Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सराफांनी स्वीकारावा एक टक्का कर

$
0
0

कर सल्लागार रवींद्र देवधर यांचा सल्ला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्थसंकल्पात सराफ व्यावसायिकांवर नव्याने लागू करण्यात आलेल्या अबकारी करात सरकारने एक टक्का आणि साडेबारा टक्के असे दोन पर्याय दिले आहेत. त्यातील करदात्यांनी एक टक्का अबकारी कराचा पर्याय स्वीकारावा, असे प्रतिपादन कर सल्लागार रवींद्र देवधर यांनी केले.

सरकारने १ मार्चपासून लागू केलेल्या अबकारी कराची माहिती सराफ व्यावसायिकांना व्हावी यासाठी नाशिक सराफ असोसिएशनच्यावतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी देवधर म्हणाले, की अर्थसंकल्पात केलेल्या व्याख्येनुसार ज्या व्यावसायिकांनी १ टक्क्याचा पर्याय स्वीकारला आहे, अशा व्यावसायिकांना सेट ऑफ मिळणार नाही. मात्र, ज्या व्यावसायिकांनी साडेबारा टक्क्याचा पर्याय स्वीकारला आहे अशांना सेट ऑफ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कागदपत्रे फायलिंग करावी लागणार आहेत. २०१२ च्या कायद्यानुसार वस्तुच्या किंमतीच्या ७० टक्के किंमतीवर करात सूट मिळत होती. ३० टक्के किमतीवर कर लागत होता. मात्र, नवीन कायद्यानुसार १०० टक्के किंमतीवर कर लागणार आहे. ब्रँडेड दागिने त्याचप्रमाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री यात येणारे कर याचेही देवधर यांनी मार्गदर्शन त्यांनी केले. इन्कमटॅक्स सल्लागार संदीप पाठक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संपूर्ण जिल्ह्यातून सराफ व्यावसायिक हजर होते. दिवसभर आमदार खासदार यांच्या भेटी धेऊन त्यांना निवेदने देण्यात आली.

दिल्लीत आवाज उठवू

दिल्ली दरबारी सराफ व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत आवाज उठवला जाईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरीही मागे हटणार नाही, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.


पालकमंत्र्यांचे आश्वासन

सराफ व्यावसायिकांवर लावलेला १ टक्का अबकारी कर काढून टाकावा या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी बंदचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींचा प्रेरणास्त्रोत आता मोठ्या पडद्यावर

$
0
0

Vinod.patil@timesgroup.com नाशिक : अन्याय अन् उपेक्षेने पिचलेल्या आदिवासींच्या उत्थानासाठी उभी हयात घालविणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आंदोलक झिलाबाई वसावे यांचा सामाजिक लढा आता मोठ्या पडद्याद्वारे लवकरच जगासमोर येणार आहे. आजवर केवळ आदिवासी आंदोलनांचे मार्केटिंग अन् नेतेगिरी करून स्वःनामाची ब्रॅन्ड इमेज समाजमनावर थोपवू पाहणाऱ्या तथाकथित संघर्ष कहाण्याच चघळल्या गेल्या. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे राहून आदिवासींच्या संघर्षाला तेज धार देणाऱ्या सातपुड्यातील झिलाबाईंची संघर्षमय कहाणी जगजाहीर होणार आहे.

निर्माता व दिग्दर्शक प्रतिभा शर्मा यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आदिवासी आंदोलनाचा नवा आयाम हा जगासमोर येत आहे.

आदिवासींच्या न्याय हक्कासंदर्भातील जंगल, जमीन, कानून आंदोलने मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे अशी बड्या नावांभोवती केंद्रित राहिली आहेत. परंतु, या आंदोलनांना खऱ्या अर्थाने बळ देणाऱ्या स्थानिक अशिक्षित आदिवासी महिला आंदोलक मात्र पडद्याआडच राहिल्या आहेत. झिलाबाई वसावे

त्यापैकीच! सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील आदिवासी गावांमध्ये झिलाबाईचे नाव पुकारले तरी प्रत्येकाच्या शरीरात वीज चमकावी, अशी ऊर्जा निर्माण होते. नर्मदा व तापीच्या खोऱ्यात आदिवासींवरील अन्यायाविरुद्ध लढ्याचे एक प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. ८६ वर्षांच्या झिलाबाई आजही तळमळीने आदिवासींच्या आंदोलन अग्रणी असतात. झिलाबाई या मूळच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातल्या गेनसरा गावच्या. लग्नानंतर रायसिंगपूर संस्थानातील भराडीपादर गावात स्थायिक झाल्या. इंग्रज गेल्यानंतर आदिवासींच्या जमिनी या संस्थानच्या नावावरच राहिल्या होत्या. १९७५ मध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट अक्टने या जमिनींवरची उरलीसुरली मालकीही गेली. आदिवासींचे हक्क नाकारले गेले. तेथूनच झिलाबाईच्या संघर्षाला सुरुवात झाली. मग त्यांनी आदिवासींच्या नैसर्गिक संसाधनावरील हक्कांसाठी लढा सुरू केला.

जगप्रसिद्ध नर्मदा आंदोलन, लोकसंघर्ष मोर्चा, उलगुलान यात्रामध्ये सहभागी होऊन आदिवासींचा आवाज बुंलद केला. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्या पाठिशी त्यांनी संपूर्ण सातपुडा उभा करीत केंद्र व राज्य सरकारवर दबाव वाढवला.

