Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लासलगाव परिसरातहलक्या पाऊससरी

$
0
0

निफाड : लासलगाव शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोस‌ळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे लासलगाव बाजार समितीमध्ये लिलावासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत आणलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. शहर व परिसरात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी झालेल्या रिमझिम पावसाने काही काळ गारवा निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिक मासानिमित्त धार्मिक उपक्रमांना प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला यंदा बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मराठी कालगणनेनुसार वर्षभरातील बारा महिन्यांव्यतिरीक्त एक महिना अधिक गृहीत धरावा लागतो. या महिन्याला अधिक मास असे संबोधन असून धार्मिकदृष्ट्या या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. अधिकमासाच्या प्रारंभापासून शहर आणि जिल्ह्यात विविध पूर्वनियोजित धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ घाला आहे.

अधिक मास १३ जूनपर्यंत राहणार आहे. धार्मिक नावांमध्ये या महिन्यात मलमास किंवा पुरूषोत्तम मास असेही नाव आहे. या काळात भाविकांच्या वतीने श्रद्धेने व्रतांचे पालन केले जाते. महिनाभर उपवास, फलाहार किंवा भोजनसमयी जे मिळेल त्याच अन्नाचे ग्रहण, एकभुक्त रहाणे, नक्तभोजन, मौनभोजन आदी व्रतांसह पुराण कथा श्रवण, नामस्मरण, विष्णूयाग आदी धार्मिक उपक्रम होतात. शहरातही अधिक मासानिमित्त या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूजा-अर्चनेसह दानादी बाबींसाठी लागणाऱ्या वस्तूही मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

अधिक मासाची कालगणना

ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस मोजले जातात. मराठी कालगणनेनुसार वर्षाचे ३५४ दिवस मोजले जातात. यातील ख्रिश्चन कालगणना ही चंद्रावर व मराठी कालगणना सूर्यावर आधारित असते. या कालगणनेत दर तीन वर्षांनी लीप वर्ष गृहीत धरले जाते. त्यानुसार मराठी कालगणनेतील दिवसांची तूट भरून काढण्यासाठी प्रत्येक ३२ महिन्यांनंतर येणारा महिना हा अधिक मास म्हणून गणला जातो. या महिन्यात धार्मिक अनुष्ठाने आणि व्रत वैकल्यांना विशेष महत्व असते.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी तालुक्यात अवैध दारू जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

उमराळे बू. येथील महाराजा खानावळ येथे ३० हजार ६३६ रुपयांचा अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

दिंडोरी पोलिस स्टेशनला प्रशिक्षण कालावधीसाठी आलेले आयपीएस अधिकारी सुदर्शन यांनी तालुक्यातील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी धडाडीने कारवाई सुरू केली आहे. यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. दिंडोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अवैध रित्या दारूविक्री सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकत कार्यवाही सुरू केली आहे.

उमराळे बू. परिसरात विविध ठिकाणी अवैध दारू विक्री व अवैध धंदे सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सुदर्शन यांना मिळाली. याबाबत त्यांनी पोलिस पाटलांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन कडक सूचना दिल्या. तसेच आपल्या परिसरात काही अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती देण्याचे तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता अभियानातंर्गत राजदेरवाडीला तपासणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राजदेरवाडी (ता. चांदवड) ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी बुधवारी जिल्हास्तरीय तपासणी केली. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात येत असून यातून तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.

तपासणीत पाणी व स्वच्छता विभागच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सहायक गट विकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी राजदेरवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी डॉ. गिते यांनी शाळा, अंगणवाडी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय यांची पाहणी केली. अंगणवाडीत एकही कुपोषित बालक नसल्याबाबत डॉ. गिते यांनी अंगणवाडी सेविकेचा सत्कार केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या मुताऱ्या वापरात नसल्याचे निदर्शनास आल्याने गिते यांनी शोषखड्डा उघडा करून पाहणी केली. यावेळी चांदवड तालुक्याचे गट विकास अधिकारी हिरामण मानकर, विस्तार अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा व तालुका पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद

प्राथमिक शाळेतील डिजिटल शिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय पोषण आहाराचा वर्ग उघडून सर्व साहित्याची पाहणी केली. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बिस्कीट देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. गिते यांनी याबाबत तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश गट विकास अधिकाऱ्यांना दिले.

संगणक बंद, गंभीर बाब

राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्या संगणक कक्षास भेट देऊन ई-ग्रामबाबत माहिती घेतली. मात्र, तांत्रिक कारणामुळे तीन महिन्यांपासून सदरची प्रणाली बंद असल्याचे संगणक परिचालकाने सांगितले. परंतु, सदरची बाब अतिशय गंभीर असून याबाबत चौकशी करण्याचे व संगणक परिचालकाचे मानधन थांबविण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. यावेळी घरकुल बांधलेल्या लाभार्थींच्या घरी भेट देऊन घरकुलाची व शौचालयाची पाहणी डॉ. गिते केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्रांतरगृह पाडण्याचा घाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात रामकुंडावरील वस्रांतरगृह पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर महापालिकेने पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या सुशोभिकरणाच्या मोहिमेअंतर्गत वस्रांतरगृहावर हातोडा पाडण्याची तयारी सुरू केली आहे. रामकुंडालगत वस्रांतरगृह पाडून सुलभ शौचालयाजवळ बांधण्याचा विचार स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू झाल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. त्यामुळे वस्रांतरगृहावरून पुन्हा महापालिका आणि पुरोहित संघ आमने-सामने येणार आहे.

भाविकांच्या आस्थेचे व श्रद्धेचे ठिकाण असलेल्या रामकुंडावर येणाऱ्या भाविकांसाठी महापालिकेतर्फे वस्रांतरगृहाची इमारती उभी करण्यात आली आहे. पुरोहित संघासह भाविक या वस्रांतरगृहाचा वापर धार्मिक कार्यासह कपडे बदलण्यासाठी करतात. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी हे वस्रांतरगृह पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, पुरोहित संघाने महंत ज्ञानदास यांच्यासह महापालिकेचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.

धार्मिकतेचे प्रतिक बनवत पुरोहित संघाने त्यावेळी मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी केली होती. त्यामुळे महापालिकेला ही मोहीम थांबवावी लागली होती. परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाप्रकल्पांतर्गत गोदावरी नदीचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण केले जाणार असून त्यात नदीकाठावरील बांधकामेही हटवले जाणार आहेत. त्यामुळे या कारवाईत वस्रांतरगृह सुद्धा पाडण्याचा स्मार्ट सिटी कंपनीचा मानस आहे. त्यासंदर्भात चर्चा केली जात असून सध्याचे वस्रांतरगृह काढून ते रामकुंडावर असलेल्या सुलभ शौचालयाच्या वर किंवा त्या शेजारी बांधण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून महापालिका आणि पुरोहित संघ पुन्हा आमने सामने येणार असून नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

पुरोहित संघाचा नकार कायम

रामकुंडावर असलेले वस्रांतरगृह हे पाडण्याचा प्रस्ताव हा पुरोहित संघानेच दिल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. परंतु, असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केला आहे. पुरोहित संघाकडून अशी कोणतीही अधिकृत मागणी केली नसल्याचे सांगत, पाडण्याच्या प्रस्तावाला आमचा तीव्र विरोध आहे. हे वस्रातंरगृह कोणत्याही परिस्थिती पाडू देणार नाही. ते पाडण्याचा प्रयत्न झाला तर मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाच लाखांचे ड्रग्ज जप्त

$
0
0

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई; तिघा तरुणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमडी हा घातक अंमलीपदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने बुधवारी (दि. १६) पहाटे पाथर्डी परिसरात अटक केली़ त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीच्या २६५ ग्रॅम अंमली पदार्थासह टाटा सफारी वाहन जप्त करण्यात आले आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्यापैकी दोघे सराईत गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी दोघे मोक्काच्या गुन्ह्यात निर्दोष सुटले आहेत.

रणजित गोविंदराव मोरे (वय ३२, रा़ २०५, सी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (वय ३१ रा. वृंदावन नगर, त्र्यंबक हौसिंग सोसायटी, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (वय ३२, रा. श्रीसाई रो हाऊस नंबर २, वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच लाख ३० हजार रुपयांचे २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, टाटा सफारी व ४६ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल असा एकूण १५ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबईहून टाटा सफारी वाहनातून (एमएच १५, ईक्यु ५००५) एमडी ड्रग्ज पाथर्डी फाट्यावरील रायबा हॉटेलजवळ विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली. त्यानुसार वाघ यांनी पोलिसांची दोन पथके तयार केली. सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, सहायक उपनिरीक्षक जाकीर शेख, दिलीप मोंढे, विशाल काठे, आदींचा या पथकात समावेश होता. पथकाने रात्री एकपासून परिसरात सापळा लावला. रात्री पावणेदोनच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाणारे संशयित सफारी वाहन पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. कारचा पाठलाग करून हॉटेल रायबाजवळ तिघांना ताब्यात घेण्यात आले. संशयित मोरे आणि दुंडे यांच्याकडे प्रत्येकी ९० ग्रॅम तर माळोदे याच्याकडे ८५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ मिळून आला. हवालदार रवींद्र बागूल यांच्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे एमडी ड्रग्ज?

