Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एनकेपीएल महाराष्ट्र स्तरावर घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केव्हीएन नाईक शिक्षण संस्था व जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे गेल्या महिन्यात झालेल्या नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग (एनकेपीएल) स्पर्धा आता महाराष्ट्र स्तरावर घेणार असल्याची माहिती केव्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी शनिवारी जाहीर केले. ही स्पर्धा दरवर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. एनकेपीएल स्पर्धेतील संघमालकांचा सत्कार सोहळा शनिवारी हॉटेल करी लीव्हमध्ये झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघांच्या मालकांचा सत्कार करण्यात आला. केव्हीएन नाईक संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सचिव हेमंत धात्रक, तानाजी जायभावे, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, मोहन गायकवाड, प्रकाश बोराडे, भाऊसाहेब जाधव, क्रीडाधिकारी अविनाश टिळे प्रमुख पाहुणे होते. स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

एनकेपीएलचा पहिल्या सिझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या स्पर्धेचा दुसरा सिझनही दिमाखात घेणार असून, त्याची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे हेमंत धात्रक यांनी सांगितले. जिल्हा कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह प्रशांत भाबड यांनी एनकेपीएलचा प्रवास स्पष्ट केला. जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मोहन गायकवाड यांनी स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट केली. एनकेपीएलचा समावेश महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या स्पर्धा कार्यक्रमात समाविष्ट झाला असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. आमदार जयंत जाधव यांनी केव्हीएन नाईक संस्थेचे कौतुक केले. संस्थेमुळे स्पर्धा दिमाखात झाल्याचे त्यांनी नमूद केले. केव्हीएन नाईक संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या सुषमा पुंडे यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी जायभावे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१५ दिवसांत ८० अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, उत्पादन व वाहतूक टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात कारवाई सुरू केली आहे. भरारी पथकामार्फत छापे टाकण्यात येत असून, मागील १५ दिवसांत तब्बल आठ लाख रुपयांचा मद्य साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी १४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८० संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे.

शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीचा रंग चढला आहे. स्थानिक निवडणुकीत पैसा आणि मद्याचा महापूर वाहतो, असे चित्र नेहमीच दिसते. पैशांची ताकद वापरत सक्षम उमेदवार निवडून येऊ शकतात. उमेदवारांकडून पैशांप्रमाणेच मद्याचाही वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री, वाहतूक आणि उत्पादन टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक्ससाईज विभागाला सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर मागील १५ दिवसांपासून विभागाने कारवाई सुरू केली. जिल्ह्याभरात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्या मार्फत गावागावात छापा सत्र राबवत गावठी दारू अड्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच अवैध मद्यविक्रीस चाप लावला जात असून अन्य राज्यातून येणाऱ्या मद्यावर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

चेकनाक्यावर बंदोबस्त

या काळात गुजरातमार्गे दमण येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची ने-आण होते. या प्रकाराला वेळीच पायबंद घालण्यासाठी गुजरातमार्गे राज्यात येणाऱ्या दमण येथील मद्यसाठा रोखण्यासाठी चेकनाक्यांवर २४ तास अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बाजाराला वाहनांचा वेढा

$
0
0

महात्मानगर येथील बाजाराची स्थिती; कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी उभारलेल्या पालिका बाजारांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. महात्मानगर पाणी टाकीशेजारील महापालिकेच्या पालिका बाजाराला मात्र नेहमी वाहनांचा वेढा घातलेला असतो. विशेष म्हणजे व्यावसायिक व ग्राहकांपेक्षा बाहेरील वाहनधारकांचीच वाहने येथे पार्क होत असतात. यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाने पालिकेबाहेरील वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

महापालिकेने उभारलेले अनेक पालिका बाजार आजही धूळ खात पडून आहेत. परंतु, महात्मानगरच्या पालिका बाजाराला अनेकांनी पसंती दिल्याने सर्वच गाळे व्यावसायिकांनी घेतले आहेत. त्यातच वेळेवर सर्वच गाळेधारक महापालिकेचा कर भरत असतात. मात्र, पालिका बाजारात गाळेधारकांना वाहन पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था असताना इतर वाहनधारकच येथे वाहने पार्क करतात.

महात्मानगर येथील एखा खासगी रुग्णालयातील अनेकांची वाहने पालिका बाजारासमोर लागत असल्याने इमारतीला वाहनांनी जणू वेढा घातल्याचे चित्र दररोज दिसते. वाहनांच्या गर्दीतून संबंधित व्यावसायिकांकडे जाण्यासाठी ग्राहकांना मार्ग शोधवा लागतो. पालिका बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांसाठी असलेल्या जागेवर बाहेरील वाहने पार्किंग करणाऱ्या महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. अनेकदा व्यावसायिक व वाहने पार्क करणाऱ्यांमध्ये किरकोळ वादही होत असतात.

