Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फी न भरल्याने हॉल तिकिटासाठीच ‘परीक्षा’

$
0
0

अन्यायग्रस्त विद्यार्थ्याच्या पालकांची पोलिसात धाव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ सिडको

शाळेस अपेक्षित असणारी फी विद्यार्थ्याने न भरल्याने त्याचे दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटच शाळेने दिले नसल्याचा गंभीर दावा करीत त्याच्या पालकांनी पोलिसात धाव घेत व्यथा मांडली आहे. आजपासून (८ मार्च) दहावीच्या इंग्रजी माध्यमाची परीक्षा सुरू होत आहे. या स्थितीत इतर विद्यार्थी अभ्यासाची उजळणी करीत असताना मात्र एका विद्यार्थ्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबई नाका पोलिस ठाण्यातच ठिय्या द्यावा लागल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थ्याला हॉलतिकीट न मिळाल्याने घोळ सुरूच होता.

इंग्रजी माध्यमाची दहावीची परीक्षा आज सुरू होत आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षेच्या अगोदर अदनान खान हा सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये हॉल तिकीट घेण्यास गेला होता. तेथे त्याला फी न भरल्याने हॉल तिकीट नाकारण्यात आल्याची तक्रार त्याचे पालक इलियास खान यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. याबाबत अधिक खुलासा करताना कोर्टाच्या आदेश असतानाही शाळेनेच अधिकृत फी सांगण्यास टाळाटाळ केल्याने आम्ही फी भरू शकलो नसल्याची बाजू त्यांनी मांडली. शाळेच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे संस्थाचालकांसह प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खान यांनी केली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात खान यांच्यासह शाळेचे पालक समितीचे उपाध्यक्ष नरेश माळोदे, भाजपचे प्रदीप पेशकार आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्याने साधावा संपर्क

हॉल तिकीट घेऊन जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते शाळेच्या निरोपास प्रतिसाद देत नसल्याची बाजू सेंट फ्रान्सिस शाळेने माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाकडे मांडली आहे. यामुळे आज त्या विद्यार्थ्याला शाळेकडून हॉलति‌कीट मिळते की नाही याकडे लक्ष लागले आहे.

सर्व विषयांचा अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येला शाळेच्या आडमुठेपणामुळे मला पोलिस स्टेशन गाठावे लागले आहे. अन्याय दूर करण्यासाठी येथेच अभ्यास करण्याची वेळ ओढावली आहे. शाळेकडून मिळणारी वागणूक योग्य नाही. शाळेवर कारवाई व्हावी.

- अदनान खान, विद्यार्थी

शाळेने अधिकृत फी वसूल करावी असा कोर्टाचा आदेश आहे. मात्र शाळेने आतापार्यंत अधिकृत फी ची रक्‍कम जाहीर केलेली नाही. मग आम्ही फी कशी भरणार? नियमानुसार विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट राखून ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पाल्याचे नुकसान झाल्यास त्यास शाळा प्रशासन व शिक्षण विभाग जबाबदार राहील.

- इलियास खान, पालक

कुठल्याही स्थितीत शाळेला विद्यार्थ्याचे परीक्षा हॉल तिकीट नाकारता येणार नाही. शाळेने असा प्रकार केल्याचे आढळल्यास मान्यता रद्द करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. मात्र, या प्रकरणात शाळा व विद्यार्थी दोघांचीही बाजू समजावून घेऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची बोर्डाची भूमिका आहे.

- राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्तृत्वानं ‘तिचं’ आयुष्य झालं प्रकाशमान!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

नाशिक : प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. असे असले तरी वीजक्षेत्रात महिला वायरमन म्हणून काम करणे नक्कीच सोपे नव्हते. मात्र पुरुषांनाही लाजवले अशी खांबावर चढण्यापासून ते मीटर रिपेरिंगपर्यंतची सर्व कामे करीत वैशाली वनकर यांनी कामाचा ठसा उमटवला. पुरुषांच्या या क्षेत्रात जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर आज त्यांनी यशस्वी लाइनमन म्हणून ओळख निर्माण केली आहे.

आयटीआय प्रशिक्षणानंतर कऱ्हाड ये‌थे वीज मंडळात पहिली पोस्टिंग मिळाली. या काळात त्यांनी खांबावर चढून इलेक्ट्रिकची महत्त्वाची कामे करण्यास सुरुवात केली. महिला असूनही पुरुषांना लाजवेल असे काम करीत असल्याने तेथील नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे काम करण्याचे त्यांना बळ मिळाले. दोन वर्षानंतर त्‍यांची नाशिकच्या भद्रकाली भागात बदली झाली. बिलवसुली करणे, मीटर काढून आणणे, ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करणे, त्याची निगा राखणे इत्यादी कामे त्यांनी यशस्वीपणे केली.

पुरुषांची कामे बाई करीत असल्याने पुरुषांना हेवा वाटायचा. काही लोक कामात मदत करायचे, तर काही लोक मुद्दाम त्रास द्यायचे. मात्र कृर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. चांगले अनुभव जास्त आल्याने वाईट अनुभव झाकले गेले, असे त्या म्हणतात. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये असलेल्या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरवर सध्या त्या काम करतात.

