Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गुरुजी रस्त्यावर!

$
0
0

टीम मटा

नाशिक : वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शनिवारी प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, तसेच नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व नाशिक जिल्हा टीडीएफतर्फे शहरात ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने करून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.


राज्य शिक्षक परिषदेचे धरणे

नाशिक : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच दि. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरात शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा क्रमांक सतरावरून आता पहिल्या तीनमध्ये आला आहे. त्यासाठी शिक्षकांनी दिलेले योगदान विचारात घेऊन मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आले.

या निवेदनात समाविष्ट मागण्यांमध्ये सन २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू व्हावा, कॅशलेस मेडिक्लेम योजना जिल्हा परिषद शिक्षकांना लागू व्हावी, २३ ऑक्टोबर २०१७ चा वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी लादलेला शासननिर्णय रद्द करण्यात यावा, ऑनलाइन कामाचे प्रमाणे २० टक्क्यांवर आणावे, शाळांची वीजदेयके शासनाने परस्पर वीज कंपनीस अदा करावीत, २००५ नंतरच्या मृत शिक्षक व शिक्षकेतरांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून मदत मिळावी, १ आणि २ जुलैच्या घोषित शाळांना अनुदान मिळावे, शालार्थ आयडी प्रस्तावांवर कार्यवाही करून योग्य प्रस्तावांना मार्चअखेर आयडी मिळावा व शालार्थ प्रणाली अद्ययावत करावी, दर महिन्यास १ तारखेला वेतन मिळायला हवे, बोगस दिव्यांग व बोगस दुर्धर आजारग्रस्तांची सक्षम प्राधिकरणाकडून शारीरिक तपासणी करावी त्यात कुणीही बोगस आढळल्यास कारवाई करावी, प्राथमिक विभागासाठी चट्टोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी त्वरित लागू करावी, पदवीधर शिक्षकांना बी. एड. करण्यास मान्यता मिळावी, आकृतिबंध त्वरित जाहीर करावा, सर्व अशैक्षणिक कामे, पोषण आहार, बांधकाम ही कामे काढून घेऊन सक्षम विभागाकडे द्यावीत, शिक्षकेतरांना आश्वासित प्रगत योजना लागू करावी, पदवीधर ग्रंथपालांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग कार्यवाहक डी. यू. अहिरे, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे-पाटील, जिल्हा कार्यवाह शरद निकम, गुलाब भामरे, सुमन हिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



प्राथमिक शिक्षकांचा एल्गार

नाशिक : वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटना आंदोलनाच्या भूमिकेत असताना शनिवारी या संघटनांमध्ये प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचीही भर पडली. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर नाशिक पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जून २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील एकस्तर व प्रोत्साहनभत्ता फरक बिले त्वरित मिळावीत, पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे काल्पनिक वेतनवाढ देऊन १५ नुसार प्रोत्साहन भत्त्यात दर वर्षी वाढ देण्यात यावी, कार्यालयीन कर्मचाऱ्याप्रमाणे एलआयसी कपात पगारातून व्हावी, ३९ ब प्रलंबित बिले त्वरित मिळावीत, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजुरीसाठी त्वरित पाठवावीत, नाशिक तालुक्यातील आदिवासी परिसरातील सर्व गावे अवघड क्षेत्र म्हणून घोषित व्हावीत, एमएससी आयटी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या अभ्यासक्रमाची सक्ती करू नये, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पाच हप्ते काही शिक्षकांच्या फंडात जमा नाहीत, ते जमा करावेत आदी प्रश्न या धरणे आंदोलनात मांडण्यात आले. या आंदोलनात सुभाष अहिरे, अशोक ठाकरे, तुकाराम पोटिंदे, प्रदीप पेखळे, बाळू भोये, रामनाथ सानप आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोटनिवडणुकीचा बिगुल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ क मध्ये पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, एप्रिलमध्ये ही निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या माध्यमातून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभागातील ४७ हजार २२८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून, नावांबाबत, तसेच बदलाबाबत काही हरकती असल्यास २६ फेब्रुवारीपर्यंत त्या दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.

मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांचे १९ डिसेंबर रोजी निधन झाल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ क जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्यांवरून प्रभागनिहाय मतदारयाद्यांचे विभाजन करून प्रभाग १३ क ची प्रारूप मतदारयादी तयार केली आहे. शनिवारी महापालिकेच्या वतीने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यासाठी हरकती व सूचना मागविल्या आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी, तसेच पाहण्यासाठी ही मतदारयादी महापालिका मुख्यालयी राजीव गांधी भवन येथे, तसेच नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीविषयी मतदारांच्या हरकती व सूचनांकरिता १७ ते २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रारूप मतदारयादीनुसार प्रभागातील तब्बल ४७ हजार २२८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून, त्यामध्ये २४ हजार १४० पुरुष, तर २३ हजार ८८ महिला मतदारांचा समावेश आहे.

राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, सुरेखा भोसले यांच्या अंत्यविधीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केली होती. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलली असून, भाजप व शिवसेनेकडून ही जागा लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे मनसेची ही जागा धोक्यात आली आहे. भाजप व शिवसेनेकडून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षनेत्यांच्या गाठीभेटीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र संभ्रमावस्था कायम आहे. ही निवडणूक लढवावी, असा काँग्रेसमध्ये दबाव आहे, तर मनसेच्या वतीने ही जागा बिनविरोध करण्यासाठी भोसले यांच्याच कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकार नाही भानावर, राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर’

$
0
0

राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करतानाच 'सरकार नाही भानावर, राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर' अशी जनतेला साद घालत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या 'हल्लाबोल' मोर्चाचे शुक्रवारी येवल्यात आगमन झाले.

