Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस मुख्यालयामागील पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. अवघ्या १५ वर्षांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

समाधान ज्ञानेश्वर कांबळे (वय १५) आणि करण मुराजी बोरगे (वय १५) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. धात्रक फाटा येथील जसलोक स्वीटच्या मागे राहणारा कांबळे आणि धात्रक फाटा येथील बंगला क्रमांक ३० शेजारी शेडमध्ये राहणारा बोरगे हे दोघे शाळकरी मित्र सोमवारी पाझर तलावावर पोहोण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत संजय साबळे हा दहा वर्षांचा मुलगादेखील होता. पाझर तलावात पाणी खोल असून, त्याचा अंदाज न आल्याने या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला असावा. तिसरा मुलगा मात्र घरी परतला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे दोघे घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी शोधाशोध केली. मात्र, मुले मिळाली नाहीत. त्यामुळे मुलांच्या पालकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, या दोघांसोबत दीपक साबळे या मुलाने ते दोघे पोहोण्यास गेले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी दिल्याने सदर बाब समोर आली. त्यानुसार त्यांचे पालक व पोलिस शोध घेण्यासाठी पाझर तलावाजवळ गेले. मुलांचे कपडे व चपला काठावर मिळाल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळातच दोघांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुदैवाने जीवितहानी टळली!

$
0
0

परंपरा जोपासताना गोळीबारात गडावर दहा जण जखमी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावर दसऱ्याच्या दिवशी बोकडबळीच्या विधीनंतर देवस्थानचा सुरक्षारक्षक हवेत गोळीबार करीत सलामी देण्याची परंपरा आहे. ही परंपरा राबवत असताना उपस्थितांचा धक्का लागल्याने गोळी जमिनीवर झाडली गेली. यामुळे गोळीतील छर्रे उडाल्याने सप्तशृंग देवस्थानच्या आठ कर्मचाऱ्यांसह दोन ग्रामस्थ असे दहा जण जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी न झाल्याने यात्रा सुरळीत सुरू आहे.

सप्तशृंग गडावर दसऱ्याच्या निमित्ताने भगवतीला बोकडबळी देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. देवस्थानचा सुरक्षा कर्मचारी सालाबादाप्रमाणे बोकडबळीच्या पार्श्वभूमीवर हवेत गोळीबार करून सलामी देत असतो. बंदूक लोड केलेली असताना हवेत गोळीबार करण्यास सज्ज असलेल्या कर्मचारीचा हात ट्रिगरवर असताना जवळ असलेल्या गर्दीचा धक्का लागल्याने हा गोळीबार हवेत न होता जमिनीवर झाला. जमिनीवरील फरशीमुळे बंदुकीतून निघालेल्या गोळीचे छर्रे उडूनजवळ उपस्थित आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना व दोन ग्रामस्थांना लागल्याने जखमी झाले.

जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये रामचंद्र रामू पवार यांना तीन ठिकाणी, दिगंबर गोधडे व शरद शिसोदे यांना दोन ठिकाणी पायाला दुखापत झाली. गणेश देशमुख, संतोष पवार, पद्माकर देशमुख यांना पायाला दुखापत झाल्याने कळ्वणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच, युवराज पाने व महेंद्र देशमुख यांच्यावर किरकोळ जखमेमुळे उपचार करून घरी पाठविण्यात आले. जखमींपैकी सागर दुबे व मधुकर गवळी या ग्रामस्थांवर वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

शनिवार, रविवारची सुट्टी तसेच, विजयादशमीमुळे भाविकांची सप्तशृंग गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मात्र शनिवारपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावल्याने लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले. नवरात्रोत्सवामुळे अनेक जण मंदिरात घटी बसले होते. सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भाविकांची गर्दी सुरूच राहील, असे सप्तशृंग देवस्थानचे विश्वस्त तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले.

सप्तशृंग देवस्थानच्या स्थापनेपासून निर्माण झालेली परंपरा आतापर्यंत सुरू आहे. बोकडबळी दिला गेल्यानंतर हवेत गोळीबार करून नवरात्रोत्सव समाप्तीची सूचना या माध्यमातून दिली जाते. गर्दीच्या सान्निध्यात धक्का लागल्याने हा प्रकार अपघाताने झाला. मात्र त्यामुळे यात्रेवर कुठलाही परिणाम झालेला नसून, अफवांवर विश्वास ठेवू नये.

- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, सप्तशृंग देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजियन्सनाही आता मिळणार ‘वाचन प्रेरणा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हर्च्युअल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या तरुणवर्गाला वाचन आणि चिंतनाच्या प्रवाहात आणण्यासाठी उच्चशिक्षण विभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी केवळ शाळांतच साजरा होणारा ‘वाचन प्रेरणादिन’ आता कॉलेज स्तरावरही साजरा करण्याचे आदेश उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले आहेत.

यासंदर्भात संचालनालयाने सर्व विद्यापीठ आणि शिक्षण सहसंचालकांना पत्र पाठविले आहे. १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. उच्च शिक्षण विभागाच्या या आदेशांमुळे कॉलेजेसमध्ये येत्या शनिवारी (दि. १५) विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत ‘वाचन प्रेरणा’ या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान, चर्चासत्र, निबंध, काव्यवाचन, अभिवाचन स्पर्धा, परिसंवाद आणि कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दिवशी कॉलेजांमध्ये लेखकांशी त्याच्या लेखनाविषयी किंवा त्याच्या कलाकृतीविषयी चर्चा अथवा त्यांची प्रकट मुलाखत घेता येणार आहे. वृत्तपत्रांतील अग्रलेख व प्रमुख लेखांचे वाचन आणि ई-बुक्सचे सामूहिक वाचन असे कार्यक्रम आयोजित करण्याचेही स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाला admin@jdhepune.info या ई-मेलवर, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना vinodtawademinister@gmail.com ई-मेलवर पाठविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.