कष्टाने फुलवला संसार

महावतिरणमध्ये इंजिनीअर असलेल्या विलास यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षीच वैशाली वनकर यांच्या खांद्यावर संसाराचा भार पडला. दोन चिमुकल्या मुलांची जबाबदारी असल्यानेकाय करावे सुचेना.! पतीच्‍या जागी त्यांना तब्बल १७ वर्षांनी नोकरी मिळाली. मोठा मुलगा दोन वर्षांचा व लहान मुलगा अकरा महिन्यांचा होता. आज मोठा मुलगा वकील तर लहान मुलगा एमबीए झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगी स्वागताने भारावला अंध क्रिकेटपटू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारे भारताला अंधांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवून देणाऱ्या नाशिकरोडच्या अनिस फक्रुल्ला बेग याचे आज येथील रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आले. अंधांच्या स्पर्धेत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या या क्रिकेटवीराची चाहत्यांनी नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत घोड्यावर मिरवणूक काढली. शिवाजी महाराज आणि आंबेडकर पुतळ्यास अनिसने हार अर्पण करून अभिवादन केले. अनिसचे जंगी स्वागत बघून त्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

अंधांची विश्वकरंडक स्पर्धा नुकतीच झाली. त्यामध्ये भारताने ११ सामने खेळले. नाशिकरोड स्थानकावर येताच रिक्षा टॅक्सी युनिनयचे अहमद शेख याने अनिसला खांद्यावर उचलून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात अनिसची रेल्वे स्टेशन परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी मनसेचे नेते भय्या मणियार, श्याम गोहड, हरीश भडांगे, आमदार योगेश घोलप मित्र मंडळाचे संस्थापक रानी लव्हेरी, संतोष क्षीरसागर, अन्वर तांबोळी, बबलू बागवान, मुस्ताक शेख, युसूफ शेख, स्वप्निल दोंदे, रोहित लव्हेरी, राहुल चटोले, सचिन मेहेरोलिया, बबलू तांबोळी, मोहम्मद तांबोली, विनोद धोत्रे, राजेंद्र हिरेमठ, राहुल पाखरे, आदेश बागूल, देविदास कटारे, मनीष जगवानी, सचिन गांगुर्डे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, पंढरीनाथ ढोकणे, रेल्वे सुरक्षा दलाचे जे. ए. पठाण आदींनी अनिसचा सत्कार केला.

ताप असतानाही पाकविरुद्ध झुंजला

बेंगळूरू येथे अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. त्यावेळी अनिस तापाने फणफणत होता. तरीही तो जिद्दीने खेळला. भारताने पाकिस्तानला नऊ विकेट्सने हरवून विजेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरले. नाशिकच्या या खेळाडून नुकतीच सहकाऱ्यांसह नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही या सर्वांचे कौतुक केले. त्यानंतर अनिस आज मुंबईहून जनशताब्दीने रात्री आठच्या सुमारास नाशिकरोड स्थानकावर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील भुजबळ पर्व संपले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजप, शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही महापालिकेतील गटनेत्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक गजानन शेलार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर आता महापालिकेत पक्षाचा किल्ला लढवण्याची जबाबदारी असणार आहे. शेलार यांच्या निवडीमुळे पालिकेतील भुजबळ पर्वही संपले आहे. शेलार हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असून, माजी मंत्री छगन भुजबळ विरोधक अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीची गटनोंदणी बुधवारी केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सहा नगरसेवकांची मंगळवारी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी एकमताने गजानन शेलार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. सर्वच सदस्यांनी एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवडीनंतर कार्यालयात शेलार यांचा सत्कार करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याशी पंगा घेतल्याने गजानन शेलार काही काळ राष्ट्रवादीबाहेर होते. गेल्या वेळेस पालिकेत भुजबळ पर्व होते. परंतु, भुजबळ सध्या जेलमध्ये असल्याने भुजबळ पर्वही संपले असून, आता थेट पवार समर्थकांची वर्णी लागली आहे. शेलार आक्रमक तसेच जेष्ठ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा किल्ला आता त्यांना एकतर्फी लढवावा लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक सदस्य स्थायी समितीवर जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएमएची निवडणूक १५ मार्च रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्यावतीने २०१८-१९ या वर्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. तीन उमेदवारांनी दंड थोपटले असल्याने १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
आयएमएची निवडणूक गेली अनेक वर्षे बिनविरोध झालेली आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी मतदान पद्धतीने निवडणूक होत आहे. दरवेळी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करून निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळला जात असे. यंदाही निवडणूक न होता अध्यक्षाची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र, मंगळवारी माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. आवेष पलोड (अर्थोपेडिक सर्जन), डॉ. चंद्रकांत सुरवसे (बालरोग तज्ज्ञ), डॉ. शोधन बांदेकर (स्त्रीरोग तज्ज्ञ ) हे रिंगणात आहेत. आयएमचे जिल्ह्यात १ हजार ३५० सभासद आहेत. १५ मार्चला मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी निकाल लागणार आहे.
डॉ. प्रशांत देवरे यांनी सांगितले, की आयएमएची सभासद संख्या वाढली आहे. प्रत्येक सभासदाला आपण काही तरी करून दाखवावे अशी इच्छा असते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तीनही उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याला यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसीयूतूनच मयूर देतोय दहावीचे पेपर

$
0
0

अपघातानंतर जिद्दीने मयूर दहावी परीक्षेस प्रविष्ट

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते मात्र दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच त्याचा दुर्दैवी अपघात झाला. मात्र या अपघातानंतरदेखील खचून न जाता रुग्णालयात उपचार घेत असतानाच अतिदक्षता विभागातून (आयसीयू) दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार त्याने केला. मंगळवारी (दि. ७) त्याने दहावीचा पहिला मराठीचा पेपर दिला सुद्धा. ही कहाणी आहे येथील के. बी. एच. विद्यालयात इयत्ता १० वीस असलेल्या जिद्दी मयूर प्रकाश वाघ याची. मंगळवारपासून दहावीचे पेपर सुरू झाले असून येथील बालाजी रुग्णालयातून मयूरने पहिला मराठीचा पेपर दिला आहे. दहावीचे वर्ष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा निर्धार त्याने केला आहे.

