Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

थोडक्यात

$
0
0

\Bआज मार्गदर्शन\B

नाशिक : मा. रा. सारडा कन्या विद्यालयातर्फे पाचवीतील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आज, २० जानेवारी रोजी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार आहे. सारडा विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेनंतर चाचणीही होणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका मृदुला शुक्ल, उपमुख्याध्यापिका मुक्ता सप्रे यांनी दिली.

\Bपुरस्कार वितरण आज\B

नाशिक : देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे आधारस्तंभ मधुकर (दादा) कावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आज, २० जानेवारी रोजी होणार आहे. ऋग्वेद सभागृह, बाजीरावनगर, तिडके कॉलनी येथे सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पुरंदरे प्रमुख पाहुणे, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी अध्यक्षस्थानी असतील. स्नेहसंमेलन, तिळगूळ समारंभ, विद्यार्थी पारितोषिक वितरण, देणगीदारांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी व कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी ही माहिती दिली.

\B(फोटो आहे)

'शिशुसंगम' उत्साहात \B

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार मराठी माध्यमात शिशुविहार मराठी व विद्याभारतीतर्फे 'शिशुसंगम' कार्यक्रम झाला. शिशुवाटिकेत ३ ते ६ वयोगटासाठी कशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था असावी, याची मांडणी येथे करण्यात आली होती. या वेळी मधुश्री सावजी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी संस्थेचे हेमंत देशपांडे, दिलीप बेलगावकर, विद्याभारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष अनिल महाजन, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित होते. वैशाली भट यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख वैशाली कुलकर्णी व विद्याभारती प्रांतप्रमुख सुनीता बल्लाळ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोहार

$
0
0

मनोज लोहार, येवलेंना

खंडणीप्रकरणी जन्मठेप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

चाळीसगाव येथील तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तसेच संस्थाचालक डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक तथा मुंबई होमगाडचे पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार (वय ४५) व त्यांचे सहकारी सहकारी धीरज यशवंत येवले (वय ४७) यांना शनिवारी (दि. १९) जळगाव जिल्हा सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा ठोठावल्यानंतर दोघे आरोपींची जळगावच्या उपकारागृहात रवानगी करण्यात आली.

या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव रावसाहेब निंबाळकर (वय ५९) यांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. चाळीसगाव येथील डॉ. उत्तमराव महाजन (वय ६२) यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी त्यांचे अपहरण करून १८ जास डांबून ठेवल्याच्या कलमांखाली तिघांवर चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, शनिवारी शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला.

कमी शिक्षा मिळावी

या वेळी लोहार यांनी कमीत-कमी शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयापुढे विनंती केली. आपणास कॅन्सर सारखा दुर्धर आजार असून, उपचार सुरू आहेत. आपल्याला कार्डियाकचा अटॅक येण्याची शक्यता असून, मुलांचे शिक्षण सुरू आहे. वृद्ध आई-वडील आहेत असा युक्तिवाद त्यांनी केला. येवले यांनी पत्नी आजारी असते, वृद्ध आई-वडील व मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. या प्रकरणात आपला काहीच फायदा होणार नव्हता. त्यामुळे कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. दोघांच्या विनंतीनंतर न्यायालयाने त्यांना कसे दोषी धरले व काय शिक्षा ठोठावली याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकार पोटातून बोलतो...

$
0
0

अभिनेत्री गार्गी फुले यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, येवला

कोणताही अभिनय करताना कलाकार हा त्याच्या भूमिकेशी अगदी एकरूप होतो. आपण करीत असलेले पात्र म्हणजे प्रत्यक्ष जगणे आहे अशी त्यास ठाम भूमिका घ्यावी लागते. कलाकार ओठातून नव्हे तर पोटातून बोलत असतो. त्यास इतरांची नक्कल करून कलाकारास स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येत नाही. एक सिद्धहस्त कलाकार म्हणून आपली ओळख करुन दयायची असेल तर कलाकारास प्रचंड मेहनत घ्यावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या तथा प्रसिद्ध अभिनेत्री गार्गी फुले यांनी येवल्यात केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद येवला शाखा आणि महात्मा फुले अकादमी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी काव्य करंडक, नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडक, रंगकर्मी सतीश कानडे, डॉ. भरतकुमार सिन्हा अभिनय, कवीवर्य कुसुमाग्रज व कवीवर्य बाबुराव बागुल काव्य वाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात झाला. या शानदार सोहळयात प्रमुख पाहुण्या म्हणून गार्गी फुले बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष तथा साहित्यिक विक्रम गायकवाड हे होते. येथील फुले नाट्यगृहातील पुरस्कार वितरण सोहळयापूर्वी स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली. त्यात परिक्षक म्हणून कवी कमलाकर देसले व प्रा. किशोर गोसावी यांनी काम पहिले. पुरस्कार सोहळयाप्रसंगी येवला तालुक्यातील जवळपास तब्बल ९० शाळांमधील एकूण ५०० विदयार्थ्यांनी पहिल्या फेरीतील काव्य काचन व अभिनय स्पर्धेसाठी सहभाग नोंदवत आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले.

