Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पावसाळी पर्यटनाचा सुपर संडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कधी मुसळधार पडणारा पाऊस तर कधी रिमझीम पडणारी हलकी सर अंगावर झेलत तरुणाईचे जत्थे रविवारी पर्यटनासाटी जात होते. रविवारी सुट्टीची पर्वणी साधत अनेक लहान-मोठ्यांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला.

रविवारचा दिवस कारणी लागावा यासाठी कुटुंबीयांसमावेतही अनेकजण सकाळपासूनच पर्यटनाला निघाले होते. नाशिकपासून जवळच असलेल्या इगतपुरी परिसारातील निसर्ग पहाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. काही पर्यटकांनी अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंद‌िर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा, तसेच सांदण दरी, रंधा धबधबा या ठिकाणीदेखील जाणे पसंत केले. त्याचप्रमाणे कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे या ठिकाणीही ना‌शिककरांनी आपला मोर्चा वळवला. कसारा घाटातील धुके अनुभवणे हा तर एक रोमांचकारी अनुभव असतो. सकाळपासूनच अनेक तरुण धुके अनुभवण्यासाठी हायवेवर उभे होते.

नाशिक जिल्ह्यातील कळवणजवळील हतगड परिसरात असलेला भिवतास धबधबा गुजरात व महाराष्ट्राच्या पर्यटकांचे आकर्षण आहे. नाशिकहून हतगड ओझरखेड धरण ओलांडल्यानंतर कळवण तालुक्याच्या हद्दीतील हे निसर्गरम्य ठिकाण दोन्ही राज्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरते. पावसाळ्यात भिवतास धबधबा ओसंडून वाहत असून, गर्द हिरवाईतून वाहणारा हा धबधबा बघून पर्यटक सुखावत आहेत. जवळच हतगड, सापुतारा हे अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य स्थळे पाहण्यासाठीदेखील गर्दी होत आहे.


दुगारवाडी, पेगलवाडीला गर्दी

त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा दुगारवाडी धबधबा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच असलेली पेगलवाडी, पहिने ही गावे पावसाळ्यात बघण्यासारखी असतात. एका दिवसात परत येण्याची ठिकाणे म्हणून यालादेखील नाशिककर पसंती देत असतात. रविवारी दुगारवाडीचा धबधबा ओसंडून वाहत होता. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाईने नटलेला परिसर आणि हिरवाईने पांघरलेला शालू व अधूनमधून संततधार कोसळणारा पाऊस असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना मोहित करत होते. नाशिक ‌जिल्ह्यात कोकणाचे सौंदर्य अनुभवास येत होते.

सर्वात जास्त गर्दी नाशिक शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर धबधब्यावर झाली होती. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी दक्षिणगंगा अर्थात गोदावरी नदीचे रूप याठिकाणी बघण्यासारखे असते. या नदीवरील सोमेश्वर धबधबा हे नाशिककरांचे पसंतीचे ठिकाण आहे. याच धबधब्याला दूधसागर धबधबाही म्हणतात. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे खडकावरून कोसळणारे पाणी व रुंदी अधिक असल्यामुळे नयनमनोहर दृश्य बघावयास मिळते. जास्त रुंदीचा धबधबा म्हणून तो परिचित आहे. पावसाची संततधार असल्याने गोदावरीला चांगले पाणी आले होते. ज्या लोकांना पर्यटनासाठी बाहेर जाणे जमले नाही, अशा लोकांनी गोदाघाटावर जाऊन पाण्याचा आनंद लुटला. बाहेरगावचे अनेक पर्यटक नदीला आलेल्या पाण्यात आनंद घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावी ‘पाऊसप्रतीक्षा’च

$
0
0

तालुक्यात ७६ टक्के पेरण्या; दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात जून प्रारंभी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणी करायला सुरुवात केली होती. गेल्या एक महिन्यात तालुक्यात ७६ टक्के पेरणी पूर्ण झाले असून ६४ हजार ५१५ हेक्टरवर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. मात्र मान्सूनच्या पावसाला अद्यापदेखील सुरुवात न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. येत्या आठवड्याभरात तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

गेल्या वर्षी जूनच्या प्रारंभी पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीची कामे लांबली होती. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातील ओल लक्षात घेत पेरणीची कामे पूर्ण केली. मात्र जूनच्या पंधरा दिवसानंतर अपेक्षित मान्सूनच्या पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. आधीच्या पावसाने विहिरींना आलेले पाणीदेखील आता खोलवर गेले असल्याने पिके जगविण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात प्रमाणपत्राची ठाकूर समाजाच‌ी मागणी

$
0
0

प्रमाणपत्र अदा न केल्यास उपोषणाचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव उपविभागात ठाकूर जमातीचे प्रलंबित व प्रस्तावित जात प्रमाणपत्राची प्रकाराने लवकरात लवकर मार्गी लावून ठाकूर जमातीच्या समाजाच्या नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी ठाकूर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना समाज मंडळाकडून नुकतेच देण्यात आले असल्याची माहिती मालेगाव तालुका ठाकूर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष बापू वाघ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सन २०१६ पासून ठाकूर समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र येथील उपविभागीय कार्यालयातून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वाघ यांनी केला. राज्य घटनेतील तरतुदीनुसार ठाकूर ही जमात अनुसूचित जमात म्हणून वर्गीकृत आहे. तर १९५६ च्या केंद्र सरकारच्या फेरबदल कायद्यानुसार ठाकूर जमाती सोबतच्या इतर जमातींचाही समावेश करून क्षेत्र बंधन लावण्यात आले. यानंतर १९७६ साली तत्कालीन शासनाने ठाकूर जमातीला कुठलेही क्षेत्र बंधन नसलेली अनुसूचित जमात म्हणून घोषित केले, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. तरी, ठाकूर समाजास जात प्रमाणपत्र देण्याविषयीचा कायदा केंद्र व राज्य सरकार, आदिवासी विभागाचे पत्र व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाकूर समाजास जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी बोलताना केली.

दरम्यान, राज्यात सर्वत्र ठाकूर समाजास जात प्रमाणपत्र देण्यात येत असून, २०१६ पासून मालेगाव विभागातील उपविभागीय कार्यालयामार्फत क्षेत्रबंधन, चालीरीती, नाव सदृश आदी बाबींची कारणे देत जातीचे प्रमाणपत्र देण्याचे नाकारले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व आमच्या मागण्या असून, येत्या दहा दिवसांत याबाबत सरकारने निर्णय न घेता ठाकूर समाजबांधवांना वेळेत जात प्रमाणपत्र अदा न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ठाकूर समाज सेवा मंडळाचे आत्माराम ठाकूर, पी. एस. आहिरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून एप्रिलचे लाइटब‌िल जास्त आले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

इंधन समायोजन आकारात झालेली वाढ, उन्हामुळे वाढलेला वीजवापर, वाढीव दरांनुसार वीज आकारावर लागलेले वीज शुल्क यातून वीज बिलाच्या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिलपेक्षा मे महिन्याचे वीजबिल जास्त आल्याचे स्पष्ट‌ीकरण महावितरणने प्रत्रकाद्वारे दिले आहे.

महावितरणने म्हटले आहे की, एप्रिल आणि मे महिन्याच्या इंधन समायोजन आकारात प्रतियुनिट २४ पैसे ते २ रुपये ८९ पैसे फरक आहे. हा आकार वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीनुसार दरमहा कमी-अधिक होत असतो. इंधन समायोजन आकार म्हणजे विद्युत निर्मितीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीतील चढ-उतारातील फरकाची निर्धारित आकारणी, जी दर युनिट वीज विक्रीवर शुल्क म्हणून आकारण्यात येते. एप्रिलमध्ये प्रतियुनिट उणे दरात असलेला इंधन समायोजन आकार मे महिन्याच्या प्रतियुनिट वीज वापरावर ग्राहकांच्या प्रकारानुसार २४ पैसे ते २ रुपये ८९ पैसे इतका वाढला आहे. महावितरणकडून सुधारित वीज दरांसाठी दाखल प्रस्ताव महाराष्ट्र वीजदर नियामक आयोगाने मंजूर केला असून आयोगाने दिलेल्या मंजुरीप्रमाणे १९ एप्रिल २०१७ च्या मध्यरात्रीपासून सुधारित दर लागू झाले आहेत. त्या दराने वीज बिल देण्यात आले होते. सुधारित दराप्रमाणे आलेल्या वीज आकारावर आयोगाने दिलेल्या आदेशानुसार वीज शुल्क आकारण्यात आले आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात एसी, कुलर, फॅन, फ्रीज आदींच्या अधिक वापराने वीज वापरही वाढतो. त्यामुळे वीज बिल वाढून आले असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

एप्रिल-मे ब‌िलाची तुलना (इंधन समायोजन आकाराप्रमाणे)

विजवापर (युनिटमध्ये) - एप्रिल बिल (रु.)- मे बिल (रु.)- फरक (रु.)

१०० - ५०९ - ६१३ - १०४

३००- २१६८ - २५५२ - ३८४

५००- ४२११ - ५३८३ - ११७२

९०१- ९५७२ - ११५३८ - १९६६

२०३९ - २६४१२ - ३१४१४ ५००२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप हॅकर बी.कॉम.चा विद्यार्थी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करणारा राजस्थानमधील हॅकर बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, आयटीचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना संशयित आरोपीने लैंगिक विकृतीतूनच हा उद्योग केल्याचे पोलिसांनी सांगितले. दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा (वय २४, रा. जसोलगाव, ता. पचपदरा, जि. बाडमेर, राजस्थान) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

असे केले व्हॉट्सअॅप हॅक

दीप्तेशच्या वडिलांचे निधन झाले असून, त्याला लहान भाऊ आहे. गावातच त्यांचे कॅरिबॅग विक्रीचे दुकान आहे. या दुकानात व्हायफाय राउटर बसवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दीप्तेशने त्याच्या काही मित्रांचे व्हॉट्सअॅप, तसेच फेसबुक अकाउंट हॅक केले. त्यातून मिळालेल्या विविध कॉन्टॅक्ट नंबरवर त्याने चॅटिंग सुरू केले. एकदा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यामुळे दीप्तेशचे धाडस वाढले. त्याने मित्राच्या फ्रेंडलिस्टमधील काही मुंबईतील महिलांशी संवाद साधत त्यांचे व्हॉट्सअॅप हॅक केले. त्यात नाशिकच्या महिलांचे मोबाइल क्रमांक संशयिताला सापडले. मग त्याने जवळपास ३० पेक्षा अधिक व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले.

तक्रारदारांची रीघ लागल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. मात्र, संशयिताचा माग काढणे तितके सोपे नव्हते. पोलिसांच्या एका पथकाने मुंबईतही सखोल तपास केला. मात्र, हाती काहीही लागले नाही. या दरम्यान पोलिसांनी इंटरनेट सर्व्हिस प्रोयव्हाडर कंपनीकडे पाठपुरावा सुरू ठेवला. क्षणाक्षणाला झालेली सर्व अपडेट्स पोलिसांनी तपासून पाहिलीत. त्या वेळी राजस्थानमधील जसोलगाव येथील व्हायफाय राउटरचा पत्ता पोलिसांना मिळाला. मात्र, दुकानात बसवलेल्या राउटरचा वापर करून कोणीही व्हायफाय सेवा वापरू शकते, असा प्रश्न समोर आला. त्यामुळे पोलिसांनी दीप्तेशचा मोबाइल क्रमांक व हॅक झालेल्या अकाउंटवरील इंटरनेट अॅक्टिव्हिटी याची सांगड घातली. त्यात दीप्तेश भावाच्या व्हायफाय राउटरच्या मदतीने हॅकिंग, तसेच अश्लील चॅटिंग करीत असल्याचा ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला आणि दीप्तेश जाळ्यात अडकला.

शिक्षण नाही; पण सहज ट्रिक उपलब्ध

दीप्तेशच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. टी.वाय. बी.कॉम.चे शिक्षण घेणाऱ्या दीप्तेशला वेगवेगळ्या गॅझेटची आवड होती. त्यातूनच वेगवेगळे प्रयोग करून तो पाहायचा. दरम्यान, हॅकिंगबाबत यू ट्यूब किंवा इतर साइट्सवर छोट्या छोट्या ट्रिक उपलब्ध असतात. त्यातील एक ट्रिक कामी आली आणि दीप्तेशचे एक पाऊल गुन्हेगारीकडे वळले, असे पीएसआय देसले यांनी सांगितले.

पाच दिवसांची पोलिस कोठडी

राजस्थानमधून अटक करून परत येताना अंतर जास्त असल्याने दीप्तेशला धुळे येथील कोर्टात हजर करण्यात आले. तिथे त्याला एक दिवसाचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर सोमवारी त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके यांच्या कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयिताने या गुन्ह्यात एका लॅपटॉपचादेखील वापर केला असावा, अशी पोलिसांची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी स्पष्ट केले.

अतिशय मोठी घटना उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकत नाही, ही धारणा या घटनेमुळे चुकीची ठरली. नागरिकांनी टू स्टेप व्हेरिफिकेशन करून अकाउंट सुरक्षित करावे. तसेच वन टाइम पासवर्ड देऊ नये.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस जिल्हाध्यक्षास मारहाण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संस्थेत कामावर येत नाही म्हणून कारवाई केल्याचा राग आल्याने एकाने काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या घरात घुसून नोकारास जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना मारहाण केली. शरणपूररोड भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अॅट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

भीमाशंकर पांडुरंग पवार (रा. शिवाजीनगर, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजाराम दिनकरराव पानगव्हाणे यांच्या शिक्षण संस्थेत संशयित आरोपी पवार नोकरीस आहे. मात्र, सक्षम कारणाविना सतत गैरहजर राहणाऱ्या पवार याच्यावर संस्थेने कारवाई केली. त्याविरोधात संशयित पवार संस्थेचे अध्यक्ष पानगव्हाणे यांची भेट घेण्यासाठी रविवारी (दि. २) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शरणपूररोडवरील कृष्णविहार या सोसायटीत आला. पवारने पानगव्हाणे यांच्या शिपाई सुनील खंडू निरभवणे (रा. काझीगडी, जुना कुंभारवाडा) यास जातीवाचक शिवीगाळ करीत घरात प्रवेश केला. प्रवेश नाकरणाऱ्या निरभवणेसह तुझ्या मालकाला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत पवार घरात घुसला. यावेळी त्याने थेट बेडरूममध्ये प्रवेश करीत पानगव्हाणेसह निरभवणे यास मारहाण केली. या घटनेत पानगव्हाणे व निरभवणे जखमी झाले. दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून सोडण्यात आले. दरम्यान, संशयिताने पानगव्हाणे यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे चेन तोडल्याचा आरोपदेखील तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात अॅट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण करीत आहेत.

सौंदर्य प्रसाधनांची चोरी

बंद दुकान फोडून चोरट्यांनी सौंदर्य प्रसाधने चोरी केल्याची घटना मखमलाबाद नाका परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील संदीप गायकवाड (रा. अश्विननगर) यांनी तक्रार दिली. त्यांच्या सौंदर्य प्रसाधनेचे दुकानाचे शटर चोरट्यांनी शनिवारी (दि. १) रात्री शटर वाकवून दुकानातील सुमारे सात हजारांचे सौंदर्य प्रसाधने चोरी केले.

पेठरोडला आत्महत्या

पेठरोडवरील पवार चाळीत राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २) सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्यचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. सुनील रामदास पवार, असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पवार यांनी रविवारी दुपारी आपल्या घरात गळफास घेतला.

हॉस्पिटलमधून लॅपटॉप चोरी

बाह्यरुग्ण विभागाच्या कॅबिनमधून चोरट्यांनी डॉक्टरचा लॅपटॉप चोरी केल्याची घटना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डॉ. ऋषिश श्रीराम सरोवर तिवारी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चोरीची घटना २७ जून रोजी दुपारी घडली. चोरट्यांनी तळमजल्यावरील बाह्यरुग्ण विभागातील कॅबिन नंबर सातमधून सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरी केला. घटनेचा अधिक तपास हवालदार गवळी करीत आहेत.

दुचाकी चोरी प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा

घरासमोर पार्क केलेली दुचाकी चौघा भामट्यांनी पळवून नेल्याची घटना भीमनगर भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये चौघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव विजय बागडे, श्रावण पोपट भालेराव, विक्रम राधामोहन यादव आणि अक्षय प्रदीप कुरकुरे (रा. सर्व सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत. भीमनगर येथील कुमावत शाळेजवळील प्रथमेश सोसायटीत राहणाऱ्या विनोद पुंजाराम बच्छाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ जून रोजी बच्छाव यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१ अे २२५२) सोसायटीच्या पार्किंगमधून चौघांनी चोरी केली. घटनेचा अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक करणारा कापड व्यापारी अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

व्यापाऱ्यांकडून कपडे खरेदी करूनही पैसे न देता फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा (रा. दिल्ली) याच्यासह त्याच्या अन्य एका साथीदारास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी येथील मनोज रामकिसन बाहेती यांनी आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

१० ऑक्टोबर २०१५ रोजी येथील कापड व्यापारी बाहेती व इतर सहकारी कापड व्यापा ऱ्यांकडून ७४ लाख ६२ हजार ७०९ रुपयांचे कापड आरोपी मुंदडा याने खरेदी केले होते. मात्र, व्यापाऱ्यांना पैसे न देताच तो मालेगाव सोडून पळून गेला होता. आझादनगर पोलिस दिल्ली, अहमदाबाद, मुंबईतील वडाळा येथे गेल्या दीड वर्षांपासून शोध घेत होते. अखेर आरोपी मुंदडा व त्याचा साथीदार आरोपी श्याम राजेंद्र राठी या दोघांना शुक्रवारी, ३० जून रोजी मुंबई काळंबादेवी येथून पोलिसांनी अटक केली. आझादनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, नाईक सुनील पाटील, कॉन्स्टेबल खुरासने यांनी अटक केली आहे. मुंदडा यांचे मूळ नाव संजय कृष्णाकुमार बाहेती (४०, रा. घणसोली, नवी मुंबई) आणि आरोपी श्याम राजेंद्र राठी यांचे मूळ नाव सरोजकुमार फुलचंद प्रजापती (३७, कोपर खैरणे, नवी मुंबई) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघा आरोपींनी मालेगाव येथे वास्तव्यास राहून बनावट कागदपत्रांचा उपयोग करून शहरातील कापड व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे.

दारू अड्डावर छापा
मालेगाव : सोयगाव भागात सुमन एजन्सीच्या पाठीमागे रोडलगत काटेरी झुडपांमध्ये विनापरवाना बेकायदा विदेशी मद्याची चोरट्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना मालेगाव पोलिसांनी रविवारी (दि. २) छापा टाकून विवेक वसंतराव बच्छाव (रा. सोयगाव) यास पकडले. त्याच्याकडून विदेशी दारू आणि बिअरच्या एकूण २३८ सीलबंद बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. एकूण २५ हजार ३५७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जुगार खेळणारे १० अटकेत
मालेगाव : मालेगाव-खडकी रोडवरील रमझानपुरा भागात रविवारी (दि. २) रात्री दीड वाजेच्या सुमारास अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी एकूण ७३ हजार ६५ रुपयांच्या मुद्देमालसह एकूण १० आरोपींना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सतीश गावित आणि त्यांचा पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल अॅडमिशनचे व्हर्च्युअल धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

मेडिकल अन् इंजिनीअरिंगसारख्या प्रवेशाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरुमचा आधार वैद्यकीय शिक्षण व संचलनालयाने यंदा घेतला. संचलनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सोमवारी दुपारी सुमारे दोन तास व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे ऑनलाइन पध्दतीने संवाद साधला.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा हा कालावधी असल्याने एकूणच प्रवेश प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या तारखा याबाबत पालक अन् विद्यार्थी खूपच संवेदनशील आहेत. प्रवेशाचे हे टप्पे बहुतांश विद्यार्थ्यांसाठी नवखे असल्याने या विषयासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधण्यास व शंकानिरसन करण्यास कुणीही उपलब्ध होत नाही. या स्थितीत अनेक खाजगी संस्था तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करून घेताना दिसल्या तरीही शासकीय विभाग याबाबत प्रामुख्याने दिसून येतो. या चित्राला मात्र संचलनालयाच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या संकल्पनेने छेद गेला आहे.

