Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिडकोत पुन्हा जळीतकांड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

शहर व परिसरात नववर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन सुरू असतानाच, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील उत्तमनगर परिसरात तीन मोटारसायकल्सची जाळपोळ करण्यात आली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दहशत पसरविण्याचा हा प्रकार असल्याचा कयास सुरुवातीला लावला जात होता. मात्र, प्रत्यक्षात जुन्या भांडणातून वाहने जाळण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अंबड पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. शहरात व विशेषकरून अंबड व सिडको भागात यापूर्वीही अशा पद्धतीने समाजकंटकांनी मोटारसायकल जळीतकांड घडवून आणलेले आहे. त्यामुळे घडल्या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

उत्तमनगरमधील बंदावणे नगरमध्ये रमेश दळवी यांचे रो हाऊस आहे. घराच्या आवारात लावलेल्या त्यांच्या तीन दुचाकी काही लोकांनी पेटवून दिल्या. नागरिकांनी पाणी टाकून त्या विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत उशिर झाला होता. गाड्या जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरणी दळवी यांच्या फिर्यादीनंतर पंकज सोनवणे, विजय पाटील, राहूल गोतीसे व अजय काचे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून दळवी यांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांची कसून चौकशी केली जात असल्याचा दावाही पोलिस सूत्रांनी केला आहे.

बंदावणे मळे परिसरात पहिल्यांदाच घडलेल्या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंबड पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशी करीत आहेत. रहिवाशांनीही देखील चुकीची अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयसिसची नाशिकमध्ये दस्तक?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियाद्वारे आयसिस या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअरची दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी चौकशी केली. मुंबई, केरळ, पुणे, बंगळुरुसारख्या मोठ्या शहरातील मुस्लिम युवकांमध्ये आयसिसचे आकर्षण असल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांत उघड झाल्या आहेत. आता नाशिकमध्ये असेच काहीसे चित्र निर्माण झाल्याने पोलिस देखील सावध झाले आहे.

पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनीअरींगचे शिक्षण घेतलेला हा तिशीतील युवक सातपूर एमआयडीसीत एका कंपनीत नोकरीस आहे. काही महिन्यांपासून नकळत तो आयसिसच्या प्रभावाखाली गेला. व्हॉटसअॅपचे स्टेटससाठी सुध्दा त्याने आक्षेपार्ह मजकूर वापरला. त्याच्या मित्र परिवारात तो आयसिसच्या समर्थनार्थ विचार मांडतो. याबाबतची एक पोस्ट व्हॉटस अॅपवर व्हायरल होताच शहर पोलिस सजग झाले. त्यांनी गुरूवारी रात्रीपासूनच संबंधित मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित मुलाला पोलिसांनी शोधले असून, त्याची सखोल चौकशी केली जात आहे. मात्र, त्याचा विस्तृत अहवाल देण्यास पोलिसांनी नकार दिला. व्हॉटस अॅपवर फिरणाऱ्या मॅसेजची दखल घेऊन ही चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकारामुळे नेटिझन्समध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित मुलाला समुपदेशनाची आवश्यकता असून, पोलिसांनी त्याच दृष्टिकोनातून भूमिका घ्यावी, अशी मते व्यक्त होत आहेत.

पोलिसांची सक्रियता

आयसिसला मदत करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातील तरूण, अल्पवयीन मुले-मुली पुढे येत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. मागील महिन्यात पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचे समुपदेशन केले होते. या धर्तीवर शहर हा मुलगा आयसिसच्या प्रभावाखाली कसा आला, याचा शोध पोलिस घेत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून अर्धवट ज्ञानाच्या आधारे युवकांनी वाहवत जाऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून े केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक रन ९ जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिककरांना प्रतीक्षा असलेल्या यंदाचा १४ वा नाशिक रन ९ जानेवारीला होणार आहे. यंदा २० हजारहून अधिक नाशिककर सहभागी होणार असल्याचे नाशिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी यांनी इप्कॉस कंपनीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष एच. बी. थॉन्टेश, सेक्रेटरी उत्तम राठोड, खजिनदार राजाराम कासार, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

नाशिक रन २००३ पासून नाशिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आले. यातून उभा राहणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केला जातो. नाशिक रनमध्ये नाशिककरांबरोबरच विदेशातून सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यावर्षी होणाऱ्या १४ व्या नाशिक रनची सुरूवात महात्मानगर मैदानावरून होणार आहे. नाशिकचे सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन व महेंद्र महाजन यांच्या हस्ते नाशिक रनच्या ज्योतीचे दिप प्रज्वलन होईल. सकाळी आठ वाजता महात्मानगर बस थांब्यापासून नाशिक रनला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

असा असणार मार्ग

महात्मानगरपासून सुरुवात झाल्यावर पुढे रिलायन्स फ्रेश, पारिजातनगर, भोसला स्कूल प्रवेशद्वार, जेहान सर्कल, स्वामी समर्थ सर्कल, आय. सी. आय. सी. आय एटीएम मार्ग महाराजा हॉटेल, मॉडेल कॉलनी मार्गे रॉकेट सर्कल, कृषीनगर, सर्मथनगर, पारिजातनगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, बंजारा हॉटेलहून महात्मानगर मैदानावर नाशिक रनची समाप्त होणार आहे. नाशिक रनमध्ये सहभागी होण्यासाठी टी शर्ट नोंदणी महात्मानगर मैदानाच्या बाहेर सुरु करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगण्यासारखे काही नाही!

$
0
0

'त्या' युवकाबाबत पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियावर फिरत असलेल्या मॅसेजेसबाबत पोलिस नेहमीच सतर्क असतात. आक्षेपार्ह काही आढळून आले तर चौकशी केली जाते. 'आयसीस'चे समर्थन करणाऱ्या त्या मॅसेजबाबत तसेच झाले. ज्या मुलाच्या नावाने हा मॅसेज फिरत होता, त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, आजमितीस सांगण्यासारखे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली.