महात्मानगरच्या पालिका बाजाराला वाहनांनी वेढा घाललेला रोज पहायला मिळतो. पालिका बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांपेक्षा बाहेरील नागरिकांकडून वाहने सर्रासपणे पार्क केली जात असल्याने मोठी अडचण निर्माण होते. यावर महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.

- राजेंद्र डोमसे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना संपविण्याचे भाजपचे कारस्थान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

ज्या शिवसेनाप्रमुखांचे बोट धरून २५ वर्षांपूर्वी तुम्ही राज्याच्या राजकारणात आलात त्याच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला संपवण्याचे कटकारस्थान तुम्ही करत असाल, तर यापेक्षा दुसरी कुठलीही मोठी प्रतारणा असू शकत नाही, अशा बोचऱ्या शब्दात राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

भाजप बरोबरची युती तोडत आगामी काळात राज्यातील प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि इच्छुक उमेदवारांचा शनिवारी येवल्यातील आसरा लॉन्सवर मेळावा झाला.

दादा भुसे यांनी नोटाबंदीच्या निर्णयासह विविध प्रश्नांना हात घातला. शिवसेनेने माझ्यासारख्या अनेक तळागाळातील माणसांना मोठे केले आहे. अगदी सामन्यातल्या सामान्य माणसाला घडविण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. हे फक्त शिवसेनेतच होऊ शकते. मात्र, शिवसेनेचे ‘प्रॉडक्शन’ असलेल्यांतील काहीजणांची भूक वाढल्याने ते अन्य पक्षात गेले. मात्र शिवसेनेप्रती निष्ठा असलेला शिवसैनिक आजही तळमळीने शिवसेनेत आहे.

२५ वर्षांपूर्वी शिवसेनेचे बोट धरून भाजप राज्याच्या राजकारणात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लक्षात ठेऊन केंद्रात सत्ता यावी यासाठी कायमच भाजपला मोठेपण दिले. केंद्रात सत्ता आली आणि भाजपच्या डोक्यात हवा गेली. त्यांनी शिवसेनेलाच संपविण्याचा विडा उचलला आहे. यासारखी दुसरी कुठलीही प्रतारणा नाही, अशा शब्दात भुसे यांनी हल्लाबोल केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही उमेदवारीवरून वादविवाद न घालता शिवसेनेला निर्भेळ यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे आवाहन सुहास सामंत यांनी केले. योग्य ठिकाणी योग्य माणसालाच उमेदवारी दिली जाईल. आपापसातील मतभेदाचे जोडे बाहेर काढून सेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन सुहास कांदे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरचे आमदारच करताहेत जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-टीडीएफ व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी शनिवारी कळवण तालुक्यातील अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या पदवीधर शिक्षकांसह शहर पर‌िसरातील कार्यकर्ते यांची बैठक घेतली. यात त्यांनी पदवीधर मतदानासाठी राबविल्या जाणाऱ्या पसंती क्रमाची उपस्थितांना माह‌िती दिली.

डॉ. सुधीर तांबे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘या मतदान प्रक्रियेतील उमेदवार सुशिक्षीत आहेत. तरीही मागील पदवीधर निवडणुकीचा अनुभव पाहता सुमारे १० हजार मतदान बाद झाले होते. आपले बहुमोल मत वाया जावू नये यासाठी प्रत्येकाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे. मतदान अधिकारी यांनी दिलेल्या पेननेच पसंती क्रम इंग्रजीत टाकावेत. दिलेल्या पसंती क्रमापुढे कोणतेही चिन्ह, कंस करू नये व सर्वच पदवीधर मतदारांनी येत्या तीन फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला हक्क बजवावा.

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आण्णासाहेब मराठे, प्राचार्य आर. बी. चौधरी, उपप्राचार्य प्रशांत कोष्टी, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. जी. डी. रुपवते, प्रा. रोहिदास बोबडे, प्रा. किशोर पवार, प्रा. मीना पवार, प्रा. भास्कर बोरसे, प्रा. दिनेश नेरपगार उपस्थित होते. डॉ. सुधीर तांबे परिसरातील शैक्षणिक संस्थांना भेट दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकला चलो रे... सेना की मनसेचे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष आता मुंबईकडे लागले आहे. युती तुटल्यानंतर मनसे व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईतील घडामोडींचा थेट परिणाम नाशिकला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांचे लक्ष राज ठाकरे यांच्याकडे लागले असून, महिनाअखेरीस प्रसिद्ध होणाऱ्या पक्षातील उमेदवारांच्या पहिल्या यादीचे स्वरूप नक्की कसे असेल, याविषयी तर्क लढवण्यात येत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी आता काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे राजकीय घडामोडींनी वेग पकडला असून, सत्ताधारी मनसे याकडे बारीक लक्ष ठेवून आहे. स्वबळावर लढण्याइतपत पक्षाकडे ताकद नसून, सत्तेची चावी जवळ करण्यासाठी मनसेला दुसऱ्या प्रमुख पक्षासोबत जाण्याशिवाय पर्याय दिसून येत नाही. राज ठाकरे यांनी युती किंवा आघाडीबाबत जाहीर वक्तव्यसुद्धा केले होते. मात्र, शिवसेना व भाजपमध्येच जागावाटपावरून तिढा सुटला नाही. अखेरीस युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी शिवसेना किंवा भाजपसोबत मनसे घरोबा करण्याची शक्यता आहे. मुंबईत मनसे उमेदवारांना सेना भाजपच्या लढाईचा थेट फायदा घेण्याची शक्यता नसली तरी मतांमध्ये विभागणी करण्याची ताकद मनसेकडे आहे. नाशिकमध्ये भाजपने युती अथवा आघाडीबाबत सुरुवातीपासून नकारघंटा वाजवली आहे. मनसेपुढे शिवसेनेचा पर्याय असला तरी स्थानिक नेते या युतीला तयारी दर्शवतील काय, असा प्रश्न आहे.

