Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

इगतपुरी, त्र्यंबक दुष्काळग्रस्तांच्या यादीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

शासनाच्या यापूर्वीच्या धोरणानुसार गेल्या दहा वर्षांत तीन उत्तम उत्पन्नाची सरासरी हे उत्पन्न समजून ५० पैशांच्या आतील नजर आणेवारीच्या गावांना शासनाच्या विविध सोयी सवलतींचा लाभ मिळत होता. मात्र आता नवीन परिपत्रकानुसार ६७ पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांनाही आता शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याला लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात गेल्या महिन्यापासून ठेंगा दाखविल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तथा तालुक्यात पाण्याची व पिकांची भयानक परिस्थिती असतांनाही या दोन्ही तालुक्यांवर चुकीच्या आणेवारी पद्धतीमुळे या तालुक्यांवर दुजाभाव व अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत शासनाला जाणीव करुन दिली होती. अखेर शासनाने या मागणीची दखल घेत व परिस्थितीचे अवलोकन करून आपल्या निर्णयात सुधारणा केली असून, त्याबाबतचे नवीन परिपत्रक १५ सप्टेंबर २०१५ रोजी जारी केले आहे. यानुसार मागील पाच वर्षांच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना सोयी सवलती लागू करण्यात येणार आहे. या नवीन निकषात व परिपत्रकाप्रमाणे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका बसत असल्याने आता या दोन्ही तालुक्याला त्याचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिकॅथलॉन आऊटलेटला राज ठाकरेंची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विल्होळी येथील स्पोर्टस् हब म्हणून नावारूपाला आलेले स्पोर्टस् आऊटलेट डिकॅथलॉनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली. डिकॅथलॉनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट देऊन आऊटलेटची माहिती घेतली.

विल्होळी नाशिकमध्ये सुरू झालेल्या डिकॅथलॉन या आऊटलेटमध्ये सर्व प्रकारच्या खेळांचे उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या आऊटलेटची माहिती जाऊन घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दालनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी डिकॅथलॉन दालनाचे व्यवस्थापक कुणाल धनवंत आणि निखील कुलकर्णी यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच राज यांनी संपूर्ण डिकॅथलॉन दालनाच्या विविध खेळ प्रकारांची आणि खेळांच्या साहित्यांची माहिती दालनाच्या व्यवस्थापकांकडून जाणून घेतली. या दालनात ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, क्रिकेट, जिम, योगा, स्विमिंग, हायकिंग, फुटबॉल सारख्या खेळांचे सा‌हित्य ग्राहकांना तंत्रशुध्द माहिती देऊन उपलब्ध केले जात आहेत. त्यासाठी या आऊटलेटमध्ये खेळाचे आणि खेळ साहित्यांचे विशेष तज्ज्ञ मंडळी देखील नेमण्यात आले आहेत. यावेळी मनसे पक्षनेते अविनाश अभ्यंकर, शारीरिक प्रशिक्षण विभागाचे प्रमुख संघटक डॉ. ऋषी शेरेकर, सरचिटणीस विशाल परदेशी, जिल्हा सल्लागार तुषार वाघमारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला फुल मार्क्स!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या दुसऱ्या पर्वणीत नाशिकमध्ये दाखल झालेल्या लाखो नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनाला फुल्ल मार्क्स दिल्याचे निष्कर्ष गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जर्नालिझम विभागाच्या विद्यार्थ्यांच्या पाहणी अहवालात पुन्हा सामोरे आले आहेत. पहिल्या पर्वणीच्या निष्कर्षांशी हे निष्कर्ष मिळते जुळते आहेत.

विशेषत: पोलिस, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या संबंधित हे निष्कर्ष आहेत. गोदेच्या स्वच्छतेबाबत ८० टक्के भाविकांनी समाधान व्यक्त केले होते. दुसऱ्या पर्वणीत हे उत्तर देणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढून ८६ टक्क्यांवर गेले. भाविकांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांमध्ये ७१ हून ७७ टक्क्यांवर हे प्रमाण गेले आहे. स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांकडून भाविकांना होणाऱ्या मदतीचे प्रमाण स्थिर म्हणजे ६७ ते ६७ टक्के राहिले आहे.

आरोग्य विभागाच्या सेवेमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निष्कर्ष या पाहणीत मिळाले. गेल्या पर्वणीत या विभागाच्या सेवेबद्दल अवघ्या ५० टक्के भाविकांनी अनुकूल मत व्यक्त केले होते. आता हे प्रमाण ७३ टक्क्यांच्या घरात आहे. पहिल्या पर्वणीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याचे मत ५१ टक्के नागरिकांनी व्यक्त केले होते. आता हे प्रमाण ५९ टक्क्यांवर आहे. वाहतूक व्यवस्थेविषयी भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. अभ्यासाचा भाग म्हणून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथून ३०० भाविकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. यामध्ये देशभरासह विदेशातून येणाऱ्या नागरिकांकडूनही प्रश्नावली भरून घेण्यात आली. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख वृंदा भार्गवे, कौमुदी परांजपे व प्रा. रमेश शेजवळ यांनी या सर्व्हेक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडे बनली धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अथवा रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील झाडे धोकादायक ठरू लागली आहेत. हा तिढा हायकोर्टाच्या आदेशानंतर मार्गी लागणे अपेक्षित आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान शहरातंर्गत वाहतुकीचे जाळे मजबूत व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करून आतील रिंगरोड, मध्य रिंगरोड आणि बाह्य रिंगरोड तयार केले. पर्वणी काळात याच रस्त्यांचा चांगला वापर नाशिककरांना करण्यात आला. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहचण्यासाठी हे रस्ते फायदेशीर ठरलेत. एकीकडे गुळगुळीत रस्ते वाहनचालकांना स्पिडचा थ्रिल देत असताना दुसरीकडे मात्र या रस्त्यावरील झाडे धोकादायक ठरू पाहत आहेत. नुकतेच गोविंदनगर येथील सिटी सेंटरमॉलकडे येणाऱ्या नवीन रस्त्यावरील झाडावर कारचालक जाऊन धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याच रस्त्यावर एखाद किलोमीटरच्या अंतरात सहा झाडे रस्त्याच्या मधोमध किंवा धोकादायक ठिकाणी आहेत. ऐन सिंहस्थपूर्वी तयार झालेल्या या रस्त्याबाबत अनेक नागरिक तर अजुनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नवीन वाहनचालक अशा धोकादायक रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालवतो तेव्हा अपघाताची शक्यता वाढते. संबंध शहरात अशा प्रकारचे २ हजारांपेक्षा अधिक झाडे असून हायकोर्टाने याबाबत महापालिकेला आदेश दिले होते. जोपर्यंत या रस्त्यावरील धोकादायक झाडे काढली जात नाही, तोपर्यंत तेथे काही साईन बोर्ड लावावे अथवा पोलिसांची नियुक्त करण्याची मागणी केली जाते आहे.

झाडांना आमचा विरोध नाही. मात्र, रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे चुकवित गाडी चालविणे वाहनचालकांसाठी कसरतीचे झाले आहे.

- अमोल मोरे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या पर्वणीसाठी भाविक शहरात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या पर्वणीनिमित्त स्नान करण्यासाठी विविध राज्यातून भाविक शहरात येण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील विविध मार्गावरून भाविकांचे लोंढे गुरुवारी येताना दिसले. काही भाविक दुसऱ्या पर्वणीपासूनच साधुग्राममध्ये तळ ठोकून बसले आहे‌त.

सिंहस्थ पर्वणीच्या रामकुंडात स्नान करण्याचा साधू महंताप्रमाणे भाविकांनाही इच्छा असते. तीच पूर्ण करण्यासाठी हजारो भाविकांनी साधुग्राम आणि गोदातिराची वाट धरली आहे. पर्वणीच्या आदल्या दिवशीच गुरुवारी अनेक भाविकांनी गोदापात्रात डुबकी मारली. तसेच कपिला संग्मावारही भाविकांची गर्दी दिसून आली. गणेश चतुर्थीमुळे सलग तीन दिवस सुटी मिळाल्याने पर्यटकांची साधुग्राममध्ये गर्दी दिसून आली.

गोदावरी परिसर भाविकांनी व्यापून गेला आहे. सर्वच अन्नक्षेत्रकडे कायमच गर्दी दिसत आहे. साधुग्राममध्ये भाविकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून येथील दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. शेवटची पर्वणी निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासकीय पातळीवरही काळजी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नदाता सुखी भव:

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात येणाऱ्या लक्षावधी भाविकांना चहा, नाष्टा आणि दोन वेळ जेवणाची सोय करून देणाऱ्या विविध अन्नछत्रांमुळे भाविकांना खऱ्या अर्थाने पर्वणी ठरते आहे. नि:शुल्क आणि दिवसभर सुरू असलेल्या या अन्नक्षेत्रांमधून दररोज हजारो भाविक तृप्त होऊन बाहेर पडतात.

साधूग्राममध्ये बाप्पा सिताराम अन्नक्षेत्र सर्वांत मोठे ठरते. यानंतर विविध आखाडे, धार्मिक संस्था, खालशांमध्ये २४ तास जेवणाच्या पंगती सुरू आहेत. यात, गाडगे महाराज पुलानजीक, पंचवटी अमरधामसमोर नाशिकमधल्या अग्रवाल सभा, अग्रवाल युवा मंच व महिला मंडळाद्वारे अन्नक्षेत्र सुरू करण्यात आले आहे. या अन्नक्षेत्रात भाविकांसाठी राहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिनाभर हे अन्नक्षेत्र भाविकांसाठी खुले राहणार असून दररोज सुमारे सात आठ हजार भाविक याचा लाभ घेत आहेत. यासाठी अग्रवाल युवा मंचचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, कन्हैया अग्रवाल यांनी सांगितले. आमच्यासह आमचे कार्यकर्ते पूर्णवेळ अन्नक्षेत्रासाठी काम करीत असून अन्नक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वागत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या पर्वणीला भाविकांनी मोठी गर्दी केली. तिसऱ्या पर्वणीला किती भाविक येणार याची उत्सुकता असून सर्वांनी या अन्नक्षेत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजाचे कार्यकर्ते मनीष ईश्वरलाल अग्रवाल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांनीही साधली संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

फेरनियोजन व चोख बंदोबस्ताच्या बळावर पोलिसांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दोन शाहीपर्वणी यशस्वी करून दाखविल्या. मात्र, चोरट्यांच्या सक्रीयतेला पूर्णपणे अटकाव घालणे पोलिस प्रशासनाला शक्य होऊ शकलेले नाही. तब्बल २४ ठिकाणी भाविकांच्या रोख रकमेसह मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची चोरट्यांनी चोरी केली आहे.

शहराच्या पंचवटी, गंगापूर, नाशिकरोड आदी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार चोरट्यांनी सुमारे रोकड, इतर साहित्य व सोन्याचे मंगळसूत्र व सोनसाखळी असा वीस लाखांचे माल चोरीस गेल्याची नोंद आहे. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी १६ चोरट्यांना पकडले; मात्र त्यांच्याकडून अवघे पाच सोनसाखळी जप्त करण्यता आल्या. शहर बसमध्ये चढताना रामकुंड परिसरात स्नाना करताना व वाहनाची काच फोडून चोरट्यांनी माल लांबविले. काही ठिकाणी पर्वणीच्या दिवशी घरात कोणीही नसल्याची संधी साधून घरफोडी केली. याशिवाय काही पर राज्यातील बाहेरगावातील भाविकांनी त्यांच्या साहित्याची झालेली चोरी संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद न दिल्याने त्या चोरीबाबत नोंदी नसल्याने वीस लाखांच्या चोरीत त्याचा समावेश नाही. भाविकांच्या सुरक्षेतेसाठीचे पोलिस प्रशासनाचे नियोजन उत्तम झाले मात्र भाविकांच्या किंमती व मौल्यवन वस्तू या कसे सुरक्षित राहतील व चोरट्यांना कसे अटकाव कसा घातला जाऊ शकतो याचे कोणतेच नियोजन पोलिसांनी केले नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास करून 'पर्वणी' साधली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकार्याचीही पर्वणी

$
0
0

पूनम अहिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

सिंहस्थातील शाहीपर्वणी स्नानासाठी प्रसिद्ध असली तरी ही पर्वणी समाजकार्याचीही संधी देत असल्याचे दिसून आले आहे. शहरात ठिकठिकाणी भाविकांसाठी अन्नदानासह पिण्याचे पाणीही वाटप करण्यात आले. त्यात विविध संस्था-संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या शुभम मोगरकर, निलेश नेरकर, वैभव मराठे, पंकज गोसावी आदी विद्यार्थ्यांनी पोलिस मित्र होऊन पोलिसांना मदत केली. भाविकांना रस्ते दाखविणे, गर्दीत भाविकांना शोधणे, भाविकांना विविध प्रकारचे आवाहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्यात आली. कॉलेज परिसरात पादचाऱ्यांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे नानासाहेब गुरुळे यांच्या नेतृत्वाखाली राहुल डावरे व इतर विद्यार्थी स्वंयसेवकांनी योगदान दिले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने पोलिसांना अल्पोपहार देण्यात आला. सोसायटीचे रिजनल हेड दीपक कल्पवृक्ष, समन्वयक अशोक कुलकर्णी आणि इतर कर्मचाऱ्यांनी पर्वणीच्या दिवशी शहरातील दोन हजार पोलिसांना अल्पोपहार दिला. सातपूर एमआयडीसीतील बॉश कंपनीकडून तिगरानिया चौकात भाविकांना मोफत चहा व नाश्ता देण्यात आला. त्र्यंबक रोडवरील वेद मंदिरासमोर भाविकांसाठी मोफत लस्सी वाटप करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकांची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

संकलन : अनिल पवार, विनोद पाटील

नाशिक शहरात होणाऱ्या घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाटसरुंना लुटणे हे प्रकार ग्रामीण भागातही पोहोचले आहेत. इतकेच नव्हे तर थेट एटीएम फोडणे तसेच बँकांवर दरोडा टाकण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत लक्षणीयरित्या वाढले आहे. या वर्षात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच शाखांवर दरोडा टाकून कोट्यवधी रुपये लांबविण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या शाखांनाच लक्ष्य करण्यात आले. येवला, चांदवड, मालेगाव, पेठ व निफाड या तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांवर दरोडे टाकण्यात आले. सर्वाधिक लूट निफाडमधील रानवड शाखेत झाली. तसेच सिन्नर येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएममशीन तोडून सुमारे चोवीस लाख रुपयांची चोरी करण्यात आली. विषेश म्हणजे काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांचाच हात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नागरिकांच्या ठेवी बँकांमध्येही असुरक्षित असल्याचे निदर्शनास येत आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये चोरट्यांनी लांबविले. ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांना ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

पहिला घटना (दि. ९ ऑगस्ट)

सिन्नर तालुक्यातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन तोडून सुमारे चोवीस लाख रुपयांची चोरी करण्यात आली. येथे जुलै महिन्यातच बँक ऑफ बडोदा सिन्नर शाखेतील एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे पंधरा लाख रुपये चोरून नेले होते. दोन्ही एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला.

सुरक्षारक्षकाचा अभाव

बँकेने सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता. या संधीचा फायदा घेत चोरट्याने एटीएम मशीन रूममधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे झाकून टाकले. बँकेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावलेले नव्हते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डाव साधला.

कर्मचाऱ्यांचीच 'हातसफाई'

कसून चौकशी केल्यानंतर बँकेचा कॅशिअर शिवाजी शांताराम सपकाळे व त्याचा भाऊ सागर दोघेही (रा. लोणारवाडी, ता. सिन्नर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २१ लाख ८ हजार ७०० रुपये रोख, तसेच गुन्ह्यात वापरलेली मारुती ८००, गॅस कटर मशीन, तसेच दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी घटना (६ मे )

एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभून दिसेल असा प्रकार नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येवला शाखेत घडला. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून भरदिवसा अन् रस्त्यात ५० लाख रुपये हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येवला शाखेतून दुपारी अंदरसूलला ५० लाखांची रोकड घेऊन बँक व्यवस्थापक आर. के. महाले व शिपाई भारती यांच्यासमवेत रिक्षाने निघाले होते. रिक्षा अंदरसूलच्या दिशेने जात असताना पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी रिक्षाचालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. अचानक झालेल्या या प्रकाराने चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा खड्ड्यात गेली. यावेळी चोरट्यांनी काठीने व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्या डोळ्यात पुन्हा मिरचीची पूड फेकली. यावेळी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन ५० लाखांची रोकड घेऊन पलायन केले.

बँकेची बेपर्वाई

बँकेच्या व्यवहारावर पाळत ठेवण्यात आली. एवढी मोठी रक्कम रिक्षातून नेण्यात आली. सोबत सुरक्षारक्षकही दिला नाही. इतकी मोठी रक्कम नेताना आवश्यक ती खबरदारीही घेण्यात आली नाही. पैसे कधी आणि केव्हा नेले जातात यावर पाळत ठेवण्यात आली.

चोरटे स्थानिकच

या प्रकरणी पोलिसांनी अजित रामदास कोल्हे, नंदकिशोर किसनराव धनगे, शंकर काशीनाथ धनगे, शेख तौसिफ शकील, शंकर भगवान मिसाळ, संतोष गोरख वल्टे यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ४० लाखांचा ऐवज हस्तगत केला. यात २७ लाख रुपये रोख, नवी तवेरा गाडी व नंबर प्लेट नसलेली नवी स्प्लेंडर गाडी हस्तगत केली.

तिसरी घटना (९ जुलै)

चांदवड तालुक्यातील निमोण इथल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतून सुमारे १९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम चोरट्यांनी पळवली. तत्पूर्वी चोरट्यांनी भडाणे येथे चोरीचा प्रयत्न केला होता. बँकेच्या मागील खिडकीचे गज गॅस कटरने कापून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर कॅशिअरच्या केबिनमध्ये घुसून गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून त्यांनी १९ लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

बँकेचा हलगर्जीपणा

येवला शाखेचे पन्नास लाख रुपये लुटून नेल्यानंतरही बँक व्यवस्‍थापनाने आपल्या इतर शाखांच्या सुरक्षेवर भर दिला नाही. याचे परिणाम बँकेला भोगावे लागले. या शाखेत सीसीटीव्ही कॅमेरा किंवा सुरक्षारक्षकही नव्हते. यामुळे चोरट्यांचे फावले. माहिती असलेल्यांपैकीच कोणीतरी हे धाडस केले असावे. यामुळे सहजासहजी लूट करण्यात आली.

घटना चौथी (२५ ऑगस्ट)

निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना येथील एनडीसीसीच्या शाखेत दरोडेखोरांनी मागील बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी कापून बँकेत प्रवेश केला. स्ट्राँगरूममधील तिजोरी तसेच ७५ पैकी ४४ लॉकर्स गॅस कटरने कापून सोन्याचे दागिने व रोकड मिळून सुमारे दोन कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी बँकेची रोकड ठेवलेली तिजोरीही फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

बँकेतील असुविधा

बँकेत सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नव्हता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नव्हते. बँक शाखा निर्जनस्थळी असल्याने दरोडेखोरांना बँक लूटणे फारसे अवघड गेले नाही. बँकेत अलार्मचाही अभाव होता. एकूणच चोरट्यांच्या दृष्टीने सर्व परिस्थिती जणू अनुकूल होती.

घटना पाचवी (१४ सप्टेंबर)

एनडीसीसीच्या तीन शाखांमध्ये चोरट्यांनी हात साफ केल्यानंतहर बँक प्रशासनाकडून इतर शाखांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही. यामुळे दोन महिन्याच्या अंतरात जिल्हा बँकेच्या चार शाखांमधून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली. येवला, निमोण व रानवडनंतर चोरट्यांनी मालेगाव तालुक्यातील निमगाव शाखेला लक्ष्य करीत सुमारे चौदा लाख रुपये लुटून पोबारा केला. दरोडेखोरांनी इमारतीच्या स्वच्छतागृहाच्या बाजूला असलेल्या खिडकीचे गज तोडून आतील बाजूस बँकेच्या तिजोरीतून चौदा लाखाहून अधिक रक्कम लांपास केली.

