Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘समृद्धी’चा मुहूर्त टळणार?

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू केली असली तरी अजूनही बहुतांश मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पावसामुळे मूल्यांकनात अडथळे येत असून हे काम रखडले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनाचा १ ऑक्टोबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या घोषणेपासूनच त्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाची धार तीव्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात बऱ्यापैकी यश मिळव‌िले आहे. संपादित करावयाच्या जमिनींसाठी चांगले दर देऊनही अद्याप काही शेतकरी जमिनच न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. जमिनीबरोबरच घरे, विहिरी, झाडे, पाइपलाइन, गोठे देखील या महामार्गात जाणार असल्याने त्याचाही मोबदला सरकारकडून दिला जाणार आहे. परंतु, नेमका मोबदला देता यावा यासाठी संपादन प्रक्रियेत जाणाऱ्या या सर्व बाबींचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. या मूल्यांकनाचे काम सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात सुरू करण्यात आले असले तरी ते अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन मूल्यांकन होणे आवश्यक असले तरी पावसामुळे या कामात अनेक अडथळे येत आहेत. इगतपुरीत तर सातत्याने पाऊस सुरू असल्याने मूल्यांकन करणारी यंत्रणा गावांमध्ये पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये अद्याप मूल्यांकनाच्या कामाला सुरुवातच होऊ शकलेली नाही.

समृद्धी महामार्गासाठी अपेक्षित खर्च मोठा असून हे काम मुदतीत सुरू करून मुदतीतच संपविण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासनापुढे आहे. कामाचा कालावधी वाढला तर त्याचा खर्चही वाढणार आह. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१७ पासून जिल्ह्यात कामास प्रारंभ करण्याचा सरकार आणि प्रशासनाचा मानस आहे. परंतु, पावसाने मूल्यांकनाचे काम रखडल्याने प्रारंभालाही विलंब होण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. मूल्यांकनाचे काम केव्हापर्यंत पूर्ण करायचे याची निश्च‌ित मुदत नसल्याचे प्रशासनाकडून सांग‌ितले जात आहे. पावसाने उघडीप दिल्याशिवाय मूल्यांकनाच्या कामाला गती मिळणार नाही. सिन्नर तालुक्यातील पाच गावांचा अजूनही या महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे या सर्व अडचणी दूर झाल्यानंतरच जमिनींचे संपादन आणि पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता बळावल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

प्रत्येक सोमवारी आढावा
सिंहस्थ कुंभमेळा काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक आठवड्याला ठराविक दिवशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला जात होता. समृद्धी महामार्गाबाबतही तेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी कार्यवाहीचा आढावा घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कामकाजास गती मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधी खड्डे, आता गतिरोधक

$
0
0

सारडा सर्कलच्या दुर्दशेने अपघाताची भीती; वाहनचालकांचा संताप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या द्वारका चौकात काही वर्षांपूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते. मात्र त्याची जोरदार पावसामुळे पुरती वाट लागलेली आहे. परिणामी, द्वारका सर्कलकडे जाणारा हा रस्ता जीवघेणा झाला आहे. याचा थेट त्रास या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. असे असतानाच त्याठिकाणी आता गतिरोधक टाकल्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहनचालकांना नाशिकरोडहून शालीमारला जाताना उपनगर, फेम टॉकीज, काटे गल्लीतील वाहतुकीचे अडथळे पार करत जावे लागते. त्यानंतर द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचे दिव्य पार पाडावे लागते. हे सर्व पार केल्यानंतर सारडा सर्कलला पोहचल्यावर वाहनचालकांसमोर खड्ड्यांचे संकट उभे राहते. त्यासोबतच याठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे आणखीनच जास्त त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

कारण एकीकडे खड्ड्यांची दुरुस्ती तर केलीच जात नाही, त्यावर आता गतिरोधक केल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. परिणामी, अपघाताची भीती नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने ही समस्या मार्गी लावण्याची मागणीही वाहन चालकांनी केली आहे.

दर्जाहीन पेव्हर ब्लॉक

सारडा सर्कलसह शालीमार, जेल रोडचा सैलानी चौक आदी ठिकाणी काही वर्षांपूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. टक्केवारीच्या नादात अत्यंत खराब दर्जाचे पेव्हर ब्लॉक टाकल्याबद्दल तत्कालीन महापालिका आयुक्तांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व ठिकाणी हेच पेव्हर ब्लॉक अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. सारडा सर्कलवरील पेव्हर ब्लॉक मुळे रस्ता वर-खाली झाला आहे. त्यामुळे वाहन घसरून चालकाला गंभीर दुखापत होण्याची भीती आहे.

शालीमारहून नाशिकरोडला जाताना वाहनचालकांना आपले वाहन कसरत करूनच चालवावे लागते. तसेच यापुढील सारडा सर्कलवर या खड्ड्यांच्या त्रासाने वाहनचालक वाहने जीव मुठीत धरून चालवत आहेत. या परिसरात उर्दू शाळा असून, विद्यार्थ्यांनाही यामुळे धोका उद्भवू शकतो. हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात वाहनचालकांचा अपघातही होऊ शकतो.

शहरातील प्रवेशाचा सारडा सर्कल महत्त्वाचा मार्ग आहे. या चौकातून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पायी प्रवास करतात. खराब दर्जाचे पेव्हर ब्लॉक आणि प्रचंड खड्ड्यांमुळे येथे अपघात होऊ शकतो. तरी पेव्हर ब्लॉक काढून हा पक्का रस्ता करावा जेणेकरून वाहनचालकांना त्रास होणार नाही.

