Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनपाचा आर्थिक डोलारा कोसळतोय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने एलबीटी धोरणात बदल केल्याचा फटका महापालिकेला चांगलाच बसला असून, थेट विकास कामांवर त्याचा परिणाम सुरू झाला आहे. एलबीटी बदलामुळे मिळणाऱ्या अनुदान आणखी मोठी कपात पुढील पाच महिन्यात होणार आहे. त्यामुळे पुढील काळात जपूनच बिले काढा असा सतर्कतेचा इशारा एलबीटी विभागाने लेखा विभागाला दिला आहे. पुढील पाच महिन्यात वेतनासह विकासकामांसाठी केवळ २२० कोटीच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक वाट बिकट बनली आहे.

ऑगस्टपासून एलबीटी धोरणात बदल होऊन ५० कोटीच्या वर उलाढाल असलेल्या उद्योग व व्यापाऱ्यांनाच एलबीटी लागू झाली आहे. त्यामुळे पालिकेला त्याचा मोठा आर्थिक झटका बसला आहे. राज्य सरकारने वर्षभरात ७५१ कोटी उत्पन्न गृहीत धरले आहे. एलबीटी पोटी महापालिकेला राज्य सरकारने तीन महिन्याचे १३७ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत हा आकडा ५३१ कोटीपर्यंत पोहचला आहे. त्यातच एलबीटीचे ५० कोटीवरील कंपन्याचे उत्पन्न हे ३५ कोटी झाले आहे. त्यामुळे महापालिकेकडून महिन्याला मिळणारे ४६ कोटी अनुदान हे थेट आता २० कोटीच्या खाली येणार आहे. त्यामुळे उर्वरीत काळात पाच महिन्यात केवळ १०० कोटीच राज्य सरकारकडून मिळणार आहे. एलबीटीकडून केवळ १२० कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे उर्वरीत पाच महिण्याचा काळात पालिकेला २२० कोटी रुपयातच आर्थिक व्यवहार करावे लागणार आहे.

महापालिकेला वेतनासह आर्थिक डोलारा चालविण्याचा महिन्याचा खर्चच सरासरी ३५ ते ४० कोटी आहे. त्यामुळे मिळणारा पैसा त्यावरच खर्च होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढताना दमछाक होणार आहे. त्यामुळे एलबीटी विभागाने लेखा विभागाला संभाव‌ित आर्थिक स्थितीची जाणीव करून दिली आहे. 'बिले काढताना जरा सांभाळूनच काढा' असा सतर्कतेचा इशारा एलबीटी विभागाने लेखा विभागाला दिला आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्याचा काळ हा आर्थिकदृष्टया खडतर राहणार आहे.



नवीन कामे थांबणार ?

एलबीटीमुळे आर्थिक डोलारा कोसळल्याने नवीन विकास कामेही थांबणार आहेत. सोबतच जुनी कामेही रखडणार आहेत. जेएनयुआरएम व मुकणेतही महापालिकेला आपला हिस्सा द्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे उत्पन्न घटल्याने निधी नेमका कोणाला द्यावा याचीही प्राधान्यक्रमक ठरवावा लागणार आहे. तर एलबीटीचा मिळणारा निधी हा वेतन व आर्थिक खर्च चालण्यावरच खर्च होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची छोटी-छोटी कामेही होणार नाही. त्यामुळे नगरसेवकांचाही उद्रेक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट फ्रान्सिस शाळेविरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट फ्रान्सिस शाळेने विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेस बसण्यास विरोध केल्याने तसेच त्यांचे ओळखपत्रही जमा करून घेत त्यांना वेठीस धरल्याने संतप्त पालकांनी गुरुवारी शाळेच्या राणेनगर शाखेसमोर जोरदार आंदोलन केले. फी भरली नसल्याने परीक्षा देता येणार नाही, या भूमिकेला पालकांनी येथे विरोध केला.

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा प्रशासन वारंवार विद्यार्थ्यांकडे अतिरिक्त फीची मागणी करीत असून, फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मनाई करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र जप्त करीत फी भरली नाही तर बाथरुममध्ये बसवून पेपर लिहायला लावू, अशा धमक्याही दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेविरोधात आंदोलन केले. यापूर्वीही शाळेने विद्यार्थ्यांचे निकाल न दाखविणे, अतिरिक्त फीची मागणी करणे, शाळेत सुविधा पुरविल्या जात नसतानाही त्यासाठी खर्चाची मागणी करणे अशा अनेक मागण्या केल्या आहेत. यंदाही याच फीची मागणी करीत विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेस बसू देण्यास विरोध करण्यात आला. 'पहिले फी भरा, मगच परीक्षा द्या' अशी भूमिका शाळेनी घेतली आहे. जिल्हा न्यायालयाने शाळेला दिलेल्या निर्णयानुसार कोणतीही अतिरिक्त फी घेण्याचा अधिकार शाळा प्रशासनाला नाही. तरीदेखील शाळा अशाप्रकारचे कृत्य करीत असल्याने शाळेविरोधात बंड पुकारण्यात आले. या प्रकरणामुळे पालकांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये शाळेविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापकांना समज देण्यात आली आहे. महापालिका शिक्षणमंडळ प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनाही पालकांनी याबाबत निवेदन दिले आहे. शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारांगणात साकारणार सायन्स सेंटर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नेहरू तारांगणात आता राजीव गांधी सायन्स सेंटर साकारणार आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जाणार असून, केंद्र सरकारकडून यासाठी दोन कोटी रुपये मिळणार आहेत. तारांगणातच सायन्स सेंटर होणार असल्याने मुलांना अंतराळातील माहितीसोबतच विज्ञानाशी निगडीत प्रयोग एकाच ठिकाणी पाहता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

नाशिकमध्ये राजीव गांधी सायन्स सेंटर उभारण्यासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटीला परवानगी मिळाली आहे. यासाठी दोन कोटीचे अनुदान केंद्राकडून मिळणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग या केंद्रात दाखविले जाणार आहेत. मात्र हे केंद्र उभारले तरी, त्याच्या देखभालीचा खर्च मोठा राहणार आहे. त्यामुळे एज्युकेशन संस्थेच्या वतीने यात महापालिकेला सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तारांगण सुरू ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून, नवनवीन युक्त्या लढवल्या जात आहेत. वाढदिवसावर होणारा खर्च तारांगणाला देण्याचा प्रस्ताव यातूनच पुढे आला आहे.

महापालिका उचलणारा वाटा

संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला आहे. सोनवणे यांनी संस्थेचा प्रस्ताव तत्वतः मान्य केला आहे. महापालिका यात पन्नास लाखाचा वाटाही उचलणार आहे. नेहरू तारांगणातील रिकाम्या जागेवरच हे सेंटर्स उभारले जाण्यावर विचार सुरू आहे. दोन्ही प्रकल्प एकाच ठिकाणी झाल्यास मुलांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सोनवणे यांनी यात पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीईटी, नेट परीक्षा एकाच दिवशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अधिव्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेची तारीख पूर्वीच जाहीर झाली असताना याच दिवशी आता टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पार पडणार आहे. या दोन्हीही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना एकाच पर्यायाची निवड करावी लागणार आहे. ही गैरसोय लक्षात घेता टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

२७ डिसेंबर टीईटी व नेट या दोन्हीही परीक्षा पार पडणार आहे. या दोन्हीही परीक्षांसाठी शहरात परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. एकेका उमेदवाराने या दोन्हीही परीक्षांसाठी अर्ज केला आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी टीईटी पुढे ढकलावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. निवेदनावर प्रा. किशोर जगताप, प्रा. रूपाली पाटील, प्रा. सोनल जाधव, प्रा.ऋषी घरटे, प्रा.प्रियंका सोनवणे, भूषण दाभाडे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी आठ पक्षी धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतातील पाणथळ आणि गवती प्रदेशामधील आणखी आठ पक्षी धोकादायक स्थितीत आल्याची माहिती समोर आली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील पक्षांच्या एकूण १८० प्रजाती धोक्यात आल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. यात नांदूरमध्यमेश्वर परिसरातील दोन पक्षांच्या प्रजातींचा समावेश आहे.

आययूसीएनच्यावतीने दरवर्षी जगभरातील पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा अहवाल आययूसीएनने जाहीर केला आहे. त्यानुसार भारतातील एकूण १८० पक्षांच्या प्रजाती धोक्यात आल्याचे (रेड लिस्ट) म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी हीच संख्या १७३ एवढी होती. मात्र, युरोपियन रोलर ही प्रजाती धोकादायक अवस्थेतून बाहेर आल्याची सुखद बाबही या अहवालाने समोर आणली आहे.

भारतातील नॉर्दन लॅपविंग, रेड नॉट, कर्ल्यू सँडपायपर, युरॅशिअन ऑयस्टरकेचर, कॉमन पोचर्ड (रक्च चंचू बदक) आणि बारटेल्ड गोडविट (छोटा पट्टेरी पाणतीवळा) या पक्ष्यांच्या प्रजाती धोकादायक अवस्थेत आल्या आहेत. पाणथळ आणि गवताळ प्रदेशात होणारे अतिक्रमण, मानवी हस्तक्षेप, विकासाच्या नावाखाली होणारे विविध प्रकल्प, व्यावसायिक कारणांसाठी होणारा वापर अशा विविध कारणांमुळे पक्षांना त्यांच्या अस्तित्वाशी झगडावे लागत असल्याचे बीएनएचएसचे सहसंचालक अतुल साठे यांनी सांगितले.

दरम्यान, आययूसीएनच्या यंदाच्या रेड लिस्टमध्ये जगातील ४० पक्षांच्या प्रजातींचा समावेश आहे. त्यात गिधाडांचा प्रामुख्याने प्रजाती आहेत.

सातत्याने धोकादायक पक्षांची यादी वाढत आहे. पक्षी संवर्धनासाठी होणारे प्रयत्न हे ठोस नसल्याचेही यातून दिसत आहे. विकासाच्या अजेंड्यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. - डॉ. दीपक आपटे, संचालक, बीएनएचएस

गेल्या फेब्रुवारीमध्ये रक्त चंचू बदक आणि छोटा पट्टेरी पाणतीवळा हे दोन्ही पक्षी दिसले होते. या दोन्ही पक्ष्यांचे धोक्यात येणे ही चिंताजनक बाब आहे. पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना अत्यावश्यक आहेत. - दत्ता उगावकर, पक्षी तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लासलगाव येथील सुमननगर परिसरात राहणाऱ्या अंजली सागर गायकवाड (वय २२) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या पतीसह सासू सासऱ्यांना ताब्यात घेत लासलगाव पोलिसांनी त्यांच्याविरोधात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी विवाहितेच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आंदोलन केले.

