Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खा. गोडसेंच्या कामांचा ‘जयोस्तुते’मधून लेखाजोखा

$
0
0

नाशिकरोड : खासदारकीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हेमंत गोडसे यांनी 'जयोस्तुते' पुस्तिकेद्वारे विकासकामांचा अहवाल जनतेला सादर केला आहे. त्याचे प्रकाशन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच झाले. मतदारसंघाबरोबरच नाशिकचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही गोडसे यांनी दिली.

एक वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोगा गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. ते म्हणाले, की मी टर्मिनेल मार्केट, इगतपुरीच्या क्रीडाप्रबधिनीचा पाठपुरावा केला. त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यासाठी शंभर टॉवरची मागणी केली, त्यापैकी पन्नासला मंजुरी मिळाली आहे. घाटाची कामे पुढील बारा वर्षे उपयोगी पडतील अशी करण्याची सूचना केली. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधीतून पंधरा रुग्णांना १९ लाख मिळवून दिले. सिन्नर तालुक्यासाठी दमणगंगा-एकवीरा व उत्तर वैतारण प्रकल्पासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाची मागणी केली आहे. नाशिकरोड प्रेसमधील मयत कामगारांच्या वारसांसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. त्यात ५ टक्के कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याचा निर्णय झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नेट’ नव्हे, विद्यार्थ्यांच्या लुटीचे गेट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अगोदरच्या परीक्षेचा निकाल लागण्या अगोदरच 'नेट' च्या (नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट) नव्या परीक्षा अर्जांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या लुटीचे गेटच सीबीएसईला गवसले आहे. यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

अगोदर होऊन गेलेल्या परीक्षेचा निकाल नेट परीक्षेचे नियोजन करणाऱ्या सीबीएसईला पाच महिने उलटून गेल्यानंतरही लावता आलेला नाही. यामुळे नेट परीक्षेस बसलेल्या उमेदवारांकडून संताप व्यक्त होत असताना आता जूनमध्ये प्रस्ताविक नव्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदतही नुकतीच (दि.१५ मे रोजी) संपली आहे. अगोदर दिलेल्या परीक्षेच्या निकालात आपल्या पदरी काय पडले हे माहिती होण्याच्या अगोदरच नव्या परीक्षेची निघणारी जाहिरात आणि गत परीक्षेचा निकाल लागण्या अगोदरच नव्या अर्ज भरण्याची संपणारी मुदत या कोंडीमुळे अगोदर परीक्षा दिलेले विद्यार्थी पुन्हा नव्याने परीक्षेस बसून भुर्दंड भरताहेत. या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या खिशातून कोट्यवधींचा महसूल मात्र परीक्षेचे व्यवस्थापन करणारी सीबीएसई यंत्रणा गोळा करीत असल्याचा आरोपही शहरातील विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

प्रलंबित निकाल सीबीएसईच्या पथ्यावर?

अगोदर घेतलेल्या निकालास हेतूपुरस्सर विलंब करायचा अन् दोलायमान मनाच्या विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षा अर्जांच्या नावाखाली कोट्यवधींच्या महसूल वसुलीचा धंदा करायचा फंडा सीबीएसई या परीक्षा नियंत्रक यंत्रणेने जवळ केला आहे काय? असाही संतप्त सवाल विद्यार्थी संघटना विचारू लागल्या आहेत. नेटची परीक्षा यापूर्वी डिसेंबर २०१४ मध्ये घेण्यात आली. निकाल मार्चमध्ये लागणे अपेक्षित होते. मात्र, आता जूनमध्ये प्रस्तावित नव्या नेट परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत (दि.१५ मे) उलटून गेल्यानंतरही हा निकाल लागलेला नाही. परिणामी, शहर आणि जिल्ह्यातूनही हजारो विद्यार्थ्यांनी नव्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. पूर्वीच्या

परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या मात्र नव्याने परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क परत दिले जात नाही. निकाल दिरंगाईच्या रटाळ कार्यपध्दतीमुळे नव्या परीक्षेचा भुर्दंड आम्ही का सोसायचा असाही मुद्दा विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

लाखा उमेदवार अन् अत्यल्प निकाल

अधिव्याख्याता पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या 'नेट' (नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट) या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार बसतात. वर्षभरातून दोनवेळा ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा निकालही अत्यल्प म्हणजे एक ते दोन टक्का इतकाच लागतो. तरीही या टक्केवारीनुसार हजारो विद्यार्थी यात उत्तीर्ण होतात. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लांबणीवर जाणाऱ्या निकालाच्या संदिग्धतेपोटी नव्या शुल्कासह पुन्हा अर्ज करावा लागत असल्याने या प्रक्रियेचा फायदा सीबीएसई विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्यासाठी करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सुमारे अडीचशे ते सहाशे रुपये शुल्क प्रतिउमेदवारास या परीक्षेसाठी भरावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभागनिहाय रस्तानिधी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

रस्ते दुरुस्ती निधीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा निधी प्रभागनिहाय देण्याची मागणी मनसेच्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांना पत्र देऊन प्रत्येक प्रभागाला किमान तीस लाखांचा निधी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पंचवीस कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. प्रत्येक विभागाला चार ते पाच कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंतच्या अनुभवानुसार विभागाप्रमाणे मंजूर निधीतून प्रभागातील सुचविलेल्या कामांची दुरुस्ती होत नाही. डांबरीकरणाचे पॅचवर्क सांगितल्यावर थातूरमातूर काम केले जाते. मुरुम मागितल्यास ५० ते ७५ ब्रास मुरुम दिला जातो. खडीकरण, डांबरीकरणाचे काम नगरसेवकांनी सुचविले तर कामाची अंमलबजावणी होत नाही. वर्ष संपल्यावर रस्ते दुरुस्ती, वाहन भाड्याने आणणे, डांबरीकरणाचे पॅचवर्क या कामासाठी किती निधी दिला व तो कसा खर्च केला याचा तपशील दोन वर्षापासून मागत आहे. मात्र, प्रशासन प्रतिसाद देत नसल्याची तक्रार गायकवाड यांनी केली आहे. रस्त्यांच्या साध्या डागडुजीच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असल्याने भ्रष्टाचार फोफावण्याची शक्यता आहे. ती रोखण्याची गरज असल्याचे मत गायकवाड यांनी मांडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या मार्गावरही पंचवटीला लेट मार्क

$
0
0

नाशिकरोड : पंचवटी एक्सप्रेसला शनिवारी (दि. १६) नाशिकला येताना पाऊणतास उशिर झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टरला घेराव घालून जाब विचारला. शनिवारी पंचवटी मुंबईहून वेळेत सुटली. कसाऱ्याजवळ खर्डा येथे गाडी तांत्रिक कारणामुळे थांबविण्यात आली. पुढे इंजिन बदलण्यात आले. या सर्व गडबडीत गाडी नाशिकला नेहमीच्या वेळेपेक्षा पाऊणतास उशिरा पोहचली. रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी चाकरमाने मोठ्या संख्येने गाडीत होते. त्यांचा संताप झाला. कोलकत्याहून येणाऱ्या दुरांतोमुळे पंचवटी सकाळी मुंबईला जाताना लेट होते हा अनुभव आता नवा राहिलेला नाही. मात्र, आता मुंबईहून नाशिकला येतानाही गाडीला उशिर होऊ लागल्याने चाकरमान्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारसाठी शिरपूर पॅटर्न उपयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालूक्यात महत्प्रयासाने पाणी टंचाईवर मात करण्यात आली. म्हणून आता तेथे पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्वीतेसाठी नाशिकमध्येही शिरपूर पॅटर्न राबवायला हवा असे मत जलतज्ज्ञ डॉ. सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्यांनी जलयुक्त शिवार अभियानासंदभात मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गाडीलकर तसेच अन्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना राबविताना अधिकाऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिरपूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई होती. तेथे पाणी अडविण्यासाठी 'नालाबांध' बंधारे बांधले. लहान बंधाऱ्यांवरील पाणी अडविण्यासाठी व जिरविण्यासाठी हे बंधारे उपयुक्त ठरले. त्यामुळे पिण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. दुबार पीक घेणे शक्य झाले. मत्स्य व्यवसाय वाढला. नदी नाल्यांजवळील मुरूम, गाळ, शेतांच्या बांधावर टाकण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सिलिंडर ग्राहकांची सर्रास होतेय फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांना वितरीत करण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरमधील गॅस काढून त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रकार गंभीर आणि धोकादायक आहे. अशा प्रकारे शहरातच नव्हे; तर जिल्ह्यात ग्राहकांची फसवणूक होत आहे. मात्र जिल्हा पुरवठा विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. तर हा प्रकार उघड झाल्यानंतर अशा प्रकारांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पुरवठा अधिकारी जी. एस. गाडीलकर यांनी दिला आहे.

नाशिकचा पुरवठा विभाग नेहमीच कोणत्याना कोणत्या मुद्द्यांवर चर्चेत राहीला आहे. सुरगाणा येथे झालेल्या कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यामुळे या विभागाच्या कारभाराची चर्चा विधीमंडळापर्यंत गाजली. तत्काल‌नि पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह या विभागातील पाच ते सहा जणांवर निलंबनाची कारवाई देखील झाली. आता सिलिंडरशी संबंध‌ति फसवणुकीचा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ग्राहकांना सिलेंडर वितरीत करणाऱ्या राणेनगर येथील एका गॅस वितरण एजन्सीच्या डिलेव्हरी बॉयने चक्क ग्राहकांच्या सिलेंडरमधून गॅस काढत तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरून विकण्याचा उद्योग सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. संबंध‌ति आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळे पुरवठा विभागाशी संबंध‌ति अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणुक आहेच; परंतू ग्राहकांच्या जीवीताशी खेळण्याचाही हा प्रकार असल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गॅस मुदतीत न मिळणे, त्याची तपासणी करून देण्यास कंटाळा करणे, गॅस सिलेंडरसाठी वेगवेगळे दर आकारणे हे प्रकार घडत असताना आता ग्राहकांना कमी वजनाचे सिलेंडर देऊन बक्कळ पैसा कमावणाऱ्यांचे पितळ या प्रकारामुळे उघडे झाले आहे.

घडलेला प्रकार निश्चितच गंभीर आहे. गॅस वितरकांना सिलेंडरचे वितरण करणाऱ्या कंपन्यांना याची माहिती दिली जाईल. फसवणूक करणाऱ्यांवर इसेन्शियल कमोडीटी अॅक्ट आणि गॅस रेग्युलेशन अॅक्ट अन्वये कठोर कारवाई होईल.

जी. एस. गाडीलकर, पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०२ गावे, १६९ वाडया तहानेनं कळवळल्या

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरविणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाच्या तडाख्यामुळे तहानेने व्याकूळली आहेत. ही गावे आणि वाड्या वस्त्यांवरील लोकांची तहान शमविण्यासाठी जिल्ह्यात तब्बल ७० टँकर फेऱ्या मारत आहेत. विशेष म्हणजे राज्यात पाणीटंचाईच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, त्यातही नाशिक अव्वल ठरला आहे. विशेष म्हणजे शहरातील काही भागातही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, १२ टँकरद्वारे पाणीपूरवठा सुरू आहे.

यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असा अंदाज वर्तविला जात होता. उन्हाच्या असह्य चटक्यांमुळे त्याचीच प्रचिती येऊ लागली आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच जिल्ह्यातील अनके तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी खेडोपाड्यातील महिलांना वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील १०२ गावे तहानेने व्याकूळली आहेत. तर १६९ वाड्यांमधील रहिवाशांना देखील पाण्यासाठी वणवण करीत आहेत. पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या अशा २७१ ठिकाणी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे.

३३ सरकारी आणि ३६ खासगी अशा ६९ टँकरद्वारे तेथे पाणी पुरवठा केला जाऊ लागला आहे. सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना नांदगाव तालुक्याला करावा लागतो आहे. तेथील ११ गावे आणि ६४ वाड्या तर सिन्नरमध्ये नऊ गावे आणि ५९ वाड्यांमधील रहिवाशी पाणी टंचाईमूळे होरपळून निघाली आहेत. सर्वाधिक ३१ टंचाईग्रस्त गावे येवला तालुक्यात असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे.

भूजल पातळीतही घट

भूजल सर्व्हेक्षण आणि विकास संस्थेतर्फे जिल्ह्यातील २०३ विहीरींचे निरीक्षण करण्यात आले. गेल्या पाच वर्षात भूजल पातळी सरासरी ७.०१ टक्के होती, परंतू त्यामध्ये घट झाली आहे. नुकतेच मान्सुनपुर्व भूजल चाचणी करण्यात आली. जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट झाली आहे. चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथील भूजल पातळी घटली आहे. सरासरी ०.१४ ते १.९४ या प्रमाणात ही भूजल पातळी घटली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील १६३ गावे अतिशोषित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील धरणांत असूसली

जिल्ह्यात २३ धरणं असून, त्यामध्ये १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अर्थात गतवर्षीही याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होता असा प्रशासनाचा दावा आहे. नाशिक शहर आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मात्र अजूनही ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा त्यामध्ये सहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वानराचा मृत्यू: गहिवरले औंदाणेकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

माणसाला पाळीव प्राण्यांचा लळा असतो. मात्र, औंदाणे या गावाला दोन वानरांचा इतका लळा लागला आहे की, उन्हाळा आला की त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसत असतं. यातील एका वानराचा अपघातात मृत्यू झाल्याने औंदाणेकरांना गहिवरून आले. यामुळे संतप्त औंदाणेकरांनी रास्तारोको करून संतापाला वाट मोकळी करून दिली. आपल्या या मित्राचा त्यांनी विधीवत अंत्यविधी केला.

गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात औंदाणे शिवारात दाखल होणाऱ्या दोघा वानरांपैकी एकाचा बस अपघातात मृत्यू झाल्याने औदांणे ग्रामस्थांनी तब्बल अर्धातास राज्य महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, वनविभाग व पोलिस कर्मचाऱ्यांनी शांतता प्रस्थापित केल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आला. यानंतर विधीवत वानरांचा अंत्यविधी करण्यात आला.

यंदाच्या उन्हाळ्यात ही दोघे वानरे दाखल झाली होती. कपाळ्या डोंगराजवळील जंगलातून पाण्याच्या शोधार्थ गावाकडे येते होती. नर व मादी या वानराची जोडी रस्ता ओलांडत असताना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास नंदुरबार आगाराची एस. टी. बस नाशिककडे जात असताना औंदाणे गावाजवळ बस अपघातात एका वानराला बसने धडक दिली. यामुळे दुसऱ्या वानराने वाहतूक थांबविली. परिसरातील ग्रामस्थांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून रास्तारोको आंदोलन केले.

या अपघाताचे वृत्त पोलिस व वन विभागाला समजताच वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. यानंतर ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्‍यात आले. या दोघाही वानरांशी गावातील ग्रामस्थ, महिला, बालक यांचेशी मित्राचे नाते तयार झाले होते. औदांणे, तरसाळी, कौतिकपाडे गावाजवळ कपाळे डोंगर असून, येथे वनविभागाचे जंगल आहे. या जंगलात वनतळ असून पाण्याची सोय नाही. तसेच मागील वर्षी दीड एकर जंगल जळून खाक झाले होते. वनविगाने या भागात झाडे लावली नाहीत. यामुळे या परिसरात प्राण्यासाठी कुठलीही विश्रांती सोय नसल्याने प्राणी गावांकडे पाण्यासाठी येत असतात. आज सकाळी अशाप्रकारे वानराची जोडी येत असताना झालेल्या अपघातात एक वानर जागीच ठार झाले. या वानराचे शवविच्छेदन करून वनविभागाने जंगलात अत्यंविधी केला. यावेळी वनपाल डी. के. नंदाळे, वनरक्षक एस. ए. खजे, एल. पी. झेंडगे यांनी केले. यावेळी सरंपच संदीप खैरनार, पोलिस पाटील प्रभाकर निकम, चिला निकम, गणेश निकम, रमेश रौदळ, रवींद्र पवार, गौरव निकम, भाऊसाहेब निकम, प्रकाश निकम यांनी वनविभागाला सहकार्य केले.

परंपरा झाली खंडित

सटाणा शहरालगत असलेल्या औंदाणे शिवारात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याच्या भटकंतीसाठी वानरे येत असतात. जून, जुलैमध्ये नेहमी येणारे दोन्ही वानरे आपला मुक्काम हलवित असतात. ही गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा होती. गत वर्षी उन्हाळ्यात दोघेही वानरे या परिसरात दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी गत वर्षी वानरांची प्रतिकृती करून त्यांची मिरवणूक देखील काढली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवासात तहानलेल्यांना पाणी

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

वैशाख वणव्याचा त्रास साऱ्यांना जाणवू लागला आहे. रेल्वे‌तील जीवघेण्या गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची स्थिती अधिकच बिकट आहे. अशा कठीण प्रवासात पाण्याची तहान भागवून प्रवाशांना दिलासा देण्याचे काम देवळालीतील आर्मी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी करीत आहेत, तेही दररोज न चुकता. रणरणत्या उन्हाळ्यात प्रवास करतांना थंडगार स्वच्छ पाणी मिळणे हे अमृत मिळण्यापेक्षा कमी नाही. अनेकदा पाणी न मिळाल्यामुळे जीव कासावीस होतो. तसेच अल्पावधीसाठी स्टेशनवर रेल्वे थांबली असतांना प्लॅटफॉर्मवर पाणी मिळण्याची शक्यता कठीणच असते. मात्र, देवळाली रेल्वे स्टेशनवर स्वत:हून पाणी घेऊन येणारे चिमुकले विद्यार्थी प्रवाशांसाठी देवदूतापेक्षा कमी नाही.

आर्मी पब्लिक स्कूलच्या राणी लक्ष्मीबाई गाईड कंपनी व छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट कंपनीचे विद्यार्थी ५ मे २००० पासून हा अनोखा उपक्रम राबवित आहेत. यासाठी त्यांना शिक्षिका आश्विनी वैद्य व त्यांचे सहकारी शिक्षक स्काऊट मास्टर यासीन पठाण व जयवंत ताश्ककार यांचे मोलाचे सहकार्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमात खंड पडलेला नाही. या वर्षीच्या उपक्रमात गाईड लीडर अंकिता गठडी व तेजस कासार सारख्या बहुतांश विद्यार्थी पाणीवाटप करीत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

विद्यार्थांना शालेय जीवनापासून पाण्याचे महत्त्व कळावे आणि इतरांना कठीण प्रसंगी पाणी किती महत्त्वाचे आहे याबाबत चांगले संस्कार व्हावेत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. कोणतीही अपेक्षा न बाळगता आर्मी पब्लिक स्कूल स्वखर्चातून हा उपक्रम राबवित आहे.

- अश्विनी वैद्य, शिक्षिका, आर्मी प‌ब्लिक स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचे आंदोलन चिघळणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील टोल प्रशासनाने करार संपल्याचे कारण देत टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांना कमी करण्याचा निर्णय गेल्या गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी चार दिवसांपासून टोलगेटवर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू करून टोल वसुली बंद पाडली आहे. रोजगारावर गदा येऊ नये म्हणून कामगारांनी संघटितपणे गत चार दिवसापासून उभा केलेला लढा आज सोमवारी पोलिस बळाचा वापर करून चिरडून टाकला जाण्याची शक्यता आहे. टोल प्रशासनाने याबाबत हालचाली केल्याचे वृत्त असून, नवीन सुरक्षा कर्मचाऱ्यांमार्फत टोल वुसली सुरू करण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

टोल प्रशासनाने राज्याच्या गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासोबत करार केला असून, सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक सोमवारी पोलिस बंदोबस्तात टोलचा ताबा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने टोल प्रशासन व कामगार यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. पिंपळगाव बसवंत येथील टोलप्रशासनाने मुंबई येथील टॉप्स सिक्युरिटीबरोबर केलेला दोन वर्षाचा करार संपल्यामुळे टॉप्स एजन्सीमार्फत भरती केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय मागील आठवड्यात जाहीर केला. त्यामुळे टोलनाक्यावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह भारतीय मजदूर संघ प्रणित टोल कामागर संघटनेचे सदस्य असलेल्या सर्वच कामगारांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेत सुरक्षा कामागारांना पाठिंबा दिला आहे. यात टोल नाक्यावर काम करणाऱ्या शंभर महिला कामगारांचाही समावेश आहे.

कामगारांच्या आंदोलनामुळे चार दिवसांपासून टोल वसुली ठप्प झाली असून, टोलकंपनीचे किमान तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. असे असले तरी टोल कंपनीस काही दिवसांची मुदतवाढ किंवा रोख स्वरूपात भरपाई देण्याचा करार सरकारसोबत झालेला असल्याचे कळते. म्हणूनच नुकसानीची चिंता न करता टोल प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, स्थानिक कामगारांचा रोजगार हिरावून न घेता त्यांना कायम करावे, यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, सुरेशबाबा पाटील, सतीश मोर, सुभाष होळकर आदी कार्यरत आहेत.

गरज सरो वैद्य मरो...

सेवेत असताना कार्यालयात कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. मात्र, कामगारांनी आंदोलन सुरू करताच टोल प्रशासनाने पाणी ठेवलेल्या कक्षास आडवे कपाट लावून पाणी न मिळण्याची व्यवस्था केली आहे. तसेच गत दोन वर्षातील पगारी रजेची रक्कमही कामागारांना मिळालेली नाही. एका कामगाराची पगारी रजेची रक्कम सात ते आठ हजार रुपये असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी भगीरथाप्रमाणे गंगापूर धरणाचे महत्त्व आहे. परंतु, या गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. सध्या सुट्ट्यांचा मौसम असल्याने धरणाच्या बॅकवॉटरला पिकनिक स्पॉटचे स्वरुप आले आहे. मद्यपींचा धरण परिसरात वावर वाढला असून जलसंपदा विभाग याकडे लक्ष देणार कधी असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे महत्त्वाचे धरण म्हणून गंगापूर धरणाचे महत्त्व आहे. धरणाच्या सुरक्षेबाबत जलसंपदा विभागाकडून मात्र दुर्लक्षच होतांना दिसत आहे. यामुळे गंगापूर धरणाची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवड्यात गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला गंगावऱ्हे गावाच्या शिवारात चार चाकी वाहनाने पेट घेतला होता. गंगापूर धरण परिसरात प्रवेशास बंदी असतांना देखील वाहन धरणाच्या बॅकवॉटरपर्यंत गेलेच कसे असा सवाल उपस्थित होतो. एकीकडे गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर कुणी गेल्यास जलसंपदा विभागातून प्रवेशपास आणा असे फमार्न दिले जाते. परंतु, दुसरीकडे धरणाच्याच बॅकवॉटरला पर्यटकांची गर्दी उसळत आहे. यात काही मद्यपी धरणाच्या परिसरात धांगडधिंगाना करतांना दिसतात. भविष्यात गंगापूर धरण परिसरात काही आपत्ती घडल्यास किंवा अंतर्गत वादातून संघर्ष निर्मार झाल्यास त्यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धरणाच्या पाण्याजवळ चिखलात रुतल्यामुळे मशिन गरम झाल्याने कार जळ्याची घटना नुकतीच घडली. परंतु, धरणाच्या पाण्यापर्यंत चारचाकी वाहनाला प्रवेश दिला गेला कसा असा सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत.

हॉटेल व बारही!

गंगापूर धरण परिसरात अनेकांनी पक्की बांधकामे केली आहेत. त्यात काही व्यवसायिकांनी मोठ-मोठे हॉटेल व बियर बार थाटले आहेत. धरणाच्या परिसरात पक्की बांधकामे करण्यासाठी परवानगी नसतांना बांधकामे झालीच कशी असा देखील प्रश्न उपस्थित होतो. धरण परिसरात बियर बारला परवानगी देण्याचे कारणच काय असाही सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत. जलसंपदा व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवत यावर कारवाई करण्याची गरज आहे.

अधिकारीच गायब

गंगापूर धरणावर ड्युटीवर असणारे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी बहुतांश वेळा गायबच असतात. केवळ एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांची धरणाला भेट असेल त्याच वेळी ते कारवाईच्या ‌भीतीपोटी उपस्थित राहतात. गंगापूर धरणाच्या गेस्ट हाऊसवर रंगणारऱ्या ओल्या पार्टींमध्ये कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकप्र‌तिनिधींचे दुर्लक्ष

गंगापूर धरण परिसरात असलेली गंगावऱ्हे व सावरगावातील लोकप्र‌तिनिधींचे धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. धरण परिसरात चुकीचे प्रकार घडत असतांना गावातील पुढारी पैसे घेऊन तडजोडी करण्यावर भर देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वत:ला स्थानिक पुढारी म्हणवून घेणारे तर प्रेमियुगलांकडू पैसै घेत सोयीची जागा देत असल्याचेही समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरमधून गॅसची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांना ग्रॅस सिलिंडर पोहच करण्यापूर्वी त्यातून ग्रॅसची चोरी करणाऱ्या २४ वर्षीय युवकाला क्राइम ब्रांचच्या युनिट तीनच्या कर्मचाऱ्यांनी छापा मारून अटक केली. राणेनगरमधील एका ग्रॅस एजन्सीचे सिलिंडर पोहचवण्याचे काम संशयित करीत होता. त्याच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

वैजिनाथ विष्णू उजागरे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो इंदिरानगर येथील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी भागात राहतो. पोलिसांनी शनिवारी रात्री कारवेई केली. उजागरे याच्याकडून ३४ एलपीजी सिलिंडर, एक इलेक्ट्रिक मोटार, दोन रबरी पाईप, दोन रेग्युलेटर, १४० ग्रॅस सिलिंडरचे सील पॅकींग व तीनचाकी रिक्षा जप्त केली. याबाबत युनिट तीनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले, की सिडको परिसरातील भवानी मंदिराच्या बाजूस असलेल्या पांगरे मळा येथे सिलिंडर ग्रॅसबाबत काहीतरी गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा मारला. डिलेव्हरी करण्यासाठी संशयित एजन्सीमधून दररोज ३० सिलिंडर घेत असे. यानंतर ग्रॅस सिलिंडर थेट ग्राहकापर्यंत न पोहचता ते पांगरे मळा येथे पोहचले जाई. तेथे प्रत्येक सिलिंडरमधून कमी जास्त प्रमाणात ग्रॅस काढून घेतला जात होता. ग्राहकांच्या हाती पडलेल्या सिलिंडरला पुन्हा पॅकींग लावल्यामुळे संशय निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. उजागरे प्रत्येक सिलिंडरमधून दीड किलो ग्रॅस काढून घेत होता.

एजन्सीमधून दररोज ३० सिलिंडर घेणारा उजागरे या माध्यमातून तब्बल ४५ किलो ग्रॅस जमा करीत होता. १४.२ किलो ग्रॅम वजनाचे तीन सिलेंडर तयार करून उजागरे ते विक्री करीत असे. ग्रॅस चोरून तयार केलेल्या या सिलिंडर विक्रीच्या माध्यामातून संशयिताला दररोज दोन हजार रुपये मिळत होते. एवढेच नव्हे तर, संपला म्हणून ग्राहक परत करणाऱ्या सिलिंडरमधून देखील उजागरेला अर्धा किलोपर्यंत ग्रॅस मिळत होता. याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला.

अन्य आरोपींचा शोध

गेल्या दोन वर्षांपासून संशयित संबंधित ग्रॅस एजन्सीकडे कामाला आहे. या व्यवसायात उजागरेसह एजन्सीचे अन्य कोणी सहभागी आहेत काय? याचा तपास पोलिस करीत आहे. अशा धोकादायक पध्दतीने ग्रॅसची चोरी करणे कायद्याने चूक तर आहेच मात्र ते धोकादायक असल्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी स्पष्ट केले. यापूर्वी २६ जानेवरी २०१२ मध्ये देवळालीगाव परिसरात अवैध ग्रॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्या ठिकाणी प्रचंड स्फोट झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकजवळ भीषण अपघात

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव इथल्या कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ डॉक्टर जागीच ठार झाले. अपघातात एक जण जखमी झाला आहे. मृत सर्व डॉक्टर हे नाशिकचे राहणारे होते. नाशिकहून पिंपळगावला जाताना डॉक्टरांच्या टवेरा गाडीला टेम्पोची जबर धडक बसली आणि ही दुर्घटना घडली.

चुकीच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोने कोकणगाव फाट्यावर डॉक्टर प्रवास करत असलेल्या टवेरा समोर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की टेवरातील पाच डॉक्टरांना जागीच आपला जीव गमवावा लागला. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. शेळके, डॉ. चद्रशेखर गांगुर्डे आणि डॉ. कुंदन जाधव या पाच डॉक्टरांचा अपघातात मृत्यू झाला. तर डॉ. उमेश भोसले अपघातात जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्ला‌स्टिकमुक्तीसाठी नाशिकच्या स्त्री शक्ती महिला गटाच्या वतीने सिंहस्थात भाविकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बचतगटाच्या महिलांनी आतापर्यंत हजारो पिशव्या तयार केल्या असून, उपक्रमात सहभागी होण्यासाठी घरातील जुने कपडे या उपक्रमाला द्यावेत, असे आवाहन बचत गटाच्यावतीने करण्यात आले आहे.

