पंचवटीतील वाघाडी परिसरात सुरू असलेले अवैध धंद्यांची मक्तेदारी मोडून काढणे पोलिसांना सहज नाही. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे अवैध व्यवसायांना लपण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. मात्र, गुरूवारी पोलिस उपायुक्त एन. अंबिका व त्यांच्या पथकाने वाघाडीची तटबंदी मोडून काढीत सर्व परिसर पिंजून काढला. पोलिसांनी या ठिकाणाहून ३० जणांपेक्षा जास्त व्यक्तिंना अटक करून जुगाराचे साहित्य, पैसे तसेच गावठी दारू असा मुद्देमाल जप्त केला.
वाघाडीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत अनेक वर्षांपासून तक्रार केली जाते. मात्र, पोलिस कारवाई करताना सातत्याने चालढकल करीत असल्याचे दिसते. शहरात सर्वत्र अवैध व्यावासायिकांवर कारवाई होत असताना वाघाडीत मात्र खुलेआम जुगार अड्डे सुरू होते. यापार्श्वभूमीवर टिकेचे धनी होत असलेल्या शहर पोलिसांनी गुरूवारी सांयकाळी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास वाघाडीवर छापा मारला. पोलिस आयुक्त एन. अंबिका, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी हजर होता. वाघाडीतून बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात होता. वाघाडीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी २२ जणांना अटक केली. जुगार अड्ड्यातून जप्त केलेल्या २५ हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कमेची रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. गावठी दारूसाठी कुप्रसिध्द असलेला वाघाडीतील अड्डाही पोलिसांनी उद्धवस्त केला. सुमारे ६०० लिटर्स गावठी दारूचा साठा जप्त करीत सहा जणांना अटक केली. वाघाडीतील आजच्या कारवाईमुळे पंचवटीत खळबळ उडाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट