Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बालिकेवरील अत्याचाराविरोधात दोंडाईच्यात मूक मोर्चा

$
0
0

अत्याचार करणाऱ्यास तत्काळ अटक करा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दोंडाईचा शहरातील नूतन विद्यामंदिर व माध्यमिक हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या बालवाडीतील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २०) शहरातील महिला, युवतींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने गावातून मूक मोर्चा काढण्यात आला.

हे प्रकरण दडपणाऱ्या संस्था चालकांसह मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ अटक करावी, हा खटला अतिशीघ्र न्यायालयात चालवावा, पीडितेस शासकीय धोरणानुसार तातडीने मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी निघालेला हा मूक मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार मांडळे यांना निवेदन दिले. या वेळी उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, नगरसेवक नरेश कोळी, चिरंजीव चौधरी, नरेश गिरासे, प्रवीण महाजन, विजय मराठे, सागर मराठे, मनोज निकम, कृष्णा नगराळे, डॉ. नितीन चौधरी, प्रकाश चौधरी, नगरसेवक सुनील चौधरी आदी उपस्थित होते. दोंडाईचातील बालवाडीत शिकणाऱ्या बालिकेला दि. ८ फेब्रुवारी रोजी चॉकलेटचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह अज्ञात नराधमाविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोंडाईचा येथे दि.८ फेब्रुवारी रोजी पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय व मानवतेला काळिमा फासणारी असताना संस्था चालकांनी शाळेची बदनामी होईल, या भीतीने किंवा संस्था चालकांची कुटुंबियांना रोखले, अशी शंका येते, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारने जिल्ह्यावर अन्याय केला

$
0
0

हल्लाबोल यात्रेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

म. टा. वृत्तसेवा, रावेर

महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले कुणावर काहीही कारवाई झाली नाही. मात्र जळगाव जिल्ह्यातील नेत्यावर आरोप होताच त्यांचे मंत्रिपद काढून घेत जिल्ह्यावर सर्वात जास्त अन्याय सरकारने केला, असे वक्तव्य मंगळवारी (दि. २०) रावेरला हल्लाबोल सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. येथील छोरिया मार्केटमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रात इतर ठिकाणीही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र जळगावचाच माणूस त्यांनी काढला. मतभेद सगळ्यांचे असतात मात्र अन्याय विरोधात उभे राहण्याची भूमिका आमची असते, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्यावर झालेला अन्याय हा जिल्ह्यावर झाल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्ह्याने खासदार शदर पवार यांना खूप प्रमे दिले. सतत पंधरा वर्षे जनतेने आम्हाला साथ दिली. मात्र आता आमची सत्ता नसली तरी जनतेचा जिव्हाळा कायम आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यासाठीच आम्ही नैतिक जबाबदारीच्या नात्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या हल्लाबोलचे आयोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या.

...तर मराठी शाळा बंद झाल्या नसत्या

सर्वसामान्यांना महागाईची झळ पोहोचत असून, गॅस सिलिंडरचे भाव हे ३५० रुपयांवरून थेट ८०० रुपयांपर्यंत गेल्या तीन वर्षांत पोहचले. त्यामुळे याला कोण जबाबदार, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी केला. महागाईची झळ सर्वात जास्त गृहिणांना पोहचत असते. सरकारने निर्णय घेत तब्बल तेराशे जिल्हा परिषद शाळा बंद केल्या मात्र आम्ही सत्तेत आल्यावर एकही शाळा बंद होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. आज जर बाळासाहेब असते तर एकही मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय झाला नसता. मात्र आता शिवसेना सत्तेत असताना शाळा बंदचा निर्णय घेण्यात येत असल्याचा खेदही त्यांनी व्यक्त केला.

कुणीही समाधानी नाही

सरकार भाषणे खुप सुंदर देते परंतु, कारवाई व कृती मात्र शून्य असल्याचा आरोप त्यांनी बोलताना केला. आमदार दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, नुसती भाषणे करून उपयोग नसून, जनतेत जाऊन जागरण करण्याची गरज आहे. कुणीही समाधानी नाही, सरकार दोन कोटी रोजगार देणार होते प्रत्यक्षात काहीच नाही, असे सांगत त्यांनी, उद्योग, शेती कशातही सुधारणा झाली नसल्याचा आरोप केला. आम्ही कर्जमाफीची मागणी करतोय आणि सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतेय. या वेळी गफ्फार मलिक, सिमरन यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार अरुण गुजराथी, नानासाहेब काळे, भास्करराव जाधव, आमदार डॉ. सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तुम्ही शेतकरी आहात का सिद्ध करा?

हे फसवे सरकार असून त्यांनी जनतेला केवळ फसविले खोटे आश्वासन दिले. आम्ही ज्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणतात, मीही शेतकरी असून मी पाच पिढ्याचा शेतकरी असल्याचे सांगतात. मात्र त्यांनी तुम्ही शेतकरी आहात का, हे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि. २०) रावेरला बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. सर्वसामान्य जनतेचा राग, रोष या हल्लाबोल यात्रादरम्यान आम्ही पाहतोय, असेही ते म्हणाले. कुठे गेले अच्छे दिन?, कुठे गेले २ कोटी रोजगार?, कुठे गेला आमचा शेतकरी, कुठे गेले प्रत्येकासाठी पंधरा लाख यासारखे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे सरकार केवळ जनतेला भोळवण देत असून, यामुळेच सरकारवर जनता रुसली आहे, असा आरोपही आमदार मुंडे यांनी केला.

मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी या सारख्या बड्याना पैसा बुडवणाऱ्याना पन्नास हजार कोटी कर्ज कसे मिळते? त्यांना कर्ज कसे मिळते, हा प्रश्न त्यांनी केला. आणि आमच्या शेतकऱ्याला कोणतेही कर्ज घ्यायला गेले तर त्यांना आधार लिंक आहे काय, सात-बारा आहे काय, असे अनेक प्रश्न विचारले जातात हे का? असा सवालही त्यांनी सरकारला केला. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, असे सांगत आमदार मुंडे यांनी छिंदमबाबतही सरकारवर टीका केली. निवडणुकीचा काळात दिलेल्या जाहिरातीची आठवण करून देत, तुम्ही जर शिवाजी महाराजांना विसरला असाल तर तुमचे सरकार पुढे जिंकून येणार नाही, अशी टीका केली. हे सरकार कोणाचेही नाही, त्यामुळे येत्या काळात ‘आपले सरकार’ आणा, असे आवाहन त्यांनी जनतेला शेवटी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

$
0
0

पिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट घोंगावू लागले आहे. रब्बीची हातातोंडाशी आलेली पिके संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २३ फेब्रुवारीपासून पुढील ४८ तासांत हवामान विभागाने गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. शेतांमध्ये कापून ठेवलेली पिके सुरक्षित स्थळी हलविण्यासह शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले आहे.

