Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टोमॅटोचे भाव घसरले; उत्पादक चिंताग्रस्त

$
0
0

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-इगतपुरी तालुक्यात टोमॅटो, वांगी या उन्हाळी पिकांना बाजारात भाव नाही तसेच वाहतूक खर्च व मजूरीलादेखील ही पिके परवडत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग ही पिके उद्ध्वस्त करू लागला आहे. या प्रकाराची सरकारने दखल घ्यावी, महसूल व कृषि विभागाने संयुक्तपणे या पिकांचे पंचनामे करावे तसेच उत्पादन खर्चाच्या तिप्पट नुकसान भरपाई द्यावी, या मागण्या परिसरातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यात उन्हाळी पिके म्हणून भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यासाठी सोसायटी कर्ज, खतांचा खर्च, ठिबक खर्च, विजेचे बिल, मजुरी, औषधांचा खर्च यामुळे शेतकऱ्याला इतका खर्च करूनही बाजार मार्केटमध्ये शेतमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नैराश्यातून हे शेतकरी भाजीपाला फेकणे, शेतातच भाजीपाला उद्ध्वस्त करणे हे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तरी, महसूल व कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे भाजीपाला पिकाचे, गडगडलेल्या भावाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी हा सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, उन्हाळी पिकांना, भाजीपाला पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. या संदर्भात आज, (दि. ९) राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती पांडुरंग शिंदे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावी सीसीटीव्हीची ‘नजर’

$
0
0

मालेगावी सीसीटीव्हीची 'नजर'

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने वीस ठिकाणी सीसीटीव्ही लागणे हे एक महत्वाचे पाऊल असून, या तंत्रज्ञाच्या सहाय्याने शहरातील गुन्हेगारी वृत्तींना आळा बसण्यास मदत होईल, असे मत अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केले.

मालेगाव शहरातील २० महत्त्वाच्या ठिकाणी येथील स्वीकृत नगरसेवक गिरीश बोरसे यांनी आपल्या नगरसेवक निधीतून सीसीटीव्ही बसवले असून, त्याच्या उद्घाटनप्रसंगी पोद्दार बोलत होते. या वेळी माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, अॅड. शिवाजी देवरे, ओम गगराणी, शरद दुसाने, हरिष मारू, रामदास बोरसे, दिलीप सोमवंशी आदी उपस्थित होते.

या महत्त्वाच्या जागांमध्ये शहरातील छावणी पोलिस ठाणे हद्दीत ४, शहर पोलिस ठाणे हद्दीत ४ तर किल्ला पोलिस ठाणे हद्दीत १२ असे एकूण २० सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. या तिन्ही पोलिस ठाण्यात याचा नियंत्रण कक्ष असणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यालगत आता सीसीटीव्हीची 'नजर' असल्याने गुन्हेगारी व संशयास्पद स्वरूपाच्या कारवाईवर पोलिसांना लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. शहरातील शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, मोसमपूल, सरदार चौक, जामा मशीद, राम सेतू, उर्दू लायब्ररी, पाच कंदील, टिळक रोड, शास्त्री चौक, निशांत चौक, अल्लमा पूल, शिवशक्ती चौक, भुईकोट किल्ला परिसर या परिसरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा पाणीस्त्रोत पिण्यास अयोग्य

$
0
0

सप्तशृंग गडावरील स्थिती

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता सर्वेक्षणातील माहिती

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी गडावर १६ पाण्याचे स्त्रोत पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पिण्याच्या पाणी योजना स्वच्छता सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. पण, ग्रामपंचायतीने या स्त्रोतातून पाण्याचा वापर केला जात नाही. यातील बहुतांश स्त्रोत कोरडे असून, हा अहवाल अगोदरचा असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे आज गडावर टँकरने पाणी पुरवले जात असल्याची माहिती दिली.

तीन हजार लोकसंख्या असलेल्या गडावर स्वतंत्र ग्रामपंचायत असून, त्यासाठी पाणीपुरवठा हा गडाच्या पायथ्याशी असलेल्या भवानी पाझर तलावातून होतो. याच धरणाचे काम सुरू असल्यामुळे येथील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला दोन टँकरने ट्रस्टव्दारे पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर ग्रामपंचायत हे पाणी फिल्टर करून आठवड्यातून एकदा नळाव्दारे पुरवठा केला जातो. दुसरीकडे भाविकांसाठी असलेल्या ट्रस्टच्या धर्मशाळेसाठी पाणी मात्र रोज टँकरने नांदुरी येथून येते. त्यामुळे टँकरचेच पाणी गाव व भाविकांना सध्या मिळत आहे. सप्तशृंगी गडावर रोज साडेसात हजार भाविक येतात, तर वर्षातून ४० लाख भाविक दर्शन घेतात. त्यामुळे येथे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाचेही प्रयत्न सुरू आहेत.

