Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अशोका मार्गावर चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या मायलेकींपैकी आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून पोबारा केला. ही घटना अशोका मार्ग परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

प्रीती सागर उत्तरवार (रा. टागोरनगर, रविशंकर मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रीती, तसेच त्यांची आई छाया व्यवहारे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पायी निघाल्या होत्या. अशोका मार्गावरील चैत्रपालवी इमारतीसमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी व्यवहारे यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. सहाय्यक निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

लाखाचा ऐवज लंपास

शहरात तीन घरफोड्या झाल्याचे समोर आले असून, त्यात भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. सिडकोतील खुटवडनगर भागात राहणाऱ्या निशा विक्रम दळवी (रा. रमा अपार्टमेंट) कुटुंबीयांसह दिवाळीनंतर बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत, त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उचकटून हॉलमधील एलसीडी व कपाटात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत. घरफोडीची दुसरी घटना दिंडोरी रोड भागात घडली. प्रसाद शंकर शिरसाठ यांच्या जामखेडे मळ्यातील गणेश मंदिरासमोरील बंद बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शेगडी, गॅस सिलिंडर, मिक्सर ग्राइंडर, दोन टेबल फॅन, नळ, पितळी समया असा सुमारे १७,५०० रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या. घरफोडीची घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार साळवे तपास करीत आहेत. दरम्यान, पाथर्डी फाटा भागातील स्वप्निल कमलाकर सुलक्षणे (रा. रसोदे संकुल, वासननगर) यांचे घरदेखील चोरट्यांनी फोडले. सुलक्षणे कुटुंबीय मंगळवारी परगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील एलसीडी टीव्ही व कपाटातील रोकड असा सुमारे ४४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

तडीपारास अटक

तडीपार करूनही शहरात वास्तव्य करणाऱ्या संतोष माने या सराईतास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने केली.
तडीपार संतोष बबन माने (रा. माऊली चौक, दत्तनगर) याच्यावर वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मानेला शहर पोलिसांनी एका वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. मात्र, मानेने शहरातच मुक्काम ठोकला. मानेच्या वास्तव्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी माने अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉइंट परिसरात येताच, त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

चार झाडांची कत्तल

वडनेरसह वडनेर गेट परिसरातील भररस्त्यावर असलेली पिंपळ व भेंडीची चार झाडे चोरट्यांनी कापून नेली. या प्रकरणी लाकूड तस्करांविरुद्ध उपनगर पोलिसांनी भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बबन तुळशीराम कटारे (रा. श्रीपादकृपा अपार्टमेंट, कलानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ ते १२ ऑगस्टदरम्यान ही झाडे तोडण्यात आली. आरोपींनी रस्त्यावरील एक पिंपळाचे आणि तीन भेंडीची झाडे तोडून लाकूड घेऊन गेले. हवालदार काकड तपास करीत आहेत.

अधिकाऱ्यास धक्काबुक्की

मुलीचे लर्निंग लायसन्स तत्काळ मिळावे, या मागणीसाठी आरटीओ कार्यालयात गोंधळ घालत सहाय्यक प्रादेशिक अधिकाऱ्यास एकाने धक्काबुक्की केली. हा प्रकार बुधवारी घडला असून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुरेय वल्लभ अग्रवाल (रा. गजानन पार्क) याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी अग्रवाल आपल्या मुलीला सोबत घेऊन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. या वेळी त्यांनी लायसन्सची मागणी केली. मात्र, गर्दी असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. यानंतर अग्रवाल यांनी वरिष्ठांना गाठले. मात्र, तेथेही गोंधळ झाला. सहाय्यक प्रादेशिक अधिकारी राहुल कदम यांनी अग्रवाल यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कदम यांना धक्काबुक्की केली. उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

पल्सरस्वारांनी मोबाइल पळविला

रस्त्याने मोबाइलवर बोलत चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल पल्सरवरील चोरट्यांनी खेचून नेला. नगरकर कॅन्सर हॉस्पिटल भागात ही घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. रूपेश शिवाजी शिरसाठ (वय १६, रा. श्रीजी पॅलेस, द्वारका) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. रूपेश सरोज ट्रॅव्हल्स कार्यालयाकडून रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोबाइलवर बोलत सिटीकेअर हॉस्पिटलच्या दिशेने पायी जात होता. समोरून आलेल्या पल्सरस्वारांनी त्याच्या हातातील सुमारे १८ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी दीपोत्सव व तुळशीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिपूर पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी शिव मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. शहरातील विविध मंदिरांत व दुकानांमध्ये त्रिपूर वाती विक्रीस उपलब्ध असून, त्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत.

कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र येऊन बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.

बालाजी मंदिरातही दीपोत्सव

या पौर्णिमेनिमित्त मुरलीधर गल्लीत सिद्धेश्वर महादेव मंदिरात शंकराला अर्धनारी नटेश्वराचा मुखवटा लावण्यात येणार असून, विविध फळांची फुलांची आरास करण्यात येणार आहे. यावेळी धार्मिक विधी व दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पणत्यांची रोषणाईदेखील करण्यात येणार आहे. तीळभांडेश्वर मंदिरातदेखील विविध प्रकारचे धार्मिक उत्सव होणार असून, यावेळी नाशिकमधील कलाकार आपली संगीत कला सादर करणार आहेत. गंगापूरच्या

बालाजी मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. बालाजी मंदिरातील दीपोत्सवाचे दृश्य पहाण्यासाठी अनेक भक्त रात्री हजेरी लावत असतात. नाशिक शहरातील सर्व मंदिरांवर रोषणाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखण्या सिटी गार्डनचे विद्रुपीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

मुबलक पाणी उपलब्ध असतानाही इंदिरानगरच्या सिटी गार्डनमधील हिरवळ पाण्याअभावी कोमेजली असून, खेळण्यांचे भंगार साहित्य गार्डनमध्येच ठेवल्याने गार्डनचे विद्रुपीकरण झाले आहे. या उदयानातील खेळणी चांगली असली, तरी अन्य बाबींची दुरवस्था झाल्याने याप्रश्नी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

इंदिरानगर येथे शहराच्या धर्तीवर सिटी गार्डन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी खेळणींबरोबरच जॉगिंग ट्रॅक, छोटेखानी स्टेडियम व कारंजा उभारण्यात आला आहे. पूर्वी या ठिकाणची खेळणी तुटलेल्या अवस्थेत होती. मात्र, नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ती बदलण्यात आली असली, तरी त्यास पुरेशी जागा अजूनही उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी नव्याने विजेवर चालणारी काही खेळणी बसविण्यात आली असून, त्यात रेल्वेचाही समावेश आहे. मात्र, या खेळणी बसविताना त्यासाठी आणलेले लोखंडी व लाकडी साहित्य तेथेच पडून असल्याने त्यापासून मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी असलेले हे निरुपयोगी साहित्य तातडीने उचलण्याची सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने ते उचले नसल्याचे बोलले जात आहे.

--

पाण्यासह विविध समस्या

उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर हिरवळ लावण्यात आली असली, तरी पाण्याअभावी ती कोमेजून गवतात रुपांतरित झाली आहे. येथे पुरेसा पाणीपुरवठाच होत नसल्याने झाडांना व हिरवळीवर पाणी मारणे अवघड होत असल्याचे सांगण्यात येत. या ठिकाणी सुमारे पंचवीस ते तीस शोचे दिवे बसविण्यात आले असून, त्यातील निम्म्याहून अधिक दिवे गायब झाले आहेत. त्यांच्या वीजताराही उघड्याच असल्याने शॉक बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या उदयानात आकर्षक कारंजा तयार करण्यात आला असला, तरी तो बंदच आहे. झाडांना व हिरवळीला पाणी नसताना या कारंजाची सुरुवात कशी करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

--

अस्वच्छतमुळे दुर्गंधीचा सामना

उद्यानाच्या बाहेरची जागा कधीही साफ केली जात नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा पडल्याचे दिसत असून, व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या उद्यानाच्या परिसराचीही स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी काही प्रेमीयुगुले बसत असल्याने हे उद्यान दिवसभर बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, सायंकाळी त्यांचा वावर वाढला असून, हटकले असता यांच्याकडून स्थानिक नगरसेवकांची नावेसुद्धा सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. येथे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

---

सिटी गार्डन या सहा एकर जागेतील गार्डनमध्ये सध्या गवताचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी पाणी नसल्याचे सांगून उद्यानातील हिरवळच गायब झाली आहे. प्रशासनाने या उद्यानाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

-हर्षद गोखले, शिवसेना ग्राहक कक्ष

--

येथील कारंजा बऱ्याच दिवसांपासून बंदच आहे. या उद्यानाच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा साचलेला असल्याने येथे जॉगिंगला जाणेही अवघड झाले आहे. या ठिकाणची लहान मुलांची खेळणीच केवळ सुस्थितीत अाहेत.

-सतीश जाधव, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’साठी शेतकऱ्यांवर दबाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर भूसंपादन अधिकारी महेश पाटील पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी संबधित अधिकारीही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले आहेत. जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून हा प्रस्तावित महामार्ग जातो. या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, काही गावांतील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध कायम आहे. परिणामी, भूसंपादन अधिकारी महेश पाटील या गावांतील शेतकऱ्यांवर पेसा कायद्यांतर्गत दबाव टाकत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, कचरू पाटील, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, रावसाहेब हारक, शांताराम ढोकणे, किसन वाघचौरे आदींनी केला आहे. भूसंपादन अधिकारी प्रांत महेश पाटील यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त झगडे यांनी संघर्ष समितीला दिले.

संघर्ष समितीच्या मागण्या

समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी महेश पाटील पेसा कायद्यांतर्गत शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. इगतपुरी तालुक्यातील तब्बल १७ ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. या महामार्गाच्या भूसंपादनप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातही ३३ केसेस दाखल झालेल्या आहेत. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांतील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत, त्या टाळाव्यात. भूसंपादन कायदा २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी. एक प्रकल्प एक दर जाहीर करावा, सिन्नर तालुक्यातील गोंदे या गावातील भूसंपादनाचा दर का जाहीर केला जात नाही, याचा खुलासा करावा आदी मागण्या शेतकरी संघर्ष समितीने विभागीय आयुक्तांकडे केल्या आहेत. याशिवाय भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना भूसंपादन अधिकारी महेश पाटील खोटे आमिष दाखविण्याबरोबरच त्यांना नुकसानीची भीतीही घालत असल्याचे समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने विभागीय महसूल आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

अन्यथा बेमुदत उपोषण

पेसाअंतर्गत ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव करून समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे, तरीही भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यांवर दबाव टाकून भूसंपादनाचा प्रयत्न करीत आहेत. भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करुन कारवाई न झाल्यास शेतकरी संघर्ष समिती बेमुदत उपोषण करेल.
- राजू देसले, समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीअभावी रखडले कलाग्राम केंद्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या आग्रहापायी सरकारी जागेवर हैद्राबादच्या धर्तीवरील हाट बाजारप्रमाणे कलाग्राम केंद्रांची उभारणी गंगापूर, गोवर्धन गावालगत करण्यात आली. परंतु,कोट्यवधी रुपये खर्चून उभारले जात असलेले केंद्र निधीअभावी रखडल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारची योजनाच बंद झाल्याने कलाग्राम केंद्राचे काम रखडले असल्याचेही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, तब्बल दहा कोटींहून अधिक रक्कम खर्च होऊनही हे केंद्र चार वर्षांहून अधिक काळापासून धूळ खात पडून असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अगोदरच महापालिकेच्या १७ एकर जागेवरील वसंत कानेटकर उद्यानात कुणी फिरकायलाही तयार नाही. त्याच ठिकाणी पुन्हा कलाग्राम केंद्र उभारण्याचा हट्ट कशाला केला गेला, असा सवालही उपस्थित केला जात आहे. कलाग्राम केंद्राची उभारणी करताना केंद्रात व राज्यात आघाडी सरकारची सत्ता होती. परंतु, आता युती सरकार असल्याने कलाग्राम केंद्राला उभारी मिळणार का, हाच खरा सवाल आहे.

