Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहरात गारवा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर वातावरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली असून राज्यात सर्वाधिक थंडीची नोंद नाशिक व जळगाव शहरात झाली आहे. नाशिक शहरातील किमान तापमान १३ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. आठवडाभर वाढलेल्या तापमानानंतर अचानक घसरलेल्या पाऱ्यामुळे शहरात गारवा निर्माण झाला आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन्हाचा कडाका तर रात्री पुन्हा थंडी पडत आहे.

दिवसा २५ ते ३० आणि रात्री १० ते १३ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने सर्दी आणि तापाचे पेशंटस वाढले आहेत. याबरोबरच खोकला, घशाला सूज येणे या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे गेल्या चार दिवसात पेशंटच्या संख्येत अचानक वाढ झाली असून सांधेदुखी असणाऱ्यांना या वातावरणामुळे त्रास होत आहे. हे टाळण्यासाठी पिण्यासाठी गरम पाणी आणि बाहेर जाताना गरम कपडे वापरावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘के टू के’वारी ११ दिवसात पूर्ण

$
0
0

डॉ. महेंद्र महाजन यांची सायकलवारी; विश्वविक्रमाची होणार नोंद

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर सायकलीस्ट महाजन बंधूपैकी डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ८५० किमीचे अंतर केवळ १० दिवस १० तासात पूर्ण केले. गिनीज रेकॉर्डसाठी या मोहिमेस १२ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे या वेगवान सायकलिंगचा विक्रम करण्यासाठीच्या या 'के टू के सायकलिंग चॅलेंज' मोहिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड, यूएमसीए रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद होणार आहे.

महाजन बंधू फाउंडेशन, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत 'खेलो इंडिया' आणि 'तंबाखू बंद' या अभियानाचा प्रचार करण्यात आला. 'टूर ऑफ ड्रॅगन', 'रेस अॅक्रॉस अमेरिका', त्यानंतर भारतात गोल्डन क्वाड्रीलेटरल मोहीम असे प्रत्येकवेळी वेगळे उपक्रम राबवून सायकलिंगचा प्रचार प्रसार आणि त्याद्वारे समाजोपयोगी उपक्रम लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम महाजन बंधू करीत आहेत.

दोन नोव्हेंबर रोजी सुरू होणारी ही मोहीम खराब हवामान, काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी, श्रीनगर जम्मू महामार्गावर कोसळलेली दरड यामुळे तीन दिवस उशिरा ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी सुरू करण्यात आली. सोमवारी ५ नोव्हेंबर लाल चौक, श्रीनगर येथून सुरू झालेली ही मोहीम नगर, उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपासआग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाड, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नूल, अनंतपूर, बंगळूरू, कृष्णागिरी, सेलम मदुराई, तिरुनेलवेली मार्गे कन्याकुमारी समुद्रकिनारा (विवेकानंद स्मारक) येथे मोहिमेचा समारोप झाला. कन्याकुमारी येथे डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमचे तेथील जिल्हाधिकारी प्रसाद वडनेरे यांनी तिरुवल्लुर पुतळ्याची प्रतिकृती भेट देत स्वागत केले.

बारा राज्यातून प्रवास

या वेगवान सायकल प्रवासात भारताच्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या १२ राज्यातून प्रवास केला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान प्रशिक्षक मितेन ठक्कर किशोर काळे, अॅड. कबीर राचुरे, अॅड. दत्ता चकोर, विजय काळे, सागर बोन्दार्डे यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्टवेअरमुळे पितळ उघड!

$
0
0

परराज्यातील संशयित गुन्हेगारांचे पासपोर्टसाठी अर्ज; ६० जणांना नोटिसा

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : पासपोर्ट मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाची माहिती देणे टाळण्याचे प्रकार आता महागात पडत आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या एका सॉफ्टवेअरमुळे नाशिकमध्येच नव्हे तर देशभरात कोठेही गुन्हा दाखल असल्यास ही बाब त्या व्यक्तीच्या पडताळणी दरम्यान उघड होते. या वर्षी असे ६० हून अधिक प्रकार पोलिसांनी शोधून काढले असून, ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.

पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारावर काही गुन्हे दाखल आहेत काय, याबाबत पडताळणी केली जाते. हे काम पोलिसांमार्फत होते. चारित्र्य पाडताळणीचा अहवाल काय असतो, त्यावर पासपोर्ट कार्यालय पुढील निर्णय घेते. या कामात शहर पोलिसांनी सुसुत्रता आणली आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला दोन टॅब देण्यात आले असून, ऑनलाइन पद्धतीने पडताळणी केली जाते. त्यातच काही महिन्यापूर्वी शहर पोलिसांना एक विशिष्ठ सॉफ्टवेअर मिळाले. त्यात व्यक्तीचे नाव टाकले की त्याची संपूर्ण कुंडली समोर येते. अगदी मोटार व्हेईकल अॅक्टनुसार गुन्हा दाखल असला तरी त्याची नोंद समजते. शहर पोलिसांकडे दिवसकाठी सरासरी १५० अर्ज पडताळणी येत असतात. या सर्वांची सॉफ्टवेअरच्या मदतीने पडताळणी केली असता त्यातील १२० अर्जदारांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. यातील ५० टक्के म्हणजे जवळपास ६० अर्जदारांवर परराज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. शहर पोलिसांनी याबाबतचा अहवाल ठाणे येथील पासपोर्ट विभागाला कळविला. त्यानुसार या विभागाने आपल्याला पासपोर्ट का देण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस संबंधितांना बजावली आहे.