शहरासह जिल्ह्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कधी थंडी, कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामानाचा अनुभव नाशिककरांना येत आहे. गत आठवड्यात आणि त्यापूर्वीही नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान, पावसाच्या हलक्या सरींसह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने ढगाळ वातावरण वगळता गारपिटीसारख्या मोठ्या नैसर्गिक अरिष्टाचा सामना नाशिककरांना करावा लागला नाही. परंतु, आता पुन्हा हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या सरींसह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळ आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप यांनी केले आहे.

ही घ्या काळजी

शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये तो विक्रीसाठी आणला असेल तर तो झाकून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. या काळात मदतीची आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नगदी पिकांना सर्वाधिक धोका

रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. नगदी पिके द्राक्ष, कांदा यांची काढणी सध्या सुरू आहे. तसेच काही शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. यामुळे गारपिटीचा सर्वाधिक फटका या दोन पिकांना बसू शकतो. याशिवाय हरभरा, गहू ही पिकेही कापणीला आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त शेतक-यांनी वीज कार्यालयास ठोकले टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी येथे शेती पंपावर वीज वापर नसताना देखील संबंधित शेतकऱ्यास वीजबिल आकारणी केल्याने वीज कंपनीच्या या भोंगळ कारभारबद्दल संतप्त झालेल्या दाभाडी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी वीज वितरणच्या कार्यालयास टाळे ठोकले.

तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी जगन्नाथ निकम यांच्या शेतातील विहिरीवर विद्युत पंप सन २०१४ पासून बंद आहे. याबाबत तत्कालीन उपअभियंता वाघ यांनी पंचनामा करून पंप नसल्याचे सादर केले होते. प्रत्यक्ष पाहणी करून विहिरीला अल्प प्रमाणात पाणी असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. तरी देखील निकम यांना २१ हजार ५०० रुपयांचे वीजबिल आकारण्यात आले. त्यामुळे निकम यांच्या परिसरातील शेतकरी संतप्त झाले. तसेच गावातील सुभाष नहिरे, जगन्नाथ निकम यांच्या घरगुती बिलाला अंदाजे सरासरी बिले देण्यात आल्याची देखील तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वीज वितरण कंपनीस वेळोवेळी अर्ज देण्यात आले आहेत, तरी देखील कुठलीही दखल घेण्यात आली नाही.

त्याचप्रमाणे गावातील रस्त्यावर असणारे विद्युत पोल, जुन्या तारा, नवीन जोडणी, घरांवरून गेलेल्या धोकादायक विजतारा व मंजूर पोल याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराबाबत गावातील शेतकरी गावातील संबंधित कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले असता एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपअभियंता एस. टी. आहेर याठिकाणी उपस्थित झाले.

आश्वासनावर बोळवण

संतप्त शेतकऱ्यांनी अभियंता आहेर यांना जाब विचारला. यावेळी आहेर यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष नहिरे, अविनाश निकम, अमोल निकम, गब्बर निकम, संग्राम निकम, बापू मोरे, संदीप निकम, रावसाहेब निकम, दिनेश नवरे, नानाजी महिरे, विठ्ठल हिरे, चेतन अनावडे, आदी शेतकरी व ग्राहक उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकीवरून तापले वातावरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांना आचार्य जितेंद्र व गो-रक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी यू ट्यूब व्हिडियोवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ व दोघांना अटक करावी या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरातील विविध चाळीस ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईस्थित हिंदू आश्रमचे आर्चाय जितेंद्र व विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गो-रक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा यू ट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात येथील कॉंग्रेस आमदार अशिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार काँग्रेस समर्थकांनी पोलिसांकडे केली होती. या व्हिडिओत शेख यांच्यावर आतंकी आमदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर शेख यांनी या व्हिडिओतील सर्व आरोपांचे खंडन करीत शिर्के व आचार्य दोघांना अटक करण्याची मागणी केली होती. १५ फेब्रुवारीपर्यंत अटक न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात दिला होता. काँग्रेस कमेटीचे प्रवक्ता साबीर गोहर यांनी यावेळी सांगितले की, आमदार शेख यांच्यावर शिर्के व अचार्य यांनी चुकीचे आरोप केले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकी देत कायदा सुव्यवस्थेस आव्हान दिले आहे.

आचार्य, शिर्केंच्या अटकेची मागणी

मंगळवारी शहरातील गांधी पुतळा, किदवाई रोड, भुक्कू चौक, मुशावरत चौक आदींसह विविध ४० ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. प्रत्येक ठिकाणी तीन कार्यकर्ते हातात काळ्या छत्र्या घेवून त्याद्वारे निषेध व्यक्त करीत होते. आचार्य जितेंद्र व गो-रक्षक मच्छिंद्र शिर्केया दोघांना अटक करण्यात यावी अशी मागणी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. या आंदोलनात साबीर गोहर, लतीफ बागवान, अस्लम अन्सारी यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी , नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज टाकीत पडला मुलगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंग गडावर आरोग्य उपकेंद्राच्या ड्रेनेजच्या उघड्या टाकीत ११ वर्षाचा मुलगा पडल्याने खळबळ उडाली. जवळच उभ्या असलेल्या ग्रामस्थांमुळे त्या मुलाला बाहेर काढण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कळवण पंचायत समितीच्या आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने वर्षभरापासून बोअर करतांना फूटलेली टाकी दुरुस्त का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नवनियुक्त उपसरपंच राजेश गवळी यांनी टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. स्वयंम संदीप बेनके असे त्या मुलाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी खेळता खेळता तो या टाकीत पडला होता.

गेल्यावर्षी जून महिन्यात ग्रामपंचायत मार्फत बोअरवेल करण्यात आले होते. आपल्या वार्डातही बोअरवेल व्हावे म्हणून गडावरील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच संदीप बेनके हे आग्रही होते. त्यानुसार त्यांच्या घराशेजारील कळवण पंचायत समितीच्या आरोग्य उपकेंद्राजवळ एक बोअर करण्याचे काम सुरू झाले. मात्र बोअर काही फुटांवर गेले असता दुर्गंधी पसरली व लक्षात आले की, उपकेंद्राच्या स्वछतागृहाची (ड्रेनेज) टाकी फुटली. तेव्हा ग्रामस्थांनी या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. याआधीही या उघड्या टाकीत गाय पडली होती. तर सोमवारी ही घटना घडली. याबाबत संतप्त झालेल्या संदीप बेनके यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

गेल्या वर्षी बेनके यांच्या मागणीनुसार वार्ड क्र. ३ मध्ये बोअर केले. त्यावेळी टाकी नादुरुस्त झाल्याने बोअरचे काम थांबविले होते. या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.- राजेश गवळी, उपसरपंच

चुकीच्या ठिकाणी बोअर केली गेल्याने उपकेंद्राच्या टाकीचे नुकसान झाले. याबाबत कोणीही तक्रार केलेली नसल्याने हे काम पेंडिंग राहिले. सहाययक गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांना तत्काळ घटनास्थळी काम मार्गी लावले.-डी. एम. बहिरम, बीडीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांमुळे आम्हाला ऊर्जा मिळाली

$
0
0

प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुस्तके, चित्रपट, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियामुळे आमचे कार्य घराघरात पोहचले. त्यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी नाशिकचे युवा साहित्यिक किरण सोनार लिखित 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात केले.