चित्र बदलण्याचा प्रयत्न

वरिष्ठ वर्गांमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थीवर्ग अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या पुस्तक वाचनात रस घेत नसल्याचे काही संस्थांच्या पाहणीचे निष्कर्ष आहेत. परिणामी, ज्ञानसंपन्न समाजाच्या शिक्षणाच्या उद्दिष्टाला बाधा पोहोचते. याशिवाय वाचनाअभावी समाजाची बौद्धिक वाढही सर्वांगीण होत नाही. याबरोबरच तरुणाईच्या हाती इंटरनेट आल्याने मोठ्या प्रमाणावर तरुणाई पुस्तक वाचनापासून दुरावून सामाजिक नुकसान होते आहे. हे चित्र बदलण्यासाठी ‘वाचन प्रेरणादिन’ यासारख्या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपवाद वगळता जिल्ह्यात शांतता

$
0
0

अपवाद वगळता जिल्ह्यात शांतता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी शांतता प्रस्थापित झाली. सायंकाळी उशिरा वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटल्याने सर्वसामान्यांची धावपळ उडाली होती. विशेषतः तळेगाव (अंजनेरी), पैगलवाडी, तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये काही ठिकाणी हाणामारी झाल्याची माहिती समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. संध्याकाळी नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक मात्र ठप्प करण्यात आली, तर सातपूरमध्ये तणापूर्ण शांतता होती. सिव्हिल हॉस्पिटल, तसेच फुलेनगरमध्ये पोलिस प्रशासनाने बंदोबस्तही वाढवला होता.

तळेगाव (अंजनेरी) येथे एका पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज, विजयदशमी (दसरा) असल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करून समाजकंटकांना रोखण्याची तयारी केली. संध्याकाळपर्यंत किरकोळ घटना वगळता शांतता होती. मात्र, यानंतर वेगवेगळ्या अफवा पुन्हा सुरू झाल्या. दोन समाजांतील तरुणांमध्ये तळेगाव, त्र्यंबकेश्वरमध्ये दगडफेक, तसेच हाणामारी झाल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
दरम्यान, शहरात आज, शहरात काही ठिकाणी मोटारसायकल रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली. यातील उत्साही तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्याच्या तक्रारी समोर आल्या. संध्याकाळी पाथर्डी फाटा येथील बुद्ध स्मारक येथे दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, हा वाद तेथेच मिटला.

लेखानगरला तणाव निवाळला

समाजकंटकांनी राणेनगर येथे एक चारचाकी फोडली. यानंतर लेखानगर येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या घरासमोर पार्क केलेली चारचाकी फोडून समाजकंटकांनी काही ट्रकचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती समजताच चुंबळे समर्थकांनी लेखानगर येथे गर्दी केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजी चुंबळे यांनीही कार्यकर्त्यांना शांततचे आव्हान करीत पोलिसांना सहकार्य करण्याची हमी दिली. यानंतर येथील तणाव निवळला. घटनेची माहिती समजताच आमदार जयंत जाधव, शैलेश कुटे, दिनकर पाटील यांनी चुंबळे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शहर पोलिस सर्व घडामोंडीकडे लक्ष ठेवून आहेत.

मोबाइल डाटा सुरू होण्याची शक्यता कमी

व्हॉटसअॅपद्वारे पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा सोमवारपासून बंद केली आहे. आज, दसऱ्याच्या दिवशीही मोबाइलधारकांना इंटरनेट सेवेपासून वंचित राहावे लागले. इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी परिस्थितीचा विचार केला जाईल. मंगळवारी रात्रीपर्यंत अफवांचे पीक कमी झाल्याची खात्री पटल्यास बुधवारपासून इंटरनेट सेवा सुरू केली जाईल; अन्यथा त्यात वाढ केली जाईल, असे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्णत्वापूर्वीच गोदापार्कची दैना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेने गोदावरी नदीच्या किनारी मोठ्या धूमधडक्यात उभारलेल्या बहुचर्चित गोदापार्कची अक्षरशः दैना झाली आहे. त्यामुळे रोजच पहाटे व सायंकाळी गोदापार्कवर जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांनी त्याकडे पाठच फिरविली आहे. गोदापार्कच्या या दुरवस्थेकडे महापालिका लक्ष घालणार का, असा सवाल नाशिककर उपस्थित करीत आहेत. महापालिकेने किमान गोदापार्कची दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

माजी महापौर दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात त्यावेळी शिवसेनेत असलेले मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोदापार्कची संकल्पना आणली होती. माजी महापौर पाटील यांनी गोदापार्कला विरोधदेखील केला होता. परंतु, बाळासाहेबांच्या आग्रहाने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गोदापार्कचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला होता. त्यानंतर गोदापार्कची उभारणीदेखील करण्यात आली. परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिककरांनी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हाकेला साथ देत महापालिकेत सत्ता दिली. राज ठाकरे यांनी महापालिकेची सत्ता घेतल्यानंतर पुन्हा गोदापार्क बनविणारच असा संकल्प केला. खासगी कंपनीमार्फत पुन्हा नव्या ठिकाणी गोदापार्कचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, गेल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे व जोरदार पावसाने नव्याने तयार करण्यात आलेला गोदापार्कदेखील वाहून गेला. चोपडा लॉन्सच्या बाजूला उभारलेल्या गोदापार्कवरही झाडाझुडपांचे साम्राज्य वाढले आहे. गोदावरीला आलेल्या महापुराने गोदापार्कची तटबंदी ढासळली आहे. सद्यःस्थितित गोदापार्क हा टवाळखोर व गुन्हेगारांचा अड्डाच बनलेला पाहायला मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने उभारलेल्या गोदापार्ककडे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

ड्रेनेजचे ढापेच झाले गायब

महापालिकेने गोदावरी नदीलगत उभारलेल्या ड्रेनेजचे ढापेच गायब झाले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने लावलेल्या ‘ड्रेनेजचे ढापे चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल’ या आशयाच्या फलकाच्या बाजूलाच असलेल्या ड्रेनेजचे ढापे चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा करते काय, असा सवालदेखील उपस्थित होत आहे.

---

गोदातीरी महापालिकेने चोपडा लॉन्सच्या बाजूला अत्यंत सुंदर असा गोदापार्क उभारला होता. परंतु गोदावरी नदीला आलेल्या अनेक पुरांमुळे गोदापार्कच नाहीसा झाला आहे. उरलेल्या गोदापार्कला रानटी झाडा-झुडपांनी वेढा घातला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

-उत्तम शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकनगर बनले निराधार वृद्धेची ‘माय’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...’ हे त्रिकालबाधित सत्य सर्वश्रुत असतानाही ८० वर्षांच्या वृद्धेला आपुलकीच्या नात्यांपासून कालगतीमुळे विलग व्हावे लागले. दुर्दैव म्हणजे या वृद्धेस तिच्या स्वत:च्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रमिकनगरमधील नागरिक मदत करायला तयार असूनही विस्मरणामुळे तिला स्वत:चे घर अन् माणसांची माहितीच आठवत नाहीये. परिणामी, या कालगतीशी झुंजत दिवस कंठणाऱ्या या निराधार वृद्धेची मायच श्रमिकनगर बनले आहे. येथील रहिवाशांनी या वृद्धेस तात्पुरता निवाराही मिळवून दिला आहे.

श्रमिकनगर परिसरात महादेव मंदिरात वर्षभरापासून सीताबाई रामचंद्र बिडवे (वय ८०) ही वृद्धा राहते. येथील रहिवासी रंजनकुमार व इतर नागरिकांनी सीताबाई यांच्यासाठी महादेव मंदिर परिसरात निवाऱ्यासाठी झोपडी तयार केली आहे, तर परिसरातील महिला व राधा सिंग या रोजच सीताबाई यांची मायेने काळजी घेत असतात. नातेवाईकांची माहिती नसलेल्या सीताबाईंची कुणाला माहिती असेल, तर त्यांनी श्रमिकनगर येथील महादेव मंदिर परिसरात भेट द्यावी, असे आवाहन श्रमिकनगरवासीयांनी केले आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी सीताबाई यांना कुणीतरी या मंदिराच्या आवारात रिक्षातून सोडून गेल्याचे परिसरातील रहिवासी सांगतात. स्वत:च्या घराविषयी त्रोटक माहिती आठविताना त्यांचा निर्देश आडगावच्या विडी कामगारनगरकडे आहे. येथील लक्ष्मीनगर भागात घर असल्याचे त्या सांगतात. पण, त्यापलीकडे त्यांना स्मृती नाही, असे रंजन कुमार यांनी सांगितले. रंजन कुमार यांनी सीताबाई यांनी पंचवटी व आडगाव परिसरातही नेले होते. परंतु, त्यांना घर न आठवल्याने पुन्हा महादेव मंदिरात त्यांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली. मंदिर परिसरात असलेल्या अंगणवाडीतील सेविकाही सीताबाईंना उदरनिर्वाहासाठी काही ना काही देतात. मंदिर परिसरातील अनेक महिला मायेने रोजच सीताबाईंची जेवणाची सोय करीत असतात. राधा सिंग या आईप्रमाणे सीताबाईंची रोज सेवा करतात.

___

मंदिराच्या आवारातील स्वच्छता करताना आजारी अवस्थेत सीताबाई नजरेस पडल्या होत्या. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल कुणाला माहिती असल्यास कृपया कळवावे.

-रंजनकुमार, रहिवासी, श्रमिकनगर

___

सीताबाईंना जेवणासाठी रोजच अनेक महिला मदत करीत असतात. मीदेखील जेवण्याची व पाण्याची सोय सीताबाईंना करून देते. कणखरपणे बोलणाऱ्या सीताबाईंना नातेवाईकांविषयी माहिती देता येत नाही. परंतु, आडगाव शिवारातील लक्ष्मीनगर भागात त्यांचे घर असल्याचे त्या सांगतात.

-राधासिंह, रहिवासी, श्रमिकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद इंटरनेटमुळे वाढला खरा संवाद!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

तळेगाव (अंजनेरी) अत्याचार प्रकरणानंतर तणावग्रस्त नाशिकमध्ये अफवांचे पेव फुटल्यामुळे दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाकडून इंटरनेट बंद करण्यात आले. दोन दिवसांपासून शहरात सोशल मीडिया पूर्णतः बंद आहे. यामुळे सोशल मीडियाच्या जाचामधून मोकळीक मिळालेल्या अनेकांची रोजच्या भरमसाट मेसेजमधून सुटका झाली आणि थेट संवादाद्वारे त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

कामाच्या व्यापात असतांना सोशल मीडियावर येत असणाऱ्या मेसेजपासून अनेकजण त्रासले होते. यंगस्टर्सच्या परीक्षा असल्याने त्यांना अशीही इंटरनेटपासून मुक्ती हवी होती. मात्र, नेट पॅक असल्याने थोड्यावेळाने ते नेट ऑन करून चॅटिंग करत असायचे. आता दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या व्यापातून सुटका झाल्याचे यंगस्टर्स व नाशिककर सांगतात. पूजा गवळे सांगते, की इंटरनेट बंद असल्याने घरात अभ्यासाला वेळ मिळाला आहे. नेट सुरू असल्यावर सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात बराच वेळ खर्ची होतो. हे योग्य नसल्याचं समजत असलं तरीही नेटची सवय जाता जात नाही. प्रशासनाने नेट बंद असल्यामुळे रोजच्या सोशल मीडियातील मेसेजपासून सुटका मिळाली आहे. रविवारपासून तणावात असलेलं नाशिक या नेट बंदमुळे शांत झाले. सोशल मीडियाचा अपरिहार्य वापर केल्याने काय सहन करावं लागत हे यातून दिसून आले.’

तरुणाई आता सोशल मीडियावरील फेक मेसेजेसला वैतागल्याचे यावरून दिसून आले. कीर्ती महाजन सांगतात, की सोशल मीडिया बंद असल्याने घरातील एकत्र संवाद वाढला आहे. कायम मोबाइलमध्ये चॅटिंग करणारे मेम्बर्स आता खऱ्या आयुष्यातला संवाद साधत आहेत. सोशल मीडियाचा वापर हा सीमित पद्धतीनेच व्हावा हा धडा यातून आपण घ्यायला हवा. रोजच्या कामात डिस्टर्ब करणारी सोशल मीडिया नसल्याने टेन्शन हलकं झाल्याचं वाटतं आहे. प्रशासनाने या भूमिकेचं स्वागत आहे. नागरिकदेखील सोशल मीडियाच्या रोजच्या व्यापला कंटाळले होते. अनेकांना व्हॉट्सअॅप मेसेज वाचायलाही वेळ मिळत नसल्याने ते त्रस्त झाले. मात्र, आता शांत वाटत असल्याचेही मत त्यांना आवर्जून नोंदविले.

मेसेजद्वारे नव्हे थेट शुभेच्छांवर भर
सोशल मीडियावर कायमच सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. यामुळे फोन कॉल्सवर दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा कमी होऊन संवाद कमी झाला होता. यंदा मात्र नेट बंद असल्याने शहरातील नागरिकांनी फोन करीत नातेवाईक व मित्रमंडळींना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही जणांनी थेट भेट देत मित्रमंडळींशी सुख-दु:खाच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. यातून कित्येक वर्षांपासून हरवलेला फोन कॉल्सवरील संवाद पुन्हा एकदा दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे क्रॉसिंगची प्रवृत्ती संपेना!

