Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

यंदा येवल्यातरंगपंचमी कोरडीच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या भीषण दुष्काळ असल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या येवला शहरवासियांनी पाणीबचतीचा संकल्प करत रंगपंचमीच्या दिवशी खेळले जाणारे सामुदायिक रंगपंचमीचे सामने यावर्षी न खेळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

येवला शहर आणि या शहरातील अनेक ऐतिहासिक वारसासंपन्न परंपरा म्हणजे एक मोठी खासियतच. महान सांस्कृतिक परंपरेची वर्षानुवर्षे अगदी अंतःकरणापासुन जोपासना करताना दरवर्षी रंगपंचमी निमित्त त्याच दिवशी शहरातील टिळक मैदानात खेळले जाणारे सामुसायिक रंगांचे सामने म्हणजे शहरवासियांसाठी एक मोठी पर्वणी. या रंगाच्या सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी त्यातील प्रत्येक क्षण न क्षण डोळ्यात साठविण्यासाठी टिळक मैदानातील घरांच्या गच्चीवर महिलावर्गासह नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यंदाची पाणीटंचाई परिस्थिती लक्षात घेता सामाजिक भान ठेवत येवेलेकरांनी हा सामुदायिक रंगांचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील सर्वच मंडळांनी यावर्षी सामने न खेळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेतला. येवला व्यापारी बँकेच्या सभागृहात जेष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके व माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सातच्या सुमारास ही बैठक झाली. रंगपंचमीचा सामना न खेळल्यामुळे जवळपास ५ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. त्यादिवशी सायंकाळी टिळक मैदानात सर्वच मंडळांनी जमायचे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एकमेकांच्या कपाळाला केवळ गुलाल लावायचा असे या बैठकीत ठरल्याची माहिती प्रभाकर झळके यांनी सांगितले. बैठकीस माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, नगरसेवक बंडू क्षिरसागर, अविनाश कुक्कर, महेश वडे, जयंत भांबारे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कैद्याची जेलरला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कैदीने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

तुरुंगाधिकारी गणेश मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सलीम उर्फ पाप्या ख्वाजा शेख (१९९/१६) याला न्यायालयीन सुनावणीसाठी नाशिकच्या सत्र न्यायालयात २० मार्चला नेण्यात आले होते. तेथून आणल्यानंतर कारागृहात नेताना कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेत असताना सलीमने त्यांना शिवागाळ केली. नंतर बराकीत जाण्यास

नकार दिला. तेथेही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून चमच्याच्या सहाय्याने इजा करण्याची धमकी दिली. सरकारी कर्मचाऱ्यांना धमकी, धक्काबुकी, कामकाजात अडथळा या कलमाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक वाळेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

राका कॉलनीत घरफोडी

शरणपूर रोडवरील राका कॉलनी येथील बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी विविध साहित्यांची चोरी केली. या प्रकरणी कमोदनगर येथील शुभांगी प्रकाश पालवे (वय ५९) यांनी सरकारवाडा पोलिसांकडे फिर्याद दिली. रविवारी सकाळी ९ वाजेच्या पूर्वी चोरट्याने घरात प्रवेश करून पाणी तापवण्याचा बंद, इनर्व्हटर, चांदीच्या मूर्ती, गॅस सिलिंडर असा सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सट्टेबाजास अटक

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या संशयितास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुपेश रत्नाकर रणसिंग (वय ३०) असे या संशयिताचे नाव असून, तो पेठरोड परिसरातील दत्तनगर परिसरात राहतो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पेठरोड परिसरात छापा टाकून रणसिंग यास पोलिसांन ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ हजार रुपये रोख, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे.

जनावरांची सुटका

कत्तलीसाठी पिकअप वाहनात आठ जनावरे घेऊन जाणाऱ्या संशयितास आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. माडसांगवी शिवारातील शिलापूर टोलनाक्याजवळ एमएच १५ डीके ७५६४ क्रमांकाच्या पिकअप वाहनात तीन गायी आणि पाच वासरे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे राहणाऱ्या नदीम नबाब इनामदार यास ताब्यात घेतले. पोलिसांनी पिकअप चालक इनामदार याच्याकडे चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विडी कामगारांचा सिन्नरला मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

केंद्र सरकारने व‌िडी बंडलवर ८५ टक्के धोका असे चित्र छापण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघाला. या वेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कामगार चौकातून आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चास सुरुवात झाली. केंद्र सरकारने विडी उद्योगासंदर्भात अनेक जाचक अटी लादल्याने राज्यातील लाखो विडी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्यामुळे या जाचक अटी मागे द्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. विडी कामगारांना देशपातळीवर हजार रुपये पेन्शन आणि पेन्शनला महागाई भत्ता लागू करावा, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर देशभरातील विडी कामगारांना दरमहा एक हजार रुपये सहाय्यता निधी द्यावा, समान काम, समान दाम या न्यायाने संपूर्ण देशभरात हजार विडीस ३०० रुपयांप्रमाणे किमान वेतन महागाई भत्ता लागू करावा, कायदेशीर हक्कांची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या यावेळी कामगारांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नेमक्या बोअरवेल्स किती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या पाणीटंचाईमुळे भूगर्भातील पाणीउपसा अपरिहार्य बनला आहे. यामुळेच सगळीकडे बोअरवेल्सचा बोलबाला सुरू झाला आहे. पण, जिल्ह्यात आजवर नक्की किती बोअरवेल्स आहेत, याचा थांगपत्ता कुणालाही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा अनभिज्ञ असल्याने बोअरवेल्सवर कुणाचेही नियंत्रण नाही काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शिवाय जिल्ह्यात एकाही अनाधिकृत बोअरवेलवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. शहरवासी पाणीकपातीला सामोरे जात असताना ग्रामीण भागातही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना भूगर्भातील पाणीउपसा करण्यासाठी बोअरवेल हा किफायतशीर व सोपा पर्याय ठरू लागला आहे. म्हणूनच ग्रामीण भागात सर्रास बोअरवेल करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

कारवाईला मर्यादा

पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर अंतरात बोअर करावयाची असल्यास तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करवून घेणे आवश्यक असते. मात्र, या नवीन बोअरवेलमुळे पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार असेल तर तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून प्रांतांना देणे गरजेचे आहे. याबाबतच सर्व्हेक्षण करण्यासाठीचा प्रस्ताव भूजल सर्व्हेक्षणकडे पाठविला जातो. मात्र, अधिकृत व अनाधिकृत बोअरवेल्सची आकडेवारीच प्रकाशात येत नसल्याने याबाबतचे कायदे आणि त्यानुसार करावयाची कायदेशीर कारवाई जिल्ह्यात कागदावरच राहिल्याची खेदजनक माहिती पुढे आली आहे.

एकही कारवाई नाही

ग्रामीण भागात कुणी अवैधरित्या बोअरवेल घेतली तर संबंधितास पहिल्यावेळी १० हजार रुपये दंडांची तरतूद आहे. त्यानंतरही कुणी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत कुणालाही न जुमानता बोअरवेल केलीच तर संबंधितांस २५ हजार रुपये दंड तसेच सहा महिने कारावासाची तरतूद आहे.
जलउपसा निर्बंधाची गरज

मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वाधिक खाली गेली आहे. तेथे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता बळावली आहे. त्याखालोखाल सुरगाणा, बागलाण, नांदगाव, येवला, व सिन्नर या पाच तालुक्यांतही भूजल पातळी धोकादायक अवस्थेत आहे. अशाही परिस्थितीत बोअरवेलची संख्या वाढत असून त्यावर निर्बंध आणण्यासाठीचा अधिनियम केवळ कागदावरच नाचविला जात असल्याचे वास्तवही पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोलsss खोलsss पाणी....!

$
0
0

गुलशनाबाद म्हणून ख्याती असणाऱ्या जलसमृध्द नाशिककरांना यंदाचा दुष्काळ मात्र चांगलेच चटके देतो आहे. कधी नव्हे तो शहरात पाणीप्रश्नाने डोके वर काढले आहे. परिणामी, शहरातील बहुतांश सोसायट्या अन् बंगल्यांमध्ये बोअर्स घेण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. पाण्याच्या शोधार्थ हवालदिल झालेल्या नागरीकांमुळे बोअर्सचा व्यवसाय तेजीत आला आहे. वाढत्या नागरीकरणाने चारही दिशांना शहराच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. अशा स्थितीत अनेक ठिकाणी पाण्याची सुविधाही अद्याप पोचलेली नाही. त्यातच यंदाच्या पाणीटंचाईच्या समस्येची भर यात पडली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे ७० टक्के सोसायटी आणि बंगल्यांमध्ये बोअर्स घेण्यात आल्याचे बोअरवेल व्यावसायिकांची आकडेवारी सांगते. तर गेल्या दशकभरात अवघ्या १०० फुटांच्या खोलीवर सापडणारे पाणी हे आता साडेतीनशे ते चारशे फुटांच्या अंतरावर सापडत असल्याचे वास्तव आहे.

बोअरवेल व्यवसायात दक्षिण भारतीय बोअरवेल व्यवसायात शहरात दक्षिण भारतीय व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूमधील व्यावसायिक शहरात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत पाण्याच्या शोधासाठी या व्यावसायिकांना तासाभराचीही उसंत नाही. नाशिक परिसरातील शेतीमध्येही बोअरवेल घेणाऱ्यांचे प्रमाण अलिकडील काळात वाढीला लागले. मात्र, जिल्ह्याच्या काही भागातील पाण्याची पातळीही घटत असल्याने पण्याच्या शोधातील नागरीकांची निराशा होत आहे.

तर पाणी मिळणे शक्य अनेकदा खोलवर बोअरवेल घेऊनही जमिनीत पाणी लागत नाही. अशावेळी त्या बोअरवेलमधील केसींग पाईप काढून घेतला जातो. शेतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या बोअरवेलमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, पावसाळ्यात साठवणुकीअभावी वाया जाणारे पाणी या पाईपद्वारे बोअरमध्ये सोडत राहिल्यास कोरडे पडलेले हे बोअर्स पुनरूज्जीवीत होऊ शकतात, अशी माहिती बोअरवेल व्यावसायिक शिरीष कावळे यांनी दिली. या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग राबविण्यावर भर दिल्यास पाण्याची घटणारी पातळी सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास कावळे यांनी व्यक्त केला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांना कंठ फुटला कसा?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरून टीका करणाऱ्या भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेने पलटवार केला आहे. अनेक दिवसांपासून मूग गिळून बसलेल्या भाजपच्या वाचाळ आमदारांना आताच कंठ कसा फुटला असा सवाल महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे.

शिवसेनेचा मोर्चा हा कुणा पक्षाच्या नव्हे तर नाशिककरांच्या प्रश्नांसाठी होता. पाण्याचे आंदोलन झाले तेव्हा भाजप आमदार कुठे होते? असा सवाल बोरस्ते यांनी केला. तर, जनतेच्या नव्हे तर भुजबळ कुटुंबियांना वाचविण्यासाठीच राष्ट्रवादी आंदोलन करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेने काढलेल्या मोर्चावर भाजपसह राष्ट्रवादीने टीका केली होती. त्यामुळे बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून भाजप व राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले. नाशिककर शिवसेनेसोबत रस्त्यावर उतरल्या नंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजप आमदारांचा आता कंठ फुटला आहे. शिवसेनेने पाण्यासाठी मोट बांधली होती तेव्हा भाजपच्या आमदारांना मंत्रीपदाचे स्वप्न पडत होते. आता शब्दच्छल करण्यापेक्षा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये आणून जाहीर खुलासा करावा, असे आवाहन बोरस्ते यांनी केले आहे. भाजपतर्फे नाशिककरांची बोळवण आता एखाद्या पॅकेजने केली जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष जयंत जाधव हे आमदारही आहेत. त्यामुळे त्यांनीच नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलने केली पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी केवळ छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर कारवाई करू नये यासाठीच आंदोलने करत आहेत. 'राष्ट्रवादी'ने मच्छरदानीपुरतेच आपले

आंदोलन मर्यादित न ठेवू नये असा सल्ला देत भुजबळांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपचा पुळका आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२५ हातपंपांनी टाकली मान

$
0
0

जिल्हाभरात भूजल पातळी खोल गेल्याचा परिणाम; पाण्यासाठी नागरिकांची वणवण अटळ

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत असून अनेक गावांत रहिवाशांची तहान भागविणारे हातपंप मान टाकू लागले आहेत. भूगर्भातीलल पाण्याची पातळी प्रमाणापेक्षाही अधिक खालावल्यामूळे जिल्ह्यात तब्बल ३२५ हातपंप असून नसल्यासारखे झाले आहेत. परिणामी हातपंपावर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ आली आहे.

पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा जिल्हावासियांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा तळ गाठत असून गावोगावी पिण्याच्या पाण्याची भिस्त आता विहिरी, हातपंप आणि तत्सम साधनांवर अवलंबून आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नाही म्हटले तरी जिल्ह्यात ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सरू ठेवला आहे. टँकरद्वारे ९२ गावे आणि १५१ वाड्यांची तहान भागविली जात आहे. टंचाईसदृश परिस्थितीत शेतीसाठी पाणी मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली. मात्र, कुटुंबाला आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, अशी जिल्हावासियांचा माफक अपेक्षा आहे. पाण्याबाबतच्या गरजा पूर्ण करण्यात ग्रामीण भागात हातपंप आणि वीजपंप महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, भूगर्भातील पाणीपातळी खालावू लागल्याने हातपंपांद्वारेही पाण्याचा उपसा करण्यावर आपसूकच मर्यादा येऊ लागल्या आहेत. गावागावांत भूजल व्यवस्थापन व पूनर्भरणाचे योग्य प्रकारे व प्रभावी नियोजन करणे काळाची गरज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दीडशे हातपंप तात्पुरते बंद

जिल्ह्यात ७ हजार २५२ हातपंप आणि ४५३ वीजपंप आहेत. सर्वाधिक ७६५ हातपंप मालेगाव तालुक्यात आहेत. त्याखालोखाल बागलाणमध्ये ७१६ तर निफाड तालुक्यात ६६५ हातपंप आहेत. सर्वात कमी म्हणजेच १४२ हातपंप पेठ तालुक्यात आहेत. जिल्ह्यातील एकूण हातपंपांपैकी १५५ हातपंप तात्पुरत्या स्वरूपात बंद पडले आहेत. तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बंद पडलेल्या हातपंपांची संख्या ३२५ पर्यंत गेली आहे. त्यातही मालेगावात भूजल पातळी सर्वाधिक खालावल्याने तेथील ४९ हातपंप निरुपयोगी ठरू लागले आहेत. त्याखालोखाल सिन्नरमधील ४८ तर येवल्यातील ४७ हातपंपांनी मान टाकली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ७७२ हातपंप सुरू असून ४५० वीजपंपांद्वारेही भूजल उपसा होत असल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. भूजलपातळी खोल जाण्याची कारणे

ग्रामीण भागातील ८० टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा भूजलाद्वारे भागविला जातो. ५० टक्के सिंचन क्षेत्रही भूजलसाठ्यावरच अवलंबून असते. पाऊस चांगला झाला तर धरणे, शेततळी, तलाव भरण्यास मदत होते. तर पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यातही वाढ होते. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, औद्योगिकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, मृद व जलसंधारण उपायांकडे दुर्लक्ष, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पूनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी यांमुळे भूजलपातळी खोल गेली आहे.



जिल्ह्यात बंद हातपंपांची तालुका निहाय आकडेवारी

तालुका बंद हातपंप

मालेगाव ४९

सिन्नर ४८

येवला ४७

चांदवड ३६

नांदगाव ३६

देवळा ३३

बागलाण २४

दिंडोरी १५

निफाड १५

पेठ ७

कळवण ५

सुरगाणा ४

नाशिक ३

त्र्यंबकेश्वर ३

एकूण ३२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगडवर सापडला ४६९ वर्षांपूर्वीचा शिलालेख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील अती दुर्गम अशा हतगड किल्ल्यावर तब्बल ४६९ वर्षांपूर्वीचा देवनागरी लिपीतील शिलालेख सापडला आहे. याद्वारे बागुलवंशी राजांच्या पराक्रमी आणि या किल्ल्याचा जाज्वल्य इतिहास उजेडात आला आहे. या शिलालेखासह किल्ल्याच्या योग्य संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळापर्वत रांगेतला हातगड किल्ला महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. गुजरात भागातून विशेषतः सुरतेकडून येणाऱ्या प्रमूख अशा सापुताऱ्याच्या घाटमाथ्यावर वसलेला हातगड किल्ला अनेक प्राचीन अवशेषांनी समृद्ध आहे. परंतु, इतिहासात हातगड किल्ल्याच्या नोंदी अतिशय तुरळक आहे. गेल्या आठवड्यात गिर्यारोहक सुदर्शन कुलथे हे हातगड किल्ल्यावर अभ्यासासाठी गेले. मुख्य प्रवेशमार्गावरून बाहेरच्या बाजूने अवघड मार्गाने किल्ल्याभोवती पाहणी करत असतांना किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या बुरूजाखाली त्यांना शिलालेख दिसून आला. वहिवाट नसलेल्या ठिकाणावर असलेल्या देवनागरी लिपित कोरलेला संस्कृत भाषेतला तब्बल सोळा ओळींचा हा शिलालेख आहे. आजही चांगल्या अवस्थेत असलेला हा उभा आयताकृती शिलालेख उंचीने चार फूट तर रुंदीला दोन फूट चार इंचाचा आहे. शिलालेखालतील अक्षरे तीन इंच उंचीची आहेत. त्या जागेवर उभे राहिले असता शिलालेख हा जमिनीपासून साडेसहा फूट उंचीवर आहे. अधिक शोध घेतला असता संपूर्ण महाराष्ट्रातील देवनागरी भाषेतला हा सगळ्यात मोठा शिलालेख असल्याचे कळते.

शिलालेख कोरीव प्रकारातला असून सदर शिलालेख किल्ल्यावरच्या वापरात नसलेल्या अवघड अशा जागेवर उभ्या कातळकड्याच्या एका भिंतीवर आजही सुस्पष्ट स्थितीत दिसून येतो. या शिलालेखावर सुदर्शन कुलथे यांनी अधिक संशोधन केले. यावरून हा शिलालेख शालिवाहन शके १४६९ सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. म्हणजेच इ. स. १५४७ साली कोरलेल्या शिलालेखाला आता ४६९ वर्ष पूर्ण झाली आहेत. सुमारे ५०० वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील राष्ट्रौढ वंशीय बागुलराजे यांच्या विजयाचा आशय आहे. बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी नगर निजामाच्या ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळला. सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा पराक्रम होता हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रुद्र कवी विरचित 'राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे.

शिलालेखातील मजकूर

स्वस्ति श्री नृप विक्र मार्क स (स्य)

....ती ... शाळिवाहन सकें

१४६९ ... संवत्सरे आषा

ढ क्षय ११ भौमे तद्दीने महाराजा

धिराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेद मा

र्ग प्रवर्तक आचार परायण सा

रासार विचारक प्रताप नाराय

ण धर्मधुरीण सकळ वेद शा

स्त्र कोविद राष्ट्रौड बागुल मुगु

ट मणी.... वा....... श्री मा

न ब्रह्मकुळ प्रदिप श्री महादेव

सूत तपश्री.... परित श्री

रा (जा) धीराज बहिरम (भैरव) सेन राजा

जबळ पराक्रमे हातगा दुर्ग वेढा

घालुनु (न) नीजाम सहा (शहा) पासुन

घेतला..... विजयी भव

संशोधकांना अध्ययनाचे आवाहन

शिलालेख संशोधनासाठी कुलथे यांना वनविभाग, कनाशीप्रांताचे ए. एन. आडे आणि इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांचे सहकार्य लाभले. सदर शिलालेख हा बागलाण आणि नाशिक प्रांताच्या इतिहासाचे अधिक धागेदोरे मिळविण्यासाठी महत्त्वाचा आहे तरी इतिहास अभ्यासक आणि जिज्ञासू मंडळींनी या विषयावर अधिक प्रकाश टाकून संशोधन करावे असे आवाहन सुदर्शन कुलथे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उत्तर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य करा’

$
0
0

नाशिक : विकासाच्या अनुशेषावर राज्याचे विभाजन किवां नवीन राज्याची निर्मिती होत असेल तर सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य केले पाहिजे, असा दावा माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी केला आहे. विदर्भ व मराठवाड्यापेक्षा उत्तर महाराष्ट्र खुपच मागासलेला असून अनुशेषाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. मराठवाडा व विदर्भा संदर्भात महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्यावर हिरे यांनी पत्रक काढून स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र राज्याचे समर्थन केले आहे. भौगोलिक व सामाजिक आणि राजकीय प्रकारचा अनुशेष उत्तर महाराष्ट्राचा आहे. उत्तर महाराष्ट्रावर विदर्भ व मराठवाड्यापेक्षा जास्त अन्याय झाला आहे, असे मत हिरे यांनी मांडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्खनन जोरात; प्रशासन कोमात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा लाभ खडी-क्रशर धारकांनी उठविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच एकट्या सारूळ येथील १६ अधिकृत खाणींमधून बेसुमार खनिज उत्खनन केल्याची बाब उघडकीस आली आहे. या खाणींमधून गेल्या आठ वर्षात सात लाख ७५ हजार ७२८ ब्रास खनिजांचे उत्खनन झाल्याचे खुद्द प्रशासनानेच केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे महसूल विभाग खडी क्रशर धारकांच्या मुसक्या आवळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक बोकाळली आहे. नाशिक तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात अनेक ठि‌काणी गेल्या काही वर्षांत उत्खननाच्या नावाखाली डोंगर पोखरण्याचे 'उद्योग' सुरू आहेत. अशा अनधिकृत उत्खननामुळे डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित रॉयल्टी न मिळाल्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. ही बाब लक्षात आल्याने आता जिल्हा प्रशासनाने अशा अवैध उत्खननावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील ६० खाणींचे व्हॉल्युमेट्रीक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी घेतला आहे. त्यासाठी गौण खनिज अधिकारी गणेश राठोड यांच्यासह सबंध यंत्रणाच कामाला लागली आहे. या सर्व्हेक्षणात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्या ६० क्रशर धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सारूळ शिवारातील १६ खाणींचे व्हॉल्युमॅट्रीक पध्दतीने सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सन २००७ पासून आजपर्यंत या खाणींमधून सात लाख ७५ हजार ७२८ ब्रास इतके उत्खनन झाले आहे.

उत्खननानुसार रॉयल्टी आकारणार

या ठिकाणच्या अधिकृत १६ खाण मालकांकडून ३०० रुपये ब्रासप्रमाणे रॉयल्टी आकारण्यात येणार आहे. ज्या खाण मालकांनी यापूर्वी रॉयल्टी भरली आहे, त्यांची २००७ पासूनची रॉयल्टी भरल्याची चलने तपासली जाणार आहेत. मालकाने भरलेली रॉयल्टी रक्कम, आतापर्यंत केलेले एकूण उत्खनन याचा मेळ साधून त्यानुसार रॉयल्टीची रक्कम आकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकेंद्राच्या जागेवर व्यापारी संकुल नकोच

$
0
0

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपकेंद्र धुळ्यात व्हावे यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत १३ जानेवारीला ठराव करुन विद्यार्थी भावनांचा आदर केला होता. मनपाच्या मालकीची देवपूरातील सर्व्हे नं. १११, ११२ अ हा भूखंड विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य देण्याचेही ठरले होते. मात्र काही राजकीय मंडळी द्वेषापोटी हा भूखंड व्यापारी संकुलासाठी देण्याचा घाट घालत आहेत. यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलन करत निवेदन देण्यात आले.



सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेला ठराव क्रमांक १८७ विखंडीत करण्यासाठी नगरविकास विभागाला १९४९ चे कलम ४५१ अन्वये पाठविलेले पत्र त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष मयुर ठाकरे, शहराध्यक्ष सचिन आखाडे यांनी मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे. विखंडीतसाठी पाठविलेले पत्र त्वरीत मागे न घेतल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन छेडेल आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त भोसले यांना यासंदर्भात घेराव घालून निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी पुरविण्यावरून दोन गटांत वाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात मंगळवारी दुपारी अचानक दोन गटांमध्ये दगडफेक होऊन तिचे रुपांतर दंगलीत झाले. यामुळे शहरात तणाव पसरला असून, काही क्षणातच पोलिसांनी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील माळीवाडा आणि चिराग गल्लीत दुपारी दोन वाजेच्या सुमारास दहावीचा पेपरला कॉपी पुरविण्याण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. त्यावेळी दोन गट आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगड विटांचा मारा केला. माळीवाडा व चिराग गल्लीतील या प्रकाराने शहरात काही वेळातच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



शहरात यामुळे दंगलीची अफवा पसल्याने ऐन बाजाराच्या दिवशीच धावपळ उडाली. मंगळवार बाजार, जळका बाजार, स्टेशन परिसर, धुळे रोड आदी भागात दंगलीच्या भीतीने दुकानदारांनी दुकाने बंद केली होती. शहरभर नागरिकांची एकच धावपळ उडाली. मात्र काही वेळातच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश घुर्ये, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरात ठिकठिकाणी दाखल झाला. त्यांनी या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तर वाद घालणाऱ्या दोन्ही गटातील तरूणांचा पोलिस शोध घेत आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेवून अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात कचऱ्याची होळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा पोलिस दल व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे यंदाही पोलिस कवायत मैदानावर कचऱ्याची होळी पेटवून होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख साहेबराव पाटील, अंनिसचे प्रा. दीपक बाविस्कर, राजेश बागूल, रत्नाकर वाघ, चंद्रवीर साळवे, रंजना नेवे तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंगळवारी सायंकाळी हा कचऱ्याची होळी करण्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमास थोडा एशीर झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सरकारी गाड्यांद्वारे प्रकाश करण्यात आला. यामुळे या होळीदरम्यान कार्यक्रमात इंधनाचीही मोठ्या प्रमाणात नासडी करण्यात आली , अशी चर्चा सुरू होती.

इंधनाची नासाडी

इंधन बचतीसाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविले जातात. तर वेळोवेळी जनजागृतीही केली जाते. मात्र जिल्ह्यातील एक जबाबदार अधिकारी जर होलिकोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पोलिस दलातील वाहने सुरू ठेवून त्यांच्या हेडलाईटचा वापर करत कार्यक्रम साजरा केला. तब्बल एक ते दीड तास कार्यक्रम सुरू राहिला त्यामुळे तेवढा वेळ वाहने सुरू ठेवून हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रमा संपेपर्यत कोणालाही वाटले नाही की, इंधनाचा गैरवापर होत आहे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदनशील भागात संचारबंदी कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे


नंदुरबार शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काळी मशिद भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरुन दोन गटात दगडफेक व जाळपोळ झाली होती. यात पोलिसांच्या वाहनांसह खासगी वाहनांचे हे नुकसान झाले होते. तर चार पोलिस कर्मचाऱ्यांसह एक अधिकारी जखमी झाला होता. यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र घटनेच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
बुधवारी सकाळी शहरात पुन्हा दोन्ही गटात वाद उफळला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात असलेल्या उपपोलिस अधीक्षक शिवाजीराव गावित व अन्य दोन पोलिस कर्मचारी जखमी झालेत. नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलिस महासंचालक विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस दलासह राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ऐन होळी, रंगपंचमी सणावेळीच आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर होळीच्या सणानिमीत्त मंगळवारच्या बाजारपेठेतील लाखो रुपयांची उलाढाल थांबली. दरम्यान शहरातील काळी मशिदसह सुभाष चौक, भाजीपाला मार्केट, यासह गर्दीच्या ठिकाणी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपट्टी, पाणीपट्टी वसुली काठावरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट चालू वर्षीही पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. परंतु गेल्या वर्षीच्या वसुलीपेक्षा यंदा वसुलीत अल्प वाढ होणार आहे. २३ मार्चपर्यंत महापालिकेची घरपट्टी ८१ कोटींपर्यंत पोहोचली असून, गेल्या वर्षापेक्षा त्यात दहा कोटींची वाढ होणार आहे. तर पाणीपट्टीची वसुलीही ४० कोटींपर्यंत पोहोचली असून उर्वरित आठ दिवसात त्यात दोन ते तीन कोटींनी वाढ होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा वसुली वाढली असली तरी, अपेक्ष‌ति उद्दिष्ठ साध्य करण्यात विविध कर विभागाला अपयश आले आहे.

जकातपाठोपाठ एलबीटीही बंद झाल्याने महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत आटले आहेत. कपाट व हर‌ति लवादाच्या प्रकरणामुळे आर्थिक उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पालिकेने वसुलीसाठी घरपट्टी व पाणीपट्टीवर लक्ष केंद्रीत केले आहे. थकबाकीदारांवर कारवाई करत थेट मालमत्ता जप्तीची प्रक्रियाही सुरू केली आहे. चालू वर्षी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट हे १२२ कोटी आहे, तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ठ हे ७५ कोटी एवढे आहे. परंतु २२ मार्चपर्यंत घरपट्टीची वसुली ही ८१ कोटींपर्यंत पोहोचली आहे. तर पाणीपट्टीची वसुली ३९ कोटी २८ लाखांपर्यंत गेली आहे.

गेल्या वर्षी मार्चअखेरपर्यंत घरपट्टी ७५ कोटी, तर पाणीपट्टीची वसुली ४० कोटींपर्यंत पोहोचली होती. वसुलीला अजून आठवडा शिल्लक असल्याने घरपट्टी वसुली ५ ते ६ कोटींनी वाढून ती ८५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर पाणीपट्टी वसुली ४२ ते ४३ कोटीपर्यंत जाणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणवापर टाळत टिळा होळीला प्राधान्य

$
0
0

पाणवापर टाळत टिळा होळीला प्राधान्य

‍म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर नाशिक परिसरात धुळवडचा जल्लोष तुलनेने यंदा कमी असला तरी विविध रंगांचे टिळे कपाळी लावत नागरिकांनी गुरूवारी आनंद लुटला. पाणी कमी वापराकडे नागरिकांनी कटाक्षाने लक्ष दिले. मात्र, पाही ठिकाणी तरुणाईन रंगाची मनसोक्त उधळण केल्याचेही दिसून आले.

देवळालीला जल्लोष

देवळाली कॅम्प : देवळाली परिसरात हिंदू, जैन, सिंधी समाजाच्या बांधवांसह सर्वधर्मीयांनी एकत्र येत होळी व धुलिवंदन सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला. होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून गोडधोड जेवणासह दुपारनंतर वीरांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. लामरोड वरील भैरवनाथ मंदिर, गवळी वाड्यातील झुलेलाल मंदिर आदी ठिकाणी वीरांची गर्दी दिसून आली.

सोसायट्यांमध्ये रेनडान्स

यंदाच्या सणांवर दुष्काळाचे सावट असल्याने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर परिसरातील महिलांनी सामाजिक भान राखत एकमेकांना टीका लावत आनंद लुटला. मात्र, वडगाव रोडवरील काही सोसायट्यांमध्ये रेनडान्ससाठी तरुणाई आग्रही दिसून आली. यासाठी त्यांनी शेकडो लिटर पाण्याची नासाडी केली

भोजपुरी गीतांची मेजवानी

सातपूर : सातपूर आणि अंबड एमआयडीसी परिसरात रोजगारानिमित्त आलेल्या आणि नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांनी कोरडे रंग उधळत‌ आनंद लुटला. यावेळी भोजपुरी गीत भजनांची मेजवानी उपस्थितांना चाखता आली.

होळीच्या दिवशी गोड जेवणाचा नैवैद्य महिला देवाला दाखवितात. तर धुलिवंदनाला उत्तर भारतीयांकडून नॉनव्हेज जेवणावर अधिक भर असतो. धुलिवंदनाला बहुतांश जणांनी कोरडे रंग लावत सण साजरा केला. यात पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले. सातपूरच्या सोमेश्वर कॉलनी, शिवाजीनगर, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, निलकंठेश्वरनगर, सातपूर राजवाडा व अंबडलिंकरोड भागात जल्लोष दिसून आला.

नगरसेवकांचाही सहभाग

सातपूर भागात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचे वास्तव्य असल्याने स्थानिक नगरसेवकांचा धुलिवंदन कार्यक्रमात सहभाग दिसून आला. शिवाजीनगर परिसरात नगरसेवक दिनकर पाटील, सातपूरला प्रकाश लोंढे, सविता काळे, रवी काळे तर अंबड लिंकरोडला नगरसेवक सचिन भोर यांनी ठिकठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

पर्यावरण संवर्धन

पंचवटी : पंचवटी परिसरात पारंपारीक पद्धतीला फाटा देत साध्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे लाकूड न जळता गोवऱ्यांची होळी करण्यात आली. धार्मिक पद्धतीने पूजाविधी करून नैवद्य अर्पण करण्यात आला. पाणीबचत आणि पर्यावरणाचे रक्षण करीन, इकोफ्रेण्डली धुळवड व रंगपंचमी खेळणार अशी ठिकठिकाणी शपथ घेण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

कचऱ्याची होळी

कळवण : होळीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो ही बाब लक्षात घेत मानूर (ता. कळवण) येथील शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये परिसरातील कचरा गोळा करून प्रतिकात्मक होळी करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. होळीसाठी झाडांचे लाकूड न वापरता परिसरातील प्लास्टिक, कागद व वेगवेगळा कचरा गोळा करून त्याची होळी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याचे दुष्परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी मीनाक्षी पवार, चेअरमन शैलेश पवार, सचिव अनुप पवार, प्राचार्य एन. बी. शिंदे, मुख्याध्यापक जे. एल. पटेल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

राणेनगर मैदानात कचऱ्याची होळी

नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राणेनगर मैदान येथे स्वछता करून कचऱ्याची होळी करण्यात आली. पर्यावरण समतोल राखत वृक्षतोड न करता परिसरातील मोठ्या प्रमाणावर साचलेल्या कचरा गोळा करण्यात आला होता. याप्रसंगी पश्चिम विधानसभा अध्यक्ष अमोल नाईक, शहर उपाध्यक्ष मनोज चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख कुणाल बागडे, पप्पू काळे, राजू दीक्षित, अनिल बोरसे, रिझवान शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

गुटख्याची होळी

सातपूर : डॉ. वसंत पवार वाचनालयासमोर जनविकास फाऊंडेशनतर्फे गुटखा, विडी सिगारेट, तंबाखू यांची होळी करण्यात आली. याप्रसंगी व्यसनमुक्तीची देखील उपस्थितांनी शपथ घेतली. याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, संयज तांबे, राजेंद्र चिखले, विजय पाटील, बाळासाहेब पोरजे, अरुण लांडगे उपस्थित होते.

इकोफ्रेण्डली धुळवड

पंचवटी : तपोवन व परिसरात धुळवड इकोफ्रेंडली साजरी करण्यात आली. विविध राज्यातील समाज बांधवांनी साधे रंग वापरून पाणी अपव्यय टाळण्यात आला. बहारदार गीतांवर तरुणाईसह बच्चे कंपनी मनसोक्त नाचली. मारवाडी युवा मंचचे राजकुमार जेफ, देवकिसन पारीख, राजेश पारीख, रघुनाथ कुमावत, अनिल शर्मा, नारायण सैनी, कैलास सैनी, आदी सहभागी झाले.

कोरड्या रंगाने रंगपंचमीचे आवाहन

नाशिकरोड : जैन सोशल ग्रुप नाशिकरोड देवळालीने यंदाची तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता कोरड्या रंगाने होळी आणि रंगपंचमी खेळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष नितीन कर्नावट आणि अशोक चोरडिया यांनी दिली. ग्रुपची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगाने होळी साजरी करण्याचे आवाहन सदस्यांना करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरण कुंवर यांच्या अडचणी वाढल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनपा शाळेतील निलंब‌ति मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर यांच्या मारहाणीचे प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहचले आहे. खांडेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी तत्कालीन प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने सरकारवाडा पोल‌सिांना दिले आहे. संबंध‌ति प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचेही आदेश आयोगाने दिल्याने कुंवर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी १९ मार्च रोजी तत्कालीन प्रशासन अधिकारी किरण कुंवर आणि निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर यांच्यात हातापायी झाली होती. शिक्षण मंडळाच्या कार्यालयातच खांडेकर आणि कुंवर यांच्यात वाद होऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले. मंगळवारच्या प्रकरणाने राग आल्याने कुंवर यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खांडेकर यांनी केला आहे. यांसदर्भात त्यांनी सरकारवाडा पोल‌सिात तक्रार दाखल केली. मुरलीधर भोर यांच्या समक्ष हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. भोर यांच्या साक्षीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

खांडेकर यांनी कुंवर यांच्याविरोधात पोलिसात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर महापालिका आयुक्तांनीही या प्रकरणाची चौकशी केली होती. परंतु त्यात काहीच निष्पन्न झाले नव्हते. या सर्व वादामुळे कुंवर यांची बदली करण्यात आली होती.

कुंवर यांच्या विरोधात कोणत‌ीही कारवाई न झाल्याने खांडेकर यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. महिला आयोगाला अध्यक्षच नसल्याने या प्रकरणावर पुढे काहीच कारवाई झाली नव्हती. नवीन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गेल्या ११ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होऊन सरकारवाडा पोल‌सिांना या प्रकणाची दखल घेत पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

खांडेकर यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करून संबंध‌ति प्रकरणाचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोल‌सिांनी हे प्रकरण पुन्हा उकरून काढावे लागणार असून, त्यांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागणार आहे. कुंवर सध्या पालघर येथे गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस संस्थांपासून बचावासाठी अलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दहावी अन् बारावीच्या परीक्षेपाठोपाठ आता व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना त्यांचा प्रवेशाचा कोटा भरण्याचे वेध लागले आहेत. या संस्थांप्रमाणे मुख्य यंत्रणांची मान्यता अन् संलग्नतेवाचून अस्तित्वासाठी झटणाऱ्या बोगस संस्थांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन डीटीई (तंत्रशिक्षण संचलनालय) ने विद्यार्थ्यांना अलर्ट दिला आहे.

विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतेवेळी त्या संस्थेतील अभ्यासक्रमाची मान्यता अन् डीटीईशी असणारी संलग्नता याची खात्री स्वत: करून घ्यावी. गरजेनुसार तंत्रशिक्षण संचलनालयाशी संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्याच्या अगोदर त्या संस्थेशी संलग्नात व संबंधित अभ्यासक्रमांना असणारी मान्यता तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संचलनालयाच्या वेबसाईटवर मान्यताप्राप्त संस्थांची यादी देण्यात आली आहे. या यादीचा संदर्भासाठी उपयोग करावा. संस्थाच्या अधिक माहितीसाठी संचलनायाशी संपर्क साधला तरीही मार्गदर्शन करण्यात येईल.

शैक्षणिक संस्थांना मान्यता देणाऱ्या संस्थांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, विद्यापीठ अनुदानआयोग यासारख्या संस्थांचा समावेश आहे. तर अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील इंज‌िनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए, एमएमएस, एम.फार्मसी, एमई, एम.टेक., एमएचएमसीटी आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी dtemaharashtra.gov.in या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभाष देसलेंची अखेर हकालपट्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले यांना बेकायदेशीर मुदतवाढ भोवली असून त्यांनी हकालपट्टी ओढवून घेतली आहे. त्यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी आणि नाबार्डच्या आक्षेपामुळे जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यावर दबाव आल्यानंतर त्यांनी देसले यांना पदावरून हटव‌लिे आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून यशवंत शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेचा कारभार आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुभाष देसलेंची नियुक्ती वादग्रस्तच ठरली आहे. संचालक मंडळांला हाताशी धरून देसलेंनी कार्यकाळ संपल्यानंतरही ३१ मे २०१७ पर्यंत कार्यकाळ वाढवून घेतला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. म्हणून धुळे जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीही नेमण्यात आली होती. देसले यांच्या संदर्भात विभागीय आयुक्तांकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच देसले यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी द्विसदस्यीय समितीने पूर्ण करून तसा अहवाल जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा बॅँकेकडे पाठविला होता. ठाकूर यांच्या चौकशी अहवालात देसले यांना नाबार्डने दिलेल्या मुदतवाढीबाबत प्रश्न उपस्थित करून त्यांची मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे देसले यांची गच्छती अटळ मानली जात होती.

प्रशासकीय पातळीवरच विद्यमान संचालकांची नाराजीही देसलेंना भोवली. त्यामुळे दराडेंनी तातडीने त्यांना पदावरून हटव‌ण्यिाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या एक वर्षाआधीच देसलेंना पदावरून दूर व्हावे लागले आहे. देसलेंचे समर्थन करणारे संचालक आता अचडणीत येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील शिलालेख दुर्लक्षित !

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
ना‌शिक : इतिहासाची साक्ष देणारे व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे शिलालेख नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असले तरी ते दुर्लक्षीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५० दुर्मिळ आणि प्राचीन स्वरुपाचे शिलालेख आहेत. पण, या शिलालेखांच्या जतनासाठी सरकारी पातळीवर असलेली निराशाही या शिलालेखांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे.

कळवण तालुक्यातील हतगड किल्ल्यावर ४६९ वर्षांपूर्वीचा शिलालेख नुकताच सापडला आहे. नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास ५० शिलालेख असून त्यांचे योग्य पद्धतीने जतन होणे आवश्यक आहे. भारतात सर्वात जास्त शिलालेख असणारा किल्ला म्हणजे मालेगाव तालुक्यातील गाळणा किल्ला होय. नाशिक जिल्ह्यात मालेगावजवळ गाळणा टेकड्यांच्या डोंगररांगेत हा गड वसला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील सुमारे २ हजार फूट उंचीच्या गाळणा किल्ल्याची इतिहास काळात 'बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार' म्हणून ओळख होती. या किल्ल्यात सर्वात जास्त म्हणजे ३० शिलालेख आजही व्यवस्थीत स्थितीत आढळतात यातील काही शिलालेख पर्शियन लिपीतील आहेत तर काही शिलालेख देवनागरी लिपीतील आहेत. निजामशाहीच्या काळातील १३९० ते १६३५ या कालावधीतील हे शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या आशेवाडीजवळ असलेल्या रामशेज किल्ल्यावर देखील पेशवेकालीन देवनागरी शिलालेख आहेत. चांदवडजवळ असलेल्या धोडप आणि इंद्राई या किल्ल्यावर पर्शियन भाषेतील मुगलकालिन शिलालेख आजही चांगल्या अवस्थेत आहेत. त्याच प्रमाणे अलंग किल्ल्यावर एक महत्त्वाचा शिलालेख आहे. औरंगजेबाचा सरदार महासिंग भादुरीया याच्यासंबंधी हा शिलालेख माहिती देतो. त्याची बायको या किल्ल्यात सती गेली त्या संबंध‌िचा उल्लेख या शिलालेखात आहे. नुकताच हतगड किल्ल्याच्या परिसरात दोन शिलालेख सापडले असून त्यातील एक शिलालेख अस्पष्ट तर दुसरा शिलालेख अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. धोडप किल्ल्यावर असलेल्या काही शिलालेखांच्या कपच्या निघायला सुरुवात झाली असून काही शिलालेखांवर चुना फासण्यात आला आहे.

अंजनेरीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात संस्कृत शिलालेख आहे. हे शिलालेख यादवकालिन असून आजही अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरतो. त्याचप्रमाणे साल्हेर-मुल्हेर येथे देखील शिलालेख असून त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यावर प्रक्रिया जपण्याची आवश्यकता आहे.

नाशिक जिल्ह्यात शिलालेखांचा मोठा साठा आहे. त्याची जपणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणतेही पावलं उचलीत नसून आहे ती शिलालेख नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही शिलालेख अत्यंत जीर्ण झाले असून या शिलालेखांवर रासायनिक प्रकिया करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या शिलालेखांच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे याला धोका निर्माण झाला आहे. या शिलालेखांच्या संरक्षणाचेी जबाबदारी सरकारने घेतली पाह‌िजे, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून होत आहे.

सरकारने किल्ले व शिलालेखांच्या संरक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्यास नाशिक शहराचा वारसा सुरक्षित ठेवता येईल. निधी नसल्याने पुरातत्व खाते देखील हतबल आहे.

गिरीश टकले, शिलालेख अभ्यासक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images