Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संतप्त शिक्षकांचा ठिय्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शिक्षकांना पगाराच मिळत नसल्यामुळे संतप्त माध्यमिक शिक्षकांनी मंगळवारी जिल्हा बँकेच्या मुख्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पण, शटर बंद न करता आल्यामुळे या शिक्षकांनी घोषणाबाजी करीत बँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी शिक्षक व बँक कर्मचाऱ्यांमध्ये झटापट व शाब्दिक चकमकही झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलकांनी बँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाठ यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिरसाठ यांनी आरटीजीएस व रोख रक्कम देऊन पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पण, हे पैसे दोन दिवसांत न मिळाल्यास पुन्हा शुक्रवारी बारा वाजता आंदोलन करण्याचा निर्णयही शिक्षकांनी या ठिकाणीच जाहीर केला.

गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांचे पगार खात्यात जमा होऊनही पूर्णपणे मिळत नाहीत. त्यात मार्च महिन्यात आलेले ६० कोटींहून अधिक पैसे शिक्षकांच्या खात्यात जमा झाले. पण, ते बँकेतून दिले जात नसल्यामुळे शिक्षक अधिक संतप्त झाले. द्वारका येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक हजार किंवा दोन हजारांच्या स्वरुपात पगार दिला जात असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येत हे आंदोलन केले. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन तब्बल दोन तास सुरू होते. यावेळी शिक्षक एकजुटीचा विजय असो, पगार आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाच्या, या संचालकांचे करायचे काय खाली डोके वर पाय... अादी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान शिक्षक अाक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी यावेळी मध्यस्थाची भूमिका घेतली. त्यानंतर शिक्षक काहीसे शांत झाले. प्रथम कार्यकारी संचालकांनी राष्ट्रीयीकृत बँकेतच पैसे नसल्याचे कारण देत शिक्षकांना या बँकेत पैसे आल्यानंतर तातडीने देण्याचे सांगितल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्या या आश्वासनावर नाराजी व संताप व्यक्त केला. त्यानंतर शिक्षकांचे काही प्रतिनिधी कार्यकारी संचालकांच्या केबिनमध्ये गेले व तेथे चर्चा केल्यानंतर आरटीजीएस व रोख रक्कम स्वरुपात पैसे देण्याचे मान्य केल्यानंतर शिक्षकांना आपले आंदोलन मागे घेतले.

--

चेअरमन, व्हाइस चेअरमन गैरहजर

जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिक्षकांनी आंदोलनास सुरुवात केल्यानंतर त्यांनी चेअरमनशिवाय कोणाशीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. पण, त्यानंतर चेअरमन नरेंद्र दराडे मुंबईला, तर व्हाइस चेअरमन सुहास कांदे उपस्थित नसल्याचे सांगितल्यानंतर शिक्षकांनी कार्यकारी संचालक यशवंत शिरसाठ यांच्याबरोबर चर्चा केली.

--

चेक होताहेत बाउन्स

यावेळी अनेक शिक्षकांनी इन्कम टॅक्स, इन्शुरन्स कंपनी, होम लोनसह इतर ठिकाणी दिलेले चेक बाउन्स होत असल्याच्या तक्रारी करीत बाउन्स चेक सर्वांना दाखविले. त्यामुळे या आंदोलनाला चांगलीच धार आली.

--

लग्नपत्रिकाही झळकल्या

एका शिक्षिकेने आपल्या मुलीचे लग्न असून, त्यासाठीही पैसे नसल्याचे सांगत लग्नपत्रिकाच या ठिय्या आंदोलनात झळकावत आपला संताप व्यक्त केला. बँकेत पैसे जमा असूनही ते काढता येत नसल्यामुळे या शिक्षिकेने आपला संताप सर्वांसमोर मांडला. लग्नासाठी अनेकांना आॅर्डर दिल्या. पण, त्यांना देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगत लग्नाअगोर पैसे द्यावेत, अशी मागणी केली.

मुलीच्या आजाराने अश्रू

एका शिक्षिकेने आपली मुलगी आजारी असून, ती हाॅस्पिटलमध्ये आहे. तिच्या उपचारांसाठी पैशाची गरज आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांना रडू कोसळल्याने आंदोलन करणारे शिक्षक काही काळ स्तब्ध झाले. त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. साकोऱ्याचे शिक्षक संजय बोरसे हे कॅन्सरने आजारी असून, त्यांना बिल व पगार मिळाले नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

--

राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकेतून शिक्षकांना पगार मिळत आहे. पण, नाशिक जिल्ह्यात तो सहकारी बँकेतून मिळत आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. परिणामी नोव्हेंबरपासून पगार काढण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.

-मोहन चकोर, अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसिकांना भावला ‘सहेला रे...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्वतंत्र अशा शैलीदार गायनकलेची वैशिष्ट्य आणि त्या संबंधीच्या आठवणींना त्यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर आणि ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. किशोर परांजपे यांच्या संवादरूपी सादरीकरणाने अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आयोजित ‘सहेला रे..’ या सांगितीक श्रध्दांजलीच्या कार्यक्रमास रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडून किशोरीताईंच्या व्यक्तिमत्त्वातील अनोखे पैलू समजावून घेण्यासाठी श्रोत्यांनी यावेळी जीवाचे कान केले होते. कौशल्यपूर्ण हातोटीने डॉ. परांजपे यांनी पं. पणशीकरांशी संवाद साधत किशोरीताईंचे व्यक्तिमत्त्व अलगदपणे उलगडत नेले. यावेळी त्यांच्या विख्यात बंदिशी दमदारपणे सादर करत पं. पणशीकरांनी श्रोत्यांची दाद मिळविली.

अमर्याद विषयाची अनुभूती

संगीतातील विविध रागांवर असणारे त्यांचे अनोखे प्रेम, संगीतामधील प्रयोगशीलता, सातत्याने नाविन्यपूर्णतेचा असणारा ध्यास, संगीताच्या साधनेपोटी असणारे समर्पण, मूळ चैतन्यरूप अन् व्यापक असणाऱ्या संगीतासारख्या अमर्याद विषयाची अनुभूती सामान्य श्रोत्यालाही मिळवून देण्याचा त्यांचा अधिकार होता, असा सूर या सांगितीक श्रध्दांजली सभेतून यावेळी व्यक्त झाला.

गाण्यात सोपेपणा आणण्यासाठी त्याच्याशी खेळण्याचा विकृतपणा त्यांना मान्य नव्हता, यासारखी त्यांच्या गाण्याची अन् व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पं. पणशीकर यांनी उलगडत अमोणकर यांच्या विख्यात बंदिशी सादर केल्या. तर, गायनातून प्रकटणाऱ्या भावाच्या परिपूर्तीतच त्यांचे समाधान दडले होते, असे निरीक्षण डॉ. परांजपे यांनी यावेळी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड कृउबात आजपासून रोख पेमेंट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत १९ एप्रिलपासून शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरूपात दिले जाणार असल्याची माहिती चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली. चांदवड बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यानंतर त्यांना रोख स्वरुपात पेमेंट अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चांदवड समितीत शेतकरी हिताला प्रथम प्राधान्य देत बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर व्यापाऱ्यांना बँक खात्यातून रोख रक्कमा काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीची रक्कम रोखीने अदा करणे शक्य होत नव्हते. यामुळे शेतकरी वर्गास मोठ्याप्रमाणात फटका बसत होता. चेक दिल्यानंतर चेक वटण्याच्या प्रक्रियेत बराच कालावधी जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले होते. त्यामुळे बुधवारपासून रोख पेमेंट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नगरसेवकांना तूर्तास दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत त्यांचे पद रद्द करण्याच्या आदेशाला राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे पाचही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.

नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची सत्ता आहे. निफाड येथील मोहन जाधव, साहेबराव बर्डे यांनी निफाड नागरपंचायतीच्या नगरसेविका लक्ष्मी पवार, एकनाथ तळवाडे, आनंद बिवालकर, मंगला वाघ व जावेद शेख यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. या नगरसेवकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचे सांगत त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी याचिकेत केली होती. या याचिकेवर निकाल देताना अप्पर जिल्हाधिकरी यांनी पाचही नगरसेवकांना अपात्र ठरवविले होते. या अपिलावर सात जून रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या शाखेला पुन्हा टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील वसंतवाडी व टिळक रोड वरील शाखेस शिक्षक भारतीचे अनिल महाजन व सुधीर पाटील तर करंजगव्हाण येथील शाखेस राजेंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यात आले. तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा बँक शाखेला सोमवारीही संतप्त शिक्षकांनी टाळे ठोकले होते. शाखाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दरमहिन्याप्रमाणे मार्च महिन्याचे ४० माध्यमिक शाळातील शिक्षकांचे पगार जिल्हा बँक शाखेत वर्ग केले आहेत. मात्र शिक्षक वारंवार जिल्हा बँक शाखांमध्ये पगार घेण्यासाठी जावूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने मंगळवारी शाखांना टाळे ठोकण्यात आले. शिक्षक संघटना पगार मिळावे यावर आग्रही असल्याने व तसे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी लावून धरल्याने बराच वेळ सकाळी जिल्हा बँक शाखा बंदच होत्या. जिल्हा बँकेस पुरेसी रोकड मिळत नसून ती उपलब्ध झाल्यास शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल. तसेच शिक्षणाधिकारी यांना देखील जिल्हा बँक प्रशासनाने शिक्षकांचे वेतन खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत उघडण्यास जिल्हा बँक प्रशासनाची हरकत नसल्याचे पत्राद्वारे कळवले, असे सांगितल्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. येत्या २१ तारखेच्या आत कोणत्याही अडचणी न सांगता वेतन अदा केले जाईल, असे लेखी आज शिक्षक भारती संघटनेला मिळाले आहे. तसेच २१ एप्रिलपर्यंत वेतन न मिळाल्यास जिल्हा बँकेवर फोजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयडिया’कॉलेजकडून दोन नवीन अभ्यासक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

इयत्ता दहावी उत्तीर्ण या किमान पात्रतेवर आधारित जाहिरात आणि इंटेरियर या दोन शाखांमधील नव्या अभ्यासक्रमांची घोषणा येथील आयडिया कॉलेजच्या वतीने करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून हे दोन स्वायत्त स्वरूपाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम पदविका स्वरूपात सादर होणार आहेत, अशी माहिती कॉलेजकडून देण्यात आली आहे.

