Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मालमत्ता जप्तीच्या नोटिसांची होळी

$
0
0

शेतकरी संघटनेकडून नोटीस मागे घेण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, येवला

उन्हाळ कांद्यासह इतर शेतमालांचे बाजारभाव सातत्याने ढासळताना एकीकडे शेतकरी मोठ्या अर्थसंकटात सापडला आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा दिल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. या नोटिसा मागे घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ११) दुपारी शेतकरी संघटनेच्या वतीने नोटिसांची होळी करण्यात आली. नाशिक-औरंगाबाद व नगर-मनमाड राज्य महामार्गावरील येवल्यातील विंचूर चौफुलीवर जोरदार घोषणा देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास खंडित झाली होती.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर काही राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वसुलीसाठी मालमत्ता जप्तीपूर्व नोटिसा पाठविल्या आहेत. याचा विरोध करून शेतकऱ्यांना बँकेने पाठविलेल्या या नोटिसा तत्काळ मागे घेण्याची मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली. तसेच संघटनेच्या वतीने या नोटिसांची होळी करण्याचा इशाराह‌ी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास नोटिसांची होळी आंदोलन केले.

सरकारचे धोरण नाकर्तेपणाचे

यावेळी संतु पा. झांबरे यांनी यावेळी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडत सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशात बँकांनी नोटिसा धाडल्या आहेत, याकडे लक्ष वेधत यावेळी झांबरे यांनी शेतकऱ्यांनी पैसे तरी भरायचे कुठून? असा सवाल उपस्थित केला. बापूसाहेब पगारे, योगेश सोमवंशी आदींनी विचार मांडले. यावेळी संघटनेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार सविता पठारे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संध्या पगारे, निर्मला जगझाप, अरुण जाधव, सुरेश जेजुरकर, सुभाष सोनवणे, अनीस पटेल, बाबासाहेब पाटील, प्रभाकर भोसले आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नांदूरमध्यमेश्वरसह निफाडला निषेध

निफाड : निफाड आणि नांदूरमध्यमेश्वला निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निफाड तहसील कार्यालयात गुरुवारी, या नोटिसांची होळी करून आपला निषेध नोंदवला. सकाळी १० वाजता नांदूरमध्यमेश्वर येथील बाजारतळात शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसाची होळी करण्यात आली. याप्रसंगी लासलगाव कृउबाचे माजी संचालक हरिश्चंद्र भवर, नांदूरमध्यमेश्वरचे सरपंच प्रल्हाद पगारे, शरद शिंदे, सोमनाथ कहाणे, गफूर शेख आदींसह शेतकरी उपस्थित होते. निफाडलाही नोटिसांची होळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्याधिकाऱ्यांचे अज्ञान की...?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी ठेका आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे वादग्रस्त ठरलेले पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी नवीन जावईशोध लावला आहे. ओला व सुका कचरा अशी कोणतीही व्याख्या नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. पालिकेच्या घंटागाडी योजनेच्या अटी व शर्तींतही त्याचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी माध्यमांसमोर केला. ‘एसएसडब्लू २०१६’ नुसार केवळ विघटनशील आणि अविघटनशील असे दोन प्रकार अस्त‌ित्वात असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ओला व सुका कचराप्रकरणी ठेकेदारांना पाठ‌िशी घातल्याचा ठपका ठेवत त्यांना दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या मागील वादाचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. घंटागाडी ठेका देताना लोकसंख्येचे मांडलेले गणित, अटी व शर्तींच्या बदलांसंदर्भातील वक्तव्यावरून ते वादात सापडले होते. त्यानंतर आता घंटागाडी योजनेत ओला व सुका कचरा विलगीकरणावरुन त्यांच्यांवर कारवाईची शक्यता आहे. घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा विलगीकरणाची व्यवस्था केली नसल्यावरून त्यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परंतु, या वादातून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी अजब दावा केला आहे. ओला व सुका कचरा असा कुठेही उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘एमएसडब्लू २०१६’ नुसार केवळ विघटनशील आणि अविघटनशील कचरा असे वर्गीकरण आहे. प्लास्ट‌िक कचरा, ई-वेस्ट वगळता सर्व कचरा हा विघटनशीलमध्ये येत असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, त्यांना शासनाच्या २९ एप्र‌िल, २०१६ च्या जीआरचा विसर पडला आहे. ठेकेदारांना पाठ‌िशी घालण्यासाठीच त्यांनी असा खटाटोप सुरू केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

२७ गाड्यांमध्ये व्यवस्था नाही

घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाच्या अटी-शर्तींची अंमलबजावणी केली नाही म्हणून आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी डॉ. डेकाटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या नोट‌िसीला डेकाटे यांनी उत्तर दिले असून, सद्यःस्थितीत २७ गाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्याचा दावा केला आहे. या घंटागाड्यांचा वापर हा हॉटेल्स, लॉन्समधील कचऱ्यासह डेब्र‌िजसाठी केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या खुलाशातही डेकाटे यांनी ठेकेदारांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे.


अटी व शर्ती ठरवल्या खोट्या

घंटागाडीच्या अटी व शर्तीमंध्येही ओला व सुका कचरा गोळा करण्याची कुठेही तरतूद नसल्याचा दावा डेकाटे यांनी केला होता. परंतु, माध्यम प्रतिनिधींनीच त्यांना घंटागाडी ठेक्यातील अटी व शर्तींची माहिती करून दिल्यावर डेकाटे यांनी आपली भूमिका मागे घेतली. घंटागाडीच्या २.३ या अटीनुसार ठेकेदाराला ओला व सुका कचरा विलगीकरणाची व्यवस्था घंटागाडीमध्ये करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही आरोग्य अधिकाऱ्यांनी अशी भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील-शिंदे जुंपली!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रभाग क्रमांक ८ मधील शिवसेना समर्थकांच्या मालमत्ता चौकशी प्रकरणात गटनेते विलास शिंदे यांच्या आरोपांवर भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. प्रभागातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यपदच रद्द करा, अशी मागणी पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये मुलाचा पराभव झाल्याने दिनकर पाटील हे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसेना समर्थकांना त्रास देत आहेत. निवडणुकीत नगरसेवकांना मदत करणाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी लावली जात असल्याचा आरोप विलास शिंदे यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी केला होता. त्यावर दिनकर पाटील यांनी चौकशीच्या नोटिसा कोणाला दिल्या गेल्या आहेत, याची आपणास कल्पना नसल्याचा खुलासा केला. ज्या आठ लोकांना नोटिसा मिळाल्या आहेत, त्या लोकांची नावे शिंदे यांनी जाहीर करावीत, असे आव्हान पाटील यांनी दिले आहे. संबंधित लोकांची नगररचना विभागाने चौकशी करून त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असेल, तर त्या बांधकामांना प्रत्यक्ष मदत करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामाना मदत केल्यास महापालिका अधिनियम १० (१) ड नुसार नगरसेवक पद रद्द होऊ शकते, असा दाखलाही त्यांनी दिला आहे.