कुंड व बोअरवेलही स्त्रोत

सप्तशृंगी गडावर गणेश कुंड, गंगाजमुना कुंड, पंजाबी कुंड, शिवालय तलाव, काली कुंड, सूर्या कुंड व देवनळी कुंड असे मोठ मोठे कुंड आहेत. त्याचप्रमाणे हातपंप, बोअरवेल आहे. त्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागने तपासले होते. त्यात गावातील पाणीपुरवठा ७० टक्के तीव्र व मध्यम जोखीमपूर्ण असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीला तीव्र जोखीम रेडकार्ड दिले होते. त्यात प्रतिबंधात्मक उपाय करून एक महिन्याच्या आत पाणीपुरवठ्याचे रुपांतर रेडकार्डवरून ग्रीन कार्डमध्ये करावे, असे आदेशही दिले. त्यानंतर ग्रामपंचायतीने उपाय केल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

जिल्हाधिकारी यांनी पाणी पिण्यायोग्य नाही हा अहवाल आल्यानंतर त्याची दखल घेतली होती. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

पिण्यास अयोग्य असल्याच्या स्त्रोतातून पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात नाही. यातील बहुतांश स्त्रोत कोरडे आहेत. धरणाचे काम सुरू असल्यामुळे टँकरव्दारे पाणी येते. गावात आरओही बसवले आहे. त्याचप्रमाणे पाइपलाइनही बदलली आहे. पुढील वर्षात पाणीप्रश्न सुटेल.

- राजेश गवळी, उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास उटगी यांचे ओझर येथे व्याख्यान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीतील महात्मा जोतीबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे आज, सोमवारी सायंकाळी ६ वाजता किनो थिएटर, ओझर टाऊनशिप, ओझर येथे 'कामगारांची आर्थिक सुरक्षा ' या विषयावर बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी संचालक आणि अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वास उटगी यांचे व्याख्यान होणार आहे.

नोटाबंदीचा बँकिंग क्षेत्रावरील परिणाम, जीएसटी, प्राप्तीकर आणि एनपीए यांचा परस्पर संबंध, बँकेतील गुंतवणुकीवरील सरकारच्या सुरक्षेबाबत बदलते धोरण याबाबत ते मार्गदर्शन करतील. पीएसयू कंपन्यांमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील निर्गुंतवणुकीमुळे कामगारांमध्ये वाढत्या संभ्रमाबाबतही ते बोलणार आहेत. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचे सत्र होऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. या व्याख्यानास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अंबादास शेळके आणि सरचिटणीस जयंत भांबारे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे, बसला विद्यार्थ्यांची गर्दी

$
0
0

जेलरोड : जेईई परीक्षेला विविध ठिकाणांहून येण्यासाठी विद्यार्थ्यांनी एसटी, टॅक्सी व खासगी वाहनांबरोबरच रेल्वेचाही आधार घेतला. मुंबईला जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस सकाळी आठला, नऊला जनशताब्दी तर गोदावरी एक्सप्रेस सकाळी साडेनऊला नाशिकरोडला आली तेव्हा अनेक बोगींमध्ये हे विद्यार्थी होते. सायंकाळी पाचला परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या पवन, कामायनी, पुणे-भुसावळ, सेवाग्राम, गोदावरी या गाड्यांमध्ये गर्दी केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांमुळे रिक्षा चालकांचाही चांगला व्यवसाय झाला. रसवंतीगृहे, फळविक्रेते, खाद्यपदार्थी विक्रेते यांचाही धंदा जोरात झाला. रेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या नाशिकरोड एसटी स्थानकातून काही विद्यार्थ्यांनी बसचा आधार घरी जाण्यासाठी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदुपारी युवकाची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाकळीरोड परिसरात पादचारी युवकाला दुचाकीवरील चोरट्यांनी अडवून रोकडसह मोबाइल असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास टाकळीरोडवर घडली. विनोदकुमार हरिलाल प्रसाद (वय १९, रा. चांगलेमळा, क्रांतीनगर, गणेश चौक, मखमलाबादरोड) या युवकाच्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि.७) विनोदकुमार टाकळीरोडने मोबाइलवर बोलत पायी चालला होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून (एमएच १५ एफएक्स ९३८४) दोघे संशयित आले. त्यांनी विनोदकुमार यास अडवून त्याच्या हातातील १४ हजार रुपयांचा मोबाइल आणि सहा हजार रुपयांची रोकड असा, २० हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. विनोदकुमारने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

मोबाइल स्नॅचिंग

रस्त्याने पायी जाताना मोबाइलवर बोलणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. सीबीएस रस्त्यावर शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंकज अंबादास पवार (रा. मांदाने, पो. भातोंडे ता. दिंडोरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. ६) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पवार जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील ठक्कर बाजार बसस्थानकाकडून जुन्या सीबीएसकडे रस्त्याने पायी चालले होते. या दरम्यान ते मोबाइल फोनवरून आपल्या भावाशी बोलत होते. दरम्यान, त्र्यंबकनाका सिग्नलकडून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पवार यांच्या हातातील १९ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