अजीज पठाण, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात जागोजागी नो एंट्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवादरम्यान आरास पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख वाहतूक मार्गात ५ सप्टेंबरपर्यंत बदल करण्यात आले आहेत. दररोज सायंकाळी ७ पासून मध्यरात्रीपर्यंत नियोजित मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे शहर बस वहातूकीचे काही मार्ग सायंकाळी ७ ते १२ पर्यंत बदलण्यात आले आहे.

गणेशोत्सवादरम्यान देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांमुळे शहरातील पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार, कालिदास कलामंदिर, सीबीएस, मेहेर, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, मेहेर ते मेनरोड, भदकाली परिसराला यात्रोत्सवाचे स्वरुप आलेले असते. गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवसांत तर अनेक भागांत चालायलाही जागा नसते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प असते. या पार्श्वभूमीवर पोल‌िस उपायुक्तांनी वाहतूक मार्गातील बदलांबाबत अधिसूचना काढली आहे.

दोन्ही बाजूंनी बंद

किटकॅट चौफुली ते महाकवी कालिदास कलामंदिरमार्गे सुमंगल कपड्याच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद राहील. सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे - किटकॅट व सुमंगलकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूने वाहनांसाठी बंद राहील. पंचवटीतील सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. याच भागातील मालविय चौक-गजानन चौक-नागचौक-शिवाजी चौक ते पुन्हा मालविय चौक हा मार्ग दोन्ही बाजूने बंद ठेवला जाणार आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी सायंकाळी ६ ते १२ पर्यंत हे नियोजन राहणार आहे.

एसटीच्या मार्गात बदल

खासगी वाहतुकीसोबतच एसटी बसेसच्या मार्गातही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार निमाणी बसस्थानकातून शालिमारमार्गे जाणाऱ्या बसेस तसेच या मार्गावरील इतर वाहतूक रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नलपर्यंत येतील. त्यानंतर सांगली बँक सिग्नल ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग बंद राहील. ही वाहतूक निमाणी बसस्थानक येथून रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल येथून मेहेर सिग्नल - सीबीएस - मोडक सिग्नल - गडकरी चौक - सारडा सर्कलमार्गे पुढे जाईल. नाशिकरोडकडून निमाणीच्या दिशेने जाणाऱ्या बसेससह इतर वाहने सारडा सर्कलमार्गे मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - रविवार कारंजामार्गे पुढे जातील. अशोक स्तंभ ते रविवार कारंजादरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने ‘नो पार्किंग’ घोषित करण्यात आला आहे. पोलिसांची वाहने तसेच अॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाच्या वाहनांना वरील निर्बंधामधून वगळले आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी सायंकाळी ६ ते १२ पर्यंत हे नियोजन असेल.

प्रवेश बंद मार्ग ( ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सायं. ७ ते रात्री १२)

- खडकाळी सिग्नल येथून शाल‌िमार मार्गे- सीबीएसकडे ये-जा करणारी वाहने

- खडकाळी सिग्नल येथून दिपसन्स कॉर्नर - नेहरुगार्डकडून गा. मा. पुतळामार्गे - मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारी वाहने

- त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंत ये -जा करणारी वाहने

- गाडगेमहाराज पुतळा - धुमाळ पॉइंट - ते मंगेश मिठाई कॉर्नर

- सीबीएस सिग्नलपासून सांगली बँक सिग्नल - धुमाळ पॉइंट -दहीपुलाकडे ये-जा करणारी वाहने

- प्रतिक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारी वाहने

- अशोक स्तांभाकडून रविवारकारंजा - मालेगाव स्टॅण्डकडे ये-जा करणारी वाहने

- रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नल - येणारी वाहने


पर्यायी मार्ग

खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहरसिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडीमार्ग - मालेगाव स्टँड येथून इतरत्र जातील किंवा खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडी - मखमलाबादनाका - पेठनाका- दिंडोरीनाका येथून इतरत्र जातील


दुसरा पर्यायी मार्ग

खडकाळी सिग्नलपर्यंत येणारी वाहने सारडा सर्कल येथून गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहरसिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडी मार्ग- मालेगाव स्टॅण्ड येथून इतरत्र जातील किंवा खडकाळी सिग्नल - किटकॅटकॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहरसिग्नल - अशोकस्तंत्र - रामवाडी- मखमलाबाद नाका - पेठनाका - दिंडोरीनाका येथून इतरत्र ये - जा करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल शॉपी फोडणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील माळेगाव (ता. सिन्नर) औद्योगिक वसाहतीतील मोबाइल दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यांपैकी एकास पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून इंडिका कारसह मोबाइल आणि होमथ‌िएटर असा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

सोपान रमेश कोकाटे (वय २३, रा. माळेगाव एमआयडीसी) असे अटक केलेल्या संशय‌िताचे नाव आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील साई स्टार मोबाइल या दुकानाचे पत्रे उचकटून चोरट्याने दुकानातील इंटेक्‍स, आयटेन कंपनीचे मोबाइल, बॅटऱ्या, होमथिएटर, लॅपटॉप असा सुमारे एक लाख १० हजारांचा मुद्देमाल २५ ऑगस्ट रोजी चोरी केला होता. पोलिसांनी संशयावरून कोकाटे याला ताब्यात घेतले. विनायक बाळू उर्फ प्रल्हाद काळे (रा. शिक्रापूर, जि. पुणे) व संदीप मुरलीधर हांडे (रा. माळेगाव, सिन्नर) या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती त्याने तपासात दिली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार (एमएच १५ बीएन ७४११), मोबाइल आणि होमथिएटर असा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, हवालदार रवी वानखेडे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, संदीप हंडगे, लहू भावनाथ, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला मुंबईला सुखरूप रवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मुंबईला रोज ३५ ते ४० ट्रक भाजीपाला पाठविला जातो. येथील सर्व भाजीपाला वाशी मार्केटमध्ये पाठवला जात असल्याने अडचण आली नाही. मंगळवारी (दि. २९) रोजी मुंबईला अतिवृष्टी सुरू असतानाही दुपारच्या आणि सायंकाळच्या लिलावाच्या गाड्या वाशी मार्केटला सुखरूप पोहचल्या. बुधवारीही भाजीपाल्याच्या बाजारावर मुंबईच्या पावसाचा काही परिणाम झाला नाही. उलट बुधवारी आवक वाढलेली असतानाही भाजीपाल्याचे दर वाढले.

मुंबईला अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. नाशिक जिल्हा परिसरातही पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असल्याने भाजीपाल्याची काढणी अवघड होत असतानाही मोठ्या कष्टाने भाजीपाला बाजारापर्यंत पोहचविण्याचे काम शेतकरी करीत आहेत. आवक वाढल्याने तसेच मुंबईच्या पावसाची परिस्थिती बघता मंगळवारी (दि. २९) भाजीपाल्याचे दर काहीसे उतरले होते. त्यामुळे बुधवारी परिस्थिती कशी राहील या विषयी उत्सुकता होती. दुपारच्या ल‌िलावासाठी भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली होती. दुपारी होणाऱ्या या फळभाज्याच्या लिलावात कालच्या तुलनेत आज दरवाढ झाल्याचे दिसले. मुंबईप्रमाणेच गुजरातलाही भाजीपाला पाठविण्यात येत असल्यामुळे दुपारचे लिलाव सुरळीत पार पडले.

मार्केटमधील भाव

भाजीपाला ------- मंगळवारचे...........बुधवार(प्रति किलो)

टोमॅटो ...............१० ते २८....................१२ ते ३०

वांगी ..................१५ ते ४०....................१५ ते ५०

फ्लावर ................ ६ ते ९ ................... ६ ते १०

ढोबळी मिरची..........१८ ते ३७...................२५ ते ४२

पिकॅडोर................१५ ते २५....................१८ ते २७

दुधी भोपळा..........१० ते २०.....................१६ ते ३३

कारले .................८ ते १६.......................११ ते १५

दोडका..................१२ ते २५.....................१६ ते ३०

गिलके...................८ ते २५......................२१ ते २९

भेंडी.......................२१ ते ३३....................२५ ते ३५

काकडी...................६ ते १३........................५ ते १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरासरीपेक्षा अधिक सरी!

$
0
0

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा १३ टक्के जास्त पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर हो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एरव्ही सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यात वार्षिक सरासरी गाठणाऱ्या पावसाने यंदा ऑगस्ट अखेरीसच सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि कळवणसारखे काही तालुकेही लवकरच सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात उन्हाळ्यात तप्त झळा तर हिवाळ्यात थंडी अधिक असते. पावसाळ्यात पावसाचा जोरही अधिक असतो. त्याचाच प्रत्यय सध्या जिल्हावासी घेत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर १५ हजार २००.९० मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ३० ऑगस्टलाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात यंदा १ जून ते ३० ऑगस्ट २०१७ या कालावधीत १५ हजार २८१.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरीहूनही अधिक पाऊस झाला आहे. प्रत्येक तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर आहे. ही सरासरी १०१८.७९ मिलीमीटर एवढी नोंदविली गेली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १३ हजार २३२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र १००.५३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सहा तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात दरवर्षी सरासरी ६१४.२० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा ९८०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात १५९.६९ टक्के पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मालेगावी निम्माच पाऊस

यंदा मालेगाव तालुक्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी ४४०.८० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु, यंदा आतापर्यंत २५१.८ मिमी म्हणजेच ५७.१२ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल देवळ्यात ३३१.७ मिमी म्हणजेच ५८.११ टक्के पाऊस झाला आहे. चांदवडमध्ये ७३.९९ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणी नसलेल्या मालमत्ता रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सुरू असलेल्या मालमत्ता सर्व्हेक्षणात नव्याने आढळून आलेल्या मालमत्तांवर महापालिकेने कारवाईची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत शहरातील ३ लाख ६० मालमत्तांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले असून, त्यात ५६ हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत. या मालमत्तांचा वापर होत असतानाही त्यांची नोंदणी पालिकेकडे झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने या मालमत्ताधारकांकडून सहा वर्षांपासून घरपट्टी वसुलीची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या मालमत्ताधारकांच्या अडचणी वाढणार आहेत.

नोंदणी न झालेल्या मालमत्तांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. तसेच, कधीपासून प्लॅटमध्ये निवास सुरू केला याचाही पुरावा सादर करावा लागणार आहेत. उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिका शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करीत आहे. महापालिकेडे नोंद न झालेल्या परंतु, त्याचा वापर सुरू असलेल्या मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. काही मालमत्तांची नोंद निवासी असताना त्याचा व्यावसायिक वापर होत आहे. त्यामुळे या मालमत्ता शोधून त्यांच्यावर कर आकारणी केली जाणार आहे. शहरात सुमारे चार लाख मालमत्ता आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ६० हजार मालमत्तांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात ५६ हजार नोंदणी नसलेल्या मालमत्ता आढळून आल्या आहेत. पालिकेच्या तरतुदीनुसार घरपट्टी वसुलीसाठी त्यांच्याकडून दुप्पट दंडासह गेल्या सहा वर्षांपासूनची वसुली केली जाणार आहे.

कपाटमुळे मालमत्तांची कोंडी

महापालिका हद्दीत कपाट प्रश्नावरून गेल्या तीन वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्रांचा प्रश्न प्रलंबित आहे. सर्व्हेक्षणात सापडलेल्या बहुतेक मालमत्ता या कपाट प्रश्नामुळे अडकलेल्या आहेत. यामुळे भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या मालमत्तांचे करायचे काय असा प्रश्न विविध कर विभागाला पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोस्ट’ स्थलांतराविरोधात जनआंदोलन

$
0
0

टपाल कार्यालयाच्या जागेमुळे ज्येष्ठांचे हाल

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेल्या नऊ दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून पंचवटीत असलेले सर्वात जुने काळाराम मंदिर टपाल कार्यालयाचे सोमवारी (दि. २८) स्थलांतर करण्यात आले आहे. सोयीच्या जागेत असलेले हे टपाल कार्यालय दुसऱ्या मजल्यावरच्या अडचणीच्या ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांच्या हे कार्यालय गैरसोयीचे ठरणार आहे. या स्थलांतराविरोधात जनआंदोलन पेटणार असल्याचे पंचवटीतील नागरिकांनी सांगितले.

पंचवटीतील काळाराम मंदिर पोस्ट ऑफिस हे जुन्या बांधकामाच्या दगडी बांधकाम असलेल्या घरात होते. ते खालच्या मजल्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ते सोयीचे होते. पोस्टाच्या कामासाठी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांना नवीन ठिकाणच्या जागेत जिन्याच्या अनेक पायऱ्या चढून जाणे अवघड होणार आहे. या अडचणीचा पोस्ट ऑफिस स्थलांतर करताना प्रशासनाने कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळेच या नव्या कार्यालयास नागरिक विरोध करीत आहेत.

स्थलांतराचे कारण वरिष्ठांना माहिती

दुसरीकडे नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसचा बोर्डदेखील अजून लावण्यात आलेला नाही. तर पोस्ट ऑफिसचा जुना बोर्ड पुसट झालेला असल्यामुळे नव्याने रंगून आणल्यानंतर हा बोर्ड लावण्यात येणार असल्याचे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र स्थलांतराचे कारण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील वास्तुच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन बाजूंनी पायऱ्या आहेत. त्यात पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी वास्तुच्या दक्षिणेला तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी वास्तुच्या पार्किंगच्या जागेच्या मागच्या बाजूला असल्याने हा जिना लवकर लक्षात येत नाही. या पार्किंगच्या जागेत खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपऱ्या असल्यामुळे या जिन्याचा शोध घ्यावा लागतो, अशा अडचणीच्या ठिकाणी स्थलांतर नको असे नागरिकांचे मत आहे.

नारोशंकर मंदिराच्या समोर महापालिकेने बांधलेल्या वास्तुच्या गाळ्यांकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. गैरसोयीची अशी ही वास्तू गेली २० वर्षांपासून पडून आहे. या वास्तुच्या दुसऱ्या मजल्यावर हे टपाल कार्यालय स्थलांतरीत करण्यास पंचवटीकरांचा विरोध आहे. यासंदर्भात बैठक घेण्यात येऊन जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे.

विश्वास मदाने, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् हिरावाडीत पथदीप सुरू

$
0
0

परिसरातील नागरिक समाधानी

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटीतील हिरावाडी भागातील ठाकरे मळा, मंडलिक मळा, सावता नगर येथील नववसाहतीत रस्ते, वीज, पाणी या मुलभूत समस्यांची वानवा असल्याने रहिवासी त्रस्त होते. याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने दुरुस्ती केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. हिरावाडी परिसरातील गुंजाळ फार्म, ठाकरे मळा, मंडलिक मळ्यासह इतर ठिकाणी नवीन वसाहती वसत आहेत. मात्र त्याठिकाणी अजूनदेखील रस्ते कच्चे असल्याने पावसानंतर चिखल होतो. याचे वृत्त देताच याठिकाणी तातडीने सभापतींनी भेट देत त्याची दुरुस्ती आणि पथदीप बसवण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरीही या परिसरात घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाणदेखील वाढत आहे.

सभापतींचे आश्वासन

सभापतींनी या भागाची पाहणी करीत तातडीने येथील पथदीप व रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्ती करून दिली आहे. आता पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी व रस्त्याच्या डांबरीकरणाचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरनाका रस्त्यावरील खड्डा धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका येथे वळणावरच मोठा खड्डा पडलेला आहे. सततच्या जोरदार पावसामुळे तो वाढतच आहे. त्याच्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या परिसरातील हा जीवघेणा खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी नागरिकांनी मनपा प्रशासनाला केली आहे. ओढ्यावरून आल्यानंतर जेल रोडकडे वळताना हा खड्डा आहे. सिग्नलवर वाहने थांबलेली असताना जेल रोडकडे जायचे झाल्यास या खड्ड्यातूनच वाहन न्यावे लागते. सततच्या पावसाने खड्डा पाण्याने भरलेला असल्यावर रात्रीच्या वेळी दिसतही नाही. त्यामुळे वाहनचालकाला जोरदार झटका बसतो. दुचाकी चालकांच्या जीवावर बेतण्याआधीच हा खड्डा युद्धपातळीवर बुजवून डांबरीकरणाची मागणीही केली जात आहे.


वाहतूक खोळंबणार नाही

या चौकातून एक रस्ता जेलरोडला, दुसरा जत्रा हॉटेलच्या रोडला तर तिसरा पंचवटीकडे जातो. नाशिक-औरंगाबाद महामार्ग असल्यामुळे या नाक्यावर सतत वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी असते. लग्नसराईत येथे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच आहे. त्यामुळे नांदूर नाका येथे लोकांच्या मागणीनंतर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. परंतु, आता कोणी सिग्नल पाळत नसल्याने अपघात होण्याची भीती आहे. त्यात या चौकात दोन वाहतूक बेटे आहेत. तरीही चौकात वाहतूक पोलिस नियुक्त केलेला नाही. या वाहतूक बेटांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दोन्ही बेट तोडून एकच वाहतूक बेट केल्यास वाहतुकीचा खोळंबा टळू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतूकदारांचे ‘त्या’ निर्णयाकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लेखानगर परिसरात ३२ वाळू वाहतूक वाहनांवर नाशिक तहसीलदारांनी कारवाई केली आहे. यापैकी काही वाहनांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करीत वाहतूकदारांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांच्या निर्णयाकडे वाहतूकदारांचे लक्ष लागले आहे.

गौण खनिजांची अनधिकृत वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर लेखानगर परिसरात उभे असल्याची माहिती नाशिक प्रांताधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या आदेशान्वये तहसीलदार, नायब तहस‌ीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्या पथकाने ३ जूनला अशा काही वाहनांवर कारवाई केली ‌होती. तेथे ३२ वाहने तेथे आढळून आली. त्यापैकी १३ वाहनांमध्ये वाळू असल्याचे आढळून आले. या १३ वाहनांपैकी नऊ वाहनांमध्ये प्रत्येकी ४ ब्रास, तीन वाहनांत पाच ब्रास, तर एका वाहनात तीन ब्रास वाळू आढळली. १९ वाहने रिकामी असल्याचे आढळून आले.

कारवाई केलेल्या १३ वाहनांमध्ये वाळू असूनही त्याबाबतच्या पावत्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे ही वाळू अनधिकृत गृहित धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रांताधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तर, रिकामी वाहने वाळू खाली करून आल्याचे गृहित धरून त्यांच्यावर एक ब्रास वाळूचा दंड आकारण्यात आला होता.

मागितली दाद

तहसीलदारांनी केलेली ही कारवाई चुकीची असून, वाहतूकदारांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद माग‌ितली आहे. स्थळ निरीक्षण करून त्याचे व्हिडीओ शूटिंग करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवालही सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांना बसचा आसरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुरांतो एक्सप्रेसचा अपघात व मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा कोलमडल्यानंतर प्रवाशांना बस व खासगी वाहनांनी प्रवास करत बुधवारी मुंबई गाठले. जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव, नांदगाव, निफाड, इगतपुरी व घोटीच्या प्रवाशांनी बसने नाशिकला येणे पसंत केले. मुंबईला सायंकाळपर्यंत नाशिकहून १९ जादा बसेस सोडण्यात आल्या, तर मनमाड नांदगावहून २१ जादा बसेस नाशिकला आल्या. खासगी वाहतूकदारांनी या अडचणीच्या काळात प्रवाशांची लूट करत जादा पैसे आकारले.

मुंबईला जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकावरुन सकाळी बसेसला गर्दी होती. दिवसभर व्दारका परिसरातून प्रवाशांनी खासगी वाहने, ट्रक व दुधाच्या टँकरसह भेटेल ते वाहन पकडत प्रवास केला. मुंबईनाका परिसरातून कूल कॅबने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी होती. विशेष म्हणजे मुंबईला मुसळधार पाऊस पडल्यानंतरही नाशिकला येणाऱ्या सकाळच्या बसेस महामार्ग स्थानकावर वेळेतच पोहचल्या. त्यामुळे प्रवाशांनाही हायसे वाटले.

चाकरमान्यांचे हाल

दोन दिवसांपासून रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले. अनेक जणांनी सुट्टी टाकली तर काहींनी रोडचा पर्याय निवडला. नाशिकला कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण मनमाडहून सुटणारी पंचवटी एक्सप्रेस व कुर्ला एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यामुळे त्यांचे हाल झाले. त्यात इतर रेल्वे नसल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.

विद्यार्थ्यांना सुट्टी

रेल्वेने अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेल्वे रद्द झाल्यामुळे बस व खासगी वाहतुकीचा पर्याय न निवडता घरीच राहणे पसंत केले. हजारो विद्यार्थी हे रेल्वेने नाशिकला शिकण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी सवलतीचे पासही असतात. त्यामुळे त्यांना रस्तामार्ग परवडणारा नसल्यामुळे त्यांनी सुट्टीचा आनंद घेतला.

मंगळवारी रात्री बस रिटर्न

मंगळवारी सकाळी दुरांतो एक्सप्रेसचा अपघात झाल्यानंतर १०० अधिक बसेस या मुंबईला पाठवण्यात आल्या. पण, दुसरीकडे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमार्गे जाणाऱ्या अनेक रात्रीच्या बस ९.३० दरम्यान, रिटर्न पाठवण्यात आल्या. त्यात मुंबई-नंदुरबारसह अनेक बसचा समावेश होता. त्यानंतर तासाभरानंतर आलेल्या बस पुन्हा पाठवण्यात आल्या. मुंबईला जाणाऱ्या खासगी वाहनांपासून अनेकांनी रस्ता खराब झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दुसरीकडे या रस्त्यावरुन ट्रॅफिक जामच्या अनेक घटनांमुळे वाहन चालक त्रस्त झाले. पावसामुळे एकीकडे अडचणी वाढल्यानंतर या कृत्रिम अडचणीही मोठ्या होत्या.