व्यक्तिगत संघर्ष पक्षीय पातळीवर?

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दिनकर पाटील आणि विलास शिंदे यांच्यात सुरू झालेला व्यक्तिगत संघर्ष पक्षीय पातळीवर पोहोचणार असल्याची चर्चा होत आहे. भाजप-शिवसेनेदरम्यान आधीच राज्य, तसेच स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष सुरू आहे. नाशिकमध्येही या वादातून एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाण्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

अनधिकृत बांधकामांचे समर्थन केलेले नाही. नगररचनाने माझे मित्र बापू घैसास यांनाही नोटीस दिली आहे. त्यांनी खुलासाही केला आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन इतरांनीही तसे करावे. आपण कोणाचीही तक्रार केली नसून, खोटे आरोप करणाऱ्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

- दिनकर पाटील, नगरसेवक, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेक‌िंगचे ट्रेनिंग सेंटर अधांतरीच!

$
0
0

नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे राज्य सरकारच्या २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार स्थापन होणाऱ्या पहिल्या ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटरचे काम गेल्या चार वर्षांपासून रख़डले आहे. दोन कोटी रुपये खर्चानंतरही विविध अडथळ्यांमुळे चार वर्षांपासून हे काम रखडल्याचे समोर आले आहे. सरकारचे कोट्यवधी रुपये पडून असल्याने क्रीडाप्रेमींनी चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात साहसी खेळांना चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे अंजनेरी येथे राज्यातील पहिले ट्रेकिंग ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने पर्यटन विभागाला दोन कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला. यासाठी अंजनेरी येथे ६ एकर जागा निश्चित करण्यात आली. यातील तीन एकर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी व तीन एकर जागा ट्रेकिंग सेंटरसाठी आरक्षित करण्यात आली. तत्काल‌िन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूम‌िपूजन करण्यात आले. या क्रीडा संकुलात ऑड‌िटोरियम, म्युझियम, प्रशिक्षणासाठी आलेल्या खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था, उपहार गृह अशी दालने बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र २०१३ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे सेंटर पर्यटन विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार असून, त्यानंतर क्रीडा विभागामार्फत तेथे प्रशिक्षण सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या सेंटरचे काम रडतखडतच सुरू आहे.
या जागेमध्ये राज्याचे अॅडव्हेंचर स्पोर्टस सेंटर स्थापन करण्याची बाब प्रस्तावित आहे. सदर जागेपासून साधारण चार ते पाच किमी अंतरावर बॅकवॉटर उपलब्ध असल्याने वॉटर स्पोर्टस उपक्रम आयोजित करणेदेखील शक्य होणार आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, या प्रकल्पाचे काम काही दिवस कॉन्ट्रॅक्टरच्या दिरंगाईमुळे थांबले असल्याचे सांगण्यात आले. दोषी कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. अंदाजे दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आमच्या अख्यत्यारित असलेले तालुका क्रीडा संकुल आम्ही कार्यान्वित केले आहे. ट्रेन‌िंग सेंटरबाबत काहीही सूचना नाही. एमटीडीसीकडून आमच्याकडे हस्तांतरीत करणार असा प्रस्ताव होता. हे राज्य सरकारच्या अख्यत्यारित असल्याने वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तेच याबाबत सांगू शकतील
- संजय सबनीस,
जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीं’ना भावपूर्ण निरोप

$
0
0

दळवटला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जिल्ह्यात आपल्या कर्तृत्व व नेतृत्वाची चुणूक दाखवत सर्वांसमोर आपल्या कामांचा आदर्श ठेवून गेलेले माजी मंत्री अर्जुन तुळशीराम पवार यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात पोलिसांनी दिलेल्या शासकीय मानवंदनेद्वारे कळवण तालुक्यातील दळवट या त्यांच्या मूळगावी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

ज्या गावात जन्म घेतला, वाढलो त्या मातीशी इमान बाळगणाऱ्या या पाणीदार नेतृत्वाची शेवटची इच्छाच होती ती, माझं अखेरचं कार्य या गावातच करण्यात यावे. म्हणून पत्नी शकुंतलाताई, पुत्र नितीन, प्रवीण, स्नुषा जयश्री, डॉ. भारती, कन्या डॉ. विजया, गीतांजली व सर्व कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी ए. टी. पवारांना अखेरचा निरोप दिला.

विकासासाठी झटणाऱ्या या सर्वांगीण व निगर्वी नेतृत्वाला कळवणकरांनी तब्बल आठ वेळा प्रतिनिधित्व देत विधानसभेत पाठवले. न बोलता आपल्या कामातून आपली आगळीवेगळी छाप पडणाऱ्या ए. टी. पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, नाशिकच्या महापौर रंजना भानशी, आमदार नरहरी झिरवाळ, सीमा हिरे, जयप्रकाश छाजेड, माजी आमदार अनिल आहेर, शरद आहेर, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, रवींद्र पगार, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, मिलिंद शमभरकर यांच्यासह आयुक्त इंद्रजित भालेराव, प्रांत गंगाधरण उपस्थित होते.

मुंबई येथे बुधवारी (दि. १०) माजी आमदार ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. आपल्या आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. शोकसभेत आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ए. टी. पवारांशी आलेल्या संबंधांचा उहापोह केला. युती शासनात ते मंत्री असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास मला करता आला. विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा असा नेता होणे नाही, अशा भावना व्यक्त केल्या. nashik pharmacy college

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटीच्या सदोष प्रवेशपत्राचा चार विद्यार्थ्यांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेत सदोष प्रवेशपत्रांचा चार विद्यार्थ्यांना फटका बसल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले. सायबर कॅफे चालकाच्या बनावटगिरीमुळे सदोष प्रवेशपत्र बनल्याचे डीटीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा अपवाद वगळता इतरत्र परीक्षा सुरळीत पार पडली.

शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला आहे. मूळच्या इगतपुरी परिसरातील असणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे हॉलतिक‌िट असतानाही त्यांच्या आसन क्रमांकावर अगोदरच इतर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हा गोंधळ समजावून घेत व्यवस्थापनाने पहिल्या सत्रात परीक्षेस बसण्याची या विद्यार्थ्यांना अनुमती दिली. मात्र, दरम्यानच्या कालावधीत अधिक तपशील यंत्रणेने तपासला असता या विद्यार्थ्यांची माहिती अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात आले नाही.

या परीक्षा केंद्रांमध्ये के. के. वाघ पॉलिटेक्निक केंद्रावर नितीन मनोज विसपुते, समाधान संतोष वाजे हे दोन विद्यार्थी तर के. के. वाघ आर्टस, सायन्स कॉलेजवर रक्षा विलास शिंदे, तर एचपीटी आर्टस केंद्रावर योगेश संपत पोरजे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. सायबर कॅफेकडूनच हे बनावट प्रवेशपत्र दिले गेल्याचे सांगत डीटीई प्रशासनाने संशयितांविरोधात कारवाई करण्याच्या सूचनाही केंद्रप्रमुखांना दिल्याची माहिती डीटीईचे सहसंचालक नाथे यांनी दिली.

दरम्यान, शहरातील ४९ केंद्रांवर या परीक्षेचे नियोजत करण्यात आले होते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ४३१ विद्यार्थी गैरहजर राह‌िले. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत ही परीक्षा पार पडली. या कालावधीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) हे पेपर घेण्यात आले. या परीक्षेच्या नियोजनासाठी शहरात ४९ परीक्षा केंद्रांवर सुमारे १३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

या परीक्षेसाठी तीन प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या होत्या. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी ५० गुण असलेली सामायिक प्रश्‍नपत्रिका, तर गणित १०० गुण आणि जीवशास्त्र १०० गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. ‘नीट’ परीक्षेदरम्यान नियोजनाचा उडालेला बोजवारा लक्षात घेता सीईटीसाठी पोलिस बंदोबस्ताचेही विशेष नियोजन करण्यात आले.

हजार विद्यार्थी गैरहजर

नाशिक विभागात ४६ हजार २०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १०२७ विद्यार्थी गैरहजर राह‌िले. ४५ हजार १४७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर शहरातील ४९ केंद्रांवर २० हजार ५७६ विद्यार्थ्यांपैकी २० हजार १४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४३१ विद्यार्थी गैरहजर राह‌िले.


विद्यार्थ्यांना ज्या विषयाची या परीक्षेत धास्ती असते त्या गणित विषयाचा पेपर तुलनेने यंदा सोपा होता. याचा फायदा विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेताना स्कोअर वाढविण्याकरिता होऊ शकतो.

- प्रमोद गायकवाड, सीईटी परीक्षा मार्गदर्शक

प्रवेशपत्र सदोष असल्याची तक्रार एका केंद्रावरून आली. यंत्रणेने याची शहानिशा केली असता सायबर कॅफेनेच विद्यार्थिनीची दिशाभूल करत तिच्या हाती बनावट प्रवेशपत्र थोपविले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास येत आहे. संशयितांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश केंद्रातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

- डी. पी. नाथे, सहसंचालक, डीटीई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडकरांची उत्सुकता शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या हॅप्पी स्ट्रीट (सिझन ३)मध्ये काय असेल याची उत्सुकता नाशिकरोडकरांमध्ये वाढली असून, त्यांना मनोरंजनाची मेजवानी देण्यास ‘महाराष्ट्र टाइम्स’ही सज्ज झाले आहे. हा उपक्रम शहराच्या विविध भागांत व्हावा, अशी नागरिकांची इच्छा असल्याने कॉलेजरोडच्या यशस्वी आयोजनानंतर नाशिकचा अविभाज्य घटक असलेल्या नाशिकरोडमध्ये येत्या १४ मे रोजी रविवारी सकाळी सात वाजता हॅप्पी स्ट्रीटची धमाल होणार आहे.

‘महाराट्र टाइम्स’ आपल्या वाचकांसाठी सातत्याने नवीन कल्पना घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. ‘मटा’ने सुरू केलेल्या ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमाला नाशिककरांसह महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेऊन भरघोस प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळा जेल रोडवर उपस्थित राहायचं आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िटीजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. या वेळेत बिटको ते कोठारी कन्याशाळा सर्कलदरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

नाशिकरोड येथे होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीट्समध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. या वेळी उपस्थितांना हे प्रकार करून घेता येतील. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बँड शो होणार आहे. या वेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा, याची माह‌िती देणार आहेत. मोहन उपासनी व रवींद्र जोशी बासरीवादन करणार आहेत. हर्षल जाधव ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहेत. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण या वेळीही गिटारवादन करणार असून, जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. नीलेश हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. रुद्र आणि दीप आहेर स्ट्रीट पेंटिंग करणार आहेत. प्रतीक हिंगमिरे आणि अर्चना पेखळे यांचा ग्रुप डान्स सादर होणार असून, या वेळी वेस्टर्न व बॉलिवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिकरोडच्या वाचकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. या वेळीदेखील असाच प्रतिसाद नाशिककरांनी द्यावा, असे आवाहन ‘मटा’तर्फे करण्यात आले आहे.

कलाकारांनी येथे संपर्क साधावा

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमाणी गार्डनला अवकळा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील मुक्तिधामच्या शेजारी असलेल्या सोमाणी गार्डनला सध्या अवकळा आली असून, परिसरातील मोठ्या गार्डन्सपैकी हे प्रमुख गार्डन असूनही एेन उन्हाळ्याच्या सुटीतदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गार्डनमधील खेळण्यांची संख्या अपुरी पडत असल्याची बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. ओटा तुटलेला, बंद असलेले लाइट, सांडपाण्याचा निचरा न होणे आदी समस्या येथे आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

या गार्डनमधील फुलझाडे अक्षरशः जळून गेली असून, हिरवळच नाहीशी झाल्याने त्याला बकाल स्वरूप आले आहे. येथील अंतर्गत सुशोभीकरणासाठी लावलेल्या जाळ्याही गायब झाल्या आहेत. काही भागात पडलेला कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत असून, गार्डनमध्ये मद्यपी, समाजकंटाकांचा वावर वाढल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

बच्चेकंपनीचा हिरमोड

सोमाणी गार्डनमध्ये उन्हाळ्याच्या सुटीमुळे गर्दी होत आहे. येथील जुनी खेळणी बदलण्यात आली आहेत. मात्र, गर्दीच्या तुलनेत ती पुरेशी नसल्याने बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. त्यामुळे सायंकाळी गर्दीच्या वेळी झोका, घसरगुंडी, सी-सॉ आदींभोवती बच्चेकंपनीला वेटिंग करावे लागत आहे. या स्थितीमुळे मुलांचा ओढा गार्डनशेजारील टॉय ट्रेनकडे वाढत असून, ट्रेन, तसेच मनोरंजनाच्या खेळांसाठी तेथे शुल्क आकारणी होते. त्यामुळे या गार्डनमध्येही अशीच तशीच मनोरंजनाची खेळणी बसविण्याची मागणी होत आहे.

--

बाकडे, ओट्याची मोडतोड

गार्डनमध्ये नागरिकांना बसण्यासाठीचा ओटा तुटलेला आहे. त्याच्या फरशा कधी पायावर पडतील याचा नेम नाही. नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची संख्या खूपच कमी आहे. सिमेंटची काही बाकडी तर उलटी ठेवण्यात आली आहेत. गार्डनमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने माशा, डासांची उत्पत्ती होत आहे. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूचे लाइट बंद आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत. ट्रॅकवर कचरा, पालापाचोळा असतो. त्यामुळे अंधारात फेरी मारायला कोणी धजावत नाही.

--

फुलझाडे नसलेले गार्डन!

सोमाणी गार्डनशेजारीच मुक्तिधाम आहे. परगावचे भाविक गार्डनमध्ये येतात, तेव्हा त्यांना फुलझाडांशिवाय असलेले गार्डन बघायला मिळते. गार्डनच्या टेकडीवर, सर्कलमध्ये, तसेच जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला फुलझाडे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही भागात हिरवळ नाही, ती लावणे गरजेचे आहे. खेळणी असलेल्या ठिकाणी खडे आहेत. त्यामुळे मुलांना इजा होत असून, येथे बारीक वाळू टाकण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलाचा पाण्यासाठी मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील वळवाडी येथील राहुल मांगू पाटील या पंधरावर्षीय मुलाचा पिण्याचे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सातत्याने पाणीटंचाई असून यंदादेखील काटवन भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याच पाण्यासाठी या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाणीटंचाई ही वळवाडी गावाच्या पाचवीला पुजलेली असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून गावाजवळील गावठाण विहिरीवरून नागरिक पाणी आणतात. तलावाजवळील विहिरीत पाणी असून, राहुल हाही गुरुवारी (दि. ११) सकाळी पाणी आणण्यासाठी एकटा गेला होता. त्यामुळे सकाळी याठिकाणी कुणीही नसताना पाणी भरताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. काही वेळानंतर गावातील काही युवक विहिरीवर गेले असता त्यांना ही दुर्दैवी घटना लक्षात आली. यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. वडनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुलला आई नव्हती तर वडील मजुरी करीत असून, त्यास दोन बहिणी आहेत. याच विहिरीत दोन वर्षांपूर्वी एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाला होता. मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्यानेच नाहक बळी जात असल्याचा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कॉलेजकडून दिशाभूल?

$
0
0

‘पीजी’बाबत सीएफएफएसआयइएसची डीटीई संचालकांकडे धाव

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

फार्मसी विद्याशाखेच्या पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमास सरकारचे अनुदान मिळत नसताना प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम सरकारी अनुदानित असल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. राज्यभरातील हे कॉलेजेस त्यांचा फार्मसीचा पीजी अभ्यासक्रम अनुदानित असल्याचे जाहीर करून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करीत असल्याची तक्रार सिटीझन फोरम फॉर सँक्टीटी इन एज्युकेशन सिस्टीम या संस्थेने तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांकडे केली आहे.

वैभव नरवडे यांनी माहितीच्या अधिकारात फार्मसीच्या अनुदानित व विनाअनुदानित कॉलेजची माहिती मागविली होती. याबाबत खुलासा करताना डीटीईने दिलेल्या माहितीनुसार राज्यात तीन विभागातीला पाचही फार्मसी कॉलेज हे केवळ पदवीस्तरापर्यंत अनुदानित असून, पदव्युत्तर स्तरावर ते विनाअनुदानितच असल्याचे उघड झाल्याचे ‘सीएफएफएसआयइएस’ ने म्हटले आहे. फार्मसीच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमास तंत्रशिक्षण संचलनालयाचे अनुदानही मिळत नसल्याची माहितीही मिळाली आहे.

अनुदानित भासवून विनाअनुदानित अभ्यासक्रम चालविणाऱ्या राज्यातील संस्थांमध्ये नाशिकच्या मविप्र फार्मसी कॉलेजसह पुणे विभागातील पुणे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई विभागातील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी आणि सी.यू.शहा कॉलेज ऑफ फार्मसी या पाच कॉलेजचा समावेश असल्याचा दावा सिटीझन फोरमच्या तक्रारीत करण्यात आला आहे. हे कॉलेजेस विनाअनुदानित ठरत असल्याने शिक्षण शुल्क प्राधिकरणाकडे या अभ्यासक्रमासाठी शुल्क ठरवून घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचेही या कॉलेजेसने टाळले आहे. कारण , या सर्व कॉलेजेसमधील एकाच अभ्यासक्रमाच्या फी स्ट्रक्चरमध्ये मोठी तफावत आहे.

मविप्रच्या फार्मसी कॉलेज व्यवस्थापनाशी त्यांची बाजू समजावून घेण्यासाठी संपर्क साधला असता , ‘आमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शंभर टक्के प्रवेश प्रक्रिया ही डीटीईच्या कॅप राऊंडव्दारेच होते. शिवाय, मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशही नसतात. डीटीईकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुदान ‌मिळत नसले तरीही एआयसीटीईकडून ते काही वर्षे मिळत होते. ते बंद केले असे म्हणावे तर एआयसीटीईकडून संस्थांना अद्याप तसे पत्र मिळालेले नाही ,’ अशी बाजू व्यवस्थापनाने मांडली. एआयसीटीईच्या अनुदानासाठी या संस्थांचा पाठपुरावाही सुरू आहे. तसे अधिकृत पत्र मिळाल्याखेरीज अनुदान बंद झाले असे कसे म्हणता येईल, असा या संस्थांचा सवाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण तलावांवर शिबिरांची धमाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शाळेत मुलांना सुट्या लागल्यानंतर पालकांकडून मुलांना अनेक शिबिरांना घातले जाते. अनेक जण महापालिकेच्या जलतरण तलावावर सुरू असलेल्या उन्हाळी शिबिरात सहभाग घेतात. नाशिकच्या वीर सावरकर जलतरण तलावावर उन्हाळी शिबिरांची सध्या धमाल आहे. मुलांची वाढलेली संख्या पाहता दोन स्वतंत्र बॅच मुलांना सरावासाठी देण्यात आल्या असल्याचे जलतरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांनी सांगितले. मुलांना जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कॉलेजच्या जलतरणपटूंची मदतही घेण्यात येत असल्याचे सोनकांबळे म्हणाले.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नाशिक महापालिकेच्या सर्वच जलतरण तलावांवर गर्दी उसळत असते. यात ५ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरीकदेखील सहभागी होतात. परंतु, नवख्या मुलांना पोहण्याचा अधिक सराव करता यावा, तसेच उत्कृष्ट जलतरणपटूंनादेखील स्वतंत्र सरावाची बॅच असावी म्हणून वीर सावरकर जलतरण तलावावर दोन बॅचेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साडेदहा ते साडेअकरा व साडेअकरा ते साडेबारा या दोन बॅचेसमध्ये मुलांना सराव करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सावरकर जलतरण तलावावर उत्कृष्ट जलतरणपटू नवीन मुलांना शिकविण्याचे काम करतात.

