Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘अलायन्स’ची सेवा पुढील महिन्यात

$
0
0

अहमदाबाद, हैदराबादही होणार कनेक्ट

bhavesh.brahmankar@timesgroup.com

Tweet : @BhaveshBMT

नाशिक : जेट एअरवेज कंपनीने दिल्ली विमानसेवा सुरू केल्यानंतर आता पुढील महिन्यात अलायन्स एअर कंपनीची अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन्ही शहरांपैकी एक सेवा सुरू होणार आहे. अलायन्स एअरच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ओझर विमानतळाला बुधवारी भेट दिली असून सेवा सुरू करण्याबाबत त्यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्लीनंतर आणखी दोन शहरे नाशिकशी विमानसेवेद्वारे जोडली जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत विविध विमानसेवा कंपन्यांना विशिष्ट हवाई मार्ग देण्यात आले आहेत. त्यात एअर इंडिया या केंद्र सरकारच्या कंपनीची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअर या विमान कंपनीला हैदराबाद आणि अहमदाबाद ही दोन शहरे नाशिकला जोडण्याची संधी मिळाली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने उडान योजनेचे हवाई मार्ग जाहीर केले आहेत. त्यानुसार, सहा महिन्यांच्या आत या विमान कंपन्यांनी सेवा सुरू करणे आवश्यक आहे. जेट एअरवेज या खासगी विमानसेवा देणाऱ्या कंपनीने नाशिक-दिल्ली-नाशिक ही सेवा सुरू केल्याने अलायन्स एअर या कंपनीवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे आता त्यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून अलायन्स एअरच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या सुविधांचीही त्यांनी पाहणी केली आहे. त्यातच शुक्रवारी दिल्ली सेवा सुरू झाली आहे. विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनल येथील विविध सुविधाही आता कार्यन्वित झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी अलायन्स एअरने विविध पदांसाठी भरतीची जाहिरातही प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे अलायन्स एअरने विविध पातळ्यांवर तयारी केली असून आता केवळ घोषणा होणे बाकी आहे. या महिन्याच्या अखेरीस त्यासंबंधीची घोषणा आणि तिकिटांचे बुकिंग सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

अशा असतील सेवा

अलायन्स एअरद्वारे हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी ७० आसनी विमानाद्वारे सेवा दिली जाणार आहे. त्यात उडान योजनेअंतर्गत ३५ आसनांचे बुकिंग राहणार आहे. आठवड्यातील सातही दिवस ही सेवा घोषित आहे. कंपनीकडून या दोन्ही शहरांसाठी एकाचवेळी सेवा सुरू होते की एका शहरासाठी याची उत्सुकता आहे. तसेच, या दोन्ही शहरांसाठी थेट सेवा असेल की हॉपिंग याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. मात्र, पुढील महिन्यात ही सेवा सुरू करण्याचे कंपनीने निश्चित केले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रखडलेच्या प्रकल्पांकडे भुजबळांचा मोर्चा

$
0
0

नांदगावच्या पाणीप्रश्नावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदगावसह जिल्ह्यातील पूर्व भागात रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नांदगावमधील चार ठिकाणी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव देऊन २१ दिवस झाले. चार दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक असतानाही हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसल्याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, अशी मागणी करण्यात आली.

बालेकिल्ल्यात दाखल झालेल्या भुजबळ यांनी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, जयवंतराव जाधव, सुधीर तांबे, अपूर्व हिरे, नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

अडीच वर्षानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या भुजबळ यांनी जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प अशा सर्वच समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकीकडे जिल्ह्यातील येवला, नांदगाव, सिन्नर, चांदवडसह पुर्व भागातील बहुतांश गावांमध्ये टंचाईची समस्या भेडसावत असताना जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना रखडल्या आहेत. निम्मा जून उलटूनही पाऊस पडत नसल्याने टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यानंतरही तत्काळ पाणीसाठ्यात वाढणार होणे शक्य नसल्याने ३० जूनला संपणारी टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मुदत आताच वाढवून घ्यावी अशी मागणी यावेळी भुजबळ यांनी केली. याखेरीज मांजरपाडा, पुणेगाव, दरसवाडीसह जिल्ह्यातील सिंचनाच्या व इतर रखडलेले प्रकल्पांची कामे त्वरीत मार्गी लावावीत यासाठीही पाठपुरावा करण्यात आला. जिल्ह्यात वीजेचे ट्रान्सफॉर्मर जळल्यानंतर दोन-दोन महिने ते बदलले जात नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करू अशी ग्वाही भुजबळ यांना दिली.

---

खरिपासाठी कर्ज, खते-बियाणे द्यावेत

खरीप कर्जासाठी दोन हजार कोटींची गरज असून जिल्हा बँकेने केवळ ५०० कोटी कर्जवाटपाचेच लक्ष्य ठेवले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँका,पतसंस्था अथवा खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येऊ नये याकरिता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अधिकच्या कर्जवाटपासाठी राज्य सहकारी बँकेकडे १५०० कोटींची मागणी केली आहे. जिल्हा बँकेची स्थिती बिकट असेल तर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कुठूनही कर्ज उपलब्ध करुन द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९७ बेशिस्तांचे वाहन परवाने निलंबित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेशिस्त वाहनचालकांचे ९७ वाहन परवाने निलंबित करण्यात आले असून, १४३ वाहनचालकांच्या परवान्यांच्या निलंबनाबाबत निर्णय अद्याप प्रलंबित आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे दिसते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर शहर वाहतूक शाखेतर्फे संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होते. दुसरीकडे वाहनचालकास जागेवर दंड भरायचा नसल्यास तो कोर्टात दाद मागू शकतो. अनेकदा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह' अथवा 'ओव्हर स्पीड', अवैध प्रवाशी वाहतूक, 'सिग्नल जम्पिंग' असे गंभीर प्रकारदेखील घडतात. स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा वाहनचालकांचे परवाने वाहतूक पोलिस जप्त करतात. यानंतर तो परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठवला जातो. यंदा वाहतूक शाखेने तब्बल २४० प्रस्ताव आरटीओकडे पाठवले. त्यातील ९७ परवाने वेगवेगळ्या कालावधीसाठी निलंबित झाले आहेत. २०१७ मध्ये वाहतूक शाखेने पाठवलेल्या १३४ प्रस्तावांपैकी १३० परवाने निलंबित झाले होते. याबाबत शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे म्हणाले की, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, मोबाइलवर बोलणे, सिग्नल जम्पिंग अशा कारणांसाठी वाहनचालकाचा परवाना जप्त करण्यात येतो. जप्त परवाना आणि प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जातो. तेथे वाहनचालकाने आपली बाजू मांडल्यानंतर पुढील निर्णय होतो. वाहनचालकाने केलेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून ही कार्यवाही करण्यात येते, असे देवरे यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रक्रियेबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले की, परवाना निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रस्ताव येत असतात. आरटीओतर्फेही सतत कारवाई होत असते. संबंधित वाहनचालकांना बुधवारी आरटीओ कार्यालयात बोलवण्यात येते. त्यांच्यावरील आरोप आणि वाहनचालकाने मांडलेली बाजू लक्षात घेता १५ दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला जातो. अवैध प्रवाशी वाहतुकीच्या प्रकारात तर अनेकदा वाहन परवानादेखील काही कालावधीसाठी निलंबित करण्यात येतो. एखाद्या वाहनचालकाने चार महिन्यांच्या आत तीन वेळा नियमभंग केल्याचे समोर आल्यास त्याचा परवाना रद्द करता येतो. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यातून निर्माण होणारा मनस्तापदेखील टाळता येऊ शकतो, असे कळसकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड भुजबळ स्वागत

