Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिककरांची आणखी चलनकोंडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा बाद झाल्यानंतर ३७ दिवसांनी बँकांकडे असलेल्या चलनाचे वास्तव जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत समोर आले. जिल्ह्यातील एकूण ५२५ राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ६,४०० कोटींची मागणी केली होती. मात्र, आतापर्यंत त्यांना केवळ १,९६८ कोटी रुपये मिळाले आहेत.


या बँकांकडे केवळ ४१७ कोटी रुपये शिल्लक असून, त्यात ३४९ कोटी एकट्या स्टेट बँकेकडे आहेत, तर इतर बँकांकडे केवळ ६८ कोटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिकसह जिल्ह्यातील नागरिकांची चलनकोंडी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

नोटा बाद झाल्यानंतर बँकांनी एकत्र माहिती दिली नसल्याने जिल्ह्यातील कॅश तुटवड्याचे हे भीषण चित्र सुरुवातीला समोर आलेच नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर हे आकडे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या सर्व बँकांमध्ये पाचशेच्या नोटा केवळ १७ कोटी २५ लाख रुपये आतापर्यंत चलनात आले असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ९०३ पैकी स्टेट बँकेचेच ८० टक्के एटीएम सुरू होते, तर उर्वरित ५२४ बँकांचे एटीएम या काळात जवळपास बंदच होते. त्यातील तुरळक एटीएम चालू-बंद होते. अशा परिस्थितीत सरकारने एटीएम सुरू केल्याचा दावाही कसा फोल ठरला हेही समोर आले आहे.

शुक्रवारी या बँकांना रिझर्व्ह बँकेतून सायंकाळपर्यंत पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे तो आकडा समोर आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर बँकांची स्थिती खूपच भयावह असली तरी त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत जिल्हाधिकारीही हतबल आहेत. याअगोदरच त्यांनी समान कॅश वाटप व्हावी यासाठी अधिकार देण्याचा प्रस्ताव पाठवला होता; पण त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही.

सात गावे घेतली दत्तक

कॅशलेस गावे व्हावी यासाठी प्रत्येक बँकेने एक गाव दत्तक घ्यावे, या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला सात बँकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाने सय्यदपिंप्री, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दरी महिरवणी, महाराष्ट्र बँकेने चांदवड तालुक्यातील भोयेगाव, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने दिंडोरी तालुक्यातील अवनखेड, देना बँकेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली तर बँक ऑफ बडोदाने येवला तालुक्यातील अंदरसूल ही गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये आता कॅशलेस व्यवहार व्हावे यासाठी बँकांकडून बँकिंग सुविधाही देण्यात येणार आहेत.

वाटप १,२०० कोटी

जिल्ह्यात आतापर्यंत किती पैसे वाटले याचा आकडा अद्याप समोर आला नसला तरी या बैठकीत १,५५० कोटी रुपये वाटप झाल्याचा ढोबळ आकडा सांगण्यात आला. त्यात ३०० कोटींहून अधिक रुपये नाशिकमधील बँकांच्या करन्सी चेस्टमधून बाहेर जिल्ह्यात पाठवण्यात आले आहेत, तर आतापर्यंत केवळ १,२०० कोटींच्या आसपासच पैसे वाटप झाल्याची चर्चाही या बैठकीत होती. त्यामुळे जिल्ह्यात एकूण किती पैसे वाटले, याबाबतही ठळक आकडेवारी समोर आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चीन, इजिप्तचा कांदा ठरतोय सरस

$
0
0

म. टा. वृत्तोवा, निफाड
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची विक्रमी आवक होण्यास सुरुवात झाल्याने गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचे भावात १ हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. देशांतर्गत गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाल्याने बाजार भावात घसरण होत आहे. तसेच चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून आखाती देशात भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त दरात कांदा उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने ही घसरण होत आहे.

निर्यात बंदचा फटका

ख्रिसमसमुळे श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया तसेच फिलीपीन्स या देशांत १० जानेवारीपर्यंत निर्यात बंद राहणार असल्याने कांद्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता निर्यातदार व्यापारी मनोज जैन यांनी व्यक्त केली.

असा घसरला लाल कांदा (दर क्विंटलचे)

१ डिसेंबर : जास्तीत जास्त १६००, सरासरी ९५१ आणि कमीत कमी ५०० रुपये

१५ डिसेंबर : जास्तीत जास्त १०५०, सरासरी ७५० आणि कमीत कमी ५१५ रुपये

१६ डिसेंबर : जास्तीत जास्त ८६०, सरासरी ७०० आणि कमीत कमी ४०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकांची झाली वाताहत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबक रस्ता सार्वजनीक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष‌ित झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. दुभाजकांची उंची कमी, काही ठिकाणी तोडफोडमुळे वाहतुुकीस अडथळा होत आहे.

पहिला हरित चौपदरी रस्ता म्हणून कौतुक झालेल्या या मार्गाचे चौपदरीकरण करतांना दाखविलेले चित्र आणि प्रत्यक्षात रस्ता यामध्ये बरीच मोठी तफावत आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुभाजक करताना अत्यंत अरुंद आणि उंचीला कमी केल्याने वेगवान वाहने या दुभाजकावर धडकण्याची भीती वाढली आहे. बहुतेक ठिकाणी हा दुभाजक फोडून परिसरातील फार्महाऊस हॉटेल, धाबेचालकांनी सोयीचा रस्ता तयार केला आहे. या दुभाजकांमध्ये फुलझाडे लावली आहेत. काही ठिकाणी यांना बहर आला आहे, तर बऱ्याच ठिकाणी देखभालअभावी झाडे वाळली आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल, धाबे यांचा सुकाळ आहे. या व्यावसायिकांनी त्यांचे फलकांचे अतिक्रमण रस्त्याच्या साईड पट्ट्यावर केल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

आश्वासनांचा पडला विसर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पायी चालणारे आणि सायकलस्वारांसाठी ट्रक करणार असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र आज या रस्त्याची स्थिती पाहता साइडपट्टीदेखील सुस्थितीत राहीलेली नाही. साईभक्तांची यामार्गावर वर्दळ असते तसेच वारकरी भाविकदेखील मोठ्या प्रमाणात दिंडीने येत असतात. त्यांना पायी चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग आणि ठिकठिकाणी विश्रांतीस्थळे तयार करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. त्याचा
आता सर्वांनाच विसर पडला आहे. जवळपास २० किलोमीटर अंतरात २५ थांबे तयार झाले असताना स्वतंत्र साइडट्रक तयार केला असता, तर त्याचाच वापर पायी चालणाऱ्या भाविकांनादेखील झाला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात आता प्लास्टिकचे रस्ते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांपैकी काही कामे प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिक वापरून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार उपविभागांत आठ रस्त्यांच्या कामात प्लास्टिकचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबतच्या कामासाठी टेंडर काढण्यात आले असून, या रस्त्यांची कामे महिनाभरात सुरू होणार आहेत. नाशिक विभागात सर्वाधिक एकूण चार रस्त्यांवर हॉटमिक्स करताना त्यात प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे.

