Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जॉगिंग ट्रॅक लवकरच घोटीकरांच्या सेवेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, घोटी

घोटी शहराच्या वैभवात भर घालणारे अनेक उपक्रम सध्या राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर घोटी शहरात नुकतेच ग्रीन जिमची सुरुवात करण्यात आली. यासोबतच शहरात लवकरच जॉगिंग ट्रॅक सुरू होणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अलका जाधव यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

दरम्यान येथील संभाजीनगर येथे या जॉगिंग ट्रॅक आवारातच ग्रीन जिम उभारण्यात आली असून या ग्रीन जिमचा लोकार्पण सोहळा नुकताच करण्यात आला. या सर्व विकासकामांना जिल्हा परिषदेच्या निधीतून बळ देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्या अलका जाधव यांच्याकडून सुरू आहे. यासोबतच शहरातील घोटी पोलिस ठाण्याच्या लगत असलेल्या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करून या विस्तीर्ण जागेचे सपाटीकरण करण्यात आले. नागरिकांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारून या ठिकाणी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या ग्रीन जिममध्ये विविध साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये हायमास्ट, वनौषधी झाडे, वृक्षारोपण करून हा परिसर सुशोभीत करण्यात येणार असल्याचेही अलका जाधव यांनी सांगितले.

रोजच्या दगदगीच्या जीवनातून वेळ काढत शहरवासीयांना उत्तम आरोग्य व व्यायामासाठी जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिम या संकल्पना राबविण्याच्या निश्चय करून युद्धपातळीवर काम सुरू आहे. या ठिकाणी आगामी काळात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न राहील.

अलका जाधव, जिल्हा परिषद सदस्या, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयमा’त रंगला राजकीय आखाडा

$
0
0

विरोधकांचा रोष वाढल्याने पोलिसांना पाचारण

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

औद्योगिक संघटना असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) निवडणुकीत शनिवारी राजकीय आखाडा रंगला. अर्ज छाननीवेळी विरोधकांचा रोष वाढल्याने थेट पोलिसांना पाचारण करण्याची वेळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आल्याने उद्योग वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर निवडणूक अधिकारी हे निःपक्षपणे काम करीत नसल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. औद्योगिक समस्यांसाठी स्थापन झालेल्या आयमात अशा प्रकारे राजकीय कुरघोडी सुरू झाल्याने उद्योग जगतातून चिंता व्यक्त होत आहे.

आयमा निवडणुकीसाठी दाखल ६० अर्जांच्या छाननीची प्रक्रिया शनिवारी, निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. चंद्रशेखर, सुभाष छोरिया व एम. जी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी दोन उमेदवार हजर नव्हते. जे उमेदवार अर्ज भरताना आणि छाननी प्रक्रियेला गैरहजर राहतात. अशांचे अर्ज बाद का करू नये असा सवाल विरोधी गटाकडून केला गेला. यामुळे वातावरणात तणाव निर्माण होऊ लागल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना अंबड पोलिसांना पाचारण करावे लागले. विरोधी गटाचे तुषार चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी हे सत्ताधारी गटाच्या बाजूने निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता छाननी प्रक्रियेतून पात्र ठरणाऱ्या ५८ उमेदवारांचे अर्ज नोटीस बोर्डवर लावण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी एम. जी. चंद्रशेखर यांनी सांगितले. दरम्यान खोट्या सह्या करून उमेदवारी अर्ज दाखल करणारे निखील पांचाळ, उमेश कोठावदे आणि त्यांचे सूचक व अनुमोदक यांच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करावा, अशी मागणी तुषार चव्हाण यांनी केली आहे. सरचिटणीसपदासाठी एकता पॅनलच्या उमेदवारांचा अर्ज अवैध असल्याने विरोधी गटातील कैलास आहेर हे बिनविरोध निवडणून आल्याचे घोषीत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आज यादी लागणार; गुन्हा दाखलची मागणी

आज, २२ रोजी सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात येणार असल्याचे एम. जी. चंद्रशेखर यांनी मटाशी बोलतांना सांगितले. विरोधकांनी मात्र, सत्ताधाऱ्यांकडून खोट्या सह्या करून सादर करण्यात आलेल्या अर्जांबाबत फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी पोलिसात जाणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी मटाशी बोलतांना सांगितले.

दोन उमेदवारांचे अर्ज बाजूला

निवडणुकीसाठी प्राप्त ६० अर्जांवर सुनावणीसाठी शनिवारी, उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यावेळी निखील पांचाळ व उमेश कोठावदे हे उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांचे अर्ज बाजूला ठेवत ५८ अर्ज पात्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. चंद्रशेखर यांनी सांगितले.

दोन गटांत लढत

आयमा कार्यकारिणीच्या निवडणुकीत सत्ताधारी विरूद्ध तुषार चव्हाण यांचा गट अशी थेट लढत होत आहे. नूतन कार्यकारिणी दोन वर्षांसाठी काम पाहणार आहे. दरम्यान, आज उमेदवारांचे अर्ज छाननीच्यानिमित्ताने रंगलेला राजकीय आखाडा उद्योजकांच्या वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. आजच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष अर्ज माघारीकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजकल्याण’ची भरती खोटी

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

समाजकल्याण विभागाची शासकीय पदभरती असल्याची जाहिरात २९ एप्रिल रोजी, अनेक वर्तमानपत्रांत प्रकाशित करण्यात आली होती. समाजकल्याण विभागात १३६० जागांवर पदभरतीची ही जाहिरात होती. यामुळे राज्यभरातील अनेक बेरोजगारांना नोकरीची लॉटरी लागणार असे चित्र उभे राहिले होते. प्रत्यक्षात ही भरती बोगस असल्याचे पुढे आले आहे. आता त्यासंबंधित वेबसाइटही बंद झाल्याचे निदर्शनास येत आहे.

भारतीय राजमुद्रेचा वापर करून राज्यातील सर्व वर्तमानपत्रांत बोगस जाहिराती या आरोपींनी प्रदर्शित केल्या होत्या. राजमुद्रेचा वापर करून जाहीर केलेल्या जाहिरातीतील संकेतस्थळावर जाऊन अनेकांनी अर्जदेखील भरले होते. काहींनी सत्यता पडताळण्यासाठी समाजकल्याणमध्ये धाव घेतल्यानंतर ही जाहिरात बोगस असल्याची बाब उघड झाली. अमरावतीमधील समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी या जाहिरातीबाबत तक्रार केली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अमरावतीतील मार्डीरोड भागात एका कार्यालयावर धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या जाहिरातीतंर्गत अनेक बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हेगारांची आठ बँक खाती सील करण्यात आली आहेत. अमरावती येथे बनावट समाजकल्याण कार्यालय उघडून अनेक बेरोजगारांना ठगवल्याप्रकरणी नागपूर, अमरावती आणि वर्धा येथील एकूण चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणामुळे नाशिकमधील नोकरीसाठी इच्छुक तरुणांचा हिरमोड झाला आहे.

अशी होती खोट...

मार्च २०१६ पासून उत्तरप्रदेशतील मुख्य सूत्रधाराने अमरावतीत एका भाड्याच्या घरात 'प्रतिसमाजकल्याण' कार्यालय उघडले होते. या तोतयाने नागपूरला 'सहयोग' नावाची कंपनी उघडल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

ही होती जाहिरात...

गर्व्हमेंट ऑफ इंडिया, समाज कल्याण विभाग, सोशल वेल्फेअर महाराष्ट्र, विविध नऊ पदांसाठी एकूण १३६० जागांसाठी २ मे ते २८ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून सदर जाहीरात प्रसारित...

समाजकल्याण सांगते की,

समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य आणि दिल्ली यांच्या माहितीनुसार असे निष्पन्न होते की, समाजकल्याण अंतर्गत अद्याप कोणत्याही पद भरती प्रक्रियेची जाहिरात देण्यात आलेली नाही. ही प्रसारीत झालेली जाहिरात बोगस आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार या प्रकरणी करू नये.

वेबसाईट झाली बंद...

www.socialwelfaremaharashtra.org या वेबसाईटवर सदर अर्ज भरायचे होते. आता ही वेबसाईट बंद आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवचन, कीर्तनकार संमेलन आजपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ व २३ मे रोजी, राज्यस्तरीय प्रवचन आणि कीर्तनकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, पौर्णिमा स्टॉपसमोर, द्वारका येथे दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून किमान एक हजार प्रवचन व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.

आज सकाळी १० वाजता मी स्वहिंदू या ग्र्रंथाचे वाचन आणि हिंदू धर्मातील वर्ण जातीची अट नसलेल्या स्वहिंदू विवाह मंच या संकेतस्थळाचे उदघाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्याहस्ते होईल. त्यानंतर 'जातिनिर्मूलन काळाची गरज' या विषयावर ते विचार मांडणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, २३ मे रोजी सकाळी १० वाजता समाजमंथन या कार्यक्रमांतर्गत सर्वांसाठी खुल्या चर्चासत्र होईल. एकसंघ हिंदू समाजासाठी जातिनिर्मूलन ही काळाची गरज, हिंदुत्वाबद्दल समाजात असलेले अज्ञान दूर करणे, दिशाहीन युवापिढी, नैतिक अध:पतन आणि भ्रष्टाचार हे चर्चासत्राचे मुख्य विषय आहेत. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज उपस्थित राहतील. चर्चासत्राचे समन्वयक म्हणून दामोदर महाराज गावले, पंडित गुरुजी, लक्ष्मण महाराज पाटील, महंत आयुर्वेदाचार्य माधवानंद सरस्वती महाराज असतील.

समाजमंथन कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संमेलनातील या चर्चासत्रातील उपरोक्त सामाजिक प्रश्नांवर सुचविल्या जाणाऱ्या प्रत्येक योग्य विचारांची अंमलबजावणी करून एकसंघ व सुसंस्कृत समाज घडविणे हाच स्वहिंदू संस्थेचा मुख्य कार्यभाग आहे. संमेलनासाठी आलेल्या प्रवचन व कीर्तनकारांची भोजनाची व निवासाची व्यवस्था स्वहिंदू संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे. संमेलन सर्वांसाठी नि:शुल्क असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा. संतांनी चालवलेला समाज प्रबोधनाचा वारसा पुढे सातत्याने प्रवाही ठेवावा, असे आवाहन संस्थेचे प्रवक्ते बी. टी. इंगळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बस तपासणीला ३१ मेची डेडलाइन

$
0
0

फिटनेस सर्टिफिकेट नसल्यास कारवाईचा बडगा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व स्कूल बसेसची तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट नसेल, तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

पुढील महिन्यापासून शाळांचे सत्र सुरू होणार आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बस व्यवस्थित असणे आवश्यक आहे. स्पीड गर्व्हनन्स, ब्रेक, एक्झीट पॉईंट, फस्ट एड बॉक्स, बसच्या पायऱ्यांची उंची, वायपर अशा अनेक महत्वाच्या बाबी यात तपासल्या जाणार आहेत. या तपासणी मोहिमेबाबत संबंधितांना कळवण्यात आले आहे. आतापर्यंत ६० ते ७० बसेसची तपासणी झाली असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी सांगितले.

सध्या शाळांना सुट्या असून, अनेक बसचालकदेखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या हे काम संथ आहे. शहरातील काही शाळांच्या स्वमालकीच्या बसेस असून, त्याची संख्या मोठी आहे. गरज पडल्यास प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शाळेत पोहचून तपासणी करतील, असे बनसोड यांनी सांगितले. तपासणीसाठी येणाऱ्या बसेसमध्ये काही दोष आढळून आल्यास ते दुरुस्त करण्यास सांगण्यात येते. दुरुस्त करून आलेल्या बसेसची पुन्हा तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू झाली असून, नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांवर कायद्याचा बडगा उचलण्यात येईल, असा इशारा बनसोड यांनी दिला.

पुनर्तपासणी विनाशुल्क

नाशिक शहरात एकूण ७७१ स्कूल बस असून, त्यात ४३५ बसेस या शाळांच्या मालकीच्या आहेत. प्रत्येक वाहनाची दरवर्षी तपासणी केली जाते. त्यात स्कूल बसचाही समावेश असतो. म्हणजे एखाद्या स्कूल बसची पाच महिन्यापूर्वी तपासणी होऊन त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले असेल, तर त्या बसेसचीही ३१ मेपर्यंत पुनर्तपासणी करावी लागणार आहे. पुनर्तपासणीसाठी येणाऱ्या बसेससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्याला येतोय रॉकेलचा दर्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरात पिण्याच्या पाण्याला रॉकेलचा दर्प येत असल्याच्या तक्रारी परिसरातील रहिवाशांनी केल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून देवळालीतील बाजार परिसरासह आनंदरोड, लामरोड भागात बोर्डाकडून मिळणाऱ्या पाण्याला रॉकेलाचा वास येत आहे. याबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. अनेक नागरिकांनी या पाण्यामुळे घशाला त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परिसरातील हॉटेलमधून देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यालाही असाच वास येत असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले. बाजार भागात सर्वाधिक प्रमाणात ही समस्या उदभवली असल्याचे नागरिकांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे विविध आजार पसरण्याची भीती असल्याने याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जलपूर्ती विभागाने तातडीने कर्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही नागरिकांनी या पाण्याच्या तक्रारी थेट बोर्डाचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांच्याकडे केल्या असून, याबाबत त्वरित संबंधित विभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

विविध हॉटेल्समधूनदेखील अशाच तक्रारी येत असून, बाजार भागात होत असलेल्या पाणीपुरवठ्यला रॉकेलचा वास येत आहे.

-सुभाष माळी, नागरिक

तीन ते चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याला रॉकेलचा वास येत असल्याने ही बाब बोर्डाच्या नजरेस आणून दिली आहे.

- बाळासाहेब गोडसे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमणे, त्रासामुळे सासूची हत्या

$
0
0

मनमाडमधील वृध्देच्या हत्येप्रकरणी सूनेला अटक; आठ तासांतच खुनाचा उलगडा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील माधवनगर परिसरातील शिक्षक कॉलनी येथील ५८ वर्षीय महिलेच्या खुनाचा अवघ्या ८ ते १० तासात छडा लावण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश मिळाले. सुनेनेच कौटुंबिक वादातून आजारी सासूची गळा दाबून हत्या केल्याचा व आपले बिंग फुटू नये म्हणून लुटीचा व चोरट्याने आपल्याला जखमी केल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. टोमणे, तुलना अन् त्रासामुळे सासूची हत्या केल्याचे शीतल जयस्वाल हिने कबुली जबाबात म्हटले आहे.

पोलिसांच्या वेगवान तपास यंत्रणेमुळे शीतल धीरज जयस्वाल या फिर्यादी महिलेने आपणच आपली सासू नीलम श्याम जयस्वाल हिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक किशोर नवले व तपास अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी शीतल जयस्वालला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मनमाड पोलिसांनी तिला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, २३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणात महिलेचे विसंगत जबाब, स्वतःच्या हाताने स्वतःला जखम करून घेणे, खोटी माहिती देणे तसेच चोरट्याने कपाट उघडून सासूबाईंचे ८०,००० चे दागिने नेले असा फिर्यादीत उल्लेख करणे, मात्र चोरट्याने कपाटातील इतर दागिन्यांना हात का लावला नाही हा पोलिसांपुढे ठाकलेला प्रश्न या गोष्टी पोलिसांच्या तपासासाठी आव्हान ठरल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपाधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे किशोर नवले आणि त्यांची टीम तसेच तपास अधिकारी पुंडलिक सपकाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बनसोडे, उपनिरीक्षक श्रीमती चोरगे यांच्या विविध पथकांनी शुक्रवारी दिवसभर तपास मोहिमेत सहभाग घेत या खुनाच्या प्रकरणाला वाचा फोडली.

खोटे उघडे पडले बाहेर जाताना समोरच्या गवळीबाईंना फोनवर निरोप दिला. नेहमीच्या रिक्षावाल्याला घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. चोर या दिशेने पळाला या शीतल यांनी जबाबात सांगितलेल्या गोष्टी तपासात खोट्या असल्याचे सिद्ध झाले आणि पोलिस खुनाचा छडा लावण्यात यशस्वी झाले. स्वतःच्या हातानेच स्वतःला जखम केल्याचा प्रकार त्यांच्या अंगलट आला.

शाब्दिक चकमकींना वैतागून दाबला गळा सासू नीलम अर्धांगवायूने आजारी होत्या. गेल्या काही वर्षांपासून मी त्यांची सेवा करीत होते. तरीही मला टोमणे मारत. त्यांच्या मुलीशी माझी तुलना करीत. धुळ्याहून आठवड्यातून एकदा पती घरी आले की सासूबाई त्यांचे कान फुंकत असत. त्यामुळे ते माझ्याशी तुटक वागत. आमच्या लग्नानंतरही सासूबाईंमुळे घरात शाब्दिक चकमकी होत. या गोष्टींचा माझ्या मनात राग होता. म्हणून मी त्यांनाच ठार मारण्याचा विचार केला. लुटमार व हल्ल्याचा बनाव करून स्वतःच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हिंमतच होत नव्हती पण..! फिर्यादीत लुटमार व खुनाचा प्रकार साडेनऊनंतर झाल्याचे म्हटले आहे. पण, शुक्रवारी सकाळी सहालाच उठून आपण सासूबाईंचा उशीने गळा दाबून खून केल्याचे नीलम यांनी पोलिस तपासात सांगितले. हातात उशी घेऊन तीन वेळा सासूबाईंच्या जवळ गेली पण हिंमत होत नव्हती. मात्र, मनात प्रचंड राग असल्याने व आपली यांच्या तावडीतून सुटका होईल म्हणून अखेर गळा दाबून खून करीत आपले इप्सित साध्य केले, असे संशयित महिलेने पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरपाडानंतर आता हरसूल एक्स्प्रेस

$
0
0

डॉ. बाळकष्ण शेलार, नाशिक रोड

टोकियो ऑलिम्पिक २०२० निवड चाचणी दिल्ली येथे नुकतीच झाली. हरसूलजवळील दलतपूर आदिवासी पाड्यावरील सहावीत शिकणारी ताई भामणे हिची देशभरातील तीस हजार स्पर्धकांमधून ८०० मीटर धावणे स्पर्धा प्रकारात निवड झाली आहे. हरसूलनजीक सावरपाडा येथील ऑलिम्पिकपटू कविता राऊत आणि पी. टी. उषाप्रमाणे भारताला देदीप्यमान यश मिळवून देण्याचा मनोदय ताई भामणे हिने व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, तिचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग, राजेश पांडे, राजेश आढव यांच्या हस्ते ताई भामणेचा सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनचे सचिव अनिल वाघ यांनी तिचे अभिनंदन केले.

एनवायसीएस आयोजित गेल रफ्तार इंडियन स्पीड स्टार मोहिमेंतर्गत ही निवड झाली असून, ताईचे पाच वर्षांचे शिक्षण, निवास व भोजन आदी सर्व खर्च गेल इंडिया कंपनी करणार असल्याची माहिती नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे (एनवायसीएस) नाशिक समन्वयक राजेश आढाव यांनी दिली. ही सोसायटी राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली युवकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करत आहे.

गेल इंडियाच्या सीएसआर निधीतून ही निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीचे आयोजन एनवायसीएसने केले. खेळाडूंचा सर्व खर्च या निधीतून केला जाणार आहे. खेळाडूंना देश परदेशातील नामवंत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत आलिम्पिक तयारीची संधी मिळणार असल्याची माहिती राजेश आढाव व अनिल वाघ यांनी दिली. खेळाडूंना शैक्षणिक शिक्षण आपल्या जिल्ह्यात घ्यायचे की दिल्लीत घ्यायचे, याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. देशातील ५५ जिल्ह्यांतील तीस हजार खेळाडूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीत भाग घेतला. त्यातून अंतिम नऊ जणांची टोकियो ऑलिम्पिक तयारीसाठी १००, २०० व ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारासाठी निवड करण्यात आली.

बिकट परिस्थितीत यश

ताईचे आईवडील रोजंदारीवर काम करतात. जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. द्राक्षतोड व पडेल ते काम ते करतात. दलतपूरला आजीचे घर आहे. तेथे हे कुटुंब राहते. दलतपूरमध्ये प्राथमिक शालेय शिक्षण घेत असताना ताईची गुणवत्ता जिल्हा अॅथलेटिक्स संघटना व महेंद्र कंपनीने हेरली. कंपनीच्या मदतीने भोसला मिलिटरी स्कूलच्या शिशुविहारमध्ये सहावीत ती शिकत आहे. चौदा वर्षांखालील राष्ट्रीय अॅथेलटिक्स स्पर्धेत ताईने सहाशे मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. कालिकत येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेतही ती सुवर्णकन्या ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हात काम केल्याने निवृत्त वायरमनचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात दीड महिन्यांत उष्माघाताने चौथा बळी घेतला आहे. तालुक्यातील कापडणे येथील शेतकरी व सेवानिवृत्त वायरमन यशवंत माळी यांचे शनिवारी रात्री उष्माघाताने निधन झाले. ते दिवसभर उन्हात राहिल्यामुळे सायंकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. उन्हामुळे चक्करही येत होती मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांचा रात्री दहा वाजता मृत्यू झाला.

जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपासून उन्हाने ४५चा पारा गाठला आहे. अंगाची लाहीलाही होत असून, त्वचा होरपळून निघत आहे. संपूर्ण जिल्हाभरात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत अघोषित संचारबंदी असते. परंतु तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. शनिवारी दिवसभर उन्हात काम केल्याने यशवंत माळी यांना अस्वस्थ वाटू लागले. परंतु त्यांनी डॉक्टरांकडे जाणे टाळल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि चक्कर येवून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते वीज वितरण कंपनीतून गेल्या दोन वर्षांपूर्वी वायरमन म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तांच्या फेरचौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्या कार्यशैलीबाबत उपमहापौर फारुक शाह यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र, केवळ कागदावरच ही चौकशी झाली असल्याचा दावा करीत शाह यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी आयुक्तांची फेरचौकशी करावी, असे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी आण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहेत. याबाबतचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

उपमहापौर शाह यांनी आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्या कार्यपध्दतीबाबत नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डावले यांच्याकडे तक्रार केली होती. धुळे शहरात १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत वारंवार तक्रारी होऊनही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अनधिकृत मोबाइल टॉवर्सचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे तरीही आयुक्तांनी रिलायन्स जिओ या कंपनीला ३६ टॉवर उभारण्यासाठी ना हरकत दाखले दिले. नगरोत्थान योजनेंतर्गत कामांच्या निविदा प्रक्रियेतही भ्रष्टाचार झाल्याचा तक्रारी आहेत. या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी तक्रार शाह यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. जिल्हाधिकारी आयुक्तांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत उपमहापौर शाह यांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल विभागीय आयुक्तांनी घेवून मनपा आयुक्त भोसले यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीमार्फत फेरचौकशी करावी असे आदेश जिल्हाधिकारी मिसाळ यांना दिले आहेत.

कागदाला कागद जोडल्याची तक्रार

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ यांच्यामार्फत आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांची चौकशी करण्यात आली. परंतु चौकशी अधिकाऱ्याने केवळ कागदाला कागद लावून अहवाल तयार केला. तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यासोबत स्वत:चा अभिप्राय दिला नाही. अशा त्रुटींमुळे ही चौकशी असमाधानकारक ठरली. परिणामी भोसले यांच्यावर कारवाई होऊ शकली नसल्याचे शाह यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पात्र उमेदवारांची यादी वेटिंगला

$
0
0




अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफ्रॅक्चरर्स असोसिएशनची (आयमा) निवडणुकीत अर्ज छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली जाणार होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. चंद्रशेखर यांची प्रकृती ठीक नसल्याने पात्र उमेदवारांची यादीसाठी प्रतीक्षा करावी लागली.

निवडणुकीतील उमेदवार तुषार चव्हाण यांनी खोट्या सह्यांचे अर्ज दाखल केल्याची अंबड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी चंद्रशेखर यांना चौकशीसाठी बोलावलेही होते. तब्बेत बरी नसलेले चंद्रशेखर मात्र चौकशीसाठी पोलिसांकडे हजर झाल्याचे सुत्रांकडून समजते. 'आयमा' निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून कायदा मोडला जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. ठरलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणे आवश्यक होते. मात्र, सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत चंद्रशेखर काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

दोन वर्षे कार्यकाळ असलेल्या 'आयमा'ची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून वादात सापडली आहे. निवडणूक अर्ज दाखल केल्यापासून विरोधकांनी अनेक आरोप निवडणूक अधिकारी व सत्ताधाऱ्यांवर केले आहेत. यामध्ये निखिल पांचाळ व उमेश कोठावदे हे दोनही उमेदवार उर्ज भरण्यासाठी उपस्थित नसतांना त्यांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता.

चव्हाण यांनी देखील उमेदवार पांचाळ व कोठावदे यांच्या खोट्या सह्या करून अर्ज सादर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तसेच खोट्या सह्या करून उमेदवारी अर्ज करणाऱ्यांवर तसेच सूचक व अनुमोदक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी चव्हाण यांनी केली.