$
0
0

'होमग्राऊंड'वर भुजबळांचे स्वागत

येवल्यात मिरवणूक; हजारो कार्यकर्त्यांकडून आतषबाजी

म. टा. वृत्तसेवा, येवला

एक तपाहूनही अधिक काळ विधानसभेत येवला मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतानाच येथील राजकारणासह विकासरुपी हुकमी एक्का अशी ओळख निर्माण केलेल्या आमदार छगन भुजबळ यांचे अडीच वर्षांनंतर शुक्रवारी दुपारी (दि.१५) येवल्यात आगमन झाले. समर्थकांसह हजारोंच्या संख्येने तालुक्यातील जनतेची गर्दी, 'डीजे'च्या साथीने निघालेली मिरवणूक अशा वातावरणात 'होमग्राऊंड' येवल्यात भुजबळांचे जंगी स्वागत करण्यात आले.

'ईडी'च्या कारवाईचा मोठा फेरा, अटक व पुढे त्यातून जवळपास २२ महिन्यांच्या तुरुंगवास, त्यानंतर जामिनावर मुक्तता होताना डॉक्टरांच्या सल्ल्याखातर महिना सव्वामहिन्याची विश्रांतीनंतर छगन भुजबळ येवल्यात येणार असल्याने सकाळी अकरा वाजेपासूनच तालुक्याच्या ग्रामीण भागातून त्यांच्या समर्थकांनी येवल्यातील संपर्क कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. शहरातील महात्मा फुले नाट्यगृहाबाहेरील राज्य महामर्गावर मोठा जनसमुदाय भुजबळांच्या आगमनाची वाट पाहत होता. नाशिकहून येवल्याकडे येणाऱ्या भुजबळांचे मतदार संघातील महामार्गावरील जवळपास सर्वच गावांमध्ये स्वागत करण्यात आले. भुजबळ यांचे दुपारी पावणेतीनच्या सुमारास आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. भुजबळांच्या स्वागतासाठी अश्वधारी रथ तयार ठेवला होता.मात्र, भुजबळांनी या रथात न बसता आपल्या वाहनातूनच उभे राहूनच पुढे मार्गक्रमण करणे पसंत केले.

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, हरिभाऊ जगताप, प्रकाश वाघ, सुनील पैठणकर, बाळासाहेब लोखंडे, राजेश भांडगे, संतोष परदेशी, अरुण थोरात आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

उत्कंठा अन् जल्लोष

भुजबळ यांचे आगमन झाल्यावर त्यांनी स्वागत यात्रेदरम्यान प्रत्येकाच्याच हाती आपला हात देत प्रतिसाद दिला. 'एकच साहेब, भुजबळ साहेब', 'कोण आला रे कोण आला, येवलेकरांचा वाघ आला' आदी ध्वनीक्षेपकावरील घोषणात समर्थकांचा मोठा जल्लोष दिसून आला.

भुजबळ झाले भावूक

भुजबळांचे येवल्यात जंगी स्वागत होताना संपर्क कार्यालाबाहेर भुजबळांनी ध्वनीक्षेपकाद्वारे उपस्थित जनतेशी संवाद साधला. बऱ्याच दिवसानंतरचा येवला दौरा अन् मोठया संख्येने जमलेला जनसमुदाय पाहता यावेळी बोलताना भुजबळ आपल्या भाषणात भावुक झाले होते. माझ्या अडचणीच्या काळात माझ्या पाठिशी आपण उभे राहिलात. या भुजबळाच्या पंखात तुम्ही आशीर्वादरुपी बळ भरले...कुणी म्हणत होते आता भुजबळांचा खेळ खल्लास झाला. मात्र, या कठीण काळात माझ्या पाठिशी येवलेकरांची शक्ती होती. तुमच्याच आशीर्वादाने या छगन भुजबळांचा पुन्हा जन्म झाला आहे, असे बरेच काही सांगताना यावेळी भावनिक झालेल्या आमदार छगन भुजबळ यांचा कंठही दाटून आला होता.

निफाडलाही स्वागत

निफाड : छगन भुजबळ येवला जात असताना त्यांचा निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी रवींद्र पगार, माजी आमदार दिलीप बनकर, अनिल कुंदे, सुभाष कराड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत वाढला विजेचा लपंडाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प शहरात वीजग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार वीज वितरण कंपनीकडून सुरू आहेत. सतत घडणाऱ्या या प्रकारांमुळे देवळालीकर हैराण झाले आहेत. कुठलेही कारण नसताना शहराच्या विविध भागात सर्रासपणे वीजप्रवाह वारंवार खंडित करण्यात येत असल्याचा नागरिकांसह व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. काही भागात दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागत असून, व्यावसायिक व नागरिकांची नित्योपयोगाची उपकरणे खराब होत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. दिवसा अथवा रात्रीदेखील कोणत्याही वेळेस अचानक वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. या प्रकारामुळे नागरिक थेट महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला लाखोल्या वाहत आहेत. या प्रकाराची वीज वितरण कंपनीने गंभीर दाखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

(पेज फोटोशेजारी सिंगल)

--------

बाजार समितीच्या रस्त्यावर कसरत (फोटो)

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाण्यासाठी असलेला दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चागंलीच कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता दुर्लक्षित राहिल्याने त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. पावसाळ्यात येथील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने येथे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

--

डेब्रिस हटवावे

जेलरोड : उपनगर येथील महापालिका शौचालयाचे डेब्रिस हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उपनगरला जाताना जॉगिंग ट्रॅकशेजारील मैदानाजवळ रस्त्याच्याकडेला जुनी शौचालये होती. अनेक नागरिकांनी घरीच शौचालय बांधल्याने, तसेच शेजारीच सुलभ शौचालय सुरू झाल्याने महापालिकेच्या या शौचालयाचा वापर कमी झाला होता. परिणामी महापालिकेने नुकतीच ही शौचालये पाडली. मात्र, त्यांचे डेब्रिस पडून असल्याने या भागाला अवकळा आली आहे. त्यामुळे ते हटविण्याची मागणी होत आहे.

--

स्नानाची गर्दी ओसरली

पंचवटी : अधिकमासानिमित्त रामकुंडावर होणारी स्नानासाठीची गर्दी ओसरली आहे. गोदावरीचे पाणीही कमी करण्यात आलेले आहे. महिनाभर तुडुंब गर्दी असलेला रामकुंड परिसर शुक्रवारी काहीसा सुनासुना झाल्याचे जाणवले. या ठिकाणी होणारा कचराही कमी झाला आहे. पाण्याचा प्रवाह संथ झालेला असून, तुरळक स्वरुपातच भाविक रामकुंडावर स्नान करताना दिसून आले.

--

आज सत्कार सोहळा

जेलरोड : नाथपंथीय गोसावी समाज विकास मंडळातर्फे आज, शनिवारी (दि. १६) विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. जेलरोड-टाकळीरोडवरील शेलार फार्म, मधुबन लॉन्स येथे सकाळी अकराला हा सोहळा होईल. यावेळी वार्षिक सभा होऊन त्यात नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा होईल. दहावी, बारावी, पदविका, पदवीधर व अन्य परीक्षांतील गुणवंतांचा सत्कार होईल. पंधरा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

--

कारवाईची मागणी (फोटो)

जेलरोड : नाशिकमध्ये समाजकार्य करणाऱ्यांवर समाजकंटकांनी हल्ले करणे, त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देणे आदी प्रकार वाढले आहेत. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पर्यावरणप्रेमींतर्फे उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले. जगबिरसिंह, निशिकांत पगारे, भारती जाधव, हेमंत जाधव, सुजोय हणमवार, सुनंदा जाधव आदी उपस्थित होते. निराधार प्राण्यांची सेवा करणारे गौरव क्षत्रिय यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला होता. बेकायदेशीर वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही धमक्या दिल्या जातात. यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

--

कॉमर्सविषयक शिबिर

जेलरोड : पारख क्लासेसतर्फे सिंधी हायस्कूलसमोरील पंडित कॉलनी शाखेत रविवारी (दि. १७) कॉमर्स करिअर मार्गदर्शन शिबिर होणार आहे. अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉमर्समधील करिअरची माहिती, एकूण खर्च, वेळ, निकालाची टक्केवारी, विषयांची निवड व अभ्यासक्रमाची प्राथमिक माहिती, अभ्यासाची पद्धत याबाबत माहिती दिली जाईल. सीए परीक्षेच्या नवीन स्वरुपाबाबत सीए लोकेश पारख माहिती देतील. नावनोंदणीसाठी ९४२२७५२८४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’कडून स्कूलबसची तपासणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शुक्रवारपासून शाळा सुरू झाल्या असल्यामुळे शहर व तालुक्यातील अनके शाळांच्या स्कूलबसची तपासणी करण्यात आली. मालेगाव विभागातील २४५ स्कूलबसपैकी १६७ स्कूलबसची तपासणी झाली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली.

विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने परवाना, वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र मुदतीत असणे आवश्यक आहे. या दृष्टीने वायुवेग पथकाद्वारे स्कूलबसची विशेष तपासणी करण्यात येत आहे. अद्याप देखील अनेक स्कूलबसची तपासणी होणे बाकी आहे. अशा शाळा व वाहन मालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, तपासणी न झालेली वाहने रस्त्यावर आढळ्यास ती जागेवरच थांबवून ठेवण्यात येतील. स्कूलबसधारकांनी आपल्या वाहनाची तपासणी करून घ्यावी अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात येतील असे बिडकर यांनी सांगितले.

स्कूलबसला वाहन करात सवलत

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा व स्कूलबसचे प्रमाण वाढावे यासाठी शासनाकडून वाहन करात मोठी सवलत देण्यात येते. प्रतिवर्षी प्रतीआसन केवळ १०० रुपये दराने वाहन कर आकारण्यात येतो. ज्या शाळांना स्वतः ची स्कूलबस घेणे शक्य नसेल त्या शाळांनी खासगी स्कूलबस मालकांबरोबर करार केल्यास त्या वाहनांना देखील वाहन करात सवलत देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्रुवनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत व्यवस्थापक असलेल्या २५ वर्षीय तरुणाने शिवाजीनगर भागातील ध्रुवनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मयूर अशोक काटे (वय २५, रा. प्रगती शाळेजवळ, अशोकनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत गंगापूर पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ध्रुवनगरमध्ये शारदा आपर्टमेंट या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी (दि. १५) सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास येथील वॉचमनची नजर चुकवून मयूर इमारतीवर चढला. साडेआठ वाजेच्या सुमारास त्याने उडी घेतल्याचे समजताच वॉचमनने गंगापूर पोलिसांना बोलावले. मयूर हा बेळगावढगा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीची कालमर्यादा पाळा

