Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहतूक पोलिस ‘टार्गेट’

$
0
0

पोलिसांना दमबाजी-मारहाण केल्याचे पाच महिन्यांत आठ गुन्हे दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांचे पालन न करता पोलिसांनाच अरेरावी करण्याचे प्रमाण गत वर्षीपेक्षा वाढले आहे. २०१७ मध्ये पूर्ण वर्षात वाहतूक पोलिसांना दमबाजी किंवा मारहाण केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल झाले होते. यंदा पहिल्या पाच महिन्यातच आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यातील तीन घटना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयातच घडल्या आहेत.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना अनेकदा आरेरावीचा सामना करावा लागतो. कधीतरी पोलिसही चुकत असतील. मात्र, यामुळे हल्ल्यासारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस स्टेशन सर्वात पुढे असून, येथे मागील १७ महिन्यात प्रत्येकी पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यानंतर, नाशिकरोड, उपनगर, सातपूर, गंगापूर, भद्रकाली या पोलिस स्टेशन हद्दीत प्रत्येक एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकारांमध्ये यंदा वाढ का झाली, त्याचे कारण सांगता येणार नाही. सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या असून, वाहनांची वर्दळ अधिक असते. 'नो इंट्री' तसेच 'वन वे' सारखे नियम मोडल्यानंतर कारवाई करताना वाहनचालकांकडून त्रागा होतो. वास्तविक जागेवर दंड भरायचा नसल्यास आणि आपण काहीही चूक केली नसल्याची खात्री असल्यास वाहनचालक कोर्टात दाद मागू शकतो. दुर्दैवाने काही वेळा वाहनचालक हमरीतुमरीवर उतरतात. रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी किंवा मारहाण झाल्यास ते खपवून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

पुरावे कॅमेऱ्यात कैद

शहर पोलिसांकडे १२५ बॉडी वॉर्न कॅमेरे असून, त्यातील ९९ कॅमेरे शहर वाहतूक शाखेकडे तर उर्वरित २६ कॅमेरे पोलिस स्टेशनकडे आहे. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा वापर सुरू झाल्यापासून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या दोन घटना यात कैद झाल्या आहेत. हे तांत्रिक पुरावे महत्त्वाचे असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास पुढील समस्याच उद्भवणार नाहीत, असे एसीपी देवरे यांनी स्पष्ट केले.

..

२०१७

पोलिस स्टेशन.....ठिकाण..............................घटनेचा दिनांक

सरकारवाडा.....शरणपूर पोलिस चौकी सिग्नल.....१३-४-१७

नाशिकरोड.....शिंदेगाव..................................११-७-१७

मुंबईनाका.....गोविंदनगर लिंकरोड....................३०-८-१७

भद्रकाली.....शालिमार रिक्षा स्टॅण्ड....................४-९-१७

सातपूर.......आयटीआय सिग्नल.......................१०-९-१७

मुंबई नाका.....फेम टॉकीज सिग्नल....................१४-१०-१७

सरकारवाडा.....वकीलवाडी चौक.....................१-१२-१७

..

२०१८

पोलिस स्टेशन.....ठिकाण....................घटनेचा दिनांक

मुंबई नाका.....इंदिरानगर अंडरपास..........१०-२-१८

गंगापूर..........आकाशवाणी टॉवरजवळ.....११-३-१८

सरकारवाडा.....शहर वाहतूक शाखा.........१८-३-१८

सरकारवाडा.....शहर वाहतूक शाखा.........१६-४-१८

मुंबई नाका.......द्वारका सर्कल.................२२-४-१८

सरकारवाडा.....शहर वाहतूक शाखा..........१०-५-१८

उपनगर..........उपनगर नाका सिग्नल........२१-५-१८

मुंबई नाका.....इंदिरानगर अंडरपास...........२६-५-१८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदन्यासाने हरखले नाशिककर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नृत्यनुष्ठान म्हणजे कथकच्या एकल नृत्यपरंपरेला चालना मिळावी, यासाठी उभा केलेला डोलारा आहे. यामध्ये २५ गुरूंचे २५ शिष्य नृत्यनुष्ठान करीत आहेत. गुरुशिष्य परंपरेसाठी या कार्यक्रमाचे समर्पण केले गेले आहे. या कार्यक्रमासाठी विविध विषय दर महिन्याला हाताळले जात असून, हे या कार्यक्रमाचे दहावे पर्व होते. या पर्वाचा या महिन्याचा विषय मल्हार आणि १४ मात्रा असा घेण्यात आला. यासाठी सुरुवातीला मधुश्री वैद्य आणि दुसऱ्या पर्वात सोनिया परचुरे यांनी सादरीकरण केले.

कीर्ती कलामंदिरतर्फे रविवारी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे 'नृत्यनुष्ठान'चे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात हिमगौरी आडके, नगरसेविका, डॉ. मीना बापये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सुरुवातीच्या पर्वात मधुश्री वैद्य यांच्या विष्णूवंदनाने केली. त्यामध्ये दरबारी कानडा आणि यमन या दोन रंगांमध्ये आशिष रानडे यांनी संगीतबद्ध केलेली विष्णूवंदना सादर झाली. यानंतर १४ मात्रांचा अडा चौताल यामध्ये थाट, आमद, चलन, तिहाईया, परण, प्रिमलू, लडी आदी प्रस्तूत केले. तसेच, मल्हार रागातील 'घन छाये गगन अत घोर घोर' ही बंदिश सादर झाली.

