Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रामसेतूवर वाट बिकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटी आणि नाशिक शहराचा बाजारपेठेचा भाग जोडण्यासाठी बांधण्यात आलेला सर्वांत कमी उंचीचा पूल म्हणून रामसेतूची ओळख आहे. या पुलावरून वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र, फक्त पादचाऱ्यांसाठीच असलेल्या या पुलावर सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांची गर्दी वाढली आहे. हा पूल त्यांच्यासाठी जणू हक्काची जागाच बनला आहे.

वाहनांसाठी हा पूल बंद करण्याकरिता दोन्ही बाजूंना उंचवटे बांधण्यात आलेले आहेत. असे असले, तरी येथून मोठी कसरत करीत दुचाकी वाहने नेण्याचा काही जण प्रयत्न करताना दिसतात. पूरस्थितीच्या वेळी सर्वांत अगोदर या पुलावरून पाणी वाहू लागते. अचानक पाणी वाढल्यास येथे धोका निर्माण होऊ शकतो. कापड बाजार, भांडी बाजार आणि सराफ बाजाराला जोडणारा हा पूल प्रामुख्याने पादचाऱ्यांच्या उपयोगासाठी आहे. पंचवटीतून या बाजारपेठेत किंवा या बाजारपेठेतून पंचवटीकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होत असतो. वाहने जाण्यासाठी बाजारपेठेकडून दक्षिणेला उतार असलेल्या भागातून नदीपात्राच्या फरशीवरून पंचवटीकडे वाहने नेता येतात.

पुलावर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे येथील रुंद पुलाच्या दोन्ही बाजूंचा उपयोग विविध वस्तू विक्रेत्यांनी करून घेतला आहे. त्यात हातगाड्या तर थेट पुलाच्या मध्यभागावरच थांबविल्या जातात. ग्राहक आणि विक्रेत्यांच्या गर्दीने हा पूल नेहमीच भरून गेलेला दिसतो. पुढे बाजारपेठेतही असाच प्रकार बघायला मिळतो. बाजारात दुकानासमोर थेट रस्त्यावरच काही दुकानांचा विक्रीचा माल ठेवण्यात येतो. जवळच दुकानदारांची वाहने पार्क केली जातात. परिणामी पादचाऱ्यांना या भागातून जाताना अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. पादचाऱ्यांना येथून सहज जाता येईल, याचा विचार करून दुकानांची मांडणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परदेशी गिफ्टचा मोह पडला महागात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लग्नाचे आमिष दाखवून ओझर येथील एका महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक करण्यात आली. परदेशातून गिफ्ट आले आहे, ते सोडविण्यासाठी बँक खात्यात वेळोवेळी पैसे टाकायला सांगून या महिलेची फसवणूक झाली. याबाबत ओझर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेचे पतीशी मतभेद असल्याने ती ओझर येथे आई-वडिलांकडे राहते. तिने एका ऑनलाइन विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर आपली माहिती व फोटो अपलोड केले होते. यावरून लंडन येथील मिचेल ससोन क्रग नावाच्या माणसाने या महिलेला फोन करून नंतर व्हॉटस् अॅपवर संवाद साधत ओळख वाढवली. मीचेलने आपली पत्नी मयत झाली असून, सारा नावाची एक मुलगी आहे. लंडन येथे राहत असून एका स्थानिक कंपनीत नोकरी करतो. काही दिवसांनी आईसह मी तुला भेटायला ओझरला येतो, असे सांगितले. महिलेने तिचा पत्ता दिल्यावर त्याने तुला भेटवस्तू पाठवतो, असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांनी दिल्ली येथून डेल्टा कुरिअर सर्व्हिसमधून श्वेता नावाच्या मुलीचा ओझर येथील या महिलेला फोन आला. तिने पार्सल सोडव‌िण्यासाठी ४२ हजार ५०० रुपये बँक खात्यावर भरा, असे सांगितले. त्यानुसार या महिलेने ते भरले. मात्र श्वेताने पार्सल सोडवयाला अजून एक लाख २५ हजार भरायला सांगितले. त्यानुसार या महिलेने पुन्हा ही रक्कमही भरली. त्यानंतर या श्वेताला या महिलेने फोन केला. तेव्हा आपले चलन चालणार नसून, ते विमानतळावरच बदलावे लागेल, असे तिने सांगून अजून ७० हजार ५०० रुपये मा‌गितले. तेव्हा ओझर येथील महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने ओझर पोलिसात धाव घेतली. ओझर पोलिसांचे एक पथक तपासासाठी दिल्ली येथे गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चॉकलेट मेकिंग’ची आज अनोखी संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेळोवेळी बहुविध उपक्रमांची पर्वणी देणाऱ्या मटा कल्चर क्लबतर्फे पॅरेंट्स डेनिमित्त आज, रविवारी (दि. २३) चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले अाहे. या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर्स आणि बंपर प्राइज जिंकण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांचा आवडीचा विषय असतो, तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट ठरताना दिसतो. त्यामुळे सर्वांनाच आवडणारी चॉकलेट्स घरच्या घरी बनविता आली तर..? सर्वांची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ पंचवटी, नाशिक या ठिकाणी करण्यात आले आहे. सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे, तसेच चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राऊनीज वर्कशॉपमध्ये बनवून दाखवणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत आहे.

--

सेल्फी पाठविणाऱ्या भाग्यवंतांना व्हाउचर्स

पॅरेंट्स डेनिमित्त ज्यांनी सेल्फी पाठविले आहेत त्यांनी चॉकलेट मेकिंग वर्कशॉपला उपस्थित राहावे. भाग्यवान ५० जणांना हेल्थ चेकअप व्हाउचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइज जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

---

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला भंडारदरा पिकनिकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रावणाची मजा लुटायची असेल तर घराबाहेर पडायला हवे, पिकनिकला जायला हवे. पण पिकनिकला जायचे म्हणजे ग्रुप हवा. त्यात भंडारदरा व त्यासारखी आजुबाजूची काही ठिकाणे असतील तर ग्रुपशिवाय पर्याय नाही. हाच विचार करुन मटा कल्चर क्लबतर्फे खास तुमच्यासाठी पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जुलै रोजी ही एकदिवशीय सहल होणार असून, सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष सवलतीही देण्यात येणार आहेत.