बनवाबनवी करणे अशक्यच

नव्या प्रणालीबाबत शहर पोलिसांच्या पासपोर्ट विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल मानकर यांनी सांगितले की, यापूर्वी पडताळणीचे काम मनुष्यबळांवर आधारित होते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम सोपे झाले आहे. पासपोर्ट मिळण्याचा २१ दिवसांचा कालावधी १५ दिवसांपर्यंत आला. यापूर्वी, शहरातीलच नव्हे तर परजिल्ह्यात गुन्हे दाखल असल्यास ते शोधणे किचकट ठरत होते. आता देशभरात कोठेही गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती एका क्लिकवर मिळते. त्यामुळे बनवाबनवी करून पासपोर्ट मिळणे शक्य होणार नसल्याचे मानकर यांनी स्पष्ट केले.

सॉफ्टवेअरचा चांगला फायदा होत असून, लवकरच ही प्रक्रिया आणखी विस्तृत करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड झालेल्या वाहनचालकांची नोंदही यात करण्यात येणार आहे. सध्या मोटार वाहन कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल झालेल्यांची नोंद ठेवण्यात येते आणि तसा अहवाल पासपोर्ट विभागाला देण्यात येतो.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

...

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंकडून ‘शाळा’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आहे. मात्र,महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या धोरणाअंतर्गत दाखल केलेल्या डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या अंबड लिंक रोडवरील शाळेतल्या एका इमारतीवर हातोडा मारण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांअतर्गत नगररचनात दाखल असलेल्या तीन हजार फायलींतून मुंढे यांनी ही फाइल बाहेर काढली आहे. शाळेचे अतिक्रमण पाडण्याची घाई सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कम्पाउंडिंग पॉलिसीची मुदत असताना तसेच त्यांची छाननी होण्यापूर्वीच पालिकेच्या कारवाईने संशय बळावला असून, आर्किटेक्ट आणि शाळा व्यवस्थापनाने याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील रहिवाशी, वाणिज्य आणि व्यावसायिक इमारतींतील अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी राज्य सरकारने कम्पाउंडिंग पॉलिसी आणत त्याला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यात दंड भरून अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रथम ३१ मे २०१८ ही या धोरणाच्या अनुषंगाने बांधकाम नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत होती. त्यानंतर ही मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढवण्यात आली असून ३१ मेपर्यंत २९२३ प्रकरणे नियमितीकरणासाठी दाखल झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ११० प्रकरणे दाखल झाली आहेत. प्रकरणे दाखल करण्यासाठी अजून दीड महिना मुदत असून, छाननीनंतरच नियमात न बसणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जाणार आहे. राज्यशासनाकडून यासाठी विशेष मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, त्यांच्याकडून छाननी केली जाणार आहे. परंतु, याबाबतची मुदत शिल्लक असतानाच, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंबड लिंक रोडवरील डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या शाळेची फाइल बाहेर काढत, बांधकाम नियमितीकरणाचा प्रस्ताव परस्पर नामंजूर केला आहे. शाळेचे अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली आहे. मुंढे यांनी पॉलिसीची मुदत असताना आणि छाननी अपूर्ण असतानाच आपल्या अधिकारात हा विषय नामंजूर केल्यामुळे विश्वस्तांपासून तर मुख्याध्यापकापर्यंत सारेच हादरले आहेत. तीन हजार फायली या नगररचनात पडून असताना नेमकी याच फाइलबाबत मुंढे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आता शाळा व्यवस्थापनाचा संशय बळावला आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनीही याबाबत तोंडावर बोट ठेवले आहे. या धोरणाची मुदत अद्याप संपुष्टात आली नसताना, एकाएकी आपल्यावर कारवाई का, असा सवाल या शाळा व्यवस्थापनाने केला असून, त्यांनी याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. या शाळेसाठी महापालिकेने दिलेला मोकळा भूखंड ताब्यात घेण्यासाठीही नोटीस बजावण्यात आली आहे.

