जमिनीच्या व्यवहारात खरेदीदाराकडून १८ कोटी ४९ लाख रुपये घेऊन जमीन नावावर न करता परस्पर दुसऱ्यास विक्री केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ११ जणांविरोधत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये टिळकवाडी येथील नऊ तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
गंगापूररोडवरील पंपींग स्टेशन परिसरात राहणाऱ्या गोविंदराव यादवराव साबळे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. साबळे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे राहणाऱ्या नक्षत्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे संचालक संतोष शांतीलाल मुथा आणि विनोद कंचन सुराणा यांच्याशी जमीन व्यवहार केला होता. मुंबई-आग्रा महामार्गावरील बिगरशेती मिळकत असलेल्या दोन हेक्टर जमिनीचा व्यवहार ३५ कोटी ५५ लाख रुपयांमध्ये ठरला होता. या व्यवहारापोटी साबळे यांनी वरील संशयितासह शहरातील टिळकवाडी परिसरात राहणाऱ्या भाविक उपेंद्र शाह, प्रियंक एस. शाह, भैरव एस. शाह, हितीश एस. शाह, हेमल पिंकेश शाह, सौरव अजीत शाह, सुनीता अजीत शाह, शारदाबेन शांतीलाल शाह यांच्याकडे २४ ऑक्टोबर २०१० ते २० ऑगस्ट २०१४ या कालावधीत नाशिक कोर्टाच्या आवारात वेळोवेळी १८ कोटी ४९ लाख रुपये दिले. मात्र, संशयितांनी जमीन साबळे यांच्या नावावर केली नव्हती.
दरम्यान, मिळकत दावा प्रलंबित असताना दोघा संशयितांनी गौतम हिरण या तिसऱ्या व्यक्तीशी खरेदी व्यवहार केला. ही बाब समोर येताच साबळे यांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला. घटनेचा अधिक तपास एपीआय निमसे करीत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट