Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्हा निर्मितीबाबत लवकरच निर्णय

$
0
0

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्हा निर्मिती तसेच अन्य तालुक्यांची निर्मिती संदर्भात आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी बुधवारी, (दि. २०) विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले असून जिल्हा विभाजनाबाबत गठित करण्यात आलेल्या समितीला ३१ जुलै २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर शासनस्तरावर मंत्रिमंडळा‌कडून मान्यतेच्या निश्चित निकषानुसार याबाबत उचित निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

यासोबतच मालेगाव येथे पोलिस आयुक्तालय स्थापन करणेबाबत फेरप्रस्ताव पोलिस महासंचालकांकडून अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावकरांना हवेत प्रशस्त रस्ते

$
0
0

'आम्ही मालेगावकरां'ची निवेदनाद्वारे शहरात २१ डीपी रोडची मागणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील २१ डी. पी. रोड मुख्य रस्त्यांचा विकास सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) अथवा इतर शासकीय यंत्रणेतर्फे करण्याची मागणी 'आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष' समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

या निवेदनात, राज्य सरकार मालेगाव महापालिकेला विविध हेडखाली अनुदान देत असलेल्या अनुदानातून या ठिकाणी मोजकीच विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे अमुलाग्र बदल व दृष्टीक्षेपात पडेल असे विकास कामे या निधीतून होत नसल्याचेही यात म्हटले आहे. त्यामुळे सरकारतर्फे देण्यात येणारा, डीपीडीसी अंतर्गत येणारा निधी यामध्ये बहुतांश कामे किरकोळ स्वरूपाचे असतात व त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही होतो. शहरातील जुना आग्रारोड सोडला तर अवजड वाहतूक करण्यास एकही रोड सक्षम नाही. तसेच शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरणही केलेले नाही. दतर गोष्टीकडेही दुर्लक्ष केले असल्याचे यात नमूद केले आहे. त्यामुळे सरकारने मालेगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती स्वतःकडे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी निखिल पवार, प्रा. के. एन. अहिरे, देवेंद्र अलई, राहुल देवरे आदी उपस्थित होते. शहरातील मोसम पूल ते मोची कॉर्नर, एकात्मता चौक ते डी. के. कॉर्नर, कॉलेज रोड ते रावळगाव नाका ते भयगाव, मोसम पूल ते टेहेरे चौफुली, नामपूर नाका ते डी. के. कॉर्नर ते टेहेरे चौफुली रिंगरोड, नामपूर रोड ते आजोंदेबाबा ते वैतागवाडी ते कुसुंबारोड रिंगरोड यांसारखे एकूण २१ रस्त्यांबाबत डीपी रोड करण्याची मागणीही आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केली.

महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

समितीने या निवदेनात महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. महापालिका अस्तित्वात येऊन १६ वर्ष होत आली परंतु मालेगावकर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मालेगाव महापालिकेचे उत्पन्न अत्यल्प आहे. येथे ठोस विकास कामांसाठी पैसा नाही. आस्थापना खर्च ४५% पेक्षा जास्त आहे. स्वच्छतेवर खर्च केला जातो. उरलेला निधी सिमेंट रोड व गटार दुरुस्तीवर वापरला जातो. त्यामुळे महापालिका काय विकास करू शकेल, असा प्रश्न समितीने विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला निर्यातीत दिंडोरी अव्वल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशात भाजीपाल्याची निर्यात करण्यासाठी राज्यात ९४ शेतकऱ्यांची ऑफलाइन नोंदणी करण्यात आली असून, त्यातील ४४ शेतकरी एकट्या दिंडोरी तालुक्यातील आहेत. कृषी विभागाच्या प्रयत्नाने जिल्ह्याने या प्रकारच्या नोंदणीत आघाडी घेतली असून, कृषी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत त्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

फळांच्या निर्यातीसाठी 'ग्रेपनेट' सारखी ऑनलाईन प्रणाली आहे. मात्र भाजीपाला उत्पादन वर्षभर होत असल्याने आणि उत्पादनाचे वेळापत्रक निश्चित नसल्याने ऑनलाइन नोंदणीत अडचणी येतात. त्याबाबत पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, तोपर्यंत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफलाइन नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना असणारे निर्यातक्षम भाजीपाला नोंदणीचे अधिकार कृषी आयुक्तालयामार्फत तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दिंडोरीचे तालुका कृषी अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी शेतकऱ्यांना याबाबतची माहिती दिली. निर्यात प्रक्रियेतील मध्यस्त आणि उमराळेतील निर्यातदारांचे गट यांच्यात समन्वय होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येवून दूधी, तोंडली, मिरची, शेवगा, आवळा या पाच पिकांकरिता नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येक देशाची वेगवेगळी मागणी लक्षात घेऊन पुढील टप्प्यात अपेडा आणि कृषी आयुक्तालयामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे पिकांचे वेळापत्रक निश्चित करणे, पॅकेजिंग, पिकांची गुणवत्ता याबाबत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचून निर्यात वाढीला चालना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अभियंत्याला लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील सोसायटीच्या वीज जोडणीसाठी २४ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेलरोड येथे वीज अभियंत्यास रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस अधीक्षक दौलत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज जोडणीसाठी जेलरोड येथील हौसिंग सोसायटीच्या चेअरमनने अर्ज केला होता. त्याने सोसायटीतील सात सदस्य व सोसायटीकरिता स्वतंत्र एक असे एकूण आठ कनेक्शन मिळावेत यासाठी २१ एप्रिल १६ ला कोटेशनसह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या द्वारका चौकातील खरबंदा पार्कमधील कार्यालयात अर्ज केला होता. त्यांना नवीन वीज कनेक्शन मंजूरही झाले होते. मात्र, कंपनीने पुढील कार्यवाहीसाठी त्यांना जेलरोडच्या शिवाजीनगर येथील उपकार्यालयात जाण्यास सांगितले. सोसायटीच्या चेअरमनने शिवाजीनगरला जाऊन कनिष्ठ वीज अभियंता दीपक उल्हास चौधरी यांची भेट घेतली. वीज कनेक्शन देण्याची विनंती त्यांना केली. चौधरी यांनी त्यांच्याकडे आठ कनेक्शनचे प्रत्येकी तीन हजार याप्रमाणे २४ हजाराची लाच मागितली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याजवळ डीडीसी बँकेवर दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरालगतच्या नगाव गावातील मुंबई-आग्रा महामार्गाजवळ असलेल्या डीडीसी बँकेच्या शाखेत गुरूवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तांनी दरोडा टाकून ८८ हजार रूपये लंपास केल्याची घटना घडली. तीन ते चार दिवसांपूर्वी तालुक्यातील कुसूंबा येथील स्टेट बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला होता. नगावमधील घटनेमुळे बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धुळे शहरापासून पाच कि.मी. वरील नगावमध्ये महामार्गाच्या बाजूला धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेची शाखा आहे. गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेचे प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून तिजोरी गॅस कटरने फोडली आणि त्यातील ८८ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. श्वास पथकाने गावातील बसस्थानकापर्यंत दरोडेखोरांचा माग काढला. या प्रकरणी पश्चिम पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीडीसी बँकेच्या नगाव शाखेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत याबाबत गेल्या काही महिन्यांपूर्वी पत्र देण्यात आले होते. त्याकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले. बँकेत सुरक्षारक्षकाची नेमणूक नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच दररोज बँकेत किमान एक लाख रुपयांची रोकड असते आदी सर्व माहिती घेऊनच चोरट्यांनी ही चोरी केली असलयाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका ठरविणार डेंग्यूचा रुग्ण!

$
0
0

वैद्यकीय विभागाचा डॉक्टरांना फतवा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूच्या वाढत्या प्रसारावर रोख घालण्याऐवजी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अफलातून फंडा शोधला आहे. शुक्रवारी वैद्यकीय विभागाने शहरातील डॉक्टरांच्या संघटनांची बैठक घेऊन खासगी डॉक्टरांनी परस्पर डेंग्यूच्या लागणीची घोषणा करू नये, असा फतवा काढला आहे.

जानेवारी ते जुलैपर्यंत शहरात २१९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. हॉस्पिटलमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास संबंधित हॉस्पिटलने पालिकेच्या वैद्यकीय विभागाला सूचित करावे. पालिकेच्या पथकाकडून रक्त तपासणी केल्यानंतर व अहवाल आल्यानंतर पालिकाच डेंग्यूच्या आजाराची घोषणा करेल, असे निर्देश प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी हॉस्पिटल्स व खासगी डॉक्टरांना दिले आहेत. जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच शहरात ७२ रुग्ण आढळून आले, तर डेंग्यूसदृश आजाराने तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. महापौरांसह आयुक्तांनी यासंदर्भात आरोग्य व वैद्यकीय विभागाची कानउघाडणी केल्यानंतर शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी शहरातील डॉक्टर्स संघटनांची बैठक बोलावली. या बैठकीला आयएमए व निमाच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिवृद्ध भंडारकर, निमाचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन कोठारी, डॉ. मृणालिनी केळकर, पॅथालॉजिस्ट संघटनेचे सुशील अहिरे यांच्यासह खासगी डॉक्टर्स उपस्थित होते. या बैठकीत डॉ. डेकाटे यांनी डेंग्यूसंदर्भात सूचना केल्या. खासगी हॉस्पिटल्सकडून यापुढे परस्पर डेंग्यू लागणची घोषणा करू नये, असे निर्देश त्यांनी दिले. डेंग्यूचा रुग्ण आला, तर सर्वप्रथम हॉ‌स्पिटलने त्याची माहिती वैद्यकीय विभागाला दिली पाहिजे. पालिकेचे पथक संबंधित रुग्णांची रक्त तपासणी करेल. त्यानंतर पालिकाचा डेंग्यूच्या लागण संदर्भातील घोषणा करेल, असा फतवा त्यांनी काढला.

डासांची घनता वाढली

शहरात पावसामुळे डांसाचीही घनता वाढली आहे. आरोग्य विभागाने नुकत्याच घेतलेल्या आकडेवारीवरून शहरात अॅनाफिलीस डासांची घनता ०.४६ एवढी झाली आहे. या डासांमुळे मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. क्युलेक्स डासांची घनता ३.२० एवढी झाली आहे. डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या एडीस डासांची घनता ०.८२ पर्यंत पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द कुकरी शो’मध्ये मिळाल्या रेसिपी टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

जेवण शाकाहारी असो किंवा मांसाहारी, त्यासाठी बेसिक ग्रेव्ही तयार असली म्हणजे जेवण अत्यंत रुचकर बनते. आयत्यावेळी पाहुणे आले आणि त्यांना पटकन जेवण बनवून द्यायचे असेल, तर त्यावेळी तयार ग्रेव्ही फार उपयोगी पडते, असे मत प्रसिध्द मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.

हॉटेल एमराल्ड पार्क येथे 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'द कुकरी शो'मध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला 'मटा'च्या वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी ब्राऊन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, केळ्यांच्या सालींपासून फ्राईड नूडल्स, मॉकटेल, पनीर मसाला, मलाई कोफ्ता, पालक पनीर आदी विविध प्रकारच्या डिशेस बनवून दाखवल्या. यावेळी सभागृहात उपस्थितांनी या रेसिपी लिहून घेतल्या, तर काहींनी मोबाइलवर संपूर्ण कार्यक्रमच रेकॉर्ड केला.

मास्टर शेफ विष्णू मनोहर हे चांगले कूक तर आहेतच शिवाय ते कवी मनाचेही आहेत. याचा प्रत्यय उपस्थितांना आला. डायटिंग करायला लागलेल्या व्यक्तीच्या मनातील व्यथा नटसम्राट मधील टू बी ऑर नॉट टू बी या स्वगताच्या चालीवर रचून एक विनोदी कविता उपस्थितांना ऐकवली. यावेळी मास्टर शेफ मनोहर यांनी आरोग्यपर काही टिप्स दिल्या. सोयाबिन तेलाचा वापर कमी करण्याचा सल्लादेखील दिला. बेक पदार्थ बनवतांना मैद्याबरोबर पीठ आणि कॉर्न स्टार्च वापरल्याने मैद्याचा वापर कमी होतो. यावेळी 'टाइम्स ग्रुप'च्या नाशिक ब्रँच हेड मंजिरी शेख आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते मास्टर शेफ विष्णू मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. 'टाइम्स ग्रुप'तर्फे आयोजित 'द कुकरी शो'चे टायटल स्पॉन्सर सनबर्ड किचन, असो. स्पॉन्सर कारडा कन्स्ट्रक्शन, को-स्पॉन्सर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर व्हेन्यू पार्टनर हॉटेल एमराल्ड पार्क होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूचा शहा यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात लिव्हर ट्रान्सप्लान्ट क्लिनिक

$
0
0

पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर करणार तपासणी व मार्गदर्शन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लिव्हर ट्रान्सप्लान्टचा दोन वेळेस थरारक अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना आता यकृताचे विकार या आजारावर पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी नाशिक येथील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल येथे लिव्हर वेलनेस व ट्रान्सप्लान्ट क्लिनिकचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. या क्लिनिकमध्ये पुणे येथील सह्याद्री अवयव प्रत्यारोपण केंद्राचे डॉ. प्रशांत राव व डॉ. बिपीन विभुते हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी नाशिकमध्ये मार्गदर्शनाबरोबरच तपासणीही करणार आहेत.

महाराष्ट्रात अवयवदान व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल अधिक जनजागृती करण्यासाठी डॉ. प्रशांत राव, डॉ. बिपीन विभुते व डॉ. मनीष पाठक यांनी पत्रकार परिषद घेत या आजारावर माहिती दिली. भारतात हजारो रुग्णांना अवयवांची नितांत गरज आहे. परंतु, योग्य वेळेत अवयव उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना वेदनादायी जीवन जगावे लागत आहे. समाजात अवयवदानासंदर्भात व प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल अधिक जनजागृती झाल्यास अनेक रुग्णांना त्यातून जीवनदान मिळण्यास मदत होईल व त्यातून त्यांचे जीवन सुलभ होईल. सह्याद्री हॉस्पिटल्स, पुणे येथील अनुभवी यकृत तज्ज्ञांनी मागील तीन महिन्यांत यकृत प्रत्यारोपणाच्या १५ शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने पार पाडल्या आहेत.

नाशिक शहराने गेल्या दोन महिन्यांत ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयवदानामध्ये जनजागृती करण्यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. नाशिकमधील दोन ब्रेन डेड व्यक्तींच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. ग्रीन कॉरिडॉरच्या सहाय्याने ३.५ तासात त्या ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत पुण्याला पोहोचले आणि अनेकांना जीवनदान मिळाले. ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय हा प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.

सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथील अद्ययावत अवयव प्रत्यारोपण केंद्रात ६०० हून अधिक यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमकडून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येतात. या केंद्रात लिव्हिंग डोनर व कॅडेव्हर (ब्रेन डेड) डोनर प्रत्यारोपणाची व्यवस्था असल्याचेही यावेळ डॉक्टरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संशोधकांंनी घ्यावा नाविन्याचा शोध’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समाजात सामाजिक बदल घडविण्यासाठी संशोधन गरजेचे असते. नव संशोधकांनी संशोधनात नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. संशोधनाची प्रक्रिया हा त्या विषयाचा गाभा असल्याने, कोणत्याही विषयात संशोधन करताना संशयी दृष्टीकोन ठेवल्यास उच्च दर्जाच्या संशोधनाची निर्मिती होऊ शकते, असे मत विद्यापीठाच्या कृषीविज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने संशोधन कार्यपद्धतीवर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कृषीविज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद‌्घाटन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव शिलानाथ जाधव, प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, शिक्षणशास्र विद्याशाखेच्या संचालिका डॉ. संजीवनी महाले उपस्थित होते.