बँकेची सुरक्षा

बँकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही यंत्रणा नाही. बँक परिसर फारसा वर्दळीचा नाही. यामुळे चोरट्यांना बँकेत प्रवेश करणे सोपे गेले.

सहावी घटना (१४ एप्रिल)

एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्न ऐरणीवर आणणारी घटना नाशिकमध्ये घडली. एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस टाकून १६ लाख रुपयांची लूट करण्यात आली होती. नाशिकच्या दत्त मंदिर चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये १४ एप्रिलला हा प्रकार घडला होता. या हायटेक लुटारुंनी एटीएमचे सॉफ्टवेअर आणि सीसीटीव्ही कॅमेरा निकामी करून १६ लाख २० हजारांची चोरी केली. ‌एटीएम फोडण्याचा हा नवा प्रकार पोलिसांनाही चक्रावून सोडणारा होता.

मोहम्मद शोएब कमाल पाशा शेख (३२, भोईसर, जि. पालघर), शंभू उर्फ करणसिंग रामधर सहदेव झा (२८, बिहार), निजामुद्दीन फकरुद्दीन शेख (२५, अंधेरी, पश्चिम मुंबई), जहांगीर जमाल शेख (२६, विरार, मुंबई), बजरंगसिंग शामसिंग (३८, वसई, मुंबई), दुर्गाप्रसाद राघवेंद्रचंद्र ब्राम्हण (३०, अंधेरी, मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली होती.

अशी केली होती चोरी

साई प्लाझा कॉम्पलेक्स येथील बँकेच्या एटीएममधील सीपीयू आणि कॅमेऱ्याची पीन काढून कॅमेरा सिस्टम बंद केली. नंतर एटीम मशिनमध्ये मालवेअर व्हायरस सोडून त्यात बिघाड केला व १६ लाख २० हजाराची रोकड पळवली. बँकेच्या संगणक तज्ञांनी महिनाभर विश्लेषण केल्यानंतर वरील आरोपींचे चेहरे कॅमेऱ्यात आढळले.

मोडस ऑपरेंडी

चोरटे नवनवीन मोडस ऑपरेंडचा वापर करून पोलिसांपुढे आव्हान निर्माण करीत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित तरूणच या क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. व्हायरस सोडून एटीएम लुटणे, गॅस कटरचा वापर करणे, स्ट्राँगरुम पळवणे, पोलिस बनूनच बँक, एटीएम लुटणे यामुळे पोलिसांपुढेच आव्हान निर्माण झाले आहे.

रोज दीडशे कोटींची उलाढाल

जिल्हा बँकेच्या २१० शाखांमधून दररोज १५० कोटींची उलाढाल होते. त्यात ६१ कोटी रुपये बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा होतात, तर ९० कोटी रुपये बँकाच्या शाखामंधून खातेदारांकडून काढले जातात. एवढ्या उलाढालीवर जिल्हा बँकेने १२० कोटींचा विमाही काढला आहे.

जिल्हा बँकांच लक्ष्य का?

सिन्नर, नाशिकरोड, येवला तसेच घोटी येथील सोने लुटीच्या घटनांचा पोलिसांनी तपास लावला. मात्र, जिल्हा मध्यवती बँकेच्या शाखांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास लागू शकलेला नाही. जिल्हा मध्‍यवर्ती बँकेच्या शाखांनाच चोरटे का लक्ष्‍य करीत आहेत, हे कोडेच आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेने जिल्हाभरात २१० शाखा स्‍थापन केल्या आहेत. कारखाना क्षेत्रात अनेक शाखा उभारण्यात आल्या. मात्र, कारखाना बंद झाल्यावर या शाखांचा विचार झाला नाही. त्यांचे व्यवहार किती होतात, याचा प्रशासन व पदाधिकारी यांना कोणालाच सोयरेसुतक नाही.

राजकारणी बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येण्यासाठी कोट्यवधीची माया खर्ची घालतात, मग त्या बँकेच्या सुरक्षेसंदर्भात एवढे उदासीन का? असा प्रश्न निर्माण होता. गोरगरिबांच्या पुंजीचे संरक्षण कोणी करायचे, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे. आपली तिजोरी भरण्यासाठीच फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपयोग केला जात आहे.

गावोगावी निर्जनस्‍थळी बँका स्‍थापन करण्यात आल्या आहेत. सुरक्षारक्षक नेमले नाहीत. सीसीटीव्ही तर दूरचा विषय ठरला आहे.

वर्षभरातील घटना व चोरीची रक्कम

बँक ऑफ इंडिया एटीएम (सिन्नर) २४ लाख

बँक ऑफ बडोदा १५ लाख

करंजाळी शाखा (जिल्हा बँक) १५ लाख

एनडीसीसी बँक (येवला) ५० लाख

एनडीसीसी बँक (निमोण) १९ लाख

एनडीसीसी बँक (रानवड) पावणेदोन कोटी

एनडीसीसी बँक (निमगाव) १३ लाख

आयसीआयसीआय बँक एटीएम (नाशिककरोड) - १६लाख

बँक लुटीची कारणे

बँकेच्या शाखा निर्जनस्थळी असणे

शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक नसणे

बँक आवारात सीसीटीव्ही यंत्रणा नसणे

सिक्युरिटी अलार्मचा अभाव

सीसीटीव्ही कॅमेरे दुय्यम दर्जाचे असणे

बहुतांश घटनांत कर्मचाऱ्यांचाच हात असणे

बँकेच्या व्यवहारावर पाळत ठेवणे

बँकेत किती रक्कम आहे, याची माहिती उघड होणे.

बँकेत रोज येणे जाणे असणे.

बँकेत नेमके कोणत्या ठिकाणी काय आहे, याची संपूर्ण माहिती असणे.

स्ट्राँग रुमच्या सुरक्षेची काळजी न घेणे.

हे उपाय गरजेचे

चोवीस तास शस्त्रधारी दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेंज अधिक असावी

बँकेच्या व्यवहारांची गोपनीयता बाळगणे

मोठ्या रक्कमेचे व्यवहार करताना पोलिसांना माहिती देणे

बँक आवारातही सीसीटीव्ही बसवावेत

बँकेची इमारतात अलार्मची व्यवस्‍था करावी

बँक सुटीच्या दिवशी सुरक्षा अधिक वाढवावी

सुरक्षेबाबत उपाययोजना सुरू

जिल्हा बँकेतील शाखांमध्ये होणाऱ्या चोऱ्या व लुटीच्या घटना चिंताजनक आहेत. जिल्हा बँकांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे सर्व शाखांना सुरक्षा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. सोबतच मोठ्या शाखांच्या ठिकाणी शस्रधारी सुरक्षारक्षक देण्याचा आमचा विचार आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांचे सरंक्षण करण्याची जबाबदारी आमची असून, या शाखांच्या सुरक्षितेसाठीचे सर्व ते उपाययोजना केले जात आहेत. यासाठी सहकार विभागाकडे पत्रव्यवहार केला गेला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर सुरक्षेबाबत राहिलेल्या त्रुटी दूर केल्या जातील.