सोशल मीड‌यिाद्वारे आयसीस या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणाऱ्या शहरातील एका मॅकेनिकल इंजिनिअरची पोलिसांच्या अॅण्टी टेरेरीस्ट सेलने शुक्रवारी चौकशी केली. या मुलाने सोशल मीड‌यिावर आयसीसला पाठींबा दिल्याची पोस्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशीस सुरूवात केली. शिक्षणामध्ये हुशार असलेला युवकाची पोलिसांनी सखोल चौकशी केली. मात्र, त्यातून काही सिध्द झाले नसल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला. पोलिसांच्या माहितीत अद्यापपर्यंत संदिग्धता आढळून येत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. संबंध‌ति मुलाचे फेक स्टेटस तयार करून ते व्हायरल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे कृत्य कोणी व का केले याचा तपास होणार असल्याचे पोलिसांनी मात्र स्पष्ट केले आहे. एकीकडे संबंध‌ति मुलाचा कोणताही दोष नसल्याचे पोलिस सूत्र सांगत असले तरी त्याची पुष्ठी कोणत्याही अधिकाऱ्याकडून केली जात नसल्याने संदिग्धता निर्माण होते आहे.

याबाबत बोलताना पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले की, सोशल मीड‌यिावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या मॅसेजबाबत पोलिस नेहमीच सतर्क असतात. शुक्रवारी आम्हाला अशाच एका मॅसेजची माहिती मिळाली. त्या मॅसेजची सत्यता तपासून पाहायला हवी, असे वाटल्याने आम्ही काम सुरू केले. या संवेदनशील प्रकरणाची चौकशी सुरू असून, यापेक्षा जास्त सांगण्यासारखे काहीच नसल्याचे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. सोशल मीड‌यिाचा वापर करताना आपण अनेकदा कोणतीही सत्यता न तपासता रिट्विट किंवा मॅसेच फॉरवर्ड करण्याचे काम करतो. ही पध्दत अत्यंत चूक असून, नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसमध्ये मंगळवारपासून ‘मटा’ कार्निवलची धूम

$
0
0

तीनही दिवस सेलिब्रेटीजची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध कॉलेज कॅम्पसकडून बहुप्रतिक्षीत असणारा 'मटा कार्निवल' इव्हेंट मंगळवारपासून (दि.५) सुरू होणार आहे. कॉलेजिअन्सच्या सुप्त गुणांवा वाव देण्यासाठी दरवर्षी या धम्माल उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा तीन दिवस चालणारा हा इव्हेंट शहरातील विविध कॉलेजेसपर्यंत पोहचणार आहे. सेलिब्रेटीजसमोर अभिव्यक्तीची संधी या इव्हेंटच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पुढ्यात आहे. नववर्षाच्या सुरूवातीला प्रत्येक वर्षी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने 'मटा कार्निवल' या इव्हेंटचे आयोजन करण्यात येते. यंदा ५ ते ७ जानेवारी या कालावधीत हा उपक्रम पार पडणार आहे.

खास कॉलेजिअन्ससाठी 'मटा'च्या वतीने कॅम्पसला कार्निवलचा मंच उपलब्ध करून देण्यात येतो. कॅम्पसमधील कॉलेजात अधिकृत प्रवेश असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या मंचावर सहभागासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगचे सुप्त कलागुण सादर करण्यासोबतच प्रश्नमंजुषा, गायनादी कलांचे सादरीकरण, उत्स्फूर्त वक्तृत्व, कविता सादरीकरण, पझल्स किंवा बौध्दीक कसरतींचे गेम्स असे कलाप्रकर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना परफॉर्म करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना सेलिब्रेटीजच्या हस्ते गौरविण्यात येईल.

कार्निवलच्या पहिल्या दिवशी म्हणजे ५ जानेवारी रोजी बीवायके कॉलेज कॅम्पससह आरवायके, एचपीटी, एनबीटी , एमसीजे कॉलेज, एसएमआरके आणि भोसला कॉलेज कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभाग घेता येईल. या कॉलेज आवारातच सकाळी उपक्रमास सुरूवात होईल. या दिवशी सेलिब्रेटी म्हणून अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि महाराणा प्रताप यांची भूमिका साकारणारे फैसल खान हे उपस्थित राहतील.

६ जानेवारी रोजी केटीएचएम कॉलेज कॅम्पससह गंगापूर रोडवरील सीएमसीएस कॉलेज , एनडीएमव्हीपी कॅम्पस व पंचवटी कॉलेज कॅम्पसमध्ये उप्रकम होईल. या दिवशी सेलिब्रेटीज म्हणून प्रेरणा पेठे, चेतन चिटणीस, नेहा राजपाल यांची उपस्थिती राहील. तर गुरूवारी (दि.७) रोजी सेलिब्रेटी म्हणून अभिनेता संतोष जुवेकर यांची उपस्थिती राहील. या दिवशी आडगाव येथील मेट कॉलेजसह सिडकोतील वावरे कॉलेज, अशोका कॉलेज, के. के. वाघ कॉलेज या कॅम्पसमध्ये हा धम्माल उपक्रम पार पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणे शेतकरीविरोधीच!

$
0
0

भारत हा जसा शेतकऱ्यांचा देश आहे, तसाच तो शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही देश आहे. आज कृषी धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधीच आहेत. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतच नाही. सरकार आश्वासन देते मात्र त्यामागचे ग‌णित स्पष्ट होत नाही. यासाठी कृषी-अर्थव्यवस्थेचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास करावाच लागेल. कारण, त्यातच त्याच्यापुढील प्रश्नांची उत्तरे तरी मिळू शकतील.

- प्रा. अशोक सोनवणे

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस त्यांची तीव्रता वाढत आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती असते. दोन्हीही ठिकाणी पाणीटंचाई नंतर निर्माण होते. कधी एखाद्या पिकाचे गरजेपेक्षा अधिक उत्पादन होते. त्यामुळे बाजारातील मागणी पुरवठ्याच्या सूत्रानुसार बाजारभाव पडतात. उत्पादन चांगले होऊनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्याचा उत्पादन खर्च ही भरून निघत नाही. समजा एखाद्या मालाचे गरजेपेक्षा कमी उत्पादन झाले तर मागणी पुरवठ्याच्या सूत्रानुसार त्या कृषीमालाचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे बजारभाव मिळायला हवा. पण, तसेही घडताना दिसत नाही. यासाठी तूर आणि कांदा या दोन कृषीमालाचे उदहारण खास करून घेता येईल.

कांद्याचे उत्पादन मागणीपेक्षा कमी झाले तर क्षणिक भाव वाढतात. अशा वेळी सर्व यंत्रणा भाव पाडण्याचा संघटितपणे प्रयत्न करतात. कांदा आयात करण्याची तत्परता केंद्र सरकार दाखवते. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविते. तुरीचे भाव वाढले पण, त्या भाववाढीचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला? तूरडाळीचे भाव ज्या पटीने वाढले त्या पटीने तुरीचे भाव वाढले नाहीत. एकंदरीत बाजारव्यवस्था व सरकारी धोरणे शेतकऱ्यांच्या विरुद्धच आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की यात सुधारणा करण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. शेतकऱ्यांचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे त्यांच्या प्रश्नांची चर्चा खूप होते पण, उपाय अतिशय कमी स्वीकारले जातात. सध्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत व्यापारी, दलाल आदींनाच अधिक फायदा होतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गवगवाच अधिक होतो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात फारसे पडत नाही. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याची भाषा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यातून शेतकरी स्वयंपूर्ण करण्यासाठी की शेतकऱ्यांच्या मतांची मोट बांधण्यासाठी असते? ज्यांनी विरोधात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी वारंवार केली तेच आज सत्तेत आहे. त्यांना शेतकऱ्यांचा ७/१२ कोर करण्यासाठी कुणीही अडविलेले नाही. कर्जमाफी तर दूरच पण दुष्काळग्रस्तांना अजून पुरेशी भरपाई पण मिळालेली नाही.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव, मालेगाव, चांदवड, येवला हे खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांची हालत खूपच हलाखीची आहे. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात कुणी आपली मुलगी द्यायलाही तयार नाही. प्रत्येक निवडणुकीत भरपाईचा आणि कर्जमाफीच्या आश्वासनांचा खूप पाऊस पडतो. शेतकरी आहे तेथेच राहतो. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा खरोखरच शासन पवित्रा घेते का? बऱ्याच वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा केवळ देखावाच केला जातो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडताना दिसत नाही.

नाशिक जिल्हा कांदा, द्राक्षे, टॉमेटो, डाळिंब आदी नगदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, ही पिके खात्रीचे उत्पन्न देणारी नाहीत. गतवर्षीच्या गारपिटीने द्राक्षासह सर्वच पिकांचे नुकसान झाले. तिच परिस्थिती टोमॅटो आणि डाळिंब या पिकांची आहे. तेल्या आणि मर रोगाने अनेक डाळिंबाच्या बागा उद्धवस्त झाल्या. शेतकऱ्यांना कृषितंत्रद्यान उपलब्ध होणे आवश्यक आहे. पण, त्याचीच कमतरता आहे. सर्वच बाजूने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीवर सर्वच व्यवस्था उभ्या आहेत. संघटित वर्गाला फारसा संघर्ष न करताही या अर्थव्यवस्थेत आगदी सहज लाभ मिळतात. पण, संघर्ष करूनही शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडत नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याला संघर्ष करण्याची सवय आहे. ८०च्या दशकात न भूतो न भविष्यति असे शेतकरी आंदोलन याच जिल्ह्यात झाले. यापुढेही सततचा संघर्ष केला तरच काहीतरी मिळेल अन्यथा शेतकऱ्यांची वाट खडतरच आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोणती भूमिका घेतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते.

शेतकरी मोठ्या ताकदीने आंदोलन उभे करतात पण, हल्ली अशा अशा शेतकरी आंदोलनाचे ही राजकियीकरण व्हायला लागले आहे. शिवाय ही आंदोलने त्या विशिष्ट परिस्थितीत क्षणिक निर्माण होताना दिसतात. संपूर्ण कृषी अर्थशास्त्राचा अभ्यास करून आंदोलनाची दिशा निश्चित व्हायला हवी. देशाची अंदाजपत्रकीय व्यवस्था कशी आहे? त्यात शेतकऱ्यांसाठी नेमकी किती तरतूद करण्यात आलेली आहे याचा अधिक बारकाईने अभ्यास शेतकऱ्यांनी करायला हवा. शेतकऱ्यांच्या शिकणाऱ्या मुलांनी याचा सखोल अभ्यास केला तर पोकळ आश्वासने देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनांचा फोलपणा त्यांच्या लक्षात येईल. सत्तेवर आलो तर प्रथम ७/१२ कोरा करू, अशी घोषणा करणे सोपे आहे, त्यासाठी पैसा कसा उभा करणार? हा प्रश्न कृषी अर्थशास्राच्या अभ्यास केला तर तो शेतकरी सहजपणे विचारू शकेल. नाशिक जिल्ह्यातील ८०च्या दशकातील शेतकरी आंदोलनाने काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना शास्रीय व पुराव्याच्या आधारे उत्तर देणे हे सत्ताधाऱ्यांना शक्य झाले नाही. जागतिक अर्थव्यवस्थेतही या आंदोलनाची चर्चा झाली. तेंव्हा जागतिकीकरण आलेले नव्हते. गेल्या ३० वर्षात खूप बदल झाले. जागतिकीकरणाने शेतीचे नवे प्रश्न निर्माण केलेले आहेत. ८०च्या दशकात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत नव्हत्या. आज राज्यात सरासरी पाच तरी आत्महत्या होताना दिसतात. आजच्या कृषी-अर्थव्यस्थेसमोर शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्या कशा थांबवायच्या? हा एक ज्वलंत प्रश्न आहे. ८०च्या दशकात या अर्थव्यस्थेचा शास्रीयदृष्टीने अभ्यास करणाऱ्या राज्यातील आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच्या जागतिकीकरणाच्या परिस्थितीतील कृषी-अर्थव्यवस्थेचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास करावाच लागेल. कारण, त्यातच त्याच्यापुढील प्रश्नांची उत्तरे तरी मिळू शकतील.

(लेखक कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साकूरमध्ये आढळला मृत बिबट्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावर साकूर या गावात सुमारे चार वर्षे वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याच्या शरीरावरील जखमेवरूनच वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्य झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, सोमवारी शवविच्छेदन अहवालानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.

साकूर गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागास अर्ज देवूनही लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूस वनविभागच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

साकूर गावातील शिवाजी सहाणे यांच्या मळ्यातील घरासमोर सकाळी आठ वाजता शेतात मृत अवस्थेत बिबट्या पडलेला असल्याचे घरातील लोकांनी पाहिले. बिबट्याची बातमी परिसरात समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे यांनी वनविभागास कळविताच इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कैलास पवार, वनरक्षक रेश्मी पाठक, आर. के. आहिरे आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचा खुलासा केला. बिबट्याचे वय चार वर्षे असल्याचे सांगितले. अधिक तपास करण्यासाठी मृत बिबट्यास घोटी येथे नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी अहवाल आल्यानंतरच खरे कारण समजू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची उधळपट्टी अन् नासाडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीपुरवठ्याचे सोशल ऑडिट करण्याच्या मोहिमेत पाणीपुरवठ्या संदर्भातील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा योजनेत मोठ्या त्रुटी आढळून आल्या असून, अनेक भागात जास्तीचा तर काही भागात अनियमितही पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या मोहिमेत पाण्याची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होत असल्याची कबुली नागरिकांनी दिली आहे. विशेषतः सिडको व सातपूरमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचे समोर आले आहे. या सोशल ऑडिटमुळे पालिकेला भविष्यातील पाण्याचे नियोजन करणे सोपे होणार आहे. महापालिकेच्या या मोहिमेकडे लोकप्रतिनिधींनी मात्र पाठ फिरवली.

शहरातील सध्याच्या पाणीपुरवठ्यातील त्रुटी शोधण्यासाठी आणि भविष्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने शनिवारी अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने पाणीपुरवठ्याची सोशल ऑडिट मोहीम हाती घेतली. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता आर. के. पवार, कॉलेजसचे १८५ विद्यार्थी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी पहाटे पाच वाजेपासून ही मोहीम सुरू केली. आयुक्तांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेऊन पाण्याच्या विषयावर जनजागृती करीत नागरिक व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. महापालिकेच्या वतीने राबविलेल्या या मोहिमेत नागरिकांकडून करण्यात येत असलेली उधळपट्टी व नासाडीच अधिक समोर आली. सहा जलशुद्दीकरण केंद्र, ९४ जलकुंभावर जाऊन प्रत्यक्ष पाण्याची उचल व पाण्याची पोहच तपासण्यात आली. प्रत्यक्ष घरांमध्ये जाऊन पाण्याचे मोजमाप करण्यात आले.

सिडको व सातपूर परिसरात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सिडकोतील सावता नगर जलकुंभावरून त्या भागात प्रतिमाणसी २७० लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. तर, शेवटच्या माणसाला १२८ लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे.

सिडको सातपूर भागात नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होते. तर, काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर पाणी टाकून पाण्याची उधळपट्टी करीत असल्याचे समोर आले आहे. नागरिकच पाण्याची उधळपट्टी करत असल्याची कबुली दिली आहे. तर, पाण्याचे असमतोल वाटप होत असल्याचे या मोहिमेत दिसून आले. पाण्याचा अपव्यवही होत असल्याचे पालिकेच्या लक्षात आले. महापालिकेने जनजागृती करीत नागरिकांशी संवाद साधला. या मोहिमेमुळे पालिकेला भविष्यात पाण्याचे नियोजन कसे करावे, यासाठीचा आराखडा तयार करता येणार आहे.

जुने नाशकात सर्व्हेक्षणाचा फज्जा

जुने नाशिक : जुने नाशिकमध्ये पाणीपुरवठा संदर्भातील सोशल ऑडिटचाच बट्ट्याबोळ झाला. नळांना पाणीच न आल्याने हा सर्व्हेक्षणाचा फज्जा उडाला. दरम्यान, खडकाळी येथे मध्यरात्री होत असलेला अपुरा पाणीपुरवठा तर फकीरवाडी येथील नागरिकांच्या नळांना पाणीच येत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगरसेवकाच्या कार्यालयावर ठिय्या देत जीपीओ जलकुंभावर मोर्चा काढून पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले.

महापालिकेच्या २८ व २९ प्रभाग परिसरात सोशल ऑडिटच्या वेळी जीपीओ जलकुंभाचे व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने सकाळी आठचा पाणीपुरवठा दुपारी अडीचला झाला, तेही अवघे पंधरा मिनिटेच. यावेळी सोशल ऑडिटमध्ये दीड मिनिटात अवघे पंधरा ते वीस लिटरच पाणी बादलीत सामावल्याने प्रती माणसी हिशोबाने ते खूप कमी असल्याची तक्रार यावेळी त्रस्त नागरिकांनी केली.

प्रभाग २९ च्या नगरसेविका रंजना पवार यांनी नागरिकांना सोबत घेत जलकुंभावर मोर्चा काढला. दरम्यान, त्यानंतर पाणी येत नसलेल्या कुंभारवाडा, अष्टेकर नगर आदी ठिकाणी अवघे दोन छोट्या टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला.

लोकप्रतिनिधींची उदासीनता

नगरसेवकांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात ओरड केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सोशल ऑडिटची मोहीम हाती घेतली होती. शनिवारच्या या मोहिमेकडे मात्र बहुसंख्य नगरसेवकांनीच पाठ फिरवली. सभागृह नेते सलिम शेख, गटनेता अनिल मटाले, अशोक सातभाई, ललिता भालेराव, नीलिमा आमले, सतीश सोनवणे अशा आठ ते दहा नगरसेवकांनीच या मोहिमेत सहभाग घेवून यंत्रणेला मदत केली. महापौर व उपमहापौर यांनी आपण बाहेरगावी असल्याचे सांगून मान सोडून घेतली. तर, इतर नगरसेवकांनी त्रास नको म्हणून या मोहिमेपासून लांब राहणेच पंसत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांतील मोठी झाडे लवकरच हटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील प्रमुख रस्त्यांसह रिंगरोडवर असलेल्या जुन्या वृक्षांमुळे खोळंबलेली रस्ते रूंदीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. हाय कोर्टाच्या उच्च स्तरीय समितीने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने२१ हजार झाडे लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरलेली रस्त्यांमधील झाडे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्चपर्यंत हे रस्ते मोकळा श्वास घेतील. रस्त्यांवर मधोमध असलेल्या या झाडांमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.