$
0
0

'समाज कल्याण'ला जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यांची व जात पडताळणी प्रमाणपत्राची विद्यार्थ्यांना आवश्यकता भासते आहे. परंतु, हे दाखले देण्यास यंत्रणेकडून विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे वाढू लागल्या आहेत. पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबतची कालमर्यादा पाळावी अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी समाजकल्याण तसेच सामाजिक न्याय विभागाला दिली आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध शैक्षणिक दाखल्यांसह जात वैधता प्रमाणपत्राची मागणी महाविद्यालयांकडून होते. हे प्रमाणपत्र व दाखले सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत नाही. दाखले वेळेत मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. विशेषत: जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांना एक महिना प्रतिक्षा करूनही जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना पुणे-नाशिक महामार्गावरील समाजकल्याण विभागातील जात वैधता प्रमाणपत्र शाखेत हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी प्रमाणपत्र वितरीत होत नसल्याचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ऐकावे लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार आहे त्यांना ते ओळखपत्र दाखवूनही दिले जात नाही. ते पोस्टाने पाठविण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. जातपडताळणी कार्यालयाकडे सादर केलेली अनेक प्रकरणे केवळ कागदोपत्री दाखल करून त्यांच्या रीतसर नोंदी न ठेवल्याने काही प्रकरणे गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. प्रमाणपत्र वितरण विलंबास शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे कारण कर्मचारी देत आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळालेले नाहीत त्यांना प्रकरण जमा केलेल्या पावतीच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश द्यावा व जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करण्यास ८१ दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र वितरणासाठी जी कालमर्यादा ठरली आहे, त्या कालावधीत ही प्रमाणपत्रे वितरित करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोत पती-पत्नीची आत्महत्या

$
0
0

सावकारी जाचातून केले कृत्य

म. टा. वृत्तसेवा, सिडको

व्यवसायासाठी लागणारे कर्ज सावकारांकडून घेतल्यानंतर ते परत करूनही पैशासाठी वारंवार होणार तगादा व मारण्याच्या धमकीमुळे त्रस्त झालेल्या सिडकोतील पती-पत्नींनी शुक्रवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी पाचही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगिता वासुदेव जाधव (३४) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी समाधान प्रभाकर पवार यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अष्टविनायक नगरमधील कमल रेसिडेन्सीत जाधव पती-पत्नी राहत हेाते. वासुदेव हा लेबर कॉन्ट्रक्‍टर होता. त्याने काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे वेळोवेळी परत केल्यानंतरही सावकारांकडून पैशासाठी तगादा सुरू होता. एका सावकाराने वासुदेव याच्या मालकीची दुचाकी सुद्धा हिसकावून घेतली. पैसे परत करण्यासाठी वासुदेवने अजून काही ठिकाणाहून पैसे घेतले. या सर्व प्रकारामुळे जाधव कुटुंबीय तणावात होते. काही दिवसांपूर्वी अपघात होऊन वासुदेव हे गंभीर जखमी झाले होते. अपघाताच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा या सावकारांकडून पैशाची मागणी झाली. या जाचाला कंटाळून पती-पत्नीने शुक्रवारी दुपारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येच्या कारणाची चिठ्ठी आढळून आली आहे. यात अशोक केदू होळकर, सुनील पुरकर, राहुल जाधव, प्रवीण भाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे या सावकारांकडून पैसे घेतले असून ते वेळोवेळी परत केले. परंतु, तरीही त्यांनी खोट्या केसेस करण्यासह मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पवार पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भाजपचे शिक्षक मतदार संघाचे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह संपूर्ण हिरे कुटूंबीय १ ऑगस्ट रेाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे सिडकोसह शहरातील भाजपमधील अनेकजण राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा सुरू झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत आमदार डॉ. अपूर्व हिरे म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भाजपमधून राष्ट्रवादीत जाण्याबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. १ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर येत असून, यावेळी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. आमदार डॉ. हिरे यांनी सिडकोसह नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून मोठी फळी उभी केली होती. सिडकोत अनेक नगरसेवकही त्यांनी निवडून आणले आहेत. भाजपमध्ये सक्रिय असताना मागील काही महिन्यांपासून त्यांनी अचानक कार्यालयावरील भाजपचे फलक काढून टाकले होते. त्याचवेळी पक्षांतर होणार याबाबत चर्चा होती. मात्र, आमदार हिरे यांच्याकडून त्यास कोणतीही पुष्टी मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांसह लोकसभा मतदार संघासह नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या होत्या. भाजपाकडून लोकसभा किंवा विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सुटका होण्यासाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर अद्वय हिरे यांनी आमदार भुजबळ यांची कारागृहात भेटही घेतली होती. त्यामुळे हिरे कुटूंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले.

दोन्ही हिरे आमदारांत लढत

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्यात सुरुवातीपासून मतभेद व गटातटाचे राजकारण होत असल्याचे वारंवार समोर आले होते. त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील दोन्ही हिरेंचा वाद हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. आता आमदार डॉ. हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा केल्याने आगामी काळात दोन्ही हिरेंमध्येच लढत होणार असल्याची चर्चा धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांवर नेम!

$
0
0

'नगररचना'च्या अधिकाऱ्यांनी दडवले स्थगितीचे पत्र; कारवाई अटळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'ग्रीनफिल्ड' लॉन्स प्रकरणात उच्च न्यायालयातील माफीनामा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जिव्हारी लागला आहे. 'ग्रीनफिल्ड' प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा स्थगिती आदेश २१ मे रोजी २ वाजून ५२ मिनिटांनी आलेला असतानाही, 'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी तो पद्धतशीरपणे दडवून ठेवल्याचे दोन दिवसांच्या तपासणीतून पुढे आले आहे. अतिक्रमण थांबवण्याऐवजी आयुक्तांना चक्रव्युहात अडकवण्यासह लॉन्सचालकाचाही गेम करण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याचे मानले जात आहे. बनाव उघडकीस येताच विभागातील अधिकाऱ्यांनी या पत्रावरून एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू केले असून नगररचना सहाय्यक संचालकांसह दोन ते तीन अभियंत्यावर आता कारवाईची होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी आर्थिक व्यवहाराचे केंद्र व सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या नगररचना विभागावर लक्ष दिले. या विभागातील अधिकाऱ्यांसह अभियंत्यानाही कामाला लावत, ऑटो डीसीआरची ऑफलाइन पद्धत बंद केली. अभियंत्यांना प्रत्यक्ष फिल्डवर पाठविले. या विभागातील दलालांची साखळी मोडीत काढत, मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे सत्र राबवले. यामुळे या विभागातील दुखावलेल्या अधिकाऱ्यांनी 'ग्रीनफिल्ड'च्या निमित्ताने थेट मुंढे यांनाच हायकोर्टाच्या चक्रव्युहात अडकविल्याचे आता स्पष्ट होत आहे. 'नगररचना'तील दप्तरदिरंगाईचे नावाने तपासणी करण्यात आली. यातून 'ग्रीनफिल्ड' प्रकरणात 'नगररचना'च्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याचा आल्या. तपासणीनंतर ग्रीनफिल्ड प्रकरण 'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी घडवून आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.