पंचवीस वर्षे जुनी शाळा

या शाळेला पुढील वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत असून, नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. तीन टप्प्यांत ही इमारत पूर्ण झाली असून, पहिला दाखला २००२ तर दुसरा दाखला २०१२ मध्ये नगररचना विभागाने दिला आहे. तिसऱ्या इमारतीसाठी कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. एफएसआय शिल्लक असल्याने त्याबाबत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यापूर्वीच फाइल रिजेक्ट करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा सर्व कागदपत्रांनिशी ही फाइल दाखल करण्यात आली आहे. नव्याने विजय सानप यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फतही प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, तरीही फाइल रिजेक्ट केल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विरोधी पक्षनेत्यांना दणका

सदरील शाळा ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या फाउंडेशनची आहे. त्यामुळे विखे पाटील यांचाही थेट संबंध या शाळेशी आहे. त्यामुळे याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच महापालिकेने त्यांच्या शाळेवर हातोडा चालवण्याची नोटीस देऊन विखे पाटील यांनाच दणका दिला आहे. सदरच्या शाळेत ज‌वळपास सातशे विद्यार्थी शिक्षण घेतात. मोठमोठ्या नेत्यांशी आणि राजकारण्यांशी संबंधित असलेल्या फायली बाहेर काढून त्यांच्यावर कारवाईचा भास निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार असल्याची पालिका वर्तुळात चर्चा असून, त्याला भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची छुपी मदत असल्याचे बोलले जात आहे.

सदर इमारतीची फाइल ही दोनदा कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत दाखल करण्यात आली आहे. या इमारतीची घरपट्टीही आम्ही भरतो. यात सातशे विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु, तीन हजार प्रकरणांमधून आमचीच फाइल कशी रिजेक्ट केली जाते, याबद्दल शंका आहे.

- पल्लवी विधाते, मुख्याध्यापिका

कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत फाइल दाखल असतानाच, महापालिका प्रशासनाकडून हेतूपुरस्सर शाळेला टार्गेट केले जात आहे. प्रशासनाची कारवाई ही शासनाच्या धोरणाविरोधात आहे. तीन हजार फायलींमध्ये शाळेचीच फाइल कशी बाहेर आली, हे संशयास्पद असून यांसदर्भात दाद मागितली जाईल.

- विजय सानप, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील महाविद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, येथे झालेल्या मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंनी सुवर्णमय कामगिरी केली. १७ व १९ वर्ष वयोगटातील धनश्री नितीन पवार ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक, अनामिका मच्छीन्द्र शिंदे ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक, तर करूणा रमेश गाढे ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. वरील तिन्ही खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना जेष्ठ क्रीडा शिक्षक दिलीप काळे, मनोहर भामरे तथा मनमाड येथील जय भवानी व्यायाम शाळेतील क्रीडा शिक्षक प्रविण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या क्रीडा इतिहासात दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, खजिनदार बाळासाहेब दुकळे,सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य जी.एस फसाले, पर्यवेक्षक जी. एल. पारखे सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूरसंचार कर्मचाऱ्यांचे मागण्यासाठी आंदोलन

$
0
0

नाशिक : आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी नाशिकमधील सर्व बीएसएनएल यूनियन आणि असोसिएशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मोर्चा काढून सरकार व दूरसंचार विभागाविरोधात असंतोष व्यक्त केला. यावेळी बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. बीएसएनएलला ताबडतोब ४ जी स्पेक्ट्रम देण्यासाठी, तिसरे वेतन रिव्हीजन लागू करण्यासाठी, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या पेन्शन रिव्हीजनसाठी तसेच चालू बेसिकवर पेन्शन अंशदान मिळावे, अशा विविघ मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व बीएसएनएल यूनियन आणि असोसिएशनचे पदाधिकारी मधुकर सांगळे, शशिकांत भदाने, राजेंद्र लहाने, दिलीप गोडसे, पी. एन. पाटील, गौरव सोनार, गणेश बोरसे, गिरीश बावीसकर, सलीम शेख, शिवाजी वारुगसे, रामकृष्ण सोनवणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदलियारविरोधात धमकीचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील बालाजी सोशल फाउंडेशनचा संस्थापक कैलास मुदलियार याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हस्तकांकरवी केबल चालकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे.