मनसेने दोन दिवसांत जवळपास पावणेपाचशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचा अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर झाला असून, ३० किंवा ३१ जानेवारीला पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवर मुंबईतील घडामोडींचा नक्की काय परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पाटील यांचा युवक, उद्योजकांशी संवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी शनिवारी संदीप फाऊंडेशन येथील पदवीधर मतदारांशी डॉ. पाटील यांनी चर्चा केली. पाटील यांनी नाशिकमधील डॉक्टर व उद्योजकांच्या भेटींवर भर दिला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनीही गाठीभेठींवर भर दिला असताना डॉ. पाटील यांनी पदवीधर व तरुणांशी संपर्क वाढविला आहे. डॉ. पाटील यांनी संदीप फाऊंडेशनमध्ये विद्यार्थी, प्राध्यापकांशी चर्चा केली.

डॉ. पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट आहे. सर्वसामान्यांसह तरुणांना परिवर्तन हवे आहे. युवक परिवर्तनासाठी सज्ज असून शतप्रतिशत भाजपसाठी मतदान करा, निवडून आल्यास पदवीधरांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू, बेरोजगारीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

मतदार जागृत झाला आहे. सर्वसामान्यांसह तरुणांना विकास हवा आहे. प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘मेक इन इंड‌िया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’सारखे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. भाजपला देशात परिवर्तन घडवायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलरोड हागणदारीमुक्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संपूर्ण हागणदारीमुक्त नाशिकसाठी झोपडपट्टीधारकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. मात्र नाशिकरोडचा कॅनॉलरोड हागणदारीमुक्तीसाठी प्रशासन आणि नगरसेविका सुनंदा मोरे प्रयत्न करीत असून, त्याला यश मिळत आहे. हा रोड हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

उपनगरनाका ते जेलरोडची पाणीटाकीदरम्यान कॅनॉलरोड आहे. साडेतीन किलोमीटरच्या या रस्त्यावर एका बाजूला आम्रपाली व अन्य झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक शौचालयांची सुविधा असली तरी लहान मुले व काही नागरिक रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. यामुळे दुर्गंधी वाढण्याबरोबरच आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्याचा वापर वाढला

जेलरोडहून नाशिकला जाण्यासाठी कॅनॉलरोड हा जवळचा मार्ग आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक त्याचा वापर करतात. वेळ व पैसा वाचत असल्याने या मार्गावरून उपनगर, नेहरूनगर, टाकळी आदी भागात जाता येते. उपनगरनाक्यावरून जेलरोडच्या पाण्याच्या टाकीकडे जाताना दिवसा आणि रात्री लहान मुले रस्त्याच्या कडेला शौचास बसलेले असतात. त्यामुळे दुर्गंधी असते.

आरोग्य धोक्यात

कॅनॉलरोडची जागा सरकारी असल्याचे समजते. पूर्वीपासून या जागेकडे दुर्लक्ष केल्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण झाले आहे. कॅनॉलरोडच्या दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गियांच्या इमारती झाल्या आहेत. लहान मुले व नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने माशा नागरी वसाहतीत घोंगावतात. रोगराईची भीती वाढली आहे. झोपडपट्ट्यांचे सांडपाणी चर खोदून सोडून देण्यात आले आहे. वाहने जाताना त्यातील पाणी अंगावर उडते. नगरसेवकांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांनाही मर्यादा येत आहेत.

अपघाताची भीती

या मार्गावर झोपडपट्टीधारकांच्या शेळ्या, कोंबड्या मुक्तपणे वावरत असतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. एसटी महामंडळाने बस सुरू केली होती. मात्र, अपघात झाल्यानंतर बसचालकाला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. त्याचा त्रास आता विद्यार्थी आणि नागरिकांना होत आहे.

अभियानाची मदत

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना शौचालय बांधणीसाठी एकूण बारा हजाराचे अनुदान दिले जाते. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे, त्यांना शौचालय बांधणीसाठी अनुदान दिले जात आहे. कॅनॉलरोडच्या लाभार्थ्यांचे अर्ज आले असून, त्यांच्या जागेची पाहणी केली जात आहे. कॅनॉलरोडला महापालिकेतर्फे सुलभ शौचालये सुरू केले आहे.

कॅनॉलरोड हागणदारीमुक्तीसाठी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. मुलांच्या पालकांकडेही आग्रह धरला जात आहे. संपूर्ण हागणदारीमुक्तीसाठी थोडा वेळ लागेल. नागरिकांनी सहकार्य केल्यास हा प्रश्न निकाली निघेल.

- सुनंदा मोरे, नगरसेविका

कॅनॉलरोडवरून नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांची ये-जा वाढली आहे. त्यांना व स्थानिकांना येथील अस्वच्छतेचा त्रास होतो. महापालिका प्रशासनाने कॅनालरोडकडे लक्ष देऊन नियमित स्वच्छता राहण्यासाठी काळजी घेतल्यास आरोग्याचा प्रश्न निकाली निघेल. - संजय शिंदे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रात्यक्षिक दाखविताना भरला गेला अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत आता प्रशासनाचीच डोकेदुखी ठरली आहे. महापालिका निवडणुकांसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता, देता आता प्रशासनाच्याही नाकीनऊ आले आहे. कर्मचाऱ्यांना डेमो दाखवण्याचा नादात एका अधिकाऱ्यांने थेट अर्जच दाखल केल्याने आता प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

शुक्रवारी शहरातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसतांना प्रभाग क्रमांक २५ मधील हेमंत बिऱ्हाडे यांचा अर्ज बनावट असल्याचे समोर आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ऑनलाइनचा डेमो सुरू असतांना हा अर्ज दाखल झाला असून, आता तो सिस्टीम मधून बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुका शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी अमावस्या असल्याने कोणाचाही अर्ज येणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु प्रभाग क्रमाक २५ मधून हेमंत बिऱ्हाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. परंतु हा अर्ज डेमो दाखवण्याच्या नादातून दाखल झाल्याचे समोर आले आहे.

संबधित अधिकारी हा कर्मचाऱ्यांना ऑनलाइनचे प्रशिक्षण देत असतांना हा अर्ज दाखल झाला. त्यामुळे हा अर्ज एकदा दाखल झाल्यानंतर त्याला सिस्टीम मधून बाहेर काढणे अवघड झाले. विशेष म्हणजे याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व आयुक्त अभिषेक कृष्णा यांनाही दिली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचीच अडचण वाढली आहे. दरम्यान यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले असून, अर्ज फेटाळण्याच्या दिवशी सिस्टीममधून बाद करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजच्या पाण्याने नागरिक त्रस्त

$
0
0

राणेनगर परिसरातील नागरिकांना त्रास

म. टा. वृत्तसेवा, सिडको

राणेनगर परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना आठ दिवसांपूर्वी ड्रेनेजची लाइन फुटल्याने येथे या परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आचारसंहिता सुरू असल्याने महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वाहणाऱ्या या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने ही समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राणेनगर परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी रास्ता खोदत असताना ड्रेनेजची लाइन फुटल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहू लागले. स्थानिक रहिवाशांनी याची तक्रार सिडको विभागीय कार्यालयात केली होती.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

मात्र, आठ दिवस उलटूनही हे काम करण्यासाठी एकही अधिकारी व कर्मचारी येथे फिरकला नसल्याने नागरिकांना आठवड्याभरापासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना अक्षरशः घराचे दरवाजे बंद करून घरातच बसावे लागत आहे. या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही खूप वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील स्थानिक अबालवृद्धांना विविध आजारांची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष केव्हा जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवडणुकीच्या उमेदवारी मिळविण्यापासून विजयश्री मिळविण्याप्रयत्नंच्या गडबडीत असलेल्या एकाही राजकीय नेत्याचे या प्रश्नाकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सामान्य नागरिकांना होणाऱ्या या त्रासाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे पाणी काढून या ड्रेनेजची सुधारणा करावी, अशी मागणी प्रांजली सरोदे, विद्या जाधव, अर्चना देवरे, सारंग बागुल, अनिता वाघ, पौर्णिमा घोष, अमृता पाटील, मालती बोडके, महेश नेरकर, दत्तात्रय जाधव आदींसह नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहाच्या कामाला मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीत व्यापारी बांधव व पर्यटकांची गरज ओळखून देवळाली मर्चंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली. यामुळे पर्यटक, व्यापारी व नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

देवळालीतील झेंडा चौकासमोरील नागझिरा नाल्यावर वर्षभरापूर्वी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, उद्योजक महाराज बिरमानी, तत्कालीन कॅन्टोन्मेन्ट बोर्ड उपाध्यक्ष सचिन ठाकरे आदी मान्यवरांच्या हस्ते या सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा झाला होता. मात्र वर्ष उलटूनही कामास प्रारंभ झाला नव्हता. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने २९ डिसेंबरच्या अंकात स्वच्छतागृहासाठी वेटिंग या शिर्षकाखाली वृत्त प्रसिध्द केले होते. असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कुसाळकर यांना कामासाठी आवश्यक तितके आर्थिक पाठबळ दानशुरांनी दिले नाही. त्यामुळे काम रखडून असून, येत्या काही दिवसात असोसिएशनची बैठक घेऊन स्व-खर्चातून स्वच्छतागृह उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून देवळाली मर्चंट वेल्फेअर असोसिएशनने हे काम सुरू केले आहे. शहरात येणारे पर्यटक, व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी आता लवकरच हे स्वच्छतागृह पूर्णत्वास जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक पोहोचले काठावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन नाशिक विभागातील सहा प्रभागांसाठी १७ इच्छुकांनी १८ ठिकाणी दावेदारी सांगत आपली माहिती भरली आहे. अद्याप त्यांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी यादीवर शिक्कामोर्तब झाले नसून, काठावर बसून इच्छुक उमेदवार आपल्याला संधी मिळणार काय, याची प्रतीक्षा करीत आहेत.

नवीन नाशिकमध्ये २४ ते २९ असे सहा प्रभाग असून, यात प्रमुख राजकीय पक्षांची ताकद पणाला लागली आहे. शिवसेना आणि भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी फौज आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच राष्ट्रवादीकडे थोडीफार ताकद असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून, प्रभाग २४ आणि २९ मधील उमेदवारांनी आपापली माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. माहिती भरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नाही. दाखल झालेल्या अर्जाची प्रत उमेदवारास विभागीय कार्यालयात जमा करावी लागणार आहे. मनसेचे पहिली यादी ३० किंवा ३१ जानेवारीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. इतर प्रमुख पक्षदेखील याच दरम्यान आपले उमेदवार निश्चित करतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने अर्जातील माहिती भरून ठेवत इच्छुक आपल्या उमेदवारीवर दावा करीत पक्षावर दबाव निर्माण करण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग २४ मधून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार प्रवीण सावळीराम तिदमे यांनी वॉर्ड क्रमांक अ, तसेच ड साठी उमदेवारी अर्जावरील माहिती भरली आहे. याच प्रभागातून अ वॉर्डातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. इच्छुक उमेदवारांमधील चढाओढीला सुरुवात झाल्याचे यातून दिसते. प्रभाग २५ (अ)मधून हेमंत ईश्वरलाल बिऱ्हाडे, २६ (ड)मधून अण्णा पाराजी आरोटो, २७ (अ) मधून किरण हरी ढवळे, २८ मधील अ मध्ये नयन दिलीप कोठावदे आणि विजय साहेबराव शिंदे, २८ ब मध्ये भाजपच्या इच्छुक अपर्णा रमेश गाजरे, २८ (ड)मधून साहेबराव गंगाधर दातीर, प्रभाग २९ च्या अ वॉर्डासाठी विठाबाई बाळासाहेब सोनवणे, ब वॉर्डामधून तुषार गजानन नागरे, तसेच संतोष लक्ष्मण सांगळे, क वॉर्डामध्ये मुक्तार अन्सार शेख, तसेच सुरेश रामचंद्र पवार आणि ड वॉर्डामधून शिवसेनेचे इच्छुक रमेश रामजी उघडे यांनी माहिती भरण्यात आघाडी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचे वॉर कॅम्पेन

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने वॉर कॅम्पेनचे अस्त्र वापरण्याचे नियोजन केले आहे. आक्रमक आणि प्रभावी प्रचार करण्यासाठी सेनेचे पदाधिकारी झटून कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या एकमेव जाहीर सभेबरोबरच शहरातील विविध प्रभागांत सेनेतील मंत्र्यांच्या १२ सभा आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो असे भरगच्च नियोजन करण्यात येत आहे.

यंदा कुठल्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसेनेने परिणामकारक रणनीतीचा अवलंब करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपशी युती न करण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केला. तत्पूर्वी, उद्धव यांनी सेनेचे राज्यभरातील पदाधिकारी, सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना आणि वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे उद्धव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. या घोषणेद्वारे सर्व सेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत अवघ्या १४ जागा जिंकणारा भाजप यंदा सत्तास्थापनेच्या वल्गना करीत आहे. प्रत्यक्षात भाजपच्या जवळपास दुप्पट जागा शिवसेनेने गेल्या वेळी जिंकल्या होत्या, तसेच इतर पक्षांतील सत्ताधारी नगरसेवकांच्या जोरावर सद्यःस्थितीत शिवसेनेचे संख्याबळ ५० च्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी वॉर कॅम्पेन करण्याचे सेनेने निश्चित केले आहे. त्यासाठी नाशिकसह मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी झटून कामाला लागले आहेत.

येत्या दोन फेब्रुवारी रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि प्रचार रॅली होणार आहे. याद्वारे शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहे. त्यानंतर दररोज एका शिवसेना मंत्र्याची जाहीर सभा शहराच्या विविध प्रभागांमध्ये घेण्याचे नियोजन आहे. सेनेच्या एकूण १२ मंत्र्यांच्या सभांची आखणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. खान्देशवासीयांची संख्या असलेल्या भागात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, कसमादेवासीयांच्या परिसरात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे अशा पद्धतीने मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १६ जानेवारी रोजी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यास खासदार हेमंत गोडसे यांनी दुजोरा दिला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही सभा झाल्यास त्याचा मोठा फायदा पक्षाला मिळू शकतो, असा शिवसेनेचा कयास आहे. त्याबरोबरच सेनेतील विविध सेलिब्रिटींच्या प्रचार दौऱ्यांची आखणी सुरू आहे. त्यात अभिनेता आदेश बांदेकर यांचा समावेश आहे. आक्रमक आणि मतपरिवर्तन घडेल, अशा प्रचाराची ही रणनीती सत्ता काबीज करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवसेनेला असून, त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सारेच कामाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मत विकणे म्हणजे गुलामगिरीकडे वाटचाल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

संपूर्ण आशिया खंडात केवळ बळकट लोकशाहीमुळे भारत देश शांततापूर्ण देश आहे. मतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. राजकारण हे समाजाचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. प्रलोभन स्वीकारून मतदान करणे म्हणजे स्वतःला विकून गुलामगिरीकडे वाटचाल करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांनी केले.

येथील मसगा कॉलेजातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. त्यांच्या हस्ते तरुणांना निवडणूक पत्र देण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मतदार या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. ठाकोर, प्रा. ए.एम.बिरारी, कुलसचिव आर. एच. शेलार, जयवंत कट्यारे, रमेश सोनावणे आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मनीषा सोनवणे यांनी केले तर प्रा. निकम यांनी आभार मानले.

तहसील कार्यालय

कळवण : मतदान करणे हा आपला पवित्र हक्क असून प्रत्येक मतदाराने मतदान करून संविधानाची पवित्रता राखून कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे मत तहसीलदार कैलास चावंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. के. एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिओ डोस देण्यासाठी साडेतीन हजार पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील आठ लाख बालकांना पहिल्या दिवशी पोलिओ डोस देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली असून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतून पोलिओ मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी रविवारी केले. पोलिओ डोस घेऊ न शकलेल्या बालकांना तीन हजार ५३४ फिरत्या पथकांद्वारे घरोघर जावून डोस दिला जाणार आहे.
बालकाला पोलिओ डोस देऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशिल वाकचौरे, राजेंद्र पोतदार आदी उपस्थित होते. जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहिमेतून आठ लाख नऊ हजार ६४१ बालकांना डोस देण्यात येणार असल्याची माहिती लांडगे यांनी यावेळी दिली. त्यासाठी जिल्ह्यात चार हजार ४६७ बूथ उभारण्यात आले असून, ११ हजार ९५५ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व ९४१ पर्यवेक्षक कार्यरत आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळता चार लाख ४२ हजार ३१९ बालके ही ग्रामीण भागात असून त्यांच्यासाठी तीन हजार १९५ बूथ तयार करण्यात आले आहेत.
प्रत्येक बालकापर्यंत पोहचण्यासाठी आज मोहिमेत पोलिओ डोस घेऊ न शकलेल्या बालकांना तीन हजार ५३४ फिरत्या पथकांद्वारे घरोघर जावून डोस दिला जाणार आहे. शहरी भागात उद्यापासून पाच दिवस तर ग्रामीण भागात उद्यापासून तीन दिवस प्रत्येक घरी फिरते पथक जाईल. याव्यतिरिक्त २५३ मोबाइल टीम खेडी व अतिदुर्गम भागातील बालकांचा शोध घेऊन डोस पाजतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवीधरसाठी भाजपची फिल्डिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, प्रचारही शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेने पदवीधरसंदर्भात अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्याने भाजपने रविवारी कार्यालयात बैठक घेऊन प्रचाराची रणनीती ठरवली आहे. पदवीधरचे भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्या प्रचारासाठी पदवीधरचे प्रभारी लक्ष्मण सावजी यांनी भाजपच्या धुरिणांची बैठक घेऊन शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, माजी खासदार प्रतापदादा सोनवणेही प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यांनी धुळे व नंदुरबारमध्ये प्रचार केला. डॉ. पाटील यांनी रविवारी नाशिकमधील डॉक्टर्स, वकील, तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, काँग्रेस आणि भाजपने उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणा जुंपली आहे. भाजपने डॉ. प्रशांत पाटील यांच्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने भाजपनेही रविवारी तातडीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदवीधरच्या प्रचाराचा आढावा घेतला. पदवीधरचे प्रभारी व प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणनीती तयार केली आहे. प्रचाराला दोन ते तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. महिला ब्रिगेडसह अन्य पदाधिकारी आता तालुकावार जाऊन डॉ. पाटील यांचा प्रचार करणार आहेत. सोशल मीडिया अॅक्टिव्ह केला असून, प्रत्येक मतदाराशी फोनवर संपर्क करण्याचे काम सुरू झाले आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी कायम ठेवण्याच्या सूचना सावजी यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

दिग्गज उतरले मैदानात

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता डॉ. पाटील यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. सावजी यांनी नाशिक, तर माजी खासदार तसेच मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतापदादा सोनवणे यांनीही प्रचारात भाग घेतला आहे. रविवारी सोनवणे यांनी धुळे व नंदुरबारमधील विविध संघटनांच्या भेटीगाठी घेऊन डॉ. पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात भाजपचा जोर वाढला आहे.

डॉ. पाटील यांचा प्रचार

भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी रविवारी शहरातील विविध संघटनांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. डॉक्टर्स, मेडिकल असोसिएशन, व्यापारी संघटना, उद्योजकांच्या भेटीगाठी घेतल्या. विविध पदवीधर संघटनांशीही चर्चा करत, परिवर्तनासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपची ताकद मजबूत करण्यासाठी मला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी संघटनांना केले. डॉ. पाटील यांनी आंनदवल्ली येथे पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी होऊन एका मुलीला डोस पाजला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याजमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची थट्टा करणारा

$
0
0

डॉ. जयंत पवार यांची टीका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांच्या अल्पावधीच्या पीक कर्जावरील नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांचे व्याज माफ करण्यात आले. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. अवघे ५० ते १०० रुपयांचे व्याज माफ करून केंद्र सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना साठ दिवसांचे व्याज माफ करण्याची घोषणा केली. याचा नीट विचार केला तर लक्षात येईल, की ६ टक्के व्याजदराने एक लाख रुपयांचे एक वर्षाला एक सहा हजार रुपये होतात. ६० दिवसांचे म्हणजे दोन महिन्यांचे एक हजार रुपये. द्राक्षाला सोसायटी काढून एकरी ८५ हजार रुपये कर्ज मिळते, तर कांदा, टोमॅटोला १० ते ३५ हजार रुपये मिळतात. म्हणजे या पिकांना कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार १०० ते ३५० रुपये. कडधान्य उत्पादकांना तर फक्त ५० ते १०० रुपये व्याजमाफी मिळेल. यातून एका मजुराचा दिवसाचा रोजसुद्धा निघत नाही. सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नोटाबंदीच्या काळात शेतीमालाला मातीमोल दर मिळाला. अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो, पालेभाज्या रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. कांदा चारशे ते पाचशे रुपये क्विंटल विकावा लागला. यातून त्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. अस्मानी संकटापासून सुटका मिळाली, मात्र सुलतानी संकटाने आसूड ओढले. उद्योग व उद्योजकांच्या पदरात कोट्यवधींचे दान टाकणारे सरकार बळीराजाची चेष्टा करीत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‌व्हिंटेज कार रॅलीने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील डिसुझा कॉलनी येथील ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे ‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’ने नाशिकरांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीचा शुभारंभ पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते झाला.
यावेळी सिंघल म्हणाले की, जुन्या काळातल्या असल्या तरी ‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’मध्ये सहभागी झालेल्या कार्सच्या मालकांनी अत्यंत प्रेमाने त्यांची देखभाल केलेली आहे. मुलासारखं त्यांनी या कार्सला जपलं असून या कार्स असणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे.
ते पुढे म्हणाले की, मीदेखील व्हिंटेज कार्सचा फॅन आहे. माझ्याकडेदेखील एक व्हिंटेज कार आहे आणि त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. ‘टाइम्स ग्रुप’ तर्फे ‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’चे आयोजन करुन नाशिककरांना एक चांगला अनमोल ठेवा पहायला उपलब्ध करुन दिला आहे. नाशिककरांनी या कार अजून चांगल्या स्थितीत जतन करुन ठेवल्या आहेत, असे ते म्हणाले.
‘टाइम्स व्हिंटेज कार रॅली’मध्ये ३५ हून अधिक व्हिंटेज कार सहभागी झाल्या होत्या. त्यात विल‌िज् जीप, ऑस्टिन बेबी, ऑस्टिन, टोयोटा कोरोना, प्रीम‌ियर पद्मिनी, हिलमॅन मिक्स, हिंदुस्तान मोटर्स कॉन्टेसा, फोर्ड परफेक्ट, प्युयोजट ३०९, फियाट ६००, इटॅलियन फियाट ११००, मित्सुबिशी एफटीओ, फोक्सव्हॅगन मायक्रो व्हॅन, एमएम ५४०, टोयोटा मार्क २, महिंद्रा जीप, सॅन स्ट्रोम आदि कंपन्यांच्या कार्स सहभागी झाल्या होत्या. ही रॅली डिसुझा कॉलनी येथून सुरू होऊन श्री स्वामी समर्थ चौक, डोंगरे वसतिगृह मैदान ते कॅनडा कॉर्नरमार्गे कॉलेजरोड भोसला गेट येथून एबीबी सर्कल आणि मायको सर्कलमार्गे यूटर्न घेऊन फ्रवशी अॅकॅडमी त्र्यंबक रोड येथे तिचा समारोप झाला. रॅलीचा समारोप झाल्यानंतर फ्रवशी अॅकॅडमी येथे दुपारी २ वाजेपर्यंत या कार डिस्प्ले म्हणून ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी सहभागी व्हिंटेज कार मालकांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात फ्रवशी अॅकॅडमीचे अध्यक्ष रतन लथ, सोमाचे अध्यक्ष प्रदीप पाचपाटील, सह्याद्री हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर प्रीती झवर, एम. डी. सफायचे अपूर्व दिक्षीत, ‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडे लागली रीघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची गर्दी होत असून, जिल्ह्यात तब्बल ७८५ जणांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, नाराज घटकांकडून बंडखोरी झाल्यास शिवसेनेची बंडखोरी वाढणार आहे.

