Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वैद्यकीय अधिकाऱ्याचे अधिकार काढण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्दिष्टांची पूर्तता न करणाऱ्या तसेच कमी काम असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडील किरकोळ रजा वगळता सर्व अधिकार काढून जिल्हा स्तरावर घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. नरेश गिते यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान आढावा बैठकीत दिले.

आरोग्य विभागाची मागील महिन्यात झालेली आढावा बैठक अपूर्ण माहिती दिल्याने डॉ. गिते यांनी रद्द केली होती. सदरची बैठक शुक्रवारी झाली. सुरुवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. डॉ. गिते यांनी मूल्यांकनाप्रमाणे आढावा घेताना सर्वात कमी काम असलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत वस्तुस्थिती सांगण्याबाबत सूचना केल्या. या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे, वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुगंधाचा वाढतोय भाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवापासून सुरू झालेल्या पूजा सामग्रीच्या बाजारपेठेला दिवाळीपर्यंत चांगली मागणी असते. यंदाही या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु, भारतीय बनावटीच्या अगरबत्त्यांमध्ये ५ ते १० टक्के वाढ झाली असून, कापूर तब्बल ५० टक्क्यांनी महागला आहे.

सणासुदीचे दिवस सुरू झाले की पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा यातील काही वस्तू महाग झाल्याने ग्राहकांनी थोडा आखडता हात घेतला आहे. भारतीय बनावटीच्या अगरबत्त्यांमध्ये जीएसटीमुळे ५ ते १० टक्के वाढ झाली असून, कापराच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात अगरबत्ती, धूप, अत्तर, कप धूप, गोवऱ्या अशा नानाविध वस्तूंची खरेदी केली जाते. घरात प्रसन्न वाटावे, वातावरण शुद्ध व्हावे यासाठी अनेकजण रोज विविध प्रकारच्या अगरबत्त्यांचा वापर करतात. काही लोक एकाच वेळी अनेक प्रकारच्या अगरबत्त्या खरेदी करतात. यंदा मात्र त्यांनी हात आखडता घेतला आहे. अगरबत्तीची चार पाकिटे घेणारा ग्राहक आता दोनच पाकिटे घेऊ लागला आहे. पूर्वी या व्यवसायावर भारतीय उत्पादकांचे वर्चस्व होते, मध्यंतरीच्या काळात चायनामेड अगरबत्त्या बाजारपेठेत आल्याने या व्यवसायावर गंडांतर आले होते. परंतु, चायनीज अगरबत्त्यांचे दुष्परिणाम दिसू लागल्याने भारतीय विक्रेत्यांनी पुन्हा भारतीय बनावटीच्या अगरबत्त्या विकणे सुरू केले आहे. सध्या बाजारात पुणे, मुंबई व बंगळुरू येथे तयार झालेल्या अगरबत्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येत्या काही वर्षांत भारतीय बनावटीच्या अगरबत्त्यांना चांगली मागणी राहील, अशी विक्रेत्यांना आशा आहे. मोगरा, केवडा, गुलाब, चंदन या पारंपरिक सुवासाबरोबरच फळाच्या सुवासिक अगरबत्त्यांना मागणी आहे. यात पाइनॅपल, मॅगो, अॅपल, मस्क अशा विविध प्रकारच्या अगरबत्त्या बाजारात आल्या आहेत. त्याचप्रमाणे २ ते १८ तास जळणाऱ्या अगरबत्तीलादेखील मागणी आहे. अगरबत्ती २५० रुपये ते १ हजार ५०० रुपये किलो दराने मिळत आहे.

धुपाला मागणी

उदबत्ती घरात जास्त काळ पेटती राहिल्याने दमा असणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. त्या तुलनेत धूप जळाल्यानंतर तसा त्रास होत नाही. यासाठी नागरिक धूप खरेदीला प्राधान्य देतात. यात ओला धूप व कप धुपाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. सहा महिन्यांपूर्वी ६०० रुपये किलो दराने मिळणारा कापूर या सिझनमध्ये १२०० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. कापूर हा कमी प्रमाणात खरेदी केला जात असल्याने त्याचे भाव लक्षात येत नाहीत.

जीएसटीमुळे उदबत्त्यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. मात्र कापूर महाग झाला आहे. यंदा चिनी अगरबत्त्यांपेक्षा भारतीय बनावटीच्या अगरबत्तीला चांगली मागणी आहे. विक्रेत्यांनीही चिनी बनावटीच्या अगरबत्त्यांची विक्री कमी केली आहे.

- कमलेश सुगंधी, उदबत्तीचे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्र कुलथे यांना समाजरत्न पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री लाड सुवर्णकार संस्था नाशिकचे माजी अध्यक्ष आणि सुवर्णकार समाजाचे नेते राजेंद्र जयराम कुलथे यांना सोलापूर जिल्हा लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजरत्न पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.