टीव्ही नेटवर्क केबलच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली. सुयश केबलचे चालक मोहन पवार (४५, अप्पू चौक, उपनगर) यांच्या फिर्यादीवरून रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले. पवार यांच्या तक्रारीचा आशय असा- उपनगर येथे मोहन पवार हे केबल व्यवसाय करतात. केबलचे ग्राहक जोडण्यावरून मोहन पवार आणि कैलास मुदलियार यांच्यात १३ नोव्हेंबरला दूरध्वनीवर बाचाबाची झाली. मुदलियारने पवार यांना म्हणाला, 'तू जे काही केबलचे काम चालू केले आहे ते बंद कर. माझ्या एरियात मी तुला केबलचा धंदा करू देणार नाही. तू जर माझ्या एरियात केबलचा धंदा चालू केला, तर मी तुझ्या घरी येऊन तुला मारझोड करीन. गाठ माझ्याशी आहे.' त्यानंतर १४ नोव्हेंबरला रात्री पावणेनऊच्या सुमारास पवार हे उपनगरच्या इच्छामणी जॉगिंग ट्रॅकवर फिरायला गेले असता दोन अनोळखी व्यक्तींनी अडवून धक्काबुकी केली. एकाने पवार यांच्या कानाजवळ रिव्हाल्वर लावून धमकी दिली. 'तुला कैलास मुदलियार यांनी फोन करुन समाजावले, तरी तू सुधारत नाही. तू त्यांच्या एरियात व्यवसाय करण्यासाठी घराच्या बाहेर पडला तर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही' असे म्हणून परत दोघांनी पवार यांना मारहाण केली. पवार यांनी आराडाओरड केल्यावर दोघे पळून गेले. त्यानंतर मोहन पवार यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी मुदलियारबरोबरच मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध तक्रार दिली. उपनगर पोलिस ठाण्यात मुदलियार व अन्य दोन अज्ञातांविरुध्द कलम ३/२५, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ५०७ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेमधून नूतनीकरण केलेल्या नेहरू उद्यानाचा लोकार्पण सोहळा न घेताच नागरिकांसाठी उद्यान खुले केल्यामुळे संतप्त झालेल्या महापौर रंजना भानसी यांनी उद्यान बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, प्रशासनाने त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असून, दुसऱ्या दिवशी उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले ठेवले. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा संताप अधिकच वाढला आहे.

नेहरू उद्यानाचे काम अद्याप बाकी असल्याने त्याचे लोकार्पण करू नये अशी मागणी काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी केली होती. त्यामुळे महापौरांनी सदरील सोहळा रद्द केला होता. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढेंनी मात्र याकडे दुर्लक्ष करत, उद्यान पहिल्या दिवशी खुले केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर भानसी यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांना सदरील उद्यान बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी हे उद्यान बंद करण्यात आले होते. परंतु, गुरूवारी पुन्हा महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असून उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या अपमानामुळे लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून, एकत्र बैठक घेऊन रणनीती तयार केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच वर्षांनंतर दरोडेखोर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरोड्याच्या गुह्यात तब्बल पाच वर्षापासून गुंगारा देणारा औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत पोलिसांनी मनमाड येथे शिताफीने अटक केला. २०१४ मध्ये नामपूर (ता. सटाणा) येथील दरोड्यात त्याचा सहभाग होता. मात्र, तो घटनेपासून फरार होता. ही कारवाई ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.

रवी लाल्या भोसले (४५, रा. जरुर, ता. वैजापूर) असे अटक केलेल्या संशयित दरोडेखोराचे नाव आहे. नामपूर येथील शिवनेरी कॉलनी येथे २०१४ मध्ये दरोडा टाकण्यात आला होता. सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळक्याने मध्यरात्री धनदाई बंगल्यात घुसून कुटुंबीयांना बेदम मारहाण करीत तब्बल चार लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले होते. या प्रकरणी जायखेडा पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी काही दिवसातच इतर आरोपींना शोधून काढले. मात्र, रवी भोसले घटनेपासून फरार होता. पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केल्यापासून म्हणजे तब्बल वर्षभरापासून मागावर असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

संशयित रवी भोसले मनमाड शहरात येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी गुरूवारी रेल्वे स्टेशन भागात सापळा लावला असता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. संशयित भोसले सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, एएसआय अशोक पाटील, पोलिस नाईक चेतन संवत्सरकर, राजू सांगळे, शिपाई गिरीष बागुल, हरीष आव्हाड आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस रुसला; लाल कांदा फसला!

$
0
0

पाण्याअभावी लागवडक्षेत्र संकटात

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सरासरी इतकाही पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीबाणीचा फटका कांदा लागवडीला बसला आहे. कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्र पाण्याअभावी वाया गेले आहे. लागवड होऊनही पाण्याअभावी पीक जळून गेल्याने कांदा उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे. ग्राहक व शेतकऱ्यांसह सत्ताधारी सरकारलाही यंदा कांदा रडवणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांत गेल्या मोसमात पावसाने सरासरी न गाठल्याने हिवाळ्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विभागातील ३९ तालुक्यांमधील भूजलपातळी खालावली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश आहे. सरासरी पावसाअभावी कांदा पिक संकटात सापडले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कांदा पिकाखालील क्षेत्रात काही अंशी वाढ झाली; मात्र पाण्याअभावी कांदा पीक संकटात आले आहे. पाणीटंचाईमुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून कांदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांसह सत्ताधारी सरकारचाही वांधा करण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या खरिपात नाशिक विभागात २९ हजार ४६६ हेक्टर तर लेट खरिपात ५६ हजार १९८ हेक्टर अशी एकूण ८५ हजार ६६४ हेक्टर इतक्या क्षेत्रावर लाल कांद्याची लागवड झाली होती. यंदा लाल कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात जवळपास ९ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे.