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर भटकंतीशिवाय पर्याय नाही. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नवीन ओळख करत निसर्गाचे सौंदर्य अनुभवणे हा अनोखा अनुभव असतो. त्यामुळे अशा पिकनिकच्या आयोजनाचीही अनेकजण वाट बघत असतात. सध्या पावसामुळे निसर्गाने हिरवी शाल पांघरली असून, त्याचा अनुभव या एकदिवशीय पिकनिकमधून घेता येणार आहे. या सहलीत चहा, नाश्ता आणि दुपारचे जेवण कल्चर क्लबकडून असणार आहे. या पिकनिकसाठी लिमिटेड स‌ीट्स असल्याने नोंदणी करणे गरजेचे आहे. मटा कल्चर क्लब मेंबरसाठी ८५० तर इतरांसाठी ९५० रुपये नोंदणी फी आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चौधरी यात्रा कंपनीतर्फे देशांतर्गत यात्रेसाठी ५ टक्के डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. जर तुमचा पाच जणांचा ग्रुप असेल आणि तुम्हाला देशांतर्गत टूर करायची असेल तर प्रत्येक सीटमागे तुम्हाला ५ टक्के (कमाल ७५० रुपये प्रतिस‌ीट) डिस्काउंट मिळेल आणि जर तुमचा १० जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येक सीट मागे ७ टक्के (कमाल १००० रुपये प्रतिसीट) डिस्काउंट मिळेल. ही ऑफर सहलीत सहभागी होणाऱ्या मटा कल्चर क्लब मेंबरसाठीच आहे. तसेच विदेश यात्रांसाठी आकर्षक सवलतीही चौधरी यात्रा कंपनीने उपलब्ध करुन दिल्या आहेत.

नोंदणीसाठी संपर्क

महाराष्ट्र टाइम्सच्या अल्फा स्क्वेअर, दुसरा मजला, डिसुजा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक -४२२००५ या पत्त्यावर किंवा ०२५३-२६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुड्ड्या खूनप्रकरणी एका संशयितास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याच्या हत्येप्रकरणी हल्लेखोरांच्या टोळीतील एका संशयिताला शनिवारी पुण्यातील मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातून पोलिसांनी अटक केली. सागर साहेबराव पवार उर्फ किट्टी (२२, रा. धुळे) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

धुळे शहरातील सहा पोलिस ठाण्यासह अमळनेर, मालेगाव, कोपरगाव, शिर्डी येथे चोरी, खंडणी, दरोडा, खुनाचे एकूण ३५ गुन्हे दाखल असलेल्या गुड्ड्याची मंगळवारी (दि. १८) जुना आग्रा रोडवरील चहाच्या दुकानासमोर टोळक्याने हत्या केली होती. प्राथमिक अंदाजानुसार या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सुमारे ११ असून, ती २५ पर्यंत वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. उर्वरित आरोपी लवकरच पकडले जातील, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली. गुड्ड्याच्या हत्येनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध शहरामध्ये पथक रवाना केले होते. त्यामधील एका पथकाने पुणे येथून सागर पवार याला पकडले. त्याच्याकडून गुड्ड्याच्या खूनाबाबत अन्य माहिती आणि सहभागी आरोपींची माहिती घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत, असेही पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सागर पवारला पोलिस हवालदार कुणाल पानपाटील, रवींद्र राठोड, दीपक पाटील, रमेश माळी यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

गुड्ड्याचा साथीदार अटकेत

गुड्ड्यांच्या हत्येनंतर शहरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणी बसेसवर दगडफेक करून काही जणांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच गुड्ड्याचा साथीदार राजाचोर यालाही ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमणगंगा-एकदरे लिंक नदीजोडला मान्यता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या भविष्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-एकदरे लिंक या नदीजोड प्रकल्पास राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. या लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तत्काळ बनविण्याचे आदेश राज्य शासनाने राष्ट्रीय जलविकास अभिकरणास दिले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकसाठी ५००० दशलक्ष घनफूट इतके पाणी अतिरक्त पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजिनीअर राजेंद्र जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

गंगापूर धरण समूहाचे पाणी भविष्याची वाढती गरज लक्षात घेता पिण्यास, सिंचनास तसेच उद्योगास पाणी पुरत नव्हते. त्यावर उपाय म्हणून दमणगंगा-एकदरे लिंक या नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनास सुचवला होता. गेल्या दीड वर्षापासून या योजनेचा पाठपुरावा केल्यामुळे त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिकचा समावेश दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात (डीएमआयसी) झालेला आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध होणे आवश्यक होते. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणामुळे गंगापूर धरणसमूहात सिंचनाची तूट निर्माण झाली होती. नाशिकसाठी पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई औद्योगिक वसाहत टप्पा क्र. १ साठी औरंगाबाद येथील शेंद्रा-बिडकीन येथे प्रस्तावित करण्यात आली. त्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी उपलब्धता दाखवण्यात आली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नाशिकवर अन्याय झाला. तो आता या योजनेतून दूर होणार आहे. त्यामुळे ‘मेक इन नाशिक’ साठी पाणी उपलब्ध झाले आहे. डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश निश्चित झाला आहे. आता नाशिकला पिण्यासह उद्योगांना व सिंचनासही दमणगंगा-एकदरे लिंक प्रकल्पातून पाणी उपलब्ध होणार आहे. २९ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा कोकण खोरे महामंडळाच्या बृहद आराखड्यात समावेश करण्यात आलेला आहे. गंगापूर कालव्यांच्या १२००० हेक्टरच्या सिंचनात निर्माण झालेली तूट या प्रकल्पातून भरून निघणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

दमणगंगा नदीवर एकदरे या पेठ तालुक्यातील गावाजवळ ५००० दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. सदरचे पाणी ८ किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे २१० मीटर उपसा करून उमरद गावाजवळील ख‌िरा डोंगरावर आणण्यात येईल. तेथून पुढे ५.५ किमी लांबीच्या बोगद्याद्वारे गंगापूर धरणात टाकण्यात येणार आहे. अशा प्रकारे नाशिकच्या विकासासाठी ५००० दशलक्ष घनफूट इतके अतिरिक्त पाणी पिण्यास, उद्योगास व सिंचनास उपलब्ध होणार आहे.


नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्न

जलसंपदा विभागामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी एनडब्ल्यूडीएला १० जुलै रोजी पत्र पाठवले आहे. प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी १८.२१ कोटी इतका खर्च येणार आहे. ही योजना राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पांतर्गत राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.


प्रस्तावित पाणी वापर व खर्च

नाशिकला पिण्यासाठी - २५०० दलघफू

उद्योगांसाठी - १००० दलघफू

सिंचनासाठी (गंगापूर कालवा) - १५०० दलघफू

अंदाजित खर्च- ८५९ कोटी

लाभ-व्यय गुणोत्तर - १.४४

आर्थिक परतावा दर - १६.७८ टक्के

प्रकल्प अहवालाचा खर्च- १८.२१ कोटी रु.

सिन्नर, शिर्डीचाही पाणीप्रश्न मिटणार

सिन्नरच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या गारगाई-अप्पर-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदी-जोड प्रकल्पासही राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तत्काळ बनविण्याचे निर्देश राज्य सरकारने राष्ट्रीय जलविकास अभिकरणास दिले आहेत. या नदी-जोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्यासाठी २३.९३ कोटी इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यासाठी ७००० दशलक्ष घनफूट इतके पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे आण‌ि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पांतर्गत गारगाई-वाघ-वाल ह्या नद्यांवर पाच धरणे बांधून ७००० दशलक्ष घनफूट पाणी लिफ्ट करून वैतरणा धरणात व पुढे थेट पाइपलाइनने हे पाणी कडवा धरणात टाकण्यात येईल. कडवा धरणातून पुन्हा लिफ्ट करून ते सोनांबे येथे देवनदीच्या उगमात येईल. सोनांबे येथील धरणातून २१०० दशलक्ष घनफूट पाणी देवनदीच्या उगमात सोडून पावसाळी कालव्याने सर्व पाझरतलाव भरण्यात येतील. सिन्नर शहर-तालुका व शिर्डीस पिण्यासाठी थेट पाइपलाइनने ८०० दशलक्ष घनफूट पाणी पुरवण्यात येईल. २६०० दशलक्ष घनफूट पाणी सिन्नर-माळेगाव उद्योग वसाहत व प्रस्तावित दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यास पुरवण्यात येईल. उर्वरित १५०० दशलक्ष घनफूट टीएमसी पाणी उच्चस्तरीय पाइपलाइनने डुबेरे-रामोशीवाडी-दापूर-दोडी-नांदूर शिंगोटे या गावांतून भोजपूर कालव्यास जोडण्यात येईल. भोजपूर कालवा थेट पाइपलाइनच्या माध्यमातून दोडी, नांदूरशिंगोटे, निमोण, तळेगाव, रांजणगाव, मिरपूर, निर्मळ पिंप्री, कोऱ्हाळे, काकडी, शिर्डीपर्यंत वाढविण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात पशुसंवर्धन योजना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकऱ्यांपर्यंत पशुसंवर्धन योजना पोहोचव‌िकरिता जालना जिल्ह्यासाठी पथदर्शी उपक्रम राबवण्याचे शासनाने यापूर्वीच ठरविले आहे. तसाच उपक्रम राबविणारा मालेगाव हा राज्यातला दुसरा तालुका ठरेल. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून देखील जनावरे व मेंढ्या खरेदीसाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांच्या उपस्थितीत मालेगाव तालुका पशुसंवर्धन विभागाच्या कामकाज आढावा बैठक प्रसंगी खोतकर बोलत होते. यावेळी महापलिका आयुक्त संगिता धायगुडे, पशुसंवर्धन उपायुक्त एस. पी. विसावे उपस्थित होते. खोतकर म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी लाभार्थ्यांना गायी व म्हैशी ही दुभती जनावरे घेण्यासाठी मोठे अनुदान दिले जात आहे. गायीसाठी ५५ हजार रुपये व म्हशीसाठी ६५ हजार रुपये असा दर केला जाणार आहे. शेतकरी सहभागासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना खोतकर यांनी दिल्या.


शीतकरण प्रकल्प लवकरच सुरू होणार

तालुक्यातील पशुधन असलेले विराणे, साकोरी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्यात येतील. जिल्हा दूध संघाचा मालेगाव येथील बंद शीतकरण प्रकल्प सुरू करण्यात येईल. यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात यावा असे निर्देश राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले. खोतकर यांनी दरेगाव परिसरातील मांस प्रक्रिया उद्योग आणि कत्तलखान्यांना भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी फेरी ः एक अनुभूती

$
0
0

केशव ढोन्नर

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांना याच प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे.

‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे...’ बालकवींच्या या कवीतेतील श्रावण त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत अगदी सहज सापडतो. त्र्यंबकेश्वर, श्रावण महिना आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हे एक अतूट समीकरण आहे. श्रावण महिना हा व्रतवैकल्य, आराधना आणि उपसनाकरिता पर्वकाल समजला जातो. साहज‌िकच आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री साधकांची पावले वळल्यास नवल ते काय! हिरव्या पाचुंची शाल अंगावर घेतलेल्या ब्रह्मगिरी आणि पर्वतराईतून शुभ्रधवल खळाळणारे धबधबे मनोहरी दिसतात. या भक्ती आणि पर्यटनाचा योग साधण्यासाठी श्रावण महिन्यात खरोखरच आयडीयल म्हणावे असे वातावरण येथे अनुभवण्यास मिळते. महिन्याभरात येथे १५ ते २० लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. अर्थात दर्शना बरोबरच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणारे भाविक काही कमी नाहीत. श्रावण सोमावारी यास विशेष पसंती मिळते.

पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादित होती. तेव्हा उपासना करणारे भाविक त्र्यंबकेश्वर येथे महिना सव्वा महिना मुक्कामी असायचे. लॉज‌िंग संस्कृती इतकी विकसीत झालेली नव्हती. तेव्हा येथे धर्मशाळा हा भाविकांचा एकमेव निवाऱ्याचा आधार होता. सकाळ-सायंकाळ मंदिरात हजेरी लावणे, पोथ्या-पुराणांची पारायणे करणे आणि प्रदक्षिणा करणे याकरिता भाविक येथे निवासी असायचे. शहरातील सर्वच मंदिर, मठ आणि आश्रमांमध्ये भल्या पहाटेपासून पुजाअर्चा सुरू झालेल्या आहेत. रात्री उश‌िरापर्यंत पोथी पुराणांचे वाचन सुरू असते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक शिव उपासना करण्याचा भाग आहे.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी तर कधी पापक्षालणासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत. इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांग‌ितले आहे. तथापि प्रदक्षिणा त‌िसऱ्या सोमवारीच करावी हा नवा पायंडा सुमारे १५ ते २० वर्षांपासून रूढ झाला आहे. यामध्ये विविध प्रकारचे समज-गैरसमज आहेत. जसे सलग पाच वर्ष तिसऱ्या सोमवारची प्रदक्षिणा केली तर लाभ होतो, असा प्रचार झाला आहे. वास्तव‌िक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी सारखाच लाभ देणारी आहे. त्यात श्रावणात केली तर अधिक चांगले आहे. केवळ त‌िसऱ्या श्रावण सोमवारचा आग्रह धरल्याने ठराव‌िक वेळेत काही लाख भाविक या सुमारे वीस किलोमीटच्या मार्गावर चालतात. एवढा मोठा समुदार एकाच वेळेत चालत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये नाशिक त्र्यंबक वाहतुकीपासून ते स्वच्छतापर्यंत सर्वच बाबतीत ताण निर्माण होतो. तशात रात्री अपरात्री ही प्रदिक्षणा होत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

