Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘लोटा परेड’ परंपरा कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीचे संपूर्ण उच्चाटनाचे शिवधनुष्य सरकारने उचललेले असले तरी विभागातील निम्म्याच ग्रामपंचायतींमध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. मार्च २०१८ पर्यंत उर्वरित निम्म्या गावांमध्ये घरोघर ही योजना पोचविण्याचे प्रशासनापुढे आव्हान ठाकले आहे.
नाशिक विभागातील ४ हजार ८७२ पैकी २ हजार ६१२ ग्रामपंचायतींमधील हागणदारीला वेशीबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर ५४ पैकी केवळ नऊ तालुक्यांमध्ये पूर्णत: शंभर टक्के ही योजना यशस्वी राबविल्याचा प्रशासनाचा दावा आहे. उर्वरित तब्बल ४५ तालुक्यांमध्ये आजही लोटा परेडची परंपरा सुरुच आहे. तेथे लोटा परेडच्या परंपरेला कायमची मुठमाती देण्यासाठी प्रशासनाने आजवर विविध उतारेही केले; मात्र त्यास दाद न मिळाल्याने प्रशासनाने आता जहाल उपाय करण्याची तयारी केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी आजवर पुरेसा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जनजागृती, प्रबोधन, आर्थिक दंड यासारख्या उपाययोजना करूनही आतापर्यंत निम्म्याच गावांमध्ये प्रशासनाला यश आले आहे.

नाशिक-नगरची आघाडी

विभागात नाशिक व नगर या दोन जिल्ह्यांनी हागणदारीमुक्तीत आघाडी घेतली आहे. नाशिकमधील १ हजार ३६८ पैकी ९१२ तर नगरमधील १ हजार ३०८ पैकी ८०७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. नाशिकच्या ७८२ तर नगरच्या ६८६ ग्रामपंचायतींची हागणदारीमुक्तीची पडताळणी झाली आहे. नाशिकमधील ४५६ व नगरमधील ५०१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित होणे बाकी आहे.

धुळ्यात निचांकी प्रतिसाद

विभागातील धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांनी लोटा परेडची परंपरा अबाधित राखली आहे. ही परंपरा अबाधित राखण्यासाठी या जिल्ह्यांचे योगदान अजुनही सुरूच आहे. धुळे जिल्ह्यातील एकही तालुका हागणदारीमुक्त झालेला नाही. या जिल्ह्यातील अवघ्या २८.४२ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात हेच प्रमाण ४३.०८ तर नंदुरबारमध्ये ४८.५० टक्के इतके आहे.


ग्रामपंचायतींमधील हागणदारीमुक्त योजनेचा लेखाजोखा

जिल्हा...........एकूण ग्रा. पं. ......हागणदारीमुक्त ग्रा. पं. .......टक्के
नाशिक.............१,३६८................९१२...................६६.६७
नगर................१,३०८................८०७...................६१.७०
नंदुरबार...............४९९................२४२...................४८.५०
जळगाव.............१,१४९...............४९५...................४३.०८
धुळे................५४९...................१५६...................२८.४२

एकूण..............४,८७३.............२,६१२................५३.६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन लाखांची देवळालीमध्ये चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील निवृत्त कर्नल सुनील सावंत यांच्या घरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख वीस हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार निवृत्त कर्नल सुनील सावंत हे पत्नी सरोज यांच्यासह त्रिवेणी सदन, माचीसवाला बंगल्याजवळ, भगूर कॅम्प रोडवर रो-हाउसमध्ये राहतात. ते बुधवारी (दि. ४) पहाटे सव्वा पाच ते सव्वा सहा या वेळेत घर बंद करून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. चोरट्यांनी यावेळी संधी साधत कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटातून सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, कडे, मंगळसूत्र, कानातील रिंगा, पोत, अंगठी आदीसह रोख २० हजार असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सावंत दाम्पत्य मॉर्निंग वॉकवरून परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायजेरियनकडून देशभरात फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकवरून मैत्री करीत कॅन्सरविरोधी तसेच इतर आजारांवर उपयुक्त असलेल्या औ‍षधी बियांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या निल्स हॅम्पे (३०, नवी मुंबई, मूळ देश नायजेरिया) या नायजेरियन भामट्याला पकडल्यानंतर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहे. संशयित आरोपीने पुणेसह दिल्ली येथील नागरिकांना कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

सायबर पोलिसांनी निल्स याला मंगळवारी (दि. ३) नवी मुंबई येथे जेरबंद केले. कोर्टाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांकडून या प्रकरणी अजूनही त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, गत महिन्यात हॅम्पे व त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील एका नागरिकाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. त्यापूर्वी नवी दिल्लीतीलच कोर्टात काम करणाऱ्या अनुराग नावाच्या व्यक्तीस १४ लाख रुपयांना चुना लावला होता. संशयिताने पुण्यातही फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितांनी देशभरात अनेक नागरिकांना गंडविल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार, पोलिस माहिती संकलित करीत आहेत.

नायजेरियन दूतावासाचे दुर्लक्ष

राज्यात तसेच देशभरात अशा प्रकारे फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्या अनेक नायजेरियन गँग कार्यरत आहे. त्यातील एका गँगच्या सदस्याला सायबर पोलिसांनी दिल्लीच्या नोएडा येथून काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याने एका घटस्फोटित महिलेची आर्थिक फसवणूक केली. आता पुन्हा नायजेरियन संशयितास अटक झाली आहे. या प्रकरणी नायजेरियन दूतावासाकडून योग्य ती मदत मिळत नाही, अशी खंत पोलिस सूत्रांनी व्यक्त केली.

‘सोशल’ मैत्रीची मोडस ऑपरेंडी

संशयित आरोपी किंवा त्याची एक मैत्रीण फेसबुकवर ४० ते ५० वयोगटातील नागरिकांशी संपर्क साधते. काही दिवस चॅटिंग करून विश्वास संपादन करण्याचे काम केले जाते. त्यानंतर, एक दिवस तरुणी अडचणीत आल्याचे भासवते. आमची कंपनी ५ लाख पौंडाला वेबसाइटवरून औषधे खरेदी करत असते. परंतु, भारतातून हा पुरवठा अचानक बंद झाला असून, त्या औषधी बिया तुम्ही भारतातून आम्हाला पुरवल्या तर तुम्हाला चांगला फायदा होईल, असे चित्र निर्माण केले जाते. नाशिकमधील तक्रारदारासोबत २२ जुलै रोजी असा प्रकार घडला होता.

सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून, यामागे एखादी टोळी असावी अशी शक्यता वाटते. सोशल मीडियाचा विस्तार व्यापक असून, संशयिताच्या संपर्कात आलेल्या बऱ्याच व्यक्तींची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- देवराज बोरसे,
सहायक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके विक्री खुल्या जागेवरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये झालेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने फटाके विक्री गाळ्यांबाबत काटेकोरपणे नियमावलीची अंमबजावणी केली जाणार आहे. महापालिकेने सहा विभागात सहा खुल्या जागा निश्चित केल्या असून, त्या ठिकाणी २६५ गाळ्यांना परवानगी दिली आहे. या व्यतीरिक्त शहरात खासगी जागेवर फटाके विक्रीचे गाळे लागल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके स्टॉल्सची मागणी महापालिकेकडे वाढली आहे. गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये फटाके स्टॉल्सला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. फटाके स्टॉल्स लावतांना नियमांचे पालन न केल्याने ही मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे महापालिकेने यंदा फटाके स्टॉल्सच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या जागेवर ५० स्टॉल्स तसेच शहरात केवळ २६५ फटाके स्टॉल्सलाच परवानगी दिली आहे. व्यतीरिक्त खासगी जागेत कुठेही फटाके स्टॉल्स उभारता येणार नाहीत. तसे आढळल्यास फौजदारी कारवाईचा इशारा पालिकेने दिली आहे.

प्रतिस्टॉल दहा हजार शुल्क

महापालिकेने फटाके स्टॉल्सची संख्या निश्चित करण्यासह त्यांच्यावरील शुल्क वाढवले आहे. प्रत्येक फटाके स्टॉल्सधारकाला चार हजार रुपये भाडे आकारले जाणार असून, तीन हजार रुपये पर्यावरण शुल्क असणार आहे. तसेच या सर्वांवर १८ टक्के जीएसटी लागू केला जाणार असल्याने प्रति स्टॉल्सचा खर्च हा दहा हजाराच्या आसपास जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विक्रीसाठी राज्यात बंदी असलेला मद्यसाठा जिल्ह्यात येणार असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पर राज्यातील तब्बल साडे बारा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई विभागीय आणि भरारी पथक क्रमांक एकने केली.

प्रदीप पोपटराव देशमुख, राहुल उर्फ सागर बबन आव्हाड, मंगेश दत्तात्रेय मोडवे (रा. तिघे सिन्नर), नाना भगीरथ सातपुते (रा. मनेगाव, ता.सिन्नर) आणि सचिन गॅरे (रा. हॉटेल राजेपार्क, सिन्नर-घोटी मार्ग) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. जिल्ह्यात २ ते ८ ऑक्टोबर हा दारूबंदी सप्ताह सुरू आहे. या काळात दमण येथील मोठा मद्यसाठा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत व उपअधीक्षक गणेश बारगजे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय भरारी पथक, निरीक्षक भरारी पथक, निरीक्षक ब आणि भरारी पथक क्रमाक एक आदी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले. त्यात आंबोली (ता. त्र्यंबक), अंबड (नाशिक) आणि सिन्नर-घोटी मार्गावर करण्यात आली.

भरारी पथकांनी बुधवारी (दि. ४) जिल्ह्यातील हॉटेल धाब्यांवर छापासत्र राबवले तसेच दुसरीकडे नाकाबंदी केली. जव्हारमार्गे येणाऱ्या रस्त्यावर आंबोली येथे सापळा लावला. वाहनतपासणीत तवेरा कारमध्ये मद्यसाठा आढळून आला. चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून हा मद्यसाठा सिन्नर-घोटी मार्गावरील हॉटेल राजेपार्क आणि अंबड एमआयडीसीत उतरविला जाणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या पथकाने दोघा ठिकाणी छापा मारला. त्यात मोठा मद्यसाठा सापडला. राजेपार्क हॉटेल येथे पथकाचे कर्मचारी पोहचण्यापूर्वीच पिकअप वाहनातून लाखो रुपयांचा मद्यसाठा उतरविण्यात आला होता. या कारवाईत सुमारे तीन लाख ९७ हजार ८५८ रुपयांचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. मद्याची वाहतूक करणारी तवेरा आणि पिकअप वाहन पथकाने जप्त केले असून, ही कारवाई निरीक्षक व्ही. अ‍े. गोसावी, एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक वाय. आर. सावखेडकर, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, सोमनाथ भांगरे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक गोसावी, चोपडेकर व दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्येप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लहवित रोडवरील एअर फोर्स स्टेशनजवळ सुमारे नऊ वर्षांपूर्वी तरुणाच्या हत्येतील संशयित आरोपींना अटक करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे.
गिरीधर सखाराम साळवे (रा. पांढुर्ली) या तरुणाची २६ जानेवारी २००९ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख संशयित म्हणून पोलिसांनी योगेश दौलत झाडे (३२), संदीप सोमनाथ झाडे (३०, दोघेही रा. चिंचोली) आणि पांडुरंग संपत नागरे (रा. चाडेगाव) या तिघांना ताब्यात घेतले. हत्या झाल्यापासून ते तिघेही पोलिसांना चकवा देत होते. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक निरीक्षक सचिन सावंत, पोलिस उपनिरीक्षक भीमराज गायकवाड यांच्या पथकाने या तिघा संशयितांना अटक केली. तिघा संशयितांनी साळवे याच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी ‌सांगितले. तिघांना देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धास ६० हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर शाखेचा व्यवस्थापक असल्याची बतावणी करून बँक खात्याचा ओटीपी नंबर मिळवणाऱ्या भामट्याने वृद्धास ६० हजार रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक विष्णुपंत देशपांडे (६८, रा. सिमेन्स कॉलनी, वडाळा-पाथर्डी रोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. २५ सप्टेंबर रोजी देशपांडे यांच्या मोबाइलवर ७३२४९४०८१६ या क्रमांकावरून फोन आला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपूर येथील जयप्रकाशनगर शाखेचा व्यवस्थापक असल्याचे चोरट्याने सांगितले. त्याने देशपांडे यांच्याकडून बँक खात्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाइन पद्धतीने ५९ हजार ९९९ रुपये काढण्यात आले. या बाबत बँकेचा एसएमएस प्राप्त झाल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेचा अधिक तपास निरीक्षक चौधरी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळक्याकडून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपघात झाल्यानंतर दोघा दुचाकीस्वारांना टोळक्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार खांदवे सभागृह परिसरात घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राहुल मनोज मारू (२४, रा. आंबेडकर कॉलनी, रविवार कारंजा) याने तक्रार दिली. त्यानुसार, मंगळवारी (दि. ३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुल आपल्या मित्रासमवेत दुचाकीवर (एमएच १५ डीडी ९२१२) जात होता. खांदवे सभागृहाजवळ भरधाव येणाऱ्या काळी पिवळी ओमनी (नंबर नाही) कारने दुचाकीस हुलकावणी दिली. त्यात दोघे मित्र जमिनीवर पडले. दोघांनी कारचालकास जाब विचारला असता तेथे आलेल्या तिघा जणांनी दोघा मित्रांना बेदम मारहाण केली. यावेळी एकाने राहुलवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकलमधील लॅपटॉप चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेडिकल स्टोअर्सच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह लॅपटॉप चोरी केला. ही घटना त्र्यंबक रोडवरील धामणकर कॉर्नर भागात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुकेश अशोक जाधव (रा. तेलीगल्ली, रविवार पेठ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. जाधव यांचे धामणकर कार्नर परिसरातील साठे हॉस्पिटल येथे हार्मोनी फार्मा नावाचे मेडिकल दुकान आहे. चोरट्यांनी सोमवारी (दि. २) रात्री बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्यातील रोकड आणि सुमारे ५० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनाने करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्समधील मंगळसूत्र लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजीपाला खरेदीसाठी पतीसह घराबाहेर पडलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरी केले. ही घटना दिंडोरी रोडजवळील किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा देविदास बाविस्कर यांच्या तक्रारीनुसार, बाविस्कर या मंगळवारी (दि. ३) सकाळी भाजीपाला खरेदीसाठी गेल्या. किशोर सूर्यवंशी मार्गावरील बालाजी सायकल मार्ट येथे त्या भाजीपाला खरेदी करीत असतांना चोरट्यांनी त्याच्या हातातील पर्सची चेन उघडली. तसेच पर्समधील सुमारे ५५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. घटनेचा अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण कार्यालयाबाहेर आमदारांचे ठाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात गेल्या एक महिन्यापासून भारनियमन सुरू आहे. सायंकाळी आणि सकाळी तब्बल सहा ते सात तास वीज गायब असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग असून त्यालाही याचा फटका बसला आहे. या अनियमित भारानियामनाविरोधात येथील काँग्रेस आमदार असिफ शेख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

शहरातील महावितरणच्या मोतीभवन कार्यालयाबाहेर सकाळपासून आमदार शेख, माजी महापौर ताहेरा शेख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले होते. यंत्रमाग उद्योग हा शहराचा प्रमुख व्यवसाय असून, बहुतांशी लोकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. मात्र शहरात गेल्या एक महिन्यापासून भारनियमन सुरू असल्याने त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसला आहे. याबाबत उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे देखील तक्रार केली असल्याचे आमदार शेख यांनी सांगितलजे. त्यानंतरही भारनियमन थांबलेले नाही. म्हणून धरणे आंदोलन करण्यात आल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. या भारानियामनाबाबत समाधानकारक तोडगा काढला जात नाही तोपर्यंत कार्यालयाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. अखेर महावितरणचे अधिकारी व शेख यांच्यातील चर्चेअंती शहरातील भारनियमन दोन टप्प्यात करण्याचा प्रस्तावास सोमवारपर्यंत मंजुरी घेण्यात येईल, अतिभारीत फिडरवरील भर कमी करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येईल, दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेवक फकीर मोहम्मद, सलीम टॅक्सीवाले, अस्लम अन्सारी, नजीर फल्लीवाले, रिजवान मेंबर, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाटे, आनंद महाराज कॉलेजला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक मान्यता नसतांना फसवी जाहीरात करून विद्यार्थ्यास प्रवेश देणे तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी चाटे स्कूलचे पैसे भरण्यास सांगितल्याच्या तक्रारीवरून ग्राहक न्यायमंचाने चाटे स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि आनंद महाराज कॉलेज या दोन्ही संस्थांना २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे अर्जाचा खर्च पाच हजार व विद्यार्थ्यांची १ लाख २५ हजार फी व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.

येवला येथील प्रथमेश व त्याचे वडील संजय गायवाड यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा निकाल देण्यात आला आहे. या निकालात अनिष्ठ व्यापारी पद्धतीचा वापर केल्याचा ठपका ठेऊन गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला देण्याचेही आदेश दिले आहे. चाटे कॉलेजने गायकवाडकडून बुक चार्जेस, युनिफॉर्मसाठी व शैक्षणिक फी पोटी १ लाख २५ हजार रुपये घेतले. मात्र कॉलेजमध्ये जेईई मेन व अॅडव्हान्सचे क्लास घेतले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यांनी थोड्याच दिवसात क्लासेस सुरू होतील असे सांगितले. त्यामुळे गायकवाड यांनी मुलाचे अॅडमिशन रद्द करण्याचा निर्णय घेवून शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केली. तेव्हा चाटे कॉलेजला मान्यता नसल्याचे कळाले. मुलाचे अॅडमिशन आनंद महाराज आर्टस, कॉमर्स कॉलेजकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुलाने अभ्यास करून आनंद महाराज कॉलेजमधूनच वार्षिक परीक्षा दिली. त्यानंतर या महाविद्यालयातून गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी चाटे स्कूलचे २० हजार रुपये भरण्याचे सांगून दाखला देण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही संस्थांना नोटीस बजावत विद्यार्थ्याला व्याजासह फी परत करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगार जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
सेवाकुंजजवळील संकटमोचन हनुमान मंदिराजवळ तरुणांवर हल्ला करून फरार झालेल्या तुकाराम चोथवे याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तुल, पाच जिवंत काडतूस आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अविनाश कौलकर व त्याचे मित्र किरण शिंदे, मंगेश वार्डे, बंटी तिडके असे सेवाकुंज येथील संकटमोचन हनुमान मंदिराकडून श्रीराम विद्यालयाकडे पायी जात होते. तेथील चिंचेच्या झाडाजवळ किरण शेळके, नाग्या, झगड्या, तुकाराम चोथवे, नीलेश नेरुळकर व त्यांचे इतर साथीदार बसले होते. त्यांनी जालिंदर उगलमुगले याच्या झालेल्या खुनाचा राग मनात धरून कौलकर आणि त्याचे साथीदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांच्यावर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी तुकाराम चोथवे हा फरार होता. त्याला बुधवारी (दि. ४) रोजी रात्री ११ वाजता मखमलाबाद नाका ते रामवाडी या मार्गाने येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचला, तुकाराम चोथवे हा स्वीफ्ट डिझायर या कारने येत असताना त्याला पोलिसांची चाहूल लागली, तेव्हा त्याने कार सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन देशी बनावटीचे पिस्टल पाच जिवंत काडतुस आणि स्वीफ्ट डिझायर कार (एम. एच. १५ ई. एम. ९१०१) पोलिसांनी जप्त केली.
तुकाराम चोथवे याला २०१४ मध्ये समीर हांडे याच्या खुनाच्या गुन्ह्यात कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. त्याची सध्या हायकोर्टात अटी शर्तीवर जामिनावर सुटका झालेली आहे. त्याच्यावरील जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टाला रिपोर्ट पाठविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेसुब’ प्रशिक्षण केंद्राचे वाढणार बळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सामनगावरोडवरील रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्रास रेल्वे बोर्डाकडून अतिरिक्त २४ एकर जागा मिळाल्याने या प्रशिक्षण केंद्राची जागेची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्राचे बळ वाढण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या केंद्रात लवकरच सुसज्ज अशा बॅफल फायरिंग रेंजची सुविधा प्रशिक्षणार्थी जवानांना उपलब्ध होणार आहे.

नाशिकरोड येथील सामनगावरोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयालगत रेल्वे सुरक्षा बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. १९९८ मध्ये रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेल्या या प्रशिक्षण केंद्राला अद्यापही स्वतःची फायरिंग रेंज नव्हती. परिणामी या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना देवळालीतील आर्टिलरी प्रशिक्षण केंद्रातील फायरिंग रेंजचा व ऑब्स्टॅकल ट्रेनिंगसाठी पुणे फोर्स वनच्या ट्रेनिंग सेंटरचा वापर करावा लागत होता. परंतु, आता या प्रशिक्षण केंद्राची ही अडचण दूर होणार आहे.

या केंद्राला आता नव्याने एकलहरे येथील मध्य रेल्वेच्या विद्युत अभियांत्रिकी संस्थेलगत (इरिन) २४ एकर जागा रेल्वे बोर्डाने दिली आहे.या प्रशिक्षण केंद्राला यापूर्वी केवळ २३ एकर जागा होती. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना फायरिंग प्रशिक्षणासाठी इतर प्रशिक्षण केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. या प्रशिक्षण केंद्राला नव्याने जागा उपलब्ध झाल्याने आता या प्रशिक्षण केंद्राची ताकद वाढणार आहे.

--

बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा

या प्रशिक्षण केंद्राने यापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे ३०० मीटरच्या बॅफल फायरिंग रेंजचा प्रस्ताव पाठविलेला आहे. भुसावळ मंडळ व मुंबई मुख्यालयाने या प्रस्तावास यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने चालू वर्षी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास या प्रशिक्षण केंद्रात लवकरच बॅफल फायरिंग रेंजच्या कामास सुरुवात होणार आहे. या फायरिंग रेंजच्या उभारणीस ९.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

--

कमांडो कोर्सही होणार सुरू

या प्रशिक्षण केंद्राची सध्याची प्रशिक्षण क्षमता २०० आहे. मात्र, येत्या वर्षभरात या केंद्राची प्रशिक्षण क्षमता ३५० पर्यंत वाढविली जाणार आहे. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या कमांडो ऑब्स्टॅकल्स कोर्सचाही प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. येथे जलतरण तलावाचीही उभारणी केली जाणार आहे.

--

येथील प्रशिक्षण केंद्राला रेल्वे बोर्डाने नुकतीच २४ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर बॅफल फायरिंग रेंज, स्विमिंग पूल उभारण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. बॅफल फायरिंग रेंजला लवकरच मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

-रामचंद्र पी. पवार, उपमुख्य सुरक्षा आयुक्त, रेसुब प्रशिक्षण केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीयपंथीयांच्या अधिकारांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात कायद्याचे राज्य आहे. यात समानता तत्त्व मूलभूत असून, ते उपेक्षित समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजासाठी लागू पडते. समाजासोबत राहून समाजापासून बहिष्कृत जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना अधिकारांची जाणिव करून देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आले.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर देशाभरातील तृतीयपंथी आराधनेसाठी जमा होतात. हा एकच दिवस असा असतो की त्यावेळी मोठा समाज जमा होतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या किमान सर्वसाधार कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्थर यांनी तृतीयपंथी यांच्या कायदेविषयक अडचणी तसेच, त्यावरील उपाय

याबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन केले. कायद्याचे राज्य सर्वोच्च आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती समान आहे. मात्र, तृतीयपंथीयांना समाजाची दडपशाही, दुर्व्यवहार आणि भेदभावाला समोरे जावे लागते. अगदी कुटुंबातील सदस्यही तृतीयपंथीयांचे हक्क मानत नाही. समाजाकडून स्विकृती नसल्याने या समाजाचे जीवन रोजचेच एक युध्द झाले असून, समानतेची भावना निर्माण होण्यासाठी कायदाच मदतीला असल्याचे सचिव एस. एम. बुक्के यांनी कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारने या संबंधी दिशानिर्देश दिले असून, त्याबाबतही बुक्के यांनी तृतीयपंथीयांना अवगत करून दिले.

१५० पेक्षा अधिक तृतीयपंथी हजर

हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपाय करणे आवश्यक असल्यास स्वतंत्र रूम आणि स्वतंत्र सार्वजनिक शौचालय असले पाहिजे, सार्वजनिक शिक्षण तसेच रोजगारासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय नागरिक म्हणून आरक्षण असते, अशी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमास १५० पेक्षा अधिक तृतीयपंथी हजर होते. कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या व्यक्तींसाठी बुक्के तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उभे राहून माहितीपत्र वितरीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शासकीय फलकांचे पेव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयाच्या मार्गावर विविध शासकीय कार्यालयांच्या फलकांचे पेवच फुटल्याची स्थिती आहे. परिणामी येथे येणाऱ्या नागरिकांचा गोंधळ उडत आहे. येथील दीड डझनावरील शासकीय कार्यालयांची नावे व पत्ते यांचा एकच फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिकरोडचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालय हे पाच जिल्ह्यांचे मुख्यालय असून, येथे विविध जिल्ह्यांतून शेकडो नागरिक, शासकीय कर्मचारी दररोज कामानिमित्त येत असतात. आयुक्त कार्यालयातही विविध विभाग आहेत, तसेच परिसरात दीड डझन शासकीय कार्यालये आहेत. नाशिकरोडला रेल्वे, बस किंवा खासगी वाहनांनी आलेल्यांना या कार्यालयात जायचे झाल्यास गोंधळ उडतो. नाशिकरोड पोलिस स्टेशनशेजारून आयुक्त कार्यालयाकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. येथे फलकांची गर्दी झाली असून, प्रत्येक खात्याचा स्वतंत्र फलक आहे. हे फलक वाचून पुढे गेल्यावर आपल्याला हवे असलेले कार्यालय कोठे आहे, ते शोधावे लागते. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाचा स्वतंत्र फलक लावण्याएेवजी एकच फलक लावून कार्यालयांची यादी व पत्ता, फोन नंबर लिहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

--

किती ही कार्यालये?

विभागीय आयुक्त कार्यालयातून नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा कारभार चालतो. या कार्यालयातच जमीन आस्थापना, सामन्य शाखा, निवडणूक, रोजगार हमी, पुरवठा, नगरपालिका, नगररचना, अपील, करमणूक आदी शाखा आहेत. शेजारीच विभागीय शिक्षण उपसंचालक, नगररचना, भूजल, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद विभागीय, चौकशी आदी कार्यालये आहेत. मागील बाजूस शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी महसूल प्रबोधिनी आहे. समोरच विभागीय कृषी कार्यालय असून, त्यांचेही असंख्य उपविभाग आहेत. शेजारीच फॅमिली कोर्ट आहे. याच आवारात सेतू कार्यालय, विभागीय वजनमापे कार्यालये, मत्सालय विभाग, विभागीय भाडेनियंत्रण कार्यालय, भूजल कार्यालय आहे. पलीकडे विभागीय माहिती कार्यालय, लष्कर भरती प्रशिक्षण केंद्र, सहाय्यक पोलिस आयुक्तालय आहे. विभागीय आयुक्तालय रस्त्यावर महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी व प्रशिक्षण संशोधन संस्था आहे. महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्रही आहे. शेजारी जिल्हा पुरवठा कार्यालयाचे गुदाम आहे. पुढेच भारत प्रतिभूती मुद्रणालय आहे.

--

प्रत्येक कार्यालयाचा फलक

या परिसरातील दीड डझनपैकी अनेक कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा फलक नाशिकरोड पोलिस स्टेशनमागील रस्त्यावर लावला आहे. येथे फलकांची स्पर्धाच सुरू असलेली दिसते. या सर्व कार्यालये व संस्थांमध्ये एक हजारावर कर्मचारी आहेत. एकट्या प्रेसचा विचार केल्यास अडीच हजार कर्मचारी आहेत. बाहेरगावांहून शासकीय कामानिमित्त आलेले कर्मचारी, नागरिक यांचा दीड डझनावरील कार्यालयांमुळे गोंधळ होतो. त्यामुळे येथे सर्वांची नावे असलेला एकच फलक लावल्यास गोंधळ दूर होईल, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

--

विभागीय आयुक्तालय प्रवेशद्वारावर सर्व शासकीय कार्यालयांचे विविध फलक लावण्याएेवजी या कार्यालयांची माहिती देणारा एकच फलक लावणे योग्य ठरेल. ही सूचना स्वागतार्ह आहे. याबाबत कार्यवाही करण्याची सूचना संबंधितांना करण्यात येईल.

-महेश झगडे, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाशोत्सव अंधारात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

औष्ण‌िक विद्युत केंद्राला पुरवठा करण्यात येणारा कोळसा कमी पडू लागल्याने संपूर्ण राज्यात भारनियमन सुरू असून, त्याचा फटका नाशिक शहरालाही बसला आहे. सणासुदीच्या काळात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पुन्हा ते सुरू झाले आहे. शहरासह ग्रामीण भाग आणि नगरपालिका हद्दीत लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी दर्शविली आहे. ही परिस्थ‌िती कोळसा उपलब्ध होईपर्यंत अशीच राहिल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येणारी दिवाळी नाशिककरांना अंधारात काढावी लागणार, अशी शक्यता आहे.

राज्यात पुरेशी वीज आहे. त्यामुळे नाशिक शहरात लोडशेडिंग होणार नाही, असे याअगोदरच महावितरणने कळवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मागणी आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने लोडशेडिंग करावे लागत असल्याची माह‌िती महावितरणकडून देण्यात आली आहे. ज्या भागाची वसुली चांगली आहे तेथे कमी प्रमाणात व जेथे वसुली कमी आहे, अशा ठिकाणी जास्त लोडशेडिंग केले जाणार आहे.

५ ऑक्टोबर रोजी व‌िजेची मागणी १७ हजार ९०० मेगावॅट होती. मात्र, उपलब्धता केवळ १५ हजार ७०० मेगावॅट होती. व‌िजेची मागणी आणि उपलब्धता यात तफावत निर्माण झाल्यामुळे राज्यात ज्या भागात सर्वाधिक वीजहानी आहे, अशाच भागात ए, बी, सी, डी, ई, एफ व जी-१, जी-२ व जी-३ या गटातील फिडर्सवर भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणला महानिर्मितीकडून ४ हजार ६०० मेगा वॅट, अदानीकडून १ हजार ७०० मेगावॅट, रतन इंड‌ियाकडून ५०० मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून ३ हजार ८०० मेगावॅट, जे. एस. डब्ल्यूकडून ३०० मेगावॅट, सीजीपीएलची ५६० मेगावॅट, एम्कोकडून १०० मेगावॅट, पवनऊर्जेतून १०० ते २०० मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातून ३८० मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून १ हजार २०० मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. त्याच प्रमाणे महावितरणने ७०० मेगावॅट वीज खरेदी केली आहे.

लोडशेड‌िंग शेड्यूल

सोमवार ते बुधवार

सकाळी ७.३० ते ९, दुपारी २.३० ते ४.१५

गुरुवार ते रविवार

सकाळी ९ ते १०.४५, दुपारी ४.१५ ते ५.४५

पवननगर, राणेनगर, गंगाघाट, कृषीनगर, विद्याविकास, एपीएमसी, पाटील कॉलनी, सद्गुरु नगर, राजेबहाद्दर, उदोजी मराठा


सोमवार ते बुधवार

सकाळी ९ ते १०.४५, दुपारी ४.१५ ते ५.४५

गुरुवार ते रविवार

सकाळी ७.३० ते ९, दुपारी २.३० ते ४.१५

अश्विननगर, विजय नगर, पी अॅन्ड टी कॉलनी, नवीन साधुग्राम, माघ सेक्टर, चव्हाण मळा, एकदूत त्रिकोणी, सहदेवनगर , उंटवाडी, महात्मानगर सावरकर नगर

सोमवार ते बुधवार

सकाळी ७.३० ते ९.३०, दुपारी २ ते ४

गुरुवार ते रविवार

सकाळी ९.३० ते ११.३०, दुपारी ४ ते ६

उत्तमनगर, एकतानगर, कुलकर्णी कॉलनी, त्रिमुर्ती चौक, पंचक, गायत्रीनगर, पंचवटी, मंगलवाडी, क्रीडा संकुल, टिळकवाडी


सोमवार ते बुधवार

सकाळी ९.३० ते ११.३०, दुपारी ४ ते ६

गुरुवार ते रविवार

सकाळी ७.३० ते ९.३०, दुपारी २ ते ४

म्हसरुळ, पेठरोड, गोरक्षनगर, अशोकस्तंभ, कोर्ट, आरटीओ, विशाल पॉइंट, एसटी कॉलनी, अमृतधाम, राममंद‌िर, सातपूर, पिंप्रीकर


सोमवार ते बुधवार

सकाळी ६ ते ८.३०, दुपारी २.४५ ते ४

गुरुवार ते रविवार

सकाळी ८.३० ते १०.४५, दुपारी ४ ते ६.३०

कलानगर, सिंहस्थ, कालिका, सिंहस्थ, साईनगर, रविवार कारंजा, गोविंद नगर


सोमवार ते बुधवार

सकाळी ८.३० ते १०.४५, दुपारी ४ ते ६.३०

गुरुवार ते रविवार

सकाळी ६ ते ८.३०, दुपारी १.४५ ते ४

गंजमाळ, लेखानगर, ठक्कर बाजार, गोविंदनगर,मोरवाडी, कृष्ण नगर


सोमवार ते बुधवार

सकाळी ६ ते ८.४५, दुपारी १२.३० ते ३.१५

गुरुवार ते रविवार

सकाळी ८.४५ ते ११.३०, दुपारी ३.४५ ते ६.३०

सारडा सर्कल



सोमवार ते बुधवार

सकाळी ८.४५ ते ११.३०, दुपारी ३.४५ ते ८.३०

गुरुवार ते रविवार

सकाळी ६ ते ८.४५, दुपारी १२.३० ते ३.१५

औरंगाबादरोड


सोमवार ते रविवार

सकाळी ६.४५ ते ८.४५, दुपारी १२.३० ते ३.१५

जुने नाशिक, बुधवार पेठ

सोमवार ते रविवार

सकाळी ८.४५ ते ११.३०, दुपारी ३.४५ ते ६.३०

भद्रकाली मार्केट, दुधबाजार, दहीपूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने उडवली दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अचानक आलेल्या पावसाने शुक्रवारी नाशिककरांची चांगलीच दैना उडविली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, दिवसभरात जिल्ह्यात ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उत्तर-मध्य महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑक्टोबर हिटचा झळा नागरिकांना असह्य होऊ लागल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत असतानाच दुपारी दोनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींनी शहरात अचानक हजेरी लावली. काही क्षणात पावसाने नागरिकांना चिंब केले. बेसावध नागरिकांना पावसापासून बचावासाठी आडोसा शोधावा लागला. अवघ्या काही मिनिटांत पावसाने शहराच्या बहुतांश भागातील रस्ते धुवून काढले. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. ५ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

जिल्ह्यात ३४ मिमी पाऊस

जिल्ह्यात दिवसभरात ३४ मिमी पावसाची नोंद झाली. सिन्नरमध्ये १९ तर येवल्यात १३ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही तुरळक पाऊस पडला असून, तेथे प्रत्येकी एक मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

परतीच्या पावसाने पिकांना झोडपणे सुरूच ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान होते असून, द्राक्षबागांच्या छाटणीच्या कामातही अडथळे येत आहेत. द्राक्षबागांमधील पानांना तडे जात असून, द्राक्षघड पोषणासही त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. वातावरणात सातत्याने बदल होत असून त्याचा परिणाम पिकांवरील फवारणीवरही होऊ लागला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ तालुक्यात भात पिकालाही या पावसाचा फटका बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडून कंदील भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिककरांवर लादलेले वीज भारनियमन त्वरित रद्द करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कंदील व मेणबत्ती भेट देण्यात आली. भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला.