लेट खरीपात मोठी घट

नाशिक विभागात यंदा खरीपातील लाल कांद्याची ७५ हजार ७१२ हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये दोन मोठे ड्राय स्पेट आल्याने व परतीच्या पावसानेही हजेरी न लावल्याने खरिपातील कांदा पीक वाया गेले. परतीच्या पावसानेही अपेक्षाभंग केल्याने लेट खरिपातील लाल कांद्याच्या लागवडीत घट झाली आहे. पाणीटंचाईमुळे रब्बी व उन्हाळी कांदा लागवडीवरही परिणाम होणार आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात लेटखरीप तर नंदुरबार जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीत मोठी घट आली आहे.

नाशिक विभागातील कांदा लागवड (हेक्टर)

जिल्हा..............२०१७............................२०१८

खरीप.....लेटखरीप.......खरीप..............लेटखरीप

नाशिक.....१६,७८२.....५३,१८४.....३७,०९७.....१२,५५४

धुळे..........१,३७२..........०..........२,६९२..........०

नंदुरबार.....१,२४२..........०..........०..........१,४४३

जळगाव..........०..........२,५६०..........०.....४,२४६

नगर.........१०,०७०..........४५४..........३५,९२३..........०

एकूण......२,९४,४६६......५६,१९८..........७५,७१२..........१८,२४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिकेची कारला धडक

$
0
0

अपघातात महिला ठार; पाच जण जखमी

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या कार व समोरून वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिका यांच्यात झालेल्या अपघातात नाशिकच्या ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी नाशिक, त्रिमूर्ती चौकातील रहिवाशी कुटुंबीय गुरुवार (दि.१५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कारने (एमएच १५ सीएम १५१२) मुंबई-आग्रा महामार्गाने आले, देवी मंदिर चौफुलीवरून मंदिराकडे गाडी वळवत असताना मालेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने (यूपी ८५, बीटी ०८६८) जोरदार धडक दिली. अपघातात मंगलाबाई सुधाकर सोनवणे (७०, रा. त्रिमूर्ती चौक, नाशिक) यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. तसेच कारमधील राहुल मुरलीधर जगताप (३९), निशा राहुल जगताप (३५), हेमा अनिल शिंपी (४०) व प्रणव राहुल जगताप (८) यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच रुग्णवाहिक चालक प्रभूदयाल धनश्यामदास (४०, मथुरा, उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सलीम शेख, हवालदार हरीशचंद्र पालवी, कॉन्स्टेबल सागर शेवाळे, १०८ रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भालचंद्र पवार, डॉ. सतीश गांगुर्डे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.

धोकादायक वळण

चांदवडच्या कुलस्वामिनी रेणुका देवी मंदिरात दर्शनासाठी वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणात रिघ असते; मात्र मुंबई-आग्रा महामार्गावरून वळण घेऊन मंदिराकडे जातांना चौफुलीवर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या चौफुलीवर अपघात नियंत्रणासाठी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी सहा वर्षांपूर्वी असाच भीषण अपघात झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड पोलिस ठाण्यात ५० जणांची नेत्रतपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनुलोम सामाजिक संस्था आणि आयुर्वर्धिनी चिकित्सालय यांच्यातर्फे शहरातील अंबड पोलिस ठाण्यात मोफत नेत्र व नाडीपरीक्षण शिबिराचा पोलिस कर्मचाऱ्यांसह सुमारे ५० पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

नेत्रांसाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक औषधींद्वारे नेत्रांची निगा राखण्यासाठी नेत्र तर्पण या आयुर्वेदातील तंत्राचा उपयोग केला जातो. यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया करण्यात येते. नेत्रांशी निगडीत दैनंदिन समस्यांवर याचा प्रभावी उपयोग होतो. ही उपचार पद्धती या शिबिरात सहभागी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली. डोळ्यांसमोर अंधारी येणे, पापण्यांवर कोंडा जमा होणे, प्रकाश सहन न होणे, डोळे शुष्क व रुक्ष होणे, पापण्यांचे केस गळणे, नेत्र गढूळ होणे, दृष्टिमांद्य होणे, अश्रुस्राव कमी होणे, कॉर्नियल अल्सर इत्यादी विकार तर्पणसाध्य आहेत. नंतर तर्पण करण्यापूर्वी पंचकर्म केल्यास रुग्णांना तर्पणाचा अधिक लाभ होतो. यानंतर तेजस्वी व अतिप्रकाशयुक्त वस्तूंकडे पाहू नये, तर्पणानंतर झोप चांगली येते, स्राव कमी होतात, डोळ्यांच्या वेगवेगळ्या भागांचा रंग प्राकृत आणि स्वच्छ होतो. दृष्टी निर्मळ होते. डोळ्यांचे सौंदर्य वाढते, अशी माहिती रुग्णांशी संवाद साधताना आयुर्वर्धिनीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. वैद्य तुषार शेलार, वैद्य दिनेश पंचभाई, वैद्य वैभव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर झाले. अंबड पोलिस ठाण्यातील कर्मचारी व परिसरातील नागरीकांनी या शिबिराचा लाभ घेतला. वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे आणि अंबड ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य या उपक्रमाच्या आयोजनासाठी मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक शेट्टीवर तडीपारीची कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याच्यासह अन्य ३१ जणांवर पंचवटी पोलिसांतर्फे तडीपारीची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला तेव्हापासून शेट्टी फरार आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोमवारी (दि. १२) वाघाडी परिसरात कारवाई केली होती. यावेळी चार ते पाच संशयित पोलिसांच्या हाती लागले. मात्र, भाजपचा प्रभाग चारचा विद्यमान नगरसेवक हेमंत शेट्टी फरार होण्यात यशस्वी ठरला. या प्रकरणी शेट्टीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याची २०१५ मध्ये घोटी परिसरात हत्या झाली होती. हेमंत शेट्टीने राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, अविनाश कौलकर यांच्यासह इतर काही साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे दोन ते अडीच वर्षांनी पोलिस तपासात समोर आले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी शेट्टीला अटक केली होती. हायकोर्टाच्या आदेशानुसार शेट्टीला जामीन देण्यात आला. जुगार अड्डे, हत्या यासह इतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या नगरसेवक शेट्टीविरुद्ध पंचवटी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. इतर जवळपास ३० सराईत गुन्हेगारही तडीपारीच्या वाटेवर आहेत. याबाबत सध्या पोलिस आयुक्तालयात खल सुरू असून, पुढील आठवड्यापर्यंत याबाबत आदेश होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय पाठबळ

विद्यामान नगरसेवकावर तडीपारीची कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. पंचवटीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शहर पोलिसांकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र, येथील सराईत गुन्हेगारांना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांकडून पाठबळ मिळते. याचा थेट फायदा सराईत गुन्हेगारांना मिळतो. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१ कोटी ८४ लाख कागदपत्र झाली डिजीटल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील महसूल व भूमी अभिलेख विभागातील \B१ कोटी ८४ लाख कागदपत्रे डिजीटल झाली असून, नव्या वर्षापासून नागरिकांना \Bसंगणकीकृत नकला मिळू शकणार आहेत. त्याबाबतची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जमावबंदी आयुक्त एस. चोक्‍कलिंगम यांनी घेतली. यावेळी जुने सर्व रेकॉर्ड १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या संगणकीकृत नकलामुळे सर्वसामान्यांना काही मिनिटात कागदपत्रांच्या नकला सहज मिळणार आहेत. विशेष म्हणजे या नकला डिजीटल सहीने घरबसल्याही मिळू शकतील.

जिल्ह्यात महसूल व भूमी अभिलेख विभागाचे १ कोटी ८४ लाख कागदपत्र रेकॉर्डमध्ये आहेत. त्यातील महसूल विभागाचे १ कोटी ५४ लाख कागद तर भूमी अभिलेख विभागाचे २७ लाख कागद रेकार्डमध्ये आहेत. हे सर्व रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजीटल स्वरूपात करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वर्षात आवश्यक कागदपत्रे नागरिकांना अधिक कमी वेळात मिळू शकणार आहेत. महसूल विभागातून जुने सातबारा, जुने फेरफार नोंदवही, चालु खाते उतारा, कडई पत्रक, इनाम पत्रक, जन्ममृत्यू रजिस्टर, तर भूमी अभिलेख विभागातून टिपण, गुणाकार बुक, आकारफोड, क.जा.प, आकारबंद, योजनापत्रक, एकत्रीकरण योजना नोंदवही, दुरुस्ती योजना, शुध्दीपत्रक, एकत्रिकरण जबाब धारिका, शेतपुस्तक, एकत्रीकरण गाव पीसी क्लास्टर रजिस्टर, वसेलवार बुक, क्षेत्रबुक, ताबेपावती, एकत्रीकरण योजनेवेळचे ९(१) ९(२) चे नकाशे मिळणार आहे.

काय आहे संगणक नकला

सरकारी कामकाजातील जुने रेकॉर्ड शोधणे हे अवघड काम होते. त्यासाठी अर्ज केल्यानंतर ते शोधण्यासाठी अनेक दिवस लागत. ते शोधल्यानंतर त्याच्या झेरॉक्स मारुन नंतर त्या नकला शिक्के व सही मारुन दिल्या जात असतं. पण, आता सरकारने सर्व सरकारी रेकॉर्ड स्कॅन करुन ते संगणकातील एका डेटामध्ये साठवले आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर हे सर्व रेकॉर्ड व त्याच्या प्रती मिळणार आहेत. त्यानंतर त्यावर सही व शिक्के मारुन ते दिले जाणार आहेत. घरबसल्याही हे रेकॉर्ड मिळू शकेल व त्यावर डिजीटल सही असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील पार्कच्या जागेत व्हावे मुलींसाठी वसतिगृह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोड येथील डोंगरे वसतिगृहाशेजारील पाटील पार्कच्या मोकळ्या जागेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहास स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर वसतिगृह मेरीत सुरू झाले. यामुळे आता पाटील पार्कच्या जागेवर मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी मराठा संघटनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

शहरात वसतिगृहाचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला तसे निर्देश दिले होते. त्यासाठी गंगापूर रोडवरील सर्व्हे क्रमांक ७१८/१ अ/१ ब/३/१० या पाटील पार्कच्या मोकळ्या आरक्षित जागेवर वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी वसतिगृह उभारण्यास विरोध केला होता. मुलांचे वसतिगृह झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असे सांगत, ही जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. गंगापूर रोडवरील जागेचा विरोध लक्षात घेवून मेरी येथे मुलांचे वसतिगृह स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या नगररचना विभागाने पाटील पार्कच्या जागेवर फुली मारली असली तरी मराठा संघटनांनी विरोध मोडून काढतं त्या जागेवर मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांनी मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने आता पाटील पार्कच्या जागेवर मुलींसाठी वसतिगृह उभारले जाणार असून, शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे पाटील पार्कच्या जागेवर मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा वाद पुन्हा पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर स्वच्छतेबाबत नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या विशेष तपासणी मोहीमेनंतर सफाई कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारपासून (दि. १६) काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा वाल्मिकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने दिला आहे.

संघटनेचे नेते सुरेश दलोड, सुरेश मारू व ताराचंद पवार यांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी असताना त्यांच्याकडून क्षमतेपेक्षा अधिक काम करवून घेतले जात आहे. आता त्यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांची पिळवणूक करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा न देता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना कामचुकार ठरवून होत असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू करण्यात येत असून, सर्व सफाई कर्मचारी प्रशासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो. तु. पाटील निवड

$
0
0

'तावडी बोली' संमेलन

अध्यक्षपदी गो. तु. पाटील

म. टा. वृत्तसेवा, येवला

येत्या ३० नोव्हेंबर रोजी जामनेर येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय 'तावडी बोली' साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मराठीचे गाढे अभ्यासक, थोर विचारवंत व साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांना मिळणार आहे. जामनेरच्या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजकांनी जाहीर करताना संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रा. पाटील यांच्या निवड जाहीर केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरात 'तावडी बोली' ही बोलीभाषा बोलली जाते. याच तावडी बोली भाषिकांनी ३० नोव्हेंबर रोजी जामनेर येथे पहिल्या राज्यस्तरीय 'तावडी बोली' साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आहेत. उद्घाटन प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांच्या हस्ते होणार असून, साहित्यिक तथा जेष्ठ विचारवंत प्रा. गो. तु. पाटील संमेलनाध्यक्षपदी असतील. येवल्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. गो. तु. पाटील यांनी समाजमनाला दिशा देणाऱ्या अनेक विषयांसह मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. 'अनुष्ठुभ' या नियतकालीकाचे माजी संपादक प्रा. पाटील यांचे 'ओल अंतरीची' हे 'आत्मचरित्र' नुकतेच प्रकाशित झाले आहे. याशिवाय, प्रा. पाटील यांनी आजवर शालेय विद्यार्थ्यांवर १६ चरित्रपर पुस्तिका लिहिलेल्या असून, 'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकावर आधारित पुस्तकेही संपादित केलेले आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शनाचे कामही प्रा. पाटील यांनी केलेले आहे. 'मटा'मधील 'सगुण-निर्गुण' या सदरात त्यांनी विविध विषयांवर केलेल्या स्तंभलेखनास वाचकांसह समाजमनाची दाद मिळालेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार गोटेंना अद्वय हिरेंचा पाठिंबा

$
0
0

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या अडचणींत वाढ

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भाजपाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटे यांच्या मदतीला भाजपचे नेते तथा नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे यांनी धाव घेतली आहे. धुळ्यात हिरेंनी गुरुवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत घेऊन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर आरोप करीत त्यांच्या कार्यशैलीवर टीका केली. आमदार गोटेंच्या नेतृत्वावर आपल्याला पूर्ण विश्‍वास असून, पक्षाने त्यांची वेळीच समजूत काढावी. तसेच आगामी निवडणुकीत आपला आमदार गोटेंना पूर्णपणे पाठींबा असेल, असेही त्यांनी जाहीर केले.

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त करीत बंडाचे निशाण उभे केले आहे. त्यात आता नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अद्वय हिरे यांनी उडी घेतली आहे. हिरेंनी गुरुवारी आमदार गोटे यांच्या समर्थनार्थ धुळ्यात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अद्वय हिरे म्हणाले की, धुळे शहरात भाजपचे आमदार असताना अनिल गोटे यांना व्यासपीठावर बोलू न देणे ही कृती अन्यायकारक असून, त्यासाठी भाजपचे म्हणविणारे डॉ. सुभाष भामरे हे जबाबदार आहेत. ते स्वतः पक्षाचे सदस्य नसताना केवळ लोकसभेत वरून तिकिट मिळविणे, मोदी लाटेवर निवडून येणे हीच त्यांची पुण्याई असल्याची टीकाही हिरे यांनी केली. या पत्रकार परिषदेसाठी नाशिक बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ निकम, शांताराम लाठर, अशोक बच्छाव उपस्थित होते.

उपऱ्यांना संधी देण्याची भूमिका घातक
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री म्हणून काम करणारे भामरे हे अद्यापही भाजपचे साधे सदस्य नाहीत. त्यामुळे काम करताना ते नेहमीच भाजपच्या स्थानिकांना डावलत आले आहेत, असेही हिरे म्हणाले. आजवर डॉ. भामरेंनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून उपऱ्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्यानेच त्यांना विरोध करणे गरजेचे झाले आहे. आधी सटाणा आणि आता धुळे येथील निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे हे पक्षालाच मारक भूमिका घेत असल्याने त्यांनी वेळीच सुधारणा न केल्यास भविष्यात त्यांनाही याचा फटका बसू शकतो, असे सूतोवाच वजा इशाराही अद्वय हिरे यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मस्तच! 'ईएमआय'वर करा सत्यनारायण पूजा

$
0
0

नाशिक

'ईएमआय'वर घर, गाडी, फर्निचर, मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. धार्मिक विधीची भन्नाट संकल्पना नाशिकमधील अनिकेत शास्त्री यांनी पुढे आणली आहे. या अंतर्गत आता सत्यनारायण पूजेपासून बारसे ते अंत्यविधीपर्यंतचे सर्व धार्मिक कार्यक्रम सुलभ हप्त्याने (ईआयएम) करता येणार आहेत.

घरात सत्यनारायण पूजा किंवा मोठे धार्मिक कार्यक्रम करायचे म्हटले तर पैशांची चणचण भासते. घर खरेदी करण्यासाठी आधीच अमाप पैसा खर्च झालेला असतो. त्यावेळी कोणाकडून पैसा मागायला सुद्धा लाज वाटते. परंतु, आता कोणापुढेही हात पसरवयाची वेळ येणार नाही. अनिकेत शास्त्री यांनी धार्मिक विधीचे सर्व कार्यक्रम ईआयएमवर उपलब्ध केले आहेत. देशात पहिल्यांदाच सुलभ हप्त्याने धार्मिक विधी करणारे नाशिक हे पहिले शहर बनले आहे.

धार्मिक विधीसाठी सहा महिने, आठ महिने व बारा महिने अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विधी पार पडल्यानंतर ईआयएमच्या रुपाने दक्षिणा देता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मोहीम

$
0
0

घरा-घरात पोहचविणार सुविधांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त १६ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने डोअर टू डोअर कॅम्पेन हाती घेतले आहे. याअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण झोपडपट्टी भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून न्यायदान आणि सर्वसामान्यांना मिळणाऱ्या मोफत सवलती याची माहिती देणार आहेत. राष्ट्रीय विधी सेवा दिन ९ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅरा लिगल स्वंयसेवक ग्रामीण व शहरी भागातील झोपडपट्टी भागात जावून प्राधिकरणामार्फत पुरविल्या जाणाऱ्या योजनांची व दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती देणार आहेत. प्राधिकरणाकडे २० ते २५ स्वयंसेवक असून, शहरात अंबड, गंजमाळ, फुलेनगर, मल्हारखान, वडाळा गाव, भारतनगर यासह इतर झोपडपट्टी भागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार बुक्के यांनी मल्हारखान झोपडपट्टी आणि अशोक स्तंभ परिसरात स्वंयसेवकांसह सर्वसामान्यांशी संवाद साधला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत विधी सहाय्य, लोकअदालत, मध्यस्थी केंद्र, व्हिक्टिम कॉम्पेनसेशन स्कीम, मनोधैर्य योजना राबविली जाते. या योजनांसह इतर माहिती या उपक्रमाद्वारे नागरिकांना दिली जाणार असल्याचे बुक्के यांनी सांगितले.

येथे साधा संपर्क

कोणतीही कायदेशीर मदत हवी असल्यास नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, वैकल्पिक वाद निवारण केंद्र इमारत, मारुती मंदिराजवळ, जिल्हा न्यायालय आवार या पत्त्यावर किंवा ०२५३-२३१४३०६ या क्रमांकावर तसेच dlsansk@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन बुक्के यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images