प्रदक्षिणा मार्गावरील तीर्थ

प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, वैतरणा-बाणगंगा निर्मल तीर्थ, बानगंगा-धवलगंगा पद्मतीर्थ, नरसींह तीर्थ, बिल्वतीर्थ आदी तीर्थ आणि नद्या तसेच मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात. काही तीर्थ आज दृष्टीत येत नाहीत. तसेच प्रदक्षिणेचा मार्गही बदलल्यामुळे काही तीर्थ आणि मंदिरे भाविकांच्या वाटेत लागतच नाहीत. प्रदक्षिणे दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पुर्वाभूमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. सकाळच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन अवघा शिणभाग घालवते. सुर्योदयाच्या वेळी स्वर्गीय दृष्याची अनुभती प्राप्त होते. येथुन पुढे परतीचा प्रवास सुरू होतो. प्रदक्षिणा मार्ग सिमेंट काँक्रीटचा झाला आहे. पूर्वी आरण्यातून वाट सापडेल तशी होणारी प्रदक्षिणा आता केवळ रस्त्याने चालणे अशी झाली आहे. डोंगर माथ्यावरून वनस्पतींमधून खळाळात आलेले झरे पायाला सुखावह असायचे. चिखलातून चालतांना विविध वनस्पतींचा स्पर्श पायांना व्हायचा आणि सलग चारपाच तास चालणे ही एक योगसाधना पूर्ण व्हायची. ती आता त‌ितक्याच प्रमाणात आणि प्रभावाने होणार नसेल, तरी देखील श्रावणात पाऊस असताना प्रदक्षिणा करणे हा अनुभव खरोखरच अगदी वेगळा आहे. आणि तो आनंदी अनुभव पुन्हा पुन्हा घ्यवासा वाटतो. अर्थात या फेरीत स्वतः काही नियम पाळणे निश्च‌ितच गरजेचे आहे. जसे सोबतचे पास्टिक कुठेही न टाकता, एकाच ठिकाणी जमा करावे. चालत असताना नशेचे पदार्थ घेऊ नये. विक्रेत्यांनीही प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. एकूणच पूर्वजांनी दिलेला हा अनमोल ठेवा आपण अनुभवतांना पुढच्या पिढीसाठी मागे ठेवावा.

तिसऱ्या सोमवारलाच महत्त्व?

श्रावणी सोमवारला प्रदक्षिणा करणे विशेष फलदायी मानले जाते. पहिले दोन श्रावण सोमवार पूर्वी ञ्यंबक येथे असणारी विशेष गर्दी असायची. पौणिर्मेपर्यंत लिंगार्चन पोथी पुराण पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेलमुळे विविध व्यवसाय‌िकांना उसंत मिळायची नाही. यातूनच श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिसऱ्या सोमावरी फेरीला प्राधान्य दिले जायचे. तशात औरंगाबाद-नाशिक आदी भागातून याच सोमवारी फेरीसाठी भाविक यायचे. म्हणून तिसऱ्या सोमवारचे महत्त्व वाढले. १९९६ नंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला. आता तर तो शासन पातळीवर नियोजन करावे, असा महत्त्वपूर्ण उत्सव झाला आहे.


महात्म्य आणि प्रथा

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत)सह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या तीनही प्रदक्षिणेत ब्रम्हग‌िरी पर्वतास प्रदक्षिणा घालणे आहे. सुमारे वीस किलोमीटरचा हा मार्ग आता पक्का रस्ता झाला आहे. या मार्गावर कित्येक तीर्थ आहेत. त्यापैकी बहुतेक काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. प्रदक्षिणेचा मार्ग देखील सोयीचा ठरेल असा बदलला आहे. त्यात काही तीर्थ राहुन जातात. ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करतांना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठून कुशावर्तावर स्नान करून श्री ञ्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गाक्रमण करावे. म्हणजे साधारणत: पहाटे पाचवाजता ही फेरी सुरू करावी. म्हणजे सूर्योदय होतांना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गे सृष्टीसौंदर्याचा अस्वाद घेत शिवाचे नामस्मरण करत फेरी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश चांगले गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कुविख्यात चांगले टोळीचा म्होरक्या गणेश चांगले (वय २८, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. तपासात त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गणेश चांगले पंचवटीतील गंगाघाट परिसरात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. शंकर कोल्हे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या महिला सहायक निरीक्षक सारीका अहिरराव आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तेथे सापळा रचला. गणेश गोदाघाट परिसरात आला असता त्याला शिताफीने अटक करण्यात आली. गणेश चांगले याच्यावर विविध पोलिस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार होता. वर्षभरापूर्वी सरकारवाडा पोलिसांनी गंगापूररोड भागात चांगलेच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी चांगले पोलिसांच्या हातावर तुरी देवून फरार झाला. त्याच्या साथीदारांच्या वाहन तपासणीत धारदार शस्त्रांसह गावठी पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्रे प्रतिबंधात्मक (आर्म अ‍ॅक्ट) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर अंबड हद्दीत दरोड्याच्या तयारीत त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यावेळीही तो पोलिसांच्या हाती लागू शकला नव्हता. तेव्हापासून अंबड आणि सरकारवाडा पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चांगले याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आर्म अॅक्ट, हाणामारी, जीवघेणा हल्ला यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओव्हरफ्लो भावलीचे जलपूजन

$
0
0

म. टा. वृतसेवा, इगतपुरी

इगतपुरी तालुक्याची मदार अवलंबून असलेले भावली धरण पाच दिवसांपूर्वी पूर्ण क्षमेतेने भरल्याने शनिवारी आमदार निर्मला गाव‌ित यांनी धरणाचे विधिवत जलपूजन केले.

यावेळी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आढावा घेऊन पाण्याचा संपूर्ण तालुक्याला लाभ होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना गावित यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. या धरणाला पर्यटकांचीही पसंती असल्याने परिसर सुशोभित करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, तहसीलदार अनिल पुरे, कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता रमेश गावीत, शाखा अभियंता सुहास पाटील, कचरू डुकरे आदी उपस्थित होते.