फेसबुक लाइव्ह सारख्या सोशल मीडियातील नवतंत्रज्ञाने नेटीझन्सना वेड लावले आहे. नेटवर २४ बाय ७ उपलब्ध असणाऱ्या नेटीझन्सशी थेट संपर्क होण्यासाठी सोमवारी दुपारी ४ ते ६ या दोन तासांच्या कालावधीत वैद्यकीय शिक्षण व संचलनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे संवाद साधण्याच्या केलेल्या प्रयोगाचे विद्यार्थी व पालकांमधून स्वागत केले जात आहे.

वैद्यकीय व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारच्या सीईटी कक्षाच्या वतीने २०१७-१८ या शैक्षणिक सत्रासाठी राबविण्यास सुरुवात झाली आहे. नीट २०१७ या परीक्षेतील गुणवत्तेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुंबईतील एरोली येथील संचलनालयाच्या व्हर्च्युअल क्लासरुममधून ही कार्यशाळा थेट राज्यभरात प्रक्षेपित केली गेली.

मेडिकल प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज व नोंदणी : २८ जून ते १० जुलै
- प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर : १२ जुलै
- कागदपत्र पडताळणी : १४ जुलैपासून
- सुधारित प्रारूप गुणवत्ता यादी : २४ जुलैपासून
- ऑनलाइन प्राधान्यक्रम : २४ ते २७ जुलै

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईमेल हॅक करून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिकांमधील ईमेलद्वारे होणारे संभाषण हॅक करून त्याद्वारे नाशिकमधील नंदिनी अगरबत्ती कंपनीच्या संचालकांची तब्बल दोन लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मलेशियन आरोपीविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कुमार रसिकलाल बुच (रा. सौभाग्यनगर, लॅमरोड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार होण्याची प्रक्रिया आता नवीन राहिलेली नाही. परदेशात विशेषतः वेगवेगळे टाइम झोन असलेल्या देशातील व्यावसायिक याच पध्दतीने व्यवहार करतात. मात्र, आता ‘मॅन इन मिडल’ या नव्या प्रकाराद्वारे व्यावसायिकांना गंडा घातला जात आहे. नंदिनी अगरबत्ती कंपनीचे संचालक असलेले बुच चिन देशातून काही बाबी निर्यात करतात. या व्यवहारांसाठी ते हॉटमेलचा वापर करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार करणारे उद्योजक इमेलद्वारेच एकमेकांशी संपर्कात असतात. ऑर्डर घेणे देणे, पैशांचे व्यवहार याची माहिती इमेलद्वारेच कळवली जाते. व्यवहार पक्का झाला की ऑनलाइन पध्दतीने पैसे वर्ग केले जातात. बुच हे देखील याच पध्दतीने व्यवहार करीत होते. मात्र, मलेशियन नागरिक असलेल्या फलोरा अनाक लिनूस मेलिन या आरोपीने बुच यांचे हॉटमेल हॅक केले. त्याद्वारे माहितीच्या आधारे स्वतः नॅनिंग एचएएक्स या कंपनीचे बनावट अकाउंट सुरू केले. तसेच, त्याद्वारे २९ मे ते १ जून बुच यांच्याशी संपर्क साधून व्यवहारापोटी तीन हजार ५८८ अमेरिकन डॉलर एका वेगळ्याच बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. या अमेरिकन डॉलरचे भारतीय रुपयांत दोन लाख ३२ हजार रुपये इतकी किंमत होते. मात्र, फसवणुकीचा हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ क आणि ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास निरीक्षक बोरसे करीत आहेत.

दोन लाख ३१ हजारांची परस्पर खरेदी
बँक खात्यांची फोन करून घेतलेल्या माहितीच्या आधारे चोरट्याने चक्क दोन लाख ३१ हजार रूपयांची परस्पर खरेदी केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी कॉलेजरोडवरील व्हाइट व्हिलो सोसायटीत राहणाऱ्या अनिल सुरेश बाविस्कर यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बाविस्कर यांच्या खात्यातून २० ते २३ जून दरम्यान अज्ञात भामट्याने ही खरेदी केली. तत्पूर्वी त्याने बाविस्कर यांच्या बँक खात्याची फोनवरून माहिती घेतली होती.

फसवणुकीच्या या प्रकारास ‘मॅन इन मिडल’ असे म्हटले जाते. आतंरराष्ट्रीय पातळीवर दोन ठिकाणी होणाऱ्या व्यवहारांवर किंवा त्यांच्या संभाषणावर नजर ठेऊन चोरटे फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. या प्रकरणी गुन्हा दाखल असून, तपासात पुढील बाबी निष्पन्न होतील.
- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक परिसरात तरुणाईच्या हुल्लडबाजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी/त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येणारी तरुणाई स्थानिक लोक तसेच पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तरुणाई मद्यप्राशन करून उत्साहाच्या भरातहुल्लडबाजी करीत असल्याने कुटुंबसहलीला येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्र्यंबक, इगतपुरी परिसरातील निसर्गसौंदर्य, आल्हाददायी वातावरण पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असते. मागील दोन-तीन वर्षांपासून या भागात पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. खासकरून पहिने, अंजनेरी, पेगलवाडी, डुगारवाडी, आंबोली, सापगाव, भावली, वैतारणा या परिसरात पर्यटकांची रेलचेल असते. यामुळे स्थानिक आदिवासींना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी आता हुल्लडबाजांचे लोंढे सगळ्यांसाठीच तापदायक ठरू लागले आहेत. मद्य प्राशन केल्यानंतर तरुणाई रस्त्यावर गाड्यांचे टेप वाजवत धिंगाणा घालत असते. उघडण्यावर दारू प्राशन करताना महिला पर्यटकांना उद्देशून अश्लील हावभाव केले जात असल्याने वादाचे प्रसंग घडत आहेत. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही त्रास दिला जात आहे. मागील वर्षी त्र्यंबक पोलिसांनी पेगलवाडी येथे बॅरिकेडिंग करीत मद्यधुंद तरुणाईला आवर घातला होता. तेव्हा पोलिसांच्या या कारवाईचे कौतुकही झाले होते. यंदाही अशाच प्रकारच्या कारवाईची गरज असून, त्र्यंबक तसेच इगतपुरी पोलिसांनी गस्त वाढवतानाच प्रसंगी अधिक कुमक लावून टवाळखोरांना आवर घालावा, अशी मागणी पर्यटक तसेच स्थानिक मंडळींनी केली आहे.

रविवारी आम्हाला काही टवाळखोरांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. आम्ही जाब विचारल्यावर काही मद्यधुंद तरुणांनी आमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना मारहाणही केली. परिसरात पोलिसांचे अस्तित्व दिसले तर अशा लोकांची गैरकृत्य करण्याची हिंमत होणार नाही. या परिसरात पूर्णपणे दारूबंदी करण्याची गरज आहे.
- आकांक्षा मोडक, पर्यटक

निसर्गसहलीचा आनंद सगळ्यांनी घ्यावा. मात्र, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणारे तसेच कुटुंबसहलीला आलेल्या पर्यटकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. शांतता भंग करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. तरुण मंडळींनी सेल्फी काढताना काळजी घ्यायला हवी. परिसरात अनेक ठिकाणी छोटे-मोठे जलाशय असून, ते तुडूंब भरलेले आहेत. या ठिकाणी अगदी जवळ जावू नये. डोंगरकडाही निसरड्या झाल्या असल्याने तेथेही काळजी घेण्याची गरज आहे.
- सुधाकर मांडवकर, पोलिस निरीक्षक

अठरा तरुणांना कडक समज
इगतपुरी : भावली धरण परिसरात रविवारी (दि. २) मद्यप्राशन करीत धिंगाणा घालणाऱ्या १८ तरुणांना इगतपुरी पोलिसांनी काही तासांसाठी ताब्यात घेतले. जोरजोराने आरडाओरडा करतानाच परिसरातील शांततेचा भंग ही तरुणाई करीत असल्याने कारवाई करण्यात आली. इगतपुरी पोलिस ठाण्यात नेऊन या सर्वांच्या पालकांना दूरध्वनी करून त्यांना याबाबत कल्पना देण्यात आली. अखेर यापुढे असे कृत्य करणार नाही, अशी हमी घेत पोलिसांनी समज देऊन त्यांची सुटका केली. कारवाई करण्यात आलेले बहुतांश तरुण नाशिकरोड तसेच आडगाव परिसरात राहणारे आहेत.

मटा भूमिका

पावसाळी पर्यटन खरे तर आनंददायी, पण अलीकडे ते कमालीचे त्रासदायक ठरू लागले आहे. त्र्यंबकेश्वर परिसर हा अशा पर्यटनासाठी जणू स्वर्गच आहे. परंतु, या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याऐवजी तरुणाई मद्याच्या कैफात जो धुमाकूळ घालत आहे, त्यामुळे तेथील शांततेला तर नख लागले आहेच; शिवाय पर्यावरणाचीही प्रचंड हानी होत आहे. नशेतील कारवायांनी हाणामाऱ्या, शिवीगाळ, बाचाबाची याबरोबरच महिलांची छेडछाड, अश्लील हावभाव यामुळे आनंदापेक्षा यातनाच अधिक होत आहेत. अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झालेली असल्याने या बेधुंद तरुणाईला कठोरपणे आवर घालणे गरजेचे ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांच्या मुख्य सूत्रधाराचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंभर रुपयांच्या नोटा स्कॅन करून त्याद्वारे बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा क्राइम ब्रँच शोध घेत आहेत. या टोळीने तयार केलेल्या नोटा सफाईदारपणे छापल्या असून, मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर या टोळीच्या आणखी काही करामती समोर येण्याच्या शक्यता आहे.

आण्णा कुमावत (रा. खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे) असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. क्राइम ब्रँचच्या युनिट एकने त्याच्या चौघा साथिदारांना शनिवारी (दि.१ जुलै) रात्री पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचून अटक केली होती. प्रशांत विनायक खरात (आसनगाव, शहापूर जि. ठाणे), राजेंद्र परदेशी (खर्डी, शहापूर जि. ठाणे), उत्तम गोळे (शहापूर जि. ठाणे), कांतीलाल यशवंत मोकाशी (खर्डी, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट नोटांची विक्री करणारी एक टोळी शहरात येणार असल्याची माहिती क्राइम युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक एन. एन. मोहिते व पोलिस शिपाई संदीप भुरे यांना मिळाली होती. या माहिती आधारे वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यात हे चौघे संशयित पोलिसांच्या हाती सापडले. मात्र, बनावट नोटांचा मुख्य सूत्रधार आण्णा कुमावत मात्र वाडिवऱ्हे येथेच उतरून गेला. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून इंडिका कार तसेच १०० रुपयांच्या बनावट नोटांचे १७ बंडल सापडले. एक लाख ७० हजार २०० रुपयांच्या या बनावट नोटा शहरात विक्री करण्यात येणार होत्या. संशयितांकडे केलेल्या चौकशीअंती या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आण्णा कुमावत असल्याचे स्पष्ट झाले. कुमावतला अटक केल्यानंतर बनावट नोटांचे रॅकेट केव्हापासून सुरू आहे किंवा त्यांनी यापूर्वी कोणा-कोणास बनावट नोटांची विक्री केली, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अटक संशयितांना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, खर्डी येथे तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी स्पष्ट केले.

१० हजारांचा बनावट नोटांचा एक बंडल विक्री केल्यानंतर या टोळीला पाच हजार रुपये मिळणार होते. तत्पूर्वीच क्राइम ब्रँचने त्यांना अटक केली. या नोटा फारच सफाईदार पध्दतीने छापण्यात आल्या असून, या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्यात येतील.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावात फ्लॅटधारकांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लॉटवर धुळे येथील पतसंस्थेचे कर्ज असतांना सातबारा कोरा असल्याचे भासवून आडगाव शिवारात १२ फ्लॅटधारकांना सदनिका विक्री केल्याप्रकरणी भूखंड मालकासह बिल्डरविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागामालक नरेंद्र पोपट पगार (रा. मॉर्निंग ग्लोरी अपार्ट. महात्मानगर) आणि बिल्डर दिनेशभाई अर्जुनभाई पटेल (रा. उमादर्शन सोसा. कलानगर) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहे. अमोल रमेशसिंह परदेशी (रा. लक्ष्मीनिवास अपा. गायत्रीनगर आडगाव) यांच्या तक्रारीनुसार, नरेंद्र पगार आणि दिनेशभाई पटेल यांनी अमृतधाम सर्व्हे क्रमांक २६१ मधील प्लॉटवर धुळे येथील समर्थ पतसंस्थेकडून २४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यापोटी २००४ ते २०१३ पर्यंत हा प्लॉट पतसंस्थेकडे गहाण होता. या कर्जाची परतफेड न करता आणि मिळकतीवर कर्जाचा बोजा न लावता नंतरच्या काळात या दोघांनी याच प्लॉटवर इमारत बांधून १२ जणांना सदनिका विकल्या. नवीन मालकांना जुन्या कर्जाची पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कर्जाची माहिती दडवून ठेवून फसवणूक केली म्हणून फ्लॅटधारक परदेशी यांनी संशयितांविरूध्द पोलिसांकडे फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलनामाची शाळा भरली...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज, मंगळवारी (दि. ४) साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने सोमवारी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

बॉइज टाऊन स्कूल

बॉइज टाऊन शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात ईश्वर काळे यांच्या कीर्तनाने करण्यात आली. वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ व शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’ अश्व मिरवणूक. पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली.

