म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्ट सिटीअंतर्गत समाविष्ट असलेले काही प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविण्यात येणार असल्याने कंपनीकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या सुधारित बजेटला स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्मार्ट पार्किंग आणि पालिकांच्या कार्यालयावरील सौर उर्जेचे प्रकल्प पीपीपी तत्वावर केले जाणार असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे बजेट एक हजार १२० कोटींवरून घटून, एक हजार २० कोटींपर्यंत आले आहे. या सुधारित बजेटला मंजुरी देण्यात आली. बैठकीत स्मार्ट प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्यात कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, विद्युत दाहिनी व नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाची कामे पूर्णत्वास आल्याची माहिती देण्यात आली. फुले कलादालनाच्या नूतनीकरणासाठी पूर्वी एक कोटी १२ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात खर्च तीन कोटी २१ लाखांपर्यत पोहचल्याचे बैठकीत सांगण्यात आले. नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद असताना, प्रत्यक्षात एक कोटी २१ लाखांचा खर्च झाल्याचे अहवालात मांडण्यात आले. कालिदास कलामंदिराचा खर्चही पाच कोटी ६४ लाखांवरून ९ कोटी ६७ लाखांपर्यंत गेला आहे. विद्युत दाहिनीच्या खर्चातही आठ लाखांची वाढ झाली आहे. पंचवटीतील पलुस्कर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी २५ लाख रुपये ग्राह्य धरण्यात आले होते. परंतु, या खर्चात १३ लाखांनी वाढ झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे एकूण बजेट हे एक हजार १२० कोटी इतके निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यातील स्मार्ट पार्किंग, सौर ऊर्जा पॅनल बसविणे आदी कामे पीपीपी तत्वावर केली जाणार आहेत. त्यामुळे कंपनीचे बजेट कमी होऊन एक हजार २० कोटींपर्यंत आले आहे. या बजेटलाही बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट