Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गाळे महिनाभरात खुले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक विकास महामंडाळाने अंबड एमआयडीसीत दोनशे लघु व मध्यम गाळ्यांचा प्रकल्पाची उभारणी केली असून, येथील दोनशे गाळ्यांचा प्रकल्प महिनाभरात कार्यान्वित होणार असल्याचे एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी ‘मटा’ला सांगितले. त्यामुळे भाडेतत्त्वावरील जागेत उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या गाळ्यांचे दर बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. एमआयडीसीने उद्योजकांना परवडतील असे दर करावेत, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

निमा, आयमा, लघु उद्योग भारती, निवेक, नाइस यांच्यासह इतरही औद्योगिक संघटनांनी लघु, मध्यम उद्योजक व भाडेकरूंना गरजेप्रमाणे एमआयडीसीने गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली होती. औद्योगिक संघटनांची मागणी लक्षात घेता एमआयडीसीने अंबड एमआयडीसीत दोनशे गाळ्यांचा प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. निमा, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी भाडेधारकांना एमआयडीसीने गाळे उपलब्ध करून द्यावेत यासाठी उद्योजकांना बरोबर घेत आंदोलनही छेडले होते. उद्योजकांची मागणी लक्षात घेता एमआयडीसीने दोनशे गाळ्यांचा प्रकल्प हाती घेतल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्त केले होते.

अंबड एमआयडीसीत सुरू असलेला दोनशे गाळ्यांचा प्रकल्प महिनाभरात कार्यान्वित होणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मात्र, एमआयडीसीने उभारलेल्या गाळ्यांचे दर बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे निमा, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी म्हटले आहे. उद्योजकांना परवडतील अशा दरातच एमआयडीसीने गाळे द्यावेत, अशी मागणी बेळे यांनी नुकत्याच झालेल्या ‘झूम’च्या बैठकीत केली होती.

--

एमआयडीसीने नव्याने उभारलेल्या गाळ्यांचे दर बाजारभावापेक्षा अधिक आहेत. उद्योजकांना परवडतील अशा दरात एमआयडीसीने गाळे देण्याची गरज आहे. असे झाले, तरच खऱ्या अर्थाने सर्वांना या गाळ्यांच्या उपयोग होऊ शकेल. अन्यथा बरेच जण स्वतःच्या गाळ्यांपासून वंचित राहू शकतील.

-धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, आयमा

--

लघू, मध्यम व भाडेतत्त्वावर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांची अनेक वर्षांपासून गाळ्यांची मागणी होती. त्यातच निमा, आयमा या औद्योगिक संघटनांच्या मागणीवरून दोनशे गाळ्यांचा प्रकल्प एमआयडीसीने बांधला आहे. महिनाभरात गाळ्यांचे काम पूर्ण होणार असून, गरजू उद्योजकांना त्यांचा लाभ मिळणार आहे.

-हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात आढळल्या १९२ वृक्षांच्या प्रजाती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वृक्षांचे जतन होऊन वृक्षतोड थांबवण्यासाठी महापालिकेने हायटेक पद्धतीने वृक्षगणनेचे काम सुरू केले असून, आतापर्यंत ३१ प्रभागांपैकी १२ प्रभागांमध्ये वृक्षगणना झाली आहे. त्यात जवळपास १४ लाख दोन हजार वृक्षांची गणना झाली आहे. या वृक्षगणनेत शहरात १९२ वृक्षांच्या प्रजाती आढळून आल्या असून, त्यात ४३ प्रजाती या फळझाडाशी संबंधित आहेत. अद्याप नऊ प्रभागांची वृक्षगणना अपूर्ण असल्याने शहरातील वृक्षगणना २५ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. जीआयएस व जीपीएस यंत्रणेद्वारे ही वृक्षगणना केली जात असून, थेट गुगल मॅपवर जाऊन आपल्या भागातील वृक्ष आता नागरिकांना पाहता येणार आहेत.

महापालिकेन शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय घेतला असून, गेल्या नोव्हेंबरपासून त्याची सुरुवात झाली आहे. टेरॉकॉन इकोटेक प्रा. लिमिटेड या एजन्सीमार्फत ही वृक्षगणना केली जात आहे. अत्याधुनिक तंत्रामार्फत पहिल्यांदाच नाशिकमध्ये वृक्षगणना करण्यात येत आहे. आता जीआयएस, जीपीएस या अत्याधुनिक तंत्राद्वारे वृक्षगणना करण्यात येणार आहे. या वृक्षगणनेसाठी कंपनीने 'वृक्षशरद' नावाचे मोबाइल अॅप विकसित केले असून, एका महिन्यात अडीच लाख वृक्षांची मोजणी करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षगणनेच्या प्रक्रियेत तीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या झाडांची गणना केली जाणार आहे. यात वृक्षाचे नंबरिंग केले जात असून, या वेळी वृक्षांच्या खोडांचा घेर, वृक्षाचे वय, त्याची स्थिती, त्याला काही कीडरोग झाला असेल तर त्याची पाहणी, कोणत्या प्रजातीचा वृक्ष, त्याचा पसारा आदी माहिती संकलित केली जाणार आहे.