नरेंद्र दराडे, अध्यक्ष ,नाशिक जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडलेश्वर पदवी चालली सातासमुद्रापार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याचे आकर्षण भारतीयांबरोबर परदेशी नागरिकांनामध्ये सुध्दा दिसून येते. भारतीय योगाने तर पाश्चिमात्य नागरिकांना वेड लावले आहे. अध्यात्मिक मनशांतीसाठी विदेशी नागरिक मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात सहभागी होतात. अनेक संस्था यासाठी वेगवेगळ्या देशात काम करतात. मात्र, अद्यापपर्यंत एखाद्या परदेशी नागरिकास अथवा एनआरआयला आखाड्याकडून पदवी देण्यात आलेली नव्हती. नाशिकच्या कुंभमेळ्यात हा इतिहास बदलण्यात आला असून गुरुवारी प्रथमच मॉरेशस येथील आणि जर्मनीत काम करणाऱ्या विश्वनंद सरस्वतींना निर्मोही आखाड्याकडून महामंडलेश्वर ही पदवी प्रदान करण्यात आली.

श्री पंच निर्मोही आखाड्यात सायंकाळी उशिरा मोठ्या थाटा-बाटात विश्वनंद सरस्वतींना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. आखाड्यांकडून देण्यात येणाऱ्या पदव्या किंवा महंताईची प्रक्रिया तशी गुप्तपण राबवली जाते. आखाड्यांशी संबंधित व्यक्तींना या पदव्या दिल्या जातात. हिंदू धर्माचे अस्तित्व जगभरात असले तरी यासाठी काम करणाऱ्या संस्था थेट आखाड्यांशी संबंधित असतीलच असे नाही. त्यामुळे श्री श्री १०८, श्री श्री १००८ किंवा महामंडेलश्वर, महंत अशा पदव्या भारताच मार्यदीत होत्या. पहिल्यादाच विश्वनंद सरस्वतींच्या रुपाने ही पदवी सातासमुद्रापार चालली असल्याची भावना कार्यक्रमास उपस्थित असलेल्या परदेशी भक्तांनी व्यक्त केली. विश्वनंद सरस्वती मुळचे भारतीय असून ते मॉरेशेस येथे स्थायिक झाले आहेत. आपल्या भक्तीमार्ग या संस्थेद्वारे ते जगभरात सनातन हिंदू धर्माचे कार्य करतात. जर्मनीमध्ये त्यांचा मोठा आश्रम असून तिथे त्यांच्या भक्तांची संख्याही लक्षणीय आहे. आजवर त्यांनी केलेल्या कामाची ही पावती असल्याचे मत निर्मोही आखाड्यातील उपस्थित साधू महंतांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणात ११ संशयितांचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महामार्ग बस स्थानकाजवळील हॉटेल तुळजासमोर झालेल्या खून प्रकरणात एकूण ११ संशयित असल्याचे समोर आले असून त्यांचा क्राइम ब्रँचकडून शोध घेतला जातो आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या या खून प्रकरणामुळे पंचवटीसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास राहुल ऊर्फ गुणाजी गणपत जाधव (३६, रा. रामवाडी, पंचवटी) या युवकाचा अवघ्या १० हजार रुपयांच्या आर्थिक वादातून एका टोळक्याने खून केला. याबरोबर किशोर नागरे (२८, रा. रामवाडी, पंचवटी), हिरालाल कृष्णा ठोंबरे (३५, रा. क्रांतीनगर, पंचवटी) व विकी द्वारकानाथ दिवे (२८, रा. पेठरोड मेहरधाम) यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चांगले खून प्रकरणात संशयित असलेला व्यंकटेश मोरे, परेश मोरे यासह ९ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. संशयित निखील मोरे आणि किशोर नागरे यांच्यात मंगळवारी सकाळच्या सुमारास आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाले होते.

हे वाद मिटवण्यासाठी राहुल जाधव व त्याच्या साथीदारांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रात्री जाधवसह किशोर नागरे (रा. तळेनगर), हिरालाल कृष्णा ठोंबरे , किरण कुलकर्णी, सागर परदेशी, विकी दिवे हे जेवणासाठी तुळजा हॉटेलमध्ये गेले होते. तेथे सर्वजण जेवणासाठी बसलेले असतांना संशयितांनी तिथे हल्ला केला.

या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रँचच्या युनिट एक आणि गुन्हे तपास शाखेकडून पथकाकडून संशयितांचा माग काढला जातो आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून या प्रकरणातील ११ संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा सहायक पोलिस आयुक्त सचिन गोऱ्हे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बालकल्याणवर काँग्रेसचा दावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता सभापतीपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महाआघाडीतल्या काँग्रेसला अद्याप कोणतेही पद पालिकेत न मिळाल्याने काँग्रेसने या पदावर दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे यांनी सभापतीपदाची संधी असून, मनसेही सभापतीपद पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे सभापतीपदाची चुरस वाढणार आहे.

महिला व बालकल्याण समितीवर मनसे ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिवसेना २, कॉँग्रेस आणि भाजप प्रत्येकी १ याप्रमाणे पक्षीय बलाबल आहे. महिला व बालकल्याण समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती झाली आहे. समितीत सद्यस्थितीत शिवसेनेच्या कोट्यातून गेलेले सुनील वाघ हे एकमेव पुरुष सदस्य असून, आठ सदस्य महिला आहेत. मनसेच्या रत्नमाला राणे, मेघा साळवे व शीतल भामरे, 'राष्ट्रवादी'च्या रुपाली गावंड आणि शोभा आवारे, शिवसेनेकडून नंदिनी जाधव आणि रिपाइंचे सुनील वाघ, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि भाजपाच्या रंजना भानसी यांची सदस्य आहेत.

सदस्य निवडीनंतर सभापती-उपसभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नगरविकास विभागाकडून निवडणूक तारखांसंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्वणी आटोपताच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महाआघाडीकडेच सभापती-उपसभापती जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत पदापासून वंचित असलेल्या काँग्रेसला हे पद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न सुरू केले आहेत. वत्सलाताई खैरे यांनी या पदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, मनसेने सभापतीपदासाठी दावा सांगितला असून, मेघा साळवे अथवा शीतल भामरे या दोघांपैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाआघाडीतच चुरस वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिकाल भवंता यांचा बहिष्कार कायम

$
0
0

पंचवटी : नाशिकच्या कुंभमेळ्याच्या शुक्रवारी (दि. १८) होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या शाहीस्नानावर बाहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय परी आखाड्याच्या साध्वी त्रिकाल भवंता यांनी जाहीर केला आहे. सकाळी १० वाजता हातात मशाली घेवून प्रशासन आणि सरकारच्या विरोधात निषेध करणार असल्याचेही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नाशिकला तीन शाही स्नान झाले, यात पहिल्या शाही स्नानावारही काळी पट्टी बांधून बहिष्कार टाकला, दुसऱ्या पर्वणीवरही हातात ज्योत घेवून निषेध व्यक्त केला होता आणि तिसऱ्या पर्वणीवरही आमचा सर्व साध्वींचा बहिष्कार कायम असेल, असे त्रिकाल भवंता यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मींच्या स्वागताची नाशिककरांची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी व शेवटची पर्वणी पार पडणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे गुरुवारी शहरात नाशिककरांची महालक्ष्मींसाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी लगबग पाहायला मिळाली.

