Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रध्वज सन्मानासाठी दक्ष

$
0
0

पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक शहर क्षेत्रात प्लास्टिक ध्वजाची विक्री करणाऱ्यांवर काटेकोर नजर ठेवण्यात येईल. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहरात प्लास्टिक ध्वजांचा वापर वाढत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. यानुसार प्लास्टिक ध्वजाचा उपयोग कटाक्षाने टाळण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा १९७१ कलम २ नुसार कारवाई करण्यात येते. राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडाप्रसंगी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतरत्र दिसतात. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशानुसार आदेशाचा भंग करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.

सामाजिक संस्थांच्या वतीनेही आवाहन प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वाहनांवर लावताना किंवा राष्ट्रप्रेमाचे प्रतिक म्हणून जवळ बाळगण्यामागची नागरिकांची भूमिका योग्य असली तरीही नंतर मात्र या ध्वजांची हेळसांड होते. याबाबत शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही प्रबोधन करण्यात येत आहे. या प्रकारच्या ध्वजांचा उपयोग टाळावा, असे आवाहन विविध शाळा, कॉलेजेस आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले. दिवसभरात या प्रकारे प्लास्टिकचे ध्वज नजरेस पडल्यास सोशल माध्यमांद्वारे किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनासारख्या औचित्यांवर प्लास्टिकचे राष्ट्रीय ध्वज विक्रीस येतात. मात्र, अशा ध्वजांच्या वापरात केंद्राच्या गृह मंत्रालयाची मान्यता नाही. आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान जपण्यासाठी नागरिकांनी अशा प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा; अन्यथा पोलिसांच्या वतीने दोषींवर व विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. - अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छोट्या नाणीसम्राटाचा वर्ल्ड रेकॉर्ड

$
0
0

माणके कंपाउंड परिसरातील संस्कार बेदमुथा याची नोटा आणि नाणे यांनी भरलेली खोली सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. आता हा छोटा नाणेसम्राट जागतिक विक्रमवीर होण्याच्या मार्गावर आहे. मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटलाल बेदमुथा यांचा नातू आणि बिपीन बेदमुथा यांचा मुलगा संस्कार याने तीन वर्षांपासून देशी-विदेशी नाणी, नोटा, तिकिटे यांचा संग्रह करण्याचा छंद जपला आहे. एकदा आई वडिलांसोबत तो औरंगाबाद येथे गेला. तेथे एका पोलंडच्या जोडप्याकडे त्याला एक नाणे दिसले. त्याला ते आवडले. त्याने त्यांच्याकडे ते नाणे विकत मागितले. पण, त्याची हौस पाहून त्या जोडप्याने नाणे भेट देऊन टाकले. यापासून संस्कारच्या या विश्वविक्रमी छंदाची सुरुवात झाली.

सुरुवातीला अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून वडिलांनी त्याला विरोध केला. मात्र, अंकाई येथील गुरू हसमुख मुनिजी यांनी संस्कारला शिवकालीन नाणे भेट देऊन छंद जोपासण्यास सांगितले. कुटुंबीय तसेच अहमदनगर येथील बन्सीलाल लोढा नाशिकचे श्री अच्युत यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. संस्कारच्या या छंदाने गरुड भरारी घेत संग्रहाच्या विश्वात आपले वेगळे आस्तित्व निर्माण केले. विविध राज्यांमधक्षल प्रदर्शनांना भेटी देतांना प्रवासात परदेशी पर्यटकांकडे कोणताही संकोच न ठेवता मागितलेली नाणी व तिकिटे तसेच, अमेरिका दौऱ्यावर नासा भेटीत गेला असता या छंदिष्ट मुलाने तिथून विनयशील स्वभावाच्या जोरावर आणलेली नाणी अशा विविध मार्गाने हा प्रवास विश्वविक्रमाकडे निघाला आहे.

असा आहे बिपीनचा खजिना आतापर्यंत विदेशातील ८,२६६ नाणी, ३६६ नोटा, १,९५५ तिकिटे संग्रहित आहेत. तसेच भारतातील ४,५६० पोस्ट तिकिटे, ९६० नाणी आणि शेकडो नोटा या विक्रमवीराकडे आहेत. इंदूरचे नाणी संग्रहक गिरीश शर्मा यांनी संस्कारचे कौतुक करून त्याला मार्गदर्शन केले. येवल्याच्या विद्या इंटरनेशनल शाळेत शिकणाऱ्या संस्कारने आता गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे झेप घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात ठिय्या

$
0
0

शहरातील नामवंत १६ कॉलेजेसने विद्यार्थ्यांकडून जादा फी घेतली आहे. त्याविरुद्ध छात्रभारती तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे. जादा फी विद्यार्थ्यांना परत करावी, असा आदेश शिक्षण विभागाने काढला असतानाही शुल्क परत करण्यात आले नव्हते. त्यामुळे छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष सागर निकम, शहराध्यक्ष राकेश पवार, विशाल रणमाळे, रोशन वाघ, मुन्ना पवार, निलेश तासकर, आरती मडके, गौरी जाधव, कौमल गांगुर्डे, गणेश चौधरी, निखील गुंजाळ, प्रशांत शार्दुल, वैभव गुंजाळ, दीपक पवार आदींनी सूर्यवंशी यांचे कार्यालय गाठले. अधिकारी नसताना त्यांच्या खुर्चीला घेराव घातला. नंतर ते येताच त्यांच्यापुढे ठिय्या दिला.

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडेही दाखल झाले. जादा फी विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चार महिन्यापूर्वी काढले असताना आणि कॉलेजेसच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेल्या तीन समित्यांचा अहवाल येऊनही कारवाई होत नसल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली. अखेर सूर्यवंशी यांनी कॉलजेसने जादा फी ३० जानेवारीपर्यंत परत करण्याचे आदेश काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असहिष्णुता पुतळ्याचे मुस्लिम ब्रिगेडतर्फे दहन

$
0
0

'इसि‌स'सारख्या संघटना भारतीय तरुणांना अमिष दाखवून तसेच धर्मांतराचा बुरखा घालून इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा निषेध करून छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने दहशतवाद जातीयवाद व असहिष्णुतेच्या पुतळ्याला चपला मारून निषेध करण्यात आला. याप्रसंगी तरुणांनी राष्ट्र निर्मिती व विकासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अजिज पठाण यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष मुश्ताक शेख, संभाजी ब्रिगेडचे योगेश मिसाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनोव्हेशन कल्चर नाशिकची नवी ओळख

$
0
0

स्मार्ट सिटी अभियानात शहरवासियांचा सहभाग व प्रतिसाद व्हावा, यासाठी महापालिकेने विविध स्पर्धा घेतल्या. त्यातील विजेत्यांना सोमवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांत पारितो‌षिक देऊन गौरविण्यात आले. यात ऑनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पनेचे पहिले ५० हजाराचे बक्षीस आदिती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले. जितेंद्र कन्सारा यांना द्वितीय (३० हजार रुपये), मोहन काळोगे यांना तृतीय (२० हजार रुपये) बक्षीस मिळाले. सोबतच अजय चांडक, ए. गोसावी, शिल्पा धामने, विशाल सांगळे यांना दहा हजार रुपयांचे पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तर स्मार्ट सिटीच्या लोगोचे प्रथम क्रमांकाचे ११ हजाराचे पारितोषिक ऋता कानडे यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात झाले. यावेळी उपमहापौर गुरूमित बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, वत्सला खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना रासकर म्हणाले, की कुंभमेळ्यानिमीत्ताने नाशिकमध्ये इनोव्हेशन कल्चरला सुरूवात झाली आहे. इनोव्हेश बद्दल नाशिकमध्ये चर्चा व काम होत असल्याने त्याची चर्चा आता जगभर व्हायला लागली आहे. कुंभमेळा, कुंभथॉन, स्मार्ट सिटीमुळे झालेल्या बदलामुळे मुंबई, दिल्ली नंतर जागतिक पातळीवर नाशिकचेही नाव घेतल जात आहे. हे इनोव्हेशन कल्चर अधिक वाढायला हवे. टाटाच्या इनोव्हेशन सेंटरमुळे त्यात आणखीन भर पडली आहे. स्मार्ट सिटीच्या निमीत्ताने आलेल्या तीन हजार संकल्पना या इनोव्हेशन कल्चर वाढीस लागल्याचा पुरावा आहे. या कल्चरमुळे जगभरातील कंपन्या या नाशिकमध्ये येतील आणि नाशिक एका वेगळ्या उंचीवर पोहचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने

नाशिक झेप घेत असून त्याचा उपयोग इथल्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्मार्ट सिटीमुळे नाशिकमधील तरूणांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. या संकल्पनामुळे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार झाल्याचे ते म्हणाले. तर परदेशातील कल्चरही आपल्याकडे सुरू झाल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनेत बदलीसाठी अतिरिक्त जबाबदाऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नगररचना विभागात बदलीसाठी कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांकडून लॉबिंग केले जाते. पंरतु आता या विभागातील क्रिम पोस्ट‌िंगवर बदलीसाठी लॉबिंग लावणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागणार आहेत. या विभागात येवू इच्छिणाऱ्या पदनिर्देशीत अधिकारी म्हणून पद दिले जाणार असून, नगररचनेतील फाईल्स मंजूर करण्यासह अतिक्रमणासह इतर जबाबदाऱ्याही स्व‌िकाराव्या लागणार आहेत. शहरातील अतिक्रमणाला थेट जबाबदार धरण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आहे.

पालिकेत सध्या बदल्यांचा मौसम सुरु झाला असून, सर्वच विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बदल्यांची गाज येणार आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यात २२ संवर्गापैकी ११ संवर्गातल्या २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु यात नगररचना विभागाला अद्याप हात लावलेला नाही. या विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तर या विभागात जाण्यासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे.

पालिकेतील सर्वात क्रिम पोस्ट‌िंगचा हा विभाग असल्याने यात जाणाऱ्यांसाठी आयुक्तांनी नवा फंडा शोधला आहे. या विभागात बदली हवी असल्यास त्यास पदनिर्देशीत अधिकारी म्हणून आता पोस्ट मिळणार आहे. परंतु या पदासोबतच त्याच्यावर नगररचना विभागातील कामकाजासह इतर आणखी चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाणार आहेत. संबंध‌िताला कार्यालयीन कामकाजासह शहरातील अतिक्रमणाशी संबंध‌ित अतिरिक्त काम करावे लागणार आहेत. यामुळे बदलीसाठी अतिरिक्त जबाबदारी स्व‌िकारावी लागणार आहे.

शहरातील विश‌िष्ट भाग त्याला दिला जाणार असून त्यातील अतिक्रमण शोधणे,त्याचा फालोअप घेवून ते पाडणे अशी जबाबदारी त्याला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे बदलीसाठी इच्छुक असलेल्यांचा हिरेमोड होण्याची शक्यता आहे. क्रिम पोस्ट‌िंगसोबतच इतर झंझटीही मागे लागणार असल्याने त्रास नको म्हणून या विभागातील बदल्यांसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या रोडावणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिवटिवाट पण ऑफलाइन!

$
0
0

नाशिक हळूहळू स्मार्ट होत आहे. त्याच्या विकासात भर पडत आहे. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्यांच्या नवमाध्यम वापरातही वाढ होतांना दिसते. पण ही माध्यमे आपल्याला किती फायद्याची आणि घातक आहेत याचा आपण विचार करायला हवा. तसेच यावर टाकल्या जाणाऱ्या मजकूराचा आपल्यावर कसा परिणाम होतो, याचाही विचार होणे आवश्यक आहे. यासोबतच अनेक प्रश्नही माध्यमे वापरताना आपल्याला भेडसावतात. याचेच उत्तर शोधण्यासाठी या अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा प्रयत्न केला जात असून नुकतेच ट्विटर संमेलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता याला यश नक्की मिळेल, असे आयोजकांचे मत आहे. ऑनलाइन राहताना येणाऱ्या अडचणी आणि आपल्याला व्हर्च्यूअली भेटणाऱ्या मित्रांना ऑफलाइन भेटून ही 'ट्विटअप' संकल्पना साकार होणार आहे. यासाठी ट्विटर युझर्सकडून ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. तसेच यासाठी कोणतेही शुल्क नाही. कार्यक्रमाचे आयोजन 'जस्ट नाशिक', 'वूई आर नाशिक' आणि 'नाशिक न्यूज' या नावाने ट्विटर अकाऊंट चालविणाऱ्या तरुणांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सायकल स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य हौशी सायकलिंग असोसिएशनतर्फे नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. या संघातील खेळाडूंच्या निवडीसाठी खुल्या गटातील पुरुष व महिला गटात ४० किमी. अंतराची स्पर्धा घेण्यात आली, त्यातून संघाची निवड करण्यात आली आहे.

या निवडचाचणीत पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ निवडण्यात आले. पुरुष गटात सर्वेश धोंडगे (प्रथम), अनिकेत सोनवणे (द्वितीय), भरत सोनवणे (तृतीय) तर महिला गटात प्रांजली पाटोळे (प्रथम), यामिनी खैरनार (द्वितीय), रेणुका गावीत (तृतीय) यांनी विजेतेपद पटकावले. त्याशिवाय राज्य स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघात वरील विजेत्यांसह योगेश टिळे, प्रवीण शेंडे, किशोर डुमरे, महेंद्र पवार, नीलेश भोये यांची निवड करण्यात आली. संघाचे व्यवस्थापक म्हणून योगेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. निवड चाचणीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव नितीन नागरे, राजेंद्र निंबाळते, शरद जोशी, हेमंत वैद्य, उत्तम जोशी, कैलास पोटींदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धात्मक सायकलिंगसाठी नाशिक जिल्हा हौशी सायकलिंग असोसिएशनतर्फे विविध गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी सचिव नितीन नागरे (सराफ बाजार) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात अतिक्रमणाची साफसफाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर महापालिकेने सुरू केलेल्या साफसफाई मोहिमेला समिश्र यश आले आहे. २५ जानेवारीपर्यंत अतिक्रमण विभागाने ९४ राजकीय होर्डिंग काढले असून, २२६२ व्यावसायिक बोर्डसह राजकीय पक्षांचे शाखा फलक काढले आहेत. गेल्या आठ दिवसात पालिकेच्या पालिकेने २३५० होर्डिंग व फलकांवर कारवाई केली असून, ही मोहीम अजूनही सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व फलक २६ जानेवारीपर्यंत काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने १८ जानेवारीपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर व फलकांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. शहरातील अनेक भागात महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेले होर्डिंग, फलक, पोल बॅनर व झेंडे जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने या अनधिकृत होर्डिंगसंदर्भात रतन लथ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्यानंतर त्यांची अंमबजावणी केली जात आहे. गेल्या आठ दिवसापासून महापालिकेच्या या मोहिमेत ९४ राजकीय होर्डिंग्ज व २२६२ व्यावसायिक व राजकीय पक्षांचे शाखा फलक काढण्यात आले आहे. जवळपास २३५० होर्डिंग व फलक जप्त करण्यात आले असून १२ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहराची बऱ्यापैकी साफसफाई झाली असली तरी, गल्लीबोळात मात्र राजकीय फलक कायम आहेत. अतिक्रमण विभागाने होर्डिंग, फलक, बॅनर जप्त केले; मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया संथ असल्याने आश्चर्य व्यक्त केले. महापालिकेच्या या दुजाभावामुळे अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम कसा लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकवर्गणीतून शाळा झाली डिजिटल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

लोकसहभागातून ई-लर्निंगचे स्वप्न साकार करण्यासाठी अंबासन (ता.बागलाण) येथील बाहेरगावी असलेल्या शिक्षणप्रेमी नोकरदारांनी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करून भरभरून मदत केली. यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल ई-लर्निंग वर्ग सुरू होऊ शकला आहे. मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात माझी डिजिटल शाळेचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक तुळसाबाई भामरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, गटशिक्षणाधिकारी पी. आर. जाधव, पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते, माजी मविप्र संचालक नारायण कोर, श्रावण महाराज, पी. आर. देवरे, केंद्रप्रमुख अशोक पवार, मुख्याध्यापिका जिजाबाई देवरे, राष्ट्रपती पुरस्कारार्थी सोपान खैरनार, माजी शिक्षक तानाजी शेवाळे, सरपंच रोहिणी कोर आदी उपस्थित होते.

पहिल्या डिजिटल ई-लर्निंग क्लासरूमचे उद्घाटन नारायण कोर यांनी केले. दुसऱ्या डिजिटल ई-लर्निंग क्लासरूमचे शं. वा. दांडेकरमामा यांचे नातीशिष्य श्रावण महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. मनोहर आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बाहेरगावी असलेल्या शिक्षणप्रेमीं नोकरदारांनी ई-लर्निंगसाठी 'सुजान पाईक आम्ही-अंबासनकर' या व्हॉट्स अॅप ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल तीन लाख रुपये जमा झाले. यामुळे दोन स्वतंत्र वर्गात डिजिटल ई-लर्निंग सज्ज केली. या खोलीला लोकवर्गणीतून स्थानिक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून रंगकाम, लाईट फिटिंग करून वर्ग सज्ज केले आहेत. शाळेत प्रोजेक्टर लावून भव्य स्वरुपात उद्घाटन करून विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगचे धडे सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकाऊंट हॅक करून नऊ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकाउंट हॅक करून इंटरनेट व बँकेच्या आरटीजीएस प्रणालीद्वारे एका कंपनीला सव्वानऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी मोहित गुप्ता या संशयितावर आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरातील कामगारनगर येथील साई गार्डन सोसायटीत जगन्नाथ महिपत पवार (वय ७४) राहतात. त्यांची युनिका एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. गुप्ता याने इंटरनेटद्वारे १६ ते १८ जानेवारी या कालावधीत कंपनीचे अकाउंट हॅक केले. कंपनीच्या अकाउंटबाबतची माहिती चोरून जगन्नाथ पवार यांच्या बँक खात्यातून दिल्ली येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर चार लाख ६० हजार रुपये, तर कांदीवली मुंबईतील एस. के. ट्रेडर्स यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यावर चार लाख ६० हजार रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे ट्रान्सफर केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मूर्ती चोरीस

त‌ीर्थाटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या गुजरामधील आखाड्याच्या महंतांकडील हनुमानाची पाच किलो वजनाची अष्टधातूची मूर्ती चोरीस गेली आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी तपोवनात हा प्रकार घडला. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील जुनागडमधील महाराज भीमदास गुरू सुरेशदास (२९, रा. जि. जुनागड) हे आपल्या आखाड्याच्या महंतांसमवेत नाशिकला आले आहेत. ते तपोवनात वास्तव्यास आहेत.

शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास ते रामकुंड परिसरात आले होते. ते पुन्हा तपोवनात गेले असता चबुतऱ्यावर ठेवलेली दीड फूट उंचीची आणि सुमारे एक लाख रुपये किंमतीची हनुमानाची मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अपघातात दोघांचा मृत्यू

ट्रक व पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत नूरमहंमद युनूस शेख (४२, रा. बागवानपुरा, नाशिक) आणि भरत रामदास भांगरे (४०, रा. वाकी, ता. इगतपुरी) या दोघांचा मृत्यू झाला. मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे परिसरात रेमंड कंपनीसमोर रविवारी (‌दि. २४) रात्री साडेअकरा सुमारास हा अपघात झाला. वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रेमंड कंपनीसमोर ट्रक आणि पिकअप या वाहनांची समोरासमोर धडक झाली. शेख यांच्या डोक्यास व पायास तर भांगरे यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यु झाला.

मृतांची संख्या तीन

दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील पिंपळनेर फाट्याजवळील अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातामध्ये मृतांची संख्या तीन झाली आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास स्वीफ्ट कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात नितीन जाधव (रा. नाशिक) व गोरख पोपट ठोंबरे (रा. सिंधी कॉलनी, जेलरोड) यांचा मृत्यू झाला होता. विकी दाहिजे आणि आसाराम ढाकणे (दोघेही रा. आम्रपाली झोपडपटटी, जेलरोड) यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र पहाटे पाचच्या सुमारास दाहिजे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत बिबट्याची नखे गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी/त्र्यंबकेश्वर

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांच्या सीमारेषेवर असलेल्या वावी हर्ष शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शिखारीच्या उद्देशानेच मारून बिबट्याची नखेच गायब झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

वावी हर्ष परिसरात सुभाष मधे हा शेतकरी आपल्या शेतीला पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता वैतरणा धरणालागतच्या आळवंडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन फूट खोलवर त्याला एक पूर्ण वयाचा बिबट्या पाण्यामध्ये मृतावस्थेत दिसून आला. या बिबट्याचे नखे गायब असल्याच्या कारणाने बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की शिकार करून झाला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिबट्याच्या मृत्यूची चौकशी होण्याची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भगवान मधे यांनी केली आहे. यावेळी घोटी पोलिसांनी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

गेल्या महिनाभरापूर्वीही इगतपुरी तालुक्यात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. महिनाभरात आतापर्यंत दोन बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. वैतरणा परिसरात पाण्यासाठी बिबट्यांचा वावर असतो. यामुळे ‌‌शिकार करण्याच्या नादातूनही या बिबट्याला मारण्यात यावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची पाणीकपात लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारपासून एकवेळ वाढीव पाणीकपात लागू करण्याचे महापौरांचे आदेश पुन्हा धाब्यावर बसविण्यात आले. त्यामुळे मंगळवारची प्रस्तावित पाणीकपात पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रशासनाच्या पाणीकपातीच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा आडकाठी केली आहे. आज (ता.२६) पालकमंत्र्यांसोबत पाणीकपातीसंदर्भात बैठक होणार असून, त्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय होणार आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक दिवसांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन होत नसल्याने महापौरांनी एक दिवस पाणीकपात करण्याचे आदेश प्रशासनाला दिला होता. सध्याच्या कपातीत जुलै अखेरपर्यत पाणीपुरवठा करणे शक्य नसून तब्बल ४९ दिवसांचा पाणीपुरवडा खंडीत करावा लागणार आहे.

....

पाणीकपातीचा निर्णय लागू होणार नसल्याने महापौरांच्या आदेशाला पुन्हा केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांसह मनसे संतप्त झाली आहे. आम्ही प्रशासनाला पाणीकपातीसंदर्भात आदेशीत केले असून, त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला आंदोलन करावे लागले असा इशारा महापौर अशोक मुर्तडक यांनी दिला आहे. नागरिकांना पाणी कमी पडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवरडीलचे कामगार ‘रस्त्यावर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विल्होळी येथील पॉवरडील एनर्जी सिस्टीम कंपनीतील कामगारांना गेल्या आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तसेच, बंद असलेली कंपनी नोव्हेंबर महिन्यात सुरू केल्यानंतर ठराविकच कामगारांना कामावर घेण्यात आले. यात अन्याय झालेल्या कामगारांनी शुक्रवारी कामगार उपायुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. थकीत वेतन व कामगारांना कामावर त्वरित घ्यावी, अशी मागणी कामगारांनी केली.

पॉवरडील कंपनीतील कामगारांचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. यामध्ये महापालिकेचे स्थायी सभापती शिवाजी चुंभळे यांनी मध्यस्थी करीत पॉवरडीलची टाळेबंदी उठवून कंपनी पूर्ववत सुरू केली. परंतु, या कंपनीत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कंपनीने डावलत नव्याने कामगार भरती केली. यामुळे अनेक कामगारांना बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. याबाबत कामगारांनी वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली. मात्र, त्यांना कामावर घेण्यात आले नाही.

पॉवरडील कंपनी व्यवस्थापन कामावर घेत नसल्याने माळी नामक कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. यात कंपनी व्यवस्थापन जुन्या कामगारांना न्याय देत नसल्याने पॉवरडीलच्या कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालवर जोरदान निदर्शने करीत थकीत वेतन व कंपनीने कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी केली. कामगारांच्या आंदोलनात कुटुंबातील सर्वच सदस्य सहभागी झाले होते.

आंदोलनाचा इशारा कपंनीने थकीत वेतनाबरोबरच जुन्या कामगारांना परत कामावर घ्यावे, या मागणीचे कामगारांनी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांना निवेदन दिले. कामगारांची मागणी मान्य न झाल्यास एक जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तके न मिळाल्यास ‘मनविसे’तर्फे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तृतीय वर्ष या वर्गासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके मिळाली नसल्याने परीक्षा द्यायची कशी, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हा प्रश्न त्वरीत न सोडविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुक्त विद्यापीठात तिसऱ्या वर्षाकरीता नाशिक जिल्ह्यातील हजारों विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंतु या विद्यार्थ्यांना वार्षिक अभ्यासक्रमाची पुस्तकेच मिळालेली नाहीत. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार पोस्टाने आणि एस. टी. महामंडळाद्वारे काही विद्यार्थ्यांना पुस्तके पाठविली आहेत परंतु अजूनही शेकडो विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. ही पुस्तके मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात पाठविली असती व विद्यार्थ्यांना तशी माहिती दिली असती तर ही पुस्तके वेळेत मिळाली असती. विद्यापीठाच्या चुकीने वर्ष वाया गेले व आर्थिक, शैक्षणिक नुकसान झाले तर जबाबदारी विद्यापीठाची राहील. हा प्रश्न त्वरीत सोडवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मनविसेच्या वतीने कुलगुरू माणिकराव साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप भवर, गणेश वाळके, मनोज घोडके आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रीडा सुविधा रास्त दरात पुरवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलातील उपलब्ध क्रीडा सुविधा उदयोन्मुख क्रीडापटू, प्रशिक्षण संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय सोमवारी नाशिक विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जाहीर केला.

हे संकुल उत्कृष्ट दर्जाचे प्राविण्य केंद्र बनावे, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विभागीय क्रीडा संकुल समितीची सभा हिरावाडी रोड येथील संकुलात झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, क्रीडा संघटक भीष्मराज बाम, नरेंद्र छाजेड, नगरसेवक रुची कुंभारकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, माहिती उपसंचालक सतीश लळीत आणि समितीचे सदस्य सचिव तथा क्रीडा उपसंचालक संजय सबनीस उपस्थित होते.

सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन नाशिकला अद्ययावत क्रीडा संकुल उभे केले आहे. या संकुलातील इनडोअर बॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक सुविधा, टेबल टेनिस, शुटींग रेंज, स्क्वॅश कोर्ट, जलतरण तलाव, मल्टिपर्पज प्लेईंग फिल्ड आणि लॉन, वसतिगृह आदी सुविधा तयार आहेत. बाकीची प्रगतीपथावर असलेली कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत, अशा सूचनाही डवले यांनी दिल्या. सुविधांचा वापर उदयोन्मुख क्रीडापटू, प्रशिक्षण संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांना व्हावा, यासाठी मासिक शुल्क आकारून या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्रैमासिक, सहामाही, वार्षिक शुल्क भरणाऱ्यांना त्यात काही प्रमाणात सवलत द्यावी. यासाठी सदस्यत्व कार्ड देण्याची सूचनाही त्यांनी केली. क्रीडा संकुल परिसरात सीसीटीव्ही लावणे, अद्ययावत ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविणे, बॅडमिंटनकरिता रोलेबल सिंथेटिक सरफेस उपलब्ध करून देणे, इनडोअर स्टेडियममध्ये कुस्तीसाठी पोडियम तयार करून देणे, वसतिगृह, इनडोअर हॉल आणि पथदिपांसाठी सौरशक्तीचा वापर करणे ही कामे प्राधान्याने करुन घेण्याचा निर्णयही समितीने घेतला. संकुलाची सुरक्षा लक्षात घेऊन खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यासही समितीने मान्यता दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅग्रो उद्योजकांसाठी टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दर्जा असूनही पूरक संस्कारांच्या अभावाने स्पर्धेत मागेच राहणारे कृषी प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर स्थापन करण्यात येणार आहे. कृषी उद्योजकतेशी निगडीत प्रत्येक घटकाला या माध्यमातून सल्ला देण्यात येईल. शिवाय कृषी उत्पादनाचे प्रोसेसिंग, मार्केटींग, ब्रँडिंग आणि ट्रेनिंगचीही सुविधा या माध्यमातून देण्यात येईल.

विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत मुक्त विद्यापीठात आभासी व्यासपीठ, कृषी पोर्टल आणि पीक उत्पादन व प्रक्रिया तसेच ग्राम विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. या बरोबरीलाच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण, माती आणि पाण्याचे संवर्धन, जमीन आरोग्य व्यवस्थापन, पशु संवर्धन व्यवस्थापन, आदींबाबत सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी प्रयत्नही केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असल्याचे विद्वत परिषदेचे सदस्य प्रतापराव पवार यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी इन्क्युबेटरसाठी विद्यापीठातर्फे आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋग्वेद महोत्सवाला उदंड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऋग्वेदतर्फे आयोजित संगीत सभेत पं. प्रसाद खापर्डे यांनी भरगच्च सभागृहात सायंकालीन समयातील पुरीया रागाने गायनास सुरुवात केली. 'पिया गुणवंता' या विलंब‌ित एकतालातील बंदीश घेऊन पुरीयाचा स्वर विस्तार हळूवारपणे मंद्रसप्तकातील षडज, मध्य, सप्तकातील आलाप, बोल आलापाने व मुळातच असणारा गोड मधुर आवाजातील राग व तालाच्या अंगाने केलेली सरगम व बोल याने प्रत्येक आवर्तन नव्याने सजवून समेला येण्याचा अंदाज त्याच्या राग ताल व तालमीची साक्ष देत होता.

द्रुत तिन तालात कालापासून मुखडा असणारी 'मोरे चतुर पिया' ही बंदिश त्यांनी सादर केली जलद सरगम ही त्याच्या सेहवसान घराण्याची खासियत असणारी व तिन्ही सप्तकात दाणेदार सपाट वक्र तान क्रिया अत्यंत सहजतेने त्यांनी गाऊन रसिकांना अनोखा नजराणा पेश केला. त्यानंतर मीश्र काफी रागात 'कृपा करो महाराज' सुफी ढंगाची ठुमरी सादर केली. कै. सरवटे बुवा समर्पित संगीत सभेत मध्यंतरात स्वर विलासी या सरवटे बुवावरील प्रमोद भडकमकर लिखीत जीवन चरित्राच्या पुस्त‌िकेचे प्रकाशन पं. कमलाकर वारे, विनायकराव गोवीलकर, सुमन रानडे, पं. रामदास पळसुले, पं. खापर्डे यांचे हस्ते झाले व श्री गोवीलकर व पं. कमलाकर वारे यांनी सरवटे बुवांच्या आठवणी व्यक्त केल्या.

दुसऱ्या सत्रात रामदासजी पळसुले याचे तबला वादन झाले. त्यांनी विलंब‌ित तीनतालात तीश्र चतुर्थ जाती पेशकार फरूखाबाद अजराडा पंजाब दिल्ली घराण्याचे कायदे, रेले अत्यंत तयारी व बुध्दीमत्तेने त्यांनी खुलवले. त्यांना तबला साथ त्यांचे तरुण शिष्य पाणटक्के याने तयारीने केली. संवादिनी वर नगमा साथ पुष्कराज भागवत यांनी केली. प्रास्ताव‌िक अर्चना भडकमकर यांनी केले. अमेय चितळे यांनी आभार मानले. प्रा. नीलेश रोटे यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक संचालकांना न्यायालयाचा दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्ट संचालकांना अपात्र ठरविण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या जिल्हा बँकेतील संचालकांना न्यायालयात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. संबंधित संचालकांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मिळाली आहे. संबंधित आदेश हा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप जिल्हा बँकेतर्फे करण्यात आला आहे. संचालकांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने संचालकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळे ११ संचालकांवरील अपात्रतेची टांगती तलवार काही काळासाठी टळली आहे.

राज्यपालांनी सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्या संचालकांवर अपात्र ठरविण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे संचालकांना दहा वर्ष निवडणुका लढविता येणार नाहीत. हा आदेश जिल्हा बँकेला प्राप्त झाला असून, या आदेशामुळे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह अकरा संचालक अपात्र ठरणार आहेत. या विरोधात सर्व संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. याचिकाकर्ते प्रमोद जोशी यांनी संबंधित निर्णय हा पूर्वक्षीय प्रभावाने लागू करता येणार नाही, तसेच हा राजकीय निर्णय असल्याचा दावा केला. न्या. जहागीरदार व पटवर्धन यांच्या द्विस्तरीय पीठाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी संचालक गणपतराव पाटील व परवेझ कोकणी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर बांधकामांवर गदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत शहरातील ६३ इमारतींचे बांधकाम बेकायदेशीर ठरवत महसूल विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना तीस दिवसात हे बेकायदेशीर बांधकाम स्वतःहून पाडण्याबाबत नोटीस जारी केल्या आहेत. तीस दिवसात हे बांधकाम पाडले नाही तर प्रशासनच हे बांधकाम जमीनदोस्त करेल, असा इशारा नोटीसमध्ये दिला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी बेकायदेशीर बांधकामप्रकरणी व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. याबाबत तातडीने बैठक घेऊन व्यावसायिकांनी या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीस सोहनलाल भंडारी, अशोकलाल भंडारी, विजय बाफना, नयनेश संघवी, नंदकुमार जंगम, संदीप कोचर, विक्रांत मोरे, सुभाष कापडणीस, संदीप कुशारे, विष्णूभारती गोसावी, ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. नीलेश शेटे, डॉ. मनोज सुराणा, नायब तहसीलदार रामदास आहेर आदी उपस्थित होते.

पिंपळगाव शहरात बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे पालक न केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जयंत मुथा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. यानुसार शहरातील ६३ बांधकामे महसूल विभागाने बेकायदेशीर ठरवली. बांधकाम व्यावसायिकांनी निवासीऐवज वाणिज्य प्रयोजनासाठी सुरू असलेला अनधिकृत कृषी वापर नियमित करण्याबाबत नगर रचना विभागाला प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव नियमबाह्य असल्याने नोंदविल्यानंतर निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव नामंजूर करीत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत.

माहितीच्या अधिकारात उघड माहितीच्या अधिकारात शहरातील बांधकामांची माहिती संकलित केली होती. शहरातील ६३ बांधकामे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४५ (२) नुसार शासनाने बेकायदेशीर ठरवले होते. या बांधकामांवर गदा येणार आहे.



शासनाच्या धोरणानुसार नियमित करता येण्यासारखी बांधकामे नियमित करावी. रस्त्यांना अडथळा आणणारी व नागरिकांची फसवणूक करणारी बांधकामे पाडण्यात यावीत. अनधिकृत बांधकामासंदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी. - जयंत मुथा, सामाजिक कार्यकर्ते

शहरातील बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, घाईने नोटीस जारी करून बांधकाम व्यावसायिकांवर दबाब टाकण्याचा हा प्रकार आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहोत. - सोहनलाल भंडारी, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images