दरम्यान, चार वर्षांहून अधिक काळापासून कोट्यवधींचे कलाग्राम केंद्र बंद का, याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून कलाग्राम केंद्राची योजनाच बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यात निधीची गरज असताना निधी उपलब्ध झाला नसल्या कारणामुळे काम बंद असल्याचे सांगण्यात आले. कलाग्राम केंद्रात प्रशासकीय इमारतीसह ९२ गाळे महिला बचत गटांसाठी उभारण्यात येणार होते. परंतु, योजनाच बंद झाल्याने कलाग्राम केंद्राचे काय होणार, असा सवाल नागरिकाकडून उपस्थित होत आहे.

--

चार वर्षांपासून जैसे थे

केंद्र सरकारचा सहाय्यता निधी व प्रादेशिक पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर, गोवर्धन गावातील शिवारात साडेपाच एकर जागेवर महिला बचत गटांसाठी कलाग्राम केंद्रास मंजुरी मिळाली होती. तत्कालीन खासदार समीर भुजबळ व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दहा कोटींहून अधिक रक्कम कलाग्रामसाठी मंजूर करीत प्रत्यक्ष २०१४ ला कामाला सुररुवातही केली. कलाग्राम केंद्राला उभारणीसाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता चार वर्षांहून अधिक काळ उलटूनदेखील कलाग्राम केंद्रच उभे राहिले नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीप पॉलिटेक्निकला ‘स्टुडंट्स चॅप्टर’पुरस्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदीप फाउंडेशन संचलित संदीप पॉलिटेक्निकला इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स इंडियातर्फे देशपातळीवरील डॉ. अमिताभ भट्टाचार्य मेमोरियल ‘उत्कृष्ट स्टुडंट्स चॅप्टर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार संदीप पॉलिटेक्निकला दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे.

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडियाचे २५ वे अधिवेशन नुकतेच गोवा येथे झाले. त्याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे उपस्थितीत व आयआयटी गोव्याचे संचालक डॉ. प्रवीण मिश्रा यांचे हस्ते संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत पाटील यांना रोख रक्कम पंधरा हजार रुपये, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

संदीप पॉलिटेक्निकमध्ये या स्टुडंट्स चॅप्टरअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये विविध तांत्रिक स्पर्धा पार पडल्या. त्यात पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, क्वीज कॉम्पिटिशन, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान तसेच नाशिकमधील उत्कृष्ट कंपन्यांमध्ये इंडस्ट्रीयल व्हिजिटचे आयोजन करण्यात आले. संदीप पॉलिटेक्निकच्या या यशाबद्दल चेअरमन डॉ. संदीप झा यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे पाच विद्यार्थी ‘एनडीए’मध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने नॅशनल डिफेन्स अकादमीसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा नाशिक शहरातील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

१० सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात देशभरातून साडेतीन लाख विद्यार्थी प्रविष्ट होते. या परीक्षेत सुदर्शन अकादमीचे आकाश काकड, वेदांत घंगाळे, गौरव गायकवाड, प्रणव जोपळे आणि प्रणव जाधव हे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत मुलाखतीसाठी बोलाविले जाणार आहे.

स्पेशल फोर्सेस, नौदलला प्राधान्य

आकाश काकड हा मखमलाबादचा रहिवाशी असून, सध्या केटीएचएम कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील विलास काकड हे मखमलाबाद येथेच शेती करतात. आकाशला आर्मीमध्ये जाऊन पुढे स्पेशल फोर्सेसमध्ये दाखल होण्याचे स्वप्न आहे. तर वेदांत हा गोविंदनगरचा रहिवाशी असून, तो केटीएचएम कॉलेजला बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील प्रशांत घंगाळे हे मायको कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्याला तोफखाना विभागात अधिकारी व्हायची इच्छा आहे. गौरव गायकवाड हाही केटीएचएमचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील चांगदेव गायकवाड हे नाशिक येथे जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. गौरवला नौदलात जाऊन पाणबुडी तज्ज्ञ व्हायची इच्छा आहे.

यातील तिघांनी दहावीनंतर एसपीआय, औरंगाबाद या संस्थेत परीक्षा दिली होती. मात्र यात आलेल्या अपयशाने न खचता त्यांनी हे यश मिळविलेे. नाशिकमधील विद्यार्थ्यांनी

स्वत:ची गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.

- सुदर्शन ‌अहेरराव,

मार्गदर्शक व प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट नाशिक’ला डिजिटल टच

$
0
0

मटा फोकस

--

संकलन ः विनोद पाटील

---

‘स्मार्ट नाशिक’ला डिजिटल टच

--

नाशिकची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर शहराने आता डिजिटल कारभाराकडे वाटचाल सुरू केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा यांनी शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ करण्यासाठी अधिकाधिक सुविधा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. २२ नागरी सुविधा केंद्रे हे याच प्रयत्नातील महत्त्वाचे पाऊल आहे. सोबतच महापालिकेचे नाशिक स्मार्ट अॅपही नागरिकांच्या मदतीला असून, या २२ नागरी सेवा केंद्रांसह नाशिक स्मार्ट अॅपचा जवळपास पावणेतीन लाख नागरिकांनी वापर केला आहे.यातून जवळपास ८० टक्के नागरिकांचे प्रश्न वेळेत मार्गी लागल्याने नागरी सुविधा केंद्र आणि नाशिक स्मार्ट अॅप हे नाशिककरांसाठी वरदान ठरले आहे...

---

ऑनलाइन दाखले अन् निपटारा

शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व परवानग्या देण्यात येतात. त्याकरिता नागरिकांना विविध विभागांत जाऊन सदर परवानग्या व दाखले प्राप्त करून घ्यावे लागतात. यामध्ये बराच वेळ जातो. नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचावा यासाठी सर्व परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिकेमार्फत नागरी सुविधा केंद्र विकसित करण्यात आले आहे. नागरिकांना ठराविक मुदतीत विविध विभागांचे दाखले मिळावेत म्हणून राज्य शासनाने सेवा हमी कायदा लागू केला असून, त्यानुसार १६ सेवांसाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ठोस पावले उचलत या १६ सेवांसोबतच तब्बल ४५ सेवा-सुविधांचे ऑनलाइन दाखले देण्यासह अर्जांचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी २२ ठिकाणी नागरी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे नागरिकांना त्यांच्याच भागात, तसेच घरपोच सुविधा दिल्या जात आहेत.

--

हजारो नाशिककरांनी घेतला लाभ

नागरिकांना नागरी सुविधा केंद्रामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले व परवानग्या उपलब्ध होणार आहे. त्यात काही दाखले ऑनलाइनही घरपोच घेता येत आहेत. या योजनेनुसार जन्म, मृत्यू, मालमत्ता कर, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण दाखला, विभागीय दाखला, जोता, बांधकाम वापर परवाना, नळजोडणी, मलवाहिनी जोडणी, मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, डॉग लायसन्स, भोगवटा प्रमाणपत्र, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण आदी दाखले महापालिकेकडून आता नागरिकांना घरबसल्या दिले जात आहेत. दि. ५ एप्रिलपासून नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या या नागरी सेवांमुळे आतापर्यंत ४३ हजार ३८८ नागरिकांनी या सेवांसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी जवळपास ३१ हजार ३०३ नागरिकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे, तर घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी दोन लाख ८ हजार ९७४ नागरिकांनी सेवा केंद्रांचा फायदा घेतला आहे. स्मार्ट नाशिक अॅपचा वापर करीत ३० हजार ६९२ जणांनी तक्रारी केल्या असून, त्यापैकी २९ हजार ६७७ नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.

--

कॅशलेस ट्रॅन्झॅक्शनला प्रोत्साहन

महापालिकेमार्फत या नागरी सुविधा केंद्रांत जवळपास ४५ सेवा पुरविण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेला येस बँकेचे सहकार्य मिळत आहे. बँकेने सदर नागरी सुविधा केंद्र चालविण्याकामी विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. सदर नागरी सुविधा केंद्रामध्ये येस बँकेमार्फत कॅशलेस ट्रॅन्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता बँकेमार्फत डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांना कर भरणा करण्याकामी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस मशिन उपलब्ध करून दिले आहे. या नागरी सुविधा केंद्रांत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांवर विहित कालावधीमध्ये कार्यवाही करून नागरिकांना वेळेत दाखले व परवानग्या देण्यात येतात. ही नागरी सुविधा केंद्रे हे त्या-त्या विभागातील विभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करीत आहेत.

--

भ्रष्टाचाराला ऑनलाइनने चाप

महापालिकेने या नागरी सुविधा केंद्रांबरोबर या सेवा नागरिकांना ऑनलाइनही उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक ऑनलाइनदेखील अर्ज भरू शकतात. त्याप्रमाणे विविध दाखले व परवानग्यांकरिता आवश्यक शुल्काचा भरणा ऑनलाइन करता येत आहेत. नगररचना, वैद्यकीय, आरोग्य विभागातील प्रमाणपत्रांसाठी पैशांची देवाणघेवाण होते. आता थेट संवादच होणार नसल्याने भ्रष्टाचारालाही चाप बसणार आहे. सद्य:स्थितीत नागरी सुविधा केंद्रे ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, ही नागरी सुविधा केंद्रे व्यवस्थितरीत्या कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात त्यांचा विस्तार करण्यात येईल.

---

कालमर्यादा निश्चिती

नागरिकांना सुविधा व दाखल्यांसाठी कमीत कमी तीन, तर जास्तीत जास्त ६० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन सुविधा प्राप्त करण्याकामी www.cfc.nmcutilities.in या वेबसाइटवर जाऊन नागरिक थेट ऑनलाइन अर्ज करून दाखले घरपोच मिळवू शकत आहेत. या परवानग्यांसाठी महापालिकेचे उंबरठे झिजविण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. नागरिकांना दाखला मिळविण्यासाठी व अर्ज करण्यासाठी या केंद्रामध्ये प्रथम यावे लागत होते. परंतु, कालांतराने आता अर्ज करण्यासह पैसे भरण्याचीही सुविधा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे जलद सेवा मिळणार आहे.

---

या ४५ नागरी सुविधा ऑनलाइन उपलब्ध

--

जन्म दाखला

मृत्यू दाखला

मालमत्ता कर भरणा

विवाह प्रमाणपत्र

मालमत्ता हस्तांतरण दाखला

विभागीय दाखला

जोता दाखला

बांधकाम वापर परवाना

नळजोडणी

मलवाहिनी जोडणी

विविध कर वसुली

डॉग लायसन्स, जन्म-मृत्यूचे दाखले

रुग्णालय नोंदणी

रुग्णालय नूतनीकरण

सोनोग्राफी सेंटर

प्री-फायर एनओसी

फायनल फायर एनओसी

फायर एक्सटिंग्युशर्स दाखला

डॉग लायसन्स नूतनीकरण

लॉजिंग लायसन्स अँड रिनिव्हल

सेफ्टिक टँक (निवासी)

सेफ्टिक टँक ( वाणिज्यिक)