धुळे येथील आझादनगर येथील सासर असलेल्या अंजलीचा जून २०१५ मध्ये विवाह झाला होता. हुंडा नको फक्त लग्न करा, असा सासरच्यांनी आग्रह धरल्याने अंजलीच्या वडिलांनी अडीच लाख रुपये खर्च करून थाटामाटात विवाह केला. मात्र, विवाहानंतर लागलीच पैशांची मागणी होऊ लागली. एकदा पन्नास हजार रुपये दिले. मात्र, तरीही तिचा छळ संपला नाही, अशी कैफियत अंजलीचे वडील भोलेनाथ शिंदे आणि आई लता शिंदे यांनी मांडली. बुधवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अंजली मृतावस्थेत आढळून आली. तिच्या पतीने व सासू सासऱ्यांनी तिला निफाड येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे पोलिसांनी एका नर्सला पंच म्हणून घेतले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास सासरच्यांनी शिंदे यांना कॉल केला. तुमची मुलगी जिन्यावरून पडली असून, त्यात गंभीर जखमी झाली. तुम्ही ताबोडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या असे सांगितले. नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सर्वांना संशय आला. सागर शिंदेसह त्याच्या आईवडिलांना अटक करीत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. पीएसआय दीपक आवारे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्येच तक्रार दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन होऊ दिले. प्रथमदर्शनी अंजलीने आत्महत्या केल्याचे दिसून येत असून त्यानुसार सागरसह त्याच्या आईवडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट दुरुस्तीला ‘अच्छे दिन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरोघरी मी अडगळीत पडलेलो. महिनोनमहिने माझ्यावरील धूळही पुसली गेली नाही. मला खरेदी केल्यानंतर काही दिवसच हौसेने डोक्यावर मिरवले गेले. नव्याची नवलाई सरली अन् मी नकोसा झालो. तेव्हापासून घरातील माळ्यावर निपचित पडून होता. परंतु, आता एकाएकी मला पुन्हा 'सोनियाचे दिन' आले आहेत. माझ्या दुरुस्तीसाठी कोण घाई सुरू आहे. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नसली तरी आरटीओच्या धास्तीने का होईना माझी किंमत कळतेय हेच पुष्कळ. अशा अडगळीत पडलेल्या अन दुरुस्तीसाठी आलेल्या हेल्मेटसचेच हे कथन. हेल्मेट्स दुरुस्तीसाठी व्यावसा‌यिकांकडे मोठी गर्दी होत असून, नागरिकांना अक्षरश: १५ दिवस वाट पहावी लागत आहे. या कारवाईच्या निमित्ताने व्यावसायिकांनाही अच्छे दिन आले आहेत. जीवनसंरक्षक साधन असूनही अडगळीत पडलेल्या हेल्मेटसचा सध्या घरोघरी शोध सुरू आहे. महिनोनमहिन्यांत त्यावर साचलेली धूळ पुसली जात आहे. एक वेळ अशी होती की हेल्मेटचा तुटलेला बेल्ट बदलणेही नकोसे वाटत होते. आता तोच बेल्ट त्वरेने दुरुस्त करून हेल्मेट द्या यासाठी ग्राहकांकडून व्यावसायिकांकडे आग्रह धरला जात आहे. हेल्मेट दुरुस्तीच्या दुकानांमध्ये शब्दश: हेल्मेटची गर्दी वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या परिपत्रकाच्या आधारे प्रादेशिक प‌रिवहन विभागाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे हेल्मेट विक्रेते आणि ते दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. अपघातात हेल्मेटअभावी डोक्याला इजा होते. त्यामध्येच अनेकदा संबंधित वाहनस्वार गतप्राणही होतो. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराबाबतची उदासीनता हे त्यामागील मुख्य कारण आहे. हेच पटवून देण्यासाठी आरटीओचे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. कारवाईच्या धाकाने का होईना पण, वाहनधारकांनी हेल्मेट खरेदीला आणि दुरुस्तीला महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवरील आरटीओ कार्यालयात जाऊन हेल्मेट वापराबाबतचे समुपदेशन ऐकण्यापेक्षा अडगळीत पडलेले हेल्मेट काढून ते वापरलेले बरे असे वाहनधारकांना वाटू लागले आहे.

महिनोनमहिने धूळखात पडलेले हे हेल्मेटस खराब झाल्याने ते दुरुस्तीसाठी वाहनधारक आता व्यावसा‌यिकांकडे धाव घेऊ लागले आहेत. हेल्मेटचा बेल्ट, बटन, रबरिंग खराब होणे, काच फुटणे, कुशन बदलणे यासारख्या कामांसाठी व्यावसायिकांकडे ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

किरकोळ स्वरुपाची कामे दोन तीन दिवसात केली जात असली तरी कुशन बदलण्यासारख्या वेळखाऊ कामासाठी ग्राहकांना तब्बल १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचाही व्यावसायिकांना तुटवडा भासत असून, असे भाग मागवित आहोत, अशी माहिती व्यावसायिकांकडून केली जात आहे.