पुरस्कारार्थींना गार्गी फुले यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते असे...

काव्य वाचन लहान गट : विद्या शेळके (ठाणगाव), गायत्री आव्हाड व तनुजा भालेराव (सायगाव), मोठा गट : ऋतुजा पुंड (अंदरसूल), प्रमोद वारुळे (डि. पॉल येवला), स्वप्नील खालकर (राजापूर), खुला गट : विशाखा बारहाते (येवला).सर्वोत्कृष्ट काव्य करंडक : सोनवणे ज्युनिअर कॉलेज, अंदरसूल.

अभिनय स्पर्धा लहान गट : साक्षी कदम, राकेश घोडेराव, प्रणाली वाघ, मोठा गट : प्रद्युम्न जाधव, रसिका चव्हाण, अनिकेत बाविस्कर, खुला गट : जगदिश पाटील. सर्वोत्कृष्ट अभिनय करंडक : सरस्वती विदयालय, सायगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचाळेत युवकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील पंचाळे येथील संदीप साहेबराव सैंद्रे (वय २०) या युवकाने शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मध्यरात्री दोन वाजता त्याने स्वत:च्या व्हाट्सअॅप स्टेटसमध्ये 'अखेर घेतला ना भो निरोप' असा मेसेज सेव्हे केल्याचे आढळून आले.

पंचाळे गावापासून एक किलोमीटर अंतरावर भोकणी रस्त्यालगत सैंद्रे यांचे घर आहे. संदीपने एसवायबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. वर्षभरापासून तो मुसळगावच्या कारखान्यात काम करत होता. शुक्रवारी दुपारी चार वाजता ड्युटी संपवून घरी आला. रात्री जेवण करून तो झोपी गेला होता. शनिवारी सकाळी सैंद्रे कुटुंबियांना संदीप घरात दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू केली. घरापासून जवळच असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाला दोरी बांधून त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत त्याचा भाऊ गणेश याने ताबडतोब कुटुंबीयांना माहिती दिली. रवींद्र जगताप यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची खबर दिली. सिन्नर नगरपालिका दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या मृतदेह देण्यात आला. संदीपच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येपूर्वी मध्यरात्री दोन वाजता त्याने स्वत:च्या व्हाट्सअॅप स्टेटसमध्ये 'अखेर घेतला ना भो निरोप' असा मेसेज मित्रांना पाठविला असल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैलेश ढगे यांचाराष्ट्रवादीत प्रवेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि दुर्गा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील गटबाजी, तसेच पक्षाकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सिडकोत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला. आपल्यासमवेत पाचशे समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगून ढगे म्हणाले, की आपल्या पुढाकाराने जेलरोड येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. मात्र, आपल्याला विचारात न घेताच उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला, तसेच उदघाटन कार्यक्रमपत्रिकेतही नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत कोंडी करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून केला जात होता. पक्षाचे काम निष्ठेने करूनही उपेक्षा होत असल्याने गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे ढगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांचा एक तास कमी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांची वेळ इतर बहुतांश शाळांच्या तुलनेत एक तासाने अधिक असल्याने हा एक तास कमी करावा, अशी मागणी महापालिका शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या शाळांची वेळ सकाळी ८ ते २ आहे. ही वेळ बदलून सकाळी ८ ते १ किंवा ९ ते २ अशी करावी, अशी भूमिका संघटनेकडून घेण्यात आली आहे.

मागील वर्षी तत्कालिन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या शाळांचे एकत्रीकरण करून १२७ शाळांपैकी ३७ शाळांचे विलिनीकरण केले होते. या निर्णयानुसार, महापालिकेच्या ९० शाळा सध्या आहेत. यावेळी महापालिकेच्या शाळांची वेळदेखील सकाळीच करण्यात आली. मात्र, सकाळची वेळ ही सर्वच शाळा आणि पालकांसाठी सोयीची नसल्याचे अनेक मुख्याध्यापकांचे म्हणणे होते. त्यामुळे शिक्षण सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळांची वेळ ११ ते ४ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सकाळच्या वेळेतीलच एक तास कमी व्हावा, ही मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे.

तुकाराम मुंढे आयुक्तपदी आल्यानंतर त्यांनी शाळांच्या वेळा बदलल्या होत्या. त्यानुसार ८ ते २ ही वेळ शाळांची आहे. परंतु, ही वेळ जास्त असून, त्यातून एक तास कमी व्हावा, अशी आमची मागणी आहे.

\B- चंद्रकांत गायकवाड,

सरचिटणीस महापालिका शिक्षक संघटना समन्वय समिती\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणात्मक वृद्धीसाठी मूल्यमापन गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या कॉलेजांची गुणात्मक वृद्धी होण्यासाठी मूल्यमापन होणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन वैद्य श्रीराम सावरीकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात परिचर्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व महाविद्यालय प्रमुखांकरीता आयोजित इम्पॅक्ट असेसमेंट कार्यशाळेत ते बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, प्रमुख अतिथी व गुजरात आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी कुलगुरु वैद्य श्रीराम सावरीकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. राजेंद्र बंगाळ, डॉ. सुधा रेड्डी, डॉ. सिध्दार्थ दुभाषी आदी उपस्थित होते.

वैद्य सावरीकर म्हणाले, 'आरोग्य क्षेत्रात सातत्याने बदल घडत आहेत. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या गुणात्मक वृद्धीसाठी मूल्यमापनाची प्रक्रिया राबविली जात आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन परिचर्या महाविद्यालयांनी गुणात्मक वृद्धीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे मूल्यमापनाद्वारे शिक्षकांना, महाविद्यालयांना, संस्थांना आणि विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होऊ शकतो.'

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर म्हणाले, 'परिचर्या महाविद्यालयांच्या संलग्निकरणाचे नुतनीकरण करताना येणाऱ्या समस्यांचे निवारण करणेसाठी पायाभूत सुविधा असणे गरजचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या गुणवत्ता वृद्धीसाठीचे उपक्रम राबविले जात आहेत.'

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले,'विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील परिचर्या अभ्यासक्रमात सुसूत्रता असावी यासाठी संलग्निकरणाचे नुतणीकरण हे इम्पॅक्ट असेसमेटवर अवलंबून असल्याने कार्यशाळा महत्त्वपूर्ण आहे.' महाविद्यालयाचे मूल्यमापन करताना पायाभूत सुविधा, विद्यापीठाचे मान्यताप्राप्त शिक्षक आदी बाबी गरजेच्या आहेत. महाविद्यालयातील समस्या दूर होण्यासाठी नियोजनबद्धरित्या या प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी व्हावे, याचे मार्गदर्शन होणार असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी ऑब्जेक्टीव्ह ऑफ इम्पॅक्ट असेसमेंट, पुण्याचे काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे एफएमटी विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी टिचींग लर्निंग ॲण्ड इव्हॅल्युएशन, स्टुडन्ट सपोर्ट ॲण्ड प्रोग्रेशन या विषयावर, बेळगांवचे केएलई अॅकॅडमी

ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायंसेसच्या प्रा. सुधा रेड्डी यांनी इन्स्टिट्यूट्युशन

ॲण्ड बेस्ट प्रॅक्टीस, रिसर्च, इनोव्हेशन ॲण्ड एक्स्टेन्शन या विषयावर, मुंबईचे एम. जी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सिध्दार्थ दुभाषी यांनी इंफ्रास्ट्रक्चर ॲण्ड लर्निंग रिसोर्स आणि गव्हर्नन्स, लिडरशिप ॲण्ड मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, उपकुलसचिव नितीन कावेडे, डॉ. सुचिता सावंत, डॉ. अनुपमा ओक, डॉ. मिनल राणे, डॉ. हुसैन, बाळासाहेब घुले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी अशोक जाधव, हेमंत कर्डक, शिल्पा पवार, बाळासाहेब पेंढारकर यांचा विशेष सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरस्त्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मूळ नांदगाव येथील मात्र मागील वर्षापासून शहरात फिरस्ता म्हणून राहणाऱ्या ३० ते ३२ वर्ष वयाच्या व्यक्तीचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्याला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केल्याने पोलिसांची तारंबळ उडाली. पोलिसांचे लक्ष आता डॉक्टरांच्या अहवालाकडे लागले असून, परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

प्रभाकर लक्ष्मण पवार (रा. टाकळी, ता. नांदगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रभाकर मंगळवारी (दि. ८) स्वत: उपचार घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. पोट दुखीने त्रस्त असलेल्या प्रभाकरने आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी प्रभाकरला भेटून त्याची माहिती घेतली. आपल्यावर सोमवारी (दि. ७) रात्री ११ वाजता सराफ बाजारातील फुलबाजार येथे असलेल्या स्वच्छतागृहाजवळ अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 'बरे वाटल्यानंतर आपणच त्याचा बदला घेऊ', असेही तो सांगत होता.

दरम्यान, लिव्हरमध्ये सेफ्टीक झालेल्या प्रभाकरचा उपचारादरम्यान शुक्रवारी सांयकाळी मृत्यू झाला. याबाबत बोलताना सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत म्हणाले,'मयत प्रभाकरने केलेल्या दाव्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही असून, रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक सुद्धा तैनात असतात. मात्र, प्राथमिक चौकशीत प्रभाकरला मारहाण झाल्याचे पुरावे दिसत नाही. त्यामुळे ही घटना नक्की येथेच झाली की अन्य कुठे याचा तपास करावा लागणार आहे.'

मागील वर्षभरापासून शहरात राहणाऱ्या प्रभाकरला मद्याचे आणि गांजा पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्या लिव्हरला त्रास होत होता की, तो कोठे पडला होता, हेही पाहावे लागेल. सध्या आम्ही डॉक्टरांच्या अहवालाची प्रतिक्षा करीत आहोत. डॉक्टराचा अहवाल जसा येईल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. तुर्तास आम्ही या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निरोगी आयुष्यासाठी जीवनशैली बदला

$
0
0

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा फिटनेस मंत्र

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बदलत्या जीवनशैलीमुळेच दिवसेंदिवस मधुमेह, लठ्ठपणा, या समस्या वाढत आहेत. आपल्या पारंपरिक जीवनशैलीकडे गेल्यास निरोगी आयुष्य जगता येईल. तुमचे आरोग्य हे तुमच्या हाती असते. त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा अथवा वजन कमी करण्यास शॉर्टकट नाही. तुमचे वजन तुम्हालाच कमी करायचे आहे. यासाठी खाण्याच्या दोन योग्य वेळा निवडा. दिवसातून किमान ५५ मिनिटे चालण्याचा निर्धार करा, असा फिटनेस मंत्र डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मालेगावकरांना दिला.

येथील भारतीय विचार मंचच्या वतीने शनिवारी 'लठ्ठपणा व मधुमेह प्रतिबंधाचा सोपा उपाय' या विषयावर सटाणा नाका परिसरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानास मालेगावकरांनी मोठी गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. डॉ. दीक्षित यांनी आपल्या व्याख्यानात लठ्ठ कोणाला म्हणण्याचे, वजन कमी करण्याचे डाएट प्लान का फसतात, कोणता डाएट प्लान यशस्वी होतो, मधुमेह व वजन कसे नियंत्रण करता येते, त्यासाठी जीवनशैली कशी असावी याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण विचार मांडले. दीड तासाच्या व्याख्यानात त्यांनी विनासायास वेट लॉसचा फिटनेस मंत्र उपस्थित श्रोत्यांना दिला. दिवसातून दोन वेळा जेवण करा व ५५ मिनिटे पायी चला, असा सहज सोपा उपाय त्यांनी सांगितला. रोजच्या आहारात कमीत कमी गोड खा. दोन जेवणांच्या मध्ये खाणे टाळावे असा सल्ला देखील त्यांनी दिला. रविश मारू यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. जिचकारांमुळे मिळाली प्रेरणा ...

डॉ दीक्षित यांनी लठ्ठपणा घालविण्यासाठी इतरांप्रमाणे मी सुद्धा विविधप्रकारच्या कसरती केल्या. डायट प्लॅन, उपवासासोबत आश्रमातही पैसे खर्च केले. मात्र त्यातून काही फायदा झाला नाही. त्यानंतर डॉ. श्रीकांत जिचकार यांचे या विषयावरील व्याख्यान पाहिले आणि आयुष्याला दिशा मिळाली. डॉ. जिचकारांचा सल्ला जीवन बदलविणारा ठरला. स्वत:तील बदल पाहून इतरांनाही हा मोफत सल्ला देण्याची प्रेरणा आल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

मालेगावी होणार मधुमेहमुक्ती केंद्र ...

मधुमेहमुक्त भारत व्हावा. देशातील लोकांचे आरोग्य सुधारावे हे डॉ. जिचकारांचे स्वप्न साकार करण्यासाठी नागपुरात 'मधुमेह मुक्त केंद्र' सुरू करण्यात आले आहे. असे केंद्र लवकरच मालेगावी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभक्ती गीतांत रमले रसिक

$
0
0

आर्मी सिंफनी बॅण्डचे दमदार सादरीकरण

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभक्तीची भावना व्यक्त करणारे शब्द अन् त्या शब्दांतून भारतीय सैन्याच्या कामगिरीचे उलगडणारे विविध पैलू, शब्द आणि सूर यामुळे रसिकांना मोहून टाकणारी शनिवारची सायंकाळ नाशिककरांसाठी देशप्रेमाला उजाळा देणारी ठरली. निमित्त होते ते, 'आर्मी सिंफनी बॅण्ड'च्या खास वादनाचे.

देवळाली आर्टिलरी सेंटर आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी या संस्थेद्वारे 'आर्मी सिंफनी बॅण्ड वादन' आणि 'जाणून घ्या भारतीय सैन्याला' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजता गंगापूर रोडवरील विश्वास गार्डन येथे हा कार्यक्रम झाला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्ली राजपथावर होणाऱ्या संचलनात कायम सहभागी होणाऱ्या नाशिकच्या 'सिंफनी बॅण्ड'चे वादन पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. या बॅण्डने सादर केलेल्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची दाद मिळाली. 'हिंदुस्थान सबसे प्यारा... हिंदुस्थान सबसे न्यारा', 'ताकद वतन की तुमसें है...', 'देह शिवा पर दोहे' यांसह 'याड लागलं गं याड लागलं...' यांसारख्या एकाहून एक सरस गाण्यांचे बहारदार सादरीकरण बॅण्डने केले. वादनाच्या कार्यक्रमांत सादर झालेली अनेक गाणी भारतीय सैनिकांनी रचली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे वातावरणात देशप्रेमाचा गोडवा पसरला. भारतीय सैन्याची यशस्वी गाथा सांगणाऱ्या गीतांसह हिंदी मराठी सिनेगीतांनी बॅण्डच्या सादरीकरणाची रंगत वाढवली.

ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, क्लबचे संस्थापक अध्यक्ष जयंत येवला, अध्यक्ष भरत सिंघल, विश्वास ठाकूर यांसह शहरातील अनेक मान्यवर यावेळ उपस्थित होते. भूषण मटकरी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

...

\Bशस्त्रांची मिळाली माहिती \B

युध्दात शत्रूचा खात्मा करण्यासाठी वापरण्यात येणारी रायफल ५.५६ एमएम इनसास आणि एलएम ५.५६ एमएम इनसास, १२२ एमएम मॉर्टरद्वारे केली जाणारी गोळाफेक यासह सैनिकांच्या छावण्यांमध्ये वापरण्यात येणारा रेडिओ, ग्रँड बीएम रॉकेट याची माहिती 'जाणून घ्या भारतीय सैन्याला' या प्रदर्शनातून देण्यात आली. यावेळी हाती रायफल घेऊन फोटो घेण्याचा मोह लहानग्यांसह मोठ्यांनाही झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आहेर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करू

$
0
0

पालकमंत्र्यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, कळवण

अखेरच्या क्षणापर्यंत जनतेशी निगडित असलेल्या प्रश्नांना तडीस नेण्यासाठी झटणाऱ्या स्वर्गीय डॉ. दौलतराव आहेर यांच्या अपूर्ण राहिलेल्या सिंचनाच्या प्रश्नांसह उर्वरित कामांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण आगामी काळात प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दिली.

माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. दौलतराव आहेर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त देवळा तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पणसोहळा नामदार महाजन यांच्या हस्ते झाला. यावेळी देवळा येथील दुर्गामाता मंदिराच्या प्रांगणात नव्याने लोकार्पण झालेल्या डॉ. दौलतराव आहेर सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते. देवळा तालुक्यातील सिंचनाला वरदान ठरणाऱ्या म्हश्याड नाल्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता वाढवीण्यासाठी जास्तीचा निधी उपल्बध करून देऊ. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत झाडीच्या धरणात पाणी टाकून देण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी यावेळी दिली. गिरणा नदीवर विठेवाडी व सावकी येथे कोल्हापूर पद्दतीच्या बंधाऱ्यांच्या निर्मितीचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधीन असून त्याची सर्व प्रक्रिया लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मंजूर करून त्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही महाजन म्हणाले.

गेल्या चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्र्रात सर्वाधिक निधी मतदार संघात आणून विकासकामांची पूर्तता करण्यात आली असून चणकापूर धरणापासून चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता परसूल धरणापर्यंत वाढविण्यासाठी लोकसहभागातून काम चालू आहे. त्याचा जास्तीचा फायदा होणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. म्हश्याड नाल्याच्या कामांसह चणकापूर उजव्या कालव्याची वहनक्षमता वाढविण्याबरोबरच सुळे डाव्या कालव्याचा प्रश्न पूर्णत्वास आल्यास तालुक्यातील जनता आपल्यावर कायमची कृतज्ञ राहील, असा आशावाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला. दरम्यान दिवसभर देवळा तालुक्यातील विविध गावांमध्ये ५५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणूदिदी बिरमानी

$
0
0

रेणूदिदी बिरमानी

देवळाली कॅम्प : येथील सिवानंदा कंपनीच्या संचालिका रेणू बन्सीलाल बिरमानी (वय ६५) यांचे अल्पशा आजराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात २ बहिणी, भाऊ असा परिवार आहे. देवळालीसह विविध भागात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात रेणूदिदी यांचे योगदान मोलाचे होते. उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व असलेले महाराजकृष्ण बिरमानी यांच्या त्या लहान भगिनी होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिमखान्याचा क्रीडा महोत्सव सुरू

$
0
0

नासिक जिमखान्याच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिमखाना आयोजित क्रीडा महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लाँन टेनिस खेळाचे १० वर्षाखालील मुले व मुलींच्या प्राथमिक फेरीचे सामने झाले. हा क्रडी महोत्सव १८ ते ३० जानेवारी दरम्यान होणार आहे.

या स्पर्धेमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, लाँन टेनिस व बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धांचा समावेश असून स्पर्धा विविध वयोगटात खेळल्या जाणार आहे. विजयी खेळाडूंना स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे. बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धा या जिल्हा मानांकित स्पर्धा आहेत. जिल्ह्याच्या संघ निवडीसाठी या स्पर्धेचा विचार करण्यात येईल.

या महोत्सवात २३ ते २७ जानेवारी बॅडमिंटन, २५ ते २८ जानेवारी टेबल टेनिस, १९ व २० जानेवारी टेनिस तसेच २६ व २७ जानेवारी रोजी बुद्धिबळ इत्यादी प्रकारचे सामने होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नासिक जिमखाना, शिवाजी रोड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये आपल्या प्रवेशिका संस्थेच्या कार्यालयात दयाव्यात. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, मानद सचिव राधेश्याम मुंदडा व सहसचिव शेखर भंडारी यांनी संयुक्तपणे दिली.

संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या अधीक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रमोद रानडे, नितीन मोडक, झूलकरनैन जागिरदार, अनंत जोशी, चंदन जाधव, जय मोडक, अजिंक्य शिंत्रे, जयंत कर्पे, भरत दाभाडे, मंगेश गंभिरे व जिमखाना तसेच जिल्हा संघटनेचे जेष्ठ खेळाडू प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुटींग स्पर्धेत सिंगल यांना ब्रांझ पदक

$
0
0

शुटिंग स्पर्धेत

सिंगल यांना ब्रांझ पदक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलिस क्रिडा स्पर्धांत शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी नेमबाजी स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावले. या स्पर्धेत राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे आयोजीत ३१ व्या राज्य क्रिडा स्पर्धा २०१९ नुकत्याच नागपूर येथे पार पडल्यात. स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात राज्यभरातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेला राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासह सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी हजर राहिले. या स्पर्धेत शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी १५ मीटर पिस्तूल नेमबाजी या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सिंगल यांनी ब्रांझ पदक पटकाविले. गत वर्षी मुंबईत पार पडलेल्या स्पर्धेत देखील सिंगल यांनी याच प्रकारात पदक मिळविले होते. राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते डॉ. सिंगल यांच्यासह विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता वीजबिल फोटोलेस

$
0
0

ग्राहकांना मोबाइल नोंदणी गरजेची

..

- १ फेब्रुवारीपासून मीटर फोटोपद्धत बंद

- एसएमएसद्वारे मिळणार अद्ययावत माहिती

- तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

- संकेतस्थळावर मीटर रीडिंगचा फोटो उपलब्ध

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीजबिलासह मीटर रीडिंग माहितीची पाठविलेल्या एसएमएसच्या आधारे वीज ग्राहकांना वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. आता येत्या १ फेब्रुवारीपासून वीजबिलावर मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केला आहे. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

वीज मीटरच्या रीडिंगची अचूक माहिती मिळण्यासाठी देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रीडिंगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. मात्र यात बिल तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रीडिंगचा फोटो उपलब्ध होत होता. परंतु, ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना एसएमएसद्वारे महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती दिली जाते. त्यामुळे मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबिल मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंगची माहिती उपलब्ध होते. परिणामी ग्राहकांना आपल्या मीटर रीडिंगची पडताळणी करता येते. मीटर रीडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होईल. फोटो मीटर रीडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे.

...

ग्राहकांनी मोबाइल क्रमांक असा नोंदवावा

एसएमएसद्वारे वीजग्राहकांना मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी स्वतःच्या मोबाइल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG टाइप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकून 'एसएमएस' केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारेही मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध

$
0
0

कासार समाज राष्ट्री अधिवेशनात मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कासार समाजाला एनटीबीमध्ये आरक्षण मिळावे ही न्याय्य मागणी शासन दरबारी ठामपणे मांडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कासार बांधवांच्या व्यथा मांडणार असून, कासार समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदगाव येथे दिले.

जागतिक कासार समाज फाऊंडेशनच्या वतीने नांदगाव येथे आयोजित दोन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटन म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अॅड. अनिल आहेर, संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे ज्येष्ठ शिवसेना नेते बापूसाहेब कवडे, मिराताई गाडेकर पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कासार समाजाने एकसंघ होण्याची गरज असल्याचे मत स्पष्ट केले. कासार समाजाने शिक्षणाच्या प्रवाहाकडे वळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कासार समाजाच्या प्रश्नासाठी आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैठकीत विविध प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

'नारपार'चे पाणी इतर राज्यात जाऊ देणार नाही, नारपारचा डीपीआर तयार आहे. आपले पाणी आपल्यालाच मिळणार असेही महाजन यांनी शेवटी सांगितले. यावेळी अॅड. संतोष भुजबळ प्रास्ताविकात म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या ०.०२ टक्के म्हणजे अवघा अडीच ते तीन लाख लोकसंख्येचा हा कासार समाज आहे. तो विविध पोटजातीत विभागलेला आहे. शासन स्तरावर ओबीसी ८७ आणि ओबीसी १६० अशा वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यापेक्षा शासकीय स्तरावर एकीकरण साधल्यास सामाजिक एकीकरण साधणे सोपे जाईल, अशी मागणी त्यांनी केली. आमची ४०वर्षांपासून भटक्या विमुक्त-ब प्रवर्गात आरक्षण मिळावी ही मागणी पूर्ण झाल्यास कासार समाज आपला ऋणी राहील, असेही ते म्हणाले. पंकज भुजबळ यांनी देखील कासार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करील असे आश्वासन दिले. या प्रसंगी आमदार उन्मेष पाटील, नरेंद्र दराडे तसेच अन्य मान्यवरांची भाषणे झाली.

नांदगाव येथील दोन दिवसीय अधिवेशनाला राज्यभरातील विविध ठिकाणाहून सुमारे साडे तीन-चार हजार समाज बांधव उपस्थित आहेत. पदाधिकारी अशोक दगडे, देवेंद्र शेटे, अॅड भुजबळ, शिवराज आंदोले, संदीप चिमटे, सौरभ कोळपकर, अनिल अष्टेकर, हेमलता तंटक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनहक्काचे ११५८ दावे प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील वनहक्क दावे निकाली निघावेत यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. आतापर्यंत ३१ हजार ५३४ पैकी ३० हजार ३७६ दावे निकाली काढण्यात आले आहेत. १ हजार १५८ दावे अजूनही प्रलंबित असून ते महिनाभरात निकाली काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.

