Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नोंदणीचा तिढा सुटेना

$
0
0

फार्मसी शिक्षणासाठी सेक्शन १२ अंतर्गत मूळ प्रश्न कायम

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

फार्मसी शाखेतील उच्च शिक्षणाशी निगडीत सेक्शन १२ अंतर्गत विद्यार्थ्याच्या नोंदणीचा मुद्दा दरवर्षीच कॉलेजांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. जाचक अटींमुळे अभ्यासक्रमाची मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कायमच राहत असल्याने या अटी शिथील धरण्याची मागणी आता कॉलेजेसकडून जोर धरू लागल्याची वस्तुस्थिती वर्षभरानंतर आहे.

सेंट्रल फार्मसी कौन्सिलच्या अटींनुसार विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रियाच मुदतीपलीकडे दोन महिने उलटून झाली नसल्याची बाब ‘मटा’ ने उघडकीला आणली होती. यामुळे फार्मसीच्या शिक्षणात कॉलेजांसाठी तांत्रिकदृष्ट्या जिकीरीचा ठरणारा सेक्शन १२ आणि व्यवसाय नोंदणीच्या मुद्द्याच्या स्थितीवर प्रकाशझोत पडला होता. या स्थितीत मुदतवाढीनंतर काहीसा बदल होऊन बहुतांश विद्यार्थ्यांची नोंदणी झाली खरी पण हा प्रश्न दरवर्षीच कॉलेजेससाठी डोकेदुखी ठरतो आहे.

गतवर्षी राज्यात सुमारे ९५ कॉलेजमध्ये प्रवेशित पाच हजारपैकी एकाही विद्यार्थ्याची नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे करण्यात आलेली नव्हती. यात वारंवार देण्यात आलेल्या मुदतीनंतर कॉलेजेसने या अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात अनेक फार्मसी कॉलेजांकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची ‘कोर्स ऑफ कंडक्ट’ ची परवानगी आहे. पण फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची फार्मसी कायद्याच्या सेक्शन १२ खाली देण्यात येणारी परवानगी नाही, या प्रकारच्या फार्मसी कॉलेजातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची रजिस्टर्ड फार्मसीस्ट म्हणून नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे करू शकत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बासरीच्या सुरावटीत ज्येष्ठ मुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोले रे पपी हरा, आयोध्येचा राजा, ज्ञानियांचा राजा, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, ज्योतिकलश झलके अशा एकापेक्षा एक गीतांनी प्रौढ नागरिक संघाचा हॉल स्वरमय झाला होता. निमित्त होते संदीप कुलकर्णी यांच्या बासरीवादनाचे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रौढ नागरिक मंडळातर्फे गुरुवारी बासरीवादनाच्या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात हिंदी- मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते बासरीवादनातून सादर करण्यात आली. कलाकारांचा परिचय जामदार यांनी, तर प्रास्ताविक आशा चौधरी यांनी केले. वादनाची सुरुवात यमन रागातील बंदिशीने झाली. पंख होते तो उड आती रे, दिवाना हुवा पागल, बाजे रे मुरलीया बाजे, हिरो अशी एकापेक्षा एक गीते बासरीवादनातून सादर करीत कुलकर्णी यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. कुलकर्णी यांच्यासोबत अनिल कुटे यांनीही बासरीवादन केले. त्यांना तबल्याची साथ ओंकार वैरागकर, तर गायनाची साथ कुमार गोविलकर यांनी केली. या कार्यक्रमानंतर सुगम संगीताची मैफल झाली. यात अनिल कोठीरी व सुजाता कायदे यांनी विविध गीते सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मैफलीची सुरुवात अष्टविनायक चित्रपटातील प्रथमतुला वंदितो या गीताने झाली. त्यानंतर जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेले अबिर गुलाल उधळीत रंग हे गीत कोठारी यांनी सादर केले. तबल्याची साथ रोजरेकर यांनी केली. कार्यक्रमाला प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, सुरेंद्र गुजराथी, शरद पाटील, रंजन शहा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यानंतर दुग्धपानाचा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधकांच्या आठवणी चिरस्मृतीत राहतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘आठवणी’ हा ग्रंथ ज्या ज्या साधकांच्या हातात येईल, त्यांना त्यांच्या आयुष्याचा मार्ग गवसेल. हा ग्रंथ अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. साधकांनी नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याविषयी ज्या आठवणी ग्रंथात लिहिल्या आहेत, त्या चिरस्मृतीत राहतील, असे प्रतिपादन वाराणसीचे प्रसिद्ध कृष्ण यजुर्वेदाचे आचार्य गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजी यांनी केले.

नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांच्यावर आधारित ‘आठवणी’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कालिदास कलामंदिरात गुरुवारी हा सोहळा पार पडला. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट यांच्यातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून द्राविड गुरुजी बोलत होते. ते म्हणाले, की ज्या वेळी कठीण काळ येतो, त्या वेळी शास्त्र मार्गदर्शक ठरतात. अंधारात ज्याप्रमाणे दिवा प्रकाशमय ठरतो, त्याचप्रमाणे ज्या लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल, त्यांच्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरेल. वेद, वाङ्मय हे देवाच्या श्वासाप्रमाणे असून, ज्या वेळी ते लुप्त होण्याचा संभव निर्माण होतो, त्या वेळी देव कोणत्या ना कोणत्या माध्यमाने ते प्रकाशात आणत असतो. नारायणकाका महाराजांनी जागतिक स्तरावर ते पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करून परंपरा कायम राखली असल्याचेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ढेकणे महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. सूर्यकांत राखे महाराज यांनी प्रास्ताविक केले. ढेकणे महाराज यांनी प्रत्येक साधकाला अशुभापासून दूर केले. अशाच काही साधकांचे भाव या ग्रंथात समाविष्ट असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुकुंदकाका ठकार, माधवदास राठी, मधुकर हरणे, प्रकाश प्रभुणे आदी उपस्थित होते.

आज प्रवचन व सांगता

शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) मुकुंदकाका जाटदेवळेकरांचे गुरुभक्ती या विषयावर प्रवचन होणार आहे. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत गंगापूर रोडवरील लोकनाथतीर्थ स्वामी महाराज चौकात हे प्रवचन होईल. दुपारी १ वाजता सांगता, १.३० वा. श्रीपिंग दर्शन, सायंकाळी ६.३० वा. सांप्रदायिक कीर्तन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंपरेत नवता डोकावली पाहिजे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संगीतात कधीही मूल्यात्मक बदल होत नाहीत. आपण परंपरेचे पालन करतोय, परंतु आता त्यात नवता डोकावली पाहिजे. जी गोष्ट परंपरेची आहे तीच नवतेचीही आहे. नवतेलाही परंपरा चिकटली नाही तर ती उठून दिसणार नाही, असे प्रतिपादन तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी केले.