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड स्थानकात रेल्वे रुळावरुन जाताना महिनाभरात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचे प्रबोधन करण्यावर भर दिला असून कायदेशीर कारवाईही सुरुच ठेवली आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज शंभर गाड्या धावतात. दररोज 12 ते 14 हजार तिकीटे विकली जातात. सरासरी 20 हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यातून महिन्याला नऊ ते दहा कोटींचा महसूल मिळतो. प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने त्यांच्या जिवीताच्या रक्षणासाठी कुंभमेळ्यात फ्लॅटफार्म एक व चारला जोडणारा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय दोन वेगळे पादचारी पूल आहेत. फ्लॅटफार्म एक, दोन व तीनवरुन पादचारी पूलावर जाण्याची सोय आहे. तरीही प्रवासी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. त्यांचा आळस त्यांच्या जीवावर बेततो.


नियमित प्रबोधन

प्रवाशांनी पादचारी पुलाचाच वापर करावा, रुळ ओलांडू नये म्हणून रेल्वे सुरक्षा दल नियमित प्रबोधन करते. त्यांचे जवान गस्त घालत असतात. प्रबोधनाचे बॅनर स्थानकात लावण्यात आले आहेत. घरी कोणी आपली वाट पहात आहे, आपला लाखमोलाचा जीव सांभाळा असे प्रबोधनपर फलक हिंदी आणि मराठीतून लावण्यात आले आहेत. मात्र, प्रवासी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात.


आरपीएफची कारवाई

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रुळ ओलांडणा-या सरासरी तीनशे प्रवाशांवर दर महिन्याला कारवाई करते. त्याआधी समज दिली जाते. तरीही प्रवासी एकत नसतील तर रेल्वे कायद्याच्या कलम 147 कलमाखाली कारवाई केली जाते. रुळ ओलांडणा-यांना अटक करुन मनमाड कोर्टापुढे उभे करतात. कोर्ट अशा प्रवाशांना दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. दंड न भरल्यास तीन ते सहा महिन्यांसाठी जेलची हवाही खावी लागते.


दुभाजक निरुपयोगी

प्रवाशांनी रुळ ओलांडू नये म्हणून आरपीएफने रुळांच्या मधल्या जागेत तीनशे मीटरपर्यंत लोखंडी दुभाजक कायमस्वरुपी रोवले आहेत. तरीही प्रवाशी त्यावर चढून दुस-या फ्लॅटफार्मवर जातात. उन्हाळ्यात व सुटीच्या हंगामात रुळ ओलांडणा-यांचे प्रमाण जास्त असते. उत्तरप्हदेश, बिहार, खान्देश, मराठवाडा या भागात जाणा-या प्रवाशांची संख्या जास्त असते. मुंबईहूनच या प्रवाशांच्या गाड्या भरुन येतात. नाशिकरोडला या गाड्या आल्यानंतर उभे राहण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे अऩेक प्रवाशी रुळावरुन जातात. वयस्कर प्रवासी आणि युवकांचे प्रमाण त्यात जास्त असते.


फुकटे आणि भटके

रेल्वे रुळ ओलांडणा-यांमध्ये फुकटे प्रवाशी भटक्यांची संख्या जास्त असते.

मध्य रेल्वेने मार्च 16 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 21 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन कोट्यवधीचा दंड वसूल केला. नाशिकरोड स्थानकात याच कालावधीत 7311 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 51 लाख 63 हजार 470 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हा दंड किमान अडीचशे रुपये आणि तिकीटाची पूर्ण रक्कम असा असतो. नाशिकरोडला तेरा टीसी आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना तिकीट काढून प्रवास करण्याची शिस्त लावण्याचे कामही ते करतात.

---

प्रवाशांनी आपला जीव कुटुंबियांसाठी मोलाचा आहे हे लक्षात घ्यावे. रेल्वे रुळ ओलांडण्याचा कधीही धोका पत्करु नये. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नेहमी पादचारी पुलांचा वापर करुन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

-संजय गांगुर्डे, सहाय्यक निरीक्षक, आरपीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काश्मीर फॉर्म्युला नाशिकमध्ये यशस्वी

$
0
0

काश्मीर फॉर्म्युला नाशिकमध्ये यशस्वी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बालिकेवरील अत्याचारानंतर परिस्थिती आता निवळली आहे. अतूट सामाजिक ऐक्य, नागरिकांचा संयम आणि संघटनांची समजदारी ही त्याची कारण असले तरी इंटनेटवर प्रायोगिक बंदी घालण्याचा काश्मीर फार्म्युला हे त्याचे खरे रहस्य आहे. त्यामुळेच पोलिसांवरील ताण कमी होऊन नाशिकरोडसह शहरात दसरा शांततेत साजरा झाला.

काश्मीरमध्ये अतिरेकी बुऱ्हाण वानी लष्कराशी चकमकीनंतर ठार झाला होता. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात गेली अनेक दिवस दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ सुरू होती. यात अनेकांचा बळी गेला. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेथील इंटरनेट, मोबाइल सेवा सरकारने बंद ठेवली होती. त्यामुळे वातावरण पूर्वपदावर आले. आताही काश्मीरमधील बहुतांश भागात इंटरनेट, मोबाइल सेवा बंदच आहे. त्याच धर्तीवर काश्मीर फॉर्म्युला नाशिकमध्ये अजमाविण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटू नये, यासाठी राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग होता. त्यामुळे हाताबाहेर गेलेली परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे.

