मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्वांना समतोल पाणी मिळावे यासाठी महापालिकेने आता पाणीपुरवठ्याच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रस्ताव महावितरणकडे ठेवला आहे. पालिकेच्या पाइपलाइनमधून मोटारी लावून पाणी ओढून घेणाऱ्यांना आळा बसणार असल्याचा दावा केला जात आहे. पाणीपुरवठा कालावधीत वीज पुरवठा खंडित ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांनी बुधवारी महावितरणला सादर केला आहे. शहरात सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींचे निरसन कण्यासाठी पालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमधील पाणी वीजपंपांच्या सहाय्याने नागरिक ओढून घेत असल्याचे पालिकेच्या लक्षात आले आहे. बहुतांश नागरिकांकडून पालिकेच्या पाइपलाइनला मोटार लावून पाणी वरच्या मजल्यांवर नेले जाते. त्यामुळे पाइपलाईनचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नसल्याने नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. जलकुंभाजवळील नागरिकांना पाणी मिळत असले तरी दूरवरच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी पालिकेने मोटारी लावणाऱ्यांवर कारवाईही सुरू केली आहे. परंतु, त्याला मर्यादा असल्याने आता थेट जलकुंभातून पाणी सोडल्यानंतर त्या, त्या भागातील वीजपुरवठा पाणीपुरवठ्याच्या काळापर्यंत खंडित ठेवण्याची मागणी महापालिकेने महावितरणकडे केली आहे.