क. का. वाघ कला अकादमी प्रस्तुत क. का. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस आयोजित कार्यक्रमात तळवलकर बोलत होते. ते म्हणाले, की संस्कार करणाऱ्या गुरूंचा सहवास लाभणे ही मोठी गोष्ट आहे. त्यासाठी वेळही तितकाच द्यावा लागतो. कला ही तरल गोष्ट आहे, ती मनानेच समजावून घ्यावी लागते. कारण तडतड केल्याने बुद्धीवर परिणाम होतो; परंतु मनावर परिणाम होण्यासाठी कलाच असावी लागते.

संगीताच्या अभिजाततेबद्दल काय वाटते, या प्रश्नाला उत्तर देताना पंडित तळवलकर म्हणाले की, अभिजाततेला मापक नसते. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला यावर राग ताल व संगीताचे स्वरूप अवलंबलेले असते. शास्त्र हा शिकवण्याचा विषय आहे. तंत्र शरीराने साधले जाते, तर कला म्हणजे सौंदर्य, आनंद, ऊर्मी, प्रेरणा, स्फूर्ती असल्याने ती मनाची कारक आहे.

ही मुलाखत सुनील देशपांडे व विद्या देशपांडे यांनी घेतली. कार्यक्रमप्रसंगी परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी तबलावादन केले. या सहवादनात त्यांनी ताल तीन ताल, पेशकार, कायदे, रेले, गत, तुकडे, चक्राधार सादर केले. व्यंकटेश तांबे, प्रफुल्ल पवार, ओंकार कोंडिलकर, अद्वय पवार यांनी तबलावादन केले. त्यांना संवादिनीवर पुष्कराज भागवत यांनी साथ केली. पदविका प्राप्त तीन विद्यार्थ्यांचा या वेळी पंडित तळवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात संगीतात भास भामरे, नाट्यमध्ये देव चक्रवर्ती आणि नृत्यामध्ये श्रद्धा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. पंडितजींचा परिचय प्रा. शिल्पा देशमुख यांनी परिचय करून दिला. सुमुखी अथनी यांनी आभार मानले.

रिअॅलिटीत पालकांचाच उत्साह अधिक

आजकाल रिअॅलिटी शो चे फॅड आहे. विद्यार्थी मन लावून कला शिकतो आणि त्याला फक्त बक्षीस मिळवायचे असते, तर पालकांनी बक्षिसाची रक्कम कोठे खर्च करायची तेदेखील ठरवून ठेवलेले असते. त्यांना कळतच नाही, की आपण आपल्या पाल्याबाबत किती चुकीचे करत आहोत. त्यांना नंतर २५ वर्षांनीही ते कळले तर कमावले. पुढच्या जन्मात तरी त्या पाल्याला सुखाने ठेवतील, असे मत पंडित तळवलकर यांनी या वेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा संडे होणार फन-डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विदेशात काही शहरांमध्ये महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही दर महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ (एलएसओएम) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोलिस दलामार्फत गंगापूर रोडवरील आसाराम बापू पुलाजवळील गोदा पार्क या ठिकाणी सकाळी सहा ते साडेआठ या कालावधीत हा उपक्रम होईल. या महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याने २३ ऑक्टोबर रोजी ‘एलएसओएम’ उपक्रम होणार आहे. ‘हॅप्पी स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाच्या धर्तीवर एलएसओएम उपक्रम असेल.

एलएसओएम ही संकल्पना विदेशात प्रचलित आहे. आपल्या शहरासाठी आणि आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र जमावे, ही संकल्पना खरोखर प्रेरणादायी असून, पोलिस विभागाने यासाठी पुढाकार घेतला असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी सांगितले.

पोलिस आणि नागरिक एकत्र आले तर गुन्हेगारीवर निश्चितच वचक निर्माण होतो. गुन्हेगारीचा बीमोड होऊन शहराचे नाव देशपातळीवर उज्ज्वल व्हावे, यासाठी फक्त पोलिसांनी किंवा नागरिकांच्या गटांनी प्रयत्न करणे तितके फायद्याचे नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून आम्ही आणखी करता येईल काय, याची चाचपणी करीत होतो, असे सिंघल म्हणाले. विदेशात काही शहरांमध्ये महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही दर महिन्याच्या चौथ्या रविवारी अशा उपक्रमाचे आयोजन पोलिस दलामार्फत होणार आहे. एलएसओएमबरोबरच धावणे, चालणे, वॉर्मअप, जॉगिंग असे व्यायमाचे प्रकारदेखील असणार आहेत. स्केटिंग, योगा, सायकलिंग वा अन्य खेळाडूंना आपले कलागुण येथे सादर करता येतील.

पोलिस-नागरिक सुसंवादासाठी उपक्रम

नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी पोलिसांमार्फत सुरुवात झाली आहे. त्याचा हा पहिला टप्पा असून, हळूहळू उपक्रमाच्या स्वरूपात, वेळेत, तसेच ठिकाणामध्ये बदल होईल. नागरिकांनी अगदी निर्धास्त होऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस आयुक्त सिंघल यांनी केले. नागरिकांना या उपक्रमाविषयी किंवा सहभागी होण्याबाबत काही शंका असल्यास त्यांनी सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे (मो. ९७६५४६५५१३) किंवा अनिरुद्ध अथानी (९८२२०६९८७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी केले. मॅरेथॉनसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना सर्व प्रशिक्षण व इतर सुविधा पोलिसांमार्फत पुरवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीसाठी पोलिसांचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस सतत प्रयत्नशील असतात. पोलिसांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानही पुढे सरसावले आहे. गुन्ह्याचा तपास आणि गुन्ह्याला प्रतिबंद घालणे यासाठी सीसीटीव्हीदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असून, व्यावसायिक अस्थापनांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी गुरुवारी केले.

नाशिकमधील व्यावसायिक अस्थापानाच्या प्रतिनिधींसाठी शहर पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सिंघल बोलत होते. बैठकीला सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शेकडो आस्थापना प्रतिनिधी हजर होते. सीसीटीव्हीचा उपयोग फक्त गुन्ह्याचा तपास करण्यासाठी होतो, असे नाही, तर अनेकदा सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी चोरी होण्याचे प्रकार आपसूकच टळले जातात, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दर्जा, त्यांची संख्या, बसवण्याचे ठिकाण यांचाही ताळमेळ हुकतो. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही त्याचा फायदा मात्र गुन्ह्याचा शोध घेताना होत नाही. यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने सीसीटीव्ही बसवणे हे महत्त्वाचे असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही बसवताना काही अडचणी असतील, सीसीटीव्हींची क्षमता, रेकॉर्डींगचा कालावधी याविषयी माहिती हवी असल्यास संबंधीतानी पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन देखील पोलिस आयुक्त सिंगल यांनी केले. यावेळी हॉटेल्स, बँका, शाळा- कॉलेजेस, विविध वस्तु किंवा वाहनांचे शोरूम्स, धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे पदाधिकारी आदी हजर होते. त्यांनी काही सुचना केल्यात. तसेच आपले अनुभव सांगितले. सीसीटीव्ही कार्यरत असणे हे फक्त पोलिसांसाठी सोयीस्कर नसून, त्याचा फायदा संबंधीत अस्थापनांना देखील होतो. ही बाब आजच्या बैठकी दरम्यान, सर्वांनीच मान्य केली असून, याची अंमलबजावणी होणार असल्याचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. या संदर्भांत एक रूपरेषा तयार केली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराचे वाहन बेपत्ताच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामासाठी ते रोज नाशिकला यायचे. १५ सप्टेंबर रोजी ते घरातून निघाले. मात्र, यानंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. त्यांच्या मरणासाठी कारणीभूत ठरलेला लष्कराच्या त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांकडे आहे. मात्र, आज ३५ दिवसांनंतरही या वाहनाचा तपास लागलेला नाही. सर्वसामान्यांचा पोलिसांवर विश्वास आहे. मात्र, तो कायम ठेवण्यासाठी अशा घटनांचा तातडीने तपास लागयला नको का, ही संतप्त प्रतिक्रिया आहे हर्षदा आव्हाड या मुलीची.

मनमाड येथे स्थायिक असलेल्या आव्हाड कुटुंबातील हर्षदा ही मोठी मुलगी. हर्षदाचे वडील श्रीकांत आव्हाड (वय ६०) यांचा १५ सप्टेंबर रोजी फेम टॉकीजसमोर अपघातात मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या आव्हाड यांनी काही खासगी काम सुरू केले होते. यासाठी ते नेहमीच मनमाड-नाशिक असा प्रवास करायचे. नाशिकमध्ये फिरण्यासाठी त्यांनी एक दुचाकी घेतली होती. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास आव्हाड स्वाद हॉटेल येथून जात असताना त्यांच्या दुचाकीस बीए ०० /डी१३२९३५ एक्स या लष्काराच्या वाहनाने धडक दिली. दुर्दैवाची बाब म्हणजे वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या आव्हाडांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूच्या बातमीनंतर आव्हाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हर्षदाचा भाऊ स्वप्नील सध्या उद्योगधंद्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर तीही स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करते आहे. मात्र, वडिलांच्या अकाली निधनामुळे या भावंडांवर जणू आभाळच कोसळले. वडिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस शासन मिळावे, एवढी आव्हाड कुटुंबाची रास्त अपेक्षा आहे. याबाबत बोलताना हर्षदाने सांगितले, की सर्वांना आपल्या लष्कराचा अभिमान असतो. तसा मलाही आहे. मात्र, अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत जणू काही करायचे नाही, असे ठरवले दिसते. चौकशी केली, की तपास सुरू आहे एवढेच उत्तर मिळते. रस्त्यावर अपघात करून लष्कराच्या छावणीत घुसून बसणाऱ्या त्या वाहनचालकाला अटक केव्हा होणार, असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे उपनगर पोलिसांकडे त्या वाहनांचा क्रमांकदेखील आहे.

या घटनेबाबत आज पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी संबंधिॉत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून न्याय मागण्याची वेळ येते हेच दुर्दैवी आहे. शिस्त म्हंटले, की लष्करची प्रतिमा समोर येते. मात्र, अपघातानंतर जखमी व्यक्तीस रस्त्यावर सोडून पळून जाणाऱ्या त्या चालकाने काय साधले? या प्रकरणाची तक्रार सरंक्षण विभागाकडे करण्यात येणार आहे.
- हर्षदा आव्हाड, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेची विहीर

$
0
0

कवितेची विहीर

---

कला-साहित्य

मेट्रो व्ह्यू

ऐश्वर्य पाटेकर

---

खूप दिवस खपलीखाली निपचित पडून राहिलेलं बियाणं एकदम रुजून वर यावं, तसंच काहीसं साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं माझं आयुष्य लख्खं उजेडात आणलं. अकादमीमुळेच वाङ्मयीन भूगोलात माझ्या नावाचा नवा चिमुकला प्रदेश उगवून आला. माझ्या समकालात खूप चांगलं अन् सकस लिहिणारे ‘लिहिते हात’ आहेत, याची मला जाणीव आहेच. पण, हे दान कुणाच्या पदरात पडेल सांगता येत नाही. आता पडलंच आहे तर त्याच्यावर माझ्या एकट्याचा हक्क थोडाच आहे. नाहीतरी तुम्ही कमावलेली भाकर तुमच्या एकट्याची नसतेच; तिचे वाटे ठरलेले असतात. तसंच काहीसं या पुरस्काराच्या बाबतीत सांगता येईल. मी जगलो त्या प्रदेशाचा त्यात वाटा आहे. वाङ्मयीन भूमीतील ज्या लेखक कवींनी माझ्यावर संस्कार केले त्यांचाही वाटा आहेच. ज्या कृषिवल परिवेशात मी वाढलो, तेथील चिडीपाखरांचा, झाडाझुडपांचा, जीवजित्रबांचाही वाटा यात आहे. माझा वाटा कसा मोजायचा? माझ्या आसपासचे कोण कोण काय काय झाले. मी मात्र, कवी झालो. माझा जमीनजुमलाही कविता. माझा बँकबॅलन्सही कविताच. आयुष्यभराचं फिक्स्ड डिपॉझिटही कविताच. म्हणून तिच्याविषयी माझ्या काही धारणा आहेत. भाकरीला जसा भूकेचा वास येतो किंवा भाकर भुकेचा वास घेऊनच जन्माला येते. तसेच कवीने मनाच्या वावरात आपल्या नावची जी माती सांभाळली आहे तिला सृजनाचाच वास यायला हवा आहे आणि कवीजवळ कवितेशिवाय सांगायला दुसरं काही असूच नये, या मताचा मी आहे. कवीच्या रेशनकार्डवर, आधारकार्डवर, रहिवाशी दाखल्यावरही कविताच असावी. माझ्याजवळ कवितेव्यतिरिक्त सांगायला दुसरी कुठलीच संपत्ती नाही. कवितेचाच ऐवज मी जपतो आहे. माझे वय चाळीस. माझ्या कवितेचे वय सव्वीस वर्षे. आतापर्यंत एवढ्या दिवसांत कवितेचाच झरा उपसत आलोय. तिच्यापेक्षा वेगळा जगलो नाही. स्वत:च्या कातडीइतकी ती मला जवळची. मान्य आहे, कवी कविता लिहितो त्या दरम्यान जगामध्ये खूप काही घडत असतं. जाळपोळ, बॉम्बस्फोट, युद्ध, दहशतवादी कारवाया, घातपात, आंदोलने, मोर्चे आणि मी फक्त कविता लिहितोय. कारण, कविता हीच एकमेव अशी गोष्ट आहे, जी मी हक्काने हट्टाने करू शकतो. खूप काही कमावलं, तेवढच काही गमावलंही. कमावल्या-गमावल्याची बेरीज-वजाबाकी म्हणजे माझी कविता नाही. मी फक्त खोदत नेतोय कवितेची विहीर. माझ्या सातबाराच्या उताऱ्यावर एवढीच एकमेव गोष्ट माझ्या मालकी हक्काची. या विहिरीविषयी सांगणं म्हणजे माझ्या कवितेविषयी बोलणं..

स्वत:च्याच कवितेविषयी कवीने असं पोटतिडकीने सांगितले पाहिजे का? तिच्या विस्तवाच्या शेकोटीशी अस्वस्थ ठणकणारं अंग शेकवून घेतलं पाहिजे का? मेंदूत खोल रुतून बसलेली अनुभवाच्या गांधील माशांची पोळे नव्यानं अशी डिवचली पाहिजे का? या प्रश्नांची उत्तरे होय अशीच आहे. अनुभव एकापास एक उभे केले, की त्याची बनते कविता. जळतेच्या जळते अनुभव मीही ठेवले एकपास एक. कविता जास्तच चटके देवू लागली. तिच्यापासून पाळता थोडंच येतं? कृषिजन संस्कृतीच्या परिक्षेत्रात वाढलो, याच पर्यावरणातील प्रतिमा-प्रतीकांचं ‘वारुळ’ अंगावर घेऊन उठलो. वास्तवाच्या विस्तवाच्या चिंतनाच्या जहाराच्या हजारो मुंग्यांनी पोखरून काढलं माझं शरीर. ते फेडून नवंच धारण केलं कवितेचं शरीर! मनाच्या वावराची चांगली मशागत केली. त्यामुळेच अस्सल प्रतिमांचं पीक जीवनानुभवातून घेण्याचं कसबही माझ्यात मेहनतीतून आलं. आणखी पिकाला इजा न होऊ देता त्यात वाढलेलं ‘तणकट’ अचूक निंदता आलं. काटेकुटे वेचून गव्हाळीच्या रानासारखी कविता निर्मळ केली. तिच्या आत्म्याची बोली नितळ करण्याची तसदी घेत राहिलो. जगात अनेक गोष्टींची खरेदी-विक्री करता येते, पण संवेदनशीलता माणूस विकू शकत नाही अन् खरेदीही करू शकत नाही. तरीही मी गव्हाची ओंबी, बाजरीचे दाणे, हरबऱ्याचे चणे, तुरीच्या शेंगा, भुईमूगाच्या शेंगा, गवताचा भारा, कडब्याची पेंढी, ज्वारीचे ताटे, असा ऐवज आणलाय कवितेत कालवून. त्यास नागरीचं लेबल लावायचं का ग्रामीणचं? हे मात्र ज्याला त्याला सुचू शकतं ज्याच्या त्याच्या वकुबानुसार. अर्थात कुठलंही जगणं, कुठलीही समस्या, कुठलीही दु:खे ही लेबलांपलीकडचीच असतात. गावाशिवाचा एकत्रित प्रदेश आखता येतो. मात्र आनंदाचा, व्यथेचा, दु:खाचा, करुणेचा, वात्सल्याचा, प्रदेश कसा आखणार? तो आखताच येत नाही. आभाळाला खांब लावता येत नाही. मला तरी निर्मितीच्या कळा एका साच्यात ठेवता येत नाही. समुद्राला बांध घालता येत नाही. एक शेत एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर नेवून ठेवता येत नाही. या गोष्टींची पुष्टी आहेच.

हे सर्व ठेवलंय कवितेच्या विहिरीत. कवितेची विहीर उतरून आल्याशिवाय कसं पोहोचता येईल कवितेपर्यंत? त्यासाठी तळठाव घेण्याचं कसब आपल्या अंगी असलंच पाहिजे. ही तर प्रथम अट आहे कवितेच्या विहिरीची. विहिरीला जर चारी बाजूनी पाण्याचे पाझर फुटलेले असतात अन् झरे खळखळत असतात. त्यांचा सुगावा घ्यायचा असेल तर पोहता तरी यायला हवं. कवितेचा जर का पोत ठरवायचाच आहे तर घ्या सूळकती उडी. विहिरीतल्या पाण्याने ओंजळ केलीय..!

(लेखक हे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अबाधित स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवांचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकार मुस्लिमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असा ठराव जमिअत उलेमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता महासंमेलनात करण्यात आला.

धुळे शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलजवळील आएशा मशिदीच्या मैदानावर जमिअत उलेमातर्फे गुरुवारी रात्री राष्ट्रीय एकता महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. जमिअत उलेमा हिंदचे अध्यक्ष हजरत मौलाना सैयद अरशद मदानी, इंदूर येथील श्री सद््गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज, नांदेड येथील पंचप्यारे गुरुद्वारा तकगट सचखंड श्री हुजूर साहेबचे ज्ञानी विजेंद्रसिंह कपूर, गांधीनगर येथील भन्ते प्रशील रत्न गौतम, जमिअत उलेमाचे राज्याध्यक्ष ह. मो. मुस्तकीन अहसन आजमी आदी उपस्थित होते. जमिअत उलेमा हिंदचे अध्यक्ष हजरत मौलाना सैयद अरशद मदानी म्हणाले की, केंद्र सरकार मुस्लिम पसर्नल लॉमध्ये हस्तक्षेप करून समाजाचे स्वातंत्र हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या देशात प्रत्येक समाजाचा पर्सनल लॉ आहे. तो काढून घेण्याचा प्रयत्न आताचे सरकार करत आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. भन्ते प्रशील रत्न गौतम यांनी भारत हा देश गौतम बुद्धांचा आहे. त्यांनी जगाला शांततेचा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आचरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