नाशिकचे युवा साहित्यिक किरण सोनार यांनी लिहिलेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो' या पुस्तकास हेमलकसात चांगला प्रतिसाद लाभला असून, सहा महिन्यांतच पहिली आवृत्ती संपली. हेमलकसात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पुस्तकाच्या विक्रीच्या माध्यमातून लोकबिरादरी प्रकल्पास मदत केली जात असून, पुस्तकास अनेक साहित्य पुरस्कारही मिळाले आहेत. मंदा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या हस्ते द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी प्रकाश आमटे यांनी सांगितले, की आम्ही आरोग्य, शिक्षण सेवासोबतच गाव विकासासाठी शेततळे बांधणे, आदिवासींनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे आणि व्यसनमुक्ती असे कार्यक्रम हाती घेतले असून, यासाठी लोकसहभागची गरज आहे. किरण सारखे युवक आमचे कार्य पाहून प्रभावित होतात आणि आपल्या क्षेत्रात आदिवासींसाठी काम सुरू करतात याचा आनंद वाटतो, असेही प्रकाश आमटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात दोन दिवसांत तीन घरफोड्या

$
0
0

मालेगाव : शहरातील घरफोडीचे सत्र वाढत असून शहरातील सोयगाव, डिके कॉर्नर, शब्बीरनगर परिसरात तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनेत लाखोचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सोयगाव भागातील सरस्वती कॉलनीमध्ये गोदावरी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पंचायत समितीचे उपसभापती अनिल शांताराम तेजा (वय ३४) यांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचे ग्रील व दरवाजेचे कुलूप तोडून १ लाख रक्कम, ७ हजार किमतीचा लॅपटॉप व ७ हजार रुपये किमतीचे फोन असा एकूण १ लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. अनिल तेजा यांनी कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

दुसरी घटना डीके कॉर्नर परिसरात झाली. तेजरत्न कॉलनीमध्ये राहणाऱ्या ललिता बळवंत निकम (वय ३३) या महिलेच्या घरात रविवारी रात्री ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील १ लाख ५ हजार रोख रक्कम व २५ हजार किमतीच्या सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून लंपास केला आहे. ललिता निकम यांनी कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

शब्बीरनगर भागातील एका किरण दुकानातदेखील सोमवारी रात्री घरफोडी झाली. सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे. पवारवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, तीन संशयितांना अटक केली आहे. अद्याप एक आरोपी फरार आहे.

कॅम्पात दोन गटांत हाणामारी

मालेगाव : पाणी भरत असताना समोर थुंकल्याच्या कारणावरून कॅम्प भागातील पंचशीलनगरजवळ प्रकाश हौसिंग सोसायटीत दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीनंतर परस्परांविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे. पूजा आहिरे नळावर पाणी भरत असताना संजय विठ्ठल आहिरे हा तिच्या समोर थुंकला म्हणून पूजा व तिच्या कुटुंबाने जाब विचारला. यानंतर संजय आहिरेसह विमलबाई विठ्ठल, सुनीता संजय, ललिता उर्फ संगीता सुरेश पवार, सपना कपिल सोनवणे व अन्य पाच जणांनी तक्रारदाराच्या घरात घुसून शिवीगाळ दम देत पूजा व तिच्या साथीदारांनी मारहाण केली, अशी तक्रार पूजा आहिरे हिने केली आहे. या प्रकरणी पूजा आहिरे व सपना सोनवणे या दोघींनी परस्पर विरोधात तक्रार केली असून, पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंढेंचा सत्ताधाऱ्यांना झटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामांची गरज, तांत्रिकता आणि निधीची उपलब्धता या आयुक्त तुकाराम मुंढेंच्या त्रिसूत्रीचा पहिला फटका भाजपसह नगरसेवकांना बसला आहे. महासभेत विविध विकासकामांचे तब्बल १५ कोटींचे प्रस्ताव माघारी घेण्यात आले. ४४ पैकी तब्बल ३५ प्रस्ताव मागे घेण्याचा प्रकार महासभेत पहिल्यांदाच घडल्याने भाजपसह नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली. बजेटमध्ये तरतूद नसल्याने पडताळणीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. नगरेसवक व सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन भाराभार प्रस्ताव ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचीही यानिमित्ताने कोंडी झाली आहे. २५ लाखांच्या अधिकारावरून आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना सुनावत, २५ लाखांचे आपल्याला खर्चाचे अधिकार असल्याचे ठणकावून सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मंगळवारी नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची पहिलीच महासभा होती. या महासभेत अपेक्षेप्रमाणे नगरसेवकांसह अधिकाऱ्यांना मोठा झटका दिला. महासभेत विकासकामांची आर्थिक तरतूद नसताना भारंभार प्रस्ताव मंजूर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश लावत, महासभेच्या पटलावर ठेवलेले ४४ पैकी ३५ प्रस्ताव माघारी घेण्याचे पत्र दिले. यामध्ये भुयारी गटार योजना, बांधकाम विभाग आणि उद्यान विभागातील प्रस्तावांचा समावेश आहे. विविध विकासकामांचे जवळपास १५ कोटींचे प्रस्ताव माघारी घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांची कोंडी झाली असताना विरोधकांनी मात्र पूर्ण सभाच माघे घ्या, असा टोमणा मारला. आयुक्तांनी सभेची सूत्रे हाती घेत, बजेट हेड निगेटिव्ह असल्याने व या प्रस्तावांबाबत आर्थिक तरतूद नसल्याने जास्तीचे प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. या प्रस्तावांची योग्य ती पडताळणी केली जाईल असे सांगत आवश्यक तेथे आपल्या अधिकारात ते मंजूर करू, अशी भूमिका घेतल्याने सत्ताधारी तोंडावर पडले. एलईडी, नगरसेवक निधीच्या प्रस्तावाचे काय, असा प्रश्न हेमलता पाटील यांनी केला. त्यावर आयुक्तांनी एलईडीचे एकच टेंडर होणार असल्याचे सांगत, हा निधी पोलसाठी वापरा अशी सूचना केली. त्यामुळे एलईडीच्या वादावर आता पडदा पडला आहे.

सत्ताधाऱ्यांनाच आव्हान

प्रस्ताव मागे घेतल्याने मुशिर सैय्यद यांनी नगरसेवक निधी घेऊन माझी कामे करा, अशी भूमिका घेतली. त्यावर आयुक्तांनी आवश्यक असेल तर २५ लाखांचे अधिकार माझ्याकडे असून, त्यातून काम करण्याची भूमिका घेतली. यासाठी महासभेवर येण्याची गरज नसल्याचे सांगत, सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. २५ लाखांच्या आत असलेली कामे मी माझ्या अधिकारात मंजूर करू शकतो, असे सांगितल्याने स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी २५ लाखांच्या आतील प्रस्तावही स्थायी समिती व प्रभाग समितीवर आणावे लागतात अशी भूमिका घेतली. या आदेशाबाबत संदिग्धता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर आयुक्तांनी स्पष्टिकरण देत, कायद्यानुसार आपल्याला २५ लाखांच्या आत कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार असल्याचे सांगत, हा आपला अधिकार असल्याचेही ठणकावले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची बोलती बंद झाली. आयुक्तांची पहिलीच सभा असल्याने वाद नको म्हणून सत्ताधाऱ्यांनी आवरते घेतले.

आमचे काम सोपे झाले

नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांचे महासभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही स्वागत करीत, भाजपला कोंडीत पकडले. आयुक्तांची ख्याती चांगली असल्याने काहीजणांवर येथे गंडांतर आले आहे. तुम्ही आल्याने चांगले झाले, असे गजानन शेलार म्हणाले. परंतु, तुम्ही आल्याने चांगले झाले नाही, असे म्हणणारेही येथे असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. आता आमचे काम हलके झाले असा टोमणाही त्यांनी मारला. त्यामुळे सभागृहात हशा पिकला.

छिंदमवरून कोंडी

शिवसेनेने महासभेत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदम यांच्या निषेधाचा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. त्या प्रस्तावाचे वाचन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. त्यामुळे कोंडीत पकडलेल्या महापौरांनी प्रस्ताव वाचून दाखवण्यास सांगितले. यानंतर निषेधाचा ठराव करीत, विरोधकांनी बाके वाजवून निषेध केला. त्यावर भाजपच्या सदस्यांनी मात्र मौन धरणे पसंत केले. भाजपच्या सदस्यांच्या या मौनावरून विरोधकांनी त्यांची कोंडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रोस्टल स्कूलची सुरक्षा ‘उंची’ वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या किशोर सुधारालयाच्या (ब्रोस्टल स्कूल) संरक्षण भिंतीचे काम वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. जवळपास पाच फूट उंची वाढविण्यात येणार असून, यामुळे तब्बल २१ फूट उंचीची भिंत पार करून पलायन करणे सोपे होणार नाही.

त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटललगत असलेल्या किशोर सुधारालयामधून ११ जानेवारी २०१६च्या मध्यरात्री २६ पैकी १२ विधी संघर्षित बालकांनी मनोरा करून तसेच, चादरींचा वापर करून धूम ठोकली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तुरूंग महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव या ब्रोस्टल स्कूलच्या संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्याचे सूतोवाच केले होते. वास्तविक संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव या घटनेपासूनच प्रस्तावित होता. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे प्रस्तावावर अंमलबजावणी होत नव्हती. सन २०१६ मध्ये घडलेल्या घटनेमुळे उंची वाढवण्याच्या कामास चालना मिळाली. दोन दिवसांपासून येथे काम सुरू झाले असून, तब्बल पाच फूट उंची वाढविण्यात येणार आहे. सध्या भिंतीची उंची १६ फूट असून, नवीन कामामुळे ती २१ फुटांपर्यंत वाढणार आहे. यासाठी तुरूंग महानिरीक्षक कार्यालयामार्फत निधीची तरतूद करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम हाती घेण्यात आले आहे. साधारणतः सव्वातीन एकर क्षेत्रफळ असलेल्या ब्रोस्टल स्कूलमध्ये १०५ विधी संघर्षित मुले सामावू शकतात. आजमितीस वेगवेगळ्या जिल्ह्यातील बाल न्यायालयाच्या आदेशामुळे सात विधी संघर्षित मुले येथे राहतात. या जेलमध्ये ३०, २१ आणि ११ फुटाचे आठ बॅरेक असून, प्रत्येक बॅरेकसमोर ६ वेगळे विभाग आहेत. मुलींचा वेगळा विभाग असून, मुख्यद्वारात तीन कार्यालये आहेत.

संरक्षण भिंतीची उंची पाच फुटांपर्यंत वाढवण्यात येणार असून, लवकरच काम पूर्णत्वास पोहचले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भिंतीची उंची वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. निधी उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे.

- के. बी. भुसारे, प्राचार्य, ब्रोस्टल स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकडो हातांकडून माणुसकीचे दर्शन 

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सामाजिक दायित्वाच्या भावनेतून येथील विवेकानंद केंद्राचे संचालक व नेत्रतज्ज्ञ डॉ. सुरेश शास्त्री यांनी 'हवे असेल ते घेवून जा...नको असेल ते देऊन जा' असा संदेश देणाऱ्या माणुसकीच्या भिंतीचे नुकतेच लोकार्पण केले. याविषयीचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाली आणि शहरातील शेकडो हातांनी या उपक्रमात भरभरून दान देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

डॉ. सुरेश शास्त्री यांनी कॅम्प रोडवरील टिपरे कॉलनी येथील आपल्या दवाखान्याबाहेर ही माणुसकीची भिंत उभारली आहे. 'शिवभावे जीवसेवा', या श्रद्धेतून कोणताही अनौपचारिक उद्घाटन सोहळा न करता त्यांनी समाजातील वंचितांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे . शिवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांनी या सामाजिक उपक्रमास सुरुवात केली. घराबाहेर असलेल्या जागेवर त्यांनी छोटासा बोर्ड लावून त्या बाजूला एका क्रेट ठेवला आहे.

आपल्या सुस्थितीतील जास्तीच्या वस्तू, गरजूपर्यंत सन्मानाने पोहोचविण्याचे माध्यम म्हणजे ही माणुसकीची भिंत असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मालेगावकरांना केले होते. त्यांच्या या माणुसकीची भिंत उपक्रमाची बातमी 'मटा'त मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील दातृत्व असलेल्यांनी अनेक वापरण्याजोगे कपडे तसेच अन्य काही वस्तू येथे जमा केल्या आहेत.

समाजात आजही माणुसकीची भावना शिल्लक आहे. याचा प्रत्यय आम्ही सुरू केलेल्या माणुसकीची भिंत उपक्रमात येत आहे. 'मटा'ने याची दखल घेतल्याने देणाऱ्यांचा ओघ वाढला असून आम्ही भारावलो आहोत. समाजातील वंचिताना याचा लाभ होईल असा विश्वास आहे. - डॉ. सुरेश शास्त्री, मालेगाव



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४७ कोटींना लावला चुना

$
0
0

जादा व्याज, परतावा देण्याचे आमिष पडले महागात

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : पैशाला पैसा जोडून सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मुळावरच घोटाळेबाज घाव घालीत आहेत. सन २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत घोटाळेबाजांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तब्बल १४७ कोटी रुपयांना चुना लावला. जादा व्याज किंवा कमीत कमी वेळेत परतावा देण्याचे आमिष या गुन्ह्यांच्या मुळाशी दडलेले दिसते. गुंतवणूकदार प्रयत्न करून पाहतात आणि त्यातच घोटाळाबाजांचा फायदा होतो.

गुंतवणूकदारांच्या खिशातील पैसा काढून घेण्यासाठी घोटाळेबाज वेगवेगळ्या शक्कल लढवतात. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असेल तसेच फसवणुकीचा आकडा लाखांच्या घरात असल्यास असे गुन्हे तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले जातात. सन २०१६ मध्ये या शाखेकडे अवघे चार गुन्हे होते. त्यात, उपनगर पोलिस स्टेशनला दाखल असलेला एचबीएन कंपनीचा घोटाळा, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेला समृध्दी जीवन मल्टी स्टेट कंपनीचा घोटाळा, फडणीस ग्रुप, तसेच हाऊस ऑफ इन्व्हस्टेमेंटसचा समावेश होतो. यात चार गुन्ह्यातच गुंतवणूकदारांचे ७१ कोटी ७१ लाख ६३ हजार ८७० रुपये गुंतून पडले. सन २०१७ मध्ये आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण आणखी वाढले. या वर्षात आर्थिक गुन्हे शाखेकडे १३ गुन्हे वर्ग झाले. या गुन्ह्यात संशयित घोटाळेबाजांनी गुंतवणूकदारांना ७५ कोटी २९ लाख १४ हजार ६९ रुपयांना गंडा घातला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक होणे, मालमत्तांचा शोध होऊन ती जप्त होणे, तसेच कोर्टाच्या आदेशाने मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणे, ही मोठी आणि किचकट प्रक्रिया ठरते. यात किती वर्ष खर्ची पडतात, हे सांगता येणे शक्य नसते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी, हेच महत्त्वाचे असल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले. मगर यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका संस्थाचालकास ताब्यात घेतले. या संस्थाचालकाने २७ हजार नोकरी देण्याबाबत जाहिरात दिली होती. अर्ज सादर करताना ३९९ रुपये भरावे लागणार होते. नोकरी मिळेल या अपेक्षेने ५० हजार व्यक्तींनी पैसे भरले असते आणि पुढे काहीच झाले नसते तर हा घोटाळा दोन कोटींच्या घरात पोहचला असता. व्यक्तीनिहाय विचार केला तर ३९९ रुपयांची किंमत फार दिसत नाही. तेच मात्र एकत्रित विचार केला तर हा आकडा मोठा दिसतो. प्रत्येक घोटाळ्याची सुरुवात याच पध्दतीने होते. जादा व्याजाचे आमिष किंवा कमी वेळेत मोबादला देण्याच्या बहाण्याने घोटाळ्यास सुरुवात होते. अशा गुन्ह्याचा तपास करणे हे देखील एक आव्हान असते. तांत्रिक दृष्टिकोनातून पुरावे संकलीत करणे आवश्यक असल्याने तपास कामात वेळ जात असल्याचे पोलिस उपायुक्त मगर यांनी स्पष्ट केले.

वर्ष -२०१६

कंपनी वा गुन्ह्याचे नाव - पोलिस स्टेशन - घोटाळ्याची रक्कम

एचबीएन कंपनी - उपनगर - ५०, ३७,०००

समृद्धी जीवन - मुंबई नाका - ३६, ४०, ६५५

फडणीस ग्रुप ऑफ कंपनी - मुंबईनाका - २८,२५,९९,०००

हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट - गंगापूर - ४२,५८,८७,२१५

वर्ष -२०१७

कंपनी वा गुन्ह्याचे नाव - पोलिस स्टेशन - घोटाळ्याची रक्कम

पॅनकार्ड क्लब - पंचवटी - ४,१५,८२,७६२

अन्नपूर्ण फायनान्स - सातपूर -४,००,०००

डीवाईन इम्पेक्स कंपनी - नाशिकरोड-१,२५,०००००

साई पादुका एक्सपोर्टस् - आडगाव - २२,६७,१५०

सुनंदा कन्सलटंट - सरकारवाडा - ४४,०००००

विश्वकर्मा बँक - सरकारवाडा - २,५६,३५,६१०

हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट - उपनगर - ५,३०, ०००

कार्पोरेशन बँक - अंबड - १,१२,११,७६७

महागायत्री मार्केटिंग - सरकारवाडा - ९,११,८०,०००

बँक फसवणूक - गंगापूर - ५१,४३,८३,७८०

बनावट डॉक्युमेंटस - सरकारवाडा -१,७९,२८,०००

स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर - गंगापूर - ९२,०००००

अॅक्सिस बँक कर्जप्रकरण - सरकारवाडा - २,१६,९५,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये चोरी अन् नेपाळमध्ये हॉटेल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,

चोरटे फारतर स्वत:ची उपजिविका भागविण्यासाठी चोरी करीत असावीत असा सर्वसामान्यांचा समज असतो. परंतु, नाशिक शहरात घरफोड्या करून एका अट्टल चोरट्याने नेपाळमध्ये दोन हॉटेल खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अन्य एक रेस्टॉरंट खरेदी करता यावे, यासाठी तो पुन्हा चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये आला. मात्र, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गणेश भंडारे असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.

चोरी करून धंदे थाटणे असे अनेक चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. रिल लाइफमधील या प्रकाराचा रियल लाइफमध्ये अनुभव येत असतो. असाच प्रकार नाशिकमध्येही घडला. गणेश भंडारे याने नाशिकमध्ये चोरी करून नेपाळमध्ये चक्क दोन हॉटेल सुरू केले. मात्र, अतिहव्यासामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात फसला. नाशिकमध्ये झालेल्या घरफोड्यांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. अटक केल्यानंतर त्याच्याकडून सुमारे १४ लाख रुपये किमतीचे अर्धा किलोहूनही अधिक वजनाचे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

टागोरनगरमधील भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते. ३० ऑक्टोबर २०१६ रोजी ही घटना घडली होती. संशयित गणेश भंडारे यानेच ही घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु, तो येथून पसार झाला. तो नेपाळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक नेपाळमध्ये गेले. परंतु, तो हाती लागला नाही.