सोलापूर येथे आयोजित हरीहर साक्षात्कार सोहळा व वधू वर परिचय मेळावा या राज्यस्तरीय मेळाव्यात कुलथे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुलथे यांनी नाशिक सुवर्णकार संस्था कार्यकारणीवर आठ वर्षे सेक्रेटरी, आठ वर्षे अध्यक्ष म्हणून तर महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर तीन वर्षे सेक्रेटरी म्हणून कार्य केले आहे. त्यांनी संस्थेसाठी व सुवर्णकार मंदिरासाठी विशेष परिश्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी संकलित केला. त्यांनी १९९३ पासून समाज कार्यात सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले आहेत. सुवर्णकला प्रशिक्षण केँद्रातून ४५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. २८ वर्षांच्या सामाजिक कार्यातून पाचशेंहून अधिक विवाह जमविले आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना सुवर्णकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा मद्यसाठा तपोवन मार्गवर जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनाकडे जाणाऱ्या मार्गावर पिकअप वाहनातून बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यातील वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ५ लाख १० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

खंडू लक्ष्मण शिरसाठ (४२ रा.मोरवाडी, सिडको) असे या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बेकायदा मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती हवालदार वसंत पांडव यांना मिळाली होती. त्यानुसार, निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि. १३) पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी तपोवन क्रॉसिंग येथे एमएच १५ सीके १२६३ या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यात ६० हजार ४८० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकंकडून आव्हानांवर मात

$
0
0

आमदार सीमा हिरे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे शिक्षण देत शिक्षक आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शिक्षणातील आव्हानांवर शिक्षक उत्तमरित्या मात करताना दिसत आहेत. शैक्षणिक प्रगतीचे हेच खरे यश आहे, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले.

इंटरनॅशनल असोशिएन ऑफ लायन्स क्लब नाशिक डिस्ट्रिक्ट रिजन - ७ च्या वतीने गुरूसन्मान सोहळा गंगापूर रोड येथील सीएमसीएस कॉलेजमध्ये शुक्रवारी झाला. यावेळी आमदार हिरे बोलत होत्या. मंचावर लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, विनोद कपूर, मिलिंद पोफळे, डॉ. विक्रांत जाधव, राजेश कोठावदे होते.

निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर शिक्षक कार्यरत आहेत. काही वर्षांत शिक्षण व्यवस्थेची बदलेली स्थिती आणि विद्यार्थ्यांची मानसिकता, हे शिक्षण क्षेत्रातले आव्हान बनले आहे. विद्यार्थ्यांच्या विचार पातळीचा अभ्यास करून त्यांना घडविण्यासाठी शिक्षकांचे अधिक परिश्रम सुरू असल्याचे दिसते, असेही आमदार हिरे यावेळी म्हणाल्या.

सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना लायन्स क्लबचे प्रांतपाल शहा म्हणाले, की बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या कलेने योग्य शिक्षण देण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समाज आणि राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचा हातभार अधिक आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम पालकांकडून होत असते. तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे कर्तव्य शिक्षक बजावतात. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक पुढाकार घेत आहे. समाजहितासाठी कार्यरत असणाऱ्या या शिक्षकांचा सन्मान करणे सामाजिक कर्तव्य आहे.

२८ शिक्षकांचा सन्मान

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी सोहळा झाला. यावेळी जिल्ह्यातील २८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. लायन्स क्लबचे अरुण अमृतकर, राजेंद्र वानखेडे, भरत अग्रवाल, सुरेश पाटील, बाजीराव पाटील यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्थ लोहकरेला विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे डिस्ट्रिक्ट आणि मेट्रोपोलिटिन बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या पार्थ लोहकरे याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा ११ वर्षांखालील वयोगटात आयोजित केली होती.

पार्थने उपांत्यपूर्व सामन्यात अमेय बेलेकरला १५-१०, १५-११ अशा फरकाने हरविले. पार्थने उपांत्य फेरीत सार्थक पाटणकरचा १५-११, १५-४ ने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात त्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी कोणार्क इंचेकर याला १५-४, १५-११ ने हरवित 'ओपन बॅडमिंटन टुर्नामेंट २०१८'चे विजेतेपद पटकावले. पार्थला प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये एक हजार बक्षिस देऊन गौरविण्यात आले. पार्थ हा रासबिहारी शाळेत इयत्ता सहावीत शिकतो.

पार्थला नाशिक जिमखानाचे बॅडमिंटन प्रशिक्षक अमित देशपांडे आणि शाळेचे क्रीडाशिक्षक मच्छिंद्र सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांश मंडळांचे देखावे अपूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव सुरू होऊन दोन दिवस झाले तरीही शहरातील मंडळांचे देखावे अद्याप अपूर्ण आहेत. पाचव्या दिवसानंतर मंडळांचे देखावे भाविकांसाठी खुले होतील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

यंदाच्या गणेशोत्सवावर परवानगीचे संकट असल्याने गणेशोत्सव साजरा करायचा की नाही अशा द्विधा मनस्थितीत मंडळाचे पदाधिकारी होते. मात्र, हे संकट दूर होण्यास बराच अवधी गेल्याने मंडळांना तयारी करण्यास वेळ लागला. जेव्हा परवानगी हातात आली, तेव्हा देखाव्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामात बराच वेळ निघून गेला. त्यात व्यापाऱ्यांच्या मालावर जीएसटी लागू झाल्याने त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला. पूर्वी ज्या प्रमाणात वर्गणी जमा होत असे, ती यंदा झाली नाही. त्यामुळे आर्थिक संकटदेखील होते. या संकटांचा सामना करून मंडळे स्थिरस्थावर झाली आहेत. यातील जी मोठी मंडळे आहेत, त्यांचे देखावे सुरू झाले आहेत. रविवार कारंजा मित्र मंडळ, गुलालवाडी मित्र मंडळ, सूर्यप्रकाश मित्र मंडळ इत्यादींचे देखावे खुले झाले आहेत. दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार असल्याने पदाधिकारीही त्या कामात गुंतले आहे. घरातील पूजा झाल्यानंतर मंडळाच्या कामाला जोमाने सुरुवात होईल. सध्या कारागीर मंडळींवर कामाचा वेग अवलंबून आहे. पाच दिवसानंतर मंडळाचे देखावे सुरु होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवात कोंडी टळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल केला आहे. यात काही रस्त्यांवर सायंकाळच्या सुमारास प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मोठ्या मंडळांची संख्या जुने नाशिक, पंचवटी या भागात जास्त असून, येथे आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी एमजीरोड, निमाणी बस स्थानक, शालिमार यांसह इतर रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल केले आहे. काही मार्गावरील शहर वाहतूक बसेसचा मार्ग बदलण्यात आला. निमाणी येथून शालिमारमार्गे नाशिकरोडकडे जाणाऱ्या बसेस तसेच इतर सर्व वाहनांना रविवार कारंजा येथून सारडा सर्कलच्या दिशेने पुढे येता येणार नाही. या वाहनांना मेहर सिग्नल, त्र्यंबक नाका सिग्नल यामार्गे नाशिकरोडच्या दिशेने जावे लागेल. हा बदल १८ ते २३ सप्टेंबर या कालावधीत सांयकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच नाशिकरोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी गडकरी चौक, सीबीएस, मेहर सिग्नल असा मार्ग वापरावा लागणार आहे. अशोक स्तंभ ते रविवार कारंजादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

या रस्त्यांवर प्रवेश बंद

किटकॅट चौफुली ते कालिदास कलामंदिरमार्गे शालिमारकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी सायंकाळी ६ वाजेनंतर प्रवेशासाठी बंद करण्यात येईल. सीबीएस बाजूकडून कान्हेरेवाडीमार्गे किटकॅट, शालिमार चौकाकडून कालिदासमार्गे व किटकॅटकडून सीबीएस बाजूकडे दोन्ही मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. सरदार चौक ते काळाराम मंदिर दोन्ही बाजूंनी सर्व वाहने मालवीय चौक, गजानन चौक, नागचौक, शिवाजी चौक आणि मालवीय चौक हा रस्ता दोन्ही बाजूंनी सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद. हा बदल १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत असेल.

दि. २३ पर्यंत सायंकाळी ७ नंतर या मार्गांवर प्रवेश बंद

- खडकाळी सिग्नल येथून शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारी वाहने

- खडकाळी सिग्नल येथून नेहरू गार्डनकडून, मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारी वाहने

- त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नर

- गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नर

- सीबीएस सिग्नलपासून शालिमारकडे नेहरूगार्डनकडे जाणारी वाहने

- मेहर सिग्नलकडून सरळ पुढे दहीपुलाकडे जाणारी वाहने

- अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डकडे जाणारी वाहने

- रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नलकडे येणारी वाहने

पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी बसमार्गात बदल

सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींचे पाचव्या (दि. १७), सातव्या (दि. १९) आणि दहाव्या दिवशी (दि.२३) विसर्जन होईल. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होईल. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निमाणी बस स्थानकावरून पंचवटी कांरजा, मालेगाव स्टॅण्ड रविवार कारंजा मार्गावरून येजा करणाऱ्या बसेस व जड वाहनांना १७ ते १९ व २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बसेस व जड वाहनांना देखील प्रवेश बंद असून, या मार्गावरील वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'वंदन माझे तुझिया पाया…, धरी शिरावर कृपेची छाया…' म्हणत वाजत गाजत गजाननाचे गुरुवारी स्वागत करण्यात आले. बाप्पांची स्वारी घरी विराजमान झाल्याने भक्तांचा उत्साह कित्येकपटीने वाढलेला जाणवत होता. एक संपूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी मध्यान्हापर्यंत पाहुणचार आणि सेवेनंतर दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या गणरायाची विधीवत पूजा करत शुक्रवारी दुपारनंतर विसर्जन करण्यात आले.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. काही घरांतील परंपरेनुसार बाप्पांचा मुक्काम दीड दिवसांचा असतो. या घरात गणेशचतुर्थीचा संपूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बाप्पांची सेवा करण्यात आली. गजाननाला आवडणारा पाहुणचार भक्तांनी केला. शुक्रवारी दुपारी बाप्पांना निरोप देण्यापूर्वी 'घरात सुख, शांती नांदो, सर्व विघ्न दूर होवो' अशी प्रार्थना करण्यात आली. दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठीच्या तयारीला दुपारनंतर वेग आला. दुपारी एक वाजेनंतर बाप्पांची आरती करून मोदक, पेढे आणि हरबऱ्याची मोकळी डाळ यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..., अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला...' असा जयघोष करीत भक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन केले. यावेळी चिमुरड्यांसह मोठ्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. गंगाघाट, गौरी पटांगण, रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, गोदावरी-कपिला संगम यासह सोमेश्वर, बालाजी मंदिर परिसर या ठिकाणी भक्तांनी गणरायाचे विसर्जन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही भक्तांनी कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन केले, तर काहींनी श्रींची मूर्ती दान केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या व्हरायटीच्या मोदकांना पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाचे आगमन झाल्याबरोबर बाप्पांच्या नैवेद्यांसाठी दुकानांत गर्दी होऊ लागली आहे. बाप्पांच्या नैवेद्यासाठी नव्या व्हारायटीच्या चविष्ट मोदकांना यंदा भक्तांकडून पसंती मिळत आहे. विनायकाच्या नैवेद्यासाठी उकडीच्या मोदकांसोबतच ड्रायफ्रूट, मँगो मोदक, नारळ बर्फी, ओले नारळाची करंजी खरेदी करण्यासाठीच्या खरेदी-विक्रीला वेग आहे.

गणपती बाप्पांचे मोठ्या धूमधडक्यात गुरूवारी घरोघरी आणि गणेश मंडळात आगमन झाले. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच गणरायाच्या नैवेद्यासाठी नव्या व्हरायटीच्या मोदकांनी शहरातील दुकाने सजली आहेत. बाप्पांच्या प्रसादासाठी विविध प्रकारच्या मिठाईला पसंती असते. त्यामुळे यंदा उकडीच्या मोदकांसह गूळ खोबऱ्याचे तळलेले मोदक, खव्याचे मोदक, साखरेचे मोदक, आंब्याचे मोदक, काजू मोदक, ओल्या खोबऱ्याचे मोदक बाजारात उपलब्ध झाले आहेत. गणेशोत्सवात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात भक्तांची वर्दळ असते. त्यामुळे बाप्पांच्या प्रसादात वैविध्य हवे म्हणून या नव्या व्हरायटीच्या मोदकांना पसंती मिळत आहे. शहरातील मिठाईची दुकानांत मोदक खरेदीसाठी भक्तांची गर्दी होताना दिसत आहे.

अशा आहेत किमती

तळलेले मोदक अडीचशे रुपये, खव्याचे मोदक तीनशे रुपये, उकडीचे मोदक बावीस रुपये प्रतिनग, काजू मोदक सहाशे रुपये, आंबा मोदक पाचशे रुपये, ओल्या खोबऱ्याचे मोदक चारशे रुपये किलो आणि ड्रायफ्रूट मोदकांची किंमत सहाशे रुपयांहून अधिक आहे. यासह बेसन लाडू, रवा लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू यांना देखील पसंती मिळत आहे. पाचशे रुपयांहून अधिक किंमतीला लाडूंची विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडी बंधारा कालव्याची क्षमता वाढविण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील चणकापूर उजवा कालव्यावरील झाडी बांधाऱ्यापर्यंतची कालव्याची क्षमता वाढविण्यात यावी तसेच कालवा झाडी ते थेट नाग्या-साक्या धरणापर्यंत लांबी वाढवी यासह ठेंगोडे उजव्या कालव्याची देखील क्षमता वाढवण्याची मागणी राष्ट्रवादीचे विनोद शेलार यांनी केली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली. झाडी बांधाऱ्याची निर्मिती १९५२ साली झाली होती. मात्र अनेक कारणांनी या बांधाऱ्यात पाणी येऊ शकले नाही. अखेर चणकापूर उजवा कालवा रामेश्वरमार्गे झाडी बांधाऱ्यात पाणी टाकण्यासाठी सर्वेक्षण देखील झाले. मात्र हे काम देखील अपूर्ण राहिले. सन २००९च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी झाडी बांधाऱ्यात पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार पंकज भुजबळ यांनी पाठपुरावा करून या कामास मंजुरी मिळवली होती. दरम्यान याची निविदा प्रक्रिया देखील पार पडली होती. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात निवडणुका होवून सत्तापरिवर्तन झाल्याने हा प्रश्न पुन्हा प्रलंबित रहिला.

अखेर नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होवून सुमारे ६ कोटीचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. मात्र झाडीपर्यंत येणाऱ्या चणकापूर उजवा कालवा व ठेंगोडा उजवाला कालवा अशा दोन्ही कालव्यांची क्षमता वाढवण्याची मागणी शेलार यांनी केली असून, यामुळे लाभक्षेत्रातील गावांना दोन्ही हंगामात शेतीसाठी पाणी मिळणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी २२ला विचारवेध संमेलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील एस. एम. जोशी कॅम्प सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील ५ वे विचार वेधसंमेलन यंदा मालेगाव शहरात आयोजित करण्यात आले आहे. शनिवार (दि. २२) सप्टेंबर रोजी मालेगाव कॅम्प येथील सुयोग मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे संमेलन होत आहे.

या संमेलनास संबोधित करण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंत महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, भालचंद्र कांगो व अन्वर राजन हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाद्वारे मार्क्स, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तीमत्त्वांचा वारसा पुन्हा एकदा तरुणांपुढे यावा याच हेतूने वरील मान्यवर संमेलनात विविध विषयांवर संवाद साधतील. या अनुषंगाने नुकतीच या. ना. जाधव विद्यालयात शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व कार्यकर्त्यांची बैठक झाली. स्वागताध्यक्ष विजय पोफळे, सचिव भास्कर तिवारी, कोषाध्यक्ष सुनील वडगे आदींच्या उपस्थितीत विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात प्रथमच असे संमेलन होत असल्याने जास्तीत जास्त महाविद्यालयीन तरुण तरुणींनी व शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष विजय पोफळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे अपघात

$
0
0

शहापूरजवळ अपघात;

नगरसेवकासह चार ठार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ धुळे येथील व्यापाऱ्यांच्या वाहनाला शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात धुळ्यातील काँग्रेसचे नगरसेवक व व्यापारी कुमारशेठ डियालानी यांच्यासह चार जण जागीच ठार झाले. यात नाशिकच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. नगरसेवक कुमारशेठ डियालाणी, ललितकुमार मनोहरलाल भारद्वाज, राजकुमार सुंदरलाल बटीजा, रमेश कुकरेजा (सर्व रा. कुमारनगर, साक्री रोड धुळे) व पाटील नामक अधिकारी (रा. नाशिक) यांचा समावेश आहे. हे पाचही जण कारने शुक्रवारी सकाळी न्यायालयीन कामासाठी मुंबईकडे येत होते. शहापूरजवळ सुमारास सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटी होत दरीत कोसळली.

सविस्तर वृत्त...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुपीत उलगडता : मोहन उपासनी

$
0
0

गुपीत उलगडता : मोहन उपासनी

श्रींच्या चरणी...!

श्री गणेशाचे आगमन झालेय, नित्यनेमाने संगीत आवडीने ऐकणारा बाप्पा माहीत आहे तुम्हाला? नाही. मग चला तर नाशिकच्या मेनरोडवरील श्री गणेश मंदिरात! संगीत आणि अध्यात्म हे वेगळे नाहीच मुळी हा भाव मनी ठेवून प्रवास करणारे संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत दिग्गज बघा. या दोहोंची सांगड ज्याला जमली तो नावारूपास आहे, सरस्वती, लक्ष्मी ज्याच्या घरात हातात हात घालून नांदताय, विद्वत्ता, नावलौकिक, प्रसिद्धीत कुठलीही कमी नाही अशी असंख्य उदाहरणे आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आहेत आणि काही शापित गंधर्वांचीदेखील. ज्याचा त्याचा प्रवास हा वरील पहिल्या उदाहरणाकडेच असतो म्हणजेच हे सगळे ज्याला लाभते तोच मोक्ष त्यात वेगळे काय? जिवंत असताना एका टेचीत राहायचे, जगायचे, मिरवायचे कोणाचेही बोल नाही, दूषणं नाहीत, हितशत्रू नाहीत, हात लावील तिथे सोने ह्या उक्तीप्रमाणे त्याच्या निर्विघ्न जीवनाच्या वाटचालीचा मार्ग कोणाला नकोय सांगा? उत्तरादाखल प्रत्येकालाच हवा असे उत्तर येईल. पूर्व पुण्याई, या जन्मी घेतलेली मेहनत यावर हे गणित अवलंबून म्हणून यशस्वी आणि शापित असे दोन प्रकार झाले असावे बहुधा. शापिताचाही मनीचा भाव चांगलाच असावा बहुदा पण पूर्वसुकृत आड येत असावे असो.

गाऊ नाचू आम्ही आनंदे कीर्तनी.

भक्ती मुक्ती दोन्ही मागो देवा..

मनाची पै वृत्ती बुडे प्रेमडोही..

नाठवतो देही दुजा भाव.

संत नामदेवांच्या अभंगातील या चार ओळी बरेच काही सांगून जातात. माझा तर ठाम विश्वास आहे ज्याच्या नसानसात परमेश्वराने संगीत ओतून पाठवलंय ही त्याची अनेक जन्माची पूर्वपुण्याईच म्हणूयात, बरं दिले कोणी तर त्या सृष्टीनियंत्याने. त्याची ओळख किती जण ठेवतात हेच तो बघत असावा किंवा परीक्षा घेत असावा, आम्ही नाशिककर कलाकार या परमेश्वरी परीक्षेत पास असू बहुधा कारण त्याच्या नामाचे, सेवेचे अनुसंधान आम्हा सगळ्यांचा बालपणापासून मिळालंय. मेनरोड येथील श्री गणपती मंदिर हेच आमचे विद्यापीठ म्हणा, पाठशाळा म्हणा तिथे संगीत आणि अध्यात्म या दोन्हीचे बाळकडू आम्हाला मिळाले, 'हजेरी' (देवासमोर त्याने आपल्याला काय दिले, आपण त्यावर काय प्रगती केली याचा देवासमोर दिलेला गायन वादन नृत्यातील लेखाजोगा) 'सेवा' हे शब्द तिथें उमजले मंदिरात झाडण्यापासून सतरंज्या (बैठक) टाकण्यापर्यंत, ते गायक वादकांना लागणारे चहापान, ते गायनसेवा अथवा महोत्सवातील गायन आटोपल्या नंतरचे आवरसावरीचे सोपस्कार आणि या साऱ्यातून आम्हाला लाभलेल्या भल्याभल्यांचा सहवास, त्यांचे मार्गदर्शन, त्याच्या गायन वादानातील बारकावे, नेमके मर्म यातूनच आम्ही घडलो. म्हणूनच विद्यापीठ म्हटले, याच मंदिररूपी विद्यापीठात माघी आणि मुख्य गणपती उत्सवात ५ दिवस संगीत महोत्सव असतो जो परंपरेने चालत आलाय त्यात आजपावतो बाहेर गावातील किंबहुना भारतवर्षातील अनेक दिग्गजांनी आपापली गायन वादन सेवा श्री चरणी अर्पण केलीय आणि आम्हाला ती अनुभवता आलीय.

हे सगळे आपोआप घडत नाही तर पिढ्यानपिढ्या या सेवकार्यासाठी श्रीचरणी झटल्याय त्यात प्रामुख्याने. सर्वश्री, विनायकराव परांजपे, गोडबोले, लखुआण्णा पैठणकर, पं. मनोहरबुवा पोतदार, बगोबा सरवटे बुवा (अतिशय पहाडी, सुरेल, गोड गळ्याचे विद्वत्ता पूर्ण छाप पडणारे गायन) पं. भानुदासजी पवार, पं. विजय हिंगणे, पं. कमलाकर वारे, पं. प्रभाकर दसककर, पं.काकासाहेब घारापूरकर. ही मी लहान असतानापासून बघितलेली दिग्गजांची फळी, जी श्री गणेश चरणी अव्याहत संगीतसेवा करीत होती. तदनंतर पं. जयंत नाईक (आकाशवाणी जळगावचे ए ग्रेड आर्टिस्ट ज्यांनी नाशिकहून पहिल्यांदाच बाहेर जाऊन तबला शिक्षणास सुरुवात केली) गिरीश पांडे, सुनील दैठणकर, प्रमोद भडकमकर, प्रशांत महाबळ, नितीन वारे, नितीन पवार, ही तबलावादनातील तडफदार पिढी, हार्मोनियम वादक सुभाष दसककर, प्रशांत महाबळ, विजय हिरण, प्रसाद गोखले, भूषण कोथमिरे, ईश्वरी दसककर, संस्कार जानोरकर, गायक सर्वश्री शंतनू गुणे (दर गुरुवारी नित्यनेमाने श्री चरणी गायन सेवा समर्पित करतात) अविराज तायडे, मकरंद हिंगणे, आशिष रानडे, प्रीतम नाकील, गौरव तांबे, सुजित काळे, रसिक कुलकर्णी, वैष्णवी भडकमकर, अथर्व वारे, अद्वय पवार ही तबलावादनातील तिसरी पिढी. व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, गिटार वादक नरेंद्र पुली आणि अन्य बरीच जी या संगीताला आध्यत्मिक जोड देऊन आणि तोच सर्व करणारा या विचाराला घेऊन काम करणारी गुणीजन मंडळी म्हणजेच श्री गणेश भक्त मंडळी, मेनरोड नाशिक.

(लेखक सुप्रसिद्ध बासरीवादक आहेत.)

प्रतिक्रियेसाठी nashik.letters@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी गटविकास अधिकाऱ्यास नोटीस

$
0
0

इगतपुरी गटविकास

अधिकाऱ्यास नोटीस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणतीही शहानिशा न करता प्रस्तावासोबत १० काम गावठाण हद्दीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याचा अंगलट आले आहे. गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरीत केल्याने जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांनी इगतपुरी नोटीस बजावली आहे. यात या हद्दीचे चुकीच्या प्रमाणपत्राचा खुलासाही मागितला आहे.