संपूर्ण जगाला प्लास्टिकने विळखा घातला असून, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यासाठी स्त्री शक्ती महिला गटाने मोफत कापडी पिशव्या तयार करून वाटण्याचा संकल्प हाती घेतला आहे. संपर्ण जगात एका वर्षात एक ट्रिलियन प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती होते. मात्र, या पिशव्यांचे विघटन होण्यास हजारो वर्षे लागतात. या पिशव्यांमुळे मनुष्य व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्यावर टाकलेल्या पिशव्या जनावरे खाद्यपदार्थ समजून खातात. त्यामुळे जनावरांच्या जीविताला देखील धोका निर्माण होतो. त्याच प्रमाणे नदीत टाकलेल्या पिशव्यांमुळे जैव विविधता नष्ट होत असून, नदीचे पाणी दूषित होत आहे. या पिशव्या नाल्यांमध्ये अडकल्याने सांडपाणी तुंबून डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे रोगराई वाढण्यास मदत होते. या पिशव्यांविरोधात मोहीम उघडण्यासाठी स्त्री शक्ती महिला बचतगटाच्या समुहाने सामाजिक बांधिलकी म्हणून सेवाभावी वृत्तीने 'अभियान प्रदूषणमुक्तीचे' हा उपक्रम हाती घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक नाशिक शहरात येणार असून, त्यांच्यासोबत प्लास्टिक पिशव्यांचा वापर देखील वाढणार आहे. याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या भाविकांना या पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी या बचतगटाला वापरलेल्या कपड्यांची गरज असून, जास्तीत जास्त नागरिकांनी जुने कपडे द्यावेत, असे आवाहन बचत गटाने केले आहे. ज्या कुणाला या उपक्रमासाठी कपडे द्यायचे आहेत त्यांनी ९८२३१२३५८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जागरूक नागरिक म्हणून या अभियानात नाशिकमधील नागरिकांनी सहभागी व्हावे. या उपक्रमाला साथ द्यावी. हा उपक्रम सिंहस्थानंतरही सुरू ठेवण्यात येणार आहे.

- सुदाम निकम,

समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. जास्तीत जास्त महिला प्रशिक्षित होत आहे. यासाठी नागरिकांनी जुने कपडे आणून नाशिक प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने हातभार लावावा. या उपक्रमात किमान एकलाख पिशव्या तयार करण्याचा आमचा संकल्प आहे.

- दीपाली कुलथे, सचिव बचत गट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी एकूण २३ धरणे आहेत. तरीही नाशिक जिल्हा हा तहाणलेला आहे. आजमितीस जिल्ह्यात खासगी व सरकारी अशा एकूण ६९ टँकरव्दारे १०२ गावे, १६९ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्याच्या मध्यान्हात ही स्थिती आहे. अनेक गाव व वाड्यांचे टँकरचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होणार आहेत. लवकर पावसाला सुरुवात झाली नाही तर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या १९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ येवला, नांदगाव, सुरगाणा, बागलाण व पेठ या तालुक्यांना बसली आहे. या पाच गावांमध्येच सुमारे ७८ गावे व ८० वाड्यांना एकूण ३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कळवण व निफाड या दोन तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसलेली नाही.

चांदवड

सहा गावांची तहान भागतेय टँकरवर

दुष्काळग्रस्त भाग म्हणून परिचित असलेला पण यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने अक्षरशः हैराण झालेल्या चांदवड तालुक्यात पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी तीन शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एक विहीरही अधिग्रहीत करण्यात आली आहे.

तालुक्यातील बोपाणे, परसूल, हिरापूर, देवरगाव, गुरहाडे आणि तीसगाव या सहा गावांत पाणीप्रश्न भेडसावत असून, या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दह्याणे येथील विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. ४४ गांव पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यात पाणीटंचाईच्या समस्येने या उन्हाळ्यात गेल्या

काही वर्षांच्या तुलनेत उग्र रूप धारण केलेले नाही. तरीही आणखी काही टँकर प्रशासनाला सुरू करावे

लागतील असा जाणकरांचा अंदाज आहे. सोळा गांव पाणीपुरवठा योजनेचा लाभ तालुक्याला असूनही, काही गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. याकडे लोकप्रतिनिधिंनी लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

चांदवड शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, हे दिवस कमी कसे होतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जावे. येत्या काही दिवसात यामध्ये वाढ होऊ शकते. लोकप्रतिनिधिंनी याबाबत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यांनी उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला यापुढील काळात पाणीटंचाईशी सामना करावा लागू नये, उन्हाचे तडाखे बसत असताना निदान पाण्याअभावी हाल होऊ नये, अशी माफक अपेक्षा बाळगून आहेत.

नांदगाव

कृत्रिम पाणीटंचाईचा बसतोय फटका

नांदगाव शहर परिसरात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना आणि माणिकपुंज पूरक योजनेमुळे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. भूजल पातळी शाबूत असूनही केवळ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे शहराला कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

सात दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दहा ते बारा दिवसाआड होत आहे. वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे रात्री अपरात्री पाणी येत असल्याने नांदगावकर हवालदिल झाले आहेत. भरभरून पाणी आहे पण विजेची समस्या, सातत्याने बंद पडणारे पंप, वाहिनीला गळती होण्याचे वाढते प्रमाण, पाणी वितरण व्यवस्थेतील असमतोल या कारणांमुळे दहा ते बारा दिवसाआड नांदगाव शहरात पाणीपुरवठा होत आहे. तीस हजार लोकसंख्येसाठी दोन योजना पूरेशा असूनही, केवळ नियोजनाअभावी नांदगावच्या अनेक भागात पाणी वितरण असमतोल असल्यामुळे समस्या उद्धभवली आहे. आपल्याच भागात पाणी सोडण्याचा काही नगरसेवकांचा अट्टाहास हा देखील कृत्रिम पाणीटंचाईस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे. आमदार पंकज भुजबळ यांनी पालिका प्रशासनावर अंकुश ठेवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. नूतन नगराध्यक्ष शैला गायकवाड यांनी पथकाद्वारे पाहणी करून गळती थांबवू तसेच, पाणी क्षमता वाढवून पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्याचा प्रयत्न करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा

नांदगाव तालुक्यात पाणीटंचाई ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. तब्बल १० टँकरने तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा होत आहे. एकूण सात विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मंगळाने, परधाडी, इंदिरानगर या वीस-एकवीस लाखांच्या पाणी योजना ९० टक्के पूर्ण आहेत. तर, सतरा योजना अंतिम टप्प्यात आहेत. तालुक्यात चार पाणीपुरवठा योजना पूर्णपणे सुरू झाल्या आहेत. तर, २२ योजना प्रगतीपथावर आहेत. तालुक्यात दहा शासकीय टँकरने पाणी पुरविले जात असून, विहिरी, हातपंप याद्वारे समस्या कमी करण्याचे प्रयत्न नांदगाव तालुक्यात सुरू आहेत.



कळवण

आवर्तनासाठी साकडे

कळवण तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील धरणांच्या साठ्यात घट झाली आहे. धरणांमध्ये असलेला अल्प पाणीसाठ्यात उन्हाळा कसा पार पाडावा याची चिंता प्रशासनासह नागरिकांना सतावत आहे.

विविध गावांमधून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीमुळे पाटबंधारे विभागही पेचात सापडल्याचे चित्र सध्या तालुक्यात आहे. प्रत्येक गावातून पाण्याच्या आवर्तनासाठी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व पाटबंधारे बिभाग यांच्‍याकडे होणाऱ्या मागणीमुळे प्रशासन व पाटबंधारे विभाग पेचात सापडला आहे. पावसाची सरासरी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कमी होत आहे. तालुक्यात काही ठिकाणी आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

अभोणा, बार्डे, कळथे, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, एकलहरे वाडी बुद्रुक, नाकोडा, नवी बेज, जुनी बेज, पिळकोस, भादवण, विसापूर, रवळजी, मोकभणगी, देसराणे या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कळवण तालुक्यात एकूण १५२ गावे, ८९ आदिवासी पाडे आहेत. त्यातील ६५ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे, तर ४२ गावांमध्ये ही योजना वीजपंपांसह कार्यान्वित आहे. एकूण ४५० हातपंप असून पाण्याअभावी त्यापैकी ३१ बंद पडले आहेत. ३७९ चालू आहेत. त्यापैकी ४० ठिकाणी पातळी खालावल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीनुसार जून महिन्यात वेळेवर पाऊस पडला नाही, तर पिण्याच्या पाण्याबरोबरच कळवण तालुक्याला चाराटंचाईचाही सामना करावा लागणार आहे. पाच गावातील विंधनविहरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, उर्वरित गावांकरिता गरजेनुसार विहिरी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाचवीला पुजलेली पाणीटंचाई

बागलाण

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील दुष्काळाची दाहकता आणि भीषणता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सरत्या मे महिन्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जूनच्या प्रारंभीच पावसाने दिलासा दिल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. अन्यथा, पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागणार आहे.

बागलाण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. सुमारे ५० हून अधिक गावांसह वाड्या व वस्त्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. मात्र, शासकीय दप्तरी अवघ्या ११ गावांना चार शासकीय व एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुमारे नऊ गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव शासकीय पातळीवर दिले आहेत. आठ ठिकाणी खासगी विहीर अधिग्रहीत करून नळपाणीपुरवठा करण्यात येत आहेत. गत पाच वर्षापासून सातत्याने सरासरी ३०० ते ३६६ टक्के पुढे पावसाची नोंद झालेली नाही. त्याचबरोबर पावसाचे जून, जुलै कोरडे जाऊन ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होऊन तालुक्यातील केळझर व हरणबारी ही दोघेही धरणे भरलेली आहेत. परिणामी पावसाची घसरती आकडेवारी ही तालुकावासीयांना चिंताजनक ठरणारी आहे. पावसाने केलेली अवकृपा परिणामी शेती सिंचनावर मोठा परिणाम होऊन शेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यातील कृषी उद्योगावर मोठा विपरित परिणामी करणारी आहे. घटत्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील विहिरी, तलाव, नद्या, नाले व धरणांची परिस्थिती दरवर्षी जेमतेम होऊन शेती सिंचनासाठी पाणी साठविणे गरजेचे झाले आहे. साठवण तलाव देखील पूर्ण भरत नसल्याने पिण्याच्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणूव लागली आहे.

पाणी आरक्षण

शेती सिंचनासाठी उभारलेली धरणे आता पिण्याचा पाण्यासाठी आरक्षित होऊ लागली आहेत. दसाने, पठावे, जाखोड व कोळीपाडा ही लपा तलाव परिसरातील गावांची तहान भागवू लागली आहेत. केळझर व हरणबारी धरणातील दोन आवर्तने ही रब्बी पिकासाठी देण्यात आल्यानंतर उर्वरित आवर्तने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करून एप्रिल व मे महिन्यात देण्यात येतात. या पाण्याचा उपयोग शेती सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्यासाठी होऊ लागला आहे.

तालुक्यातील गिरणा, मोसम, आरम, करंजाड, कान्हेरी, हत्ती, दोध्याड या नद्या एकेकाळी बारमाही वाहणाऱ्या होत्या. मात्र, कमी पर्जन्यमानामुळे या नद्यामधील खडक आता डोकेवर काढू लागले आहेत. त्यात वाळू माफियांच्या कारभारामुळे तर नद्यांमध्ये बारा फुटापेक्षाही अधिक खोलीचे खड्डे दिसू लागल्याने पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तालुक्यातील राहुड, चिराई, महड व काटवन परिसरातील गावांबरोबच सटाणा शहरालगत असलेल्या भाक्षी, मुळाणे, अजमीर सौंदाणे, रामतीर, रातीर, सारदे, इजमाने, देवळाणे, सुराणे, खिरमाणी या गावांना तर वर्षभर टँकरने पाणी पुरवावे लागते.

सद्यस्थितीत तालुक्यातील अजमेर सौंदाणे, सुराणे, लोणारवाडी, कातरवेल, रातीर, रामतीर, खिरमाणी, भाक्षी, सारदे, इजमाने चौगांव, पिंपळदर या अकरा गावांना चार शासकीय व एक खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसभरातून उपरोक्त गावांना किमान चार व कमाल दोन वेळा टँकरच्या फेऱ्या करण्यात येऊन पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. दऱ्हाणे व इंदिरानगरकरिता परशुराम पाकळे, भाक्षीकरिता शशिकांत खैरनार, बिजोरसेकरिता प्रवीण देवरे, चौंधाणेकरिता दगुबाई मोरे, नामपूरकरिता वर्षा सावंत, कऱ्हेकरिता सुनील जाधव यांच्या विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, सटाणा व आराई येथील विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

तरसाळी, नवेगाव, जुनी शेमळी, किरायतवाडी, जामनवाडी, नवी शेमळी, खमताणे, बिजोटे, डोंगरेज, जोरण, चिराई व महड या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत शासकीय पातळीवर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या गिरणा नदीपात्रातील पाणी संपले आहे. यामुळे चणकापूर अथवा पुनदचे आवर्तन आल्यानंतर गिरणानदी दुथडी भरून वाहू लागल्यानंतर सटाणा शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सटाण्यात आजमितीस एक ते दोन दिवसाआड नळपाणीपुरवठा करण्यात येत आहे. केळझर धरणातील तिसरे व अखेरचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. आवर्तनामुळे आरमनदीला पाणी येऊन आठ दिवस पाण्याचा लाभ मिळू शकेल.

योजनांवरच भर

तालुक्यातील भारत निर्माण व पेयजल योजनेंतर्गत अनेक गावांच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना धूळखात आहेत. किंबहुना ग्रामपंचायत व ठेकेदारांच्या हातमिळवणीमुळे देखील कृत्रिम पाणीटंचाईचा फटका बसत आहेत. औदांणे पाच गांव पाणीपुरवठा योजना, ताहाराबाद पाणीपुरवठा योजना, अंबासन पाणीपुरवठा योजना, तिळवण पाणीपुरवठा योजना, सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर पाणीपुरवठा योजनांवर प्रकाशझोत टाकणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नरमध्ये ९ गावे, ५९ वाड्यांना टँकर सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील नऊ गावे आणि ५९ वाड्यांना १२ सरकारी टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या खूपच कमी आहे. गारपीठ व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा जरा उशिरा सुरू झाल्या आहेत.