संशयित भंडारे नाशिकमध्ये आल्याची खबर गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकच्या पथकाने सीबीएस परिसरामध्ये सापळा रचला. या परिसरात आलेल्या भंडारे याला शिताफीने अटक करण्यात आली. उपनगर हद्दीमध्ये दोन, तर गंगापूर हद्दीमध्ये एक अशा तीन घरफोड्या केल्याची माहिती त्याने तपासात दिली आहे.

साने पॉलिश करून देणाऱ्यालाही अटक

चोरीचे सोने पॉलिश करून देणाऱ्या मुंबईतील दीपक देवरुखकर या संशयितालाही पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून या तीनही घटनातील १३ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे ५४७ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता निरीक्षक आनंदा वाघ यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याची रवानगी कोठडीत झाली आहे.

रिसॉर्ट खरेदीचा प्लॅन फसला

संशयित भंडारे याने नेपाळमधील एका युवतीशी विवाह केला आहे. नेपाळमधील पोखरा येथे त्याने चोरीच्या पैशातून दोन हॉटेल्स खरेदी केले आहेत. त्याला आणखी एक रिसॉर्ट खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळविला. परंतु, तो नाशिकमध्ये आल्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने त्याचा रिसॉर्ट खरेदीचा प्लॅन फसला आहे. गणेश भंडारे हा मूळचा सांगली येथे राहणारा आहे. सांगली येथील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर चोरीचा पहिला गुन्हा दाखल झाला. नाशिकमध्येही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलमार्फत त्याची माहिती नेपाळला कळविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार प्रकरणाचे पडसाद

$
0
0

चिमुकलीवरील घटनेनंतर दोंडाईचा बंद; आरोपीला अटकेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ज्ञानोपासक शिक्षण संस्थतील नूतन माध्यमिक विद्यालयात पाचवर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरनाचे तीव्र पडसाद जनमानसात उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोडाईचा कडकडीत बंद पाळला. दरम्यान, बंदला कोणतेही गालबोट न लागता बंद शांततेत पार पडला.

दोंडाईचा शहरात पहिल्यांदाच दुपारी साडेचार वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यास मिळाला. यावरून घटनेच्या प्रती शहराच्या नागरिकांमध्ये असलेली चीड लक्षात येते. पोलिसांनी तातडीने त्या नराधमास अटक करावी अशीच मागणी दुकानदारांनी केली आहे. दुकाने, भाजीपाला, व्यापारी व अन्य सर्व व्यवहार बंद होते. चीड आणणाऱ्या या निंदनीय घटनेचा निषेधार्थ पाळलेला बंद अभूतपूर्व होता.

दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात बालवाडीत शिकणाऱ्या बालिकेवर अज्ञात नराधमाने दि. ८ फेब्रुवारीला अमानूष अत्याचार केला होता. ही घटना चव्हाट्यावर आणू नये , पोलिसांत तक्रार देऊ नका. यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमकविण्यात आले. परंतु, नातेवाईकांचा प्रयत्नाने जळगावात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. अज्ञात अत्याचारीविरोधात व संस्थाचालक माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख , डॉ. रवींद्र देशमुख, महेंद्र पाटील, प्रतीक महाले, नंदू सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शिक्षक महेंद्र पाटील यास अटक केली असून, त्यास तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांच्या मनात आक्रोश

या घटना नोंद होऊन बारा दिवस उलटूनही अद्याप अन्य संशयित फरार आहेत. या मोकाट आरोपींचा शोध घ्यावा. यासाठी बुधवारी (दि. २१) दोंडाईचा बंद पाळण्यात आला. बालिकेवर अत्याचार प्रकरणाचे पडसाद दोंडाईचासह अन्यत्र पडत असून, बालिकेचे पालक या घटनेने घाबरून गेले आहेत. याचा नागरिकांच्या मनात मोठा आक्रोश असून, यामुळेच दोंडाईचात पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवारी (दि. २०) दोंडाईचात विशाल मूक मोर्चा काढून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंदू हा सर्वात रहस्यमय अवयव

$
0
0

डॉ. महेश करंदीकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेंदू हा शरीरातील इतर सर्व अवयवांपेक्षा अतिशय रहस्यमय अवयव आहे. मेंदूची रचना सारखी असली तरी प्रत्येकाच्या मेंदूचे कार्य वेगळ आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांची संख्या वाढली असून विसरभोळेपणा हा त्यातील एक आजार समोर येत आहे. मेंदू निरोगी नसण्याचे हे लक्षण असून शरीराचा हा भाग निरोगी ठेवण्यासाठी आपण योग्य वेळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेंदू व मज्जारज्जू शल्यविशेषज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी केले.

मेमरी क्लब संस्थेतर्फे 'मानवी मेंदू - रहस्य आणि आरोग्य' या विषयावर डॉ. महेश करंदीकर यांचे शंकराचार्य संकुल येथील नानासाहेब ढोबळे सभागृहात व्याख्यान झाले. मेंदूची रचना ही लहान मेंदू व मोठा मेंदू अशी असते. मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक, निर्णय क्षमता या बाबी तर उजवा भाग हा मन, भावनिक, कला, चिंता या बाबी सांभाळत असतो. या दोन भागांमधील असंतुलन आजारांचे मुख्य कारण ठरत असते. अर्धशिशी हा आजारही या असंतुलनामुळे होत असल्याने दोहोंमधील सुवर्णमध्य साधणे आवश्यक आहे. आजकाल तरुणांमध्ये अस्थिर मनामुळे अनेक मोठमोठे आजार होत आहेत. अस्थिर मनामुळे प्रतिकार करणाऱ्या पेशींवरही परिणाम होत असून कॅन्सरसारखे गंभीर आजारही अगदी सहजतेने बळावत आहेत, असे डॉ. करंदीकर यांनी सांगितले.

आपली छोटछोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होत असेल, शरिरात सगळीकडे दुखणं, कोणीच आपल्यावर प्रेम करत नाही ही भावना, कशातच मन न रमणे, उगाचच थकवा, बैचेनी, उदास वाटत असेल तर हे आजारी मेंदूचे लक्षण आहे. मेंदूला निरोगी बनवण्यासाठी त्याची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. यामध्ये मन शांत करणे, योगा, व्यायाम, चांगला आहार, हासणे, छंदांची जोपासणा, वर्तमानात जगणे अशा गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच उलटं चालणे, डाव्या हाताची कामे उजव्या हाताने व उजव्या हाताची कामे डाव्या हाताने करणे, पेपर उलटा धरून वाचण्याचा प्रयत्न करणे अशा मेमरी गेम्सचाही सुदृढ मेंदूसाठी फायदा होत असल्याने या बाबी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिल्या. रागिणी किणीकर यांनी प्रास्ताविक केले. संजिवनी कुलकर्णी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


..अन् ‘तिची’ झाली बालविवाहातून सुटका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणाच्या हक्काची गरज, बालविवाहाला चाप या बाबी पुढील पिढी सक्षम बनविण्यासाठी आवश्यक असल्या तरी अद्याप समाजातील अनेक घटकांमध्ये याबाबत योग्य जागरुकता नसल्याचे दिसून येते. अशी अनेक उदाहरणे वारंवार समोर येत आहेत. बुधवारीही अशीच घटना उघडकीस आली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी येथील वज्रेश्वरी झोपडपट्टीतील कुटूंब मुलीकडे लक्ष देण्यास कोणी नसल्याचे कारण पुढे करत तिची लग्नगाठ बांधायला निघाले होते. मुलीच्या सजगतेमुळे व 'चाकं शिक्षणाची' या सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे हा डाव हाणून पाडण्यात यश आले असून, मुलीची सुटका करण्यात आली आहे.

सुनीता (नाव बदलले आहे) इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी. वज्रेश्वरी झोपडपट्टीत तिचे तिच्या कुटुंबियांसमवेत राहते. तिचा विवाह बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील मोतीनगरमध्ये कोळपेवाडी येथे राहणाऱ्या मुकेश नारायण शिंगडे या रिक्षाचालकासोबत ठरवण्यात आला होता. 'चाकं शिक्षणाची' या संस्थेच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात दोन वर्षांपूर्वी सुनिता ही शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होती. तिच्याशी चर्चा केली असता सौंदाणे, मालेगाव येथील आश्रमशाळेत भीषण पाणी टंचाईमुळे शाळा अर्धवट सोडून ती नाशिकला आली. तिला पुन्हा शाळेत जाण्यास प्रोत्साहन देत पंचवटी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे तिला शिक्षणाची गोडी निर्माण झाली;Ḥ परंतु आई-Ḥवडील दोघेही दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्याने व पर्यायाने मुलीकडे लक्ष देण्यास घरी कोणी नसल्याने सुनीताचा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे तिच्या आईने सांगितले. परंतु, सुनीताची या विवाहाला मान्यता नव्हती. तिने वेळीच सजगता दाखवत 'चाकं शिक्षणाची' संस्थेच्या फिरत्या शाळेत येऊन सामाजिक कार्यकर्ते हेमंत भामरे यांना भेटून विवाह थांबवण्याची विनंती केली आणि त्यानुसार प्रक्रिया संस्था व पोलिस यंत्रणेकडून सुरू झाला.

\Bअसा रोखला विवाह

\B'चाकं शिक्षणाची' संस्थेचे हेमंत भामरे व शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सुनीताचा विवाह थांबण्यासाठी आखणी केली. बालविवाह रोखण्यासाठी प्रथम नाशिकमधील महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्वरीत पोलीस उपअधिक्षक अरुंधती राणे यांनी अहमदनगर पोलिस अधीक्षक ऑफिसला फॅक्स करण्यात आला. अहमदनगर एसपी ऑफिसने वर पक्षाकडील लोकांना नोटीस देऊन, तसेच प्रत्यक्ष बोलावून लग्न रोखत असल्याचे लेखी लिहून घेतले. त्यामुळे बुधवारी (दि. २१ फेब्रुवारी) होणारा हा बालविवाह रोखण्यात यश आले.

\B

\Bसुनीताचा बालविवाह रोखल्यामुळे ती पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. आमच्या शाळाबाह्य सर्वेक्षणात शाळाबाह्य मुलींचे प्रमाण मोठे आहे व मुली शाळाबाह्य होण्याचे प्रमुख कारण बालविवाह हा आहे. आजही भारतात तेरा दशलक्षांहून अधिक मुलींचे बालविवाह होतात. त्यातील एक मुलगी वाचवण्यात यश आले.

- सचिन जोशी, 'चाकं शिक्षणाची'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी स्ट्रीट’ची धमाल आता नाशिकरोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासून सुटका करून घेण्याची संधी येत्या रविवारी नाशिककरांना 'हॅपी स्ट्रीट' या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्या शाळा, जेलरोड येथे येत्या रविवारी (दि. २५ फेब्रुवारी) सकाळी ७ ते ९.३० या वेळेत नाशिकरोड येथील रहिवाशांची सकाळी हॅपी होणार आहे.

नेहमीच वाहतुकीने गजबजलेले रस्ते आपल्यासाठी खुले होणे, हा विचारच आपल्याला सुखावून जातो. त्यातच या रस्त्यांवर विविध खेळ, उपक्रम, डान्स, गाणी होणार असतील तर त्याची मजाच न्यारी असते. हीच मजा हॅपी स्ट्रीटमधून अनुभवण्यास मिळत असल्याने हा उपक्रम नेहमीच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये कॉलेजरोड व गोविंदनगरमधील हॅपी स्ट्रीटला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता वेळ आहे नाशिकरोड, जेलरोडवासियांना हॅपी करण्याची. येत्या रविवारी ही संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून झुम्बा, स्केटिंग, मेहंदी, पारंपरिक खेळ, योगासने, सायकल राइड, स्केच, टॅटू, वारली पेंटिंग, पेपर आर्ट, रांगोळी, बासरीवादन असे अनेक कलाप्रकारांचे सादरीकरण यावेळी विविध ग्रुप्सतर्फे सादर केल्या जाणार आहेत. तसेच पहिल्या दोन हॅपी स्ट्रीटला धमाल केलेला प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे नाशिकरोडलाही येणार असून त्याला भेटण्याचीही संधीही यावेळी मिळणार आहे.

जिंका सरप्राइज गिफ्ट

यावेळी महाराष्ट्र टाइम्स हॅप्पी स्ट्रीटमध्ये तुम्हाला सरप्राइझ गिफ्ट लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. त्यासाठी 'स्वच्छ सोसायटी- स्वच्छ नाशिक' या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. आपली सोसायटी, अपार्टमेंट स्वच्छ करतानाचा फोटो आणि स्वच्छ झाल्यानंतरच फोटो तुम्हाला सिटिझन रिपोर्टरच्या अॅपवर पाठवायचा आहे. फोटो पाठवताना सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. 'हॅपी स्ट्रीट-स्वच्छ सोसायटी'या मथळ्याखाली फोटो, सोसायटीचे नाव, पदाधिकाऱ्यांचे नाव पाठवायचे आहे. विजेत्या सोसायट्या तसेच हॅपी स्ट्रीटमध्ये भाग्यवंतांना प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे याच्या हस्ते सरप्राइज गिफ्टही मिळू शकते.

