Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बाजार समितीचा आज फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दोन मोठ्या सहकारी संस्थांतील गैरव्यवहार प्रकरणांची सुनावणी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या समोर आज, शुक्रवारी (दि. ११) होणार आहे. त्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आैटघटकेची ठरण्याची शक्यता आहे, तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भातील निर्णय लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात सहकारातील या दोन्ही मोठ्या संस्था असून, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी सत्ताधारी गटाचा दबाव असल्याने सहकार विभाग काय निर्णय घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

या दोन्ही संस्थाच्या संचालकांना आपापला खुलासा सादर करावा लागणार असून, त्यानंतर यावर निर्णय होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी नव्याने पदभार सांभाळून २४ दिवस उलटले आहेत. त्यामुळे त्यांची कारकीर्द या खुलाशानंतर ठरणार असून, त्यात जिल्हा उपनिबंधक काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे या खुलाशानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीची कारवाई केली जाणार असल्याची चर्चा असल्यामुळे हे पदाधिकारी हबकले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर बँकेत बंदूकधारी सुरक्षारक्षकाची नेमणूक, सीसीटीव्ही खरेदीत बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संचालकांचे खुलासे आल्यानंतर ही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे त्याला किती वेळ सहकार खाते घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. पण, कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारची चौकशी करायची असून, त्यात निर्णय घेणे तुलनेने सोपे ठरणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संस्थांवर शिवसेनेचे पदाधिकारी असल्यामुळे भाजप यात काही चाल खेळते का, याची भीतीही सर्वांना आहे.

दोन्ही संस्थांना नोटिसा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना संस्था बरखास्त का करू नये, अशी नोटीस पाठविण्यात आली आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांना नुकसानीच्या खर्चाची जबाबदारी आपणावर का निश्चित करू नये, अशी विचारणा नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थांचे संचालक काय खुलासा करतात, यावर सारे अवलंबून राणार आहे.

विरोधकांची बरखास्तीची मागणी

दोन्ही संस्था शेतकऱ्यांशी निगडित असून, या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने त्या बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या संस्थांच्या गैरव्यवहाराच्या बातम्या सातत्याने येत असतात. पण, त्यावर कोणतीही कडक कारवाई केली जात नसल्यामुळे संबंधित वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारदर्शी कारभाराला प्राधान्य देणार

$
0
0

आमने-सामने

साडेदहा हजार सभासदसंख्या अन् सुमारे पाचशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेपाठोपाठ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) या शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि. १३ ऑगस्ट) मतदान होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या ‘प्रगती’ आणि विरोधकांच्या ‘समाज विकास’ या तुल्यबळ पॅनलच्या दुरंगी लढतीत प्रचारालाही आता रंग चढले आहेत. या लक्षवेधी निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्यांच्या मुद्यांवर यानिमित्ताने एक दृष्टिक्षेप...

--

पारदर्शी कारभाराला प्राधान्य देणार

--

शतकमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या ‘मविप्र’ या संस्थेच्या मौल्यवान परंपरेची जाणीव आम्हालाही असल्याने त्याच निकषावर संस्थेत घडणाऱ्या चुकीच्या मुद्यांवरच आम्ही बोट ठेवले आहे. सामाजिक हिताच्या मुद्याला आम्ही कधीही अव्हेरले नाही, उलट पाठिंबाच देऊ केला. याउलट सत्ताधाऱ्यांनी संस्थेतील बांधकामे, जमीन खरेदीसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये संचालकांना विचारात घेण्याइतपतही सौजन्य दाखविलेले नाही. संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये गरजेपेक्षा अवास्तव यंत्रणेची खरेदी केली गेली. याशिवाय संस्थेसाठी गरजेच्या संसाधनांच्या खरेदी प्रक्रियेतही पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता सत्ताधाऱ्यांना वाटली नाही. संस्थेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असतानाही एकाधिकारशाहीने कारभाराचीच जाचक पद्धती निर्माण झाली आहे. संस्थेसाठी हयातभर योगदान देणाऱ्या नामवंत पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशप्रक्रिया आणि काही प्रसंगांत या एकाधिकारशाहीचे घेतलेले कटू अनुभव भ्रष्टाचाराच्या मुद्यांची शक्यता निर्माण करणारे आहेत. जनरल मीटिंगमध्येही या एकाधिकारशाहीचा प्रत्यय येतो. लोकशाही पद्धतीने खुले मत मांडण्याची संधीही कुणाला दिली जात नाही. शैक्षणिक संस्थेत असणाऱ्या बड्या ठेवींचा सामाजिक कामांसाठी विनियोग का केला जात नाही. संस्थेच्या अनेक व्यवहारांमध्ये रोखीने व्यवहार होतात, त्याऐवजी हा प्रत्येक व्यवहार बँकेद्वारेच व्हायला हवा. रोखीच्या पैशास कुणाचेही हात लागणार असतील, तर शंकेला जागा उरतेच. ज्या ब्रीदासाठी संस्था उभी आहे त्या घटकांना डावलून इतर समाजबाह्य घटकांना निवडप्रक्रियेत सहभागी करून कुठली धोरणे सत्ताधाऱ्यांनी जपली आहेत? विनाअनुदानित कर्मचारी वर्षानुवर्षे अत्यल्प पगारावर कार्यरत आहेत. त्यापैकी काहींचे पीएफ खातेही उघडले गेलेले नाहीत, तर सेवक संघटना स्थापन करण्याचे कर्मचाऱ्यांचे प्रयत्नही सत्ताधाऱ्यांनी हाणून पाडले, हे लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाही. संस्थाध्यक्षांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात संस्थाहिताच्या मुद्यांवर पाठविलेल्या सुमारे अडीचशे ते तीनशे पत्रांपैकी एकाही पत्राला सत्ताधाऱ्यांनी साधी पोहोचही दिली नाही. केवळ नाममात्र नोंद देखाव्यासाठी करून ठेवली. संस्थाबाह्य केंद्र संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याने ही संस्था खासगीकरणाकडे झुकविण्याचा सत्ताधाऱ्यांचा कावा आहे, असे म्हटले तर नाकाला मिरच्या का झोंबतात? आवश्यकता नसताना केल्या जाणाऱ्या नेमणुका या निवडणुकीसाठी सत्तेचा गैरवापर म्हणून केल्या गेल्या. आम्ही सत्तेत आल्यास पारदर्शी, लोकशाहीवर आधारित आणि सभासदांच्या विश्वासास पात्र अशा कारभारास प्राधान्य देऊ. यासोबतच संस्थेच्या प्रत्येक घटकाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करतानाच संस्था आणि समाजाचे संपूर्ण हित हाच आमच्या अजेंड्यावरील मुद्दा राहील. जे निर्णय समाजहिताचे आहेत अशा निर्णयांच्या पाठीशी आम्ही कायमच राहिलो. मात्र, जे संस्था आणि समाजहितास बाधक आहे, अशाच मुद्यांना आम्ही विरोध केला.