विविध राज्यांतून रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबरामध्ये प्लास्टिक मिसळल्यामुळे रस्ता दर्जा सुधारला आहे, तसेच प्लास्टिक कचऱ्याची समस्याही सुटण्यास मदत झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मुख्य सचिवांनी प्लास्टिकच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले. या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व मुख्य अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रातील एक काम प्लास्टिकच्या वापर डांबरामध्ये करून प्रायोगिक तत्त्वावर हे काम हाती घेण्याचे सांगण्यात आले होते.

अहवाल सरकारला जाणार

प्लास्टिकचा वापर करून रस्ते बनवण्याच्या प्रायोगिक तत्त्वाच्या आठ कामांत काही ठिकाणी एक ते दोन किलोमीटरचे रस्ते असतील, तर काही ठिकाणी नऊ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या वापराने प्लास्टिकच्या किमतीत किती फरक पडतो, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रत्येक तीन महिन्यांनी तपासणी करून एक वर्षानंतर या कामाचा अहवाल सरकारला पाठवला जाणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या आठही रस्त्यांच्या कामावर ९ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करताना तो हॉटमिक्समध्येच केला जाणार आहे. त्यामुळे अगोदर रस्त्याचे इतर प्राथमिक कामे केली जातील व त्यानंतर प्लास्टिकचा वापर होणार आहे.

मार्गदर्शक सूचना

प्लास्टिकचा वापर करताना राज्य सरकारने भारतीय रस्ते महासभेकडून प्रकाशित मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हे काम करताना या सूचनांचे काटेकोर पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सूचनांमध्ये रस्ते तयार करताना त्या कामात प्लास्टिकचे प्रमाण किती असावे व ते कोणत्या पद्धतीने वापरावे, अशा सर्वांचा समावेश आहे.

या रस्त्यांचा समावेश (अंतर किलोमीटरमध्ये)

- पंचाळे ते शहा रस्ता - १.५
- साकूर फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्ता - १
- साकोरे-कोकणगावजवळील रस्ता - १.५
- पिंपळगाव ते चिंचखेड रस्ता - १
- पेठ-तोरंगण-हरसूल रस्ता - ५
- मालेगाव ते चंदनपुरी येसगाव - ९
- मालेगाव ते सटाणा रस्ता - ५.४६५
- खामखेडा-सावळी रस्ता, देवळा - २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकाणी वाचनालयात ज्ञान, प्रबोधनाची मेजवानी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नुकतीच झालेली महास्वच्छता मोहीम आणि त्यानंतर शहरात पसरलेला थंडीचा गारवा यामुळे सगळीकडेच उल्हस‌ित वातावरण झाले आहे. या वातावरणात मालेगावकरांना ज्ञान, प्रबोधनासह मनोरंजनाची संधी चालून आली आहे. येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारपासून (दि. १८) २५ डिसेंबरपर्यंत ग्रंथालय सप्ताह आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आला आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांनी दिली.

शतकोत्तर कार्यकाल पूर्ण करणाऱ्या या वाचनालयाचा हा उपक्रम अर्धशतकाहून अधिक काळ सातत्याने सुरू आहे. रविवारी १८ डिसेंबर रविवारी येथील मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्या हस्ते ग्रंथालय सप्ताहाचे उदघाटन होईल. त्यादिवशी सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि एवरेस्ट मोहिमेचे कप्तान उमेश झिरपे (पुणे) यांचे ‘एवरेस्ट मोहिमेचा प्रवास’ या विषयावर एवरेस्टच्या स्लाइड शोसह व्याख्यान होईल. यासह सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध विषयांवरील व्याख्याने स्लाईड शोसह या व्याख्यानमालेत श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेतील सर्व कार्यक्रम रोज रात्री ८ वाजता वाचनालयील सभागृहात होतील. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी या कार्यक्रमांचा व सभासद योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह आणि प्रदीप कापडिया, अॅड. उदय कुलकर्णी, मिलिंद गवांदे, सुरेंद्र टिपरे, रविराज सोनार, पुरुषोत्तम तापडे या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मराठी गझल मुशायराने समारोप

शतकोत्तर परंपरा असलेल्या या व्याख्यानमालेचा शेवट यावेळी रविवार, २५ डिसेंबर रोजी सुरेश भट गझल मंच, पुणे प्रस्तुत ‘गझलरंग-मराठी गझल मुशायरा’ ह्या आगळ्या साहित्यिक कार्यक्रमाद्वारे होईल. शाहीर सुरेशकुमार वैराळकर सूत्रसंचालन करीत असलेल्या ह्या कार्यक्रमात दहा नामवंत गझलकार कवी सहभागी होणार आहेत. समारोपाच्या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले हे प्रमुख पाहुणे असतील.

विषय व व्याख्याते

१८ डिसेंबर - एवरेस्ट मोहिमेचा प्रवास - एव्हरेस्टवीर उमेश झिरपे (पुणे)

१९ डिसेंबर - संघर्षग्रस्त ईशान्य भारत आणि आपण' - मिलिंद चंपानेरकर(पुणे)

२० डिसेंबर - आकाशातील आश्चर्ये - पंचांगकर्ते श्री. दा. कृ. सोमण (ठाणे)

२१ डिसेंबर - समान नागरी कायद्याबद्दलचे समज आणि गैरसमज-सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रमा सरोदे (पुणे)

२२ डिसेंबर - चित्रसृष्टी आणि साहित्य सृष्टीत इथे-तिथे - सिने-साहित्य पत्रकार रवीप्रकाश कुलकर्णी (डोंबिवली)

२३ डिसेंबर - काश्मीर: काल, आज आणि उद्या ' - जाहिद भट्ट

२४ डिसेंबर - नोटबंदी आणि सर्वसमावेशक विकास - अर्थविश्लेषक मिलिंद मुरुगकर (नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाचखोरांना घेतले ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबर महिन्यात थंडावलेले लाचखोरीचे प्रकार पुन्हा जोर धरू लागले आहेत. नोटांची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे तर हे प्रकार वाढीस लागले असावेत, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. अॅण्टी करप्शन ब्युरोने शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे मारीत चार जणांना जेरबंद केले. यात एका सहायक पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे.