वृक्षगणना २५ लाखांवर जाण्याची शक्यता

आतापर्यंत १२ प्रभागांत वृक्षगणनेचे काम झाले आहे. त्यात १४ लाख २ हजार २६८ वृक्षांची गणना करण्यात आली आहे. वड, पिंपळ, लिंब, गुलमोहर, बांबू, आंबा, फणस अशा विविध प्रजातींची नोंद केली जात आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असून, पालिका हद्दीत अद्याप नऊ प्रभागांची वृक्षगणना बाकी आहे. त्यामुळे शहरातील वृक्षांची गणना २५ लाखांवर जाण्याचा अंदाज पालिकेने वर्तवला आहे. महापालिकेने २००७ मध्ये मनुष्यबळामार्फत शहरातील वृक्षांची गणना केली होती. त्या वेळी १९ लाख वृक्ष पालिका हद्दीत आढळून आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधील लॅपटॉप, पर्स पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहन पार्क करीत असलेल्या चालकास पैसे पडल्याची बतावणी करून दोघा भामट्या महिलांनी कारमधील लॅपटॉप आणि पर्स हातोहात लांबवली. ही घटना बिटको चौकात घडली असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्निल युवराज देवरे (रा. नम्रता चौक, पाटीलनगर, सिडको) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.३१) काही कामानिमित्त देवरे नाशिकरोड येथे गेले होते. पत्नीस उतरवून ते बिटको चौकातील सरोज ट्रॅव्हल्स येथे कार (एमएच १२, एफटी ९४६४) पार्क करीत असताना हा प्रकार घडला. वाहन पार्क करीत असताना त्यांना एका महिलेने खाली पैसे पडल्याचे सांगितले. देवरे वाहनाखाली उतरले असता दुसऱ्या बाजूने उभ्या असलेल्या महिलेने कारचे दुसरे दार उघडून कारमधील आसनावर ठेवलेला डेल कंपनीचा लॅपटॉप आणि महिलेची पर्स असा ऐवज चोरून नेला. पर्समध्ये तीन हजाराची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे १३ हजारांचा मुद्देमाल होता.

जुगाऱ्यांवर कारवाई

नाशिक :हिरावाडी परिसरातील क्षीरसागर कॉलनीतील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १७ जुगारींना जेरबंद केले. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्विफ्ट कारची पार्किंगमधून चोरी

नाशिक : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली सुमारे सहा लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना कामटवाडा शिवारातील शिवतीर्थ कॉलनीत घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश विजय फेरके (रा. आशा अपा. शिवतीर्थ कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. फेरके यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून घट्ट केले मुलांशी मैत्रीबंध

$
0
0

कामाची जबाबदारी कितीही वाढली तरी संवादाचा पर्याय सदैव खुला ठेवला. आपल्या कामाचा ताण मुलांवर पडणार नाही, याची सदैव काळजी घेतली. मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. मुलांनाही आमच्या दोघांची मित्र म्हणून गरज भासते हे आमच्या दोघांच्या परिश्रमांचे चीज असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.

भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा या दोन महत्त्वाच्या कामांचा संगम सिंगल कुटुंबात झाला आहे. ही दोन्ही पदे महत्त्वाची तितकीच जबाबदारीची! सतत कामाचा बोजा आणि तीन वर्षांनी ठरलेली बदली, असे गणित ठरलेले. सिंगल यांना रेवांत हा मोठा मुलगा, तर रविजा ही धाकटी कन्या. रेवांत सध्या बारावीचे शिक्षण घेतो, तर रविजाने कॉलेज जीवनास सुरुवात केली आहे. वरवर सर्वसामान्य कुटुंबात दिसणारे चित्र येथेही दिसते. मात्र, पती-पत्नी दोघेही मोठ्या हुद्द्यावर असताना त्यांचे संगोपन करणे, त्यांना मैदानी खेळासह अभ्यासातही प्रवीण बनवण्याची जबाबदारी सिंगल दाम्पत्याने चपखलपणे पार पाडली. सर्व सुख मुलांच्या पायी आणून ठेवल्याने ते संस्कारी, मेहनती होतात असे नाही. मुलांसाठी पैसा किंवा सुखवस्तू आणून दिल्याने पालकांची जबाबदारी संपत नाही याची सिंगल यांना जाणीव आहे. जो वेळ मिळेल तो मुलांसाठी द्यावा, असे सिंगल मानतात. आम्हा दोघांच्या सतत बदल्या होत गेल्या. अगदी छोट्या शहरांमध्ये काम केले. यावेळेस मुलांना कधीही दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही. पालक म्हणून जे कर्तव्य पार पाडायला हवे, ते पार पाडलेच असे सिंगल यांनी सांगितले. मुलगी अवघी १८ महिन्यांची होती. त्या वेळी मी तिला स्वतः स्विमिंग टँकमध्ये घेऊन उतरलो. तिला या क्षेत्रात आवड निर्माण व्हावी म्हणून लक्ष दिले. आज ती स्विमिंगमध्ये नॅशनल चॅम्पियन असून, राष्ट्रीय पातळीवरील किमान तीन पदके तिने पटकावली आहेत. मुलालादेखील टेनिसची प्रचंड आवड असून, त्यालाही या क्षेत्रात करिअर करता यावे म्हणून आम्ही सतत झटत असतो. अगदी सुरुवातीपासूनच मुलांना मैदानाशी जोडले. मैदानी खेळात मुलांचा रस निर्माण झाल्याने त्यांना रिकामेपण जाणवतच नाही. कामाचा ताण असला तरी जेव्हा शक्य असेल तेव्हा सर्वांनी जेवण सोबत करावे, यासाठी आम्ही सगळेच आग्रही असतो. मुलांशी संवाद ठेवणे गरजेचे असून, तो नियम आम्ही दोघे पाळतोच. विनिता सिंगल यांनी मानसशास्त्राचे शिक्षण घेतले असून, त्यांच्या शिक्षणाचा फायदा मुलांच्या संगोपनात कामी आल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. मुलेही त्यांची बाजू आम्हाला सांगतात. दिवसभरात आलेले चांगले आणि वाईट अनुभव आम्ही मुलांशी शेअर करतो. आई-वडील म्हणून मुलांसमोर एक एक्झाम्पल सेट करायला हवे. ते आईवडीलच करू शकतात. संवादातून मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले की जिथे गरज आहे, तिथे मुलांना समाजावून सांगता येते आणि आवश्यकता असल्यास ओरडताही येते. यासाठी आपल्याला मुलाचे मन मित्र म्हणून ओळखता यायला हवे, असे सिंगल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये कर्मचारी गैरहजर राहत असल्याने आयुक्तांनी आता शिस्तीचा बडगा उगारला आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दोन दिवसांपासून पालिका मुख्यालयातील विविध विभागांना अचानक भेटी देऊन दोन दिवसांत नऊ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, तसेच कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून व गैरशिस्तीचा ठपका खातेप्रमुखांवर ठेवला आहे. पालिकेत बायोमेट्रिक हजेरी कार्यान्वित करण्याचेही आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या मुख्यालयास विभागीय कार्यालयांमध्ये कर्मचारी टेबलवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी आहेत, तसेच कर्मचाऱ्याचे उशिरा येणे, लवकर जाणे आणि ओळखपत्र जवळ न बाळगण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या विरोधात आयुक्त कृष्णा यांनी कारवाई सुरू केली आहे. कृष्णा यांनी शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस पालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. त्यात नऊ कर्मचारी टेबलवर आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीला खातेप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

श्रावणी सोमवारची सुटी रद्द

महापालिकेने श्रावणी सोमवारनिमित्त गेल्या दोन सोमवारी विशेष सवलत म्हणून दोन तास अतिरिक्त सुटी मंजूर केली आहे. त्यामुळे सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंतच कामकाज सुरू होते. मात्र, गेल्या सोमवारी कर्मचाऱ्यांनी दुपारपासूनच कार्यालय सोडले तर काही कर्मचारी कामावरच आले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत, थेट पुढील दोन श्रावणी सोमवारची दोन तासांची सुटी रद्द केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना झटका बदला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीबीटी सेल कार्यान्वित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या डायरेक्ट बेन‌फििट ट्रान्सफर सेलच्या (डीबीटी) शिफारसीनुसार महाराष्ट्र सरकारनेही डीबीटी सेल सुरू केला असून, नागरिकांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रकमा थेट खात्यात जमा होणार आहेत. डायरेक्ट बेनिफ‌टि सेलची अमंलबजावणी करण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ही वेबसाइट नाशिकच्या इएसडीएस या कंपनीने तयार केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानुसार उच्च आणि तंत्र शिक्षण, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा या पाच विभागातील ४० योजनांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी)ने राज्यातील लाभार्थ्यांना लाभ, अनुदान किंवा सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (डीबीटी) आणि सेवा पोर्टल विकसित केले आहे. या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे लाभ, अनुदान किंवा सेवा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट प्राप्त होणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या तीनशेपेक्षा जास्त योजना आणि सेवा या पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत

विविध रकमा जमा होणार

या योजनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती देखील थेट खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे किंवा सरकार ज्या व्यक्तींना विविध सेवांच्या मोबदल्यात सेवानिवृत्त वेतन देते अशा सर्व व्यक्तींचे वेतन या योजनेच्या माध्यामातूनच थेट बॅँकेत जमा होणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे लाभ किंवा विविध प्रकारचे अनुदान देखील यातून मिळणार आहे. तसेच एखाद्या ठिकाणी पूर आल्यास अशा ठिकाणी मदतीसाठी देण्यात येणारी रक्कम देखील याच माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे.
एक महिन्यापासून या वेबसाइटवर काम करत होतो. त्यात येणाऱ्या अडचणी सोडवल्या आहेत. पहिल्यांदाच असे प्रॉडक्ट तयार करत असल्याने आमच्यापुढे आव्हान होते. या वेबसाइटवर जास्त लोकांनी एकाच वेळी लॉगीन केले तरीही काहीही अडचण येणार नाही. ही वेबसाइट सुरू होऊन दोन दिवस झाले. त्यात कोणतीही अडचण नाही. हे करण्यासाठी तांत्रिक विभागाचे सचिव व मुख्यमंत्री कार्यालयाकडून सतत फॉलोअप घेतला जात होता.

- पीयूष सोमाणी, आयटी उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच नगरसेवकांवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत राखीव जागांवर उमेदवारी करून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी अद्याप जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. यात भाजपचे उद्धव निमसे, मिर्झा शाहीन सलीम बेग, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, काँग्रेसच्या समिना मेमन, मनसेचे योगेश शेवरे यांचा समावेश आहे. पंधरा दिवसांत या नगरसेवकांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई ओढवण्याची शक्यता आहे.

निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, या मुदतीला आता अवघे पंधरा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाने या नगरसेवकांसह जातपडताळणी समितीला पत्र देऊन तातडीने जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती केली आहे. महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून आलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात येते. महापालिकेची निवडणूक २३ फेब्रुवारीला झाली. येत्या २३ ऑगस्ट रोजी निवडणुकीला सहा महिने पूर्ण होत आहेत. या वेळी बहुसंख्य उमेदवारांनी निवडणूक लढतेवेळीच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, निवडून आलेल्या नऊ उमेदवारांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. त्यामुळे निवडणूक विभागाने या सर्व नऊ नगरसेवकांना जातपडताळणी पत्र वेळेत सादर करण्याचे पत्र पाठवले होते. यापैकी चार नगरसेवकांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहेत. मात्र, पाच नगरसेवकांनी अद्याप जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. पंधरा दिवसांत प्रमाणपत्र आले नाही तर हे नगरसेवक अपात्र ठरण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यता रद्दविरोधात शिक्षकांची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शैक्षणिक वर्ष २०१२ नंतर मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्याचा शासनाच्या निर्णयाविरोधात विविध शिक्षक संघटनांतर्फे शनिवारी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे निदर्शने करून हा निर्णय रद्द करण्याचे निवेदन सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांना देण्यात आले. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास दि. १६ ऑगस्टपासून लाक्षणिक उपोषणाचा इशाराही यावेळी निदर्शनकर्त्या शिक्षकांनी शिक्षण खात्याला दिला.

याप्रसंगी निदर्शने करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करताना पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, की शासनाने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. या शिक्षकांना सक्षम अधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या असल्याने शासनाने आपला निर्णय मागे घेतला पाहिजे.

शिक्षक मान्यता रद्द करण्याच्या शासननिर्णयाविरोधात शनिवारी शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांना निदर्शने केली. या निर्णयाच फटका नाशिक जिल्ह्यातील १३५ पैकी ४६ शिक्षकांना बसला आहे. वास्तविक पाहता हे सर्व शिक्षक २०१२ पूर्वीपासून सेवेत आहेत. फक्त त्यांच्या मान्यता त्यानंतर झालेल्या आहेत. शासनाच्या आदेशानंतर या सर्व शिक्षकांच्या मान्यतांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याने संबंधित शिक्षकवर्ग अस्वस्थ झाला आहे. अशा प्रकारची चौकशी त्वरित थांबवून त्यांच्या मान्यता रद्द करण्यात येऊ नयेत, अशा मागणीचे लेखी निवेदनही यावेळी शिक्षक लोकशाही आघाडीमार्फत शिक्षण खात्याला देण्यात आले. या निदर्शनात शिवाजी निरगुडे, रवी गोरे, कैलास देवरे, एस. बी. देशमुख, एस. बी. शिरसाट, मोहन चकोर, ई. के. कांगणे, बी. के. सानप, बी. के. शेवाळे, रवींद्र जोशी, रवींद्र मोरे, बी. एस. शिरसाट, बाळासाहेब ढोबळे, माणिक मढवई, नंदराज देवढे, के. डी. देवढे आदींसह सुमारे तीनशे शिक्षक सहभागी झाले होते.

--

संपास पाठिंब्यासाठी ‘कामबंद’

राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने दि. १ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सिन्नर तालुका कृती समितीच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शनिवारी सिन्नर तालुक्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक भारतीच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन या कृती समितीच्याव तीने विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांना देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे सिकंदर बच्छाव, डी. ई. खरात, व्ही. एस. पानसरे, सुभाष घुगे, रावसाहेब केदार, रवींद्र गडाख, सचिन रानडे, शैला सानप, अनिल सानप आदींसह सिन्नर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानवी साखळीद्वारे स्वच्छतेला साद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील काकाणी विद्यालयाच्या सामाजिक कार्य सप्ताहाचा शनिवारी समारोप झाला. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी हातात रंगीबेरंगी छत्र्या घेवून मानवी साखळीद्वारे मोसम नदी स्वच्छतेचे आवाहन केले.

शहरातील भुईकोट किल्ला परिसरातून या मानवीसाखळीस सुरुवात झाली. झु. प. काकाणी, सौ. रु. झु. काकाणी, कै. रा. क. काकाणी, नवीन प्राथमिक शाळा यांचे सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. यावेळी महापालिका आयुक्त संगीता धायगुडे, अध्यक्ष विलासजी पुरोहित, संचालक प्रल्हाद शर्मा, सतीश कलंत्री, नितीन पोफळे, राजेंद्र अमीन आदी उपस्थित होते. नदीपात्रालगत विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

शहरातील आंबेडकर पुलावर या मानवी साखळीचा समारोप करण्यात आला. त्यावेळी सर्वांनी हातात छत्री धरून मानवी साखळी पूर्ण केली. या रंगीबेरंगी छत्रीसह असलेल्या मानवी साखळीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गोविंद तापडे, मुख्याध्यापक एस. बी. मोरे, पर्यवेक्षक तुकाराम मांडवडे आदींसह शिक्षक, संस्थचे पदाधिकारी, विद्यार्थी सहभागी झाले होते. नरेंद्र गुरव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवावर सोशल मीडियाचा प्रभाव

$
0
0

व्हायरल क्लिप्सप्रमाणे मूर्तिकारांकडे मंडळांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा विविध प्रकारच्या आकर्षक आरास करण्यावर भर असतो. गणेशोत्सवाला धार्मिक उत्सवाचे स्वरूप असल्याने पौराणिक विषयांवरील आरास करण्यासाठी मूर्तिकारांकडे मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी होत आहे.

यंदाही बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मूर्तिकारांना सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या क्लिप दाखवून त्याप्रमाणेच चलतचित्रांची आरास करण्याची मागणी करीत आहेत.

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा प्रकारचे मेसेजेस एका झटक्यात पोहचण्याचे काम होत आहे. त्याचा परिणामही तितक्याच वेगाने होऊ लागल्याने त्यातील काही मेसेज परिणामकारक ठरत आहेत. यात जास्त करून धार्मिक विषयांच्या क्लिप या यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात चिलतचित्राद्वारे उतरणार आहेत, असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मागणीवरून दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यालय नाशिकला अन् कार्यक्रम पुण्याला!

$
0
0

आदिवासी दिन कार्यक्रम; आदिवासी विभागाचा अजब कारभार

नाशिक : समृद्धी महामार्ग आणि कर्जमाफीमुळे नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांना होणाऱ्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विभागाने दरवर्षी नाशिकमध्ये होणारा जागतिक आदिवासी ‌दिनाचा कार्यक्रम चक्क यावर्षी पुण्याला हलवला आहे. आदिवासींचे मुख्यालय असलेल्या नाशिकमध्येच हा कार्यक्रम होण्याची परंपरा केवळ मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून यावर्षीत मोडीत काढण्याचे धाडस आदिवासी विभागाने दाखवले आहे. नाशिकमध्ये नाट्यगृह मिळत नसल्याने पुण्यात हा कार्यक्रम घेतला जात असल्याचा हास्यास्पद दावा आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

जगभरातील आदिवासींना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी युनोने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. राज्यात १९९३ पासून हा दिवस साजरा करण्याची पंरपरा आहे. राज्यातील आदिवासींचे मुख्यालय नाशिकला असून, येथील आयुक्तालयातूनच योजनांची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे आतापर्यंत दरवर्षी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा नाशिकलाच घेण्याची परंपरा आहे. डॉ. विजय कुमार गावित, बबनराव पाचपुते, मुधकर पिचड, विष्णू सावरा यांच्या मंत्रिपदाच्या काळात नाशिकलाच जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. आतापर्यंत हा आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयुक्तालयाकडून साजरा केला जात असला तरी, त्याला शासकीय कार्यक्रमाचा दर्जा नव्हता. आदिवासींनी संघर्ष करीत यावर्षी प्रथमच जागतिक आदिवासी दिन शासकीय स्तरावरून साजरा केला जाणार आहे.