दुचाकीची चोरी

भगूर येथील सावरकर वाड्यासमोरील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून ८५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी हातोहात लांबवली. वैभव सुरेश वळवी (रा. सुशीला अपार्टमेंट, सावरकर वाड्यासमोर, भगूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वळवी राहतात त्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी (दि.६) त्यांनी दुचाकी (एमएच ३९ एए ५९१०) पार्क केली होती. याच दिवशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राहुल सुरेश भंडारी (रा. कविता बंगला, सप्तशृंगी कॉलनी, जुना गंगापूरनाका) यांची २५ हजार रुपयांची मोपेड (एमएच १५ सीएच ७६८६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना गत वर्षी १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारात पार्क केलेल्या दुचाकीवर हात साफ केला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

युवतीचा विनयभंग

मोबाइलवरून फोन करून युवतीला शालिमार चौकात भेटण्यासाठी बोलावून बळजबरीने तिचा हात धरून दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित गणेश राजाराम खैरनार (वय ३३, रा. जाई रो हाऊस, कोणार्कनगर) याने पीडितेला मोबाइलवरून फोन करून शालिमार चौकात बोलाविले. त्याठिकाणी त्याने पीडितेचा हात धरून बळजबरीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करीत लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रस्ट कार्यकारिणी बरखास्तीचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराच्या आरोपांमुळे काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार ट्रस्टच्या विद्यमान कार्यकारिणी बरखास्तीचा ठराव रविवारी दुपारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने सर्वानुमते संमत करण्यात आला.

बुद्धविहार ट्रस्टवर विद्यमान कार्यकारिणीने नवीन सभासद नोंदणीवर आजवर घातलेली बंदीही उठवण्यात आली. मात्र, ट्स्टच्या विद्यमान अध्यक्षांनी ही सभाच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. येथील देवी चौकात ऐतिहासिक बुद्धविहार आहे. त्याची व्यवस्था नोंदणीकृत बुद्धविहार पब्लिक ट्रस्टर्फे बघितली जाते. परंतु, या ट्रस्टच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कामकाजावर मनमानीबरोबरच भ्रष्टाचाराचेही आरोप झाले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून बुद्धविहार ट्रस्टचा कारभार चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी बुद्धविहार बचाव कृती समितीची स्थापना झाली होती. या समितीत विद्यमान कार्यकारिणीतील विलास गांगुर्डे आणि माणिक साळवे या दोघा ट्र्स्टींचाही समावेश होता. या सभेस विश्वस्त विलास गांगुर्डे, शशिकांत उन्हवणे, प्रकाश बागुल,चावदास भालेराव, पी. के. गांगुर्डे, अमोल घोडे, रविकांत भालेराव, पुंडलिक बर्वे, भीमचंद चंद्रमोरे, इंद्रजित भालेराव, उन्मेश थोरात, मानसी जाधव, स्वाती भुजबळ आदींसह बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

---

सर्व ट्रस्टींच्या विचारविनिमय व परवानगीशिवाय बुद्धविहार ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण बोलावण्याचा अधिकार इतरांना नाही. त्यामुळे रविवारची सभाच बेकायदेशीर आहे.

-भास्कर कटारे, अध्यक्ष, बुद्धविहार पब्लिक ट्रस्ट

०००

नंदिनी नदीच्या नावासाठी साकडे

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीचे रूप गेल्या अनेक वर्षांत बदलून गेले असून, या नदीचे नावसुद्धा नासर्डी झाले आहे. नंदिनीची स्वच्छता करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत असून, सरकारदप्तरी आता नासर्डी हे नाव न वापरता नंदिनी हेच नाव वापरण्यात यावे, असे साकडे गोदा संवर्धन मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले आहे.

निवेदन देताना जय बजरंग युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, निशिकांत पगारे, पंकज भिंगारे, नितीन कोलेकर, विनोद पाटील, विपुल आपटे, अनुजा कुलकर्णी, सुजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शहरातून वाहणारी नासर्डी नसून, नंदिनीच आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्याचा अद्यापही कोठेही बदल झाल्याचे दिसत नाही. सरकारी कागदोपत्री आजही नासर्डी हा उल्लेख करण्यात येत आहे. नंदिनी उल्लेख करून त्याला अधिकृतपणे प्रेक्षणीय स्थळ म्हणून उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदिनी हे नाव सरकारच्या गॅझेटमध्येच समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नंदिनी नदीलगत आजही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत असून, नदीत प्लास्टिक व कचरा टाकला जात आहे. वारंवार संस्थांकडून नदीची सफाई होत असली, तरी असा कचरा किंवा प्लास्टिक नदीत येणारच नाही यासाठी सरकारी यंत्रणेने पुढाकार घेऊन कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सरकारी दस्ताऐेवजात किंवा कोठेही फलक लावतांना तो नासर्डी असा न लावता नंदीनी हाच उल्लेख झाला पाहिजे यासाठी पुढाकार घेण्यात यावा व ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचावेोवी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नासर्डी हा शब्दच नाशिककरांबरोबरच बाहेरून येणार्या पर्यटकांच्या तोंडून हद्दपार होवून नंदीनी हेच नाव आले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली असून यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेपूर्वीच ‘परीक्षा’…

$
0
0

\Bपरीक्षेपूर्वीच 'परीक्षा'…

\Bदेशभरातील नामांकित संस्थांमध्ये इंजिनीअरिंग, फार्मसीसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेली जेईई मेन्स परीक्षा नाशिकमध्ये विविध केंद्रांवर रविवारी पार पडली. यावेळी परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची कसून तपासणी करण्यात आली. हातातील कड्यासह, कानातील व गळ्यातील आभूषणे अन् कमरेचा पट्टाही परीक्षार्थींना परीक्षा केंद्राबाहेर ठेवावा लागला. त्यामुळे त्यांना 'परीक्षेपूर्वीच परीक्षेचा सामना' करावा लागला. परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षार्थींना सोडण्यासाठी आलेल्या पालकांचीही मोठी गर्दी दिसून आली.

१) परीक्षा केंद्राबाहेर पोहोचल्यानंतर परीक्षार्थींनी तपासणीसाठी लावलेली रांग.

२) परीक्षार्थींची परीक्षा केंद्राबाहेर धातूशोधक यंत्राद्वारे सुरू असलेली तपासणी.

३) धातूशोधक यंत्राद्वारे तपासणी झाल्यानंतर हातातील कडे काढण्याच्या सूचना करताना पर्यवेक्षक.

४) परीक्षार्थीच्या कमरेच्या पट्ट्याची तपासणी करताना पर्यवेक्षक.

५) विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना योग्य सूचना देताना पर्यवेक्षक.

६) पर्यवेक्षकांच्या सूचनेनुसार कानातील आभूषणे काढताना विद्यार्थिनी.

७) परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी गळ्यातील साखळी काढताना परीक्षार्थी.

८) विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर केंद्राबाहेर पेपर सुटण्याची वाट पाहत बसलेले पालक.

९) पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर आल्यानंतर पालकांशी संवाद साधताना परीक्षार्थी.

१०) परीक्षा संपल्यानंतर केंद्राबाहेर पडताना, तसेच केंद्राबाहेर झालेली परीक्षार्थी व पालकांची गर्दी.

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैचारिक मंथनातूनच मूलतत्त्ववाद घटू शकेल

$
0
0

तिसरे मार्क्स गांधी आंबेडकर संमेलन

डॉ. गोपाळ गुरू यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संघर्षातून नव्हे तर वैचारिक मंथनातूनच मूलतत्ववादाची धार कमी होईल. संघर्ष करून हाती काहीही लागत नाही, उलट वैचारिक धार बोथट होते त्यामुळे विचारमंथन हाच उपाय आहे, असे प्रतिपादन डॉ. गोपाळ गुरू यांनी केले.

विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित विचारमंथन कार्यक्रमात डॉ. गोपाळ गुरू बोलत होते. 'विद्ममान मूलतत्त्ववादाचे स्वरूप व परिणाम' असा त्यांचा विषय होता. डॉ. गोपाळ गुरु यावेळी म्हणाले की, कुठल्याही ग्रंथातील विचार हे अंतिम सत्य मानणे,ते सर्वतोपरी उपयोगी आहे हा आग्रह ठेवणे,हे मूलतत्ववादाकडे वाटचाल करते. काळानुसार बदल करणे हे सजगपणाचे लक्षण आहे. नव्या विचारांची जोपासना म्हणजे मूलतत्ववादाला बगल देणे होय.

याचदरम्यान आयोजित व्याख्यानात 'धार्मिक मूलतत्त्ववादाची चिकित्सा' या विषयावर अन्वर राजन म्हणाले की, विषमतेला तात्त्विक आधार देण्याचे काम धर्माने केले असले तरी धर्मातील सर्व गोष्टी पूर्णपणे योग्य वा पूर्णपणे टाकाऊही नाही. रामनाम घेणारा कबीर धर्म पुस्तकात नाही असे सांगतो. धर्म ईश्वरप्रेमात असून ईश्वरप्रेम म्हणजे माणसावरील प्रेम असे तो मानतो. धर्माची चिकित्सा ही राजकीय भावनेतूनही धर्मविरोधासाठीही होते. समानतेच्या तत्वासाठी चिकित्सा व्हावी असेही अन्वर म्हणाले.

महिलेला दोषी ठरविणे सुरूच

तिसऱ्या सत्रात 'मूलतत्त्ववादाच्या बळी महिला' या विषयावर शशिकला राय म्हणाल्या की, मुलींचे लवकर लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करणारा समाज विधवा विवाहासाठी पुढाकार घेत नाही. हा ढोंगीपणा आहे. महिलांना कमी लेखणे, प्रत्येक गोष्टीत दोषी धरणे हे पुरुषसत्ताक संस्कृतीचे लक्षण आहे. लक्ष्मणरेषेचा धोका न ओळखणे ही सितेची चूक असेल तर सोन्याचे हरीण मानणे हीदेखील चूकच होती पण महिलेला दोषी ठरविणे हे आजही चालू आहे, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरांमुळे महिला मोठ्या पदांची संधी

$
0
0

महापौर रंजना भानसीचे सामाजिक समता सप्ताहात प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला सुधारणांबाबत केलेल्या कायद्यामुळे देशात आज महिला वेगवेगळ्या पदांवर विराजमान झाल्या आहेत, असे प्रतिपादन नाशिकच्या महापौर रंजना भानसी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहात त्या बोलत होत्या. १४ एप्रिल पर्यंत होणाऱ्या या सप्ताहाचे रविवार मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी महापौर भानसी बोलत होत्या. मंचावर आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती माजी अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल, सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते. यावेळी महापौर भानसी म्हणाल्या की, डॉ. आंबेडकर यांनी महिलांसाठी तयार केलेल्या सामाजिक कायदे व राज्यघटनातील तरतुदीमुळे मी आज महापौर पदावर विराजमान आहे. त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य केले. महिलांना विविध क्षेत्रात विकासाची संधी प्राप्त झाली, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचण्यास मदत होईल, असे आमदार बाळासाहेब सानप यांनी

सांगितले. राजेंद्र कलाल यांनी सप्ताह आयोजनाविषयी माहिती दिली. सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात आमदार सानप यांच्या हस्ते 'महामानवास अभिवादन' या एप्रिल २०१८ च्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन झाले. या सामाजिक समता सप्ताहाचे संयोजन व आयोजन विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, कार्यालय अधीक्षक अजय गांगुर्डे, एस. बी. त्रिभुवन, सुभाष फड, अनिल तिडमे, शंतनू सावकार, व्ही. जी. भावसार, नीता नागरे, संदीप वळवी तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी केले.

सामाजिक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम

सोमवार (दि. ९) : शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा, कॉलेजेस व वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा

मंगळवार (दि. १०) : आडगाव येथील शासकीय वसतिगृह परिसरात व सामाजिक न्याय भवन परिसरात रक्तदान शिबिर

बुधवार (दि. ११) : सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्जवाटप योजनांची माहिती

गुरुवार (दि. १२) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान

शुक्रवार (दि. १३) : सामाजिक प्रबोधनात्मक व्याख्यान

शनिवार (दि. १४) : सामाजिक न्याय भवन परिसरात समारोप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या सुधीशची अष्टपैलू कामगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडिया डेफ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने लुधियाना येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या नाशिकच्या सुधीश नायर याने अष्टपैलू कामिगरी करीत सामनावीरचा पुरस्कार पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चिनाब इलेव्हनने स्पर्धा जिंकून एक लाख रुपयाचे बक्षीस पटकावले.

अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशचा अमन रिजवी याने सर्वोत्तम खेळाडू म्हणून कार बक्षीस मिळवली. या स्पर्धेतील विजेत्यांना लवली ग्रुपचे चेअरमन रमेश मित्तल, पंजाबच्या इ्न्कमटॅक्स विभागाचे मुख्य आयुक्त विनयकुमार, उपायुक्त लक्ष गुप्ता यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या लीगमध्ये एकूण १५ सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेत १४४ खेळाडूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या नाशिकच्या सुधीश नायर याने चार षटकांत ५ विकेट घेतल्या. फलंदाजीतही चमक दाखवत १५ चेंडूत २६ धावा केल्या. त्यात ३ षटकार व २ चौकारांचा समावेश होता. सुधीश हा नाशिकरोडचा रहिवासी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमय रस्त्यापासून सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोडच्या इंगळेनगर ते उपनगर नाका मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांची खड्डेमय रस्त्यापासून सुटका झाली असून, 'मटा'ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकरोडहून जेलरोडला येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे कॅनॉलरोड. उपनगर नाक्याहून सुरू होणारा हा रस्ता इंगळेनगर चौकात येऊन जेलरोडला मिळतो. कॅनॉलरोडमुळे बिटको किंवा टाकळीरोडने येण्याचा त्रास, तसेच वेळ वाचतो. त्यामुळे कामगार, विद्यार्थी, नागरिक कॅनॉलरोडचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत. मात्र, काही काळापासून हा रस्ता खराब झालेला होता. झोपडपट्टीवासीयांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्याने हा रस्ता जागोजागी उखडला होता. त्यामुळे रस्त्याने वाहने चालविणे अवघड झाले होते. त्यातच पथदीपही अनेक ठिकाणी बंद होते. झोपडपट्टीधारकांची मुले, जनावरे, रात्री-अपरात्री रस्त्यावर येऊन अपघात होत होते, वादावादी होत होती. आता रस्ता नव्याने झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

काम रेंगाळले होते

कॅनॉलरोड खोदून वर्ष झाले तरी येथील काम सुरू होत नव्हते. खडी व डबर येऊन पडली होती. अखेर नागरिकांच्या रेट्यामुळे अन् 'मटा'ने केलेल्या पाठपुराव्यामुळे रस्ता रुंदीकरण होऊन कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात उपनगर नाक्यापासून आम्रपाली झोपडपट्टीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, पुढे शेलार डेअरीपासून इंगळेनगर चौकापर्यंत रस्ता दुरुस्तच झाला नव्हता. अपघात वाढून वाहनांचेही नुकसान होत होते. या समस्या मांडल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ व त्रास वाचल्याने त्यांनी समाधन व्यक्त केले आहे.

---

देवळालीगावात रस्ताकामास प्रारंभ

जेलरोड : नाशिकरोडच्या प्रभाग २२ मधील देवळालीगाव बाजारतळ ते रोकडोबावाडी रस्त्याचे काम सहा ते आठ महिन्यांपासून रखडले होते. ते आता सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बंद असलेल्या पथदीपांचेही काम लवकरच केले जाईल, अशी माहिती नगरसेविका सरोज आहिरे यांनी दिली. हे काम मार्गी लागावे यासाठी 'मटा'ने पाठपुरावा केला होता. देवळालीगावातून रोकडोबावाडी, जय भवानीरोड, वडनेर येथे जाण्यासाठी हा रस्ता जवळचा आहे. मात्र, सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. काही दिवसांपूर्वी खडी पसरवून ठेवल्याने वाहने पंक्चर होत होती. आता आठवडाभरापासून रस्ता रूंद करण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच डांबरीकरणही केले जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या रस्त्याचे काम करताना जेसीबीमुळे भूमिगत वायरी तुटल्याने पथदीप बंद पडले आहेत. त्यामुळे लूटमार होत असल्याने सायंकाळी महिलावर्ग येथून जाणे टाळत आहे. त्यामुळे येथील बंद पथदीपदेखील त्वरित सुरू करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोगो : म. टा. इम्पॅक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शहर परिसर व पुणे येथून दुचाकी चोरून कमी पैशात विक्री करणाऱ्या बुलेट गँगला अटक करण्यात यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशियतांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिस निरीक्षक अशोक करपे व पथकातील कर्मचारी शहरात गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. काही व्यक्ती मालेगाव शहरात महागड्या मोटारसायकल कमी किमतीत विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहरातील मिल्लत चौक परिसरात सापळा रचून संशयित सैय्यद शोएब उर्फ नवाब सैय्यद सलीम (रा. कुसुंबा रोड, मालेगाव) सैय्यद उस्मान सैय्यद युसूफ (रा. सरदारनगर, मालेगाव) यांना दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नंबर प्लेट नसलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यांनी ही मोटारसायकल त्यांचा साथीदार इमान खान लुकमान खान उर्फ लुक्यो, (रा. राजानगर चुनाभट्टी, मालेगाव) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. तसेच, त्यांचा आणखी एक साथीदार शेख मेहमूद शेख मेहबूब उर्फ याकूब (रा. दानिश पार्क, देवीचा मळा, मालेगाव) यास देवीचा मळा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. या संशयितांनी मालेगाव शहर तसेच, पुणे जिल्ह्यातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे मालेगाव शहर व पुणे शहरातील मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात मे रोजी होणार मनपाचा लोकशाहीदिन

$
0
0

जेलरोड : नाशिक महापालिकेचा लोकशाहीदिन सात मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत महापालिका मुख्यालयात होणार आहे. मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या बांधकाम, पाणीपुरवठा, पथदीप, स्वच्छता, गटारी, अतिक्रमण आदी तक्रारींच्या अनुषंगाने लोकशाहीदिनात मार्गदर्शन केले जाईल. नागरिकांची तक्रार थेट लोकशाहीदिनी स्वीकारली जाणार नाही. नागरिकांनी विहीत नमुन्यात दोन प्रतित आपली तक्रार २० एप्रिलपर्यंत महापालिका मुख्यालयात सादर करावी.

पोलिस वारसांना संधी घ्या

जेलरोड : नशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीत अनुकंप तत्वावर पोलिसांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राणे प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयुक्तांना निवेदनद्वारे करण्यात आली. पोलिस आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रसाद जमखिंडीकर, जिल्हा संपर्क प्रमुख विनोद वाघमारे, शहराध्यक्ष रफिक शेख, राज शेख आदी उपस्थित होते.

शाहीर डुंबरेंना पुरस्कार

जेलरोड : सिन्नर येथील शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. साईबाबा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ (जानोरी) आणि अखिल भारतीय माळी युवा मंच (नाशिक) या संस्थेतर्फे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार डुंबरे यांना बुधवारी (दि. ११) सायंकाळी पाच वाजता जानोरी (ता. दिंडोरी) येथे प्रदान केला जाईल.

मोफत आरोग्य तपासणी

पंचवटी : गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि भारतीय ब्राह्मण उत्कर्ष संस्थेतर्फे ३८१ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्रीनारायण तिवारी, नगरसेवक गुरुमित बग्गा, विमल पाटील, नटवरलाल बोरा, संस्थेचे अध्यक्ष उमापती ओझा आदी उपस्थित होते. शिबिरात अस्थिरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, शुगर तपासणी, ईसीजी, रक्तगट आदी तपासण्या समृद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केल्या.

ग्रीन जिमचे लोकार्पण

सातपूर : प्रभाग १० मधील अशोकनगर, शिंदेमळा परिसरात महिलांसाठी आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून ग्रीन जिम उभारण्यात आली आहे. या ग्रीन जिमचा लोकार्पण सोहळा आमदार हिरे यांच्या उपस्थित झाला. याप्रसंगी सभापती माधुरी बोलकर, नगरसेवक सुदाम नागरे, नगरसेविका पल्लवी पाटील, महेश हिरे, गणेश बोलकर व परिसरातील महिला, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा सेल्फी


पालिकेच्या जागेत बंगले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

आपल्या जागेवरच अनधिकृते दोन बंगले आणि दुकाने उभारल्याचे महापालिकेला नवीन आयुक्त तुकाराम मुंढे येईपर्यंत कित्येक वर्षे माहीत नसल्याचे समोर आले आहे. नांदूरनाका येथे असलेले दोन अनधिकृत बंगले आणि नऊ दुकाने महापालिकेने अखेर जमीनदोस्त केली.

जेलरोडचा पूल ओलांडल्यानंतर नांदूरगाव लागते. येथील शाळेसमोर रस्त्याच्या कडेला दोन बंगले अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. तसेच शेजारीच नऊ दुकानेही सुरू झाली होती. ही जागा महापालिकेची आहे. परंतु, महापालिकेलाच अतिक्रमणाची खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. तक्रारी करुनही महापालिकेने संरक्षणच दिले होते. आयुक्त तुकाराम मुंढेंनी सूत्रे स्वीकारताच चक्रे हलली आणि ही अतिक्रमणे जमीनदोस्त झाली. उपायुक्त आर. एस. बहिरम यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी दिलीप तांदळे, आर. आर. गोसावी, नगररचनाचे अभियंता संतोष जोपुळे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटवली.

पुलाजवळ अतिक्रमणे

नागरिकांच्या म्हणण्यानुसार जेलरोड पुलाजवळ अतिक्रमणे झाली आहेत. दोन्ही बाजूला वखारी, व्यावसायिक गाळे झाले आहेत. ते परवानगी न घेताच बांधण्यात आल्याचा आरोप आहे. नांदूरनाक्याची अतिक्रमणे हटवली त्यापासून दीडशे मीटरवर जेलरोडच्या पुलाजवळील अतिक्रमणे आहेत. जेलरोड ते बिटको दरम्यानही अतिक्रमणे वाढली आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूलतत्ववाद हे मनुस्मृतीचे दुसरे रुप

$
0
0

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात मूलतत्ववाद नव्या जोमाने प्रवेश करत असून हे मनुस्मृतीचे दुसरे रुप आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभारात मूलतत्ववादाने धुमाकूळ घातला असून त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर संघटीत लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय यांच्यावतीने रविवारी तिसऱ्या मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आपण प्रत्येक कामासाठी वेळ घालवतो; परंतु विचारांसाठी आपल्याकडे वेळ नसतो. आपण असुरक्षित, संवेदनशील काळात मार्क्स, गांधी, आंबेडकर याचे विचारसंमेलन का घ्यावे लागते? असा प्रश्न समारोपाच्या सत्रात कांबळे यांनी केला. गेल्या ७० वर्षांपासून या तीन महानायकांना एकमेकांचे शत्रू ठरविले गेले आहे. असे असते तर बाबासाहेबांनी मार्क्सची तुलना बुद्धांसोबत केली नसती. ज्यावेळी अस्पृश्यांसाठी गांधीजींनी राष्ट्रीय शाळा बांधल्या याचवेळी बाबासाहेब राष्ट्रीय पातळीवर वसतिगृह काढत होते. मूलतत्त्ववाद हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवतो. प्रश्न हे एकटेच संपत नसतात असेही, यावेळी ते म्हणाले.

मागील चुकांची फळे आपण भोगतो आहे. मार्क्सवाद्यांनी देशी विचार स्वीकारले नाही. जेव्हा ते स्वीकारले तेव्हा वेळ निघून गेली होती. बुद्ध आणि मार्क्स हे एका विचांरांचे आहे हे बाबासाहेबांनीच सांगितले आहे. असे का घडते आहे याचा आज भूतकाळात जाऊन विचार करतो आहे. राज्यघटना डोक्यावर घेऊन मिरवणूक काढतो. परंपरेच्या घोषणा देतो. परंतु, शंभर वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या त्या आजही घडता आहेत. हे विसरतो आहे. मूलतत्ववादाला एकट्याने टक्कर देण्याचे काम नाही त्याला संघटित टक्कर देण्याची गरज आहे, असे कांबळे यांनी सांगितले.

वर्चस्ववाद म्हणजेच मूलतत्त्ववाद आहे, असे प्रतिपादन कॉ. डॉ. भालचंद्र केंगे यांनी केले. विचारमंथनाच्या पाचव्या सत्रात ते 'मूलतत्ववादाच्या विरुद्ध मार्क्सवादाचा संघर्ष' या विषयावर ते बोलत होते. मार्क्सवाद हा मूलतत्त्ववादाला विरोध करतो. मनुष्य हा नैसर्गिकरित्या असमान आहे, वर्चस्ववादी आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. मनुष्याचा स्वभाव त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवरून ठरत असते. ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी लढणे हे कळत नकळत वर्चस्ववादच आहे. समाज बदलण्यासाठी जनक्रांती महत्त्वाचे आहे. सध्याचे भाजपचे सरकार हे दलित विरोधी मानसिकता असलेले सरकार आहे. यात सामाजिक न्यायाला दुय्यम स्थान आहे. मूलतत्ववादा विरोधात कुणी बोलायलाच नको अशी भीती निर्माण केली जात आहे. समाजात लोककल्याणकारी ढाचा बदलला आहे. गांधीजींचे विचार हे स्वच्छतेपुरतेच मर्यादित झाले आहेत. या सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला मात्र त्यांची दृष्टी घेतली नाही. केंद्रस्थानी माणूस असल्याचा विचार डोकावत नाही तोपर्यंत येथे समानता येणार नाही, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मांस विक्री; दोन जण ताब्यात