जलतरणपटूंना प्रशिक्षण

वीर सावरकर, सातपूर व सिडकोतील जलतरण तलावांवर जलतरणपटूंसाठी विविध प्रकारच्या सरावाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये फ्री स्टाइल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, फ्लाय स्ट्रोक, डायविंग व अंडरवॉटरचे प्रशिक्षण आदींचा समावेश असल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले.


मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जलतरण तलावांवर पोहण्याचे आकर्षण असते. यासाठी जलतरण तलावांवर मुलांसाठी स्वतंत्र प्रॅक्टीस बॅचेस ठेवण्यात आल्या आहेत. मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट जलतरणपटूंना नेमण्यात आले आहे. तसेच सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.

- हरी सोनकांबळे, मुख्य व्यवस्थापक, जलतरण तलाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवघेण्या अपघातांना ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात जीवघेण्या अपघातांत घट झाली असून, पोलिसांकडून सतत प्रयत्न होत असल्याचा हा परिपाक असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले. मागील चार महिन्यांपासून वाहतूक पोलिस प्रबोधनासह दंडात्मक कारवाई करीत असून, नागरिकांनी सहाकार्य केल्यास जीवघेण्या अपघातांच्या संख्येत आणखी घट होऊ शकते, असा दावा आयुक्तांनी केला.

गुन्हे उघडकीस आल्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, जयंत बजबळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शहरात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात मार्च महिन्यात २० जीवघेण्या अपघातांची नोंद झाली होती. या अपघातांत २१ जणांचा बळी गेला होता. एप्रिल महिन्यात मात्र जीवघेण्या अपघातांचे प्रमाण नऊवर आले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. की शहर वाहतुकीचा प्रश्न मागील चार महिन्यांपासून रडारवर घेण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईसोबत अनेक जनजागृतीपर अभियान राबवले जात आहेत. हेल्मेटचा वापर व्हावा या दृष्टीनेदेखील पोलिस प्रयत्नशील आहेत. वाहतूक पोलिसांकडून सततचा पाठपुरावा होत असल्याने अपघातांचे प्रमाण घटले असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

--

चार महिन्यांतील स्थिती

महिना-अपघात-मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती

जानेवारी-१८-१८

फेब्रुवारी-१२-१३

मार्च-२०-२१

एप्रिल-९-९

एकूण-५९-६१

--

सीएमसीद्वारे गस्त फायद्याची

ट्रलाइज्ड मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे सीआर मोबाइल अर्थात, गस्त पथकाचे काम नियंत्रित, तसेच अधिक परिणामकारक होणार असल्याचा दावा पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केला. यापूर्वी ही वाहने पोलिस स्टेशनमार्फत नियंत्रित केली जात होती. चार सीआर मोबाइल, तसेच दोन निर्भया पथकांचे नियंत्रण कंट्रोल रूमकडे सोपविण्यात आले आहे. ही वाहने चार सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांताधिकारी, तहसीलदारांविरूद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

वाळू ठेकेदार आणि बेजबाबदार महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावातील युवकाचा तापी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला होता. हा मृत्यू अवैध वाळू उत्खननामुळे झाला असल्याचा दावा करून शिंदखेडा न्यायालयाने प्रांताधिकारी, दोन तहसीलदार, दोन तलाठी, दोन मंडलाधिकारी आणि तीन वाळू ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

तापी नदीलगत शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे वाळू ठेका मंजूर आहे. यासह ठेकेदारांनी शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील तापी नदी पात्रालगत अवैधपणे वाळूचे उत्खनन सुरू केले. परिणामी ५० फूट मोठा खड्डा तयार होऊन पाणी साचून त्यात पडून अक्कडसे येथील सतीश छोटू सैंदाणे (वय १९) हा तरुण मृत झाला होता. त्यामुळे संबंधित तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी वाळू उपशाबाबत अटीशर्तीचा भंग होत असतांना, अधिकाऱ्यांकडून देखरेख, कर्तव्यबजावणीत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याकडे फिर्यादीने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार किशोर भगवान कोळी यांच्या फिर्यादीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकारी, ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ठेकेदाराने वाळूच्या ठेक्याची जागा आणि त्यांनी केलेल्या उल्लंघन, अटीशर्तीचा भंग याबाबतही तपास करून लवकरच दोषींना अटक करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक देविदास भोज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल, मल्टिप्लेक्समध्‍ये ‘फायर अलर्ट’ बंधनकारक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागपूर महापालिकेच्या धर्तीवर शहरातील उंच इमारती, हॉटेल्स, मॉल, मल्ट‌िप्लेक्स, हॉस्प‌िटल्समध्ये ‘फायर अलर्ट हॉट लाइन’ सिक्युरिटी सिस्टिम बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिका घेण्याच्या तयारीत आहे.

संबधित यंत्रणा बसवून देण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यात येणार असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी पालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचा दावा महासभेवर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आला आहे. संबंधित संस्थांकडून पालिकेला शुल्क मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागास आगीच्या घटनांबाबत खबर मिळताना काही त्रुटी व अन्य कारणांमुळे विलंब झाल्यास आगीच्या घटनांमधील जीवित व वित्तहानी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आगीच्या घटनांबाबतची खबर तत्काळ मिळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव अग्निशमन विभागाने तयार केला आहे. शहरातील हॉटेल्स, उंच इमारती, मॉल्स, मल्ट‌िप्लेक्स, रुग्णांलयामध्ये ‘फायर हाय अलर्ट सिस्टिम’ बंधनकारक करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.
यात विशेष इमारतींमध्ये आगशोधक व आगसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित केलेली असते. त्या यंत्रणेसोबत जीपीएसवर आधारित यंत्रणा बसविल्यास संदेश दळणवळणाचे काम झपाट्याने होऊ शकते. परिणामी आगीच्या घटनांमधील जीवित व वित्त हानीवर वेळीच नियंत्रण मिळविता येऊ शकते. नागपूर महापालिकेने यासाठी ‘फायर अलर्ट हॉटलाइन’ ही यंत्रणा उपलब्ध करून बसवून घेतली आहे, तर ठाणे महापालिकेतही ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेदेखील आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाला त्वरित संपर्क होण्यासाठी फायर अलर्ट हॉट लाइन सिक्युरिटी सिस्टिम कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील उंच इमारती, रुग्णालये, मॉल, मल्ट‌िप्लेक्सना ही यंत्रणा बसविणे बंधनकारक केले जाणार आहे.

खर्च एजन्सीचा

यासाठी प्रकल्प उभारणीच्या भांडवली व महसुली खर्चाची जबाबदारी संबंधित खासगी एजन्सीची राहणार आहे. अहवाल तयार करणे, शासकीय परवनाग्या घेणे, पाच वर्षे मनुष्यबळ पुरविणे तसेच मनपास शुल्क जमा करण्याची जबाबदारी एजन्सीची असेल. एजन्सीला केवळ कक्ष उभारण्यासाठी जागा दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावसाहेब दानवेंविरोधात जिल्हाभरात निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या शेतकरीविरोधी विधानाचे तीव्र पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. गुरुवारी (दि. ११) सकाळी जिल्ह्यातील येवला, सटाणा, मालेगाव, त्र्यंबकेश्वरला शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून दहन करण्यात आले.

येवल्यात जोडेमारो आंदोलन

येवला : शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलाहार घातला. यावेळी संभाजी पवार, जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे सहभागी झाले होते.

कारवाईची मागणी

मालेगाव : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रमोद शुक्ला, नथू देसले, शंकर बोरसे, प्रवीण देसले यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

सटाण्यात निषेध

सटाणा : शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ बागलाण तालुका शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नाशिक : महानगरच्या वतीने दानवे यांच्या प्रतीमेला जोडेमारा आंदोलन मध्यवर्ती कार्यालय शालीमार येथे करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदी उपस्थित होते.

राजीनाम्याची मागणी

त्र्यंबकेश्वर : येथील शिवनेरी चौकात शिवसैनिकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळेस भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी निवृत्ती लांबे, समाधान बोडके, भूषण अडसरे, शाम भुतडा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

पंचवटीत आंदोलन

पंचवटी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी, सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दानवे यांची अंतयात्रा काढून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी े प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, शरद लभडे, नितीन रोटेपाटील आदी उपस्थित होते. मानूर येथील शेतकरी प्रकाश माळोदे यांनीही जाहीर निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका शाळांमध्ये कराटे प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींना स्वसुरक्षेचे महत्व पटावे आणि त्यांनी आत्मनिर्भर होता यावे यादृष्टीने शहर पोलिसांनी ‘नन्ही कली’ उपक्रमांतर्गत कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. महापालिकेच्या शाळा क्रमांक ३१ मध्ये पाच ब्लॅक बेल्ट महिला पोलिस कर्मचारी हे प्रशिक्षण देणार आहेत.

शहर पोलिस, महापालिकेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिब‌िराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी या शिब‌िराला सुरुवात झाली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि ‘नन्ही कली’ प्रोजेक्ट ऑफिसर ज्योती वाघचौरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शहर पोलिस दलातील पाच महिला कर्मचाऱ्यांनी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असून, त्याच विद्यार्थिनींना प्रशिक्ष‌ित करणार आहेत. ३१ मेपर्यंत प्रशिक्षण सुरू राहणार आहे. गुरुवारी या शिब‌िराचा शुभारंभ झाला. कामटवाडा परिसरातील ३१ नंबर शाळेत सकाळी ११ ते साडेअकरादरम्यान कार्यक्रम झाला. यावेळी पोलिस आयुक्त सिंगल यांच्यासह, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, पोलिस निरीक्षक मधुकर कड, मुख्याध्याप‌िका सविता काळे उपस्थित होत्या. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे. त्याची नेहमी तयारी ठेवा. तसेच, स्वसुरक्षेतेसाठी कराटे आवश्यक असून, विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त सिंगल यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल, लॉन्समध्ये कचरा विघटन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसल्याचा फटका महापालिकेला केंद्र सरकारच्या स्वच्छ शहरांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बसला आहे. त्यामुळे ठेच लागल्यानंतर जागे झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता शहरातील मोठी हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्समध्ये कचरा डी-कंपोष्ट करणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील सूचनापत्र पालिकेच्या वतीने सर्व हॉटेल्स, लॉन्स व मंगल कार्यालयांना दिले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. कचऱ्यापासून तयार होणारे खत विकण्याची मुभा यांना देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील पाचशे शहरांचा स्वच्छतेसाठी सर्वेक्षण केले. त्यात महापालिकेचा क्रमांक हा १५१ वा आला आहे. या सर्वेक्षणात महापालिका हद्दीत असलेले हॉटेल्स, लॉन्स आणि मंगल कार्यालयांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याचे विघटन त्याच ठिकाणी करण्याची सुविधा असणाऱ्या पालिकांना अतिरिक्त गुण देण्याची तरतूद होती. शहराच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला महापालिका हद्दीतील एकाही मंगल कार्यालयात, लॉन्समध्ये आणि हॉटेल्समध्ये अशी सुविधा आढळून आली नाही. त्यामुळे महापालिकेचे गुणांकन वाढू शकले नाही. त्याचा परिणाम नंबर घसरण्यात झाला. त्यामुळे आता पालिकेने पुढील सर्वेक्षणात मानाकंन सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उश‌िराने जागे झालेल्या आरोग्य विभागाने आता शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्सधारकांना त्यांच्याकडे तयार होणाऱ्या कचऱ्याचे विघटन त्याच ठिकाणी करण्याचे बंधन घातले आहे.

हजारावर संख्या

शहरात जवळपास एक हजाराच्या वर हॉटेल्स, शंभरच्यावर मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्सचालकांनी आपल्या हद्दीत तयार होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे विघटन करण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यापासून तयार होणारे खत त्यांनी गार्डन व लॉन्ससाठी वापरावे किंवा ते बाहेर विकण्याची त्यांना मुभा असल्याचे स्पष्ट‌ीकरण डॉ. डेकाटे यांनी दिले. त्यामुळे शहरातील सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्सधारकांना आता कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे.

क्रेडाई बनवणार माहितीपट

महापालिकेने ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात कचरा विलगीकरण पूर्ण करणारे पहिले बनविण्याचे टार्गेट आखले आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी महापालिका क्रेडाई आणि विविध एनजीओंची मदत घेणार आहे. गुरुवारी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कचरा विलगीकरणासंदर्भातील जनजागृती मोह‌िमेत पालिकेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच कचरा विलगीकरणासाठी माह‌ितीपट तयार करून तो शाळा, कॉलेज आणि मोठ्या सोसायट्यांमध्ये दाखविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. घरोघरी जाऊन त्यांसदर्भातील जनजागृती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यात हवी झोकून देण्याची तयारी

$
0
0

नृत्यात हवी झोकून देण्याची तयारी

--

देशातील प्रमुख कथक नृत्यांगनांपैकी एक असलेल्या शमाताई भाटे नुकत्याच नाशिकमध्ये येऊन गेल्या. शहरातील अनेक नृत्यांगनांना त्यांनी धडे दिले आहेत. त्यांचा लाभलेला सहवास ही नाशिकच्या कलाकारांसाठी वेगळी पर्वणी होती. कथक नृत्यात त्यांनी केलेले विविध प्रयोग नृत्य प्रवासात मैलाचे दगड ठरले आहेत. कथकची सद्यःस्थिती यावर त्यांच्यासोबत केलेली बातचीत...