मेफेड्रोन असे नाव असलेल्या या ड्रग्जला 'म्याव म्याव ड्रग्ज' असेही म्हटले जाते. हे ड्रग्ज खूप महाग असून प्रतिग्रॅमसाठी दोन हजार रुपये मोजावे लागतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. हे ड्रग अतिशय दुर्मिळ आहे. मात्र, ते नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई कनेक्शन अन् टिपर गँगशी संबंध

मुंबई येथून हे ड्रग्ज आणले जात असावे अशी प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. शहरातील कॉलेजरोड, गंगापूर रोड परिसरात या ड्रग्जची विक्री होते. कॅनडा कॉर्नर परिसरात या ड्रग्जची नशा केलेल्या एका तरुणीला काही वर्षांपूर्वी धावत्या वाहनातून ढकलण्यात आले होते़ संशयित दुंडे आणि माळोदे हे टिप्पर गँगशी संबंधित असून त्यांच्यावर दरोड्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाने सिडकोतील कुख्यात टिप्पर टोळीतील नऊ जणांना २१ फेब्रुवारी २१०८ रोजी मोक्काअन्वये शिक्षा ठोठावली होती. तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यामध्ये माळोदे आणि दुंडे यांचा समावेश आहे. सिडकोतील भोळे मंगल कार्यालयाजवळील यश आर्केडच्या शिल्पा स्टॉक ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात २७ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी टिप्पर गँगने नियोजनबद्धरित्या शस्त्रास्त्रासह दरोडा टाकून एक कोटी तीन लाख ५० हजारांची रोकड लुटून नेली होती. अंबड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल होता. यानंतर या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आला.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरऊर्जा विजेसाठी पावणे तीन रुपयांचा दर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर (२ रुपये ७१ पैसे) मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी एक हजार मेगावॅट सौरऊर्जा दीर्घकालिन निविदाद्वारे खरेदी करण्यासाठी निविदा प्रकियेला सुरुवात करण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या नवीकरणीय मंत्रालयाने कर व शुल्क यांच्या कायद्यातील बदल करारामध्ये समाविष्ट करण्याबाबतचे स्पष्टीकरण जारी केल्यानंतर या निविदेची उलट बोली ही 'टीसीआयएल'च्या वेबसाइटवर १४ मे रोजी झाली. यात आठ निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता आणि त्यांची एकूण क्षमता सुमारे १,४५० मेगावॅट होती. त्यापैकी एक हजार मेगावॅटसाठी खालील निविदाकार पात्र ठरले. यामध्ये जेएलटीएम एनर्जी (२० मे.वॅ.) व माहोबा सोलार,(२०० मे.वॅ.) हे सर्वात कमी बोली लावलेले निविदाकार ठरले असून त्यांनी २ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट इतक्या कमी दराची बोली लावली. रिन्यू सोलार पॉवर,(२५० मे.वॅ.) एक्मे सोलार होल्डिंग्‌स लि.,(२५० मे.वॅ.) टाटा पॉवर रिन्युयबल एनर्जी,(१५० मे.वॅ.) आणि अजुरे पॉवर (इंडिया), (१५० मे.वॅ.) यांनी २ रुपये ७२ पैसे प्रतियुनिट इतकी बोली लावली होती. या वर्षात 'एनटीपीसी'ने व देशातील इतर राज्यांनी काढलेल्या निविदांमध्ये न्यूनतम दर ठरला आहे. सौरऊर्जेमधील निविदाकारांनी महाराष्ट्र शासन व महावितरणवर विश्वास दाखविला याबद्दल महावितरण व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांना फायदा