-अॅड. नितीन ठाकरे, समाज विकास पॅनल


---


‘मविप्र’चा विकास हाच एकमेव ध्यास

--

शतकाची उज्ज्वल परंपरा जोपासणाऱ्या ‘मविप्र’च्या ब्रीदाची जाणीव जागती ठेवूनच आम्ही कार्यभार सांभाळला. आमच्याकडे सत्ता सोपविल्यापासून संस्थेचा विकास आणि विद्यार्थीहितच केंद्रस्थानी राहिले. सत्तेच्या कालावधीत संस्थाहिताच्या उद्देशाने अत्यंत काटकसरीने आणि पारदर्शी कामकाज कार्यकारी मंडळाने केले. याच्याच परिणामी आजमितीस संस्थेकडे ७१ कोटी ५६ लाखांच्या मुदतठेवी आहेत. ५६ कोटी २१ लाख रुपये बचत आणि चालू खात्यात शिल्लक आहेत. एकूण १७१ कोटी ७० लाख रुपये संस्थेकडे शिल्लक आहेत. यासारखी आकडेवारी आमच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची पावतीच आहे. त्यामुळेच संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळू शकले. तरीही विरोधकांकडून तथ्यहीन प्रचारावर भर दिला जातो. सभासदांचा बुद्धिभेद करून त्यांची दिशाभूल करण्यातच विरोधकांचा स्वार्थ दडल्याने तथ्यहीन आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. संस्थेच्या वार्षिक अहवालातील आकडेवारीबाबतही विरोधक अपप्रचार करतात. संस्थेने नेमलेल्या चार्टर्ड अकाैंटंट्स यांनीही ही माहिती अचूक असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतरही सभासदांचा बुद्धिभेद करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ताळेबंद हा कुठल्याही संस्थेच्या व्यवहारांचा आरसा आणि आत्मा असतो, याची आम्हाला पूर्ण जाणीव असून, तो आमच्या कामकाजाप्रमाणेच पूर्णत: स्वच्छ आहे. केटीएचएमसाठी मिळालेली जागा कुणाही खासगी व्यक्तीने संस्थेला दिलेली नसून, संस्थेने शैक्षणिक उद्देशांसाठी ती जागा महसूल विभागाकडून रीतसर मिळविली आहे. विरोधकांकडून विरोधासाठीच विरोध केला गेला. डॉ. वसंतराव पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले समाजसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठीच समाजातील ज्येष्ठांच्या विनंतीचा मान राखून मी ध्येयाने पदभार स्वीकारला. त्यामुळे येथे घराणेशाहीचा विरोधकांचा मुद्दा फोल ठरतो. तेव्हापासून आतापर्यंत खटलेच दाखल करण्यात विरोधक गुंतले आहेत, त्यांना विकासाच्या मुद्यात स्वारस्यच नाही, हेच यावरून स्पष्ट होते.

शैक्षणिक संस्थेची पदे ही सेवा अन् त्यागाचीच असतात, या धारणेने आम्ही कामकाज केले. संस्थेने अवास्तव खर्चाला बगल दिली. संस्थेची वाहनेही आम्ही वापरली नाहीत. इतके पारदर्शी आमचे व्यवहार असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये तथ्यच नाही. इतका अफाट विस्तार असणाऱ्या संस्थेचे खासगीकरण होत असल्याचा आरोपही हास्यास्पद आहे. येथे सभासद हेच संस्थेचे खरे मालक आहेत. ते संस्थेत येऊन आमच्या कामकाजाचे निरीक्षक म्हणूनही उपस्थित राहू शकतात. त्यांचा आदर केला जातो. इतके लोकशाहीचे वातावरण संस्थेत असताना विरोधकांकडून रंगविले जाणारे चित्र चुकीचे आहे. विरोधकांनी तथ्यहीन आरोपांवर वेळ घालविण्याऐवजी मविप्रसाठी वेळ आणि योगदान देण्यास शिकावे. लढाई ही वैचारिक असायला हवी.

- नीलिमा पवार, प्रगती पॅनल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसेवेचे व्रत पेलण्यास तंदुरूस्त राहा

$
0
0

विशेष महानिरीक्षक विजयसिंह जाधवांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पोलिस होणे म्हणजे जनसेवेचे व्रत स्वीकारणे होय. या सेवेची संधी सर्वांनाच मिळत नाही. त्यामुळे पोलिसांनी जनसेवेचे व्रत पेलण्यासाठी तंदुरूस्त राहणे आवश्यक असून, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवावी, असे प्रतिपादन विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव (प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य) यांनी केले. गुरूवारी (दि. १०) धुळे जिल्हा पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य कवायत मैदानावर सकाळी पोलिस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचालनाच्या कार्यक्रम झाला त्यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक जाधव बोलत होते.

समाजाला सुदृढ ठेवण्यासाठी असामाजिक तत्त्वांवर उपचार करावे लागतात. समाजातील दुष्ट, असामाजिक, गुंड प्रवृत्तींना कायद्याच्या कक्षेत आणून त्यांच्यावर कारवाईची संधी पोलिसांना मिळणार आहे, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक जाधव म्हणाले. ही एकप्रकारची समाजसेवा असून, पोलिसांनी समाजातील दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके यांच्यावरील अन्याय दूर करावा, असे आवाहन त्यांनी केले. शिस्त हा पोलिस दलाचा आत्मा असून, तो बिघडणार नाही याची पोलिसांनी जाणीव ठेवली पाहिजे. चारित्र्य, विश्वासार्हता, निष्ठा आणि शिस्त तुमचे करिअर घडविणार आहे. या सर्व गोष्टी तुम्ही अंगी बाळगल्या तर तुमच्यातून चांगला पोलिस अधिकारी तयार होईल, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास माजी प्राचार्य प्रशांत बच्छाव, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव, उपप्राचार्य शशिकांत महाजन उपस्थित होते. याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्राचार्य चंद्रकांत गवळी म्हणाले की, प्रशिक्षक केंद्राच्या सहाव्या प्रशिक्षण सत्रात ३८० पोलिस शिपायांना ९ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती ‌दिली. या प्रशिक्षण केंद्रासाठी सुसज्ज वसतिगृह, प्रशासकीय इमारत, सुरक्षा भिंतीचे कुंपणाचे कामे पूर्ण झाली असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडले ‘कथकरंग’...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलानंद कथक नृत्य संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कथकरंग’ या कथक नृत्याच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमात बहारदार नृत्य सादरीकरणातून कथकरंग उलगडले. विश्वास लॉन्स येथे बुधवारी रंगलेल्या या कार्यक्रमात एक रंग व एक तालातील विविध रचनांचे सादरीकरण करण्यात आले.

कलानंद संस्थेच्या उगवत्या व अनुभवी विद्यार्थीवृंदाने हा कार्यक्रम सादर केला. एक वर्ष नृत्य शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींपासून ते विशारद, अलंकार झालेल्या विद्यार्थिनींपर्यंत आपली कला सादर करून गुरू संजीवनी कुलकर्णी यांना वंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘एकदंत प्रथम नमन’ या गणेशवंदनेने करण्यात आली. त्यानंतर कथक परिचय, रास रयत, सरगम, झपताल, होरी आदी नृत्यप्रकार सादर झाल्यानंतर कलानंदच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या गत-निकास सादर केल्या. या कार्यक्रमात नितीन पवार (तबला), कुणाल काळे (संवादिनी), मोहन उपासनी (बासरी) यांनी संगीतसाथ केली. पुष्कराज भागवत यांनी गायनसाथ केली. सुमुखी अथनी, वृषाली कोकाटे, मधुवंती देशपांडे यांनी संयोजन केले. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मधुवंती देशपांडे यांनी आभार मानले.


३६ वर्षांची परंपरा...

संस्थेच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विशिष्ट संकल्पना घेऊन अनोखे सादरीकरण करण्यात आले. त्यात ‘एक रंग एक ताल’ ही संकल्पना मांडण्यात आली. संकल्पनेत दुर्गा स्तवन, सावन, तराणा, ताल विस्तार, भजन आदी नृत्यप्रकार एकतालात गुंफून सादर करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप आरोह या संकल्पनेवरील नृत्य सादर करून झाला. गेल्या ३६ वर्षांपासून दर वर्षी हा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त जवानाला चार दिवसांची कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील सोयगाव भागातील तुळजाई कॉलनी येथे झालेल्या किरकोळ भांडणात सुरेश पंडितराव काळे (५७) या माध्यमिक शिक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणी निवृत्त जवान किशोर रामदास शेवाळे यास न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील आघार (खु) येथील जनता विद्यालयाचे शिक्षक सोयगाव येथील तुळजाई कॉलनी येथे राहत होते. त्यांचे बुधवारी (दि. ९) रात्री किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या निवृत्त जवान किशोर शेवाळे यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी शेवाळे यांनी त्यांच्या ताब्यातील बंदुकीने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी शेवाळे व काळे यांना ताब्यात घेतले असता काळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात शेवाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने गुरुवारी शेवाळे यास चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृह शिपायाचे मंगळवारपासून उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड कारागृहातील कथित भ्रष्टाचार व गैरप्रकारांबाबत तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत धुळे कारागृहातील पोलिस शिपाई अनिल बुरकुल यांनी मंगळवार १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.

बुरकूल हे नाशिकरोड जेलमध्ये होते. त्यांची धुळे जेलमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांनी नाशिकरोड जेलमधील भ्रष्टाचाराबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून पुरावे सादर केले आहेत. तरीही त्याबाबत कारवाई होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ऑगस्ट २०१६ पासून तक्रारी केल्या आहेत. त्यांची दखल प्रशासन घेत नसून जेल उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारीची चौकशी होत नाही. जेलमध्ये पाचशे मोबाइल सापडल्याच्या तक्रारीची चौकशी अजूनही झालेली नाही. तत्कालीन कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे सापडूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. डॉ. बळीराम शिंदे या कैद्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कारवाई करावी. कांबळे व धामणेंची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, कर्मचाऱ्यांच्या अवैध बदल्या थांबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

समितीला पुरावे द्या
उपमहानिरीक्षक धामणे यांनी सांगितले, की बुरकूल यांनी १३ वर्षे नाशिकरोड कारागृहात सेवा दिल्यानंतर नियमानुसार त्यांची धुळे कारागृहात बदली करण्यात आली आहे. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी चौकशी समितीला पुरावे सादर करावेत. बुरकुलांचीही चौकशी सुरू आहे. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीला तयार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात ६० टक्केच पाणीसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे नाशिक विभागातील विविध प्रकल्पांतील एकूण पाणीसाठ्याने फर्स्ट क्लास गाठला आहे. मात्र, आताच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून शेती सिंचनाच काय पिण्याचा पाण्याचीही गरज भागू शकणार नाही. त्यामुळे येत्या काळात अधिक पावसाची गरज आहे.
विभागातील ३५३ विविध प्रकल्पांचा एकत्रित २ हजार ६८२ दशलक्ष घनमीटर (दलघमी) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पीय उपयुक्त पाणी साठ्याशी ही टक्केवारी ६१.८४ इतकी आहे. विभागात सर्वाधिक ८१.०२ टक्के इतका पाणीसाठा नाशिक जिल्ह्यात जमा असून सर्वात कमी धुळे जिल्ह्यात २२.६४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
नाशिक विभागातील सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये जून व जुलै महिन्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने विभागातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र, पावसाचे प्रमाण असमान असल्याने विभागातील नाशिक व नगर या दोन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर धुळे, जळगाव व नंदूरबार या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांत अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही, हे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. धुळे, जळगाव व नंदूरबार या तिन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्याचा निम्मा कालावधी सरला असल्याने आता या तिन्ही जिल्ह्यांमधील प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे भवितव्य पावसाळ्यातील ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांतील पर्जन्यमानावर अवलंबून राहणार आहे.

दमदार पावसाची प्रतीक्षा
विभागात १९ मोठे, ४० मध्यम तर २९४ लघु प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांत आजमितीस ७०.९६ टक्के म्हणजेच २२८३.०६ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी नाशिकच्या मोठ्या प्रकल्पांत ८०.१८ टक्के, नगरच्या मोठ्या प्रकल्पांत ८३.१३ टक्के तर जळगावमधील मोठ्या प्रकल्पांत अवघा ४८.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. विभागातील सर्व मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा पुरेसा होण्यासाठी अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे. विभागातील ४० मध्यम प्रकल्पांत अवघा ३८१.७४ म्हणजेच ४१.२० टक्के तर २९४ लघु प्रकल्पांत अवघा १७.५४ दलघमी म्हणजेच ९.०४ टक्के इतकाच पाणीसाठा झालेला आहे.