प्रा. जे. एफ. पाटील म्हणाले, संशोधन करताना संशोधकाने अस्तित्त्वात असलेल्या गोष्टीचे कारण काय हे शोधून वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करायला हवे. डिज‌िटल तंत्रज्ञान हे दुधारी शस्रासारखे आहे. संशोधकांनी आपल्या मातृभाषेत केलेले संशोधन उच्चतम पातळीपर्यंत पोहोचते, असे सांगतानाच जगाची भाषाही तितकीच महत्त्वाची असल्याने इंग्रजी भाषाही शिकणे महत्त्वाचे आहे. खरी ज्ञान निर्मिती ही निसर्गावर नियंत्रण ठेवण्यास शिकविते. तसेच का, कसे आणि केव्हा यांचा शोध घेते म्हणजेच संशोधन. संशोधनाची उद्दिष्टे ठरवणे हा संपूर्ण संशोधन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा असून आपण काय करणार आहोत, हे स्पष्टपणे समजायला हवे. उद्दिष्टे ही स्पष्ट शब्दांमध्ये अमोजकीच उद्दिष्टे ठेवायला हवीत. उद्दिष्टे निश्चित करताना, ती आपण गाठू शकू किंवा नाही याचाही विचार करायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिलानाथ जाधव म्हणाले, आपले संशोधन हे ज्याच्यासाठी आहे त्याला त्याची गरज आहे काय ? याचा विचार करून, संशोधन केवळ स्वतः पुरतेच सीमित न ठेवता त्याचा समाजाच्या विकासासाठी उपयोग व्हायला हवा असे सांगितले. डॉ. संजीवनी महाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अनिल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली परिसर, त्रिमूर्ती चौकात नाकाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

नाशिक परिसरात वाढती गुन्हेगारी व सतत होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी देवळाली परिसरात सकाळच्या सुमारास रेस्ट कॅम्प रोड येथील वर्कशॉप चौफुलीवर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या वतीने तसेच त्रिमूर्ती चौकातही नाकेबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात आली.

पोलिस आयुक्तालय हद्दीत काही दिवसांपासून गुन्हेगारी व चेन स्नॅचिंगसारख्या घटना रोज घडत आहेत. नाशिकरोड व नाशिक परिसरातून चेन स्नॅचिंग करणारे गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून सुटका मिळविण्यासाठी ग्रामीण भागाकडे पलायन करतात. त्यामुळे शहर वाहतूक विभाग व देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन यांच्यातर्फे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. दुपारपर्यंत चार वाहनांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्यासह गणपत मुठाळ, अलाउद्दीन शेख, पो. हवालदार झाडे, वाहतूक विभागाचे निळकंठ भुजबळ, शरद ठाकरे आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी त्रिमूर्ती चौकीतही नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसापुरकरांना शाबासकीची थाप!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला वाढेल जंगल तर... असेल कुशल मंगल नाही घातला कुऱ्हाडीचा घाव ठेविला मनी वनाप्रती भाव असा ध्यास मनाशी घेऊन कौतुकास्पद पावलं टाकताना वनसंरक्षण अन् त्याच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्या तालुक्यातील विसापूर ग्रामस्थांच्या पाठीवर वनविभागाच्या शाबासकीची थाप पडली आहे. गेल्या पाच वर्षात वनक्षेत्रातील एकाही झाडावर कुऱ्हाड न चालवताना निसर्गाचा अमूल्य असा वनठेवा जतन करणाऱ्या विसापूरकरला यंदाचा 'संत तुकाराम वनग्राम' योजनेतंर्गतचा जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

विसापूर हे गाव अन् विशेषतः या गावातील संयुक्त व्यवस्थापन समिती याबाबत दक्ष राहताना गेल्या काही वर्षांत तालुक्यातील वनांचा हा ठेवा खऱ्या अर्थाने वृद्धिगत झाला आहे. त्यामुळेच यंदाच्या संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कारापर्यंत विसापूरकरांनी मजल मारली आहे. वनविभागाच्या वरिष्ठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी गावातील वनव्यवस्थापन समित्यांशी साधलेला सुसंवाद, गावकऱ्यांना केलेले मार्गदर्शन हे देखील याकामी आले आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमध्ये वनसंवर्धनासाठी स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने ही योजना सुरू आहे. या योजनेतंर्गत उत्कृष्ट वनसंरक्षण करणाऱ्या गावांना दरवर्षी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर पुरस्कार दिला जातो. यंदा विसापूर गावाने तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक पटकावताना जिल्हास्तर गाठला होता. आता या गावाला जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. गेल्या काही वर्षात येथील वनविभागाने वनक्षेत्रात राबविलेल्या अनेक योजनांना सकारात्मक प्रतिसाद देतानाच योजना प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सहकार्य, मोठ्या प्रमाणात सहभाग, गेल्या ५ वर्षांत वनविभागाने वेळोवेळी केलेल्या वन रोपवनांचे येथील ग्रामस्थांकडून संरक्षण होताना झाडांची झालेली वाढ, जंगल वाढण्यास मदत झाल्याने मोर, लांडगे, साळींदर आदी वन्यजीवांना मिळालेला अधिवास अशा विसापूरकरांच्या अनेक गोष्टींची दखल वनविभागाने हा पुरस्कार देताना घेतली आहे. गेल्या पाच वर्षात या गावपरिसरातील वनक्षेत्रात वृक्षतोड झाली नाही. वनक्षेत्रात गायी, गुरे, शेळ्यामेंढ्या न घातल्या गेल्याने कुठल्याही प्रकारची चराई झाली नाही. वनक्षेत्रात कुठलेही अतिक्रमण झाले नाही. यंदाच्या टंचाई काळात वन्यजीवांची तहान भागविण्याच्या दृष्टीने येथील वनविभागाने पुरविलेल्या सिमेंटच्या कुंड्यांमध्ये या गावातील शेतकऱ्यांनी पाणी टाकून वन्यजीवांची तहान भागवली होती.

९५ टक्के कुटुंबांकडे स्वयंपाकाचा गॅस वनसंरक्षण आणि संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणाऱ्या वनक्षेत्र परिसरातील गावांना वनविभागाच्या वतीने स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन देण्यात येते. विसापूर गावातील जवळपास १५१ पात्र लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानातून गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. गावातील एकुण कुटुंबांची संख्या लक्षात घेता हे प्रमाण जवळपास ९५ टक्के आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोर तरुणांना पोलिसांचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शाळा, कॉलेज परिसरात तरुणींची छेड काढण्यासाठी घिरट्या घालणाऱ्या आणि वेगाने वाहने चालविणाऱ्या बाइकर्सना पोलिसांनी शुक्रवारी धडा शिकवला. बिटको कॉलेजजवळ उपनगर पोलिसांनी दोन तासात १६५ बेशिस्त रायडर्सविरुद्ध गुन्हे दाखल केले, तसेच १२ हजार दंड वसूल केला.

बिटको कॉलेजजवळ सकाळी ११ ते दुपारी एकदरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त ठाकूर, पोलिस निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक बोरसे, शिंदे, मुळे, साळवे, कडभाने, विंचू आदी ३० पोलिसांनी ही मोहीम राबवली. चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, ट्रीपल सीट, वाहन परवाना नसणे, वाहनांचे सायलेन्सर काढून ठेवणे अशा प्रकरणात पोलिसांनी रायडर्सला हिसका दिला. बिटको कॉलेजमार्गावर टवाळखोर घिरट्या घालतात. वेगाने वाहने चालवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करतात, विद्यार्थीनींची छेडछाड करतात, अशा तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या आहेत. कॉलेज प्रशासनाने टवाळखोरांपुढे हात टेकवले होते. उपनगर पोलिसांनी सकाळपासूनच कारवाईची तयारी केली. कारवाईची कुणकुण लागताच काही टवाळखोरांनी पोबारा केला. मात्र, अनेकजण पोलिसांच्या हाती लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद, नागपूर उद्योगात नाशिकच्या पुढे

$
0
0

Gautam.Sancheti @timegroup.com नाशिक : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे मार्ग बंद करण्याचा घाट घालण्याच्या प्रकारावरुन उद्योजकांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता राज्याच्या औद्योगिक विकासाचा आराखडा समोर आला आहे. यात मुंबई व पुणे या विभागापेक्षा नाशिकचा औद्योगिक विकास हा चाळीस टक्केही नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिकपेक्षा औरंगाबाद व नागपूरही औद्योगिक विकासाबाबत पुढे आहे. नागूपर येथे मिहान प्रकल्प तर औरंगाबाद येथे दिल्ली -मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या प्रकल्पामुळे येथील औद्योगिक विकास झपाट्याने होणार आहे. उद्योग मंत्रालयाने नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची तुलना प्रगत मुंबई-पुणे बरोबर केली व नवीन उद्योगांना विदर्भ व मराठवाड्यात नेण्यासाठी एक अभ्यास समिती गठित केली आहे. त्यात मुंबई, पुणे व नाशिक येथे औद्योगिकीकरणामुळे येणारा ताण व नागरीकरणामुळे झालेली वाढ लक्षात घेता ही समिती विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात समतोल विकास साधण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात मुंबई ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथे मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. नाशिकचा औद्योगिक विकास मुंबई -पुणे शहर जवळ असल्यामुळे झाला असला, तरी या वसाहतीत बंद उद्योगांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींचे प्रश्न सोडवणे व विस्तार करणे सरकारकडून अपेक्ष‌ित आहे. पण उद्योग मंत्रालयानेच नाशिकला औद्योगिक विकास झाला आहे व तेथे पुन्हा ताण नको म्हणत दुर्लक्ष केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीत ११८१, अंबड येथे १६०१ तर सिन्नर येथे ९३७ भूखंड वाटण्यात आले आहेत. यातील काही भूखंडावरील उद्योग बंद आहेत. जिल्ह्यात दिंडोरी, मालेगाव, विंचूर, पेठ यांसह इतर ठिकाणी मात्र उद्योगांचे प्रमाण खूपच कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या १७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील ९१ तर जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २४ ऑगस्टला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी २५ जुलैला निवडणुकीची नोट‌ीस प्रसिध्द करण्यात येणार आहे. ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहेत. १० ऑगस्टला बुधवारी सकाळी ११ पासून नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. १२ ऑगस्टला शुक्रवारी दुपारी ३पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लगेचच निवडणूक चिन्हांचे वाटप करुन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. २४ ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. २९ ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ला पडला चॉइस नंबर महाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

पैसे घेवून चॉइस नंबर न देणाऱ्या मालेगावच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) ग्राहक न्यायमंचाने दिलेले पैसे परत करण्याचे आदेश देत दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. तसेच चॉइस नंबर व्यतिरिक्त दिलेल्या नंबरचे कागदपत्र देण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे या निकालात चॉइस नंबरसाठी भरलेल्या ४५ रुपये रक्कमेवर २७ जानेवारी २०१५ पासून शेकडा १२ टक्के वार्षिक व्याज रक्कम देण्याचेही निकालात म्हटले आहे. त्यामुळे पाच हजारापेक्षा जास्त हा भूर्दंड आरटीओला बसणार आहे.

कळवणचे विशाल धनराज वाघ यांनी याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे तक्रार केली. वाघ यांनी नव्याने घेतलेल्या मारुती सुझुकी सियाझ कारसाठी एम. एच. ४१ ए. एच. ३००० या चॉइस नंबरसाठी आरटीओकडे विचारणा केली. त्यासाठी त्यांनी ४५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. पण त्या दिवशी लगेच पैसे भरणे वाघ यांना शक्य होऊ शकले नाही. नंतर पुन्हा विचारणा केली असता त्यांनी तो नंबर असल्याचे सांगितले. त्यानुसार वाघ यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी ४५ हजार रुपये भरले. पण त्यांना चॉइस नंबर देण्यात आला नाही. त्याबाबत विचारणा केली असता संबंधित नंबर १३ जानेवारीलाच दिल्याचे स्पष्टीकरण 'आरटीओ'ने दिले. तसेच त्यांच्याकडून एम. एच. ४१ व्ही. ६८८६ हा नंबर देण्यात आला. त्याचे कागदपत्र दिले नाही आणि चॉइस नंबरसाठी घेतलेले पैसेही वाघ यांना परत केले नाही.

यासंदर्भात तक्रारीवर आरटीओकडून कोणतेच उत्तरही देण्यात आले नाही. न्यायमंचात हजर देखील राहिले नाहीत. त्यामुळे न्यायमंचाने एकतर्फी निकाल देत चॉइस नंबरसाठी भरलेली ४५ हजार रुपये रक्कम परत करण्यासह त्यावर १२ टक्के वार्षिक व्याज देण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व कागदपत्र देण्याचेही या निकालात म्हटले आहे. सेवेत कमतरता केल्यामुळे मासिक त्रासापोटी ७ हजार व अर्जाचा खर्चापोटी ३ हजार असा १० हजाराचा दंडही ठोठावला. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी निकाल दिला. अॅड. के. बी. चांदवडकर यांनी तक्रारदारातर्फे युक्तीवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिसरा महाज आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी स्थायी सभापती पदासाठी ३ तर महिला बालकल्याणसाठी २ अर्ज दाखल आले आहेत. यात आघाडीचे गटनेता तसेच उपमहापौर युनूस शेख इसा व तिसरा महाजचे सदस्य एजाज बेग आजिज बेग यांनी स्थायीच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल केला. तर विद्यमान स्थायी समिती सभापती ताहेरा शेख यांनी देखील महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. स्थायी समितीच्या विद्यमान सभापती ताहेरा शेख यांचा कार्यकाळ ३० जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतीपद मिळवण्यासाठी सत्ताधारी तिसरा महाज व विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

स्थायी समितीमधील कार्यकाळ संपलेले सहा निवृत्त सदस्य व तीन राजीनामा दिलेले सदस्य अशा नऊ सदस्यांची स्थायी समितीवर नवनियुक्ती करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समितीवर देखील नऊ सदस्य निवडण्यात आले. स्थायी समितीतील पक्षीय बलाबल लक्षात घेता काँग्रेस आणि तिसरा महाज यांचे समसमान पाच सदस्य असल्याने दोघांकडून हे पद आपल्याकडेच ठेऊन मनपाच्या तिजोरीच्या चाब्या आपल्याच हाती कशा राहतील, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीच्या सभापती पदासाठी नऊ सदस्यांच्या मतांची गरज आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते उपमहापौर युनूस इसा यांची स्थायीच्या सभापती पदासाठी जोरदार तयारी सुरू असून त्यासाठी त्यांना काँग्रेसची देखील मदत होऊ शकते. तर तिकडे तिसरा महाजचे एजाज बेग आजिज बेग यांनी जोर लावला आहे. सेना आणि 'जद'ला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. यात काँग्रेसच्या जयबूंनिसा नुरूल्ला यांनी देखील अर्ज दाखल केला असल्याने काँग्रेस देखील हे पद आपल्याकडे कायम रहावे, यासाठी ताकद लावते आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून स्थायी आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आपल्याच पक्षाची वर्णी कशी लागेल यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. येत्या २६ जुलै रोजी पालिका सभागृहात सकाळी ११ वाजता स्थायीची तर दुपारी एक वाजता महिला बालकल्याण समितीची निवड होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर आयुक्त जे. पी. पाटील हे निवडणुकीचे कामकाज पाहतील, अशी माहिती नगरसचिव राजेश धसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८०० इमारती फायर ऑड‌िटविना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पंधरा मीटरपेक्षा जास्त उंचीच्या पाचशे व व्यावसायिक वापर असलेल्या तीनशे इमारतींकडून दरवर्षी होणारे फायर ऑड‌िटच केले जात नसल्याचे समोर आले आहे. अग्निशमन कायदा कलम ३(३) नुसार या इमारतींनी वर्षातून दोनदा प्राध‌िकृत केलेल्या फायर एजन्सीकडून फायर ऑड‌िट करणे बंधनकारक असतानाही, भोगवटाधारकांनी इमारतींचा ताबा घेतल्यापासून त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पालिकेकडून दरवर्षी वर्तमानपत्रातून नोट‌िसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत. तर दुसरीकडे या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवाशी मात्र खेळ सुरूच आहे.

फायर ऑड‌िटसंदर्भात कारवाईचे कायदे तकलादू असल्याने अग्निशमन विभागाला कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे. महापालिका अग्निशमन कायदा कलम ३(३) नुसार १५ मीटरच्या वर उंची असलेल्या निवासी इमारती व व्यावसायिक वापर असलेल्या इमारतींना वर्षातून दोनदा फायर ऑड‌िट करणे बंधनकारक आहे. महापालिकेने प्राधिकृत केलेल्या फायर एजन्सीजकडून जानेवारी व जुलै महिन्यात फायर ऑड‌िट करणे आवश्यक आहे. इमारत मालक व भोगवटाधारकांनी वर्षातून दोनदा फायर ऑड‌िटचे दाखले अग्निशमन दलला सादर करणे आवश्यक आहे. परंतु शहरात इमारत उभी राहिल्यानंतर अद्याप एकाही इमारतीने फायर ऑड‌िट करून घेतले नसल्याची बाब उघड झाली आहे. शहरात १५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या जवळपास पाचशे निवासी इमारती आहेत. तर व्यावसायिक वापर असणाऱ्या तीनशेच्या आसपास इमारती आहेत. त्यामुळे या आठशे इमारतींतील भोगवटाधारकांनी अद्याप एकदाही फायर ऑड‌िट केलेले नाही. फायर ऑड‌िटची यंत्रणा कार्यान्व‌ित आहे की, नाही हेच भोगवटाधारक तपासत नाही. त्यामुळे इमर्जन्सी काळात ती सुरू होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांचाच जीव धोक्यात जातो.

त्रोटक तरतुदी संबंधित भोगवटाधारकांनी इमारतीचे फायर ऑडिट केले नाही तर, त्यांच्यावर कायद्यात तीन प्रकारच्या कारवाया प्रस्ताव‌ित करण्यात आल्या आहेत. त्यात संबंधित इमारतीचा पाणीपुरवठा खंड‌ित करणे, विद्युत पुरवठा तोडणे किंवा इमारत सील करण्याचा पर्याय आहे. परंतु या तीनही सेवा अत्यावश्यक सुविधेत असल्याने भोगवटाधारकांवर कारवाईच करता येत नाही.

नोटिसांचा सोपस्कार

अग्निशमन विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाच्या अभावी या आठशे इमारतींना दरवर्षी वर्तमानपत्रातून नोटिसा बजावण्याचे सोपस्कार अग्निशमन विभागाकडून पार पाडले जातात. पालिकेकडून दरवर्षी डिसेंबरमध्ये वर्तमानपत्रातून या इमारतधारकांना सामुहिक नोटीस बजावली जाते. त्यात कारवाईचा इशाराही दिला जातो. परंतु, वर्तमानपत्रातून आलेल्या नोटिसांकडे नागरीक दुर्लक्ष करतात. बऱ्याच नागरिकांना या नोटिसांची माहिती नसते. तसेच असे फायर ऑडिट करावे लागते, याचीही माहिती नसते. त्यामुळे नागरिकांच्या जीवासंदर्भात कागदे रंगवण्याचेच काम सुरू असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगारानंतर खुले झाले ‘पत्ते’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई नाक्यावरील 'मोठा' जुगार अड्डा उद््ध्वस्त करत पोलिसांनी ४१ जणांना जेरबंद केले. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश असून, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, तर मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हे प्रकरण इथपर्यंतच न थांबता याचे खापर मनसेने माजी आमदार वसंत गिते यांच्यावर फोडल्याने राजकीय बाजारदेखील गरम झाला आहे.

मुंबई नाका पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेला सर्वांत मोठा जुगार अड्डा शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री उद््ध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणी ४१ जुगाऱ्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ५ लाख ७१ हजार रुपयांची रोकड, मोबाइल, तसेच दुचाकी असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी छापा मारला, त्या वेळी एक पोलिस कर्मचारी जुगार खेळताना सापडला. कैलास चव्हाण असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली. या जुगार अड्ड्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाजीराव महाजन यांचीही तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.

मुंबई पोलिस स्टेशनचा कार्यभार क्राइम ब्रँचच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, हा अड्डा वसंत गिते यांचा गड असलेल्या गायकवाडनगरमध्ये सुरू होता. मनसेने त्या आधारे गिते यांना लक्ष्य केले. गिते यांनीदेखील मनसेवर पलटवार केल्याने जुगार अड्ड्यावरील कारवाईला यापुढे राजकीय वळण लागण्याची चिन्हे आहेत.