मौखिक पंरपरेतून समृद्ध झालेली लखलखीत वाणी हीच झिलाबाईंची मुख्य ताकद आहे. त्या बोलायला लागल्या, की अवघ्या आदिवासी संस्कृतीचा आत्मा त्यांच्या शब्दातून बाहेर येतो. सर्वच आंदोलनांचे गल्ली ते दिल्ली नेतृत्व त्याच करतात. आंदोलनाना बळ देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. आदिवासींना त्यांच्या जीवनाचा हक्क मिळाला पाहिजे एवढेच त्यांचे ध्येय! जंगलाला वडील, तर जमिनीला त्या माता म्हणतात. त्यामुळे आदिवासींच्या व्यथा, वेदना त्या प्रखरपणे आपल्या भाषेतून जगासमोर मांडतात. त्यामुळेच त्यांच्या या प्रेरणामय व संघर्षमय जीवनाची कहाणी जगासमोर पुढे यावी या उद्देशाने प्रतिभा शर्मा यांनी त्यांच्यावरील चित्रपटाचे काम सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्याचे चित्रीकरण सातपुड्यात तसेच मुंबईत सुरू आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'आमो आखा एक से'

झिलाबाई यांच्यावरील चित्रपटाचे नाव 'आमो आखा एक से' असे ठेवण्यात आले आहे. दीड तासाच्या चित्रपटात झिलाबाईचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. अन्यायाविरुद्ध लढा सुरू करताना आदिवासी आमो आखा एक से हे आदिवासींच्या घोषवाक्याने करतात. त्यामुळे चित्रपटाला तेच नाव देण्यात आले असून, तो मराठी व हिंदी भाषेत झळकणार आहे. त्यामुळे सातपुड्यातील या झाशीच्या राणीची कथा बघण्यास सातपुड्यातील त्यांच्या अनुयायांसह सर्वच जण इच्छुक आहेत.

झिलाबाई या आंदोलकांसाठी एक प्रेरणास्रोत राहिल्या आहेत. जंगल, जमीन व आदिवासींचे हक्क यांच्यासाठी सुरू केलेला लढा आजही सुरूच आहे. त्यामुळे त्यांचे कार्य जगासमोर आल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल.

प्रतिभा शिंदे

अध्यक्षा, लोकसंघर्ष मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कपाट’चा फैसला दोन दिवसात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकमधील कपाट प्रकरणांमुळे संपूर्ण शहराचाच विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे कपाट प्रकरणे नियम‌ीत करण्याबाबत सरकार सकारात्मक असून, येत्या दोन ते तीन दिवसात होणार त्यावर अंतिम निर्णय असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या प्रकरणांची संख्या मोठी असल्याने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे महाजन यांनी सांग‌ीतले. त्यामुळे कपाटांची कोंडी फुटणार असल्याने शहरातील बिल्डरासंह सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.

शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतीचे बांधकाम करताना फ्री ऑफ एफएसआयच्या क्षेत्रातच आठ बाय दहाचे कपाट बांधून जास्तीचे बांधकाम करून ते ग्राहकांना विकण्याचा प्रघात पाडला होता. त्यावर मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आक्षेप घेत अशा बांधकाम परवानग्या थांबवल्याने गेल्या दीड वर्षापासून अडीच हजार इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. सरकारच्या आदेशानंतर असा प्रकरणांची संख्या आता पुढे आली असून, तब्बल २५८९ अर्ज महापालिकेकडे आले आहेत. या अर्जांची संख्या आयुक्तांनी सरकारला कळविली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार अपूर्व हिरे व माजी आमदार वसंत गीते यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी कपाट प्रकरणाचा तोडगा अंतिम टप्प्यात असल्याचे शिष्टमंडळाला सांगीतले. कपाटांसदर्भातील निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे अधिवेशनात पटलावर ठेवून त्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कपाट प्रकरणाचा विषय ठेवला जाणार असल्याचे चित्र असून, कपाटाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिल्डरांसह, सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे नाशिकचा ठप्प असलेल्या विकासालाही चालना मिळेल. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. असा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानेवाडी अपघातात तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड मनमाड-नांदगांव मार्गावरील पानेवाडी शिवारात इंडियन ऑइल कंपनीसमोर मोटार सायकल टँकर आणि इंडिकाच्या विचित्र अपघातात तीनजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतात दोन सख्या बहिणीत्यांचा मावस भावाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगांव तालुक्यातील जोंधळवाडीभालुर येथील राणी ज्ञानेश्वर काळे (१८), प्रतिभा ज्ञानेश्वर काळे (१३) या बहिणी आणि त्यांचा मावस भाऊ संदीप कडू आवारे (१७, रा. भालुर) हे तिघे मोटारसायकलवर नागापुर येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनास आले होते. दर्शन घेऊन घरी पततत असताना त्यांच्या मोटार सायकलला कोणत्यातरी वाहनाने धडक दिली मात्र अपगात कसा घडला हे समजू शकलेले नाही. यात तिघेही मृत्यूमुखी पडले. तर अपघातात त्यांच्या सोबत असलेले शीतल साईनाथ काळे (२५) व समर्थ साईनाथ काळे (3०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीचे सत्र थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात घरफोडीच्या घटनांना ब्रेक लावण्यात अद्याप पोलिसांना यश मिळालेले नाही. मोकाट फिरणारे गुन्हेगार सर्वसामान्यांच्या घरातील मुद्देमालावर डल्ला मारीत असून शहरातील आडगाव, मुंबई नाका, इंदिरानगर व सातपूर या ठिकाणी झालेल्या चार घरफोड्यांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.