पहिला शासनस्तरावरील आदिवासी दिन हा नाशिकला होणे अपेक्षित होते. परंतु, पहिलाच शासकीय जागतिक आदिवासी दिन हा नाशिकऐवजी पुण्याला साजरा केला जाणार आहे. यासंदर्भातील आदेश आदिवासी विभागाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि नाशिक आदिवासी आयुक्तालयाला पाठवला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. परंतु, हा कार्यक्रम नाशिकऐवजी पुण्याला स्थलांतरीत करण्याचे कारण मुख्यमंत्र्यांमागे शेतकऱ्यांचा लागलेला ससेमिरा आहे. गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना समृद्धी महामार्ग आणि शेतकरी कर्ममाफीवरून शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. नैताळे येथे तर मुख्यमंत्री ज्या मार्गावरून गेलेत तो मार्ग गोमूत्राने धुवून अनोखा निषेध नोंदवला होता. त्यामुळे नाशिकला गेल्यास परत शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून थेट विभागानेच हा कार्यक्रम पुण्याच्या बालगंर्धवाला हलवल्याची चर्चा आदिवासी विभागात आहे. त्यामुळे पहिल्या वहिल्या शासन मान्य आदिवासी दिनाच्या नाशिकमधील कार्यक्रमाला आदिवासींना मुकावे लागणार आहे.

नाट्यगृह मिळेना...!

पुण्याला आदिवासी दिनाचा कार्यक्रम स्थलांतरित करण्याचे गजब कारण आयुक्तालयाने दिले आहे. नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह मिळाले नसल्याचा दावा विभागाकडून केला जात आहे. परंतु, एखादा शासकीय कार्यक्रम असला तर, थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात खासगी कार्यक्रम रद्द होऊन तेथे शासकीय कार्यक्रम घेऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असेल तर विशेष परवानगीने खासगी कार्यक्रम आपोआप रद्द होतात. परंतु, केवळ मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये या एकाच उद्देशाने आदिवासी विभागाने घेतलेल्या या विशेष काळजीची विभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरा नव्हे, मित्रच!

$
0
0

नवनाथ वाकचौरे

जावई अन् सासरे या नात्याला बहुधा कटुतेची किनारच मोठी असते. त्यामुळे सासरे अन जावई एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात यावर कुणाचा चटकन विश्वास बसणार नाही. मात्र, नात्याने जावई व सासरे असलेल्या नाशिकरोडच्या सुनील वसंत सूर्यवंशी व शिवाजी शंकर पाटोळे (रा. मानूर, कळवण) यांनी हा समज खोटा ठरवला आहे. या दोघांतील निखळ मैत्री कुणालाही हेवा वाटावी अशीच आहे. मानपानाचा डंख या दोघांच्या मनाला कधीही झाला नाही. त्यामुळे त्यांच्यातील मैत्रीची वीण अधिकच घट्ट होत गेली.

नाशिकरोडच्या के. जे. मेहता हायस्कूलमध्ये पेशाने शिक्षक असलेले सुनील सूर्यवंशी मूळचे निफाड तालुक्यातील कोकणगावचे. नोकरीच्या निमित्ताने नाशिकरोडला स्थायिक झालेले. २१ वर्षांपूर्वी कळवण तालुक्यातील मानूर येथील शिवाजी शंकर पाटोळे यांच्या सारिका या थोरल्या मुलीशी विवाह झाला. तेव्हापासून जावई सुनील व त्यांचे सासरे शिवाजी पाटोळे यांच्यात मैत्रीचे ऋणानुबंध जुळले ते आजतागायत कायम आहेत.

या दोघांतील मैत्रीचे ऋणानुबंध जुळण्यास एक घटना कारणीभूत ठरली. सुनील २००८ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेटचा सामना घरात पाहत होते. त्या वेळी त्यांच्या वडिलांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्या वेळी सुनील यांचे सासरे गुजरात बॉर्डरजवळील एका पाड्यावर शिक्षक म्हणून कार्यरत होते. व्याह्यांच्या मृत्यूची घटना कळताच पाटोळे तडक निघाले आणि नाशिकरोडला पोहोचले. या अचानक उद््भवलेल्या प्रसंगात त्यांनी जावई व त्यांच्या भावांना मित्राप्रमाणे धीर दिला. एखादा जीवलग मित्र अडचणीच्या वेळी धावून आल्याची प्रचीती सुनील यांना आली. तेव्हापासुन सुनील यांचे कुटुंबीय शिवाजी पाटोळे यांना सासरे न मानता आपला ‘वेलविशर मित्रच’ मानतात.

सुनील व त्यांचे इतर बंधूही हक्काने मैत्रीचा सल्ला आपल्याकडून घेत असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे सासरे शिवाजी पाटोळे सांगतात. आपल्याशी कोणताही आडपडदा न ठेवता हसून-खेळून गप्पागोष्टी करतात. त्यामुळे जावई कमी अन् मित्रच जास्त शोभतात, असे पाटोळे सांगतात. मैत्रीखातर एकमेकांची कधी कधी चेष्टाही रंगते. नवीन घर खरेदी करताना असो वा अन्य अडचणीच्या प्रसंगी सासरे तातडीने मदतीला धावून येतात. प्रत्येक प्रसंगात ते सासरे म्हणून नाही, तर मित्र म्हणूनच अधिक जवळचे वाटतात, असे जावई सांगतात. मैत्रीखातर त्यांचे पैसे लवकर परत करणे शक्य झाले नाही तरी त्यांनी कधी कुरबूर केली नाही. एवढेच काय, सासऱ्यांनी आपल्या भावांनाही अडचणीच्या काळात आर्थिक हातभार लावून मैत्रीचा परिघ रुंदावल्याचे सुनील सांगतात. आमच्या नात्यात हे मैत्रीचे नाते अधिक घट्ट असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना आता दिरंगाई भोवणार

$
0
0

‘नरेगा’ मोबदला वेळेत देण्याचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) योजनेतील अकुशल मजुरांना वेळेत मोबदला न दिल्यास भरपाईची रक्कम संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहेत. या कामात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने २००६ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. नाशिक विभागात नरेगा अंमलबजावणीच्या कामकाजाचा आढावा विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नुकताच घेतला. विभागातील नाशिकसह धुळे व जळगाव या तीन जिल्ह्यांतील नरेगा मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत देण्यात प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याने या मजुरांना तब्बल ७ लाख ५८ हजार ९४२ रुपये इतक्या भरपाईचा भुर्दंड शासनाच्या माथी पडला असल्याची धक्कादायक बाब या आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आली.

सुधारणेसाठी पंधरा दिवस

नरेगा मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यास दिरंगाई झाल्यास या मजुरांना भरपाई मिळण्याची तरतूद या योजनेत आहे. असे असूनही नरेगाची अंमलबजावणी करणाऱ्या विभागातील अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने शासनाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. याची विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेत यापुढे अशी दप्तर दिरंगाई झाल्यास भरपाईची रक्कम विभागातील उपजिल्हाधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, अभियंते, लेखाधिकारी, ग्राम रोजगार सेवक यांच्याकडून वसूल केली जाईल असा इशारा दिला. नरेगातील दप्तर दिरंगाईतील सुधारणेस विभागीय आयुक्तांनी विभागातील अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचा कालावधी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीला नाशिकचे ४० टीएमसी पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाकडे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तब्बल ४० टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे.

जूनसह जुलैमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्गाचे प्रमाण अधिक राहिले. नांदूरमध्यमेश्वर धरणातून ६२ हजार क्युसेकने पाणी सोडावे लागले. पावसाचा जोर ओसरला असतानाही नांदूरमध्यमेश्वरमधून ३५०० क्युसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने सातत्याने पाणी जात असून, ५ ऑगस्टपर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये पोहोचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जायकवाडीची क्षमता १०४ टीएमसी आहे. मात्र, त्यातून काढलेला गाळ आणि फेरक्षमता निश्चितीनंतर लाभक्षेत्राचा विचार करता होणारा पाऊस आणि येणारे पाणी याचे प्रमाण विसंगत आढळल्यामुळे यापूर्वी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जायकवाडी ८० टीएमसी भरले तरी ते १०० टक्के भरल्याचे गृहीत धरण्याचे निश्चित झाले आहे. हे धोरण गृहीत धरल्यास नाशिकमधून आतापर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीत गेले असून, निम्मे जायकवाडी भरण्यास त्यामुळे मदत झाली आहे.

गंगापूरमधून विसर्ग थांबविला

शहरातून पाऊस‌ गायब झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सद्यःस्थ‌ितीत सहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक १८५० क्युसेक विसर्ग दारणातूनच होतो आहे. पालखेडमधून १५०० क्युसेक, कडव्यातून १८०, भोजापूर १००, आळंदी ८५ आणि नांदूरमध्यमेश्वरमधून ३५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरणातून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथसंपदेसाठी वाचन चळवळ

$
0
0

बहिःशाल शिक्षण मंडळाचा नवा उपक्रम

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाची आवड निर्माण व्हावी, स्वातंत्र्याचे मूल्य रुजावे, त्यांना आत्मपरीक्षण करता यावे, या अनुषंगाने बहिःशाल शिक्षण मंडळातर्फे ज्ञानविज्ञान वाचन चळवळ सुरू करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २११ केंद्रांवर हा नवा उपक्रम राबविला जात आहे.

विद्यापीठांतर्गत बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता विभाग कार्यान्वित आहे. या विभागातर्फे ‘ज्ञानविज्ञान वाचन चळवळ’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथांचे वाचन करण्याची प्रेरणा वाढवणे, ग्रंथांच्या आशयांचे विश्लेपण करणे, ग्रंथांमधील अर्थांचे विवेचन करीत ते विद्यार्थी व वाचकांपर्यंत पोहोचवणे, असा उद्देश या चळवळीमागे आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून ही चळवळ साकारली आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठ व कॉलेजेससोबतच सामाजिक संस्था, सार्वजनिक वाचनालये, ज्येष्ठ नागरिक संघ येथे उपक्रम राबविण्यात येणार आहे. या चळवळीच्या आयोजनासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये विशेष समिती नेमण्यात येणार आहे. नाशिकमधील ३२, पुण्यातील ३५ तर नगरचे २४ ग्रंथ अन्वेषक निवडण्यात आले आहेत. नेमण्यात आलेल्या अन्वेषकांना काही ग्रंथ ठरवून देण्यात आले आहेत. ते या ग्रंथांचा सखोल अभ्यास करतील. त्यावरून समाजाची वर्तमान परिस्थिती, सर्जनशीलता व विचार प्रबोधन यावर व्याख्यान आयोजित करण्यात येईल. व्याख्यानानंतर विद्यार्थी व वक्ता यांच्यात मुक्त चर्चा होईल. प्रत्येक कॉलेजमध्ये दहा दिवसांची व्याख्यानमाला घेतली जाणार आहे.

या ग्रंथांचे होणार अन्वेषण

समाजसुधारक : २७, स्रियांच्या संदर्भात महत्त्वाची पुस्तके : २०, मराठी वाङमयीन पुस्तके : १९, शेतीवरची पुस्तके : २९, वाचण्यायोग्य : २५, इतर वाङमयीन पुस्तके : ३३, अनुवादित पुस्तके : २३, नवे शिक्षण नवे दिशा देणारे ग्रंथ : २८, सामाजिक ग्रंथ : ४०, विज्ञान साहित्य : २३, इतिहासात्मक पुस्तके : ८, संदर्भ ग्रंथ : ३०, संकीर्ण : ३१

सहभागासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

www.unipune.ac.in/snc/Extra_mural_studies/default.htm या वेबसाइटवर या चळवळीची माहिती देण्यात आली आहे. या चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी वेबसाइटला भेट देत रजिस्ट्रेशन करावे. तसेच या वेबसाइटवर चळवळीअंतर्गत अभ्यासल्या जाणाऱ्या ग्रंथाची यादी व ग्रंथ अन्वेषकांची यादीही वेबसाइटवर बघता येणार आहे.

ज्ञानविज्ञान वाचन चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागेल. राज्यभरात सर्व कॉलेजेसमध्ये ही चळवळ सुरू केली आहे. - डॉ. नवनाथ तुपे,

संचालक, बहिःशाल शिक्षण मंडळ, पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरोधकांकडे मुद्देच नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी कार्यकारी मंडळाने संस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. मराठा विद्याप्रसारक संस्था आणि बहुजन समाजाच्या प्रगतीवर भर दिला. विरोधकांकडून विकास आणि प्रगतीच्या मुद्द्याऐवजी केवळ वैयक्तिक आरोप आणि टीकेलाच प्राधान्य दिले जाते, असे प्रतिपादन चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे आयोजित प्रगती पॅनल प्रचारसभेत बोलताना केले.

दौलत आबा पाचोरकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, राघो नाना आहिरे, डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, उत्तम भालेराव, श्रीराम शेटे, विश्वास मोरे, दिलीप बनकर, शंकरराव भालेराव, दिलीप धारराव, प्रतापदादा मोरे, सुरेशबाबा पाटील, बळवंत गोडसे, पंडित पिंगळे, विलास बोरस्ते, दिनकर ठाकरे, रामकृष्ण तिडके, सुखदेव देवळे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, डॉ. वसंतराव पवार यांच्या निधनानंतर कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ सभासदांनी मला सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारण्याचा आग्रह केला. डॉ. पवार यांचे अपूर्ण राहिलेले समाजसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठी मी पदभार स्वीकारला. मात्र, याच वेळेस माझ्यावर खटले दाखल करण्यात आले. आजवर विकासाचे मुद्दे सोडून विरोधक केवळ खटलेच दाखल करण्यात गुंतले आहेत. संस्थेचा विकास आणि प्रगतीवर बोलण्याचे मुद्देच त्यांच्याकडे नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

श्रीराम शेटे म्हणाले, की मविप्रचा विस्तार आता अफाट झाला आहे. सुमारे पाचशे ते सहाशे कोटींचे बजेट, पावणेनऊशे एकर जमीन आणि दोन लाख विद्यार्थी इतका मोठा आवाका जनहिताच्या उद्देशाने पेलण्यासाठी मविप्रला योग्य नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व पवारच देऊ शकतात.

सुरेशबाबा पाटील, दिलीप बनकर, दिलीप धारराव, रामकृष्णबाबा तिडके, अॅड. दिनकरराव ठाकरे यांनीही प्रगती पॅनलला साथ देण्याचे आवाहन केले. धोडंबे येथे रघुनाथदादा पवार, काजीसांगवी येथे गंगाधर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाल्या. मालेगावकरांनी म्हणजेच हिरे कुटुंबीयांनी मविप्रसारख्या लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन दाखवाव्यात, नंतरच इतरांवर घराणेशाहीचा आरोप करावा, असे आवाहन सुखदेव देवळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या सोमवारसाठी वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वर येथे जातात. भाविकांची गर्दी व जादा एसटी बसच्या नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी दुपारपासून सीबीएस ते टिळकवाडी सिग्नल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

श्रावणमासातील तिसरा सोमवार महत्त्वाचा मानला जातो. यंदा दि. ७ ऑगस्ट रोजी तिसरा सोमवार असून, दर्शनासाठी, तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला जातात. त्यासाठी रविवारी दुपारपासूनच जिल्हाभरातील भाविक त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना होतात. या पार्श्वभूमीवर एसटी मंडळाच्या वतीने मेळा बसस्थानक येथून जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथे जाण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सीबीएस ते टिळकवाडी सिग्नल हा मार्ग एसटी बस व शासकीय वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रविवारी दुपारी २ वाजेपासून ते सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे मेळा बसस्थानक ते हॉटेल राजदूत हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात आला असून, हॉटेल राजदूतकडून मेळा बसस्थानकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

असा आहे पर्यायी मार्ग

या मार्गावरून सीबीएसकडून टिळकवाडी चौफुलीकडे जाणारी वाहने सीबीएस सिग्नल येथून त्र्यंबक नाका, हॉटेल राजदूत, त्र्यंबकरोडमार्गे इतरत्र जातील किंवा सीबीएस सिग्नलकडून मेहेर, अशोक स्तंभ चौक, गंगापूररोडमार्गे इतरत्र जातील. टिळकवाडी चौफुलीकडून सीबीएसकडे येणारी वाहने टिळकवाडी सिग्नल, सावरकर जलतरण तलाव, त्र्यंबक नाका, सीबीएस यामार्गे इतरत्र जातील किंवा टिळकवाडी सिग्नल येथून पंडित कॉलनीमार्गे गंगापूररोड, अशोक स्तंभमार्गे इतरत्र जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैं हूँ ब्यूटिफुल...

$
0
0

नाशिक ः ढोलकीच्या तालावर..., मैं लडकी ब्यूटिफुल..., प्रेम रतन धन पायो..., सूर निरागस हो... ही धमाकेदार गाणी अन् एक से बढकर एक टॅलेंटेड परफॉर्मन्स अशा वातावरणात ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘मटा श्रावणक्वीन’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारी पार पडली.

गेल्या अनेक दिवसांपासून तरुणींमध्ये या स्पर्धेच्या एलिमिनेशन राउंडची चर्चा होती. टॅलेंट राउंडच्या सादरीकरणात वैविध्य असल्याने स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली होती. ग्रुमिंगसाठी कुणाची निवड होते याची उत्सुकता प्रत्येकीच्या चेहेऱ्यावर दिसत होती. नाशिकची श्रावणक्वीन होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या ओढीने तरुणी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच बहारदार परफॉर्मन्सची चढाओढ दिसून आली. विविध कलाविष्कारांच्या सादरीकरणाने प्राथमिक फेरीचा संपूर्ण माहोल उत्साहाने भारला होता. लावणीपासून ते कन्टेम्पररी, हीपहॉप अशा पारंपरिक ते वेस्टर्न डान्स फॉर्मची शैली तरुणींनी सादर केली, तर कुणी कराओकेवर गाणी सादर केली. या सगळ्यांना मिळणाऱ्या टाळ्या, शिट्ट्यांच्या प्रतिसादामुळे वातावरण जल्लोषमय झाले होते. एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर होत असल्याने कोणाची वर्णी ग्रुमिंगसाठी लागेल याची कुजबूज तरुणींसोबतच पालकांमध्येही सुरू होती.

..

पर्सनॅलिटीत झाला बदल...

गेल्या वर्षीच्या श्रावणक्वीनमध्ये नाशिकचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रिया तोरणे, मृणाल कुलकर्णी, प्रियंका गिते यांनी आपले अनुभव शेअर केले. ‘मटा’ने आम्हाला खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. श्रावणक्वीनच्या ग्रुमिंगमधून आमच्या पर्सनॅलिटीत आमुलाग्र बदल झाला. एका ग्रुमिंगमध्येच आम्ही सेलिब्रिटी झाल्याचे फिलिंग आम्हाला मिळाले. ही संधी खूप अमूल्य आहे, असे मत व्यक्त करीत त्यांनी यंदाच्या स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढविला. नेहा तावडे हिने ‘सलाम-ए-इश्क मेरी जान...’ या गाण्यावर आपला खास परफॉर्मन्स सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख-भागवतांच्या दोस्तीची मिसाल

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार

त्यांची मैत्री अशी, की रोज सलाम- सुप्रभात केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि शब्बाखैर म्हणजेच गुड नाइट म्हटल्याशिवाय झोप लागत नाही. नाशिकरोडचे लिंबू व्यापारी फिरोज शेख आणि हॉटेल व्यावसायिक बंटी भागवत यांच्या अनोख्या दोस्तीची ही आदर्श मिसाल.

बंटी भागवत यांचे नांदूर नाका आणि पाथर्डी फाटा येथे हॉटेल आहे. दर्जामुळे त्यांचा नावलौकिक आणि ग्राहक वर्ग वाढला आहे. हाटेल व्यवसायानिमित्ताने नाशिकरोडचे लिंबू आणि भाजीपाला विक्रेते फिरोज शेख यांच्याशी त्यांचा बारा वर्षांपूर्वी संपर्क आला. दोघांमध्ये धर्माबरोबरच वयातही मोठे अंतर आहे. फिरोज शेख यांचा मुलगा बंटी भागवतांच्या बरोबरीचा आहे. फिरोज शेख जेलरोडच्या पंचक भागात राहतात, तर भागवत यांचा सिन्नर फाटा येथे भागवतमळ्यात बंगला आहे. पण दोस्ती कृष्ण-सुदामाची.

रोजच्या व्यावसायिक देवाणघेवाणीतून झालेल्या ओळखीचे आता जीवलग मैत्रीत रूपांतर झाले आहे. त्याला कारणीभूत ठरली ती जुनी घटना. भागवत यांची नांदूरनाका येथे हाटेलची जागा भाड्याने होती. मालकाने त्यांना अचानक जागा रिकामी करण्यास सांगितले. संसार उघड्यावर येण्याची वेळ आली होती. नवीन जागा घेण्यासाठी नऊ लाख रुपये कमी पडत होते. रक्ताचे नातेवाईक आकडा ऐकूनच लांब गेले. मात्र, फिरोजभाईंनी स्वतःचे घर तारण ठेवून नऊ लाखांची मदत बंटीभाऊला उभी करून दिली. हे उपकार बंटीभाऊ विसरले नाहीत. फिरोज यांनी मुलगी निलोफरला कष्ट करून उच्च शिक्षण दिले. शिक्षणासाठी दीड लाखाची गरज होती. बंटीभाऊंनी कष्टाने साचवलेले पैसे फिरोजभाईंना न मागता दिले. निलोफर आता यूपीएससीची परीक्षा देत असून तिला कलेक्टर होऊन समाजाचे पांग फेडायचे आहे.

दोघांच्या मैत्रीत पैसा व स्टेटस कधीच आले नाही. चौथी शिकलेल्या फिरोजभाईंना मोबीन, सलमान आणि निलोफर ही तीन अपत्ये, तर बारावी शिकलेल्या बंटीभाऊंना पत्नी, तसेच संचिता व वेदिका या दोन गोड मुली. या सर्वांचे घट्ट फॅमिली रिलेशन झाले आहे. मोबीनने आता अब्बांचा लिंबूचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली आहे. ही दोन फॅमिली सुटीमध्ये माळशेज, लोणावळा अशा विविध ठिकाणी गाडी करून फिरायला जातात, एकत्र जेवतात, राहतात, मजा करतात, अडीअडचणींना धावून जातात. ईद, मोहरमला बंटीभाऊ कुटुंबीयांसह हमखास फिरोजभाईंच्या घरी जातात. हक्काने शीरखुर्मा खातात, भेटवस्तू देतात, मुक्कामही ठोकतात, तर दिवाळी, दसरा अशा महत्त्वाच्या सणांना फिरोजभाई बंटीभाऊंच्या घरी शुभेच्छा देण्यास जातात. दोस्ती असावी तर अशी असे नाशिकरोडकर आजही म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांकडून वृक्षांची लागवड

$
0
0

शायनिंग स्टार शाळेचा वन विभागाच्या सहकार्याने उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबक रोडवरील बेळगाव ढगाजवळ असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर कोणार्क नगर येथील शायनिंग स्टार शाळेने तब्बल २ हजार रोपांची लागवड केली. यावेळी केवळ वृक्षलागवड नव्हे तर भविष्यात ही रोपे जगवण्याचा संकल्प या शाळेने केला आहे.

सरकारच्या ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत यंदा ३० लाखांहून अधिक वृक्षलागवड नाशिक जिल्हयात करण्यात आली. त्यानंतरही काही सामाजिक व शैक्षणिक संस्थांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शायनिंग स्टार शाळेच्यावतीने २ हजार वृक्ष लागवडीचा मानस व्यक्त केला. त्याला प्रतिसाद देत मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव तसेच उपवनसंरक्षक टी. ब्युला. एलिल मती यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यानुसार गुरूवारी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. बेळगाव ढगा या गावात असलेल्या डोंगर पायथ्याशी २ हजार खड्डे खोदण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर त्याठिकाणी वृक्षलागवड केली. यावेळी मुख्यवनसंरक्षक, उपवनसंरक्षक, प्रादेशिक वन अधिकारी संजय खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वनरक्षक वाघ आणि महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना काही झाडे लावून प्रात्यक्षिकदेखील दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वृक्षलागवड करण्यात आली.

वृक्षांचे महत्त्व नवीन पिढीला समजावे तसेच निसर्गाशी जवळीक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शायनिंग स्टार शाळेच्या मुख्याध्यापिका गीता व्यास व संचालक हेमंत व्यास हे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. भविष्यात या दोन हजार वृक्षांची जोपासना करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ही केवळ सुरुवात असून, आणखी वृक्षलागवड करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व आदींचे सहकार्य लाभले.

शाळेचे हे कार्य कौतुकास्पद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण होईल. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण फायदेशीर ठरेल.

एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images