जलसंपदा हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. संपूर्ण जनतेला या पाण्याचा लाभ होवो, तालुक्यातील व मतदारसंघातील जनता सुखी समाधानी होवो, अर्ध्या महाराष्ट्राला पिण्याचे व शेतीचे पाणी पुरविणाऱ्या दारणा, मुकणे, कडवा, वाकी व वैतरणा धरणेही लवकर भरोत अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

भावलीसह दारणा, कडवातून विसर्ग

इगतपुरी तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार असून, धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. इगतपुरीचा पश्चिम परिसर जलमय झाला आहे. इगतपुरी तालुक्यात ४८ तासांत ३०० मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात तालुक्यात २१८३ मिमी पाऊस झाला असून, ही सरासरी ६३ टक्क्यांवर गेली आहे. दारणा, कडवा या धरणांतून मोठ्या प्रमाणात जलविसर्ग सुरू असून, वैतरणा व मुकणे धरणातही जलसाठा वाढला आहे. भावली धरण चार दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून, दारणा ८० तर कडवा ८५ टक्के भरले आहे. दारणा धरणातून १३ हजार क्यूसेस, तर कडवा धरणातून ७ हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. भावली धरणातून १६०० क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. वैतरणा ७२ टक्के, मुकणे ३६ टक्के तर वाकी धरण ३५ टक्के भरले आहे.

निफाडला रिमझिम

निफाड ः निफाड व परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अर्धा तास चांगला पाऊस झाला. दुपारी रिमझिम पाऊस बरसत होता. दारणा व गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने सायखेडा-चांदोरी परिसरात पूरसदृश स्थिती आहे. गोदाकाठ परिसरातील वीटभट्ट्या तसेच शेती पाण्याखाली गेली आहे.

चांदवड, नांदगावला भिजपाऊस

मनमाड ः मनमाड शहर परिसरात तसेच चांदवड तालुक्यात शनिवारी रिमझिम पावसाने जनजीवन विस्कळीत केले. शुक्रवार रात्रीपासून मनमाड शहरात संततधार पाऊस सुरू होता शनिवारी मनमाडसह चांदवड व नांदगाव तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसाने रस्त्यावर दुकाने मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांची धांदल उडाली. या भिजपावसाने शेतकरी वर्गात समाधान पसरल्याचे चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी अपव्यय टळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य मंत्रिमंडळाने उसाच्या पिकासाठी ठिंबक वापरण्याचा निर्णय घेतला. जलचिंतन संस्थेने १२ एप्रिल २०१२ रोजी केलेल्या उपोषणात उसासाठी ठिंबकाचा कायदा करण्याची मागणी केली होती. उशिरा का होईना सरकारने हा निर्णय घेतला असल्याने पाण्याचा अपव्यय टळणार असल्याची प्रतिक्रिया जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली.

सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात उसाचे क्षेत्र अमर्याद झाले होते. त्यास जास्तीचे पाणी देऊन पाण्याचा अपव्यय होत होता व जमिनीसुद्धा खराब झाल्या. वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी वसूल होत नव्हती. हा राष्ट्रीय संपत्तीचा नाश होता. एकीकडे दुष्काळी भागात पिण्याचे पाणी नाही त्यासाठी टँकर लावले जातात त्या उलट कालवा लाभक्षेत्रात पाण्याचा अमर्याद वापर केला जात असल्याचे दिसून येत होते. हे समन्यायी तत्वाचे अगदी विरुद्ध होते. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला देऊ नये याबरोबरच इतर अनेक मागण्या या उपोषणात जलचिंतन संस्थेने केल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या ताज्या निर्णयानुसार उसाला ठिंबक सिंचन केलेले नसल्यास पाणी मिळणार नाही. तसेच सिंचन प्रकल्पाच्या कालवा लाभ क्षेत्रात उसाचे पिक किती असावे याबाबतचे नियम ठरवणे आवश्यक झाले आहे. कारण साखर दरवर्षी देशाच्या गरजेनुसार पिकवली तरच तिचे भाव स्थिर राहतील व साखर कारखानदारी अडचणीत येणार नाही. तसेच तयार साखर ठेवण्यास पुरेसे गोडाऊन सुद्धा नाहीत जागतिक बाजारपेठेची व आपल्या लोकसंखेची गरज यानुसारच ऊस पिक क्षेत्रावर नियंत्रण आणणे क्रमप्राप्त झाले आहे, असे मत जलचिंतन संस्थेने व्यक्त केले आहे.

अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला द्या
सरकारची पावले आता शेतीतील पाणीबचतीच्या दिशेने पडणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, त्या संबंधीचे निर्णय घेणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने सरकारकडून उशीर होतो. जनतेला शिस्त लावणे हे सरकारचे काम असून या देशात स्वयंस्फूर्तीने फार गोष्टी घडत नाही. ठिंबकमधून निर्माण होणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला द्यावे, अशी मागणी जलसंस्थेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी अर्जात खोडा

$
0
0

नाशिक : कर्जमाफीची घोषणा होऊन महिना उलटल्यानंतर राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांच्या संपामुळे असे अर्ज भरणे शेतकऱ्यांना अवघड आहे. या अर्जात शेतकरी इतर माहिती भरू शकतात. पण, त्यांना कर्जाचा तपशील भरतांना अडचण येणार आहे. या अर्जाच्या ९ क्रमांकावर पीक किंवा मुदत कर्जाचा तपशील हा कॉलम आहे. यासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांची माहिती महत्त्वाची आहे.
राज्य सरकारने हे ऑनलाइन अर्ज राज्यातील २५ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांमधून भरून देण्यासाठी आवाहन केले आहे. त्यात अर्जाचा नमुनाही जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच बँका व प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्रावरही असे अर्ज असणार आहे. पण या अर्जावरील माहिती भरण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्जाचा तपशील मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मात्र ही अडचण येणार नाही. पण त्यांची संख्या कमी आहे.

याद्या रखडल्या
राज्यात शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या घोषणेला सोमवारी २४ तारखेला महिना पूर्ण होणार आहे. पण सरकारकडे आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी पुकारलेल्या संपामुळे रखडली आहे. तब्बल २७ दिवसांपासून राज्यातील २१ हजार विविध कार्यकारी सोसायटीचे ६५०० हून अधिक सचिव संपावर आहेत. त्यामुळे खरा आकडा पोहचत नसल्यामुळे शासनाचाही गोंधळ उडाला आहे. केवळ ढोबळ माहितीद्वारे शासन आकडेमोड करीत आहे. त्यातच हा ऑनलाइन अर्जाचा घोळ आता नव्याने वाढला आहे.