केतन काशिनाथ राठोड असे मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. तब्बल चार महिन्यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारीच्या चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली हे विशेष. मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून ऑगस्ट महिन्यात तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबीयांविरुध्द छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात नियमित हजेरी टाळण्याबरोबरच सहाय्य करण्याच्या मोबदल्यात एपीआय राठोड याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी रक्कम देण्याचे ठरले होते. यावेळी एसीबीसह तक्रारदाराने योग्य खबरदारी घेतली. एपीआय राठोड मुंबई नाका पोलिस स्टेशनजवळील साहेबा हॉटेलसमोर आपल्या कारमधून आला होता. त्याने तक्रारदारास इशारा करून कारच्या दिशेने बोलावले. मात्र, सापळ्याची कुणकुण लागताच त्याने पोबारा केला. या घटनेची तब्बल चार महिन्यांपासून एसीबीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत राठोड पैशांची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम १५ प्रमाणे मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीने गुरुवारी रात्री उशिरा राठोडला ताब्यात घेतले. ही कारवाई उपअधीक्षक प्रभाकर घाडगे यांच्या पथकाने केली.

मुख्याध्यापकासह उपशिक्षक जाळ्यात

दहावी बोर्डाच्या परीक्षेचा बाह्यविद्यार्थी म्हणून १७ नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पेठ तालुक्यातील कुंभाळे येथील चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत राघो भामरे आणि उपशिक्षक पंकज कारभारी गरूड यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मूळ तक्रारदार आणि त्याच्या मित्राने १७ नंबरचा फॉर्म भरला. मात्र प्रत्यक्ष परीक्षेचा फॉर्म भरून घेण्यासाठी लाचखोर शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थ्यांकडे प्रत्येकी पंधराशे रुपयांची मागणी केली. यापैकी एकाने पाचशे, तर दुसऱ्याने एक हजार रुपये परीक्षा फी ५ डिसेंबर रोजी जमा केली. उर्वहित पैसे नंतर देण्याचे ठरले होते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने मुलांच्या पालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करीत गुरुवारी ही कारवाई केली. लाचखोर मुख्याध्यापक भामरे यांच्या दालनात एसीबीने सापळा रचून दोघांना जेरबंद केले.

तलाठी सापडला

सिन्नर तालुक्यातील पाथरे-सायाळे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर तहसील कार्यालय परिसरात धान्य गोदामाजवळ १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. कुमारसिंग मगनसिंग परदेशी (वय ५४) असे या तलाठ्याचे नाव असून, सध्या ते पाथरे-सायाळे येथे कार्यरत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाइट ड्रेस घोटाळा विधिमंडळात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागातील नाइट ड्रेस घोटाळा शुक्रवारी राज्य विधिमंडळात गाजला असून, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच नैतिकता असेल तर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचा राजीनामा द्यावा, असे आव्हान विखे-पाटील यांनी सावरांना दिले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने शुक्रवारी आदिवासी विभागातील २२ कोटींचा नाइट ड्रेस खरेदीचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारला या प्रश्नी जाब विचारला असून, शनिवारी सरकारकडून यावर उत्तर दिले जाणार आहे.

राज्य सरकारला अंधारात ठेवून तत्कालीन दोन आयुक्तांनी २२ कोटींचे नाइट ड्रेस परस्पर आपल्या अधिकारात खरेदी केल्याचे प्रकरण ‘मटा’ने उघडकीस आणले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला धारेवर धरत, या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत जाब विचारला. कुपोषणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना चांगलेच फैलावर घेतले. या विभागात यापूर्वी स्वेटर, रेनकोट खरेदी घोटाळे झाले आहेत. आता नाइट ड्रेसचा घोटाळा समोर आला आहे. नाइट ड्रेसची खरेदी करण्याच्या निर्णयावर निशाणा साधताना ते म्हणाले, की आदिवासी विकास विभाग कुपोषित आदिवासी बालकांना पोषण आहार देण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे नाइट ड्रेस दिला तर उपाशी, अर्धपोटी कुपोषित बालकांना शांतपणे झोप लागेल, अशी या सरकारची भूमिका असल्याचा टोमणा त्यांनी सरकारला लगावला. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारावर सातत्याने पांघरुण घातले जात आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर मंत्री कारवाई करीत नाहीत आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करीत नाही. नैतिकता असती तर आदिवासी विकासमंत्र्यांनी आतापर्यंत स्वतःच राजीनामा दिला असता, असेही विखे-पाटील म्हणाले. या २२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत, खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शनिवारी सरकार यावर काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेखा विभाग संशयाच्या भोवऱ्यात

वित्तीय मान्यता नसतानाही तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव यांनी खरेदीचा आदेश दिला, तर सोनाली पोंक्षे यांनी बिल अदा करण्याचे आदेश दिले. मात्र, ज्या लेखा विभागाने हे बिल अदा केले, त्यांनाही वित्तीय आदेशाचा विसर पडला आहे. त्यामुळे बिल अदा करणारे लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारीही अडचणीत येणार आहेत. आदिवासी विभागाकडून या घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा होणार असल्याने हे सर्व अधिकारीही अचडणीत सापडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यागाच्या बळावरच शिक्षण संस्थांची प्रगती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामदार गोखले यांनी आपल्या बुद्धिमत्तेने ब्रिटिशांना प्रभावित केले होते. त्यांनी स्थापन केलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीमुळे अनेकांना दर्जेदार शिक्षण तर मिळालेच शिवाय, मोठमोठ्या संधीही प्राप्त झाल्या. स्थापनेच्या वेळी अनेक बाबींचा त्याग त्यांना करावा लागला असेल. मात्र, त्यागाच्या बळावर चालणाऱ्या संस्थाच शतकपूर्तीकडे वाटचाल करतात, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या पदव्युत्तर विभागाचे व ‘एसएमआरके’ कॉलेजमधील ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. संस्थेतील कार्याला प्रोत्साहन देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेतर्फे राज्यपालांना सन्मानपत्र देण्यात आले. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी शिक्षणातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलवता आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षण क्षेत्रात राबविल्या जाण्याऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या विभागीय सचिव, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी प्रास्ताविकात ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट केली.

राज्यपाल पाटील यांनी एसएमआरके कॉलेजच्या ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन करून अशा प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना निश्चितच आपल्या करिअरच्या दिशा गवसतील, असे प्रतिपादन केले. या समारंभाला इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. सी. कुलकर्णी, इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर, शैलेश गोसावी, प्राचार्य शिंपी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, उपप्राचार्या साधना देशमुख, डॉ. कविता पाटील व प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. डॉ. मोहिनी पेटकर व रसिका सप्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी आभार मानले.



‘सृजन’शीलतेचे आविष्कार...

नाशिक ः एसएमआरके कॉलेजमध्ये आयोजित ‘सृजन’ प्रदर्शनात कॉलेजमधील एकूण ३३ विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. ‘वैश्विक शांततेकडे वाटचाल’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन होते. ह्युमन डेव्हलपमेंट, होम सायन्स, टेक्सटाइल विभाग, संगीत विभाग, न्यूट्रिशियन अॅण्ड डाएटिशियन आदी विभागांचा यात समावेश होता. टेक्सटाइल म्हणजेच वस्त्रशास्त्र विभागाने खादी ही संकल्पना मांडली. अन्नशास्त्र विभागाने क्षुधाशांतीतून वैश्विक शांततेकडे हा संदेश व संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले. भाषा विभागाने साहित्यातून शांततेचा संदेश दिला आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक साहित्यातून शांततेचा संदेश देणारे साहित्य ग्रंथ त्यांनी ठेवले आहेत. ज्युनिअर कॉलेजने दहशतवादाचे दुष्परिणाम व सामाजिक विषमतेतून निर्माण होणारी हिंसा व त्यासाठीचे उपाय, नवीन समृद्ध जगाची कल्पना मांडली. कॉमर्स विभागाने शांततेच्या दिव्य प्रकाशाची प्रतिकृती साकारून प्रकाश पुढे पाठवत राहण्याचा संदेश दिला. फॅशन डिझायनिंग विभागाने टाकाऊतून टिकाऊद्वारे शांततेचा संदेश दिला आहे. बीबीए विभागाने गौतम बुद्धांची प्रतिकृती साकारून शांतता स्थापित करण्याचा संदेश दिला. संगीत विभागाने संगीताच्या माध्यमातून शांततागीत साकारले. गृह सजावट विभागाने वास्तुशास्त्र व शांतता यांचा संबंध स्पष्ट करून प्रत्येक घरात शांतता नांदावी, असा संदेश दिला.या प्रदर्शनाला शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टर्स, मॉडेल्सद्वारे प्रदूषणमुक्तीचा संदेश

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विविध प्रकारच्या प्रदूषणाचा विळख्याने पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. प्रदूषण टाळल्याने अनेक समस्या सोडविता येतील, हे दाखविण्याचे काम शहरातील माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी केले आहे. पोस्टर्स आणि मॉडेल्सच्या अफलातून कल्पनेतून त्यांनी प्रदूषणमुक्तीच्या विविध उपाययोजना मांडल्या आहेत.

महात्मा फुले कलादालनात हरितकुंभ समन्वय समिती, शिक्षण उपसंचालक आणि महापालिकेतर्फे प्रदूषणमुक्तीसाठी पोस्टर्स व मॉडेल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात नदी प्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, कचरा व्यवस्थापन यावरील उपाययोजना कशा प्रकराच्या असायला हव्यात, हे विद्यार्थ्यांनी दर्शविले आहे. विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हरितकुंभ समन्वय समितीचे सदस्य निशिकांत पगारे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, शिक्षण विभागाच्या गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, महापालिका शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, सुनील मेंढेकर, अॅड. अमोल घुगे, योगेश बर्वे, अॅड. गिरीश दंदणे, उदय थोरात, सचिन बरलीकर, कृष्णकुमार सोनवणे, प्रकाश बर्वे, किशोर पहाडी, कैलास दराडे, मनोज खरात, दत्ताराम बैरागी, श्वेताली खरात, रवी सोनवणे, राज चंद्राहास आदी उपस्थित होते.


३५० पोस्टर्स अन् १६ मॉडेल्स

प्रदर्शनात शहरातील शाळांमधून ३५० पोस्टर्स व १६ मॉडेल्सद्वारे प्रदूषणमुक्तीसाठीच्या उपाययोजना मांडण्यात आलेल्या आहेत. हे प्रदर्शन शनिवार (दि. १७)पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून, नाशिककरांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---

प्रदूषणमुक्तीसाठी नागरिकांचा सहभाग असावा आणि तो दिसावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांने स्वतःपासून प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतल्यास ही समस्या सुटू शकेल.

-निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर मनपा प्रशासनाने गुरुवारी बोलडोझर चालवले. अत्यंत रहदारीचा असलेल्या या परिसरात अनधिकृत रिक्षा थांबे, हॉटेल व्यासायिक, फेरीवाले यांचे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. त्यात नवीन बसस्थानक याच रस्त्यावर असल्याने बस वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होतो.

