Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तळेगाव घटनेबाबत लवकरच अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव अंजनेरी येथील घटनास्थळासह त्यानंतर पडसाद उमटलेल्या गावांना आयोगाने भेट दिली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, दंगल बाधितांचे गाऱ्हाणेही आयोगाने ऐकले आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या एकूणच प्रकाराबाबत आयोग गंभीर असून, लवकरच सविस्तर अहवाल सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाने सोमवारी नाशिकमध्ये दिली.

तळेगाव अंजनेरी येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. निवृत्त पोलिस अधिकारी विजय कांबळे, माजी सचिव आर. डी. शिंदे आणि माजी न्यायमूर्ती सी. एल. थुल यांचा या आयोगामध्ये समावेश होता. मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सांजेगाव आणि नांदूरवैद्य गावात त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, प्रांताधिकारी राहुल पाटील तसेच समाज कल्याण अधिकारी प्राची वाजे होत्या. दंगलसदृश परिस्थितीमुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडून घटनाक्रम समजाऊन घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. तळेगाव अंजनेरी या गावालाही आयोगाने भेट दिली. तेथील घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तेथील ग्रामस्थांशी देखील चर्चा करून आयोगाने परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर आयोगाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीडित मुलीचे कुटुंबीय, तसेच अन्य काही जखमींची विचारपूस केली. नाशिक निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपण अनेक घटकांशी या दौऱ्यादरम्यान चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दलित-मराठा ऐक्य परिषद कोल्हापुरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिर्डीमधील स्थगित करण्यात आलेली दलित- मराठा ऐक्य परिषद आता ११ नोव्हेंबरला कोल्हापुरात होणार आहे. या परिषदेचे स्थळ बदलण्यात आले असून, ती आता शिर्डीऐवजी कोल्हापूरमध्ये होणार असल्याची माह‌िती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. कोपर्डीची घटना व त्यापाठोपाठ नाशिकमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे.

दलित व मराठा समाजामध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये १९ ऑक्टोबरला दलित-मराठा ऐक्य परिषद आयोजित केली होती.परंतु तळेगाव प्रकरणामुळे पुन्हा तणाव निर्माण झाल्याने ही ऐक्य परिषद स्थगित करण्यात आली होती.दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवलेंनी ही परिषद स्थगित केल्याची घोषणा केली होती. कोपर्डी व तळेगावच्या घटनांमुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण झाली होता. त्यामुळे या परिषदेचे ठिकाणच बदलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

११ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेला कोल्हापूरमधील स्थानिक प्रतिनिधींसह राज्यभरातील दलित व मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.दोन समाजात निर्माण झालेली तेढ कमी करून जातीय सलोखा कायम राहण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देश में शांती बनी रहे, यही मकसद…

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

‘भैय्या देश मे क्या हो रहा है मुझे मालूम नही, बस्स देश मे शांती बनी रहे यही मेरा मकसद है.’ डोक्याला बांधलेले लाल कफन, अंगतील टी शर्ट, गळ्यात काही मजकूर लिहिलेली पाटी आणि हातात देशाचा तिरंगा ध्वज घेऊन एक अवलिया सध्या भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या रामेश्वरमकडे पायी निघालाय. हा अवलिया तरुण महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या हातातील तिरंगा पाहून कुणीही त्याची आपसूकच विचारपूस करीत आहे.

बाबा राहुल गौड पिवारी असे त्या अवलीया तरुणाचे नाव आहे. राहुल मूळचा उत्तर प्रदेशातील बदायू येथील रहिवासी. मात्र सध्या तो एका अनोख्या पायी यात्रेच्या प्रवासाला निघाला आहे. हरिद्वार ते रामेश्वर अशा शांती पदयात्रेला निघलेला राहुल नुकताच येथील महामार्गावरून मार्गस्थ झाला. त्यावेळी त्याच्या हातातील अत्यंत भव्य असा तिरंगा त्याच्या बद्दलची प्रवाशांची उत्सुकता वाढणारा असल्याने तो अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. १५ ऑगस्टपासून त्याने आपली पदयात्रा सुरू केली आहे.

भगवान शंकराचा भक्त असलेला राहुल सच्चा देशभक्तदेखील आहे. कारण देशात शांतता राहावी, जातीय धार्मिक सलोखा कायम राहावा याच विचारातून तो प्रेरित झाला असून, त्यासाठीच त्याने ही पदयात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील साई बाबांचे दर्शन घेण्याची त्याची इच्छा असल्याने तो शिर्डी येथेही जाणार आहे.

हजारो किमीचे हे अंतर पायी चालण्याचे आव्हान त्याने स्वीकारले असून, गेल्या तीन महिन्यात मजल दरमजल करीत तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. वाटते मुक्काम कुठे करायचं? राहायचे कुठे? खायचे काय? हे प्रश्न त्याचा मनात नाहीत कारण तो म्हणतो ‘पुरा देश मेरा है’ रस्त्यात लागणारे धार्मिक ठिकाणे, ढाबे असे कुठेही तो आपले भूक भागावतो आणि चालत राहतो. हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि चालताना फार बोलू नये म्हणून त्याने गळ्यात अडकवलेली पाटी आणि त्यावरील ते वाक्य ‘देश की शांती हेतु पद यात्रा’ हेच सारे काही सांगून जाते. एरवी कुठल्याही धार्मिक पदयात्रेत डिजेच्या तलवार झिंगाट नाचणारी तरुणाई हल्ली सहज रस्त्यावर दिसते. मात्र देशात शांती सलोखा राहावा म्हणून ऊन, वारा, पावसाची तमा न करता पायी निघालेला हा अवलिया वेगळाच म्हणावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अवतरले चहाचे मळे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चहाचे मळे आसाममध्ये आहेत हे आपण टीव्ही आणि पुस्तकात पाहतो. मात्र, नाशिकरोडलाही चहाचे मळे अवतरल्याचे आणि महिला मजूर चहाची पाने तोडून पाठीवरील टोपलीत टाकत असल्याचे सुंदर चित्र दिसत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर नासर्डी पुलालगत वाहतूक बेट आहे. त्यामध्ये आसामचे सुंदर निसर्ग चित्र साकारण्यात आले आहे. चहाच्या मळ्यात महिला मजूर पाठीला टोपली लाऊन चहाची पाने खुडत असल्याचे सहा-सात पुतळे येथे उभारण्यात आले आहेत. एक वर्षापूर्वी या वाहतूक बेटातील झाडे जळून गेली होती. तसेच बोरी आणि बाभळी उगवल्या होत्या. महिला पुतळ्यांचे हात समाजकंटकांनी काढून बाजूला फेकून दिले होते. त्यामुळे वाहतूक बेटाकडे पाहून नाशिक शहराची चुकीची प्रतिमा बाहेरगावच्या प्रवाशांच्या मनात उभी राहत होती. बेट साकारणाऱ्या खासगी प्रायोजकाने बेटाची पुन्हा स्वच्छता करून झाडे वाढवली आहेत. पुतळ्यांचे हात पुन्हा जोडण्यात आले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या बेटाची शोभा वाढली आहे. या बेटावर महिला मजूर चहाची पाने खुडून टोपलीत टाकत असल्याचा भास येणाऱ्या जाणाऱ्याला होत आहे. नाशिकमध्ये कामानिमित्त येणारे बाहेरगावचे लोकदेखील समाधान व्यक्त करत आहेत.

