Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काश्यपी धरणग्रस्तांचे आज ‘करो या मरो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रकल्पबाधित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यासह अनेक मागण्यांची वर्षानुवर्षे दखल घेतली जात नसल्याने काश्यपी धरणग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या निषधार्थ आजपासून (दि. १५ ऑगस्ट) काश्यपी धरणात सुमारे दोन ते अडीच हजार धरणग्रस्त बेमुदत जलसमाधी आंदोलनाला बसणार आहेत. ज‌िवाची पर्वा न करता मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला असून, नाशिकमध्ये असणारे पालकमंत्री गिरीश महाजन या आंदोलनाची दखल घेणार की धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात काश्यपी धरणाचे काम सुमारे २५ वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, धरणग्रस्तांना अजूनही त्यांच्या संपादित जम‌िनींचा मोबदला मिळालेला नाही. या धरणातील पाण्याचा सर्वाधिक लाभ नाशिक महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना होतो. मात्र, अपेक्षित मोबदला न मिळाल्याने धरणग्रस्तांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बळावली आहे. स्थानिकांना दरवर्षी ३० टक्के पाणीसाठा राखून ठेवण्यात यावा, महापालिका व पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे केलेला काश्यपी धरणासंबंधीचा करारनामा पूर्ण करण्यात यावा, धरणग्रस्तांना धरणावर मत्स्य व्यवसाय करण्याचे अधिकार मिळावेत, त्यासाठी ठेक्या संबंधीचे शुल्क व अनामत रक्कमदेखील माफ करण्यात यावी आदी मागण्या सरकारदरबारी अनेक वर्ष प्रलंबित आहेत. संपादीत जमिनीचा विनाअट व विनाविलंब चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, त्यांचे पुनर्वसन करावे अशा मागण्यासांठी काश्यपी धरणग्रस्तांनी वारंवार आंदोलने करूनही सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यापमाणे १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीमध्ये ध्वजवंदन झाल्यानंतर सकाळी दहाला हे सर्व आंदोलक काश्यपी धरणाकडे कुटुंबियांसह धाव घेणार आहेत. तेथे धरणातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. देवरगाव, धोंडेगाव, काळूशी, वैष्णववाडी, खाडेचीवाडी, शिरपाडी येथील महिला, पुरुषांसह दोन ते अडीच हजार ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपासून राज्य सरकारपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळेच आता जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर धरणग्रस्त काश्यपीत उड्या मारतील. हे बेमुदत आंदोलन होईलच.
- यशवंत मोंढे, धरणग्रस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेजेसमध्ये सर्रास प्रोजेक्ट पायरसी

$
0
0

स्वप्न‌िल देवकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

अभ्यासक्रमातील प्रोजेक्टचे आऊटसोर्सिंग करण्याचा ट्रेंड शहरातील इंज‌िनीअरिंग कॉलेजांमध्ये पसरतो आहे. विद्यार्थ्याने स्वत:च्या सहभगाने करणे अपेक्षित असणारे प्रोजेक्ट चक्क २५ हजार रुपयांपर्यंतच्या रकमा भरून प्रोजेक्ट डेव्हलपर्सकडून तयार करवून घेतले जात असल्याचे वास्तव कॅम्पसमध्ये उघड झाले आहे.
शहरात इंज‌िनीअरिंग कॉलेजेसची संख्या मोठी आहे. पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या अभ्यासक्रमात पदवीसाठी विविध प्रोजेक्टस असतात. या प्रोजेक्टला सुमारे २०० गुण देण्यात येतात. त्यामुळे अभ्यासक्रमात प्रोजेक्टचे महत्व विशेष आहे. वर्गात शिकलेल्या थिअरीनंतर विद्यार्थ्यांना त्या ज्ञानाचा प्रत्यक्षानुभव घेता यावा, यासाठी या प्रोजेक्टची रचना असते. मात्र कॅम्पसमध्ये सर्रास मार्केटिंग करणाऱ्या प्रोजेक्ट डेव्हलपर्स कंपन्यांना पायबंद घालण्याकडे इंज‌िनीअरिंग कॉलेजेसही काणाडोळा करत आहेत.
डेव्हलपर्सकडून मार्केटिंग
इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव मिळावा यासाठी अभ्याक्रमानुसार स्वतंत्र करावा लागतोे. अशा प्रकारच्या प्रोजेक्टसाठी अभ्यासक्रमात २०० ते २५० मार्कांची तरतूदही आहे. विद्यार्थांनी हे प्रोजेक्ट स्वतः बनवणे अपेक्षित असताना कमी वेळेत संपूर्ण काम होत असल्याने विद्यार्थी प्रायव्हेट प्रोजेक्ट डेव्हलपर्सकडे आकर्षित होताना दिसत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही होत आहे. अशा प्रकारच्या डेव्हलपर्सकडून एका प्रोजेक्टसाठी तब्बल २५ ते ३० हजार रुपये घेतले जातात. कॉलेजच्या आवारातच विद्यार्थांना संपर्कासाठी व्हिज‌िटिंग कार्ड देखील देण्यात येते.

प्रोजेक्टचे काटेकोर परीक्षण व्हावे

इंज‌िनीअरिंगसारख्या महत्वाच्या विद्याशाखेत पायाभूत ज्ञान घेतानाच या प्रकारची पायरसी होत असेल तर ही कॉलेजेस देशाला कशा प्रकारचे मनुष्यबळ पुरवताहेत हे चित्र स्पष्ट होते. या प्रकारच्या प्रोजेक्ट पायरसीला आळा घालून गुणवान विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी गुणवंत आणि मेहनतीने प्रोजेक्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पायरसीला आळा घालण्यासाठी कॉलेजेसने या प्रोजेक्ट्सची समीक्षा अतिशय काटेकोरपणे करायला हवी अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पर्यटन विकासासाठी सरकार बांधील’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुका ही निसर्गाची खाण असून, निसर्ग बहरलेला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या तालुक्याचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी शासन बांधील राहील, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे सिंहस्थ ध्वजारोहण रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आमदार योगेश घोलप, आखाड्याचे श्रीमहंत रामकिशोरदास शास्त्री, चतुःसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास, जगतगुरु द्वाराचार्य, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तिचरणदास आदिंसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित शासनप्रतिनिधी व साधूसंत यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कपिलधारा तीर्थक्षेत्री विधीवत गंगापूजन, जलपुजन व देवतापूजन करण्यात आले. यावेळी मंत्रांच्या जयघोष सुरू होता. त्यानंतर महाआरती करुन सिंहस्थ ध्वजाचे ध्वजावतरण रावल व साधू महंतांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कपिलधारा ट्रस्टच्या वतीने उपस्थित लोकप्रतिनिधी व साधू, महंत यांचा सिंहस्थ प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकचा सिंहस्थ सोहळा हा राज्यस्तरीय, देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरचा भक्तीसोहळा म्हणून लवकरच मान्यता मिळणार आहे. केंद्रशासन त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही गोडसे म्हणाले. सिंहस्थामुळे नाशिक जिल्ह्याचा देशभर लौकिक झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, काशिनाथ मेंगाळ, जि. प. सदस्य गोरख बोडके, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, पर्यटन विभागाच्या प्रादेशिक अधिकारी प्रज्ञा मिसाळ, तहसीलदार अनिल पुरे, ज्ञानेश्वर लहाने, कार्यकारी अभियंता रमेश गावित, नगरसेवक केशव पोरजे, भाजपा नेते अशोक मुणोत आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तालुक्यांमध्ये होणार अग्न‌िशमन केंद्रे

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड या तालुक्यांमध्ये अग्निशमन केंद्रे सुरू होणार आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियान राबवण्याचा निर्णय २००९मध्ये घेतलेला आहे. या अभियानातंर्गत ड -वर्ग नगर महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीना अग्निशमन केंद्र व अग्निशमन वाहन घेण्यासाठी शासनाने अनुदान दिले. मात्र, नंतर स्थापन झालेल्या संस्थांचा अग्निशमन सुरक्षेत समावेश केला नव्हता. अग्निशमन केंद्र व वाहन असणे या स्थानिक संस्थांत गरजेचे असल्यामुळे राज्य शासनाने त्यांचा समावेश महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानात करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातील ड -वर्ग नगर महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना होणार आहे. नाशिक जिल्ह्यात २००९ नंतर चांदवड येथे नगरपरिषद व कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड येथे नगर पंचायती स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होणार आहे.
नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत व नगर परिषदा या अगोदर विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांना अद्याप स्टाफही मिळाला नाही. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांचा प्रश्नही कायम आहे. अशात हा निर्णय दिलासादायक आहे.
अग्निशमन केंद्र व वाहनासाठी शासनाकडून ७० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली जाते. उर्वरीत रक्कम ही संबंध‌ित संस्थेला लोकवर्गणी म्हणून खर्च करावी लागते. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या या नगर परिषद व नगरपंचायतींतील ही रक्कमही भरणेही अवघड जाणार आहे. त्यासाठी शासनाने १०० टक्के अनुदान दिल्यासच हे केंद्र उभारणे व वाहन घेणे सोपे जाणार आहे. ग्रामपंचायतीमधून नगर पंचायत व नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर या संस्थांच्या सोयी व सुविधांमध्ये फारसा बदल झाला नाही. पण अग्निशमन केंद्र असणे ही गरजेची गोष्ट असल्यामुळे त्याचा फायदा या शहरांना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यातील दोन शाळांना ‘आयएसओ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता कन्या विद्यालय या दोघी शाळांना मानाचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले असून एकच संस्थेच्या दोन विद्यालयांना एकाचवेळी मानाचे मानांकन मिळण्याची राज्यातील पहिलीच घटना आहे.

शालेय व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत मानाचा असलेला आय. एस. ओ. दर्जा प्राप्त करण्यासाठी जे निकष ठरवून देण्यात आले होते. ते सर्व पूर्ण करून श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता कन्या विद्यालयाने आपल्या कार्याच्या जोरावर मानांकन यशस्वीरित्या मिळविले.

संस्थेच्या दोन्ही विद्यालयाच्या सुसज्य इमारतींबरोबरच सर्व सोयींनी युक्त क्रीडांगण, प्रयोगशाळा व कला विभागाचे कामकाज ठळकपणे दिसून आले. ग्रामस्थांना संदेश देणारा फलक विद्यालयाच्या दर्शनी भागात लावलेला असून दररोजचा दिनविशेष, थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, प्रबोधनपर माहिती सादर केली जाते. या सर्व बाबींचा विचार करून मूल्यमापन समितीने दोन्ही विद्यालयांना एकाच वेळी आय. एस. ओ. मानांकन दिल्याची माहिती मुख्याध्यापक डी. ई. आहेर, मुख्याध्यापिका उषाताई बच्छाव यांनी दिली. यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

गुणवत्तेच्या निकषावर विद्यालयांसाठी देण्यात येणारा मानाचा आय. एस. ओ. मानांकनाचा दर्जा संस्थेच्या दोन्ही विद्यालयांनी पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

- हितेंद्र आहेर, अध्यक्ष देवळा एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांना अनुदान द्या

$
0
0

सभापती केदा आहेर यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विक्रीस आणलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट ५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे राज्य सरकारने अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याबाबत आहेर हे मुख्यमंत्री, सहकार व पणनमंत्र्यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडणार आहेत, असेही यात म्हटले आहे.

देवळा येथे नुकतीच याबाबत एका पत्रकार परिषदेत केदा आहेर यांनी ही माहिती दिली. याबाबत बोलताना सभापती केदा आहेर म्हणाले, एक महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर कांद्याचे लिलाव चालू झाले असले तरी कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पूर्णतः भ्रमनिरास झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून गारपीट, बेमोसमी पाऊस, दुष्काळ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी होरपळून निघालेला असताना मागील वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करून कांद्याचे उत्पादन काढले होते. मात्र मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला एक महिन्यांपासून व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये खुल्या व गोणी पद्धतीच्या लिलावाचा वाद निर्माण झाल्याने भावच नाही. तसेच बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव पूर्णतः ठप्प झाले.

या सर्वपरिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून कांद्याला सरासरी एक हजाराच्यावर प्रतिक्विंटल उत्पादन खर्च येत असताना ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये विक्रीस आणलेल्या कांद्याला सरसकट ५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी पत्रकात शेवटी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅपमुळे अपघातग्रस्ताला मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

व्हॉट्सअॅपवरील मेसेजेकडे अनेकदा खोटे असल्याचे समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, व्हॉट्सअॅपवरील मेसेज संवेदनशील सदस्यांमुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला.

प्रेरणा एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संचालक व आदिवासी विकास विभागातील कर्मचारी विजय रूपवते यांचा अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती त्यांच्या प्रेरणा संस्थेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर इतर सदस्यांना मिळाली आणि काही तासाच अपघातस्थळी धाव घेत त्यांच्या मित्रांनी मदत केली. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मित्रमंडळींनी जखमी रूपवते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख रुपयांचा मदत निधीही उपलब्ध करून दिला. या मित्रांनी सिटी स्कॉनच्या रिपोर्टनुसार तत्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. या ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण रात्र रुग्णालयात जागून काढली. रूपवते यांना वैद्यकीय उपचारासाठी राज्यभरातून मदत उपलब्ध झाली. मित्रांच्या सहकार्यानेच त्यांना उपचारासह जीवदानही मिळाले.

गरजूंसाठी नेहमी पुढाकार

प्रेरणा एकता संस्थेचा समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार असतो. या संस्थेच्या सदस्यांत वकील, डॉक्टर्स, व्यावसायिक, नोकरदार, लेखापाल, सनदी लेखापाल आहेत. या संस्थेचे अध्यक्ष कैलास दराडे, सचिव शरद सोनवणे, सहसचिव विष्णू वारुंगसे, शाम घुगे, प्रकाश गायकवाड, साहेबराव सोनवणे, भगवान काकड, राजेंद्र सांगळे, अमित आडके, उदय गडकरी, राजेंद्र सानप, धनंजय कर्के, नितीन कंडारे आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरला विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर आंतर-जिल्हा सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या संघाने पुण्यावर वर्चस्व राखत दोनही वयोगटातील अजिंक्यपद पटकावले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अंतिम सामन्यात थरारक खेळाचे प्रदर्शन झाले. दोनही गटात नागपूरच्या संघाने पाचपैकी शेवटचे २ सामने जिंकत विजेतेपद पटकावले. नाशिकचे प्रसिद्ध क्रीडा मानसशास्र तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
१७ वर्षाखालील गटात खेळताना पुणे संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरचे तीनही सामने जिंकत नागपूरने धक्का दिला. एकेरीतील दोन सामने पुणे संघातील सोहम पाटील आणि पूर्वा बर्वे यांनी जिंकत संघाला आश्वासक आघाडी मिळवून दिली होती. मात्र, नागपूर संघाने चिवट खेळ करत दुहेरीत पुण्याची डाळ शिजू दिली नाही. मिश्र दुहेरीत रितिका ठाकर आणि गौरव मिथे यांनी प्रयत्नांची शर्थ करत संघाला विजयश्री मिळवून दिली.
१९ वर्षांखालील गटातही अटीतटीचे सामने झाले. याही गटात पुणे संघाने पहिले दोनही सामने जिंकले. मात्र, दुहेरीत पुण्याला लय सापडलीच नाही. नागपूरच्या संघातील खेळाडूंनी दुहेरीतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. रोहन गर्बानी, सौरभ केऱ्हालकर, राशी लांबे, रितिका ठाकर यांनी नागपूरला विजय मिळवून दिला. शेवटचा व निर्णायक सामना तीन सेटपर्यंत खेळला गेला. रितिका आणि सौरभ यांनी मिश्र दुहेरीत चांगला खेळ करताना संघाला २१-१७, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवून दिल्याने नागपूरला पुन्हा एकदा विजयाची चव चाखता आली.
नाशिकच्या १७ वर्षांखालील तसेच १९ वर्षांखालील संघांना उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही गटात पुण्याच्या संघाने नाशिकला अनुक्रमे ०-३, १-३ असे पराभूत केले. १९ वर्षांखालील गटात नाशिकची राष्ट्रीय खेळाडू वैदेही चौधरीने एकमेव विजय मिळविला.
१७ वर्षांखालील गटात उपांत्यफेरीत पुण्याच्या संघाने पूर्ण वर्चस्व राखले. पुण्याच्या सोहम पाटीलने नाशिकच्या कौशल शिरुदेला २१-१७, २१-१२ असे पराभूत करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या सामन्यात शिल्पी पुसाडकरला पुण्याच्या पूर्वा बर्वे हिने २१-१५, २१-१८ असे सरळ सेटमध्ये नमवले. विजयाची तीच लय पुढे कायम ठेवत सोहम पाटील आणि सोहम नावंदर या जोडीने अधिप गुप्ता आणि अजिंक्य पाथरकर या जोडीला २३-२१, २१-१८, २१-१५ असे पराभूत करत सामना अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
१९ वर्षांखालील गटात नाशिकची वैदेही चौधरी व्यतिरिक्त कोणाचीही डाळ शिजली नाही. याही गटात पुण्याच्या संघाने ३-१ असा मोठा विजय प्राप्त केला. पुणे संघाच्या आर्य भिवपथकी याने नाशिकच्या तनय अखेगावकर याचा २१-७, २१-१२ असा धुव्वा उडवला. पुढील सामन्यात नाशिकची राष्ट्रीय खेळाडू वैदेही चौधरी हिने पूर्व बर्वेला २१-१५, २१-१४ असा विजय मिळवल्याने नाशिकने बरोबरी साधली. मात्र, पुण्याच्या संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत नाशिकच्या खेळाडूंना नामोहरम केले. अजिंक्य पाथरकर, हृष‌िकेश होले या जोडीला सोहम पाटील आणि तेजस देव या जोडीने २३-२१, २१-१६ असे पराभूत केले. तर अदिती कुटे आणि वैदेही चौधरी या बलाढ्य जोडीचे आव्हान अदिती काळे आणि पूर्वा बर्वे या जोडीने २१-१९, २१-१९ असे परतवून लावत संघाला अंतिम फेरीत पोचविण्यास मदत केली.
१७ वर्षांखालील उपांत्य फेरीत दुसऱ्या एका सामन्यात मुंबई उपनगर संघाला नागपूरने ३-१ असे पराभूत केले. एकेरीचे दोनही सामने नागपूरच्या रोहन गर्बानी आणि मालविका बनसोड यांनी जिंकल्याने नागपूरचा विजय सोपा झाला. तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या अक्षय शेट्टी आणि वंश सिंघ या जोडीने नागपूरच्या गौरव मिथे आणि रोहन गर्बानी यांना पराभूत केल्याने मुंबईचे आव्हान जिवंत राहिले होते. मात्र मुलींच्या दुहेरीत मालविका बनसोडे आणि राशी लांबे या नागपूरच्या जोडीने विजय मिळवत संघाला अंतिम फेरी गाठून दिली.
१९ वर्षांखालील संघातही नागपूर संघाने वर्चस्व राखत थरारक झालेल्या सामन्यात ठाण्याच्या संघाला ३-२ असे पराभूत केले. ठाण्याकडे २-१ अशी आघाडी असूनही शेवटचे दोन्ही सामने जिंकत नागपूरने अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या रितिका ठाकरने चमक दाखवत तब्बल तीन सामन्यांत सहभाग घेत सर्व सामने जिंकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरी पाहुनी कळले मोठा झाला पाऊस!

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

'मनात माझे नाव तुझ्या पण आग्रही नाही, तुझ्याएवढा पाऊससुद्धा लहरी नाही', 'किती दिसांनी घरी परतुनी आला पाऊस, सरी पाहुनी कळले मोठा झाला पाऊस' अशा एकापेक्षा एक सरस गझलांनी कुसुमाग्रज स्मारकातील सायंकाळ रंगत गेली. निमित्त होते, प्रथमेश क्रिएशन्स गोवानिर्मित 'जावे कवितांच्या गावा' आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी गझल मुशायऱ्याचे.

यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाहक मकरंद हिंगणे, लोकेश शेवडे, विनायक रानडे यांच्या हस्ते ज्येष्ठ गझलकार नासिर शेख, कमलाकर देसले, प्रशांत वैद्य आणि गौरवकुमार आठवले यांचा स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

पुढे गझलकारांनी आपल्या गझल पेश केल्या.

'दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती, भाषणबाजी केवळ नावासाठी होती, पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला, पण शेवटची ओळ दबावासाठी होती, वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले, पाठीवरची थाप सरावासाठी होती...' गोविंद नाईक यांनी सादर केलेल्या या गझलेने मुशायऱ्याची सुरुवात झाली. 'चिता पेटून गेल्यावर सभा भरणार असते, जिचे सौभाग्य गेले तीच फक्त रडणार असते, तिला आढ्याकडे बघणे जिवावर येत असते, धन्याची आठवण कारण तिला छळणार असते...' आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचं भीषण वास्तव मांडणारी ही गझल संतोष वाटपाडे यांनी सादर केली. 'तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर, कराव्या बंद आठवणी तिचा तो भास झाल्यावर, बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे जरा देवा, किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर...' आकाश कंकाळ या युवा गझलकाराने सादर केलेल्या या गझलेला सर्वांचीच वाहवा मिळाली. रेश्मा कारखानीस यांनी 'कोणता रे धर्म त्यांचा जात होती कोणती, माणसाला जाळणारी वात होती कोणती, वस्त्र बदलावे तसे बदलायचे ते नेहमी, सापही साशंक त्यांची कात होती कोणती...' ही गझल सादर केली. अनिल आठलेकर यांनी 'कोणाला दोष केव्हाही उगाचच देत नाही मी, इथे माझ्याच कामाला कधी येत नाही मी, उन्हाळे पावसाळेही जसे आले तसे गेले, सहज बिघडायला काही तुझी तब्येत नाही मी...' ही गझल सादर करत सभागृहात हशा पिकवला. 'जन्म एक मध्यरात्र वाटतो, मग तुला

स्मरून मी पहाटतो. ज्या पुढे उडून दाखवायचे, तोच आपली पतंग काटतो. विठ्ठला पुन्हा मला झपाट तू आणि मी पुन्हा तुला झपाटतो...' ही गझल वैभव कुलकर्णी यांनी सादर केली. प्रशांत वैद्य यांनी 'चारचौघींसारखी नाहीस तू, पाहिजे होते मला ते पीस तू, शोध माझ्या अंतरंगी घेशी तुझा, काय माझ्यासारखी झालीस तू...' ही गझल सादर केली. 'वरवरचा शुकशुकाट आहे, आत सईंचे चऱ्हाट आहे. भाग्य चालते रखडत माझे, स्वप्न धावते सुसाट आहे...' दत्तप्रसाद जोग यांनी निवेदनाबरोबरच ही गझल सादर केली. याचबरोबर पाऊस, दुष्काळ, राजकारण, प्रेम, तसेच रोमँटिक मूडमधील गझल यावेळी सादर झाल्या. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन खेळाडू आज जाणार श्रीलंकेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील महिंद्राराजे स्टेडियमवर १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर अॅथलेटिक्स मर्कंटाइल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या संघात निवड झालेले पांडुरंग ताजनपुरे, अतुल जंत्रे व नारायण वाघ हे तीन यंग सिनीयर्स खेळाडू आज (दि. १७ ) श्रीलंकेला रवाना होणार आहेत.
पांडुरंग ताजनपुरे हे चेहेडी येथील किराणा व्यावसायिक आहेत, तर अतुल जंत्रे हे सम्राट ग्रुप या बांधकाम कंपनीत स्टोअर किपर म्हणून नोकरीस आहेत. या स्पर्धेत सहभागी होत असलेले नाशिकचे तिसरे खेळाडू नारायण वाघ हे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोकरीस आहेत. श्रीलंकेत होत असलेल्या मर्कंटाइल इंटरनॅशनल मीटमध्ये शंभर मीटर, पाच हजार मीटर धावणे व पाच हजार मीटर वॉकमध्ये ते सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ फार्म परिसरात गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा आलिशान बंगला भुजबळ फार्म जप्त होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांसह नाशिककरांनीही मंगळवारी या परिसरात गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास अनेक समर्थकांनी तेथे हजेरी लावली, तर रात्री उशिरापर्यंत अनेक जण तेथे येऊन पाहणी करीत होते.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सहा महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेल्या माजी मंत्री भुजबळ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पदावर असताना ठेकेदारांकडून जवळपास ७८० कोटींचा लाभ घेत, या पैशांतून त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला जात आहे. कारवाईचाच एक भाग म्हणून ईडीने भुजबळांच्या २२ मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. त्यात दिंडोरीतील शेतजमिनीसह भुजबळ फार्मचाही समावेश आहे. भुजबळ फार्ममधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित आहे, तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे. हा महाल व त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त केली असून, हे बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे. भुजबळ फार्म ही भुजबळांची नाशिकमधील ओळख असून, ही जागाच आता ईडीने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांसह अनेकांनी मंगळवारी भुजबळ फार्म परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, ईडीकडून लवकरच जप्तीची कारवाई पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांनी घेतल्या ‘काश्यपी’त उड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध मागण्यांसाठी 'करो या मरो'च्या तयारीने आलेल्या काश्यपी धरणग्रस्तांपैकी १५ ते २० जणांनी स्वातंत्र्यदिनी धरणात उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. अन्य ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रश्नावर नेमलेली उच्चस्तरीय समिती लवकरच या प्रकरणात लक्ष घालणार असून, विशेष बाब म्हणून हा प्रश्न हाताळण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्यपीग्रस्तांचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता बळावली आहे.

शहरवासीयांची तहान भागविता यावी, यासाठी १९९२ मध्ये काश्यपी धरण बांधण्यात आले. धरणासाठी चार ते पाच गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, त्या वेळी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांना मोबदला मिळालेला नाही. धरणग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत नोकरी दिली जाणार होती. मात्र, ६० पैकी केवळ २३ धरणग्रस्त कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळू शकली आहे. उर्वरित ३७ कुटुंबे अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय धरणग्रस्तांना अपेक्षित मोबदलाही मिळू शकलेला नाही. या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्या मान्य होत नसल्याने सोमवारी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास देवरगाव, धोंडेगाव, काळूशी, वैष्णववाडी, खाडेचीवाडी, शिरपाडी येथील धरणग्रस्त एकत्र आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धरणावर धाव घेतली. जलसमाधी घेण्याच्या तयारीने आलेल्या आंदोलकांपैकी १५ ते २० जणांनी अचानक धरणात उड्या घेतल्या. त्यापैकी अनेकांना पोहता येत नसल्याने काही ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ बाहेर काढले. काहींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे यशवंत मोंढे यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तातडीची बैठक बोलावली. बैठकीला महापालिका, पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते उपस्थित होते.

या प्रश्नाबाबत २८ जून रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीमध्ये नगरविकास, विधी व न्याय विभाग, पाटबंधारे विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभागाने या प्रश्नाबाबतचे अहवाल समितीला सादर केलेत का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. आठ दिवसांत हे अहवाल सादर करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. लवकरात लवकर याबाबत उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार बैठक आयोजित केली जाईल, असे धरणग्रस्तांना सांगण्यात आले आहे.
धरणग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडविणे, नुकसानभरपाई देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करणे, गावठाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामस्थांनी गावठाण ताब्यात घेणे आदी ‌विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पायाभूत सुविधांसाठी खासगी संस्थांची मदत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात अनेक संकुले उभारण्यात आली आहेत मात्र त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आज सरकारकडे निधी नाही. हे खरे असले तरी काही चांगल्या संस्थांना सांगून ही क्रीडा संकुलांची चांगल्या पद्धतीने देखरेख करणे सोपे होईल. हे सर्व स्थानिक पातळीवर व्हायला हवे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेचे औपचारिक उदघाटन पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. जयप्रकाश दुबळे, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी, जिल्हा बॅडमिंटन संघटनाध्यक्ष एस. राजन, पदाधिकारी उपस्थित होते.

लखानी यांनी आपल्या मनोगतात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास बॅडमिंटन या खेळाला चांगले भविष्य असल्याचे सांगितले. संघटनांना राज्य सरकारची संस्था म्हणून मान्यता मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरावाडीत घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ७० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी हिरावाडी परिसरात घडली.

अभिजित संभाजी बोरुडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्याजवळील सिद्धिविनायक टाऊनशिपमध्ये राहणारे बोरुडे कुटुंबीय शुक्रवारी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी बोरुडे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील ७० हजार रुपयांचे सुमारे सव्वातीन तोळ्याचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार ठार

दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात जखमी झालेला प्रशांत उत्तमराव जगताप (वय ३०, रा. सायोना सोसायटी, इंदिरानगर) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिक- पुणे हायवेवरील हॉटेल करीलीव्हसमोर १० ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. अपघातातील आणखी एका गंभीर जखमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचा मित्र रोहित शरद भामरे (२४ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, उपनगर) जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाइन (एमएच १५/सीडब्लू ७४१८) या मोटारसायकलवरून येत असताना दुभाजकावर आदळल्याने हे दोघे गंभीर जखमी झाले होते. यात प्रशांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक येवला तपास करीत आहेत.

सिव्हिलमधून दुचाकींची चोरी

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असली तरी हॉस्पिटलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मखमलाबाद रोडवरील अशोक गोपाळ अरगडे शुक्रवारी सकाळी आजारी असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. अरगडे परत येईपर्यंत चोरट्यांनी पार्किंगमधून हिरो होंडा (एमएच १५/एव्ही ७३५१) व महेश खामकर यांची सीबीझेड (एमएच १८/एजे ६१३५) या दोन मोटारसायकली लंपास केल्या होत्या. हवालदार निकम तपास करीत आहेत.

दोन ठिकाणी चेनस्नॅचिंग

पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करीत पोबारा केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

महात्मानगरमधील विमल जयंत पाटील (वय ६५) शनिवारी रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले. एस्सार कंपनीच्या पेट्रोलपंपासमोरून त्या गणपती मंदिराकडे पायी जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक गवळी तपास करीत आहेत. चेन स्नॅचिंगची दुसरी घटना अमृतधाम परिसरात घडली. विमल हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या आशा शरद देवरे (वय ४५) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घराजवळ हरिओम इमारतीजवळून पायी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक सदाफुले तपास करीत आहेत.

बसचालकास मारहाण

कट मारल्याच्या कारणावरून बस अडवून चालकास मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास सारडा सर्कल परिसरात घडली. या प्रकरणी एका बुलेटस्वाराविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश दत्तू झाडे (रा. चिंचोली, सिन्नर) या बसचालकाने ही तक्रार दिली आहे.

झाडे सीबीएसकडून द्वारकाकडे बस घेऊन जात असताना एमटीवाय ९५६८ या क्रमांकाच्या बुलेटस्वाराने त्यांची बस सारडा सर्कल भागात अडवली. कट का मारला, अशी विचारणा करीत बुलेटस्वाराने शिवीगाळ करून चालकाच्या केबिनमध्ये घुसून झाडे यांना मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

सिडकोत तडिपारास अटक

शहर व जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना सिडको आणि परिसरात वास्तव्य करणाऱ्या अंबड येथील तडिपार गुंडास पोलिसांनी रविवारी गजाआड केले. त्र्यंबक पांडुरंग भारसकर (वय २२, रा. पांजरापोळ, रामनगर, दत्तनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये शहर पोलिसांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र, भारसकर सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत राहत होता. दत्तनगरमधील कारगिल चौकात भारसकर उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार विसे तपास करीत आहेत.

पेठ रोडवर एकाची आत्महत्या

पेठ रोड परिसरातील दोंदे चाळीत राहणारे मनोज दादाजी रंगारी (वय ५५) यांनी रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. रंगारी यांनी छतास साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनात मोठे होताना समाजालाही सोबत घ्या

$
0
0

विनोद खरोटे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहिर सुवर्णकार समाजातील अनेक विद्यार्थी समाजातील विविध क्षेत्रात उच्च स्थानावर कार्यरत आहेत. मात्र यशाचे शिखर पादाक्रांत करतांना विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे होताना, समाजालाही सोबत घेऊन पुढे जायला हवे, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष विनोद खरोटे यांनी केले. सुवर्णकार समाजबांधवांनी गरीब परंतु हुशार मुलांची जात न पाहता, अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहिर सुवर्णकार समाज, नाशिकरोड देवळाली संस्थेतर्फे जेलरोड येथील श्रीहरी मंगल कार्यालयात समाजबांधवांचा मेळावा आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्ष राजेंद्र दुसाने यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमास चंद्रकांत लवटे, विक्रम खरोटे, माजी नगरसेविका सुनंदा खरोटे, तृप्ती जाधव, संजय खरोटे, रवींद्र जाधव, रवींद्र पोतदार, राजेश भालेराव, संतोष सोनार आदी उपस्थित होते.

समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे 'मन मे है विश्वास' पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धा परीक्षेत नशीब अजमावणाऱ्या नाशिकमधील गुणवंत परंतु गरीब विद्यार्थ्यांना सर्वप्रकारची मदत करण्यास आपण कटिबद्ध राहू, असा विश्वासही खरोटे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांचीही तयारी करण्यावर भर द्यायला हवा, असे मत संस्थेचे सरचिटणीस संतोष सोनार यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी महेश घोडके, संतोष विसपुते, गौरव विसपुते, धनंजय दंडगव्हाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मी नाशिककर’ भावनेतून ‘अभिमान चित्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिटी सेंटर मॉल येथे 'अभिमान चित्र' या अनोख्या उपक्रमाचे सोमवारी (दि. १५) आयोजन करण्यात आले होते. केवळ नाशिककर या एकाच उद्देशाने एकत्र येत येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

अभियानाची सुरुवात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाली. या उपक्रमात हजारो नाशिककरांचे त्यांच्या परिवारसह हातात भारताचा ध्वज घेऊन फोटो काढण्यात आले. या सर्वांचे फोटो स्टुडिओ सेटअपमध्ये काढून त्यांना त्वरित फोटो प्रिंट विनामूल्य देण्यात आली. अभियानात कलाकार किरण भालेराव, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड २०१५ नमिता कोहोक आदींनी सहभाग घेतला.

अभियानाची सांगता शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते झाली. संकल्पना अमित पाटील व आदित्य बोरस्ते यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमणगंगेचे पाणी ‘गोदावरी’ला द्या

$
0
0

नदीजोड प्रकल्प समावेशासाठी खासदार गोडसेंचे निवेदन

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

गोदावरी-गिरणा तुटीचे खोरे असल्याने दमणगंगेचे पाणी गोदावरी खोऱ्यात व नार-पार-औरंगा-अंबिका नद्यांच्या खोऱ्यातील पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी जास्तीत जास्त नदीजोड प्रकल्पांचा समावेश दमणगंगा-नार-पार खोऱ्यातील गुजरात व महाराष्ट्राच्या पाणी वाटपाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने बृहत आराखड्यात करावा, अशा मागणीचे निवेदन खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजिनीअर राजेंद्र जाधव यांनी समिती अध्यक्ष राजेंद्र पवार यांना दिले.

राज्य सरकारने गेल्या एप्रिल महिन्यात जलविज्ञान मेरीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. समितीवर या नद्यांच्या खोऱ्यातील पाणी उपलब्धता विचारात घेवून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे जलनियोजन अंतिम करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. याशिवाय नद्यांच्या खोऱ्यांतील पाणी गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्यासाठी तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणाऱ्या योजना सुचविण्यास सांगितले आहे. त्याच अनुषंगाने खासदार गोडसे व राजेंद्र जाधव यांनी या समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची भेट घेत वरील मागणीचे निवेदन दिले.