वनहक्क दाव्यातून आतापर्यंत ११ हजार ९४७ दावे पात्र ठरविण्यात आले आहेत. अपात्र दाव्यांची संख्या १८ हजार ४२९ आहे. सुरगाण्यात आदिवासी बांधवांना १८ हजार एकर वनपट्ट्याचे वाटप करण्याचे नियोजन सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याच महिन्यात हा कार्यक्रम घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

वनहक्कांचे दावे तातडीने निकाली काढावेत या मुख्य मागणीसह आदिवासी बाधवांना वनपट्यांचे हस्तांतरण करावे या व अन्य मागण्यांकरिता गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये डाव्या पक्षांनी नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या लाँगमार्चची दखल घ्यावी लागली. दावे लवकरात लवकर निकाली काढा, असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यामध्ये वैयक्तिक दाव्यांसह ग्रामपंचायतींच्या दाव्यांची संख्याही मोठी होती. जिल्हा प्रशासनाने अपिलासाठी दाखल १९ हजार ६०६ तर सुमोटो अपिलांतर्गत ११ हजार ९२८ असे एकूण ३१ हजार ५३४ दावे निकाली काढण्याच्या प्रकियेस सुरुवात केली. अपिल दाखल दाव्यांपैकी ८९३२ दावे प्रशासनाने पात्र केले. तर १० हजार १ दावे तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले आहेत. सुमोटो प्रक्रियेत दाखल दाव्यांपैकी तीन हजार दावे पात्र तर ८४२८ दावे अपात्र ठरले आहेत.

-

मिळणार २६ हजार ४९९ एकर क्षेत्र

अजूनही जिल्ह्यात १ हजार १५८ दावे प्रलंबित असून त्यामध्ये उपविभागीय स्तरावरील ८८२ तर जिल्हा समिती स्तरावरील २७६ दाव्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असून उपविभागीय समितीकडे ५० हजार ४४३ दावे प्राप्त झाले होते. समित्यांनी ३१ हजार ५३४ दावे अमान्य करून १८ हजार २३५ दावे पुढील मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग केले. या समितीने १८ हजार २३५ दाव्यांपैकी १७ हजार ५५१ दाव्यांना मान्यता दिली. ६८४ दावे अपात्र ठरविण्यात आले. पात्र दाव्यांमधील लाभार्थ्यांना २६ हजार ४९९ एकर क्षेत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत सुरगाण्यात आदिवासी बांधवांना १८ हजार एकर वनपट्ट्याचे वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे. २५ जानेवारी हा कार्यक्रम घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

ग्राफसाठी

एकूण दावे

३१ हजार ५३४

निकाली दावे

३० हजार ३७६ दावे

प्रलंबित दावे

१ हजार १५८ दावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीए एलएलबीचा निकाल जाहीर

$
0
0

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लॉ विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रखडलेले निकाल जाहीर होण्यास शनिवारी सुरूवात झाली. शनिवारी बीए एलएलबी शाखेचे निकाल जाहीर करण्यात आले असले तरीही बीएसएल एलएलबीच्या व्दितीय ते पाचव्या वर्षाचे व एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. हे निकाल सोमवारपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. तब्बल ७६ दिवस उलटूनही विद्यापीठाने या शाखेचे निकालच जाहीर न केल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी विद्यापीठ उपकेंद्रात ठिय्या दिला होता.

या आंदोलनादरम्यान प्रतिकुलगुरू डॉ. उमराणी यांच्याशी विद्यार्थ्यांनी फोनद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांना शनिवारी निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या व्दितीय ते पाचव्या वर्षाचे निकाल जाहीर करण्यात आले. अद्याप बीएसएल एलएलबी अभ्यासक्रमाच्या व्दितीय ते पाचव्या आणि एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाचे निकाल जाहीर झालेले नाहीत. सोमवारपर्यंत हे निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. हे निकाल रखडल्याने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मागण्यांची जंत्री अनेक वर्षांपासून 'जैसे थे'च आहे. पेपर तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकता, निकाल उशिरा लागण्यासंदर्भातील तक्रारी आदी विषय या मागण्यांमध्ये दरवर्षी येतात. विधी शाखेच्या प्रश्नांची ही कोंडी फुटावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर प्रकाश कांबळे (२९) आणि सनी राजेंद्र जानराव (२०, दोघे रा. गोदरेजवाडी, सिन्नर फाटा) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजता पीडित महिला घरी असताना संशयितांनी तिच्या घरात बळजबरीने घुसून तिचा हात धरत विनयभंग केला. या प्रकाराला विरोध केल्याने संशयितांनी पीडितेच्या सासऱ्यांना, तसेच तिला शिवीगाळ करून दमदाटी केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक होनमाने करीत आहेत.