विभागातील पाणीसाठा (दलघमी)
जिल्हा......प्रकल्प संख्या........प्रकल्पातील उपयुक्त साठा......सध्याचा उपयुक्त साठा......टक्केवारी
नाशिक............१०३..................१४९३.८४..................१२१०.२८............८१.०२
नगर..................३९..................१२१७.६३............९८४.०५..................८०.८२
नंदूरबार.............४१............१९४.३२..................७९.०९............४०.७०
जळगाव...........११२............१४२५.४५..................५५६.३७............३९.०३
धुळे..................५८..................४८१.२६..................१०८.९४............२२.६४
एकूण............३५३............४३३७.८०............२६८२.३४..................६१.८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळी मंदिरात हरीनाम साप्ताह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव
पंचवटीतील मुंबई-आग्रारोड महामार्गावरील श्री क्षेत्र बळी महाराज देवस्थान मंदिरात शनिवार १२ ऑगस्टपासून अखंड हरीनाम साप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सोहळ्यात दररोज आठ दिवस पहाटे ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ८ ते १२ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ सामूदायिक हरीपाठ होणार आहे. दिगंबर महाराज किरकाडे (पुरणगावकर) यांचे (दि. १२), रामचंद्र महाराज मालपुरकर यांचे (दि. १३), आनंदासजी महाराज कजवाडेकर यांचे (दि. १४), अजय महाराज बारस्कर यांचे (दि. १५), गोविंद महाराज गोरे यांचे (दि. १६), सूर्यभान महारज शेळगावकर यांचे (दि. १७) तर महंत संजयदासजी महाराज यांचे (दि. १८) यांचे दररोज रात्री ९ ते ११ कीर्तन होतील.
कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (दि. १९) ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते ११ या वेळेत होईल. त्यानंतर दुपारी १२ नंतर महाप्रसाद आयोजित केला आहे. तरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन बळी महाराज देवस्थान मंदिर व बळी अमर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवविवाहितेचा आकस्मात मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली. नाजुका गणेश खोडे (२९, रा. खोडेनगर, वडाळागाव, नाशिक) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजुका खोडे ही विवाहिता आपल्या माहेरी पेठेनगरमधील नळे मळा येथे आली होती. नळे मळ्यासमोरील एका इमारतीजवळ मंगळवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास ती बेशुद्धावस्थेत नातेवाइकांना आढळून आली. तिला तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोल‌िसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफाकडे खंडणीची मागणी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चोरीचे सोने खरेदी केल्याची धमकी देऊन प्रसिद्ध सराफाकडे खंडणी मागणाऱ्या तोतया रेल्वे पोलिस अधिकाऱ्यावर मुंबई नाका पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. भवरलाल पुखराज चोपडा (रा. कॉलेजरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
जुना आग्रा महामार्गावरील ग्रामदैवत कालिका देवी मंदिरासमोर चोपडा यांचे आर. एल. ज्वेलर्स नावाचा सराफी मॉल आहे. त्यांना मंगळवारी (दि. ८) एका मोबाइलवरून फोन आला. संबंध‌िताने आपण मुंबई रेल्वे पोलिसमध्ये निरीक्षक असून, एका महिलेस चोरीप्रकरणी पकडल्याचे सांगितले. तिच्याकडून तुम्ही चोरीचे सोने खरेदी करता असे ती सांगत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावर ज्वेलर्स मालक चोपडा यांनी आपण असे काही करत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, संशय‌िताने हे प्रकरण मिटव‌िण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर तुम्हाला महागात पडेल अशा शब्दात धमकावलेही. प्रारंभी चोपडा यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, संशय‌िताने सलग दोन दिवस त्यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे त्रस्त झालेल्या चोपडा यांनी पोलिसांकडे धाव घेऊन खंडणी मागितली जात असल्याची फिर्याद दिली आहे.

कॅमेऱ्यासह लॅपटॉप चोरी
नाशिक : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी हॉलमधील टेबलवर ठेवलेला कॅमेरा व लॅपटॉप असा सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल लांबविला. अशोका मार्ग परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुह्याची नोंद केली आहे. महेंद्र दगडू सोनवणे (रा. ए विंग, आम्रपाली टॉवर्स) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटुंबीय बुधवारी (दि. ९) सायंकाळी कामात व्यस्त असताना चोरटे घरात आले. त्यांनी घरात प्रवेश करून हॉलमधील टेबलवर ठेवलेला कॅमेरा व लॅपटॉप चोरून नेला.

महिलेची पर्स लांबविली
नाशिक : बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानकात थांबलेल्या वृध्द महिलेच्या पिशवीतील पर्स चोरट्यांनी चोरून नेली. ठक्कर बाजार बसस्थानकात हा प्रकार घडला. पर्समध्ये रोकड, मोबाइल व महत्त्वाची कागदपत्र असा सुमारे ३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कलावती रामचंद्र सोनार (६०, रा.सप्तशृंगी रो हाऊस, महाले फार्म) यांनी फिर्याद दिली आहे. सोनार बुधवारी (दि. ९) बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेल्या. बसची प्रतीक्षा करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील पर्स हातोहात लांबविली. पर्समध्ये मोबाइल व रोकड असा ऐवज होता.

मोबाइल, लॅपटॉप लंपास
नाशिक : मोबाइल व कॉम्प्युटर्स विक्री दुरुस्तीचे दुकान फोडून चोरट्यांनी मोबाइल व लॅपटॉप असा सुमारे एक लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्र्यंबकनाका परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मंदार प्रभाकर वडगांवकर (रा. वर्षाली बंगला, नरसिंहरोड) यांनी फिर्याद दिली आहे. वडगांवकर यांचे त्र्यंबकनाका परिसरातील प्रसन्ना आर्केड येथे नील्विक ट्रेडर्स नावाचे मोबाइल व कॉम्प्युटर्स विक्री दुरुस्तीचे दुकान आहे. चोरट्यांनी सोमवारी (दि. ७) रात्री दुकानाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन मोबाइल व लॅपटॉप असा सुमारे एक लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

तडिपार गुंडास अटक
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षांसाठी शहर व जिह्यातून हद्दपार करूनही शहरातच वावरत असलेल्या तडिपार गुंडाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सरकारवाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जॉन संजय साळवे (२६, रा. रचना हायस्कूलमागे, शरणपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. साळवे यास शहर पोलिसांनी तडीपार केले आहे. तरीही तो शहरातच असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी (दि. ८) दुपारी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर शहरातील विविध पोलिस स्टेशन्समध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वृध्देची आत्महत्या
नाशिक : सातपूर एमआयडीसीतील कामगारनगरमध्ये ७५ वर्षीय वृध्द महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत बुधवारी (दि. ९) आत्महत्या केली. सत्यभामा पिरा पमार (७५, रा. स्वाध्याय केंद्राजवळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या ९३ टक्के भाजल्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सत्यभामा यांनी पेटवून घेतल्याचे समजताच त्यांचे नातजावई नितीन जमदाडे यांनी त्यांना सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल केले. परंतु, सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सातपूर पोलिस स्टेशनमध्ये मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सिडकोतील तरुण बेपत्ता
नाशिक : सिडकोतील उपेंद्रनगर भागात राहणारे नागेश शेषराव पाटील (३४, रा. एचआयजी बिल्डींग, उपेंद्रनगर) पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत माहिती असल्यास अंबड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार एस. पी. गारले यांनी केले आहे. त्यांची पत्नी वैशाली पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. शरीराने मध्यम, रंगाने गोरे, उंची साडे पाच फूट, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे काळे असे पाटील यांचे वर्णन आहे. त्यांनी अंगात जांभळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी पॅण्ट परिधान केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईपादुकांचा दर्शन सोहळा देश-विदेशात

$
0
0

शिर्डीः शिर्डी येथील प्रसिद्ध संत श्रीसाईबाबा यांच्या देहसमाप्तीस १८ ऑक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या महत्त्वपूर्ण घटनेचे मोल साई संस्थान आणि जगभरातील साईभक्तांसाठी अनन्यसाधारण आहे. सहाजिकच या घटनेचा शतकी टप्पा संस्मरणीय पद्धतीने साजरा करण्यासाठी १ ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ हा कालावधी ‘श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष’ म्हणून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने ठरवले आहे.