प्रवाशांची लूट

खासगी वाहतूकदारांनी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचा गैरफायदा घेत प्रवाशांची लूट केल्याच्याही तक्रारी होत्या. काही ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी ४५० ते ५०० रुपये घेण्यात आले. काहींनी प्रामाणिकपणे नेहमीचेच दर आकारले.


कसाऱ्यात दरड कोसळली

जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. घोटी टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत दरड दूर केल्याने वाहतूक सुरळीत झाली. पावसामुळे इगतपुरी तालुक्यात नेहमीच दरड कोसळण्‍याच्या घटना होत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजवाडे संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार

$
0
0


राजवाडे मंडळाला पुरस्कार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

इतिहास संशोधनाचे उत्कृष्ट कार्य करणारी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे संशोधन मंडळाला पुरुषोत्तम पुरस्कार हा उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. सहकारमहर्षी पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. ९ ऑक्टोबरला राजवाडे मंडळास पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र असे आहे. याबाबतची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी बुधवारी (दि. ३०) पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील राजवाडे संशोधन मंडळ यंदा पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित होणार असल्याने मंडळाच्यावतीने पत्रकार परिषदेत माहिती देतांना अध्यक्ष मदनलाल मिश्रा, क्युरेटर श्रीपाद नांदेडकर, ग्रंथपाल नंदलाल अग्रवाल, डॉ. लता अग्रवाल, जयश्री शहा व मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी, महाराष्ट्रातील शिक्षण संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील मोजक्या कार्यक्षेत्रातील संस्थांना यापूर्वीही हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याची नोंद घेतली आहे. त्यासोबत येत्या काळात संस्थेचे कार्य वृद्धिंगत करणे याबाबत सजग करणारादेखील आहे, असे मुंदडांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे गेले डॉर्निअर विमान?

$
0
0

नाशिकची विमानसेवा अजूनही अधांतरितच; ‘एचएएल’लाच नाही थांगपत्ता

‘नाशिकला आता विमानसेवा सुरू होणार’, ‘तेव्हा होणार’, या आणि अशा प्रकारच्या वार्ता वारंवार येऊन गेल्या. विविध कारणे पुढे केल्यानंतरही विमानसेवा अद्यापही ‘हवेत’च आहे. सप्टेंबर तोंडावर येऊन ठेपल्यानंतरही ‘उडान’ होण्याची चिन्हे नाहीत. या पार्श्वभूमीवर विमानसेवेचा परामर्श घेणारी मालिका आजपासून.

नाशिक : इतरांचे जाऊ द्या, आम्हीच आमच्या १९ आसनी विमानाद्वारे प्रवासी सेवा देतो, असे सांगणारे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आता तोंडघशी पडले आहे. कारण, कानपूरच्या कारखान्यात तयार झालेले डॉर्निअर विमान अद्यापही ओझर एचएएलच्या ताब्यात आलेले नाही. परिणामी, ओझरहून सेवा सुरू करण्याची एचएएलची घोषणा पोकळच ठरली आहे.

राज्य सरकारने पर्यटन खात्यांतर्गत तब्बल ८४ कोटी रुपये खर्चून ओझर विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर म्हणजेच ३ मार्च २०१४ रोजी या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात झाले. दीड वर्षे वाद मालकीचा वाद रंगल्यानंतर अखेर नाममात्र दराने हे टर्मिनल एचएएलकडे हस्तांतरीत करण्यात आले. आता त्यास दोन वर्षे उलटूनही प्रवासी विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, एचएएलला पॅसेंजर टर्मिनलचा पांढरा हत्ती पोसावा लागत आहे.

लढाऊ विमानांची निर्मिती एचएएलकडून केली जाते. हवाईदल आणि नौदलासाठी १९ आसनी डॉर्निअर विमानाची निर्मिती एचएएलने यापूर्वीच केली आहे. याच धर्तीवर प्रवासी वाहतुकीसाठी एचएएलच्या कानपूर येथील कारखान्यात दोन डॉर्निअर विमानांचे उत्पादन करण्यात आले आहे. एचएएलचे चेअरमन टी सुवर्ण राजू यांनी मार्च महिन्यात या विमानांची पाहणीही केली. ही विमाने ११ मे रोजी ओझर एचएएलच्या ताब्यात देण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर एप्रिलमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी ओझर एचएएलला भेट देऊन विमानसेवेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच भेटीत एचएएलचे महाव्यवस्थापक बी. व्ही. पी. शेषागिरीराव यांनी स्पष्ट केले की, कानपूर येथील कारखान्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन प्रवासी विमानांचे उत्पादन घेण्यात येत आहे. एक मे रोजी ही दोन्ही विमाने ओझर एचएएलकडे येणार आहेत. ही विमाने प्रवासीसेवा देणाऱ्या हवाई कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्यास आमचे प्राधान्य राहील. शिवाय एचएएलही विमानसेवा सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. नाशिकहून मुंबई, पुणे ऐवजी नाशिक दिल्ली किंवा हैदराबाद या मार्गांवर सेवा सुरू करण्याचा आमचे प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता ऑगस्ट महिना सरत आला असतानाही ही डॉर्निअर विमाने ताब्यात आली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

एचएएल अधिकाऱ्यांचे तोंडावर हात

डॉर्निअर विमानासंदर्भात एचएएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत न बोलणेच पसंत केले. काहींनी याविषयी माहिती घेऊन सांगू असे स्पष्ट केले. कानपूरला विमाने सज्ज असताना ती ओझरला का येऊ शकलेली नाहीत? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. खासगी कंपन्यांच्या सेवेला डॉर्निअर विमानांचा सक्षम पर्याय उपलब्ध होणे शक्य आहे. मात्र, या साऱ्या प्रक्रियेत प्रचंड हलगर्जीपणा असल्याने प्रत्यक्षात ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा फडशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी व दोन बोकड ठार झाले, तर दुसऱ्या घटनेत म्हाळसाकोरे येथे एक वासरी ठार झाली. परिसरातील चार ते पाच गावांत बिबट्याची दहशत पसरली आहे.

