Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेल्वे पोलिसांना सावत्रपणाची वागणूक

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

रेल्वे सुरक्षा दलाइतकीच महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या रेल्वे पोलिसांना रेल्वेकडूनच सवतीची वागणूक मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एका खोलीत कसाबसे कामकाज करताना अनंत अडचणी येत आहेत. रेल्वे पोलिसांना प्रशस्त कार्यालय देण्याची गरज आहे.

खोली नव्हे अडगळ

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस यांचे शेजारी शेजारीच कार्यालय आहे. सन १९६२ मध्ये येथे रेल्वे चौकी होती. पूर्वी इगतपुरीचे ते आऊटपोस्ट होते. या चौकीलाच सन १९९९ मध्ये रेल्वे पोलिस स्टेशन असे नाव मिळाले. रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) मोठे व सुविधा युक्त कार्यालय आहे. रेल्वे पोलिसांना मात्र १५ बाय १५ फुटाचे खुराडे मिळाले आहे. रेल्वे पोलिसांचे रात्र व दिवसपाळीत मिळून ४० कर्मचारी आहेत. यात दोन उपनिरीक्षकांसह पाच अधिकारी आहेत. त्यांनाही बसायला जागा नाही. फक्त पोलिस निरीक्षकांना स्वतंत्र केबिन आहे. जुन्या टेबलावर ठाणे अमंलदार बसतात. या खोलीत रेकार्ड ठेवायला जागा नाही.

चार संगणकांनाही टेबल नाही. या खोलीतच दोन छोटे लॉकअप आहेत. एक पुरुषांसाठी तर दुसरी महिलांसाठी आहेत. एका लॉकअपचा वापर मुद्देमाल ठेवण्यासाठी करावा लागतो. गुन्ह्यांची संख्या वाढल्याने फिर्यादींची संख्याही वाढली आहे. फिर्यादी आल्यावर त्याला उभे राहायलाही जागा नाही. शेजारीच असलेल्या कोर्टाच्या खोलीचा वापर हे पोलिस करत असतात.

रेल्वेने वाऱ्यावर सोडले

रेल्वे पोलिस हे प्रवाशांच्या सुरक्षेची दिवसरात्र काळजी घेतात. प्रवासी जखमी झाल्यावर त्याला रुग्णालयात नेण्याची जबाबदारी ते पार पाडतात. नाशिकरोड स्टेशनवर रेल्वेची भरपूर जागा आहे. रेल्वेकडे अनेकदा विनंती करूनही रेल्वे पोलिसांना कायार्लयासाठी जागा मिळत नाही. रेल्वे पोलिसांचे नियंत्रण नागपूरहून अधीक्षक करतात. मनमाडला उपविभागीय अधिकारी आहेत. कुंभमेळ्यात अनेक दिग्गज अधिकारी आले पण कोणीही रेल्वे पोलिसांच्या व्यथा जाणल्या नाहीत. कुंभमेळ्याचा थोडा निधी या पोलिसांच्या सुविधांसाठी मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली.

पुरेशी जागा तर द्या

वरिष्ठ रेल्वे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबल 'मटा'शी बोलताना म्हणाले की, छोट्या रेल्वे चौकीचेच हे पोलिस स्टेशन केलेले आहे. आमच्या पोलिसांना काम करायला, बसायला जागा नाही. रेल्वेला अनेकदा विनंती करूनही जागा मिळत नाही. कोणत्याच सुविधा मिळत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी असेल तर रेल्वेने त्वरित कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला पोलिसांची गैरसोय

रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये शौचालय नाही की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रेल्वेने नळ जोडणी दिलेली नाही. प्रवाशांसाठीच्या नळावरच पाणी प्यावे लागते. महिला पोलिस ड्युटीवर आल्यावर युनिफार्म बदलण्यासाठी त्यांना चेजिंग रुम नाही. त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाचीही सोय नाही. त्यामुळे त्यांची मोठी कोंडी होते. तोंड दाबून बुक्क्याचा मार रेल्वे पोलिसांना खावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठमध्ये ८० टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पेठ

पेठ नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ जागांसाठी एकूण ८०.२४ टक्के मतदान झाले. एकूण ३९६७ पैकी ३१८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक ३४५ पैकी ३०३ मतदारांनी मतदान केले. सगळ्यात कमी मतदान प्रभाग दोनमध्ये झाले. या प्रभागात १०५ पैकी केवळ ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदार केंद्र क्रमांक ७ मध्ये दुपारी दोन एव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे तासभर मतदान प्रक्रिया बंद पडली होती. लवकर नवीन एव्हीएम मशीन उपलब्ध होत नसल्याने मतदार व उमेदवारांनी तक्रारी केल्या. आज (दि. २) पेठ येथील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे.

शिवेसना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही खरी लढत होत असून आज मतदार कोणाला हात देतात याकडे लक्ष लागले आहे. पोलिस प्रशासनाने अनूचित प्रकार टाळण्यााठी मतमोजणीवेळी कडक बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये ८१.१४ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

निफाड नगरपंचायतीसाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. निफाडमध्ये ८१.१४ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होताच मतदारांनी सर्वच केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी गर्दी काहीशी कमी होती. तर, ३ वाजेनंतर मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी केल्याने बहुतेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

निफाड नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब अजमावत असून, १३ हजार ७३४ मतदार आहेत. पैकी ८१.१४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, अवघ्या तासाभरात नगर पंचायत निवडणुकीचे निकाल हाती येणार असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या सत्तेचे सूत्र हाती घेण्यासाठी उमेदवारी करीत असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच अनिल कुंदे, भाजपाचे राजाराम शेलार, शिवसेनेचे मुकुंद होळकर, जावेद शेख आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निफाडमध्ये शिवसेना-भाजपा युती असून, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विरोधात उभे ठाकले आहेत. बसपानेही पाच उमेदवार उभे केले आहेत. अपक्षांचा वाढलेला प्रभाव पाहता निकालानंतर निवडून आलेले अपक्ष उमेदवारही निर्णायक भूमिकेत असतील, अशी शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा उत्साह प्रचंड दुणावला असून, ८२.५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान होत असून, आज (२ नोव्हेंबर) वाजगाव रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे. देवळा येथील आठवडे बाजाराला मतदानामुळे सुटी देण्यात आली होती.

देवळा नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत देवळा विकास आघाडी व जनशक्ती पॅनलमध्ये १७ जागांसाठी काट्याची लढत होत आहे. या निवडणुकीत सुमारे ८८२३ मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यसाठी सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लावून उभे होते. देवळा येथील जिल्हा परिषदेच्या मुलामुलींच्या प्राथमिक शाळेत मतदान असल्याने या परिसराला पोलिसांनी चारही बाजूंनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवळा विकास आघाडीकडून वॉर्ड क्र. ९ व ११ मध्ये भारती अशोक आहेर व अशोक देवराम आहेर हे दाम्पत्य उमेदवारी करीत आहे. जनशक्ती पॅनलमधून वॉर्ड ११ मधून उदय आहेर तर १२ व १४ मधून अश्विनी आहेर हे दाम्पत्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वॉर्ड क्र. पाच, नऊ, अकरा, तेरा, व चौदा यात सरळ लढती होत आहेत. वॉर्ड नऊमधून माजी पंचायत समिती सदस्या भारती आहेर प्रतिष्ठेची लढत देत आहेत.

वॉर्ड अकरामधून पंचायत समितीचे माजी सभापती अशोक बापू आहेर यांची लढत शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष व जनशक्ती पॅनलचे नेते उदयकुमार आहेर यांच्याशी होत आहे. वॉर्ड क्रमांक चौदामधून देवळा विकास आघाडीचे नेते केदा आहेर यांच्या पत्नी धनश्री आहेर यांची लढत जनशक्ती पॅनलचे नेते उदयकुमार आहेर यांच्या पत्नी अश्विनी आहेर यांच्याशी होत आहे. या लढतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, दिवसभर मतदान केंद्रावर मतदार आणण्यासाठी दोघाही पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी दहापासून मतमोजणी

देवळा प्रशासकीय इमारतीत आज सकाळी १० वा. मतमोजणी होणार आहे. यासाठी १७ टेबल ठेवण्यात आले असून, ३४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अवघ्या एक तासात देवळा नगरपंचायतीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे प्रातांधिकारी संजय बागडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये ८० टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरासरी ८०.१२ टक्के मतदान झाले. चांदवडमधील प्रस्थापित नेत्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या आणि नवोदितांसाठी पालिका राजकारणात प्रवेश करण्यासाठी मोठी संधी घेऊन आलेल्या या निवडणुकीबद्दल औत्सुक्य असल्याने निवडणूक अखेरपर्यंत रंगतदार झाल्याचे दिसून आले.

सकाळी साडेनऊपर्यंत प्रभाग एकमध्ये २१.७१ टक्के तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वात कमी म्हणजे ८.१८ टक्के मतदान झाले होते. नंतरच्या काळात मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागल्याचे चित्र होते. पुढील दोन तासात काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. साडेअकरा वाजेपर्यंत सर्व १७ मतदान केंद्रे मिळून ३५.८० टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान या वेळेस प्रभाग एकमध्ये सरासरी ५० टक्के होते. मतदान केंद्र क्रमांक दहामध्ये मतदारांची एकच झुंबड उडाली.

चांदवड पालिका निवडणुकीत स्वतःला अजमावत असलेल्या बहुतांश उमेदवारांनी मतदानास मतदारांनी यावे, यासाठी शनिवारी रात्रीपासून फिल्डिंग लावल्याचे बोलले जात होते. सगेसोयरे, नातेवाईक यांच्यासह सारे कुटुंब यात गुंतल्याचे स्पष्ट होते. अनेकांनी रेणुका देवी आणि इच्छापूर्ती गणेशासह विविध धार्मिक ठिकाणी पूजा करून कौल मागितले.

अर्थपूर्ण चर्चा

दरम्यान, कोणाचा भाव किती फुटला याची सर्वत्र चर्चा होती. एक हजार रुपयांपासून सात हजारापर्यंत भाव फुटल्याचे काही मतदार सांगताना दिसत होते. तर, प्रशासन-उमेदवार यात तथ्य नसल्याचे सांगत खंडन करताना दिसत होते.

मतांचा गठ्ठा प्रभावी

ज्या कुटुंबात मतांची संख्या जास्त त्या कुटुंब प्रमुखाला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याची स्थिती होती. त्यांनी मतदानाला बाहेर पडावे यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक यांचे सर्वदूर प्रयत्न सुरू होते. बऱ्याच ठिकाणी मतदार वारंवार आवाहन करूनही मतदानाला घराबाहेर पडत नव्हते. त्यांच्या या भूमिकेबद्दल ना तर्कवितर्क लढविले जात होते.

अपक्षांवर सर्वकाही

सतरा प्रभागात तब्बल ५७ अपक्ष उमेदवार आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाची युती किंवा आघाडी नाही त्यामुळे अपक्ष किती मते घेतात आणि कोणाची मते खातात याची प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारात धाकधूक असल्याचेही खासगीत सांगितले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमध्ये झाले सर्वात कमी मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कुठेही अनूचित प्रकार न घडता उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण सोळा प्रभगात सरासरी ७५ टक्के मतदान झाले. सोळा प्रभागतून ७४ उमेडवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले.

कळवण नगरपंचायतची पहिलीच निवडणूक असल्याने जशी उमेदवारांची उत्सुकता होती, त्याप्रमाणे मतदारही उत्सुक होते. सकाळी आठ वाजेपासून मतदान केंद्रावर गर्दीस सुरुवात होऊन १२ वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले. दुपारी मतदारांची गर्दी ओसरली होती. त्यानंतर मतदारांचा उत्साह कायम राहून मतदान केंद्रांवर रांग लागली होती. पक्षीय नेते आपापल्या प्रभागात ठाण मांडून होते. सर्व प्रभागात उमेदवार मतदान केंद्राच्या २०० मीटर लांब थांबून मतदारराज्याला नमस्कार करून मतदान करण्याची विनंती करीत होते.

सुरगाण्यात ८० टक्के मतदान

सुरगाणा नगरपंचायतीसाठी किरकोळ वादविवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३७३९ पैकी २९१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १४६३ महिला तर १४५३ पुरुषांनी मतदान केले. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्ती महामार्गावरच बरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महामार्ग क्षेत्रात हेल्मेट सक्ती न करता महामार्गावरच ही मोहीम राबविली जावी, असा सूर हेल्मेटची सक्ती योग्य की अयोग्य या विषयावर आयोजित परिसंवादातून उमटला.

नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्या वतीने सीबीएस येथील हुतात्मा स्मारकामध्ये परिसंवाद झाला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, संघटनेचे अध्यक्ष रमेश कडलग, पा. भा करंजकर, भाऊसाहेब गडाख, प्रा. सुमन मुठे, छाया जाधव, अविनाश आहेर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार‍ आदींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व स्तरातील नागरिकांना विश्वासात घेऊनच हेल्मेटसक्ती करायला हवी होती, अशी अपेक्षा यावेळी काही मान्यवरांनी व्यक्त केली. तर 'आरटीओ'ने हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा बेशिस्त वाहतूक कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा करंजकर यांनी व्यक्त केली. हेल्मेट सक्ती जाचक असून हेल्मेट परिधान करताना ज्येष्ठांना त्रास होत असल्याने ज्येष्ठांना हेल्मेट सक्ती असू नये अशी अपेक्षा काही मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नागरिकांची लूट चालत असल्याचा आरोप करीत 'आरटीओ'ने प्रथम बेकायदा वाळू वाहतूकीवर कारवाई करण्याची हिमंत दाखवावी असा सल्ला अविनाश आहेर यांनी दिला. हेल्मेट सक्ती महिलांना त्रासदायक ठरत असून महिलांना या सक्तीमधून वगळायला हवे असे मत सुमन मुठे आणि छाया जाधव यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

$
0
0

नाशिक : माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) अर्ज भरण्यात येत असलेल्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही ३१ ऑक्टोबरपर्यंत होती. परीक्षेस पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असते. मात्र विभागाच्या संकेतस्थळांमध्ये त्रुटी आढळून येत असल्याने विद्यार्थ्यांना हे अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या. हे अर्ज विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत भरले नसते तर त्यांना ३४० या नियमित शुल्कासह २० रुपये विलंब शुल्कही भरावा लागणार होता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारिख नियमित शुल्कासह १० नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह ११ ते १९ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची २ ते १९ नोव्हेंबर व विलंब शुल्कासह २३ ते २६ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘युनोस्को यादीमध्ये सिंहस्थाला द्या स्थान’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला युनोस्कोने आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे व संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याकडे केली आहे. शर्मा यांची दिल्तीत भेट घेवून सिंहस्थाचे महत्त्व पटवून देत युनोस्कोला तात्काळ विनंती करावी, असा आग्रह दोघांनी केला आहे. आपण यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

प्रत्येक देशातील त्यांच्या सांस्कृतिक उत्सवाची नोंद या युनेस्को संस्थेच्या माध्यमातून केली जाते व त्या पारंपरिक व धार्मिक उत्सवाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जातो. युनेस्कोच्या यादीत ज्या उत्सवाचा समावेश होतो त्या उत्सवाला कुठल्याही देशाची किंवा आंतराष्ट्रीय संस्थेची मदत मिळू शकते. सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा उत्सव म्हणूक ओळखला जातो. संपूर्ण जगात सर्वात जास्त भाविक हे सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होतात. नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा म्हणूक मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात येऊन नदीपात्रात स्नान करून नवीन ऊर्जा घेऊन जातात. त्यामुळे या कुंभमेळ्याला आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी ललिता शिंदे व खासदार हेमंत गोडसे यांनी शर्मा यांची भेट घेवून युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश होणे संदर्भात संकल्पना मांडली शर्मा यांनी मी आपल्या भावनांचा आणि आपण सुचविलेल्या उत्सवाचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश होण्याबाबत लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाची पदके झाली जगण्याचे ओझे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशासाठी लष्करात दाखल झालो. तीन युध्दांमध्ये सहभाग घेतला. जीवाची पर्वा का करतात, याचे भानच त्यावेळी नव्हते. मात्र, एक दिवस आता तुमची गरज नसल्याने निवृत्त होण्याचे आदेश लष्काराने दिले. ते साल होते १९७४. मात्र, सन्मानाने तीन पदके छातीवर मिरवताना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. लष्कारने निवृत्तीवेतनच सुरू केले नाही. देशसेवेचे व्रत पेलताना आयुष्याची लढाई कशी हरलो हेच समजले नाही, अशी खंत माजी सैनिक बाळासाहेब उपासनी यांनी व्यक्त केली.

नाशिकरोड परिसरातील उपासनी सन १९६० मध्ये मध्य रेल्वेत सहायकचालक म्हणून भरती झाले. याच दरम्यान भारतावर परकीय आक्रमण झाले. ते परतावून लावण्यासाठी युवकांनी लष्करात भरती होण्याचे आवाहन करण्यात आले. देशसेवा घडावी म्हणून उपासनी सन १९६२ मध्ये सेनेत दाखल झाले. दोन महिने झाशी येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यासह इतर सैनिकांना चीनच्या युध्दासाठी पाठविण्यात आले. तब्बल सहा महिने त्यांनी या लढाईत यशस्वी सहभाग घेतला. युध्द विरामानंतर त्यांना पुन्हा रेल्वेच्या सेवेत पाठवण्यात आले. मात्र, सन १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर चाल गेली. त्यामुळे पुन्हा एकदा उपासनी सेनेच्या मदतीला धावले. युध्द संपल्यानंतर ते पुन्हा झाशीला परतले. यानंतर सन १९७१ मध्ये सुध्दा उपासनी यांनी पराक्रम गाजवला. युध्दांच्या मैदानात गाजविलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना तीन वेगवेगळ्या पदकांनी गौरवण्यात आले. याच दरम्यान ५ लाख सैनिकांना युध्दातून कमी करण्यात आले. त्यात उपासनी सुध्दा होते. भारतीय लष्काराने या सैनिकांना कोणेतही निवृत्ती वेतन दिले नाही.

