Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मुकणे योजनेवरून राजकारण तापले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुकणे पाणीपुरवठा योजनेप्रकरणी एल अॅण्ड टी कंपनीने अल्टिमेटम दिल्यानंतर आता महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेन सत्ताधारी मनसेला घेरण्याची तयारी केली असून, एल अॅण्ड टी च्या पत्राचा बोलविता धनी कोण?, असा सवाल आता सत्ताधाऱ्यांना केला आहे. या प्रकरणात विशेष महासभा घेऊन अतिरिक्त खर्चाची जबाबदारी कोणाची यावर प्रशासनाने प्रकाशझोत टाकावा, अशी मागणी शिवसेना गटनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. दोन लाखांच्या फाईल्स मंजूर होत नसताना कोट्यवधीच्या विषयांसाठी दबाव का?, असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.

नाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुकणे पाणीपुरवठा योजनेतील गोंधळाप्रकरणी एल अॅण्ड टी कंपनीने पालिकेला आता ३० सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. कंपनीच्या निविदेला ३० सप्टेंबरच्या आत मान्यता न दिल्यास प्रकल्पातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी महापौरांना पत्र लिहून मुकणेसंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची सूचना केल्यानंतर पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेने आक्रमक होत, नोटीसला भीख घालू नका, असे सांगत या पत्रामागचा बोलविता धनी कोण?, असा सवाल केला आहे. कंपनीच्या आडून कोणीतरी दुसराच व्यक्ती इशारा देत असल्याचा संशय बोरस्ते यांनी व्यक्त केला आहे.

निविदा काढल्यानंतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. स्थगिती उठविताना राज्य सरकारने पालिकेचे आर्थिक दायित्व कमी करण्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खर्चाचा खुलासा घेणे आवश्यक आहे. सत्ताधारी ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत तर नाही ना असा सवाल करीत प्रशासनावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खून प्रकरणात आणखी एकाला अटक

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

महामार्ग बसस्थानकाजवळील हॉटेल तुळजासमोर झालेल्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली. या घटनेत पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची संख्या आता तीन झाली असून, अद्याप व्यंकटेश मोरे या मुख्य सूत्रधारासह आठ जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

महामार्ग बसस्थानक येथील हॉटेल तुळजाजवळ गत बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास राहुल ऊर्फ गुणाजी गणपत जाधव (वय ३६) रा. रामवाडी, पंचवटी या युवकाचा १० हजार रुपयांच्या आर्थिक वादातून एका टोळक्याने खून केला होता. या हल्ल्यात किशोर नागरे (वय २८) रा. रामवाडी, पंचवटी, हिरालाल कृष्णा ठोंबरे (३५) रा. क्रांतीनगर, पंचवटी व विकी द्वारकानाथ दिवे (वय २८) रा. पेठरोड मेहरधाम हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ पंचवटी तसेच सिडको परिसरात राहणाऱ्या ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरुवातीलाच पोलिसांनी निखील मोरे आणि समीर व्यवहारे यांना बेड्या ठोकल्या. सध्या हे संशयित पोलिस कोठडीत असून, उद्या रिमांड संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. याच प्रकरणात पोलिसांनी हर्षल पोपट निकम या २२ वर्षीय तरुणास त्रिमूर्ती चौक, सिडको येथून मंगळवारी अटक केली. कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उज्जैन कुंभमेळ्यातील घरांना नाशिककरांचा टच

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी बोस्टन येथील प्रख्यात आर्किटेक्ट स्कॉट नॉक्स यांनी हनी कॉम्ब व्हिलेज तयार केले जात आहे. यापुढील सर्व कुंभमेळ्यात केंद्र सरकारकडून याच घरांचा वापर होणार आहे. नाशिकमध्ये या घरांचा थेट वापर झाला नव्हता मात्र डेमोचे सादरीकरण झाले होते. आता उज्जैनला या घरांचा वापर होणार असल्याचे ही घरे उभारण्यासाठी नाशिकचे ३१ आर्किटेक्ट झटत आहेत. नाशिककर ही घरे उभी करणार असल्याने हनी कॉम्ब व्हिलेजला 'मेड इन नाशिक पॅटर्न' म्हटले जाणार आहे.

कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या निवासाचा अनेकदा प्रश्न निर्माण होतो. तकलादू घरे किंवा तंबूमध्ये त्यांना वास्तव्य करावे लागते. सध्या अस्तित्वात असलेली घरे ही वॉटर प्रुफ नसल्याने पावसाचे पाणी तंबूत शिरते. आग लागल्यास तंबू खाक होतात. ही अडचण ओळखून बोस्टन येथील स्कॉट नॉक्स यांनी हनी कॉम्ब व्हिलेज तयार केले असून, केंद्र सरकारतर्फे त्याचा वापर करण्यात येणार आहे. यात तयार होणारे ही घरे सेमी परमनंट हाऊस या प्रकारची असून, ती पोर्टेबल स्वरुपाची असणार आहे. एका घरात चाळीस लोकांना रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही घरे बांबू आणि फायर प्रुफ कापड यापासून तयार करण्यात येणार आहेत. यात लिव्हिंग पॅव्हेलियन, मेडिकल पॅव्हेलियन आणि मल्टीपर्पज पॅव्हेलियन असे तीन प्रकार आहेत. या व्हिलेजमध्ये वीज बचतीसाठी प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. घरांवर पडणारे पाणी रेन हार्वेस्टींगद्वारे जमा केले जाणार आहे.

घरे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून तयार केली जाणार आहेत. एका पॅव्हेलियनला तयार करण्यासाठी ३ लाख रुपये खर्च येणार असून, त्यात ४० माणसांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. एकूण २५ हजारांसाठी ७ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. नाशिक कुंभमेळ्यात साधुग्राममध्ये सेक्टरनुसार व्यवस्था करण्यात आली होती. अशिक्षित लोकांना सेक्टर शोधतांना येणारी अडचण लक्षात घेऊन प्रत्येक सेक्टरसाठी रंगांचा वापर करण्यात येणार आहे. सब सेक्टरला फळांची नावे दिली जाणार आहे.

घराच्या निमिर्तीसाठी नाशिकमधील ३१ आर्किटेक्ट काम करीत असून, निकीता गायकवाड या समन्वयाची भूमिका बजावत आहेत. भूकंप झाला तरी या घरांमध्ये काही होणार नाही. तसेच आग लागलीच तर फोफावणार नाही, अशा पध्दतीने ही घरे आहेत. या घरांना मेड इन नाशिक पॅटर्न असे नाव दिले जाणार आहे. स्कॉट नॉक्स यांनी बोस्टनचे विमानतळही साकारले आहे.

साधुग्राममध्ये घरांचे डेमो दाखविले होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांना रहाता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याचा कुंभमेळ्यात चांगला उपयोग होईल.

- स्कॉट नॉक्स, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनवर बंदी घालणे चुकीचेच

$
0
0

शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सनातन संस्थेवर बंदी घालणे चुकीचे असून, दिवंगत दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनाचा शोध शासनाने आपल्या पोलिस, गुप्तचर आदी यंत्रणांच्या माध्यातून घ्यावा. उगीचच सनातनसारख्या धर्मकार्य करणाऱ्या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय घेणे योग्य होणार नाही, असे ज्योतिषमठ आणि शारदामठ यांचे पीठाधिश्वर जगदगुरू शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक, भक्त, साधू-संत आले म्हणूनच हा वैश्विक मेळा आहे. एकात्मतेचा संदेश देणारा आहे. हिंदू धर्मातील विविध पंथ, उपासना पध्दती शेवटी एकच आहेत. ही एकात्मता मोसंबी अथव संत्री सारखी नाही जे फोडल्या नंतर छिलके उडतात, तर ही एकात्मता टरबुजासारखी आहे. कापले तरी ते एकसंघता सोडत नाही. सुमारे २५००वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य यांनी पीठांची निर्मिती केली व संपूर्ण भारतवर्षात हिंदू धर्म एकसंघ केला.

आपल्या विरुध्द ज्योतिषपीठाबाबत वासुदेवानंद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती फेटाळली आहे. त्यांनी सादर केलेले त्यांच्या गुरुंचे इच्छापत्र खोटे होते, असे यापूर्वीच सिध्द झाले आहे. त्याचप्रमाणे काशी येथे कोणतेही पीठ नाही. काही व्यक्ती स्वतःला शंकराचार्य म्हणवितात. मात्र, नियमांचे पालन करीत नाही, असे म्हणून त्यांनी आपण चार्तुमासात नदी ओलांडायची नाही म्हणून अद्याप त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात देखील गेलेलो नाही. काही आपल्या वाहनावर शंकराचार्य लिहितात आणि अशी वाहने रस्त्यावरील धाब्यावर उभी राहतात. हा धर्माचा अवमान आहे. अशा व्यक्तींना शासनाने समज दिली पाहिजे. आपण स्नान केले याचे कारण जनतेत स्नानाचे महत्त्व टिकले पाहिजे. सनातन धर्माचे रक्षण झाले पाहिजे. आपल्याला मध्य प्रदेश शासनाने संरक्षण दिले आहे. अर्थात संरक्षणाचा उपयोग बडेजाव म्हणून नको मात्र, हिंदू धर्माचे आपण धर्मगुरू आहात इतर धर्माच्या धर्मगुरुंना शासन अधिक महत्त्व देत असताना कोट्यवधी हिंदूंच्या सर्वोच्च पीठाबाबत आकस बाळगणे चुकीचे आहे.

नेपाळवर मावोवादी षडयंत्राचा प्रभाव

नेपाळ राष्ट्राने हिंदू धर्मीय न होता निधर्मी म्हणून स्वतःस जाहीर केले, हे अत्यंत चुकीचे झाले. यामुळे या देशाची एकसंघता लयास जाईल. हा मावोवादी षडयंत्राचा प्रभाव आहे, असे देखील त्यांनी सांगितले. लोकशाही पाहिजेच मात्र, धर्म देखील जपला पाहिजे, हा राजधर्म आहे. नेपाळचा राज चांगला होता मात्र, हे षडयंत्र करणाऱ्यांनी राज परिवाराची हत्या केली. राजकुमारास दोषी ठरविले. तो देखील हयात नाही. येथे ख्रिश्चनधर्माचे प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे. देशातील मुस्लिम धर्मियांनी आपल्या धर्माचे पालन करावे. त्यांना आमचा कधीच विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधिकाऱ्यांचा ताण होणार कमी

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

मुंबई नाका आणि म्हसरूळ या दोन नवीन पोलिस स्टेशनची भर पडताच पोलिसांनी प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या डिव्हीजन कार्यालयांचा विस्तार करण्याचे नियोजन आखले आहे. गणेशोत्सवानंतर लागलीच सध्याच्या दोन डिव्हीजनचा विस्तार होणार असून, नवीन रचनेमुळे अधिकाऱ्यांना कामाचा निपटरा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल.

नाशिक शहराच्या सीमा रूंदावत गेल्या तशा पोलिस आयुक्तालयासाठी नवीन पोलिस स्टेशनची मागणी जोर धरू लागली. गृहविभागाने या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलिस स्टेशनला मंजुरी दिली. या पोलिस स्टेशनच्या जागा निश्चित झाल्या. नवीन पोलिस स्टेशनच्या निर्मितीला अनुसरून पोलिसांनी आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली. आजवर नाशिकमध्ये दोन पोलिस उपायुक्त हे झोन एक आ​णि झोन दोन या पातळीवर काम करीत होते. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्तांसाठी दोनच डिव्हीजन कार्यालये अस्तित्वात होते. त्यामुळे प्रशासकीय कामांना खीळ बसत असे. त्यातच गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारी रोखणे यात सहायक पोलिस आयुक्तांची (एसीपी) सर्व उर्जा खर्ची पडत असे. या पार्श्वभूमीवर नवीन पोलिस स्टेशनला मंजुरी मिळताच सर्वप्रथम डिव्हीजन कार्यालयांचा विस्तार करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. त्यानुसार, पंचवटी, भद्रकाली, अंबड आणि नाशिकरोड या चार डिव्हीजनची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी फक्त दोनच डिव्हीजन होते. त्यामुळे तिथे कार्यरत असलेल्या सहायक आयुक्तांना पाच ते सहा पोलिस स्टेशनचा कार्यभार संभाळावा लागत असे. आता मात्र, फार तीन पोलिस स्टेशनमागे एक सहायक पोलिस आयुक्त नियुक्त केला जाणार आहे. गणेशोत्सवानंतर ही कार्यालये सुरू होतील.

डिव्हीजन ऑफीसमध्ये प्रशासकीय कामे मोठ्या प्रमाणावर होतात. तडीपारीची कारवाई, चॅप्टर केसेस होतात. या पार्श्वभूमीवर डिव्हीजन कार्यालयांची संख्या वाढणे महत्त्वाचे होते. नवीन डिव्हीजनमुळे अधिकाऱ्यांची संख्याही वाढेल.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त

डिव्हीजन ऑफीस - पंचवटी

समाविष्ट पोलिस स्टेशन : पंचवटी, म्हसरूळ, आडगाव

कार्यालय : सारडा सर्कलजवळील आयजी ऑफीसजवळ

डिव्हीजन दोनचे ऑफीस- भद्रकाली

समाविष्ट पोलिस स्टेशन : भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर

कार्यालय : शरणपूररोडवरील जुने पोलिस आयुक्तालय

डिव्हीजन तीनचे ऑफीस- अंबड

समाविष्ट पोलिस स्टेशन : अंबड, सातपूर, इंदिरानगर

कार्यालय : पाथर्डी फाटा येथील क्राईम ब्रँच युनिट दोनचे कार्यालय

डिव्हीजन चारचे ऑफीस - नाशिकरोड

समाविष्ट पोलिस स्टेशन : नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर

कार्यालय : उपनगर येथील सध्याचे डिव्हीजन ऑफीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाकडूनच महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

कामानिमित्त नाशिकच्या सेशन कोर्टात आलेल्या महिलेचा पोलिस कर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिन्नर येथील पीडित महिला सोमवारी कोर्टात आली होती. त्यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या वावी पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचारी विजय लोखंडे याने सदर महिलेचा विनयभंग केला. याबाबत सदर महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. याच गुन्ह्यात लोखंडे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हल्ला करणे, शिवीगाळ करून दमदाटी करणे आदी कलमान्वये सदर महिलेविरोधात क्रॉस कम्प्लेंट दाखल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराच्या दबावामुळे आरोपी मोकाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या भाजप लोकप्रतिनिधींनीही गुन्हेगारीकरणाबाबतीत आघाडीचाच कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. कधीकाळी आघाडीच्या आश्रयास असलेल्या गुन्हेगारांनी आता भाजपमध्ये आपले बस्तान बांधायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आमदारांनाही अशा लोकांची गरज असल्याने आमदाराज्ञनीही थेट या गुन्हेगारांना आपल्या छत्राखाली घेतले आहे. ठक्कर बाजार खून प्रकरणातील मुख्य संशयित व्यंकटेश मोरे पाच दिवसांपासून फरार असून, पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी भाजपच्याच नेत्यांकडून मदत केली जात असल्याचे खळबळजनक वृत्त आहे.

ठेकेदारी पद्धतीमुळे नाशिकमधील गुन्हेगारीला चांगलेच बळ मिळाले असून, ठिकठिकाणचे पार्किंगचे ठेके हे तर गुन्हेगारांचे नंदनवन बनले आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने आणि यापूर्वीचे आमदारही मनसेचे असल्याने या गुन्हेगारांनी काही वेळ मनसेत बस्तान बसविले होते. त्यामुळे चांगले आणि पगारे हत्याकांडाची अनुभूती शहराने घेतली होती. आता शहरात भाजपचे आमदार आणि राज्यात भाजपचेच सरकार असल्याने या गुन्हेगारांनी आता भाजप नेत्यांच्या चरणी लोटांगण घातले आहे. या नेत्यांनीही सशक्त होण्यासाठी या गुन्हेगारांना आश्रयास घेतल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा असाच एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पदाधिकारी भाजपात स्थिरावला आहे. या कार्यकर्त्यांमुळे भाजपमध्ये गुन्हेगारांना जवळ करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

गेल्या आठवड्यात ठक्कर बसस्थानक परिसरात मध्यरात्री चौघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सरकारवाडा पोलिसांनी अकरा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यात राहुल उर्फ गुणाजी गणपत जाधवला आपला जीव गमवावा लागला. संशयित व्यंकटेश मोरे, परेश मोरे व त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी धारदार शस्त्रांनी नागरे, जाधव, ठोंबरे व परदेशी यांच्यावर वार केले. त्यात जाधवच्या डोक्यात व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत निखिल मोरे, समीर व्यवहारे आणि हर्षल निकम यांना अटक झाली असून, मुख्य संशयित व्यंकटेश मोरे हा अद्यापही फरार असून, पोलिसांना सापडत नाही.

व्यंकटेश मोरेवर राजकीय कृपाछत्र असल्याने पोलिसांवर आता त्याला अटक न करण्यासाठीच दबाव टाकला जात आहे. मोरे हा सध्या एका भाजपच्या आमदाराचा सेवेकरी बनला आहे. त्यामुळे या आमदार पती-पत्नीकडून त्याला संरक्षण मिळाले असल्याची पोलिस दलात चर्चा आहे. या दबावामुळेच पोलिस माहिती असूनही मोरेपर्यंत पोहचत नसल्याची चर्चा आहे. खुनातील गुन्ह्यातील आरोपीलाच वाचवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याने पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत. याच मोरे एका ठेक्याच्या प्रकरणात थेट नगरसेवकावरच हात उचलला होता. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी माहीत असतानाही त्याला आपल्या सेवेशी ठेवण्यासाठी आमदारांनी हट्ट चालविला आहे.

विशेष म्हणजे या गुन्हेगारांबाबतीत आघाडी आणि मनसेच्या नेत्यांचा अनुभव पोलिसांना येत होता, तसाच अनुभव भाजप नेत्यांचाही येत असल्याने पोलिस संभ्रमात पडले आहेत. सरकार भाजपचेच असल्याने पोलिसांचेही हात बांधले गेल्याने या खून प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांच्या गुन्ह्यांवर पडदा

$
0
0

आठ महिन्यांतील १३ गुन्ह्यांचा लागेना शोध

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : देशाच्या आर्थिक सुरक्षेलाच आव्हान देणारा बनावट नोटांचा धंदा तेजीत आला, असे दिसते. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या काळात शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये बनावट चलनाचे १३ गुन्हे दाखल झाले असून, यातील एकाही गुन्ह्याच्या मुळापर्यंत तपासाधिकारी पोहचू शकलेले नाहीत.

गेल्या काही वर्षांपासून बनावट चलनाचे लोण नाशिक शहरासह ग्रामीण भागात पोहचले आहे. नुकतेच सप्तशृंगी गडावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यापूर्वी मार्च २०१३ मध्ये सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूर आणि पांगरी येथून अनुक्रमे दोघा तरुणांना बनावट नोटांच्या गुन्ह्यात शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. शहरी भागात सुध्दा बनावट नोटांचा बाजार गरम झालेला दिसतो. हे प्रमाण नेमके किती असावेत, याबाबत पोलिसही शाशंक आहेत. चालू वर्षात बनावट चलनाचे १३ गुन्हे दाखल झाले. मागील वर्षी जानेवरी ते ऑगस्ट या कालावधीत सात गुन्हे शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आले. मात्र, यातील एकही गुन्हा आजवर उघड झालेला नाही. याबाबत क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, बनावट नोटा तयार करण्याचे काम शहरातच होते असे नाही. या नोटा परराज्यातून किंबहूना परदेशातून येतात. बँकेत भरणा झाल्यानंतरच बनावट नोटांना तोंड फुटते. यात बराच कालव्याप होतो. त्यामुळे तपास करताना अडचण निर्माण होते. स्थानिक पातळीवर मात्र पोलिस दक्ष असून, मागील वर्षी सिडको आणि​ इंदिरानगरमधील दोघा तरुणांना अटक केली होती, असे गोरे यांनी स्पष्ट केले. बनावट नोटांच्या गुन्ह्यात तपासास खीळ बसण्याचे कारण म्हणजे बऱ्याचदा आपण काळजीपूर्वक याकडे पाहत नाही, असे क्राईम ब्रँचचे सिनिअर इन्सपेक्टर संजय सानप यांनी स्पष्ट केले. बहुतांशवेळा बांग्लादेश आ​णि पाकिस्तानमार्फत या बनावट नोटा येतात.

सर्वसाधारणपणे बनावट नोटा हाती येताच प्रत्येकजण ती कटवण्याचा प्रयत्न करतो. स्थानिक पातळीवर कारवाई होते. मागील वर्षी अटक केलेल्या तरुणांकडून पाच लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, असे सानप यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभपर्वातही त्र्यंबकनगरीत रंगला गणेशोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ पर्वकाल आणि त्यानिमित्ताने झालेली गर्दी व प्रशासनाच्या नियाजनात सुध्दा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली परंपरा कायम ठेवली आहे. शहरातील विविध भागात भव्य गणेशमूर्तींची स्थापना झाली असून, रस्त्यावर अडथळा येणार नाही अशा पद्धतीने दररोज आरती महापूजा आदी संपन्न होत आहे.

कुंभमेळ्यात विविध प्रांतातून आलेले भाविक साधू-संत या भव्य मूर्ती पाहून आकर्षीत होतात मोबाईल मध्ये हे मनमोहक रूप साठवितात. विदेशी पत्रकार छायाचित्रण करतात. त्र्यंबकच्या तहसीलदारांचा इकोफ्रेंडली गणेश स्वतः तयार केलेला आहे. शाडूच्या मातीची जवळपास सव्वा फुटाची सुबक आकर्षक गणेशमूर्ती त्यांनी आपल्या कामाचा व्याप संभाळत अवघ्या तीन दिवसांत तयार केली. त्यांनर पोस्टर कलर वापरून तिला आकर्षक रंगसंगती दिली आहे.

तहसीलदारांची कलाकृती

तहसीलदार नरेशकुमार बहीरम यांनी सांगितले, की शाळा कॉलेजमध्ये असतांना आपण मूर्तीकलेत पारंगत झालो होतो. नंतर कॉलनीत राहत असतांना कॉलनीच्या उत्सवाची गणेशमूर्ती आपण स्वतः तयार करायचो. अर्थात दहा वर्षांत मूर्ती तयार केली नव्हती. मात्र, यावर्षी त्र्यंबकच्या नवीन तहसील कार्यालयात गणेश स्थापना करण्याचा विचार पुढे आला तेव्हा मला प्रकर्षाने वाटले की येथील पहिला गणेशोत्सव आहे. आपण स्वतः मूर्ती घडवावी, दुसरे म्हणजे शाडूच्या मातीपासून आणि बिगरविषारी रंगापासून तयार केलेली ही मूर्ती पर्यावरणाची हानी करणारी नसावी म्हणून मी स्वतः गणेशमूर्ती तयार केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत मातीकाम मूर्तीकाम चित्रकला आदी शिकविले पाहिजे. यामधून कलाविष्कार सादर करतांना सृजनशिलता जोपासता येते. यातूनच विद्यार्थ्यांंना पुढे गोडी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव तहसीलदारांना भोवली अरेरावी वर्तणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील तहसीलदार दीपक पाटील यांच्या अरेरावी वर्तणुकीविरुद्ध येथील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन गेल्याच आठवड्यात केले होते. त्याची दखल घेत तहसीलदार दीपक पाटील यांना १३ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश मालेगाव तहसील प्रशासनास प्राप्त झाला आहे. या सक्तीच्या रजेच्या काळात नायब तहसीलदार गिरीश वाखारे यांच्याकडे मालेगाव तहसीलदारपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

येथील तहसीलदार दीपक पाटील यांच्या विरोधात येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मागील आठावड्यात कामबंद आंदोलन केले होते. पाटील हे नेहमीच अरेरावी करतात. अशासकीय भाषेत बोलतात तसेच त्यांच्या कामातील अनियमितता, वेळकाढूपणा आदी कारणांबद्दल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेऊन तक्रार केली होती. या आंदोलनानंतर दीपक पाटील यांना स्वतःवरील कार्यवाही अटळ असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विना तारखेचा व वैद्यकीय दाखला नसलेला अर्ज पाठवून रजेची मागणी केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने हा अर्ज फेटाळतानाच पाटील यांना २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले. या कालावधीत नायब तहसीलदार गिरीश वाखारे हे तहसीलदारपदाचा कारभार सांभाळणार आहेत. गेल्या काही महिन्यांत लाचलुचपत विभागाच्या कार्यवाहीमुळे मालेगाव तहसील प्रांत व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयलातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला होता. आता महसूल कर्मचाऱ्यांचे खुद्द तहसीलदार यांच्या विरोधातील आंदोलन आणि त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय यामुळे मालेगाव तहसील कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहळा संपला तरी शोभावंत करमायले...

$
0
0

prashant.desale@timesgroup.com

'गेल्या येळपेक्षा यंदा नाशिकमध्ये सुविधा दिसतायं, आम्ही तिसऱ्या पर्वणीलाच येणार होतो, पण पावसानं खोडा घातला, म्हणून आता आलोया. पण इथला सोहळा संपला तरी इकडे शोभावंत करमायले, म्हणून त्र्यंबक जाण्याआधी पहरभर थांबोलयं तपोवनात' अस्सल मराठवाडी भाषेत दौलतराव मुंजाजी ढोबळ बोलत होते. पाच म्हातारे आणि एक म्हातारी असा हा मराठवाडी मित्रपरिवार तपोवनात एका चिंचेच्या झाडाखाली निवांत बसला होता. 'देवानं सुखरूप ठेवलं तर पुढच्या कुंभमेळ्याला नक्की येवू,' असं सांगतांना सत्तरी ओलांडलेल्या दौलतरावांचा चेहरा चांगलाच खुलला.

नाशिक येथील तीनही पर्वणी आटोपल्या. तपोवनातील साधू-महंतांचे तंबूंही सोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी बहरलेले तपोवन उदास वाटत होतं. अधूनमधून काही परप्रांतीय तसेच महाराष्ट्रातील पर्यटक, भाविक अजूनही नजरेस पडत आहेत. गुंडेश्वर (ता. बसमत, जि. हिंगोली) येथील भाविकांचा हा चमू चिंचेच्या झाडाखाली निवांत बसला होता. डोक्यावर पिवळ्या रंगाचे पागोटे, प्रत्येकाच्या खांद्यावर उपरणं, अंगात पांढरा सदरा आणि धोतर तर म्हातारीनं निळ्या रंगाचं लुगडं नेसलेलं होतं. गप्पांच्या ओघात, बाजीराव चव्हाण यांनी मागच्या कुंभमेळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 'मागच्या वेळेला एवढ्या सुविधा नव्हत्या, रस्ते चकचकीत होते, पण इतके मोठाले नव्हते. एका रिक्षावाल्यानं चार तासात संपूर्ण नाशिक फिरवून आणलं होतं. आता पाय थकले आणि ‌गावभर फिरण्यासाठी रिक्षा करण्याइतपत पैसाआडका नाय. गावाकडं दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला, मगचं वाट धरली नाशिकची. स्वस्त असते म्हणून गाडीनं (रेल्वे) आलो नाशिक.'