म्हाळसाकोरे येथे श्रीकृष्ण सखाहरी पडोळ हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराजवळील शेडमध्ये गायी व वासऱ्या बांधलेल्या होत्या. सोमवारी रात्री आठच्या सुमारास पडोळ हे गायीचे दूध काढून घरात आले असता बिबट्याने शेडमधील वासरीवर हल्ला केला. या हल्ल्यात वासरी ठार झाली. तालुक्यातील काथरगाव येथे ज्योती ज्ञानेश्वर शिंदे या शेतात वस्ती करून राहतात. मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिंदे यांनी घराबाहेर बांधलेल्या दोन बोकडांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

काथरगाव शेजारील सुंदरपूर येथे शेतात वस्ती करून राहणारे पीर मोहम्मद कासीम यांच्या घराबाहेर शेळ्या बांधलेल्या होत्या. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने यातील एका शेळीवर हल्ला केला. शेळ्यांचा आवाज ऐकून कासीम कुटुंबीय धावत घराबाहेर आले असता बिबट्याने तोपर्यंत शेळीला ठार केले होते. ही घटना वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या आदेशान्वये मनमाडचे वनपाल पी. एस. पाटील, वनपाल विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख यांनी घटनेचा पंचनामा केला.

पकडण्यासाठी पिंजरे लावले

तारुखेडले, म्हाळसाकोरे, नांदुरमध्यमेश्वर, सारोळेथडी, सुंदरपूर यासह काही गावांत गेल्या आठ ते दहा दिवसांत बिबट्याने शेळ्या व कुत्रे यांचा फडशा पडला आहे. यामुळे वन विभागाने बिबट्याला पकड्यासाठी काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेब्रुवारीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना ३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे.
यंदा परिषदेने वर्षभरातील परीक्षांचे वेळापत्रक पहिल्यांदाच परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर केले आहे. आतापर्यंत परीक्षा जवळ आल्यानंतरच वेळापत्रक जाहीर केले जात असे. यंदा पहिल्यांदाच परीक्षा परिषदेने २०१७-१८ या वर्षातील सर्व परीक्षांचे वेळापत्रक वेबसइटवर जाहीर केले आहे. या वेळापत्रकात ट्रेण्ड टिचर्स सर्टिफिकेट फॉर अँग्लो इंडियन स्कूल (टीटीसी परीक्षा), राष्ट्रीय इंडियन मिलेटरी कॉलेज परीक्षा, डीटीएड/डीएलईडी, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा व लघुलेखन परीक्षा, शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. यापुढे २९ सप्टेंबर रोजी होणारी शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा विशेष कौशल्य परीक्षा (जीसीसी-एसएसडी-सीटीसी) घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. डीटीएड/डीएलईडी पुर्नपरीक्षेसंदर्भातील अधिसूचना १ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून ही परीक्षा २१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज परीक्षा १ व २ डिसेंबर रोजी होणार आहे. अर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ३ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत अधिक माहिती www.mscepune.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे चित्रकला, मोदक बनवा स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘कल्चर क्लब’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसेच खास महिलांसाठी मोदक मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
आडगाव नाका, बळीराजा मंदिराजवळील पार्कसाईड होम येथे ३ सप्टेंबर रोजी या दोन्ही स्पर्धा होणार आहे. सणासुदीच्या काळात झटपट तयार होतील अशा विविध पाककृती कशा तयार करायच्या याविषयी डेमो वर्कशॉपही दुपारी तीन वाजता पार्कसाईड होम या ठिकाणी होणार आहे. कोमल सूर्यवंशी या व्हेजी नगेट, इन्स्टंट चोको लावा केक , इन्स्टंट ब्रेड, दहीवडा या आणि अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपी करून दाखवणार आहेत. या दोन्ही स्पर्धा आणि वर्कशॉपसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

चित्रकला स्पर्धेसाठी नियम
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटात चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी गणेशोत्सव हा विषय आहे. स्पर्धा रविवारी, ३ सप्टेंबर दुपारी २ वाजता सुरू होईल. स्पर्धेचा कालावधी २ तास असणार आहे. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

मोदक मेकिंग
स्पर्धेला येताना स्पर्धकांनी मोदक बनवून आणावेत. मोदक स्पर्धकांनी स्वतः बनविलेले असावेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही. स्पर्धेसाठी मोदक तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचे चालतील. ही स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. चित्रकला स्पर्धा आणि मोदक मेकिंग कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना सायंकाळी ५ वाजता आकर्षक बक्षिसे दिले जातील. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क (०२५३) ६६९७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रत्येक गटातून तीन विजेते
चित्रकला स्पर्धेसाठी प्रत्येक गटातून ३ विजेते निवडले जातील. प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, द्वितीय क्रमांकास चार हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे. हे गिफ्ट व्हाउचर योगेश इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून दिले जातील. तसेच सर्व विजेत्यांना सह्याद्री हॉस्पिटलतर्फे फॅमिली हेल्थ चेक अप व्हाउचरसुद्धा दिले जातील. मोदक मेकिंग स्पर्धेतूनही तीन विजेते घोषित केले जातील. प्रथम क्रमांकास सात हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, द्वितीय क्रमांकास चार हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे. हे गिफ्ट व्हाउचरही योगेश इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून दिले जातील. या सर्व विजेत्यांना सह्याद्री हॉस्पिटलतर्फे फॅमिली हेल्थ चेक अप व्हाउचरसुद्धा दिले जातील. १० झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉप मध्ये हेल्थ चेक अप व्हाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प‍्रत‌िनिधी, नाशिक
अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी गोविंद शिवाजी रणेर (२३, रा. बलसा खुर्द, जि. परभणी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी बुधवारी सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये १९ मे २०१६ रोजी या गुन्ह्याची नोंद झाली होती. सरकारी वकील योगेश कापसे यांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले. नाशिकरोडच्या पंचक शिवारातील बोराडे मळा परिसरात एका ट्रान्सपोर्ट कंपनीतील ड्रायव्हर कुटुंबीयांसह रहात होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या रणेर याने या कुटुंबातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तसेच तिच्यावर अत्याचार केले. एएसआय धनेश्वर भारती यांनी या मुलीस व आरोपीला परभणी येथून अटक केली. कोर्टात हा खटला सुरू होता. फिर्यादी तथा मुलीच्या आईने साक्ष फिरविली. मात्र, न्यायाधीशांनी वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरून रणेर यास अपहरणप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, तर बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड तसेच ‘पोस्को’न्वये सात वर्षेसक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने रणेर याला सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्यात मुबलक पाणी

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvepravinMT

नाशिक : जिल्ह्याच्या बहुतांश भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून धरणांमधील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमधील एकूण पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. विशेष म्हणजे पावसाने मुक्काम ठोकल्याने धरणांमधून अजूनही विसर्ग सुरूच आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात आतापर्यंत ५४ टीएमस‌ी पाणी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठी आणि मध्यम आकाराची एकूण २४ धरणे आहेत. गंगापूर, पालखेड त्यापैकी सात धरणे मोठी असून १७ धरणे मध्यम आकाराची आहेत. त्यांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा अशा आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. यंदाही यापैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरीच्या ९६.४० टक्के पाऊस झाला आहे. तर अन्य तालुक्यांमध्ये १०१ ते ११५ टक्क्यांपर्यंत पाऊस‌ झाला आहे. मालेगाव, देवळासह काही तालुक्यांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात १ जून ते २९ ऑगस्ट या कालावधीत १४ हजार ९८९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीच्या ९८.६१ टक्के पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये सरासरी ओलांडण्याची शक्यता अधिक आहे. या पावसाने धरणांमधील पाणीसाठाही वाढला आहे. धरणांची साठवण क्षमता कमी असल्याने गंगापूर, दारणासह अनेक धरणांमधून सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. गतवर्षी आजमितीस धरणांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा होता. तो एक टक्क्याने वाढून ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

जायकवाडीत ५४ टीएमसी पाणी

यंदा जून आणि जुलै या दोनच महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे सातत्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे १ जूनपासून आतापर्यंत तब्बल ५४ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. सध्या जायकवाडीत ७६.९५ टीएमसी पाणी असून ५०.८९ टीएमसी ज‌िवंत पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा

धरण.........क्षमता (दलघफु)..........पाणीसाठा.........टक्केवारी

वाघाड.........२३०२.........२३०२.........१००
दारणा.........७१४९.........७१३४.........९९
करंजवण.........५३७१.........५३३२.........९९
गंगापूर.........५६३०.........५३३७.........९५
चणकापूर.........२४२७.........२२२७.........९२
मुकणे.........७२३९.........५२६०.........७३
गिरणा.........१८,५००.........१०२९३.........५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडीचा दरवाजा पडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
तालुक्यातील देशमाने बुद्रुक येथील अंगणवाडीचा दरवाजा पडून दोन चिमुकले विद्यार्थी जखमी झाले. बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. वर्षभरापूर्वीच ही अंगणवाडी ताब्यात घेण्यात आली आहे. तरीही तिचा दरवाजा अचानक कोसळल्याने कामाच्या दर्जाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
प्रणेती रामदास बागुल व वेदांत विनायक भालके अशी दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. त्यांच्यावर गावातीलच खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घडलेल्या प्रकारास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनालाच जबाबदार धरले असून अंगणवाडी सेविकेने वेळोवेळी दरवाजा दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. अंगणवाडी सेविकेने दरवाजा दुरुस्ती व वॉल कम्पाउंड बांधणीसाठी यापूर्वीच अर्ज केला होता, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली.
२०१४-१५ च्या जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी योजेंतर्गत देशमाने बुद्रुक गावात प्रत्येकी सहा लाख रुपये खर्चाच्या दोन अंगणवाड्यांचे बांधकाम माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी बांधकाम केल्याचा आरोप संदीप दुगड यांनी केला आहे. २०१६ मध्ये मुलांना शिकवण्यासाठी अंगणवाडी ताब्यात देण्यात आली. मात्र, अंगणवाडी ताब्यात मिळाल्यापासून काही त्रुटी अंगणवाडी सेविकेकडून ग्रामपंचायतीस लक्षात आणून देण्यात आल्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप दुगड यांनी केला आहे.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
अंगणवाडीत वॉल कंपाउंड नसल्याने पंधरा दिवसांपूर्वी सापाने वर्गात प्रवेश केला होता. अंगणवाडी सेविकेने प्रसंगावधान राखल्याने ग्रामस्थांच्या मदतीने संभाव्य दुर्घटना टळली. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता दोन मुलांच्या अंगावर दरवाजा अचानक कोसळला. दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्याला दुखापत झाली. या दुर्घटनेप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images