Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्या’ गावांची मिटली पाणीचिंता!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पाणीटंचाईच्या गर्तेत अडकलेल्या सिन्नर तालुक्यातील जामगावसह खापराळे आणि चंद्रपूर या आदिवासीबहुल गावांमध्ये आता मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची पाण्याची चिंता मिटणार आहे. सीएसआर निधीतून गावांमध्ये झालेल्या कामांमुळे येथील एक हजार ६२४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होऊ लागली आहे.
या तीनही गावांमधील एकूण लोकसंख्या पाच हजारांहूनही कमी आहे. जामगाव येथे स्वतंत्र तर खापराळे आणि चंद्रपूर येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावात सिंचनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने येथे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. त्यामुळे महिलांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत असे. ही वणवण थांबावी आणि शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हिंदुस्तान कोकाकोला बेव्हरेजेस, वाटॅर ट्रस्ट ऑर्गनायजेशन, संजीवनी इन्स्टियूट ऑफ एम्पॉवरमेंट अॅण्ड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला आहे. गावातील जास्तीत जास्त शेतीक्षेत्र ओलिताखाली यावे यासाठी सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला. बंधाऱ्यांची डागडूजी, लघु धरणांची बांधणी, पाझर तळ्यांची डागडुजी, सामायिक विहीर बांधणे आदी कामे दीड वर्षापूर्वी या गावांमध्ये हाती घेण्यात आली. यंदा झालेल्या पावसानंतर त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहे. खपराळे आणि चंद्रपूर येथे प्रत्येकी एक लघु धरण बांधण्यात आले आहे. तसेच सिमेंट नाल्याची उंची वाढवून त्याला बांध घालण्यात आल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे. येथील पाणी जमिनीत मुरल्याने आसपासच्या विह‌िरींमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयमा घडवणार नवउद्योजक!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
उद्योजकांच्या कुशल व अकुशल कामगारांबाबत विविध प्रकारच्या मागण्या व अपेक्षा तसेच नवीन उद्योजक घडवण्यासाठी आयमाच्या माध्यमातून औद्योगिक इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन समितीची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयमाचे (अंबड इंडस्ट्र‌िज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) पदाधिकारी व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यात नवीन उद्योजक घडविणे, होतकरू उद्योजकांना ट्रेनिंग देणे तसेच प्लेसमेट सेल स्थापन करणे यावर सखोल चर्चा करण्यात आली. यासाठी आयमातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून, औदयोगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही समिती प्रयत्न करेल. यात उद्योजकांकडून काही प्रतिनिधी व प्रत्येक कॉलेजचा एक प्रतिनिधी या समितीत असेल, असेही अहिरे यांनी सांगितले.
या बैठकीत आयमा व निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे म्हणाले की, उद्योजकांच्या अपेक्षा व नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या अपेक्षा यामध्ये फारच तफावत आहे. नवीन शिकून येणाऱ्या तरुणास लगेच २० ते २५ हजार रुपये पगाराची अपेक्षा असते. केब‌िन, गाडी अशा अपेक्षा असतात. त्यामुळे उद्योजकाच्या विकासाच्या दॄष्टीने नोकरीवर घेतलेल्या तरुणाला एवढा पगार देऊनही अनुभवाची कमतरता व अपूर्ण माहितीमुळे उद्योगाच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.
नवीन नोकरी करणाऱ्या तरुणांनी जेथे आपण नोकरी करतो त्या कंपनीच्या उद्योजकांनी कशाप्रकारे, कोणत्या परिस्थितीतून उद्योग स्थापन केला आहे, हे जाणून घेतले तर ते त्यांच्या पुढील भवितव्याच्या व उद्योजक होण्याच्या दॄष्टीने पुढचे योग्य पाऊल ठरेल, असे प्रतिपादन केले. आयमातर्फे औदयोगिक इन्स्टिस्ट्यूट इंटरॅक्शन समितीची स्थापना झाल्यामुळे असलेली ही तफावत व तरुणांमध्ये मार्गदर्शनाचा पडलेला गॅप भरून निघण्यास मदतच, होर्इल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आयमाचे सरचिटणीस निखील पांचाल यांनी आयमातर्फे लवकरच मुलांना ट्रेनिग व प्रॅक्टिकल अनुभवासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येर्इल, असे सांगितले. या बैठकीत आयमाचे सौमित्र कुलकर्णी, धनंजय दीक्षित, शैलेश पोटे, प्रा. दालकरी, पंचवटी कॉलेजच्या डॉ. रुपाली खैरे, जेडीसी बिटको कॉलेजच्या स्वप्ना पाटील, अशोका युनिव्हर्सलच्या विशाखा वार्इकर, मुंजे इस्टिट्यूटच्या शीतल गुजराथी यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड @८

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थंडीचा कडाका वाढत असून, शुक्रवारी पहाटे निफाडमध्ये जिल्ह्यातील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये ८.० तर नाशिकमध्ये किमान तापमान ८.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. सूर्यादयापूर्वीच्या तीन ते चार मिनिटांपूर्वी नोंदविले जाणारे तापमान हे सर्वात निचांकी असते, अशी रंजक माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली.

गतवर्षी प्रमाणेच यंदाही नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. गतवर्षी येथील किमान तापमान चार अंशांपर्यंत गेले होते. यंदाही नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच निफाड तालुकावासीयांना गारवा झोंबू लागला आहे. नाशिक शहरात शुक्रवारी ८.८ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले. गुरुवारी ते ९.५ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले होते. हेच तापमान शुक्रवारी दीड अंश सेल्सियसने खाली आले. निफाडमध्ये जिल्ह्यातील सर्वात निचांकी ८.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान खाली उतरत असले तरी उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सर्वात नीचांकी तापमानाची नोंद होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच ७.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक थंडीचा जिल्हा म्हणून नाशिक दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्याखालोखाल पुण्यात ९.४ तर जळगावात १०.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. थंड हवेचे ठिकाण अशी ख्याती असलेल्या महाबळेश्वरमध्ये १४.० अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले आहे. त्याहून कमी तापमान यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, नांदेड, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये नोंदविले गेले आहे.

सूर्यादयापूर्वीचे

तापमान महत्त्वाचे

तापमानाच्या नोंदी घेण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. दिवसा तापमान मोजण्यासाठी पाऱ्याचा थर्मामीटर वापरतात, तर रात्री किमान तापमान मोजण्यासाठी स्पीरिटचा वापर करतात. स्पीरिट ज्या वेळेला थिजते ते सर्वात कमी तापमान म्हणून नोंदविले जाते. किमान तापमान मोजणीचे सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे सूर्योदयापूर्वीचे तीन ते चार मिनिटे होय. या वेळेत हे तापमान सर्वात कमी नोंदविले जाते. विशेष म्हणजे ते मध्यरात्र आणि पहाटेपेक्षाही कमी राहाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यू ट्यूब व्हिडीओची डाऊनलोड पडली महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंटरनेटचा अनिर्बंध वापर करणे जणू प्रत्येकाचा हक्क झाला आहे. यू ट्यूब असो की सोशल मीडिया, दुसऱ्याच्या मालकीचा व्हिडीओ, लेखन सहजतेने आपल्या नावावर खपवण्याचा धंदाच सुरू झाला आहे. आपल्याला काय होणार अशा अविर्भाव हे उद्योग केले जातात. असाच काहीसा प्रकार तिघांच्या बाबतीत घडला असून, त्यांच्याविरोधात पायरसी अॅक्टनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन शिंदे, आकाशा लहाने, मोहन राणे (सर्व रा. नाशिक) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. या तिघांनी मिळून एक लघुपट यू ट्यूब व्हिडीओ चॅनेलवर प्रसारीत केला होता. वास्तविक, हा व्हिडीओ २०१५ मध्ये गोरेराम लेनमधील गोदावरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मयुरी उर्फ अनिता मदन जगताप (वय २१) हिने तयार केला होता. कॉलेजमध्ये असताना तयार केलेला हा लघुपट मयुरीने लोकांच्या प्रतिसादासाठी यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केला. काही दिवसानंतर मयुरीने सदर लघुपट यू ट्यूबवरून हटवला. पंरतु, काही दिवसांनी तोच लघुपट वरील तिघा संशयितांनी बॅकग्राऊंड संगीत बदलून आपल्या नावानिशी यू ट्यूबवर टाकला. या बाबतची माहिती मिळताच मयुरीने सदर व्हिडीओची खात्री केली. लघुपटातील हक्कांवर गदा आणण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी वरील कृत्य केल्याची खात्री पटल्याने मयुरीने सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी कॉपीराईट अधिनियमातील ५२ (अ) आणि ६८ (अ) या कलमानुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पीएसआय उबाळे करीत आहेत. लघुपटाच्या कॉपी राईटसमुळे गुन्हा दाखल होण्याचा नाशिकमध्ये हा पहिलाच प्रसंग असू शकतो. मोबाइल, इंटरनेट व त्या अनुषंगाने येणाऱ्या अॅप्समुळे सर्वसामान्यांकडून सातत्याने सायबर क्राईम वा कॉपीराईट अॅक्टचे उल्लंघन होत असते. इंटरनेट वापर करणाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही पुराव्यांची जमवाजमवच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांकडे आढळलेल्या रकमेप्रकरणी अॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) शुक्रवारी बँकेकडून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. या गुन्ह्यात जबाब नोंदवण्याचे व पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याचे एसीबीचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितले.

बाजार समितीचे लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन, टंकलेखक विजय सीताराम निकम आणि लिपिक दिगंबर हिरामण चिखले यांना २५ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या पथकाने अश्वमेधनगर ते आरटीओ चौक या रस्त्यात कौशल्य सुमंगल हॉलसमोर सापळा रचून अटक केली होती. हे तिघे प्रवास करीत असलेल्या कारमध्ये ५७ लाखांच्या रोकड सापडली. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या देयक व इतर बिलांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून ही रक्कम पेठरोडवरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून परस्पर काढून घेतल्याची माहिती एसीबीला मिळाल्यानंतर कारवाई झाली होती. रात्रीच्या वेळी इतकी मोठी रक्कम संशयास्पद पध्दतीने हाताळली जात असल्याने एसीबीने या तिघांविरोधात म्हसरूळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिस अधीक्षक उगले यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली होती. संशयित आरोपींना देखील दोन वेळा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, बाजार समितीमध्ये ५७ लाखांची रोकड ठेवण्याइतकी मोठी तिजोरीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताना बँकेत पॅनकार्ड सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ५७ लाखांची रक्कम काढताना या तरतुदीलाच हरताळ फासण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात समोर आल्याने त्यादृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, तिघा प्रमुख संशयिता व्यतिरिक्त एसीबीने बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांचीही चौकशी केली आहे. यानंतर, एसीबीने जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, अद्याप हे काम सुरू असल्याचे अधीक्षक उगले यांनी सांगितले.

बँकेतून काही कागदपत्रे यापूर्वी जप्त करण्यात आली होती. कागदपत्रांच्या छाननीनंतर पुन्हा नव्याने काही कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. शुक्रवारीदेखील तपास पथकाने बँकेकडून कागदपत्रे ताब्यात घेतली. अद्याप चौकशी सुरू असून, यातून ठोस निष्पन्न झाले की पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चोरीची अखेर खोटी फिर्याद उघडकीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ट्रक चोरीची फिर्याद दाखल होते. मालकाला इन्शुरन्स मिळतो. मात्र, चोरी गेलेल्या ट्रकचा कोणताही थांगपत्ता लागत नाही. ट्रक चोरीच्या या गुन्ह्यांचे गुढ कायम राहते याचे सविस्तर वृत्त ‘मटा’ने जुलै महिन्यात प्रसिध्द केले होते. ‘मटा’च्या वृत्ताची पोलिसांनी दखल घेत सखोल तपास करीत ट्रक चोरीचा बनाव रचणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

यंदाच्या पहिल्या सात महिन्यांतच शहर परिसरातून १० ट्रक चोरीला गेल्या. एवढे मोठे पार्क केलेले वाहन चोरी जाते, मात्र, त्याचा तपासच लागत नसल्याचा सविस्तर अहवाल ‘मटा’ने २७ जुलैच्या अंकात प्रसिध्द केला होता. वास्तविक जुन्या ट्रक भंगारमध्ये विकून ट्रक चोरी झाल्याची फिर्याद दिली जाते का हे तपासणे महत्त्वाचे असल्याचा मुद्दा ‘मटा’ने उपस्थित केला. पोलिस अधिकाऱ्यांनी या भूमिकेला दुजोरा देत कारवाई करण्याचे आदेश दिले. ट्रक चोरीच्या अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप यांना माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पोहोचले. तिथे त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एमएच १३ ए.एक्स. २६८७ हा टाटा कंपनीचा २५१८ या मॉडेलचा ट्रक पोलिसांनी जप्त केला. मात्र, आरोपींकडे चौकशी केला सदर ट्रक हा मूळ मालकाने पुढील कर्ज माफ व्हावे व इन्सुरन्स मिळावा या उद्देशाने विकला असल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या गुन्ह्यात आणखी काही जणांना अटक होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. सदर संशयित भंगार झालेली ट्रक विकत घेऊन ट्रक तोडून नमूद गाडीचे कागदपत्रे चोरलेल्या ट्रकवर चढवून ट्रक विक्रीचा धंदा करीत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

असा झाला ट्रकचा व्यवहार

ट्रकचा मूळ क्रमांक एमएच १५ ईजी ५७०७ असा आहे. मूळ मालकाने हा ट्रक जामनेरच्या संशयितांना विकला. यानंतर नाशिक व धुळे येथील काही जणांनी सदर ट्रकचा क्रमांक बदलून बनावट चेसीज क्रमांक प्रिंट करून जामनेरला विकला. पोलिसांनी हा ट्रक नाशिकला आणला असून, त्याची ओळख पटविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट परस्पर नावे करीत तीन कोटींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

बनावट दस्तऐवज तयार करून वृध्देच्या नावावर असलेला सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा भूखंड परस्पर नावावर करून घेतल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तिघांसह एका महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुणे येथील अनिल दामोदर सावंत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सावंत यांच्या आई शीला दामोदर सावंत (वय ८६) यांच्या नावावर महात्मानगर परिसरातील सर्व्हे नं.७२८ मध्ये ५८६ चौ.मी.चा प्लॉट आहे. बाजारभावानुसार सध्या या प्लॉटची किमत दोन कोटी ८६ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. या प्लॉटबाबत सावंत यांच्या नातेवाईकांनादेखील माहिती होती. याचाच फायदा घेत नातेवाईक अतुल अशोक भंडारी (रा. मनमाड), गिरीश मनोहर सावंत (रा. मुंबई) व जयेश भगवानलाल वर्मा (रा. पेठरोड, पंचवटी) आदींनी संगनमत करून आईच्या संमतीचे बनावट कागदपत्र तयार करून ते अज्ञात महिलेच्या माध्यमातून सरकारी कार्यालयांना सादर करून प्लॉट परस्पर नावे करून घेतल्याचे सावंत यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ जागांसाठी तब्बल १०३ उमेदवार रिंगणात

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी चित्र स्पष्ट झाले. पडद्यामागच्या जोरदार राजकीय हालचाली, गुफ्तगू अशा अनेक बाबींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतानाच महत्त्वपूर्ण नगराध्यक्षपदाच्या लढतीसह विविध प्रभागातील नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठीच्या रिंगणातून नेमकी कुणाकुणाची माघार होणार अन् नेमके कोण-कोण आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीला सामोरं जाणार ही येवला शहरवासीयांना गेल्या काही दिवासांपासून लागलेली मोठी उत्कंठा उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी संपली.

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात राहिल्याने ही लढत ‘षटरंगी’ होणार आहे. पालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी तब्बल १०३ उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या अंतिम दिवसातील प्रत्येक घडामोडींकडे शहरवासीयांच्या नजरा लागल्या होत्या.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवसानंतर येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची थेट जनतेतून होणारी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र समोर आले आहे. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मनोहर जावळे, प्रमोद सस्कर, आनंद शिंदे व राजेश भंडारी या चौघांनी आपले अर्ज माघार घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषाताई माणिकराव शिंदे, भाजपचे बंडू अंबादास क्षीरसागर, काँग्रेस (आय)चे शेख एजाज शेख रियाज यांच्यासह अजहर अली अलताफ अली सैय्यद (अपक्ष), शेख अ. वहाब फकीर मोहमंद (अपक्ष) व भारिप बहुजन महासंघाचे दीपक शशिकांत लाठे या सहा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी ‘षटरंगी’ लढत दिसत असली तरी, भाजपचे बंडू क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या उषाताई शिंदे अन् काँग्रेसचे एजाज शेख यांच्यातच खरा ‘मुकाबला’ होणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरपालिकांसाठी बहुरंगी लढती

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, सटाणा व भगूर या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी कुठे तिरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी, षटरंगी लढती रंगणार आहेत. आज (दि.१२) उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यामुळे आजपासून उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा होऊन रणधुमाळी सुरू होणार आहे. काही उमेदवार व पक्षांनी माघारीपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे आजपासून मतदारांच्या गाठीभेटी वाढणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने चुरस वाढली आहे.

भगूरमध्ये रंगणार तिरंगी लढत

भगूर नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत एकूण १९ उमेदवारांनी माघार घेतली. रिंगणात नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत.

शुक्रवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी उडणार असून, आज (दि.१२) उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ​या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिता करंजकर, भाजपकडून शोभा भागवत, तर काँगेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रेरणा बलकवडे या रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी शिवसेनेने १७ जागांवर, भाजपने १६ व आघाडीकडून १५ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. प्राजक्ता बागडे, दत्त कुंवर, चेतन बागडे, विलास पिंगळ असे चार अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

अनिता करंजकर (शिवसेना), शोभा भागवत (भाजप), प्रेरणा बलकवडे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)

माघार घेतलेले उमेदवार

अश्विनी मोरे, सुमीत चव्हाण, सचिन दुर्गुडे, मदन गायकवाड, युसूफ खान, संदीप गोरे, विनोद लोट, विनायक काळे, वर्षा पंडोरे, चेतक बलकवडे, मोहिनी वालझाडे, श्रीकांत सोनवणे, फरीद शेख आदी.

नांदगावमध्ये रंगणार पंचरंगी लढत

नांदगाव नगरपरिषदेत थेट नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून, शुक्रवारी चार जणांनी माघार घेतली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

अरुण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश कवडे (शिवसेना), संजय सानप (भारतीय जनता पक्ष), शिवाजी पाटील (अपक्ष), कल्पना वाघ (अपक्ष). चार पुरुष उमेदवारांविरोधात एकमेव महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे, ही बाब लक्षवेधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानपेट्यांमध्ये अडकले भाविकांचे दान!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com
Tweet : bidvepravinMT

नाशिक : काही देवस्थानांमधील ट्रस्टींचे वाद कोर्टापर्यंत गेल्याने तेथील दानपेट्या उघडण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांकडे केंद्रित झाले आहेत. अशा दानपेटीत अडकलेली रक्कम व्यवहारात यावी, यासाठी काही देवस्थानांनी दानपेट्या उघडण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना साकडे घालण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पेट्यांमध्ये अडकून पडलेल्या नोटाही लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकनुसार पाचशे आणि हजाराच्या नोटा केवळ ११ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स, मेडिकल्स अशा ठिकाणी चलनात वापरता येणार आहेत. त्यानंतर त्या बाजारपेठेत रद्दी ठरणार असून, बँकांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंतच त्या स्वीकारण्यात येणार आहेत. या नोटा शनिवारपासून चलनातून कायमस्वरूपी बाद होणार आहेत. म्हणूनच अशा नोटांचा भरणा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी उसळली आहे.

मंदिरांचे शहर म्हणून लौकिक असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरांमधील दानपेट्यांत मोठ्या प्रमाणावर दानही जमा होते. एकीकडे १०० रुपये आणि त्याखालील नोटांचा बाजारपेठेत प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना शहरातील काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, नवश्या गणपती मंदिर व तत्सम देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये लाखो रुपये असण्याची शक्यता आहे. याखेरीज पाचशे आणि हजाराच्या नोटा बाजारात वटत नसल्याने काहींकडून अशा नोटा मंदिरांमधील दानपेटीत टाकण्याचे दातृत्व दाखविले जाऊ लागले आहे.

परस्परविरोधी ट्रस्टींमध्ये दिलजमाई

दानपेटीमध्ये जमा झालेल्या १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनात याव्यात म्हणून आता देवस्थानांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. कोर्टात वाद असलेल्या देवस्थानांनी लवकर दानपेट्या उघडता याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दानपेट्यांच्या चाव्या धर्मादाय आयुक्तांकडे असल्याने दानपेट्या उघडण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र धर्मादाय आयुक्तांना देण्याची तयारी देवस्थानांनी सुरू केली आहे. दानपेट्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकांमध्ये जमा करणे आवश्यक आहे. या सर्व प्रकारामुळे एकमेकांमध्ये तात्त्विक वाद असलेल्या ट्रस्टींमध्ये दिलजमाईची शक्यता निर्माण झाली आहे.

अध्यक्षांची वाढणार जबाबदारी

देवस्थानांमधील दानपेट्यांमध्ये जमा होणारी रक्कम सुट्या पैशांच्या स्वरूपात अधिक असते. अगदी पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांचा भरणा असतो. येत्या काही दिवसांत पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात दाखल होतील. मात्र, सुट्या पैशांची चणचण भासणारच आहे. दानपेट्यांमधील अशा शंभर रुपयांपर्यंतच्या नोटा घेऊन त्या बदल्यात पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टवरील अध्यक्ष आणि तत्सम अन्य पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. दानपेट्यांमधील प्राप्त रक्कम आहे तशी बँक अधिकाऱ्यांकडे सोपविले जाण्यापर्यंत या अधिकाऱ्यांना‍ पाठपुरावा करावा लागणार आहे.

गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिरातील दानपेट्यांच्या चाव्या धर्मादाय आयुक्तालयाकडे आहेत. या दानपेट्या उघडाव्यात, असे विनंतीपत्र धर्मादाय आयुक्तांना लवकरच देणार आहोत. ‘धर्मादाय’मधील अधिकारी आणि ट्रस्टचे खाते असलेल्या बँक ऑफ बडोदामधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच या दानपेट्या उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- राजेश जाधव, ट्रस्टी, नवश्या गणपती देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता खर्चायची चिंता

$
0
0

टीम मटा, जळगाव/धुळे

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयानंतर शनिवारी चौथ्या दिवशीही बँकांमध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात भरण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शंभर, पन्नासच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आता खर्चात हात आखडता घेतल्याने बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुटी असते, मात्र आजच्या शनिवारी या बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. नागरिकांनी सकाळी साडेसात-आठ वाजेपासूनच बँकांसमोर रांगा लावलेल्या होत्या. नियमांची पूर्ण माहिती नसणे, तसेच काही बँकांची मनमानी यामुळेही बँक अधिकारी व रांगेतील नागरिक यांच्यात वाद झाले. काही बँकांमध्ये रांग संपत नसल्याने दुपारी तीन वाजेनंतर एक्स्चेंज फॉर्म देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे नागरीक व बँक अधिकारी यांच्यात तू तू मैं मैं झाली.

एक्स्चेंज आठवड्यातून एकदाच

बँकांमधील दर्शनी भागात लावलेल्या सुचनेनुसार, एकावेळेस चार हजार रुपये एक्स्चेंज केल्यानंतर त्या पुढील आठवड्यात नोटा एक्स्चेंज करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे, तरीही अनेकांनी या सूचनेकडे काणाडोळा करत एक्स्चेंजसाठी रांगेत नंबर लावलेला होता.

युनियन बँकेत पोलिस बंदोबस्त

नवी पेठेतील युनियन बँकेच्या शाखेत नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ आली. या बँकेत एक्स्चेंज व विड्रॉलसाठी एकच रांगा असल्याने खातेदारांचा गोंधळ उडत होता. त्यातून रांगेतील क्रमांकावरून खातेधारकांमध्ये वादाच्या घटना घडल्या.

दैनंदिन व्यव्हार विस्कळीत

चलनातून बाद नोटा बँकेत स्वीकारून दोन हजार रुपयांची नवीन नोट नागरिकांना देण्यात येत असली, तरी व्यवहारात शंभर, पन्नास व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याने साधा भाजीपाला खरेदी करणेही नागरिकांसाठी अडचणीचे झाले आहे. आज आठवडे बाजारातही गर्दी नव्हती.


ग्राहक भांडारात घेणार जुन्या नोटा

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील शासकीय ग्राहक भांडारांमध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार धुळे शहरातील ग्राहक भांडारात पाचशे व हजारच्या जुन्या नोटा देऊन खरेदी करता येईल, असे ग्राहक भांडारचे अध्यक्ष अनिल मुंदडा यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ग्राहक भांडारमध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

आयुक्त उशिरापर्यंत थांबून

धुळे महापालिकेत दोन दिवसांत चार कोटींचा करभरणा झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. करापोटी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी मनपात थांबून होते. शनिवारी दुपारपर्यंत तीन कोटी २३ लाखांपर्यंत मालमत्ता कराचा भरणा झाला असून, रात्रीतून ही रक्कम चार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज मनपा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तांची रात्रीपर्यंत ड्युटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेत दोन दिवसांत चार कोटींचा करभरणा झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. करापोटी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी मनपात थांबून होते. शनिवारी दुपारपर्यंत तीन कोटी २३ लाखांपर्यंत मालमत्ता कराचा भरणा झाला असून, रात्रीतून ही रक्कम चार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज मनपा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

ग्राहक भांडारात घेणार जुन्या नोटा

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील शासकीय ग्राहक भांडारांमध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार धुळे शहरातील ग्राहक भांडारात पाचशे व हजारच्या जुन्या नोटा देऊन खरेदी करता येईल, असे ग्राहक भांडारचे अध्यक्ष अनिल मुंदडा यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ग्राहक भांडारमध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या माजी मंत्र्याविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळा गाजत असतानाच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेत घरकुल घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह त्यांचे भाऊ आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात राज्याचे रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल आणि काँग्रेस नेते माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यात वैर आहे. दोंडाईचा पालिकेची निवडणूक या दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची असल्याने त्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. अशात दोंडाईचा घरकुल योजनेमध्ये शासनाची फसवणूक, स्वत:च्या फायद्यासाठी योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, तत्कालिन नगराध्यक्ष रवींद्र भास्कर देशमुख, विक्रम बळीराम पाटील, गुलाबसिंग सुरतसिंग सोनवणे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ, राजेंद्र व्ही. शिंदे, अमोल प्रभाकर बागूल या ७ व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत.
दरम्यान, हा गुन्हा राजकीय सूडभावनेने दाखल करण्यात आरोप या घोटाळ्यातील संशयित आरोपी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणी आपण अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले, तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीठटंचाईने रात्र खराब!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर भारतात आणि मुंबईत मिठाची टंचाई निर्माण झाल्याची अफवा शुक्रवारी रात्री धुळ्यात येऊन धडकली अन् रात्रीतून मीठ खरेदी करण्यासाठी होलसेल बाजार भागातील ऊस गल्लीत नागरिकांची गर्दी उसळली.

देशाच्या काही भागात मीठ टंचाईच्या धास्तीमुळे त्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असल्याचे वृत्त खासगी वृत्तवाहिन्यांवर दिसू लागताच आधीच नोटटंचाईने त्रासलेल्या धुळेकरांची एकच धावपळ सुरू झाली. होलसेल बाजारातील ऊस गल्लीत मीठ खरेदीसाठी गर्दी झाली. त्यातून वाद सुरू झाल्याने या भागात तणाव निर्माण झाला. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने बाजारात दाखल झाले. मीठ टंचाईची केवळ अफवा असल्याचे ते नागरिकांना सांगू लागले. पण त्यांचे काही एक न ऐकता नागरिकांनी मीठ खरेदीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीचार्ज करून शांतता निर्माण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मिठाचा मुबलक साठा उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत मिठाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ते पाचशे रुपये किलो दराने विकले गेल्याची अफवा नाशिकमध्येही पसरली. परंतु, नाशिकमध्ये मुबलक प्रमाणात मीठ उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने केले आहे.

मिठाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, दर गगनाला भिडल्याची अफवा मुंबईमध्ये पसरली होती. एरवी १० ते १५ रुपये किलो दराने विक्री होणारे मीठ पाचशे रुपये किलोने विक्री होत असल्याच्या अफवेने नागरिकांमध्येही गोंधळ निर्माण झाला. काहींनी दुकानांमध्ये जाऊन याबाबत खात्री करवून घेतली. मुंबईत घडलेला हा प्रकार नाशिकमध्येही चर्चेचा विषय ठरला. तुटवड्यामुळे मिठाचे दर किलोला पाचशे रुपयांपर्यंत पोहोचले ही केवळ अफवा असल्याची माहिती नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे सचिव राहुल डागा यांनी दिली. जिल्ह्यात मीठाचा व्यापार करणारे सुमारे ४० व्यापारी आहेत. नाशिक शहरात आणि नाशिकरोड येथे मीठाचे दोन मोठे व्यापारी आहेत. गरजेनुसार रोजच मीठ व्यापाऱ्यांकडून माल मागविला जातो. गुजरातमधील गांधीधाम तसेच मूंबईहूनही माल मागविला जातो. सध्या नाशिकमध्ये मुबलक मीठ उपलब्ध असून, तुटवड्याची शक्यता नसल्याची माहिती डागा यांनी दिली.

मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याने दर ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचले ही निव्वळ अफवा आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. नाशिकमध्ये मुबलक प्रमाणात मीठ उपलब्ध असून, त्याचे दरही पूर्वी इतकेच आहेत.

- प्रफुल्ल संचेती, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटा रद्दला सहकाराचे सहकार्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्लोबल कमांड दिल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसारखेच सहकारी बँकाना राष्ट्रीयकृत बँकेतून १० हजार रुपये एकावेळी काढण्याचे निर्देश मिळाल्यानंतर सहकारी बँकानी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता या बँकांना शुक्रवारपासून पैसे देणे सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ५१२ सहकारी बँकेत नवा पैशांचा खळखळाट सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अजूनही या बँकांना पुरेसा पैसा न पुरवल्याच्या तक्रारी असल्या तरी रविवारी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकेच्या ५२५ शाखा आहेत. त्यात आता सहकारी बँका त्यांच्या साथीला उतरणार असल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. विशेष म्हणजे सहकारी बँकेत पाचशे व हजाराच्या नोटा पहिल्या दिवसापासून स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याचा ताणही मोठ्या बँकेवर आला नाही.

नाशिक जिल्ह्यात ४४ सहकारी नागरी बँका असल्या तरी त्यात मर्चंट बँकेच्या ८१ शाखा आहेत. त्याचप्रमाणे नाशिक रोड- देवळाली बँकेच्या २६, विश्वास बँकेच्या ११, जनलक्ष्मी २६, जनकल्याण १०, पिंपळगाव मर्चंट ०९, ओझर मर्चंट ८, महेश को. ऑप. बँक ७, समर्थ को ऑप. बँक ९, राजलक्ष्मी ६, गोदावरी ५, गिरणा ६, बिझनेस ५, तर इतर सहकारी बँकाही शाखा आहेत. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१२ शाखा आहेत. त्यामुळे ही संख्या ५१२ पर्यंत जाते. ग्रामीण भागापासून शहरी भागातील गल्लीबोळात या बँकाच्या शाखा असल्यामुळे त्याचा उपयोग ग्राहकांना पैसे जमा करण्यात व डिपाझिट करण्यात होत असल्यामुळे चलण आता फिरणार आहे.

ग्लोबल कमांडमध्ये बदल

ग्लोबल कमांडमध्ये बदल करण्यासाठी स्टेट बँकेने त्याच नावाचे नवीन खाते उघडून ही कमांड कमी केल्याचे समजते. त्यामुळे या बँकाना पैसे देणे थोडे अवघड झाले असले तरी आता सुरळीत झाले आहे.

एनडीसीच्या तिजोरीत भर

सहकारी बँकामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक डिपाझिट करीत असून, त्यात एनडीसी या सहकारी बँकेत त्याचे प्रमाण खूप मोठे आहे. शुक्रवारपर्यंत १०० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली, तर आता तो आकडा २०० कोटींहून अधिक जाणार आहे. ५० दिवस मुदत असल्यामुळे एनडीसीबरोबरच इतर बँकामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट खरेदीत फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान ओढा परिसरातील जमिनीचा भाव वधारेल, असे आमिष दाखवत एकाकडून १८ लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यातील संशयित आरोपीविरोधात यापूर्वीदेखील आर्थिक फसवणूकप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

विजय नंदू वानखेडे (स्मिता अपार्ट. पाटील लेन १, कॉलेजरोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वानखेडेने जेलरोड परिसरातील आरंभ कॉलेजजवळील हरिवंदन अर्पाटमेंटमध्ये रहणाऱ्या मुकुंद रामदास रकटे यांची फसवणूक केली. एलआयसी एंजट म्हणून काम पाहणाऱ्या रकटे यांची २०१२ पासून वानखेडे याच्याशी ओळख आहे. वानखेडे एस.डी.एस. नावाची कंपनी चालवतो.