गोविंदनगर

मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत समावेश होणाऱ्या गोविंदनगरमधील गुरुकृपा रो-हाऊसमध्ये राहणारे अशोक गोविंद कुलकर्णी २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या स्वयंपाकगृहाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेले १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले. यात चेन, अंगठी, ब्रेसलेट, नाणे, रिंगा व रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश होता.

आडगाव शिवार

घरफोडीची दुसरी घटना आडगाव शिवारातील सरस्वतीनगरमध्ये झाली. येथील लिटल हाऊसमध्ये राहणारे राकेश कुमार शर्मा (वय ५४) हे २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४२ हजार ७०० रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरी केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर परिसर

तिसरी घटना इंदिरानगर परिसरात घडली. पाथर्डी गावातील मेट्रोझोनसमोरील साफर अपार्टमेंटमधील रहिवासी गिरीश तुकाराम उगले हे रविवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच, घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उगले यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

सातपूर परिसर

अमृतेश्वरी कुटी येथील रहिवासी अजय कुमार परमानंद दिडा बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याची चेन व एलईडी टीव्ही असा ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास असमाधानकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माय अन् मावशीने भरले पंखात बळ!

$
0
0

jitendratarte@timesgroup.com

नाशिक : एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एसटीआय परीक्षेचा निकाल लागला. मी राज्यात प्रथम असल्याचा सुखद धक्काही मला बसला. आई मजुरी करते, त्या शेताच्या बांधावर जाऊन तिला जोर जोराने आवाज दिला. आईही लगबगीने काय झालं विचारत पुढे आली. तिच्याकडे बघून मला रडूच कोसळले. ती म्हणाली, कुठल्यातरी परीक्षेत पास झालास का? मी म्हटलं, नुसता पास नाही झालो राज्यात पहिला आलो. माझ्या या प्रतिक्रियेवर भरल्या कंठाने अन् ओलावलेल्या पापण्यांनी ती माऊली पाठमोरी होऊन पुन्हा शेतात मजुरीला निघून गेली. माझ्या या यशात माझ्या इतकाच माझाा आई आणि मावशीचा वाटा आहे. खरेतर माय अन् मावशीनंच माझ्या पंखात खरं बळ भरलं...!

हे भावोद्‍गार आहेत एसटीआय (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) या स्पर्धा परीक्षेत प्रथम आलेल्या दीपक वनसे याचे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द हे दीपकचे गाव. या परिसरात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतमजूर असलेल्या आई वडिलांच्या प्रेरणेने त्याने नाशिक गाठलं. बारावीनंतर आपल्या मुलानं प्लेन ग्रॅज्युएशनऐवजी फार्मसीचं क्षेत्र करिअरसाठी निवडावं ही त्या सहावी पास शेतमजूर माताची आग्रही इच्छा. यासाठी हाताशी असलेला शेतीचा इवलासा तुकडाही विकण्याची द्रोपदाबाई सुभाष वनसे यांची तयारी होती. आईच्या इच्छेसाठी त्याने नाशिकच्या पंचवटी कॉलेजात बी. फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कॅम्पस प्लेसमेंटमधून मिळालेली नोकरीही त्याने अल्पावधीत अधिकारी बनण्याच्या स्वप्नाने सोडली. दोन वर्षे अभ्यास करूनही हाती काही लागत नसताना यंदाच्या संधीचं सोनं करण्याचा निश्चय देवीदासने केला, तोच मुळात मुलासाठी प्रसंगी मजुरी करणाऱ्या आई द्रोपदाबाईंच्या आशावादी नजरा आठवून. आईची हीच आशावादी नजर माझ्यासमोर प्रतिकूलतेवर मात करून गेली असेही देवीदास सांगतो.

नातेवाईकांच्या घरात शिक्षणासाठी राहताना प्रत्येकाच्याच वाट्याला अनुकूलता येते असे नाही. मात्र, शिक्षणासाठी नाशिकमध्ये मावशी मंदाबाई तांदळकर यांच्याकडे राहताना त्यांनी स्वत: लोकांकडे धुणे भांड्याची कामे करीत भाच्याच्या स्वप्नांना उभारी दिली. आपल्या यशाचे मोठे शिलेदार माय अन् मावशी असल्याचेही देवीदास सांगतो. सरस्वतीचं रूप असणारी प्रेरणाशक्ती आपल्याच घरात आपल्याला कशी भेटू शकते, याचं उदाहरण दीपक वन्से याचं यश बनलयं!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण हत्याप्रकरणी लाय डिटेक्टर टेस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील इंद्रकुंड येथे झालेल्या वृध्देच्या हत्येप्रकरणी पंचवटी पेलिसांनी संशयितांपैकी एकाची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंचवटी पोलिसांचे एक पथक संशयितांसह मुंबईला रवाना झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या व्यवस्थापकाची पंचवटी पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली.

इंद्रकुंड येथील वल्लभाचार्य आश्रमातील एका खोलीत आठ फेब्रुवारी रोजी सिंधू चव्हाण (वय ७५) या वृद्धेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. गॅस सिलिंडर चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. चव्हाण ज्या जागेत राहत होत्या ती जागा एका बांधकाम व्यावसायिकाने घेतल्याचे आणि जागा खाली करण्यासाठी संबंधित वृद्धेला त्याने त्रास दिल्याचे समोर आले. मात्र, ठोस पुरावा नसल्याने तपासाची चक्रे त्या पाच संशयितांवरच थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरीत नाशिक-पुणे अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील दोन महिन्यात अॅन्टी करप्शन ब्यूरोने (एसीबी) राज्यभरात १९७ सापळे रचून २२० पेक्षा अधिक संशयित लाचखोरांना जेरबंद केले आहे. या कालावधीत नाशिक आणि पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ३२ सापळे रचण्यात आले.

एसीबीने २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांकडून २३ लाख ३८ हजार ६०० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अटक केलेल्या लाचखोरांमध्ये महसूल विभागातील सर्वाधिक कर्मचारी असून, त्याखालोखाल गृह विभाग (पोलिस), ग्रामविकास, नगरविकास, एमएसईबी, आरोग्य, शिक्षण, वन विभाग, सहकार व पणन, कृषी विभाग, आरटीओ या विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आठ महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

नाशिक परिक्षेत्रात नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक सापळे अहमदनगर जिल्ह्यात (०९) झाले असून, त्या खालोखाल नाशिक आणि जळगावमध्ये प्रत्येकी आठ, धुळे चार आणि नंदुरबारमध्ये अनुक्रमे चार आणि तीन सापळे रचण्यात आले. याबाबत माहिती देताना एसीबीचे अधीक्षक डी. पी. प्रधान यांनी सांगितले की, सर्वच वयोगटातील तक्रारांच्या संख्येत वाढ होत आहे. एसीबीकडून तक्रारदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळे फोन नंबर्स तसेच अप्लिकेशन, सोशल मीडिया यांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एसीबीकडे येणाऱ्या तक्रारीची लागलीच दखल होत असल्याने तक्रारदारांचा विश्वास वाढत असून, त्यातूनच सापळ्यांची संख्या वाढत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लाचखोर अधिकारी वा कर्मचाऱ्यांबाबत सर्वसामान्यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलिस अधीक्षक डी. पी. प्रधान (९९२३१८५५६६) यांच्याशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ०२५३-२५७५६२७, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रधान यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भूमाता’ला रस्त्यातच रोखले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर/त्र्यंबकेश्वर

महिला दिन म्हणजे पुरोगामी विचारांच्या दिशेने टाकलेले एक पाऊलच! मात्र, याच दिवसाच्या पूर्वसंध्येला महिलांनी महिलांनाच मंदिर प्रवेशापासून रोखून `आगळावेगळा` पायंडा पाडत पुरोगामीत्वाची वाट अडवली. शनिशिंगणापूरपाठोपाठ त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून महिलांना रोखण्यात आले. भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सिन्नर तालुक्याच्या हद्दीतच पोलिसांनी अडविले. दुसरीकडे, ब्रिगेडच्या आंदोलकांना रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील शेकडो महिला तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मंदिराभोवती कडे करून उभे होते.

भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई व त्यांच्या सुमारे ५० महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी सिन्नर येथील नांदूर शिंगोटे येथेच रोखल्याने पुढील संभाव्य संघर्ष टळला. महिला कार्यकर्त्यांना त्र्यंबकेश्वर येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केल्याने सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. सिन्नरच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाला विरोध केला. महाशिवरात्रीपर्यंत महिलांना त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा अल्टिमेटम भूमाता ब्रिगेडने १८ फेब्रुवारीला दिला होता. त्यानंतर विविध संघटनांनी त्र्यंबकेश्वरमधील म‌हिलांना परंपरा मोडणाऱ्या भूमाता ब्रिगेडविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला त्र्यंबकेश्वरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

महिलांसह, साधूमहंत, नगरपरिषद सदस्य, जेष्ठ नागरिक, पुरोहित संघ, हिंदुत्ववादी सघंटना एकत्र आल्या. नगराध्यक्षा विजया लढ्ढा, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा प्रभावती तुंगार, बांधकाम सभापती तृप्ती धारणे आणि शहरातील शेकडो महिला सोमवारी सकाळीपासून मंदिरात ब्रिगेडला रोखण्यासाठी जमल्या होत्या. ब्रिगेडच्या महिला मंदिरात जाऊ नये म्हणून हिंदु संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयारी केली होती.

हरसिद्धगिरींचा प्रयत्न फसला

दुपारी बाराच्या सुमारास साध्वी हरसिध्दगिरी या त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झाल्या. आपणास अध्यक्षांना भेटावयाचे आहे तसेच आपणास थेट गाभाऱ्यात जायचे आहे, असा आग्रह त्यांनी मंदिर विश्वस्तांकडे धरला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न सदस्यांनी करून पाहिला. मात्र, त्या ठाम राहिल्याने त्र्यंबकेश्वरच्या संतप्त झालेल्या महिलांनी साध्वीला मंदिराबाहेर काढले. साध्वींनी आपण आंदोलन करणार असल्याचे सांगून तेथेच बैठक मारली. मात्र, महिलांनी त्यांना तेथून जाण्यास भाग पाडले.

पोलिसांच्या केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. हा सरकारचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे. गाभाऱ्यात प्रवेशापासून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न निरर्थक आहे. याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत.-तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता ब्रिग्रेड

महिलांना गाभाऱ्यात प्रवेश ही त्र्यंबकची परंपरा नाही. त्यामुळे प्रथा परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. त्र्यंबकच्या सर्वस्तरातील महिला एकत्र आल्या असून, भूमातेचा आम्ही विरोध करीत आहोत.-विजया लढ्ढा, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या तंत्रज्ञानाचे लढाऊ विमानाला कवच

$
0
0

mahesh.pathade@timesgroup.com

नाशिक : भारतीय वायुसेनेला फायदेशीर ठरणारे 'केनोपी इनफ्लेटेबल सील' नावाचे तंत्रज्ञान नाशिकच्या एचएएलने विकसित केले आहे. नाशिकचे एचएएलचे व्यवस्थापक हितेंद्र सौंदाणकर यांनी त्यावर संशोधन केले असून, ते मूळचे धुळे येथील आहेत. हे तंत्रज्ञान लढावू विमानात वापरले जाते. त्यामुळे कॉकपिटमध्ये हवेचा दाब मेंटेन राहू शकतो. यापूर्वी हे तंत्रज्ञान विदेशातून आयात करावे लागत होते. मात्र, भारतातच ते विकसित करण्यात आल्याने एचएएलचा निम्मा खर्च वाचला आहे. या शोधकार्याला केंद्र सरकारच्या रसायन व खत मंत्रालयाने नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे.

'इनफ्लेटेबल सील' हे तंत्रज्ञान इलोस्टोमेटिक मटेरिअलपासून बनविण्यात आले आहे. विदेशातून हेच सील आयात करण्यासाठी जेवढा खर्च लागतो, तो एचएएलच्या संशोधनामुळे आता निम्म्यावर आला आहे. नाशिकचे व्यवस्थापक (स्वदेशीकरण)हितेंद्र सौंदाणकर यांनी या संशोधनात विशेष योगदान दिले असून, या तंत्रज्ञानाचे भारतीय वायुसेनेनेही कौतुक केले आहे. 'टेक्नॉलॉजी इन इनोव्हेशन' या प्रकारात या तंत्रज्ञानाला केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले आहे.

इनफ्लेटेबलचे फायदे

- उच्च दर्जा व अधिक वर्षे सेवा देणारे

- पारंपरिक कच्च्या मटेरियलऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचे मटेरियल

- विदेशातून सील मागविण्याची गरज नसल्याने खर्च निम्म्याने कमी

- विदेशी चलनात बचत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरकडे कूच करण्याचा प्रयत्न केला मात्र, नांदूर शिंगोटे येथे पोलिसांनी आंदोलकांना रोखून ताब्यात घेतले आहे.

शनिशिंगणापूरनंतर तृप्ती देसाई यांनी त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. काल महाशिवरात्रीदिवशी देसाई व त्यांच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वरकडे कूच केली असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले होते. त्यानंतर आज सकाळीच पुन्हा एकदा या महिला कार्यकर्त्यांनी तसाच प्रयत्न केला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून पूजा करणारच, असा चंग या महिलांनी बांधला असून पोलिसांनी खबरदारी म्हणून देसाई व सर्व कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतले. पोलिसांनी काहीवेळ स्थानबद्ध करून या महिलांची सुटका केल्याचे सांगण्यात येत आहे.

सिन्नरमधील नांदूर शिंगोटे येथून त्र्यंबकेश्वर सुमारे ८० किलोमीटर दूर आहे. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस वारंवार कारवाई करत आहेत. मात्र, देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अद्याप सिन्नर सोडलेले नसल्याने तणावाची स्थिती कायम आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वरला जाण्यापासून आम्हाला का रोखलं जात आहे?, असा सवाल करताना पोलीस चुकीचे वागत आहेत, असा आरोप देसाई यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळनगरला प्रतीक्षा सुविधांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
रासबिहारी-मेरी रोडवरील गोकुळनगर आणि ईश्वरी हौसिंग को ऑपरेटीव्ह सोसायटीला गेल्या दहा वर्षांपासून पाणी आणि रस्त्याच्या समस्यांनी जेरीस आणले आहे. मुलभूत सुविधांअभावी या भागातील रहिवाशी त्रस्त झाले असून महापालिकेने या भागाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
या भागात दहा वर्षांपासून एकदाही नळाला पुरेशा दाबाने पाणी आलेले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यांचे सुद्धा अद्याप डांबरीकरण झाले नाही. २००५ सालापासून कॉलनीत ३६ बंगले आहेत. इतकी लोकवस्ती असतानाही महापालिका या भागाकडे दुर्लक्ष करीत आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत असल्याने ते दिवसभर पुरत नसल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
प्रारंभीच्या काळात या भागातील रोडचे खडीकरण झाले. पण अनेकवेळा मागणी करून डांबरीकरण झाले नसल्याने सर्व खडी वरती आली आहे. त्यामुळे पायी चालणे अवघड झाले आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी व वृद्धांना बसण्यासाठी उद्यान किंवा कोणतेही मैदान या भागात नाही. दहा वर्षे कमर्शियल पद्धतीने घरपट्टी वसूल करुनही पाणी व रस्त्यासारख्या मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली असता त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
मूलभूत सुविधांसोबतच या भागातील सुरेक्षकडेही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. विजेच्या डीपी उघड्या आहेत. त्यांना मागे व पुढचे झाकण नाही. त्यामुळे या डीपींच्या बाजूने जाताना आणि येताना भीती वाटत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु ती कमी व्यासाची टाकलेली असल्याने बऱ्याचदा पाणी साचते आणि दुर्गंधी पसरत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
'महापालिका प्रशासनाने निदान पाणी द्यावे, रस्ते नीट करावेत व ड्रेनेज लाईन टाकून द्यावी. पावसाळ्यात देखील आम्हाला पाणी मिळत नाही. अतिशय वाईट परिस्थिती आहे आमची.'
- शिव चरणसिंग,
रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रंदिवस पाण्याचा अपव्यय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
मुंबई आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेजसमोरील सर्व्हिस रोडला लागून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून रात्रंदिवस पाणीगळती सुरू आहे. या पाईपच्या व्हॉल्व्हमधून रात्रंदिवस हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
एकीकडे नागरिकांना प्यायला पाणी नसताना इथे मात्र पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. पाण्याचा होणारा हा अपव्यय आणि गळती त्वरित थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असलेले पाहून पंचवटी विभागाच्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या पाण्याच्या पाईपलाईनचे पूजन करून निषेध व्यक्त केला.
प्रशासनाचे शहरातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी श्याम पिंपरकर, सोमनाथ बोडके, सुनील फरताळे, चन्द्रशेखर पंचाक्षरी यासह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गौरी पटांगणावर कचऱ्याचे साम्राज्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
गोदावरी नदीच्या काठावरील गौरी पटांगण समोर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. शेजारील सर्व दुकानदार आणि व्यापारी वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
सातत्याने सूचना देऊन आणि सूचन फलक लावूनही परिसरातील रहिवाशी, नागरिक आणि भाजीपाला विक्रेते या ठिकाणीची कचरा कुंडी सोडून बाहेरच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाऱ्यामुळे इथला सुका कचरा वेगाने उडतो आणि परिसरात घाण पसरते. या ठिकाणी कायमच घंटागाडी असावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आम्हाला रात्रंदिवस या दुर्गंधीचा आणि कचऱ्याचा सामना करावा लागतो. महापालिकेने या ठिकाणी कायमच घंटा गाडी उभी करावी.
- देवांग जानी, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारींच्या ढाप्यांनी अपघाताला आमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
अशोकनगर परिसरात रस्त्यावरील गटारींच्या ढाप्यांमुळे वाहनचालकांना कसरत करुन वाहने चालवावी लागत आहेत. महापालिकेच्या पावसाळी गटार विभागाने रस्त्यात खड्डे बनून असलेले हे ढापे रस्त्याला समांतर करावेत, अशी मागणी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी केली आहे.
महापालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पावसाळी गटारी तयार केल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये टाकण्यात आलेल्या पावसाळी गटारींचे ढापे रस्त्यातच खड्डे बनून बसल्याने वाहनचालकांना वाहने चालवितांना नेहमीच करसत करावी लागते. या ढाप्यांचा खड्डा वाचविण्याच्या नादात वाहनचालक एकमेकांवर धडकल्याचे अनेकदा अपघात घडले आहेत. दीड महिन्यांपूर्वीच एका कामगाराचा पावसाळी गटारीच्या ढापा वाचविताना महामंडळाच्या बसची धडक लागून अपघातात मृत्यु झाला होता.
पावसाळी गटारींची उभारणी केल्यानंतर टाकण्यात आलेले ढापे हे रस्त्यांच्या खाली असल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महापालिकेच्या पावसाळी गटार विभागाने नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारा छावण्यांसाठी शिवसेना आक्रमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळाच्या दाहकतेत येवला तालुका सापडला असून तालुक्यातील गावोगावच्या विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांना चारा मिळत नाही. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी जनावरे आणि बैलगाड्यांसह येवला तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला. येत्या आठ दिवसात तालुक्यात चारा छावण्या सुरू झाल्याच पाहिजे, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी दिला.

येवला शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शिवसैनिक, तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाबाहेर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

कांदे यांनी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांवर कडक शब्दात टीका केली. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी शिवसेनेची नाळ ही सरकारशी नव्हे तर आम जनता आणि शेतकऱ्यांशी जुळलेली आहे. अधिकाऱ्यांनी सरकार दरबारी चुकीचे अहवाल पाठवू नये. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांनाही अधिकारी राज्य सरकारला चाऱ्याबाबत चुकीचे अहवाल पाठव‌ीत आहेत. चाराटंचाई असतानाही या चुकीच्या अहवालामुळेच तालुक्यात सरकारकडून मोफत चारा छावण्या सुरू होवू न शकल्याचा आरोप कांदे यांनी केला.

येवला तालुक्यात चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत कृषी अधिकारी, महसूल विभागाने नव्याने सर्वेक्षण करावे, यासाठी गरज पडल्यास आमच्यासह पक्षाचे पदाधिकारी तुमच्यासोबत सर्वेक्षणासाठी येतील, असे आवाहनही त्यांनी केले. चारा छावण्या सुरू न केल्यास सरकारी अधिकाऱ्यांच्या घराबाहेर जनावरे बांधू, असा इशाराही कांदे यांनी दिला.