अन्य बेटांची दुरवस्था

नाशिकरोडच्या वाहतूक बेटांची दुरवस्था झाली आहे. व्दारकाच्या बेटामध्ये भिकारी झोपलेले असतात. तेथे मुंबई नाक्याप्रमाणे झाडे लावलेली नाहीत. या महत्त्वाच्या चौकातील वाहतूक बेटालाच अवकळा आली आहे. विजय-ममता चौकातील वाहतूक बेटावर काटेरी झाडे-झुडपे उगवली आहेत. उपनगर नाक्यावरील बेटाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. दत्तमंदिर चौकातील बेट कचराकुंडी झाले आहे. तेथेही कांग्रेस गवत व काटेरी झाडे-झुडपे उगवली आहेत. बिटको चौकात दोन वाहतूक बेट साकारली जात आहे. मात्र, त्यांच्या पूर्णत्वाला मुहूर्त लागत नाही. सिन्नरफाटा येथील बेटाचीही रंगरंगोटीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवा फडकव‌िण्याचा केला निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नगरपालिका, पंचायत समिती अन् जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर व तालुक्यात आता राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी जय्यत तयारीच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या बैठकांना सुरुवात झाल्याचे दिसत असून, याच अनुषंगाने रविवारी दुपारी शिवसेना पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची एक बैठक शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. आगामी निवडणुकीत एकजुटीने सामोरे जाताना भगवा फडकवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत आगामी येवला नगरपालिका, पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या गटातील निवडणुकीत एक दिलाने काम करून भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. पक्षात कुठलेच अंतर्गत मतभेद नसून, या निवडणुका एकहाती जिंकू अशी ग्वाही यावेळी नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. नगरपालिका निवडणुकीत भाजपाशी युती झाली तर ठिकच, अन्यथा सर्वच्या सर्व २४ जागांवर सेनेच्या वतीने सक्षम उमेदवार दिले जाणार असल्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. संघटनात्मक पातळीवर एकजुट असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी सांगितले.

पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना केल्या. येवला नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपाठोपाठ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लगेचच येत असल्याने वेळ फार कमी असणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागून जास्तीत जास्त काम करायचे आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धीकडे लक्ष ठेवा. येत्या काळात गाफील न राहता जोमाने कामाला लागा, असेही पवार यावेळी म्हणाले. जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भास्कर कोंढरे, राहुल लोणारी, सर्जेराव सावंत आदींनी विचार मांडले.

बैठकीस तालुका उपप्रमुख छगन आहेर, पंचायत समिती सदस्य रतन बोरनारे, बाबासाहेब डमाळे, नगरसेवक सागर लोणारी, ‘येमको’ बँकेचे संचालक अरुण काळे, रुपेश लोणारी, रावसाहेब नागरे, दीपक भदाणे, धीरज परदेशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत दुचाकी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुतोंड्या मारुतीसमोरील अहिल्याराम व्यायामशाळेसमोरील पार्किंग शेडमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक युवकांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पेटवलेल्या दुचाकीजवळ काही चारचाकी व दुचाकी वाहने होती. यातील एका टेम्पोचेही नुकसान झाले असून, पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

रामकुंड परिसराला लागून असलेल्या अहिल्याराम व्यायमशाळेसमोर वाहनांच्या पार्किंगसाठी शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये लकी कोटेकर यांनी आपली दुचाकी रविवारी रात्री पार्क केली. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास समाजकंटकांनी पेट्रोल टाकून दुचाकी पेटवली. यानंतर, समाजकंटकांनी एका टेम्पोसह तीन ते चार दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुचाकीची आग विझवली. मात्र, तोपर्यंत टेम्पोचे हुड पेटून नुकसान झाले होते. या ठिकाणी दोन चारचाकीदेखील पार्क होत्या. त्यातील एका कारचे कव्हर पेटले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेबाबत बोलताना गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी सांगितले की, रामकुंड परिसरात तीर्थस्थळ म्हणून देशविदेशातील पर्यटक येतात. दुर्दैवाने समाजकंटक या ठिकाणी मद्य पिणे, उनाडकी करणे यासाठी येऊन धिंगाणा घालतात. पोलिसांनी येथे गस्त वाढवणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धम्ममूल्यांचे आचरणच राष्ट्रहित साधेल’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगीकरण, उदारीकरण, व्यापारीकरण, बाजारीकरण, भांडवलशाही अर्थव्यवस्थेने मानवाच्या जगण्याचे प्रश्न अधिक जटील बनले आहेत. ‘मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच’ हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश ध्यानी धरून सर्व धर्म, पंथ, प्रांत सन्मान ही राष्ट्राची बलस्थाने असल्याचा सूर ‘धर्मांतराची ८१ वर्ष व आजची धम्म चळवळ’ या विषयावरील परिसंवादात निघाला.

८१ व्या धर्मांतर घोषणा दिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकतर्फे खुल्या मुक्ती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्य, शांती, अहिंसा, मानवता ही धम्म व संविधानिक मूल्यांचे आचरणच राष्ट्र हित साधेल, असे मत शरद शेजवळ यांनी व्यक्त केले. या मूल्यांवर शेजवळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बुद्ध, कबीर, तुकोबा, शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचा विचार आदर्शच कृतीत आण्याची गरज व सामाजिक प्रबोधन चळवळी अधिक गतिमान करण्याची गरज यावेळी प्रा. जितेश पगारे यांनी व्यक्त केली. बुद्ध विचारच जगाला मार्ग देईल असे विचार एस. डी. जाधव यांनी व्यक्त केले. सुरेश सोनवणे, बाळासाहेब सोनावणे, महेंद्र पगारे, विनोद वाघ यांनी धम्म व संविधान मूल्यांच्या प्रचार प्रसाराचे महत्व सांगितले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अतिश वानखेडे होते. प्रास्ताविक उमेश पगारे यांनी केले. प्रताप निकम, राहुल गुंजाळ, अक्षय जगताप, अश्विन जाधव, नितीन काळे, सिद्धार्थ शेजवळ, विकास सोनवणे, चेतन साबळे, लालचंद डाके, रवी निकम या मान्यवरांनी आपले मते व्यक्त केले. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकतर्फे घेण्यात आलेल्या या खुल्या परिसंवादाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुमकीन हैं।

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गेल्या महिन्याभरापासून शहरात डॉन येणार अशी चर्चा होती. मैं हूँ डॉन, डॉन इन नाशिक असं म्हणत शहरात डॉनची दहशत पसरविण्यात आली. विशेष म्हणजे डॉन येणार असल्याचे पोस्टर पोलिस प्रशासानेच लावले असल्याने नाशिककर संभ्रमात पडले होते. कॉलेजियन्समध्ये सस्पेन्स तयार झाला होता. अखेरीस सोमवारी (१७ ऑक्टोबर) डॉन मागील गमक उलगडले. नाशिक पोलिसांनी कॉलेजियन्स व प्राध्यापकांची मिटिंग घेत डॉन म्हणजे ‘दोस्त ऑफ नाशिक’ असे जाहीर केले. डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुकीन हैं, क्योकी डॉन ट्रॅफिक रूल ब्रेक ही नहीं करता तो उसे पकडे कैसें? असे नवे पोस्टर शहरात रिलीज करण्यात आले आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालय व नाशिक फर्स्ट यांच्या वतीने नाशिक शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काँक्रीट प्लॅन बनविण्यात आला आहे. शहरातील सर्व कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व कॉलेजियन्सचे प्रतिनिधी यांच्या एकत्रित सहभागातून हा काँक्रीट प्लॅन राबविण्यास सुरुवात झाली आहे. प्लॅनची पहिली फेज म्हणून वाहतुकीचा डॉन ही संकल्पना मांडण्यात आली. प्रचंड सस्पेन्स ठेवल्यानंतर डॉन म्हणजे काय हे सोमवारी सर्वाना सांगण्यात आले. नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर अशोक मुर्तडक, आरटीओ भरत कळसकर यावेळी व्यासपीठावर होते.

वर्दीचा धाक बसवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारण्यापेक्षा मानसिक बदल घडवायला हवा हा उद्देश या काँक्रीट प्लॅनचा आहे. नाशिकचे ब्रँडिंग कन्सल्टन हेमंत बेळे यांची डॉन ही संकल्‍पना होती. याअंतर्गत डॉन म्हणजे दोस्त ऑफ नाशिक असणार असून, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम व जनजागृती हे डॉन करणार आहेत. यावेळी वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट वापरणे व वाहतुकीला स्वतःहून शिस्त लावेल, अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली.

सर्व डॉन उपस्थित

ट्रॅफिक काँक्रीट प्लॅनसाठी शहरातून निवडण्यात आलेले चोवीस नामवंत डॉननीदेखील या कार्यक्रमास उपस्थिती लावली. डॉन नावाची कन्सेप्ट नेमकी काय कार्य करणार याची उत्सुकता या सर्व डॉनला देखील लागून होती. शहरातील सर्व डॉन वाहतुकीचे नियम पाळणार असून, नाशिककरांना हे नियम पाळायला लावणार आहेत.

सर्व डॉन व्हावेत

स्मार्ट नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी आखण्यात आलेल्या काँक्रीट प्लॅनमध्ये सर्वजण डॉन (दोस्त ऑफ नाशिक) झाल्यास आवडेल. सर्व नाशिककरांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले.
वाहनांवर लागणार डॉनची स्टिकर

मैं हूँ डॉन (दोस्त ऑफ नाशिक) हे स्टिकर कॉलेजियन्सचे प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी आणि शहरातील नामवंत डॉन यांच्या वाहनांवर लागणार आहेत. या माध्यमातून वाहतुकीचे सर्व नियम पाळले जावेत, असे आवाहन व जनजागृती करण्यात येणार आहे.

कॉलेजेसमध्ये होणार कॅम्पेन

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी युथला कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी काँक्रीट प्लॅनची पुढची फेज म्हणून जनजागृती तसेच आणखी सरप्राईज सस्पेन्स कॅम्पेन शहरातील कॉलेजेसमध्ये घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडच्या राजकारणात ‘एमआयएम’ची एंट्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मनमाडच्या राजकारणात उतरण्यासाठी नवे पक्ष, संघटनादेखील उत्सुक असल्याने आता मनमाडच्या राजकारणात ओवेसी बंधूंच्या एमआयएम (मजल‌िस ए मुस्लिमिन) या पक्षाची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनमाड येथील अकबर सोनावाला यांनी नुकताच या पक्षात प्रवेश करून निवडणुकीत एमआयएम उतरणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. मनमाड शहरात या पुढील काळात या पक्षाचे नगरसेवक, आमदार तसेच पक्षप्रमुख ओवेसी बंधूदेखील येणार असल्याचे अकबर सोनावाला यांनी स्पष्ट केले. विकासासाठी व भ्रष्टाचारी सत्ताधारी आघाडीला तसेच निष्क्रिय ठरलेल्या सर्व इतर पक्षांना आम्ही लढत देऊन शहर विकास घडवून आणू. तसेच अल्पसंख्यांक बहुजन समाजाला न्याय मिळवून देऊ, असे अकबर सोनावाला यांनी म्हटले आहे. सोनावाला परिवारातील सबिहा सोनावाला या विद्यमान नगरसेविका असून, मनमाड शहरात ओवेसी बंधूंचा पक्ष येण्याची चिन्हे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.


मनमाड, नांदगावमध्ये हालचाली गत‌िमान

मनमाड : मनमाड व नांदगाव नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे वृत्त येताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मनमाड व नांदगाव शहरात निवडणूक आचारसंहिता लागली असून, निवडणुकीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक याबाबत मनमाड नांदगावमध्ये कमालीच्या औत्सुक्याचा विषय असून, थेट नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागातील नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत मनमाड शहरात थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुकांची रेलचेल असणार आहे. नगरपालिकेत मतदारांच्या प्रारूप याद्या लावण्यात आल्या असल्याने ते पाहण्यासाठी पालिकेत गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानूर घाटाला कचऱ्याची बाधा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात बांधण्यात आलेल्या घाटांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने या घाटांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मानूर गावच्या घाटाचीही अशीच परिस्थिती असून, या घाटाला कचऱ्याची बाधा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागात नियमितपणे स्वच्छता होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या घाटाकडे माणसांची ये-जा ही प्रामुख्याने अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीच्या काळातच होत असते. त्यावेळी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मानूर गावाकडून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेला मार्ग अरुंद आहे. १५ वर्षांपूर्वी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या मार्गाकडे दुर्लक्ष झाले. एकदा डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा डांबरीकरणाचा थर दिला गेला नसल्याने रस्त्यावरची खडी निघाली आहे. या रस्त्याने पायी जाणेदेखील अवघड झाले असताना याच रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. येथे कचऱ्याचे मोठे ढिगारे तयार झालेले आहेत, तसेच रस्त्यावरच शौचाला बसणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने या भागात अस्वच्छता पसरली आहे. स्मशानभूमीकडे जाणारा दुसरा मार्गही अरुंद असल्याने तो मार्गही अडचणीचाच झालेला आहे.

नांदूर आणि मानूर या दोन्ही गावांच्या घाटांमध्ये पार्किंगसाठी मोठी जागा सोडण्यात आलेली आहे. विविध धार्मिक विधींसाठी आलेल्या नागरिकांना येथे वाहने पार्क करण्याची चांगली सुविधा मिळाली आहे. मात्र, या पार्किंगच्या जवळच घाटावर कचरा आणून टाकला जातो. पंचवटीतील मुख्य रस्त्याच्या कडेलाही कचरा साचलेला असतो; तो उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, तेथे या आडवळणाच्या ठिकाणी घंटागाड्या कशा फिरकणार, असेही नागरिक म्हणू लागले आहेत.

---

पायऱ्यांवरील पाइप खिळखिळे

मानूरच्या घाटाला पुराच्या पाण्याचा तडाखा बसल्याने घाटावर बांधण्यात आलेल्या पायऱ्यांवर बसविण्यात आलेले लोखंडी पाइप खिळखिळे झाले आहेत. काही निखळून पडले होते. त्यातील काही पाइप गायब झालेले आहेत. या भागाकडे दुर्लक्ष झाल्यास उर्वरित पाइपसुद्धा गायब होऊ शकतील, अशी स्थिती येथे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटांच्या पेपर म‌िलसाठी नाशिकरोडला सर्वेक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसच्या जागेत नोटांची पेपर मिल होण्याच्या दृष्टीने केंद्राची समिती मंगळवारी दाखल झाली. पेपर मिलसाठी असलेल्या सोयी-सुविधांची आणि व्यवहार्यतेची पडताळणी समितीने केली. समिती आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे.
सर्वेक्षणावेळी महाप्रबंधक एस. पी. वर्मा, होशंगाबाद समितीचे सदस्य पी. आर. गौडा, एस. पी. एम. सी. एल.चे राकेशकुमार, प्रवीण गुप्ता, मण‌िशंकर, गंधम, महापात्रा, कमळसकर आदी उपस्थित होते. खासदार हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संदीप बिश्वास, देवीदास गोडसे, सुनील आहेर यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. ही पेपर मिल झाल्यास नाशिकचा विकास होणार असून, रोजगारवृद्धीही होणार आहे.
केंद्र सरकारचे २०२४पर्यंत ४८ हजार टन नोट पेपरच्या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. सध्या १६ हजार टन उत्पादन होते. उर्वरित ३२ हजारांपैकी १६ हजारसाठी दोन मशिनलाइन याअगोदर होशंगाबादसाठी तत्वतः मंजूर झाल्या आहेत. उर्वरित १६ हजार टन पेपर उत्पादनासाठी केंद्र सरकार जागा शोधत आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये पेपरमिल व्हावी यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. संसद आणि संबंधित मंत्रालयाला नाशिकमधील सुविधांची माहिती देऊन त्यांनी महत्व पटवून दिले. पेपर मिलसाठी भारतप्रत‌िभूती आणि चलार्थ मुद्रणालयाकडे २५० एकर जागा पडिक आहे. तसेच प्रेस कामगारांच्या नेहरुनगर वसाहतीत तीन हजार सदनिका रिकाम्या आहेत. तेथे नवीन पेपरम‌िलच्या कामगारांना राहण्याची सोय होईल. नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ असल्याने पेपरमिलचे उत्पादन झाल्यानंतर वाहतूकही स्वस्तात होणार आहे. पेपर मिलसाठी लागणारा कापूसही जवळच्या जळगावमधून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिकला पेपरमिल होणे शासनासाठीही व्यवहार्य ठरणार असल्याचे गोडसे यांनी केंद्र सरकारला पटवून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षांतराचे `मतलबी वारे`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत यश मिळवून नगरसेवकपदाची खुर्ची अन् त्यापाठोपाठ येणारी विविध पदे मिळवता यावीत यासाठी शहरात पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणारे विद्यमान लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच शिवसेनेची वाट धरल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सत्ताधारी मनसेला शहरात मोठे खिंडार पडले आहे. मंगळवारी डझनभर पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षात प्रवेश करून अनेकांना धक्का दिला.