शहरातील रस्ते रूंदीकरणात अनेक जुने वृक्ष अडथळे ठरले होते. सिंहस्थात निधी येवूनही या रस्त्यांचे काम होवू शकले नव्हते. गंगापूर रोड, अशोका मार्ग, वडाळा रोड, दिंडोरी रोड, मखमलाबाद रोडवरील हे झाडे तोडण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. शहरातील रस्त्यांवरील २६०९ झाडांमुळे रस्त्यांचे रुंदीकरण अडकले होते. समितीने अभ्यास करून ११४५ झाडे तोडण्यास, ६४० झाडे ट्रान्सप्लान्ट करण्यास परवानगी दिली होती. तर वड, पिंपळ, चिंच, अशी ७९० झाडे तोडू नये, असे आदेश दिले होते. ही झाडे तोडण्यापूर्वी प्रती झाड्याच्या बदल्यात तीन झाडे लावण्याचा निर्णय झाला होता. महापालिकेने ७९० झाडांच्या बदल्यात ३४४५ झाडे लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शहरात जवळपास २१ हजार झाडे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जीआयएस मॅपींगने झाडांची जनगणना

वृक्षांची गणना करण्यासाठी जीआयएस (जिओग्राफीकल इन्फॉरमेशन सिस्टीम) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी महापालिकेने २००७ मध्ये वृक्षगणना मनुष्यबळाच्या आधारे केली होती. परंतु, नवी गणना ही तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाणार असल्याने झाडांची नेमकी संख्याही प्रथमच कळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव पाणी हवं, मग पैसे मोजा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील नागरिकांच्या अतिरिक्त पाणी वापरावर आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी महापालिकेने केली आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनापेक्षा जास्त पाणी वापर करणाऱ्या कुटुंबाना वाढीव पाणीपट्टी आकारली जाणार आहे. याबाबत लवकरच महासभेत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे दर माणशी १३५ लिटर पेक्षा अधिक पाणी वापरल्यास अतिरिक्त पैसे मोजण्याची तयारी नाशिककरांना ठेवावी लागणार आहे.

महापालिकेने शनिवारी राबविलेल्या पाण्याचे सोशल ऑडिट मोहिमेत पाणी वापरापेक्षा त्याची उधळपट्टीच अधिक होत असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. शहरातील १९ लाख लोकसंख्येसाठी ३५ कोटी लिटर पाणीपुरवठा होऊन सुद्धा पाण्याची बोंब आहे. सरासरी दर माणशी १८५ लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, यातील बहुतांश पाणी वाया जात आहे. सध्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता असतांना नागरिकांच्या या उधळपट्टीला चाप लावण्याचा विचार प्रशासन करीत आहे. सध्या महापालिका एक हजार लिटरला ५ रुपये दर आकारत आहे. अन्य महापालिकांपेक्षा हा दर कमी असल्याचा दावा केला जातो. शंभर टक्के पाणीमीटर बसविण्याची मोहीमही हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना वाढीव पाणीपट्टीसाठी तयार रहावे लागणार आहे.

अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह?

प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला तरी त्याला नगरसेवकांकडून विरोध होण्याची चिन्हे आहेत. पुढील वर्षी निवडणुका असल्याने नागरिकांचा रोष घेण्यास नगरसेवक तयार होणार नाहीत. घरांना मीटर बसविले असले तरी सोसायट्यांमधील पाणीपट्टी कशी लावणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. मोठ्या बिल्डिंगमध्ये पाण्याचे एकच कनेक्शन असते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात किती वापर होतो, याचे मोजमाप करणे शक्य नाही. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे.

शंभर टक्के घरांचे मोजमाप

घरपट्टी वाढीवरही पालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शहरातील प्रत्येक घराचे नव्याने मोजमाप केले जाणार आहे. यासाठी आयुक्तांनी पाच जानेवारीला कॉलेजेसच्या प्राचार्यांची बैठक बोलावली आहे. पाणीमीटर तपासणी व घरांची मोजणी एकत्रित केली जाणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले. कॉलेजेसने तयारी दर्शवली नाही तर खाजगी संस्थेकडून हा सर्व्हे केला जाणार आहे. शंभर टक्के मीटर, शंभर टक्के घरांचे सर्व्हेक्षण हा पालिकेचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगबाजीवर संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नायलॉन तसेच काचेची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई केली. संध्याकाळपर्यंत नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर रात्री आणखी आठ गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, काचेच्या कोणत्याही प्रकारचा मांजा धोकादायक ठरवत पोलिसांनी कारवाई केल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, पतंग उडवण्यासाठी नेमकी कोणत्या धाग्याचा वापर करायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नायलॉन या धोकादायक मांजामुळे पक्षी संकटात सापडतात. मनुष्याच्या जीविताला धोकाही कायम असतो. काचेच्या कोटिंगमुळे धारदार झालेल्या मांजामुळे कान - नाक प्रसंगी मान कापण्यासारखे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नायलॉनसह काचेची कोटिंग असलेल्या सर्व प्रकाराच्या मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे. अनेकदा सूचना देऊनही मांजा विक्री होत असल्याचे समोर आल्याने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी नाशिकरोड, सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर तसेच देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विक्रेत्यांच्या दुकानावर छापे मारून नायलॉन मांजा तसेच, काचेमुळे धारदार झालेला मांजा जप्त केला. या प्रकरणी संध्याकाळपर्यंत नऊ विक्रेत्यांवर आयपीसी कलम १८८ नुसार वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. आणखी आठ गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त धिवरे यांनी दिली.

पतंग उडवण्यासाठी साधा दोराही पुरेसा आहे. मात्र, पतंग उडवणारे दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी धारदार मांजाचा उपयोग करतात. त्यात नायलॉन मांजाची भर पडल्याने या खेळाचे मूळ स्वरूप पूर्णतः बदलले. आता, पतंगबाजांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मांजावरच कारवाई सुरू केल्याने पतंगाच्या खेळावर संक्रांत आली

असल्याची भावना विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

सिडको-सातपूरमध्ये कारवाई

सिडको आणि सातपूर भागातील मांजा विक्रेते तसेच साठेबाजांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी अंबड परिसरातील दुकानावर छापे मारून साठेबाजांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सकाळपासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सातपूर भागात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमृत पाटील यांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेतला. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईबाबत माहिती समजताच विक्रेत्यांनी मांजाचा साठा इतरत्र हलवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, संक्रांतीपर्यंत कारवाईत

सातत्य ठेवण्याची मागणी केली जाते आहे. 'मांजा विक्रेत्यांवर गुन्हे अन् साठेबाज मोकाट' याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. या

पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापे मारण्यास सुरुवात केली असून, परिसरातील साठेबाजांमध्ये खळबळ उडाली

आहे.

मांजा विक्री, टवाळखोर, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली. कॉलेज, क्लासेसजवळ थांबणाऱ्या १५४ टवाळखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर ७८ रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर कारवाई झाली. ट्रिपलशिट, अथवा वाहतूक नियम भंग करणाऱ्या ८१ जणांवर कारवाई झाली.

- श्रीकांत धिवरे,

पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगोळीच्या नाना छटा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प रांगोळी ही आनंद द्विगुणित करण्यासाठीचा एक कलाप्रकार समजला जातो. प्रत्येकाच्या दारात रांगोळी सजलेली पाहणे हे मनमोहणारे ठरते. भगूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन विद्यामंदिरात नुकतेच वार्षिक रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. येथेही रांगोळी वेगवेगळ्या रूपात पाहणे मनमोहक ठरले.

शाळेतील ५ वी ते १२ च्या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आधारित रांगोळ्या काढत उपस्थितांसह परीक्षकांचेही मने जिंकली. वार्षिक रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संस्कार भारती, मुक्तहस्त, संकल्पचित्र, पोट्रेट आदी प्रकारात रांगोळ्या रेखाटल्या. विद्यार्थ्यांना संस्कारभारती रांगोळीतील बारकावे समजून सांगतांना देवयानी राहणे या विद्यार्थिनीने पाचबोटी, बिंदू, चकली, गोपद्म इतर विद्यार्थ्यांना संस्कारभारती रांगोळीतील बारकावे समजावून

सांगितले.

कलाशिक्षक संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ, कृष्णा लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रांगोळी स्पर्धेत ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ल. चं. जोशी, उप मुख्याध्यापक श. रा. वैद्य, कार्यवाह के. डी. वाघ आदींनी विद्यार्थ्यांच्या रांगोळ्यांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वितरणात असमतोल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सिडको, सातपूरच्या विभागातील अधिकाऱ्यांनी पहाटे पाच वाजेपासून परिसरातील पिण्याचे पाण्याचे ऑडिट सुरू केले होते. यामध्ये सिडको, सातपूरचा काही भाग वगळला तर बहुतांश भागात मुबलक पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात इंजिनीअरिंग कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाणी ऑडिट करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी देखील नवीन नाशिकच्या सिडको भागात अधिकाऱ्यांसमवेत सहभाग घेतला.

नाशिक शहरातील भविष्यात पाणीटंचाईचा सामान करावा लागू नये, यासाठी आयुक्त डॉ. गेडाम यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना शहरातील पाणीपुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यात चोवीस तास महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील विविध भागात पाण्याचे ऑडिट केले. दोन जानेवारी पहाटे पाच वाजेपासून तर तीन जानेवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पाण्याचे ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये सिडको, सातपूरच्या उंच भागात पाण्याचा प्रवाह कमी असल्याने कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. परंतु, बहुतांश भागात मुबलक व प्रेशरने पाणी मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑडिटमध्ये सेकंदात किती पाणी मिळते, किती तास पाणी दिली पाहिजे, तसेच कुठल्या भागात पाणी वाया घालविण्याचे प्रमाण अधिक आहे, आदींची पाहणी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केली.

कोणत्या भागात पाणी अधिक अथवा कोणत्या भागात पाणी कमी आहे याचीही पाहणी करण्यात आली. सिडको विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांसह पाणीपुरवठा, विद्युत, बांधकाम, ड्रेनज यांसह विविध कर विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. सातपूरला विभागीय अधिकारी महेंदकुमार पगारे, बांधकाम उपअभियंता रमेश पाटोळे, पाणीपुरवठा उपअभियंता ए. एन. जाधव, अशोक मेश्राम यांसह सर्वच विभागातील कर्मचारी होते.

नाशिकरोडला पाण्याची गळती कमीच

नाशिकरोड : पाणी वितरणातील गळती व चोरी रोखण्यासाठी नाशिकरोड आणि परिसरातील पाणीपुरवठ्याच्या सोशल ऑडिटला पहाटे पाचलाच सुरुवात झाली. पाण्याचे ऑडिट करण्यासाठी नाशिकरोड विभागीय कार्यालयाने जय्यत तयारी केली होती. रविवारी पहाटे पाचपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांनी दिली.

नाशिकरोड, चेहडी, जेलरोड, उपनगर, गांधीनगर, देवळालीगाव परिसरात जलकुंभापासून नागरिकांच्या नळापर्यंत पाण्याची गळती अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. नाशिकरोड येथे महापालिकेचे १६ जलकुंभ आहेत. नाशिकरोडला भीमनगर, सामनगाव, मुक्तीधाम, उपनगर, गांधीनगर, विहीतगाव, शिवशक्तीनगर, दुर्गा उद्यान, पवारवाडी आदी जलकुंभावर ही मोहीम राबविण्यात आली. या जलकुंभावर आणि वितरणाच्या ठिकाणी मिळून सुमारे दोनशे कर्मचारी पाण्याचे ऑडिट करण्याच्या कामाला जुंपले. काही कर्मचाऱ्यांनी चोवीस तास ड्यूटी केली. पाणीपुरवठा अभियंता नितीन पाटील आणि विभागीय अधिकारी कुसूम ठाकरे यांनी पहाटे तीनलाच हजेरी लावली. जलकुंभावरून प्रत्यक्षात नळापर्यंत पोहचणाऱ्या पाण्याची मोजणी करण्यासाठी नाशिकरोडला १६ जलकुंभावर पाण्याचे ऑडिट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल ऑड‌िटला ‘केबीटी’चे बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या सोशल ऑडिट मोहिमेत मविप्रच्या कर्मचीर अॅड. बाबूराव गणवतराव ठाकरे अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पालिकेच्या मोहिमेला बळ दिले. ९४ जलकुंभावर जाऊन विद्यार्थ्यांनी पाणीपुरवठ्यातील त्रुटी शोधण्यासह प्रत्यक्ष पाण्याचे मोजमाप केले. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेला पुढील काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

शहरातील पाणीपुरवठ्याचा अभ्यास करण्यासह त्रुटी शोधण्यासाठी महापालिकेने अभियांत्रिकी कॉलेजच्या मदतीने शनिवारी पाणीपुरठ्याचे सोशल ऑडिटची मोहीम हाती घेतली. यात मविप्रच्या कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह चार कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्त्य विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. सनेर यांच्या नेतृत्वाखालील प्रा. एम. पी. चौगुले, प्रा. एस. जे कढभाणे, प्रा. मधुरा आहेर डॉ. के. टी. पाटील, प्रा आर. व्ही. देवळकर आणि प्रा. प्रितेश आहेर यांनी या प्रकल्पाचे नियोजन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महापालिका व कॉलेज विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे शहरातील ९४ जलकुंभांच्या वितरण प्रणालीचा अभ्यास केला. जलकुंभाची पातळी तपासणे, जलकुंभ भरण्यासाठी लागणारा वेळ, पाणी संपण्याची वेळ, प्रत्यक्ष घरापर्यंत किती पाणी पोहचते याचे मोजमाप करण्यात आले. तसेच पाण्याची उधळपट्टी, नासाडी, वितरणातील त्रुटी अभ्यास करून विद्यार्थ्यांनी महापालिकेला माहिती दिली. या सर्व्हेक्षणातून येणारी माहिती महापालिकेला उपयुक्त ठरणार असून, पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी उपयोगी ठरणारी आहे.

अभियांत्रिकीचे १८५ विद्यार्थी

महापालिकेच्या या मोहिमेत अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह, के. के. वाघ, संदीप फाऊंडेशन, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे १८५ विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेल्या कामाचा अहवाल ते रविवारी महापालिकेला सुपूर्द करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरापत काढून तरुणास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुन्नसने का पाहतो, अशी विचारणा दोघा संशयितांनी अंकित त्रिभूवनलाल कालीया (वय २४) या युवकास बेदम मारहाण केली. जुनी पंडित कॉलनी येथे राहणाऱ्या अंकितने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अंकित त्याच्या मित्रासोबत गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास राका कॉलनीत उभा होता. त्यावेळी हॉटेलमधून गाडीकडे परतत असताना रस्त्याच्या कडेला दोन संशयित युवक उभे होते. तेव्हा अंकित याने दोघांकडे पाहिले म्हणून दोघांनी मारहाण केली.

पोत व मोबाइलची चोरी

घरमालक घराची कडी लावून बाहेर गेलेला असताना चोरट्याने कडी उघडून घरातील सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, मोबाइल आणि रोकड चोरून नेली. बुधवार पेठेतील डिंगरअळी परिसरात २५ डिसेंबर रोजी ही घटना घडली. किरण मधुकर शिंदे यांच्या घराची कडी उघडून चोरट्याने सुमारे १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दिंडोरी रोडवर घरफोडी

घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दिंडोरीरोडवरील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या सुनील मोतीराम लोखंडे यांच्या घरी घडली. लोखंडे २८ ते २९ डिसेंबर रोजी बाहेर गावी गेले असता चोरट्याने रोकड आणि दोन सिलेंडर टाक्या असा ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. लोखंडे यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

जुगाऱ्यांवर कारवाई

निमाणी बसस्थानक येथील जुगार खेळणाऱ्या १४ जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राजवाडा परिसरातील विजय पगारे व त्याच्यासोबत १३ जुगारी निमाणी बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयाजवळ जुगार खेळत असल्याचे पंचवटी पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

प्रवाशाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने ४५ ते ५० वयोगटातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या व्यक्तीचा मृतदेह लहवित गावाजवळ आढळून आला. या प्रकरणी पोलिस पाटील संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

युवकाचा मृत्यू

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेल्या युवकाची ओळख पटलेली नसून, या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पुरुषाचा मृतदेह आढळला

पंचकगाव येथील स्मशानभूमीसमोरील गोदापात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,येवला

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आजही विविध समाजातील जातपंचायतींमधील कुपरंपरा, अनिष्ठ प्रकार आजही सुरूच असल्याचे दिसत आहेत. अशाच प्रकारच्या काशिकापडी समाजातील अनिष्ट रूढींविरोधात जापंचायतीच्या नऊ पंचाविरोधात येवल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काशीकापडी समाजातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांसमोर पतीच्या मृतदेहासोबत डोक्यावर तूप लावून विधवेला आंघोळ, दहाव्या दिवशी तिचा सुहासिनीचा साज उतरवणे, तिचे पांढरे कपाळ कोणाला दिसू नये म्हणून दिवसभर अंधाऱ्या कोठडीत कोंडणे आदी अनिष्ठ प्रथा राजरोसपणे सुरू आहेत. याच प्रथांच्या विरोधात समाजातील येवला शहरातील रहिवाशी कोमल वर्दे यांनी आवाज उठवत आव्हान दिले आहे. आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईला याच प्रथांखाली हिन वागणूक देणाऱ्या पुण्यातील जातपंचायतीच्या नऊ पंचाविरोधात कोमल वर्दे यांनी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात २४ डिसेंबर २०१५ रोजी वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळी करण्यात आलेल्या या कुप्रथेच्या विरोधात येवला शहरातील पारेगाव रोडलगतच्या पद्मावती नगरमधील रहिवाशी कोमल वर्दे यांनी आवाज उठवित दि. ३१ डिसेंबर रोजी पुणे येथील फरासखाना पोलिस ठाण्यात ईमेलद्वारे तक्रार नोंदवली होती. मात्र, तेथील पोलिसांकडून त्याबाबत कुठलीही पुढील कारवाई न झाल्याने कोमल वर्दे यांनी येवला शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमीयुगुलाचा मित्रांनीच केला घात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिनाभरापूर्वी गंगापूर रोडवरून बेपत्ता झालेली अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनी शर्वरी फडकेसह तिचा मुंबईतील नालासोपाऱ्याचा मित्र अमन सिंग या दोघांचा अवघ्या लाखभर रुपयांसाठी खून झाल्याचे उघड झाले आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारातील कच नदी परिसरात ३० डिसेंबर रोजी दोघांचे मृतदेह आढळून आले होते.

घरातून फरार झाल्यानंतर हे प्रेमीयुगूल पुणे येथे गेले होते. तेथून ते संगमनेरमध्ये परतले. संशयित आरोपी पंकज सोनवणे आणि अमन सिंग हे चांगले मित्र होते. त्यामुळे घरातून पळाल्यानंतर शर्वरी, अमन आणि पंकज हे एकत्र पुण्याला गेले. अमन व शर्वरीने आपल्याकडील साडेचार लाख रुपये विश्वासाने पंकजकडे सोपवले. या पैशातूनच पंकजने नोव्हेंबर महिन्याअखेरीस नवीकोरी इटॉस कार खरेदी केली. मात्र, पंकजला या दोघा प्रेमीयुगुलाकडून आणखी एक लाख रुपये हवे होते. तो सातत्याने तशी मागणी करीत होता. २९ ते ३० डिसेंबरच्या दरम्यान याच कारणास्तव विजय काचे, राहुल गोतिसे यांना सोबत घेऊन पंकज संगमनेरला पोहचला. तिथे त्यांनी शर्वरीसह अमनला कारमध्ये बरोबर घेतले. आधी घेतलेले पैसे आणि नव्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे तिघा संशयितांचे अमनसोबत वाद होताच आरोपींनी आपल्याकडील चॉपरने दोघांवर वार करून हत्या केली.

यानंतर नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोटा शिवारातील कच नदी परिसरात मृतदेहावर पेट्रोल टाकून तिघांनी धूम ठोकली. संगमनेरहून परतल्यानंतर अंबड परिसरात झालेल्या वाहनजाळपोळीच्या गुन्ह्यात राहुल गोतिसेला अटक करण्यात आली.

चेनने दाखवला मार्ग

मृतदेह आढळून आल्यानंतर संगमनेर पोलिस स्टेशनचे सिनीअर पोलिस इन्सपेक्टर अनिल नलावडे व पीएसआय मुख्तार शेख यांनी तपासाला सुरुवात केली. त्यात, घटनास्थळी एक सोन्याची चेन पोलिसांना सापडली. ही चेन पुण्यातील एका ज्वेलरीशॉप तयार झाल्याची खात्री पटल्यानतंर पोलिसांची एक टीम पुण्याला रवाना झाली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे संशयित आढळून आले. यानंतर पोलिसांनी वेळ न दडवता संशयितांचा पत्ता शोधून त्यांना जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात थंडी परतली

$
0
0

शहरात ८.५ अंश नीचांकी तापमानाची नोंद



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात कमी झालेल्या थंडीचा जोर आता पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी पुन्हा एकदा राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. रविवारी ८.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री व पहाटे थंडीचा कडाका असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही सतावू लागल्या आहेत.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात थंडीचा कडाका खूपच वाढला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम होऊन नाशिकमधील तापमापनातही कमालीची घट झाली होती. सातत्याने तीन ते चार दिवस नाशकात नीचांकी तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक थंडीचे ठिकाण म्हणून निफाड तालुकाही त्यामुळे चर्चेत आला. निफाडमध्ये ५ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्याचवेळी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तापमानही ५.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या रविवारपासून पुन्हा हे तापमान वाढत गेले. ३० डिसेंबरला ११.२. ३१ डिसेंबरला १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसांतही पारा अनुक्रमे १०. १ आणि १०.४ अंशावर होता. हेच तापमान रविवारी खाली उतरून ८.५ अंश झाले. नाशिक खालोखाल नांदेड येथे किमान तापमान ९.० अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. पुणे आणि जळगाव १०.२, नागपूर ११.२, गोंदिया १२.८, सातारा १२.९, मालेगावमध्ये १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित असलेल्या महाबळेश्वरमध्येही किमान तापमान १४ अंशांवर पोहोचले आहे. एकिकडे किमान तापमान कमी होत असताना कमाल तापमान मात्र चांगलेच वाढले आहे. रविवारी जिल्ह्यात कमाल तापमान ३२.९ अंश नोंदविले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्याबाबत नियोजन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवडसह अनेक तालुक्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करावे, असे आदेश सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, समाज कल्याणच्या सहाय्यक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये पाणीसाठा खूपच कमी असल्याने जून, जुलैपर्यंत सर्व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करता येईल, त्‍यावर लक्ष केंद्रित करा अशी सूचना ना. भुसे यांनी केली. यंदा पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. त्यातच मराठवाड्याला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे नाशि‌क शहर आणि जिल्हावासीयांवरच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. पाण्याचे ऑडिट, प्रत्येक थेंबाचा हिशेब यानुसार एप्रिलनंतरच पिण्यासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होईल की नाही याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हीच स्थिती जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांचीही आहे. बैठकीत मात्र आगामी धोरणाबाबत कुठलाच निर्णय झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीत रंगला मराठमोळा माहोल

$
0
0



सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर.







दिवंगत कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या 'सांगा कसं जगायचं?' या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रीयन संस्कृतीबद्दल भाष्य करणाऱ्या पथनाट्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. 'कोंबड्यानं बांग दिली', 'हरी मुखे म्हणां', 'गावात आली वसुदेवाची स्वारी' या अभंग, ओव्यांबरोबरच हातात कंदील घेतलेला झाडावरचा पिंगळा या भूमिकांनी कॉलेजियन्सचे लक्ष वेधून घेतले. वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीनी सादर केलेली 'छबीदार छबी' ही लावणी, प्रतिक बफणा ग्रुपचे 'या कोळी वाड्याची शान' या परफॉर्ममन्सवर कॉलेजियही थिरकले.

भक्ती आठवले या विद्यार्थिनीने सादर केलेल्या 'शेजारणीने बरं नाही केलं गं बया' या भारुडाने कॅम्पसमध्ये हशा पिकवला. कार्यक्रमाच्या अखेरीस लेझिमसह 'करीतो नमन म्हणत गणरायाला' गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिता पंचभाई व नेहा तावडे यांनी केले. कॉलेजचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, स्टुडंट काउन्सलिंगचे अध्यक्ष आर. टी. आहेर, जर्नालिझम विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश नखाते, अंकुश सोनवणे, प्रफ्फुल अत्रावळकर यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच लोककलेचे सौंदर्य पिढीपर्यंतही पोहोचावे, या हेतूने कॉलेजमधील कलामंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापासून कॉलेजियन्स या कार्यक्रमाच्या तयारीत दंग होते. त्यामुळे प्रत्यक्ष या दिवसाची मजा लुटताना प्रत्येकात उत्साह संचारला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images