शनिवारी शहरात ठिकठिकाणी महालक्ष्मींचे आगमन होत असल्याने त्यासाठीची खरेदी शुक्रवारी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही खरेदी गुरुवारीच करण्यावर नाशिककरांनी भर दिला. महालक्ष्मीची प्रतिष्ठापना शनिवारी होणार आहे. यासाठी महालक्ष्मीचे अलंकार, साड्या, फुले, सजावटीचे साहित्य, फराळासाठी लागणारे विविध पदार्थ यांची गुरुवारी मोठ्या प्रमाणावर खरेदी होत होती.

जुन्या नाशिक परिसरामध्ये गोदावरी नदी तसेच पर्वणीचे मुख्य ठिकाण आणि शहराची मुख्य बाजारपेठही आहे. त्यामुळे कोणत्याही सण-समारंभाला या भागात नाशिककरांची खरेदीसाठी गर्दी होत असते. पर्वणीमुळे नेमका हाच भाग शुक्रवारी बंद असणार आहे. तसेच गुरुवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर या भागातील दुकाने बंद होणार असल्याने गुरुवारी दुपारी ३ ते ५ यावेळेत इथे खरेदीची झुंबड उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोर गणपती बाप्पांचाच !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत भारतीय धर्मसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्याची संधी आज, शुक्रवारी तिसऱ्या शाहीस्नानाच्या निमित्ताने सर्वांना घेता येईल. शाही स्नानासाठी नाशिक नगरी पुनश्च एकदा सजली असली तरी पूर्वसंध्येला जोर राहिला तो गणपत्ती बाप्पांचा. बाप्पांच्या आगमनासाठी नाशिककरांची उशिरापर्यंत लगबग सुरू होती.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या आणि दुसऱ्या शाही पर्वणीच्या वेगवेगळ्या छटा संबंध जगाने अनुभवल्या. आज, पुन्हा एकदा हाच अनुभव घेण्यासाठी साधू-महंत सरसावले आहेत. पहिल्या पर्वणी प्रमाणेच यावेळेस कमी भाविक हजेरी लावतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यातच यावेळेस फक्त नाशिक येथीलच पर्वणी असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. भाविकांची संख्या रोडावली असली तरीही २ हजार बसेस, १० हजारापेक्षा जास्त पोलिस तैनात आहेत. नाशिक येथे वैष्णवांचे प्रमुख तीन आखाडे असून आज प्रथम निर्मोही आखाडा स्नानासाठी पुढे असेल. तत्पूर्वी या धर्मोत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेल्या शाही मिरवणुकीचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. नाशिक येथे तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममधील लक्ष्मी नारायण मंदिरापासून शाही मिरवणुकीस प्रारंभ होईल.

पावसाची शक्यता

तिसऱ्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून गुरूवारी सकाळी ११ वाजेपासून २३० क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शुक्रवारी पहाटेपासून नाशिकसह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागू शकते. हा पाऊस सुरू झाल्यानंतर १२ तास बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहर परिसरात पावसास सुरूवात झाल्यानंतर धरणातील विसर्ग बंद करण्यात येईल.

बंदोबस्ताचा धडा

सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी हाताळताना काय खबरदारी घ्यावी, याबाबतची कार्यशाळा बुधवारी रात्री हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पार पडली. यात देशभरातील १६७ ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. गर्दी नियोजनाच्या दृष्टीने सिंहस्थ कुंभमेळा एक आव्हानच ठरतो. आठ महिन्यांवर आलेल्या उज्जैनच्या कुंभमेळ्यात याच ट्रेनी अधिकाऱ्यांना बंदोबस्तातील बारकावे समाजावून सांगण्यात आले.

उत्साह मावळला

शाही पर्वणीच्या पूर्वसंध्येला भाविकांनी गणपती बाप्पांचे शहरात जोरदार स्वागत केले. गणेश चतुर्थीनिमित्त भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दोन पर्वणी अनुभवलेल्या भाविकांना आता तिसऱ्या पर्वणीबाबत फारशी उत्सुकता राहिली नसल्याचे दिसत आहे. प्रशासन सुध्दा याच मूडमध्ये असून रात्री उशिरापर्यंत नो एंट्री पाँईट, नो व्हेईकल झोन तसेच बाह्य वाहनतळे सुरू करण्यात आलेली नव्हती.

नितीशविरोधात शंखनाद

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धार्मिक मुद्यांवरून साधू महंतांनी नाशिकमधून घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी बिहारमधील मठांचा मुद्दा पुढे केला आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यास नितीशकुमारांना त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. अगोदरच विधानसभा निवडणुकीत भाजपचा सामना करणाऱ्या नितीशकुमारांसमोरील अडचणी वाढल्याचे मानले जात आहे.

६०० पोलिसांची 'सुट्टी'

दुसऱ्या महापर्वणीचा जगन्नाथ रथ यशस्वीपणे पेलल्यानंतर पोलिस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. तिसऱ्या पर्वणीला भाविकांची संख्या कमी असल्याने ६०० पोलिसांना सुटी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६०० पोलिसांची ‘सुट्टी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या महापर्वणीचा जगन्नाथ रथ यशस्वीपणे पेलल्यानंतर पोलिस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला. तिसऱ्या पर्वणीला भाविक फार मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्याची शक्यता कमी असल्याने ६०० पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या मूळ ठिकाणी पाठवण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल १० हजारापेक्षा जास्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पहिल्या पर्वणीला भाविकांनी स्नानाकडे पाठ फिरवली. तर, दुसऱ्या पर्वणीला सुमारे ५० लाख भाविकांनी शहरात हजेरी लावली. सिंहस्थ कुंभपर्वात अमावस्येला महत्त्व असते.

तिसरी पर्वणी पौर्णिमेदरम्यान असून यासाठी भाविकांची तितकीशी गर्दी होण्याची शक्यता धूसर आहे. यापार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पोलिस उपायुक्त मकरंद रानाडे यांच्यासह १० सहायक पोलिस आयुक्त, १५ एपीआय तसेच ६०० पोलिस कर्मचारी माघारी पाठवून दिले. हे पोलिस कर्मचारी राज्यातील वेगवेगळ्या भागातील आहेत. सध्या, गणेशोत्सव सुरू झाला असून आवश्यकतेनुसार पोलिसांना माघारी धाडण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोऱ्हे यांनी सांगितले.

