Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बिबट्या जेरबंद

$
0
0

सिन्नर : पांढुर्ली या गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली होती. मागील आठवड्यात विंचूरदळवी येथे एक वासरू बिबट्याने फस्त केल्याने शेतकरी वर्गात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने गुरुवारी सकाळी निवृत्ती वाजे (रा . पांढुर्ली) यांच्या गटात पिंजरा लावला असता, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षेच्या बडग्याप्रमाणेच कामकाजही व्हावे गतिमान

$
0
0

सरकारी कर्मचाऱ्यांना कामकाजादरम्यान मारहाण केल्यास पाच वर्षांचा कारावास होणार असल्याचा कायदा झाला, याचे सर्वसामान्य स्वागत करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिक सरकारी कार्यालयात जाताना अगोदरच धास्तावलेला असतो. आपले काम होईल की नाही, अशी त्याची त्यालाच शाश्वती नसते, तर तो हाणामारी करेल कशाला? दलाली करणारे अथवा गुंडगिरीचा धाक दाखवत नियमबाह्य काम करून घेणारे सर्वत्र आढळतात. अशा अपप्रवृत्तींना यामुळे काही प्रमाणात आळा बसू शकेल. या कायद्याचा उपयोग अशा अपप्रवृत्तींना प्रतिबंध करण्यासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केवळ कायदे निर्माण करून आणि कठोर शिक्षेची तरतूद केल्याने सुशासनाचा प्रश्न सुटणार नाही, तर गतिमान कामकाजालाही प्राधान्य द्यावे, असे मतदेखील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

--

सुसंवाद टिकविण्याची गरज

सरकारने केलेल्या कायद्याचे स्वागतच करायला पाहिजे. नोकरी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यास संरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र, हाणामारीपर्यंत वेळ येईल अशी वर्तणूक सरकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित नाही. जनतेची कामे वेळेवर झाली, तर संघर्षाचे प्रसंगच निर्माण होणार नाहीत. नागरिक आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद टिकविण्यासाठी कामांचा निपटारा वेळेवर होणे आवश्यक आहे.

-सागर उजे

वेळेवर व्हावीत नागरिकांची कामे

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांचा येणारा अनुभव चांगला नसतो. वेळेत काम न होणे, वारंवार पाठपुरावा करूनदेखील पदरी निराशा येणे यामुळे नागरिकांचा संताप अनावर होऊन संघर्ष होण्याची शक्यता असते. अर्थात, नागरिकांनी कायदा हाती हाती घेऊन हाणामाऱ्या करणे योग्य नाही, तसेच नागरिकांची कामे झाली पाहिजेत याचादेखील विचार सरकारने करायला हवा.

-योगेश महाले

पडताळणीसाठी हवी सक्षम यंत्रणा

सरकारी कर्मचाऱ्यांबाबत झालेला कायदा चांगला आहे. परंतु, जशी नाण्याला दुसरी बाजू असते तशी ती या कायद्याबाबतदेखील असायला पाहिजे. कर्मचारी अथवा अधिकारी यांच्या बाबत झालेल्या प्रकाराची सत्यता पडताळून पाहण्यासाठी यंत्रणा सक्षम असायला हवी. अन्यथा हा सर्वसामान्य नागरिकांबाबत अन्याय ठरेल आणि नागरिकांची सहज होणारी कामे होणार नाहीत, अशी शक्यता वाटते.

-देवीदास नारळे

गैरवापर रोखण्याचे आव्हान

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना निर्धोक वातावरणात काम करण्यासाठी त्यांच्या संरक्षणाचे कायदे पूर्वीपासून आहेत, त्यात गैर काही नाही. मात्र, आता नव्या कायद्याने शाळा प्रवेश, दवाखान्यांतील उपचार अशा काही गरजेच्या कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंध येतो, त्यांची या कायद्याचा आधार घेऊन पिळवणूक होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

-दीपक लढ्ढा

बाजू मांडण्याची मिळावी संधी

नागरिकांना आपली कामे करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अनेकदा कर्मचारी व नागरिकांत शाब्दिक खटके उडतात. काही वेळेस संताप आनावर झाल्यास हाणामारीही होत असेल. मात्र, त्याकरिता विनाजामीन अटक आणि पाच वर्षे तुरुंगवास ही शिक्षा जास्तच आहे. या शिक्षेची तरतूद कमी करून नागरिकांना बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे.

-योगेश घागरे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपणार चिमुकल्या पायांचे ठसे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शुक्रवारी शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रमदेखील जिल्ह्यात राबविण्यात आला. हे ठसे जपले जाणार असून, शाळा सोडताना विद्यार्थ्याला ते दिले जाणार आहेत. विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, लेझीम पथक, बैलगाडीतून मिरवणूक यामुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते.

या सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण दराडे, जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. राज्यात नाशिक जिल्ह्यातच अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

प्रवेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात ११ जूनपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सर्व गावांमध्ये मशालफेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीदेखील नाशिक तालुक्यातील शिंदे गावात मशाल फेरीत सहभाग घेतला. ग्रामस्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, मोफत पाठ्यपुस्तके वितरण नियोजन, शाळाबाह्य मुलांच्या भेटी, गाव दवंडी, मशाल फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करून वातावरणनिर्मिती करण्यात आली. या सोहळ्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरून संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनी शाळांना भेटी देऊन या उपक्रमात सहभाग घेतला.

शेवग्याच्या झाडांची लागवड

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उप्रकमांबरोबरच शेवग्याच्या झाडांच्या लागवडीचा उपक्रम घेण्यात आला. डॉ. गिते यांनी कुपोषण निर्मूलनासाठी शेवगा लागवड करण्याचे आवाहन करून जिल्हा शेवगामय करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार शुक्रवारी शाळा व अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या झाडांची लागवड करण्यात आली.

मुलांमध्ये रमले अधिकारी

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. नव्यानेच शाळा व अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या शैक्षणिक पर्वातील पहिल्या पावलाचे साक्षीदार होण्यासाठी व या मुलांना प्रोत्साहन व आशीर्वाद देण्यासाठी हे अधिकारी मुलांमध्ये रमल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील रामरावनगर शाळेत भेट देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी निफाड तालुक्यातील ओझर शाळेला भेट देऊन आपला सहभाग नोंदविला. जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे येथील मुलांसोबत शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. पोलिस अधीक्षक प्रवीण दराडे यांनी नाशिक तालुक्यातील पिंप्री सैय्यद येथील शाळेमध्ये उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’ शाळांचा दर्जा वाढवणार

$
0
0

सीईओ डॉ. नरेश गिते यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत असून या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षकाने शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व सुसंस्कृत पिढी तयार करणेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

घोटी (ता. इगतपुरी) येथील रामरावनगर भागातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोस्तव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकार, गट विकास अधिकारी किरण जाधव, सरपंच कांदाबाई बोटे, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार, गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गिते यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. डॉ. गिते यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्याने स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. रामरावनगर येथील अंगणवाडी केंद्रास डॉ. गिते यांनी भेट देऊन तेथे सुरू असलेल्या बालग्रामविकास केंद्राची माहिती घेतली. या केंद्रात २ तीव्र कुपोषित बालक उपचार घेत असून त्यांच्या वजनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्यांकडून वाहनचोरी

$
0
0

तिघा जणांच्या टोळीकडून १८ दुचाकी जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका संशयिताच्या अटकेने वाहनचोरीचाही भांडाफोड करण्यात अंबड पोलिसांना यश मिळाले आहे. तिघा सराईतांच्या टोळीने शहरातील तब्बल १८ दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांकडून घरफोडीतील मुद्येमालासह आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित दुचाकींचा शोध सुरू असून, पुरावा मिटवण्यासाठी संशयितांनी चार दुचाकी विहिरीत फेकल्या आहेत.

विजय केशव गुप्ता (२१), प्रशिक उर्फ भुऱ्या बाळू भरीत (१९, दोघे रा. वरचे चुंचाळे) व नवनाथ उर्फ डॉलर रामदास साळवे (१९, रा. आंबेडकरनगर, चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की अंबड एमआयडीसीतील क्लॅरिऑन इंजिनीअर्स अ‍ॅण्ड टेक एलएलपी कंपनीत शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. ही घटना शनिवारी (दि. ९) रात्री घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित विजय गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दुचाकीचोरीचा भांडाफोड झाला. त्यानुसार तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. संशयितांनी विविध भागातून १८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील आठ दुचाकी चुंचाळे येथील पांजरपोळच्या शेतातून जप्त करण्यात आल्या. तसेच सहा दुचाकी इतरांना वापरण्यासाठी देण्यात आल्या असून, त्या लवकरच जप्त केल्या जाणार आहेत.

इतर ठिकाणचे गुन्हे उघडकीस

संशयितांच्या अटकेने अंबडचे दोन, तसेच इंदिरानगर, मुंबईनाका आणि सातपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, सहायक आयुक्त सचिन गोरे, अशोक नखाते, निरीक्षक सोमनाथ तांबे आदी उपस्थित होते. उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, हवालदार मल्ले, पोलिस नाईक दत्तात्रेय गवारे, दुष्यांत जोपळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, शिपाई हेमंत आहेर, दिपक वाणी, विपूल गायकवाड, मनोहर कोळी, प्रशांत नागरे आदींच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधुभावातून वाढेल धर्माची शान

$
0
0

ईद-उल-फित्रनिमित्त नमाज अदा; सर्व धर्मियांकडून शुभेच्छांचा वर्षाव

टीम मटा

देशाची सुरक्षा, धर्मावर येणारे संकट, अतिवृष्टी यापासून आपले संरक्षण व्हावे तसेच आपसाआपसात बंधुभाव वाढीस लागून धर्माची शान जोपासण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहिले पाहिजे. रमजान हा पवित्र महिना असल्याने कोणाकडून काही चुकी झाली असल्यास त्याला माफी द्यावी, अशी मुस्लिम बांधवांनी शनिवारी अल्लाहकडे प्रार्थना केली.

देवळाली कॅम्प : वडनेर रोडवरील इदगाह मैदानावर मौलाना सादिक अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली तर भगूर येथे हाफिज इकबाल दाऊद यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता व समृद्धीसाठी नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना खैरात वाटप केली. एकमेकांची गळाभेट घेत सर्व धर्मियांनी शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानाच्या प्रवेशद्वारावर शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, तहसीलदार राजश्री अहिरराव, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, विलास धुर्जड, चंद्रकांत गोडसे, हनुमंता देवकर, रवींद्र भदाणे, संजय गोडसे, नितीन गायकवाड,छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सैय्यद आदी उपस्थित होते.

शिर्खुमाची मेजवानी

सातपूर : रमजान ईदनिमित्त सातपूरकरांना शनिवारी शिर्खुमाची मेजवानी मिळाली. नगरसेवक तथा मनसे गटनेता सलिम शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी आप्तेष्टांना बोलवत शिर्खुमाचा पाहुणचार दिला. सातपूरला रजविया मशिद व अंबडलिंकरोवर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, भाजपा युवा मोर्चाचे नितीन निगळ, अरुण काळे, भिवानंद काळे, राजेश दराडे यांच्यासह सातपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र कुटे उपस्थित होते.

नाशिकरोडला उत्साह

जेलरोड : देवळालीगाव, विहितगाव येथील मुख्य ईदगाह मैदान, उपनगर मदरसा, अंजुमन फैजाने हजफिया नुरी ट्रस्ट मदरसा मंगलमूर्तीनगर, कौनेस मदरसा डी. डी. पी नगर, अशफिया गुलशने चित्तीया कॅनालरोड, विहितगाव मशिद, देवळालीगाव मशिद, सोमाणी गार्डन मशिद, रोकडोबावाडी मशिद, जामा मशिद मरकज, मसजिद-ए-नूरिया व मदरसा गोसावी वाडी, सुन्नी मसजिद-ए-नुरिया जियाउद्यीन डेपो, नूर-ए-महम्मदिया मशिद शिंदे, अश्रफिया मशिद व मदरसा अरिंगळे मळा, चाँदतारा मशिद चेहेडी, महम्मदिया सुन्नी मसजिद जाखोरी, इमाम अहमद रजा मशिद सिन्नरफाटा, अक्रम-ए-मदरसा मगर चाळ येथे सामूहिक नमाज पठाण झाले.

नेतेमंडळींची गर्दी

आमदार योगेश घोलप, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, पंढरीनाथ ढोकणे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, केशव पोरजे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, माजी महापौर नयना घोलप, मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, प्रकाश करोडे, कैलास आल्हाट, भैय्या मणियार, ऱफीक शेख आदींनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

कारागृहात ईद

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी रमझान ईद उत्साहात साजरी केली. यानिमित्त मौलवींच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाले. मौलवींनी बंद्यांना मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर, कारागृह कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, तात्या निंबाळकर, डॉ. ससाणे, संतोष कोकणे, निमजे आदी उपस्थित होते. यावेळी नमाजींना शिर्खुमा वाटप झाले. राजकुमार साळी यांनी बंदीजनांना शुभेच्छा दिल्या.

पूर्वजांचे स्मरण

नाशिकरोड : रमजान ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आल्यानंतर शेजारील कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांना पुष्प अर्पण करुन मुस्लिम बांधवांनी आदरांजली वाहिली. दरम्यान, शहर पोलिस दलाच्या वतीने पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, प्रभाकर रायते यांच्यासह नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोहर कोरडे, व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, मनसेचे प्रकाश कोरडे, शाम गोहाड आदींनी गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नवनाथ पंथीयांच्या शुभेच्छा

पंचवटी : नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवाना पुष्प वाटून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बर्वे, उपाध्यक्ष जालिंदर कानडे, रजनीकांत पवार, सचिव चेतन कानडे, जालिंदर जाधव, रोहित कानडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेववाडी झोपडपट्टीला दिलासा?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरची महादेववाडी झोपडपट्टी अनधिकृत ठरवून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने झोपडपट्टी हटविण्याची कारवाई सुरू केल्याने येथील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, राज्य सरकारने पावसाळ्यात निवासी भागातील अतिक्रमण काढू नये, असा आदेश काढला आहे. त्यामुळे तूर्त तरी किमान चार महिने येथील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सातपूरच्या महादेववाडीतील झोपडपट्टीमधून पंधरा मीटर डीपी रस्ता जात असून, रस्त्यावरील झोपडपट्टीत ६७ झोपड्या, तर एक बुद्धविहार आहे. न्यायालयाने ही झोपडपट्टी हटवून रस्ता तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने झोपडपट्टी हटविण्यासाठी रेखांकन केले. त्यापूर्वी ऑक्‍टोबर २०१३ मध्ये अतिक्रमणात येणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बाधितांची यादी तयार केली. त्याचाही लाभ यांना देण्याचे प्रयत्न झाले. त्यातील काहींकडे पुरावे असल्याने घरकुल योजनेत लाभ मिळाला, तर काहींकडे पुरावेच नसल्याने ते अद्याप या झोपडपट्टीत राहत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने मार्च २०१८ मध्ये रस्त्यात येणाऱ्या झोपड्या काढण्याचे आदेश देत लाल फुल्या मारल्या. एप्रिल २०१८ मध्ये महापालिकेने पुनर्वसन करण्याची मागणी झोपडपट्टीतील नागरिकांनी केल्यानंतर महापालिकेने रहिवाशांशी पत्रव्यवहार करीत घरकुल योजनेत सहभागी होण्यासाठी रहिवासी पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, झोपडपट्टीतील अवघ्या चार कुटुंबांना रहिवासी पुरावे सादर करता आल्याने महादेववाडीतील झोपडपट्टीधारकांना महापालिकेने जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, संबंधित रहिवाशांनी नोटिसा स्वीकारल्या नसल्याने महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. सध्या बंदोबस्त मिळाला नसल्याने ही कारवाई करता आली नाही, तर दुसरीकडे चार महिने अतिक्रमण काढता येत नसल्याने त्यांच्यावरील कारवाई तूर्तास चार महिने थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विकास कर्मचारी संघटनेचा आज मेळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावा रविवारी (दि. १७) पेठ रोडवरील आर. टी. ओ. ऑफिस शेजारील एकलव्य शाळेत होणार आहे. यात शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत निर्णायक भूमिका घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांचा मेळाव्यात सहभाग असेल.

शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी पाच अशी करावी, आदिवासी विकास विभागातील शिक्षक संवर्गातील नियतकालिक रखडलेल्या बदल्यांबाबत भूमिका घेणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना डी.सी.पी.एस. योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात यावी, शालेय शिक्षण व वसतिगृह विभाग स्वतंत्र करण्यात यावा यासह काही विषय या मेळाव्यात घेण्यात येणार आहे.

मेळाव्यात या महत्त्वपूर्ण विषयांसह इतरही विषयांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवारी करणारे सर्व उमेदवारांना एकाच मंचावर आमंत्रित केले जाणार आहे. आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित कर्मचारी वर्गाच्या व विभागातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नाशिक विभागीय मेळावा होत आहे.

नाशिक विभागात २१७ शासकीय आश्रमशाळा असून २११ अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहेत. नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे,यावल आणि राजूर या सात आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत आश्रमशाळांच्या समस्यांवर २५ वर्षांपासून कर्मचारी संघटना कार्यरत आहे. शासनमान्यता प्राप्त असलेल्या या संघटनेची नाशिक विभागातील शिक्षकांनीही दखल घेतली आहे. विभागात होणाऱ्या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत संघटनेने संघटित आणि निर्णायक भूमिका पार पाडावी, असा निर्णय नाशिक येथे झालेल्या बैठकीत संघटनेने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्याप्रकरणी पाचही सावकार अटकेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेकायदा कर्ज वसुलीच्या त्रास देऊन दाम्पत्यास आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या पाचही संशयित सावकारांना अटक करण्यात आली. या सर्वांना सोमवारपर्यंत (दि. १८) कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

खासगी सावकारांच्या बेकायदा पैसा वसुलीने त्रस्त झालेल्या वासुदेव अंबादास जाधव (३८) आणि संगिता वासुदेव जाधव (३४, दोघे रा. अष्टविनायकनगर, कमल रेसिडन्सी, सिडको) या दाम्पत्याने शुक्रवारी (दि. १५) दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी दाम्पत्याने पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिट्टी लिहिली. यात दाम्पत्याने घेतलेले कर्ज आणि दिलेले पैसे याचाही तपशील नमूद केला होता. त्यानुसार पोलिसांनी राहुल जाधव (२६, रा. साईजीत रो हाउस, शुभम पार्कमागे, गजानननगर), अमोल मंगेश सोनवणे (२८, रा. फ्लॅट १७, बिल्डींग १, शुभम पार्क, अंबड लिंकरोड), अशोक केदू होळकर, सुनील पुरकर आणि प्रवीण भाऊ (वेदमंदिर) अशा पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यातील जाधव आणि सोनवणे वगळता अंबड पोलिसांनी तिघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली. तर, जाधव आणि सोनवणे यांना क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास इगतपुरीतील जोगेश्वरी अपार्टमेंटमधून ताब्यात घेतले. या पाचही संशयितांना कोर्टात दुपारी हजर करण्यात आले. कोर्टाने सर्व संशयितांना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत बोलताना अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले की, संशयित आणि जाधव दाम्पत्य यांच्यात झालेल्या व्यवहाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार कागदपत्रे जप्त करणे आणि बँके खात्यांचे तपशील जमा केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचा शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रमजान ईदचे पर्व उत्साहात साजरे होत असताना शनिवारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनने हलकासा शिडकावा केला. यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

नाशिकमध्ये पावसाचे आगमन झाले असले तरी अद्याप तो हवा तसा बरसलेला नाही. जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली. शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास पावसाने हलकासा शिडकावा केला. मात्र, काही मिनिटांतच तो थांबला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींनी शहराच्या बहुतांश भागात हजेरी लावली. त्यामुळे बेसावध नागरिकांची धांदल उडाली. अवघ्या १५ ते २० मिनिटांतच पावसाने विश्रांतीही घेतली. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी २२ जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शनिवारी कमाल तापमान ३१, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शहरात १ जूनपासून आजपर्यंत ३७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात शनिवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत अवघ्या ०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली. १४ जूनला अवघ्या दोन तासांत ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तुलनेने यंदा पाऊस अजूनही बरसलाच नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्र्यंबकेश्वर येथेही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी होती. अचानक आलेल्या पावसाने त्यांची चांगलीच तारांबळ उडविली. हवेतही गारवा निर्माण झाला.

विजेचा लपंडाव

पावसाचे आगमन होते न होते तोच शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला. पावसाचा शिडकावा झाल्यानंतर शहरात अनेक भागांत वीज गूल झाली. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. शहरासह त्र्यंबकेश्वरमध्येही विजेचा लपंडाव सुरू असल्याचा अनुभव रहिवाशांनी घेतला. पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये याकरिता महावितरणला सज्ज राहावे लागणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले. पंचवटी, कॉलेज रोड, सिडको, सातपूर या परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा सावकारी पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सुरू असलेल्या बेकायदा सावकारीचा उद्योग खपवून घेतला जाणार नाही. याबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास अथवा तक्रार द्यायची असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

सावकारांच्या जाचामुळे केवलपार्क येथील पती पत्नीने शुक्रवारी आत्महत्या केल्यानंतर अवैध सावकारीचा व्यवसाय पुन्हा चर्चेत आला. या प्रकरणी पाच सावकारांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले, की खासगी बेकायदा सावकारी खपवून घेतली जाणार नाही. अशा सावकारांबाबत काही माहिती असल्यास अथवा तक्रार द्यायची झाल्यास नागरिकांनी थेट पोलिस स्टेशन किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शहरात जर असे प्रकार सुरू असतील तर ते मोडून काढण्यासाठी पोलिस सर्वोत्परी प्रयत्न करतील, असे आश्वासन डॉ. सिंगल यांनी दिले.

शहरात यापूर्वी बेकायदा सावकरीमुळे अनेक गंभीर गुन्हे घडले असून, यातून सराईत गुन्हेगारांना देखील पैसे पुरविले जातात, हे स्पष्ट झाले आहे. बेकायदा सावकारीबाबत काही वर्षांपूर्वी पंचवटीत मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बरेच वर्षांनी बेकायदा सावकारीचा प्रश्न समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझर विमानतळावर लवकरच कॅफेटेरिया

$
0
0

५०० चौरस फुटाची जागा उपलब्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील नाशिक विमानतळाच्या ठिकाणी लवकरच सुसज्ज कॅफेटेरिया साकारला जाणार आहे. त्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) पॅसेंजर टर्मिनलमधील ५०० चौरस फुट जागा नाशकातील एका केटरर्सला भाड्याने दिली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ओझर येथे एचएएलची मालकी असलेल्या विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल उभारण्यात आले आहे. आता या विमानतळावरुन विमानसेवा सुरू आहे.

एअर डेक्कन कंपनीच्या वतीने गेल्या डिसेंबर महिन्यापासून सेवा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत एअर डेक्कनची नाशिक-मुंबई-नाशिक ही सेवा सुरू आहे. तर, नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा येत्या २१ जूनपासून सुरू होत आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस राहणार आहे. तसेच, जेट एअरवेज कंपनीकडून नाशिक-दिल्ली-नाशिक या सेवेचे उदघाटन झाले आहे. त्यामुळे ही सेवाही १८ जुलैपासून सुरळीतपणे सुरू होणार आहे. दिल्ली सेवा ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस राहणार आहे. दिल्ली सेवा ही १६८ आसन क्षमता असलेल्या बोईंग विमानाद्वारे आहे तर मुंबई व पुणे ही सेवा १६ आसन क्षमता असलेल्या छोट्या विमानाद्वारे आहे. या तिन्ही सेवा पुढील आठवड्यापासून नियमित राहणार असल्याने प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांचाही विचार करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी तिकीट काउंटर, चेक इन आणि चेक आउट एवढ्याच सुविधा आहेत. याठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा अन्य सुविधा नाहीत. मोहाडी गावापासूनही मोठ्या अंतरावर विमानतळ असल्याने प्रवाशांना बाहेर जाऊनही खाद्य पदार्थ आणणे शक्य होत नाही. विमान उशिरा येणे किंवा जाण्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पॅसेंजर टर्मिनल राज्य सरकारने पर्यटन निधीतून साकारले आहे. हे टर्मिनल देखभाल आणि दुरुस्तीसाठी ९९ वर्षांच्या कराराने 'एचएएल'च्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिक येथे वाढत्या विमानसेवेचा विस्तार पाहता एचएएलने आता टर्मिनलमधील ५०० चौरस फुट जागा कॅफेटेरियासाठी भाड्याने दिली आहे. चेक इन काउंटरच्या लगत असलेल्या या जागेत चहा, कॉफीसह विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉल राहणार आहेत. नाशिकच्या एका केटरर्सला ही जागा देण्यात आली असून येत्या काही दिवसातच हा कॅफेटेरिया सज्ज होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.

विमानतळावर कॅफेटेरिया अत्यंत गरजेचा आहे. प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने ही सुविधा नव्हती. आता प्रवासी संख्या वाढल्याने कॅफेटेरियाही उपलब्ध होणार आहे.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

लहान मुले आणि वृद्धही प्रवासात असतात. त्यामुळे विमानतळावर खाद्य पदार्थांचा स्टॉल आवश्यक आहे. ही सुविधा लवकर सुरू करावी.

- नीलेश चव्हाण, प्रवासी

शुभवार्ता ........ फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ कॅफेटेरिया फोटो

कर्तृत्ववानांच्या पाठीवर रोटरीतर्फे कौतुकाची थाप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची सुसंधी लाभली असून, पुरस्कारार्थींनी भावी वाटचालीत आणखी नाव कमवावे, आपल्या शहराचा लौकिक वाढवावा, असे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे स्टेशन कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडिअर पी. रमेश यांनी केले.

येथील रोटरी क्लबतर्फे दर वर्षी देण्यात येणाऱ्या रोटरी व्होकेशनल अॅवॉर्डच्या वितरणावेळी ते बोलत होते. मेसोनिक लॉज सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर क्लबचे सेवानिवृत्त कर्नल अध्यक्ष अशोक शिरगावकर, सचिव राजेश कटारे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रुती मदान आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्ती आणि संस्थांचा दर वर्षी सन्मान केला जातो. यावेळी पुरस्कारार्थींच्या कार्याचा विजय शेट्टी, जय सुंदरामन, डॉ. अलका स्वादी, अश्विनी शिरगावकर आदींनी परिचय करून दिली. डॉ. अरुण स्वादी यांनी सूत्रसंचालन केले. मुरली राघवन यांनी आभार मानले. अॅड. अशोक आडके, कर्नल विनोद मलिक, डॉ. पूर्णेंदू बक्षी, मनोज कल्याणकर, दिनेश कारिया, प्रा. सुनीता आडके, कश्मिरा धवन, कमलेश वर्मा, शशी मदान, संजीवनी बक्षी, संध्या सुंदरामन आदी उपस्थित होते.