$
0
0

नाशिक : रहिवासी कॉलनीत बेकायदेशीरपणे मांस विक्री करणाऱ्या भाजप अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षाच्या घरी मुंबई नाका पोलिसांनी रविवारी रविवारी सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकला. या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष असलम इमाम कुरेशी (वय ४२) व नबीद अफजल कुरेशी (२८) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. हे गोमांस निघाले तर गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार पोलिस कारवाई करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेतून ८७ हजारांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुमच्या मालकाचे पैसे मला परत द्यायचे आहे, अशी ओळख काढून बँकेत मदतीला धावलेल्या भामट्याने ८७ हजार रुपये हातोहात लंपास केले. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास द्वारका परिसरातील आयडीबीआय बँकेत घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातील व्हिडीओ फूटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न भद्रकाली पोलिस करीत आहेत. या प्रकरणी आतिष देवीदास सोनवणे (वय २५, रा. टागोरनगर) या कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

महाविनायक पेंट्स या दुकानात आतिष काम करतो. हा व्यवसाय ओडिशातील सुभ्रत जेन यांचा असून, दुकानाचे पैसे भरण्यासाठी आतिष सोमवारी बँकेत पोहोचला होता. कॅशिअर काउंटरवर पोहोचण्यापूर्वी आतिषला सफेद रंगाचा शर्ट परिधान केलेली व्यक्ती भेटली. या व्यक्तीने आतिषला त्याच्या मालकाचे नाव सांगत, मला तुमच्या मालकाचे काही लाख रुपये द्यायचे असल्याचे सांगितले. गप्पा मारत असताना संशयिताने आतिषला पैसे मोजण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने ८७ हजार रुपयांची रोकड हातोहात लंपास केली. पैसे घेऊन बँकेतून बाहेर पडलेला आरोपी रिक्षात बसून फरार झाला. चोरीची घटना उघडकीस येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा बँकेत पोहोचला. बँकेतील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता संशयिताची चोरी उघड झाली.

याबाबत सूर्यवंशी यांनी सांगितले, की संशयिताचे वय ४५ ते ५० वर्षांच्या दरम्यान असून, त्याने मराठी भाषेत फिर्यादीशी संवाद साधला. घटनेनंतर आरोपी रिक्षात बसून फरार झाला. सीसीटीव्हीत त्या रिक्षाचा क्रमांक स्पष्ट झाला असून, सायंकाळी रिक्षाचालक सापडला. मात्र, या रिक्षात दोन अन्य प्रवासी होते. इतर प्रवाशांप्रमाणे संशयितही बसला आणि काठे गल्ली सिग्नल येथे उतरून गेल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली. या प्रकरणी आतिषने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयिताचा तपास सुरू आहे.

गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेत असाच प्रकार घडला होता. तीन एप्रिल रोजी झालेल्या या घटनेत सहा ते सात जणांच्या टोळक्याने मिळून चक्क २८ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा बँकेतच फसवणुकीचा प्रकार घडला असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल स्पेस लोकल चॅप्टरची नाशिकला स्थापना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंतराळ संशोधन व विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर काम करणाऱ्या नॅशनल स्पेस सोसायटीचे लोकल चॅप्टर नाशिकला सुरू करण्यात आले आहे. भारतातील कोलकाता व चंडिगड येथे संस्थेचे केंद्र असून, महाराष्ट्रात पूर्णवेळ कार्यान्वित असलेले लोकल चॅप्टर यानिमित्त नाशिकला सुरू झाले आहे. नाशिक स्पेस सोसायटी नाशिक इंडिया चॅप्टर या नावाने हे केंद्र ओळखले जाणार आहे. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे यांची या चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

चॅप्टरचा नाशिकमधील विद्यार्थ्यांना लाभ होणार असून, विशेषत: अंतराळ क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लब महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राविषयी जनजागृती करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, विविध स्पर्धा, कार्यशाळाही याअंतर्गत घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अध्यक्ष अविनाश शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. शहरात प्रथमच अंतराळ क्षेत्रातील शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे.

नाशिकमध्ये प्रथमच अवकाश संशोधनाचा प्रसार होणार आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत शालेय विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाची ओळख व्हावी यासाठी अॅस्ट्रॉनॉमी क्लब सुरू करण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया सुरू होणार आहे.

- अविनाश शिरुडे, अध्यक्ष, नॅशनल स्पेस सोसायटी लोकल चॅप्टर नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images