कॉलेजच्या वतीने आयोजित ‘एक्सक्लेम २०१७’ या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ही घोषणा करण्यात आली. ‘डिप्लोमा इन डिजीटल इंटेरियर डिझाइन’ आणि ‘डिप्लोमा इन डिजीटल अप्लाइड आर्ट’, असे या अभ्यासक्रमांचे नामकरण आहे. प्रदर्शनाच्या समारोप सत्रात आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी बनविलेल्या प्रतिकृतीची माहिती करून घेतली.

कुसुमाग्रज स्मारक येथे या चार दिवसीय प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. यावेळी शहरातील नामवंत वास्तुविशारद, इंटेरियर डिझाइनर, चित्रकार, विद्यार्थ्यांचे पालक आदी मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमात संस्थेचे संचालक विजय सोहनी, डीन विवेक पाटणकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती वादावर अखेर पडदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील मंदिर विश्वस्त आणि साधूमहंतांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मूर्तीवादावर मंगळवारी अखेर पडदा पडला. येत्या ३१ मेपर्यंत पावर्ती मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असे देवस्थान ट्रस्टने लेखी आश्वासन दिल्यानंतर षड्दर्शन आखाडा परिषदेने आपले अंदोलन मागे घेतले.

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहातील पार्वतीची मूर्ती खंड‌ित झाली आहे. विश्वस्त ललीता शिंदे यांनी नवीन मूर्ती तयार करवून देवस्थानच्या ताब्यात दिली आहे. नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करत नाही? असा सवाल उपस्थित करून अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, डॉ. बिंदू महाराजसह संपूर्ण षड्दर्शन आखाडा परिषदेच्या महंतांनी

मूर्ती ताब्यात घेऊन स्वतः प्रतिष्ठापना करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे देवस्थान ट्रस्ट आणि साधू यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.

दरम्यान, यात सोमवारी (दि.१७) तहसील आणि पोल‌िस प्रशासन यांनी केलेली मध्यस्तीही निष्फळ ठरली होती. साधूमहंतांनी इशारा दिल्याप्रमाणे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, डॉ. बिंदुजी महाराज, विश्वस्त ललीता शिंदे आणि जवळपास शंभर साधू मंदिर प्रांगणात सकाळी ११ वाजता आले. बकुळीच्या झाडाच्या सावलीत ठिय्या मांडला. त्यांची समजूत काढण्यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा विश्वस्त यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर यांनी साधूंशी संवाद साधला. तहसीलदार महेंद्र पवार, जिल्हा पोल‌िस उपअधीक्षक शामराव वळवी, निरीक्षक सुधाकर मांडवकर हे बंदोबस्तासह उपस्थित होते.

यादवराव तुंगार यांनी साधुमहंतांनी आपले अंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करत आपले काही चकुत असेल तर माफ करावे असे म्हटले. यावर डॉ. बिंदू महाराज यांनी आपण ज्येष्ठ आहात आमची माफी मागून आम्हाला लाजवू नका आणि ट्रस्टमधील सदस्य आणि अधिकारी करत असलेल्या अन्यायावर पांघरून घालू नका, असे सांग‌ितले. तसेच मूर्तीबाबत काय निर्णय घ्यायचा असेल तो सर्वसाधुंच्या समक्ष घ्या असे बजावले.

विश्वस्त सचिन पाचोरकर यांनी सर्वांसमोर पत्र वाचन केले. त्यानुसार ३० एप्रिलला देवस्थान ट्रस्टची बैठक होईल. त्यामध्ये प्राणपतिष्ठा सोहळ्याची रुपरेषा निश्च‌ित करण्यात येईल. त्यानंतर ३१ मेपर्यंत असलेल्या मुहूर्तावर पार्वती मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. यावर डॉ. बिंदू महाराज यांनी ३१ मे पर्यंत प्राणपतिष्ठा सोहळा झाला नाही तर आखाडा परिषद हे धर्मकार्य करेल, असा इशारा देवून आंदोलन मागे घेण्यात आले.

साधूंमध्येच जुंपली...
मंदिर प्रांगणात साधूंनी गदारोळ करत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. यात आखाडा परिषद आता विसर्जीत झाली आहे. ते नाव घेऊ नका असे आवाहन आखाड्याचे पवनभारती महाराज यांनी केले. याचे पडसाद बैठकीत उमटले. शेवटी डॉ. बिंदू महाराज व इतर साधू आणि पवनभारती यांच्यात हमरीतुमरी होऊन एकमेकावर धाऊन जाण्याचे प्रकार घडले. मंदिर प्रांगणात साधूंमध्येच जुंपल्यामुळे अधिकारी आणि उपस्थित भाविकांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

शिंदे यांना अश्रू अनावर

ललीता शिंदे यांनी आपली बाजू मांडली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. मी नवीन मूर्तीसाठी दीड लाख रुपये खर्च केले. केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून मूर्ती बसविण्यास आडकाठी घालण्यात आली. विश्वस्तांनी याबाबत नेहमीच राजकारण केले. माझ्या भावांना व मला शिवीगाळ केली, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ नव्हे; बरबादीचा मार्ग

$
0
0

संघर्ष यात्रेते विरोधकांची टीका; शिवडेत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाविरोधात शिवडे व पांढुर्ली (ता. सिन्नर) ग्रामस्थांनी लढा तीव्र केल्यानंतर संघर्ष यात्रेने या लढ्याला आणखी बळ दिले. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन संपादित केली तर सरकारला पळता भुई थोडी करू, असा इशारा दिला आहे. हा समृद्धी महामार्ग नसून, बरबादीचा मार्ग असल्याचे सांगत सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी शिवडेत ग्रामस्थांतर्फे सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत तिरडी पेटविण्यात आली.

राज्याचा कानाकोपरा पिंजून काढणारी संघर्षयात्रा मंगळवारी शिवडे गावात पोहोचली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या समृद्धी महामार्गाबाबतच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली. जुना महामार्ग असताना मुंबई-नागपूर नवीन महामार्गाची गरजच काय? असा सवाल विखे पाटील यांनी केला. तसेच अधिकाऱ्यांनी मर्यादा सांभाळाव्यात. आम्हाला मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही, असे सांगत प्रांताधिकारी महेश पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात, हे सरकारने विसरू नये. आम्ही देखील सरकार चालविले आहे. समृद्धीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसाला सुध्दा धक्का लावू देणार नाही. दडपशाहीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर पळता भुई थोडी करू, असा इशारा अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला.

एक इंचही जमीन देणार नाही

समृद्ध शेती उद्‍ध्वस्त करून कसला समृद्धी महामार्ग करीत आहात. या महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही. ही जमीन आमची आई आहे. आईला विकण्याचा घाट घातला जात असून, तो आम्ही उधळून लाऊ. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे सांगत शिवडे ग्रामस्थांनी समृद्धीविरोधातील लढा आणखी तीव्र केला आहे.
शेतकऱ्यांच्या घरावर बुलडोझर फिरवून, त्यांना उद्‍ध्वस्त करून कुठला विकास साधला जाणार आहे. मुठभर लोकांच्या भल्यासाठी सुरू असलेला उपद्व्याप सरकारने थांबवला पाहिजे. आम्ही पक्षभेद विसरून शेतकऱ्यांबरोबर राहू.

- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

समृध्दी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेत कऱ्यांच्या केसाला सुध्दा पोलिसांना धक्का लावू देणार नाही. ‘शेतकरी’ ही एकच जात मानून या महामार्गाला विरोध करण्यासाठी एकजूट कायम ठेवा. जुन्या सुविधा असताना नवीन महामार्ग उभारण्याचा अट्टहास का?

- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव @ ४४.६

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

उष्णतेच्या तडाख्याने उत्तर महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. गत महिनाभरातील जिल्ह्याच्या तापमानाचे सर्व रेकॉर्डस् मागे टाकत मंगळवारी मालेगावचे कमाल तापमान ४४.६ अंशांवर पोहोचले. नाशिकचा पाराही चाळीशीचा उंबरा ओलांडूनच राहिल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. नाशिकचे कमाल तापमान ४०.१ अंश, तर किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

एप्रिलच्या मध्यावरच नाशिकचा पारा चाळीसच्या अंकाभोवती फिरू लागला, तर जिल्ह्यात मालेगावने तापमानाचा उच्चांक या महिन्यात वारंवार नोंदविला आहे. मंगळवारी मालेगावच्या पाऱ्याने पुन्हा एकदा दाहकता दाखवून दिल्याने नागरिकांना उष्म्याने हैराण करून सोडले. अद्याप मे महिना सुरू होण्यास दहा दिवसांचा अवधी आहे. त्यातच थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारा नाशिकसारख्या जिल्ह्यावरच ही वेळ येत असेल तर इतरत्र काय चित्र असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मालेगाव पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या तापमानानेही जिल्ह्याच्या तुलनेत वरचष्मा ठेवला आहे. जळगावचे तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

चंद्रपूर जगात दुसरे हॉट

नागपूर : सोमवारी हलकी घसरण झालेला पारा विदर्भात पुन्हा कोपला. त्यात चंद्रपूर ४६.४ अंशांसह जगात दुसरे सर्वाधिक उष्ण ठरले. नागपूरनेदेखील ४५.५ अंशांसह मोसमाचा उच्चांक अनुभवला. यामुळे विदर्भातील होरपळ कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडाचा प्रकल्प रद्द करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सरकारने कोणताही प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. मात्र, म्हाडाच्या आडगाव येथील प्रकल्पाबाबत तसे होत नसल्याने आम्ही सर्व विरोधी पक्षांचे नेते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाला स्थगिती देऊ, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आडगाव येथे सोमवारी रात्री संघर्ष यात्रा दाखल झाली. त्यावेळी त्यांना आडगावमधील माजी नगरसेविका मीना माळोदे आणि गावतल्या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांच्या वतीने म्हाडा प्रकल्पाची जागा शाळेला मिळावी, या मागणीचे निवेदन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासह अनेक आमदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला आडगावमधील चिन्मयी लभडे या चिमुकलीने शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत. द्राक्ष, पिकांना भाव मिळत नाही, त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली.