चंद्रशेखर यांनी पात्र ५८ अर्जांची यादी 'आयमा'च्या बोर्डावर रविवारी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार असल्याचे पत्रकारांना शनिवारी (दि. २१) सांगितले होते. मात्र, रविवारी प्रत्यक्षात विरोधातील उमेदावार पात्र यादी पहाण्यासाठी गेले असता, निवडणूक अधिकारीच आले नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तब्बेत बरी नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सोमवारी (दि. २३) अर्ज माघारीचा दिवस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्णतेच्या लाटेपासून दिलासा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन दिवसांपासून ऊन सावलीच्या खेळामुळे उष्णतेच्या लाटेपासून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात १७ मे ते २१ मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याचा अंदाज राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राध‌िकरणाने वर्तविला होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरू आहे.

मधूनच तयार होणारे ढगाळ हवामान आणि शनिवारी रात्रभर सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे नागरीकांना उन्हाच्या काहीलीपासून थोडासा दिलासा मिळाला. गेल्या एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात शहरातील तापमानाचा पारा वेगाने वाढला होता. महाबळेश्वर पाठोपाठ थंड हवेचे ठिकाण मानले जाणाऱ्या नाशिकने गेल्या महिन्यात उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या खालोखाल पारा दर्शविला. नाशिकचे तापमान महिनाभरापूर्वी तब्बल ४१ डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहचल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उन्हाच्या वाढत्या तडाख्याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणावर दिसून आले. उन्हापासून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.

तापमानाने ही उच्चांकी पातळी गाठण्या अगोदर जिल्ह्याच्या काही भागास पावसाने तडाखा दिला होता. मे महिन्याच्या सुरूवातीला तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे नागरिक धास्तावले होते. आता जून महिन्याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या असून, पहिल्या पावसाच्या आगमनाचे आडाखे बांधले जात आहेत. असे असले तरीही अद्याप पावसात थोडासा कालावधी असल्याने दरम्यानच्या कालावधीत संभाव्य उष्णता व पाणीटंचाईचे संकट कायमच आहे. पावसाच्या आगमनासाठी सुमारे १५ दिवस ते महिनाभराच्या कालावधीपर्यंत वाट पाहवी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्या जनावरांच्या जिवाशी खेळ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येवला वनविभागाने अनेक गावातून गायी जप्त करून आणल्या आहेत. निफाड येथे औरंगाबाद महामार्गावर निफाड इंग्लिश स्कूलशेजारी त्यांना बंदिस्त ठेवले असून, त्यांच्या चारापाण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. भरउन्हात या मुक्या जनावरांचे हाल होत आहेत.

वनविभागाच्या जागेत चरताना या गायी, गोरे आणि शेळ्या वनविभागाने ताब्यात घेतल्या. जागेवर या जनावरांच्या मालकांनी दंड न भरल्याने त्यांच्यावर केस करून ही जनावरे निफाड येथे आणली. डोंगरगाव, पिंपळ खुटे, घुलेवाडी या परिसरातील ही जनावरे आहेत. जप्त केलेल्या जनावरांची काळजी घेण्याची वनविभागाची जबाबदारी आहे. त्यानुसार या जनावरांच्या देखभालीसाठी एक कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याने जमेल तेवढे प्रयत्न करून त्यांना चरायला घेऊन जातो. पण, आता दुष्काळामुळे येथे चरायला काही नसल्याने मी काय करू, असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अविनाश राऊत यांनी हा प्रकार उघडकीस आणून दिला. अधिकारीवर्गाशी या वेळी मोबाइलवरून चर्चा केल्यानंतर चारा म्हणून उसाच्या बांड्या असलेली गाडी आली. तेव्हा कुठे भुकेने व्याकूळ असलेल्या जनावरांच्या पोटात चारा गेला.

पिण्यासाठी पाणीही मिळेना! जप्त केलेली जनावरे हे जानेवारी महिन्यापासून येथे आहेत. अत्यंत कडक उन्हाळा सुरू आहे. तीव्र तापमानाच्या काळातही ही जनावरे खुंटीला बांधून एका जागी उभी आहेत. त्यांना धड निवाराही नाही. पाण्याचा स्त्रोत कमी झाल्याने या जनावरांना कधी गटारीचे पाणी प्यायची वेळ येते. ही वस्तुस्थिती खुद्द इथल्या कर्मचाऱ्याने सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बर अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपसंपदा असल्याच्या आरोपाबाबत तथ्य आढळून आल्यानंतर अँण्टी करप्शन ब्युरोमार्फत उघड चौकशी सुरू होते, अशी उघड चौकशी सुरू असलेल्यामध्ये महापालिका, महसूल, पोलिस, आरोग्य अशा वेगवेगळ्या खात्यातील मातब्बर समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उघड चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून, दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतात, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

घरकुल प्रकल्पाच्या प्रस्तावापासूनच महासभेच्या रडारवर आलेले महापालिकेचे बांधकाम विभागाचे चीफ इंजिनीअर सुनील खुने यांची एसीबीमार्फत उघड चौकशी सुरू आहे. चौकशी अधिकाऱ्याने काही महिन्यापूर्वी त्यांचे एकूण मालमत्ता, उत्पन्न, व खर्च यांचा तपशील वरिष्ठांना सादर केला. मात्र, यात चार त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार २८ मार्च २०१६ हा अहवाल परत करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपअधीक्षक छापरिया करीत आहेत.

एसीबीचे पोलिस अध‌‌ीक्षक डी. पी. प्रधान याबाबत म्हणाले,'आम्ही संकल‌ित केलेली माहिती खरे की खोटे हे सिध्द करण्याची जबाबदारी संबंध‌ित व्यक्तीचे असते. अनेकदा सदर व्यक्ती शेती उत्पन्न किंवा हात उसणे कर्ज दाखवतात. मात्र, त्याचे सबळ पुरावे सादर झाले पाहिजे. आयटी रिर्टन्स नसेल तर असे पैसे अपसंपदा म्हणून गणले जातात. युनिटचे एसपी किंवा पोलिस महासंचालक कार्यालयातून या त्रुटींवर काम केले जाते. काढलेल्या त्रुटींवर समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले नाही तर गुन्हा दाखल होतो.' हा नियम सर्वच प्रकरणात वापरला जातो, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

सुनील खुनेपाठोपाठ सिव्ह‌िल हॉस्पिटलचे तत्कालीन सिव्ह‌िल सर्जन आसाराम दादासाहेब भालसिंग, सिव्ह‌िलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गणपत रायसिंग चव्हाण, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक प्रकाश परदेशी, सिव्ह‌िल सर्जन प्रमोद मुरलीधर चपळगांवकर, पाटबंधारे विभागाचे डिव्ह‌िजनल इंजिनीअर आत्माराम खैरनार, सहायक पोलिस निरीक्षक शिवसिंग जाधव, सहकार विभागातील विशेष लेखा परीक्षक अनिल दगाजी पाटील, वन विभागातील दक्षता विभागाचे अधिकारी हेमंत माणकलाल छाजेड, पाटबंधारे विभागाचे डिव्ह‌िजनल इंजिनीअर पंड‌ित भगवान पाटील, निफाडच्या निवासी नायब तहसीलदार राजश्री अहिरराव (गांगुर्डे), पीडब्लूडीचे बीड येथील एक्झ‌िक्युटीव्ह इंजिनीअर वसंत बाविस्कर, माजी सहायक पोलिस आयुक्त संजीव ठाकूर, पोलिस निरीक्षक दिलीप सुरेश गावीत, सिन्नरचे तत्काल‌ीन तहसीलदार सुनील महादू सैंदाणे, मालेगावचे तत्कालीन डीव्हायएसपी योगेश चव्हाण, मालेगावाचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्यासह अनेक बडे अधिकारी एसीबीच्या रडारवर आहे. यातील काही जणांनी आपल्याकडील संपत्तीची माहितीच अद्याप सादर केलेली नाही किंवा त्यांनी सादर केलेली माहिती त्रुटींमुळे नाकारण्यात आलेली आहे. उघड चौकशी सुरू असली म्हणजे संबंध‌ित व्यक्ती दोषी असतोच असे नाही. संबंध‌ित व्यक्तीस क्लिन चीट मिळाली तरी ती फाईल बंद होण्यास काही कालावधी लागतो, असे एसपी प्रधान यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिका निवडणुकीचे वाहू लागले वारे

$
0
0

येवल्यात भाजपची नियोजनासाठी झाली बैठक

म. टा. वृत्तसेवा, येवला

पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या येवला नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या वतीने आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची प्राथमिक नियोजन बैठक शहरातील विश्रामगृहावरील सभागृहात झाली. या बैठकीत पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी हजेरी लावत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पालिका निवडणुकीचे तिकीट वाटप हे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी चर्चा व विचारविनिमय करूनच निश्चित केले जाईल, असा विश्वास खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पालिकेच्या निवडणुकीत फिल्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा व्हावा. युती होईल अथवा नाही, मात्र पक्षाचा कार्यकर्ता सक्षम व्हायला हवा, असे यावेळी पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस बापू पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेला नवा कार्यकर्ता उरावर बसणार नाही, याकडे विशेष लक्ष देऊन, तर कधी जुन्यानव्यांचा मेळ घालून जुन्याचे मार्गदर्शन घेत पालिकेवर आगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, असे यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले. पालकमंत्र्यांनी येवल्यात अधिकारी व पक्ष कार्यकर्ते यांची संयुक्त सभा लावावी, असे माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले. कल्याणकारी योजना मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे. मतभेद सोडून काम करावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष दादाराव जाधव यांनी केले.

भाजप नगरसेवक बंडू क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप केले. पालिका निवडणुकीच्या वातावरणात वरिष्ठ भाजप नेत्याच्या सभा व्हाव्यात, आपसातील हेवेदावे दूर करून एकसंघ रहा अशी अपेक्षा यावेळी गोरख खैरनार, सागर नाईकवाडे, वीरेंद्र परदेशी यांनी व्यक्त केली. भाजपा येवला शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी पक्षाच्या येवला शहरातील केल्या जात असलेल्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकला.

बैठकीस भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम, ज्येष्ठ नेते कैलास सोनवणे, नितीन पांडे, विजय श्रीश्रीमाळ, मनोज दिवटे आदी उपस्थित होते. गणेश खाळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

...तर एकला चलो रे येवला शहरात पक्षाने गेल्या काही पक्षाने केलेली कामे सांगत भाजपाचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे, असा सूर शिंदे यांनी आळवला. भाजपचा नगराध्यक्ष होणार असेल तरच युती करावी अन्यथा 'एकला चलो रे' साठी आम्ही सक्षम असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकाटे, गावित चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक ः नाशिक विभागातील सात आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या उत्पन्नाची अँटी करप्शन ब्यूरोमार्फत उघड चौकशी सुरू आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील चार लोकप्रतिनिधींचा यात समावेश असून, सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे, नवापूरचे शरद गावित, तसेच जळगाव महापालिकेतील नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याही मालमत्तेची तपासणी एसीबीमार्फत सुरू आहे. याशिवाय विविध ८२ अधिकाऱ्यांच्या प्रकरणांची एसीबीकडून झाडाझडती सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक विभागात आमदार म्हणून कार्यरत असलेल्या किंवा राहिलेल्या एकूण सहा जणांची एसीबीने उघड चौकशी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते बबनराव पाचपुते, तसेच अशोक लांडे हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपातून नुकतेच निर्दोष सुटलेले राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप, तसेच लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेले भानुदास कोतकर यांचा यात समावेश आहे. भाजपवासी झालेले सिन्नर तालुक्याचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याही मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. जळगाव महापालिकेतील शहर विकास आघाडीचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनाही एसीबीने रडारवर घेतले आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक डी. पी. प्रधान यांनी सांगितले, की एखाद्या व्यक्तीकडे कमी कालावधीत खूप संपत्ती जमा होत असल्याची माहिती मिळाल्यास एसीबी गुप्त चौकशी सुरू करते. संबंधित व्यक्तीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळवली जाते. त्यात तथ्य आढळून आल्यास उघड चौकशीसाठी राज्य सरकारकडे मंजुरी मागितली जाते. नाशिकमध्ये अशा प्रकारची ८२ प्रकरणे उघड चौकशीसाठी घेतली आहेत. त्यात नाशिकमधील ४० प्रकरणांचा समावेश आहे. उघड चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने फॉर्म एक ते सहा भरून आपल्याकडील संपत्तीचा समाधानकारक खुलासा केला नाही तर त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल होतो.

कृषी विभागाचे तीनतेरा

नाशिक युनिटअंतर्गत कृषी विभागाच्या तब्बल आठ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची उघडपणे चौकशी सुरू आहे. कृषिप्रधान जिल्हा अशी नाशिकची ओळख असून, याच विभागातील वरिष्ठांसह कनिष्ठ अधिकारी एसीबीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ही केवळ चौकशी आहे. उघड चौकशी सुरू असली म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरते असे नाही.

तीन आमदार भाजपचे

सत्ताधारी भाजपमध्ये सक्रिय झालेल्या तीन आजी-माजी आमदारांची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधीच्या अपसंपदेची उघड चौकशी २०१४ मध्ये सुरू झाली. त्यात अद्याप समाधानकारक प्रगती नाही. अनेक लोकप्रतिनिधी माहिती देण्यास टाळटाळ करतात. लोकसेवकांची भूमिका पार पाडणाऱ्या या लोकप्रतिनिधींची चौकशी पूर्ण होऊन काय समोर येते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मानवतेच्या दृष्टीने स्थगिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संयोजक व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मानवतेच्या दृष्टीने नाइलाजास्तव स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी पत्रकाद्वारे केला.

खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख रकमेबाबत शासन निर्णयानुसार गंभीर त्रुटी आढळल्याने खेळाडूंचे आर्थिक नुकसान होणार होते, तसेच यापूर्वीच्या जालना व अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेच्या शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याचे निदर्शनास आल्याने दुसऱ्या दिवशी तात्पुरते सामने थांबविण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी २२ मे रोजी सकाळच्या सत्रात स्पर्धा सुरू करण्याची तयारी असताना स्पर्धा संयोजन समितीचे कोशाध्यक्ष व प्रभारी उपसंचालक संजय सबनीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची क्रीडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी क‍ळविले. ही माहिती समजताच परिषदेच्या सर्व सभासदांनी तातडीने रुग्णालयात जाऊन सबनीस यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेची तातडीने बैठक होऊन मानवतेच्या दृष्टीने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तामिळनाडूचा श्रीनाथ विजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे रेषा असोसिएट्सतर्फे रविवारी झालेल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या नारायणन श्रीनाथ याने विजेतेपद पटकावले. गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी उपविजेती, तर अव्वल मानांकित ग्रँडमास्टर शार्दूल गागरेला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. येथील स्वामीनारायण मंदिरात रविवारी दुपारी अडीच वाजता स्पर्धेचा समारोप झाला.

आमदार सीमा हिरे, डॉ. गुजराथी, कांगणे, लक्ष्मण सावजी, अनिल भालेराव, अर्चना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत नाशिकच्या १५ ते २० खेळाडूंच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली, तर नवोदितांना फिडे रेटिंग मिळेल, अशी माहिती पंचप्रमुख नितीन शेणवी यांनी दिली. स्पर्धेत नाशिकच्या १३ मुलांनी बक्षिसे मिळवली. स्पर्धेचे आयोजक मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

स्पर्धेचा निकाल (कंसात गुण)

१. आंतरराष्ट्रीय मास्टर नारायणन श्रीनाथ, तामिळनाडू (९), २. महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी, गोवा (८.५), ३. आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे, सांगली (८), ४. आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, मुंबई (८), ५. शाश्वत चक्रवर्ती, छत्तीसगड (८), ६. ग्रँडमास्टर शार्दूल गागरे, अहमदनगर (८), ७. फिडे मास्टर नितीश बेलूरकर, गोवा (७.५), ८. इंद्रजित महिंद्रकर, औरंगाबाद (७.५), ९. ऋतुजा बक्षी, औरंगाबाद (७.५), १०. पवन दोडेजा, अमरावती (७.५), ११. एम. विनयकुमार, तेलंगणा (७.५), १२. अवधूत लेंडे, नाशिक (७.५), १३. प्रतीक मुळे, पुणे (७.५), १४. गणेश ताजणे, नाशिक (७), १५. रईस अहमद ए. क्यू., सातारा (७).

विशेष पारितोषिके

१. कल्पेश देवांग, नंदुरबार, २. सौरभ कुलकर्णी, मुंबई, ३. नमीत चव्हाण, पुणे, ४. गिरीश डाकलिया, छत्तीसगड, ५. पद्मानंद मेनन, पुणे, ६. सम्यक पतोडी, औरंगाबाद, ७. यश ढोके, नागपूर, ८. बालाजी एम., तामिळनाडू, ९. वल्लभ कवी, पुणे, १०. आविष्कार वानखेडे, नाशिक.

उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू

१. उदय नाईक, मुंबई उपनगर

उत्कृष्ट नवोदित खेळाडू

१. प्रणव शास्त्री, ठाणे, २. विवेक पाटील, नंदुरबार, ३. मोतीलाल गावित, धुळे, ४. कौशिक साळसिंगीकर, नाशिक, ५. सिद्धान्त सोनार, नाशिक,

उत्कृष्ट महिला खेळाडू

१. साक्षी चितलांगे, औरंगाबाद, २. धनश्री राठी, नाशिक, ३. शलाका पागे, नागपूर, ४. श्रुती राठी, नाशिक, ५. श्रेया राठी, नाशिक

१३ वर्षांखालील वयोगट

मुले ः १. आदित्य सामंत, नाशिक, २. पार्थ लोणकर, नागपूर, ३. आर्यन शहा, पुणे, ४. आर्यन पोलखरे, ५. नील शिंत्रे, मुंबई. मुली ः १. प्रचीती चंद्रात्रे, नाशिक, २. ग्रीष्मा धुमाळ, ठाणे, ३. कियार्रा खटुरिया, मुंबई शहर, ४. अनुभा राठी, अकोला, ५. श्रावणी सामंत, नाशिक

११ वर्षांखालील वयोगट

मुले ः १. सिद्धान्त देवरे, नाशिक, २. साहील खोसे, पुणे, ३. प्रणीत कोठारी, अहमदनगर. मुली ः १. श्रुती रांका, नाशिक, २. अदिती वावल, पुणे, ३. अयशी बासू, मुंबई उपनगर, ४. वृंदा राठी, नाशिक.

९ वर्षांखालील वयोगट

मुले ः १. ओम कदम, मुंबई, २. वीर कडाकिया, मुंबई उपनगर, ३. मारू मिटांक, मुंबई उपनगर. मुली ः १. पृथा गाजरे, मुंबई उपनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्यांचे दर होईना कमी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिना संपत आला तरी आंब्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आवक भरपूर असूनही दर मात्र कायम आहेत. तसेच सफरचंद व इतर फळांचे दरही कायम असून, केळींची आवक थोडी मंदावली आहे.

अक्षय तृतीयेनंतर साधारणतः आंब्यांची मागणी कमी होण्याबरोबरच दरही कमी होतात. यंदा मात्र, अजूनही आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत. लालबाग, केशर, देवगड, राजापुरी, हाफूस, बदामी आदी आंब्यांचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवकेबाहेर आहेत. साधारणतः ५० रुपये किलोच्या पुढेच आंब्यांचे दर आहेत. हाफूस आंबा १०० रुपये किलोच्या पुढे तर केशर ८० रुपये किलोने विक्री होत आहे. गावठी आंबे अद्याप बाजारात दाखल न झाल्यानेही आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत, असे विक्रेत्याने सांगितले. सफरचंद, चिकू, केळी, अननस, किवी, टरबूज, संत्री या फळांचे दर मात्र जैसे थे आहेत. टरबुजांची अजूनही चांगली आवक होत असून नगानुसार दर ठरत आहेत. सफरचंदचे दर १०० ते १६० रुपये किलोने मिळत आहेत.

किलोचे दर आंबे - ५० ते १२०, सफरचंद - १४० ते १६०, चिकू - ६०, अननस - ५०, संत्री - ६०, केळी - ३० रु. डझन, किवी - ३० रुपयांना एक, टरबूज - २० ते ७० रु. नग, नारळ - ३० रुपये नग.

कांदापात ४० रुपये जुडी

पाणीटंचाईची झळ भाजीपाल्याला बसली असून, पालेभाज्या कडाडल्या आहेत. कांदापात ४० ते ५० रुपये जुडी तर मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे. इतर फळभाज्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवकेबाहेर गेले आहेत. दुष्काळामुळे भाजाापाल्याची आवक घटल्याने दरावर परिणाम झाला आहे. लागवड नसल्याने आवक प्रचंड घटल्याने कांदापात पन्‍नास रुपये जुडीचा उच्‍चांक गाठला आहे. शेपूनेही कधी नव्हे त तीस रुपये जुडीपर्यंत मजल गाठली आहे. पालक आठ ते दहा रुपये जुडी तर मेथीही ४० रुपये जुडीने ‌विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या कमी झाल्या आहेत.

फळभाज्यांचेही दर वाढले आहेत. पाच ते सात रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो आज २० ते ३० रुपये किलोने मिळत आहेत. कारले, गिलके, दोडके यांचे दर ६० ते ७० रुपये किलोवर स्थिरावले आहेत. गवार, भेंडी व वांगे हे पन्नाशीच्या घरात खेळत आहेत. कोबी व फ्लॉवरनेही वीस रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. पाणीटंचाईमुळे नवीन लागवड नसल्याने अजून महिना दीड महिना तरी भाजीपाल्याचे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

किलोचे दर कारले - ६०, गिलके - ६०, दोडके - ६०, वांगे - ४०, बटाटे - २०, गवार - ५०, शेवगा - ४०, टोमॅटो - ३०, कोबी - २०, फ्लॉवर - २०, मिरची - ७०, भेंडी - ४०, मेथी - ३० ते ४५, कोथिंबीर - १० ते २५, कांदापात - ४० ते ५०, शेपू - २० ते ३०, पालक - ८ ते १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा अखेर स्थगित!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे सुरुवातीपासून वादात सापडलेली राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व आयोजकांच्या 'मैदानाबाहेरील कुस्त्यां'मुळे रविवारी अखेर स्थगित करण्यात आली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचा फटका खेळाडूंनाच बसला आहे. या संपूर्ण प्रकाराचे खापर प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्यावरच फोडण्यात आले. या धक्क्यामुळे सबनीस यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. एकूणच या प्रकाराने महाराष्ट्रातील मानाच्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कुस्तीप्रेमींचे लक्ष लागलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला तारीख जाहीर करण्यापासूनच ग्रहण लागले होते. या स्पर्धेची तारीख तीन वेळा बदलण्यात आली. अखेरीस २० मेपासून येथील सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन वजनगटांतील स्पर्धा झाल्या. मात्र, कुस्तीगीर परिषद व आयोजकांमध्ये दुसऱ्या दिवसापासून बक्षिसाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली. जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमानुसार वजनगट वाढल्याने त्याची अंमलबजावणी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतही करण्यात आली. त्यामुळे सातऐवजी आठ वजनगटांत ही स्पर्धा कुस्तीगीर परिषदेने घेतली. शासननिर्णयाप्रमाणे या वाढीव वजनगटाची बक्षिसे आयोजकांनीच द्यावी, अशी भूमिका महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतली. मात्र, शासननिर्णयात सातच वजनगट निश्चित करण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला. या दोघांच्या वादात शनिवारच्या सर्वच लढती रद्द करण्यात आल्या होत्या. कुस्तीगीर परिषद आपल्या मुद्द्यावर अडून राहिल्याने आयोजकांच्या बैठकीत अखेरीस ही बक्षिसे देण्याचे मान्य करण्यात आले. स्पर्धा सुरू राहावी, खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून आयोजकांना कुस्तीगीर परिषदेपुढे नमते घ्यावे लागले.

धुसफूस सुरूच

बक्षिसाच्या मुद्द्यावरून आयोजकांनी माघार घेतल्यानंतरही कुस्तीगीर परिषद व आयोजकांतील दरी वाढतच गेली. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या कानावर घालण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लांडगे यांनी शनिवारी तातडीने पुण्यातून नाशिककडे कूच केले. लांडगे रात्री अकराच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. त्यामुळे धुसफूस आणखी वाढली. लांडगे यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतर प्रभारी क्रीडा उपसंचालक सबनीस यांनाच जबाबदार धरले. त्यांच्यावर सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. एकूणच या प्रकाराने सबनीस अस्वस्थ झाले. शनिवारी मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडल्याने क्रीडाधिकारी अविनाश टिळे यांनी त्यांना डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिकारीच नसल्याने कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात येत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची क्रीडामंत्र्यांसोबत सोमवारी बैठक आहे. या बैठकीतच पुढचा निर्णय घेऊ. मात्र, तोपर्यंत कुस्ती स्पर्धा होणार नाही, असे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

ज्या बक्षिसाच्या मुद्द्यावर कुस्तीगीर परिषद अडून बसली होती, ती बक्षिसे देण्यास मान्यता दिल्यानंतरही परिषदेने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा आहे. खेळाडूंच्या भल्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेतली होती. आता यामुळे खेळाडूंचेच नुकसान झाले आहे. आयोजनासाठी केलेला सर्व खर्चही यामुळे वाया घेतला आहे, आयोजक आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>