महापालिकेने कारवाई सुरू करताच 'ग्रीनफिल्ड'चे संचालक विक्रांत मते यांनी हायकोर्टात २१ मे रोजी धाव घेतली होती. त्याच दिवशी कोर्टाने स्थगिती दिली. त्यासंदर्भातील वकिलाचे पत्र दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांनी स्वीकारले होते. 'ग्रीनफिल्ड'चे अतिक्रण सायंकाळी साडेचार वाजता काढण्यात आले होते. त्यामुळे पत्र देऊनही अतिक्रमण काढल्याने मते यांनी हायकोर्टात धाव घेतली. कोर्टात २.५२ चे पत्र सादर झाले असताना 'नगररचना' सहसंचालकांच्या अहवालात मात्र दुपारी ३.४५ मिनिटांनी पत्र मिळाल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे रिसिव्ह पत्रावर चुकीची वेळ टाकून आयुक्तांनाच अडवण्याचा डाव होता की अजून दुसरे काही, याबाबत आता तपास सुरू झाला आहे.

म्हणूनच पाटील तणावात

'ग्रीनफिल्ड'प्रकरणात अधिकाऱ्यांचे आर्थिक हितंसंबध असल्याचे उघड होत आहेत. स्थगितीचे पत्र दडवून ठेवत संबंधित लॉन्सचालकाला धडा शिकवण्याचा काही अधिकाऱ्यांचा डाव होता. परंतु, हा डाव त्यांच्याच अंगलट आला आहे. या प्रकरणात माफीनाट्यानंतर आपल्याला लक्ष्य केले जाईल, अशी रवींद्र पाटील यांना भीती होती. त्यामुळेच ते तणावात होते. त्यात नगररचनाच्या एका अधिकाऱ्यांने त्यांना धोक्यात असल्याचा संदेश पाठवला. तणाव अधिक वाढल्याने ते बेपत्ता झाले होते.

खोटा अहवाल बनवला?

'ग्रीनफिल्ड'चे अतिक्रमण २१ मे रोजी काढले जाणार, असे महापालिकेने अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे लॉन्सचालकांने कारवाईपूर्वी स्थगिती आणली. तरीही महापालिकेने कारवाई केली. लॉन्सचालक हायकोर्टात गेल्याने आयुक्तांवरच हे प्रकरण शेकले. झालेला प्रकार अंगलट येऊ नये म्हणून यातून आपली मान सोडवून घेण्यासाठी सहाय्यक संचालक आकाश बागूल यांनी संबधित पत्र दुपारी ३.४५ वाजता मिळाल्याचे सांगून हा अहवाल आयुक्तांना सादर केला. परंतु, हायकोर्टात २.५२ लाच पत्र मिळाल्याचे सांगत, नगरचनाचा सारा बनाव उघडा केला आहे.

तर फौजदारी कारवाई

'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी ग्रीनफिल्ड प्रकरणातील दोन्ही पत्रे अगोदर दडवून ठेवली. त्यातील एक पत्र गुरुवारी सापडले होते. परंतु २.५२ मिनिटांनी स्वीकारलेले पत्र मात्र गायब झाले. यावरून आयुक्तांनी प्रशासनासह नगररचना विभागाला धारेवर धरत २.५२ मिनिटांनी प्राप्त झालेले पत्र एका तासात आले नाही तर थेट फौजदारी कारवाई करू, असा इशारा दिला. आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मात्र तासाभरातच संबंधित पत्र 'नगररचना'कडून प्रशासन उपायुक्तांकडे पोहचले. त्यामुळे 'नगररचना'तील अधिकाऱ्यांनी हा प्रकार मुद्दाम होऊ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तोरस्ती कचराफेक...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई धोरण अवलंबिलेले आहे. आरोग्य व घंडागाडी कर्मचाऱ्यांकडून उघड्यावर कचरा टाकू नये याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणेही सुरू आहे. मात्र, कारवाईचा बडगा उगारून आणि प्रबोधन करूनदेखील सातपूर परिसरात रस्तोरस्ती, मोकळ्या भूखंडांवर उघड्यावर कचराफेक सुरूच असल्याचे चित्र आहे.

परिसरातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा परिसराचे बकालपण वाढवीत असून, तो उचलताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे अशी कचराफेक का होते, याची कारणे शोधून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून रोजच ठिकठिकाणी घाण, कचरा उघड्यावर टाकू नये याबाबत प्रबोधन केले जाते. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून मगच तो घंटागाडी टाकावा, असेही सांगण्यात येते. मात्र, असे असतानादेखील परिसरातील शासकीय व खासगी मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने तो उचलण्याचे काम घंटागाडी कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. महापालिकेकडून उघड्यावर कचराफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. परंतु, ती पुरेशी ठरत नसल्याने अनेक ठिकाणी रोजच उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता अशी कचराफेक करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व्यापक मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

घंटागाडी कर्मचारी हैराण

सातपूर परिसरात खुलेआम होणाऱ्या कचराफेकीमुळे अनेक रस्त्यांच्या कडेला, तसेच मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे दिसून येत आहेत. शासकीय, खासगी भूखंडांवर अशा प्रकारे टाकला जात असलेला कचरा संकलित करण्याचे काम घंटागाडी कर्मचाऱ्यांनाच करावे लागत असल्याने अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याचे हे कर्मचारी सांगतात. मोकळ्या जागेवर घाण, कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई केल्यास नक्कीच आळा बसेल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

भूखंडांवर पार्किंगची अडगळ

सातपूर भागात काही खासगी भूखंडधारकांनी चारचाकी अवजड वाहने पार्क करण्यासाठी जागा दिली आहे. परंतु, संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा साचत असल्याने रहिवाशांना दुर्गंधीचा वास सहन करण्याची वेळ येते. रहिवासी भागाला लागून असलेल्या भूखंडांवर बंद पडलेली अनेक वाहने गेल्या अनेक वर्षांपासून उभी आहेत. संबंधित वाहनांमुळे अनुचित प्रकार घडण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोकळ्या भूखंडांवर अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे.

शासकीय अथवा खासगी भूखंडांवर कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. रहिवासी भागालगत सर्रासपणे खासगी मालकीच्या जागेवर अवजड वाहनांचे पार्किंग केले जाते. या ठिकाणी पडून असलेल्या चारचाकी वाहनांच्या बाजूलाही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याप्रश्नी कारवाई करावी.

-दीपक पटेल, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिका निवडणुकीत काँग्रेसच किंगमेकर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आगामी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष किंगमेकर ठरेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अब्दूल सत्तार यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व संघटनांची आढावा बैठक काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनतंर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सत्तार यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जूनला प्रदेशअध्यक्ष खासदार अशोक चव्हाण जळगाव येथे येणार आहेत. लेवा भवन येथे काँग्रेसचा मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्हा नेत्यांना प्रत्येकी एका प्रभागाची देण्यात येणार आहे. नेत्यांनी त्यांच्या घरातील एक उमेदवार निवडणुकीस उभा करावयाचा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची वरच्या पातळीवर आघाडी झाली आणि तसे निर्णय स्थानिक पातळीवर सोडल्यास येथे निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. ज्यांना गटबाजी हवी त्यांनी पक्षात येवू नये. मी चार नगरसेवकांची जबाबदारी घेतली असून त्यांना निवडून आणणार आहे.

राजू वाघमारे यांनी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा. भाजपचे मंत्रीमंडळ हे भ्रष्टमंत्री मंडळ आहे, असा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी फक्त माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी पूर्ण होण्याअगोदर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. समतानगर मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होवून तिची हत्या झाली आहे. आम्ही त्यापरिवाराचे सांत्वन करण्यास जाणार असल्याचे त्यांनी सांगिलते. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, उदयसिंग पाटील, जिल्हा प्रभारी विनायक राव, सहप्रभारी हेमलता पाटील, शिरिष चौधरी, डॉ. राधेशाम चौधरी, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.

दानवेंना लाख मतांनी पराभूत करणार

काँग्रेसच्या आढावा बैठकित सत्तार यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक लाखाच्या मताधिक्याने पराभूत करण्याचा संकल्प सोडला आहे. जो पर्यंत संकल्प पूर्ण होणार नाही तोपर्यंत डोक्यावरील केस वाढविणार नसल्याने टक्कल ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीपेक्षा एसटी प्रवास महाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी महामंडळाने तिकिटदरात १८ टक्के दरवाढ लागू केल्यामुळे बसच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. इंधन दरवाढ व कामगारांच्या वेतनात वाढ केल्यामुळे हे दर वाढवण्यात आले असून, शनिवारपासून हे दर लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे खासगी बसपेक्षा एसटीचा प्रवास महागडा होणार आहे. या बस दरवाढीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची भिती आता व्यक्त केली जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने वाढवलेल्या या दरवाढीचा सर्वाधिक फटका नव्याने सुरू झालेल्या शिवशाहीला बसणार आहे. ऑक्टोबरमध्ये खासगी बसशी स्पर्धा करण्यासाठी या बसेस सुरू करण्यात आल्यानंतर त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. पण, या भाडेवाढीमुळे त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिकहून आतापर्यंत ६४ शिवशाही बस पुणे, औरंगाबाद, धुळे, व बोरीवली येथे धावतात. तर दोन स्लिपर कोच या नागपूर व कोल्हापूर येथे सुरू करण्यात आल्या. पण, या भाडेवाडीमुळे या मार्गांवरील दरही वाढले असून, पुण्याच्या ३४६ रुपयाचे भाडे आता ४११ रुपये झाले आहे. तब्बल ६४ रुपयाची ही वाढ आहे.

नाशिकहून धावणाऱ्या बसचे दर

सर्वसाधारण बस

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - १९४ -२३०

पुणे- २२५- २६०

औरंगाबाद - २१३- २५५

बोरिवली - १९५- २३०

धुळे - १६९ -२१०

निमआराम बस

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - २६७ -३१५

पुणे- ३०८- ३५५

औरंगाबाद - २९१ - ३४५

बोरिवली - २६७- ३१५

धुळे - २३१ -२७५

रातराणी

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - २३१ -२७५

पुणे- २६६ - ३१०

औरंगाबाद - २५२ - ३००

बोरिवली - २३१- २७५

धुळे - २०० - २४०

शिवशाही

शहर - अगोदरचे दर - वाढलेले दर

मुंबई - ३०१ -३४५

पुणे- ३४६ - ४११

औरंगाबाद - ३२९ - ३७५

बोरिवली - ३०१- ३४५

धुळे - २६६ - ३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसापुरात तृतीयपंथीयांना चोप

$
0
0

मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

तालुक्यातील विसापूर येथे पैसे मागण्यासाठी आलेले सहा तृतीयपंथीय मुले पळविणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला. तृतीयपंथीयांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. आमदार उन्मेष पाटील व मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.

मुक्ताईनगर येथील भीमराव गोपाळराव सांळुखे (वय ४०), मंगल लक्ष्मण शिंदे (वय ४४), गणेश शिवाजी सांळुखे (वय २४), सुरेश तानाजी सांळुखे (वय २२), भवानी भगवान सांळुखे (वय २१), आकाश तानाजी सावंत (वय २१) हे तृतीयपंथीय विसापूर येथे आपल्याने (एमएच १४ बीए ३८३३) पैसे मागण्यासाठी आले होते. कार एका ठिकाणी उभी करून गावात पैसे मागत असतांना ग्रामस्थांना ही मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर उपसरपंच विजय राठोड यांनी मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली. मेहुणबारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ अतिशय संतापलेले असल्याने पोलियांनी तृतीयपंथीयांना ताब्यात घेत ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठा जमाव जमा झाला होता. संतापलेल्या ग्रामस्थांनी तृतीयपंथीयांच्या कारची तोडफोड करून त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. आमदार पाटील यांनी तेथे पोहचत ग्रामस्थांना शांत केले. ग्रामस्थ शांत झाल्यानंतर तृतीयपंथीयांना पोलिसांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली असता तृतीयपंथीयांनी आपण मुक्ताईनगर येथील असल्याचे सांगितले. येथे पैसे मागण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे काही साथीदार आजूबाजूच्या खेड्यांमध्ये फिरत होते. त्यांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. त्यांनी आपले ओळखपत्र, आधार कार्ड दाखविल्यानंतर पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत न्यायालयात हजर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जवसुलीसाठी आता धडक मोहीम

$
0
0

जिल्हा बँकेचे अधिकारी-कर्मचारी जाणार घरोघरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

३१ मार्चपर्यंत अवघी १९ टक्केच वसुली झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अजूनही नाजूकच आहे. त्यामुळे वसुली मोहीम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मैदानात उतरवण्यात आले असून ते तालुका-तालुक्यात दौरे करत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी बँकेचे कर्ज वसुलीचे उर्वरित उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहे.

जिल्हा बँक अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून केदा आहेर यांनी कर्ज वसुलीसाठी धडक मोहीम उघडली. फेब्रुवारीत त्यासाठी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कर्ज वसुलीचे प्रयत्न केले होते. त्यात जंगम जप्तीव्दारे थकबाकी झालेले वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप, मोटरसायकल यांची जप्ती करून सुमारे १२५ वाहनांची जप्तीद्वारे दोन कोटी रकमेची वसुली केली. अखेर वसुलीस पात्र दोन हजार ७६९ कोटी रुपये असतानाच केवळ ६७४ कोटींची वसुली असून ही थकबाकी पोटी अवघी १९ टक्के आहे. तर थकबाकी पोटी आतापर्यंत २६८ कोटी ६० लाखांचे व्याज जमा झाले आहे. जून २०१८ अखेर अधिकाधिक कर्ज वसुलीसाठी २१ जूनपासून परत कर्जवसुली मोहीम राबविली जाणार आहे. जुने तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना प्राप्त १५६ अधिकारान्वये सहकार कायदा १९६० चे कलम १०७ नुसार जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पुढील लिलाव प्रक्रियापर्यंतच्या कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आलेले आहेत. उर्वरित तालुक्यातील ही ऐपतदार थकबाकीदारांवर जप्ती आदेश लवकरच प्रसिद्ध करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच मैदानात उतरवले असल्याची माहिती अध्यक्ष आहेर यांनी दिली आहे.

कर्जमाफीचा लाभ घ्या

सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अतंर्गत मुद्दल व व्याजसह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे आणि ग्रीन लिस्टमध्ये नावे आलेली आहेत, अशा शेतकऱ्यांनी दीड लाखावरील त्याच्या हिश्याच्या रकमेचा भरणा करून कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. या योजने अंतर्गत भरणा केल्यानतर सरकारकडून एक वेळ समझोता योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१ हजार ७०० पैकी केवळ ११ हजार खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. योजनेची अंतिम मुदत ३० जून २०१८ अखेरपर्यंतच असल्याने उर्वरित अधिकाधिक खातेदारांनी लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे असे आदेश अध्यक्ष आहेर यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन विकास शंभर कोटींचा

$
0
0

प्रधान सचिवांच्या उपस्थितीत तत्वत: मंजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेत नाशिकचा समावेश झाल्यानंतर नाशिकच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनी सरसावली आहे. राज्य सरकारचा पर्यटन विभाग आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील ११ पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शंभर कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मार्ट पर्यटन आराखड्यास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्या उपस्थितत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यात पर्यंटन स्थळांच्या विकासासह पर्यंटन माहिती केंद्राचीही उभारणी केली जाणार आहे.

महापालिकेनेही शहरातील पर्यटन स्थळाचे ब्रॅण्डींग करण्यासह पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पावले उचलली आहेत. महापालिका मुख्यालय यासंदर्भात पर्यटन सचिव गौतम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राठोड, आयुक्त तुकाराम मुंढे, स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पर्यटन विभागाचे अधिकारी नितीन मुंडावरे, 'केपीएमजी'चे प्रतिनिधी व पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देशभरात धार्मिक व पौराणिक शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. परंतु, त्या तुलनेत नाशिकचे ब्रॅण्डींग झाले नसल्याने पर्यटक पाठ फिरवतात. त्यामुळे नाशिकच्या पर्यटन विकासासाठी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्मार्ट पर्यटन विकास योजना राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेने पुढाकार घेतला असून स्मार्ट सिटी कंपनी आणि पर्यटन विभागाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. नाशिकच्या पर्यटन विकासासाठी काय करता येणे शक्य आहे. अस्तित्वातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

केंद्र शासनाच्या 'रामायण सर्किट' अंतर्गत नाशिकची अगोदरच निवड झाली असून पर्यटन विभागाच्या पथकाने शहरातील पर्यटन स्थळांची पाहणीही केली आहे. याअंतर्गत रामायण सर्किटशी निगडीत असलेले ११ पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहेत. त्यात काळाराम मंदिर, सितागुंफा, सिताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामकुंड, तपोवन, रामसृष्टी, रामगयातीर्थ, पंचरत्नेश्वर, सिता सरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद, किष्किंदानगरी शुक्लतीर्थ, कावनई कपिलधारा, शूर्पणखातीर्थ या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. रामायण सर्कीट योजनेला चालना देण्याच्या दृष्टीने या पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील आठवड्यात स्मार्ट सिटी व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात यासंदर्भातील सविस्तर आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर स्मार्ट सिटीची पुन्हा बैठक होणार असून त्यात सविस्तर प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

तपोवनात माहिती केंद्

पर्यटक त्र्यंबकहून थेट शिर्डीला जातो. त्याला शहरातील पर्यटन स्थळांकडे वळवल्यास नाशिकच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. येणाऱ्या भाविक, तसेच पर्यटकांना नाशिकमधील धार्मिक स्थळे तसेच पर्यटन स्थळांविषयी माहिती व्हावी तसेच नाशिकच्या पर्यटन विकासासाठी देशभरात मार्केटिंग करता यावे यासाठी पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. पंचवटीतील तपोवनात हे केंद्र उभारले जाणार आहे. महापालिका तसेच सरकारच्या वेबसाइटवर नाशिकमधील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपलब्ध सुविधा आदींविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आराखड्याचे वैशिष्ट्ये

- देशभर नाशिकचे मार्केटिंग होणार

- टूर ऑपरेटर्स व गाईड यांच्यासाठी प्रशिक्षण सुविधा

- पर्यटनस्थळांविषयक दिशादर्शक फलक लावणार

- भोवतालच्या पर्यटनस्थळांचा विकास

- सरकारच्या वेबसाइटवर पर्यटन स्थळांची माहिती

- पर्यटकांसाठी निवास व न्याहरी योजनेला प्रोत्साहन देणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदसाठी मालेगावी कडेकोट बंदोबस्त

$
0
0

२६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; ५००हून अधिक कर्मचारी तैनात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सांगता शनिवारी रमजान ईद निमित्ताने होत आहे. शहरात एकूण १८ ठिकाणी सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. ईद सण शांततेत साजरा व्हावा यासाठी मालेगाव पोलिस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रमजान ईद पार्श्वभूमीवर शहरात अपर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलिस उप अधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ३६ पोलिस उप निरीक्षक, ५५० पोलिस कर्मचारी, ३००होमगार्डस तैनात असतील. यासह दंगा नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या, विशेष शाखेचे १५ कर्मचारी, वज्र, वरून, बॉम्ब शोधक पथक देखील तैनात असणार आहे. शहरात एकूण २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर १६ व्हिडियो कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ५६४ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांचे सोमवारपासून उपोषण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माथाडी कामगारांच्या सरकारदरबारी असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी मुंबई येथे मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर माथाडी कामगारी युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते १८ जूनपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव यांनी दिली. या उपोषणात नाशिकचे माथाडी कामगारहीसामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रलंबित मागण्यांसाठी याअगोदर सरकारबरोबर बैठका झाल्या, लाक्षणिक संप, मोर्चे आंदोलनेही झाली. पण, हे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे मुंबईला माथाडी भवन येथे बैठक झाली व त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत माथाडी कामगार युनियनचे नेते व सरचिटणीस आमदार नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, आमदार शशिकांत शिंदे व अध्यक्ष एकनाथ जाधव हे उपस्थित होते. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करून अनुभवी कामगार नेत्यांच्या सदस्य म्हणून नेमणुका करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्यात, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामागारांच्या मुलांना प्राधान्य प्राधान्य द्यावे, माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका कराव्यात, राज्यातील ३६ माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न शासनाने थांबवावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपारास ‘माफी’ नाही

$
0
0

मटा विशेष

--

तडीपारास 'माफी' नाही

--

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

--

नाशिक : तडीपारीची कारवाई झाल्यानंतर पोलिसांना चकवा देत शहरात वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगारांवर लागलीच पुन्हा तितक्याच कालावधीसाठी तडीपारी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयानंतर उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघा सराईतांवर नुकतीच कारवाई झाली. यामुळे शहरात वास्तव्यास असलेल्या तडीपार गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

शहर पोलिसांनी २०१७ मध्ये २३ तर २०१८ मध्ये आतापर्यंत ५७ अशा ८० जणांना शहरासह जिल्ह्यातून तडीपार केले आहे. आणखी नऊ सराईतांवर तडीपारी चौकशी प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या विरोधात लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेचे तीन ते चार किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले की प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तडीपारी करण्यात येते. पोलिस स्टेशनकडून येणाऱ्या प्रस्तावावर पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी निर्णय घेतात. या सुनावणी दरम्यान संशयित गुन्हेगार स्वत: किंवा व वकिलामार्फत आपले म्हणणे मांडू शकतो. तडीपारीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले की, पोलिसच संबंधित व्यक्तीला नजीकच्या म्हणजे ठाणे, अहमदनगर किंवा औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर सोडतात. अनेकदा तडीपार व्यक्ती जिल्ह्याच्या सीमेवरील गावात म्हणजे मोखाडा, संगमनेर वा वैजापूर अशा ठिकाणी राहतात. येथून नाशिकमध्ये येण्यासाठी फारसा वेळ जात नाही तसेच दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध असतात. तडीपार केलेल्या व्यक्तीस काही कामानिमित्त शहरात यायचे असल्यास पोलिस उपायुक्त किंवा कोर्टाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतात. मात्र, तसे होत नाही. तडीपार व्यक्ती सहजतेने शहरात येऊन वास्तव्य करतात. कागदावर तडीपार असलेले संशयित शहरात गुन्हे करतात. यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासावर देखील परिणाम होतो.

--

दोघांवर कारवाई

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवीन पद्धत सुरू केली आहे. याबाबत बोलताना परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, नियम तोडून शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपारास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात मुंबई पोलिस अॅक्टममधील कलम १४२ नुसार गुन्हा दाखल होतो. मात्र संशयितास जामीन मिळतो. तर खटल्याच्या सुनावणीसाठी मोठा कालावधी लागू शकतो. लागलीच सुटका झाल्याने संशयितांना तडीपारीचे गांभीर्य वाटत नाही. या पार्श्वभूमीवर नवीन कारवाई सुरू केली आहे. आता तडीपारास अटक झाली की त्याच्या गुन्ह्यांचा अभिलेख विचारात घेता पुन्हा तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जातो. त्यावर सुनावणी होऊन जेवढ्या कालावधीनंतर तो शहरात सापडला तेवढ्याच कालावधीसाठी त्यास तडीपार करण्यात येते. यामुळे अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याचा वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा कोकाटे यांनी व्यक्त केली. या धर्तीवर १५ दिवसांपूर्वी दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images