दुसऱ्या पर्वामध्ये कृष्णवंदना सोनिया परचुरे यांनी कस्तुरी तीलकमं, ताल धमारमधील पं. सुरेश तळवलकर यांचा रचना नृत्यातून सादर केल्या. त्यांनी अभिनय प्रकारामध्ये झमकी झुकी आयी, बदरिया कारी हा मांड रागातील झुला प्रस्तूत केला. त्यांना साथ देण्यासाठी हार्मोनियमवर दिव्या रानडे, श्रेयस गोवित्रीकर, तबला रोहित धारप, सुजित काळे, गायन आशिष रानडे, आशय कुलकर्णी, सूत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ऑर्किड शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांची खास उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा-गट प्रवर्तक समिती स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात आशा-गटप्रवर्तकांसाठी कार्यरत सर्व संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीमध्ये सहभागी संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये एका महिला आशा अथवा गट प्रवर्तक असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटने(आयटक)चे राजू देसले, महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने सलीम पटेल, महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक महासंघ लातूरचे भगवान देशमुख, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक स्वयंसेविका संघ ठाणे (सर्व श्रमिक संघ NTUI) चे एम. ए. पाटील, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघचे राजेंद्र बावके यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. पत्रलेखन मसुदा जबाबदारी आयटक सीटूवर राहणार आहे. समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविली असमन, २ जुलै रोजी मागणी दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच, १८ जुलैला नागपूर येथे पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २० जून ते ३० जून या कालावधीत आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे. राज्यभरातील कार्यरत ६५ हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तक एकत्र येऊन समितीच्या नेतृत्वाखाली संघटितपणे लढा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी द्यावे नैतिकतेला प्राधान्य

$
0
0

डॉ. जयश्री मेहता यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलिकडे डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या केवळ घटना नाहीत तर समाजरचनेत सूक्ष्म स्तरावर घडणाऱ्या या नोंदी अस्वस्थतेच्या सूचक आहेत. जुन्या कालखंडाच्या तुलनेत असे प्रकार अलिकडील काळातच वाढीला लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्तेचा स्तर घसरतो आहे काय, अशा शंकाही या चित्रामुळे समाजाच्या विविध स्तरातून उपस्थित होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. या स्थितीत व्यावसायिकता सांभाळताना नैतिकतेचा पायाही प्राधान्याने जपण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांपुढे उभे आहे, असे प्रतिपादन भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. डॉ. मेहता म्हणाल्या, की केवळ संस्थेची स्थापना होणे महत्त्वाचे नाही. तर भविष्यात ही संस्था किती आणि कशी रुजते, ही संस्था समाजासाठी नेमके काय योगदान देते, समाजाला किती आशावाद यातून मिळतो या मापकांवर संस्थेचे महत्त्व ठरते. आरोग्य विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून या निकषांवर स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र, या यशावर समाधान मानून चालणार नाही. नव्या डॉक्टरांना वैद्यकीय शाखेतील दर्जेदार शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे देऊन सुदृढ समाज घडविण्याची अपेक्षा आरोग्य विद्यापीठाकडून या प्रसंगी समाज करतो आहे, असेही डॉ. मेहता म्हणाल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख, आयुष संचालनालयाचे संचालक प्रा. कुलदीप राज कोहली, वैद्यकीय शिक्षण आणि संषोधन संचालनालयचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर होते. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये वर्धापन दिनानिमित्त सकाळी ध्वजवंदन करण्यात आले.

यांचा झाला सन्मान

समारंभात विद्यापीठातर्फे डॉ. अशोक अनंत महाशूर, डॉ. सयैद अब्दुस सामी, डॉ. विलास दत्तोपंत वांगीकर, डॉ. अनंत भगवंत धर्माधिकारी, डॉ. गांधीदास सोनाजीराव लवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या वैद्यकीय, दंत आयुर्वेद व युनानी, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेच्या ४० विद्यार्थ्यांना एकूण ४५ सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. तसेच २०१७-१८ या वर्षासाठी विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरीकरीता पुरस्कारही देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अचानक संप पुकारण्याच्या प्रवृत्तीला घालावा आळा

$
0
0

अचानक संप पुकारण्याच्या प्रवृत्तीला घालावा आळा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांनाच हाल सहन करावे लागले. बस कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या वेतनवाढीवरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र, त्यामुळे खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची लूट केल्याचेही समोर आले. बसच्या संपाने नियमित प्रवास करणाऱ्यांचीही चांगलीच दमछाक केली. एरवीदेखील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची लूट होते. त्यामुळे अचानक संप पुकारण्याची प्रवृत्ती रोखण्यासह खासगी वाहनचालकांकडून केल्या जाणाऱ्या लुटीला प्रशासनाने वेळीच आळा घातला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

योग्य नियोजनाची गरज

एसटी बससेवा शहरी व ग्रामीण प्रवाशांसाठी अतिमहत्त्वाची मानली जाते. परंतु, अचानक बससेवा बंद पडल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अतिमहत्त्वाच्या सुविधा अशा प्रकारे अचानक बंद करणे योग्य नाही. याबाबत योग्य नियोजनाची गरज आहे.

-वाल्मीक जाधव

परिणामकारक धोरण आखावे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिली गेली नसल्याने बससेवा बंद करण्यात आली. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या संघटनेने बंदला पाठिंबा दिला नसला, तरी बससेवा खंडित झाल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. वास्तविक ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्याबाबत परिणामकारक धोरण आखले जावे.

-भाऊसाहेब पाटील

प्रवाशांना नाहक मनस्ताप

अचानक बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यात मात्र काही खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट करण्यात आल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली. सरकारची अतिमहत्त्वाची सेवा असलेली प्रवासी वाहतूक बससेवा बंद करताना प्रवाशांना अगोदर पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे.

-वसंत माळी

कडक कारवाईची करावी तरतूद

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक बससेवा बंद केल्याने स्थानकांवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बससेवा बंद करण्यामागे नेमके कारण काय, याची माहितीच प्रवाशांना झाली नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करण्यात आला. फारसे गंभीर कारण नसतानाही असा बंद पुकारणे चुकीचेच असून, यापुढे असे झाल्यास कडक कारवाईची तरतूद करावी.

-कपिल भावले

मनमानीला लावावा चाप

बससेवा बंद पडल्याने रेल्वेने आलेल्या प्रवाशांना सर्वाधिक हाल सहन करावे लागले. खासगी वाहनचालकांनी बंद बससेवेचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे शहरात आलेल्या प्रवाशांकडून लुटले. परिणामी शहरात बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

-किरण लवांड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवकरच २५० प्राध्यापक होणार रुजू

$
0
0

वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

केवळ तज्ज्ञ प्राध्यापकांच्या उपलब्धतेअभावी वैद्यकीय शिक्षणाची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. यानुसार वैद्यकीय शिक्षणासाठी एमपीएससीऐवजी थेट महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २५० प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व प्राध्यापक आगामी महिनाभरातच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूजू होतील, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, की वैद्यकीय शाखा ही अतिशय संवेदनशील आहे. सर्व समाजाचे आरोग्य या शाखेवर अवलंबून असते. त्यामुळे या शिक्षणाच्या दर्जाविषयी तडजोड करून चालत नाही. या अगोदर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती होत होती. मात्र, यासाठी मोठा कालावधी खर्च होत होता. दरम्यान, तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापकांना इतर संधी निर्माण झाल्यास नियुक्तीही रखडली जात होती. याचे दुरगामी परिणाम वैद्यकीय शिक्षणावर होत होते. हे टाळण्यासाठी शासनाने यापूर्वी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार आता या प्राध्यापकांच्या नियुक्त्या थेट शासकीय स्तरावरून होणार आहेत. त्यामुळे अलिकडे २५० प्राध्यापकांची यासाठी निवड करण्यात आली असून, येत्या महिनाभराच्या कालावधीत हे प्राध्यापक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सेवेत रूजू होतील. या प्रक्रियेच्या कालावधीत वाढ करीत सन २०२० पर्यंत ही भरती शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, रखडलेल्या पदोन्नतींबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की या पदोन्नती दुसऱ्या टप्प्यात आहेत. यातील पहिल्या टप्प्यात अॅकॅडमिक पदोन्नतीसाठी १५० प्राध्यापकांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रासाठी शासकीय मेडिकल कॉलेज

उत्तर महाराष्ट्रासाठी यंदा जळगावमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाल्याची बाब स्वागतार्ह असल्याचेही संजय देशमुख यांनी सांगितले. या निर्णयामुळे वैद्यकीय विद्याशाखेच्या नव्या १०० जागांची भर उत्तर महाराष्ट्रात पडणार असल्याचे ते म्हणाले. या जागांसाठी आता सन २०१८-२०१९ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षात सुमारे ३५० पेक्षा जास्त पदव्युत्तर जागा वैद्यकीय शिक्षणासाठी निर्माण केल्या गेल्याचा फायदा राज्याच्या वैद्यकीय सेवेत होणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखांचा चेक बळकावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून तिघांनी बेदम मारहाण करीत आणि ठार मारण्याची धमकी देत एका व्यक्तीला दीड लाख रुपयांचा चेक लिहून देण्यास भाग पाडले. ही घटना ६ ते ७ जून या दिवशी महात्मानगर परिसरातील प्रकाश अपार्टमेंटमधील गाळा क्रमांक एक ते तीनमधील थॉमस कुक हौ. लि. येथे घडली.

या प्रकरणी प्रितीश कांतीलाल खिंवसरा (४१, मनमंदिर अपार्ट, ठक्कर डोमसमोर, लवाटेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. खिंवसरा यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी देवेन आहेर (रा. जेलरोड) आणि त्याच्या साथिदारांनी खिंवसरा यांच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश करीत मारहाण केली. गोल्डन हॉलिडेज ट्रॅव्हल्सचे अधिकारी संतोष भंडारी यांच्या नावे चेक देण्यास तयार असताना संशयितांनी तब्बल दीड लाख रुपयांचा चेक आपल्या नावे लिहून घेतला. तसेच चेक वटला नाही तर डबल पैसे द्यावे लागतील असे फिर्यादीकडून बळजबरीने लिहून त्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सह्या घेतल्या तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बुराडे करीत आहेत.

बनावट परवान्याच्या आधारे वाळूची तस्करी

बनावट परवाना तयार करून त्याआधारे टॅक्स चुकवणाऱ्या दोन जणांवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झााला आहे. राहुल विजय धात्रक (२५, रा. गंधर्वनगरी) सुदर्शन सानप (रा. नाशिक) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळील समाधानगादी सेंटर समोर शनिवारी (दि.९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपी वाहनात (एमएच १२ के.पी. ४२२२) वाळू भरून जात असताना पोलिसांना त्यांना अडवले. वाळू वाहतुकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता संशयितांनी ती सादर केली. मात्र, पोलिसांनी बारकाईनी तपासणी केली असता परवानाच बनावट असल्याचे समोर आले. बनावट परवान्याच्या आधारे वाळूची तस्करी करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पीएसआय माळी करीत आहेत.

जाचक मळ्यात घरफोडी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ जूनच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी सचिन संदेश सातारकर (३८, रा. प्लॉट क्रमांक १२, जय भवानीरोड, जाचक मळा, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. सातारकर कुटुंबीय शुक्रवारी (दि. ८) घराबाहेर पडले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भडीकर करीत आहेत.

महिलेची आत्महत्या

अंबड परिसरातील जाधव संकुल येथे राहणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.९) रात्री पाऊणेदहा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे. इंद्रायणी झवर (३६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला जाधव संकुल येथे भाडेकरू म्हणून राहत होती. शनिवारी घरातच तिने गळफास लावून आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीजवळ रेल्वे घसरली

$
0
0

- मुंबई-हावडाचे तीन डबे घसरले

- प्रवासी किरकोळ जखमी

- पंचवटी, राज्यराणी, गोदावरी रद्द

- अन्य रेल्वेगाड्यांना दहा तासांपर्यंत विलंब

म. टा. वृत्तसेवा, घोटी/जेलरोड

मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास रुळावरून घसरले. यामुळे प्रवाशांना किरकोळ मार बसला असला तरी जीवित व वित्तहानी टळली. या अपघातामुळे मध्य रेल्वेची उत्तर भारताकडे होणारी वाहतूक रविवारी विस्कळीत झाली. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. अन्य रेल्वेगाड्यांना दोन ते दहा तास विलंब झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रविवारी सकाळी सहाला अपघातग्रस्त डबे हटविण्यात आल्यानंतर सकाळी सातनंतर वाहतूक सुरळीत झाली.

मुंबईहून मुंबई-हावडा एक्सप्रेस (१२८०९) रात्री नाशिककडे येत होती. इगतपुरी स्टेशननजीकच्या तीन लकडी पुलाजवळ इंजिनापासून नवव्या क्रमाकांच्या कोचची काही चाके, पँट्रीकारचे चाक व त्यानंतर असलेल्या कोच क्रमांक एस १२ची पुढील बाजूची चाके रेल्वे रुळावरून घसरली. हे कोच डाऊन व मिडल लाइनच्या दरम्यान जाऊन पडले. त्यामुळे अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर घसरलेले डबे काढण्याचे काम सुरू केले. हावडा मेलचे उर्वरित डबे कसारामार्गे मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वे स्टेशनमध्ये आणून प्रवाशांची सुटका केली. अपघातामुळे रात्री दोन ते सकाळी सातपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

गाड्यांना विलंब

अपघातानंतर काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. भुसावळ-मुंबई एक्स्प्रेस नाशिकरोडला येऊन माघारी गेली. मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी, गोदावरी, राज्यराणी रद्द करण्यात आली. रविवार असल्याने या गाड्यांना नोकरदार, व्यावसायिकांची गर्दी नव्हती. भुसावळ-पुणे ही पहाटे सव्वापाचला नाशिकरोडला येणारी गाडी तीन तास उशिरा नाशिकरोडला आली. मंगला एक्स्प्रेस तीन तास, तर हावडा मेल दोन, जनता एक्स्प्रेस पाच, महानगरी अडीच तास आणि सेवाग्राम तीन तास विलंबाने आली. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांनाही उशीर झाला. कोलकाता एक्स्प्रेस रात्री बाराला नाशिकरोडला येते. ती आज सकाळी साडेनऊला आली. कुशीनगर एक्स्प्रेसची नाशिकची वेळ रात्री अडीचची आहे. तथापि, ही गाडी सकाळी दहाला आली. देवगिरी तब्बल दहा तास उशिराने धावली. काशी एक्स्प्रेला एक तास विलंब झाला.

या गाड्यांच्या मार्गात बदल

पुणे-दौंड-मनमाडमार्गे मुंबई- अमृतसर, लोकमान्य टिळक गुवाहाटी, वाराणसी या गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या. मुंबई- वाराणसी महानगरी, लोकमान्य टिळक-पाटलीपुत्र सुपर, पनवेल-गोरखपूर, लोकमान्य टिळक हाटिया या गाड्या वसई- सुरत जळगावमार्गे वळविण्यात आल्या. सुट्या संपत आल्याने प्रवासी स्वगृही निघाले होते. त्यामुळे गाड्यांना गर्दी होती. अपघातामुळे मात्र या प्रवाशांची गैरसोय झाली.

प्रवाशांना नाश्ता

अनेक गाड्या रद्द झाल्या तर अनेक गाड्यांना प्रचंड विलंब झाला. विविध स्थानकांवर प्रवासी अडकून पडले. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नाशिकरोड, मनमाड येथे नाश्ता, तर भुसावळ रेल्वे स्थानकावर मोफत जेवण दिले. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्कच्या जागेवर झोपड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गरजू व्यावसायिकांसाठी महापालिकेने गंगापूररोडवरील आनंदवली गावात मुख्य रस्त्यालगत गाळे प्रकल्प साकारला असून, त्याच्या बाजूलाच चिल्ड्रेन पार्कसाठी जागा आरक्षित आहे. मात्र, या जागेवर आता झोपड्यांचे अतिक्रमण फोफावले आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकीकडे पार्कच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण झालेले असतानाच दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने येथे उभारलेले गाळे आजही धूळ खात पडून आहेत. त्यामुळे महापालिकेचा आणि पर्यायाने नागरिकांकाच पैसा पाण्यात गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, आता आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

आनंदवली येथे धूळ खात पडलेल्या शॉपिंग सेंटरच्या बाजूस सर्व्हे नंबर २८/१/१ ला लागून महापालिका शाळेसमोर पोलिस चौकीमागे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, त्या ठिकाणी महापालिकेने चिल्ड्रेन पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण फोफावले आहे. याबाबत तक्रारी करूनदेखील कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या अतिक्रमणांचा वाहतुकीसही अडथला होत असून, त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने तरी महापालिकेने येथील झोपड्यांचे अतिक्रमण त्वरित हटवून येथे चिल्ड्रेन पार्क साकारावे, अशी मागणी आनंदवलीकर करीत आहेत.

गाळे खुले करण्याची मागणी

महापालिकेकडून स्मार्ट सिटीअंतर्गत वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन नाशिकच्या वैभवात भर टाकली जात असतानाही येथील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. आनंदवली येथे गंगापूररोडलगत वावरे विद्यालयाजवळ कोट्यवधी रुपये खर्च करून चार-पाच वर्षांपूर्वी महापालिकेने शॉपिंग सेंटर बांधले आहे. परंतु, या शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांचे वाटप होऊनही ते बंद स्थितीतच आहेत. त्यामुळे महापालिकेने एवढा खर्च केला तरी कशासाठी, असा प्रश्न आनंदवलीकरांना पडला आहे. या शॉपिंग सेंटरमधील गाळे

लवकरात लवकर खुले करावेत, अशी मागणीही होत आहे.

---

आनंदवलीतील महापालिकेचे गाळे धूळ खात पडून असून, चिल्ड्रेन पार्कसाठी आरक्षित केलेल्या जागेवरही झोपड्यांचे अतिक्रमण झालेले आहे. याप्रश्नी आता आयुक्तांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

-राधा बेंडकुळे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाह सोहळ्यात जीवन संजीवनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नांमधील धांगडधिंगा आणि त्यावर होणारी पैशांची वारेमाप उधळपट्टी समाजाला काही नवीन नाही. परंतु, शुभविवाहाच्या सोहळ्यात जीवन संजीवनीची प्रात्यक्षिके दाखवून नाशिकमधील गुंजाळ आणि पुण्यातील कामठे या सुशिक्षित कुटुंबांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. या एका लग्नाची गोष्ट सध्या शहरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रा. डॉ. बाबासाहेब गुंजाळ यांचा मुलगा तुषार हा सिनेकलावंत असून दिग्दर्शन, संवाद, पटकथालेखन आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कासव' चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केले आहे. त्याचा विवाह पुणे येथील रमेश कामठे यांची सुकन्या शीतल हिच्याशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. लग्नामध्ये होणारा भरमसाठ खर्च आणि अनावश्यक प्रथांना फाटा देऊन त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. तुषार यांचे मोठे भाऊ विशाल हे वेदना निवारण तज्ज्ञ (पेन फिजिशियन) असून, त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून स्वागत समारंभात 'जीवन संजीवनी' हा उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. दोन्ही पक्षाकडील मंडळींनी त्यांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले. नातलग काय म्हणतील ही धास्ती होतीच. परंतु तरीही त्यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके

हृदयविकार किंवा तत्सम अटीतटीच्या वेळी रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंतच्या कालावधीत संबंधित व्यक्तीवर कोणते प्रथमोपचार करावेत याचे प्रात्यक्षिके या जीवन संजीवनी उपक्रमामध्ये दाखविण्यात आली. कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा, छातीवर दाब देऊन हृदयाचे ठोके कसे सुरू करावेत याची माहिती व प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित २०० वऱ्हाडी मंडळींनी पाहिली. 'जीवनसंजीवनी' हा नाशिक भूलतज्ज्ञ संघटनेचा उपक्रम असून तो सादर करण्यासाठी भूलतज्ज्ञ संघटनेच्या डॉ. सरला सैंधानी, सचिव डॉ. राहुल भामरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. नितीन वाघचौरे, डॉ. दिनेश महाजन तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. विवाहाला उपस्थितांनी 'जीवन संजीवनी' आत्मसात करून एका गरजू व्यक्तीचे प्राण वाचविले तरी या उपक्रमाचा उद्देश सफल होईल, अशी भावना यावेळी गुंजाळ कुटुंबियांनी व्यक्त केली.

विवाह सोहळ्यासारख्या शुभकार्यात जीवन संजीवनीचा उपक्रम लोक स्वीकारतील का, याची धास्ती होती. परंतु डॉ. विशाल यांच्या आग्रहामुळे आम्ही हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. उपस्थितांनीही तो कुतुहलाने अनुभवला. अवघ्या २० ते २५ मिनिटांत उपस्थितांना जीवन संजीवनीबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे नवरदेव तुषार यांनी स्वत: ही प्रात्यक्षिके करून पाहिली. जीवन संजीवनीला सर्व स्तरातून प्रतिसाद वाढतो आहे.

- डॉ. राहुल भामरे, सचिव, नाशिक भूलतज्ज्ञ संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेंच्या अटकेवरून तणाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे यांची सभा रविवारी रामकुंड परिसरात आयोजित करण्यात आली होती. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात भिडे यांचे नाव असल्याने या सभेस विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. दुपारी चारच्या सुमारास शालिमार चौकातील आंबडेकर पुतळ्याजवळ २५० ते ३०० कार्यकर्ते जमा झाले. भिडेंना अटक करण्यासह सभा रोखण्याची मागणी आंदोलकांनी करीत रामकुंडाच्या दिशेने कूच केली. त्यामुळे पोलिसांनी नेहरू गार्डन, शालिमार, रविवार कारंजा, सीबीएस, अशोकस्तंभ अशा विविध ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली. तसेच, रामकुंडाच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना रोखले.

पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक पुन्हा आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले. तेथून काही कार्यकर्ते सीबीएस चौकात आले. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. याच दरम्यान जिल्हा कोर्टासमोर एका समाजकंटकाने म्हसरूळला निघालेल्या सिटीबसवर चालकाच्या दिशेने दगड फेकला. यानंतर पेट्रोल असलेली बॉटल फेकून आग लावली. सुदैवाने पेट्रोल जमिनीवरच सांडले. यामुळे अनर्थ टळला. या वेळी प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. विविध शाळा या आठवड्यात सुरू होत असल्याने खरेदीसाठी रविवारी नागरिकांची मोठी गर्दी या भागात झाली होती. दुसरीकडे अधिक महिन्यातील एकादशीचा मुहूर्त साधून रामकुंडाकडे येणाऱ्या भाविकांचे यामुळे हाल झाले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीघ्र कृती दलाचे जवान, दंगल नियंत्रण पथक असा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली तरी रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सिन्नरमधील नगरसेवक श्रीकांत जाधव यांसह त्याच्या कुटुंबातील तीन जणांविरुद्ध भगूर येथील देवानंद घायवटे यांचा छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक झाली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घायवटे यांची कन्या डॉ. कादंबरी योगेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कादंबरी व डॉ. योगेश आनंदा जाधव यांचा २०१२ मध्ये विवाह झला होता. त्यानंतर त्यांना दोन अपत्य झाली. एकत्रित कुटुंबातील पती डॉ. योगेश, सासरे आनंदा जाधव, सासू रमाबाई जाधव, दीर श्रीकांत जाधव जाव शोभा जाधव यांनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी भांडण करून मुले हिसकावून घेत डॉ. कादंबरी यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे त्या माहेरी वडील देवानंद घायवटे यांच्याकडे निघून आल्या. दुसरी बायको करायची आहे, असे सांगून पती व सासरच्या लोकांनी मानसिक त्रास दिला. तसेच डॉ. योगेश व दीर श्रीकांत यांनी भगूरला येऊन शिवीगाळ केली. फारकत दे नाही तर तुझ्या वडिलांना बघून घेईन, अशी धमकी दिली. याचा त्रास झाल्याने वडील २९ मे रोजी घर सोडून निघून गेले. ३१ मे रोजी त्यांचा मृतदेह दारणा नदीपात्रात आढळून आला. वडिलांच्या मृत्यूला सासरची मंडळी कारणीभूत असल्याची तक्रार डॉ. कादंबरी यांनी केल्यानंतर पोलिसांनी जाधव कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचालकाची लहान मुलास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

घंटागाडी चालकाने सिडकोतील दत्त चौकात एका लहान मुलास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाग २९ मधील प्रभागात घंटागाडी (एमएच १५ एफव्ही ०९८४) नेहमीप्रमाणे कचरा गोळा करण्यासाठी आली. अमृत कापसे हा घंटागाडीचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. तसेच कचरा टाकण्यासाठी परिसरातील आलेल्या महिला व नागरिकांना तो शिविगाळ करत होता. त्याचवेळी अविनाश पाटील या एका लहान मुलाने 'घंटा वाजवा' असे सांगितल्याचा त्याला राग आला. त्याने लहान मुलाच्या पोटात लाथदेखील मारली. लहान मुलाची आई वनिता तुलशीराम पाटील यांनी कापसेच्या तावडीतून आपल्या मुलास सोडवले. याबाबतची माहिती नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे यांना कळवली. नगरसेविका राणे घटनास्थळी धाव घेत स्वछता निरीक्षक व घंटागाडी सुपरवायजर यांना या घटनेची तातडीने माहिती दिली. पाटील यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात कापसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषणाची खरी माहिती आवश्यक

$
0
0

जिल्हा परिषद सीईओ डॉ. नरेश गिते यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून, प्रथम कुपोषणाबाबत खरी माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. यासाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून वंचित बालकांचा शोध घ्यावा. त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही डॉ. गिते यांनी केले.

सटाण्यातील नंदनवन लॉन्स येथे आयोजित बागलाण व देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एकत्रित आढावा बैठकीत डॉ. गिते बोलत हेाते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रदीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेलकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील उपस्थित होते.

कुपोषण निर्मुलनासाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले असून, त्यामधून कुपोषित बालकांना आहार व औषधे देण्यात येत आहेत. मात्र, बागलाण व देवळा तालुक्यात सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर मी समाधानी नसून दोन्ही तालुक्यांनी येत्या आठ दिवसांत पुन्हा सर्वेक्षण करून वंचित राहिलेल्या बालकांना शोधून त्यांना केंद्रात भरती करावे, असेही डॉ. गिते म्हणाले. या वेळी डॉ. गिते यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेत गेल्या दोन महिन्यांत नाशिक जिल्ह्याने देशात २२५ वरून १३२ क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्याच्या क्रमवारीत नाशिक जिल्ह्यातील चार तालुके पहिल्या दहांमध्ये असून, त्यात नाशिक प्रथम, त्र्यंबक सहावा, दिंडोरी सातवा व कळवण तालुका आठव्या क्रमांकावर आहे. याबाबत डॉ. गिते यांनी चारही तालुक्यांचे अभिनंदन करून देवळा व बागलाण तालुक्यांनी जलदगतीने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रचना’त आज कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रचना विद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, साने गुरुजींच्या स्मृतिदिनी म्हणजे ११ जून रोजी या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर परशुराम साइखेडकर नाट्यगृहात आज (११ जून) सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके व महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिकचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. शेकटकर अध्यक्षपदी

$
0
0

\Bसीएचएमई सोसायटीवर बिनविरोध निवड \B

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या (\Bसीएचएमई\B) अध्यक्षपदी ले. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची, तर सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड करण्यात आली. रविवारी संस्थेच्या भोसला मिलिटरी स्कूल येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश भिडे, उपाध्यक्ष शैलेंद्र जोगळेकर, सहकार्यवाह सुहास जपे, कोषाध्यक्ष मनोहर नेवे यांची निवड करण्यात आली आहे.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर निवड झालेले हे नाशिकरोड बिटको महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत व्यवस्थापन आणि वाणिज्य विषयातील १० पुस्तकांचे लेखन केले आहे. पंधरापेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंधांचे वाचन केले आहे. सार्वजनिक वाचनालयाचा त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाले आहे.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची ८२ वी सर्वसाधरण सभा भोसलामध्ये पार पडली. संस्थेचे ५५० आजीव सभासद यांनी बिनविरोध निवडलेल्या नाशिक विभागीय समितीची आणि नागपूर विभागीय समितीची घोषणा केली. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या ११ उमेदवारांनी अर्ज भरल्याने सर्वांचा बिनविरोध निवड झाली. संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी सभासदांसमोर संस्थेचा अहवाल मांडला. त्यास एकमताने मंजुरी मिळाली. यावेळी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. के. जी. कुलकर्णी यांनी सभासदांपुढे निवडणूक वृत्तांत मांडला.

पाच वर्षांसाठी निवड

अध्यक्षपदी ले. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, तर कार्याध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी यांच्यासह तेरा जणांची सदस्य म्हणून १० जून २०१८ ते मे २०२३ पर्यंत या पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. एस. जी. नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे, तर नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, कार्यवाह कुमार काळे हे असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेचे अविस्मरणीय लेणे!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

एकीकडे चित्रकारांच्या कलेचं रेखाटन, तर दुसरीकडे शिल्पकलेतून आकार घेणाऱ्या कलाकृती... कुठे शास्त्रीय संगीताचा नजराणा, तर कुठे हटके डान्सचा तडका... परिसंवादातून कलेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करीत काही महत्त्वाच्या विषयांवर होणारे विचारमंथन... कॅलिग्राफीतून उमटणारे अक्षरांचे सौंदर्य अन् मनमोहक कॅरीकेचर पाहण्यात दंग झालेले कलारसिक... असा अविस्मरणीय माहोल होता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'कलासंगम' महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा. रविवारची सुटी आल्याने रसिकांसाठी हा दुग्धशर्करायोगच ठरला.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये रविवारी कलेची खास पर्वणी नाशिककर कलारसिकांनी अनुभवली. यानिमित्ताने 'कलेची साधना आणि आजचा विद्यार्थी', 'वादन- हौस साधना की फॅड', 'छायाप्रकाश : कालचा की आजचा', 'कला आणि व्यवसाय' या विषयांवर परिसंवाद पार पडले. या परिसंवादांत कलेच्या क्षेत्रातील दिग्गजांना संवादकांनी विचारलेल्या प्रश्नांतून कला क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या बाबी प्रकाशझोतात आल्या. तसेच कलासंगममध्ये हौशी कलाकारांच्या कलाविष्कारांचा खास नजराणा नाशिककरांसाठी पेश झाला. यामध्ये तराना कथ्थक, तिल्लाना, भरतनाट्यम, सतार वादन, एकपात्री, नर्तनरंग, कीर्तन तराना, लोकनृत्य, समकाल कथ्थक, तबला वादन, मेलोडिका, पोवाडा, सोलो साँग, पॉप साँग, सेक्सोफोन, ड्युएट यांसारख्या अनेक बहारदार कलांचे सादरीकरण झाले. सर्व परफॉर्मन्सेसना कलारसिकांची दाद मिळत होती. यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रांगणात कॅरीकेचर डेमो, शिल्पकलेतून साकारले जाणारे व्यक्तिशिल्प, निसर्गाच्या छायेत कॅनव्हॉसवर वॉटर कलर पेंटिंग आणि पेन स्केचच्या माध्यमातून साकारले जाणारे निसर्ग चित्र, कॅलिग्राफीमधून मराठी अक्षरांचं सौंदर्य खुलवण्याची कला यासर्वांचे साक्षीदार नाशिककर कलारसिक होत होते. प्रत्येक कलेचा आविष्कार सादर होताना, तसेच तो पूर्णत्वाकडे येताना कलाकारांच्या चेहऱ्यावरील मनमोहक भाव तर कलारसिकांची उत्सुकता आणि आनंद नक्कीच उल्लेखनीय ठरला. कलासंगमचा दुसरा दिवस कलाकार आणि कलारसिक या दोघांच्या दृष्टीने यादगार ठरला. कलाकारांना अतिशय कलामय माहोलात कला सादर करता आली. सोबतीला कलारसिकांची उत्स्फूर्त दाद आणि कलाकारांना मिळणारी पावती प्रेरणादायी होती.

सायंकाळीही कलेची मेजवानी

संध्याकाळी गणेशवंदना सादर झाली. 'पंचतुंड नररुंडमालधर' या गाण्यातून गणेशाला आणि शंकराला नमन करण्यात आले. सोबतच कथ्थक कलेचे बहारदार सादरीकरण झाले. यानंतरचा गायनाचा कार्यक्रम कमालीचा रंगला. संध्याकाळी कलासंगममध्ये सादर झालेल्या सर्व कलाविष्कारांना प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कलासंगमचा समारोप यादगार करण्यासाठी कलारसिक कलेच्या संगमात दंग झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावच्या लेकींना गवसला ‘सूर’

$
0
0

कादवा नदीत गिरवताहेत पोहायचे धडे

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

ग्रामीण भागात स्वमिंग पूल उपलब्ध नसल्यामुळे अनेक मुलींना आवड असूनही पोहण्याची कला शिकता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात विहीर असूनही त्याच्या घरातील स्त्रियांना पोहता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात पोहण्याविषयी एक न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे पिंपळगाव बसवंत महाविद्यालय आणि पिपंगळगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने तसेच अरुण मोरे आणि शारदा मोरे यांच्या विशेष सहकार्याने खास महिला व मुलींसाठी कादवा नदीत पंधरा दिवसांपासून पोहण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. उद्या, मंगळवारी या शिबिराचा समारोप असून अनेक महिला, मुलींना 'सूर' गवसला आहे.

या प्रशिक्षण शिबिरास महिला व मुलींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पंधरा दिवसात अनेक महिला व मुली पोहण्यात पूर्णपणे तरबेज झाल्याने प्रशिक्षण शिबिर यशस्वी झाल्याचे मत सरपंच अलका बनकर, प्राचार्या डॉ. एस. एस. घुमरे, प्रशिक्षक व क्रीडाशिक्षण प्रा. हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. मंगळवारी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप होत आहे. शिबिराचा समारोप होत असला तरी पोहण्याबाबत महिलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास भरला गेला आहे. त्यामुळे यापुढील काळातही या महिलांचा सराव सुरूच राहील व त्यासाठी प्रशिक्षक व संरक्षक साहित्य कायमच उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ज्या महिला व मुलींना दररोज सराव करायचा असेल त्यांनी सकाळी सात वाजता स्विमिंग पॉईंटवर उपस्थित रहावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे.