हेल्मेट खरेदीसाठी ५०० ते १५०० रुपये खर्च करण्यापेक्षा २०० ते ३०० रुपयांत हेल्मेट दुरुस्त होते. म्हणूनच दुरुस्तीसाठी येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. इतरवेळी साधारणत: दररोज १५ ते २० हेल्मेटस दुरुस्तीसाठी येत असत. परंतु, आरटीओची मोहीम सुरू झाल्यापासून दररोज सरासरी १०० ते १५० हेल्मेटस दुरुस्तीसाठी येत आहेत. - किरण सोनवणे, व्यावसायिक, एन. डी. पटेलरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा ऑपरेटरच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवेक अहिरे या केबल ऑपरेटरने 'सुसाईड नोट'मध्ये गंभीर आरोप केलेत खरे मात्र, पोलिसांकडे वेगळीच नोंद असल्याने केबल व्यवसायची दिशा कोणत्या दिशेला चालली असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. डिजिटायझेशन होताच केबल व्यावसायिकांची चलती बंद झाली. त्यातच खासगी डीटीएच ऑपरेटरने केबल व्यवसायातील अर्थकारणावर अल्पविराम लावला. यातून लोकल केबल ऑपरेटर आणि मल्टी केबल ऑपरेटर यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

विकी केबल नेटवर्क चालवणाऱ्या विकी अहिरे या युवकाने २७ ऑक्टोबररोजी वडाळा नाका परिसरातील डेन डिस्कव्हरी प्रा. लिमिटेड या कंपनी कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. अहिरेने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याला मानसिक त्रास दिला गेला असल्याचा उल्लेख असून, चार व्यक्तींची नावे यात आहेत. याप्रकरणी पोलिस 'सावध' भूमिका घेत असतानाच आपण चुकून विष प्राशन केले यात केबल कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचा जबाब अहिरेने पोलिसांकडे दिला. विरोधाभास असलेले चित्र यातून समोर आले असून, केबल कंपनीशी संबंधित असलेल्या नगरसेवक सतीश सोनवणे यांनी अहिरेंचा दावा फेटाळून लावला.

आमच्याकडे ३५० पेक्षा अधिक केबल ऑपरेटर्स आहेत. त्यातील ३५ ते ४० केबल ऑपरेटर्सकडे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. या थकबाकीसाठी कार्यालयातील कर्मचारी तगादा करीत असतात. थकबाकीचा आकडा वाढत चालल्याने व्यवसाय हाताळतांना नाकीनऊ येत आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अहिरेकडे साडेसहा लाख रुपये थकबाकी आहे. याबाबत त्यालाही विचारणा झाली असेल. काही थकबाकीदार केबल ऑपरेटर्स या घटनेला हवा देण्याचा प्रयत्न करीत असून, कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अहिरेने मात्र स्वतःच यात डेन कंपनीचा कोणताही सहभाग नसल्याचे पोलिसांना सांगितले.



डिजिटायझेशनमुळे गफलत

केबल व्यवसायाला डिजिटल स्वरूप प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक केबल ग्राहकाची नोंद सरकार दरबारी होते. यात, केबल ऑपरेटरसह कंपन्यांनाही हस्तक्षेप करण्यास जागा उरलेली नाही. यामुळे अनेकदा अतिरिक्त पैशांसाठी प्रयत्न करणाऱ्यांची पंचाईत होते. विवेक अहिरेच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर डेन केबल कंपनीवर अनेक गंभीर आरोप झाले. यात, केबल ऑपरेटरकडून पैसे घेऊन रिसीट दिली जात नसल्याचा आरोप आहे. यामुळे केबल ऑपरेटरवर प्रमाणापेक्षा जास्त थकबाकी दिसते. तसेच सेवा बंद होण्याच्या भीतीने ऑपरेटर काहीही बोलत नाही. या आरोपांना उत्तर देताना सोनवणे यांनी स्पष्ट केले की, असा कोणताही गैरव्यवहार अद्यापपर्यंत झालेला नाही. केबल ऑपरेटर्सची संख्या मोठी आहे. रिसीट मिळाली नसती तर हा व्यवसायच ठप्प झाला असता. ग्राहकांकडून पैसे घेऊनही ते कंपनीकडे जमा न करणारे काही ऑपरेटर्स सैरभैर झाले असून, त्यातून ते चुकीचे आरोप करीत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वरण-भाताचीही भ्रांत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभरात डाळींची साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करूनही डाळींचे दर उतरायला तयार नाहीत. मोठ्या प्रमाणात डाळींचा साठा उपलब्ध असूनही या डाळी बाजारांत आणल्या जात नसल्याने डाळींचे दर काही उतरायला तयार नाहीत. आजही किरकोळ बाजारात डाळींचे दर १८० ते २०० रुपये आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून आता डाळ-भातही गायब होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच सणासुदीचे दिवसांत तूरडाळीच्या किंमती उतरत नसल्याने सर्वसामान्यामध्ये तीव्र संताप आहे.

