Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तरुणावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना कस्तुरबा झोपडपट्टीत घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित रामबाबू मिश्रा (१९, रा.कस्तुरबा झोपडपट्टी, शरणपूररोड) या तरुणाने तक्रार दिली. त्यानुसार, बुधवारी रात्री सुमित झोपडपट्टीतील एकनाथ अभंग यांच्या घराजवळ मित्रांसमवेत गप्पा मारत बसलेला असतांना हा प्रकार घडला. परिसरातील वैभव जवंजाळे आणि समीर कांबळे या युवकांनी सुमीतला गाठून पैशांची मागणी केली. सुमितने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त वैभवने शिवीगाळ करीत जवळच असलेली लोखंडी खुर्ची उचलून सुमितच्या डोक्यात टाकली. तर, समीरने त्याच्यावर चाकू हल्ला केला. घटनेचा अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

गॅस चोरी करताना अटक

भरलेल्या सिलिंडरमधील गॅस चोरणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. दोघे संशयित गॅस एजन्सीच्या वितरण व्यवस्थेचे कर्मचारी आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अंबादास वाघामारे व अंकुश आप्पा तांबे (रा. भीमवाडी, गंजमाळ) अशी संशयितांची नावे आहेत. गुरूवारी दुपारी सोमेश्वर कॉलनीत दोघांना सिलिंडरमधून गॅस चोरतांना रंगेहात पकडण्यात आले. घरपोहच गॅस वितरणाचे काम करणाऱ्या या संशयितांनी गॅसने भरलेल्या टाक्या सोमेश्वर कॉलनीत नेऊन तेथे लोखंडी पाइपच्या सहाय्याने रिकाम्या टाकीत भरण्याचे काम केले. सिल केलेल्या गॅस सिलिंडरचे वजन करून दिले जात नाही. असे प्रकार यापूर्वी अनेकदा उघडकीस आले असून, ग्राहकांचे नुकसान टाळण्यासाठी पुरवठा विभागासह पोलिसांनी मोठी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

रोकडसह कपडे पळविले

चाकूचा धाक दाखवित तिघांनी दुकानातील रोकडसह कपडे पळवून नेल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये लुटीचा गुन्हा दाखल झाला आहे. इमरान रमजान अली (२० रा. मानिकपूर, जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश) या विक्रेत्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीचे पाथर्डी फाटा परिसरात बॉम्बे सेल नावाने कपड्याचे दुकान सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री इमरान व त्यांचे कामगार दुकानात असताना तीन तरुण आले. त्यांनी इमरान यांना चाकू लावत गल्यातील रोकड आणि दुकानातील कपडे काढून घेतली.

महिलेवर चाकू हल्ला
किरकोळ कारणातून चौघांच्या टोळक्याने महिलेच्या हातातील चाकू हिसकावून तिच्यावरच चाकू हल्ला केल्याची घटना देवळालीगावातील मालधक्का रोड परिसरात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाबाई सुरेश काठे (४७ रा. सरदार चाळ,मालधक्कारोड) या महिलेने सदर प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. महिलेचा नातू बुधवारी रात्री आपल्या अंगणात मोबाइलमध्ये गेम खेळत होता. करण गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे, रॉकी श्रीसुंदर व त्यांचा एक साथीदार आदींनी ‘आमचा फोटा काढतो काय?’ असे विचारत लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना लक्षात येताच भाजी कापत असलेली महिला आपल्या नातवाच्या बचावासाठी धावून आली. मात्र, संशयितांनी महिलेच्या हातातील चाकू हिसकावून त्यांच्या दोन्ही हातावर चाकूने वार केले.

दीड लाखांची चोरी
मदतीच्या बहाण्याने वृध्दाकडील एटीएम कार्डची आदलाबदल करून भामट्यांनी बँक खात्यातील एक लाख ६२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना सिडकोत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ देवराम उगलमुगले (७१ रा. सुंदरबन कॉलनी, लेखानगर) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास उगलमुगले स्टेट बँकेच्या सिडको शाखेतील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी तिथे आलेल्या आणि हेल्मेट घातलेल्या चोरट्याने उगलमुगले यांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा केला. मात्र, आरोपीने उगलमुगले यांचे एटीएम स्वतःकडे ठेवत त्यांच्या हाती दुसरेच एटीएम ठेवून पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रिंटर, स्कॅनरसह मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंभर रुपयांच्या नोटा स्कॅन करून त्याद्वारे बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या पोलिस कोठडीत १० जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. टिटवाळा येथील संशयिताच्या घरातून प्रिंटर स्कॅनर अशा साहित्यासह आणखी ७० बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या नोटांचे वितरण नेमके कोठे झाले याचा तपास अद्याप सुरू आहे.

आण्णा कुमावत (५०, रा. खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे), प्रशांत विनायक खरात (आसनगाव, शहापूर जि. ठाणे), राजेंद्र परदेशी (खर्डी, शहापूर जि. ठाणे), उत्तम गोळे (शहापूर जि. ठाणे), कांतीलाल यशवंत मोकाशी (खर्डी, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) अशी कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीला क्राइम ब्रँचच्या युनिट एकने पाथर्डी फाटा येथे सापळा लावून १ जुलै रोजी रात्री अटक केली. टोळीतील सदस्यांकडे एक लाख ७० हजार रुपयांच्या आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या नोटा संशयित शहरात विक्री करणार होते.

एक लाखांच्या नोटा विकत घेणाऱ्याकडून या टोळीला ५० हजार रुपये मिळणार होते. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांपैकी कांतीलाल मोकाशी हा क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या कार्यालयातून पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्यास इगतपुरी तालुक्यातून लागलीच जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा सामान्य व्यावसायिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चलनात आणणाऱ्या दोन तरुणांना आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या सहा बनावट नोटा तसेच स्कॅनर आणि प्रिंटर जप्त केले आहे.

आकाश भावसार आणि संतोष तमखाने अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माडसांगवी येथील हॉटेलचालक चंद्रभान नारायण गोडसे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आकाश भावसार (२३, रा. गंगापूररोड) याने दोन हजार रुपयांची बनावट नोट देऊन १०० वस्तूंची खरेदी केली होती. त्यावेळी त्याने व्यवहारातील उर्वरित पैसेही परत नेले होते. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. आकाश माडसांगवी येथील पानटपरी व्यावसायिक मंदाबाई गंगाराम साळवे यांच्याकडे सिगारेटचे पाकीट विकत घेण्यासाठी गेला. त्याने सिगारेटचे ७० रुपये देण्यासाठी दोन हजार रुपयाची नोट दिली. साळवे यांनी ती नोट चंद्रभान गोडसे यांच्याकडे देत नोटेच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित केली. गोडसे यांना आकाशने दिलेली नोट बनावट असल्याचे जाणवले. तसेच आकाशने आठवडाभरापूर्वी कटलरी व्यासायिक विजय पेखळे यांना बनावट नोट दिल्याचे लक्षात येताच गोडसे यांनी आडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ माडसांगवी येथे आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन हजाराच्या अजूनही काही नोटा आढळून आल्या. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आकाशने त्याचा साथीदार संतोष तमखाने (२०, रा. ध्रुवनगर, गंगापूर) याची माहिती दिली. पोलिसांनी संतोषला यांच्या घरी जाऊन अटक केली. पोलिसांनी संतोषकडून दोन हजार रुपयाच्या दोन बनावट नोटा आणि स्कॅनर प्रिंटिंग मशिन जप्त केले. आडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणतेही संयुक्तिक कारण न देता विमा दावा नाकारणा-या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने विमा दाव्याचे ३ लाख ७६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. तसेच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी ७ हजार व तक्रारीचा खर्च तीन हजार असा १० हजाराचा दंडही केला आहे.

लासलगाव येथील हरपालसिंग दलजितसिंग भल्ला यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. भल्ला यांच्या मालकीची टोयोटा इटियॉस काराचा वर्षभराचा विमा काढला. त्यानंतर ११ महिन्यानंतर त्यांच्या गाडीला इगतपुरीजवळ अपघात झाला. त्याची त्यांनी विमा कंपनीला तात्काळ सूचना दिली. त्यानंतर या कंपनीने सर्व्हेअरमार्फत वाहनाचा सर्व्हे केला. त्यानुसार ३ लाख ७७ हजार इतक्या रक्कमेत फुल अॅण्ड फायनल सेटलमेंट करून इंडिमि‌निटी बॉण्ड लिहून घेतला. पण त्यानंतर विम्याची रक्कम न देता दावा नामंजूर केल्याचे पत्र पाठवले. यात भल्ला यांना कोणतेही संयुक्तिक कारण देण्यात आले नाही.

या तक्रारीवर विमा कंपनीने युक्तिवाद करतांना सांगितले, की भल्ला यांनी मोटार वाहन १९८८ अन्वये केस दाखल करणे आवश्यक होते. वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात झालेला असल्याने वाहनाची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची नाही. क्लेम फॉर्ममध्ये ड्रायव्हरच्या तपशिलातील माहिती चुकीची दिल्याने अटी व शर्तीचा भंग झालेला आहे, अशीही बाजू मांडण्यात आली. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने कोणतेही संयुक्तिक कारण नसताना विमा दावा नाकारून सेवा देण्यात कमतरता केल्याचे सांगत विमा दाव्याचे ३ लाख ७६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. तसेच ऑगस्ट २०१६ पासून या रक्कमेवर १० टक्के व्याज रक्कम हाती मिळेपर्यंतचे देण्याचेही निर्देश दिले आहे. या रकमेबरोबरच तक्रारदारास मानसिक त्रासापोटी ७ हजार व तक्रारीचा खर्च तीन हजार असा १० हजाराचा दंडही केला आहे. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिला आहे. भल्ला यांच्याकडून अॅड. टी. एस. थेटे यांनी युक्तीवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इग्नुच्या सहकार्याने एमसीएफची सुविधा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु), नवी दिल्ली यांच्यात अलीकडेच शैक्षणिक सामंजस्य करार झाला. त्यानुसार विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता चालू शैक्षणिक वर्षापासून मास्टर ऑफ कॉम्पुटर अॅप्लिकेशन (एमसीए) हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी हा शिक्षणक्रम सुरू करणार असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली करून देतानाच त्यांना काळानुरूप अद्ययावत शिक्षण देण्यासाठी कुलगुरू प्रा. वायुनंदन यांनी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यांच्यात महिनाभरापूर्वीच झालेल्या शैक्षणिक करारानंतर अल्पावधीतच जलद गतीने पाऊले टाकत विद्यापीठ आणि इन्गुमधील तज्ज्ञांची बैठक विद्यापीठात बोलविली होती. या बैठकीस इग्नुच्या स्कूल ऑफ कॉम्प्यूटर अॅन्ड इनफॉर्मेशन सायन्सेसचे संचालक डॉ. पी. वी. रमेश आणि तेथील एम.सी.ए. चे संयोजक प्रा. अक्षय कुमार उपस्थित होते. शिक्षणक्रमासंदर्भात आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या राज्यातील काही अभ्यासकेंद्रांवर याचे प्रवेश होणार असून, गुणवत्तेबाबत तडजोड न करता एमसीए सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस सतर्कतेने मिळाले दोन लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खात्याची फोनवरून घेतलेल्या माहितीच्या आधारे बँक खात्यातून काढलेले दोन लाख रुपये सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाले आहे. यापूर्वी सायबर पोलिसांनी एका वृध्द महिलेची मोठी रक्कम ट्रान्सफर होण्याआधीच बँकेच्या मदतीने रोखली होती. सायबर पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

या प्रकरणी कॉलेजरोडवरील व्हाईट व्हिलो सोसायटीत राहणाऱ्या अनिल सुरेश बाविस्कर यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बाविस्कर यांच्या खात्यातून २० ते २३ जून दरम्यान अज्ञात भामट्याने रक्कम काढली होती. बँक खात्यांची फोन करून घेतलेल्या माहितीच्या आधारे चोरट्याने चक्क दोन लाख तीन हजार रुपयांची परस्पर खरेदी करून काढली होती.

या प्रकरणी २ जुलै रोजी सायबर पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस आयुक्त अॅड. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली देवराज बोरसे यांनी तपास सुरू केला. सायबर पोलिस स्टेशनचे बँक सेलचे कर्मचारी कृष्णा राठोड तसेच प्रदीप वाघ यांनी लागलीच गुन्ह्याचे गांर्भीय ओळखून बाविस्कर यांचे खाते आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधला. या कर्मचाऱ्यांनी झालेल्या सर्व गैरव्यवहारांची माहिती बँकला कळवली. त्यानंतर बँकेने हालचाली करून दोन लाख तीन हजार १५२ रुपयांची रक्कम बाविस्कर यांच्या खात्यात पुन्हा वर्ग केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया सेल पोलिसांकडून कार्यान्वित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सोशल मी‌डिया हे सध्या माहितीचे देवाण घेवाण करण्याचे प्रभावी मध्यम आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असून त्याचा आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनीही बदलत्या काळाची गरज ओळखून सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शुक्रवारी सोशल मीडिया सेलचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलिस उपअधीक्षक मुख्यालय अतुल झेंडे, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, अशोक करपे आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक संजय दराडे म्हणाले, की नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे. सामान्य नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, प्रतिक्रिया ग्रामीण पोलिस दलाचे फेसबुक पेज Nashik Rural Police, ट्विटर अकाउंट Nashik Rural Police@SpRural आणि ९१६८५५११०० या व्हॉट्सअॅप नंबरवर करावे. नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्यात बाहेर असलेले नागरिकही या सेवेचा वापर करून तक्रारी व माहिती घेऊन पोलिसांच्या संपर्कात राहू शकतात.

तक्रार करण्यासाठी कार्यालयात येऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही. नागरिकांच्या येण्या-जाण्याचा वेळही वाचेल. शिवाय सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारींवर स्वतः पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांचे लक्ष असेल. सोशल मीडियाचा गैरवापर, धार्मिक व जातीय भावना दुखावले जाणारे फोटो, क्लिप्स, मजकूर पोस्ट करणे, मोबाइल फोनद्वारे बँक अकाउंट / एटीएम कार्डची माहिती घेऊन होणारी ऑनलाइन फसवणूक अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालय सायबर पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप हॅकर पुणे पोलिसांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करणाऱ्या राजस्थान येथील दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा या हॅकरच्या पोलिस कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दीप्तेशच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, पुणे येथे दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पुणे शहर पोलिसही दीप्तेशचा ताबा घेणार आहेत.

राजस्थानमधील बाडमेल जिल्ह्यातील पचपदारा तालुक्यातील जसोलगाव येथे राहणाऱ्या दीप्तेशला सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने १ जुलै रोजी अटक केली. अवघ्या टी. वाय. बीकॉमचे शिक्षण घेत असलेल्या संशयित दीप्तेशने वन टाइम पासवर्डच्या माध्यमातून नाशिक शहरासह मुंबई, पुणे येथे आणि गुजरातसह राजस्थान राज्यातील अनेक महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. नाशिक शहरात ३१ तक्रारदार पुढे आले. त्यात २९ महिलांचा समावेश होता.

राजस्थानसह गुजरात आणि राज्यातील पुणे येथील महिलांचे अकाउंट हॅक करून अश्लिल मॅसेज पाठवल्याची कबुली संशयित दीप्तेशने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, दीप्तेशने पुणे येथील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले असून, तसे चार गुन्हे पुणे शहर पोलिसांकडे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पुणे शहर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी (दि. ७ जुलै) शहरात आले. संशयित दीप्तेशच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारीच संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने दीप्तेशच्या पोलिस कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की अद्याप आमचा तपास सुरू आहे. त्याचमुळे संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. शहर पोलिसांचा तपास संपला की कोर्टाच्या आदेशाने संशयितास पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.

आर्थिक फसवणूकही!

दीप्तेशने मोबाइल हॅक करून केवळ महिलांना त्रास दिला नाही; तर त्याने आर्थिक फसवणूकही केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईतील एक व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक केल्यानंतर त्याने पेटीएम अॅपचा वापर करून सात हजार रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या तसा कोणताही पुरावा समोर आला नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे गेट बंद होते तेव्हा...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मध्ये रेल्वेच्या मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील निफाड स्टेशनपासून थोड्या अंतरावर असलेल्या रेल्वे गेटची तार तुटल्याने जवळपास दीड ते दोन रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. निफाड-पिंपळगाव मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे गुजरातहून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसह परिसरात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायीकांसह प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
निफाड-पिंपळगाव मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील पोलची तार तुटल्यामुळे दोन्ही बाजूचे गेट बंद झाले. त्यामुळे गेटच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. काही वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने शाब्दीक वादही झाले. एरवी दहा मिन‌िटे गेट बंद झाले तरी लांबच लांब रांगा लागतात. त्यातच शुक्रवारी तर तब्बल दोन तास रेल्वे गेट बंद होते.
हा मार्ग साईभक्तांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. गुजरातहून सापुतारा-वणी-पिंपळगाव-निफाडमार्गे भाविक शिर्डीला दर्शनासाठी येतात. शनिवार, रविवारची सुटी आल्यामुळे भाविकांची संख्या अधिक होती. मात्र रेल्वे गेट दोन तास बंद असल्यामुळे भाविकांचे हाल झाले.
शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निफाड स्टेशनजवळून रेल्वे गेली. तेव्हा कुंदेवाडी जवळील हे गेट बंद करण्यात आले. मात्र रेल्वे गेल्यानंतर गेटमनने जेव्हा रेल्वे गेट वर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गेटची तार तुटल्याचे निदर्शनास आले. तब्बल दोन तास अथक परिश्रमानंतर हे गेट सुरू झाले.
शिर्डीला गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने गुजरातच्या भाविकांच्या गाड्या गेटच्या पश्चिम बाजूला अडकून पडल्या होत्या. तसेच पिंपळगावला कांदा घेऊन जाणारे ट्रॅक्टर, पीकअप, शालेय बस, अपडाऊन करणारे विद्यार्थी, नागरिकांचे हाल झाले.
निफाड रेल्वे स्टेशनचे हे गेट अनेकदा अशाच प्रकारे तांत्रिक बिघाड होऊन बंद पडते. या मार्गावर वाहनांची संख्या खूप असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक लोक रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संताप व्यक्त करतात.
शिर्डी-सुरत असा हा महत्त्वाचा मार्ग आहे. वाहनांची गर्दी असलेला हा मार्ग असल्याने या रस्त्यावर रेल्वेकडून उड्डाणपूल बांधला जात आहे. उड्डाणपुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम कासवगतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’साठी दर निश्च‌ित

$
0
0

बागायती जमिनीला दुप्पट दर


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बहुचर्चित समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी द्यावयाचे दर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केले. मात्र हे दर काही गावांतील शेतकऱ्यांना अमान्य असून, आज (दि.८) सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

सिन्नर तालुक्यात जिरायती जमिनीसाठी कमीत कमी ४० लाख ९९ हजार रुपये, तर जास्तीत जास्त ८४ लाख ७१ हजार रुपये दर निश्च‌ित करण्यात आले आहेत. इगतपुरीत हाच दर ४३ लाख २० हजार ते ८४ लाख ६८ हजार रुपये एवढा निश्च‌ित झाला आहे. विशेष म्हणजे बागायती जमिनींसाठी या दरांच्या दुप्प्ट दर दिले जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचा दरपत्रकाला विरोध

समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींचे प्रति हेक्टरी दर जिल्हास्तरीय समितीने जाहीर केले असले तरी ते मान्य नसल्याची भूमिका काही गावांमधील शेतकऱ्यांनी घेतली आहे. आज, शनिवारी विरोध दर्शविणाऱ्या सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये सरकारची अंत्ययात्रा, मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, दरपत्रकांची होळी करून निषेध नोंदविण्यात येणार आहे. सिन्नर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शने करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याने दोन वासऱ्यांच्या फडशा पाडला. म्हाळसाकोरे ते कोमलवाडी रस्त्यालगत भरत गणपत मुरकुटे हे आणि सोमनाथ सखाहरी पडोळ हे शेतात वस्ती करून राहतात. मुरकुटे आणि पडोळ यांच्या वस्तीत अवघ्या २०० फुटाचे अंतर आहे. दोघांच्याही घराच्या जवळ असलेल्या शेडमध्ये गायी व वासऱ्या बांधलेल्या होत्या. गुरुवारी रात्री बिबट्याने आधी मुरकुटे यांच्या शेडमधील वासरीवर हल्ला करून तिला तिला केले. त्यानंतर उसाच्या शेतात नेले.त्यानंतर पडोळ यांच्या डमधील वासरीलाही ठार करून तिलाही उसाच्या शेतात नेले. या दोन्ही वायऱ्या शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्या. मुरकुटे आणि पडोळ कुटुंबाने लागलीच याबाबत वन विभागाला कळव‌िल्यानंतर परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी पंचनामा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांचा श्वास गुदमरलेलाच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महापालिकेच्या नाशिक पूर्व भागातील औरंगाबाद रोडवरील नैसर्गिक नाल्यांचा कोंडमारा केलेला आहे. यामुळे मागील वर्षी तसेच याही वर्षी पाणी दुकाने आणि घरांमध्ये शिरण्याचे प्रकार घडले. पावसाच्या पाण्याला मार्ग काढून देताना सर्वांचीच दमछाक झाली. या मार्गावरील १३ नाल्यांपैकी ११ नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे ते बुजले आहेत.
सराफ बाजारात पाणी शिरल्यानंतर नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची महापालिका प्रशासनाने घोषणा केली असली तरी अजून औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक नाल्यांच्या बाबतीत कुणावरही कारवाई झालेली नाही. औरंगाबाद नाका ते मानूर शिवार या पाच किलोमीटरच्या औरंगाबाद मार्गावर १३ नैसर्गिक नाले आहेत. त्यातील ११ नाल्यांच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. या नाल्यांच्या जुन्या खुणा केवळ रस्त्याचे काम करताना येथे पाइप टाकून केलेल्या मोऱ्यांमुळे लक्षात येते. अन्यथा या भागातून नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह होता, हेदेखील कुणाला कळले नसते.
मुंबई-आग्रा महामार्गाकडून औरंगाबाद रोड आणि औरंगाबाद रोडकडून गोदावरी नदीपात्राकडे असा उताराचा भाग आहे. या उताराच्या भागात हे नैसर्गिक नाले होते. हा भाग शेतीचा असताना नाले मोकळे होते. कितीही पाऊस झाला तरी या नाल्यांनी पाणी वाहून जात असल्यामुळे पिकांचे कधी नुकसान होत नव्हते. नांदूरनाका येथील नाल्याला तर मोरीही शिल्लक ठेवण्यात आली नाही. त्यामुळे जोराचा पाऊस झाल्यावर नाक्यावर पाण्याचे तळे साचते ही समस्या गंभीर झालेली आहे. नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचा श्वास मोकळा केला नाही तर भविष्यात पाण्याचा निचरा होण्याची समस्या अत्यंत गंभीर होईल. नांदूरनाका परिसरातील पाणी काढून देण्यासाठी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साह्याने नाला करावा लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृतच्या हालचाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली तरी, चार मह‌िने होऊनही स्वीकृत सदस्यपदी निवड करता आलेली नाही. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने स्वीकृतचा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने स्वीकृतसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेत स्वीकृतसाठी पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आयुक्तांनी महापौरांसह सभागृहनेता, गटनेत्यांची बैठक येत्या ११ तारखेला बोलावली आहे. या बैठकीत निवड प्रक्रियेची औपचारिक माहिती दिल्यानंतर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. परंतु, स्वीकृतसाठी अटी व शर्तींमुळे भाजपसह शिवसेनेची मात्र अडचण होणार आहे.
महापलिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकून एकहाती बहुमत मिळवले, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. केंद्र-राज्यासह नाशिक महापालिकेतही भाजपची सत्ता आल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, सत्तेचा लाभ घेण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांच्या गणसंख्येवर स्वीकृत सदस्य निवडण्याची पद्धत आहे. त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार पालिकेत भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य निवडले जाऊ शकतात. परंतु, भाजपमध्ये स्वीकृत सदस्य होण्यासाठी मोठी स्पर्धा असून, तीन जागांसाठी जवळपास दीडशे जण इच्छुक आहेत. भाजपमध्ये तीन जागांसाठी जवळपास १६० पेक्षा जास्त जण इच्छुक आहेत. प्रशासनाने लावलेल्या अटी शर्तींतून निम्मे इच्छुक कमी होणार आहेत. शिवसेनेतही दोन जागांसाठी तीस ते चाळीस जण इच्छुक आहेत.

या क्षेत्रातील हवेत

- विधी, शिक्षण, अभियांत्र‌िकी, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातून निवड
- संबंधित क्षेत्रातील किमान पाच वर्षे अनुभव
- याबाबत कागदोपत्री पूर्तता आवश्यक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांतील पेट्रोलवर डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

इंदिरानगर भागातील बऱ्याच इमारतींत उभ्या असलेल्या वाहनांमधून पेट्रोल काढल्याच्या तक्रारी येत असतानाच आता सिडको व अंबड औद्योगिक वसाहतीतही मोठ्या प्रमाणावर पेट्रोल व डिझेलची चोरी होत असल्याचे दिसून आले आहे. उभ्या असलेल्या गाड्यांना खोट्या चाव्या लावून, तसेच पाइप कापून त्यातील पेट्रोल व डिझेल काढून घ्यायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे नागरिकांना आर्थिक झळ बसण्यासह नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सिडको व इंदिरानगर भागात सध्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधील पेट्रोल, डिझेल काढण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांतूनदेखील इंधनचोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मागील आठवड्यातच इंदिरानगर पोलिस ठाण्यात काही नागरिकांनी याबाबत तक्रार अर्जसुद्धा दिले आहेत. परिसरात पेट्रोल व डिझेलची चोरी करून त्याची विक्री करणारी ही मोठी टोळीच कार्यरत असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्‍त केला असून, यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अंबड औद्योगिक वसाहतीत राज्यासह राज्याबाहेरील अनेक वाहने कंपन्यांना लागणारे साहित्य घेऊन येत असतात. कंपनीत हे साहित्य उतरविणे किंवा पुन्हा भरणे यासाठी बराच वेळ लागत असल्याने या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर गाड्या उभ्या असल्याचे दिसते. आशा गाड्यांमधील डिझेल काढून त्याची विक्री केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. अनेकदा परराज्यांतील वाहनचालक असल्याने त्यांना धमकी देऊन सर्रासपणे गाड्यांमधील डिझेल काढले जात असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.

--

नोंदीअभावी निर्ढावले चोरटे

बऱ्याचदा पेट्रोल व डिझेलची चोरी झाल्यावर त्याची नोंद पोलिसांत काय करायची म्हणून कोणीही पोलिसांना ही माहिती देत नसल्याचे दिसते. त्यामुळे चोरटे चांगलेच निर्ढावले असून, चोऱ्यांच्या प्रकारांत वाढ झाली आहे. झटपट व कमी श्रमात पैसा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हे प्रकार केले जात असल्याचे दिस असून, अंबड पोलिसांनी या पेट्रोल व डिझेल चोरीच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे. या टोळीचा त्वरित छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधू-महंतांनी सांगितले वृक्षारोपणाचे महत्त्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पिंपळद येथील जुना आखाड्याच्या जागेत गुरूपौर्णिमा उत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी आखाडा परिषदेचे महामंत्री व जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक हरेगिरी महाराज यांनी दोन हजार वृक्ष लागवडीच्या संकल्प सोडला. उप‌स्थित साधुमहंतांनी पुराणातील दाखले देत वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

महंत हरेगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मधुर फळे देणारी दीर्घायुषी झाडे लावून आपण आपल्या गुरूप्रती श्रद्धाभाव व्यक्त करीत आहोत. तसेच त्र्यंबकनगरी ही गौतमऋषींनी वसवलेली आहे. पुराणकथेचा दाखल घेतल्यास येथे आधी शेतकरी होते. तम्हणून आपणही येथे शेती आणि वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

महामंडलेश्वर शिवगीरी महाराज यांच्यासह गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या एन. सी. सी. व गाईड विद्यार्थिनी आणि शिक्षिका उपस्थित होत्या. महामंत्री हरिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांनी शेतीचे विविध प्रयोग यशस्वी केले याचा दाखला दिली. तसेच जुना आखाड्याच्या पिंपळद येथील जागेत नंदनवन फुलविण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांनी उपस्थितांना त्र्यंबकेश्वर येथे वृक्षारोपण करण्याची महती स्पष्ट केली. त्र्यंबकेश्वर हे गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात येते. येथे पाऊस चांगला झाला तर संपूर्ण दक्षिण भारताला तो उपयुक्त ठरतो. म्हणून येथील वनसंपदा वाढवली पाहिजेे, असे त्यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेला नाशिकची चाके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे मोटार निर्मिती करणाऱ्या एकलहरेतील रेल्वे ट्रॅक्शन कारखाना विस्तारीकरणाचे संकेत मिळाले आहेत. कारखान्याच्या वीस एकर जागेत ५२ कोटींचा नवा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यात रेल्वेची चाके आणि अॅक्सल तयार केले जाणार आहेत. विस्तारीकरणाचा प्रस्ताव मध्य रेल्वेला पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्प उभारणीस सुरुवात होईल.
हा प्रकल्प झाल्यास आऊटसोर्सिंगची कामे रेल्वेला करावी लागणार नाहीत. उत्पादन खर्चात कपात होईल. तसेच सुमारे पाच हजार जणांना रोजगार मिळेल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी ‘मटा’ ला दिली. मध्य रेल्वेचे मुख्य वीज अभियंता अग्रवाल यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहचला आहे. तो मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे जाईल. खासदार गोडसे यांनी अग्रवाल यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्वरित रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याची सूचना केली. देशातील रेल्वे ट्रॅक्शनचे प्रमुख घनशाम सिंग यांनीही नवीन प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
युनियनचे प्रयत्न
एकलहरे ट्रॅक्शन कारखान्याला गेल्या महिन्यात दिल्लीतील रेल्वे बोर्डाचे सदस्य घन्यशाम सिंग आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी भेट दिली होती. त्यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने त्यांना विस्तारी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. या दोघांनी युनियनचे सचिव भारत पाटील, उपाध्यक्ष, पी. एम. जाधव, अनिल दराडे, मनोज नागरे यांच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. विस्तारीकरणासाठी ही युनियन २२ वर्षापासून प्रयत्न करत आहे. विस्तारीकरणानंतर कारखान्यात चार वर्कशॉप होणार आहेत.
खासदार हेमंत गोडसे कारखाना विस्तारीकरणासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. रेल्वे बोर्ड सदस्य नवीन टंडन यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. रेल्वे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गोडसे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. कारखाना विस्तारीकरणामुळे सुमारे पाच हजार जणांना रोजगार मिळेल. रेल्वेचा आऊटसोर्सिंगचा खर्च वाचेल. कारखाना विस्तारीकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम मध्य रेल्वेच्या मुख्य विद्युत अभियंत्यावर सोपविण्यात आले होते. तत्कालीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी १९८१ साली अडीचशे एकर जागा अधिग्रहित करुन एकलहरे रोडवरील हा कारखाना सुरू केला. येथे पाचशे कामगार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडर्न प्रणवचा संबळावर ठेका!

$
0
0

नाशिक ः ढोलकी आणि संबळ वाजलं आणि पावलं थिरकली नाही असं सहसा होत नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत लोकसंगीताचा ताल अगदी खोलवर मुरला आहे. या तालाला तोलून धरलयं संबळ या चर्मवाद्याने! आज पालक आपल्या पाल्यांना टीव्हीवरील रिअॅलिटी शोसाठी तयार करू इच्छितात. त्यातही गायनालाच जास्त पसंती असते. वादन असलं तरी ‘संबळ’ या वाद्याकडे अजूनही मागासलेपणानं पाहिलं जातंय. मात्र, ओझरच्या प्रणव कोंटुरवार तरुणानं हे वाद्य कला आणि करिअर म्हणून निवडलंय. लोककला लोप पावत असताना केवळ गुरुंच्या सांगण्यावरून संबळ हे करिअर निवडून त्याने आपल्या गुरूंना अनोखी गुरूदक्षिणा दिली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण डॉक्टर, इंजिनीअर आणि त्याही पलिकडं वेगवेगळ्या क्षेत्राकडं वळत असताना प्रणवनं लोककलेला प्राधान्य दिल्याने त्याचे वेगळेपण उठून दिसते.

ओझरसारख्या जागतिक नकाशावर लढाऊ मिग विमानाचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या पण छोटयाशा गावात हा मुलगा प्रणव जन्मला, वाढला. गावात खंडोबाचं मंदिर, दरवर्षी भरणारी जत्रा. खंडोबा म्हणजे जागरण-गोंधळ, वाघ्या- मुरळी, संबळ या सगळ्या लोककलांत त्याचं बालपण समृद्ध झालं. लोकसंगीत अंगात भिनलं आणि त्याला या लोककलेनं आकर्षित केलं. अनेक गोंधळी गीतात वाजणारं संबळ त्याच्या मनाला भुरळ घालू लागलं. पण शिक्षण अर्धवट सोडून कसं चालेल? त्यातही वडील संजय कोंटुरवार हे माध्यमिक शिक्षक! मग शिक्षकाचं पोरगं शिकलं नाही तर लोक काय म्हणतील? असं बाकीच्यांनी भरीस घातलं. पण संजय कोंटुरवार हे हाडाचे कलाशिक्षक. त्यांनी प्रणवला संबळ वादक, सुप्रसिध्द ढोलकीवादक गणेश डोकबाणे यांच्या सुपुर्द केलं आणि तुम्ही याचे गुरू, याला सांभाळा म्हणत लोककलेसाठी आपल्या मुलाला तयार करण्याची परवानगी डोकबाणे यांना देऊन टाकली.

माध्यमिकचं शिक्षण संपलं आणि प्रणवनं संबळ वादनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. मुळात या वाद्याची गोडी आणि अंगातही लोकसंगीताचा ताल त्यामुळे अल्पावधीत त्याने आपल्या गुरूच्या आवडत्या शिष्यात स्थान मिळवलं. प्रणवनं निष्ठेनं त्यांच्याकडं आपलं शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण सुरू असतानाच प्रणव आणखी एक कला महाविद्यालयात शिकत होता, ती म्हणजे शिल्पकला! महाविद्यालय म्हटलं की, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आले. त्यातही कलेलाच वाहिलेलं महाविद्यालय असेल तर मग विचारायलाच नको. प्रणवला ही संधी मिळाली. त्यानं त्या संधीच सोनं केलं. पुढे अनेक महाविद्यालयात तो गोंधळी गीतावरील नृत्यस्पर्धेत संबळ वाजवताना दिसू लागला. लोकांनाही त्याचा ताल आवडू लागला. प्रणवचा हुरूप वाढत गेला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा महोत्सव असो अथवा जिल्हा परिषदेची अध्यक्ष चषक स्पर्धा, यात प्रणवचा संबळ वाजत राहिला. अरुण-राज प्रस्तूत ‘मायबाप’ कार्यक्रमातही त्याने संगीत साथ केलीय. ‘हंडाभर चांदण्या’ या गाजत असलेल्या नाटकाच्या गाण्यातही प्रणवचा संबळ दिलखुलास वाजला.

प्रणव अजूनही शिक्षण घेत असून आपल्या वादनात अधिक बारकावे तो शोधतो आहे. त्यासाठी त्याला पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीत जायची इच्छा आहे. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या तालमीत तयार होण्याचं त्याचं स्वप्न आहे. संबळ वादनाची लोककला लोप पावत असताना आपल्या गुरूंना अनोखी भेट म्हणून करिअरच संबळ वादनात करण्याचं ठरविणारा प्रणव कोंटुरवार त्यामुळे आज वेगळा ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुबिन कौन बतावे बाट...

$
0
0


महाभारताची रचना करणाऱ्या महर्षी व्यास मुनींना वंदन करण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास पौर्णिमा साजरी केली जाते, तीच गुरुपौर्णिमा होय. उत्तम शिष्य घडवितानाच त्यांच्यातले अवगुण काढून चांगल्या गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम गुरू करतात. आयुष्य जगण्यासाठीची वेगळी दृष्टी देतानाच शिष्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य गुरूंकडून अविश्रांतपणे सुरू असते. लहान-मोठ्या प्रसंगांपासून विविध प्रकारच्या कसोट्यांद्वारे शिष्याला पैलू पाडण्याचे गुरूंचे कार्य कायमच अलौकिक मानले जाते. गुरुपौर्णिमेनिमित्त अशाच गुरूंबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जागविलेल्या आठवणी त्यांच्याच शब्दांत...

--

द्रष्टे अन् सर्जनशील

माझे गुरू अंध असले, तरी त्यांची प्रतिभा फार मोठी होती. एकदा मी माझ्या गुरुंसोबत चालत होतो. त्याचवेळी आमच्या जवळून एक व्यक्ती गेली. तत्क्षणी गुरुजी मला म्हणाले, रेवणसिद्धा गेला का रे आपल्या जवळून. बघ बरं. मी त्या व्यक्तीला थांबवले आणि त्याकडे चौकशी केली, तर तो रेवणसिद्धाच होता. मी अाचंबित झालो आणि तत्काळ गुरूंना म्हणालो, आपण कसं ओळखलंत? त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, काही नाही रे, ३० वर्षांपूर्वी तो असाच भेटला होता. त्याच्या पावलाची लय आणि वजन अजूनही माझ्या लक्षात आहे! हे उत्तर ऐकून मी थक्कच झालो.

कर्नाटकमधील गदडा येथे राहणारे पं. पुट्टराज गवई हे माझे गुरू. त्यांच्याविषयी काय, किती आणि कसं सांगायचं खरं तर हा प्रश्नच आहे. संगीत, कला आणि आध्यात्म यांचा ते सागरच होते. नाऊमेद कधी व्हायचं नाही, ही त्यांची शिकवण. सतत प्रयत्नरत राहण्याचा त्यांचा सल्ला आजही लख्ख आठवतो. सतत जागरूक राहणं हेच जिवंतपणाचं लक्षण असल्याचे त्यांनी शिकविले. शिष्याला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ते आग्रही असायचे. एखाद्या समस्येला, आव्हानाला समर्थपणे तोंड देण्याची शिकवण ते सतत द्यायचे. शिष्याने केवळ उत्तम शिष्यच नाही, तर उत्तम व्यक्तीही व्हावे यासाठी ते आग्रही होते. त्यांच्याकडे विविध बाबींविषयी असलेला दृष्टिकोन अतिशय व्यापक होता. रसिक म्हणून ऐका, रियाज करा आणि सादरीकरण करा, असे ते सतत सांगायचे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मी किंमत दिली म्हणूनच मी आज जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. कला जोपासण्यासाठी रसिक म्हणून ऐका, हे त्यांचे वाक्य आजही मी अनुसरतो आहे. त्यांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी मला त्यांची शिकवणच कामी येत आहे. पुढे मी कोलकाता, पुणे आणि अन्य ठिकाणी संगीताचे धडे घेतले. गुरुजींमुळे माझा पक्का झालेला पायाच आज कलेची साधना करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. गुरुजींची आणखी एक मोठी आठवण आहे.

एका मैफलीसाठी विविध प्रकारचे ४०० तांबे एकत्र करण्यात आले होते. ती मैफल तब्बल चार तास चालली. श्रोते मंत्रमुग्ध झाले. मैफल संपली आणि ते सर्व तांबे परत देण्याची वेळ झाली. अनेकांनी तोंडात बोटे घातली काहींनी भुवया उंचावल्या. गुरुजींनी एक एक तांब्या हातात घेतला आणि तो वाजवून पाहिला. ज्याचा तो होता त्याच्याकडे एकेक सुपूर्द केला. संगीतातला डोळसपणा त्यांच्याकडे होता. प्रत्यक्षात दृष्टी नसली, तरी त्यांच्या अंगी जी प्रतिभा होती ती कल्पनातीतच म्हणावी लागेल.

(शब्दांकन ः भावेश ब्राह्मणकर)

--

निसर्ग हाच सर्वांत मोठा गुरू

निसर्गच्या सान्निध्यातूनच जगण्याची ऊर्जा मिळते. कोकिळेच्या एका मधुर स्वराने कवी सजग होतो, तर कधी धबधब्याच्या खळखळाटातून गाण्याची चाल मिळते. ढगांचा स्पीड नृत्य कलाकाराला एखादी जगावेगळी स्टेप शिकवून जातो. कलाकरांना मिळणारी चेतना निसर्गात ओतप्रोत भरली असून, यापेक्षा मोठा गुरू शोधून सापडत नाही.

चित्रकलेची ओळख आणि श्रीगणेश घरातच झाला. वडील चंद्रकांत वामन भालेराव चित्रकलेचे शिक्षक होते. त्यामुळे घरात ओघानेच चित्रकलेविषयी वातावरण निर्माण झाले होते. त्या वयात आईवडिलांसारखा गुरू मिळणे महत्त्वाचे असते. सुदैवाने मला ती संधी मिळाली. थोडासा मोठा झाल्यानंतर निसर्गचित्रकार शिवाजीराव तुपे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्यासह निसर्गात जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचा आनंद घेताना त्याच भावनेने तो कागदावर कसा उतरवायचा, याचे मूळ त्यावेळी सापडल्याचे वाटते. एखाद्या ठराविक ठिकाणी समोर दिसणारा क्षण डोळ्यात समावून घेण्याची कला यानिमित्ताने शिकता आली. त्याचा पुढे कायमच मोठा उपयोग झाला. पुढील काळात वासुदेव कामत, जॉन फर्नांडिस यांसारख्या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांनी निसर्गाकडे, तसेच जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची कला शिकविली. गेल्या काही वर्षांत चित्रकलेच्या माध्यमातून देश-विदेशांत काम करण्याची संधी मिळाली. चित्रकलेच्या माध्यमातून देश-परदेशांतील कलाकारांशी संबंध येतो. त्यांच्याकडून रोजच काही तरी शिकायला मिळते. अगदी शाळेतील लहान विद्यार्थ्यांची चित्रेही आपल्याला नवा दृष्टिकोन देतात.

कलेची उपासना हे नित्यकर्म आहे. ही उपसाना अखेरपर्यंत सुरू राहावी, हीच प्रत्येक कलाकराची अपेक्षा असते. मात्र, त्यासाठी तसा सहवास महत्त्वाचा ठरतो. अनेकदा हे काम निसर्गाच्या सान्निध्यात सहजगत्या होते. कलाकाराला निसर्ग समजावून घेता आला पाहिजे. निसर्ग जे शिकवतो, ते घरात बसून कागदावर उतरविणे शक्य नाही. लहानपणी आईवडील, शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षक आपले गुरू असतात. करिअर घडवतानादेखील गुरू आवश्यक असतो. हे गुरू आपल्यातील सकारात्मक; पण लपलेली तत्त्वे शोधण्यास मदत करतात. मात्र, निसर्ग या तत्त्वांना खतपाणी देऊन फुलविण्याचे काम करतो. निसर्गात हरवून कलेची साधना करण्याची कला निसर्गच देत असतो. त्यासाठी एक अनुभव घेणे क्रमप्राप्त आहे. निसर्गाशी तादात्म्य पावून हरवून जाण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही!

(शब्दांकन ः अरविंद जाधव)

--

‘जेजे’चं आवारच गुरुस्थानी

खरंतर शिल्पकला या क्षेत्राशी माझा कधीच संबंध आला नव्हता. घरची पार्श्वभूमीदेखील तशी नव्हती. १९८७ साली पेठे विद्यालयातून दहावी पास झाल्यानंतर काय करायचे याबाबत माझ्यासह घरचांमध्येही संभ्रम होता. आपल्या मुलाने कलाक्षेत्रात काही तरी करावे अशी वडिलांची इच्छा होती, तर पोलिस खात्यात अधिकारी व्हायचं, अशी स्वतःची इच्छा होती. दहावी पास झाल्यानंतर सायन्सला प्रवेश घेतला. अकरावी पास झाल्यानंतरही दिशा सापडत नव्हती. त्यामुळे आयटीआयच्या पेंटर ट्रेडसाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टची जाहिरात एका वर्तमानपत्रात वाचायला मिळाली आणि तडक मुंबई गाठली. बरोबर फक्त स्वतः काढलेली चित्रे होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या आवारात प्रवेश करताच थोडंसं धस्स झालं. हे क्षेत्र नवीन होतं. मुंबई नवीन होती. येथे कसे होईल, काय होईल, अशी धाकधूक मनात होती. परंतु, जे. जे.च्या आवारात प्रवेश करताच डोक्यात घंटा वाजली. विचार पक्का झाला. येस, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं तेच हे ठिकाण. आता काही तरी करून दाखवायचं या ध्येयानं पछाडलं. कमर्शिअल आर्टिस्ट होऊन नाव कमवायचं, असा निश्चय केला. मुलाखतीच्या वेळी बरोबर आणलेली चित्र पाहून तेथील शिक्षकांनी मला फाइन आर्टला जाण्याचा सल्ला दिला. बघता बघता फाउंडेशनची दोन वर्षे संपली. तोपर्यंत जे. जे.च्या आवारानं विचारांची शक्ती दिली होती. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला होता. माझ्या शिल्पकलेच्या प्रवासात एका व्यक्तीचाच हातभार लागला, असे म्हणता येणार नाही. ज्या-ज्या शिक्षकांनी मला घडवलं ते शिक्षक आपापल्या विषयात ग्रेटचं होते. त्यामुळे माझ्या शिल्पकलेमध्ये प्रत्येकाची छाप जाणवते. शिक्षण घेताना शिक्षक आणि विद्यार्थी असं नातंच नव्हतं. एकमेकाला रोज भेटलो नाही तर जीव कासावीस होऊन जायचा. माझ्या शिक्षणात एस. आर. पवार, एम. पी. पवार, मधुकर वंजारी यांचा मोलाचा वाटा आहे. जे. जे.मध्ये प्रत्येक शिक्षकांचे आणि मुलांचे चांगले जमायचे. रोज नवीन गोष्ट शिकायला मिळत असल्याने एक विचारधारा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जे. जे.मधील शिक्षणात सौंदर्यशास्त्राचे शिक्षण आयुष्याला कलाटणी देऊन गेले. गजानन पाटील नावाच्या शिक्षकाने जे. जे.मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर जादू केली. सौंदर्य म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होते, त्याचा प्रवास कसा असतो, या बाबी गजानन पाटील अतिशय खुबीनं शिकवत असतं. त्याच्या विचारांनी कामाला एक वेगळा आयाम मिळाला.

(शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक)

--

बाबाच माझे गुरू...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरू असतो; पण गुरू वडिलांच्याच रूपात मिळण्यासाठी खरोखरच भाग्य लागते आणि ते भाग्य मला लाभले. माझे बाबा प्रमोद भडकमकर मला गुरू म्हणून लाभले. जन्मापासून बाबांकडून काय घेतले तर ते म्हणजे फक्त संगीतच, म्हणजे तबला. ते बोल म्हणायचे व मी झोपायचे. पुढे पुढे तर ते बोल म्हटल्याशिवाय मी झोपतच नसे. अगदी लहानपणापासून ते रियाजासाठी बसले, की मी त्यांच्या आजूबाजूला असे.

खूप लहान असल्यापासून त्यांनी मला तबला शिकवायला सुरूवात केली. त्यांच्याकडून शिक्षण हे फक्त तबल्यावर बसल्यावरच नाही, तर कुठेही कधीपण मिळाले. जिथे रिदम मिळाला की ते काहीतरी म्हणत, शिकवत. मग ती ट्रेन असो किंवा गाडीचा हॉर्न किंवा अजून काहीही. प्रवासातही ते याचीच चर्चा करीत.

बाबांनी मला कधीच मुलगी म्हणून कसलीही सूट दिली नाही. ते म्हणायचे या वाद्याची जी डिमांड आहे ते तसेच वाजले पाहिजे. बाबांनी तबल्यातील अनेक गोष्टी शिकवल्या. तबला सुरात कसा लावायचा, कायदे कसे वाजले गेले पाहिजेत, रेला वाजवताना कशाची तयारी लागते, बंदिशी कशा वाजवायच्या, कोणत्या अक्षरावर वजन द्यायचे, बंदिशी दुसऱ्या तालात रचताना कशा रचायच्या, कायद्याच्या, रेल्याच्या बंदिशी कशा बांधायच्या, तिहाई कशी बांधायची हे मी त्यांच्याकडून शिकले.

तबला हा सुंदर, आकर्षक कसा वाजवला जाईल, मुख्यत: गाण्याची साथ करताना कसा वाजवायचा या गोष्टीचा त्यांचा खूप अभ्यास होता. तोपण त्यांनी मला शिकविला. अनेक बारकावे बाबांनी मला शिकविले.

बाबा व्यक्ती म्हणून खूप सकारात्मक, मिस्किल, सर्जनशील, गमतीशीर होते. स्टेजवर वाजवताना नवीन काही सुचले तर तिथल्या तिथे वाजविणे, शिकविणे ते करीत असत. प्रत्येक प्रोग्रॅमला काही तरी नवीन करण्याचा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांच्यामुळे मला अनेक मोठ्या कलाकारांना भेटण्याची, त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. प्रत्येक कलाकाराचा तबला कसा ऐकायचा, गाणं कसं ऐकायचं, कुणाचे कुठले गुण घ्यायचे हे बाबांनी शिकवलं. रोज त्यांच्या बोलण्यात गुरुजींबद्दल (पं. सुरेशदादा तळवलकर) काही तरी असायचेच. माझं वय, शिक्षण व अनुभव सर्व कमी आहे; पण बाबांमुळे मला जे काही काही मिळालं ते सांगण्याचा हा प्रयत्न. या सर्व आठवणी खूप अविस्मरणीय आहेत, त्या बाबांशिवाय दुसरे कुणी देऊ शकत नाही, याची मला जाणीव आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार.

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

००


गुरू गुण लिखा न जाई!

गुरू गुण लिखा न जाई!

सब धरती कागज करू, लेखनी सब बन राई

सात समुंद की मासी करू, गुरू गुण लिखा न जाई... ‍

एखाद्याचा आवाज खूप चांगला आहे, परिस्थ‌तिीही पूरक आहे, परंतु गुरू चांगला लाभला नाही, तर यशस्वी शिष्य घडू शकत नाही. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. मी आज जो काही आहे केवळ गुरूंमुळेच.

विदर्भात माझे क्र‌ीडाशिक्षक देवराव भालेराव हे उत्तम बासरीवादक होते. त्यांची बासरी मी अत्यंत तन्मयतेने ऐकत असे. त्यांनीच माझी संगीतविषयक आवड ओळखली. त्याची जाणीवही करून दिली. मलाही याच क्षेत्रात पुढे जावेसे वाटू लागले. परंतु, संगीत हे करिअरचे क्षेत्र नाही, असे सांगून आईवडिलांनी विरोध केला. त्यामागे माझी काळजी अधिक होती. पं. भीमसेन जोशींची गाणी मी कितीतरी वेळा ऐकत असे. त्यांना भेटावे असे मनोमन वाटत होते. पुसद येथे एका कार्यक्रमात त्यांना भेटलो. त्यांच्याच हस्ताक्षरात त्यांच्या घराचा पत्ता घेतला. त्यांना भेटण्याचा दिवस आणि वेळही ठरली. वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडले. पुण्यात पोहोचलो. परंतु, त्या दिवशी पंडितजी भेटले नाहीत. असे तब्बल २० दिवस चालले. ते सांगतील त्या वेळेच्या दहा मिनिटे आधीच मी त्यांच्या दरवाजाजवळ पोहोचायचो. हे २० दिवस माझ्यासाठी कसोटीचे होते. विसाव्या दिवशी पंडितजींनी घरात बोलावून त्यांच्या रियाजाच्या खोलीमध्ये नेले. तुला येते ते गा, असे सांगितले. त्यांनी गायलेली एक रचना तंतोतंत गाण्याचा प्रयत्न केला. तू हे कोठून शिकलास, असे पंडितजींनी विचारले आणि त्यांच्याकडे माझे गाण्याचे शिक्षण सुरू झाले. पंडितजी गाणे शिकविण्यास तयार झाले, हे ऐकून कुटुंबीय आनंदित झाले. पंडितजींचा अधिकाधिक सहवास लाभावा म्हणून वडिलांनी मला पुण्यात ड्रायव्ह‌िंग क्लासही लावून दिला. पंडितजींच्या सूचनेनुसार नंतर मी त्यांच्याच मुलांसमवेत पं. रामभाऊ भाटे यांच्याकडे शिकलो. त्यांच्यामुळे माझ्यात अामुलाग्र बदल झाला. गाणे शिकत असलो, तरी चरितार्थाचा प्रश्न होताच. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर एसएनडीटीमध्ये नोकरीला लागलो. वीणा सहस्रबुद्ध आणि प्रभा अत्रे यांच्या सान्निध्यात आलो. त्यांच्यामुळे नाशिकमध्ये नोकरीची संधी मिळाली. गाणे शिकणे सोडू नकोस, असा सल्ला रामभाऊ भाटे यांनी दिला. मुंबईत पद्मविभूषण सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलो. आज अधिष्ठाता ललित-कला विभाग, एसएनडीटी वूमेन्स युनिट, मुंबई विद्यापीठ या पदापर्यंत पोहोचलो आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

०००

पतीरुपानेच लाभला गुरू

प्रत्येकाला आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याचा गुरू मिळत असतो. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन जीवनप्रवासाला दिशा देण्याविषयीचे मार्गदर्शन यातून मिळत असते. माझ्या आयुष्यात मात्र माझ्या पतींच्या रुपानेच मला गुरू लाभला. शिक्षण पूर्ण करण्यापासून प्राध्यापक होणे व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करीत माझे पती प्रा. देवीदास गिरी यांची मोलाची साथ मला लाभली.

बारावीपर्यंत अतिशय ग्रामीण भागात मी शिकत होते. बीएच्या प्रथम वर्षात शिकत असताना माझी व प्रा. देवीदास गिरी यांची ओळख झाली आणि काही महिन्यांतच आम्ही विवाहबद्ध झालो. माहेरी व्यवसायाने सोनार कुटुंब असल्याने शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मुलींच्या शिक्षणाबाबत तर ती अजिबातच नव्हती. त्यामुळे शिक्षणास ग्रामीण भागात विरोध होता. प्रा. गिरी यांच्याशी विवाह झाल्यानंतर मात्र सासरी चित्र अगदी उलट होते. शिक्षणासाठी अतिशय पूरक वातावरण होते. सासरे मुख्याध्यापक, दीर, नणंद प्राध्यापक असे चित्र होते. त्यामुळे लग्नानंतर मला माझे पती प्रा. गिरी यांनी पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रीने घराबाहेर पडून काम केले पाहिजे, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे, अशी शिकवण मला त्यांनी दिली. त्यानंतर ओझर कॉलेजात मी बीएला मी प्रवेश घेतला. शिक्षणासाठी मिळत असलेल्या पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी मराठी विषयात ओझर कॉलेजात, एमएला नाशिकरोड कॉलेजात पहिली आले. बीएडमध्येही पहिली आले. सेट पास झाले आणि एसएमआरके महिला कॉलेजात अर्ज केल्यानंतर नोकरीही मिळाली. एका ग्रामीण भागातील मुलीसाठी हा प्रवास स्वप्नवत होता. परंतु, माझ्या गुरूंमुळे अर्थात, माझ्या पतींमुळे मला हे यश मिळविता आले.

प्रा. गिरी संमेलन, कविसंमेलने, व्याख्याने यासाठी अनेक ठिकाणी मला घेऊन जायचे. चांगली भाषणे माझ्या कानावर पडावी, असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे माझ्यात बरेच परिवर्तन झाले. बायोडाटा तयार करणे, इंटरव्ह्यूला सामोरे जाणे हे टप्पेदेखील त्यांच्यामुळेच पूर्ण करू शकले. आता स्पर्धा परीक्षांवरील माझी पंधरा पुस्तके, दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. काही क्षण असेही आले की हे आपण करू शकू की नाही, असे वाटले. मात्र, गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. आपल्यात परिवर्तन होण्यासाठी एखादी व्यक्ती आपल्या मागे असावी लागते. मला घरातच गुरू मिळाला आहे. केवळ शिक्षणापुरताच नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मार्गदर्शन मला लाभत आहे.

(शब्दांकन ः अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवर्षीय समीहनची ‘कळसूबाई’वर स्वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील रांगड्या सह्याद्री रांगेतील ५ हजार ४०० फूट असे सर्वांत उंच असलेले कळसूबाई शिखर सात वर्षांच्या समीहन पत्की या चिमुकल्याने लीलया सर केले आहे. एकदा तरी या एेतिहासिक शिखराच्या माथ्यावर आपला माथा टेकवावाव, अशी प्रत्येक गिर्यारोहकाची सुप्त इच्छा असते. पावसाळ्यात तर त्यावर चढाई करणे अवघडच असते. पण, समीहनने त्याची आई शलाका व वडील प्रसाद पत्की यांचा बरोबरीने ही मोहीम फत्ते केली आहे.

समीहनला ट्रेकिंगचे आकर्षण असून, या आधी त्याने आपल्या आई-वडिलांबरोबर पांडवलेणी, चामरलेणी व अंजनेरी या पर्वतांवर चढाई केली आहे. ट्रेकिंगला जायच असेल, तर सर्वांत आधी समीहन उठून तयार असतो. ट्रेक करताना त्याला सगळ्यांचा पुढे राहणे व टीमला लीड करणे आवडते. कळसूबाईलाही तो त्याचे फुटबॉल प्रशिक्षक जगदीश खाडे यांचा बरोबरीने सर्वांत पुढे होता, असे त्याच्या पालकांनी सांगितले. मुसळधार पाऊस, गर्द धुके व प्रचंड वारा अशा आव्हानात्मक परिस्थितीत त्याने हे शिखर सर केले.

--

‘बंदे में है दम...’

शिखराच्या शेवटच्या ५०० फुटांवर प्रचंड वारा होता. मोठ्यांनाही स्वतःचा तोल संभाळण कठीण जात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिखर सर करण्याची समीहनची जिद्द वाखाणण्यासारखी होती. हळूहळू मार्गक्रमण करीत सर्वांनीच कळसूबाई शिखरावर माथा टेकला. सकाळी ९ वाजता सुरू केलेली चढाई दुपारी सव्वाबारा वाजता पूर्ण झाली. सव्वातीन तास चढाई करूनही समीहनचा उत्साह तेवढाच होता. ज्या उत्साहात चढाई केली, तेवढ्याच उत्साहात सगळ्यात पुढे राहून तीन तासांत तो पर्वत उतरला. उतरताना इतर ट्रेकर्सकडून ‘बंदे में दम है’, ‘यू मोटिवेटेड मी’ यांसारख्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया ही खूपच बोलक्या होत्या. भविष्यात महाराष्ट्रतील इतर पर्वतही सर करायचा समीहनचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नाशिक सायकलिस्ट'चे अध्यक्ष जसपाल बिर्दींचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

सायकल चळवळीत मोठे योगदाने देणारे 'नाशिक सायकलिस्ट'चे अध्यक्ष जसपाल बिर्दी यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. मुख्य म्हणजे सायकलवर नितांत प्रेम करणाऱ्या बिर्दी इगतपुरी-नाशिक या मार्गावर सायकलिंग करतानाच हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली.

बिर्दी शनिवारी सकाळी सायकलिंगसाठी निघाले, नाशिक-इगतपुरी-नाशिक असा सायकल प्रवास करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांचे निधन झाले.

सायकलिंगच्या प्रचारासाठी प्रचंड परिश्रम करणारे अशी जसपाल यांची ओळख होती. नाशिक-पंढरपूर सायकलवारीचे, दिव्यांगांसाठी सायकल राईड, महिला सक्षमीकरणासाठी महिला रॅली असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या निधनामुळे सायकलिस्ट समुदायाला मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images