या प्रकल्पांतून उपलब्ध होणाऱ्या सौरऊर्जेमुळे महावितरणला महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध देण्यासाठी तसेच अपारंपारिक ऊर्जा खरेदीच्या बंधनाची पूर्तता करण्यासाठी मदत होणार आहे. महावितरणने राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी' योजने अंतर्गत राज्यातील कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी प्राबल्य असलेल्या २० जिल्ह्यांतील सुमारे २१८ तालुक्यात २ मेगॅवॅट ते १० मेगावॅट इतक्या क्षमतेचे एकूण १ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्पर्धात्मक निविदा काढलेली असून त्याची प्रकिया चालू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेक अकाऊंट्सचा फेसबुकवर सुळसुळाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकचा वापर करताना अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे हे धोक्याचे ठरू शकते. कारण सध्या फेसबुकवर फेक अकाउंट्सचा सुळसुळाट झाला असून फेक अकाऊंट कसे ओळखायचे, फेक अकाउंटमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध कसे राहावे, याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ ओंकार गंधे यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे झालेल्या 'सायबर सुरक्षा जनजागृती भाग २' या व्याख्यानात ते बोलत होते. ऑनलाइन शॉपिंग करताना आपले अकाउंट कसे हॅक होऊ शकते, कोणतीही साइट कशा पद्धतीने हॅक होते, सीसीटीव्हीसुद्धा कसे हॅक केले जातात हे त्यांनी करून दाखविले. अगदी आपली गाडी, कारही हॅक कशी होऊ शकते, त्यातून ब्रेक फेल करणे, स्टेरिंग लॉक करणे आदी प्रकार कसे होऊ शकतात, याबद्दलही गंधे यांनी माहिती सांगितली. तसेच नवीनच प्रचलित झालेल्या 'इलूमिनाटी' संघटना, धोके आदी विषयांबद्दलही माहिती दिली. शिवाय, यासारख्या अनेक जनजागृती व्याख्यानांची गरज समाजाला आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, मनीष चिंधडे, नीलेश सोनजे, पराग जोशी, संतोष साबळे, गौरव सामनेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

अडीच महिन्यानंतर महाडला सासरच्यांविरुद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तालुक्यातील सरवड येथे माहेर असलेल्या विवाहिता शीतल पाटील हिचा रायगड जिल्ह्यातील महाडला संशयास्पदरित्या मृत्यू झाला. विवाहितेचा पती विनीत पाटील व इतरांनी तिचा घातपात केल्याचा संशय शीतलच्या नातलगांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी मध्यरात्री महाड शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरवड येथील शीतल भीमराव पाटील या उच्चशिक्षित तरुणीचा विवाह विनीत ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी ६ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच पती विनीत पाटील, सासरे ज्ञानेश्वर दामू पाटील, सासू निर्मला ज्ञानेश्वर पाटील, नणंद वृषाली अशोंक मुंगसे, अलका संभाजी पाटील यांच्याकडून छळ सुरू झाला. तिच्याशी संभाषण केले जात नसे तसेच तिला उपाशी ठेवण्यात येऊ लागले. तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून माहेरी पाठविण्यात देण्यात येत होते. ती एम. ए. बी. एड. असल्यामुळे तिच्याकडे नोकरीचा आग्रह धरला जात होता. दरम्यानच्या काळात विनीतला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी औषधी निर्माण कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे सुमारे एक वर्ष नऊ महिने सासरी सिन्नर येथे राहिल्यानंतर शीतल महाड येथे आली. महाड येथे असताना दि. १ मार्च २०१८ रोजी हिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. शीतलचा भाऊ रोशन भीमराव पाटील (जळगाव) यांच्या तक्रारीवरून महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धुळे बंद’ला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

मंदिर मुद्दा तापला; शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांचा सहभाग

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनाऱ्यावरील मंदिरे हटवून तेथे साडेपाच किमीचे रस्ते तयार करण्याची संकल्पना आमदार अनिल गोटे यांनी मांडलेली आहे. त्यास विरोध करीत बुधवारी (दि. १६) शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांनी धुळे बंदची हाक दिली. या बंदमध्ये शहरात काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत होते, तर तुरळक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना जिल्हाप्रमुखांसह हिंदूत्ववादी संघटनांनी अतिक्रमण करून उभारलेली मंदिरे पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे आमदार गोटे यांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे, की जर शहराचा विकास हवा असेल तर अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. यानंतर धुळे बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदमध्ये आग्रारोड, फुलवालाचौक, चैनीरोड, मुख्य बाजारपेठ पाचकंदिल चौक परिसरात तुरळक बंद होती. काही ठिकाणी शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यात वाद झाल्याने भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरामण गवळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे, संजय वाल्हे, अरुण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. शहरातील जमनालाल बजाज रोडवर पोलिस चौकीजवळील दुकांनावर काही जणांनी अचानक दगडफेक केली. यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

bigg boss marathi, day 31: 'बिग बॉस'च्या घरात अश्लील वर्तन

$
0
0

नाशिक: अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगापुरे यांचा मराठी बिग बॉसमधील रोमान्स वादात सापडला आहे. या दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अश्लील वर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कलर्स या मराठी वाहिनीवर 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो सुरू आहे. या शो मध्ये वेगवेगळ्या कलाकरांनी सहभाग घेतला असून यातील रेशम सेठ टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे या दोघांमध्ये सध्या रोमान्स सुरू आहे. १४ मे रोजी प्रसारित झालेल्या शोमध्ये या दोघांत अश्लील संवाद झाला. तसेच दोघांचे हावभाव देखील अश्लील होते. याबाबत कायद्याचा विद्यार्थी असलेल्या ऋषीकेश देशमुख यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेशम आणि राजेश यांनी विवाहबाह्य संबंधाचं समर्थन करणारं वर्तन केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. हे दोघेही विवाहित असून त्यांना मुलेही आहेत. कौटुंबिक जबाबदारी पार पडणाऱ्या या दोघांच्या प्रेमसंबंधामुळे अनैतिक संबंधांना खतपाणी मिळणार असून ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी असल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

देशमुख कायद्याचे विद्यार्थी आहेत. एका राज्यस्तरीय वाहिनीवर अश्लीलतेचा प्रचार आणि प्रसार सहज होतो. हे कोठेतरी थांबायला हवे म्हणून पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली. रेशमसह राजेश, कलर्स वाहिनी, व्हायाकॉम १८ अॅण्ड इटीव्ही नेटवर्क, इंडेमोल तसेच या संबंधित सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २९२, २९३, २९४ तसेच आयटी अॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी आणि त्यांना या पुढे अश्लील दृष्य प्रसारीत करण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक बूथ, दहा यूथ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले संघटन मजबूत करण्यासाठी 'एक बूथ दहा यूथ' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी युवक शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. येत्या महिनाभरात प्रत्येक बूथवर युवकांची नेमणूक करणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. त्यात युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे पक्षाकडे असावे यासाठी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादीची युवक शाखा एका बूथवर दहा युवक कार्यकर्त्यांची फळी महिनाभरात तयार करणार आहे. बूथप्रमुख व त्यासोबत असणाऱ्या युवकांनी बूथवर कसे लक्ष दिले पाहिजे याचे मार्गदर्शन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले. अॅड. चिन्मय गाढे, नवराज रामराजे, रोहन नहिरे, किरण पानकर, विशाल कोशिरे, किरण माणके, स्वप्नील चव्हाण, डॉ. संदीप चव्हाण, सागर बेदरकर, भूषण गायकवाड, सोमनाथ सानप, मनोज चव्हाण, राहुल तुपे, विशाल डोखे, मितेश राठोड, सुनील घुगे, रितेश जाधव, स्वप्नील सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ गाळ्यांचे वाटप रद्द करा

$
0
0

सटाणा बाजार समितीला उपनिबंधकाचा आदेश

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने १७ गाळ्यांचे अनिधिकृतपणे केलेले वाटप रद्द करावे, तसेच या गाळ्यांच्या वाटपाबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नव्याने प्रक्रिया राबवावी, या आदेशाची अमंलबजावणी सध्या सुरू असलेल्या सटाणा बाजार समितीची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्राधान्याने करावी, असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी दिला.

बाजार समिती विभाजनानंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच तत्कालीन संचालक मंडळ अडचणीत सापडले आहे.

बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने मालेगाव रोडवरील बाजार समिती मालकीच्या जागेवर ७४ लाख ५२ हजार १८९ रुपये खर्च करून १७ गाळ्यांचे बांधकाम केले होते. या गाळ्यांच्या वाटपासाठी १२ मार्च २०१३ पर्यंत मागणी अर्ज मागविले होते. या १७ गाळ्यांसाठी तब्बल ३३ अर्ज बाजार समितीला प्राप्त झाले. बाजार समितीने ३० मार्च २०१३ ला गाळ्यांचे वाटप केले. दरम्यान या गाळेवाटपात अनियमितता दिसत असून आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार सुहास पवार यांनी जिल्हा निबंधकांकडे केली हेाती. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. यानुसार मालेगाव येथील उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत गैरव्यवहार आढळून आला आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. १६ एप्रिल २०१८ ला समक्ष सुनावणीस हजर राहून लेखी खुलासा सादर करण्याची मुभा करे यांनी तत्कालीन संचालक मंडळाला केली होती. यानंतर अर्जदार सुहास पवार यांनी जिल्हा उपनिबंधक करे यांच्याकडे या व्यवहार विरोधात कागपत्रांची पुर्तता करून गाळे लिलाव रद्द करावे, तत्कालीन संचालक मंडळाकडून झालेला तोटा वसुल करावा, अशी मागणीही अर्जाद्वारे केली होती. या अर्जावर जिल्हा उपनिबंधक करे यांनी १७ गाळ्यांचे अनधिकृतपणे केलेले वाटप रद्द करावे, तसेच या गाळ्यांच्या वाटपाबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नव्याने प्रकिया राबवावी असे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विराट पुन्हा अपयशीगुरुवारी रात्री बेंगळुरूच्या

$
0
0

विराट पुन्हा अपयशी

गुरुवारी रात्री बेंगळुरूच्या संघाने हैदराबादसमोर सहा गडी गमावून धावांचे २१९ आव्हान ठेवले. बेंगळुरूच्या ए. बी. डीव्हीलर्सने ३९ चेंडूत ६९ धवा केल्या. फलंदाजीचा सूर न गवसलेला बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मात्र अवघ्या १२ धावांवर त्रिफळचीत झाला. अखेरच्या फळीतली फलंदाजांनी तडाखेबाज फटकेबाजी करून हैदराबादसमोर विजयारसाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२४ वाहनांवर कारवाईचा बडगा

$
0
0

२६ लाखांहून अधिक दंड वसूल

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अवैध प्रवासी वाहतुकीस चाप बसावा यासाठी संपूर्ण राज्यभरात १६ एप्रिल ते १५ मे या दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मालेगाव विभागात येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ३२ खासगी आटो रिक्षा तसेच १९२ अन्य वाहने अश एकूण २२४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती अधिकारी किरण बीडकर यांनी दिली.

या विशेष मोहिमेत रिक्षांवर करण्यात आलेल्या कारवाईत ५० हजार ५८५, तर अन्य वाहनांकडून २६ लाख ३७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या वाहनधारकांकडून भविष्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणार नसल्याचे लेखी घेवून वाहने ताब्यात देण्यात आली आहेत. तसेच अशा खासगी आटो रिक्षा प्रवाशांच्या लक्षात याव्यात यासाठी त्यांना पांढरा रंग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाईल गेमद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती

परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोरला उपलब्ध करून दिले आहेत. रोड सेफ, सारथी व ओबे ऑर डाय हे ते तीन अॅप आहेत. याद्वारे सुरक्षित वाहतुकीबाबत उपयुक्त माहिती पोहचवली जाणार आहे. मालेगाव क्षेत्रातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी केली कारवाई

आटो रिक्षा तपासणी - ३२

अन्य वाहने तपासणी - १९२

आटो रिक्षा दंड - ५० हजार ५८५

अन्य वाहने दंड - २६ लाख ३७ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जल, जंगल, जमीन सत्ताशोषणाचे अड्डे

$
0
0

जल, जंगल, जमीन सत्ताशोषणाचे अड्डे

तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी-नापिकी आणि कोसळवलेला शेतमालाचा बाजार भाव यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्या त्वरित थांबल्या पाहिजे. जागतिकीकरणात जल, जंगल, जमीन हे सत्ताशोषणाचे अड्डे बनले आहेत, अशी टीका तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी केले.

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, डायमंड मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित जलशाहिरी परिषदेत अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. उद्योगपती उद्योगाला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करत नाही, मग शेतकऱ्यांनवरच का ही वेळ येते. आज शेतकरी उद्ध्वस्त करून उद्योगपतींना संरक्षण दिले जात आहे. शेतकरी हा वीजबिल, बँक कर्जा करता नाडवला जातो तर भांडवलदार उद्योग, व्यावसायिक यांना हे सरकार संरक्षण देते, असा आरोपही त्यांनी बोलताना केला.

शेती, पाणीबचतीबाबत मार्गदर्शन

या वेळी प्रा. अशोक सोनवणे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी व जलधोरण' या विषयावर व्याख्यान दिले. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे कुणब्याचा शेताची आणि जनावरांच्या चाऱ्याची केवळ चिंता न करता ते कुणब्याचा मुबलक आणि परवडेल असेच कसे उपलब्ध होईल हे सांगत, असे ते म्हणाले. या वेळी कवी गायक सुनील खरे यांनी जलप्रबोधन गीत सादर केले. कवी प्रा. शिवाजी भालेराव, कवी लक्ष्मण बारहाते, सचिन सताळकर, सोमनाथ गायकवाड, अभिषेखा गांगुर्डे शेती व पाणी विषयावरील कविता सादर केल्या. जलशाहिरी परिषदेचे प्रास्ताविक आयोजक प्रा. शरद शेजवळ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळाच्या कार्यालयातील जुगार अड्डा उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मित्रमंडळाच्या कार्यालयात राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत आठ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून रोकड, तसेच जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. वाल्मीकनगर परिसरात क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युनिट एकचे शिपाई स्वप्निल जुंद्रे यांना या अड्ड्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी युनिटच्या पथकाने वाल्मीकनगर भागातील दोस्ती मित्रमंडळाच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी शेखर जाधव (रा. एकलव्य सोसायटी, पांडवनगरी) व त्याचे सात साथीदार पत्त्यांच्या कॅटवर तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून, अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

ऑफिस फोडून कॉम्प्युटर लंपास

एकाच इमारतीत असलेली दोन खासगी कार्यालये फोडून चोरट्यांनी कॉम्प्युटर आणि मोबाइल असा ८६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना संभाजी चौकात घडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज उदयनारायण यादव (रा. शकुंतला बिल्डिंग, संभाजी चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यादव आणि त्यांचे शेजारी किशोर पाटील यांची देवकी बिल्डिंगमध्ये व्यावसायिक कार्यालये आहेत. मंगळवारी रात्री चोरट्यांनी या दोन्ही कार्यालयांचा कडी-कोयंडा तोडून कॉम्प्युटर, प्रिंटर आणि मोबाइल असा सुमारे ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार गायकर करीत आहेत.

महिलेचा विनयभंग

घरासमोरील अंगणात मच्छरदाणीत झोपलेल्या महिलेचा एकाने विनयभंग केला. ही घटना पिंपळगाव बहुला येथील सहावा मैल भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे.

पंकज ऊर्फ नितीन देवराम लहारे (वय २६, रा. सहावा मैल, चंद्रभागा लॉन्सशेजारी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. उकाड्यामुळे सहावा मैल भागात राहणारी विवाहिता बुधवारी रात्री आपल्या घरासमोरील अंगणात मच्छरदाणी लावून झोपलेली असताना हा प्रकार घडला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

दुकान फोडून २३ हजारांची चोरी

फ्लेक्स, बॅनर तयार करण्याचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे २३ हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना राणेनगर परिसरात घडली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजरत्न मुरलीधर केदार (रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. केदार यांचा राणेनगर परिसरातील लक्ष्मीनारायण हाइट्स या इमारतीत फ्लेक्स, बॅनर बनविण्याचा व्यवसाय आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या शॉपच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी एलईडी टीव्ही आणि फ्लेक्स बोर्डचे रोल व शाईचे डबे असा सुमारे २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेचा अधिक तपास हवालदार भोजने करीत आहेत.

चक्कर येऊन वृद्धे मृत्यू

देवदर्शन आटोपून घराकडे पायी परतताना चक्कर येऊन पडल्याने ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना काळाराम मंदिर परिसरात घडली. सुंदराबाई भिला चौधरी (रा. गजानन चौक, गुरुद्वारारोड) असे या महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री चौधरी देवदर्शनासाठी काळाराम मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे निघाल्या असता मंदिर आवारातच त्यांना चक्कर आली. जमिनीवर कोसळलेल्या चौधरी यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत.

दुकानदार महिलेची पोत खेचली

सिगारेट घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून धूम ठोकली. ही घटना शिवाजीनगर येथील धारबळे मळा परिसरात घडली असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा राजेंद्र वडजे (रा. तुलसीनमन रो-हाऊस, माऊली कॉलनी, धारबळे मळा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. वडजे यांचे आपल्या घराला लागूनच साईनाथ किराणा नावाचे दुकान आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन ग्राहकांपैकी एक व्यक्ती त्यांच्या दुकानात सिगारेट घेण्यासाठी आली. सिगारेट घेऊन त्याने नंतर साबण आणि शाम्पूची मागणी केली. दुकानात वर टांगलेली शाम्पूची पुडी तोडण्यासाठी वडजे काउंटरजवळ उभ्या राहिल्या. याचाच फायदा घेत चोरट्यांपैकी एकाने वडजे यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची पोत तोडली. त्यानंतर चोरटे दुचाकीवर बसून फरार झाले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेलकर करीत आहेत.

(क्राईम डायरी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्षिसाच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महागडी कार बक्षीस म्हणून देण्यात येत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, फसवणुकीचा हा प्रकार वारवांर घडत असल्याचे दिसते.

या प्रकरणी स्मिता किरण पाटील (३८, रा. वास्तुछाया बिल्डींग, घोडेबाबनगर, तपोवनरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, ६ ते १६ मे या काळात फसवणुकीचा प्रकार घडला. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीने ७८३५०३३९८८, ९६५४४७५०९० तसेच ९७७३७५९९०५ या मोबाइल क्रमांकावरून पाटील यांच्याशी संपर्क साधला. एका योजनेत तुम्हाला महागडी कार लागल्याचे आरोपीने पाटील यांना सांगितले. जवळपास आठ लाख रुपयांची कार असून, ती मिळवण्यासाठी थोडासा खर्चही करावा लागेल, असे आरोपीने सांगितले. यानंतर आरोपीने वेगवेगळ्या मार्गाने अवघ्या १० दिवसात पाटील यांच्याकडून एक लाख ९१ हजार ८९६ रुपये उकळले. बँक खात्यावर पैसे जमा केल्यानंतरही आरोपीची मागणी वाढतच असल्याचे लक्षात आल्याने पाटील यांनी विचारपूस केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अॅक्टमधील कलम ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पैसे देण्यापूर्वी खात्री करा

असे गुन्हे करणारे संशयित परराज्यातील दुर्गम भागातून हा उद्योग करतात. वेगवेगळ्या आणि महागड्या वस्तू फुकट अथवा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून आरोपी नागरिकांकडून पैसे उकळतात. एकदा पैसे दिले की नागरिक बक्षिसाच्या आमिषाने पुन्हा पुन्हा पैसे देतात. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता, पैसे देण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य अभियंतापदी जनवीर रुजू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महावितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदाचा पदभार ब्रिजपालसिंह जनवीर यांनी गुरुवारी स्वीकारला. यापूर्वी, ते जळगाव परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर जनवीर यांची वर्णी लागली आहे.

जनवीर यांनी आयआयटी, मद्रास येथून १९८७ मध्ये एम. टेक. या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. महावितरणमधील आपल्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. यापूर्वी, त्यांनी नाशिक येथे तत्कालीन राज्य विद्युत मंडळ आणि महावितरणमध्ये पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच मुख्य सामग्री भांडाराचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, औष्णिक विद्युत केंद्रात उपकार्यकारी अभियंता या पदांवर जवळपास १० वर्षे कार्यरत होते. त्यामुळे नाशिक परिमंडळातील विजेच्या समस्यांशी ते परिचित आहेत. उस्मानाबाद आणि हिंगोली येथे अधीक्षक अभियंता या पदावर काम करतांना वसुली व वीजगळतीचे आव्हान स्वीकारून प्रगती साधली. नागपूर येथे मुख्य अभियंता-गुणवत्ता व नियंत्रण, प्रकाशगड या मुख्य कार्यालयात खरेदी विभागाचे कार्यकारी अभियंता, मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोंदिया व जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून काम करताना त्यांनी विशेष कामगिरी केली. वीज क्षेत्रातील निर्मिती, गुणवत्ता व नियंत्रण, संचालन व सुव्यवस्थापन, खरेदी व भांडार, पायाभूत आराखडा या विभागात कामाचा बहुआयामी अनुभव आहे.

नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी रुजू झाल्यानंतर जनवीर यांचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे व भुजंग खंदारे, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागूल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम, धनंजय आहेर, मनीष ठाकरे, मधुसूदन वाढे, प्रेरणा बँकर, वित्त व लेखा विभागाचे प्रभारी सहायक महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने आदींसह अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधींनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १५ केंद्रे सज्ज

$
0
0

लोगो

विधान परिषद निवडणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्व‍िवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी, २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

प्रत्येक तालुका स्तरावरील तहसील कार्यालये, तसेच नाशिक तालुका व शहरातील सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे दालन येथे मतदान केंद्रे असतील. प्रत्येक तालुक्यातील नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि महापालिकेतील सर्व सदस्य हे संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात मतदान करतील.

जिल्ह्यात ६४४ मतदार

जिल्ह्यात एकूण ६४४ सदस्य मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नाशिक महापालिका, भगूर नगरपरिषद, देवळाली छावणी परिषद, नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सर्व सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती असे १६० मतदार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) दालनातील केंद्रावर मतदान करतील.

केंद्रनिहाय जिल्ह्यातील मतदारसंख्या

दिंडोरी तहसील कार्यालय : २६

पेठ तहसील कार्यालय : २२

इगतपुरी तहसील कार्यालय : २७

त्र्यंबकेश्‍वर तहसील कार्यालय : २४

निफाड तहसील कार्यालय : २९

सिन्नर तहसील कार्यालय : ३९

येवला तहसील कार्यालय : ३४

मालेगाव तहसील कार्यालय : ९७

नांदगाव तहसील कार्यालय : ६०

चांदवड तहसील कार्यालय : २४

कळवण तहसील कार्यालय : २५

देवळा तहसील कार्यालय : २३

बागलाण तहसील कार्यालय : ३२

सुरगाणा तहसील कार्यालय : २२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images