बारागावपिंप्री, धोंडवीरनगर, नळवाडी, शिंदेवाडी, फुलेनगर, श्रीरामपूर, पांगरी खुर्द, निऱ्हाळे पाट पिंपरी या नऊ गावांसह पूर्व भागातील ५९ वाड्यांना १२ सरकारी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिंपरवाडी आणि दोडी खुर्द येथील आव्हाड वस्तीवरील पाण्याचे टँकर नुकतेच मंजूर करण्यात आले असून, त्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मऱ्हळच्या तीन वस्त्या, खापराळे, जयप्रकाशनगर आणि सोनारी यांनी पंचायत समितीकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले आहेत. पाटपिंपरी येथे काही दिवसापूर्वी महिलांनी तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आंदोलनावर टँकर सुरू करण्यात आले आहेत.गतवर्षी झालेल्या कथित टँकर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी यावर्षी पाणीपुरवठा करताना सावध पवित्रा घेतला आहे. टँकरची मागणी आलेल्या गावात तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, लपाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या पाहणी केल्यानंतरच वस्तुस्थिती बघून टँकर देण्याचे निश्चित केले जात आहे. त्यामुळे टँकर मागणी केलेल्या गावच्या परिसरात पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तेथील पाणीसाठा संपल्यानंतरच टँकर मंजूर केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षित भूखंडावर उद्यानाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सध्या सुट्यांचा मौसम असून सातपूरमधील सावरकरनगरमध्ये आरक्षित भूखंडावर चिमुकल्यांसाठी उद्यान उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. या परिसरात महापालिकेने पुढाकार घेत मोकळ्या मैदानांवर उद्यान उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अशोकनगर भागातील सावरकरनगरमध्ये महापालिकेच्या आरक्षित असलेल्या जागेवर उद्यान उभारण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यातच सावरकरनगर भागात रस्ते काँक्रिटीकरण झाले; परंतु साईडपट्या खड्डेमय झाल्याने वाहनचालांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने सुविधा पुरविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सावरकरनगर परिसर सुमारे ६० टुमदार बंगल्यांमुळे ओळख आहे. यात गट क्रमांक ५१४ अ मधील रहिवाशांसाठी उद्यान उभारण्याच्या उद्देशाने महापालिकेने अनेक वर्षांपासून मोठा भूखंड आरक्षित केला आहे. महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावर उद्यान उभारण्याची अनेक वर्षांपासून रहिवाशी मागणी करत आहेत. परंतु, महापालिका व स्थानिक नगरसेवक रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशी करतात. त्यातच महापालिकेचे सर्व प्रकारचे कर सावरकरनगर भागातील रहिवाशी भरत असतांना नागरी सुविधा देतांना महापालिका हात का आखडता घेते असा देखील प्रश्न येथील रहिवाशी उपस्थित करत आहेत. तसेच सावरकरनगर भागातील अंतर्गत रस्ते महापालिकेने काँक्रिटिकरण केले. परंतु, साईडपट्या विकासाविनाच सोडून दिल्या आहेत. यामुळे साईडपट्ट्यांची अवस्था खड्डेमय झाली असल्याने वाहनचालकांना वाहने चालवितांना त्रासाला सामोरे जावे लागते. स्थानिक नगरसेवक व महापालिकेने उद्यानाची उभारणी त्वरित केली पाहिजे. तसेच रस्त्यांच्या साईडपट्ट्यांची कामे देखील हातात घेतली पाहिजे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

नियमित वेळेत कर भरणारा परिसर म्हणून सावरकर नगरचा उल्लेख केला जातो. महापालिकेने बालगोपाळ व जेष्ठांसाठी उद्यानाची उभारणी केली पाहिजे.

- सुलोचना ठाकरे, रहिवाशी, सावरकरनगर

सावरकरनगरात आरक्षित भूखंडावर उद्यान उभारण्याची जुनी मागणी आहे. याकडे महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे.

- किरण पाटोळे, रहिवाशी, सावरकरनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मणक्यांचे विकार आटोक्यात आणणे शक्य

$
0
0

नाशिकरोड : नियमित व्यायाम, संतुलित आहार, आयुर्वेदानुसार उपचार आणि कमी ताण घेतल्यास मणक्याच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येते, असे प्रतिपादन वैद्य विक्रांत जाधव यांनी केले. दत्तमंदिर रोडवरील लायन्स क्लबच्या मैदानात योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वसंत व्याख्यानमाला सुरू झाली. वैद्य जाधव यांनी मणक्यांचे विकार व आयुर्वेदिक उपचार यावर पहिले पुष्प गुंफले. प्रभाग सभापती केशव पोरजे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेविका संगीता गायकवाड, आर. डी. धोंगडे, बाबा बच्छाव, लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश गाडेकर, संजय पगारे प्रमुख पाहुणे होते. रमेश जाधव यांनी स्वागत केले. वैद्य जाधव म्हणाले की, धावपळीचे जीवन आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तरुणांमध्ये मणक्यांचे विकार वाढले आहेत. भारतातील पंधरा टक्के लोक या विकाराने त्रस्त आहेत. ही व्य़ाधी टाळण्यासाठी व्यायाम तसेच आयुर्वेदातील औषधांचा वापर करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीने गजबजली शहरातील स्थानके

$
0
0

फणिंद्र मंडलिक

सुट्ट्यांनिमित्त बाहर गावी जाण्यासाठी नाशिकच्या बसस्थानकांवर आणि नाशिकरोडच्या रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. गर्दी व प्रशासनाकडून होणारे नियोजन बघता आगामी सिंहस्थात काय होणार याची धास्ती वाटू लागली आहे. नियमित होणाऱ्या गर्दीवर प्रशासन नियंत्रण मिळवू शकत नसल्याचे सध्या दिसून येत असल्याने सिंहस्थात गर्दीवर कसे नियंत्रण मिळविले जाईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रेल्वे स्थानकावर गर्दी

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून, रोजच्या तुलनेत तिप्पट गर्दी होत असल्याने तिकीट काढण्यासाठी लोकांना तासन तास रांगेत उभे रहावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकरोड स्थानकावर गर्दीचा महापूर वहात असून मे महिन्याच्या सुट्या घालवण्यासाठी व सुट्ट्यांनिमित्त बाहेर गावी पर्यटनासाठी जाण्यासाठी नाशिकरोड स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. रेल्वेचे आरक्षण या अगोदरच फुल्ल झाल्याने नागरिकांना साधे तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. सध्या आरक्षणासाठी तीन महिन्यांचे वेटिंग आहे. नाशिकरोड स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रणा गर्दीमुळे तोकडी पडत असून, रांगेत उभे राहण्यासाठी नागरिकांना धडपड करावी लागत आहे. तिकीट घेतलेल्या प्रवाशांना गाडीत बसायला जागा नको, परंतु पाय ठेवायला जागा द्या, अशी विनंती इतर प्रवाशांना करावी लागत आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या खच्चून भरलेल्या दिसत असून, प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानकावरील विश्रामगृहे तुडूंब भरली असून, उरलेल्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच सहारा घ्यावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी काबूत आणण्यासाठी पोलिस कर्मचारीही कामाला लागले असून, बंदोबस्तासाठी कसरत करावी लागत आहे. नाशिकरोड स्थानकाच्या तिकीट बुकींग खिडकीसमोर पहाटे ४ वाजेपासून रांगा लागत आहे. सकाळच्या नाशिक, पुणे आणि भुसावळ पॅसेंजरसाठी नागरिक आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला येत आहेत.

उत्पन्नात वाढ

नाशिकरोड स्टेशनवरून साधारणतः रोज १५ ते २० हजार नागरिक प्रवास करीत असतात. परंतु सध्या यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे स्टेशन हे मध्य रेल्वेचे सर्वांत जास्त उत्पन्न देणारे स्थानक म्हणून ज्ञात आहे. स्टेशनचे रोजचे सरासरी उत्पन्न २० लाख आहे. परंतु, सुट्यांमध्ये हेच उत्पन्न २५ लाखापर्यत पोहचले आहे. रोज साधारण २० हजार लोक आरक्षण करून प्रवास करीत असतात. त्यांची संख्या २५ हजारापर्यत पोहचली आहे. जवळ जाणाऱ्या प्रवाशांना बसचा पर्याय उपलब्ध असून, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मात्र हालाखीत प्रवास करावा लागत आहे.

नांदेड, परभणी, नागपूर, खंडवा, भुसावळ या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दारात उभे राहून प्रवास करावा लागत आहे.

रिझर्व्हेशनसाठी रांगा

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे रिझर्वेशन काऊंटरवर तिकीट रिझर्व्हेशनसाठी आलेल्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, तिकीट बुकींगमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर तिकीट रिझर्वेशनसाठी रांगेत उभे राहिल्यानंतर तिकीट मिळत नाही. तत्काळ तिकीटासाठी नंबर लावल्यानंतर पहिल्या दोन प्रवाशानंतर तिकीट बंद झाल्याची घोषणा केली जाते. परंतु, एजंटमार्फेत रिझर्वेशन काढल्यास तुम्हाला नंबर न लावताही घरपोच तिकीट मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. येथील कर्मचारी रिझर्व्हेशनसाठी आलेल्या प्रवाशांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. रिझर्व्हेशनचा फॉर्म भरुन दिल्यानंतर तिकीटावर वेगळीच माहिती छापून येते. याबाबत कर्मचाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रवाशांकडून फॉर्म भरण्यास चूक झाल्यास त्याला पुन्हा फॉर्म भरून पुन्हा नंबर लावण्यास सांगण्यात येतो. येथे रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एजंट उभे असतात. त्यांना जास्त पैसे दिल्यास आत जाऊन पाहिजे तेवढी तिकीटे काढून देतात. प्रवाशांनी ठराविक गाडी संबंधी माहिती विचारल्यास आम्हाला सांगता येणार नाही, तिकीट क़ाढायचे असल्यास काढा अन्यथा निघून जा, असे सांगण्यात येते. काही कर्मचारी पान-गुटखा खाऊन रिझर्वेशन काढण्यासाठी बसतात. त्यामुळे ते काय बोलतात हे प्रवाशांना समजत नाही. रेल्वे स्टेशनच्या आवारात गुटखा खाण्यास सिगरेट पिण्यास बंदी असताना कर्मचाऱ्यांना तो नियम लागु नाही का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. तिकीट काढल्यानंतर हिशेबात नेहमी घोळ होतो, अनेक प्रवाशांना पैसे परत मिळतांना कमी मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पैसे कमी का दिले अशी विचारणा केल्यास तुम्ही सुटे दोन रुपये आणून द्या, त्यानंतर दहा रुपये घेऊन जा अशी अनेक प्रवाशांची अडवणूक केली जाते. या जाचाला कंटाळून अनेक प्रवासी पाच ते दहा रुपये सोडून देतात. रेल्वे रिझर्वेशन काऊंटर संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता बघतो, कारवाई करतो अशी उत्तरे दिली जातात. तरीही यांच्यावर लवकर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

बसस्थानके फुल्ल!

रेल्वे प्रमाणेच शहरातील सर्वच बसस्थानके गर्दीने ओसंडून वाहत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या महामार्ग बसस्थानकातून सुटत असल्याने प्रवाशांनी तेथेही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र या ठिकाणीही पुरेसे नियोजन नसल्याचे जाणवते. प्रवाशांनी चौकशी केली असता, त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. कोणती गाडी किती वाजता येईल, असे विचारले असता, गाडी येईल तेव्हा सोडली जाईल असे उत्तर दिले जाते.

केंद्राला नाही वाली!

लांबच्या प्रवासासाठी अनेक प्रवासी रिझर्व्हेशन करणे पसंत करतात. परंतु, ठक्कर बाजार येथे असलेल्या रिझर्व्हेशन केंद्र हे कुत्र्यांचे निवासस्थान बनले आहे. येथील कर्मचारीही प्रवाशांना व्यवस्थित उत्तरे देत नाही. प्रवाशांनी काही विचारणा केली असता, बाहेर चौकशी करुन या, आम्हाला गाड्याचे टाईमिंग माहिती नाही असे सांगितले जाते.

गाड्यांची संख्या अपुरी

पुण्याला व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. मात्र प्रवाशांच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्याने त्यांना अन्य मार्गाने प्रवास करावा लागतो. सुट्ट्यांच्या कालावधीत या मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी होत आहे.

स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

एसटी महामंडळाच्या सर्वच बसस्थानकांवर अस्वच्छतेने थैमान घातले असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. गाड्यामध्ये घाण करु नका असा संदेश देणाऱ्या प्रशासनाने मात्र आपली स्थानके अत्यंत अस्वच्छ ठेवली आहेत. या स्थानकांवर नियमित साफ सफाई होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

खासगी एजंटचा सुळसुळाट

एसटीचे सुट्ट्यांबाबत पुरेसे नियेजन नसल्याने खासगी एजंटांनी त्याचा फायदा होत आहे. महामार्ग व ठक्कर बाजार येथे खासगी एजंटाचा सुळसुळाट वाढला असून, थेट बसस्थानकात येऊन प्रवासी पळवण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे. या एजंटाना आवर घालणारे कुणी नसल्याने त्यांचा जोर वाढला आहे. या एजंटांचे अधिकाऱ्याशी संबंध असल्याची चर्चा बसस्थानकात होताना दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थांच्या ठेवींना हवे विमा संरक्षण

$
0
0

राकेश हिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यभरातील पतसंस्थांच्या कारभारात पारदर्शकता यावी तसेच पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण नसल्याची माहिती ठेवीदारांना मिळावी यासाठी पतसंस्थांनी माहिती फलकावर तशी नोंद करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी नुकतेच दिले आहेत.

राज्यात शहरासह ग्रामीण भागात सुमारे १५ हजारांपेक्षा जास्त पतसंस्थांचे जाळे विस्तारले आहे. या पतसंस्थांच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक उलाढाल होते. राज्यातल्या अनेक पतसंस्थांचे काम चांगले असून त्या लोकांच्या विश्वासास पात्र ठरल्या आहेत. मात्र, एखादी पतसंस्था अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांना हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अनेकदा ठेवीदारांचे पैसे बुडण्याचीही शक्यता असल्याने खबरदारी म्हणून पतसंस्थांनी आधीच या ठेवींवर कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नसल्याचे स्पष्ट करून तशी लेखी नोंद ठेव पावतीवर व पासबुकात करणे आवश्यक असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.

राज्यातल्या पतसंस्था चांगले काम करत असल्या तरी अनेक पतसंस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतात. अशा पतसंस्थांमधून ठेवी परत मिळवतांना अनंत अडचणींचा सामना ठेवीदारांना करावा लागतो. ठेवी परत न मिळाल्यास ठेवीदार रोष व्यक्त करतात. त्यामुळे पतसंस्थांनी आधीच ठेवींवर विमा संरक्षण नसल्याची माहिती फलकावर स्पष्टपणे लावावी, असे आदेश देण्यात आले आहे. या माहितीफलकावर पतसंस्थेचा आर्थिक लेखाजोखा, तीन वर्षांचे ऑडीट वर्ग, गुंतवणुकीचा तपशील, संचालक मंडळाची नावे व कार्यकाळ, कर्जवसुलीची रक्कम व प्रमाण अशा बाबींचा उल्लेख करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

पतसंस्थांमध्ये गुंतवणूक करतांना ठेवीदारांमध्ये साक्षरता असावी, त्यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी यासाठी पतसंस्थांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती असणारा फलक कार्यालयात लावण्याचे आदेश दिले आहेत. पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याची नोंदही पतसंस्थांनी माहिती फलकावर स्पष्ट करावी. - सुनील पवार, प्रभारी सहकार आयुक्त

पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण नसल्याचे नमूद केल्यास ठेवीदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन ठेवींचे प्रमाण कमी होऊ शकते. पर्यायाने सर्वच पतसंस्था अडचणीत येतील. त्यामुळे पतसंस्थांच्या दृष्टीने योग्य विचार करायला हवा.

- राजेंद्र पवार, चेअरमन, यशवंतराव चव्हाण पतसंस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>