‘माझ्यासमोर बसून बोला’
आपण कायद्याला जपणारी माणसे आहोत, कायदा मोडणारे नाही. ज्यांना जाब विचारायचा असेल, त्यांनी माझ्यासमोर बसून माझ्याशी बोलावे, असे खुले आव्हान राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी विरोधकांना दिले. ते राष्ट्रीय एकता महासंमेलनासाठी धुळ्यात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. भैय्यूजी महाराज म्हणाले की, देशात सलोख्याचे वातावरण तयार करायचे असेल, तर भारताची तुलना पाकिस्तानशी करू नये. समान नागरी कायद्याचा विचार करताना धर्म व संविधानातील तरतुदी यांचाही विचार व्हावा. धर्मा-धर्मात काय लिहिले आहे हे लहानपणी शिकवल्यास सर्व वाद मिटतील, अशी अपेक्षा भैय्यूजी महाराजांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकार मिळाले, विकासाचे काय?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोने शहरात उभारलेल्या सहा योजनांचे महापालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर आता सिडकोकडील नगररचना विभागाचे अधिकारही महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे आता तरी महापालिकेकडून या भागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विकासकामे करताना आता सिडकोची परवानगी लागणार नसल्याने राजकीय नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, सिडकोतील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न आता महापालिका खऱ्या अर्थाने मार्गी लावणार की नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सिडकोने उभारलेल्या सहा योजनांपैकी पाच योजनांचे यापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतर झाले होते. मात्र, सहावी योजना हस्तांतरास बराच कालावधी लागला. त्यामुळे सिडकोकडून महापालिकेला चार भूखंड व दोन सभागृहेसुद्धा मिळाली आहेत. सर्व योजनांचे हस्तांतर झाल्यानंतर सिडकोकडील नगररचनेचे अधिकारही महापालिकेला मिळावेत, यासाठी सर्वांनी पाठपुरावा सुरू केला. मागील आठवड्यात हे अधिकार महापालिकेला देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता सिडको प्रशासकीय कार्यालयात केवळ घरे हस्तांतरण व सिडकोच्या ताब्यात असलेले काही अतिक्रमित भूखंड विक्री करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. यापूर्वी सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न निघाल्यानंतर सिडको व महापालिका एकमेकांकडे हे अतिक्रमण काढण्यावरून ढकलाढकल करीत होते. आता महापालिकेकडे नगररचनेचे अधिकार प्राप्त झाले असून, येथील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेकडून सिडकोतील अतिक्रमण काढले जाणार की नाही, याबाबतची चर्चा होत आहे. सिडकोने यापूर्वी दिलेल्या बांधकाम परवानग्यांबाबतही महापालिका काय भूमिका घेणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

नेतेमंडळींत समाधान!

शहरातील विविध लोकप्रतिनिधींना विविध विकासकामे करताना सिडकोच्या परवानगीची गरज पडत होती. आता मात्र सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नसल्याने नेतेमंडळींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांची पोलिसांकडून कानउघडणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक वसाहतीत दिवाळीत होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध बसावा यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत उद्योजकांनी वेळेचे बंधन न पाळल्यामुळे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक पार पडली. शुक्रवारी दुपारी ४ वाजता पोलिस बैठकीला हजर झाले. मात्र, उद्योजकच यावेळी उपस्थित नसल्याने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी आयुक्तांना ‘डोन्ट कम’चा संदेश पाठवला.
उशीरा सुरू झालेल्या या बैठकीत उपायुक्त धिवरे यांनी उद्योजकांची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेचे बंधन न पाळल्यामुळे मीच आयुक्तांना न येण्याचे सांगितल्याची माहितीही त्यांनीच या बैठकीत दिली. विशेष म्हणजे आयमाचे पदाधिकारी व काही उद्योजक सोडल्यास या बैठकीला अनेक उद्योजकांनीही पाठ फिरवल्यामुळे उद्योजकांची दांडी मारण्याची चोरीही या निमित्ताने उघड झाली. अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये दिवाळीच्या काळात कारखान्यांना सलग सहा दिवस सुटी असल्यामुळे होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध लागावा यासाठी अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स (आयमा) कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उद्योजक, सुरक्षा सेवा देणाऱ्या एजन्सी व सिक्युरिटीज एजन्सीज, लेबर काँट्रॅक्टर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी ठिक चार वाजता बैठक सुरू होईल असा संदेश आयमातर्फे देण्यात आला. पण प्रत्यक्षात तो न पाळल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी उद्योजकांना वेळ न पाळण्यावरून सुनावले.
गेल्या वेळच्या
सुचनांचे काय?
गेल्या वेळेस दिलेल्या सुचनांचे अजूनही पालन उद्योजकांनी केलेले नाही, असे सुनावत अधिकाराबाबत आपण नेहमी जागृत असतो.
पण आपली जबाबदारी मात्र विसरतो. गेल्या वेळी सीसीटीव्ही, स‌िक्युरिटी गार्डबरोबरच अनेक सूचना केल्या. पण त्या पाळल्या नाहीत. स‌िक्युरीटी व सेफ्टी हा महत्वाचा विषय आहे. त्यासाठी पोलिसांतर्फे आम्ही नियोजन केले आहे. त्यासाठी उद्योजकांनीसुध्दा जागृत राहणे गरजेचे आहे.
आम्ही नाकाबंदी, बॅरिकेडिंग, वाहन तपासणी व गस्त वाढवणार आहोत. त्याचप्रमाणे झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशनची सूचना चांगली आहे, त्यावर कारवाई करू असेही सांगितले. या बैठकीत आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी रात्रीची गस्त, बाहेरुन येणाऱ्या वाहनांची तपासणी, रस्ते नाकाबंदी, झोपडपट्टी कोम्बिंग ऑपरेशन, पहाटे होणाऱ्या चोऱ्या, छोट्या टपऱ्यांची वाढलेली संख्या व अवैध धंदे, बंद पडलेले पथदीप या विषयाकडे लक्ष वेधले. या बैठकीत अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. व्ही. करंजे, आयमाचे सरचिटणीस निखील पांचाल, तक्रार उपसमितीचे चेअरमन राधाकृष्ण नाईकवाडे, नाईसचे रमेश वैश्य, धनजंय बेळे, विवेक पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकास सोडून पालकांचा पळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या तीन वर्षांच्या बालकास सोडून माता-पित्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना जेलरोड परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्या निर्दयी पालकांचा शोध घेतला जात आहे. सेंट अण्णा चर्चचे रवी त्रिभूवन यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी रात्री एका जोडप्याने आपल्या तीन वर्षीय मुलास चर्चसमोर उघड्यावर सोडून दिले. मध्यरात्रीच्या सुमारास जीवाच्या आकांताने मुलाने रडायला सुरुवात केली. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक माळी करीत आहेत.

कॉलेजमध्ये
लॅपटॉपची चोरी
मविप्रच्या फार्मसी कॉलेजमध्ये लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सरिता अमरनाथ चौधरी (रा. सरस्वती चौक, सिडको) यांनी लॅपटॉप चोरीची तक्रार दिली आहे. बुधवारी चौधरी या फार्मसी कॉलेजला गेल्या होत्या. लॅबमध्ये ठेवलेला त्यांचा २० हजार रुपये किमतीच्या लॅपटॉपवर चोरट्यांनी हात साफ केला. अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.