यासंदर्भात पवार म्हणाले, की ही मागणी कोणच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, येथील मुलांच्या भविष्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने ती महत्त्वाची बाब आहे. विखे-पाटील यांनीही यासंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. लातूरमधील एका शेतकऱ्याच्या मुलीवर वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मालेगावच्या सभेनंतर दोन आत्महत्या झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, वेळ पडल्यास संघर्ष अधिक कठोर करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्थानिक घटक महत्त्वाचा

एखाद्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे स्थानिक लोकांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. आडगावमधील संबंधित तीन एकर जागा शाळा आणि धार्मिक विधीसाठी वापरली जाणारी जागा यांच्या मध्ये आहे. त्यामुळे शिक्षणासाठी ही जागा मागितलेली असल्याने स्थानिकांची मागणीचा विचार करणे गरजेचे आहे, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर फोर्स स्टेशनमध्ये आग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देवळाली कॅम्प येथील साऊथ एअर फोर्स स्टेशन परिसरातील गवताला मंगळवारी दुपारी आग लागली. दुपारी १ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दुपारी साडेचार वाजता ही आग विझली. या आगीत मालमत्तेचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे संरक्षण विभागाने सांगितले.

कडाक्याचे ऊन आणि वाळलेल्या गवतामुळे आगीने पेट घेतला. देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्डाचा एक, महापालिकेचे पाच, भगूर नगरपालिकेचा एक, लष्कराचे तीन अशा एकूण १० अग्निशमन बंबांनी या आगीवर तब्बल पाच तासांनी नियंत्रण मिळवले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही आग शमविण्यात आल्याचे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आग इतकी मोठी होती की धुराचे लोट सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावरून दिसत होते.

मोठी हानी टळली!

आग लागली त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर हवाई दलाचे कार्यालय आहे. या ठिकाणी सॉफ्टवेअरशी संबंधित काम चालत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आग वेळीच आटोक्यात आली नसती तर मोठी हानी झाली असती, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्याधारित मनुष्यबळ घडविण्यास व्हावेत प्रयत्न

$
0
0

शिक्षक विकास कार्यशाळेतील सूर

स्वप्नील देवकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

तंत्रज्ञानाच्या सर्वच क्षेत्रातील वाढत्या व्यापामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योगांमध्ये मनुष्यबळास भविष्यात उत्तम संधी आहेत. या क्षेत्रासाठी आवश्यक ती कौशल्य धारण करणारे मनुष्यबळ घडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असा सूर पीव्हीजी कॉलेजमध्ये आयोजित शिक्षक विकास कार्यशाळेतून उमटला.

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योजकता व संधी’ या विषयावर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोनदिवसीय उपक्रमात आय. आय. टी, मुंबई येथील तज्ज्ञ व माजी विद्यार्थ्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात कौस्तुभ भडभडे यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स’ तसेच कॉपीराईट, लोगो ,पेटंट लॉ याविषयी मार्गदर्शन केले. तर सुहास देशपांडे यांनी ‘झीरो एनर्जी बिल्डींग अॅन्ड ग्रीन बिल्डिंग’ व नवनवीन तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापराशी संबधित ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ या विषयावर प्रकाश टाकला.

कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात कॅनडास्थित उद्योजक अशोक रानडे यांनी ‘एक्स्पोनेन्शिअल ग्रोथ ऑफ टेक्नॉलॉजी’ या विषयांसोबत तंत्रज्ञान क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदलांचा मागोवा घेतला. शिक्षकांनी अभियांत्रिकी शिक्षण देत असताना भविष्यातील तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांविषयी समाजात जागरुकता निर्माण केली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल जोशी होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय गुंजाळ, प्राचार्य निहार वाळिंबे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची जबाबदारी प्रा. नीलेश कुलकर्णी यांनी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नास कॉलेजेसकडून ऑनलाइन रजिस्ट्रेशन

$
0
0

अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू; सेल्फ फायनान्सने १,५६० जागा वाढल्या

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

पुणे अन् मुंबईच्या धर्तीवर यंदा पहिल्यांदाच नाशिकमध्ये इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी प्रशासनाची तत्परतेने तयारी सुरू आहे. यंदा स्वयं अर्थसहाय्यित संस्थांच्या प्र्रस्तावामुळे शहरात गतवेळच्या तुलनेत १,५६० जागांमध्ये वाढ झाली आहे. तर, ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवार (दि. १८) दुपारपर्यंत सुमारे ५० कॉलेजांनी नोंदणी केली होती. उर्वरित दोन कॉलेजेसची प्रक्रिया सुरू होती.

शहरात महापालिका हद्दीमध्ये अकरावी प्रवेशांसाठी यंदा ५२ कॉलेजेस उपलब्ध आहेत. पैकी सोमवारपर्यंत ५२ पैकी ४२ कॉलेजेसने रजिस्ट्रेशन केले होते. काही कॉलेजेसना तांत्रिक चुकांच्या दुरूस्तीसाठी मंगळवारची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी दुपारपर्यंत हे काम अंतिम टप्प्यात आले होते.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यानंतरच्या टप्प्यात १५ जून ते १५ जुलै या ३० दिवसांच्या कालावधीत प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येऊन प्रवेश पूर्ण होतील. यंदा ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने २१ हजार ५६० जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. ही प्रक्रीया पहिल्यांदाच शहरात राबविली जात असल्याने माहितीसाठी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी माहिती पुस्तिकाही शिक्षण विभाग पोहचविणार आहे.