या परिसरात अनेक शाळा कॉलेज, बाजारपेठ असल्याने नागरिकांनादेखील या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालण्यास देखील जागा नसते. बेशिस्त वाहतूक, अनधिकृत थांबे, अतिक्रमण अशा अनेक समस्यांच्या विळख्यात नवीन बस स्थानक परिसर अडकला आहे. येथील मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव विभागाला मात्र अखेर जाग आली असून, या नवीनबस स्थानकाबाहेरील रस्त्यालगत मनपाच्या जागेवरील अतिक्रमण हाटवण्याची कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण नि‌र्मूलन अधीक्षक दीपक हादगे, शहर अभियंता कैलास बच्छाव तसेच नगररचना विभाग अधिकारी, बीट मुकादम संजय जगताप आदींसह अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचारी यांनी दोन जेसीबी तसेच एक ट्रॅक्टरच्या साह्याने हे अतिक्रमण हटवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संगीत मानापमान’ने वसंतोत्सवास सुरुवात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिशय धीरगंभीर पदे, श्रीमंतीचा थाट, दागिने, भरजरी पोशाखांची अक्षरश: लयलूट अशा वातावरणात संगीत मानापमान नाटक सादर झाले. नाशिकमध्ये शुक्रवार (दि. १६) पासून दुसऱ्या वसंतोत्सवास दमदार सुरुवात झाली. पुढील दोन दिवसांत प्रसिद्ध गायकांकडून गाण्यांची मेजवानी मिळणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘वसंतोत्सव’ हा शास्त्रीय संगीतमय कार्यक्रम होत असतो. वसंतोत्सवाचे नाशिकमधले यंदाचा दुसरे वर्ष आहे. या संगीतमय कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आनंद भाटे, कौशिकी चक्रवर्ती यांच्यासह डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांचे सुश्राव्य शास्त्रीय गायन नाशिककरांना ऐकण्याची संधी लाभणार आहे. वसंतोत्सवात पहिल्या दिवशी संगीत मानापमान नाटक झाले.

नाट्यसंगीत या शब्दामधे महाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे ही दिग्गज मंडळी पदे गायची तेव्हा प्रेक्षक बेहोष होत असत. अनेक नाट्यपदे आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होत नाही. संगीत मानापमान हे नाटक त्यापैकीच एक.

त्या काळात गाजलेल्या संगीत नाटकांपैकी ‘संगीत मानापमान’ हे नाटक अतिशय गाजलेले नाटक आहे. या नाटकाचे पुनरूज्जीवन शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांनी केले. महाराष्ट्रात या नाटकाचे अनेक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नाशिकला बऱ्याच वर्षांनी या नाटकाचा प्रयोग झाला. दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी यांनी केले आहे तर राहूल देशपांडे यांनी यात मुख्य भूमिका केली आहे.

परिस्थितीनं गरीब पण कर्तृत्वाने शूर असणारा नायक आणि स्वत:च्या ऐश्वर्याची घमेंड असणारी नायिका यामध्ये पहिल्याच प्रवेशात घडलेला संघर्ष यामधून ‘मानापमान’ सुरू होते व नाटकाच्या समाप्तीपर्यंत नायिकेसह प्रेक्षकास स्वकर्तृत्व मोठे करण्यास प्रवृत्त करते. श्रीमंत कुळात वाढलेली ‘भामिनी’, ‘धनी मी पती वरीन कशी अधना’ असं म्हणत सेनापती असलेल्या पराक्रमी धैर्यधराशी लग्न करण्यास साफ नकार देते. या अपमानामुळे धैर्यधराच्या मनात भामिनीविषयी शेवटपर्यंत तिरस्कारच दाखवत, ‘स्वत:च्या पराक्रमानेच पत्नी मिळवून दाखविन’ अशी ईर्ष्या यातून दिसते.

आज वसंतोत्सवात

आज (दि. १७) वसंतोत्सवात सकाळच्या सत्रात ७ वाजता आनंद भाटे यांचे गायन तर सायंकाळच्या सत्रात ६ वाजता राहूल देशपांडे यांचे गायन व नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा परीक्षा निकालावर आक्षेप

$
0
0

चुकीच्या प्रश्नाला दिले सरसकट गुण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जलसंपदा विभागाच्या राज्यभर झालेल्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता पदाच्या सरळसेवा भरती परीक्षेत चुकीचे प्रश्न व उत्तर दिल्यामुळे तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना ८ ते १० गुणांची खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या सत्रात बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत ही गुण पद्धत आमच्यावरच अन्याय करणार असल्याची सांगत जाहीर पत्रक प्रसिद्धीस दिल्याने या परीक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या परीक्षेत राज्यभरातून ३५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून दोन सत्रात बसलेल्यांची संख्या ही २४ हजारांच्या आसपास आहे. या परीक्षा सकाळ, दुपार व सायंकाळ अशा सत्रात होत्या. त्यात सर्वच प्रश्नपत्रिका या वेगवेगळ्या होत्या. या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत नव्हती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शंभर प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. परंतु तिसऱ्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत असलेल्या चुकीच्या प्रश्नांचे व उत्तरांचे गुण देण्यात आले आहे. त्याबाबत जलसंपदा विभागाच्या परीक्षा नियंत्रणाकडून तसे ई-मेल सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. तक्रार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत अन्याय झाले असल्याचे सांगितले. तरी त्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांवर पैशाची खैरात केली आहे. ते सर्वच प्रश्न त्यांचे बरोबर आले नसते तसे गृहित धरणेही चुकीचे आहे. दोन सत्रांतील विद्यार्थ्यांना या अतिरिक्त गुणांचा फटका बसेल. त्यामुळे या परीक्षेबाबत सरकारने पुनर्विचार करावा, असेही या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रदीप कातकडे, जयराम वरपे, योगेश कातकडे, माधुरी मेवाडे, हर्षला देवरे यांनी तक्रार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकत सर्व्हेक्षणाला सोमवारचा मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मिळकतींचा बहुप्रतिक्षीत सर्व्हेक्षण अखेर मार्गी लागले असून सोमवार पासून या सर्व्हेक्षणाला सुरुवात होणार आहे. जीओ इन्फोटेक कंपनीचे १३० सर्व्हेक्षणार्थी नाशिकमध्ये दाखल झाले असून शुक्रवारपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. सोमवारपासून नाशिक पश्चिममधून याला सुरुवात होणार असून यातून १५ ते २० टक्के मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षापासून महापालिकेचे मिळकत सर्व्हेक्षण विविध कारणांनी अडकले आहे.यापूर्वीचा ठेकेदारानाने अर्धवट काम सोडल्याने काम ठप्प झाले होते. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदा काढल्या होत्या.

त्यामध्ये दिल्लीतील जीओ इन्फोटेक या कंपनीने कमी दराच्या निविदा सादर केल्याने त्या कंपनीला हे काम देण्यात आले असून सोमवार पासून कंपनीने सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी कंपनीचे १३० कर्मचारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांचे प्रशिक्षण पालिकेने सुरू केले आहे.