जिल्हा परिषद सदस्या अनिता बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील गावठाणाबाहेरील १० कामांबाबत पत्र दिले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग १) यांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीस दिलेला कार्यारंभ आदेश रद्द करण्यात आला आहे. मात्र, सदर अहवालानुसार इगतपुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यावसायिक महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यावर कटलरी सामानाचे दुकान लावून उदनिर्वाह करणाऱ्या महिलेचा रिक्षाचालकाने विनयभंग केला. ही घटना वर्दळ असलेल्या रविवार कारंजा भागात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयित रिक्षाचालक चेतन साहेबराव ढुमसे (२८, रा. बजरंगनगर, आनंदवली) याला अटक केली आहे.

पीडित महिला रविवार कारंजा भागात बुधवारी (दि. १२) रात्री ४२ वर्षांची रस्त्यावर कटलरी मालाचे दुकान लावून व्यवसाय करीत होती. यावेळी संशयित रिक्षाचालकाने दुकान बाजूला घेण्याच्या कारणातून महिलेस शिवीगाळ करीत अंगावर धावून जात ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सारिका अहिरराव करीत आहेत.

दुचाकी घसरल्याने महिला ठार

भरधाव दुचाकी घसरल्याने पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना त्र्यंबक रोडवरील जिंजर हॉटेलसमोर झाली असून, या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधूबाई नागेश खाडे (३६, रा. घाटोळमळा, गोरक्षनाथ रोड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून बाबासिंग हरभजनसिंग चौधरी (४३, रा. घाटोळमळा) हे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अपघात मंगळवारी (दि. ११) झाला. बाबासिंग चौधरी व सिंधूबाई खाडे या आयटीआय सिग्नलकडून सकाळ सर्कलच्या दिशेने स्कूटर (एमएच १५ अ‍ेएन ३५०४) या दुचाकीवर प्रवास करीत असतांना जिंजर हॉटेल परिसरात भरधाव स्कूटर घसरून दुभाजकावर आदळली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी सिंधूबाईचा मृत्यू झाला. अमोल खाडे यांच्या तक्रारीवरून चौधरी यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार कोटमे करीत आहेत.

पेट्रोलपंप कामगारास लुटले

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या परिचिताने कामगारास जमिनीवर पाडून सुमारे १८ हजार ४०० रुपयांची रोकड लुटल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. अंबड पोलिस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विजय मराठे असे कामगारास मारहाण करून रोकड लांबविणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धी पेट्रोल पंपावरील कामगार वैभव नारायण भुसारे (रा. खुटवडनगर) यानी तक्रार दाखल केली आहे. भुसारे बुधवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पंपावर काम करीत असताना संशयित आरोपी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. संशयिताने भुसारे यांचा पाय धरून जमिनीवर पाडले. यावेळी भुसारे यांच्या हातातील रोकड खाली पडली असता संशयिताने नकळत १८ हजार ४०० रुपयांची रोकड घेवून पोबारा केला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

नाशिकरोड, सिडकोत

नऊ जुगारी गजाआड

शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने नाशिकरोड आणि सिडको परिसरात छापे टाकून नऊ जुगारींना बेड्या ठोकल्या. याकारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून नाशिकरोड आणि अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

जेलरोड येथील पाण्याच्या टाकीमागे जुगारी खेळत असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. १२)सायंकाळी पोलिसांनी शुभम सोसायटी मागील मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी सुरेश कुवर, भागवत अहिरे, रवींद्र जगदाळे व दिलीप पगारे हे मटका खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून दोन हजार ७१० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी युनिटचे हवालदार अन्सार सय्यद याच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गायकर करीत आहेत.

दुसरी कारवाई सिडकोतील सिंहस्थनगर भागात झाली. वंजारी समाज भवन भागात पोलिसांनी छापा टाकला असता दौलतसिंग, अरुण झंझाळ, बंडू पवार, किरण पाटील व चंद्रनसिंग राजपूत आदी उघड्यावर जुगार खेळतांना आढळून आले. या प्रकरणी युनिटमधील पोलिस शिपाई महेंद्र साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नाईक एन. सी. भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुषखबर! आठवडाभर भरपूर पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेपत्ता झालेल्या पावसाची आतुरतेने वाट पहात असलेल्या नाशिककरांसाठी खुषखबर आहे. पुढील आठवड्यात १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, अशी सुखवार्ता हवामान विभागाने दिली असून त्यामुळे पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजणाऱ्या पिकांनाही जीवदान मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

गेली दोन वर्षे शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस नाशिककरांवर यंदा काहीसा हिरमुसल्याचेच चित्र होते. जूनपासून सप्टेंबरच्या अगदी पंधरवड्यापर्यंत पावसाने सातत्याने लहरीपणाचेच दर्शन घडविले आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्या त्या महिन्याच्या सरासरीपर्यंत पाऊस पोहोचल्याचे यंदा पहावयास मिळाले. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठल, सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये सातत्याने हजेरी लावणारा पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून गायब झाला आहे. किमान तापमान कमी होत असल्याने पावसाचे पूनरागमन होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु, गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे.