ऐन दिवाळीच्या तोंडावर कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन लादल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यात पुरेशी वीज आहे. त्यामुळे नाशिक शहराला वीज भारनियमन होणार नाही, असे महावितरण कंपनीने अगोदरच कळवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लंपडाव सुरू झालेला आहे. या भारनियमनामुळे शहरातील व्यापार व उद्योगास कोट्यवधीचा फटका बसणार आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे विविध ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, बूस्टर पंपिंग स्टेशन आहेत. वीज भारनियमानमुळे पाणीपुरवठा शुद्धीकरण प्रकियेत अडथळे येत असून, शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सकाळच्या वेळी कामाला जाण्याची घाई असताना वीज जाते. तसेच रात्री स्वयंपाक करण्याच्या वेळीही वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील जनता ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असताना भारनियमन सुरू केल्याने नागरिकांचा प्रचंड संताप होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

कुठलीही पूर्वसूचना न देता हे भारनियमन सुरू केल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. परीक्षा तोंडावर असताना भारनियमनमुळे अभ्यास होत नसल्याने विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे नाशिकमधील नियोजित वीज भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, विद्यार्थी अध्यक्ष गौरव गोवर्धने, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रशांत खरात, डॉ. अमोल वाजे, अॅड. सुरेश आव्हाड, अॅड. चिन्मय गाढे, सुनील महाले, अशोक मोगल-पाटील, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंधारातच वाचले निवेदन

शहरातील भारनियमनाच्या वेळेस निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा अंधारातच वाचून द्यावे लागले. महावितरणच्या कार्यालयातच वीज नसल्याने तेथे अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी निवेदनही अंधारातच घेतले असून, त्याचे वाचनही अंधारात करावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथींचा प्रकोप कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यू, स्वाइन फ्लू व साथीच्या रोगांचा प्रकोप कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवली असली तरी साथीच्या व संसर्गजन्य आजारांचा प्रकोप थांबत नसल्याचे चित्र आहे. सहा दिवसांत शहरात स्वाइन फ्लूचे ९ रुग्ण पॉझ‌िट‌िव्ह आढळून आले असून, एका मह‌िलेचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूचा कहर कायम असतानाच डेंग्यूचाही अटकाव होत नसल्याचे चित्र आहे. सहा दिवसांत शहरात डेंग्यूचे शंभर संशय‌ित रुग्ण आढळून आले असून, त्यात १६ जणांचे अहवाल पॉझिट‌िव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य आता ‘रामभरोसे’ झाले आहे.

अस्वच्छतेमुळे शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू वाढत असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने गेल्या आठवड्यापासून स्वच्छता मोहीम राबवली होती. या मोह‌िमेमुळे रोगराई कमी होईल असे वाटत होते. परंतु, वैद्यकीय विभागाच्या अहवालानुसार डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच असल्याचे चित्र आहे. गेल्या मह‌िन्यात डेंग्यू रुग्णांचा आकडा १०५ वर गेला होता. तर सप्टेंबर मह‌िन्यात स्वाइन फ्लूमुळे १४ जणांचा बळी गेला होता. पावसाने ओढ दिल्याने स्वाइन फ्लू व डेंग्यूचा प्रकोप कमी होईल असे वाटले होते. परंतु, डेंग्यू व स्वाइन फ्लू थांबत नसल्याचे चित्र आहे.

सप्टेंबर मह‌िन्यात सहा दिवसांतच डेंग्यूचे शंभर संशय‌ित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ६४ रुग्णांचे अहवाल आले असून, त्यात १६ जणांचे अहवाल पॉझ‌िट‌िव्ह आहेत. परंतु, डेंग्यूने मृत्यू मात्र झाला नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. डेंग्यूसोबतच स्वाइन फ्लूचा जोरही कायम आहे. सहा दिवसांत ९ स्वाइन फ्लूचे पॉझ‌िटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी पंचवटीत एका मह‌िलेचा स्वाइन फ्लूमुळे बळी गेला आहे. त्यामुळे सहा दिवसांतील आकडेवारीवरून स्वाइन फ्लू आपले पाय पसरत असल्याचे चित्र आहे.

स्वाइन फ्लूने ६६ मृत्यू

डेंग्यूने शहरात कोणाचा बळी गेला नसला तरी, स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. सप्टेंबर मह‌िन्यात स्वाइन फ्लूमुळे १४ जणांचा बळी गेला आहे. चालू आठवड्यात एका मह‌िलेचा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ६६ जणांचा बळी गेला असून, त्यात महापालिका हद्दीतील २९ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील ३७ जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. पालिकेच्या उपाययोजना कूचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images