राज्यभर राज्य सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडण्यासाठी निघालेला हा हल्लाबोल मोर्चा शुक्रवारी सायंकाळी नाशिक जिल्ह्यात प्रवेशकर्ता होताना येवला शहरातील शनिपटांगणावर राष्ट्रवादीच्या राज्यातील दिग्गज नेत्यांची जाहीर सभा झाली. खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंढे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील आदी नेत्यांची प्रमुख भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृध्द कलाकारांचे मानधन रखडले

$
0
0

नाशिकच्या काही मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकारांनी २०१४-१५ मध्ये अर्ज केल्यानंतर त्यांना शासनाकडून मानधन मंजूर झाले मात्र अद्यापही त्यांना ते मिळालेले नाही.

मानधन मंजूर झाल्याचे पत्र कलाकारांना देण्यात आलेले आहे. परंतु, ते कधी मिळणार याची अनेकांना प्रतीक्षा आहे. यातील बरेचसे कलाकार नव्वदी पार केलेले असून त्यातील काही अंथरुणावर खिळून आहे. विशेष म्हणजे ही बाब शासनाला माहित असूनही या कलाकारांचे मानधन अद्यापपर्यंत जमा झालेले नाही. मानधन जमा होण्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे होते ते सर्व करण्यात आले आहे त्यामुळे हे पैसे लवकर जमा करण्यात यावे, अशी मागणी वृद्ध साहित्यक व कलाकार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्या' शेतकरी महिलेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ

$
0
0

मुंबईत मंत्रालयाजवळ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चांदवड तालुक्यातील शेतकरी शकुंतला कारभारी झाल्टे यांची मागणी मालकी हक्क जमीन ताब्याबाबत आहे. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश, निफाड यांच्याकडे अपिल न्यायप्रविष्ठ आहे. कोर्टाकडून अंतिम निकाल पारीत झाल्यानंतर झाल्टे यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली.

शकुंतला झाल्टे यांनी शुक्रवारी मंत्रालयाजवळ विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्माजी पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केल्यानंतर व्यथित शेतकरी मंत्रालयात धाव घेऊ लागले आहेत. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकरी महिला शकुंतला झाल्टे यांचा मालकी हक्काच्या जमिनीबाबत वाद सुरू आहे. या जमिनीचा ताबा मिळावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. झाल्टे यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी चांदवड प्रांताधिकाऱ्यांना उपोषणाबाबतचे निवेदन दिले होते. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांची मागणी दिवाणी स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी उपोषण अथवा अन्य आंदोलन करू नये अशी विनंती करीत त्यांचे समुपदेशनही करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालय, निफाड यांच्याकडे त्यांनी दाद मागावी, असा सल्ला त्यांना देण्यात आला.

शकुंतला झाल्टे यांचे जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणे उचित नाही. जमिनीच्या संदर्भातील दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असल्याने व्यथित होऊन त्यांनी हे पाऊल उचलले असावे. न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करणे न्यायोचित होईल.
- सिद्धार्थ भंडारे, प्रांताधिकारी चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहुल चोक्सीचा नाशिकच्या व्यापारालाही गंडा

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या गीतांजली ग्रुपचा मेहुल चोक्सी याने नाशिकच्या फ्रेंचायजीला सात कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकप्रमाणे देशभरातील १०० च्या आसपास फ्रेंचायजीही यात फसले गेले आहेत. या सर्वांच्या फसवणुकीचा आकडा ३०० कोटींच्या आसपास आहे. यातील अनेकांनी स्थानिक पातळीवर या विरोधात तक्रारी केल्या असून, काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे गीतांजली जेम्सच्या विविध स्किममध्ये नाशिकचे ९०० हून अधिक ग्राहक फसले होते. त्यांना रिटर्न ज्वेलरीसुध्दा आली नाही. पण, यांचे पैसे फ्रेंचायची घेणाऱ्या वैभव ज्वेलर्सने आपल्या खिशाला चाट देऊन परत केल्यामुळे ते बचावले आहेत.

नाशिकमध्ये गीतांजली जेम्सची फ्रेंचायजी कॅनडा कॉर्नरवर येथील एका सराफाला देण्यात आली होती. पण, काही महिन्यानंतर त्यांनी व्यवहारात पारदर्शकता नसल्यामुळे ती सोडली. त्यानंतर नाशिकरोडवरील दत्त मंदिर चौकातील वैभव ज्वेलर्सच्या भास्कर माळवे व वैभव माळवे यांनी ही फ्रेंचायजी २०१२ मध्ये घेतली व १८ महिन्यानंतर त्यांनी ती सोडली. अॅडव्हान्स पेमेंट देऊनही माल न दिल्यामुळे वादाला सुरुवात झाली व त्यानंतर झालेल्या अनेक व्यवहारात फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ही फ्रेंचायजी सोडली पण, तोपर्यंत त्यांना ७ कोटींचा फटका बसला होता. त्यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून, सेबीकडेही तक्रार केली आहे.

मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली ग्रुपने देशभरात फ्रेंचायजी दिल्या. त्यानंतर त्यात अनेकांची फसगत झाली. पण, त्याची दखल आतापर्यंत सरकारी पातळीवर घेण्यात आली नाही. या फ्रेंचायजी सोडण्यामागे आर्थिक फसवणूक हे कारण असले तरी चोक्सीने मात्र काही प्रकरणात फ्रेंचायचीला त्यात दोषी ठरवले आहे. यात मालाच्या किमतीतही मोठा घोटाळा केल्याचे बोलले जात आहे.

पंजाब नॅशनल बँकेने मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सीबीआयने मुंबई, पुणे, सूरत, जयपूर, हैदराबाद आणि कोईमतूरसह एकूण २० ठिकाणी 'गीतांजली'च्या कार्यालय, शोरुम्सवर छापे टाकले आहे. त्यामुळे हा गीतांजलीचा या गैरव्यवहारात फ्रेंचायजीचा विषयाची सुध्दा चौकशी झाल्यास मोठा गैरव्यवहार बाहेर येणार आहे.

गीतांजली जेम्सची आम्ही फेंचायजी घेतली होती. अठरा महिन्यांनंतरच आम्ही तो सोडली. त्यातून आमची ७ कोटींची फसवणूक झाली आहे. त्याविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. आमच्यासारखेच देशभरातील १०० च्या आसपास फ्रेंचायजी फसल्या असून, फसणुकीचा आकडा ३०० कोटींच्या आसपास आहे.

- वैभव भास्कर माळवे, सराफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या थापाड्या सरकारला धडा शिकवा: मुंडे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी/निफाड

शिवसेना-भाजप युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी असून, शिवसेना ही पूर्वीची शिवसेना राहिली नसून, ती भिवसेना झाली आहे. जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून फसविणाऱ्या फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

दिंडोरी, निफाड व कळवण येथे शिवसेना-भाजप युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे पुढे म्हणाले, की लोकसभेपूर्वी गुजरात मॉडेल व 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता मिळवली. पंधरा लाख बँक खात्यावर देण्याचे आश्वासन दिले. जनधन खाते उघडायला लावले पण बँक खात्यात दमडीही आली नाही. सातबारा उतारा कोरा, वीज वीजबिल माफ, शेतमालाला भाव आदी आश्वासने देत फडणवीस सरकार सत्तेत आले, पण त्यांनी सर्वांची फसवणूक केली. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदींविरोधात देशातील जनता जात असल्याचे पाहता लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. हे 'थापाडे सरकार' असल्याचा घणाघात करीत या सरकारला खाली खेचण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

पाणी पळवू देणार नाही

मांजरपाडा वळण योजना प्रकल्प आम्ही सुरू केला, पण शिवसेना-भाजप युती सरकारने ते काम बंद पाडले. हे पाणी महाराष्ट्रातील जनतेला देण्याऐवजी गुजरातला देण्याचा घाट घातला आहे. पण, हे पाणी आम्ही गुजरातला कदापि जाऊ देणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-भाजप युती सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. फक्त घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या या सरकारला खाली खेचा. सर्वसामान्यांना तुम्ही 'डिजिटल इंडिया'ची स्वप्न दाखवतात. तो जर उपाशी असेल तर तुमचा डिजिटल इंडिया काय कामाचा. न्याय मिळत नाही म्हणून लोकांना मंत्रालयात जाऊन आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तरी अशी सत्ता आम्हाला नको. मराठी शाळा बंद केल्या तर मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही.

- सुप्रिया सुळे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावजाच्या शोधात बिबट्या विहरीत पडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सावज शोधत असलेला बिबट्या शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान विहिरीत पडल्याची घटना तारुखेडले येथे घडली. शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाने क्रेनच्या साहाय्याने बिबट्याला बाहेर काढत पिंजऱ्यात जेरबंद केले.

तारुखेडले येथील संतोष शिंदे यांच्या गट नं. १६ मधील क्षेत्रात पहाटे पाच वाजेच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत कोसळला. विहिरीत पडल्यावर तो जोरजोरात डरकाळ्या फोडू लागला. शिंदे यांनी लागलीच वनविभागाला कळविल्यानंतर सहाय्यक वन संरक्षक राजेंद्र कापसे, वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी आदींनी विहिरीत क्रेन सोडून बिबट्याला बाहेर काढले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकून निफाड येथील वनविभागाच्या नर्सरीत नेण्यात आले. येथे पशुवैधकीय आधिकारी चांदोरे यांनी बिबट्याची तपासणी केली आहे. नर जातीचा बिबट्या असून त्याचे वय साडेचार वर्ष असल्याचे भंडारी यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघाडी नाला गटारगंगाच

$
0
0

वाघाडी नाला गटारगंगाच

काँक्रिटीकरणानंतरही 'जैसे थे' परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ परिसरापासून वाल्मिकनगरातून वाहत येणाऱ्या वाघाडी नाल्याच्या नशीबी अजूनही गटारीचेच स्वरुप आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गोदावरीला करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाबरोबरच वाघाडी नाल्याचेही काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र या नाल्यात गटारीचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नाल्याला गटारगंगेचे स्वरुप कायम असल्याचे दिसत आहे.

गोदावरी नदीला पंचवटी परिसरातून येऊन मिळणाऱ्या दोन नद्यांचा उल्लेख केला जातो. त्यातील एक अरुणा आणि दुसरी वरुणा नदी आहे. त्यातील अरुणा नदी आणि गोदावरीचा संगम रामकुंड येथे होतो. तर वरुणा नदी ही गोदावरीला म्हसोबा पटांगण येथे मिळते. असे असताना अरुणा नदीचे अस्तित्वच नष्ट झालेले आहेत. काँक्रिटीकरणात नदी दिसेनाशी झालेली आहे. पंचवटीतील सरदार चौक, काळाराम मंदिर, शनीचौक या भागातील ड्रेनेज लाइन सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोरून म्हसोबा पटांगणाशेजारून वळविण्यात आलेली आहे. या गटारीचे पाणी थेट वाघाडी नाल्यात सोडण्यात आलेले आहे. अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त असलेल्या पाण्यामुळे वाघाडी नाला घाण झालेला दिसतो.

गटारीच्या पाण्यामुळे दलदल

काँक्रिटीकरण केलेल्या या वाघाडी नाल्यातून सध्या कमी पाणी वाहत असून, या पाण्यासाठी नाल्यात खोलगट आकार करण्यात आला आहे. त्यातूनही या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. या पाण्यात कचरा, घाण आणि वाल्मिकनगर परिसरातील पूलाच्या खालच्या भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमुळे हे पाणी घाण झालेले आहे. त्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे ते पाणी महापालिकेने बांधलेल्या भाजीमार्केटच्या पश्चिमेच्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळच मोकळे करण्यात आल्याने या भागात गटारीच्या पाण्यामुळे दलदल तयार झाली आहे. गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याच्या वल्गना करीत असताना वाघाडी नाल्याच्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही ही बाबही लक्षात घ्यावी लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा पूल अखेर खुला

$
0
0

प्रवाशांच्या मागणीनंतर एक बाजू सुरू

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी गावाजवळ दारणा नदीच्या पात्रात नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी शुक्रवारी (दि. १६) सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. या पुलावरून वाहतुकीची प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दुसरी बाजू मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेली नाही.

नाशिक-पुणे महामार्गाचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. चेहेडीगावाजवळ दारणा नदीच्या पात्रात नवीन चारपदरी पुलाचे कामही काही महिन्यांपासून पूर्ण झालेले आहे. मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. परिणामी, जुन्या पुलावर वारंवार होत असलेल्या वाहतुकीच्या विस्कळीतपणामुळे प्रवाशी त्रस्त झालेले होते. मात्र या पुलाच्या एका बाजूवरून नाशिकरोड ते सिन्नरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

'नाशिकरोड-चेहेडी'च्या कामाला खो

सिन्नर ते चेहेडीदरम्यान नाशिक-पुणे महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी नाशिकरोड-चेहेडीदरम्यान सुमारे अडीच किलोमिटर महामार्गाचे काम न्यायालयीन वादामुळे रखडले आहे. या दरम्यान महामार्ग रुंदीकरणात २३६ झाडे तोडावी लागणार असल्याने या कामास वृक्षप्रेमींनी न्यायालयात विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. झाडे तोडण्यास परवानगी मिळालेली नसल्याने दारणा पुलाजवळ चेहेडी गावाच्या बाजूकडील संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झालेले नाही. परिणामी, हा पूल वाहतुकीसाठी खुले करणे धोक्याचे होते.

निकालाची प्रतीक्षा; खर्चात वाढ

महामार्ग रुंदीकरणाच्या कामास अडथळा ठरणारी २३६ झाडे तोडण्यावरून उद्भवलेला वाद न्यायालयात निकालावर आहे. शुक्रवारीही या संदर्भात दाखल याचिकेवर अंतिम निकाल होऊ शकलेला नाही. याचिकेवरील सुनावणी पूर्ण आहे मात्र निकाल बाकी आहे. त्यामुळे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे. आतापर्यंत ३१२ कोटी रुपयांचा खर्च या महामार्गाच्या रुंदीकरणावर झाला आहे. उर्वरित काम रेंगाळल्याने आता या प्रकल्पाच्या मूळ खर्चात मोठी वाढ होणे अटळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत कर्जवसुलीसाठी सचिवही उतरणार मैदानात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा बँकेच्या थकीत कर्जवसुलीसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिवही आता मैदानात उतरणार आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर आणि जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बँकेच्या कर्जवसुलीसाठी सचिवांना ग्रामीण भागात कामाला लागण्याचे आदेश नीलकंठ करे यांनी दिले आहेत. तसेच थकबाकीदारांवर आता कलम १३८ अन्वये दावा दाखल करण्याची तयारीही बँकेने केली असून, तशी मागणी जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जवसुलीसह विविध अडचणीबाबत अध्यक्ष आहेर यांनी जिल्हा उपनिंबधक करे यांची भेट घेतली. या भेटीत बँकेच्या कर्जवसुलीसाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा झाली. त्यात कर्जवसुलीसाठी विकास सोसायटीच्या सचिवाचाही सहभाग असावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जुने व मोठे थकबाकीदारांची स्थावर मालमत्ता जप्त करून तीचा लिलाव करणे, मोठया प्रमाणात थकबाकी झालेले ट्रॅक्टर जप्त करून लिलाव करणे आदि बाबींवरही चर्चा झाली.

त्यावर करे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. करे यांनी सोयायटी सचिवांना आदेश काढून जिल्हा बॅक वसुली कारवाईत सहभागी होण्याचे आदेश दिले आहे. गावपातळीवर वसुलीचे नियोजन करून जास्तीत जास्त वसुली करण्याचे आदेश त्यांनी पत्रात दिले आहे. तसेच दीड लाखांवरील कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांशी संवाद साधून, या योजनेत त्यांना सहभागी करून घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे वसुलीला जोर येण्याची शक्यता आहे.

कलम १३८ लावू द्या

ज्या थकबाकीदारांनी कर्जवसुली पोटी धनादेश दिले आहेत, त्यांच्यावर कलम १३८ अन्वये दावा दाखल करणेबाबत कारवाई करण्याची मागणी आहेर यांनी करे यांच्याकडे केली आहे. जिल्हा बँकेला याबाबत कारवाईसाठी कायदेशीर अडचण येत असून, त्यासाठी जिल्हा उपनिंबधकाकडून अधिकार मिळाल्यास ही कारवाई करता येवू शकते. त्यासाठी असलेल्या कायदेशीर बाबी ही त्यांनी जाणून घेतल्या असून, त्यावरही निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी अध्यक्ष आहेर यांनी चर्चा केली. यात कर्जवसुलीसाठी सहकार्य करण्याचे साकडे त्यांनी साचिवांना घातले. त्यास सचिवांनी प्रतिसाद कर्जवसुलीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशवाडी भाजीमार्केट चकाचक

$
0
0

मनपा आयुक्तांच्या पाहणीच्या भीतीने स्वच्छता

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशवाडी रस्त्यालगत पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भाजीमार्केट दुर्लक्षित झाल्यामुळे तेथे प्रचंड घाण साचली होती. भाजीविक्रेते आणि महापालिका यांच्या वादामुळे वापराविना पडून असलेले हे भाजीमार्केट बेघरांचे आणि भिकाऱ्यांचे निवासस्थान म्हणूनच नाही, त्यांचे स्वच्छतागृहदेखील बनले होते. मात्र नूतन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे पाहणी करतील या भीतीने हे मार्केट स्वच्छ करण्यात आलेले आहे.

महापालिकेत नुकतेच बदलून आलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भाजीबाजाराला पाहणी होण्याच्या अगोदरच त्याची स्वच्छता करण्याची दक्षता पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या मार्केटमधील घाण दूर होऊन मार्केट चकाचक झालेले आहे.

नाशिक शहर हे हागणदारीमुक्त शहर असल्याचे जाहीर केले गेले असले तरी या मार्केटमध्ये पाहणी केल्यानंतर किती घाण आणि दुर्गंधी पसरली होती याची कल्पना आली असती. अशा भागात जर आयुक्त मुंढे यांनी पाहणी केली तर काय होईल या भीतीपोटी येथील स्वच्छतेच्या कामाला प्रचंड गती देण्यात आली. तसेच तातडीने हे अत्यंत घाण असलेले मार्केट स्वच्छ करण्यात आले.

अधिकाऱ्यांची दक्षता

काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदाघाटाची पाहणी केली होती. त्यावेळी म्हसोबा पटांगण येथे पाहणी करीत असताना त्यांना गणेशवाडीचे भाजीमार्केटही बघून घ्या, असा आग्रह धरला. मात्र, मुंढे यांनी आज गोदाघाट बघायचा आहे असे म्हणत भाजीमार्केटकडे जाण्याचे टाळले. त्यांची या भाजी मार्केटमध्ये कधीही व्हिजिट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पंचवटी विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून भाजीबाजाराच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

भाजीबाजाराचा मोकळा श्वास

या स्वच्छतेदरम्यान या मार्केअमध्ये बस्तान बसविलेल्या लोकांना येथून हाकलण्यात आले. याठिकाणी भाजीबाजार भरत नसल्याने शौचालय आणि मुतारीसाठीच या भाजीमार्केटचा वापर केला जात होता. तो आता थांबणार असून, या भाजीबाजाराला मोकळा श्वास घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या भाजीमार्केटची अवस्था अत्यंत खराब झाली होती. येथून येता-जाताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या इमारतीच्या पायऱ्या आणि मागची बाजूचा वापर शौचालयासाठी केला जात असल्यामुळे येथे घाण साचली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त शहर शिवमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोमवारी (दि. १९) साजऱ्या होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून शहर छत्रपतींच्या जयजयकारासाठी सज्ज झाले आहे. शहरात नजर जाईल तेथे शिवजन्मसोहळ्याच्या तयारीचे चित्र दिसून येत आहे. कार्यकर्ते तहान-भूक विसरून जयंती सोहळ्याच्या पूर्वतयारीला लागले आहेत.

शहरातील मध्यवर्ती परिसरासह विविध उपनगरांमध्ये शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी या सोहळ्यानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. जयंतीनिमित्त शहरात विविध परिसरांमध्ये मिरवणूक सोहळा रंगणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित उपक्रमात ४० फूट उंचीचे होर्डिंग आणि ६१ फुटी भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सोहळ्यास सुरुवात होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ वंदन, शिववंदन आणि शिवगर्जना होऊन या मैदानातून सकाळी १० वाजता पालखी सोहळा सुरू होईल.

शहरात विविध उपनगरांमध्येही शिवजन्मोत्सवाच्या तयारीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. जागोजागी भगवे ध्वज, पताका, होर्डिंग उभारणी, चौक सुशोभीकरण, विविध सामाजिक कामांची पूर्वतयारी असे चित्र दिसून येत आहे. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्सवाच्या दोन दिवस आधीच शहर शिवमय झाले आहे.

पालखी सोहळ्याचा मार्ग असा

शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे आयोजित पालखी सोहळ्यांतर्गत खडकाळी सिग्नल, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा यामार्गे रामकुंडापर्यंत पालखी अभिषेकासाठी प्रस्थान करेल. या पालखी सोहळ्यात ढोल पथक, लेझीम पथक आणि चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावेळी केवळ पारंपरिक वाद्यांचाच उपयोग केला जाणार आहे. या सोहळ्यात शिवचरित्रातील विविध प्रसंगांवर आधारित चित्ररथ असणार आहेत. आदिवासी तालुक्यांमधून आलेली नृत्य पथके, शाळा, कॉलेजेस आणि सामाजिक व सांस्कृतिक संघटनाही यात सहभागी होणार आहेत. ईदगाह मैदानावर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छिंदमविरोधात संताप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अहमदनगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिवसेना आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत तीव्र निषेध केला.

शहरातील द्वारका चौफुली येथे श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत श्रीपाद छिंदम मुर्दाबाद, भाजप सरकार होश में आओ, छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय? अशा घोषणा देत छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील हा महत्त्वाचा चौक घोषणाबाजीने दणाणून गेला होता. काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांची मोठी कुमक असल्यामुळे अनर्थ टळला.

यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सैनिक होते. शिवजयंतीच्या तोंडावर केलेले विधान हे घातक आहे. शिवरायांच्या नावाने मते मागणाऱ्या सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे म्हणाल्या, की श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याच्या पाठीमागे कोणीतरी सूत्रधार आहे. हा सूत्रधार शोधून काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. श्रीपाद छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दखल करावा, त्याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे इब्राहिम अत्तार, मुख्तार शेख, संभाजी ब्रिगेडचे, विलास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या करुणा धामणे, दीपाली पाटील, वैशाली डुमरे, भारती बोरसे, कविता पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले होते. पंचवटीतल्या युवासेनेच्या वतीने मेहेर सिग्नलवर छिंदमविरोधात आंदोलन करण्यात आले.



मनसेचे जोडे मारो आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून शिवरायांचा जाणीवपूर्वक अपमान करणारे अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर श्रीपाद छिंदम याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून प्रतिमादहन करण्यात आली. यावेळी छिंदम यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष अनिल मटाले, खंडू बोडके, सातपूर विभाग अध्यक्ष सोपान शहाणे, नवीन नाशिक विभाग अध्यक्ष रामदास दातीर, महिला शहराध्यक्षा रिना सोनार, भानुमती आहिरे, पद्मिनी वारे, अरुणा पाटील आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठ, सुरगाण्यात डॉक्टरांची वानवा

$
0
0

नाशिक : पेठ आणि सुरगाणा या आदिवासीबहुल भागात काम करण्यास तज्ज्ञ डॉक्टरच मिळत नसल्याने आरोग्य विभागाने हात टेकले आहेत. जवळपास तीन लाख रुपयांचे मानधन देण्यास आरोग्य विभाग तयार असताना ही परिस्थिती असून, काम करण्यास तयार असलेल्या खासगी डॉक्टरांची शोधमोहीम पुन्हा हाती घेण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

आरोग्य विभागाचे जाळे ग्रामीण भागात पोहोचले असले तरी अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या सर्वत्रच दिसते. विशेषत: भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरच आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसतात. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने बाळंतपणादरम्यान काही समस्या उद्भवल्यास ग्रामीण भागातील महिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. प्रवासात वेळ गेल्यास बाळ गुदमरणे किंवा इतर समस्या निर्माण होऊन अर्भकासह मातेच्या जिवाला धोका निर्माण होतो. दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये सिझेरियनसाठी हजारो रुपये खर्च करणे सर्वसामान्य कुटुंबांना अवघड जाते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी, अर्धवेळ किंवा ऑन कॉल या पद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. यासाठी अगदी लाख ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या मानधनाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये खासगी, तसेच सरकारी डॉक्टर्स मिळून हा कोरम पूर्ण झाला आहे. मात्र, पेठ आणि सुरगाणा तालुक्याकडे खासगी डॉक्टरांनीसुद्धा पाठ फिरवली आहे. याबाबत बोलताना सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की या दोन तालुक्यांत काम करण्यासाठी तयार असलेल्या डॉक्टरांना दुप्पट म्हणजे तीन लाखांपर्यंत किंबहुना त्यापेक्षा अधिक मानधन देण्यात येऊ शकते. आम्ही मागील काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, त्यास यश मिळालेले नाही. आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणार असून, नियुक्ती देण्यात येणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही खासगी डॉक्टरांची सेवा घेतली जायची. आता मात्र त्यांना मानधनाबरोबरच कामानुसार अतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खासगी डॉक्टर आपली सेवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये देऊ शकतात.

मोफत सिझेरियन!

सामान्य आणि गरिबांना खासगी हॉस्पिटलमध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया करणे आर्थिक दृष्टिकोनातून अवघड असते. वेगवेगळ्या कारणांमुळे सिझेरियनचे प्रमाण वाढते असून, याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत ही सुविधा आता तालुका स्तरावर मोफत पुरविली जात आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून, हळूहळू ग्रामीण भागातून सिव्हिलमध्ये पाठवण्यात येणाऱ्या महिला रुग्णांची संख्या घटेल, असा विश्वास डॉ. जगदाळे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसएमएस जॉबच्या नावाखाली फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बल्क एसएमएस पाठवून घरबसल्या दहा ते पंधरा हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवून वृद्धास गंडा घालणाऱ्या दोन परप्रांतीयांविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला असून, तक्रारदाराच्या पाठपुराव्यानंतर, तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक कुमार आणि रणजितसिंग अशी या गुन्ह्यातील संशयितांची नावे आहेत. नवीन रमाकांत गंगावणे (वय ६१, रा. जयप्रसाद रेसि. जुनी पंडित कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी याबाबत वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांतून जाहिरात केली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देत गंगावणे यांनी संशयितांशी संपर्क साधला. एप्रिल २०१६ मध्ये संशयितांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी गंगावणे यांना भूलथापा मारल्या. घरबसल्या १५ ते २० हजार रुपये कमावण्यासाठी आमच्याकडे बल्क एसएमएस कीटसाठी नाममात्र शुल्क भरून नोंदणी करा, असे संशयितांनी सांगितले. त्यानंतर तुम्हाला आम्ही ग्राहक क्रमांक देऊ, त्यानुसार तुम्ही एसएमएस पाठवण्यास सुरुवात करा. या कामासाठी दर महिन्याला तुम्हाला मानधनापोटी ठराविक रक्कम दिली जाईल, असे गंगावणे यांना सांगण्यात आले. घरातच थांबणाऱ्या गंगावणे यांनी भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून, २८ एप्रिल २०१६ रोजी नोंदणी शुल्काचे १२ हजार रुपये संशयितांचे एसबीआय बँक खात्यात (खाते क्रमांक ३५३३६११५११६) मध्ये भरली. पैसे भरल्यानंतर अनेक दिवस उलटूनही बल्क एसएमएस किट मिळत नसल्याने गंगावणे यांनी संशयितांशी संपर्क साधला, तर संशयितांनी टॅक्ससाठी पुन्हा साडेचार हजार रुपये भरण्याचा सल्ला दिला. या प्रकरणात काही तरी काळेबेरे असून, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच गंगावणे यांनी चौकशी केली. यात संशयितांच्या फसवणुकीचा भंडाफोड झाला. या दरम्यान संशयितांचा संपर्क तुटल्याने गंगावणे यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता तपास सुरू केला. संशयितांनी बिहारमधील बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने पोलिसांनीही हात वर केले. तपासच होत नव्हता. मात्र, गंगावणे यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर दोन वर्षांच्या कालावधीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजून घेत सकारात्मक भूमिकेने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

बतावणीचा नाशिकरोडला आणखी एक प्रकार

वीज कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करीत घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी एक लाख ७७ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या दोन घटना दिंडोरी आणि पेठरोडवर घडल्या असून, या तिन्ही गुन्ह्यांतील आरोपी एकच असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अलका नारायण धिवरे (वय ७५, रा. गुरुद्वारामागे, विद्याविहार कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धिवरे घरात एकट्या असताना हा प्रकार घडला. वीज कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून आरोपींनी धिवरे यांच्या घरात प्रवेश मिळवला. बिल भरलेले नाही, असे म्हणून आरोपींनी वृद्ध धिवरे यांच्याकडे बिल भरल्याची पावती मागितली. या वेळी आरोपींनी धिवरे यांना हातातील बांगड्या काढून ठेवण्याचा सल्ला देत धिवरे यांना बांगड्या काढून कपाटात ठेवण्यास भाग पाडले. यानंतर दोघांपैकी एकाने वृद्धेस गच्चीवरील लाइट पॉइंट बघायचा आहे, असे सांगत गच्चीवर नेले. दुसऱ्या आरोपीने कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सहा तोळे वजनाच्या व सुमारे एक लाख ७७ हजार रुपये किमतीच्या चार बांगड्या काढून घेतल्या. उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. यापूर्वी, पेठ आणि दिंडोरीवरदेखील दोन भामट्यांनी जनगणना, तसेच वीज मीटरचे रीडिंग घ्यायचे असल्याचे सांगत दोन घरांतील दागिने काढून पोबारा केला असून, या सर्व घटनांमध्ये एकच गुन्हेगार असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.