--

-सोलो आणि ग्रुप यांच्यात तुम्ही जास्त प्राधान्य कशाला देता?

-मुख्यतः कथक हा सोलोत मोडणारा, मैफलीतला प्रकार मानला जातो. कथकमध्ये चेहेऱ्यावरच्या हावभावांना जास्त प्राधान्य दिले जाते. त्यातील सूक्ष्मता हे कथकचे प्रमुख अंग आहे. आमच्या पूर्वजांनीदेखील सोलो या माध्यमालाच प्राधान्य दिलेले दिसते आणि आजही दिले जात आहे. परंतु, मला जर नृत्यात जास्त विस्तृतता आणायची असेल, तर मी ग्रुपलाही प्राधान्य देईन. पूर्वीच्या काळी स्टेजचा आकार लहान होता. त्यामुळे कलाकाराच्या चेहेऱ्यावरचे हावभाव नीट दिसायचे. महाकवी कालिदास कलामंदिरचे उदाहरण द्यायचे झाल्यास स्टेजचा आकार मोठा आहे. सातव्या किंवा आठव्या रांगेतून पाहिल्यास इतक्या मोठ्या स्टेजवर एक नर्तक नृत्य करणार हे डोळ्यांना खटकते. त्यामुळे अशा वेळी ग्रुप डान्स योग्य वाटतो. सोलो प्रकार सूक्ष्म आहे, तर ग्रुपमध्ये ऊर्जा आहे. दोन्ही प्रकार भिन्न असले, तरी त्यांच्या जागी ते योग्य आहेत. त्यामुळे सोलो की ग्रुप हा वाद करून चालणार नाही.

---

-एक्स्प्लोरिंग सायलेन्स- ‘निःशब्दभेद’ हा प्रकार तुम्ही दाखवला, त्याबद्दल काय सांगाल?

-समुद्राखालची शांतता मी कथकच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. समुद्राच्या तळाशी जात असताना काय अनुभव येईल, खोल खोल जाताना छोट्या वनस्पतींचा होणारा हळुवार स्पर्श, समोरून येणारे माशांचे थवे, बाहेरपेक्षा आत वेगळी हालचाल करणारी माणसे, अशा अनेक गोष्टी एक्स्प्लोरिंग सायलेन्स या प्रकारातून सादर करण्याचा प्रयत्न केला. आपण जेव्हा समुद्राच्या तळाशी जातो, तेव्हा निःशब्द शांतता असते. ती दाखवण्यासाठी घुंगरूदेखील वापरले नव्हते. छाया-प्रकाशाच्या रंगांचा जास्तीत जास्त वापर केला होता. यात नवनवीन तंत्राचादेखील वापर केला होता. दोन अनोळखी जातीचे समुद्रातील प्राणी एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्या मनातील विचार यात दाखवले आहेत. भारतात असे प्रकार खूप कमी प्रमाणत सादर होतात. इतर माध्यमांत त्यांचा जास्त वापर होतो. परंतु, कथकमध्ये फारसा होताना दिसत नाही, तो सादर करण्याचा प्रयत्न होता. राज्यातील जनतेने हा प्रकार ‍वाखाणला यातच त्याची यशस्विता दिसते.

--

-महाभारतावर आधारित ‘अतित की परछाई’ कार्यक्रमात वेगळेपण काय आहे?

-कथक म्हटले, की रामायण, महाभारत, रुक्मिणी स्वयंवर अशा एका मागून एक अनेक धार्मिक कथा, परंपरा असलेले प्रकार आपण पाहिले असतील. परंतु, विविध तांत्रिक साधनांचा वापर करून हा प्रयोग मी फुलवला आहे. त्यात जुन्या पारंपरिक गोष्टी तर आहेतच, मात्र विचार नवीन आहेत. आम्ही महाभारतातील कथानके सरसकट सादर केलेली नाहीत, तर त्यातील व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केला आहे. महाभारतातील सात व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कुंती, द्रौपदी, भीष्म, दुर्याेधन, दुःशासन, गांधारी अशा व्यक्तिरेखांचा यात समावेश आहे. प्रत्येकाच्या स्वभावानुसार नृत्यशैलीचा वापर केला आहे. या कार्यक्रमात कुचिपुडी, भरतनाट्यम् अशा वेगवेगळ्या शैलींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार समजण्यास जास्त सोयीस्कर होतो. हा कार्यक्रम करावा अशी तीस वर्षांपासून इच्छा होती. त्यावर दोन वर्षे सतत काम केले. थोडा जास्त वेळ लागला असला, तरी अस्सल कलाकृती देण्यात यश आले आहे.

--

-नृत्यातून सांगीतिक विचार कसे मांडता?

-नृत्य आणि संगीत या दोन्ही कला वेगळ्या असल्या, तरी त्या एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्या सादरीकरणशास्त्रात साम्यता आहे. दोन्हींच्या माध्यमातून मी कंटेम्पररी हा प्रकार सादर करते. कथकच्या माध्यमातून कंटेम्पररी प्रकार आजवर कुणी सादर केलेला नाही. तो मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. जग इतके जवळ येत चालले आहे, मग शास्त्रीय नृत्य व पाश्चात्य नृत्य प्रकार यांचा समन्वय साधून मूळ कलाप्रकाराला धक्का न लावता कलाकृती सादर केली, तर बिघडेल कुठे? कथक नृत्य प्रकारात मी लेव्हल्स वापरल्या, प्रकाशयोजनांचा वापर केला. अनेक साइजेसच्या लेव्हल्स वापरल्या, तर बिघडले कुठे? एखादी कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांसमोर पोहोचावी हाच त्यामागचा एकमेव उद्देश होता. आधुनिकतेकडे वाटचाल करताना मी मूळ गाभ्याला हात लावलेला नाही. त्यामुळे संगीत आणि पाश्चात्य नृत्यप्रकारात फक्त सादरीकरण नसून, एक वेगळा विचार आहे. तो मी सादर करीत असते.

--

-कथकच्या प्रसारासाठी काय होणे गरजेचे आहे?

-आज प्रत्येक जण बॉलिवूड डान्सकडे वळत आहे. प्रत्येकाला वेस्टर्न फॉर्मकडे जाण्याची ओढ आहे. त्यांचेही साहाजिक आहे. कबीर, मीरा, महाभारत, रामायण सादर करून पैसे मिळणार नाहीत, तर मग या फंदात कशाला पडायचे, अशी येथील कलाकारांची व त्यांच्या पालकांची मानसिकता आहे. ज्या तुलतनेत बॉलिवूड डान्स शहरा-शहरांत पोहोचला आहे, त्या प्रमाणात आम्ही पोहोचू शकलेलो नाही. आम्हाला मर्यादा आहेत. नाशिकचाच विचार केल्यास शहरातील मुली किंवा मुले कथक शिकू शकतात. परंतु, जवळच्या सिन्नर, संगमनेर, श्रीरामपूर, निफाड या ग्रामीण भागातील मुली शिकू शकत नाहीत. अनेक मुलींची इच्छा आहे. परंतु, आम्ही तिथंपर्यंत पोहोचू नाही शकत. आमची जाण्याची इच्छा आहे, परंतु अार्थिक गणित जमत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन कलाकार बॉलिवूड डान्सकडे वळत आहेत.