दुसरीकडे, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या कांद्याची आवक घटल्याने दरात पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली असून, आठवडाभरात उन्हाळ कांद्याच्या दरात सरासरी ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीनंतर मात्र आवकेत वाढ होऊन बाजारभाव कमी होण्याची चिन्हे असली तरी पावसाअभावी पुढील वर्षी कांदा पुन्हा डोळ्यात पाणी आणणार आहे.

ऑगस्टमध्ये कांद्याचे क्विंटलचे दर सहा हजारापलिकडे गेले होते. यामुळे केंद्र सरकारला कांदा आयात करावा लागला. मात्र, सप्टेंबर अखेर लाल कांद्याची आवक होऊ लागल्याने दर घसरून तीन हजारापर्यंत खाली आले. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कांदा आवकेत पुन्हा घट होण्यास सुरुवात झाल्याने भावही वाढू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व पिंपळगाव बसवंत या मोठ्या बाजारपेठांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली आहे. यामुळे क्विंटलमागे सरासरी पाचशे रुपयांनी भाव वाढले आहेत. गुरुवारी अवघी २१२ क्विंटल आवक होऊन सरासरी ३१०० रुपये भाव मिळाला. लाल कांदा किमान १९००, कमाल ३३९५ तर सरासरी ३२०० रुपये दराने विक्री झाला. पिंपळगाव बाजार समितीतही लाल व उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली आहे. उन्हाळ कांद्याची साधारणतः दोनशे ते तीनशे क्विंटल आवक झाली.



डाळींचे सध्याचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ - रु १७० ते २०० मूगडाळ -रु १४० ते १६० चणाडाळ - रु ७० ते ८० उडीदडाळ - रु १३० ते १५० मसूरडाळ - रु १०० ते ११०

सरकारने निर्यातमूल्य कमी केले तर शेतकऱ्यांनाही फायदा होईल. कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी पाण्याअभावी पीक येणे शक्य नाही. उत्पादन घटून कांदा कडाडण्याची शक्यता आहे. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मदिनी ओढ-वला मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

जन्मदिनीच मृत्यू होण्याची घटना तशी दुर्मिळच असते. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर (‌ता. साक्री) येथील प्रगतशील शेतकऱ्याच्या वाट्याला अशी वेळ आली. विशेष म्हणजे ज्या घटकेला त्यांचा जन्म झाला होता तेव्हाच त्यांची प्राणज्योत मालवली.

पिंपळनेर येथील प्रगतशील शेतकरी शेख रुकनोद्दीन कमालोद्दीन यांना कर्करोगावरील उपचारासाठी नाशिकमधील मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शेख हे ६८ वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू पहाटे ५ वाजून १० वाजता झाला. विशेष म्हणजे याच वेळेला त्यांचा ६८ वर्षांपूर्वी जन्म झाला होता. जन्मदिनाची अचूक वेळ व वारही मृत्यूबाबतही अचूक ठरला आहे. शेख रुकनोद्दीन यांचा दफनविधी गुरुवारी सायंकाळी पिंपळनेर या त्यांच्या जन्मगावीच करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, दोन भाऊ, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. मालेगाव परिक्षेत्राचे मोटार परिवहन अधिकारी अयाज शेख यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात कम्युनिटी प्लंबिंग चॅलेंज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेतील प्रसाधनगृहांच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचे धोक्यात येणाऱ्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक स्तरावरील कम्युनिटी प्लंबिंग चॅलेंज ही स्पर्धा येत्या सोमवारपासून (२ नोव्हेंबर) नाशकात होत आहे. मुक्तीधामच्या महापालिका शाळा क्र. १२५ मध्ये २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक प्रसाधनगृहे उभारली जाणार आहेत.

वर्ल्ड स्कील कौन्सिल, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्लंबिंग अँड मेकॅनिकल ऑफिशिअल्स आरएमआयटी युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), वर्ल्ड प्लंबिंग कौन्सिल आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशन यांच्या तर्फे कम्युनिटी प्लंबिंग चॅलेंज ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्याचा उद्देश या स्पर्धेमागे असल्याची माहिती प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिका या चार देशांचे संघ सहभागी होणार आहेत. कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक अशी मुला-मुलींसाठीचे प्रसाधनगृह आणि हात धुण्यासाठीची स्वच्छ जागा तयार करण्याची ही स्पर्धा असल्याचे वर्ल्ड स्किल फाऊंडेशनचे प्रोजेक्ट डेव्हलपर सीन केर्ने म्हणाले. प्रत्येक संघात प्लंबरसह इंजिनीअर, बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती आणि डिझाईनर यांचा समावेश असणार आहे. स्पर्धेसोबत विद्यार्थ्यांना हात धुणे, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, प्रसाधनगृहाचा वापर आदींविषयीची जागृकताही विद्यार्थ्यांमध्ये केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडकोत पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचे हत्यार उपसले असतांनाही गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. महाजननगर भागात शनिवारी रात्री दोन वाहने जाळण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांकडून झाला आहे. एक रिक्षा व दुचाकी जाळण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांनी केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपसातील वादातून वाहने जाळण्याचा प्रयत्न झाला का, याबाबत अंबड पोलिस तपास करत आहेत. रहिवाशांनीही चुकीचे अथवा गुन्हेगारी स्वरुपाचे व्यक्ती आढळ्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका स्टॉल्सचा वाद कोर्टात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अनधिकृतरित्या फटाके विक्रीचे स्टॉल्स उभारले जात असल्याबाबत मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू खाटीक युवा महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत लासुरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पोलिस प्रशासनाने अनधिकृत फटाके स्टॉल्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरात फटाके विक्रीचे दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. अनेक व्यावसायिक फटाके विक्रीबाबतचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे फटाके विक्री करतात. रहिवाशी भागात फटाके विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या जीवा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पोलिस दाद देत नसल्याने लासुरे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी परिसरात अनाधिकृत्यरित्या लावल्या जाणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, फटाक्यांचे साठे तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ज्या परिसरात अनधिकृतरित्या फटाके विक्री होत असेल त्या पोलीस स्टेशनच्या निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, शहराबाहेरील मोकळ्या जागांवर फटाके विक्री करावी, रहिवाशी भागात फटाक्यांची दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त यांना हे निवेदन देण्यात आले आहे. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी याप्रकरणात लक्ष घालून बेकायदेशीर व अनधिकृत फटाका विक्रीची दुकाने लावली जाऊ नयेत असे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले आहेत. तसेच बेकायदेशीर दुकाने काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागले आहे.

शहरातील अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर कारवाई करून नाग‌रिकांच्या जीवीताचे रक्षण करावे अशी आमची मागणी आहे. प्रशासन दाद देत नसल्याने आम्ही फटाके विक्रेत्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. सोमवारी (दि. २) त्यावर सुनावणी होणार आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासनाच या बेकायदा फटाके विक्रीला आळा घालू शकते.

चंद्रकांत लासुरे, याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांची होतेय परवड

$
0
0

अभ्यासासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याची तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पुस्तके अद्याप न मिळाल्याने सध्या विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. काही दिवसांतच येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ रहात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अभ्यासक्रेंद्रावर अनेकदा चकरा मारून त्याचा काही उपयोग होत नसल्याची तक्रारही विद्यार्थी करीत आहेत. अशा परिस्थितीत मुक्त विद्यापीठाचे 'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीद कसे साध्य होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुक्त विद्यापीठाने यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली. त्यामुळे या प्रक्रियाचे लाभ घेत जवळपास ६ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठात वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदवला. मात्र, आता या प्रचंड संख्येत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकच मिळत नसल्याची तक्रार काही अभ्यासकेंद्रांवर करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन मात्र या मूलभूत बाबींकडे लक्ष देण्याचे सोडून विविध कार्यक्रम घेण्यात मश्गुल आहेत. दिवाळीपर्यंत पुस्तके मिळणार, असे आश्वासन विद्यापीठाने दिले असले तरी लगेचच येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

पूर्वी अभ्यासकेंद्रावर पुस्तके देण्यात येण्याच्या प्रोसेसमध्ये आता काही अंशी सुधारणा केली असून, प्रेसमधून पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी, त्यांच्या पत्त्यावर पोहोचविण्यात येतात असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, ग्रामीण भागातील असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत पुस्तकेच पोहोचली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ऑनलाइन प्रवेश करताना संभाव्य धोका ओळखून वेळेच्या आधीच पुस्तके छपाईसाठी देण्याची गरज होती, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत असून, पुस्तके वेळेवर न मिळाल्यास अभ्यास कसा करायचा असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. परीक्षेच्या काळात तरी पुस्तके उपलब्ध व्हावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पत्ते अपडेट नसल्याचा फटका

ऑनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अपडेट पत्ते भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामीण भागातील अनेकांनी पत्ते व्यवस्थित न भरल्याने त्यांची पुस्तके कोणत्या पत्त्यावर पाठवायची असा मोठा प्रश्न मुक्त विद्यापीठासमोर पडला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासकेंद्रापर्यंतही येऊ शकत नसल्याने त्याला पुस्तके मिळण्याची पंचाईतच झाली असून, वर्ष वाया जाते की काय अशी धास्ती विद्यार्थ्यांना पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना लुटणारा ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या बहिणीचे नाव का घेतले? किंवा माझ्या भावास का मारले?' अशा प्रश्नांनी कॉलेज विद्यार्थ्यांशी कुरापती काढत त्यांना मारहाण करून लूट करणारा आरोपी नीलेश अशोक सोनवणे ऊर्फ खांडवा याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.

शहरातील विविध कॉलेजांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लुटण्याचा धंदा नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा याने सुरू केला होता. विद्यार्थ्यांना बळजबरी ‌रिक्षामध्ये कोंबत त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकारही वारंवार कॉलेजांच्या आवारात घडत होता. यातील बहुतांश प्रकारात खांडवाचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांशी कुरापती काढल्यानंतर त्यांना मारहाण करून प्रसंगी शस्त्राचा धाक दाखवित त्याने मोबाइल, पैसे आणि दागिने हिसकावले आहेत. या पध्दतीने हिसकलेल्या मुद्देमालापैकी सुमारे तीन लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल सरकारवाडा पोलिसांना हस्तगत केला आहे. सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतच सुमारे १० गुन्हे केल्याची कबुलीही खांडवा याने पोलिसी खाक्या अनुभवताच दिली.