गॅस वितरकास लुटले
गॅस सिलेंडरची घरपोच सेवा देणाऱ्या एजन्सी कामगारास दोघांनी लुटल्याची घटना सातपूर येथील केदारनगर परिसरात घडली. विकास उर्फ गॅब्या प्रेम प्रकाश रॉय (रा. समर्थ पार्क, श्रमिकनगर) व चंद्रकांत दामोदर डगळे (रा. आंबेडकर हॉल जवळ, शिवाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. सातपूर गॅस एजन्सीचे कामगार चंदन शेनपडू सुशिर (२४ रा.शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चंदन सुशिर व नितीन बाळासाहेब सानप हे दोघे कामगार गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास केदारनगर येथील आयटीआय कॉलनीमध्ये आपले काम करीत असताना लुटीचा प्रकार घडला. संशयितांनी दोघा गॅस वितरकांचा रस्ता अडवून बेदम मारहाण केली तसेच चंदनच्या खिशातील सुमारे सहा हजार ५०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत नितीन सानप या कामगाराचा मोबाइल खिशातून पडला असता तोही संशयितांनी उचलून पोबारा केला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

चाकूचा धाक दाखवून वृध्दास लुटले
रस्त्यावर झाडांची फुले तोडत असलेल्या वृध्दास चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वार युवकांनी लुटल्याची घटना गंगापूररोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावर घडली. वृध्दाच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ कारभारी ढोमसे (६४ रा. राजेंद्र भवन, जुना गंगापूर नाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वामी विवेकानंद मार्गावरील देह मंदिर सोसायटीसमोरील रस्त्याच्या दुभाजकात लावलेल्या फुलझाडांची फुले तोडत असताना ढोमसे यांच्याजवळ एक अॅक्ट‌िव्हा येऊन थांबली. मुळात कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अ‍ॅक्ट‌िव्हा दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी ढोमसे यांना थेट चाकूचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे ढोमसे यांनी सांगताच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्याच्या गालात फटका मारीत गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी तोडली. यानंतर, चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक सोनाने करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्म्यांना पोलिसांकडून मानवंदना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या देशभरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज, शुक्रवारी राष्ट्रीय पोलिस हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले.
दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगलीसारख्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात येते. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत शहीद झालेल्या देशभरातील ४७३ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. यात महाराष्ट्रातील पाच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे सहसंचालक बी. जी. गायकर, पोलिस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, दत्तात्रय कराळे आदींनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यापूर्वी परेड कमांडर विजय दाणी व सेकंड परेड कमांडर रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली ९० पोलिस कर्मचाऱ्यांनी शोकसंचलन केले. महापौर अशोक मुर्तडक, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अशा विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांचे कार्डक्लोन रोखणार

$
0
0

सायबर आर्मीची उच्चस्तरीय बैठक; नाशिकच्या तज्ज्ञाचाही सहभाग

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : संपूर्ण देशातील बँकिंग व्यवस्थेला हादरवणाऱ्या कार्डक्लोन प्रकरणाबाबत दिल्ली येथे सायबर आर्मीची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या प्रकरणाचे मूळ शोधण्याचे काम समिती करीत आहे. या समितीत देशातील नामवंत हॅकर्स व सायबर सिक्युरिटीतील तज्ज्ञ काम करीत असून, त्यात नाशिकच्या अमर वझरे या युवकाचाही समावेश आहे.

देशातील नामवंत बँकांच्या ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून परस्पर काढण्याचे प्रकार होत असून, यात कार्डचे क्लोन करून ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणात अनेक बॅँकांचा महत्त्वाचा डाटादेखील करप्ट झाला आहे. यामध्ये अॅक्सिस, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एस बॅँक आदी बॅँकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी दिल्लीत सायबर आर्मीची एक उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली असून, त्यात देशातील नामवंत तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील सर्व एटीएममध्ये आपल्या खात्याचा पीन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ अमर वझरे यांनी केले आहे. यातील मास्टर कार्ड आणि विजा कार्ड यांना सर्वात जास्त धोका असून, या कार्डधारकांचा डेटा मेलवेअर टाकून अॅक्सेस केला आहे. यातील लॉगफाईल चोरीला गेल्या आहेत. ग्राहकांनी आपल्या एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक असून, त्यानंतर बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे आहे. ग्राहकांना कुणाचाही फोन आल्यास बँकेचे डिटेल देऊ नये, त्याचप्रमाणे जे कार्ड ब्लॉक झाले आहेत त्यांचा सीव्हीव्ही नंबर हॅकर्सकडे आहेत, अशा ग्राहकांनी कार्ड बदलणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांना फक्त पीन बदलून चालणार नाही. कॅस्पर स्काय नावाच्या एका कंपनीने भारतातील एका नामांकित कंपनीला तुमचा डेटा चोरी होत आहे, याची कल्पना दिली होती. त्याच कंपनीच्या ग्राहकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अनेकजण ऑनलाइन व्यवहार करताना ती साईट सिक्यूअर आहे, की नाही याची खातरजमा करीत नाहीत. ज्या साईट्ची सुरुवात hppps या अद्याक्षरांनी होते त्याच साईट्सवरून व्यवहार करावेत, असे सांगण्यात आले आहे. वायफाय सुरू आहे, अशा ठिकाणाहून ऑनलाइन बॅँकिंगचे व्यवहार करू नये. हा सायबर हल्ला चीनकडून होत असल्याचा संशय असून, जास्तीत जास्त नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

येथे करा तक्रार

बॅँक व्यवहाराबाबत काही संशयास्पद हालचाल वाटत असेल, कुणी अनोळखी व्यक्ती बॅँकेचे डिटेल्स विचारत असतील किंवा बॅँकेतून पैसे गहाळ झाले असतील, तर याबाबत तक्रार करायची असल्यास ९७६२१००१०० या क्रमांकावर तक्रार करावी. नाशिक पोलिसांचा हा व्हॉट्सअॅप क्रमांक असून, त्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

ही घ्या काळजी

एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक, कुणाचाही फोन आल्यास बँकेचे डिटेल देऊ नये, वायफाय सुरू आहे तेथे ऑनलाइन बॅँकिंगचे व्यवहार करू नये, बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे

ऐन सणासुदीच्या काळात बॅँक ग्राहकांचे कार्ड बंद झाल्याने मोठा अनर्थ ओढावला आहे. ग्राहकांनी व्यवहाराबाबत सावधानता बाळगावी. तातडीने एटीएमचा पीन बदलावा. त्यानंतर बंद झालेले कार्ड बदलून घ्यावे.

- अमर वझरे, संचालक, सायबर आयटी सिक्युरिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, नंदिनीचा पूरप्रभाव होणार कमी!

$
0
0

अभ्यास समितीची स्थापना; महिनाभरात अहवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी व नंदिनी नदीला वारंवार येणाऱ्या पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी महापालिका आता पाटबंधारे विभागाच्या मदतीने अहवाल तयार करणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीकाठावरील बंधारे हटविण्यासह नदीतील गाळ काढणे व पुलांची उंची वाढविण्याचा त्यात समावेश आहे. पूररेषेमुळे बाधित झालेल्या हजारो मिळकतींना या अहवालामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती फरांदे यांनी दिली असून, यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरी व नंदीनीला सन २००८ व २०१६ मध्ये आलेल्या महापुरात नदीकाठावरील रहिवाशी भाग हा पूर्णतः पाण्याखाली गेला होता. त्यामुळे हजारो मिळकतींचेही नुकसान झाले होते. सन २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पूररेषा तयार करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी महापालिका, जलसंपदा व केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या पुणे कार्यालयाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यातून दोन्ही नदीकाठावर निळी व लाल रेषा निश्चित करून या दरम्यान येणाऱ्या मिळकतींना परवानगीच नाकारण्यात आल्याने जवळपास साडेतीन हजार मिळकती अडचणीत सापडल्या आहेत. यावेळी पूररेषा तयार करण्यासह अनेक उपाययोजनाही या संशोधन केंद्राने सुचविल्या होत्या. परंतु, या उपाययोजनांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केला. गोदावरी व नासर्डी नदीपात्राची शहर परिसरातील पूर वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने तत्कालीन लोकप्रतिनीधींनी पूररेषेची व पूरप्रभावित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत जलसंपदा व महानगरपालिकेला सूचना केल्या. नदीपात्रात आवश्यक त्या उपाययोजनांनंतर जसे नदीपात्राची रुंदी न वाढविता नदीपात्रातील बंधारे, केटीवेअर बंधारे काढणे, नदीपात्रातील तळातील गाळ काढणे ही कामे २५ वर्षांत झाली नाहीत. त्यामुळे स्वतः पाहणी केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबत चर्चा केली आहे. आयुक्तांनी पूरप्रभाव क्षेत्र कमी करण्यासाठी एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. दोन पालिकेचे अधिकारी व जलसंपदाचे दोन अभियंते हा अहवाल तयार करणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

पूरप्रभावित क्षेत्र कमी करण्यासाठी उपाययोजना

दोन्ही नद्यांवरील जुन्या पुलांची उंची वाढविणे, आनंदवल्लीचा बंधारा हटवणे, होळकर पुलाखालील बंधारा हटवून बॅरेज गेट उभारणे, दोन्ही नद्यांमधील गाळ उपसणे, खोल पात्रातील भागात संरक्षक भिंत उभारणे, फॉरेस्ट, आसाराम बापू, रामवाडी, उंटवाडी पूल उंच व नवीन करणे, मल्हारखान येथे संरक्षक भिंत बांधणे, नंदीनीवरील तिडके कॉलनी, पखालरोड, वडाळारोड, नासर्डी पुलाची उंची वाढविणे, बलून टाईपची बंधारे उभारणे, उंटवाडी पुलाच्या स्लॅबखालील बीमची खोली कमी करणे, पुराचे सुयोग्य नियोजनासाठी संगणीकृत पूरपूर्वानुमान केंद्रांची निर्मिती

पूरप्रभाव क्षेत्र कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी शंभर कोटींचा खर्च येणार आहे. परंतु, त्यामुळे हजारो मिळकतींना संरक्षण मिळणार असून, भविष्यातील पुराचा धोकाही टळणार आहे.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळी महाराज देवस्थानची दानपेटी सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटी येथील जागृतस्थान असलेल्या श्री क्षेत्र बळी महाराज देवस्थान मंदिराची दानपेटी सील करण्याचे आदेश धर्मादाय उपायुक्त राहुल मामू यांनी दिले आहेत. या आदेशात यापुढील व्यवहार धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक सुभाष हळदे यांच्या मार्फत केले जातील व मंदिराचे स्वतंत्र खाते उघडले जाणार असल्याचेही म्हटले आहे.

बळी महाराज मंदिराच्या नोंदणीवरून धर्मादाय आयुक्त कार्यालयात वाद सुरू असून, वाळू शिंदे, अनंता सूर्यवंशी व विजय अभंग यांनी आपणच विश्वस्त असल्याचा दावा करीत नोंदणीची मागणी केली आहे. दरम्यानच्या काळात या मंदिरात गोळा होणारी वर्गणी व दानपेटीवरूनही वाद होता. त्यामुळे विजय अभंग यांनी दानपेटी सील करण्याची मागणी करणारा अर्ज दिला. त्यावर धर्मादाय उपायुक्त यांनी हे आदेश दिले. अभंग यांच्यातर्फे अॅड. एम. डी. कुलकर्णी, अॅड. यू. पी. वाळुंज व अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी युक्तिवाद केला.

सर्वांना वाटते ट्रस्टी व्हावे

बळी महाराज देवस्थान मंदिर राष्ट्रीय महामार्गालगत येत असल्याने नवीन मंदिर रासबिहारी शाळे जवळील मोकळ्या जागेत विस्तारण्यात आले. नवीन मंदिराचे काम सुरू झाल्यापासून हा वाद सुरू झाला. आपसातील मतभेदांमुळे व भाऊबंदकीच्या वादामुळे या परिसरातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला ट्रस्टी व्हाव, यासाठी चाढाओढ सुरू झाली. त्यामुळे सर्व एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. हा वाद स्थानिक पातळीवर न मिटता तो तीन वर्षांपूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाऊन पोहोचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचनेवर आठ हरकती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर सध्या हरकती व सूचना दाखल केल्या जात असून, आतापर्यंत आठ हरकती विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यात विशेषतः प्रभागांची मोडतोड करण्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. कौस्तुभ परांजपे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवरच आक्षेप घेतला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिवाळीमुळे हरकतींवरील सुनावणीला ९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुनावणींसाठी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची आयोगाने नियुक्ती केली आहे.

मनपा निवडणुकीसाठी जाहीर प्रभार रचनेवर सध्या हरकती व सूचना मागविल्या जात आहेत. येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत या हरकती व सूचना दाखल करायच्या आहेत. आतापर्यंत शैलेश ढगे (प्रभाग १७), अजिंक्य साने (प्रभाग १३), सत्यभामा गाडेकर (प्रभाग १९), नितीन चिडे (प्रभाग २१), संजय भालेवराव (प्रभाग १७), परेश लोखे (प्रभाग २०), करणसिंग बावरी (प्रभाग १५) यांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. कौस्तुभ परांजपे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवरच आक्षेप घेतला आहे. आयोगाने या हरकतींवर सुनावणीसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, दिवाळीमुळे ही मुदत वाढवली आहे. आता ४ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी केली जाणार आहे.