पोलिस यंत्रणा झाली निवांत

तिसऱ्या पर्वणीसाठी अगदी एखादा लाख किंवा त्यापेक्षा कमी भाविक शहरात येतील. यापूर्वी त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड अशा दोन्ही ठिकाणी एकाच तारखेला शाही पर्वण्या पार पडल्या. आता, त्र्यंबकेश्वर येथील पर्वणी २५ सप्टेंबरला असून नाशिकमध्ये शुक्रवारी शाहीस्नान पार पडेल. दोन वेगवेगळ्या तारखांना शाहीस्नान होणार असल्याने भाविकांच्या संख्येवर परिणाम होईल. यामुळे सध्या तरी पोलिस निवांत असून सायंकाळी उशिरापर्यंत 'नो व्हेईकल झोन' तसेच 'नो इंट्री झोन' लागू करण्यात आला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे, दरोड्यांना गोदरेज जबाबदार

$
0
0

vinod.patil@ timesgroup.com

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या शाखांवर दरोडे आणि लुटीच्या वाढत्या घटनांची कारणमिमांसा होऊन तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित असतांना, संचालक मंडळ अजूनही अकलेचेच तारे तोडत आहे. बँकेवरील दरोडे म्हणजे दरोडेखोरांचे गोदरेज कंपनीला चॅलेंज असल्याचे अजब तर्क संचालकांनी लावला आहे. संचालक एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी चक्क गोदरेज कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून खरीखोटी सुनावल्याने कंपनीही अचंबित झाली आहे. संचालकांची नियमबाह्य नोकरभरती रोखणाऱ्या लेखापरीक्षक अरविंद मोरेसह सहकार विभागावरही खापर फोडण्याचे काम संचालकांनी सुरू केले आहे.

राज्यातील जिल्हा बँकांमध्ये लक्षणीय आर्थिक उलाढाल असलेली जिल्हा बँक सध्या दरोडे आणि लुटीच्या घटनांनी त्रस्त असतांना संचालक मंडळामध्ये मात्र पदांवरून मानापमान नाट्य सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल पाच दरोड्यांच्या घटनांमध्ये २ कोटी ८० लाख रूपयांची लूट झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा दिवसाढवळ्या लुबाडला जात असल्याने बँकेच्या ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साडेतीन हजार कोटी ठेवी, २१० शाखा, २८ ठिकाणी लॉकर्स व स्ट्राँगरूम सुविधा, दररोजचा दीडशे कोटीचा टर्नओव्हर असा भला मोठा बँकेचा विस्तार असताना या शाखांच्या सुरक्षेचा मात्र विचारच केलेला नसल्याचे दिसते.

सुरक्षेच्या उपाययोजना करण्यापेक्षा संचालक व प्रशासन कागदी सुरक्षेवरच भर देत आहेत. जिल्हा बँकेने सोने, एकत्रीत कॅश, कॅश ट्रान्सफरच्या सुरक्षेसाठी तब्बल १२० कोटीचा विमा काढला आहे. त्यासाठी १२ लाखांचा वार्षिक विमा प्रीम‌यिम भरला जातो. सुरक्षा रक्षकांवर खर्च करणे बँकेने टाळल्याने बँकेवर दरोडे पडत असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. जिल्हा बँकेतील सर्व २१० शाखांना कॅश पुरविण्यासाठी २८ ठिकाणी गोदरेज कंपनीचे लॉकर्स व स्ट्राँगरुम सुविधा उपलब्ध आहेत. लॉकर्स व स्ट्राँगरुम्स मजबूत असल्याने ती लुटली जाऊ शकत नाहीत, असा संचालक मंडळाचा दावा आहे. अलिकडचे दरोडे म्हणजे बँकेला नव्हे तर, गोदरेज कंपनीलाचा आव्हान असल्याचे सांगून गोदरेज कंपनीच्या अधिकाऱ्यालाच पाचारण करण्याचा प्रताप अध्यक्षांसह प्रशासनाने केला आहे. 'गोदरेज कंपनीमुळे आमचे कसे नुकसान झाले' याचा पाढा या अधिकाऱ्यासमोर वाचण्यात आला असून सुरक्षायंत्रणात सुधारणा करण्याचा उपदेशही गोदरेज कंपनीला देण्यात आल्याने कंपनी अधिकारी अवाक झाले आहेत.

अरविंद मोरेंवर खापर

जिल्हा बँकेतील भ्रष्टाचार व नोकरभरतीला पायबंद घालणारे तत्कालीन लेखापरीक्षक अरविंद मोरे यांच्यांसह सहकार विभागावर खापर फोडण्याची तयारी काही संचालकांनी सुरू केली आहे. यासाठी प्रशासनाकडून मोरे यांचीच तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोकरभरतीला विरोध केल्यानेच सुरक्षारक्षक भरता आले नाहीत. त्यामुळेच हे दरोडे आणि लुटीच्या घटना घडल्याचा आरोप माजी अध्यक्षांनी केला आहे. तर सहकार विभागही जबाबदार असल्याचा आरोप संचालक करीत आहेत.

अलिकडचे दरोडे व लुटीच्या घटना आमच्यापेक्षा गोदरेज कंपनीला आव्हान देणाऱ्या आहेत. कंपनीच्या सुरक्षित लॉकर्सवर आम्ही अवलंबून राहिलो. त्यामुळे कंपनीला आम्ही विचारणा केली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही उपायांसह शस्रधारी सुरक्षा रक्षक नियुक्तीचा निर्णय झाला आहे. - नरेंद्र दराडे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ना‌सिक हॅम्स’मुळे अमेरिका प्रभावित

$
0
0

साउथ एशियन डिझास्टर मॅनेजमेंट तज्ज्ञांकडून कौतुक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील हॅम रेडिओ यंत्रणा पाहून अमेरिकन फॉरेस्ट सर्व्हिसमधील एशियन डिझास्टर मॅनेजमेंट तज्ज्ञ सी. बालाजी सिंग अतिशय प्रभावित झाले. त्यावेळी 'जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापनासाठी हॅम रेडिओचा वापर ही उत्तम बाब आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे नुकतीच कुंभमेळ्यातील शाहीस्नानाची दुसरी पर्वणी पार पडली. या पर्वणीच्या वेळी अतिविशिष्ट परिस्थितीत विविध खातेप्रमुखांना गरजेनुसार संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 'नासिक हॅम्स'ची मदत घेतली.

सिंहस्थाच्या दुसऱ्या पर्वणीच्या पार्श्वभूमिवर १२ व १३ सप्टेंबर असे दोन दिवस मिळून नासिक हॅम्स संस्थेच्या १६ जणांनी सुमारे २६-२८ तास सेवा पुरवली. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावाहा व निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी आखलेली योजना यशास्वीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मनीष चिटको आणि उदय चांदोरकर, नासिक महापालिका पंचवटी येथे सतीश चांदोरकर व अजय आहिरे, रामकुंड मुख्यालय येथे अनिरूद्ध कुर्तडीकर व अतुल वर्तक, गांधी तलाव सेक्टर येथे मनोज जोशी, शाही मार्ग सेक्टर येथे विकास कक्कर, टाळकुटेश्वर सेक्टर येथे सतीश कुलकर्णी, लक्ष्मीनारायण घाट येथे सुधीर जोशी, सिव्हिल हॉस्पिटल येथे नितीन हिंगमीरे, महामार्ग बस स्थानक येथे माधव भट, गंगापूर धरण येथे शेखर म्हस्कर व अतुल म्हस्कर, नासिकरोड रेल्वे स्टेशन येथे अजित बर्जे व वेदांत बर्जे व महात्मानगर येथे अनिल रेगे अशा विविध महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक हॅम्सच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली होती.

शहराचा मानबिंदू असलेल्या या कुंभमेळ्यामध्ये स्वत:चे रेडिओ सेटस् वापरून कुठल्याही प्रकारे आर्थिक मोबदला न घेता इतकी महत्त्वाची सेवा पुरवल्याबद्दल शहर व शहराबाहेरील व्यक्ती, संघटनांबरोबरच अगदी विदेशातूनही 'नासिक हॅम्स'चे अभिनंदन होत आहे. विशेष बाब म्हणजे वेदांत बर्जे हा फक्त १७ वर्षीय युवक सुद्धा पूर्ण वेळ या यंत्रणेत सामील होता. तो सध्याच्या युवापिढी पुढे आदर्श ठरावा नाशिकरोड नियंत्रण कक्षात वेदांत हा कुतूहलाचा व आकर्षणाचा भाग ठरला होता. लगेचच असलेल्या नासिकच्या तिसऱ्या शाही स्नानाच्या पर्वणीसाठी 'नासिक हॅम्स'कडून असेच सहाय्य घेण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. याचा भाविकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंद विड्याला राज्यभरातून पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृध्दीच्या सोनपावलांनी घरोघरी महालक्ष्मीचे आगमन होणार असून, त्यासाठी लागणाऱ्या नाशिकच्या गोविंद विड्याला राज्याच्या विविध भागातून मागणी येत आहे. वकीलवाडी येथील साईछत्र पान स्टॉलमधून विडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.

महालक्ष्मीला विड्याचा नैवद्य लागतो. मग पानविडा जर आयुर्वेदीक आणि आकर्षक स्वरुपात असला तर नक्कीच मन प्रसन्न करेल. म्हणूनच वकीलवाडीतील साई छत्र पान दुकानाचे रवींद्र लहामगे यांनी महालक्ष्मीच्या आकाराचा पानविडा बनविला आहे. यंदा या विड्याला नाशिकबरोबर राज्य़ाच्या विविध भागातून मागणी आहे. त्यांनी बनवलेले विडे इतर जिल्ह्यात पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या दोन दिवसात अमरावती, महाबळेश्वर, औरंगाबद, नागपूर, पुणे, मुंबई, अशा १५ ते २० जिल्ह्यांमध्ये विडे पाठवले आहे. विडे वेळेत पाठवणे शक्य नसल्याने बाहेरच्या ऑडर्स थांबवल्या आहेत.

विड्याची ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री होत आहे. हा विडा 'गोविंद' नावाने प्रसिध्द आहे. विड्यात विशिष्ट प्रमाणात काथ आणि चुना लावला जातो. पानात लावलेला काथ व चुना वेगळ्या पध्दतीने तयार केला जातो. त्यात गुलाबपाणी लोणी यांचे मिश्रण असते. त्याचबरोबर सुपारी बडीशोप, सुकामेवा, गुलाबपाकळी, गुलाबपाणी, गुलकंद, मध, केशर, अस्मनतारा, वेलची, लवंग, ओवा, जेष्ठमध, कंकोळ, तीळ, खोबरे, पत्री, खडीसाखर, काळ्या मनुका, मध, कापुर, स्वर्णभस्म, चांदीचा वर्ख, अशा ५२ प्रकारच्या बहुगुणी वस्तू त्यात टाकलेल्या असतात. या विड्याला चारही बाजुने वस्त्राने सजविले जाते. चेरीचा मुखवटा,लवंगाचे डोळे असा विविध प्रकारांनी सजवून महालक्ष्मीचे स्वरुप देण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षापासून हा विडा गृहिणींच्या गौरीपूजन सोहळ्यात रंगत आणतोय. आकर्षक शिल्पाप्रमाणे या विड्याची सजावट केलेली असते. सजावटीचा भाग म्हणून हा मंगल नैवेद्य ठेवला जातो. गौरी विसर्जनानंतर सर्व कुटूंबियांकडून या प्रसादाचे सेवन केले जाते. ही परंपरा केवळ नाशिकमध्ये प्रसिध्द आहे. विड्यासाठी वस्त्रे मथुरेहून आणली आहेत. दागिने नाशिकच्या सराफ व्यावसायिकांनी बनवले आहेत.

आम्ही शास्त्रशुध्द पध्दतीने विडा बनवित असल्याने ग्राहकांची मागणी असते. पूर्वी नाशिकमधून मागणी असायची; आता बाहेरच्या जिल्ह्यातूनही प्रतिसाद मिळतो आहे.

रवींद्र लहामगे, संचालक, साईछत्र पान मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळी घाटाकडे भाविकांची पाठ

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

पावसाने शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने टाकळी येथील संगम घाटाकडे भाविकांनी येण्याचे टाळले. प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या घाटावर दिवसभरात केवळ पोलिस कर्मचारी, महापालिकेच्या गाड्या अन् माध्यमांचे प्रतिनिधी वगळता कुणी फिरकले नाही.

ऋषीपंचमीनिमित्त दिवसभरात आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या महिलांनी रामकुंडावरील शाहीस्नानाची गर्दी टाळत टाकळी येथील संगम घाटावरचं सकाळी ९ वाजेपर्यंत स्नान केले आणि आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. साधुग्रामकडून येणाऱ्या भाविकांच्या आशेवर दिवसभर यंत्रणा सज्ज होती; मात्र ५ वाजेपर्यंत देखील भाविक न आल्याने घाटावर दिवसभर शुकशुकाट होता.

घाटावर उरली अॅम्ब्युलन्स

पंचवटी : टाकळी घाटावर सकाळी नऊ वाजेपर्यंत भाविकांचा बऱ्यापैकी ओघ होता. ऋषीपंचमीनिमित्त परिसरातील महिला भाविकांनी गोदातीरी डुबकी मारली; नंतर मात्र भाविकांची संख्या रोडावत गेली. दुपारी १२ नंतर तर कुणी भाविकच आले नाही. त्यामुळे घाटावर महापालिकेचे कर्मचारी, पोलिस आणि आपतकालीन व्यवस्था म्हणून अॅम्ब्युलन्स दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images