जिल्हा परिषदेवर भगवा फडकावा यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागात वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना गण, तसेच गणांमध्ये उमेदवारीचे वेध लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल ७८५ इच्छुक उमेदवारीला सामोरे गेले आहेत. रविवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यांमधील १८ गट आणि ३६ गणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये विद्यमान खासदारांसह काही लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनी मुलाखती दिल्या. शनिवारी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नांदगाव, येवला, निफाड व चांदवड या चार तालुक्यांमधील २३ गट व ४६ गणांसाठी तब्बल ४०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. निफाडमधील दहा गट, नांदगावमधील चार, येवल्यातील पाच, तर चांदवडमधील चार गटांसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, आमदार अनिल कदम आदींनी, तर रविवारी जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, अॅड. शिवाजी सहाणे आदींनी मुलाखती घेतल्या. दरम्यान, इच्छुकांमध्ये सुशिक्षित महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे.

यांनी दिल्या मुलाखती

खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे यांनी एकलहरे गटासाठी मुलाखत दिली. याशिवाय इगतपुरीतून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला, शिवराम झोले यांच्या स्नुषा मीना यांनी वाडिवऱ्हे गटासाठी उमेदवारीची इच्छा दर्शविली, तर सिन्नरमधील चास गटातून शीतल सांगळे यांनी मुलाखत दिली. नाशिक तालुक्यातील पळसे गटातून संजय तुंगार, अनिल ढिकले, जगन आगळे, भाऊसाहेब ढिकले आदींनी मुलाखती दिल्या.

यादी पक्षप्रमुखांकडे

जिल्ह्यात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मुलाखतीमुळे इच्छुकांची नेमकी संख्या कळली असून, लवकरच यादी तयार केली जाईल. ही यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविली जाईल. जिल्ह्यात शिवसेनेसोबत जाण्याची तयारी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने दर्शविली आहे. पक्ष पदाधिकारी अर्जुन डांगळे यांनी जिल्ह्यात काही जागांची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप विस्तृत चर्चा झाली नसल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा उमेदवार मनसेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपला रविवारी दणका बसला. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या सहकारी असलेल्या नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून, इतर पक्षांसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

महापालिकेत अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. बहुतांश विद्यमान नगरसेवकांनी भाजप-शिवसेनेचा रस्ता पकडला. या काळात मनसेची अग्निपरीक्षा पार पडली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा आपला मोर्चा शहराकडे वळवला. मराठी सिने कलाकारांसह ठाणे शहरातील मतदारांना शहराची सैर घडवली. एकीकडे पक्षाकडे ताकद नसल्याची ओरड विरोधकांकडून होत असताना मनसेकडून निवडणूक लढवण्याची तब्बल पावणेपाचशे उमेदवारांनी तयारी दर्शवली. शिवसेना, भाजपत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मनसे याकडे लक्ष ठेवून आहे. शिवसेना, भाजपकडून तिकीट नाकारण्यात येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी पक्षाकडून सुरू आहे. मनसेसाठी बंडोबा फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ११ अमधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका ज्योती अर्जुन गांगुर्डे यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस सोमनाथ बोडके यांनीही पक्षाला रामराम करीत मनसेची वाट धरली. विशेष म्हणजे ज्योती गागुंर्डे आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमवेत निवडून आल्या होत्या. सानप वॉर्ड क्रमांक ११ बमध्ये विजयी झाले होते. मनसेने थेट भाजप शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून, भाजपसाठी हा दणका मानला जातो आहे. भाजप हा विषय किती गांभीर्याने घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images