पोलिसांविषयी मात्र नाही तक्रार
व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियामुळे आग भडकत होती. त्यामुळे प्रशासनाने ४८ तास जिल्ह्यातील इंटरनेट सेवाच बंद ठेवली आहे. दसऱ्याला नागरिकांची गैरसोय होणार असतानाही असा धाडसी निर्णय घेण्यात आला. नागरिकांना व्हॉटसअॅपवर दसऱ्याच्या शुभेच्छा देता आल्या नसल्या तरी शांतता व कायदा-सुव्यस्था टिकून राहिल्याने त्यांनीही तक्रार केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडून थेट नोकरीची हमी

$
0
0

महापालिकेकडून थेट नोकरीची हमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने आता शहरातील बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून या प्रशिक्षणाद्वारे दरवर्षी ५०० प्रशिक्षितांना थेट नोकरीची हमी दिली जाणार आहे. यासाठी महापालिका दरवर्षी एक कोटी रुपये खर्च करणार आहे. रोजगाराच्या उपलब्धतेअंतर्गत हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटोमोबाईल, बांधकाम या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दिले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने आता बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी येत्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कौशल्य प्रशिक्षणाद्वारे हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटोमोबाइल, बांधकाम या क्षेत्राशी संबधित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी शहरातील दारिद्र्यरेषेखाली असलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला, अपंगाना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी १८ ते ३५ वयोगटाची अट ठेवण्यात आली असून खाजगी संस्थेद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सबंधित तरुणाला प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार असून तीन महिने नोकरीची हमी दिली जाणार आहे. त्यासाठी करिअर मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे जनजागृती करणे निर्माण करणे, अर्ज मागविणे, कौशल्यविषयक निर्धारण करणे, प्रशिक्षण देणे व त्यांनतर रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी दरवर्षी ५०० लाभार्थी निवड केले जाणार असून त्यावर एक कोटी खर्च येणार आहे. प्रतिलाभार्थी २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. संबंधित प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला असून मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती कृष्णा यांनी दिली आहे.

गडचिरोलीच्या धर्तीवर हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. गडचिरोलीमध्ये ८० टक्के यश आले होते. त्यामुळे नाशिकमध्येही हा प्रकल्प यशस्वीपणे राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई, त्र्यंबकेश्वर बससेवा बंदच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला आहे. त्यामुळे शहरात, जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही काही मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली असली तरी मुंबई आणि त्र्यंबकेश्वर मार्गावरील बस वाहतूक मंगळवारीही बंदच ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वातावरण पूर्णत: निवळत नाही तोपर्यंत जोखीम उचलली जाणार नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तळेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि विशेषत: नाशिक-मुंबई आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर उमटले होते. संतप्त जमावाने आठ बसेस जाळल्या, तर १८ बसेसची तोडफोड केली. त्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले. संतप्त जमावाकडून एसटी बसेसचे नुकसान केले जात असल्याने रविवारी दुपारपासून बसद्वारे होणारी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी दिवसभर बससेवा बंद होती. जनजीवन पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत बससेवा बंदच राहणार असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात १३ बस डेपो असून, ११०० बसेस आहेत. त्यापैकी ९५० बसेस रोज शहर, जिल्हा आणि राज्यांतील रस्त्यांवर धावत असतात. या सर्व बसेसची वाहतूक पूर्णत: थांबविण्यात आली होती. त्यामुळे शहरांतर्गत, जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरील वाहतूकही ठप्प झाली होती. ऐन सणासुदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. महामंडळाच्या नाशिक विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्याबाहेरील डेपोंच्या बसेस पोलिसांच्या सूचनेनुसार सोडण्यास सुरुवात झाली. पोलिसांच्या बंदोबस्तातच या बसेस सोडण्यात आल्या. रात्रीनंतर धुळे, जळगाव, नंदुरबार या मार्गांसह जिल्ह्यांतर्गत बहुतांश मार्गांवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत मुंबई, तसेच त्र्यंबकेश्वर मार्गांवरील वाहतूक सुरू करण्यात आली नसल्याची माहिती महामंडळातील सूत्रांकडून देण्यात आली. या मार्गांवर बससेवा सुरू करण्याची जोखीम तूर्तास उचलणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस तसेच महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सूचना आल्याशिवाय ही वाहतूक सुरू केली जाणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शहर बससेवा सुरू

गेल्या दोन दिवसांत शहरात १२ बसेसच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे शहर बससेवादेखील बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र मंगळवारी सकाळी साडेसहापासून शहर बससेवा सुरू करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तणाव निवळला

$
0
0

परिस्थिती पूर्वपदावर; समाजकंटकांची चौकशी अन् शोध सुरू

म. टा. वृत्तसेवा सिन्नर, फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारनंतर नाशिकरोड शहरात झालेला उद्रेक मंगळवारपर्यंत निवळल्याने शहरातील सर्व सेवा सुरळीतपणे सुरू झाल्याचे चित्र मंगळवारी सकाळनंतर दिसून आले. त्यामुळे दसरा सणाच्या निमित्ताने नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दरम्यान, पोलिसांनी काही समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

रविवारी रात्री भीमनगर येथे व सोमवारी दुपारी जेलरोडच्या छत्रपती चौक, सायखेडा रोड, भारत भूषणनगर, पाण्याची टाकी परिसरात समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ व तोडफोड करीत प्रचंड दहशत निर्माण केली होती. जेलरोड भागात तर गटागटाने वाहनांवरून फिरत समाजकंटकांनी घोषणाबाजी करीत, शिवीगाळ करीत अक्षरशः धुडगूस घातला होता. त्यामुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

सोमवारी दुपारी तीन वाजता परिस्थिती चिघळल्याने शहर पोलिस आयुक्तांनी जेलरोडला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली होती. त्यानंतर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. यावेळी शीघ्र कृती दलाची एक तुकडीही शहरातील दंगेखोरांवर नियंत्रण ठेवण्यास तैनात करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर सौम्य लाठीमारही केला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदी निर्माण झाली होती. दंगेखोरांच्या दहशतीमुळे जेलरोड, नाशिकरोडच्या बाजारपेठा अंशतः बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात वाहनांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटाकांवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळविल्याने सोमवारी रात्री दगडफेकीची घटना घडली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवहार सुरू केले. दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांनीही फुले, सिकसोने, वाहने, किराणा, दागिणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते पुन्हा गजबजल्याचे दिसून आले.

रात्रीही पोलिस बंदोबस्त

भीमनगर, देवळालीगाव, मालधक्का, जेलरोड पाण्याची टाकी, छत्रपती चौक, जुना सायखेडा रोड, सिन्नर फाटा, चेहेडी, बिटको चौक या संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त कायम होता. त्यामुळे समाजकंटकांना पुन्हा डोके वर काढण्याची संधीच मिळाली नाही.

वाढदिवसाची पार्टी करणारे ताब्यात

सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्याने सहा-सात युवकांचा एक गट वाहनांची तोडफोड करण्यासाठी एका हॉटेलमध्ये एकत्र येऊन मद्यपान करीत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या सातही युवकांना नाशिकरोड कोर्ट परिसरातून ताब्यात घेतले असता मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते पार्टीसाठी एकत्र आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. मात्र त्यांनाही रात्रभर पोलिस ठाण्यात थांबावे लागले. मंगळवारी त्यांना १४९ कलमाखाली प्रतिबंधात्मक नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले.

राजकीय नेत्यांची हजेरी

सोमवारी सायंकाळी मालधक्का रोडवर हितेंद्र अनिल गायकवाड या युवकास त्याच्या चारचाकी गाडीवरील मराठा क्रांती मोर्चाचे स्टिकर काढण्याची सक्ती करून एका पाच जणांच्या गटाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. याशिवाय या हल्ल्यात हितेंद्र गायकवाड याची आई सरिता अनिल गायकवाड यांच्यावरही हल्ला चढवून यातील काही युवकांनी त्यांच्याशी झटापट केली होती. या घटनेनंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह स्थानिक नेत्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी नाशिकरोड

पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी यावेळी जमलेल्या प्रक्षुब्ध जमावाचे म्हणने ऐकून घेत कारवाईचे आश्वासन देत त्यांची समजूत काढली. या हल्ल्याच्या घटनेतील संशयित आरोपी प्रजोल शाम भालेराव, सनी भालेराव, उमेश पारखे व एक अनोळखी असे चार जण फरार असून, पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांनंतर नाशिक शांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी शांतता प्रस्थापित झाली. सायंकाळी उशिरा वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटल्याने सर्वसामान्यांची धावपळ उडाली होती. विशेषतः तळेगाव (अंजनेरी), पैगलवाडी, तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये काही ठिकाणी हाणामारी झाल्याची माहिती समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. संध्याकाळी नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक मात्र बंद झाली.

तळेगाव (अंजनेरी) येथे एका पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी विजयादशमी असल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करून समाजकंटकांना रोखण्याची तयारी केली. संध्याकाळपर्यंत किरकोळ घटना वगळता शांतता होती. मात्र, यानंतर वेगवेगळ्या अफवा पुन्हा सुरू झाल्या.

दोन समाजांतील तरुणांमध्ये तळेगाव, त्र्यंबकेश्वरमध्ये दगडफेक, तसेच हाणामारी झाल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, मंगळवारी शहरात काही ठिकाणी मोटारसायकल रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली. यातील उत्साही तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्याच्या तक्रारी समोर आल्या. संध्याकाळी पाथर्डी फाटा येथे दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, हा वाद तेथेच मिटला.

मोबाइल इंटरनेट बंदच

व्हॉटसअॅपद्वारे पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा सोमवारपासून बंद केली आहे. आज, दसऱ्याच्या दिवशीही मोबाइलधारकांना इंटरनेट सेवेपासून वंचित राहावे लागले. इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी परिस्थितीचा विचार केला जाईल. मंगळवारी रात्रीपर्यंत अफवांचे पीक कमी झाल्याची खात्री पटल्यास बुधवारपासून इंटरनेट सेवा सुरू केली जाईल; अन्यथा त्यात वाढ केली जाईल, असे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’मध्ये काँग्रेस अडचणीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसची डोकेदुखी वाढव‌िली आहे. पदवीधरसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विभागवार बैठका घेणे सुरू केले आहे. पक्षाच्या आदेशानुसारच आपण निवडणूक लढव‌ित असून, प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी सुरू केल्याचे त्यांनी सांग‌ितले आहे. कोते पाटील यांच्या एंट्रीने काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबेच्या अडचणी वाढल्या आहेत. कोते पाटील हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्यासाठी ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.

मतदार याद्यांच्या गोंधळामुळे पदवीधरच्या निवडणूक काहीकाळ लांबणीवर पडत असल्या तरी, या निवडणुकांमधील रंगत वाढत चालली आहे. सत्ताधारी भाजपने नाशिकच्या सीटसाठी आपली सर्व ताकद एकवटत उमदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्यामागे पक्ष उभा केला आहे. पाटील यांच्या विजयाची जबाबदारी थेट मंत्र्यांवरच टाकण्यात आली आहे. तर काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. माकपच्या वतीने राजू देसले तर संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सचिन चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे चौरंगी लढत होईल, असे चित्र आजपर्यंत होते. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही एंट्री घेतल्यामुळे रंगत वाढणार आहे.

विधानपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेसने विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीने आता वेगळी चूल मांडली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम कोते पाटील यांना मैदानात उतरविले आहेत. कोते पाटील हे अजित पवार यांचे विश्वासू असून त्यांच्या एंट्रीने डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढणार आहेत. कोते पाटील यांच्यासाठी पाचही जिल्ह्यात पक्षाने मतदार नोंदणीची कार्यक्रम सुरू केला आहे. नाशिकमध्ये पाच जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली आहे.

नात्यागोत्यात पेच

काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हुणे आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोते पाटील हे सुद्धा थोरातांचे भाचे आहेत. त्यामुळे थोरातांपुढेच या निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. या भाऊबंदकीतून मार्ग काढण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरूनच प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस एकमेकांविरोधात लढल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

पक्षाने पदवीधरची निवडणूक लढण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय पातळीवर काम सुरू केले असून, पाच जिल्ह्यांमध्ये यंत्रणा कार्यरत केली आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत होईल.

- संग्राम कोते-पाटील,

प्रदेशाध्यक्ष, रायुकाँ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वकिली व्यवसायावर प्रेम करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

माझ्या न्यायपालिकेतील न्यायदानाच्या कार्यातून मी समाजाभिमुख न्याय दिला आहे. प्रत्येक न्यायाधीशाच्या यशात काम करणाऱ्या वकिलांचा युक्तिवादाचा अनमोल वाटा असतो. स्पर्धेच्या युगात अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञान आवश्यक आहे त्यासाठी नवोदित वकिलांनी इंग्रजी भाषेला वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे वकिली हा व्यवसाय करताना या व्यवसायावर प्रेम करा, असे प्रतिपादन इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी केले.

निफाड येथील कर्मविर गणपत दादा मोरे महाविद्यालयात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि निफाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळा आणि उत्तर महाराष्ट्र वकील परिषदेच्या निमित्ताने ते बोलत होते. व्यासपीठावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले, अरुंधती भोसले, नाशिकचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरूण ढवळे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीस निफाड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. जी. एन. शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून निफाड वकील संघाची परंपरा व कार्यक्षेत्राची माहिती दिली. अॅड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विषद केली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरूण ढवळे यांनी महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाजातील इमारतींचा प्रश्न व त्यावरील उपाययोजना याबाबत विचार व्यक्त केले. परिषदेस जिल्यासह उत्तर महाराष्ट्रातील न्यायाधीश, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक दहशतीखाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील अंजनेरी शिवारात मंगळवारी सायंकाळी झालेल्या दंगलीतील २५ संशय‌ित आरोपींना त्र्यंबक पोल‌िसांनी न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोल‌िस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी शिवारात मंगळवारी सायंकाळी झालेल्या दगडफेक, वाहनांची जाळपोळ प्रकरणी दोन गटाच्या २५ जणांवर त्र्यंबक पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे पोल‌िस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोल‌िस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर आधारतीर्थ अनाथ आश्रमाजवळ अंजनेरी शिवारात त्र्यंबकच्या दिशेने मोटारसायकलस्वार येत असताना दोन गटांमध्ये हाणामारी झाली. मोटासायकली आणि अन्य वाहनांची मोडतोड करून जाळपोळ करण्यात आली. यात आठ व्यक्ती आणि चार पोल‌िस अधिकारी जखमी झाले आहेत. या दंगलीत दहा ते बारा मोटारसायकली जाळण्यात आल्या आहेत.

यामध्ये ताब्यात घेतलेल्या दोन्ही गटांच्या २५ जणांमध्ये नाशिक, अंजनेरी, रोहीले, वाढोली या गावातील व्यक्तींचा समावेश आहे. या घटनेनंतर नाशिक-त्र्यंबक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर त्र्यंबक शहरात दहशत पसरली आहे. घटनेनंतर जिल्हा पोल‌िस अधीक्षक अंकुश शिंदे, अप्पर पोल‌िस अधीक्षक प्रशांत मोहिते, उपविभागीय पोल‌िस अधीक्षक शामराव वळवी आदींनी भेट दिली.

त्र्यंबकमध्ये अफवांचे पेव

त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, मंगळवारी सायंकाळी अंजनेरी जवळ मोटारसायकल, कार जाळण्यात आल्या. तसेच बसवरही दगडफेक झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी दसरा असूनही सणाच्या आनंदापेक्षा वातावरणात तणावच जास्त जाणवत होता. सोशल मीड‌िया बंद असूनही अफवांचे पेव चांगलेच पसरले आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी नाशिक-त्र्यंबक मार्गावर आलेल्या एसटी बसवर दगडफेक झाल्याने प्रवाशी हादरले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात विविध अफवा पसरल्याने बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. दुकाने बंद झाल्याने रस्त्यावर अंधार पसरला होता. दरवर्षी दसऱ्याला ग्रामस्थ सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेर पडतात. मात्र यंदा सर्वांनी घरात राहणेच पसंत केले. सीमोल्लंघनासाठी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवाडे फाटा तुपादेवी येथे जातात. मात्र नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या याच ठिकाणी जमाव जमल्याच्या चर्चा पसरल्याने ग्रामस्थांचे सीमोल्लंघन झालेच नाही.

मंगळवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर त्र्यंबक शहरात दहशत पसरली होती. दोन तासांपेक्षा अधिक काळ थरार अनुभवल्यानंतर सार्वजन‌िक ध्वनीक्षेपकावरून ‘घाबरू नका’ असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

$
0
0

भाजप, सेनेला संधी; राष्ट्रवादी, काँग्रेसला अडचण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या पाच महिन्यावर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भाग ऐन सणासुदीतच ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गट व १५ पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत नव्या दमाचे उमेदवार मात्र खुश असून अनपेक्षित नावे निवडणुकीत समोर येणार आहे. राष्ट्रवादीस प्रबळ नेतृत्व नसल्याने अडचण असून भाजप, सेनेला यामुळे संधी चालून आली आहे.

राज्यात सत्ता असल्यामुळे गेल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून २७ जागा पदरात पाडणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळेस निवडणुका अवघड आहेत. माजी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे नेते छगन भुजबळ हे अटकेत असल्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादीकडे प्रबळ नेतृत्व नाही. त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर आता राष्ट्रवादीची मदार आहे. राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेने गेल्या निवडणुकीत १७ जागा पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. पण आता त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता असल्यामुळे शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची आशा आहे. काँग्रेसला राष्ट्रवादी व शिवसेनेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांचे स्थान तिसऱ्या क्रमांकाचे होते. काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीत १४ उमेदवार निवडून आले होते. आता त्यात मोठी वाढ होण्याची त्यांना आशा आहे.

भाजपकडून जोरदार फिल्डिंग

या तिन्ही पक्षाव्यतिरिक्त सर्वात खराब स्थिती ही गेल्या वेळेस भाजपची होती. त्यांना एकूण ७४ जागांपैकी फक्त ४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपला सिन्नर, देवळा-चांदवड तालुक्यात चांगली संधी आहे. त्यात इतर जागेवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे भाजपने व्यूहरचना आखत ग्रामीण भागातून यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीत माकप, मनसे व अपक्ष प्रत्येकी ३ अशी स्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कावडधारकांची संख्या घटली

$
0
0

त्र्यंबकला बाजारपेठेत शुकशुकाट; ग्रामस्थ भयभीत

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहर आणि परिसरातील अशांत परिस्थितीने सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जाणाऱ्या कावड धारकांची संख्या कमी झाली आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेस त्र्यंबकेश्वर येथून कुशावर्ताचे जल घेऊन कावड धारक भक्त हे सप्तशृंगी देवीस जातात. यासाठी बाजारातही वस्तूंची खरेदी होत असते. मात्र यावेळेस कावड धारकांची संख्या कमी असल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे.

विजयादशमी म्हणजेच दसरा होताच दुसऱ्या दिवसापासून त्र्यंबकेश्वर ते वणी रस्त्यावर कावड धारकांची रांग लागते. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक रहिवासी शेकडो वर्षांपासून ही परंपरा जोपासत आहेत. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातून तसेच बाहेरूनही भाविक येथे येतात. त्यांचीही संख्या हजारात असते. मात्र यावेळेस तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेने कावड धारकांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.

बाजारपेठेतही नारळ, टी-शर्ट, सजावटीचे साहित्य विक्री करणारी दुकाने कुशावर्त परिसरात थाटली जातात. मात्र त्यांनाही थंड प्रतिसाद मिळत आहे. अगदी तुरळक प्रमाणात कावडधारक दिसत आहेत. यामागे बंद असलेली बस वाहतूकही कारणीभूत आहे. त्यामुळे बाहेरगावचे कावड धारक कमी झाले आहेत.