देशासाठी वेळोवेळी धाव घेणाऱ्या उपासनींची दखल रेल्वेने सुद्धा घेतली नाही. ऐन उमेदीच्या काळात उपासनींची झोळी रितीच राहिली. यामुळे त्यांनी लष्कराकडे निवृत्तीवेतनासाठी लढा सुरू केला. सन १९७४ पासून त्यात खंड पडलेला नाही. या कालखंडात त्यांनी पाच राष्ट्रपतींशी पत्रव्यवहार केला. तेवढ्याच संरक्षणमंत्र्यांना गाऱ्हाणे घातले. मात्र, आजवर उपासनीच्या दु:खावर कोणीही फुंकार घातली नाही. सन १९८० मध्ये उपासनींची पत्नी कुंदा यांचा अपघात झाला. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने उपासनींना खासगी व्यक्तींकडे चाकरी करण्याची वेळ आली. सन २००७ मध्ये किडनीच्या विकाराने आणि उपचाराअभावी पत्नीचे निधन झाले. मुलगा राजेंद्रचेही सन २०१० मध्ये हार्टअॅटॅकमुळे निधन झाले. एक मुलगी सासरी असते. तिची परिस्थिती बेताची असल्याने तिकडे जाणे शक्य नाही. सध्या ८२ वर्षाचे झालेले उपासनी एका वकिलाकडे चाकरी करतात. त्यांच्याकडेच राहतात. ज्या देशबांधवांसाठी शत्रुसमवेत चार हात केले तेच आज दखल घेत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

कोर्टात लढाई करण्यासाठी पुरेसा पैसा नाही. सरकारी व्यवस्था एकदा निवडून आलेल्या आमदार, खासदाराला मुबलक वेतन आणि निवृत्ती वेतन देते. मात्र, माझ्यासारख्या सैनिकांवर अशी वेळ येते. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांना सरकारने पेन्शन सुरू केले, यात कोणती व्यवहार्यता तपासली गेली.

- बाळासाहेब उपासनी, माजी सैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ्यामुळे घडले ६१९ जणांचे आयुष्य

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : चौकातील फळे हे विचांराच्या देवाणघेवाणचे प्रतिके समजली जातात. समाजात उत्क्रांती घडवण्यासाठी या फळ्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. शहरातील काही फळे मात्र बेरोजगारांसाठी वरदान ठरली आहेत. युवकांना रोजगार मिळावा यासाठी इंटीग्रेटेड रुरल लाईव्ह हूड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या रोजगार फळ्याच्या माध्यमातून ६१९ युवकांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली आहे.

फळा संस्कृतीचे जागतिक इतिहासात खूप मोठे योगदान आहे. रशियन राज्य क्रांतीसह भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फळ्याचे खूप मोठ्या प्रमाणात योगदान होते. त्यामुळे फळा हा सर्वासामान्यांचा आवाज म्हणून प्रचलित आहे. शहराच्या अनेक चौकात मंडळांच्या वतीने फळे लावले जातात परंतु शाळाबाह्य, वंचित, समाजासाठी रोजगाराची भूमिका बजावणारा एकही फळा नाही. आज तोच फळा रोजगार मिळवून देण्याचे माध्यम बनला आहे.

या रोजगार फळ्याची संकल्पना २०१२ मध्ये इंटीग्रेटेड रुरल लाईव्ह हूड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे प्रवीण बोडखे यांना सुचली. त्यांनी लोकवर्गणीतून शहराच्या शहराच्या सिडको, सातपूर, पंचवटी कारंजा, फुलेनगर या भागातील चौकांमध्ये फळे तयार करून लावले. या फळ्यांवर ज्यांच्याकडे काम आहे अशा व्यक्तींना लागणाऱ्या पदांचे नाव व पदाची संख्या व मोबाइल नंबर लिहियचा. ज्यांना कामाची गरज आहे, अशा व्यक्ती हा फळा वाचून संबंधित कारखानदाराला फोन करतात व कामावर रुजू होतात.

इंटरनेटच्या युगात फळा म्हणजे कालबाह्य कल्पना होय परंतु, जे युवक शाळा बाह्य विद्यार्थी आहेत, साहजिकच अशा माध्यमांचा वापर करणे त्यांना शक्य नाही तसेच परवडण्यासारखे नाही. त्यामुळे फळा हे माध्यम स्वस्तात आणि सहज स्वीकारले गेले आहे. उद्योजक, छोटे दुकानमालक आणि बेरोजगारांना एकत्र आणून दोघांच्याही समस्या सोडविण्यासाठी रोजगार फळा एक परिणामकारक व्यासपीठ बनले आहे. त्याचप्रमाणे अकुशल युवकांना प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासही याची मदत मिळत आहे. हा फळा पहाण्यासाठी शेकडो युवक येथे जमतात ज्यांना ज्या कामाची आवश्यकता आहे, असे युवक कारखानदारांशी दुकानमालकांशी संपर्क साधतात. या उपक्रमासाठी नोकरी देणारा व नोकरी घेणार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. या संस्थेतर्फे या फळ्यांची व्याप्ती वाढवण्यात येणार असून, लवकरच नाशिकरोड व शहराच्या इतर भागांमध्ये लावले जाणार आहेत.

जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा यासाठी हा प्रयत्न होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आजपर्यंत ६१९ लोकांना रोजगार मिळाला आहे.

- प्रवीण बोडखे, अध्यक्ष, इंटीग्रेटेड रुरल लाईव्ह हूड डेव्हलपमेंट फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हुमान’ महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'हुमान' या पुस्तकाने तरुणी तसेच महिला वर्गाला मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. तालुक्यातील छोट्याशा गावातून सुरू झालेल्या एका ग्रामीण महिलेचा प्रवास एका पोलिस अधिकाऱ्यापर्यंत येऊ पोहोचला, आता अधिकारी म्हणून फारशी अपेक्षा नाही मात्र लेखिका म्हणून खूप काही करायचे आहे, असे मत प्रसिध्द लेखिका संगीता धायगुडे यांनी व्यक्त केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान वाचनालय समितीच्यावतीने आयोजित 'संवाद लेखकांशी' या उपक्रमांतर्गत झालेल्या मुलाखतीला उत्तर देताना धायगुडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, हुमान म्हणजे कोडे. मला आयुष्याने अनेक कोडी घातली, त्या सर्वांना मी पुरून उरले. आताही अनेक कोडी पडत‌ाहेत मात्र, त्या सर्वांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मी करते. त्यात यशस्वी होते. आयुष्यात पहिले हुमान पडले ते सातवीनंतर करायचे काय? असे सांगतानाच धायगुडे यांनी तेथून पुढे सुरू केलेला प्रवास सांगितला. संगीता धायगुडे यांच्या ग्रंथाली प्रकाशनच्या 'हुमान' या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. धायगुडे यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत टकले यांनी घेतली. मुलाखतीनंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे घेतलेल्या साहित्यभूषण परीक्षा २०१५ चे प्रमाणपत्र वितरण झाले. प्रथम इंद्रायणी पुरस्कार प्रशांत केंदळे यांना, गोदामाता पुरस्कार तोष्णा मोकडे यांना तर तृतीय कृष्णामाई पुरस्कार सुनीती पेंडसे व अनिता लोपीस यांना देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोनिक्सला ग्राहक मंचचा दणका

$
0
0

भूखंडप्रकरणी फसवणूक झाल्याने व्याजासह पैसे परत देण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त किमतीत भूखंड मिळणार असे सांगत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या फोनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दणका दिला. ग्राहकाची फसवणूक झाल्याने तक्रारादाराचे ४ लाख ५५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत देण्याचे आदेश मंचाने दिले असून, इतर ग्राहकांनाही यामुळे दिलासा मिळू शकतो.

गोविंदनगर परिसरातील चंद्रकिरण पार्कमध्ये कार्यालय थाटणाऱ्या नागपूर येथील फोनिक्स कंपनीने स्वस्तात जमीन देण्याचे आश्वासन ग्राहकांना दिले होते. सिन्नरमधील देवपूर, उजनी तसेच त्र्यंबकेश्वरमधील नाईकवाडी, ठाण्यातील मुरबाड, नागपूर येथील सीताबर्डीसह इंदूर येथे कंपनीचे भूखंड असून, ग्राहक ते स्वस्तात आणि हफ्त्याने खरेदी करू शकतात, असे आमिष कंपनीतर्फे दाखवण्यात आले. हफ्त्याने पैसे भरण्याची सोय कंपनीने करून दिल्याने शेकडो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये कंपनीकडे जमा केले. यात हॅपी होम कॉलनीत राहणारे दिलीप रामदास वारे यांचाही समावेश होता. त्यांनी या कंपनीकडे ४ लाख ५५ हजाल ८९८ रुपये जमा केले. प्रत्यक्षात कंपनीने आश्वासनाप्रमाणे सांगितलेल्या साईटवर कोणतेही बांधकाम सुरू केले नाही. कंपनीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फोनिक्स कंपनीसह जितेश नारायण नशीने आणि मोतिलाल तुकाराम बांडेबुचे यांच्याविरोधात ग्राहक न्यायमंचाकडे अॅड. आर. एन. जाधव यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत मिळावी आणि नुकसानीपोटी पाच लाख आणि खर्चासाठी २५ हजार रुपये मिळावेत, अशी विनंती त्यांनी मंचाकडे केली. कंपनीला हजर राहण्यासाठी वारंवार कळवूनही ते किंवा त्यांचा प्रतिनिधी सुनावणीसाठी हजर झाले नाही. यावर, एकतर्फी सुनावणी घेत मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-सोनवणे आणि सदस्य कारभारी जाधव यांनी तक्रारदार वारे यांच्या बाजूने निकाल दिला. वारे यांनी गुंतवलेले ४ लाख ५५ हजार ८९८ रुपये १२ टक्के व्याजासह परत करावेत, झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी पाच हजार रुपये आणि खर्च म्हणून तीन हजार रुपये फोनिक्स कंपनीने अदा करावेत, असे म्हटले आहे. फोनिन्स कंपनीचा घोटाळा एक कोटी रुपयांपर्यंत पोहचला असून, पैस परत मिळवण्यासाठी गुंतवणुकदारांचे प्रयत्न सुरू आहेत.

व्यवहारापूर्वी सावध राहा

दामदुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून किंवा जास्त व्याज दर देतो, असे सांगत अनेक कंपन्या सर्वसामन्यांना गंडा घालत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांचा अभ्यास करून गुन्हेगारांना वेळीच आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गुंतवणूकदारांनी सुध्दा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन ग्रामीण पोलिस दलामार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांचेच सरकारविरोधात उलगुलान