पारदर्शी प्रवेशांची अपेक्षा

गत वेळेसपर्यंत शहरातील काही रँकींगच्या कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. विज्ञान शाखेसाठी काही कॉलेजेसचे मेरिट तीन प्रवेश फेऱ्यांनंतरही ९० टक्कयांच्या खाली येत नाही. तर काही ठिकाणी कॉलेजेसला विद्यार्थी शोधावे लागतात. यामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या वाट्याला मनस्ताप येतो. यंदा मात्र ऑनलाइन प्रक्रिया या गोंधळावर उतारा ठरून केंद्रीभूत पद्धतीने पारदर्शक प्रवेश होतील, असा आशावाद विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रक्रियेसाठी महापालिका हद्दीत एकूण ५२ कॉलेजेस समाविष्ट आहेत. जवळपास सर्व कॉलेजेसचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून, स्वयं अर्थसहाय्यतेच्या काही प्रस्तावांमुळे १५६० जागा वाढताहेत. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वास वाटतो.

- रामचंद्र जाधव,
शिक्षण उपसंचालक, शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खतप्रकल्पातून ९९ हजार युनिट वीज

$
0
0

पंधरा दिवसांत सुरू होणार वीजनिर्मिती प्रक्रिया

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत नाशिकमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प येत्या पंधरा दिवसांत कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पावर आठ कोटींचा खर्च करण्यात आला असून, दररोज ३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेला या वीजनिर्मिती प्रकल्पातून दररोज ९९ हजार युनिट वीज मोफत मिळणार आहे.

महापालिकेला कोणत्याही प्रकारचा भांडवली खर्च न करता ही वीज मिळणार असल्याने पालिकेच्या खर्चात आर्थिक बचत होणार आहे. महापालिकेने जीआयझेड प्रकल्पांतर्गत जर्मन सरकारच्या मदतीने खत प्रकल्पावर वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी या प्रकल्पासाठी जर्मन सरकारचे अर्थसहाय्य मिळवले होते. या प्रकल्पासाठी आठ लाख युरो (सुमारे ६.८ कोटी रुपये) इतका निधी जर्मन सरकारने दिला आहे. या प्रकल्पासाठी ८०२.७९ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, हैदराबादच्या एका कंपनीने पर्यावरण सुधार उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी अनुदानाव्यतिरिक्तचा खर्चाची जबाबदारी उचलत प्रकल्प दहा वर्षे चालवण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी महापालिकेस भांडवली गुंतवणूक करावी लागलेली नाही. यामध्ये ३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार असून, दरमहा ९९ हजार युनिट वीज मोफत मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रथचक्र चौक ‘नो हॉकर्स झोन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

इंदिरानगर परिसरात रथचक्र चौक तसेच बापू बंगला येथे बहुतांश विक्रेते भाजी विकण्यासाठी बसत असल्याने रोजच वाहतुकीचा खोळंबा होत असे. या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भाजी विक्रेत्यांना साईनाथनगर येथे जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. साईनाथनगर येथे हॉकर्स झोन करण्यात येणार असून बापू बंगला व रथचक्र चौक येथे ‘नो हॉकर्स झोन’चे फलकही लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

इंदिरनगर परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि मुख्य म्हणजे भाजी विक्रेत्यांसाठी कलानगर येथे भाजीबाजार उभारण्यात आला होता. मात्र, त्यास भाजीविक्रेत्यांकडून अतिशय कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला. रथचक्र चौकासह बापू बंगला परिसरात भाजीविक्रेत्यांची गर्दी वाढतच होती. याशिवाय इंदिरानगरमधील वडाळा पाथर्डी रोडवर अनेक ठिकाणी सायंकाळी रस्त्यांच्या कडेला अनेक भाजी विक्रेते बसतात. अनधिकृतपणे बसणाऱ्या या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेने यापूर्वी अनेकदा कारवाई केली. मात्र, कारवाईपुरतेच हे भाजी बाजार बंद होतात. नंतर पुन्हा दोन-तीन दिवसांनी हे भाजीबाजार सुरू होत असल्याचे लक्षात आले आहे. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे अनेक अपघात होऊन वाहतुकीस बराच अडथळा निर्माण हेात असतो.

नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मनाई करण्यात आल्यानंतरही रथचक्र चौक आणि बापू बंगला येथे मुख्य रस्त्यावर भाजीविक्रेते बसत होते. मात्र, येथेही वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याने साईनाथनगर येथील खुल्या जागेत खास हॉकर्स झोन करून येथेच भाजी विक्रेत्यांनी तेथे बसावे अशी सूचना करण्यात आली.

साईनाथनगर येथे ६० भाजीविक्रेते बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. काही ओटे यापूर्वी तयार झालेले आहेत. लवकरच याठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी ओटे, वीज पुरवठा या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी जागा दिलेल्या भाजी विक्रेत्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका डॉ. कुलकर्णी यांनी दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी भाजी विक्रेत्यांच्या जागेची पाहणी केली. संबंधित भाजी विक्रेत्यांशी याबाबत चर्चा केली असून त्यांनीही यासाठी सकारात्मकता दाखविली असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रयत्न व्हावा यशस्वी

वडाळा-पाथर्डी रोडवर मोठ्या प्रमाणावर विविध विक्रेत्यांचे अतिक्रमण होते. या अतिक्रमणावर उपाय म्हणून साईनाथनगर येथील जागेची निवड करण्यात आली आहे. मात्र, मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भररस्त्यात अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने इंदिरानगरमध्ये होत असलेला अधिकृत हॉकर्स झोन यशस्वी करावा, अशीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

साईनाथनगरनंतर पुन्हा रथचक्र चौक व बापू बंगला येथे भाजी विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी ‘नो हॉकर्स झोन’ असे फलकही लावण्यात येणार आहे.
- डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपट्टीवाढ अटळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नावाढीवर प्रशासनाने भर दिला असून २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये करवाढ प्रस्तावित केली आहे. मालमत्ता करात सरासरी १४, तर पाणीपट्टीत करात पाच टक्के करवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर झाला आहे.

प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुमारे १४१० कोटींचे बजेट सोमवारी स्थायी समितीला सादर केले. सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करासह पाणीपट्टी करात वाढ करण्याचे संकेत दिले असून, प्रस्तावित करवाढीला मंजुरी दिल्यास साधारण १५ ते २० कोटी रुपये प्रतिवर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. यासदंर्भात आता गुरुवारी (दि. २०) निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे नियोजित १४१०.७ कोटींचे वार्षिक बजेट सोमवारी प्रभारी आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत बजेटमध्ये ६२ कोटींची वाढ झाली असली, तरी महसुली खर्च व विविध योजनांच्या दायित्वामुळे महापालिकेच्या बजेटमध्ये विकासकामांना मोठी कात्री लावण्यात आली आहे. बजेटमध्ये १२२८ कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले असले, तरी भांडवली खर्चात मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी भांडवली खर्चासाठी साडेचारशे कोटींची तरतूद होती. यंदा मात्र महसुली खर्च ८७५ कोटींवर गेल्याने व विविध योजनांचा भार वाढल्याने भांडवली खर्चासाठी केवळ १३० कोटी रुपयेच उरले आहेत. त्यामुळे अधिकाधिक उत्पन्नवाढीवर प्रशासनाने भर दिला असून, मालमत्ता करासह पाणीपट्टीत सरासरी १४ आणि ५ टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.

जादा १० कोटी उत्पन्न मिळणार

गतवर्षीही मालमत्ता कर व पाणीपट्टी करात वाढ सुचविली होती. परंतु, महापालिका निवडणुकीमुळे सत्ताधारी मनसेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला होता. यावर्षी मात्र सत्ताधारीच मालमत्ता करासह पाणीपट्टी कराच्या वाढीला अनुकूल असल्याने नाशिककरांवर करवाढीचा बोजा पडणार आहे. मालमत्ता करांच्या दरामध्ये सर्वसाधारण करात ५ टक्के, सर्वसाधारण स्वच्छता कर, जललाभ कर, पथकर व महापालिका शिक्षण करात प्रत्येकी एक टक्का व मलनिस्सारण लाभ करात ५ टक्के अशी एकूण सरासरी १४ टक्के करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला यातून सरासरी वार्षिक १० कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. याचा निर्णय आता गुरुवारी सत्ताधाऱ्यांकडून घेतला जाणार आहे.

करबुडव्यांचे काय?

महापालिकेने वॉटर ऑडीट केलेले नाही. अनेक ठिकाणी नादुरुस्त जलवाहिन्या आहेत. तसेच वस्त्यांमध्ये पाण्याची चोरी होत आहे. मोठ्या थकबाकीदारांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. ही वसूल न करता सामान्य ग्राहकांवर करवाढीचा बोजा टाकला जात आहे. जो करदाता व्यवस्थित कर भरतो त्याच्या माथी हा बोजा टाकला जाणार आहे. त्यामुळे यावरून राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत पाणीपुरवठा वेळेत बदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली शहरातील उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठ्याची वेळ बदण्यात येणार आहे. या बदलाची अंमलबजावणी गुरुवारपासून (दि. २०) करण्यात येणार आहे.

देवळालीच्या सदर बाजार भागात दुपारी २.३० च्या सुमारास पाणीपुरवठा केला जात असे. आता तेथील पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२ वाजेची करण्यात आली आहे. स्टेशनवाडी परिसरात दुपारी १२ ऐवजी दुपारी २.३० वाजाता पाणी सोडले जाणार आहे. देवळालीच्या सदर बाजार भागाची लोकसंख्या स्टेशनवाडीपेक्षा अधिक असल्याने

या भागातून सतत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार कॅन्टोन्मेंट कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्याशी नगरसेवकांनी चर्चा केली आणि पाणीपुरवठ्याची वेळ बदलावी असा निर्णय घेण्यात आला. हिल रेंज परिसरात उभारण्यात आलेली नवीन जलकुंभाची क्षमता ६.५० लाख लिटर आहे. तो भरण्यास अधिक वेळ लागतो. कमी वेळात पाणी पंपिंग होत नसल्याने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाक्या वेळेत भरत नाही. त्यामुळे बाजारभागात पाणी पुरवठा कमी दाबाने होतो. सोबत हिल रेंज परिसरात असलेल्या टाकीतून वॉर्ड क्रमांक ४ म्हणजेच लामरोड भागात पाणीपुरवठा सकाळी ८ वाजता केला जात आहे. यापूर्वी तेथे पहाटे ३ किंवा ५ वाजता पाणीपुरवठा केला जात असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणपोईचे भांडे चोरट्यांनी पळविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस रोहन देशपांडे यांनी स्वखर्चाने नाशिकरोडला पाच ठिकाणी पाणपोई सुरू केल्या. मात्र, भुरट्या चोरांनी पाणपोईचे एक भांडे आणि शोभेसाठी ठेवलेल्या दोन कुंड्या पळवल्या.