राज्यात सत्ता बदल होवूनही स्थानिक सरकारी अधिकारी जुन्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कामे करीत आहेत. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या काही अधिकारी देत असल्याचा आरोप येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी केला. तालुक्यातील सरकारी अधिकाऱ्यांना पाणी व चाराटंचाईची समस्या दिसत असूनही ते झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांनी केला. मोर्चात बाजार समितीचे संचालक साहेबराव सैद, सर्जेराव सावंत, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, राजेंद्र लोणारी, छगन आहेर, अमोल सोनवणे, विठ्ठल महाले यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वारिप’चा येवला तहसीलवर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकरी, शेतमजूर, विधवा, घटस्फोटीत महिला, मागासवर्गीय आदींच्या विविध मागण्यांसाठी येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी येवला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे निळे ध्वज हाती घेत व जोरदार घोषणा देत निघालेल्या या मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती.

विंचूर चौफुलीवरून मोर्चाला सुरुवात झाली. मनमाड-नगर राज्य महामार्गावरून जोरदार घोषणा देत मार्गस्थ झालेला हा मोर्चा येवला तहसील कार्यालयावर धडकला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, विशेष घटक योजना एक लाखावरून तीन लाख रुपये करण्यात यावी, या योजनेचा कालावधी ठरविण्यात यावा, जनरल शिधापत्रिका धारकास देखील प्रति महिना ३५ किलो धान्य देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेची जाचक अट रद्द करून जातीच्या व उत्पन्नाच्या दाखल्यानुसार भूमिहीन व बेघर लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, विधवा, घटस्फोटीत महिलांना व अपंगांना जमिनीची अट रद्द करून मासिक वेतन सुरू करावे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रत्येक गावात सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. 'स्वारिप'चे येवला तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, विक्रम पवार, अमोल निकम, शशिकांत जगताप मोर्चात सहभागी झाले होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रियाज हा ‘रिवाज’ असतो

$
0
0

बासरीचे नादावणारे सूर आणि तबल्यावर सर्रकन् फिरणाऱ्या हाताच्या बोटांची जादुई करामत, अशी जबरदस्त मोहिनी घालणाऱ्या, रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या तबला बासरीच्या जुगलबंदीने 'स्वर-नाद संवाद' या कार्यक्रमाने 'कुसुमाग्रज-पहाट'चा सुरेल प्रारंभ झाला. कुसुमाग्रज स्मरणमध्ये निसर्ग देहूकर या तरुण तबलावादकाने 'स्वर-नाद संवाद' या कार्यक्रमाची आखणी केली होती. निसर्ग देहूकर हा ज्येष्ठ कवयित्री रेखा भांडारे-देहूकर यांचा मुलगा. नाशिककर निसर्गशी साधलेला हा मुक्तसंवाद...!



g मैफल सादर करण्यामागची तुमची भूमिका काय?

श्रद्धेय कुसुमाग्रजांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती. मी अगदी लहानपणापासून त्यांना खूप जवळून पाहिलंय. अनेकदा ते आमच्या घरी यायचे. मला तबला वाजवायला सांगायचे. माझा पियानो आवडीने वाजवायचे. माझी आई तेव्हा संवादिनीवर लेहरा धरायची आणि मैफल रंगत जायची. त्यात त्यांचे मित्रमंडळी सहभागी व्हायचे; असे अनेकदा घडले. म्हणूनच त्यांच्या जयंतीला त्यांना अभिवादन करून कार्यक्रम करणे, हे माझं कर्तव्य होतं.

g इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटच्या शिक्षणानंतर तबलावादनाकडे कसे वळलात ?

मी तबलावादनाकडे कसा वळालो हे विचारणं म्हणजे मी श्वास कधीपासून घ्यायला लागलो असं विचारण्यासारखं आहे. अगदी जन्मापासून तबला माझ्यासोबत आहे. माझी नैसर्गिक ओढ तालाकडेच होती. मी दोन तीन वर्षांचा असतांना आई मला अनेक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना घेऊन जायची. घरी आल्यावर स्वयंपाक घरातले मोठे डबे घेऊन ते उलटे ठेवून त्यावर ऐकलेले ते दणादण वाजवायचो. कालिकेच्या यात्रेतून ढोलके आणले जायचे. हे सर्व पाहून आईने मला तबला-डग्गा आणून दिला. तो आजतागायत माझ्याबरोबर आहे, मित्रासारखा. संगीताचे प्राथमिक ज्ञान अलंकार, सांगितीक संज्ञाचे अर्थ इत्यादी माला आईकडूनच मिळाले. २००६ साली मी स्पिकमॅकेची राष्ट्रीय शिष्यवृत्ती जिंकलो त्यावेळी डागर घराण्याचे ज्येष्ठ उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांच्याबरोबर राहून एक विद्यार्थी म्हणून मला धृपद-धमार संगतीचे शास्रशुद्ध शिक्षण आणि कोणत्याही गायनाच्या संगतीसाठी आवश्यक असणारा 'मिजाज' उस्तादांकडून मनावर बिंबवला गेला.

g उस्ताद फजल कुरेशींचा शिष्य होण्याचा अनुभव कसा आहे?

खरं सांगायचं तर मी लहानपणापासूनच अब्बाजी (उस्ताद अल्लारखाँ) फजलभाई आणि झाकिरभाईंना खूप ऐकलंय. त्यांचा तबला ऐकतच मी मोठा झालोय. त्यामुळेच माझ्या तबलावादनावर पंजाब घराण्याचा प्रभाव आहे. या घराण्याची नैसर्गिक ओढ मला होती, परंतु त्यांचा शिष्य होणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण मला असं वाटतय की मी खूप लकी आहे की एक उत्तम गुरू म्हणून मला फजलभाई लाभले. जवळपास नऊ वर्षांच्या घरंदाज तालीमीनंतर त्यांनी स्वत:च मला त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि स्वत‌ंत्र कार्यक्रम करण्यासाठी खूप उत्तेजन दिलं. गेली अनेक वर्षे त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमांना जाणं, कार्यशाळांना जाणं या सर्वांतून त्यांचा लाभलेला वैयक्तिक सहवास हा खूप मोलाचा ठरला.

g रियाजासाठी वेळ केव्हा काढता?