ते मनमोकळेपणानं बोलत होते पण तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक पुसटशी काळजी पसरली होती. विचारल्यावर चंद्रभागा भारती या आजीबाई म्हणाल्या, 'मराठवाड्यातील सण-उत्सव, लोकांचे फिरणंहिरणं सगळं काही पावसावर अवलंबून असतं दादा. तुमच्याकडं अंगणात नदी हाय, आमच्याकडं प्रत्येकाच्या दारात रिकामे ढिबरे (भांडी) दिसतात, आणि डोकी टँकरची वाट पाहतात.' थोडसं थांबून दौलतराव म्हणाले, 'कुंभमेळा आता आवरत आला, तरी इथली शोभा काही कमी झाली नाही. गाडी स्टेशनपासून ते बसअड्ड्यांपर्यंत आणि गोदाकाठापासून ते तपोवनापर्यंत सगळीकडं कसं शोभावंत वाटायले. आता तपोवनातच बघा ना, आवराआवर सुरू आहे, तरी आम्हाला इथं करमायले.' या प्रत्येकाच्या बोलण्यातून एक आपुलकी, मनमोकळेपणा जाणवत होता. मात्र, समोर खळखळून वाहणारी गोदामाई पाहून ते पुन्हा पुन्हा लांबलेल्या पावसाविषयी चिंता व्यक्त करत होते.

उमाजी क्षिरसागर यांनी पुढच्या प्रवासाबद्दल सांगितलं. त्यांच्या गावाकडचे काशिनाथ भालेराव महाराज शिर्डीहून त्र्यंबकला आले आहेत. त्यांच्याकडेच राहण्याखान्याची सोय होणार होती. इतक्या लांबून आलेले असूनही त्यांच्यापैकी कुणाकडेच मोबाइल नव्हता. यावर दत्ता चव्हाण यांनी वेगळंच स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'आम्ही घराबाहेर पडलो, एवढ्या दूर आलो. याबाबत घरी कळविण्याचं काही गरज वाटली नाही. तिकडे पोरांनां लई चिंता आहे पावसाची. त्यात आम्ही जुनी खोडं काय मदत करणार? ना पाणी आणणार, ना कामधंदा करणार? आता इकडे दोन-चार दिवस जास्तही थांबलो तरी काही बिघडणार नाही, आम्ही तर 'त्याच्या' निरोपाची वाट पाहतोय.' आम्ही जेव्हा तपोवनात आलो तेव्हा एका माणसाकडं मोबाइल दिसला म्हणून त्याला इनवणी केली. त्यानं गावाकडे निरोप देण्यापुरता फोन लावून दिला. शेवटी दौलतराव शांत स्वरात म्हणाले, 'निसर्गानं अशी दशा ‌केली बाबा, म्हणून गावात जीव लागत नाही. पण त्यानं पोट दिलयं तर तोच चार घासाचीबी सोय करलं, देवाची कृपा असली, अन् गावाकडं शिवार बहरलं तर पुढच्या कुंभमेळ्याला नक्की येवू...'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुर्बानी बोकडाची किंमत झाली दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्यात गोवंश हत्याबंदीमुळे यंदाच्या बकरी ईदला मुस्लिम बांधवांना मोठ्या जनावरांची कुर्बानी देता येणार नसल्याने इतर जनावारांचा पर्याय देखील महाग झाला आहे. त्यामुळे गेल्यावेळच्या तुलनेत दुप्पक किंमत मोजण्याची वेळ आली आहे.

धार्मिक विधी म्हणून बकरी ईद निमित्त जनावरांची कुर्बानी देण्याचे प्रथा आहे. गोवंश हत्याबंदीमुळे बोकडांच्या किंमती गगनाला भिडले आहे. मागील वर्षी सुमारे पाच हजार रुपयांना मिळणारे बोकड यंदा बारा ते वीस हजार रुपये मोजून खरेदी करावे लागत आहेत. श्रीरामपूर, अहमदनगर,लोणी, चांदवड, नाशिक तसेच परराज्यातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात व राजस्थान येथील खास विविध जातीचे देखणे बोकड विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, परराज्यातील बोकडांची किंमत २५ ते ६० हजार रुपयांपर्यंत आहे.

कुर्बानीचा इतिहास

हजरत इब्राहिम अलैहास्सलाम यांची अल्लाहता अल्लाने त्याग व बलिदानाची परीक्षा घेण्याचे ठरवले. आपल्या प्रिय व आवडीमधून कुर्बानी देण्याचे सांगितले. तेव्हा हजरत इब्राहिम अलैहीस्सलाम यांनी आपले एकमेव पुत्र हजरत इस्माईल अलैहीस्सलाम यांची कुर्बानी देऊ केली. तेव्हा अल्लाह प्रसन्न होऊन त्यांनी दुंबाची (खास बोकड) कुर्बानी दिलेल्या अवस्थेत मिळून आला. तेव्हापासून या पिता पुत्राच्या सन्मानार्थ जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा अस्तित्वात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तरी नागरी सुविधांकडे लक्ष द्या!

$
0
0

सिडकोच्या प्रभाग बैठकीत सर्वच सदस्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, सिडको

नाशिक शहरात झालेल्या सिंहस्थ कुंमेळा संपला असल्याने महापालीकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी नागरी सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. नविन नाशिक सिडकोच्या महापालीकेतील सभागृहात झालेल्या प्रभाग बैठकित सर्वच सदस्यांनी सभापती कांचन पाटील यांच्याकडे मागणी केली. याप्रसंगी नगरसेवक सुधाकर बडगूजर यांनी उद्यान विभाग कामचुकारपणा करत असल्याचा आरोप केला, तर नगरसेविका वंदना बिरारी यांनी प्रभाग ५२ च्या काही भागात रात्री येणा-या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा असे कळकळिणे सांगितले. तसेच प्रभागातील रहिवाश्यांसमोर मलाच राजीनामा देण्याची वेळ आणू नका असे सांगितले.

नविन नाशिक सिडकोतील प्रभाग कुंभमेळ्याचे कारण देत अनेक अधिकारी व कर्मचारी नगरसेवकांना सांगत होते. यामुळे अनेक ठिकाणी नागरीकांना असलेल्या त्रासाकडे लक्ष देण्यात दोन महिन्यांपासून महापालीकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना वेळ मिळाला नाही. महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या प्रभाग बैठकित मात्र सर्वच नगरसेवक संतप्त होत कुंभमेळा संपला आहे, आता नागरी सुविधांकडे लक्ष द्या अशी एकमुखी मागणी सभापती सौ. पाटील यांच्याकडे केली. नगरसेवक बडगूजर यांनी सावतानगरच्या अक्षय चौकात वृक्ष उन्मळून पडल्यावर उद्यान विभागातील अधिका-यांना कळवून देखील वृक्ष हटविला नसल्याचा आरोप केला. तसेच वंदना बिरारी यांनी प्रभाग ५२ मधिल काही भागातील रहिवाश्यांना रात्री एकवाजेला पाणी भरावे लागत असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग ५२ मध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, अन्यथा रहिवाश्यांच्या रोषाला स्थानिक नगरसेवक म्हणून बळी पडत राजीनामा द्यावा लागेल असा संतप्त सवाल नगरसेविका बिरारी यांनी उपस्थित केला. सभापती सौ. पाटील यांनी सदस्यांच्या तक्रारींकडे अधिका-यांनी तत्काळ दखल घेण्याबाबत सुचना केल्या. याप्रसंगी नगरसेवक अरविंद शेळके, उत्तम दौंदे, सुर्वणा मटाले, आश्विनी बोरस्ते, रत्नमाला राणे, शोभा फडोळ, कल्पना चुंभळे यांसह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्रातून गणेशमूर्तींचे संकलन

$
0
0

शिव समर्थ मंडळाचा सोमेश्वर परिसरात उप्रकम

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूररोडवरील शिव समर्थ कला व क्रीडा मंडळाच्या वतीने सोमेश्वरच्या गोदावरी नदीच्या पात्रात तिसऱ्या व पाचव्या दिवशी विर्सजित करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्ती संकलन करण्यात आल्या. शिव समर्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोदापात्रातून शेकडो मूर्तीवर काढल्या आहेत.

शिव समर्थ मंडळाच्या वतीने तीन वर्षांपासून भाविकांना गोदापात्रात गणपतीच्या मूर्ती टाकू नये, असे आवाहन केले जात आहे. तसेच अधिकाधिक गणेश मंडळांनी आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देतांना आरती झाल्यावर पाण्यातून बुडवत दान करण्याचेही आवाहन शिव समर्थ मंडळाच्या वतीने करण्यात येते. दरम्यान तीन व पाच दिवसांचे गणपतींचे विर्सजन अनेकांनी सोमेश्वरच्या गोदापात्रात करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विलास शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत गोदापात्रातून गणपतीच्या शेकडो मूर्ती वर काढल्या. या मूर्ती महापालिकेच्या ताब्यात देणार असल्याचे शिंदे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले.

गोदावरी नदीपरिसराची पहाणी

घराघरात मोठ्या उत्साहाने विराजमान झालेल्या गणारायाला रविवारी (दि. २७) निरोप दिला जाणार आहे. सोमेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावर गणेश विर्सजनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमिवर सातपूर विभागाच्या वतीने पहाणी दौरा करण्यात आला. यात सभापती उषा शेळके, नगरसेवक विलास शिंदे, विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर काळे यांच्यासह महापालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. याप्रसंगी पोलिस निरिक्षक काळे यांनी गोदाकाठी बॅरिकेडींग करण्याबाबत सूचना केली. सोमेश्वर व गोदावरी नदीपात्राजवळ स्टाँल लावून भाविकांना गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे नगरसेवक शिंदे यांनी सांगितले.

आठवडे बाजार शनिवारी

देवळाली कॅम्प : देवळालीत दर रविवारी भरणारा आठवडे बाजार यंदा रविवारी (दि. २७) आलेल्या अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जनामुळे शनिवार (दि. २६) भरणार आहे. या मार्गावर मिरवणुकांची दिवसभर ये-जा करतील म्हणून निर्णयात बदल करण्यात आला असल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने जाहीर केले आहे. भाजी, फळविक्रेते व देवळालीवासियांनी रविवार ऐवजी शनिवारी आठवडे बाजारात येण्याचे आवाहन देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिझनेस बँकेत गैरव्यवहार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या बिझनेस बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, कोणीही संचालक दोषी नाही. गुरुवारच्या (दि. २४) १९ व्या वार्षिक सभेत सभासदांना सत्य सांगणार असल्याची माहिती अध्यक्ष वसंत नगरकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

अजगर खान यांच्या ५० लाखांच्या कथित एफडी घोटाळाप्रकरणी पोलिसांनी न्यायालयाचे सर्च वॉरंट घेऊन बँकेची झडती घेतली. त्याबाबत नगरकर म्हणाले, की योग्य कागदपत्रे सादर केल्यानेच कोर्टाने संचालकांना जामीन दिला आहे. तपासासाठी आम्ही सर्व सहकार्य करत आहोत. बँकेचे ६१ लाख रुपये डुबवणारे, बॅंकेत खोट्या नावाने खाती उघडून फसवणूक करणारे बॅँकेची बदनामी करत आहेत. खान यांचा निवडणूकीत अर्ज बाद झाल्यामुळे ते आता बदला घेत आहेत. कर्मचाऱ्यांच्या चुकीबद्दल संचालकांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही असा कोर्टाचा निकाल आहे. सचोटीमुळेच 'ड' मधून 'अ' वर्गात जाणाऱ्या बँकेने केवळ १८ वर्षात ४० कोटीची मालमत्ता उभी केली आहे. बँकेचा एनपीए शून्य आहे. साडेपाच हजार सभासद व ११६ कोटीच्या ठेवी असून निव्वळ नफा एक कोटी ४० लाख आहे. बँकेची परिस्थिती भक्कम असल्यानेच सभासदांचा विश्वास कायम आहे, असेही नगरकर यांनी सांगितले. उपाध्यक्ष संजय सुराणा, नेमीचंद कोचर, विजय संकलेचा, अशोक तापडीया, राजश्री कपोते, आशा जाजू, मिलिंद दंडे आदी संचालकांनीही बँकेची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्या अडकला पिंजऱ्यात

$
0
0

महिरावणी परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा सुस्कारा

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महिरावणी शिवारात अनेक महिन्यांपासून बिबट्या रात्रीच्यावेळी वावर होता. यासाठी वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर बुधवारी पहाटे अडकला. बिबट्याला पकडण्यात यश आल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.

महिरावणी परिसरात बिबट्याची दहशत अनेक शेतकऱ्यांनी अनुभवली होती. यात चार शेतकऱ्यांच्या गायी व वासरूंना बिबट्याने जखमीही केले होते. बिबट्या दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने महिरावणीकरांनी वन विभागाकडे परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी केली होती. परंतु, वनविभागाकडे पिंजराच नसल्याने गावकऱ्यांमध्ये बिबट्याविषयी भीतीचे वातावरण होते. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'दारात आला बिबट्या, वनविभागाकडे नाही पिंजरा', अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर वनविभागाने महिरावणीच्या लोणे वस्तीत तत्काळ पिंजरा बसविला होता. मात्र, नंतरची काही महिने बिबट्याने दुसरीकडे धूम ठोकली. त्यामुळे पिंजरा रिकामाच राहिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. परंतु, पुन्हा काही दिवसांपूर्वी बिबट्याला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पाहिले असल्याचे मनसेचे ना‌शिक तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी वनविभागाला माहिती दिली होती. माहिती दिल्यानुसार वनविभागाने दोन दिवसांपूर्वीच पिंजऱ्यात शेळी उभी केली होती. दरम्यान बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शेळीला फस्त करण्यासाठी बिबट्याने पिंजऱ्यामध्ये प्रवेश करताच जोर-जोरात डरकाळी फोडायला सुरुवात केली. यानंतर लोणे वस्तीतील शेतकरी जागे झाले. रमेश खांडबहाले यांच्याच माध्यमातून पुन्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. यावेळी वनविभागाचे अधिकारी जी. एस. वाघ, तुपलोंढे व देवरे यांनी बिबट्याला ताब्यात घेतले आहे. बिबट्याला जव्हारच्या जंगलात सोडणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेच्या मानधनातून एलईडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मनसेच्या नगरसेविका संगीता गायकवाड महापालिकेकडून मिळणाऱ्या आपल्या मानधनातून नाशिकरोडच्या प्रभाग ५९ मध्ये डिसेंबरअखेर शंभर एलईडी दिवे लावणार आहेत. यामध्ये गुरुवारी (दि. २४) पहिल्या टप्प्यात ३० दिवे लावून या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.

मुक्तीधाम, तरणतलाव, आनंदनगर, शाळा क्रमांक १२५ चा जॉ‌गिंग ट्रॅक आदी परिसरात हे एलईडी बसवले जातील. ५०, ७० आणि १०० वॅटचे हे दिवे असतील. या उपक्रमाला शिखर प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड यांनी दिली. प्रभागातील जुन्या खांबावरील दिवे काढून अंधार असलेल्या भागात नवीन एलईडी लावण्यात येणार आहेत. पाच महिन्यात संपूर्ण प्रभाग अंधारमुक्त करण्याचे नियोजन असल्याची माहिती संगीता गायकवाड यांनी दिली. एका एलईडीची किंमत साडेतीन हजारापर्यंत आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कार्यकारी अभियंता एस. पी. बनकर यांच्याकडे एलईडी दिवे लावण्याची परवानगी देण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीची वाटचाल एज्युकेशन हबकडे

$
0
0

Vinod.patil@timesgroup.com

नाशिक : स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या नाशिकला शैक्षणिक सुविधांचाही निकष पूर्ण करावा लागणार आहे. मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा प्रवास करणारऱ्या नाशिकने अगोदरच एज्युकेशन हबकडे प्रवास सुरू केला आहे. नाशिक आरोग्य व मुक्त विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थाच्या शाळा तसेच व्यवस्थापन, अभियांत्रिकी, माहिती व तंत्रज्ञान आदी विषयांवर शिक्षण देणाऱ्या नामांकित संस्था शहरात स्थिरावल्या असून, संभाव्य शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. विविध प्रकारचे शिक्षण घेऊन दरवर्षी सव्वा दोन लाख विद्यार्थ्यी नाशिकबाहेर पडत आहेत. विविध प्रकारचे शिक्षण एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने व विविध प्रांतातील विद्यार्थ्यांचा ओढा नाशिककडे वळत असल्याने मुंबई-पुण्यापाठोपाठ हे महानगर शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे.

शिक्षण हा विकासाचा केंद्रबिंदू मानला जातो. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, उद्योग, अभियांत्रिकी, जैव तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, अवकाश व हवामानशास्त्र, संरक्षण शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, व्यवस्थापन शास्त्र, साहित्य, संगीत, कला यांच्या विकासाचा पाया हा शिक्षणातून रचला जातो. त्यामुळे जिथे शिक्षणाचा पाया भक्कम असेल अशा शहरांचा विकास झपाट्याने होण्यास मदत होते. मुंबई-पुणे या दोन शहरांच्या विकासात शैक्षणिक सुविधांचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच झपाट्याने ही शहरे विकासाच्या वाटेवर धावू शकली. नाशिक शहर हे सुवर्ण त्रिकोणातील एक शहर आहे. मुंबई, पुण्यानंतर शैक्षणिक नगरी म्हणून नाशिकची नवी ओळख आता निर्माण झाली आहे. कृषी, उद्योग, आयटी क्षेत्र, वाईन हब, चित्रपट नगरी आणि अनुकूल हवामानामुळे नाशिकमध्ये शैक्षणिक संस्थाचे एक मोठे जाळेच निर्माण झाले आहे.

शहराच्या नागरिकीकरणाचा वेगही प्रचंड आहे. त्यामुळे नाशिक व नाशिक जिल्ह्याचा परिसर यांचा विचार करता गेल्या काही वर्षात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्यात्मक वाढ मोठी झालेली आहे. विशेषत: व्यवस्थापन शास्त्र व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संख्येत झालेली वाढ लक्षणीय आहे. पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वाहतूक अभियांत्रिकी, वाईन टेक्नोलॉजी या क्षेत्रांचे अभ्यासक्रम नाशिकमध्ये सुरू झाले आहेत. त्यामुळे कधीकाळी मंदिरांचे शहर व धार्मिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने शैक्षणिक नगरी अशी आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

आधुनिकतेच्या प्रवाहात नाशिक जिल्ह्यातही शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाचे स्वरुप पूर्णपणे पालटले आहे. मराठीसोबतच इंग्रजी माध्यमांतील 'सीबीएसई' आणि 'आयसीएसई' मंडळाच्या शाळांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांमार्फत ज्ञानदानाच्या प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे मराठी व अन्य मंडळांच्या शाळांनी देखील आपला शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महाविद्यालयीन व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचे जाळे गतीने विस्तारले. त्यामुळे नाशिकमधून मुंबई-पुणेकडे शिक्षणासाठी जाणारा ओढा आता पूर्ण कमी झाला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन, विधी, वाणिज्य, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, वाइन, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या संस्थाचा समावेश आहे. एकाच ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या या पर्यायांमुळे बाहेरील विद्यार्थ्यी आता ज्ञानार्जनासाठी नाशिकमध्ये येत आहे.

इंटरनॅशनल स्कूल

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल, नाशिक केंब्रीज स्कूल, डॉन बॉस्को, अशोका युनिव्हर्सल स्कूल, अशोका इंटरनॅशनल स्कूल, इस्पीलियर स्कूल, फ्रावशी अॅकॅडमी, सिम्बायोसिस स्कूल, विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, बार्नस् स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, न्यू इरा स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल, किलबिल शाळा, सिल्व्हर ओक स्कूल, बॉईज टाऊन, सेंट झेवियर्स, सेंट फिलोमिना, होरायझन अॅकॅडमी यासारख्या शाळांमार्फत शहरामध्ये आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई तसेच आयबी अशा बोर्डांशी संलग्न अभ्यासक्रम शिकविले जातात. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होत असून, या शाळांमुळे नाशिकचे विद्यार्थी जगभर पोहचले आहेत.

शिक्षणावर प्रभाव

नाशिकमध्ये पिढ्यानपिढ्या शिक्षण देत असलेल्या पेठे विद्यालय, भोसला मिल‌िटरी, स्कूल सारडा कन्या शाळा, रुंग्ठा विद्यालय, आदर्श शाळा, श्रीराम विद्यालय, शिवाजी विद्यालय, जनता विद्यालय, मराठा हायस्कूल, निर्मला कॉनव्हेंट यासारख्या शाळांनी आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे. नव्या शिक्षण पध्दतीशी जुळवून घेत अनेक शैक्षणिक उपक्रम नव्याने सुरू केले आहेत. शिक्षकांना ट्रेनिंग देण्यापासून ते विविध संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान देण्याचा प्रयत्न या शाळांमार्फत सुरू आहे. त्यामुळेच इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावातही या शाळांची क्रेज आजही कायम असून, शिक्षण क्षेत्रावर या शाळांचा प्रभाव आहे.

दोन विद्यापीठ

'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ', 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' आणि पुणे विद्यापीठाचे 'नाशिक कॅम्पस' यांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासात मोठी भर पडली आहे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून अनेकांना दूरस्थ शिक्षणाची संधी मिळत आहे. डबेवाला, घरकामगार, सलून व्यावसायिक, ड्रायव्हर्स यासारख्या शिक्षणापासून वंचित घटकातील नागरिकांनाही शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मेडिकलच्या मुख्य अभ्यासक्रमाबरोबरच पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या सर्व दिशा खुल्या केल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसच्या माध्यमातूनही विद्यापीठाइतकेच एक सक्षम कॅम्पस लवकरच नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे. स्टुडंट फॅसिलीटी सेंटर, ई लायब्ररी यासह अनेक सुविधांनी सज्ज अशा या कॅम्पसमुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.

या संस्थाचा मोलाटा वाटा

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ

नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज

नाशिक एज्युकेशन सोसायटी

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था

आदिवासी विकास सेवा समिती

महात्मा गांधी विद्यामंदिर

गोखले एज्युकेशन सोसायटी

के. के. वाघ शिक्षण संस्था

ग्रामोदय शिक्षण संस्था

रयत शिक्षण संस्था

मध्यवर्ती हिंदू सैनिकी संस्था

मनपा शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनविरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'समीर गायकवाड मागील मास्टर माईंडला अटक झालीच पाह‌िजे, धर्मवाद हो बरबाद, फुले शाहू आंबेडकर आम्ही सर्व दाभोळकर' यांसारख्या घोषणा देत लोकशाही हक्क संरक्षण समितीने सीबीएस जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन केले. सनातन संस्थेवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

सनातन संस्थेची कार्यपध्दती राज्य घटनेला आव्हान देणारी आहे. अॅड. गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सनातन संस्था गायकवाडच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. संघटनेकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून, त्याचा आम्ही निषेध करतो असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. धर्माच्या नावाखाली तरूणांना फसविणाऱ्या संघटनांपासून विद्यार्थ्यांनी व युवकांनी सावध रहावे, असे आवाहन कॉ. श्रीधर देशपांडे, राजू देसले, संदीप भावसार, शांताराम चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अळ्यांचे जेवण, धमक्या अन् छळ

$
0
0

नर्सिंगच्या विद्यार्थिनींची करुण व्यथा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झुरळ, अळी असलेले जेवण... तुम्हाला नापास करु... आजारी असतानाही नर्सिंगची ड्युटी... गेटबाहेर जाण्यास मज्जाव... मानसिक छळ... आजारी असताना उपचाराचीही वानवा... ही सारी व्यथा आहे सरकारी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींची. सुप्रिया माळी या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी त्यांच्यातील घुसमट व्यक्त केली आणि नर्सिंग कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाचा कारभारही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

सुप्रियाच्या मृत्यूने नर्सिंग कॉलेजच्या सर्वच विद्यार्थिनी हादरल्या असून, आपण आता काही बोललो नाही तर कदाचित आपल्यालाही आपला जीव गमवावा लागेल, अशी तीव्र भावना त्यांच्यात आहे. सुप्रियाच्या निधनानंतर झालेला उद्रेक पाहून अखेर कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन हादरले आहे.

आजारी विद्यार्थिनींना इमर्जन्सी, आयसीयु आणि स्वतंत्र कक्षात युद्धपातळीवर उपचार सुरु केले आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास रिपाइ, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह महिला व पुरुष पोलिसांच्या ताफ्याने येवून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच विद्यार्थिनींचे जबाबही नोंदवून घेतले. तर, आरोग्य उपसंचालक बी डी पवार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

विद्यार्थिनींच्या तक्रारी

जेवणाबद्दलची कुठलीही तक्रार ऐकून घेतली जात नाही

खायचे तर खा नाही तर तुम्हीच मेस चालवा

तुम्ही सायको आहात, असे मॅट्रनकडून बोलले जाते

कुणीही फोनवर किंवा मोबाईलवर बोलायचे नाही

अपमानास्पद शब्द वापरुन खच्चीकरण

कुठलीही कामे करुन घेतली जातात

आमचे फोटो काढले जातात

गेल्या १५-२० दिवसांपासून मी आजारी आहे. येथे केवळ थातूर मातूर उपचार करुन कुठलेही निदान करण्यात आले नाही. मी नंदूरबारला माझ्या गावी गेले. तेथे आईने दवाखान्यात नेले. रक्त तपासले आणि हिमोग्लोबिन कमी असण्यासह टायफॉईड झाल्याचे निदान झाले. त्यानंतर मी इथे आले पण अद्यापही योग्य उपचार मिळालेले नाहीत.

- आजारी विद्यार्थिनी

आम्हाला हा सर्व प्रकार कळताच आम्ही येथे आलो. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी एकेकट्याने संवाद साधत त्यांचे जबाब नोंदविले आहेत. योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- अविनाश बारगळ,

‍पोलिस उपायुक्त

नर्सिंग कॉलेजमधील हा सारा प्रकार अतिशय चिंताजनक आणि निंदा करण्यासारखा आहे. सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थिनींना मनमोकळे वातावरण मिळायला हवे.

- अर्जुन टिळे,

माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा छळ करणे आणि त्या आजारी असल्या तरी त्यांच्यावर उपचार न करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे. सुप्रियाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम न करता कुटुंबियांना मृतदेह देण्यात आला. राज्य सरकारने या साऱ्या प्रकरणातील दोषींना निलंबित करावे. विद्यार्थिनींना पोषक वातावरण मिळणे अत्यावश्यक आहे.

- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images