सन २०१४ मध्येच रकटे यांना वानखेडेने ओढा शिवारातील गट क्रमांक १५ मधील फ्लॅट क्रमांक १२ क्षेत्र तीन हजार चौरस मीटर हे विक्रीस असल्याबाबत सांगितले. सन २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या जमिनीला सोन्याचा भाव येईल, असा विश्वास संशयित आरोपीने रकटेंना दिला.

या जमिनीबाबत जेलरोड येथील उषा पाटील, किरण पाटील व उत्कर्षा पाटील यांनी जनरल मुख्यत्यारपत्र लिहून दिल्याचे वानखेडेने दाखवले. यामुळे विश्वास बसलेल्या रकटे यांनी २२ लाख ५० हजार रुपयांना व्यवहार ठरवला. त्यातील १८ लाख रुपये २७ मे २०१५ रोजी संशयित आरोपी वानखेडेला देण्यात आले. यावेळी नोटरी करण्यात आली. प्रत्यक्षात पैसे घेऊनही वानखेडेने उपरोक्त जमीन रकटे यांच्या नावावर केलीच नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर मिळकतीचे जनरल मुखत्यारपत्र वानखेडेने रद्द केले. वानखेडेला फसवणूक करायची होती, असे स्पष्ट झाल्यानंतर रकटे यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

दामदुप्पटमध्येही गुंतवली रक्कम

कंपनीमार्फत वानखेडेने गोट फार्मिंगमध्ये दामदुप्पट पैसे गुंतवणाऱ्यास दामदुप्पट पैसे देण्याची स्किम सुरू केली होती. या योजनेत रकटे यांनी एकदा सात लाख आणि पुन्हा चार लाख अशी रक्कम गुंतवली. सन २०१४ मध्ये या योजनेची मुदत संपली, तर अद्याप रकटे यांना पैसे मिळालेले नाही. या प्रकरणी वानखेडे विरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढवय्या राणेखानाचे देवपूर

$
0
0

लढवय्या राणेखानाचे देवपूर

नाशिकच्या नसानसांत ऐश्वर्य अन्‌ शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र, या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो. त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची अन्‌ ते जपण्याची गरज आहे, असे सिन्नर तालुक्यातील देवपूर हे गाव पाह‌िलं की वाटायला लागतं. राणेखाणाचे शौर्य, भागवतबाबांची महती अन् शाहिरांची गुरूभूमी या इतिहासाने देवपूर सजले आहे. मात्र देवपूरचा हा प्रवास अस्वस्थ तर करतोच पण, नाशिकचा वारशाची स्थिती पाहून ह्दय पिळवटून टाकतो.

रमेश पडवळ

देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्यामुळे हा इतिहासही जाणून घेणे रोमांचक ठरते. १४ जानेवारी १७६१ ला अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचं तिसरं युद्घ झालं. या युद्धात नानासाहेब पेशव्यांबरोबर १२-१३ वर्षांचे अगदीच नवखे महादजी शिंदे सहभागी झाले होते. मात्र मराठ्यांचे पानिपत होऊ लागलं. ‘पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां महादजीही परत फिरला. वाटेत एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असतां, राणाखान (राणेखान) नांवाच्या एका मराठे लष्करांतील माणसानें त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें.’ असा उल्लेख इतिहासाच्या पानात मिळतो. राणेखान एक पखाली (पाणी वाहणारा) होता. जखमी अवस्थेतेतील महादजींना त्या धामधूमीतून राणेखानाने पुन्हा आपल्या मुलखात आणलं. राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इनाम म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते गावची जहागिरीही दिली. राणेखानास देवनदीचा सहवास आवडल्याने त्याने वास्तवासाठी देवपूरची निवड केली. आतापर्यंत एवढाच राणेखानाचा इतिहास सांगितला जातो. मात्र राणेखानाच्या पराक्रमांची अनेक उदाहरणे इतिहासात नोंदविलेली आहेत.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर १२ किलोमीटरवर देवपूर फाटा लागतो. या फाट्यापासून डावीकडे वळायचे अन्‌ पाच किलोमीटवर देवपूर गाव लागते. गावाजवळ येताच इंग्रजांनी बांधलेला दगडी बंधाऱ्यातून डोकावणारी देवनदी दर्शन देते. रस्त्यालगत दिसणारी मरीआई व खंडोबांचे मंदिर दर्शन देतात. अजून थोड पुढे जाऊन डावीकडे वळाल्यावर आपण गावाबाहेरच्या वेशीसमोर असलेल्या पारावर पोहोचतो. पारामागे लहानमोठी दोन-चार मंदिरे पहायला मिळतात. पखाल्याचा सरदार झालेला राणेखानाने देवपुराभवती कोट बांधत कोटात भव्य वाडावजा हवेली बांधली. कोटाला दोन दरवाजे आहेत. दोन्हींची अवस्था दयनीय आहे. त्यातल्या त्यात पारासमोरचा उत्तरदरवाजा अर्थात सध्याचा महात्मा गांधी प्रवेशद्वाराची स्थिती बरी आहे. तर बडाबागेकडे तोंड करून असलेला पश्च‌िम दरवाजा आता कोसळण्याच्या स्थितीत आहे. याची व हवेलीची सुंदर बांधणी मात्र खिळवून ठेवते. राणेखानाने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही, असे मनोहर गडाख व भागवत गडाख सांगतात. याच धर्मसमभावाचे दर्शन घडवीत राणेखानाने गावात मशिद व त्याच्याच शेजारी हनुमान मंदिरही बांधले ते आजही पहायला मिळते. ते पुढे असेही सांगतात की, राणेखान हा प्रामाणिक अन्‌ निष्ठावान होता. आपल्याला मिळालेल्या सत्तेचा त्याने कधीही गैरवापर केला नाही. गावात प्रवेश करताना राणेखान वेशीबाहेरच घोड्यावरून उतरत अन्‌ हवेलीपर्यंत पायी चालत जात. यातून त्यांची प्रजेबद्दलची आपुलकी त्याने अनेक माध्यमातून दाखवून दिली होती. म्हणूनच त्याच्याबद्दलच्या अनेक चांगल्या अख्यायिका गायिल्या जातात. मशिदीसमोर अन्‌ देवनदीच्या काठावर उभी असलेल्या राणेखानाच्या चार मजली हवेलीने आता देह ठेवला आहे. मात्र हवेलीचे अवशेष आजही राणेखानाचा इतिहास जागा करतात. पानिपतच्या पराभवानंतर त्याचा बदला चुकवायला अकरा वर्षे लागली अन् तो बदला दिल्लीवर नियंत्रण मिळवित महादजी शिंदेंनी चुकता केला. यात त्यांना राणेखानाची मोलाची साथ मिळाली. अनेक लढाया अन्‌ कुरघोड्या मोडून काढण्यात राणेखान वस्ताद होते. १७८७ मध्ये जयपूरचा राजा प्रतापसिंग व महादजी शिंदे यांच्या लढाईत सरदार राणेखान सहभागी होता. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हा गुलाम काद‌‌िरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरिता इ. स. १७८८ साली राणेखानास दिल्लीस पाठविले होते. गुलाम का‌‌द‌िर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता. अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. दिल्लीच्या शहाअलमने त्याला राजा हिंमतबहाद्दर ही पदवी दिली होती. कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुपगीरने गोसाव्यांचें एक छोटेसे सैन्य तयार केले होते. गोसाव्यांचा सरदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आपल्या कुरापतींमुळे अयोध्येचा नबाब, होळकर, बुंदेलखंडचा अलीबहाद्दर, नाना फडणिस, दत्ताजी शिंदे, जयपूरकर, जोधपूरकरकरांना देखील हैराण केले होते. अनुपगीरला शरण आणण्याची कामगिरी राणेखानाकडे सोपविण्यात आली. १७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत पाटीलबाबास शरण आणले. तसेच बादशाहीला हैराण करणाऱ्या गुलाम कादिरच्या बंदोबस्तामुळे मराठ्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा परत मिळून उत्तरेत त्यांचा वचक पूर्ववत बसला, हे श्रेय महादजी अर्थातच राणेखानाचेच. अलीगडचे पूर्वीचे नाव रामगड असून, नजीबखान रोहिल्याने ते बदलले असा उल्लेख गोविंदराव पुरूषोत्तम यांच्या १७८३ च्या पत्रात आढळतो. पत्रात ते म्हणतात, ‘नजीबखानानें ज्या रामगडचे अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे. (राजवाडे खंड. १२. ५०, ३६).’ असा उल्लेख मिळतो. हिंदू व मुस्लिम सत्तेत रण पेटले असताना राणेखान पादशाहीसाठी महादजी शिंदे बरोबर रणांगणात लढत होता. यावरून राणेखानाची महादजींबद्दलची निष्ठा समोर येते. राणेखानाच्या अशाच अनेक कामगिरींचा लेखाजोखा मात्र पडद्याआड राहिल्याचेही देवपूर पाहताना लक्षात येते. कारण तेथे हा पराक्रम सांगणारी माहिती मिळत नाही.