इच्छुकांना संधी

हॅपी स्ट्रीटमध्ये कला सादर करण्याची इच्छा असलेल्यांनी आजच ०२५३ - ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी पेपरला पकडले १४ कॉपीबहाद्दर

$
0
0

बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; संवेदनशील केंद्रावर नजर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नाशिक विभागात १४ कॉपीबहाद्दर भरारी पथकांना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यामध्ये ८९ केंद्रांवर सुमारे ७४ हजार परीक्षार्थी पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला सामोरे गेले. नाशिक विभागात चार जिल्ह्यांमधून १ लाख ६८ हजार विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. सोलापूरमध्ये व्हॉट्सअॅपवरून इंग्रजीची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे वृत्त असले तरीही नाशिक विभागात असा कुठलाही प्रकार आढळला नसल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यंदाच्या परीक्षेत पारदर्शकता वाढविण्यावर बोर्डाने भर दिला आहे. यासाठी वर्गामध्ये मर्यादित आसन व्यवस्थेसह संवेदनशील केंद्रांचे स्थलांतर आणि वर्गातच प्रश्नपत्रिकेचे पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने फोडण्याचा नियम आदी बाबींमुळे पहिल्या पेपरला कॉपीबहाद्दरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात बोर्डाला यश मिळाले आहे. विभागात नाशिक जिल्ह्यात भरारी पथकांनी ३ कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली. धुळे जिल्ह्यातून ५, जळगावमधून ६ कॉपीबद्दरांवर कारवाई करण्यात आली. विभागात ही संख्या १४ आहे. विशेष बाब म्हणजे यंदा भरारी पथकांची संख्या वाढूनसुध्दा नंदुरबार या कॉपीबाबत बदनाम जिल्ह्यात पथकांच्या हाती एकही कॉपीबहाद्दर पहिल्या दिवशी लागला नाही.

बारावीच्या पेपरमुळे शहरात सकाळपासून विद्यार्थी व पालकांची लगबग दिसून आली. पाल्याच्या परीक्षेसाठी अनेक पालकांनी नोकरी-व्यवसायातून सुटी काढत पाल्यासोबत परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. वेळेच्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाण्याच्या स्पष्ट सूचना बोर्डाने दिल्या होत्या. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. अनेकांनी खासगी वाहनाने पाल्यांना सोडत तर अनेकांनी रिक्षा आणि बससेवेचा पर्याय निवडत परीक्षा केंद्र गाठले. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी मध्यम असल्याच्या संमिश्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारास्त्र कायम

बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असली तरीही कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारावर ठाम आहेत. शासनाने लेखी आश्वासने देऊनही कनिष्ठा महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रास्त मागण्याही विचारात घेतलेल्या नाहीत. याच्या निषेधार्थ प्राध्यापकांचा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे सचिव प्रा. संजय शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्यांना अस्वच्छतेचे ग्रहण

$
0
0

ठेकेदाराकडे वाहने धुण्याची व्यवस्था नाही; कर्मचाऱ्यांसह रहिवासी हैराण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या घंटागाड्यांना अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराकडून या घंटागाड्या धुण्याची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेरून चकाचक दिसणाऱ्या घंटागाड्या आतून अस्वच्छ असल्याने आरोग्य विभागाने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

नाशिक महापालिकेने घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची अभिनव योजना सुरू केली. यामुळे रस्त्यांवर घाण, कचराचे प्रमाण कमी झाल्याने सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यातच नव्याने महापालिकेने घंटागाड्या खरेदी करून वाढलेल्या परिसरात योग्य कचरा संकलन करण्याची व्यवस्था केली. मात्र नवीन घंटागाड्यांच्या अस्वच्छतेने नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे.

विकसित होत असलेल्या व स्मार्ट सिटीचे नामांकन मिळालेल्या नाशिक महापालिकेने नुकतेच स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवत नाशिककरांना स्वच्छतेचा संदेश दिला होता, असे असतानादेखील उघड्यावर घाण, कचरा टाकला जात असल्याने दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. परंतु, घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्याच अस्वच्छ असल्याने परिसरात जातांना दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात रोजच घंटागाडीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडे जाब विचारणार

अगोदरच घंटागाडी ठेकेदाराकडून गमबूट, मास्क व सुरक्षा साधने व्यवस्थित दिली जात नाहीत. यात आता अस्वच्छ घंटागाड्यांचा त्रासही कर्मचाऱ्यांना सहन करण्याची वेळ येते. अनेकदा कर्मचारी आरोग्य विभागाकडे तक्रारी करत असतात. मात्र याकडे आरोग्य अधिकारी कधी लक्ष देणार, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. काही घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सातपूरच्या सभापती माधूरी बोलकर यांच्याकडेच अस्वच्छ असलेल्या घंटागाड्यांबाबत समस्या मांडल्या. त्यावर सभापती बोलकर यांनी तत्काळ प्रशासनाकडे जाब विचारणार असल्याचे सांगितले. किमान आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा घंटागाडी धुण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

घंटागाडीत काही मिनिटे बसावे

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ काही मिनिटे घंटागाडीत बसून पहावे, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. नागरिकांच्या घरातील घाण, कचरा संकलन करताना अगोदरच अथक अडचणींचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यातच अस्वच्छ असलेल्या घंटागाड्यांमध्ये उभे राहणे जणू शिक्षकाचा असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

गणवेश बदलण्यासाठी जागाच नाही

महापालिकेच्या सातपूर विभागात क्लब हाऊसवर घंटागाड्या लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील अनेक भागातील कर्मचारी रोज या क्लब हाऊसवर येत घंटागाडी नेत असतात. परंतु, या कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी गणवेश बदलण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने त्यांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. ठेकेदाराने वर्षभरापासून दोन शेड क्लब हाऊसवर उभारले आहेत. परंतु, ते आजही बंद स्थितीत पडून असलेले पहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीकरांना मिळाला दोन महिन्यांनंतर ‘आधार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आधार कार्ड ही देशातील नागरिकांची महत्त्वाची ओळख झाली असून, देवळालीतील शालेय व कॉलेजियन विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा यांसारख्या कामांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रं. चारच्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याबाबत या वॉर्डच्या नगरसेविका आशा गोडसे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार देवळालीत आधार कार्ड नोंदणी शिबिर सुरू केले आहे.

येथील गुरुद्वारा रोडवर असणाऱ्या कॅन्टोन्मेंट संयुक्त प्राथमिक संकुलात बुधवार (दि. २१) पासून सकाळी ११ ते ५ या वेळेपर्यंत आधार नोंदणी करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या ही बाब नजरेस आणून देऊनदेखील त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोडसे व बोर्डाच्या नगरसेविका आशा गोडसे यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयातून एक आधार नोंदणी मशिन उपलब्ध करून दिले आहे. देवळालीत ५० हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी हे आधार केंद्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने सुरू केले असून, शालेय प्रवेश, वाहन परवाना व इतर आवश्यक परवान्यांसाठी आधार अनिवार्य असल्याने लोकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांसाठी काही मशिन उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र ते न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images