छगन भुजबळ यांचे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते शिवाजी चुंभळे यांनी पत्नी कल्पना आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हातून त्यांनी शिवबंधन स्वीकारले. जेलरोड येथील मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील बोराडे, बालाजी सोशल फाऊन्डेशनचे गिरीश मुदलीयार आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. सिडकोत राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष खंडेराव दातीर, त्याचबरोबर माजी नगरसेवक रवींद्र देवरे यांचे बंधू भूषण देवरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसेचे विद्यमान नगरसेवक तसेच माजी सभागृह नेते शशिकांत जाधव यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याखेरीज सातपूर भागातील अपक्ष नगरसेविका लता दिनकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले मधुकर जाधव, मनसेचे कार्यकर्ते संदीप पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंचवटीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुपाली गावंड यांनीही भाजपची वाट धरली आहे.

सातपूर भाजपचा बालेकिल्ला?

सातपूर : सातपूर परिसरातील काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या गोटात हुडहुडी भरली आहे. काँग्रेस, शिवसेना व मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या या भागात आता भाजपची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे राजकिय नेत्यांकडून बोलले जात आहे.

सिडकोत शिवसेनेचे बारा नगरसेवक

सिडको: पूर्वीपासूनच सिडको म्हणजे भाजपा व शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा सेनेची युती न झाल्याने व मनसेची हवा असल्याने सिडकोत मनसेने चांगलीच घोडदौड केल्याचे दिसून आले. मात्र, आता शिवसेनेत आजी-माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षप्रवेश करीत असल्याने सिडकोत शिवसेनेची ताकद चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी भाजपाकडूनसुद्धा विविध पक्षांतील पदाधिकारी किंवा काही नगरसेवकांचा लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या भागात शिवसेनेचे बारा नगरसेवक झाले आहेत.

सेनेची वाढली ताकद

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापौर निवडणुकीत जेलरोडचे मनसेचे नगरसेवक शोभना शिंदे आणि संपत शेलार यांनी पक्षाचा आदेश झुगारुन शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. पक्षाचा व्हीप झुगारल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. ते रद्द करण्यासाठी अशोक सातभाई यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. दीड वर्ष पाठपुरावा करुन आणि आपल्या पक्षाची बाजू समर्थपणे सातभाई यांनी मांडली. त्यामुळे शिंदे आणि शेलार यांचे नगरसेवकपद रद्द होऊन नुकतीच पोटनिवडणूक झाली होती. आता स्वतः सातभाईच शिवसेनेत दाखल झाले. हा विचित्र योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे.

पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांचे आव्हान मोडून काढले. भाजपच्या मंदाताई ढिकले आणि सुनंदा मोरे यांनी विजय मिळवला. त्यातच अपक्ष नगरसेवक पवन पवार आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिनकर आढाव, विद्यमान नगरसेवक संगीता गायकवाड, कन्हैय्या साळवे, कोमल मेहरोलिया तसेच प्रताप मेहरोलिया, हेमंत गायकवाड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जेलरोडला सविता दलवानी, संभाजी मोरुस्कर हे देखील भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचे खच्चीकरण झाले होते. अशोक सातभाई आणि सुनील बोराडे यांच्या सेना प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून भाजपला तुल्यबळ प्रतिस्पर्धी तयार झाला आहे.

मनसे धोक्यात

नाशिकरोडला मनसेचे सहा नगरसेवक गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडून आले होते. शोभना शिंदे, संपत शेलार, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, अशोक सातभाई, हेमंत गोडसे यांचा त्यात समावेश होता. हेमंत गोडसे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेतर्फे लढून खासदारकी मिळवली आहे. अन्य नगरसेवक विविध पक्षात गेले. त्यामुळे आता नाशिकरोडला मनसेचा एकही नगरसेवक नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडण दोघींचे अन् मारहाण पोलिसाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वात्सल्य महिला सुधारगृहातील दोन महिलांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला त्याच दोघींनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संबंधित महिलांविरोधात कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंपा शेख व रिना शेख अशी संशयित महिलांची नावे आहेत. अशोकस्तंभ परिसरात वात्सल्य महिला सुधारगृह आहे. या ठिकाणी अनाथ, गरजू महिला मुलींसह देहविक्री व्यवसायातून पोलिसांनी सोडवलेल्या मुलींना आसरा दिला जातो. मुख्यालयातील पोलिस शिपाई भाग्यश्री मधुकर भाटेवाल या वात्सल्य वसतिगृहात नेमणुकीस आहेत. सोमवारी सकाळी चंपा व रिना या दोघी संशयितांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद सुरू होता. यावेळी महिला पोलिस भाटेवाल यांनी दोघींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींनी भाटेवाल यांच्याशी वाद सुरू केला. वाद वाढल्यानंतर दोघींपैकी एकीने पकडून ठेवले, तर दुसरीने बेदम मारहाण केल्याचे भाटेवाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अंजनेरी येथे घडलेल्या अत्याचार घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात झालेली जाळपोळ व हिंसाचाराच्या घटनेच्या, तसेच देवळा येथे झालेल्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ मनमाड शहरात पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय मनमाड बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, व्यापारी संघ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुतळा विटंबना व हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातून मूकमोर्चा काढला. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आंदोलन झाल्याने कोणताही तणाव निर्माण झाला नाही, ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर मनमाड शहरातील प्रमुख राजकीय पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी संघाने बंदला पाठिंबा देत हे आंदोलन सर्वसमावेशक केले. मंगळवारी सकाळपासूनच शहराच्या प्रमुख बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवरील दुकाने बंद होती. रिक्षा संघटनेने या बंदला पाठिंबा जाहीर केला होता. बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. शाळांच्या परीक्षांवर बंदमुळे कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.