कंपनीच्या वतीने हायटेक पद्धतीचा वापर होणार आहे. त्यात टॅबद्वारे सर्व्हेक्षण केले जाणार असून प्रत्यक्ष मिळकतींची मोजमाप ऑनलाइन पद्धतीने टॅबवर केली जाणार आहे. यावर महापालिकेचाही वॉच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षात ८४ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सटाणा तालुक्यातील विंचुरे या गावी राजाराम महादू गायकवाड (वय ४८) या शेतकऱ्याने गुरुवारी आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा ८४ वर पोहोचला आहे. गायकवाड यांनी विषप्रशान करून आत्महत्या केली असून, त्यामागील नेमके कारण पुढे आलेले नाही. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस व धरणे भरलेली असतानाही आत्महत्या होत असल्यामुळे शासनाची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केला होती. यंदा आतापर्यंत हाच आकडा ८४ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात १९ व्या शतकात शेतकरी आत्महत्याचा विषय फारसा समोर आला नाही. पण २० व्या शतकात त्याचे प्रमाण २००६ पासून सुरू झाले व त्यात नंतर वाढच होत गेली. जिल्ह्यात २००१ मध्ये केवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली पण तोही नंतर मदतीसाठी अपात्र ठरला. त्यानंतर २००२ व २००३ मध्ये एकही आत्महत्या नव्हती. त्यानंतर २००४ मध्ये ५, तर २००५ मध्ये ३ आत्महत्या झाल्या. त्यानंतर २००६ पासून यात वाढ होत दरवर्षी दोन आकडी झाला. शेतकरी आत्महत्याचे सत्र राज्यभर सुरू आहे, पण नाशिकमध्येही त्याचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येमागे वेगवेगळी कारणे असली तरी त्यात शाश्वत शेती नसणे हे मुख्य कारण पुढे आले आहे. त्यामुळे कर्ज व नैराश्यातून या आत्महत्या झाल्याचे बोलले जात आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्ती व त्यानंतर कर्ज व मालाला भाव नसणे हीसुध्दा यामागील कारणे आहे. पण सरकारने या सर्व आपत्तीनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे पाऊल न उचल्यामुळे त्यात वाढच होत आहे.

अकरा वर्षातील शेतकरी आत्महत्या

२००६ -३८, २००७ -२९, २००८- ४०, २००९ - २०, २०१०- ३०, २०११-३४, २०१२-१९, २०१३-१५, २०१४-४२, २०१५-८५, २०१६-८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत ठेकेदाराविरुद्ध ठिय्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

परिसरातील मोरवाडी येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण झाले असले, तरी येथील ठेकेदाराकडून येथे येणाऱ्या नागरिकांशी केल्या जाणाऱ्या अरेरावीच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी सिडकोतील सर्वपक्षीय नगरसेवकांसह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठेकेदाराविरुद्ध ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. येथील समस्या आयुक्‍तांना कळविल्या जाणार असल्याचे आश्वासन विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

मोरवाडी येथील स्मशानभूमीच्या देखभालीचा ठेका अनेक वर्षांपासून एकाच व्यक्‍तीकडे देण्यात येत आहे. अनेक वेळा विद्यमान नगरसेवकांशी या ठेकेदारांचे खटके उडत असतात. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नसल्याचे आरोप केले जात आहेत. संबंधित ठेकेदार हा सामान्य नागरिकांशीसुद्धा अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी नगरसेवक डॉ. अरविंद शेळके यांच्याशीसुद्धा वाद करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी संबंधित ठेकेदाराने दिली होती. विविध राजकीय नेत्यांना आलेल्या अनुभवानंतर शुक्रवारी सिडकोतील माजी नगरसेविका सुमन सोनवणे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, शीतल भामरे, लक्ष्मण जायभावे, अरविंद शेळके या नगरसेवकांसह गोविंद घुगे, संजय भामरे, बाबुलाल निकम, मयूर परदेशी, सतीश खैरनार, गोपाळ जायभावे, राहुल सोनावणे, सीताराम सांगळे, शिवाजी बरके, माणिक जायभावे, मुकेश शहाणे, अरुण वेताळ आदींसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्याकडे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांकडून समस्यांची माहिती घेतली जात असताना संबंधित ठेकेदाराने थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मोरवाडी स्मशानभूमीमध्ये रात्री-अपरात्री मद्यप्राशनाचे प्रकार घडत असून, मद्याच्या बाटल्याही यावेळी अधिकाऱ्यांना दाखविण्यात आल्या. येथील सर्व प्रकाराची माहिती आयुक्‍तांना कळविली जाणार असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. कुमावत यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

वरदहस्ताची चर्चा

संबंधित ठेकेदार आवश्यक ते अंत्यविधीचे साहित्य देत नसल्याचे आरोप यापूर्वी वारंवार करण्यात आले होते. यापूर्वीदेखील अनेकदा नगरसेवकांनी तक्रारी करूनही या ठेकेदारावर कारवाई होत नसल्याने या ठेकेदाराच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे, याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

…तर टाळे ठोकणार

अंत्यविधीसाठी आलेल्यांना आवश्यक ते साहित्य न देणे, रॉकेलचा साठा असतानाही रॉकेल शिल्लक नसल्याचे सांगून गैरसोय करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला. स्मशानभूमीलगतच्या महानुभाव पंथाच्या दफनभूमीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. दफनासाठी आल्यानंतर खडडा करण्यासाठी पैशाचीसुद्धा मागणी केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या स्मशानभूमीची योग्य रीतीने देखभाल न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच धार्मिक स्थळांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेने दाखल केलेल्या पाच अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला हायकोर्टाने १६ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे या धार्मिक स्थळांना दिलासा मिळाला आहे. परंतु, शहरातील अन्य अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई सुरूच राहणार आहे. दरम्यान, हायकोर्टाने महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणावर ताशेरे ओढले असून, मालकीच्या जागा नसताना कारवाई का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, या धार्मिक स्थळांसंदर्भातील मालकी पुढच्या सुनावणीत सादर करण्याचे आदेश दिले.

महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात सुरू केलेल्या कारवाईविरोधात शिवसेनेच्या दिलीप दातीर व भागवत आरोटे यांच्यासह पाच जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पालिकेने पहिल्या टप्प्यात ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटवली असून, दुसऱ्या टप्प्यात ५७ धार्मिक स्थळांना नोटिसा दिल्या आहेत. ३० डिसेंबरपूर्वी त्यांच्यावर कारवाई करायची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने दातीर यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर चुंचाळे येथील अष्टविनायक गणपती मंदिर, सिध्दिविनायक गणपती मंदिर, राम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर या पाच धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. येत्या १६ जानेवारीपर्यंत जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेने ओपन स्पेसवरील धार्मिक स्थळांवरही कारवाई सुरू केली आहे. त्याला हायकोर्टाने आक्षेप घेतला असून, सर्व्हेक्षण हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. एखाद्या जागेवरील लेआऊटवर स्थानिकांचा अधिकार असतो. त्यामुळे ती जागा पालिकेकडे हस्तांतरित नसतानाही या जागेवर कारवाई का? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे. या जागांची मालकी तुमच्याकडे असल्याचे पुरावे १६ जानेवारीपर्यंत सादर करा, असे आदेश देऊन पालिकेला फटकारले आहे.

शिवसेनेचा डाव फसला

अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात शिवसेनेने थेट भूमिका घेत कारवाईला विरोध केला होता. परंतु, हायकोर्टात केवळ पाचच मंदिरांबाबत याचिका दाखल केली. त्यामुळे हायकोर्टाने चार धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थगिती दिली. शहरातील सर्व धार्मिक स्थळांसंदर्भातील उल्लेख त्यात केला असता, तर संपूर्ण शहरातील कारवाईलाच स्थगिती मिळाली असती. परंतु, तशी स्थगिती न मिळाल्याने शिवसेनेची निराशा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ नियुक्तीवरून ‘शिवसेना-भाजप’ जुंपली

$
0
0

आमदार सानप, फरांदेची सरकारकडून नियुक्ती; घोलप संतप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर राज्य सरकारने आमदार बाळासाहेब सानप व प्रा. देवयानी फरांदे या दोघांची निवड केली आहे. परंतू, या निवडीवर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देवळाली मतदारसंघात विद्यापीठ येऊनही देवळालीच्या आमदारांना का डावलण्यात आले, असा सवाल आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित केला आहे. सरकार शिवसेनेला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप घोलप यांनी केला आहे. त्यामुळे या विद्यापीठावरील निवडीवरून आगामी काळात शिवसेना व भाजपमधील भांडणात भरच पडणार आहे, असे चित्र दिसत आहे.

देवळाली मतदारसंघातील गोवर्धन शिवारात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर आमदार बाळासाहेब सानप व प्रा. देवयानी फरांदे यांची निवड केली. परंतू, ही निवड करताना सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर अन्याय करण्यात आला आहे. मुक्त विद्यापीठ हे देवळालीमतदार संघात येत असताना, मतदारसघांबाहेरील भाजपच्या आमदारांची वर्णी लावण्यात आली आहे. केवळ शिवसेनेला शह देण्यासाठी विद्यापीठ ज्या विधानसभा मतदारसंघात आहे त्याऐवजी दुसऱ्याच मतदारसंघातील आमदारांची निवड करून शिवसेनेला डिवचण्यात आले आहे. भाजपकडून शिवसेनेला कमी लेखण्याचा हा प्रकार आहे. अशा शब्दांत निर्णयावर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात आघाडीचे सरकार असतांनाही, देवळाची आमदार म्हणून माजीमंत्री बबनराव घोलप यांची नियुक्ती केली जात होती. परंतू, युती सरकारच्या काळात मात्र सत्तेतीलच घटक पक्षालाच ठेंगा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप आमदार योगेश घोलप यांनी केला आहे. भाजपने शिवसेनेवर आमदाराला डावलून इतर मतदारसंघांच्या आमदारांची या विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती केली असल्याची गरमागरम चर्चा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतून शुक्रवारी सुरू होती. राज्याच्या सत्तेतील घटक पक्षालाच भाजपकडून कमी लेखण्याचा हा प्रकार असल्याच्या या निवडीवर शिवसेना नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित प्रकार हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना व भाजपमधील संघर्ष अधिक विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक वेगवेगळ्या कारणांनी सतत होरपळत आहेत. त्यातच महिनाभरापासून सुरू असलेली चलनटंचाई आणि त्यातच कांदा दरात झालेली मोठ्या घसरण यामुळे शेतकरी वर्गात संताप उसळला असून, त्याचे पडसाद मनमाड शहरात उमटले. शुक्रवारी सकाळी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मनमाड बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडून नंतर मनमाड-मालेगाव चौफुलीवर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळी बाजार समितीत आल्या नंतर शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणा वर घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. मनमाड चौफुलीवर येत रस्त्यावर ठाण मांडले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळावा, अशी मागणी केली. आंदोलनात शेतकरी उत्स्फूर्त पणे सहभागी झाले. गोपीनाथ झाल्टे हे स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बाजार समितीचे संचालक किशोर लहाने, भाऊसाहेब जाधव, भागाजी यमगर, सचिव कुलथे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांच्या भावना शासन दरबारी पोहचवू, असे आश्वासन दिले. मनमाड शहर पोल‌िस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

शंभर रुपयांनी घट

मनमाड बाजार समितीत दोन दिवसांपासून कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकरी अस्वस्थ होते. गुरुवारी कांद्याला असलेल्या भावात तब्बल शंभर रुपयाने घट होऊन ६०० ते ६५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली. गुरुवारी कांद्याला ७५० भाव होता. त्यामुळे शेतकरी वैतागले. त्यांनी लिलाव बंद पाडून रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनजीटी’चा आदेश महापालिकेला प्राप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या खतप्रकल्पामुळे पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील नव्या बांधकामांवरील लावलेली बंदी उठवल्यानंतर एनजीटीचा आदेश पालिकेला अखेर प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता बांधकाम परवानगींचा मार्ग मोकळा झाला असून रखडलेल्या बांधकाम परवानगींसाठी स्वतंत्र सेल सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. १६) पालिकेला आदेश प्राप्त होताच, पालिकेने परवानगी देण्यांसदर्भातील कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खतप्रकल्पातील अनास्थेमुळे एनजीटीने गेल्यावर्षी शहरातील नवीन बांधकामांवर निर्बंध घातले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नवीन बांधकामे बंद करण्यात आली होती. महापालिकेने एनजीटीत पुनर्विलोकन अर्जही दाखल केला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी एनजीटीत पालिकेच्या पुनर्विलोकन अर्जावर सुनावणी होऊन एनजीटीने घातलेले निर्बंध उठवले होते. त्यामुळे बांधकामांना दिलासा मिळाला होता. परंतू लेखी आदेश पालिकेला प्राप्त झालेला नव्हता, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेरीस शुक्रवारी पालिकेला एनजीटीचा आदेश प्राप्त झाला असून नवीन बांधकामावरील सर्व निर्बंध हटले आहेत. तसेच खत प्रकल्प सुरळीत सुरू ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत. एकूण २० हजार चौरस मीटर वरील बांधकामांना पर्यावरण मंत्रालयाची अट कायम ठेवण्यात आली आहे.

कपाट प्रश्नाच्या तोडग्याकडे नजरा

महापालिकेच्या नगररचना विभागाला संबधित आदेश प्राप्त झाल्यानंतर पालिकेने प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र सेल स्थापन करण्यात आला आहे. यामार्फत तातडीने नव्या बांधकाम परवानगी दिल्या जाणार आहेत. तसेच यापूर्वी दाखल झालेल्या परवानगींसाठीही फास्ट ट्रॅकवर निर्णय घेतले जाणार आहेत. आदेशात स्पष्टता असल्याने परवानग्या देतांना नगररचना विभागाला आता कोणत्याही अडचणी नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे. एनजीटीच्या निर्णयानंतर आता कपाट प्रश्नाच्या तोडग्याकडे आता बिल्डरांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’त अद्याप सावळागोंधळ सुरूच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयात उद्भवलेल्या प्रश्नांसंदर्भात निवड समितीने शुक्रवारपासून कसून चौकशीस सुरुवात केली आहे. या चौकशीत दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकून घेतले जात असून सार्वजनिक वाचनालयाच्या दुर्दैवाचे दशावतार पुन्हा एकदा सुरू झाल्याचे यावरून दिसू लागले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार मागील पंचवार्षिकच्या कार्यकारिणीला पायउतार व्हावे लागले. तीच बेकायदेशीर परिस्थिती वाचनालयात पुन्हा नव्याने अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली की काय, असा प्रश्न वाचनालय प्रेमींना पडला आहे.

साधारणत: दीड महिन्यांपूर्वी तत्कालीन पदाधिकाऱ्यांचे काम थांबवून अध्यक्षांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांची ही कृती बेकायदा असल्याचे सांगितले. त्यावर अ‍ॅडव्होकेट नागनाथ गोरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची एक अभ्यास समिती नेमण्यात आली. त्या अभ्यास समितीचा निर्णय अजून आलेला नसताना गुरुवारी (दि. १५) अध्यक्षांनी सभा बोलवून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. समितीच्या कुठल्याही नियमाला बांधील न राहता औरंगाबादकर गटाने सातत्याने काही ना काही कारवाया सुरूच ठेवलेल्या आहेत. कार्यकारिणीची बैठक घेऊ नये, कोर्टात कोणतीही भूमिका घेऊ नये, पेपरबाजी करू नये आणि नेमलेले प्रभारी पदाधिकारी काढून टाकावे. जुन्याच पदाधिकाऱ्यांना सह्यांचे अधिकार द्यावेत, असे ठरले असल्याचे कळते; मात्र यापैकी कुठलीही अट औरंगाबादकर आणि प्रभारी पदाधिकाऱ्यांनी न ऐकता सातत्याने आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले आहेत. सावानाच्या घटनेत कलम २२ मध्ये अध्यक्षांना असलेल्या अधिकारांची नोंद आहे. त्यामध्ये कुठेही प्रभारी नियुक्त्यांचे अधिकार अध्यक्षांना नाहीत; मात्र सगळे वाचनालय आपणच चालवू शकतो, अशा अविर्भावात औरंगाबादकर यांनी गेले दीड महिना कामकाज चालूच ठेवले आहे. त्याबद्दलही नाशिककरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

रमेश जुन्नरे यांना कार्यपद्धतीबद्दल कार्यकारी मंडळाने काढून टाकले असून ते सभासद म्हणूनसुद्धा वाचनालयात नाहीत; तरीही अध्यक्षांनी स्वत: आदेश काढून त्यांना पुन्हा कार्यकारी मंडळात घेतले आहे. तसेच प्रकरण डॉ. वेदश्री थिगळे यांचे असून त्यांनाही श्रीकांत बेणी यांच्या अल्प मतातील कार्यकाळात सहकार्य केल्याबद्दल काढून टाकण्यात आले आहे. डॉ. थिगळे यादेखील वाचनालयाच्या सर्वसाधारण सभासद नसून त्यांना गुरुवारच्या सभेत सांस्कृतिक सचिव करण्यात आले आहे. कार्यकारी मंडळ हे सर्वोच्च असताना अध्यक्ष म्हणून स्वत:ला सर्वेसर्वा मानण्याचा मनसुबा औरंगाबादकर यांच्या कामकाजातून व्यक्त होतो. झेंडे-बेणी यांना धर्मादाय आयुक्तांकडून वाचनालयाचा कारभार कायदेशीर व्यक्तींच्या हातात नाही. हे जसे ऐकावे लागले होते त्याचीच वाट औरंगाबादकरदेखील बघताहेत की काय, अशी शंका सर्वसामान्य वाचकाला येऊ लागली आहे. औरंगाबादकर आणि तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे जी अभ्यास समिती गठित केली आहे त्याचा निर्णय येईपर्यंत तरी सामोपचाराने पुढे जाणे आवश्यक होते; मात्र तसे घडताना दिसत नाही. नव्याने निवडलेले पदाधिकारी आणि ज्यांचे काम थांबवले आहे ते सर्व अशा दोन सत्ता निर्माण झाल्या आहेत की काय? सावानाचे काय होणार? हा प्रश्न नाशिककरांना सतावतो आहे.

आम्ही समितीच्या निर्णयाची सभ्यपणे वाट पाहत आहोत. आम्ही वाचनालयाच्या उत्कर्षाचे काम केलेले असल्याने कसलीही भीती नाही. त्यामुळे आम्ही कायद्याचे उल्लंघनही करणार नाही. शीशुपालाचे शंभर अपराध भरावे लागतात, ही महाभारतातील गोष्ट सध्या बेकायदेशीर काम करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी.

-मिलिंद जहागिरदार, पदाधिकारी, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>