दीपक कपूर यांची नियुक्ती

या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची नियुक्ती केली आहे. कपूर हे हरकतींवर सुनावणी घेऊन त्या संदर्भातील स्पष्ट अहवाल महापालिका आयुक्तांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी त्यांना या सुनावणी घेण्यास मदत करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत अधिकारीच उदासीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारींवर कारवाई करायला हवी, तक्रारदारांचे आरोप खोडून काढायला हवेत, असे प्रशासनाच्या विविध कार्यालयांमधील सक्षम अधिकारीच भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत उदासीन असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या विषयावरील बैठकीला दांडी मारून मुजोर अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारी परिपत्रकाचा अवमान केला म्हणून संबंधितांना नोटीस काढण्याचा निर्णय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. तब्बल तीन महिन्यांनी आयोजित या बैठकीत १४ तक्रारींवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र त्यापैकी निम्म्याहून अधिक तक्रारींवर संबंधित विभागांकडून कार्यवाहीच झाली नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. बैठकीला त्या त्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी हजर राहाणे अनिवार्य असताना लिपिक किंवा तत्सम कर्मचाऱ्यांना पाठवून अधिकाऱ्यांनी स्वत:च्या निष्क्रियतेचाच पुरावा दिला. अनेक तक्रारींवर ठोस कार्यवाहीच झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर बगाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीबाबत सूचना देऊनही सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहाणे हा सरकारी परिपत्रकाचा अवमान असून, संबंधितांना नोटीस काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

भ्रष्टाचाराच्या पाच नवीन तक्रारी

बगाटे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत भ्रष्टाचारासंबंधी पाच नवीन तक्रारी करण्यात आल्या. पेठ तालुक्यातील निरगुडे येथील आश्रमशाळेत बोगस नोकर भरतीद्वारे आठ लाख १६ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यात आल्याची तक्रार बापू बैरागी यांनी केली आहे. याखेरीज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेबाबत सटाणा तालुक्यात अपहार झाल्याची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याखेरीज अन्य तीन तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांना आदेश

वर्षभरापूर्वी दाखल प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत तोंडी माहिती न देता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, त्याची एक प्रत संबंधित तक्रारदारालाही दिली जावी. कार्यवाहीनंतर सेवापुस्तकात नोंद घेतली असेल, तर त्याचे पुरावेही अधिकाऱ्यांनी सादर करावेत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यपालांच्या दौऱ्याची प्रशासनाकडून चोख तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस’ यांच्या परिषदेच्या निमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर राव नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुरक्षेसह एकूणच व्यवस्थेबाबत चोख तयारी करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संबंधित विभागांना दिल्या.

या दौऱ्यात राज्यपालांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी पावणेदहाच्या सुमारास राज्यपालांचे पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेत होणाऱ्या परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ते पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. राज्यपालांच्या सुरक्षेसह एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले. राज्यपाल जातील त्या मार्गावर स्वच्छता राहील, याची खबरदारी घेण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. राज्यपालांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात काळजी घेण्याबाबतच्या सूचना दिल्याचे खेडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडकरांच्या आरोग्याशी खेळ

$
0
0

पंचायत समितीच्या बैठकीला आरोग्य अधिकाऱ्यांची दांडी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

डेंग्यूसदृश आजाराने तालुक्यात नुकताच एका जणाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत निफाड तालुक्यातील आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निफाड पंचायत समितीच्या मासिक सभेला आरोग्याविषयी प्रश्नांना सामोरे जायला नको या धाकाने अधिकाऱ्यांनी दांडी मारली, असा आरोप सदस्यांकडून करण्यात आला.

आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे पंचायत समितीच्या बैठकीत समोर आले आहे. या बैठकीला एकही आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे गेल्या अनेक मिटिंगपासून या विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे पंचायत समिती सदस्यांनी लक्षात आणून दिले. या सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली. शासकीय योजना या केवळ कागदावरच असतात, प्रत्यक्षात येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी यापासून वंचितच राहतात, असा आरोप सदस्यांनी केला

गेल्या वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकल देण्यात येणार होत्या. मात्र अद्यापही लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे आता प्रशासन केवळ योजना राबविते मात्र त्या केवळ कागदावरच राहतात की काय असाही प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. या संदर्भात सदस्य प्रकाश पाटील यांनी कामचुकार आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आरोग्य विभागचे डॉ. चव्हाण आतापर्यंत एकाही मिटिंगला उपस्थित राहिलेले नाहीत, असे ते म्हणाले. जेव्हा वीज हवी होती तेव्हा भारनियमन केले आता ८ तांसावरून वीजपुरवठा १२ तास करण्यात आला. परंतु, आता याचा काही एक उपयोग नसून, डिसेंबरनंतरही १२ तासही वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली. टाकळी-विंचूर येथील बंधाऱ्याच्या कामासाठी निधी मंजूर का नाही झाला असा प्रश्न उपस्थित केला. तसेच ज्या ठिकणी एकही काम झाले नाही त्याठिकाणी पूर्ण निधी पोहोचला मात्र ज्या ठिकाणी अर्ध्या टप्यात काम झालेले आहे, तिथे अद्यापही एकही रुपया पोहोचलेला नाही. याचा अर्थ काय समजायचं असा प्रश्न पाटील यांनी अधिकारीवर्गाला विचारला.

संपूर्ण सभेत सर्वाधिक प्रश्ने ही प्रकाश पाटील, राजाभाऊ दरेकर, संदीप सोनवणे, लक्ष्मीबाई खरात यांनी उपस्थित केले. तसेच रखडलेले प्रकरण त्वरित अंमलात आणावे. लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा, अशी एकमुखी मागणी केली. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पिंपळगाव येथील शाळेतील एका या शिक्षकाला परस्पर सक्तीच्या रजेवर पाठवले. याबाबत सभापतींना कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याचे यावेळी समोर आले. यावर सदस्यांनी आक्षेप घेतला.

सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी

डेंग्यूचा विळखा ग्रामीण भागापर्यंत आला असताना आरोग्यविभाग मात्र सुस्त आहे. त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि डॉ. चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. सदस्य प्रकाश पाटील यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. याआधी झालेल्या सभेत आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात आला परंतु, अनेक महिने उलटून गेले तरीदेखील अहवाल सादर करण्यास आरोग्य अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. तसेच कृषी अधिकारी शेतकऱ्यापर्यंत योजना का पोहोचवत नाही, असे खडेबोल पाटील यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>