शहर पोलिसांच्या दृष्टीने ही कारवाई महत्वाची आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जुगार अड्डा चालवणाऱ्या चार ते पाच संशयितांची नावे पुढे आली आहेत. तपासात सर्व बाबी निष्पन्न होतील.

- एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्याला एक मुल ‘टार्गेट’

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com नाशिक ः अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हळहळला. लहान मुलांना 'टार्गेट' करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. वास्तविक, आपल्या नाशिक शहरातही लहान मुलांचा लैंगिक शोषणाचा आकडा पाहिला तर कुणाच्याही पोटात गोळा येईल. शहरात दर आठवड्याला ० ते १८ वर्ष वयोगटातील सरासरी एका मुलाचे किंवा मुलीचे लैंगिक शोषण होत असून याबाबत प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शूअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट (पोक्सो) नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

पोक्सो अॅक्ट २०१२ मध्ये लागू झाला. त्यानुसार ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींवर या कायद्यातील कलम ३, ४, ५ आणि ६ नुसार गुन्हा दाखल होतो. शहर पोलिसांनी २०१३ मध्ये अशा प्रकारचे १२ गुन्हे दाखल केले. यात, बलात्कार, विनयभंग, छळ अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. २०१४ मध्ये गुन्ह्यांची संख्या थेट ३६ पर्यंत पोहचली. २०१५ मध्ये हेच प्रमाण ४९ वर गेले. तर, चालू वर्षात जून महिन्यापर्यंत बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी २२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे हा आकडा वाढताच दिसत असून लहान मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मागील वर्षांपासून सरासरीचा विचार करता प्रत्येक आठवड्यात पोस्कोतंर्गत एकतरी गुन्हा दाखल होत आहे. या क्षेत्रात समुपदेशक म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी न्याहारकर यांनी सांगितले की, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रत्येक घटनेची कारणे वेगवेगळी असू शकते. बऱ्याचदा हे प्रकार नातेवाईक किंवा परिचितांकडून घडतात. वास्तविक, समाजातील प्रत्येक स्थरातील नागरिकांपर्यंत लैंगिक शिक्षण पोहचणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मुलांना 'गुड आणि बॅड टच' यातील फरक समजून सांगायालाच हवा. लैंगिक अत्याचाराशी संबंध‌ित खूप साऱ्या घटना झोपडपट्टी भागात किंवा अशिक्ष‌ित कुटुंबात घडतात. सावत्र पिता, परिसरातील युवक, घरातील कोणीही मुलामुलींचे शोषण करतात. किमान ४ ते १६ वर्षे वयोगटातील मुलां-मुलींना याबाबत शिक्षण मिळायला हवे. शहरात अनेक सेवाभावी संस्था असून महिला व बालविकास विभागाने त्यांना या कामासाठी नियुक्त करायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. लहान किंवा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत समाजात जागृती होत आहे. याबाबतचा कायद्यात देखील प्रभावी असून आलेल्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जाते. महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत सदर प्रकरणाचा तपास केला जातो. - सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, क्राईम ब्रँच

मुलांच्या शोषणाचे गुन्हे दाखल होतात त्यापेक्षा किती घटना समोर येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अनेकदा पीड‌ित बालकांना तक्रारही करता येत नाही. यासाठी पालकांचा आपल्या पाल्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असायला हवे. - अश्विनी न्याहारकर, समुपदेशक





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंब‌ित पोलिसाची चौकशी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई नाका येथील जुगार अड्ड्यात जुगार खेळताना पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीतून समोर येणाऱ्या तथ्यानुसार संबंध‌ितांची कार्यालयीन चौकशी देखील करण्यात येणार आहे. यात, पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्यासंबंधी काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील यांच्या पथकाने गुरुवारी रात्री सदर अड्ड्यावर छापा मारला. ४१ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडील जवळपास ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी कैलास चव्हाण जुगार खेळताना सापडले. हा अड्डा अगदी मुंबई नाका पोलिस स्टेशनसमोरच सुरू होता. शहरातील सर्वांत मोठा अड्डा सुरू असताना मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव चव्हाण यांना खबरच लागली नाही, याविषयी सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मनात संदेह होता. त्यानुसार, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी प्राथमिक चौकशीनंतर लागलीच महाजन यांची कंट्रोल रुमला बदली केली. जुगार खेळणाऱ्या चव्हाणला निलंब‌ित करण्यात आले. तसेच त्यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या आधारे त्यांच्या कार्यालयीन चौकशीचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, चौकशीत महाजन यांचा हलगर्जीपणा उघड झाल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. शहर पोलिस दलासाठी ही कारवाई एक इशारा असून यापुढे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्यास यापेक्षा कडक शासन करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. पोलिस फक्त शिवसेना किंवा विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करते, हा आरोप सुद्धा पोलिसांनी यानिमित्ताने खोडून काढला आहे. शहर पोलिसांनी मुंबई नाका भागात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री कारवाई केली. याचे राजकीय पडसाद उमटत असून भ्रष्ट पोलिसही रडारवर आले आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images