शांततापूर्ण मोर्चा

मनमाड शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, दलित संघटना यांनी शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. सिद्धार्थ कॉलनी येथून निघालेल्या मूकमोर्चात नगराध्यक्ष प्रवीण नाईक, माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे राजाभाऊ पगारे, रिपाइं ग्रामीण जिल्हाप्रमुख राजाभाऊ आहिरे, साईनाथ गिडगे, गणेश धात्रक, अॅड. सुधाकर मोरे, योगेश पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शिवसेना गटनेते संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, रिपाइं पदाधिकारी गंगाभाऊ त्रिभूवन, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, काँग्रेसचे अशोक व्यवहारे, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम मूलनिवासी मंचचे फिरोज शेख, प्रकाश बोधक, व्यापारी महासंघाचे राजाभाऊ पारीक, सुरेश लोढा, अरुण सोनवणे, किशोर नावरकर आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार देवगुणे यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामपूर जिल्हा परिषद शाळेला लावले कुलूप

$
0
0

वादग्रस्त शिक्षकाच्या नियुक्तीवरून संताप

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

निलंबनानंतर शिक्षक पंडित कापडणीस यांना पुन्हा सेवेत घेऊन नामपूर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत नियुक्ती केल्याबद्दल संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेला कुलूप लावले. जोपर्यंत या शिक्षकाची नियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

संबंधित शिक्षक अंबासन येथील शाळेवर असतानादेखील तेथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मारझोड करणे, शिक्षकांसोबत गैरवर्तणूक करणे, पालकांना न जुमानने अशा अनेक कारणांवरून सीईओकडे तक्रार केली होती. त्यावर या शिक्षकाची नामपूर येथील इंदिरानगर शाळेत बदली करण्यात आली. तेथेदेखील हा शिक्षक वादग्रस्त ठरल्याने येथील शाळेला कुलूप लावण्यात आले होते. या सर्व तक्रारींची दखल घेत संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीने ठराव करून संबंधित शिक्षक हा नामपूर परिसरातील कोणत्याही शाळेवर देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी या वादग्रस्त शिक्षकाची पुन्हा नामपूर येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेवर नियुक्ती करण्यात आल्याने संतप्त पालक, ग्रामस्थ, सरपंच व सदस्यांनी शाळेला कुलूप लावले. जोपर्यंत या शिक्षकाची नियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी सरपंच सोनाली निकम, उपसरपंच मंगल सावंत, जि. प. सदस्या सुनीता पाटील ग्रामपंचायत सदस्य व पालक उपस्थित होते.

शाळा भरतेय वर्गाबाहेर

शाळेला कुलूप ठोकल्याने सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात बसावे लागले. उन्हामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, सीईओंनी याची त्वरित दखल घेऊन यातून योग्य मार्ग काढावा, अशी मागणी केली जात आहे.

सदर शिक्षक हा वादग्रस्त असून, याबाबत सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात सीईओ मिलिंद शंभरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. येत्या दोन दिवसात या शिक्षकावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- डी. एम. बहिरम,

गटविकास अधिकारी

पंडित कापडणीस या शिक्षकाच्या गैरवर्तुणुकीबाबत नामपूर येथील शाळेत नियुक्ती होऊ नये, यासाठी नामपूर ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे काही महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला होता. तरीदेखील सदर शिक्षकाची नामपूर मराठी शाळेवर गरज नसताना नियुक्ती झालीच कशी.

- सोनाली निकम, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खत प्रकल्प लवकरच कार्यान्वित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचा खत प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून, तो व्यवस्थित सुरू व्हावा यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीच्या वतीने मंगळवारी महापालिकेत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा सुरू राहणार असून, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प बंद झाल्याने शहरातील बांधकामाच्या पूर्णत्वाचे दाखले देण्यास पुण्याच्या हरित लवादाने मनाई केली होती. त्यामुळे नवीन फ्लॅट ताब्यात घेणाऱ्यांना असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रकल्पातून सध्या एक टन कचऱ्यातून चार टक्के खत तयार होते. कंपनीने याच प्रकल्पातून १२ टक्के खत तयार होईल, असा दावा केला आहे. अटी-शर्तींनुसार निविदाधारकाने सध्या खत प्रकल्प येथील मशिनरी, वाहने व इमारती इत्यादी आवश्यक दुरुस्ती कामे करून प्रकल्प कार्यान्वित करणे व येणाऱ्या कचऱ्यावर नियमानुसार प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावण्याचे काम करायचे आहे. भविष्यात वाढत जाणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणानुसार येणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती नवीन मशिनरी, वाहने व आवश्यक यंत्रणा वेळोवेळी उभी करण्याचे कंपनीला सांगण्यात आले आहे. तीस वर्षांच्या कालावधीत जुनी-नवीन मशिनरी, इमारती इत्यादी बाबींची देखभाल दुरुस्ती करून येणाऱ्या कचऱ्यावर नियमानुसार प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

वेळोवेळी शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादींनी ठरवून दिल्यानुसार विविध मंजुरी, परवानगी घेणे इत्यादीसाठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करणे, कचरा प्रक्रियेनंतर तयार होणारे विविध उत्पादनांची विक्री करणे व त्यासाठी योग्यती यंत्रणा उभी करणे ही जबाबदारी निविदाधारकाची राहील. प्लॅन्ट चालविण्याचा खर्च, भविष्यात लागणाऱ्या मशिनरीसाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतनानुसार येणारा खर्च, विज बिले व इतर बाबींसाठी लागणारा सर्व प्रकारचा खर्च निविदाधारकाने करावयाचा आहे. तसेच तयार होणाऱ्या विविध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे मक्तेदाराचे राहील.

मनपाचे राहणार नियंत्रण

या प्रकल्पावर मनपाचे नियंत्रण व देखरेख असणार आहे. खत प्रकल्पात येणाऱ्या कचऱ्याचे वजन योग्य पध्दतीने नोंदविण्यासाठी नाशिक मनपामार्फत अॅटोमेटेड वजनकाटा बसविण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच खत प्रकल्प येथिल दैनंदिन कामकाजावर योग्य पध्दतीने नियंत्रण ठेवण्याचे दृष्टिने विद्युत विभागामार्फत आवारात सीसीटीव्ही. कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस सबसिडी नकोय; नाकारा स्वस्त धान्यही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असतानाही सरकारकडून सवलतीच्य दरात अन्नधान्य मिळविणाऱ्या रेशनकार्डधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा विभागाने दिला आहे. असे अन्नधान्य स्वेच्छेने नाकारा, असा विनंतीचा सूर आळवतानाच थेट कारवाईचीच तंबी दिली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रेशन दुकानांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळविण्यासाठी उत्पन्न मर्यादाही विहीत करण्यात आली आहे. एक लाखापेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांकडे शुभ्र शिधापित्रका असणे व त्यांनी सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ न घेणे पुरवठा विभागाला अभिप्रेत आहे. मात्र, अजुनही अनेक कुटुंब केशरी व पिवळी रेशनकार्ड बाळगून त्याद्वारे शिधावस्तूंचा लाभ मिळवित असल्याची वस्तुस्थिती आहे. असे सवलतीच्या दरातील अन्नधान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय राज्य सरकारने १३ ऑक्टोबर रोजी एका विशिष्ट धोरणानुसार उपलब्ध करून दिला आहे. ज्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांधारकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी अशा रेशनकार्ड तहसील किंवा धान्य वितरण कार्यालयात तत्काळ जमा करून शुभ्र रेशनकार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