अशा प्रकारांबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वारंवार वाढत होत्या. अखेरीला पोलिसांनी पाठपुरावा करीत रचलेल्या सापळ्यात खांडवा सापडला. याकामी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार झोन एकच्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका, पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी, शेगर, गोसावी, पवार, पळशीकर, प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, प्रभकर कोल्हे, रवि मरकड, सुरेश शेळके आदी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

एकटाच करायचा लूट

नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा हा मूळ नाशिकचाच. चोरीच्या उद्देशाने दहशत पसरविण्यासाठी त्याने विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. विद्यार्थी हेरून त्याला विशिष्ट ठिकाणी गाठणे, प्रसंगी रिक्षात कोंबून शस्त्राचा धाक दाखविणे आणि लूट करणे अशी त्याच्या गुन्ह्याची पध्दती होती. गुन्हा झाल्यानंतर काही दिवस तो शहराबाहेरही निघून जात होता. शिवाय गुन्ह्यामध्ये तो एकटाच सहभागी होत असल्याने तो वारंवार पोलिसांना चुकविण्यात यशस्वी होत होता. अखेरीस पोलिसांनी सापळा रचत खांडवाच्या मुसक्या आवळल्या.

अनेक दिवसांपासून नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा याचा शोध सुरू होता. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या लुटीवर त्याचा भर होता. त्याला ताब्यात घेण्यास पोलिस पथकाला यश मिळाल्याने विद्यार्थी सुरक्षित होतील. या प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना जाणवल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

- हेमंत सोमवंशी, पोलिस निरीक्षक, सरकारवाडा, पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोस्टनवारी पडली महागात

$
0
0

एमआयटीने उचलला फक्त अधिकाऱ्यांचा खर्च

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिकमधील कामासाठी थेट अमेरिकेकडून सत्काराची पाठ थोपटून घेण्यासाठी बोस्टनला गेलेल्या महापौर व उपमहापौरांसह आमदारांना ही वारी चांगलीच महागात पडली आहे. एमआयटी कुंभथॉनने केवळ चार अधिकारी, पालकमंत्री अशा पाच जणांचाच खर्च उचलला. त्यामुळे उर्वरित चार लोकप्रतिनिधींच्या खिशाला झळ बसली. बोस्टनमध्ये जाऊन मिरवण्याची हौस या महाशयांना चांगलीच महागात पडली आहे. बोस्टनदौरा आटोपता घेत थेट नाशिक गाठायची वेळ त्यांच्यावर आली.

कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल बोस्टनच्या एमआयटी कुंभथॉनने नाशिकमधील निवडक अधिकारी व लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले होते. हा खर्च उचलण्याची तयारीही कुंभथॉनने दाखवली होती. अमेरिकेची वारी म्हटल्यावर इच्छुकांची यादी मात्र वाढतच गेली. त्यामुळे भराभर निमंत्रणे सोडण्याची वेळ कुंभथॉनवर आली. मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्यासह महापौर, उपमहापौर, दोन आमदार अशी मोठी यादीच तयार झाली. ऐनवेळी आर्थिक खर्चाचा भार उचलण्यापासून कुंभथॉनने हात आखडता घेतला. पालकमंत्र्यांसह केवळ अधिकाऱ्यांचीच विमान प्रवासाची तिकिटे मिळाली. त्यामुळे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरेंना अखेर स्वखर्चाने बोस्टनवारी करावी लागली. निवास खर्च वगळता प्रवासासह इतर खर्च हा या लोकप्रतिनिधींना चांगलाच डोईजड झाला. पाच दिवसांचा भला मोठा खर्च अंगावर आला. बोस्टन दौऱ्यात शहरातील नामांकित बिल्डरांचे पुत्र तसेच उद्योजकांच्या मुलांनी घुसखोरी केली होती. या बिल्डर, उद्योजकांनीही ऐनवेळी आपले हात वर केले. त्यामुळे सर्वांच्या खर्चाची पंचाईत झाल्याने गड्या आपला गावच बरा असे म्हणत या दौऱ्यातील निम्मे लोकांनी नाशिककडे कूच केले.

मुख्यमंत्र्यांना स्वकियांचा विसर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीच्या प्रचार सभेत महापौरांच्या बोस्टनवारीवर तिखट टीका केली. महापौरांना आमंत्रणच नसल्याचा दावा करीत त्यांनी यांच्या प्रवासाचा खर्चही उचलला नसल्याचा आरोप केला. मात्र, एमआयटीने महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींना रितसर निमंत्रणे दिले होते. तरीही मुख्यमंत्री आरोपाच्या नादात मनसेसह स्वपक्षियांचीही पोलखोल करून गेले. या दौऱ्यात भाजपच्या दोनही आमदारांनाही आपल्या स्वखर्चानेच बोस्टन गाठावे लागले. विरोधकांवर आरोप करण्याच्या नादात भाजपचेही आमदारांच्या घुसखोरीचा त्यांना विसर पडल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७० कोटींच्या मालमत्तेवर टाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशनसाठी येणाऱ्या अन्नधान्याची परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया जमविणाऱ्या पाच ठेकेदारांची तब्बल १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करण्याचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाने दिला आहे. संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासंबंधी पोलिस उपअधीक्षक छगन देवराज यांनी कोर्टाकडे विनंती केली होती.

आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात जानेवरी महिन्यात ३ हजार मेट्रीक टन रेशनच्या धान्याचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सरकारी अधिकारी आणि ठेकेदार मिळून सर्वसामान्यांच्या तोंडाचा घास पळवत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत असल्याचे पुरावे समोर आले. हा घोटाळा उघडकीस येताच राज्य सरकारने तातडीने ९ तहसीलदारांना निलंबित केले होते. सुरगाणा पोलिसांनी धान्य अपहाराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या घोटाळ्याचे धागेदोरे संपत नामदेव घोरपडे, विश्‍वास नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे, मगन रतन पवार आणि रमेश सोमनाथ पाटणकर यांच्यापर्यंत पोहचले. या ठेकेदारांनी संगनमत करून सरकारची आर्थिक लूट केल्याचे सबळ पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये मोक्कातंर्गत गुन्हा दाखल केला. संशयित ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांची माया धान्य घोटाळ्यातून जमा केली असून, ती जप्त करण्याबाबत पोलिस उपअधीक्षक छगन देवराज यांनी मोक्का कोर्टात ​विनंती अर्ज सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी संशयितांची तब्बल १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

धाबे दणाणले

नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेला हा धान्य घोटाळा सर्वांत मोठा असून, राज्यात प्रथमच धान्य घोटाळ्यात मोक्कासारख्या कलमाचा वापर करण्यात आला. या प्रकरणात सर्वांत प्रथम ९ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, यातील आठ जणांना मॅटकडून क्लिन चिट मिळाली. दुसरीकडे ठेकेदार कायद्याच्या कचाट्यात सापडले असून, जिल्ह्यातील सर्वांत मोठी जप्तीची कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. ठेकेदारांपाठोपाठ कारवाईचा फेरा कोणा कोणावर फिरणार याची चर्चा होत आहे.

शिल्लक दहा हजार ते कोट्यधीश!

या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधार म्हणून संपत घोरपडे याकडे पाहिले जाते. पोलिसांनी बँकेचे व्यवहार तपासले असता, १९९७ मध्ये त्याच्या बँक खात्यात अवघे १० हजार रुपये होते. यानंतर त्याचा संबंध अपहाराशी वाढत गेला. धान्याची अफरातफर वाढली तशी त्याच्याकडे पेट्रोलपंप, अनेक प्लॉट, वाहने अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा होत गेली. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात खून, खूनाचा प्रयत्न यासह कमोडिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी ​दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इग्नु’च्या प्रवेशांना सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वतीने (इग्नु) चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्र‌िया सुरू झाली आहे. जानेवारी २०१६ च्या सत्रासाठी केटीएचएम कॉलेजमधील इग्नु केंद्रांवर प्रवेश अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. इग्नुच्या माध्यमातून विविध पदवी , पदविका, पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. या अभ्यासक्रमांस प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१५ आहे.

विलंब शुल्कासहित अर्ज सदर करण्याची मुदत २१ डिसेंबर २०१५ आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी केटीएचएम महाविद्यालयातील अभ्यास केंद्रामध्ये संपर्क साधावा अशी माहिती अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. आर. डी. दरेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्न्स स्कूलच्या शिक्षकांचा संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

'बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, हमारी मांगे पुरी करो-वर्ण खुर्सी खाली करो', अशा घोषणा देत शाळा बार्न्स स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच विविध मागण्यांसाठी नुकताच लाक्षणिक संप करण्यात आला.

कामगारांना वेतनवाढ मिळावी, बोनस मिळावा, कामगारांना कायम करावे, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शाळेत सवलती मिळाव्यात, अशा या कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत. एकूण ११ मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. यावेळी संपामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, वाल्मिक अन्सारी, मधुकर वाघ, योगेश्वर मोजाड आदींसह शाळेचे मोहन कुमार टाक, रमेश देशमुख, महेंद्र गायकवाड आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एबीबी सर्कलचा गुदमरला श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील रोजच वर्दळीचा असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहनांमुळे एबीबी सर्कलचा श्वास गुदमरला आहे. त्यातच रोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालकही हैराण झाले आहेत. यात पोलिस आयुक्तालयाने स्वतंत्र पोलिस व्यवस्था उभी करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. सततच्या वाहतूक कोंडीने एबीबी सर्कलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीने रहिवाशी देखील हैराण झाले आहेत.

देशभरातील १२ पैकी एक ज्योर्तिंलिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे दर्शन करण्यासाठी जगभरातून भाविक नाशिकमध्ये वर्षभर येत असतात. यामुळे त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रोजच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. परंतु, दिवसेंदिवस वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे एबीबी सर्कलवर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. कुंभमेळ्यात सर्कलचे नूतनीकरण करण्यात येऊन योगसाधनेवर आधारित प्रतिकृती नुकत्याच लावण्यात आल्या आहेत. वाहनांची वाढलेल्या वर्दळीमुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने एबीबी सर्कलवरून जाण्यासाठी रोजच वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. एबीबी सर्कलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्रास होतो. याकडे पोलिसांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

- कैलास खांडबहाले, वाहनचालक

काही वर्षांत शहराचा विकास वेगाने झाला. परंतु, रस्त्यांवर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. अत्यंत वर्दळीमुळे रोजच वाहतूक कोंडी होणारा भाग म्हणून एबीबी सर्कलची नवी ओळख होत आहे.

- गणेश आहेर, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images