माहिती मिळणे झाले अवघड
शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे ९५ टक्के कर्ज या संस्थेमार्फतच वाटप केले जाते. त्यामुळे या कर्जाचा तपशीलही या संस्थेकडे आहे. या सोसायट्यांच्या सचिवांनी २७ जूनपासून आपल्या विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे शासनाला अचूक माहिती मिळणे अवघड झाली आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सोमवारपासून (दि. २४) भरण्याचे आवाहन केले आहे. या अर्जावरील इतर माहिती शेतकरी भरू शकतात. कर्जाचा तपशील भरण्यासाठी आमच्याकडून माहिती घ्यावी लागणार आहे. सरकारने आमच्या मागण्या मंजूर कराव्या. त्यानंतर ही सर्व कामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
- विश्वनाथ निकम,
अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकर्षक नोंदणीची चारचाकींसाठी मालिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील चारचाकी खासगी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. असा आकर्षक क्रमांक घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज २५ जुलै २०१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जमा करणे आवश्यक आहे.
ज्यांचे नावे असेल त्याने अर्ज करावा. अर्जासोबत अर्जदाराने फोटो ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या किंवा शेड्युल बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावे भरावा लागेल.

एकदा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक बदलून किंवा रद्द करता येणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद पाकिटात सादर करावा. अर्जदार विहित शुल्कापेक्षा सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक दिला जाईल.

आकर्षक क्रमांकाचे शासकीय विहित शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथील बोर्डवर प्रदर्शित करण्यात आलेली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बूथ तिथे शाखा; शाखा तिथे झाड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसकडून ‘गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा’ या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नाशिकमधील पक्षाच्या संघटनेकडून ‘बूथ तिथे शाखा व शाखा तिथे झाड’ असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या सर्व नवीन शाखांचे उद्‍घाटन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ‘राष्ट्रवादी युवक’चे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता संघटनेतर्फे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याच अभियाना अंतर्गत युवक संघटनेतर्फे ‘बूथ तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा आणि शाखा तिथे एक झाड’ असा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

वृक्षसंवर्धनाची जबाबदारी शाखाप्रमुखाकडे
उपक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे पक्षबांधणीसोबतच शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावली जाणार आहे. शहरातील प्रत्येक शाखेजवळ झाड लावून त्याची वाढ व रक्षण करण्याची जबाबदारी तेथील शाखा प्रमुखाची असणार आहे. त्यामुळे या उपक्रमातून नाशिक शहरात शेकडो झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती अंबादास खैरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना पडला नाशिककरांचा विसर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची केलेली घोषणा फसवी ठरली आहे. नाशिककरांच्या विश्वासाला भाजपने तडा दिला आहे. शहराकडे समस्यांकडे मुख्यमंत्र्यानी लक्ष घालावे व शहराचा विकास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस निखिल सरपोतदार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना नाशिककरांचा विसर पडल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंचवार्षिक सत्तेत अनेक महिने महापालिका आयुक्त नव्हते. परंतु, शहराचा विकास हा राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू होता. महापालिका निवडणुकीनिमित्त सुरू असलेल्या जाहीर प्रचार सभेत नाशिककर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फसव्या घोषणांना बळी पडले. नाशिक दत्तक घेणार अशी घोषणा करून मुख्यमंत्री मोकळे झाले. यानंतर ना‌शिकमधील मतदारांनी भाजपला एक हाती सत्ता दिली. नाशिक शहराचा कायापालट होईल, असे त्यांना वाटले. मात्र, मुख्यमंत्र्यानाच या घोषणेचा विसर पडल्याचा आरोप सरपोतदार यांनी केला आहे. शहर दत्तक घेऊन सहा महिने उलटले शहरात पहिल्याच पावसात पावसामुळे नालेसफाई न झाल्याने गटारी तुंबल्या. त्यामुळे जुन्या नाशिक व शहरातील अनेक भागामध्ये दुर्गंधी पसरली. कचरा, डास यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. परिसरातील अनेक नागरिक, लहान मुले साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. डास प्रतिबंध होण्यासाठी धूर फवारणी व नाल्यावर औषध फवारणी केली गेली नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत, असेही सरपोतदार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरिपाच्या पेरण्यांवर ‘दुबार’चे संकट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
खरीप हंगामाचा दीड महिना उलटल्यानंतरही पावसाअभावी नाशिक विभागात अद्याप १०० टक्के पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर काही तालुक्यांमधील खरीप पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

नाशिक विभागातील ५४ पैकी काही तालुक्यांचा अपवाद वगळता यंदा समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. यातून विभागात ७७.४४ क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अर्थात, ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधान देणारी असली तरी काही तालुक्यांना अद्यापही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा तालुक्यांमधील पेरण्या खोळंबलेल्या आहेत.
नाशिक विभागातील २२ हजार ९३ हेक्टर इतक्या प्रस्तावित क्षेत्रापैकी १७ हजार ४६९ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. अद्यापही प्रस्तावित क्षेत्रापैकी चार हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. असमान पावसामुळे अद्याप काही तालुके पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये येत्या आठवडाभरात दमदार पाऊस न झाल्यास तेथील पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक, नंदुरबार पिछाडीवर
विभागात नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्राच्या ७२.१३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात मका, तूर, उडीद, भूईमूग, सोयाबीन व भात या पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात तर बाजरीची पेरणी कमी प्रमाणात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तर केवळ ५९.५० टक्के इतकीच पेरणी झाली आहे. मका, ज्वारी, उडीद व तूर या पिकांचा पेरा या जिल्ह्यात चांगला झाला आहे.

जळगाव-धुळे अव्वल
विभागातील जळगावसह धुळे जिल्ह्यातील पेरण्या १०० टक्केच्या जवळपास पोहचल्या आहेत. जळगावमध्ये सुमारे ८१ तर धुळे जिल्ह्यात ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील पेरण्यांनी वेग घेतला होता. धुळे जिल्ह्यात मूग, सोयाबीन व कापूस या पिकांच्या तर जळगावमध्ये मका, भूईमूग व सोयाबीन या पिकांच्या पेरण्या प्रस्तावित क्षेत्रापेक्षा जास्त झाल्या आहेत.

विभागातील पेरणी स्थिती
जिल्हा.........प्रस्तावित क्षेत्र (हे).........प्रत्यक्ष पेरणी (हे).........पेरणी टक्केवारी
नाशिक.........६,०८०.८०..................४,८९२.२०.........७२.१३
जळगाव.........७,८००..................६,८४९.४८.........८०.८९
धुळे.........४,५८१...........................४,०९९.८४.........८९.६५
नंदुरबार .........२,८५१..................१,६२७.८२.........५९.५०
एकूण.........२२,०९२.८०..................१७,४६९.३४.........७७.४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

$
0
0

नाशिक : प्राप्तिकर दिनानिमित्त नाशिक विभागातर्फे सोमवारी (दि. २४) आयसीए हॉल, अशोक मार्ग येथे दुपारी ३ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स, संयुक्त आयकर आयुक्त मोहित मृणाल यांनी दिली. यानिमित्त आयकर परिवारातील सदस्यासाठी ‘राष्ट्रउभारणीत प्राप्तिकराचा वाटा’ या विषयावर निबंध लेखन, घोषवाक्य लेखन, मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे.

आजपासून व्याख्यान
नाशिक : श्री कालिकादेवी मंदिर संस्थान श्री कालिकादेवी मंदिर परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने २४ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री कालिकादेवी मंदिर सभागृह, जुना मुंबई-आग्रारोड येथे ज्ञानेश्वरीवर प्रा. उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

उद्या गुणगौरव सोहळा
नाशिक : नाएसो संचलित सारडा कन्या विद्यामंदिरचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजता प. सा. नाट्यमंदिरात होणार आहे. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर रंजना भानसी यांची उपस्थिती राहणार आहे.

जेलरोडला टिळक जयंती
नाशिकरोड : जेलरोड येथील अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयात लोकमान्य टिळकांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक विभागप्रमुख जयश्री सरोदे यांनी टिळकांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षिका शुभांगी खैरनार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी टिळकांविषयी मनोगत व्यक्त केले.


व्हिडीओचालकावर गुन्हा
नाशिक : भद्रकालीतील व्हिडीओ गल्लीत अश्लिल चित्रफीत दाखवणाऱ्या चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल बन्सीलाल जैन (४८, रा. काठेगल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. भद्रकाली पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई जावेद अताउल्ला खान यांनी शनिवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तलावडी परिसरात छापा मारून अनिल यांच्या व्हिडीओ हॉलची पाहणी केली. त्यावेळी संशयित तेथे अश्लिल चित्रफीत दाखविली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.

बाजार समितीची आज सुनावणी
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी काढलेल्या नोटीसांवर सोमवारी (दि. २४) सुनावणी होणार आहे.
गेल्या ३ जूनला या नोटीसा काढल्यानंतर संचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर या सुनावणीसाठी पुढच्या तारखा देण्यात येत होत्या. त्याच कालावधीत सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव संचालकांच्या सभेत मंजूर करण्यात आला. सभापतीच्या निवडीत शिवाजी चुंभळे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आता ही सुनावणी होत आहे.

बिटकोमधून रुग्ण बेपत्ता
सिन्नर फाटा : महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेला जेतवननगर येथील सुरेश उमाकांत गांगुर्डे (४७) हा रुग्ण बेपत्ता झाला आहे. अनिल उमाकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात सुरेश गांगुर्डे हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यास कळविण्याचे आवाहन नाशिकरोड पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाप्रश्नी कार्यवाही करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गोदावरी प्रदूषणासंदर्भात होत असलेल्या चालढकलीची दखल हायकोर्टाने घेतली असून, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी पर्यावरणप्रेमी ऋषिकेश नाझरे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान हे निर्देश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात नाझरे यांनी सांगितले, की केंद्र सरकारच्या ‘निरी’ या संस्थेने गोदावरी रक्षणाबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जाताना दिसत नाही. नदीच्या प्रवाहाला अडथळा करता कामा नये, ही प्रमुख सूचना असतानाही गंगापूररोडला क्रीडा संकुलाच्या कामाचे डबर नदीत टाकले जात आहे. नदीकाठची झाडे तोडण्यास हायकोर्टाची मनाई आहेत, तरी झाडे तोडली जात आहेत. ‘निरी’ची मनाई असतानाही नदीत कचरा टाकला जात आहे.

प्रतिबंध असूनही बांधकाम

नदीच्या निळ्या (नदीचा काठ) व पांढऱ्या रेषेत (नदीचा प्रवाह) बांधकामास प्रतिबंध असतानाही या रेषांमध्ये इमारती, हॉटेल्सचे बांधकाम सुरू आहे. तसेच, गोदापार्कदेखील त्यातच आहे. नदीकाठी आलेली नैसर्गिक झाडे, गवत न काढण्याच्या सूचना आहेत. मात्र, ते काढून परदेशी झाडे लावण्यात येत आहेत. नदीतील पाणी शेतीलाही वापरण्याची परवानगी नाही. ते फक्त पिण्यासाठी वापरण्याचे निर्देश आहेत. परंतु, नदीकाठी सुरू असलेल्या बांधकामासाठी अनेक भागात नदीत पंप टाकून पाणी खेचले जात आहे. नदीच्या बाजूला ठेवलेल्या निर्माल्य कलशात निर्माल्याएेवजी कचरा टाकला जात आहे. निर्माल्याला जागा नसल्याने ते नदीत टाकावे लागत आहे. वरील बाबी नाझरे यांनी याचिकेद्वारे कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर कोर्टाने प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारअभावी खुंटणार संभाषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आदेशान्वये ३० जुलैच्या आत मोबाइल कार्ड व आधार कार्ड एकमेकांना लिंक करुन न घेतल्यास स‌िम कार्ड बंद करण्याचा इशारा ट्रायने दिला आहे. परंतु, आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांचे बोटांचे ठसे फिंगर प्रिंट रीडर यंत्रावर जुळत होत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मोबाइलच्या सिम कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने मोबाईल सीम कार्ड व आधारकार्ड एकमेकांना लिंक करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने भारतातील सर्व दूरसंचार कंपन्यांना आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले. ज्या ग्राहकांनी नवीन कार्ड घेतले, त्यांना व्हेरिफिकेशन करुनच कार्ड वितरित करण्यात आले. परंतु, ज्या ग्राहकांकडे जुनी कार्ड आहेत, अशांना ३० जुलै ही मुदत देण्यात आली. सर्व कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना तसे मेसेजही पाठवले. मात्र, ग्राहक मोबाइल कार्ड लिंक करण्यासाठी मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर अनेकांचे फिंगरप्रिंट आधार कार्डशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले. आधार कार्ड लिंक न होणे ही टेलिफोन कंपन्यांची चूक नाही तर ती प्रशासनाची चूक असल्याचे सांगितले जात आहे.

बायोमेट्रिक अपडेशन नाही

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११ ते २०१४ या कालावधीत ज्या व्यक्तींनी आधार कार्ड काढले आहे, अशा ग्राहकांचे बायोमेट्रिक अपडेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले आधारकार्ड त्याच व्यक्तीचे आहे की नाही हे ठामपणे सांगता येत नाही. आतापर्यंत केवळ वीस टक्के ग्राहकांनीच आपले स‌िमकार्ड आधारकार्डशी लिंक केलेले आहेत. ८० टक्के ग्राहकांनी अद्याप लिंक केलेले नाही. अनेकांना लिंक करण्यात अडचणी येत आहे. हे कार्ड दिलेल्या मुदतीत लिंक न झाल्यास सिमकार्ड कायमस्वरुपी रद्द केले जाईल, असे ट्रायने म्हटले आहे. एकीकडे ट्रायची सक्ती तर दुसरीकडे आधार काढताना प्रशासनाची चूक, त्यामुळे काय करावे अशा कचाट्यात ग्राहक सापडले आहे.

एकत्र काढलेल्या आधारमध्येही दोष

अनेक कुटूंबांनी एकत्रितरित्या आधार कार्ड काढले आहेत. त्यातील पुरुषांचे आधारकार्डचे व्हेरिफिकेशन होत असून, काही महिलांच्या कार्डबाबत तक्रारी आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण इमारतीमध्ये असलेल्या लोकांचे व्हेरिफिकेशन होत नसल्याचे दिसून आले आहे.


दुसऱ्याच्या नावावर सिम घेण्याचा सल्ला

नवीन सीम कार्ड घेणाऱ्या ज्या ग्राहकांचे आधार कार्ड फिंगर प्रिंटशी मॅच होत नाही, अशा ग्राहकांना ज्यांचे कार्ड आणि फिंगर प्रिंट दोन्ही मॅच होतील, अशा व्यक्तींच्या नावार कार्ड घेण्याचा सल्ला टेलिफोन कंपन्यांकडून दिला जात आहे. मात्र, हे बेकायदेशीर असून, या सिमकार्डचा गैरवापर झाल्यास त्याचा आधारधारकाला मनस्ताप होऊ शकतो.


अनेक ‘आधार’ बंद

अनेक ग्राहकांकडे अद्याप आधारकार्ड नाही. ज्या ग्राहकांना कार्ड काढायचे आहे अशांसाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. नाशिक शहरात व उपनगरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी आधार कार्ड केंद्रे सुरू केली होती, त्यातील बहुतांश बंद झाली आहेत. त्यामुळे आधार कार्डसाठी अनेक ग्राहकांना वणवण फिरावे लागत आहे. अनेक ग्राहकांनी महापालिकेत व जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता पत्ते देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात तेथे आधारकार्ड केंद्रच सुरू नसल्याचे आढळून आले आहे.


अपडेशेनची पर्यायी व्यवस्था नाही

बोटांचे ठसे दर दहा वर्षांनी कमी अधिक प्रमाणात बदलू शकतात. परंतु, डोळ्यांचे आयडेंट‌िफिकेशन बदलत नाही. शहरातील सर्वच मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयांत, दुकानांमध्ये बोटांचे ठसे तपासणी यंत्रणा आहे. या ठिकाणी डोळ्यांचे आयडेंट‌िफिकेशन करणारी यंत्रणा नाही. ती बसवल्यास आधारकार्ड कमी प्रमाणात रद्द होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


आधारकार्ड नंबर टाकल्यास अनेक कार्डधारकांचे व्हेरिफिकेशन होत नसल्याचे आढळून आले आहे. आधार कार्ड तयार करताना चूक कोणाची आहे, हे आता तरी सांगता येणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधून अपडेशन करुन घ्यावे व आपला आधार नंबर मोबाइल स‌िमकार्डशी संलग्न करुन घ्यावा

- तुषार शहाणे, स‌िमकार्ड डीलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरांना पाण्याचा वेढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रविवारी सकाळी काहीशी उघडीप दिलेल्या पावसाने दुपारापासून चांगलाच जोर धरला. गंगापूर धरणातून दहा हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या पाण्याने रामकुंड परिसरासह गोदापात्रानजीक असलेल्या शिव मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारी येथील दर्शनापासून भाविकांना वंचित राहावे लागणार आहे.

त्र्यंबकेश्वरपासून उगम पावून निघालेल्या गोदावरी नदीच्या पात्रात असंख्य शिव मंदिरे आहेत. नाशिक शहराच्या भागात विशेषतः रामकुंडाच्या परिसरात शिव मंदिरांची सर्वांत जास्त संख्या आहे. सध्या गोदावरी नदीला आलेल्या पुराने गोदापात्रातील सर्वच मंदिरे पाण्यात गेली आहेत. त्यात बाणेश्वर, सिद्धपाताळेश्वर, टाळकुटेश्वर, नारोशंकर, नीलकंठेश्वर अशा अनेक मंदिरांचा समावेश आहे. पुराच्या पाण्याचा वेढा या मंदिरांना बसला असल्याने आज (दि. २४) पहिल्या श्रावणी सोमवारी या मंदिरात भाविकांना दर्शन घेणे, तसेच पूजा करणे शक्य होणार नाही. पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास कपालेश्वर मंदिराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराने मंदिराकडे जाणेही अवघड होणार आहे. कपालेश्वर मंदिरातून दर सोमवारी सायंकाळी कपालेश्वरांची पालखी काढण्यात येते. श्रावणी सोमवारी या पालखीला जास्त महत्त्व असते.

प्रत्येक श्रावणी सोमवारच्या पूजेला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. मंदिरांमध्ये जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला जातो. भाविकांची दिवसभर गर्दी असते. मात्र, यंदा पुरामुळे अनेक मंदिरांत असे विधी न होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रविवारी दशक्रिया विधीसह अन्य विधींसाठीच्या जागा पाण्याखाली गेल्याने हे विधी अन्य ठिकाणी करावे लागले.


आजपासून श्रावणमासारंभ

व्रतवैकल्यांचा श्रावणमास सोमवार (दि. २४)पासून सुरू होत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी अशा सणांची मालिका घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. शहरातील शिव मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, श्रावणी शुक्रवारनिमित्त महिलावर्गाकडूनही व्रतवैकल्यांचे नियोजन सुरू झाले आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनेच या महिन्याच्या व्रताला सुरुवात होणार आहे. दि. २७ जुलैला नागपंचमी असून, कृष्ण जन्माष्टमी, राखीपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, पोळा अादी सण-उत्सवांची चाहूल श्रावणामुळे लागली आहे.


पंचवटीत वाहतूक मार्गात बदल

श्रावणानिमित्त पंचवटीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथील काही रस्ते दर सोमवारी, तसेच शनिवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहतुकीला व्यत्यय येऊ नये म्हणून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

श्रावणाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने दर शनिवारी आणि सोमवारी वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन आखले आहे. मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा रस्ता, खांदवे सभागृहाकडून कपालेश्वराकडे येणारा रस्ता आणि सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस बंदी घालण्यात येणार आहे. श्रावणातील सर्व सोमवारी आणि शनिवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. वाहनांची संख्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images