... तर होणार कारवाई
पुरवठा विभाग लवकरच अपात्र रेशनकार्ड शोधमोहीम हाती घेणार आहे. एक लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांकडे केशरी किंवा पिवळी रेशनकार्ड आढळून आल्यास किंवा ते अशा शिधापत्रिकांद्वारे शिधावस्तूंचा लाभ घेत असल्याचे आढळल्यास रेशनकार्डधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्यांना सुखद धक्का!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांच्या दैनंदिन कामास मंगळवारी सुरुवात झाली. त्यातील २०० पोलिसांना त्यांच्या कुटुंबासह आरोग्य तपासणीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. बरहुकूम सर्व हजर झाले. मात्र, पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसह खासगी वाहनात बसवून थेट उंटवाडीरोडवरील मल्टीफ्लेक्सच्या दारात सोडण्यात आले. काय करायचे, असे प्रश्न सर्वांच्या मनात असताना हातात एमएस धोनी या पिक्चरची तिकिटे पडली. कामाच्या दडपणाखाली मॉलपर्यंत पोहचलेल्या पोलिसांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

पोलिसांची सकाळी सुरू झालेली ड्युटी कधी संपेल याचा नेम नसतो. सोबत दंगल, समाजकंटकाचा त्रास, गुन्ह्याचा तपास अशा बारा भानगडी पाचवीला पुजलेल्या. अर्थात, पोलिस दलाच्या सेवेत रूजू झाल्यापासून हळूहळू का होईना पोलिस हा ताण पचवायला लागतात. सर्वांना ते सहन होते असे नाही. मात्र, कामाचा भाग म्हणून आरोग्याशी खेळ करत कर्तव्याला प्राधन्य दिले जाते. मागील आठवड्यात तर पोलिसांनी दिवसाची रात्र केली. मिळेल तिथे झोपणे आणि हातात पडेल ते खात पोलिसांनी चोख कर्तव्य बजावले. दंगल आटोपली आणि पोलिसांनी दिवाळी बंदोबस्ताची तयारी सुरू केली. दरोडा, घरफोडी, चेनस्नॅचिंग घडू नये, यासाठी बैठका सुरू झाल्या.

कामाचा ताण एका दिवसात कमी होणे शक्य नसले तरी तो हलका करणे आवश्यक असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांचे म्हणणे आहे. आपल्या काही अधिकाऱ्यांना त्यांनी ही बाब बोलून दाखवली. यानंतर, कर्मचाऱ्यांना काहीतरी सरप्राईज द्यावे, याची तयारी त्यांनी केली. मंगळवारी प्रत्येक पोलिस स्टेशनमधून पाच ते सहा पोलिसांना त्यांच्या कुटुंबियासह आरोग्य तपासणीसाठी मुख्यालयात बोलविण्यात आले. आदेश ते मुख्यालयात हजरही झाले. यानंतर, कोणतीही कल्पना न देता त्यांना खासगी बसमध्ये बसवून थेट उंटवाडी येथील मल्टीफ्लेक्समधील ‘एमएस धोनी’ पिक्चर सुरू असलेल्या थिएटरमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी या पिक्चरचा आनंद घेतला. ‘विचार केला नव्हता की कधी, असा दिवसही उजडेल!’, अशी एका पोलिस कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया सर्व काही व्यक्त करणारी ठरली.

सतत दडपण असेल तर त्याचा पोलिसांच्या कामावर परिणाम होतो. तो ताण कमी व्हावा, या उद्देशाने आज सर्व नियोजन करण्यात आले. त्यास कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे असे नवनवीन प्रयोग राबवले जातील.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत गाडगे महाराज धर्मशाळा अनुभवण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेले अनाथ, अपंगांचे सेवेकरी अन् समाजात बदल घडविण्याची ताकद फक्त शिक्षणात असल्याचे ठाम मत मांडणाऱ्या संत गाडगे बाबांनी गोरगरिबांच्या सोयीसाठी जागोजागी धर्मशाळा बांधल्या. अशीच एक धर्मशाळा नाशिकच्या गोदाकाठी १९३२ ला बांधली. ही वास्तू आजही त्यांच्या कार्याचा अन् कर्तृत्वाचा वारसा सेवाकार्यातून पुढे नेत आहे. म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे येत्या रविवारी, २३ ऑक्टोबर रोजी श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकची पांडवलेणी (त्रिरश्मी), पंचवटीतील मंदिरे, नाशिकचा नाणे संग्रह, वाडा संस्कृती दर्शन, पोथ्यांचा साज, गोदाघाट, प्राचीन गोवर्धन, गंगापूर व जलापूरसह देवघडे वडनेर व समर्थांची टाकळी हे नाशिकचा वारसा असलेली स्थळे ‘मटा हेरिटेज वॉक’च्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवली आहेत. अगदी अबालवृद्धांचा या हेरिटेज वॉकला उत्स्फूर्त प्रति‌साद लाभला. ही स्थळे जशी नाशिकचा वारसा आहेत तशीच या शहराला वेगळेपण मिळवून देणाऱ्या व्यक्त‌िही नाशिकचा वारसाच आहेत. यात संत गाडगेबाबांचे नाव आदराने घेतले जाते. संत गाडगे बाबांचा सहवास नाशिककरांना लाभला आहे. याच काळात नाशिककरांच्या आग्रहामुळे गाडगेबाबांनी हनुमानगढीवर (आजची काझीगढी) गोदाघाटानजीक धर्मशाळा बांधली. यासाठी त्यांनी श्रमदानही केले. या धर्मशाळेचे बांधकाम गाडगेबाबांच्या सूचनेनुसार झाल्याने या वास्तुचे सौंदर्य आजही गोदाघाटावर येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला भावते, असे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे संचालक कुणाल देशमुख यांनी सांगितले. या वास्तुला आता ८४ वर्षे झाली आहेत. गोदातटापासून गढीच्या टोकापर्यंत विस्तारलेली गुलाबी रंगाची इमारत पाहताना अनेकांना येथे भेट देण्याची इच्छा असते. ही उत्सुकता श‌मविण्यासाठी ‘मटा’ने धर्मशाळेत हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. धर्मशाळेबरोबरच टाळकुटेश्वर मंदिर व सरदार यसाजी बलकवडे यांची समाधीही पाहता येणार आहे. याबाबत श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे संचालक कुणाला देशमुख व इतिहास अभ्यास प्रा. रामनाथ रावळ माहिती देणार आहेत.

सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक
गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजता सर्वांनी धर्मशाळेत एकत्रित जमायचे आहे. गाडगेबाबा धर्मशाळेकडे येण्यासाठी पंचवटी अमरधामकडून धर्मशाळेकडे तसेच रोकडोबा तालमीकडून धर्मशाळेकडे येता येईल. ‘मटा’ हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या एसएमएस करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : रमेश पडवळ, ८३८००९८१०७.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात आता कामकाजास मनाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराचे भूषण असलेल्या आणि १७६ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालयातील (सावाना) अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आले आहेत. संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीत फूट पडली असून, कार्याध्यक्ष, कार्यवाह आणि अर्थसचिवांना अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. या घडामोडींमुळे सावानातील राजकारण तापले आहे.

सावानाच्या कार्याध्यक्षा विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार आणि अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांनी सावानाच्या घटनेतील नियमांचे उल्लंघन करून संस्थेचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल, असे काम केल्याचे आढळून आल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे. या तिघांचे कार्यकारी मंडळ सदस्य तथा पदाचे कामकाज पुढील सूचना होईपर्यंत थांबवून ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

घटनेच्या भाग ५ कलम २२ अन्वये अध्यक्षांनी ही नोटीस मंगळवार (दि. १८)बजावली आहे. सभासदांच्या माहितीसाठी ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. या निर्णयाची संस्थेच्या बँकांनाही माहिती देण्यात आली आहे. संस्थेच्या घटनेतील नियम, उपनियमांचे उल्लंघन करीत असल्याबाबतची कारणे दाखवा नोटीस अध्यक्षांनी ६ ऑक्टोबर रोजी बजावली होती. सात दिवसात या संदर्भात संबंधितांना खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. जहागीरदार यांच्याकडून ३७, केळकर यांच्याकडून २६, तर बेदरकर यांच्याकडून १३ मुद्द्यांचा खुलासा अध्यक्षांनी मागितला होता. परंतु, या तिघांनीही १३ ऑक्टोबर रोजी अध्यक्षांना पत्र देवून पुराव्यांची मागणी केली होती. मात्र, विचारण्यात आलेल्या मुद्द्यांचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही याबाबत खुलासा केला नव्हता. अध्यक्षांनी अखेर पुढील निर्णय होईपर्यंत या तिघांचे कामकाज स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

चुकीचे आरोप करून आम्हाला हेतूतः बदनाम करण्याचा विद्यमान पदाधिकारी जाणिवपूर्वक प्रयत्न करीत होते. परंतु अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी केलेल्या कारवाईमुळे या पदाधिकाऱ्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे. सावानामध्ये केवळ दर्शनी भागामध्ये नियमबाह्य पध्दतीने कामे करून संस्थेचे लाखो रुपये जहागीरदार यांनी उधळले. मात्र, वाचनालयाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला. पुस्तके व सभासद नोंदीतील घोटाळा उघड होऊ नये, या हेतूने पुस्तक देवघेव विभागाची संगणकीय प्रणाली हेतूतः बंद पाडली. आम्ही वेळोवेळी केलेल्या आरोपांना या कारवाईने पुष्टी मिळाली आहे, असे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी म्हटले आहे.

आमच्यावर अन्याय झाला
सार्वजनिक वाचनालयाचा लौकिक वाढावा यासाठी स्वच्छ पारदर्शी आणि निरपेक्ष भावनेने आम्ही काम केल्याचे सर्व वाचक जाणतात, तरीही आमच्यावर सर्वथैव अन्याय झाला हे यामागील सत्य आहे अशी प्रतिक्रि‌या केळकर, जहागीरदार आणि बेदरकर यांच्यावतीने देण्यात आली.

जहागीरदार यांच्यावरील आरोप
संस्थेच्या आवारात लाखोंची बांधकामे विहीत पध्दतीने केली नाहीत.
कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठराव न करताच अनेकांना बिले अदा करण्यात आली. कामनिहाय खर्च कार्यकारी मंडळापुढे सादर केला नाही.
सुमारे १ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी वेळोवेळी मोडतांना कार्यकारी मंडळाची मंजुरी घेतली नाही.
मुक्तद्वार विभागाचे बांधकाम करतांना नाशिक महापालिका तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मंजुरी घेतली नाही.
प. सा. नाट्यगृहामध्ये ग्रीनरुममध्ये बेकायदेशीरपणे गाळा बांधला.
संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींवर अकारण लाखो रुपये खर्च करण्यात आले. जाहिराती देण्यापूर्वी वेळोवेळी कार्यकारी मंडळाची मंजुरी घेतली नाही.
संस्थेमध्ये नवीन कर्मचारी नेमतांना कार्यकारी मंडळाचे ठराव केले नाही.
भंगार सामानाची विक्री कार्यकारी मंडळाच्या ठरावाशिवाय व कायदेशीर बाब न पाळता केली.
संस्थेमध्ये ग्रंथ खरेदी नियमितपणे करण्यात आली नाही.

या तिघांच्याही कामकाजाबाबत सभासदांचे आक्षेप होता. त्यामुळे त्यांना तात्पुरते कामकाज करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, त्यानंतरच अंतिम कारवाई करण्यात येईल.
- विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images