--

वाघ गुरुजी शाळा

‘मविप्र’च्या शाळेतर्फे वृक्षदिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली... यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली. संगीतशिक्षक शेवाळे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, पालखीपूजन व विठ्ठलाची आरती झाली. सीमा भामरे यांनी आषाढी एकादशीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लावा, मोक्ष मिळवा अशा विविध घोषणा देत वृक्षदिंडीतून चिमुकल्यांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका वनिता पाटील यांनी आभार मानले. कविता आगळे यांनी सूत्रसंचालन केले. मविप्रचे सेवक संचालक अशोक पिंगळे, नगरसेविका स्वाती भामरे व शालेय समितीचे सदस्य बी. एल. चव्हाण, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साळवे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वनिता पाटील आदी उपस्थित होते.

--

रंगूबाई जुन्नरे शाळा

विठ्ठलाचा जयघोष करीत अन् अभंग सादर करीत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या माँटेसरी विभागात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल-रखूमाई, वारकरी अशा वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. मुख्याध्यापिका स्मिता वाळवेकर यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

--

स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूल

पाथर्डी फाटा येथील शाळेत साक्षात अलंकापुरी अर्थात, पंढरपूर अवतीर्ण झाले होते. विठ्ठल-रखूमाई, वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखांतील विद्यार्थ्यांनी परिसरात काढलेली दिंडी अन् माउली माउलीचा जयघोष यामुळे चैतन्य अवतरले होते. विठ्ठल-रखूमाईच्या विधिवत पूजनानंतर विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले. माउलीच्या जयघोषावर सर्वांनी ठेका धरला होता. शिक्षकांनी वारी, दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्यध्यापिका रिना गोविल, सायली काळे व शिक्षकवृंद उपस्थित होता.

--

वाल्मीकी टॉट्स शाळा

गंगापूररोडवरील प्री-प्रायमरी आणि प्रायमरी शाळेतर्फे दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या अभंगानुसार विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. शाळेच्या संचालिका सीमंतिनी कोकाटे, संस्थापिका सीमा कोकाटे, मुख्याध्यापिका मोनिका गोडबोले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

--

भगूर, देवळाली परिसर

देवळाली कॅम्प : आषाढी एकादशी व वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त नूतन विद्यामंदिर, ओम साईराम सेवाभावी संस्था व भोर नर्सरीतर्फे भगूर शहरात प्रभात फेरी काढून वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना करण्याचा संदेश येथील विद्यार्थ्यांनी दिला. मुख्याध्यापिका लता जोशी, तानाजी भोर यांच्या हस्ते वृक्षपूजन झाले. चिमुकल्यांनी हातात विविध प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक घेऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत परिसरातून वृक्षदिंडी काढली. चिमुकल्यांनी केलेली वारकऱ्यांची वेशभूषा, तर नऊवारी साडीतील विद्यार्थिनींनी नागरिकांचे लक्ष वेधले. भगूरकरांतर्फे भाजपचे शहराध्यक्ष कैलास गायकवाड यांनी शिवाजी चौकात दिंडीचे स्वागत केले. दिंडीत अशोक बोराडे, बी. जे. शिंदे, नीलेश गोसावी, दीपक कोकणी, योगेश शेळके, विशाल शिरसाठ, शीतल जाधव आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. वनश्री पुरस्कारप्राप्त तानाजी भोर यांनी विद्यार्थी व भगूरकरांना तुळशीच्या तीन हजार रोपांचे वाटप केले. दिनेश गोविल, नामदेव सूर्यवंशी, जितेंद्र पावशे आदींचे सहकार्य लाभले. देवळालीतील दर्शन अॅकॅडमी, सरस्वती विद्यामंदिर संचालित देवळाली हायस्कूल, मविप्र संचालित आदर्श शिशुविहार येथील विद्यार्थ्यांनीदेखील वृक्षदिंडी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वर मंदिररुपाने ‍नाशकात अवतरली ‘आळंदी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आळंदी येथील ज्ञानेश्वरांच्या मंदिरानंतर नाशिकचे ज्ञानेश्वर मंदिर हे दुसरे महत्त्वाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. ज्या भाविकांना आळंदीला जाऊन समाधीचे दर्शन घेणे शक्य नाही अशांसाठी कार्तिकी व आषाढी एकादशीला हुंडिवाला लेन येथील हे मंदिर म्हणजे आळंदीच ठरते. या दोन्ही दिवशी येथे यात्रा भरते आणि भाविक आळंदीला आल्याचे समाधान मानून कृतकृत्य होतात. आज आषाढीनिमित्त येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

मंदिरात दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन करण्यात येते गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी दहीहंडी, गोपालकाल्याचे आयोजन केले जाते. ज्ञानेश्वर माउलींचा जन्मसोहळा आयोजित करण्यात येतो. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम व भागवत सप्ताह होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा अर्थात, संजीवन समाधी सोहळाही होतो. कार्तिक वद्य पंचमी ते कार्तिक वद्य चतुर्दशी अशा संजीवन समाधी सोहळ्याच्या १० दिवसांत मंदिरात भजन-कीर्तन-भागवत सप्ताह व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्रयोदशीला मंदिरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, तर समाधी सोहळ्याच्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन केल जाते. मंदिराच्या उत्सवाची परंपरा व दैनंदिन दैवतांची पूजा नारायण गणेश शौचे यांचे चिरंजीव पांडुरंग शौचे व त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.

मोठा सांस्कृतिक वारसा

या मंदिरात पूर्वी संस्कृत नाटकांच्या तालमी होत आणि येथेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. एकदा संस्कृत नाटकाच्या बक्षीस समारंभावेळी बालगंधर्व आले आणि त्यांनी आपले रेशमी जोडे मंदिराच्या बाहेर काढून ठेवले. इकडे बक्षीस समारंभ संपल्यानंतर ते बाहेर पडत असताना रेशमी जोडे चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यावर शास्त्रीजींनी बालगंर्धवांना तुमचे जोडे आमच्या मंदिरातून चोरीला गेले त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, असे सांगितले. त्यावर बालगंधर्व म्हणाले होते, की माझ्याकडे असे अनेक जोडे आहेत, तुम्ही काळजी करू नका! देशातल्या नामवंत संगीतकारांनी या ठिकाणी आपली कला सादर केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी क्रांतिकारकांनी बैठका घेतल्याचीही नोंद आढळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्ण, नातेवाइकांशी साधावा सुसंवाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे यंत्रांवरील खर्च वाढला आहे, पर्यायाने उपचारांवरील खर्चातही वाढ झाली आहे. मात्र, या मुद्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. डॉक्टरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी सुसंवाद ठेवायला हवा. आपली भूमिका मांडण्यासाठी समाजप्रबोधन करावे, सोबतच आत्मचिंतनही करावे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर दिनानिमित्त रविवारी (दि. २) रोजी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते सहा डॉक्टरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की देशाच्या जीडीपीच्या किमान पाच टक्के तरतूद सार्वजनिक आरोग्यासाठी असायला हवी. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती तरतूद अत्यल्प होती. केंद्र सरकारने अडीच टक्क्यांपर्यंत तरतूद आणली आहे. तरीही ही तरतूद अत्यल्प आहे. यामुळे ७० टक्के रुग्णांना खासगी सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे.

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टमधील काही बाबी वास्तवाला धरून नाहीत. वैद्यकीय व्यवसायाची धोरणे एखाद्या दालनात बसून ठरविली जाऊ शकत नाहीत. हा कायदा इन्स्पेक्टरराजला आमंत्रण देणारा असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

---

...यांचा झाला सन्मान

या कार्यक्रमात डॉ. भामरे यांच्या हस्ते डॉ. निवेदिता पवार, डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. अशोक बच्छाव, डॉ. डी. एम. पवार, डॉ. महेश मालू, डॉ. नवीन पटेल यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारार्थींनी मनोगतात त्यांच्या जीवनातील अनुभवांचे कथन केले. अमेरिकेतील खडतर रॅम स्पर्धा पूर्ण करण्याऱ्या डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील यांच्याबरोबर एकल गटातून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ई-पॉस’मशिनचे दुकानदारांना वाटप

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने पावले टाकताना राज्य सरकारने या प्रणालीतील स्वस्त धान्य दुकानांमधील नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या गैरकारभाराला पायबंद घालण्यासाठी ‘ई-पॉस’मशिन आणले आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने रेशनिंग दुकानधारकांना धान्य वितरित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ओयासिस कंपनीच्या या मशिनचे वाटप नुकतेच येवल्यात करण्यात आले.

रेशनिंग धान्य दुकानांमध्ये होणारा गैरकारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘पीओएस’ मशिनच्या माध्यातून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात असलेल्या रेशनिंग दुकानधारकांना पीओएस मशिन दिल्या जात आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तहसीलच्या सभागृहात तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील १४० रेशनिंग दुकानदारांना मशिनचे वाटप केले. तसेच याबाबत मशिन वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

रेशनिंग दुकानधारकांना पीओएस मशिनचा वापर कसा करावा, कार्डधारकांचे बोटांचे ठसे कसे घ्यावे, यासह इतर आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व दुकानदारांना प्रस्तुतीकरणाद्वारे पीओएस मशिनची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. प्रसंगी पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे, पुरवठा अव्वल कारकुन योगेश पाटील, उपलेखापाल पुष्कराज केवारे, लिपीक सरोदे आदींसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी उपस्थित होते. १ जुलैपासून या मशिन्सचा वापर प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आधारबेस रेशन धान्य वितरणास शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत आपले रेशनकार्ड

आधार लिंकिंग केले नाही त्यांना मुदत मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आषाढी’ने अवतरले चैतन्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वर्षातली सर्वांत मोठी एकादशी मानली जाणारी आषाढी एकादशी आज, मंगळवारी (दि. ४) साजरी होत असून, त्यामुळे शहर परिसरात चैतन्य अवतरले आहे. दिंडीतील वारकऱ्यांप्रमाणेच शहर परिसरातील भाविकांनाही विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनाची आस लागली असून, रोषणाईने उजळलेल्या शहरातील मुख्य विठ्ठल मंदिरांमध्ये सोमवारी सायंकाळनंतर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

शहरात कॉलेजरोडवरील नामदेव विठ्ठल मंदिर, काझीपुरामधील विठ्ठल मंदिर, तसेच हुंडिवाला लेन येथील ज्ञानदेव विठ्ठल मंदिर येथे काकडा आरती, दुग्ध रुद्राभिषेक, महापूजा त्यानंतर महाआरती असा सोहळा रंगणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कॉलेजरोडवरील नामदेव मंदिरात सकाळी ६.३० ला महापूजा होणार असून, ३०० महिलांची दिंडी काढण्यात येणार आहे. ९.३० वाजता ज्येष्ठ नागरिकांची दिंडी निघणार असून, ११ ते १ भजनी मंडळाचा कार्यक्रम, गायक पुष्कराज भागवत यांची बोलावा विठ्ठल मैफल होईल. दुपारी ३ ते ५ भजन होईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत महिलांचा हरिपाठ होईल. सुशीलाबाई विष्णुपंत तुपसाखरे यांच्या स्मरणार्थ तुपसाखरे परिवाराने हे मंदिर बांधले आहे.

जुन्या नाशकातील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिरात सकाळी ८ वाजता अभिषेक, ९ ते १२ या वेळेत भजन, दुपारी ४ ते ५.३० या वेळेत प्रवचन, तर रात्री ९ ते ११.३० या वेळेत कीर्तन होणार असल्याची माहिती नंदलाल काळे यांनी दिली. मंदिराची संपूर्ण व्यवस्था नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळ पाहत आहे.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीही म्हटले जाते. आषाढी एकादशी ही महाविष्णूंची तिथी मानलेली असल्याने तिला ‘हरिदिनी’ असेही म्हणतात. .

या दिवशी श्रीविष्णूंची ‘श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत जातात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तिनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

प्रेमाची साठवण

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरीत वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो. पंढरपुरात जाऊन दर्शन घेणे शक्य नाही, असे भाविक स्थानिक विठ्ठल मंदिरांत दर्शन घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहाराबाद शाळेची दयनीय अवस्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे विद्यामंदिर हे तळीरामांचे आश्रयस्थान झाले असून, शाळेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात डुकरांचा सुळसुळाट असल्याचेही दिसत आहे. परिणामी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात तर आलेच आहे. परंतु, तळीरामांच्या आश्रयस्थानामुळे त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती यतीन पगार यांच्या गावापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील प्राथमिक शाळेची ही स्थिती भयावह आहे.

ताहाराबाद येथील प्राथमिक शाळेचे पहिले ते चौथीचे वर्ग असलेल्या वर्गांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. नियमित परिसर स्वच्छ होत नसल्याने हे ज्ञान मंदिर परिसरात डुक्करांचा वावर असतो. शाळेत जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी संख्या आहे. याठिकाणी येण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी डुक्करांचा सामना करून मगच वर्गात प्रवेश करावा लागतो,असे चित्र आहे. या उपद्रवामुळे शाळेच्या आवा‌रात ठिकठिकाणी घाणीचे, चिखलाचे साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी परसत आहे. तरी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी तसेच नागरिकांनी केली आहे.

तळीरामांचा बनला अड्डा

सरकारने मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, यांना नागरी वसाहत, शाळा, कॉलेजेस, मंदिर परिसरात बंदी केली आहे. असे असतानाही ताहाराबादच्या ज्ञान मंदिरात तळीरामांनी याठिकाणी मद्य सेवन करून त्याचठिकाणी रिकाम्या बाटल्या फोडून फेकल्या जातात. काही विद्यार्थ्यांना तर यामुळे इजादेखील झाल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिनला भेदायचाय गरिबीचा अंधार

$
0
0

नाशिक : परिस्थिती नाही तर व्यक्तीतील जिद्द त्याचे भविष्य घडवत असते. गरिबीच्या अंधारातही गुणवत्तेचे तेज झाकोळत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन अरुण गांगुर्डे. हलाखीच्या परिस्थितीतही मराठा हायस्कूलमध्ये दहावीत ९२.८० टक्के गुण मिळवत त्याने आपली खडतर वाट उज्ज्वल केली. गुणवत्तेच्या या प्रकाशवाटेतूनच गरिबीचा अंधार भेदण्याची सचिनची जिद्द आहे. त्याच्या या जिद्दीला, प्रकाशवाटेवर सुरू झालेल्या प्रवासाला साथ हवी समाजाच्या दातृत्वाची. सचिनला सीए व्हायचं आहे. तशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आहे. इंजिनीअरिंग किंवा मेडिकलपेक्षा अकाउंट्स क्षेत्रात नाव कमवावे हे आठवीपासूनचे स्वप्न असल्याचे सचिन म्हणतो.

सचिन गांगुर्डे याने सध्या ११ वी कॉमर्सला अॅडमिशन घेतली आहे. त्याला सीए व्हायचे आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या सचिनने दहावीत मिळविलेले घवघवीत यश कौतुकास्पद आहे. दहा बाय दहाच्या खोलीत गांगुर्डे कुटुंबाचा संसार गुजराण करतो आहे. सचिनचे वडील अरुण गांगुर्डे पंडित कॉलनीतील मुरकुटे वाचनालयात वॉचमन आहेत. महिन्याकाठी मिळणारे साडेसहा हजार रुपयांचे वेतन कुटुंबाच्या चरितार्थासाठी अपुरे पडते म्हणून गांगुर्डे वेळ मिळेल तेव्हा विविध संस्थांसाठी गार्डनिंगचेही काम करतात. त्यातून महिन्याकाठी दोनएक हजार रुपये पदरात पडतात. सचिनची आई संगीता घरीच असतात. मात्र, मुलांच्या शिक्षणाला आणि संसाराला हातभार लागावा म्हणून त्याही दोन-चार मेसचे डबे करतात. सचिनला एक लहान भाऊ असून, तोही अभ्यासात हुशार. मुरकुटे हॉलजवळ संस्थेने दिलेल्या छोट्याशा घरात हे कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.

गांगुर्डे कुटुंब मूळ चांदवडचे. शेतीच्या छोट्याशा तुकड्यावर एकत्र कुटुंबाचा भार पेलणे शक्य नसल्याची जाणीव झाल्याने १७-१८ वर्षांपूर्वी गांगुर्डे बिऱ्हाड घेऊन शहरात आले. शहरात राहून मुलांना चांगले शिक्षण मिळेल, त्यांचे भविष्य आपल्यापेक्षा चांगले घडावे ही त्यांची अपेक्षा सचिनच्या रूपाने फळाला आली. सचिनला हळूहळू घरातील परिस्थिती समजत गेली. मराठा हायस्कूलमध्ये अॅडमिशन घेतलेल्या सचिनने लहानपणापासूनच आपल्या हुशारीची चुणूक दाखवली. चौथीत असताना स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल अवघ्या दोन मार्कांनी हुकला, याची खंत आजही त्याच्या बोलण्यात जाणवते. सचिनने आठवीत असताना नॅशनल मिन्स कम मिरिट ही परीक्षा उत्तीर्ण केली. यामुळे त्याला महिन्याकाठी पाचशे रुपयांची मदत मिळते. बारावीपर्यंत या पाचशे रुपयांतदेखील भागवू; पण पुढे काय, असा प्रश्न सचिनसह त्याच्या कुटुंबाला सतावतो आहे. सचिनला सीए व्हायचं आहे. तशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आहे. इंजिनीअरिंग किंवा मेडिकलपेक्षा अकाउंट्स क्षेत्रात नाव कमवावे हे आठवीपासूनचे स्वप्न असल्याचे सचिन म्हणतो. आजच्या टप्प्यापर्यंत जगण्याची लढाई लढणाऱ्या गांगुर्डे कुटुंबीयाला सचिनच्या ज्ञानाचा यज्ञ सुरू ठेवायचा आहे. अशा वेळी समाजातील दातृत्वाने मदतीचा हात पुढे केल्यास सचिनला नक्कीच उभारी मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पल्स पोलिओत मालेगाव पिछाडीवर

$
0
0

विशेष अभियानात केवळ ४१ टक्के बालकांना डोस; पोलिओ निर्मूलनाचे आव्हान

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशभरात जरी पोलिओ निर्मूलन झालेले असले तरी मालेगाव शहरात पोलिओ विरोधातील लढाई संपलेली नाही. शहरातील पूर्व भागात असलेल्या मुस्लिम समाजातील चुकीच्या प्रथांमुळे अनेक कुटुंबाकडून पोलिओ डोस देण्यास नकार दिला जातो. याचा परिणाम पल्स पोलिओ मोहिमेवर दिसून येतो. यामुळेच रविवारी (दि. २) येथील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत निरुत्साह दिसून आला. परिणामी, रविवारच्या या विशेष अभियानात केवळ ४१ टक्के बालकांना पोलिओ डोस देण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणेसमोर पोलिओ निर्मूलनाचे आव्हान उभे राहिले असून, मालेगाव या मोहिमेत पिछाडीवर गेले आहे.

रविवारच्या विशेष मोहिमेत १ लाख २५ हजार ७२५ बालकांना पोलिओ डोस मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ५२,५६८ बालकांपर्यंतच हे पोलिओ डोस पोहचवता आले. या मोहिमेचा शुभारंभ महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देऊन करण्यात आला. विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडून ३७९ बूथवर एकूण १,२३३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यात बूथवरील १,११८ कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मोबाइल टीम व ट्रान्झिट टीम तयार करण्यात येऊन शहरातील मुस्लिमबहुल भागात घरोघरी जाऊन पोलिस डोस देण्यात आला. शहरातील बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणीदेखील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात आले. शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागात पोलिओ लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने आरोग्य यंत्रणेला सातत्याने प्रयत्न करावे लागत आहेत. यामध्ये लसीकरण नाकारणाऱ्यां कुटुंबांचे मत परिवर्तन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात ९०० कुटुंबांचे मतपरिवर्तन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र रविवारच्या विशेष मोहिमेनंतरदेखील ७३,१५७ बालकांना पोलिओ डोस देण्याचे आव्हान कायम आहे.

अमेरिकेतील पथकाचे प्रयत्न

या आधीदेखील शहरात जानेवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत अमेरिकेतील रोटरी पथकाने शहरातील मुस्लिमबहुल भागात जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शहरातील नगरसेवक, धर्मगुरू तसेच सामाजिक संस्था शहरातील पोलिओ निर्मूलनासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images