पिकांना जीवदान
नाशिक जिल्ह्यात सोमवारी १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. पिवळ्या पडू लागलेल्या कांदा पिकासह अन्य पिकांनाही या पावसाचा फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत झाले स्वस्त!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाथर्डी फाट्यावरील खत प्रकल्पात कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला मागणी वाढत असून, गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी साडेचार हजार टन कंपोस्ट खताची खरेदी केली. केंद्र व राज्य सरकारने कचऱ्यापासून तयार केल्या जात असलेल्या सेंद्रिय खताला टनामागे दीड हजार रुपयांचे अनुदान दिल्याने महापालिकेने या खताची किंमत अडीच हजारांवरून एक हजार रुपयांवर आणली आहे. त्यामुळे खताला मागणी वाढली आहे.

भ्रष्टाचार आणि गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पाला खासगीकरणामुळे सध्या सुगीचे दिवस आले आहेत. या ठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प असून, गेल्या वर्षापासून त्याचे काम सुरुळीत सुरू आहे. हा खत प्रकल्प चालविण्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी निर्मित होणाऱ्या सेंद्रिय खताला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. महापालिकेकडून एक टन खुल्या सेंद्रिय खताला अडीच हजार, तर बंदीस्त खताला तीन हजार रुपयांचा दर आकाराला जातो. सध्या केंद्र व राज्य सरकारकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध प्रकारचे अनुदान दिले जात आहे. तीन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील महापालिकेच्या कचऱ्यापासून खत प्रकल्प निर्मितीच्या प्रकल्पासाठी टनामागे दीड हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महापालिकेने प्रतिटन अडीच हजार रुपयांचा दर आता एक हजार रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या खताची मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यांपर्यंत साडे चार हजार टन खत तयार होते, ते विकले गेले आहे. त्यामुळे दर कमी आणि चांगल्या दर्जाचे खत मिळत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्याने या खत प्रकल्पाला अच्छे दिन आले आहेत.

बाराशे टन निर्मिती
खत प्रकल्पाचे खासगीकरण झाल्याने आणि ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे येत असल्याने खत प्रकल्पाची क्षमता वाढली आहे. घंटागाड्यांमध्येच ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्याने खत प्रकल्पात दरमहिन्याला बाराशे ते चौदाशे टन सेंद्रिय खत तयार होत आहे. महापालिकेचा हा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनात उपयुक्त ठरला आहेच, शिवाय शेतकरी आणि कंपनीला देखील लाभदायी ठरला असून, पालिकेच्या उत्पन्नात भर घालत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस - टँकरच्या अपघातात १५ प्रवासी जखमी

$
0
0

नाशिक:

नाशिक- औरंगाबाद महामार्गावर शिवनेरी बस आणि पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरची धडक झाली. विंचुर एमआयडीसीजवळ झालेल्या या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर नाशिकच्या दिशेने जात असताना विंचुर एमआयडीसीजवळ टँकरचा टायर फुटला. टँकर विरुद्ध दिशेने येणाऱ्या शिवशाही बसला आदळला. दोन्ही गाड्या वेगात असल्याने बस उलटली. या अपघातात बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जखमींना निफाड रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. लासलगांव पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतन विद्यामंदिरात शिक्षकांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळाली कॅम्प येथील नूतन विद्यामंदिरात पालक संघाच्या वतीने सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक रावसाहेब पोटे यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यवाह मधुसूदन गायकवाड होते. यावेळी रावसाहेब पोटे यांनी पोलिस खात्यात नोकरी करत असताना अनेक ज्ञात अज्ञात गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून रोखून त्यांना जीवनाचा खरा मार्ग दाखवण्याचे काम वेळप्रसंगी चौकटीबाहेर जाऊन सामाजिक सद्भावनेच्या दृष्टीकोनातून मोलाचे सल्ला देण्याचे काम कसे साध्य केले. याविषयी अनुभवकथन केले.

सर्व शाळांमधील दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त असून शाळांच्या गुणवत्ता वाढीवर संस्थेचे विशेष लक्ष असते. शाळेत शिक्षक रुजू करताना गुणवत्ता असलेला प्रथम श्रेणीत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षकांनाच सेवेत सामावून घेतले जाते, असे एकनाथ शेटे यांनी सांगितले. पालक शिक्षक संघाचे कार्यवाह विलास म्हसाळ यांनी सूत्रसंचालन केले. वि. अ. सानप यांनी आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक अ. रा. डावरे, उपमुख्याध्यापक अ. रा. बोराडे, कायमसेवक प्रतिनिधी जि. पं. भावसार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे उपाध्यक्ष अ. द. निसाळ, सहकार्यवाह गा. हि. आंबेकर यांच्यासह सर्व सदस्य व शिक्षकांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images