यानिमित्त संस्थानच्या वतीने साईपादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात प्रत्येक राज्यात विविध शहरांमध्ये व जगातील २५ देशांमध्ये तेथील साई मंदिरांमार्फत करण्यात येणार आहे. अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करू इच्छित असलेल्या ट्रस्टच्या/संस्थांनी आपल्या संपूर्ण माहितीसह उपजिल्हाधिकारी (ई-मेल dycoll.2@sai.org.in, मोबाइल क्र. ०७७२००७७२०५ ) व शताब्दी कक्ष (ई-मेल shatabdi@sai.org.in, फोन ०२४२३-२५८९०७ ) श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी करणाऱ्या महिलांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
सिन्नर फाटा येथील किशोर गॅरेज हे दुकान फोडून त्यातील वाहनांच्या स्पेअरपार्टसह इतर साहित्याची चोरी करणाऱ्या चार महिलांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांनी चोरलेला मुद्देमाल भद्रकाली परिसरातील भिमवाडी येथे लपवून ठेवला होता. यातील काही मुद्देमाल गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सिन्नर फाटा येथील किशोर गॅरेज हे दुकान फोडून त्यातील साहित्य चोरीस गेल्याची घटना घडली होती. या गॅरेजमध्ये चोरी केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी सिन्नर फाटा येथून राधा संपत शिंदे (२४), मुक्ता प्रकाश घोडे (२३), बबिता आसाराम सावळे (३१) आणि हीन समिर शेख (३२, सर्व रा. भिमवाडी, भद्रकाली) या चार महिलांना गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांनी सिन्नर फाटा येथील किशोर गॅरेज फोडून त्यातील चोरलेला मुद्देमाल भिमवाडी येथून नाशिकरोड पोलिसांना दिला. या चारही महिला दुसऱ्यांदा चोरी करण्याच्या उद्देशाने सिन्नर फाटा परिसरात आल्या होत्या. तेथे त्यांना पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

$
0
0

म. टा. वृतसेवा, घोटी

नाशिकरोडकडून पनवेलकडे जाणारी गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेसचे इंजिन घोटीजवळ नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास ही रेल्वे घोटी स्टेशनवर उभी होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या उश‌िराने धावत होत्या. दुपारच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे नियोजन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते.

शुक्रवारी दुपारी नाशिकहून कल्याणच्या दिशेने जाणारी गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेसचे दुपारी एक वाजेच्या सुमारास घोटी स्टेशन जवळ येताच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी व रेल्वे प्रशासन, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. यामुळे थोड्यानंतर येणारी गोदान एक्स्प्रेस २५ मिनिटे थांबविण्यात आली. तर पटना एक्स्प्रेस अस्वली स्टेशन येथे रोखून धरण्यात आली.

पुष्पक एक्स्प्रेसलाही यामुळे धावण्यास विलंब झाला. दरम्यान, रेल्वे प्रशासन व कर्मचारी यांनी तत्काळ प्रयत्न करून लहवित

येथून सहायक इंजिन आणले. या इंजिनच्या सहायाने दुपारी अडीच वाजता दीड तास उशिराने गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस इगतपुरीच्या दिशेने रवाना करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध दाम्पत्याचे चोरट्यांशी दोन हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील नामपूर रोडवरील क्रांतीनगरमधील एकाच परिसरात तीन घरांमध्ये दरोड्याचा प्रयत्न केला. यातील एका घरात त्यांनी २५ हजारांचा ऐवज चोरला. मात्र एका ठिकाणी चोरट्यांच्या आवाजाने घरातील तिघांना जाग आल्याने त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत चोरट्यांचे पिस्तुलासह तीन काडतूस तेथेच राहिले. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे शहरात घबराहट पसरली आहे. मात्र चोरट्यांसोबत दोन हात करणारे वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या नातवाच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली आहे.

गुरुवारी मध्यरात्री शहरातील क्रांतीनगर परिसरात २५ ते ३० वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी आधी रामदास जिभाऊ अहिरे यांचे बंद बंगल्यात हात साफ केला. दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. घरात कोणीही नसल्यामुळे त्यांनी लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून दागिणे, मोबाइल असा २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी केला. यानंतर त्याच्या लगत असलेल्या नितीन काशिनाथ पवार यांच्या बंगल्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. पवार यांच्या बंद बगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले. मात्र पवार यांच्या घरात त्यांना काही हाती लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी पुढील घरात शिरण्याचा प्रयत्न केला.

अन् चोरट्यांचे

पिस्तूल खेचले…

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास हे चोरटे योगेश बाळासाहेब भदाणे यांच्या घरात घुसले. भदाणे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजास होल पाडून कडी उघडली. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उघडण्याचा प्रयत्न करीत असतांना कपाटाजवळच झोपलेले योगेश यांचे वृद्ध आई-वड‌िलांसह मुलाला जाग आली. त्यांनी चोरट्यांना कपाट तोडण्यास विरोध केला. चोरट्यांमध्ये आणि या तिघांमध्ये झटापट झाली. त्यात चोरट्यांनी योगेश यांच्या वड‌िलांच्या हातावर व दंडावर लोखंडी धारदार हत्याराने वार केले. दरम्यान त्यांनी जवळच पडलेला मोबाइल घेवून पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हढ्यात त्यांच्यातील एकाच्या चेहऱ्यावरील रुमाल ओढण्यात घरातील सदस्यांना यश आले. ओळख पटण्याच्या भीतीमुळे सावध झालेल्या एका चोरट्याच्या हातातील पिस्तूल, मॅगनेट व तीन जिवंत काडतूस खाली पडले. त्यामुळे चोरट्यांनी घरातून पळ काढला.

चोरट्यांकडून दगाडांचा मारा

भदाणे यांच्या घरातून पळ काढल्यानंतर आपल्या कुणी पाठलाग करू नये म्हणून चोरट्यांनी त्यांच्यावर दगाडांचा मारा केला. अंधाराचा फायदा घेत ते कोणत्या दिशेला पळाले हे समजू शकले नाही. मालेगावकडे रवाना झाल्याचे दिसून येत आहे.

श्वान पथक हजर

शुक्रवारी सकाळी मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली. तसेच श्वान पथकाने देखील चोरट्यांचा माघ घेण्याचा प्रयत्न असता ते मालेगावच्या दिशेने गेल्याचे कळाले. या घटनोचा अधिक तपास पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड एमआयडीसीत टवाळखोरांची दहशत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीत टवाळखोरांकडून कामगारांवर हल्ला करीत मिळेल त्या वस्तूंची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून, गटाने येऊन अचानक हल्ला करण्यामागे कुणाचा तरी हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. टवाळखोरांकडून कंपनीच्या गेटवरच कामगारांवर हल्ला केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असले, तरी उद्योजकांसह कामगारांतही भीतीचे वातावरण दिसून येत आहे. पोलिसांनी परिसरातील टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कामगार, उद्योजकांनी केली आहे.

लघु, मध्यम व छोट्या कारखान्यांची मोठी संख्या अंबड एमआयडीसीत आहे. हजारोंच्या संख्येने कामगार अंबड एमआयडीसीत तीन शिफ्टमध्ये काम करतात. अनेकदा वेतनाच्या दिवशीच कामगारांना लुटण्याची प्रकार घडले आहेत. परंतु, आता वेतनच बँकांमध्ये होत असल्याने कामगारांना लुटमारीचे प्रकार जवळपास थांबले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी टवाळखोरांच्या दोन गटांनी कामगारांवर हल्ला करीत लुटमार केली होती. एका कामगाराची दुचाकीच हल्लेखोरांनी पळविली. विशेष म्हणजे कंपनीच्या गेटवरच हल्लेखोरांनी कामगारांवर हल्ला करत लूट केली. दरम्यान, अंबड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. परंतु, अशा प्रकारे कामगारांवर हल्ला झाल्याने पोलिसांनी अंबड एमआयडीसीत पेट्रोलिंग वाढवत हल्लेखोरांना ताब्यात घेत कठोर कारवाईची मागणी उद्योजकांनी केली आहे. आयमात झालेल्या उद्योजकांच्या बैठकीतही अशी मागणी करण्यात आली आहे.

--

वर्गणी मागणाऱ्यांवर व्हावी कारवाई

स्लम भागातील काही भाई मंडळी तरुणांना अंबड एमआयडीसीतील छोट्या कारखान्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वर्गणी मागण्यासाठी पाठवीत असते. परंतु, रहिवासी भाग नसताना वर्गणी देण्याचे कारणच काय, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जातो. मात्र, भाईंच्या नावावरून वर्गणी नाकारली, तर संबंधित उद्योजकाचे नुकसान करण्याची तयारी अशा मंडळींकडून केली जाते. पोलिसांनी वर्गणी मागणाऱ्यांवरदेखील कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी उद्योजकांनी केली आहे.

--

मद्यविक्रीचा सुळसुळाट

अंबड औद्योगिक वसाहतीत स्लम भागाला लागून व इतरही ठिकाणी टपऱ्यांवर अवैद्य मद्यविक्रीचा सुळसुळाट झाला आहे. अनधिकृत असणाऱ्या टपऱ्यांवर मद्य मिळत असल्याने पोलिस कारवाई करणार कधी, असा सवाल उपस्थित होतो. विशेष म्हणजे मद्य पिणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण टवाळखोरांचेच असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

--

अंबड एमआयडीसीत कामगारांना लुटण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, गेल्या मंगळवारी अचानक दोन गटांतील हल्लेखोरांनी कामगारांना लुटले. अशा टवाळखोरांचा त्रास उद्योजकांसह कामगारांनाही नेहमीच सहन करावा लागतो. पोलिसांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

-राजेंद्र आहिरे, अध्यक्ष, आयमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग सुट्यांमुळे पर्यटनाचे प्लॅनिंग

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

नाशिकसह कोकण व राज्याच्या काही भागात झालेला दमदार पाऊस अन् त्यातच आजपासून सलग चार दिवस जोडून सुट्या येत असल्याने विविध पावसाळी व धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्लॅनिंग अनेकांकडून केले जात आहे. दुसरा शनिवार व रविवार सुटी, सोमवारी रजा टाकल्यावर मंगळवारची स्वातंत्र्य दिनाची सुटीही जोडून येत असल्याने अनेक जण सहकुटुंब भटकंतीवर निघणार आहेत. परिणामी नाशिक परिसरासह आसपासची धार्मिक व पर्यटनस्थळे या काळात गजबजणार असल्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी हजेरी लावल्यामुळे अनेकांनी हिरवाईने नटलेल्या भागात पावसाळी पर्यटनाचा श्रीगणेशा केलेला आहे. त्यातच पुन्हा चांगला पाऊस होण्याचे संकेत असल्याने मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह निसर्गप्रेमी मंडळींनी अशा सहलींचे नियोजन केल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी तर आधीच रिझर्वेशनदेखील केलेले आहे.

--

या ठिकाणांना वाढते प्राधान्य

सलग सुट्यांमुळे नागरिकांसह उत्साही ट्रेकर्सकडूनही आगामी तीन-चार दिवस पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील अशोका वॉटरफॉल, उंट दरी, संधान व्हॅली, भंडारदरा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, अंजनेरीसह त्र्यंबकमधील विविध ठिकाणी जाण्याचे बेत आखले जात आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, भीमाशंकर, माथेरान, पाचगणी, सापुतारा आदी पर्यटनस्थळांसह पावसाळ्यात निसर्गाचे खरे रूप पाहण्यासाठी समुद्रकिनारे, तसेच धार्मिक स्थळांनादेखील अनेकांकडून पसंती दिली जात आहे.

--

अष्टविनायकसह महाराष्ट्रदर्शनही...

अनेक नागरिकांनी आगामी गणेशोत्सव लक्षात घेत गणशोत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी आधीच अष्टविनायक दर्शनासह महाराष्ट्रदर्शन करण्याचे प्लॅनिंग केले आहे. त्यामुळे खासगी प्रवासी संस्था व यात्रा कंपन्यांकडून या काळात नेमक्या याच ठिकाणांच्या सहलींचे नियोजन करण्यात आले आहे. अशा सहलींसाठीदेखील आगाऊ बुकिंग झाल्याचे एका खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने सांगितले.

--

आगाऊ बुकिंग जोरात

सलग आलेल्या सुट्यांमुळे पावसाळी पर्यटनासह देवदर्शन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. त्यामुळे खासगी प्रवासी संस्थाचालकांच्या बुकिंगमध्ये दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहने मिळणेदेखील कठीण झाले आहे. असंख्य प्रवासी संस्थांकडील भाडेतत्त्वावरील वाहनांची आगाऊ झाल्याने काहींनी प्रवासी भाड्यातही वाढ केली आहे. ज्यांच्याकडे स्वतःच्या प्रवासी गाड्या आहेत त्यांनीदेखील आपल्या गाड्या खासगी प्रवासी संस्थांना भाडेतत्त्वावर देऊ करून आलेला सीझन कॅश करण्यावर भर दिला आहे.

--

अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचारी सलग सुट्यांनिमित्त पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यासाठी दोन-तीन दिवसांत जाऊन परत येता येईल अशा पर्यटनस्थळांना, तसेच धार्मिक स्थळांना पसंती दिसून येत आहे.

-विनायक आढाव, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

--

शनिवार ते मंगळवारदरम्यान आलेल्या सुट्यांमुळे तब्बल तीन-चार दिवस सुटी मिळत आहे. त्यानिमित्त आजूबाजूच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांसह काही धार्मिक पर्यटनस्थळांना परिवारासह भेट देण्याचे प्लॅनिंग केले आहे.

-बी. एम. चेलवन, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादात रखडल्या साइडपट्ट्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर व अंबड एमआयडीसीतील रस्त्यांच्या साइडपट्ट्या महापालिका व एमआयडीसी यांच्या वादात रखडल्या आहेत. त्यातच ठराविक रस्त्यांनाच महापालिकेने साइडपट्ट्या कशा केल्या, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या पावसामुळे या साइडपट्ट्या खोल झाल्यामुळे अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे महापालिका व एमआयडीसीने यावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी उद्योजकांसह कामगारांनी केली आहे.

शहरातील एमआयडीसींत सन १९७८ मध्ये कारखान्यांचे जाळे वाढण्यास सुरुवात झाली. आजमितीस सातपूर व अंबड एमआयडीसींत तब्बल २७०० हून अधिक लघु, मध्यम व गाळ्यांमध्ये उद्योग सुरू आहेत. १९८४ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यावर एमआयडीसीतील रस्त्यांची कामे हस्तांतरित करण्यात आली होती. या काळात महापालिकेचे कामकाज प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होते. दरम्यान, सन १९९२ मध्ये लोकशाही पद्धतीने मतदान होत महापालिकेत नगरसेवक निवडून आले. परंतु, महापालिकेची स्थापना झाल्यापासून एमआयडीसीतील केवळ रस्तेच देखभालीसाठी महापालिकेला देण्यात आले असल्याचे अधिकारी सांगतात. यात एमआयडीसीतील साइडपट्ट्यांची कामे महापालिकेला हस्तांतरित केले गेली नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. एका बाजूला डांबरी रस्ते दर पाच वर्षांनी केले जात असल्याने साइडपट्ट्या खोल झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच अवजड

वाहनांमुळे अपघात होऊन अनेक कामगारांना जीवही गमवावा लागला आहे.

दरम्यान, एमआयडीसीच्या स्थापनेपासूनच साइडपट्ट्यांची कामे मार्गी लागत नसल्याने यावर ठोस उपाय काढणार कोण, असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिका व एमआयडीसीच्या वादात साइडपट्ट्यांची कामे रखडल्याने त्याचा त्रास कामगारांसह उद्योजकांनादेखील सहन करावा लागत आहे. पुढील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनीच यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

--

‘झूम’च्या बैठकीतही टोलवाटोलवी

जिल्हा उद्योग केंद्राच्या (झूम) बैठकीत एमआयडीसीतील साइडपट्ट्यांवरून नेहमीच वाद होत असतात. महापालिकेकडून साइडपट्ट्या हस्तांतरितच केल्या गेल्या नसल्याचे सांगण्यात येते, तर एमआयडीसीकडून रस्त्यांची कामे महापालिका करते, त्यात साइडपट्ट्यांचीही कामे केली पाहिजेत, असेच उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जाते.

--

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील साइडपट्ट्यांबाबत ‘झूम’च्या बैठकीत नेहमीच चर्चा होते. परंतु, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनादेखील बैठकीस आमंत्रित करण्यात येईल.

-मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकांना तात्काळ हटवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघटनेचे राज्य संघटक श्रीकृष्ण शिरोडे यांनी प्रशासकांवर जोरदार टीका करून त्यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही संस्थेवर प्रशासक सहा महिन्यांसाठी असतो. पण, सध्याचे प्रशासक रिझर्व्ह बँकेकडून दर वर्षी एक वर्षाची मुदत वाढवून घेतात. अशी कोणती युक्ती प्रशासक करतात आणि मुदत वाढवून घेतात, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी शिरोड म्हणाले, की प्रशासकांनी आतापर्यंत एकाही शाखेस भेट दिल्याचे एेकिवात नाही. बऱ्याच शाखा बकाल अवस्थेत वाटतात, तर आठ ते दहा शाखा तोट्या असतानाही त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत. संचालक असताना २० टक्के लाभांश मिळत होता. तो गेल्या तीन वर्षांपासून १५ टक्केच मिळत आहे. त्यामुळे ५ टक्के सभासदांचे नुकसान झाले आहे. संचालकांच्या काळात एनपीए १.५० ते २ टक्के होता, आता तो ९.५० टक्के झाला आहे. बँकेच्या बहुतेक केसेस फेल गेल्या, तरी वकील बदलले नाहीत. त्यामुळे बँकेच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी या बैठकीत उपस्थित केला. प्रशासकांच्या पुढे-पुढे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अन्याय्य बदल्या करण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस जय पाटील, अनिल देशमुख, भिकचंद खिंवसरा, बन्सिलाल कर्नावट, चंपालाल जैन, कुंदनमल जैन, धनश्री भावसार, रेवती पाटील, नारायण राजपूत, सुरेश कुलकर्णी, देवकिसन माळी, संजय अमृतकर, शेख इस्माईल, अनंत भोसले आदींसह सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेतून खुलली मैत्री...

$
0
0

नाशिक टाइम्स टीम
फिनालेच्या परफॉर्मन्सची जय्यत तयारी, जल्लोषात होणारी रॅम्पवॉकची प्रॅक्ट‌िस आणि स्पर्धेतून खुलत गेलेली मैत्री जपत वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय ‘सोनी पैठणी’ स्पर्धेचे सहावे ग्रुमिंग सेशन शुक्रवारी उत्साहात पार पडले.
अंतिम फेरीची आतुरता आणि त्यामागील टेन्शन स्पर्धकांच्या चेहऱ्यावर शुक्रवारी दिसत होतं. या ग्रुमिंगमध्ये एकीकडे स्पर्धेसाठी चुरस दिसत होती, तर दुसरीकडे सहा दिवसांत जमलेल्या मैत्रीचे भाव स्पर्धकांमध्ये स्पष्ट जाणवत होते. दुपारी एक वाजता या ग्रुमिंग सेशनला सुरुवात झाली. नवीन डान्स अकॅडमीचे नवीन तोलाणी यांनी स्पर्धकांचा अंतिम फेरीतला वैयक्त‌िक परफॉर्मन्स, इंट्रोडक्शन, रॅम्पवॉक राउंड यांची प्रॅक्ट‌िस घेतली. याबरोबरच स्पर्धकांना अंतिम फेरीत स्वतःला सिद्ध करताना काय करावे, याच्या टिप्सही दिल्या. यानंतर अंतिम फेरीच्या दृष्ट‌िकोनातून स्पर्धकांना कम्युनिकेशन स्किलचे धडे देण्यात आले. अभिनेत्री, मॉडेल किंवा जाहिरात क्षेत्रात स्पर्धक लवकरच पदार्पण करणार आहेत. यावेळी संभाषणावर पकड मिळवल्यास व्यक्त‌िमत्त्वाची प्रभावी छाप पाडता येते, असा सल्ला यावेळी स्पर्धकांना मिळाला.
स्पर्धेचे ग्रुमिंग पार्टनर असलेल्या ‘स्पीक वेल’ इन्स्टिट्यूटमध्ये हे ग्रुमिंग सेशन पार पडले.
गेल्या सहा दिवसांत मिळालेल्या टिप्समधून अंतिम फेरीपूर्वीच स्पर्धक मॉडेल भासू लागल्या आहेत. प्रत्येकीची ढासू परफॉर्मन्ससाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वेस्टर्न आउटफिट आणि साडी रॅम्पवॉकसाठी अत्यंत काटेकोरपणे सराव केला जातोय. या सरावात स्पर्धकांमध्ये ‘मीच श्रावणक्वीन होणार...’ अशी चुरस प्रत्येकीमध्ये निर्माण झाली आहे. खास बाब म्हणजे, स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत मैत्रीदेखील जपली जातेय. ग्रुमिंग सेशनमध्ये झालेल्या मैत्रीचे बंध जपत स्पर्धेला सामोरे जाण्याचा निश्चय स्पर्धकांनी केला आहे. परफेक्ट ग्रूम होत स्पर्धक सोमवारी होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाले आहेत.

टायटल्ससाठीही तय्यार
श्रावणक्वीनच्या झगमगत्या मुकुटासोबतच देण्यात येणार इतर अॅवॉर्ड टायटल्ससाठी स्पर्धक सज्ज आहेत. टॅलेंट राउंडसोबतच इतर राउंडमध्येही आमचे सादरीकरण दमदार असणार आहे. श्रावणक्वीन आम्ही होणारच, सोबतच टायटलही मिळणार असल्याचा आत्मविश्वास स्पर्धकांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात सेवाकर भरणा एेरणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सावानाने केंद्रीय सेवाकर भरला नाही म्हणून मध्यंतरी झालेल्या पत्रापत्रीला आता पुन्हा ऊत आला असून, हा चाळीस लाखांचा कर तात्काळ भरावा, असा विषय नुकत्याच झालेल्या सावाना सभेत प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी घेतला. परंतु, इतकी मोठी सेवाकर रक्कम लगेचच भरावी याला दोन सदस्यांनी कडाडून विरोध केल्याने हे प्रकरण चांगलेच रंगात आले आहे. या प्रकरणी आता चार सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, त्यांच्यामार्फत चौकशी होणार आहे.

सन २०१२ मध्ये सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशान्वये सावानामध्ये सत्तेवर असलेले झेंडे, बेणी यांना पायउतार व्हावे लागले आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. या निवडणुकांमध्ये झेंडे, बेणी पॅनलचा पराभव करून विलास औरंगाबादकर, कर्नल देशपांडे पॅनल निवडून आले. त्यानंतर सातत्याने बेणी हे सावानाने सेवाकर भरावा म्हणून आग्रह धरत होते. तसे पाहता सावानाचे कर सल्लागार गोविलकर यांच्या आणि सेवाकर अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने, सावानाने केंद्रीय सेवाकर भरण्याची तयारीही केली होती. बेणींनी मात्र २००९ ते २०१२ पर्यंतच्या काळात सावानाचे कार्यवाह असताना सेवाकराचा भरणा का केला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. आज अध्यक्ष असलेले विलास औरंगाबादकर २००८ ते २०११ या कालावधीत बेणींच्या बरोबर सावानात कार्यरत होते. २०१२ मध्ये नव्याने निवडणुका झाल्यानंतर गोविलकर यांच्या सल्ल्याने सावानाने २००९ पासूनचा सेवाकर २०१४ मध्ये दंड-व्याजासह भरला.

सन २००९ पासूनचा सेवाकर सन २०१४ मध्ये भरल्यानंतर काही काळाने सेवाकर कार्यालयाकडून पुन्हा सावानास १५ लाख रुपये कर अधिक १५ लाख रुपये दंड अधिक व्याज अशी अंदाजे रुपये चाळीस लाख भरण्यासाठी नोटीस आली. एकदा सावानाने २००९ पासूनचा सेवाकर भरल्यानंतर पुन्हा आलेली ही नोटीस अन्याय्य असल्याचे सावानाच्या कार्यकारी मंडळास वाटले आणि या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी म्हणून पुण्याचे प्रसिद्ध कर सल्लागार विजय ठकार यांचा सल्ला घेतला. ठकार यांनी ही नोटीस म्हणजे सावानावर अन्याय आहे आणि अशा अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची सोय सरकारनेच केलेली आहे, त्यामुळे हे पैसे भरण्याचे सावानास काहीच कारण नाही, असे सांगितले. त्यांच्याच सल्ल्याने सावानाने नागपूरला कमिश्नर यांच्याकडे अपील केले. नागपूरचे कर सल्लागार राजंदेकर यांनीही याबाबतीत सावानास मदत केली. या सल्ल्यासाठी विजय ठाकर अथवा राजंदेकर यांनी सावानाकडून कोणतीही फी आजपर्यंत घेतलेली नाही. अपील अद्यापही पडून आहे. या अपिलाचा निकाल सावानाच्या बाजूने लागल्यास सावानाचे चाळीस लाख रुपये वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावाना कार्यकारी मंडळाने जरा सबुरी बाळगावी, अशी चर्चा सांस्कृतिक वर्तुळात होत आहे.

_____

सावानाने जाणीवपूर्वक सेवाकर चुकविला म्हणून १५ लाख रुपये दंड झाला आहे. २००९ ते २०१४ अशा पाच वर्षांचा तो आकडा आहे. त्यावर सावानाने अपीलही केलेले आहे. मात्र, सेवाकर सल्लागार प्रभू देसाई यांनी असा सल्ला दिला आहे, की हा सेवाकर व व्याज भरावेच लागणार आहे. ते अंडरप्रोसेस भरले, तर किमान दंडातील काही रक्कम कमी होऊ शकते. त्यामुळे हा विषय सभेवर घेतला होता. सावानाने बँकेत ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्यावर ७ टक्क्याने व्याज मिळते व आपण मात्र २४ टक्क्याने व्याज भरायचे, हा मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घातले अपिलाचा निकाल २ वर्षांनी लागल्यास २४ टक्क्याने पैसे भरावे लागणार आहेत आणि तसेही पाहता जहागीरदारांच्या काळात सर्व्हिस टॅक्स माफी योजना जाहीर झाली होती. त्याचा फायदा तेव्हाच्या कार्यकारी मंडळाने घेतला असता, तर आज व्याज व दंड भरावा लागण्याची वेळच आली नसती.

-श्रीकांत बेणी, प्रमुख कार्यवाह, सावाना

---

सावानाचा सेवाकर हे प्रकरण आमच्या कारकीर्दीतील नाही. संस्थेस लागू असलेले सर्व कर भरण्यास आमचा कधीच विरोध नव्हता. म्हणून औरंगाबादकर, बेणी यांच्या कारकीर्दीमध्ये (म्हणजेच २००८ ते २०११) त्यांनी न भरलेला २००९ पासूनचा करही आम्ही २०१४ मध्ये भरला. आज जे प्रकरण आहे ते २००९ पासूनचा कर भरल्यानंतरही सेवाकर कार्यालयाने २००७ पर्यंत मागे जात पुन्हा मागील कर मागण्यामुळे निर्माण झालेले आहे आणि त्याला आमचा विरोध होता. त्याही वेळी बेणी पत्रापत्री करून चाळीस लाखांची रक्कम भरण्याचा आग्रह वारंवार करीत होते. आजही अपिलाच्या निकालाची वाट न बघता सेवाकर भरण्याचा आग्रह बेणी करीत आहेत. या प्रकरणाविषयी नव्या कार्यकारिणी सदस्यांना सर्व माहिती व्हावी म्हणून मी सविस्तर पत्र पाठवीत आहे.

-मिलिंद जहागीरदार, माजी कार्यवाह, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>