नऊ जुगारींवर कारवाई

आर्टिलरी सेंटररोड आणि जेलरोड भागात सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पकडून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोकड हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणी उपनगर तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्टिलरी सेंटर रोडवरील चिंतामणी बंगल्यासमोर गुरुवारी रात्री काही जुगारी जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा मारला. यात रामदास वैरागर, तसेच त्याचे सहा साथीदार तीन पत्ती जुगार खेळताना सापडले. त्यांच्या ताब्यातून आठ हजार ३६० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक विलास गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गोडसे तपास करीत आहेत. दरम्यान, दुसरी कारवाई जेलरोड भागातील चरणदास मार्केट भागात करण्यात आली. चरणदास मार्केट भागात शुक्रवारी सायंकाळी उघड्यावर मटका सुरू असताना नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी प्रभाकर टाक, तसेच त्याचा एक साथीदार कल्याण बाजार मटका जुगार खेळताना, तसेच खेळविताना सापडले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रकाश भालेराव याच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग निधीवरून प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पालिकेच्या वाडिया रुग्णालयातील बंदावस्थेत असलेल्या दोन रुग्णवाहिका, दिव्यांगांच्या निधीचे वाटप, मोकाट कुत्र्यांची समस्या आदी विषयांवरून शनिवारी झालेल्या महासभेत गदारोळ झाला. या सर्व विषयांवरून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मोकाट कुत्र्यांवर प्रतिबंधात्मक शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्रीच नसल्याची बाब उघडकीस आली.

येथील महापालिकेच्या सभागृहात शनिवारी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे व नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थित महासभा झाली. सभेच्या प्रारंभी शहरातील भूसंपादन दाव्यापोटी द्यावयाचा रक्कमेचा मुद्दा चर्चेस आला. याविषयी एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत न्यायालयात भूसंपादन प्रकरणी एकही निकाल पालिकेच्या बाजूने लागत नाही, असा आरोप केला. तसेच यासाठी पालिकेकडून स्थापन करण्यात आलेली सर्व प्रकारणे समोर का ठेवण्यात येत नाही? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान याविषयावर समितीने तयार केलेल्या अहवालास मंजुरी देण्यात आली.

अंदाजपत्रकात ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा विषय देखील गाजला. आर्थिक वर्ष संपत आले तरी देखील या निधीचा योग्य विनियोग का झाला नाही? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर सहायक उपायुक्त राजू खैरनार यांनी दिव्यांगांना साहित्य वाटप सुरू करण्यात येईल, असे सांगितले. शहरात मोकट कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील कुत्र्यांच्या लसीकरणावर अधिकाऱ्यांची उत्तरे आणि नगरसेवकांचे प्रश्नांचे गांभीर्य सोडून सभागृहात हास्य पिकले. पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया व लसीकरणासाठी रुग्णालय व आवश्यक सामग्री नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पालिकेच्या विकास आराखड्यात संगमेश्वर भूमापन क्रं. १२९१ हा भाग हरितपट्टा म्हणून दाखविला आहे. या भागात व्यायामशाळा उभारण्यासाठी आरक्षणात फेरबदल करण्याचा विषय उपमहापौर सखाराम घोडके यांच्या शिफारशीने चर्चेस आणण्यात आला होता. चर्चेअंती या जागेसाठीच्या आरक्षणात बदल करण्यास महासभेने मंजुरी दिली.

रुग्णवाहिका बंद का?

शहरातील वाडिया रुग्णालयातील दोन रुग्णवाहिका बंद असल्याच्या विषयावरून कॉंग्रेस नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुरुस्तीच्या नावाने या रुग्णवाहिका कित्तेक दिवस बंद आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. महापौर रशीद शेख यांनीही अधिकाऱ्यांना झापले. आरोग्य विभागाच्या कारभारवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी ७ आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

'गठबंधन'चे तोंडावर बोट

महासभेत महागठबंधन आघाडीचे नगरसेवक अतिक अहमद कमाल यांनी परिधान केलेले काळे कपडे व तोंडावरील बोट चर्चेचा विषय ठरला. गेल्या महासभेत नगरसेवक कमाल हे नागरी समस्यांवरून बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांना महापौरांनी बोलू दिले नाही. एका दिवसासाठी निलंबित केले असल्याचे सांगत अतिक यांनी सभागृहात लोकशाही आहे की हुकुमशाही असा सवाल केला. तसेच काळे कपडे परिधान करून तोंडावर बोट ठेवून निषेधही व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0

जळगाव, धुळे, रावेरला पुतळादहन

टीम मटा

नगर महापालिका कर्मचाऱ्याशी फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा शनिवारी (दि. १७) जळगाव, धुळे शहरासह रावेरला विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला.

जळगावात निषेध

जळगाव : शहरातही शनिवारी (दि. १७) शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनेकडून निषेध रॅली काढून नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा निषेध करण्यात आला. शिवसेनेकडून महापालिकेच्या इमारतीसमोरील चौकात छिंदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. दुपारी महापौर ललीत कोल्हे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, विनोद देशमुख यांच्या उपस्थितीत श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

धुळ्यातही शिवप्रेमींकडून निषेध

धुळे : शहरात सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. १७) नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्यास शेण लावून दहन करण्यात आले. शहरातील भगवा चौकातही संतप्त शिवसैनिकांनी छिंदमच्या नावाने ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला. ऐन शिवजयंतीच्या दोन दिवस अगोदर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवप्रेमींच्या भावना भडकल्या आहेत. सकाळी शहरातील मनोहर टॉकीजसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्च्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत श्रीपाद छिंदमच्या निषेधाच्या घोषणा देत त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या वेळी संयोजक मनोज मोरे, भोला वाघ, राजकुमार बोरसे, अर्जुन अण्णा पाटील, गौरव पवार, प्रदीप जाधव, संजय वाल्हे, रजनीश निंबाळकर आदींसह तरुण उपस्थित होते. शिवसेनेकडून भगव्या चौकात आंदोलन करण्यात आले. संतप्त शिवसैनिकांनी छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारीत निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनात रामदास कानकाटे, कैलास मराठे, भाऊसाहेब चौधरी, योगेश मराठे, हेमंत गायकवाड, कुणाल कानकाटे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’

रावेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रावेर मराठा सेवा संघाने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचाबद्दल अतिशय खालच्या पातळीचे शब्द वापरून उपमहापौर छिंदम यांनी अपमान केला आहे. याबाबत रावेरला मराठा सेवा संघाने त्याचा जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, सरकारने गुन्हे नोंदविण्यात दिरंगाई करू नये, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष असून, राष्ट्रपुरुषांची बदनामी हा राष्ट्रद्रोह आहे. म्हणून या छिंदम यांच्यावर राष्ट्रपुरुषाचा अवमान, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक लोकभावना दुखावून समाजात अशांतता निर्माण करणे व कलम १२४ अ नुसार देशद्रोह असे गुन्हे राज्य सरकारने तत्काळ दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार विजयकुमार ढगे व पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांना देण्यात आले. निवेदनावर प्रशांत पाटील, घनःशाम पाटील, अरुण पाटील, सोपान पाटील, किशोर पाटील, रमेश पाटील, नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी, योगराज पाटील, यादवराव पाटील, ललित बागूल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् नागाला मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नागाची जोडी दिसणे की औत्सुक्याची गोष्ट असते. मात्र हे जुळण सुरू असताना एका नागाला जखम झाली. त्या नागावर सर्पमित्रांनी यशस्वी शस्रक्रिया करून त्याला जीवदान दिले.

पिंपळगाव बसवंतपासून जवळच असलेल्या उंबरखेड येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीजवळ नागाचे जुळण होते. यावेळी एक नाग लोखंडी पाइपात अडकल्याने त्याच्या पोटाजवळ फाटले होते. याबाबत सर्पमित्र भैय्या महाले यांना काही शेतकऱ्यांनी माहिती देताच त्यांना घटनास्थळी जावून त्या नागाला एका बरणीत टाकले. दुसऱ्याही नागाला वेगळ्या बरणीत टाकले. पोट फाटलेल्या नागवर उपचार करण्यासाठी सर्पमित्र पिंपळगावात पाहोचले. मात्र अशी शस्रक्रिया करण्याची सुविधा पिंपळगावात नसल्यामुळे त्यांनी आपल्या इतर मित्रांना याबाबत कळविले.

सामाजिक बांधिलकीतून मेडिकल व्यावसायिक रोहित कापुरे यांनी पराग हॉस्पिटलच्या डॉ. कविता सोनवणे यांना विनंती केली. त्यांनी शास्त्रक्रियाचे सर्व साहित्य दिले. मात्र पेशंट घाबरतील म्हणून हॉस्पिटलमध्ये शस्रक्रिया करू नका, अशी विनंती केली. सर्पमित्र व शास्त्रक्रियाचा अनुभव असलेले पिंटू पवार, योगेश डिंगोरे व भैय्या महाले यांनी दत्त मंदिराच्या ओट्यावर जखमी नागावर शस्रक्रिया केली. पवार यांनी जखमी नागाच्या पोटाला टाके घातले. टाके घालत असताना पडून असलेला नाग त्यानंतर काही वेळातच फणा काढू लागला. नाग दिसला की त्याला मारायला लाठ्या काठ्या घेऊन काही लोक तयार असतात. पिंपळगाव येथील या सर्पमित्रांनी एका विषारी नागाला मानवतेच्या दृष्टीने जीवदान दिले आहे.

आतापर्यंत ३ ते ४ जखमी नागांची यशस्वी शस्रक्रिया केली आहे. साप आणि नाग याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत गैरसमज आहेत. ज्या ठिकाणी साप, नाग दिसतो अशा ठिकाणी जाऊन त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडत असतो.-पिंटू पवार, सर्पमित्र पिंपळगाव ब.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी मॅरेथॉनद्वारे स्वच्छतेचा संदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील निमा व सिन्नर अॅथलेटीक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी आयेजित 'निमा मिनी मॅरेथॉन २०१८' स्पर्धेत जिल्हाभरातील दोन हजारावर स्पर्धक सहभागी झाले. सिन्नर औद्योगिक क्षेत्रात उद्योजक व कामगारांना स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पोहचविणारी मॅरेथॉन सर्वांचे आकर्षण ठरली.

येथील माळेगाव एमआयडीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, एस. के. नायर, संदीप भदाणे, अरूण चव्हाणके, सिन्नर अॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, चिटणीस बाळासाहेब लोंढे, अविनाश पगारे आदी उपस्थित होते.

सिन्नर मिनी मॅरोथॉनचे सलग १३ वर्षांपासून यशस्वीपणे आयोजन करण्यात येते. ही १४ वी मिनी मॅरेथॉनचे यशस्वी पार पडली. सिन्नर रनमुळे तालुक्यातील धावपटूंना प्रोत्साहन मिळाले असून अनेक धावपटूंनी राज्यपातळीवर नाव नोंदविले असल्याचे आमदार वाजे यांनी अधोरेखित केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते

स्पर्धेत १२ वर्षाआतील मुलींच्या गटात सानिका चौधरी, मुलांच्या गटात अनिल चौधरी, १४ वर्षांआतील मुलींच्या गटात रविना चौधरी तर मुलांमध्ये विशाल मेंडके, १८ वर्षाआतील मुलींच्या गटात वनिता भोंबे तसेच मुलांमध्ये रवींद्र गावाडी, महिला खुला गटात काजल दळवी, तर पुरूष खुला गटामध्ये दिनकर लिलके यांनी प्रथम क्रमांक पटकावून विशेष प्राविण्य मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images