नाशिकरोडला पाणपोईवर थंड आणि शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था केलेली असल्याने नागरिकांना वेगळे समाधान लाभत होते. देशपांडे यांनी शिखरेवाडी, मोटवानी रोडवरील शाहूनगर, नारायणबापूनगर, दसकचा छत्रपती शिवाजी चौक येथे पाणपोई सुरू केल्या. पाणपोईच्या स्वच्छतेसाठी व्यक्ती नेमण्यात आल्या असून पाणपोईभोवती हिरवळ असावी म्हणून कुंड्या ठेवल्या आहेत. तसेच पक्षांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. ओंकार देशपांडे, महेश गायकवाड, सतीश शहाणे, शुभम आढाव, रोहित कुलकर्णी, संदी आहेर आदींचे सहकार्य लाभत आहे.

कुंड्या पळवल्या

नारायणबापू चौकातील पाणपोईजवळ शोभेच्या झाडांच्या दोन मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या मंगळवारी रात्री भुरट्या चोरांनी पळवल्या. तसेच पाणपोई झाकली जाईल अशा पध्दतीने येथे वाढदिवसाचे बेकायदेशीर होर्डिग्ज लावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरची भागणार तहान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरातील नव्याने विकसित होत असलेल्या इंदिरानगर, वडाळागाव, राजीवनगर या भागातील पाणी समस्येवर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा आधार घेतला आहे. या योजनेंतर्गत कलानगर व चढ्ढा पार्क परिसरात दोन जलकुंभ तातडीने उभारण्यात येणार आहेत.

शहरातील विभागीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठ्यासंदर्भात बैठक घ्यावी आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतः जलकुंभाची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी दिले.

इंदिरानगर व वडाळा गाव परिसरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही मार्ग निघत नसल्याने स्थानिक नगरसेवकांनी बुधवारी महापौरांनाच साकडे घातले. महापौर भानसी यांच्यासह उपमहापौर प्रथमेश गिते यांची पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत प्रभाग ३० व २३ च्या नगरसेवकांची बैठक झाली. यात महापौरांनी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. बैठकीला अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, उपअभियंता धारणकर, संजीव बच्छाव यांचेसह कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. बैठकीत माजी उपमहापौर व नगरसेवक सतीश कुलकर्णी, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, चंद्रकांत खोडे, सतीश सोनवणे, शाहीन मिर्झा, रुपाली निकुळे, शाम बडोदे व पुष्पा आव्हाड आदी नगरसेवकांनी पाणीसमस्या मांडल्या. इंदिरानगर परिसरात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याची तक्रारी आहेत. कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तक्रार केल्यावर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. तांत्रिक व वितरण विभागात समन्वय नसल्याने अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी ढकलत असल्याचेही काही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. इंदिरानगर भागाचा विचार करता या भागासह परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

समन्वयाचा अभाव

सिडको आणि इंदिरानगर यांना पाणीपुरवठ्यातील समन्वय अनेकदा साधला जात नाही. इंदिरानगरला सिडको विभागातून पाणी पुरवठा होतो, तर हा भाग पूर्व विभागाला जोडला गेलेला आहे. त्यामुळे सिडकोतील अधिकाऱ्यांनीही इंदिरानगरच्या पाणीपुरवठ्याकडे लक्ष दिले पाहिजे. इंदिरानगरच्या पाण्याचे नियोजन पूर्व विभागाकडेच दिले पाहिजे. तसेच या भागातील जलकुंभ शेवटच्या टप्प्यात भरत असल्याने पाणी पळविले जात असल्याचाही आरोप होत असतो.

कृत्रिम पाणीटंचाई

वडाळा गावात अजूनही बऱ्याच ठिकाणी महापालिकेने जलवाहिनी टाकलेली नाही. परिणामी परिसरातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरणारच नाहीत यासाठी काहीजण प्रयत्न करतात. पाण्याची पळवापळव करून नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. जलकुंभ असूनही ते पूर्णपणे भरण्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. आजही बऱ्याच भागात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे सुरुवातीला पाण्याची पळवापळव बंद करून जलकुंभ पूर्णपणे भरू द्यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी महापौरांसोबत झालेल्या बैठकीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला द्या कांद्याची माळ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर परिसरातील शेतकऱ्याकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याकडे विविध समस्यांचे निवेदन देतानाच, शेतकऱ्यांनी कांद्याची माळ भेट देत ‘अच्छे दिन’ची आस दाखवणाऱ्या भाजप सरकारला ही माळ देण्यात यावी, अशी विनंती करीत आपला संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक गोरखनाथ बलकवडे, ज्ञानेश्वर गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन करंजकर, विशाल बलकवडे, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, अशोक ठुबे, कांगणे, मुन्ना अन्सारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

अवघ्या राज्यभरात ​अन्यायकारक समृद्धी महामार्ग, संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या होत असून, या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, युनायटेड जनता दलातर्फे राज्यभर काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे भगूर येथे आगमन झाले. त्या वेळी सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष, कांदा, भाजीपाला आदींसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमी भाव देण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी देवळाली कॅम्प, भगूर पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

भगूरसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारे पाणीदेखील उचलू दिले जात नसून, लष्करासह कॅन्टोन्मेंट प्रशासन शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करीत आहेत. यामुळे आधीच पिकांना भाव नसल्याने पाण्याअभावी पिके करपण्याची भीती काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन करंजकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images