येथील के. बी. एच. विद्यालयात मयूर शिकत असून निळगव्हाण येथील प्रकाश वाघ यांचा तो चिरंजीव आहे. दि. १ मार्चला त्यांच्या गावाहून मालेगावला स्कुटीने येत असताना रस्त्याच्या मध्यभागी अचानक तीन मुले आल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, त्याच्या उजव्या मांडीचे हाडाचे तीन तुकडे होत मोठी दुखापत झाली. त्यास तात्काळ उपचारासाठी बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मयुरला दहावीच्या परीक्षेसाठी घेत असलेल्या मेहनतीवर पाणी फिरणार याचा सल मनात होता.

वडील प्रकाश वाघ यांनाही या दुर्दैवी अपघाताने मयुरचे नुकसान होऊ नये असे वाटत होते. परंतु, त्याच्या मांडीला झालेली दुखापत अत्यंत गंभीर असल्याने त्यावर उपचार करणारे डॉ. महेश तेलारांधे यांनी त्यास हालचाल करता येणार नसून धोका टळलेला नसल्याचे सांगितले.

यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला बाप आणि मुलाच्या जिद्दीचा प्रवास. मयूरनेदेखील उपचार घेत असताना परीक्षा देण्याची तयारी दाखवली आणि त्याच्या या जिद्दीला वडिलांनी प्रोत्साहित केले. त्याला रुग्णालयातूनच दहावीची परीक्षा देता यावी, असा विनंती अर्ज वडिलांनी नाशिक विभागीय मंडळाकडे केला. विभागात पहिल्यांदाच असा प्रसंग आल्याने बोर्डाचे अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली व डॉक्टरांशी याबाबत चर्चा केली. अखेर बोर्डानेदेखील त्यांची रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून पेपर देण्याची विनंती मान्य केली.

मंगळवारी, येथील बालाजी रुग्णालयात मयूरच्या पेपरसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पोलिस कर्मचारी, बोर्डाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा कालावधीदरम्यान त्याच्या कक्षात अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. मयूरनेदेखील या सगळ्याचे कोणतेही दडपण न घेता वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या जोरावर सलग तीन तास रुग्णालयातूनच पेपर दिला. त्यावेळी सगळ्यांनीच त्याचे कौतुक करीत त्यास भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उगाव घटनेच्या निषेधार्थ तहसीलवर मोर्चा

$
0
0

पाच जणांविरुद्ध कारवाईसाठी नातेवाईकांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

द्राक्षांच्या व्यवहाराच्या पैशांवरून शेतकऱ्यांनी केलेली मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने द्राक्ष व्यापाऱ्याचे मुनीम रवीराज वाघ यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना उगाव येथे घडली. याप्रकरणी उगाव येथील ५ जणांविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी उगाव येथे मंगळवारी (दि. ७) बंद पाळण्यात आला. तसेच मृताच्या नातेवाईक व मित्रपरिवारच्या वतीने निफाड तहसीलवर मोर्चाही काढण्यात आला.

मृत रवीराज वाघ यांच्या नातेवाईकांनी शंकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, निफाड तहसीलवर मोर्चा काढला. सोमवारी (दि. ६) त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, तहसीलदार विनोद भामरे यांची भेट घेत नातेवाईकांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. गिऱ्हे व भामरे यांनी या प्रकरणात संशयित आरोपींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मंगळवारी (दि. ७) या मागणीसाठी उगाव येथे कडकडीत बंद पाळून आठवडे बाजारही रद्द करण्यात आला. मृत वाघ यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य योजनेतून २० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार भामरे यांनी दिले. ढोमसे कुटुंबीयांनी या व्यवहारात आमचे द्राक्षांचे पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, असा दम देऊन धमक्या दिल्या. या सर्व जाचाला कंटाळून रवीराज वाघ यांनी विषारी औषध पिऊन घेतले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावरून महासभेत गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका सभागृहात मंगळवारी (दि. ७) महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, उपायुक्त डॉ. पाठारे यांच्या उपस्थिती महासभा बोलावण्यात आली होती. महासभेच्या प्रारंभीपासूनच सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे तसेच विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करित एकच गोंधळ घातला. तसेच प्रशासनास धारेवर धरले. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू असल्याने अखेर महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी महासभा तीन दिवसांसाठी तहकूब केली. अनेक विषयांवर महासभेत चर्चा होणे अपेक्षित असताना झालेल्या गोंधळामुळे महासभा तहकूब करण्यात आली.