५० वर्षांची प्रशिक्षणार्थी

या शिबिरात शहर व परिसरातील तब्ब्ल दीडशे महिला व मुलींनी सहभाग नोंदविला. त्यात ५० वर्षांच्या महिलांपासून पाच वर्षाच्या मुलींपर्यंतच्या प्रशिक्षणार्थिंचा समावेश होता. विशेष म्हणजे शिक्षिका, शेतकरी महिला, विद्यार्थिनी आदींची या प्रशिक्षणात संख्या अधिक होती. गेले सोळा दिवस हे प्रशिक्षण सुरू होते.

स्विमिंग पाईंट झाला 'फेमस'

पिंपळगाव बसवंत येथे कादवा नदीच्या तिरावर अरुण मोरे यांचा निसर्गाने नटलेल्या मळा आहे. या मळ्यातूनच निसर्ग न्याहाळत स्विमिंग पॉईंटकडे जाता येते. मोरे दाम्पत्याच्या सहकार्याने मुलींना नदीन उडी मारली आहे. रबरी टायर, रबरी पॅड या संरक्षक साहित्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीची झाडे नदीस घातक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नदीचे स्वतःचे असे हक्क आणि कर्तव्ये आहेत. आपण तिच्या हक्कांवर आणि कर्तव्यांवर घाला घालीत आहेत. नदीपात्रातील काँक्रिटीकरणामुळे नदीची जैवविविधता नष्ट होत आहे. गोदेभोवती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच झाडे लावली पाहिज्त. चुकीचे झाड लावल्यास नदीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. नदी ती झाडे स्वीकारत नाही, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासिका कीर्ती अमृतकर यांनी केले.

वारसा व रिकनेक्टिंग विथ गोदावरीतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेण्यात येणाऱ्या गोदावरी परिक्रमेंतर्गत सातव्या परिक्रमेत त्या बोलत होत्या. या परिक्रमेप्रसंगी रिकनेक्टिंग विथ गोदावरीच्या शिल्पा डहाके, वारसाचे नीलेश गावंडे, अमोल पाध्ये, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.

परिक्रमेच्या माध्यमातून गोदावरी नदीला समजून घ्यावे, तिच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी किती गरज आहे, याबाबत जनजागृती निर्माण करता येईल. सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत नदीकाठावर, तसेच पात्रात झाडे लावण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी योग्य ती झाडे लावण्याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. आधीच गोदावरीच्या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गोदेच्या पर्यावरणाला वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. शिल्पा डहाके यांनी परिक्रमेचे संचालन केले. नीलेश गावंडे यांनी प्रास्ताविक केले.

--

ही झाडे ठरतात उपयुक्त

नदीभोवती कोणती झाडे लावावीत व कोठे लावावीत, याबाबत अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की नदीच्या काठावर कोणती झाडे लावावीत याचे ठोकताळे ठरलेले आहेत. नदीभोवती जांभूळ, पानजांभुळ, वाळूंज, उंबर, करंज, कदंब, भोकर ही झाडे लावावीत. त्यांचे पालन व्हायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे जीपीएफ खाते लवकरच ऑनलाइन

$
0
0

नाशिकच्या शिक्षकांनीच बनवली वेबसाईट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भविष्य निर्वाह निधी खात्याच्या लेखचिठ्ठ्या मिळविण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या जाचातून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कायमची सुटका होणार आहे. या शिक्षकांना आता आपल्या जीपीएफ खात्याची माहिती घरबसल्या आपल्या स्मार्ट फोनवर मिळणार असून, पीएफ स्लीपही काढता येणार आहे. या योजनेचा फायदा जिल्ह्यातील सुमारे १७ हजार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासाठीची वेबसाईट जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनीच तयार केली आहे. अशा प्रकारची वेबसाईट तयार करून शिक्षकांचे जीपीएफ अकाउंट ऑनलाइन करणारा नाशिक हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार आहे.

जीपीएफ खात्यावर जमा रकमांची माहिती मिळविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी मोठे जिकिरीचे काम होते. कित्येक शिक्षकांना जीपीएफ खात्याच्या स्लिपा वर्षानुवर्षे मिळणेही मुश्किल होते. काही शिक्षकांना शिक्षण संस्थाचालकांच्या ससेमिऱ्याचाही सामना करावा लागत होता. मात्र, आता या सर्व त्राग्यातून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कायमची सुटका झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे १७ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीपीएफ खात्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह पथक कार्यालयाने जिल्ह्यातील दाभाडी येथील किसन जयराम निकम विद्यालयातील शेखर ठाकूर आणि संदीप ठोके या शिक्षकांच्या सहकार्याने एक स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता येथून पुढे त्यांच्या जीपीएफ खात्याची माहिती घरबसल्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वेतनपथक करणार खातरजमा

वेतन पथक कार्यालयामार्फत शिक्षकांच्या जीपीएफ अकाउंटची माहिती वेबसाईटवर लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिक्षकांची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेतूनच भरली जाणार आहे. वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या माहितीची वेतनपथक कार्यालयाद्वारे खात्री केली जाणार आहे. या वेबसाईटवर अपलोड केलेली माहिती संबंधित शिक्षकांना घरबसल्या स्मार्टफोनवरही बघता येणार आहे. या वेबसाईटच्या कामकाजाचे सादरीकरण राज्याच्या शिक्षण संचालकांसमोरही करण्यात आले होते.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जीपीएफ अकाउंट लवकरच ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी www.pyunitsecnsk.in ही वेबसाईट विकसित केली आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची माहिती या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

- उदय देवरे, अधीक्षक, वेतन भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय, जि. प. नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>