...यांचा झाला सन्मान

अनिरुद्ध अथनी (मॅरेथॉन मॅन), अनिता पगारे (महिला सबलीकरण), डॉ. शिरीष घन (अष्टपैलू कामगिरी), गोकुळ लोखंडे (पत्रकारिता), वैभव गागे, प्रेम लुल्ला (सामाजिक कार्य), योगेश गुप्ता (भ्रमणवीर), बुद्धभूषण बोराडे (वक्तृत्व), अक्षय रहाणे (शैक्षणिक), भक्तवत्सलम नायडू (खानपानतज्ज्ञ), सुनीता ताजनपुरे (स्त्री उद्योजक) आदी पुरस्कारार्थींचा ब्रिगेडिअर पी. रमेश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाच्या शांतीसाठी दुआँपठण

$
0
0

मालेगावात रमजान ईद साजरी; येवला, मनमाडला उत्साह

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याची सांगता शनिवारी (दि. १६) झाली. शहरातील बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली.

शहरात रमजान ईदनिमित्त वेगवेगळ्या १८ ठिकाणी सामूहिक नमाज व दुआँ पठण करण्यात आले. कॅम्प रस्त्यावरील मुख्य ईदगाह मैदानावर माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले. या वेळी देशाच्या अमन व शांतीचा संदेश आपल्या मनोगतातून मौलाना यांनी दिला.

मुख्य ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मता चौकात शांतता व एकात्मता समितीतर्फे आमदार मौलाना मुफ्ती यांचा फेटा बांधून सत्कार केला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मनपाचे उपायुक्त राजू खैरनार, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, माजी सभापती प्रसाद हिरे, हरिप्रसाद गुप्ता आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी बोलताना मौलाना म्हणाले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. देशाच्या प्रगतीसाठी मुस्लिम समाज नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. येणाऱ्या काळातदेखील देशात अमन व शांती राहावी सौदाहार्याचे वातावरण राहावे, अशी दुआँ यावेळी मागण्यात आली. तसेच मौलाना मुफ्तींनी धार्मिक संदेश देतानाच सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य केले. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षतोड रोखून वृक्षसंवर्धनासाठी सर्वांची पुढे यावे. लेक वाचवून त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. समाजात, प्रामुख्याने तरुणांमधील वाढती व्यसनाधिनता चिंतेचा विषय आहे. तरुणांनी यापासून दूर राहावे. यासह काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग असून, तेथील स्थानिकांना हक्क मिळावेत तरच शांतता टिकून राहील, असेही ते शेवटी म्हणाले. घरोघरी शिरखुर्म्याचा आनंद घेण्यात आला. हिंदू बांधवांनीदेखील गळाभेट घेत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त वरिष्ठ पोलिस अधिकारी बंदोबस्तावर लक्ष ठेऊन होते. टेहेळणी मनोरे आणि क्लोज सर्किट टीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहातील नियंत्रण कक्षात प्रत्येक हालचाल टिपली जात होती. चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडून 'स्नेहमिलन'

मनमाड : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने ईदच्या निमित्ताने गुलाबपुष्प देऊन स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने मनमाड नगरपालिका परिसरात मुस्लिम समाजबांधवांना गुलाबपुष्प देऊन गळाभेट व स्वागत करून स्नेहमिलन केले. या वेळी शहरप्रमुख मयुर बोरसे, उपप्रमुख जाफर मिर्झा, खालिद शेख, शहर संघटक मुराद शेख, महेंद्र गरुड, वाहतूक सेनेचे अमजद शेख, अंकुश गवळी, स्वराज देशमुख, कासिफ शेख, रिजवान कुरैशी, नितीन जाधव, हेमंत मुदलीयार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख योगेश इमले, उपप्रमुख कयाम सैय्यद, सचिन आव्हाड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवस्थानची नावे करावीत सातबारावरून कमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

श्रीराम व व्यंकटेश बालाजी देवस्थान यांची नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील नावे कमी करण्याचा प्रश्न थेट मंत्र्यांच्या दरबारी पोहोचला आहे.

संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावरील देवस्थानांची नावे कमी करून भोगवट नंबर ३ हा वर्ग काढून तो नंबर १ मध्ये समाविष्ट करीत शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करावे, यासाठी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस प्रीतम आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री पाटील यांनी नाशिक विभागीय आयुक्तांना याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील शिंगवे बहुला, बेलतगव्हाण, विहितगाव, मनोली, सावरगाव, तिरडशेत या गावांतील सर्व जमिनी वंशपरंपरेने शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. परंतु, पेशवेकाळात सदर देवस्थानांची दिवाबत्ती व वार्षिक उत्सव साजरा होण्यासाठी या गावांच्या जमा होणाऱ्या महसुलातून काही रक्कम सरकारने देवस्थानला परस्पर द्यावी, असा आदेश दिला होता. संबंधित देवस्थानाकडून सरकारला येणे असलेली रक्कम रामनवमी उत्सवाच्या खर्चासाठी 'रेव्हेन्यू ग्रँट' म्हणून देण्यात आल्याचे सरकार दप्तरी स्पष्ट उल्लेखित आहे.

सन १९७२ मध्ये दोन्ही देवस्थानांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर आपली नावे लावली. १९९० पर्यंत सदर मिळकत शेतकऱ्यांच्या कब्जात असूनही देवस्थानकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी होत नव्हती अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे बिनशेती करण्यासाठी, खरेदी-विक्री होण्यासाठी कोणताही त्रास होत नव्हता. मात्र, १९९२ नंतर देवस्थानांनी आपला ना हरकत दाखला घेणे बंधनकारक केले. त्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयात बाजू मांडू दिली नाही. याबाबत महसूलमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सूचित केले. शिष्टमंडळात कॅन्टोन्मेंट नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, विक्रांत चांदवडकर, तानाजी करंजकर, विलास धुर्जड, सुनील धुर्जड, शरद पाळदे, राजेंद्र मांडे, संदीप धुर्जड, तुषार बोडके आदींचा समावेश होता.

अभिप्राय सकारात्मक असूनही...

शेतकऱ्यांनी सरकार व जिल्हाधिकाऱ्यांकडे देवस्थानच्या आदेशाविरोधात आर्थिक व्यवहाराबाबत तक्रारी केल्या. विधी व न्याय विभागाने १० मार्च २००३ च्या अभिप्रायात स्पष्ट केले आहे, की सदर जमिनी बिनशेती करणे, खरेदी-विक्री करणे, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणे याकामी सातबारावर असलेल्या देवस्थानांच्या नावात बदल न करता परवानगी देण्यात यावी. त्यासाठी शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, गत चार वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर आदेशाला न जुमानता शेतकरी व जमीन विकासधारकांची गळचेपी चालविली असल्याने मंत्र्यांच्या दरबारी गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात विजेची अशी घ्या काळजी

$
0
0

मटा गाइड

पावसाळ्यात विजेची अशी घ्या काळजी

पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढत असते. ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास शून्य वीज अपघात हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे. तेव्हा अपघातमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी वीजसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी मटा गाइड.

उपकरणांचा पाण्याशी संपर्क टाळा

पाणी हे वीजवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड, विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्याशी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वीज मिटरच्या जागी पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास, मीटरजवळचा मेन स्विच बंद करून महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ओल्याव्याच्या ठिकाणी उपकरणे हाताळताना पायात रबरी चप्पल किंवा बूट घालावा. घरातील ओले कपडे विजेची वायर व तारेवर वाळवण्यासाठी टाकू नये किंवा काही बिघाड दिसल्यास तत्काळ मेन स्विच बंद करावा. एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास त्याला कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजूला करावे, त्वरित कृत्रिम श्वासोच्छ्वास देत रुग्णालयात नेण्यात यावे.

अर्थिंग व घरातील वीज तपासणी व दुरुस्ती

शेतातील व घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अर्थिंग महत्त्वाची आहे. परवानाधारक ठेकेदाराकडून अर्थिंग व वायरिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. अर्थिंग व वायरिंगमध्ये दोष आढळल्यास तत्काळ तो दोष परवानाधारक व्यक्तीकडून दुरुस्त केला पाहिजे. घरात सर्वप्रथम स्विच बोर्डाअगोदर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवणे फार गरजेचे आहे.

अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरमुळे घरातील वायरिंगमध्ये दोष निर्माण झाल्यास घरातील वीजपुरवठा लगेच बंद होतो व होणारी वित्त व जीवितहानी (अपघात) टाळता येण्यास मदत होते. घरातील प्रत्येक स्विच बोर्डापर्यंत अर्थ वायर पोहोचवून जोडणी करावी. इमारतीमध्ये वेगवेगळ्या विद्युतभाराकरिता क्षमतेप्रमाणे मिनीॲच्युर सर्किट ब्रेकर व मेन स्विचचा वापर करावा. त्यामुळे बाधित भागाचा वीजपुरवठा त्वरित बंद होऊन सुरक्षित राहण्यास मदत होते. इतर भागातील वीजपुरवठा सुरू असतो. घरातील जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली, तसेच आवरणाची रोधकक्षमता कमी झालेली वायरिंग तत्काळ बदलण्यात यावी. अर्थिंग वेळोवेळी तपासून घ्यावी.

दर्जेदार उपकरणांचा वापर

फ्रीज, कूलर, मिक्सर, इस्त्री, गिझर, मोटार इत्यादी उपकरणांकरिता थ्री फेज पिन आणि सॉकेटचाच वापर करावा. आयएसआय चिन्ह आणि योग्य दर्जा असलेलीच विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

बांधकाम करताना काळजी घ्या

लघुदाब, उच्चदाब किंवा अति उच्चदाब वाहिनीखाली कोणत्याही इमारतीचे किंवा इतर बांधकाम करू नये, तसेच, इमारत/बांधकाम व वाहिन्यांमध्ये नियमानुसार पुरेपूर आडवे अंतर असायला पाहिजे.

शेतात वीजवापर

जनावरे विजेच्या खांबास, तसेच विजेच्या खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व अर्थिंगची वायर अखंड असावी. पाऊस सुरू असताना विजेचा पंप सुरू अथवा बंद करणे शक्यतो टाळावे. पाऊस सुरू असताना रोहित्र, खांबाजवळ वा वीजतारांखाली थांबणे टाळावे.

संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी तत्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा महावितरणच्या चोवीस तास उपलब्ध मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १९१२ वा १८००-२३३-३४३५ वा १८००-१०२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप

$
0
0

महाराणा प्रताप जयंती

नाशिकरोड : येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तहसीलदार एस. डी. मोहिते यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामनगरवासीयांना मिळाली ‘ओळख’!

$
0
0

योजनांच्या लाभांपासून वंचितांना शिधापत्रिका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव व धुळे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या छोट्याशा रामनगर वस्ती येथील रहिवाशी २०११ च्या जणगणननेपासून अनेक शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहिले होते. नाशिक व धुळे जिल्हा हद्दीवर असल्याने एकप्रकारे सीमावादाचा फटका त्यांना बसला होता. अखेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तत्परतेने या वस्तीवरील नागरिकांना हक्काचे रेशनकार्ड मिळाले आहे.

तालुक्याच्या उत्तरेला धुळे नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर कंधाणे हे छोटेसे गाव आहे. या गावाचाच एक भाग असलेल्या रामनगर वस्ती मात्र दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीत वसलेली असून, जिल्ह्याच्या हद्दीचा गंभीर प्रश्नामुळे या वस्तीवरील तब्बल ७५ कुटुंब २०११ च्या जनगणनेपासून अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित होते. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी नुकतीच रामनगर वस्तीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार विजय चव्हाण, ग्रामसेवक बी. एन. पाटील, एस. बी. थोरकर आदी उपस्थित होते.

या वेळी रामनगरवासियांनी देवरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. या वस्तीवरील सर्व कुटुंब हे कंधाणे गावाचे रहिवासी आहेत. मात्र, सध्या ते धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा गावाच्या गावठाण जागेवर राहतात. त्यामुळे जिल्ह्यांच्या सीमावादात कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो आहे. नागरिकत्वाचा पुरावा असलेले साधे रेशनकार्डदेखील आम्हाला नाही मग आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. देवरे यांनी त्यांची कैफियत शांतपणे ऐकून तत्काळ मालेगाव तालुका हद्दीत येणाऱ्या रहिवाशांना शिधापत्रिका वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच धुळ्याचे तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा करून उर्वरित धुळे जिल्हा हद्दीतील कुटुंबांना शिधापत्रिका देण्याबाबत सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात रामनगरमधील काही कुटुंबाना लगेचच शिधापत्रिकादेखील वाटप करण्यात आल्या. वस्तीवर असलेली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी टँकरची सोय करण्याचेदेखील आश्वासन त्यांनी दिले. देवरे यांच्या तत्परतेने रामनगर वस्तीवरील रहिवाशांना ओळख मिळाली असून, यावेळी रहिवाशांनी देवरे यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेच्या वादातून तरुणीचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागेच्या वादातून एकाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना गंगापूर पोलिस स्टेशनसमोरील कॉलनीरोड भागात घडली. विजय शेषराव वाघमारे (रा. शाहू आंबेडकर कॉलनी, संतकबीरनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित २४ वर्षीय तरुणी पोलिस स्टेशनसमोरील कॉलनी रोडवर तिच्या आई- वडिलांसोबत रस्त्यावर गप्पा मारत उभी असताना ही घटना घडली. संशयिताने जागेच्या वादाची कुरापत काढून आई-वडिलांना शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करीत तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

घरात घुसून महिलेस मारहाण

बेडरूममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलेच्या घरात घुसून दोघा महिलांसह एकाने तिला बेदम मारहाण केली. यात महिलेचा विनयभंग झाला असून, ही घटना सिडकोतील शिवशक्ती चौकात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

शीतल गायकवाड (रा. शनिमंदिर, फुलेनगर), पूजा खंडारे आणि नितीन खंडारे (रा. दोघे शिवशक्तीचौक, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. सरस्वती चौकात राहणारी महिला रविवारी आपल्या बेडरूममध्ये कपडे बदलत असताना शेजारी राहणाऱ्या खंडारे दाम्पत्यासह शीतल गायकवाड या महिलेने पीडितेच्या घरात प्रवेश केला. यावेळी संशयितानी पीडितेस शिवीगाळ केली. तसेच मारहाण करीत घराबाहेर ओढून आणले. यावेळी खंडारे याने पीडितेचा विनयभंग केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

पत्नीस मारण्याचा प्रयत्न

घरगुती कारणातून पत्नीस बेदम मारहाण करीत तिला फिनेल पाजणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झला आहे.

गणेश शंकर कोळेकर (रा. पवारवाडी, सायखेडारोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गणेश आणि पत्नी स्वाती यांच्यात शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी घरगुती कारणातून वाद झाला. वाद विकोपाला गेला असता गणेशने पत्नी स्वातीस बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर फिनेलची बाटली स्वातीच्या तोंडात ओतली. यामुळे त्रास सुरू झालेल्या स्वातीला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वातीवर उपचार सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गणेशला अटक केली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनोने करीत आहेत.

विहिरीत पडल्याने

अंध महिलेचा मृत्यू

शेतात जात असताना विहीरीत पडल्याने ४३ वर्षांच्या अंध महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मोहगाव (ता. नाशिक) येथे घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सत्यभामा विलास म्हस्के (रा. मोहगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सत्यभामा या शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पायी निघालेल्या असताना ही घटना घडली.

पायवाटेने जाणाऱ्या म्हस्के यांना वाटेत आलेल्या विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्या विहिरीत पडल्या होत्या. वेळीच मदत न मिळाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलिस पाटील सोमनाथ टिळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

सातपूरला तरुणीची आत्महत्या

प्रबुद्धनगरमधील १८ वर्षीय तरुणीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सुवर्णा राजू पवार (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १५) दुपारी आपल्या घरी सुवर्णाने अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

..

सावतानगरमध्ये

सात जुगारी गजाआड

सिडकोतील सावतानगर भागात एका घरात सुरू असलेला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत सात जणांना अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सावतानगर परिसरातील बजरंग चौकात एका घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि. १४) रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी अड्डामालक बालू बाबुराव बोमटे आणि त्याचे सहा साथिदार जुगार खेळतांना सापडले. संशयितांच्या ताब्यातून सात हजार ४१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक दोंबाडे करीत आहेत.

मोबाइल लंपास

रस्त्याने फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार त्रिकुटाने पळविल्याची घटना दत्तनगर येथील सुदर्शन कॉलनीत घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश कैलास मोरे (रा. सुदर्शन कॉलनी) या युवकाच्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जेवन आटोपून आदेश आपल्या घरासमोर मोबाइलवर बोलत फेरफटका मारीत असताना चोरट्यांनी संधी साधली. प्रितरंग सोसायटीसमोरून तो पायी जात असताना पाठीमागून डिओ (एमएच १५ एफडब्ल्यू ९१९७) दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेगर करीत आहेत.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images