रियाज हीच जीवनशैली आहे. फक्त तबल्यावर होणारा अभ्यास हाच रियाज नसून रियाज ही एक व्यापक गोष्ट आहे. किंबहुना रियाज हा एक रिवाज आहे. ही कष्टसाध्य कला आहे आणि रियाजाला पर्याय नाही. रियाज हा करावा लागत नाही तो होतच असतो, चालूच असतो.

g बॉलीवूडच्या गाण्यांसाठीही तुम्ही तबलावादन केलंय, त्याबद्दल...?

बॉलीवूडमध्येही आता शास्त्रीय रागतालांवर आधारित असलेली अनेक गाणी होतात. अशा गाण्यांचा एक भाग व्हायला मलाही आवडतं. नुकताच २०१५ मध्ये 'एबीसीडी २' चित्रपट येऊन गेला. त्यामध्ये तबलावादनाची संधी मला मिळाली होती, ते गाणे रसिकांनी जरूर ऐकावे.

g झाकिरभाईंसोबतचा एखादा संस्मरणीय किस्सा...?

गेल्यावर्षीच्या गुरूपौर्णिमेला मुंबईला झालेल्या अब्बाजींच्या गुरूवंदना सोहळ्यात फजलभाईंनी मला सोलो तबलावादन करण्यासाठी सांगितले होते. त्या कार्यक्रमाची प्रेरणा आखणी अर्थातच झाकिरभाईंची आणि त्या कार्यक्र्रमासाठी झाकिरभाईंसोबत देशविदेशातले अनेक नामांकित संगीत कलाकार उपस्थित होते. त्या सोलोवादनात थोड्याशा क्लिष्ट गणितावर आधारित पेशकाराला झाकिरभाईंनी दिलेली जोरदार दाद मला प्रेरणेची संजीवनी देऊन गेली. शेवटच्या तिहाईला इतकावेळ हाताने ताल धरून असलेले झाकिरभाई खुर्चीवरून उठून मोठ्याने म्हणाले 'बहोत अच्छे' ही मनमोकळी मिळालेली दाद, हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. माझा सोलो झाल्यावर मी जेव्हा प्रेक्षकांत त्यांच्या पाया पडायला गेलो तेव्हा त्यांनी मला कडकडून मारलेली मिठी आणि भरभरून दिलेला आशीर्वाद हे माझ्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा फार मोठे आहे व राहतील.

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबल चालकांविरोधात मालेगावी आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

टीव्ही केबल चालकांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याने याबाबत चौकशी करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शहरातील केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसव‌िणे अनिवार्य करण्यात आले आहे. मालेगाव शहरात सुमारे एक लाखाहून अधिक केबलधारक आहेत. वारंवार मागणी करूनही केबल चालक सेट टॉप बॉक्स बसव‌िण्यास तयार नाहीत. तसेच शहरातील केबल चालक सेट टॉप बॉक्ससाठी किंमत १६०० ते १८०० रुपये घेतात. मासिक फी देखील २०० रुपये आकारली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्बल महिलांना करा सक्षम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

स्त्री ही सक्षम झाली आहे. मात्र, अजूनही काही भागात महिला मागे आहेत. ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून सक्षम आहेत, त्यांनी इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले.

कलिका देवी मंदिर संस्थान आणि क्रीडा साधना यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरात विशेष कामगिरी केलेल्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक बोलत होते. महापौर पुढे म्हणाले की, आज महिला अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांनी कोणतेही काम मनापासून केले, तर त्यांची आणखी चांगली प्रगती होण्यास मदत होईल. उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी सांगितले की, सर्वांनी भारताच्या राज्यघटनेचे पालन करावे. त्यामुळे गढूळ वातावरण पुसून टाकण्यास मदत होईल. यामुळे महिलांची आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची प्रगती होण्यास मदत होणार आहे. या वेळी पुरस्कारार्थी महिलांच्या वतीने मैथाली गोखले, वीणा नवले, सिस्टर ईगुन्नी डिसुझा, प्रणिता कुमावत, माधुरी ढोली यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या नवदुर्गांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारार्थींमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, वीणा नवले (शिक्षण), रेखा महाजन (संगीत, गायन), सिस्टर ईगुन्नी डीसुझा (सामाजिक कार्य), प्रणिता कुमावत (शिक्षण अधिकारी- क्रीडा), वैशाली शहाणे (सोनार) (पत्रकारिता), मैथाली गोखले (लेखन), चित्रलेखा कोठावळे (बी. डी. ओ.), पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांचा समावेश होता.

या बरोबर वर्षभरात विविध खेळात राष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव उज्वल करण्याऱ्या ५० महिला खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला जम्परोप या खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आनंद खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी उपमहापौर गुरुमीत बग्गा, माजी आरोग्य मंत्री शोभा बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांचे स्वागत कलिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील आणि क्रीडा साधनाचे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images