महासभेच्या प्रारंभीच नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला आहे. रुग्णालयात रेबीजसारख्या गंभीर आजारांवरील औषधे तसेच इंजेक्शन उपलब्ध नाहीत, असे सांगितले. त्यामुळे शहरातील गरीब जनतेला महागड्या रुग्णसेवा घ्यावा लागत आहेत. प्रसूतीसाठी वाडिया, अली अकबर, पालिकेच्या रुग्णालयात आलेल्या महिलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येते आहे. ही संतापजनक बाब असून यास आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याबाबत उपस्थित सर्वच नगरसेवकांनीदेखील विविध मुद्दे उपस्थित करीत डॉ. डांगे हे महासभेस वारंवार अनुपस्थित का राहतात, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यामुळे सभागृहात विषय पत्रिकेवरील विषय चर्चेला येण्याआधीच कमालीचा गोंधळ सुरू झाला.

या गोंधळाच्या परिस्थितीच उपमहापौर युनुस इसा यांनी गुलशनगर येथील सार्वजनिक शौचालय ठेकेदाराकडून पाडण्यात आल्याचे सांगत येथील नागरिकांच्या शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला असून ठेकेदाराने पाडण्यात आलेल्या शौचालयांचे मलबा तसेच भंगार गायब केल्याचा आरोप केला. याबाबत शहर उपअभियंता संजय जाधव यांनी, पाडण्यात आलेल्या शौचालयाच्या जागी नवीन शौचालय बांधण्यात येणार असून संबंधित ठेकेदारास मलबा व भंगार जमा करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे, असे सांगितले. दरम्यान, महासभेच्या प्रारंभीपासूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने कामकाज होऊ शकले नाही. अखेर महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी या गोंधळातच महासभा तीन दिवसांसाठी तहकूब करण्यात आल्याचे जाहीर करीत महासभा गुंडाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीत राबून कष्टाने सावरला संसाराचा गाडा

$
0
0

महिला दिन विशेष : तिची झुंज

रामनाथ माळोदे

पतीचे अपघाती निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाला सावरायचे कसे, चार मुलांची जबाबदारी सांभाळायची कशी, आयुष्य कसे निभावून न्यायचे अशा अनेक प्रश्नांचे माथ्यावर ओझे झालेल्या ताराबाई गावले यांनी स्वतःला तर सावरलं, मुलांना मायेची ऊब दिली, सुसंस्कार दिले. शेतात राब राब राबल्या, जोमाने शेती फुलवली. मुलाला पदव्युत्तर, एका मुलीला पदवी पदवीपर्यंत शिक्षण दिलं आणि दुसऱ्या मुलीला डॉक्टर बनविले. प्रचंड मेहनत आणि जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत संसाराचा गाडा सावरला, त्यांच्या प्रेरक लढ्याची कहाणी.

निफाड तालुक्यातील सायखेड्याजवळील सोनगाव हे ताराबाई गावले यांचे गाव. पती पांडुरंग गावले यांचा ओझर येथे अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल सव्वीस दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, ती झुंज अखेर अपयशी ठरली. या अपघाती निधनानंतर गावले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या पुरत्या खचून गेल्या. मुलगा संजय, मुली अनिता, सुनीता आणि मनीषा यांची जबाबदारी पेलण्याचे शिवधनुष्य खांद्यावर उचलले.

मोठी मुलगी अनिता हिचा विवाह पती असतानाच झालेला होता. संजय, सुनीता आणि मनीषा यांचे शिक्षण सुरू होते. घर, शेती आणि मुलांचे शिक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मुलांची आई आणि वडील या दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलत होत्या. आता शेतीच्या मशागतीपासून, बियाण्यांची खरेदी, लागवडी, खते, औषधे, पेरणी, काढणी अशा सर्वच कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी वाढली. त्यांनी पिकविलेली द्राक्ष परदेशातही निर्यात झाली आहेत.

मुलगा संजयने हिंदी विषय घेऊन पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने आईला शेती कामात साथ देण्यास सुरवात केली. मुलगी सुनीता हिने मानसशास्त्र विषय घेऊन कला शाखेची पदवी घेतली. मनीषा हिने वैद्यकीय शिक्षण घेतले. लग्नानंतर ती नांदगाव येथे यशस्वीरित्या प्रॅक्टिस करीत आहे. मुलगा आणि तिन्ही मुलींचे लग्न समारंभ थाटात केले. लग्नानंतर मुलींचा सुखाचा संसार बघून ताराबाई यांना समाधान वाटत आहे. मुलगा आणि मुलीचे मुलेही उच्च शिक्षण घेत असल्याचे बघून अभिमानाने त्यांचा उर भरून येतो. गुणी नातवंडांमध्ये रममाण होत असताना त्यांना झालेला विरह, दुःख, आतना या साऱ्यांचा त्यांना विसर पडत, असल्याची भावना त्या व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन बांधकाम ठेकेदारांकडे प्राप्तिकर विभागाचा सर्व्हे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दोन नामांकित बांधकाम ठेकेदारांकडे आयकर विभागाने सर्व्हे करून त्यांच्या व्यवहाराची तपासणी केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या सर्व्हेमध्ये बी. पी. सांगळे व हर्ष कन्सस्ट्रक्शनचा समावेश आहे. या सर्व्हेत काय मिळाले किंवा त्यांच्यावर काय कारवाई केली याबाबत प्राप्तिकर विभागाने गोपनीयता पाळली आहे. सराफानंतर आता प्राप्तिकर विभागाने शहरातील बिल्डरांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने जोरदार कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेत हा विभाग आता पुन्हा सक्रिय झाला आहे. प्राप्तिकर विभागाने शनिवारी (दि. ४) हा सर्व्हे केल्यानंतर सोमवारी त्याबाबत सर्व कागदपत्रे व माहिती ही एकत्रित करून पुढील कारवाईसाठी पुणे येथील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या सर्व्हेमुळे शहरातील ठेकेदार व बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे. सर्व्हे करण्यात आलेले दोन्ही ठेकेदार मोठे असून प्राप्तिकर खात्याच्या वेगवेगळ्या चमूने दिवसभर हा सर्व्हे केला. आर्थिक व्यवहाराच्या हिशेबातील काही व्यवहाराचा संशय आल्याने ‘प्राप्तिकर’ने ही धडक दिली असल्याचे बोलले जात आहे. या सर्व्हेत अनेक कागदपत्रांची पाहणी केली असून संशयास्पद गोष्टींची माहिती घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योगी’ पोलिसांची कुंडली बनवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे गोचिडासारखे चिकटून बसणाऱ्या वसुली पंटर पोलिस कर्मचाऱ्यांची कुंडली बनवा, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच अशा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार असून, काही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंघल यांनी दिली. या प्रकरणाला वाचा फुटल्याने पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

पैशाचा माज आणि पोलिस असल्याची मस्ती काही पोलिसांच्या डोक्यात भिनली असून, त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. परिणामी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास ढेपाळत असून, त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचा उद्रेक अलिकडेच एका पत्रातून झाला. काही कर्मचाऱ्यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कैफियत मांडली. महाराष्ट्र टाइम्सने या पत्राला रविवारी वाचा फोडली. ‘सीपी साहेब एक झटका द्याच!’ या शिर्षकाखाली रविवारी, ५ मार्च रोजी वृत्त प्रसिध्द करण्यात आले. क्राइम राइटर, हजेरी मास्तर, ठाणे अंमलदार, डीबी कर्मचारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे राइटर, बीट मार्शल अशा विशिष्ट जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वर्षानुवर्षे गोंजारण्याचे काम शहरात सुरू असल्याकडे या वृत्तातून लक्ष वेधण्यात आले. या वृत्ताची पोलिस वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच पोलिस आयुक्तांनीही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

सिंघल यांनी खास या विषयाला अनुसरून पोलिस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पोलिस प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या वसुली पंटर कर्मचाऱ्यांची माहिती द्या, असे आदेश यावेळी देण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्यास गय केली जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहर पोलिस दलातील काही कर्मचारी केवळ वसुली पंटर म्हणूनच काम करीत असल्याचे सिंघल यांच्या निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे काही कर्मचाऱ्यांची मलाईदार पदावरच वर्णी लागत असल्याचेही स्पष्ट झाले असून, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सिंघल यांनी दिला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्यांवरील कारवाईकडे लक्ष

पोलिस आयुक्तांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. परंतु, असे डॅमेज कंट्रोल तात्पुरते न करता आयुक्तांनी कारवाईद्वारे आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. पोलिस स्टेशन्समधील ज्या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी कर्मचारी ‘उद्योग’ करतात त्यांच्यावरही पोलिस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

काही कर्मचाऱ्यांचे पत्र मला मिळाले असून, याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस दलास बदनाम करणाऱ्या वसुली पंटर कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये डीबीसह अनेक बेशिस्त व बेजबाबदार कर्मचारी असून, त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल.

- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी भानसी, प्रथमेश गिते उपमहापौर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नव्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक १४ मार्च रोजी होत असून, भाजपतर्फे महापौरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेल्या प्रथमेश गिते यांची निवड होण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे या दोन नावांची शिफारस केली असून, त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

भानसी या अकराव्या महापौर होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रभारी वसंत गितेंच्या मुलाला उपमहापौरपदाचे पक्षाकडून बक्षीस देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सभागृह नेता आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, मुंबईत भाजपने महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडी सेविकांवर जिल्हाभर करण्यात येत असलेली लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती बंद करावी, कामासाठी सेविकांचे खर्च झालेले पैसे सेविकांना तातडीने मिळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

शहरातील विविध मार्गांवरुन हा मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहचला. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिल‌िंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले. तुमच्या मागण्या मंत्रालय स्तरावर पोहचवल्या जातील, असे आश्वासन शंभरकर यांनी दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्याने या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना लाइन लिस्टिंगचे काम करण्याची जिल्हाभर सक्ती केली जात आहे. या कामासाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी आतापर्यंत दोन हजार रुपये पदरचे खर्च केले आहेत. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची अंगणवाडी सेविकांना सक्ती करू नये, असे आयुक्त कार्यालयाने आदेश दिले असतानाही वरिष्ठांकडून कामावरुन काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. नाशिक जिल्हा परिषद व प्रकल्प कार्यालय आयुक्तालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही. अधिकारी आपल्या अधाकराचा गैरवापर करुन अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या कामाच्या सक्तीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती काढून टाकण्यात यावी, सेविकांचा व कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत झालेला खर्च त्वरित देण्यात यावा, आयुक्तालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. प्रलंब‌ित मागण्यांसाठी १० मार्च रोजी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद व नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानसेवी न समजता प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, अंगणाडी कर्मचाऱ्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यात यावे, केंद्र सरकारच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्माचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करण्यात यावा. टीएचआरचे सेवन लाभार्थी करीत नसल्याने महाराष्ट्रात कुपोषण व बाल मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. म्हणून टीएचआर बंद करुन सर्व लाभार्थींना ताजा शिजवलेला आहार देण्यात यावा, आजारपणासाठी १५ दिवसांची रजा देण्यात यावी, सेवा समाप्त होण्याच्या दिवशी सेवासमाप्तीचा लाभ देण्यात यावा. अंगणवाडी सेविकांना व मिनी अंगणवाडी सेविकांना समान मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन, टीए-डीए आहार बिलाचे पैसे देण्यात यावे, दरमहा मोबाइल खर्च देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: सत्ता येताच गुजराती भाषेतले बोर्ड झळकले

$
0
0

नाशिक : महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळताच गुजराती भाषेला अच्छे दिन येऊ लागले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम संपताच रामकुंडावर गुजराती भाषेचे सूचनाफलक झळकायला लागल्याने पर्यटकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात मराठीऐवजी गुजराती भाषेचा वापर अचानक वाढल्याने मुंबईकरांनी नुकतेच आंदोलन केले होते. त्याची लागण नाशिकला झाली असून, पंचवटीतील अनेक धार्मिक स्थळे आणि रस्त्यांवर अचानक गुजराती भाषेतील बोर्ड लागल्याने यात्रेकरू आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व की गुजराथी माणसाचे असा अनेक वर्षांपासून वाद आहे. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आवाज उठवला होता. मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील वातावरण अचानक बदलले असून, अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांचे बोर्ड मराठीबरोबरच गुजराती भाषेतून तयार केले असून, महाराष्ट्र सरकाराचे नियम धाब्यावर बसवले आहेत. मध्य रेल्वेने उपनगरीय गाड्या व आरक्षण तिकिटांवर गुजराती भाषेचा वापर केला आहे. महाराष्ट्रातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या तसेच, ज्यांचे प्रवासी हे हिंदी भाषिक आहेत त्यांनाही गुजराथी भाषेची तिकिटे दिली जात असून, अनेक रेल्वे स्टेशनवरचे दिशादर्शक बोर्डही गुजराथी भाषेत नव्याने तयार केले आहेत. बेस्टकडून व रिलायन्सकडून देण्यात येणाऱ्या विजेचे बिल गुजराथी भाषेत देण्यास सुरुवात झाली असून, महाराष्ट्रात अचानक गुजराथी भाषेचे बोर्ड चमकू लागल्याने असे परिवर्तन कसे झाले? याचा अनेकांना प्रश्न पडला आहे.

एचडीएफसी बँकेने आपल्या वेबसाईटवर मुंबईची प्रमुख भाषा म्हणून गुजराथीचा उल्लेख केला होता. मात्र मुंबईच्या नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर हा उल्लेख काढून टाकण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने रामकुंडावर गुजराती भाषेतील बोर्ड लावले आहेत. हे बोर्ड मराठी, गुजराथी व इंग्रजीतून लावण्यात आले आहेत.

केवळ गुजराती भाषेचेच बोर्ड का?

रामकुंडावर देश-विदेशातून लोक येत असतात. येथे हिंदीचा वापर केल्यास अनेकांना ही भाषा समजू शकेल. गुजराती भाषेत बोर्ड लावून ती किती लोकांना समजेल असा प्रश्न आहे. नाशिक महापालिकेने बोर्ड लावताना केवळ गुजराथी भाषेचीच का निवड केली? इतर भाषांनी काय घोडं मारलं असा सवाल नागरिक विचारत आहेत. या भाषा बदलामागे काय दडलं आहे हे तपासण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सानपांकडून फरांदे ‘चेकमेट’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपने महापौर व उपमहापौरपदासाठी नावे निश्चित केली आहेत. महापौरपदासाठी पाचव्यांदा निवडून आलेल्या रंजना भानसी, तर उपमहापौर पदावर नवख्या प्रथमेश गितेंची वर्णी लावली आहे. महापौर व उपमहापौर पदावर एक जुना, तर एक नवा असा उमेदवार देवून जुना नवा असा संगम साधला असला तरी गितेंच्या निवडीने पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षातून अनेक जेष्ठ निवडून आले असताना नवख्या गितेंकडे उपमहापौर पदाची जबाबदारी देवून घराणेशाहीची सुरूवात भाजपने केल्याची चर्चा आता पक्षात सुरू झाली आहे. तर आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना शह देण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून वसंत गितेंना थेट चाल दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेल्या प्रथमेश गिते यांच्या नावाची शिफारस प्रदेशाकडे केली आहे. त्यांच्या नावामुळे पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपात पुन्हा घराणेशाही सुरू झाल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीची जबाबदारी ही वसंत गिते यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे या विजयाचे बक्षीस म्हणून त्यांच्या घरात थेट उपमहापौरपद देण्यात आले आहे. पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे पद गितेंना देण्यात आल्याने आता पक्षातील त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे.

वसंत गिते आणि भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यात फारसे सख्य नाही. तसेच, फरांदे यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशीही फारसे पटत नाही. त्यामुळे फरांदेना चेकमेट देण्यासाठी थेट गितेंनाच पक्षाने चाल दिल्याचे पक्षात बोलले जात आहे. पक्षातील गितेंचे वजन वाढवण्यासह पालिकेतील सत्ताही त्यांच्याच हातात देवून वरिष्ठ नेत्यांनी फरांदेनाही शह दिला आहे. तसेच, पुढील निवडणुकीत गितेंसाठी मध्य मतदारसंघाची वाटचाल सोपी करून दिली आहे. त्यामुळे या निवडीला पक्षातील काही लोकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढोल मोहिमेतून महापालिकेची ६८ लाखांची वसुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नोट‌िसांना केराची टोपली दाखवणाऱ्या थकबाकीदांरावर ढोल-ताशांची मात्रा कामी आली असून, सोमवारी महापालिकेची तब्बल ६८ लाखांची वसुली झाली आहे. या मोहिमेत पालिकेने १० मिळकती जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मिळकतींमध्ये सिन्नरमधील प्रतिष्ठ‌ित भैरवनाथ पतसंस्थेच्या कार्यालयाचा समावेश आहे. सोबतच शहरातील नामवंत बिल्डरांसह हॉटेलचालकांच्या मिळकतींचाही समावेश आहे. ढोल-ताशांच्या गजरात आपल्या इभ्रतीचे तीनतेरा होऊ नयेत म्हणून थकबाकीदारांनी डोळे झाकून वसुलीचे चेक पालिकेच्या स्वाधीन केल्याने पालिका मालमाल झाली आहे.

महापालिकेने थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी सोमवारी ढोलताशांची मदत घेतली. सिडकोत सकाळच्या सत्रात उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल पामवर साडेसहा लाखांच्या थकबाकीसाठी ढोल-ताशांच्या गजरात थकबाकीपत्र देण्यात आले. त्यामुळे हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांचा विचार करून हॉटेलचालकाने साडेसहा लाखांचा चेक दिला. त्यापाठोपाठ भैरवनाथ सहकारी पतसंस्थेवर थकबाकीसाठी कारवाई करण्यात आली. यावेळी पालिकेचे पथक पोहचताच तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय बंद करून घेतले. ढोल-ताशे वाजवून पालिकेने सील लावून ही मालमत्ता जप्त केली. सोमवारी या कारवाईत ६८ लाख ५२ हजारांची वसुली करण्यात आली. या कारवाईला मंगळवारपासून जोमात सुरुवात होणार असून, सहा विभागांत ढोल पथके लावण्यात आली आहेत. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.


या मिळकती केल्या जप्त

ठक्कर एन. एम. - शॉप

अमोल कन्स्ट्रक्शन- दोन शॉप

दुर्गेश बिल्डर - शॉप

राज डेव्हलपर्स- शॉप

सुरेश काबडी - निवासी

देवीदास गांगुर्डे - निवासी

बिरबल सैनी- शॉप

पुष्पा जावळे- शॉप

श्री भैरवनाथ पतसंस्था


नाशिकरोडला ६७ हजार वसूल

सिन्नर फाटाः सोमवारी नाशिकरोड प्रभागात पालिकेचा हा बँडबाजा फिरल्याने ६७ हजार रुपयांची वसुली झाली. याची चांगलीच चर्चा झाली. पालिकेच्या या गांधिगीरीने थकबाकीदारांची प्रतिष्ठा डावावर लागली आहे. आपल्या प्रतिष्ठेचे खोबरे होऊ नये यासाठी एका थकबाकीदाराने तर काही थकबाकीही भरली. त्यात शाम दासवाणी यांनी मिळकत करापोटी थकबाकीपैकी ५७ हजार २०० रुपये व पाणीपट्टीपोटी १० हजार रुपयांची थकबाकी तत्काळ भरली. जगन पिंटो, साईकिरण फर्निचरचे कांकरिया, जय मल्हार हॉटेलच्या मालकाने या पथकाकडे तीन दिवसांची मुदत मागवून घेतल्याची सहाय्यक अधीक्षक नामदेव जाधव यांनी दिली. नाशिकरोड प्रभागातील विविध मोबाइल कंपन्याच्या ४९ मोबाइल टॉवरकडे सुमारे ५० लाख रुपयांची थकबाकी आहे.ही थकबाकी वसूल करण्यासाठी १० मार्चनंतर धडक मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी दिली.

सिडकोत सहा लाख वसूल
सिडकोः महापालिकेने विविध करांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारात ढोलताशे सुरू केले आहेत. पाथर्डी रोडवरील हॉटेल पाम येथे पहिल्याच दिवशी सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने ही ढोल वाजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेमुळे थकबाकीदाराने सहा लाख रुपयांपैकी काही रक्‍कम रोख व काही धनादेशाद्वारे दिल्याचे महानगरपालिका सुत्रांनी सांगितले.

मार्चअखेर महानगरपालिकेकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे जास्तच लक्ष दिले जात असते. यंदा प्रथमच थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून गाजावाजा करून वसुली करण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे.

सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने एक लाख रुपयांच्या वर थकबाकी असणारे ३१ लोक असून, संपूर्ण सिडकोत दीडशे ते दोनशे लोकांकडे घरपट्टी बाकी आहे. सिडकोतील सर्व मिळून एक कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. ज्या थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही, अशांच्या घरांसमोर ढोल वाजवत वसुलीसाठी जाणार असून, न दिल्यास त्यांच्या मिळकती सील करणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी दिली. सिडकोतील टॉवरवरदेखील कारवाई करण्यात येणार असून, तेदेखील सील करणार आहेत.

सोमवारच्या कारवाईत नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी टॉवरच्या करांची वसुली १० मार्चनंतर सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. कुमावत, मालिनी शिरसाठ यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पंधराव्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन यांची निवड करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राज्यपाल भवनात ही निवड केली.

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्रमोद येवले, मोहन काशिकर आणि ई. वायुनंदन या तिघांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. प्रमोद येवले यांच्या नावाची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र ई. वायुनंदन यांचा अॅकॅडेमिक बायोडाटा वजनदार भरल्याने त्यांची या पदावर निवड झाली. डॉ. ई. वायुनंदन हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ऑगस्ट १९८७ पासून कार्यरत आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयात पदविका घेतलेली असून, सामान्य प्रशासन विषयात एम. ए. केलेले आहे. ते एमफिल व पीएचडीदेखील आहेत. त्यांना २५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून, त्यांनी संशोधनदेखील केलेले आहे. कुलगुरूपदाच्या निवडीसाठी तीन जणांची समिती नेमण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ‘नीट’चे संचालक अजयकुमार शर्मा, सीताराम कुंटे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटनोंदणी धूमधडाक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक मनपात मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांची सोमवारी दुपारी विभागीय महसूल आयुक्तांकडे गटनोंदणी करण्यात आली. पक्षाच्या गटनेतेपदी संभाजी मोरुस्कर यांची निवड करण्यात आली. भाजपचे नगरसेवक भगवे फेटे परिधान करून गट नोंदणीसाठी उपस्थित होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नियोजन सभागृहात प्रत्येक नगरसेवकांची उपस्थिती बघून गट नोंदणीसाठी कुणाची काही हरकत आहे का, याची खात्री केली.

नाशिक मनपाच्या चाव्या शिवसेनेच्या भात्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपने शिवसेनेला मात देत, नाशिक मनपात बहुमत प्राप्त केले. त्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी हजेरी लावून गटनोंदणी केली. तीन नगरसेवक पूर्वपरवानगीने अनुपस्थित राहिले. त्यापैकी कोमल मेहरोलिया या औरंगाबाद येथे परिक्षेकामी गेल्याचे सांगण्यात आले. नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिल्याने भाजपच्या गोटातून त्यांना आता पालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी बढती देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातीचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने कृपादृष्टी केल्याने वर्ष २०१६-१७ मध्ये कांदा निर्यातीने उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार २० लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त कांदा निर्यात झाली असून, निर्यातीचा आतापर्यंतच हा विक्रम ठरला आहे. यावर्षी कांदा निर्यात ३० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र निर्यात वाढूनही वाढलेल्या उत्पादनामुळे कांदा दर सरासरी ५०० रुपये क्विंटलवर ‌स्थिरावल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.

यंदा पाऊस चांगल्या झाल्याने कांदा उत्पादन तिप्पटीने वाढले आहे. बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत असल्याने कांदादर घसरले आहेत. विक्रमी निर्यात होऊनही उत्पादनाच्या तुलनेत निर्यात न वाढल्याने कांदादरात वाढ होऊ शकलेली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. सन २००९-१० मध्ये १८.७३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाली होती. निर्यातीचा हा उच्चांक होता. मात्र यावर्षी हा विक्रमही मोडीत निघाला आहे. नोव्हेंबर २०१६ पर्यंत २०.१० लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व चालू मार्च महिन्यात सरासरी दोन ते लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे गृहित धरल्यास वर्ष २०१६-१७ मध्ये कांदा निर्यात २५ ते ३० लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचणार आहे.

यावर्षी सुमारे गतवर्षापेक्षा २५ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन वाढले आहे. निर्यातीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास यावर्षी पहिल्या आठ महिन्यांतच विक्रमी निर्यात झाली आहे. मात्र अजूनही कांद्याची भरमसाठ आवक होत असल्याने निर्यात वाढणार आहे. असे असूनही याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायऱ्यांवरच ओतला कांदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

केंद्र व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शेतकरी विरोधी धोरण अवलंबणाऱ्या या सरकारचा निषेध नोंदवत शेतकरी संघटनेद्वारे शहरातील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर कांदा ओतून दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पद मिळताच शेतकरी नेते देवीदास पवार यांनी शासनाच्या विरोधात एल्गार पुकारत. प्रांत कार्यालयाबाहेर शेकडो

शेतकऱ्यांच्या साक्षीने कांदा फेक करत निषेध नोंदवला. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, तसेच तूर डाळीला रास्त भाव मिळाला पाहिजे, या प्रमुख मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे

करण्यात आल्या.

राष्ट्रवादीचे नेते तथा कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, भिला आहेर, एकनाथ गांगुर्डे, कारभारी वाघ आदींच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात प्रशासकीय इमारतीच्या मुख्य द्वारावर दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळासाठी प्रशासकीय इमारतीत बघ्यांची गर्दी झाली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला. तसेच गोणीत आणलेला कांदा कळवणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर ओतून सरकारी कामकाज आणि पोकळ घोषणांचा निषेध केला.

प्रशासनाच्या वतीने कळ्वणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, महादू खैरनार, रत्नाकर पाटील, पोपट खैरनार, धीरज पाटील, माकपचे भाऊसाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त करीत शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images