--

-नृत्यगृहाची संकल्पना काय आहे?

-ज्याप्रमाणे आज प्रत्येक शहरात नाट्यगृहे आहेत, त्याप्रमाणे नृत्यगृहाची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नृत्यगृहे झालीत, तर कलाकारांना त्यातील सूक्ष्मता समजेल. त्यासाठी अॅकोस्टिक ट्रिटमेंट केलेली थिएटर्स असावीत. नृत्यासाठी वापरण्यात येणारे फ्लोअर चांगले असावे. मल्टिमीडिया प्रॉडक्शनची सोय असावी. कथक ही पारंपरिक कला आहे, तिच्या संवर्धनासाठी सरकारबरोबरच कॉर्पोरेट कंपन्यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे.

--

-आजच्या पिढीबद्दल काय सांगाल?

-आजच्या पिढीला अनेक पर्याय खुले आहेत. त्यामुळे आवड किंवा छंद म्हणून याकडे पाहिले जात नाही. त्यातून काय मिळेल हे गणित त्यांच्याकडे असते. पालकही हाच विचार करतात. मी मुलीला इंजिनीअर केले, तर ती जास्त पैसे मिळवेल, कलाकार केले, तर त्या तुलनेतच कमी मिळेल. मग मी कलाकर कशाला तयार करू? तिला नृत्याच्या क्लासपेक्षा गणिताचा क्लास लावेन, असा विचार दिसतो. पूर्वीसारखे झोकून देऊन काम करण्याची तयारी दिसत नाही. झटपट यश कसे मिळेल याची ओढ वाढते आहे. अर्थात, कथकच्या बाबतीच ही ओरड आहे असे नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशीच स्थिती दिसते.

(शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छाशक्तीअभावी खुंटला ‘आयटी’चा विकास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे नाशिकमध्ये आयटी क्षेत्र वाढू शकले नाही, अशी भूमिका मांडून आयटी कंपन्यांच्या संचालकांनी विमानसेवेपासून इन्र्फास्ट्रक्चरसंदर्भातील समस्यांचा पाढाच खासदारांसमोर विशेष बैठकीत वाचला. खासदार गोडसे यांनी गुरुवारी आयटी कंपन्यांची बैठक निमा सभागृहात आयोजित केली होती. यावेळी त्यांना आयटी उद्योजकांसाठी एकाच ठिकाणी सहाय्य व माहिती मिळावी, अशी व्यवस्था करून स्टार्टअपला नाशिकमध्ये प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन देत समस्या जाणून घेतल्या.

नाशिकमधील आयटी क्षेत्रातील कंपन्या असंघटित आहेत. त्यांनी संघटितपणे काम करून नाशिकला आयटी हब होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, आयुक्त अभिषेक कृष्णा, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, ‘निटा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक अनिल पवार आदी सहभागी झाले होते.

एचआेएच टेक लॅब्स कंपनीच्या सीईआे राधिका मलिक यांनी प्रास्ताविकात नवीन आयटी कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच ज्या आयटी कंपन्या सध्या नाशिकमध्ये आहेत त्यांना चालना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. निमाचे अध्यक्ष बॅनर्जी यांनी ३० व ३१ मे रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मेक इन नाशिकमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार गोडसे यांनी निमा, आयमा व चेंबर्स आॅफ काॅमर्स या संघटनांनी या उद्योगांना संघटित करून या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी आयटी बिल्डिंग एमआयडीसीला नाममात्र दरात भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविल्याचे सांगितले.

--

महापालिकेत स्वतंत्र समिती

आयटी कंपन्यांना सहाय्य करण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या आयटी कंपन्यांना काही समस्या भेडसावत असेल, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केले.

--

सात वर्षांत आयटी हब

शासनाने पायाभूत सुविधांवर लक्ष दिल्यास व त्याचे चांगले ब्रँडिंग झाल्यास पुढील सात वर्षांत नाशिक आयटी हब होईल, अशी भावना इएसडीएस सीईआे राजीव पपनेजा यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी विविध मुद्देही मांडत आयटी कंपन्यांच्या अडचणी व त्यातील आव्हाने याबाबत सविस्तर माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपुड्याच्या होळीवर माहितीपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आगळ्या-वेगळ्या संस्कृती आणि परंपरांनी अवघ्या जगाच्या पर्यटन क्षेत्राला भुरळ घालणाऱ्या, नंदुरबारच्या सातपुड्यातील आदिवासी होळीवर जिल्हा माहिती कार्यालायाने माहितीपट तयार केला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शनिवारी (दि. १३) दुपारी दीड वाजता या माहितीपटाचे प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

‘आता बदल दिसतोय, माझा महाराष्ट्र घडतोय’ हे ब्रीदवाक्य... ‘व्हिजिट महाराष्ट्र वर्ष’ आणि ‘आपले सरकार करू कामगिरी दमदार’ या प्रेरणेतून पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यात सातपुड्याच्या अंगाखांद्यावर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या आदिवासींच्या होळीचाही समावेश आहे. राज्याच्या पर्यटन विकास महामंडळानेही या होळीला हजेरी लावत त्याचे ब्रॅंडिंग केले.

जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी या माहितीपटाच्या संकल्पनेवर संशोधन केले आहे. अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे यांनी संशोधन सहाय्य केले. या माहितीपटाची निर्मिती दूरदर्शनचे व राज्य सरकारचे मान्यताप्राप्त निर्माता जळगाव येथील ब्रिज कम्युनिकेशन यांनी केली आहे. ब्रिज कम्युनिकेशनचे संचालक मिलिंद पाटील यांनी लेखन, दिग्दर्शन केले आहे.

आदिवासी परंपरेवर प्रकाश

सातपुड्याच्या होळीच्या गौरवास्पद संस्कृती व परंपरेची माहिती राज्यासह जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसाला व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने माहितीपट बनविला आहे. यात मोलगी, काठी, सोन, असली, धडगाव, वडछील पुनर्वसन वसाहत, धनाजे आदी ठकाणी होणाऱ्या आदिवासींच्या होळी उत्सवाच्या धार्मिक विधी परंपरांचे, रंगभूषा, आभूषणे, दागिने, आदिवासी पारंपरिक वाद्ये, आदिवासी नृत्य आदींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images