राणेखान २२ डिसेंबर १७९१ ला कायमचा देवपूरच्या मातीत एकरूप झाला. राणेखानाचा मृत्यू हा देखील अज्ञात इतिहास आहे. देवनदी काठावरील राणेखानाच्या महालाच्या प्रवेशद्वारासमोरच नदीपलीकडे राणेखानाने आपले आई-वडील अन्‌ नर्तकी यांच्या कबरीसाठी बडाबाग नावाची शाही कब्रस्तान तयार केली होती. या बडाबागेतच नंतर राणेखानाची दगडी बांधणीची व नक्ष‌ीकाम केलेली सर्वात मोठी व सुंदर कबर आज पहायला मिळते. बडाबागेला किल्ल्यासारखा पूर्व दरवाजा आहे. या दरवाज्यात उभे राहिले की, राणेखानाची हवेली दिसते. मात्र, बडाबागेभवतीचा भक्कम कोट पडला आहे. अनेक कबरींची नासधूस झालेली दिसते. राणेखानाची कबर एक मराठा-मुस्लिम वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. सुंदर कबरीची इमारत, कोरीव काम केलेले दरवाज्यांच्या कमानी, खिडक्या व नक्षीदार घुमट, त्यावरील नक्षीकाम, मनोरे, इमारतींना जोडणारी दगडी पायवाट अन्‌ दुर्लक्षित कारंजे पाहून मन हेलावते. या परिसराची सुंदरता म्हणजे प्रत्यक्ष अनुभवणेच योग्य. शांत परिसर अन् नदीकिनारी असलेली ही सुंदर समाधी राणेखानाचे व्यक्त‌िमत्त्वही उलगडते.

देवपूर बाबा भागवतांची संजीवनी समाधी गाववेशीतून आत गेल्यावर उजव्या हाताला आहे. समाधीवास्तू एखाद्या वाड्यासारखी दुमजली आहे. इमारतीच्या मध्यभागी बाबांचे समाधीस्थान आहे. बाबांचे सहाव्या पिढीतील वंशज दिगंबर महाराज व त्यांचे नातू प्रसाद भागवत मंदिराची व्यवस्था पाहतात. भागवत बाबा मूळचे नगरसूलचे. त्यांचे वडील महादेवबुवा व आई उमाबाई हे कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जात असताना गर्भवती असलेल्या उमाबाईंना देवपुरात पुत्र झाला. हाच पुत्र पुढे बाबा भागवत म्हणून प्रसिद्ध झाले. भागवत बाबांनी ग्रामस्थांच्या हितासाठी खूप कामे केली. त्यांची ख्याती ऐकून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्र्यंबकराव डेंगळ्यांच्या हस्ते बाबांसाठी त्या काळात दोन हजार रुपये व वस्त्रं पाठविली. मात्र बाबांनी ती नाकारत ते धन ग्रामस्थांसाठी उपयोगात आणले. फर्दापूर हे गाव भागवत बाबांना इनाम म्हणून मिळाले होते. वावी गावातून कीर्तन शिकण्यासाठी भागवत बाबांकडे आलेल्या परशरामाला बाबांनी तू शाहीर असल्याची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. पुढे तोच शाहीर परशराम म्हणून प्रसिद्ध झाला. या शाहिरांनी देखील आपले गुरू म्हणून बाबा भागवतांचा उल्लेख केला आहे. म्हणूनच शाहीर अमर शेख यांनी गावात १९५५ ला शाहीर संमेलन घेतले होते. या संमेलनात दोनशे शाहीर सहभागी झाले होत अन् हे संमेलन दोन महिने सुरू होते. ही नोंद देखील देवपूरच्या इतिहासातील एक अनोखे पान आहे. गावात १९६० पासून बोहाड्यांची परंपराही बंद झाली आहे. गावात अनेक मंदिरे आहेत. पण पारावर भेटलेले निवृत्त नौदल कर्मचारी प्रभू कांबळेंच्या विक्रांतवरील सेवेचे अनुभव ऐकताना नतमस्तक व्हायला होतं.

देवपूर गावाला राजकीय दृष्ट्याही महत्त्व आहे. नंतरच्या काळात देवपूरवर कम्युनिस्टांचा प्रभाव दिसतो. कम्युनिस्टांचे व नाना गडाखांचे देवपूर म्हणून गावाला ओळख आहे. मात्र हा वारसाही पुसट होत आहे. ऐतिहासिक, धार्मिक अन् राजकीय वारसा अंगभूत असलेल्या देवपूरचा देव्हारा मात्र आता रिकामा वाटतो. देवपूरकडे कोणीच लक्ष देत नाहीत, असे म्हणण्यापेक्षा आमचे देवपूर आम्हीच जपू, अशी इच्छाशक्तीही निर्माण होणे गरजेचे आहे. राणेखानाचे ऐश्वर्य, भागवतबाबांची महती अन्‌ शाहिरांची भूमी विस्कटलेली पाहून डोळे भरून येतात. देवपूरचा इतिहास मातीमोल होणार आहे का? हा प्रश्न मन पिळवटून टाकतो.

Ramesh.padwal@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगा वाढल्या, पैसे घटले

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध बँकांमध्ये शनिवारी शासकीय, तसेच आैद्योगिक साप्ताहिक सुटीमुळे नोटा बदलण्यासाठी व डिपाॅझिट करण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. सकाळपासूनच बँकांसमोर मोठ्या रांगा लागल्यामुळे तिसऱ्या दिवशी बँकांवर प्रचंड ताण आला. ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर दोन दिवस झालेल्या गर्दीपेक्षा तिसऱ्या दिवशीची गर्दी प्रचंड होती. रांगा वाढल्या, पैसे घटले अशी स्थिती शहरभर दिसून आली. आज, रविवारी (दि. १३)सुद्धा गर्दीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे बँकांकडून शनिवारीच त्यासंदर्भातील नियोजन करण्यात येत होते.

शनिवारी सकाळपासून सुरू झालेली गर्दी कमी होत नसल्यामुळे अखेर अनेक बँकांनी टोकन सिस्टिम सुरू करून ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी यावे, असा अाग्रह धरला. त्यासाठी स्वतंत्र काउंटर उघडण्याची तयारीसुद्धा दाखवली. पण, काही ठिकाणी ग्राहकांनी बँकांचे म्हणणे एेकले, तर काही ठिकाणी ग्राहकांनी लगेचच पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे बँकेपुढेही पेच निर्माण झाला.

कॅश शाॅर्टेजचा प्रश्न

ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे शनिवारी ठिकठिकाणी बँकांमध्ये कॅश शाॅर्टेजचा प्रश्न निर्माण झाला. पण, काही बँकांनी सायंकाळी उशिरापर्यंत पैसेवाटप करून डिपाॅझिटही केेले. त्यामुळे ग्राहकांची नाराजी दूर होण्यास मदत झाली.

काउंटिंग मशिन हिट

सतत कॅश काउंटिंग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या मशिन हिट झाल्याचा प्रश्नही काही बँकांत उपस्थित झाला. त्यामुळे बँकांनी त्यावर उपाय शोधत काही काळ कॅश हाताने मोजल्याचे प्रकारही घडले. पण, हा प्रश्न सर्वच बँकांना डोकेदुखी ठरू लागला असून, त्याबाबतच्या तक्रारी मुख्यालयात येऊ लागल्या आहेत.

बँक कर्मचारी त्रस्त

गेल्या तीन दिवसांपासून बँकांत वाढत असलेली गर्दी व वाढवलेल्या वेळामुळे बँक कर्मचारी त्रस्त झाले आहे. ग्राहकांशी वादावादी, माहितीसाठी वारंवार विचारले जाणारे तेच तेच प्रश्न यामुळे त्यात भर पडली आहे. सुटीच्या दिवशी बँक सुरू ठेवणे व त्यात रात्री उशिरापर्यंत बँकेत हिशेबाचा ताळमेळ घालणे हे काम अंगावर आल्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सोमवारी सुटी जाहीर झाली असली, तरी ती रद्द झाल्यास त्यांच्यावर पुन्हा ताण पडणार आहे.

स्पेशल काउंटर वाढवणार

स्टेट बँकेने कॅश एक्स्चेंजसाठी स्पेशल काउंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे डिपाॅझिट व नोटा बदलण्यासाठी स्वतंत्र लाइन करण्यावरही बँक विचार करीत आहे. त्यामुळे गर्दीत कमी होण्यासही ताणही कमी होईल, असे बँकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

स्पेशल व्हेईकल रवाना

कॅश आणण्यासाठी बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेकडे स्पेशल व्हेईकल रवाना झाल्या असून, त्यातून पुरेशी कॅश येणार आहे. त्यामुळे बँकेचा ताण काहीअंशी कमी होणार आहे. दोन हजार व शंभराच्या नोटांबरोबरच आता ५०, २० व १० च्या नोटाही देण्यात येणार आहेत. त्यामुळे चलन फिरण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापनाकडे तक्रारींचा ओघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने समस्यांच्या विळख्यात अडकलेले नागरिक अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रारींचा ओघ कायम असून, आमच्या समस्या सोडवा, असे साकडेच या विभागाला घातले जाऊ लागले आहे. शनिवारी दिवसभर या विभागाचा दूरध्वनी तक्रारींमुळे खणखणत होता.

पाचशे आणि हजाराच्या नोटा पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स यांसारख्या ठिकाणी वटविण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही बँका, टपाल कार्यालये येथील गर्दी कमी होण्याची ‌चिन्हे नाहीत. शनिवारी सरकारी सुटीच्या दिवशीही बॅँका तसेच टपाल कार्यालयांमधील व्यवहार सुरू होते. शनिवारी औद्योगिक वसाहतीला सुटी असल्याने बँकेत पाचशे आणि हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी, तसेच नोटा बदलून घेण्यासाठी कामगारवर्गाने मोठी गर्दी केली. मात्र आजही बॅँका, तसेच टपाल कार्यालयांत उपलब्ध नोटा संपल्याने त्या ‍मिळू न शकल्याचा अनुभव नागरिकांना आला. याबाबतचे गाऱ्हाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अनेकांनी मांडले.

सातपूर आयटीआय पुलाजवळील हॉस्पिटलमध्ये पाचशेच्या नोटा स्वीकारत नसल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकाने केली. सातपूर, मुंबई नाका परिसरात एटीएम सेंटर्स बंद असल्याच्या तक्रारी या विभागाला प्राप्त झाल्या. पंचवटीत मेडिकल स्टोअर्समध्ये पाचशे आणि हजाराच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत. काही खासगी बँकांनीदेखील खातेदार नसलेल्या नागरिकांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली. सेंट्रल बँकेच्या नाशिकरोड शाखेबाहेर नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची एका नागरिकाने तक्रार केली. काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने तशी माहिती या विभागाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. संबंधित ठिकाणी पोहोचून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दिवसागणिक नागरिक आपत्ती व्यपस्थापनाकडे तक्रारींचा ओघ वाढत आहे. यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images