ग्रामस्थ दसरा सणास त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी जात असताना मंदिरच बंद करण्यात आले. यावेळी बाहेरगावचे भाविक अक्षरश: हवालदिल झाले. मिळेल त्या रस्त्याने वाहने घेऊन परत जाऊ लागले. परंतु दुसरीकडे नाशिक-त्र्यंबक रस्ता बंद असल्याने तेथेही त्यांना प्रवेश नव्हता. दोन तास असाच खेळ झाल्यानंतर नगरसेवक धनंजय तुंगार यांनी पुढकार घेऊन ध्वनिक्षेपकाद्वारे काही झाले नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गटांमध्ये तणाव; भगूर परिसरात बंद

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथे मित्र मंडळाच्या वतीने लावण्यात आलेला फलक फाडून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भगूर येथे झाला. सकाळपासूनच भगूर बंदची हाक देण्यात आली. त्यास स्थानिकांनी प्रतिसाद दिल्याने प‌रिसरात बुधवारी दिवसभर बंद पाळण्यात आला.

भगूर येथील स्वा. सावरकर चौकात लावण्यात आलेला शुभेच्छाफलक पहाटेच्या सुमारास फाडल्याची घटना सकाळीस उघडकीस आल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरत रोष व्यक्त केला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर निकामी तयार जाळण्यात आले. सकाळपासूनच भगूरसह बसस्थानक परिसर बंद ठेवण्यात आला. फलक फाडल्याप्रकरणी आरोपीस अटक करावी, या मागणीसह नागरिक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. सुरुवातीला बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. रस्त्यावर उतरलेल्या युवकांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन करण्यात आले. रस्त्यावरील दगड आणि पेटते टायर व बाजुला करीत पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून दिली. गावच्या शिवाजी चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. परिसरात सकाळपासूनच तणाव असल्याने सर्वच दुकाने बंद होती. यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनिक कामकाजावर परिणाम जाणवला. दरम्यान, फलक फाडल्याप्रकरणी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्होळी, महिरावणीसह ८ गावांत संचारबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात आणि नाशिक तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने आठ गावांमध्ये ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. जिल्हा परिषदेचे रस्ते तसेच या गावांलगतच्या महामार्गाला त्यामधून वगळण्यात आल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरासह लगतची काही गावे, त्र्यंबकेश्वर आणि इगतपूरी तालुक्यात तणावपूर्ण परिस्थिती असून, तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरात राणेनगर, सातपूर, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट, लेखानगर, मुंबई नाक्यासह त्र्यंबकेश्वरपर्यंतच्या अनेक गावांमध्ये मध्यरात्रीपर्यंत हाणामारीचे प्रकार सुरू होते. मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाट्यापासून घोटीपर्यंत अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती होतो. काही समाजकंटकांकडून या वादाला आता जातीय रंग दिला गेला असून, त्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच शहरासह ग्रामीण भागातही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, गस्तही वाढविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, परिसरात सलोख्याचे वातावरण ठेऊन सहकार्य करा असे आवाहन जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाने केले आहे.

अतिरिक्त बंदोबस्त दाखल
नाशिकमध्ये तणावाचे वातावरण असल्याने परिस्थिती चिघळून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली असून धुळे, अहमदनगर, औरंगाबाद आणि पुणे येथील पोलिसांच्या तुकड्या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. नाशिककर भयभीत झाल्याने या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढून शहरवासियांच्या सुरक्षेसाठी आम्ही कट‌िबध्द असल्याची ग्वाही दिली.

इंटरनेट सेवा शुक्रवारपर्यंत बंद
नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट मोबाइलद्वारे व्हायरल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. मोबाइल कंपन्यांकडून पुरविण्यात येत असलेली इंटरनेट सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. ती शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्यानंतर परिस्थितीनुरूप ती केव्हा सुरू करावी याचा निर्णय घेतला जाणार आहे. याखेरीज केबल प्रक्षेपणही बंद करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान अजूनही बससेवा पुर्णत: सुरू झाली नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

दगडफेक करणाऱ्या तिघे ताब्यात
लेखानगर भागातील एका नगरसेवकाच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या वाहनाचे नुकसान करणाऱ्या एका संशयितासह दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोर्टाने त्या संशयिताला १४ ऑक्टोबरपर्यंत पोल‌िस कोठडी दिली, तर दोन अल्पवयीन संशयितांची बालनिरीक्षणगृहात रवानगी केली. मंगळवारी सायंकाळी १५ ते २० जणांच्या टोळक्याने लेखानगरमधील एका नगरसेवकाच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ केल्याची घटना घडली. तसेच त्यांच्या घरासमोरील इनोव्हा कारच्या काचा फोडून नुकसान केले. यानंतर मोटरसायकल सोडून गेलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोर्टात हजर केले.


कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे आवाहन

तळेगाव-अंजनेरी येथील पीडित बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना आवर घालावा अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला.
या पार्श्वभूमीवर बुधवारी पोल‌िस आयुक्तालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत राजकीय पदाधिकाऱ्यांसह शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. तसेच पोल‌िस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी केले. बालिकेवरील बलात्काराच्या प्रकरणानंतर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अशांतता आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. हा तणाव निवळावा यासाठी पोल‌िस आयुक्तालयामध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोल‌िस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, ग्रामीणचे पोल‌िस अधीक्षक अंकुश शिंदे, उपायुक्त विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, जयवंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नगरसेवक अजय बोरस्ते, शिवाजी चुंभळे, शशिकांत जाधव, उद्धव निमसे, दिनकर पाटील, विलास शिंदे, दत्ता गायकवाड, शैलेश कुटे, नाना महाले, राहुल ढिकले, अनिल ढिकले, गोकुळ पिंगळे, प्रकाश मते, संदीप गुळवे, अर्जुन टिळे, शिवाजी सहाणे, लक्ष्मण जायभावे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याखेरीज माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक संजय साबळे, अण्णासाहेब कट्यारे आदींसह रिपाइं, भारिपचे पदाधिकारी उपस्थित होते.
तणावाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. आपल्या कार्यकर्त्यांना आवर घाला असे आवाहन पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना केले. ज्यांच्यावर पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यांना तत्काळ पोलिसांत हजर करण्याचे आवाहन केले. तसेच, तणावाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला. सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>