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : आदिवासी आमदारांसह मंत्र्यांना विश्वासात न घेताच राज्य सरकारने बोगस आदिवासींना नोकरीमध्ये संरक्षण देण्यासाठी काढलेल्या २१ ऑक्टोबरच्या अध्यादेशामुळे सर्वपक्षीय आमदार संतप्त झाले आहेत. कॅब‌निेटची मंजुरी न घेताच, सरकारने राबविलेला हा निर्णय दीड कोटी आदिवासींची फसवणूक करणारा असून, या निर्णयाविरोधात आदिवासी संघटनांपाठोपाठ सर्वपक्षीय आमदार एकवटले आहेत. नागपूरमध्ये सोमवारी राज्यातील आदिवासी आमदाराची तातडीची बैठक होणार असून, यात प्रथम सरकार विरोधात 'उलगुलान'चा इशारा दिला जाणार आहे. त्यामुळे बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्याच अंगलट येणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याच्या विविध विभागांमध्ये अनुसूचित जमातीचे बोगस दाखल घेऊन सेवेत कार्यरत असलेल्या दीड लाख बोगस आदिवासी कर्मचारी व अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचे आदेश राज्य सरकारने २१ ऑक्टोबरला काढले आहेत. एसटीच्या राखीव जागांवर १ जून १९९५ ते १७ ऑक्टोबर २००१ या काळासासाठी हा निर्णय लागू केला आहे. या निर्णयामुळे आदिवासींचा हक्क डावलला गेल्याने आदिवासी समाजात सरकारविरोधात तीव्र भावना आहेत. राज्यातील आदिवासी मतदारसंघातून निवडून आलेल्या २६ आमदारांपैकी १४ आमदार भाजप शिवसेनेचे आहेत. त्यात भाजपचे तब्बल १२ आमदार आहेत. आदिवासी आमदार व खासदारांसह आदिवासी मंत्र्यांना डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आदिवासी आमदारांनी केला आहे. या निर्णयाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी सोमवारी नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभा आदिवासी आमदार मंचचे अध्यक्ष असलेल्या तोडसाम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आमदारांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यात सरकार विरोधाच्या आंदोलनाची दिशा ठरवून ३ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आदेश रद्द करण्यासाठी अल्ट‌मिेटम दिला जाणार आहे.

लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चे

सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयाविरोधात येत्या ७ तारखेला राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदारांच्या घरांवर आदिवासी बचाव संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा निर्णय घेतला जात असताना लोकप्रतिनिधी कुठे होते, असा सवाल आदिवासी संघटनांनी केला असून आमदारकीचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली जाणार आहे. त्यामुळे या आमदारांच्याही अडचणी वाढल्या आहेत.

आमची जातच आता चोरली जात आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना संरक्षणाचे बक्ष‌सि देत असून, हा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत. सत्तेत असलो तरी या निर्णयाविरोधात आहोत.

राजू तोडसाम, अध्यक्ष, महाराष्ट्र आदिवासी आमदार मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न पेटला; बळीराजाचा संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी सोडण्याबाबतचे संकेत रविवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून मिळताच लोकप्रतिनिधींसह संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर धडक दिली. गंगापूर आणि दारणा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाबाबत निषेध नोंदविला. रात्री उशिरापर्यंत हालचाली गतिमान झाल्या. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी खासदार गोडसे यांच्यासह काही लोकप्रतिनिधी दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.

रविवारी दुपारी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत तातडीची बैठक बोलावली होती. पाणी सोडण्याबाबतचा निर्णय झाल्याची कुणकुण लागताच खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, योगेश घोलप, महापौर अशोक मुर्तडक आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जायकवाडीत केवळ पिण्यासाठीचे पाणी सोडणे आवश्यक असून, घाईने निर्णय घेऊ नये असे म्हणणे जिल्हाधिकाऱ्याकंडे मांडण्यात आले. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे आम्हाला कार्यवाही करणे भाग असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गंगापूर आणि दारणा धरणातून रात्रीतून पाणी सोडले जाऊ शकते, असे संकेत सूत्रांनी रविवारी दिले.

जायकवाडीसाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास शुक्रवारी (दि. ३१) हायकोर्टाने नकार दिला होता. हे पाणी केवळ पिण्यासाठीच दिले जावे तसेच पाणी सोडल्यानंतर प्रवाहाच्या मार्गात त्याचे नुकसान होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी असेही हायकोर्टाने निर्णयात स्पष्ट केले होते. नगर आणि नाशिककरांनी पाणी सोडण्याविरोधातील धार तीव्र केली असली तरी हायकोर्टाच्या निर्णयामुळे पाणी सोडले जाणार हे स्पष्ट झाले. याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असली तरी तोपर्यंत पाणी जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता बळावली आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहीते बोस्टनच्या दौऱ्याहून नाशिकमध्ये परतताच रविवारी हालचालींना वेग आला. मराठवाड्यासाठी तातडीने पाणी सोडावे असे निर्देश पाटबंधारे महामंडळाने दिल्यामुळे रविवारी साप्ताहीक सुटीच्या दिवशीही कुशवाह यांनी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे, पोलिस अधीक्षक संजय मोहीते, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता आर.एस. शिंदे, महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी पाणी सोडल्यानंतर वहन मार्गात त्याची चोरी होण्याचे प्रकार घडतात. बंदोबस्ताच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्त मिळावा अशी मागणी केली.

स्पष्ट निर्देशाअभावी प्रशासन संभ्रमात

हायकोर्टाच्या आदेशानूसार मराठवाडयाला केवळ पिण्यासाठी पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले. यापूर्वी दिलेल्या आदेशात पिण्यासह, उद्योग आणि शेतीसाठी पाणी सोडले जाणार होते. मात्र नवीन आदेशानूसार त्यात बदलाची शक्यता वर्तविली जात होती. मात्र याबाबत प्राधिकरणाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश आले नाहीत. पाणी न सोडल्यास हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, या भितीने प्रशासनाने पाणी सोडण्याचे निेर्देश दिले आहेत. मात्र दुसरीकडे नेमके किती पाणी सोडावे याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामूळे तुर्तास तरी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानूसारच गंगापूरमधून १.३६ तर दारणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फ्रान्सिस शाळा-पालक वाद कायम

$
0
0

विद्यार्थ्यांना नीट वागणूक मिळत नसल्याचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट फ्रान्सिस शाळा व पालक यांच्यातील वाद अद्यापही सुरुच असून शिक्षक विद्यार्थ्यांना नीट वागणूक देत नसल्याने सोमवारी (दि. २) पुन्हा एकदा शाळा प्रशासन व पालक यांच्यात वाद निर्माण झाला. सहामाही परीक्षा देण्यास शाळा प्रशासन विद्यार्थ्यांमध्ये अडथळे निर्माण करीत असल्याने संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाबरोबर बैठक घेत शाळा प्रशासनाला जाब विचारला.

मागील काही महिन्यांपासून ही शाळा विद्यार्थ्यांचे निकाल न देणे, अवाजवी फीची मागणी करणे, परीक्षेला न बसू देणे अशा विविध कारणांनी वेठीस धरत आहे. आपल्या मुलांची होत असलेली हेळसांड पाहता पालकांनी आंदोलन, निवेदन, गुन्हे दाखल करुन शाळा प्रशासनाला समज देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मनपा शिक्षणमंडळ, पोलिसांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करीत शाळा प्रशासनाला समज दिली आहे. तरी शाळा आपली मुजोरी सोडत नसल्याने सोमवारी याबाबत बैठक घेण्यात आली.

शाळा प्रशासन कॉम नोंदणीकृत फीशिवाय कोणतीही अतिरिक्त फी भरणार नाही, अशी भूमिका यावेळी पालकांनी मांडली. शिक्षण विभागाच्या चौकशी अधिकारी जयश्री पांडुरकर यांनी यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कुसुमा शेट्टी व संजय पाटील यांना समज दिली. या प्रकरणाचा अहवाल लवकरच शिक्षण मंडळाला सादर केला जाणार असून निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिहीन वाहनधारकांनाही टोलमध्ये सूट द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोलनाक्यावर स्‍थानिक भूमिहीन वाहनधारकांची लूट अखंडितपणे सुरूच आहे. इतर वाहनधारकांप्रमाणे या भूमिहीन वाहनधारकांनाही टोल आकारणी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या वाहनधारकांनी दिला आहे.

टोल प्रशासानाने स्‍थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती दिली असली तरी ज्या वाहनधारकांकडे सातबारा उतारा आहे, त्यांनाच सूट मिळते. स्थानिक भूमिहीन वाहनधारकांकडे सातबारा नसल्याने त्यांना टोलमध्ये सूट मिळत नाही. यामुळे एका फेरीसाठी या वाहनधारकांना ९५ रुपये टोल आकारला जातो. हा अन्याय दूर करावा, अशी मागणी विजय भंडारे, विश्वास जाधव, विकास मांदळे, रशीद शेख, मुश्ताक कझी, शौकत अन्सारी, मुन्ना अन्सारी यांनी केली आहे.

पिंपळगाव टोल प्रशासनाने वीस कि. मी. परिसरातील सर्वच वाहनांना टोलमुक्ती दिली आहे. भूमिहीन वाहनधारकांना जवळच्या खेड्यावर जाण्यासाठीही टोल भरावा लागतो. यामुळे या भूमिहीन वाहनधारकांनाही टोलमुक्ती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेव्हिट मार्केट गजबजले

$
0
0

कपडे खरेदीसाठी ग्राहकांची देवळालीमध्ये गर्दी

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

दीपावलीच्या सणासाठी कपड्यांची खरेदी म्हटलं की ग्रामीण भागासह नाशिककरांच्या तोंडावर पहिले नाव येते ते देवळालीच्या लेव्हीट मार्केटचे. अगदी ब्रिटीश काळापासून येथील तयार कपड्यांची बाजारपेठ नाशिककरांसाठी कपड्यांचे माहेरघर म्हणून पसंतीस उतरले असून रेडीमेड कपड्यांनी बाजारपेठ फुलून गेली आहे.

वाढत्या महागाईमुळे यंदा लहान मुलांच्या कपडे खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. यावर्षीच्या खरेदीत विविध सिनेमांमध्ये वापरल्या गेलेल्या कपड्यांच्या प्रकार खरेदी केले जात असून यामध्ये 'बाहुबली', 'बजरंगी भाईजान', 'डबल साईड पेंट', 'सिल्की' तसेच 'मोदी' पॅटर्नच्या कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात लहान मुलांसह पालक वर्गाचा कल असल्याचे दिसून येतो आहे. तर मोठ्या माणसांमध्ये 'कार्गो शर्ट', 'स्टोन जीन्स' 'रॉव वॉश', 'प्रिंटेड शर्ट' आदी प्रकार नव्या लुकमध्ये उपलब्ध आहे.

महिला वर्गाचा खरेदीसाठी उत्साह

महिला आणि मुलींमध्ये 'वन पीस मिडी', 'क्रॉप टॉप', 'टेंक टॉप', 'जमसुट', 'लेगिज टॉप', 'लाँग फ्रॉक', 'प्लाझो', 'शिफॉन कुर्ती', 'बलून' तर 'थ्री फोर्थ जीन्स'सह 'डेनीम शर्ट' आदी पॅटर्नच्या रेडीमेड तर कपडा मटेरियलमध्ये विशेष करून शंभर टक्के कॉटनपासून बनविलेल्या 'वारली पॅटर्न'ची वाढती मागणी असून त्यासोबत 'केटलॉग', 'कॉलर पॅटर्न', 'लाँग डिझायनर', 'सिल्क', 'तिलिस्म', 'यल्लो पर्ल', 'रज्जो प्रिंट्स'सारख्या कपड्यांची चर्चा आहे. अवघ्या आठवड्यावर आलेल्या दिवाळीची खरेदी करण्यासाठी देवळालीत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

दिवाळीसाठी आवश्यक मातीच्या पणती, शिरई, लक्ष्मीमूर्ती, रांगोळी व पूजा साहित्यांची दुकानेही थाटण्यात आलेली आहेत. घर सजावटीसाठी आवश्यक पडदे, तोरण, सोफा कव्हर, बेडशीट, पिलो कव्हर आदी दुकानेही रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांकडून लावण्यात आले असून नागरिकांची खरेदीसाठी येथेही गर्दी दिसून येते आहे.

खरेदीसाठी प्रतीक्षा 'लक्ष्मी'ची

इगतपुरी, मनमाड, निफाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, ओझर आदी भागातील नागरिकांचा यंदा सर्वाधिक राबता असून अजूनही बऱ्याच कामगार वर्गाचे वेतन आणि बोनसचे पैसे अद्याप हातात आलेले नाही. ते पैसे मिळाल्यानंतर खरेदीसाठी अधिक गर्दी होईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोनसमुळे उमटली आनंदलहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

बाजारपेठेमध्ये असलेल्या मंदीसदृश वातावरणामुळे आर्थिक विकासाची चाके मंदावलेली आहेत. अशा परिस्थितीत नाशिकमधील सातपूर आणि अंबड एमआयडीसीमधील बहुतांश बड्या कंपन्यांनी कामगारवर्गाला दिवाळसणात सुखावणारा निर्णय घेत सरासरी २० टक्के बोनस जाहीर केला आहे.

अंबड, सातपूर एमआयडीसीमध्ये सर्वाधिक कंपन्या आहेत. यातील सिटू कामगार संघटनेची युनियन असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये सरासरी २० टक्के बोनस जाह‌ीर करण्यात आला आहे. याबाबत सिटूने दिलेल्या प्रसिद्धपत्रकात अंबड एमआयडीसीतील २१ कंपन्या तर सातपूर एमआयडीसीतील १२ कंपन्यांमधील कामगारांना बोनस जाहीर झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

सिटू कामगार संघटनेच्या सर्वच कंपन्यांमध्ये कामगारांच्या हिताचे निर्णय कामगार संघटना घेत असल्याने कामगारांचा विश्वास असल्याचे सिटूचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले. यात सिडको औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे बोनस पुढीलप्रमाणे : एआयसी (१९ टक्के), नाशिक स्टिल (२० टक्के), झायलॉन (२० टक्के), नोवितीयार लिंग्राड इलेक्ट्रानिक्स (२० टक्के), अॅडम फेब्रिकेशन (२० टक्के), नाशिक अॅटोटेक (२० टक्के), हिन्दुस्थान कोकाकोला (२० टक्के), अनीष फार्मा (२० टक्के), सुदाल इंडस्ट्रिज ९ हजार ९००, अॅटोकॉप अप्लायन्सेस (२० टक्के), फिनोटेक्स फायबर (२० टक्के), सुमो अॅटोटेक (२० टक्के), अल्फ इंजिनीअरिंग एक महिन्याचा पगार व तीन हजार रुपये, ओके टुल्स (२० टक्के), जगदीश इंजिनीअरिंग (२० टक्के), ब्ल्यू क्रॉस (२० टक्के), हेक्सटेक्स इंजिनीअरिंग १७ हजार ९००, जेटेक्स इंजिनीअरिंग १२ हजार ६४५ रुपये, तुषार प्रिसिकॉन एक महिन्याचा पगार, देशमुख इंडस्ट्रिज एक महिन्याचा पगार व तुषार इंडस्ट्रिजलाही एक महिन्याचा पगार बोनस युनियन व कंपनीय व्यवस्थापनाने जाहीर केला आहे.

दरम्यान, सातपूर एमआयडीसीमधील इंडियन व्हॉल्व (२० टक्के), सिमेघ इंडस्ट्रिज (२५ टक्के), सिप्रा इंजिनीअरिंग युनिट दोन (२० टक्के), आनंद आय पावर ६ हजार ४०० व (२० टक्के), इप्कॉस इंडिया १८ हजार ते २५ हजार २००, सिंग इंजिनीअरिंग (२० टक्के), गोल्डी प्रिसिजन (२४ टक्के), सिप्रा इंजिनीअरिंग युनिट एक (२२ टक्के), एम. जी. इंजस्ट्रीज ३ हजार ५०० व (२० टक्के), शेरिन अॅटो १८ हजार, सागर इंजिनीअरिंग ८ हजार ४०० व सुयोग रबर (८.३३ टक्के) बोनस जाहीर करण्यात आला आहे.

कामगारांना बोनस जाहीर झाल्याने त्यांची दिवाळी निश्चित गोड जाणार असल्याचे डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले. सिटू युनियनमधिल कामगारांना बोनस जाहीर झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.

बड्या कंपन्यांचे बोनस कधी?

सिटू युनियने एकीकडे बोनस जाहीर केले असता इतर मोठ्या कंपन्यांचे मात्र अद्यापही बोनस जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे सिडको, सातपूरमधील मोठ्या कंपन्यांना बोनस कधी जाहीर करणार याकडे कामगारवर्गासह या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या छोट्या वेंडर्सचेही लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीकडे जागृती; दुसरीकडे कारवाई

$
0
0

परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगारांचे धाबे दणाणले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगवेगळ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वच स्थरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा पोलिसांच्या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. परिमंडळ दोनमधील पोलिस स्टेशनंतर्गत हा उपक्रम सुरू असताना टवाळखोर व भरधाव वेगात वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांवर देखील पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणांवर पुन्हा पोलिस दिसू लागल्याने परिमंडळ दोनमधील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहनचोरी किंवा छेडछाडीसारख्या घटनांना आळा बसवा म्हणून परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर या पोलिस स्टेशनमधील वेगवेगळ्या भागात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांशी संवाद साधून आवश्यक माहिती देत आहेत. नुकतेच इंदिरानगरमधील किशोरनगर, चेतनानगर, राणेनगर परिसरात सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक केतन राठोड व त्यांच्या सहकारी यांनी नगरसेविका अर्चना संजय जाधव यांच्या समवेत जनजागृती केली. जेष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधतांना त्यांनी चोरीला आळा कसा घातला पाहिजे, स्वतःची रक्षा कशी करावी, बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांची भूमिका, सोसायटीमधील सीसीटीव्हीचे महत्त्व, दागिने घालताना घ्यायची काळजी आदींविषयी मार्गदर्शन केले. अशाच प्रकारची जनजागृती वेगवेगळ्या ठिकाणी केली जात आहे. दरम्यान, एकीकडे नागरिकांशी संवाद सुरू असताना सोमवारी पोलिसांनी आपला मोर्चा टवाळखोरांसहित भरधाव वेगात वाहने हाकणाऱ्या बाईकस्वारांकडे वळवला. दिवसभरात ५८२ जणांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. यात २११ टवाळखोर तर ३७१ बाईकस्वारांचा समावेश होता. कारवाईचे सर्वाधिक प्रमाण नाशिकरोड पोलिस स्टेशन हद्दीत पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images