गोरक्षनगरला घरफोडी

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना पेठ रोडवरील आरटीओजवळील गोरक्षनगर भागात घडली. या प्रकरणी साहेबराव गेनू निगळ (७५, रा. गणेश संकुल, पेठ रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निगळ कुटुंबिय १२ ते १८ जानेवारीदरम्यान नातेवाईकांच्या लग्नासाठी ठाणे येथे गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात ६५ हजार रुपयांची चार चांदीची ताटे, नऊ चांदीचे ग्लास, पाच फुलपात्रे, एक चांदीची चीप, मेडल, दहा कुंकू करंडे, गणपतीची मूर्ती, चार हजार रुपयांच्या साड्या चोरट्यांनी घरातून लांबविल्या. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार बागूल अधिक तपास करीत आहेत.

महिलेची आत्महत्या

सिडकोतील २७ वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) दुपारी नवीन नाशिकच्या फिरदोस कॉलनीत घडली. कांचन बाळासाहेब दोंदे (२७, रा. महात्मा फुले चौक, फिरदोस कॉलनी) असे महिलेचे नाव आहे. शुक्रवारी घरी असताना सायंकाळी साडेसहा वाजेपूर्वी त्यांनी घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात आल्यावर बाळासाहेब लहूजी दोंदे यांनी त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळले नसून, अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस हवालदार धरम अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनपुरीत उद्यापासून ‘येळकोट येळकोट’

$
0
0

यात्रोत्सवाची तयारी पूर्ण; आज येणार मशालज्योत

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरानजीक असलेल्या खंडेराय महाराज व बनुबाईच्या चंदनपुरीत पौष पूर्णिमा अर्थात २१ जानेवारीपासून यात्रोत्सावास प्रारंभ होत आहे. राज्यात खंडेरायाच्या जेजुरी इतकेच चंदनपुरीचे महत्त्व असल्याने यात्रोत्सवादरम्यान हजारो भाविक भंडारा उधळण्यासाठी येथे येत असतात. या पार्श्वभूमीवर चंदनपुरी येथे जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुरी ग्रामपंचायत, पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने यात्रोत्सावाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून चंदनपुरीत यळकोट यलकोट जय मल्हारचा नाद दुमदुमणार आहे.

खंडेराय महाराज व बानूबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या चंदनपुरीत यात्रोत्सवाची लगबग सध्या सुरू आहे. दिवसेंदिवस भाविकांची यात्रोत्सवासाठी गर्दी वाढत आहे. त्या अनुषंगाने जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने मंदिर परिसराची रंगरंगोटी, स्वच्छता, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासह भाविकाच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छता कर्मचारी, रेलिंग, जनित्र आदी सोई सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. यात्रोत्सव काळात भाविकांची गर्दी लक्षात घेता वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ट्रस्टचे स्वयंसेवक देखील कार्यरत असणार आहेत.

पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला सोमवारी सकाळी खंडेराय, म्हाळसा व बाणाई यांच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक काढून प्रारंभ होईल. मिरवणुकीत मानाच्या काठ्या देखील असणार आहेत. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापुजा, आरती आदी धार्मिक विधी होतील. यात्रोत्सवादरम्यान भंडारा, प्रसाद, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, उपहारगृह, खेळणी, मनोरंजन खेळ आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. यात्रोत्सव काळात राज्यातील भाविक आपल्या घरातील देवांची खंडेरायाशी भेट घालून देण्यासाठी तसेच तळी भरण्यासाठी येत असतात. या धार्मिक विधीसाठी देखील वाघ्या मुरळी दाखल झाले आहेत.

प्रशासकीय तयारीचा आढावा

चंदनपुरीत सुरू होणाऱ्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच योगिता अहिरे, पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, निरीक्षक भाऊसाहेब पटारे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रापच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

जेजुरीहून मशालज्योत होणार दाखल

चंदनपुरी येथे यात्रोत्सवनिमित्ताने जेजुरी येथून मशालज्योत आणण्याची परंपरा आहे. ही मशालज्योत आणण्यासाठी मंगळवारी माजी सरपंच राजेंद्र पाटील, पुजारी तुकाराम सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी जेजुरी गेले होते. जेजुरी येथे विविध धार्मिक विधी पूर्ण करून प्रज्वलित केलेली ही मशाल ज्योत रविवारी चंदनपुरीत दाखल होणार आहे. सकाळी या ज्योतीचे सवाद्य मिरवणूक काढून स्वागत केले जाईल. तसेच मंदिर परिसरातील दीपमाळ प्रज्वलित केली जाईल.

चंदनपुरी येथील यात्रोत्सव सोमवारपासून सुरू होत आहे. मल्हारभक्तांसाठी ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलिस व महसूल प्रशासन सज्ज आहे. ट्रस्टचे स्वयंसेवक देखील कार्यरत राहणार आहेत. पाणी, वीज, स्वच्छता, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आदींनी व्यवस्था पूर्ण झाली आहे.

- सतीश पाटील, अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images