काय आहेत मागण्या

बृहत आराखड्यात दमणगंगेचे पाणी गोदावरी व नारपार-अंबिका-औरंगा या नद्यांचे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी जास्त नदीजोड प्रकल्पांचा समावेश करावा, राज्याला वीजेपेक्षा पाण्याची जास्त गरज असल्याने कोकणातून गोदावरी-गिरणा खोऱ्यात पाणी वळविणाऱ्या सर्व नदीजोड प्रकल्पांत धरणाच्या पायथ्याशी वीजप्रकल्प उभारण्याची शिफारस करावी, मुंबईसाठी दमणगंगा-पिंजाळ लिंक राबविण्याऐवजी पिंजाळ-शाई-काळू-पोशीर-शिलार या ७३ टीएमसीच्या प्रस्तावित धरणांतून पाण्याची गरज पूर्ण करण्याबाबत सुचविणे, मराठवाड्यासाठी ४४ टीएमसीचा दमणगंगा-गोदावरी लिंक प्रस्ताव यासोबत विविध मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर लॅबची चोवीस तास सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यातच कम्प्युटर आणि मोबाइलच्या माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 'सायबर लॅब' उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि शहर पोलिस आयुक्तालयात सुसज्ज सायबर लॅबच्या उद्‌घाटनप्रसंगी महाजन बोलत होते.
राज्यात ४२ ठिकाणी एकाच वेळी या लॅबचे उद्‌घाटन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, अशा स्वरूपाची यंत्रणा स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. या यंत्रणेमुळे सायबर गुन्ह्यांचा तपास वेगाने होऊन गुन्हेगारांना वचक बसविता येईल. संवाद यंत्रणा वेगवान होत असताना त्यासोबत येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी ही अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिस मोबाइल व्हॅनमुळे नागरिकांना संकटकाळी तत्काळ मदत करता येईल आणि नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा उपयोग मोबाइल बँकिंग, ई-बँकिंग, मोबाइल शॉपिंग, ई-गव्हर्नन्स आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोशल मीडियाचा विस्तारही वाढतो आहे. याबरोबरच या क्षेत्रात फिशिंग, क्लोनिंग, हॅकिंगसारखे प्रकारही वाढत आहेत. सायबर लॅबच्या माध्यमातून अशी गुन्हेगारी रोखणे किंवा गुन्ह्यांचा तपास तत्काळ करणे शक्य होईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात पोलिस अधिक्षक शिंदे यांनी आठ पोलिस उप अधीक्षकांच्या क्षेत्रात प्रत्येकी एक मोबाइल व्हॅन फिरती ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. व्हॅनमध्ये सहा कर्मचारी आणि सुसज्ज साहित्य असणार आहे. भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणेचाही उपयोग करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

शहर पोलिसांची चांगली कामगिरी
शहर पोलिस दलाच्या लॅबचे उद्‌घाटन करताना महाजन यांनी शहर पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले. नव्या सुविधांमुळे पोलिस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या लॅबसाठी आमदार अपूर्व हिरे यांनी ३० कम्प्युटर आणि एक सर्व्हर उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्वेता शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे 'सायबर लॅब'ची माहिती दिली. या लॅबमध्ये एकूण चार अधिकारी आणि आठ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या कक्षाची सुविधा २४ तास उपलब्ध राहणार आहे. शहरातील विविध पोलिस स्टेशनशी ही लॅब जोडली जाणार आहे. मोबाइल, संगणक, लॅपटॉप आदींवरील माहिती प्राप्त करणे या लॅबच्या माध्यमातून शक्य होणार आहे. सायबर गुन्ह्यांच्या विश्लेषणासाठी हार्ड डिस्कवरील माहिती आता मुंबईऐवजी नाशिक पोलिस आयुक्तालयातच मिळविता येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

ही आहेत सायबर लॅबची वैशिष्ट्ये
- लॅबसाठी चार अधिकारी, आठ कर्मचारी नियुक्त
- चोवीस तास सुविधा उपलब्ध
- लॅबमुळे मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉपवरील माहिती मिळविणे शक्य
- सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण आता मुंबईऐवजी नाशिकमध्येच मिळणार
- ऑनलाइन घोटाळ्यांचा तपासही लॅबमुळे शक्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्य विक्री; १३ जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यदिनी मद्य विक्रीवर बंदी असतानाही अवैध साठा करून विक्री केल्या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली. उत्तमनगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला ४५ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांत गंभीर माळी, विठ्ठल बोरसे, नाना पाटील, मधुकर पाटील, सुनील ठाकरे, सुनील वाघ, प्रशांत माळी, नानाभाऊ माळी, श्रीकांत चव्हाण, अशोक बेलवार, संजय खैरनार, राजू आव्हाड आणि सैजात शौकतअली शेख यांचा समावेश आहे. या संशयितांकडून पोलिसांनी विविध कंपन्यांच्या ४५ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. ड्राय डेच्या दिवशी हे मद्य जादा दराने विक्री करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या पथकास ही माहिती समजताच त्यांनी छापा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळ, गारपीटीसारखे नैसर्गिक अरिष्ट, कर्जबाजारीपणा यामुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही सुरूच आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‍मालेगाव आणि नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, गतवर्षभरात ८५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली होती.

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील दत्तू राधो बोरसे (वय ४२) यांनी रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विषप्राशान करुन आत्महत्या केली. तर मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रक येथील अजयसिंग रामसिंग परदेशी (वय ४५) या शेतकऱ्यानेही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. गत तीन चार वर्षांत जिल्ह्यात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक अरिष्टांमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वारंवार हिरावला गेला. गत वर्षभरात तर दुष्काळाची दाहकता सोसावी लागल्याने खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निसटले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्रच शहरात सुरू झाले. जून संपेपर्यंत पावसाचा जोर नसल्याने ५५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. मात्र गेल्या दीड महिन्यात समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात ‍शेतकरी आत्महत्येच्या आठ घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कर्जाचे पुणर्गठन, दुष्काळग्रस्तांना मदत, मागेल त्याला शेततळे, मोफत खते आणि बियाणे, याखेरीज बाजार समित्यांमधील दलालांच्या जाचातून तसेच आडतीच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची मुक्तता असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. तरीही शेतकरी आत्महत्या होत असल्याने या घटनांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images