बायोमेडिकल वेस्ट नोंदणी

अॅसेसमेंट रजिस्टर

नवीन मालमत्ता नोंदणी

अतिरिक्त बांधकामांना मंजुरी

पाणीपट्टी कर भरणा

वॉटर मीटर चोरी, खराब

इंजिनीअर लायसन्स

भोगवटा प्रमाणपत्र

रिवाइज बांधकाम दाखला

झोन सर्टिफिकेट

टीडीआर सर्टिफिकेट

टीडीआर युटिलायझेशन

शहर विकास आराखडा नकाशा

जाहिरात परवाना

तात्पुरता जाहिरात परवाना

जाहिरात परवाना नूतनीकरण

मनपा सभागृह, मोकळ्या जागा भाडेसंदर्भात

मनपा गाळे भाडेसंदर्भात

रोड डॅमेज चार्जेस

प्लंबिंग लायसन्स

नळजोडणी हस्तांतरण

वृक्षतोड परवानगी

झाडांच्या फांद्या तोडणे

--

नागरी सेवा केंद्रांमधील अर्ज व निपटारा स्थिती

--

विभाग अर्ज निपटारा शिल्लक

घरपट्टी भरणा १४२४८० १४२४८० ०

पाणीपट्टी भरणा ६६४९४ ६६४९४ ०

जन्म प्रमाणपत्र १९१६५ १७८३१ १३३४

फायर अंतिम दाखला ११८ ११३ ५

फायर एनओसी ५६१ २१५ ३४६

नळजोडणी ५१५ ३०८ २०७

जोते प्रमाणपत्र ९१ ५ ८६

झोन दाखला ४११ १४८ २६३

दूषित टाकी स्वच्छता ७९२ ७०९ ८३

नवीन नळजोडणी ३१७२ २३३८ ८३४

पाणी जोडणी हस्तांतरण ७५३ ४५ ७०८

बांधकाम परवाना ८१८ १०४ ७१४

भोगवटा प्रमाणपत्र २५४६ २५६ २२९०

मालमत्ता कर उतारा १४१६ ७५७ ६५९

मालमत्ता हस्तांतरण ३३०२ २९२५ ३७७

मृत्यू प्रमाणपत्र ६९४६ ६३८२ ५६४

रुग्णालयाची नोंदणी ९५ ८ ८७

रुग्णालय नूतनीकरण २३९ २१ २१८

विवाह नोंदणी प्रमाणपत्र ५६२ ४०९ १५३

-----------------

स्मार्ट नाशिक अॅपला वाढता प्रतिसाद

--

३० हजार ६९२ -एकूण प्राप्त तक्रारी

२९ हजार २७७ -निपटारा झालेल्या तक्रारी

१४१५- प्रलंबित तक्रारींची संख्या

--

अॅपवरील विभागनिहाय तक्रारींची स्थिती

--

विभाग एकूण तक्रारी निपटारा प्रलंबित

पाणीपुरवठा विभाग ३५५४ ३३२४ ३०

आरोग्य व मलनिस्सारण ६२८३ ६२१९ ६४

सार्वजनिक बांधकाम ३१८० २८०१ ३७९

उद्यान विभाग १०९९ १०५७ ४२

एमटीएस विभाग ७० ६७ ३

नगररचना विभाग ६०९ ५६० ४९

प्रॉपर्टी टॅक्स २२३ २२० ३

वैद्यकीय विभाग २४ २१ ३

विद्युत विभाग १०२४८ ९६०० ६४८

ड्रेनेज विभाग ३४२५ ३३७० ५५

वॉटर टॅक्स १९६ १९६ ००

भूमिगत गटार ८९ ७१ १८

उद्यान (बांधकाम) ८० ७५ ५

उद्यान ( हॉर्टिकल्चर) ८२३ ७८० ४३

पर्यावरण विभाग १२ ११ १

--

शहरातील २२ नागरी सुविधा केंद्रे

--

विभागीय कार्यालये अन् उपकार्यालये ः

-मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, मनपा मुख्यालय, शरणपूररोड

-नवीन नाशिक विभागीय कार्यालय, नवीन नाशिक, अंबड पोलिस स्टेशनसमोर

-कामटवाडे उपकार्यालय, मधुरा लॉन्ससमोर, कामटवाडेरोड

-वडनेर-पिंपळगाव उपकार्यालय, मारुती मंदिराजवळ, वडनेर पिंपळगाव

-पाथर्डी गाव उपकार्यालय, पाथर्डी गाव

-अंबड गाव उपकार्यालय, अंबड गाव पाण्याच्या टाकीजवळ, अंबड

-नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, विभागीय कार्यालय, मेनरोड, शालिमाररोड

-इंदिरानगर उपकार्यालय, कलानगर, इंदिरानगर

-गांधीनगर उपकार्यालय, मारुती मंदिराजवळ, नाशिक-पुणे महामार्ग, गांधीनगर

-पंचवटी विभागीय कार्यालय, पंचवटी, मखमलाबाद नाक्याजवळ

-म्हसरूळ उपकार्यालय, महापालिका शाळा क्रमांक ८९, भाजी मार्केटशेजारी, म्हसरूळ

-मखमलाबाद उपकार्यालय, मारुती मंदिराजवळ, मखमलाबाद

-आडगाव उपकार्यालय, आडगाव बस स्टॉप, मेनरोड, आडगाव

-नांदूर-मानूर उपकार्यालय, महापालिका शाळेसमोर, नांदूर-जेलरोड मार्ग, नांदूर गाव

-नाशिकरोड विभागीय कार्यालय, मुक्तिधामरोड, नाशिकरोड

-चेहेडी गाव उपकार्यालय, चेहेडी जकात नका, नाशिक-पुणेरोड, नाशिकरोड

-दसक गाव उपकार्यालय, शिवाजीनगर, म्हसोबा मंदिरासमोर, जेलरोड, नाशिकरोड

-पंचक गाव उपकार्यालय, पंचक सरकारी दवाखाना, जेलरोड, नाशिकरोड

-नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी, शरणपूररोड

-महात्मानगर, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, महात्मानगर, नाशिक

-सावरकरनगर, आकाशवाणी केंद्राजवळ, सावरकरनगर

-सातपूर मनपा विभागीय कार्यालय, त्र्यंबकरोड, सातपूर

--

महापालिकेचा कारभार अधिकाधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन सर्व सुविधा देण्याचा मानस आहे. यापुढच्या काळात दाखले आणि सुविधांसाठी नागरिकांना वारंवार महापालिकेत चकरा मारण्याची गरज राहणार नाही. नागरिकांना या सुविधा व दाखले वेळेत मिळतील यासाठीचीही खबरदारी घेण्यात येत आहे. ४५ सेवा-सुविधा ऑनलाइन करणे हा त्याचाच भाग आहे.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, नाशिक महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकीदारांवर खंडित विजेचा ‘शॉक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

अनियमित भारनियमन, जादा वीजबिलाची आकारणी, डीपीचा वीजपुरवठाच खंडित करणे, दिवसा भारनियमन व रात्री वीजपुरवठा अशा गैरसोयीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांवर वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी महावितरणने वीज खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली थेट महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना जाब विचारला. खासदार गोडसे यांनी या वेळी महावितरणचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी चर्चा केली.

नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री, एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे, सामनगाव या भागातील शेतकरी सुमार दर्जाच्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठ्याची सेवा सुमार दर्जाची असतानाही महावितरणने कारवाई करताना डीपीचाच वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचीही हकनाक फरपट होत असल्याचा आरोप या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकरी बांधवांवर जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. बहुतांश डीपी नादुरुस्त असल्यानेही शेतकऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यात कृषीपंपांचा वापर अगदीच कमी असूनही वीजबिले मात्र भरमसाट देण्यात आल्याचा आरोपही या वेळी या शेतकऱ्यांनी केला. याशिवाय एकलहरे, हिंगणवेढे, कोटमगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कमी दराने वीजपुरवठा देण्याची मागणीही या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने खासदार गोडसे यांनी मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याकडे केली. पंचायत समीतीचे माजी सभापती अनिल ढिकले, सामनगावचे सरपंच सचिन जगताप, नगरसेवक रमेश धोंगडे, शशिकांत ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

तक्रार निवारण शिबिर घेणार

तालुक्यातील ज्या गावांत वीजपुरवठ्यासंदर्भात समस्या आहेत, अशा सर्व गावांत शेतकऱ्यांच्या वीजपुरवठाविषयक समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण शिबिर घेण्याचे आश्वासन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी खासदार गोडसे यांना दिले. या तक्रार निवारण शिबिरांतून स्थानिक शेतकऱ्यांच्या वीजपुरवठाविषयक समस्या गावपातळीवरच सोडविल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेचा फार्स

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात डेंग्यूसह अन्य साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहर आरोग्य सुधार समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमवेत थेट नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. रुग्ण आढळल्यानंतरही ठराविक भागातच स्वच्छता व औषध फवारणी होत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

सिडकोत डेंग्यूसह अन्य साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत असतानाच तुळजाभवानी चौकात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने येथे उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिका, जिल्हा आरोग्य विभागातर्फे येथे जनजागृती व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या स्थितीची शहर आरोग्य सुधार समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक बंटी तिदमे, छाया देवांग, रुपाली निकुळे यांच्यासह आरोग्याधिकारी आर. एस. गायकवाड, विभागीय स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे, मलेरिया विभागाचे नदीम पठाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली. सभापती कुलकर्णी यांनी नागरिकांशी संवाद साधला असता नागरिकांनी यापूर्वी या भागात महिन्यातून एकदाच औषध फवारणी होत असल्याचे सांगितले, तर सायंकाळची धूर फवारणी केवळ मुख्य रस्त्यावरच होत असल्याचे सांगितले. स्वच्छता होत असली, तरी या ठिकाणी असलेला पालापाचोळा किंवा रस्त्यांच्या कडेचा कचरा उचललाच जात नसल्याचेही सांगितले.

अचानकपणे झालेल्या या पाहणी दौऱ्यात व नागरिकांशी थेट संवाद साधल्याने खरी परिस्थिती समोर आली असली, तरी ही स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात सिडकोत राबविणे आवश्यक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. कुलकर्णी यांनी सांगितले, की नागरिकांनीही याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. घरात पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक घरांच्या गच्चीवर नारळ, रिकामे डबे व बाटल्या आढळून आल्याने याबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचनाही केली. सिडकोत आरोग्य विभागाकडून साफसफाई होत असली, तरी रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत, झुडपे काढण्यात येत नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. पुरेशा घंटागाड्यांअभावी रस्त्याच्या कडेला असलेले गवत व झुडपांमध्ये अनेकदा कचरा टाकला जात असल्याने डासांची उत्पत्ती होत असून, याबाबतही योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.

--

ठराविक भागातच मोहीम

काही दिवसांपासून सिडकोत साथींचे रुग्ण आढळून आल्याचे लक्षात आल्यावर गाजावाजा झाल्यानंतर आता ठराविक भागातच औषध फवारणी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वीच औषध फवारणी केली असती, तर अशी समस्या उद्‌भवलीच नसती अशा तक्रारीही केल्या. यावेळी सभापती कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना या भागातच नव्हे, तर संपूर्ण सिडको परिसरात दररोज औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. धूर फवारणी ही गल्लीबोळातही झालीच पाहिजे, असेही सांगितले.

--

पुरेशा मशिनचा अभाव

सिडकोत सध्या एक मोठे व पाच लहान धूर फवारणी मशिन्स असून, एक मशिन केवळ अर्धा तासच सुरू राहते. सिडकोची व्याप्ती पाहता या ठिकाणी अजून धूर फवारणी मशिनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सिडकोतील गल्लीबोळांत फवारणी करण्यासाठी लहान मशिनची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात येत आहे.

--

यापूर्वी परिसरात फवारणी दररोज होत नव्हती. आठ-पंधरा दिवसांतून एकदाच फवारणी होत होती. रुग्ण आढळल्यावर प्रशासनाला जाग आली आहे. ही धूर फवारणी व औषध फवारणी सातत्याने ठेवणे आवश्यक आहे.

-रुपाली पाटील, स्थानिक रहिवासी

--

सिडकोत नागरिकांनी यापूर्वी धूर फवारणी होत नसल्याचे सांगितले असून, संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. सायंकाळी सर्वत्र धूर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-सतीश कुलकर्णी, सभापती, आरोग्य सुधार समिती

--

धूर फवारणी ही प्रत्येक घरात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले असून, त्या पद्धतीनेच महापालिकेने करार केला. मात्र, ठेकेदार केवळ एकाच मुख्य रस्त्यावर ही धूर फवारणी करीत असल्याचा आरोप आहे.

-बंटी तिदमे, नगरसेवक, प्रभाग २४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑल सोल्स डे’निमित्त कॅम्पमध्ये मिसा अर्पण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सर्वधर्मीय एकोप्याने नांदणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीने गुरुवारी ऑल सोल्स डे (आत्म्यांचा पवित्र दिवस) साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देवळालीतील सेंट पॅट्रिक्स दफनभूमी येथे आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा याकरिता त्यांच्या नातेवाइकांनी मिसा (प्रार्थना) अर्पण केली.

जगभरातील ख्रिस्तीबांधव दि. २ नोव्हेंबर रोजी आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा, या उद्देशाने हा विधी साजरा करतात. येथील सेंट पॅट्रिक्स दफनभूमी येथे देवळाली परिसरातील ख्रिस्तीबांधवांसह नाशिक, मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवानी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ मिसा अर्पण करीत त्यांना स्वर्गलोक प्राप्त व्हावा, अशी मागणी ईश्वराकडे केली. फादर नॉलेस्को गोम्स यांनी धार्मिक विधी साजरे करीत पूर्वजांना स्वर्ग प्राप्त होण्यासाठी काय करावे, याचे विवेचन आपल्या संदेशातून केले. यावेळी परिसरातील पाच फादर, तसेच ख्रिस्ती समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ले. ज. आर. गोपाल यांची मुक्त विद्यापीठास भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संरक्षण मंत्रालयाच्या मनुष्यबळ नियोजन व सुविधा विभागाचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल यांनी नुकतीच येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी त्यांचे स्वागत केले.

लष्करी जवानांना निवृत्ती नंतरही समाजात ताठ मानेने जगता यावे, या उद्देशाने त्यांच्यासाठी नोकरीच्या जागीच उच्च शिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात आली आहे. या संदर्भात अलीकडेच संरक्षण मंत्रालय आणि मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या मनुष्यबळ नियोजन व सुविधांचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल यांनी काल मुक्त विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले.या भेटीत त्यांनी विद्यापीठ परिसरातील यशवंतराव चव्हाण यांचे वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्र, कृषी प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे, संगणकशास्त्र विद्याशाखेचे संचालक प्रा. माधव पळशीकर, ग्रंथालय प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील आणि जनसंपर्क विभाग प्रमुख संतोष साबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात महिन्यांपासून मिळेना परवाना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आरटीओ कार्यालयात नूतनीकरणासाठी दिलेला वाहनपरवाना मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही गणेश शेलार यांना सात महिन्यांपासून परवाना मिळालेला नाही. आरटीओ कार्यालयाचे सात महिन्यांपासून ते उंबरठे झिजवत आहेत. फक्त तात्पुरत्या स्वरूपात माहिती-शिक्का असलेले पत्र कार्यालयाने दिले आहे. मात्र, वाहन परवाना कधी मिळणार, याची ठोस माहितीदेखील दिलेली नसल्याने शेलार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शेलार यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास असल्याने एका पायाने नीट चालताही येत नाही. त्यांनी वाहन परवाना नूतनीकरणासाठी २७ एप्रिल २०१७ रोजी सर्व कागदपत्रे आणि शुल्क यांची पूर्तता करून अर्ज केला होता. त्यांना अर्ज सादर करताना एक महिन्याच्या आत वाहन परवाना घरी पोस्टाने येईल, अशी माहितीदेखील दिली होती. मात्र, एक महिना उलटूनही आपला वाहन परवाना मिळाला नसल्याने कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी पोस्टात चौकशी, तुमचा पत्ता चुकलेला असेल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोस्ट ऑफिस व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी केली; पण तेथेही काहीही माहिती मिळाली नाही. त्यांनी वारंवार आरटीओ कार्यालयात चौकशी व लेखी स्वरूपात अर्ज करूनही कोणतीही ठोस उत्तरे मिळाली नाहीत.

त्यामुळे संतापलेल्या शेलार यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडे प्रिंटिंग ऑफ डी.एल. आणि केएमएसची अडचण असल्याने तुमचा परवाना तयार होत नाही आणि या अडचणींची आम्ही सोडवणूक करू शकत नाही, शिवाय अडचण कधी दूर होईल हेही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात एक्झॅक्ट कॉपी ऑनलाइन अर्ज करून घ्या, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी शिक्का मारून प्रत ताब्यात घेतली; पण परवाना कधी मिळेल या प्रश्नाचे ठोस उत्तर देण्यास आरटीओ कार्यालयाने टाळले.

तात्पुरती पावतीही झिजली...

आरटीओ कार्यालयाची पावती असल्याने सुरुवातीला पोलिसांकडून अडवणूक झाली नाही. मात्र, अनेक दिवस परवाना न मिळाल्याने पावती झिजून खराब झाली आणि मधल्या काळात वाहतूक पोलिसांची कडक मोहीम सुरू असताना अडवणूकही झाली. त्यांनी परवान्याचे कारण दिले असता परवाना मिळण्यासाठी इतके दिवस लागतात का? तुम्ही खोटं बोलतात, असे म्हणून दंडही वसूल करण्यात आल्याची कैफियत शेलार यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षण लांबले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचे आरक्षण करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तब्बल तीन तास काथ्याकुट करुनही आरक्षणाचा प्राथामिक आराखडा तयार झाला नाही. आता मंगळवारी पुन्हा या प्रश्नावर बैठक बोलवण्यात आली आहे. त्यानंतर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे हा आरक्षण आराखडा अंत‌मि मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या पाण्याच्या आरक्षणाचा विषय यावर्षी फारसा गंभीर नसला, तरी काही धरणातील पाण्याच्या आरक्षणाबाबत वाद असल्यामुळे त्याबाबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.

या आढावा बैठकीत नाशिक महानगरपालिकेने वर्षभरासाठी चार हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याबाबत या बैठकीत आतापर्यंत उचलले पाणी व लोकसंख्येनुसार लागणारे पाणी याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यानंतर मंगळवारच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील नाक्यासाक्या व चणकापूर धरणाच्या आरक्षणावरही वाद असून, हा प्रश्न कसा सोडावा यावरही चर्चा करण्यात आली. इतर बहुतांश धरणाच्या आरक्षणाबाबत मात्र फारसे वाद नसल्यामुळे त्यावरील आरक्षणाचा अंत‌मि आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे.बैठकीत जलसंपदासह महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते. पाण्याचा विषय नाजुक असल्यामुळे या बैठकीला माध्यमाच्या प्रतिनिधींनाही प्रवेश देण्यात आला नाही. आरक्षणाचा आराखडा मंजूर करण्याचा अधिकार पालकमंत्री यांचा असल्यामुळे या विषयावर प्राथमिक चर्चा आम्ही करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दरवर्षी असते आरक्षण

जिल्ह्यात सर्वच भागांना पाणी मिळावे यासाठी दरवर्षी या पाण्याचे आरक्षण केले जाते. यावर्षी सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरलेली आहेत. त्यामुळे आरक्षण करण्यात फारशी अडचण नाही. त्याचप्रमाणे काही धरणे वगळता इतर धरणावर कोणी अद्यापर्यंत जास्त पाण्याची मागणी केली नाही. त्यामुळे हा आराखड्याला तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मुबलक साठ्यामुळे दिरंगाई

पाण्याचे आरक्षण ३१ जुलैपर्यंत निश्चित केले जाते. १५ ऑक्टोबरपासून हे आरक्षण लागू होते. पण यावेळेस धरणात मुबलक साठा असल्यामुळे ही बैठकही लांबली व हे आरक्षण निश्चित झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरूपम यांच्या पुतळ्याला ‘जोडेमार’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्त नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निरुपम यांच्या होर्डिंगला जोडेमार आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मनसे महिला आघाडीतर्फे त्यांना बांगड्यांचा हार पाठविला आहे. या वेळी पोलिसांनी मनसैनिकांना अटक करून नंतर जाम‌निावर सुटका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या फेरीवाल्यांवरून परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. मुंबईतल्या मनसे निषेधाचे लोन नाशिकमध्ये पोहचले असून, काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या मनसे तसेच राज ठाकरे यांच्याविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी गुरूवारी संजय निरुपम यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या ठक्कर बाजार येथे निरूपम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारण्यात आले. यावेळी विभागप्रमुख अनंता सूर्यवंशी, महिला आघाडीच्या नेत्या हर्षा शिसोदिया यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अंकुश पवार, मनोज घोडके, रामदास दातीर, विक्रम कदम, सचिन भोसले, राम संधान, परशुराम पाटील निखिल सरपोतदार, हर्षा फिरोदिया, कामिनी दोंदे, देवयानी वाघ, आरती खिराडकर आदींसह मोठ्या

संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी अचानक आंदोलन केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर त्यांची जाम‌निावर सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वेच्छानिवृत्तीची महापालिकेत लाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत अधिकाऱ्यांची गळती सुरूच असून, गौतम पगारे, बी. यू. मोरेंपाठोपाठ आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आहे. त्यांच्या अर्जाने अर्जाने खळबळ उडाली असून, पाठोपाठ दोन ते तीन अभियंतेही हाच मार्ग स्वीकारणार असल्याने पालिकेत स्वेच्छानिवृत्तीची लाटच आली आहे. सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून अधिकारी हा मार्ग स्वीकारत असल्याने सत्ताधारी मंडळी तसेच आयुक्तांकडून याबाबत कोणतीही हालचाल केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अस्वस्थतेचे वातावरण आहे. काही पदाधिकाऱ्यांकडून थेट टार्गेट केले जात असल्याने अधिकारी धास्तावले आहेत. भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता पगारे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विधी विभागप्रमुख बी. यू. मोरे यांनीही तोच कित्ता गिरवला आहे. येत्या महासभेवर यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेला येणार आहे. त्यानंतर आता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड यांनीही अर्ज सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना सोमवारपासून रोख ‌मोबदला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून (दि.६) वजन मापानंतर रोख मोबदला मिळणार आहे. गुरुवारी व्यापारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने नोटाबंदी केल्याने उद्भवलेल्या परीस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बँकांमध्ये चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत शासनाने शेतमाल विक्रीची रक्कम धनादेश, RTGS/NEFT द्वारे अदा करणेबाबत बाजार समित्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून बाजार समितीच्या बाजार आवाराम शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर धनादेश, RTGS / NEFT सेवेद्वारे चुकवतीची रक्कम अदा करण्यात येत आहे.

२४ तासांत मिळणार पैसे

शेतकऱ्यांसह व्यावसाय‌किांच्या मागणीचा विचार करून बाजार समितीच्या बाजार आवारांवर शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रोख स्वरूपात मोबदला देण्यासाठी गुरुवारी कांदा बाजार आवारावर कांदा व धान्य विभागातील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत धान्य विभागातील व्यापाऱ्यानी सोमवारपासून भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर २४ तासांच्या आत मालविक्रीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत मर्चन्टस असोशिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, सचिनकुमार ब्रह्मेचा, संदीप दरेकर, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर, कांदा व्यापारी नितीनकुमार जैन, ओमप्रकाश राका, अजित भंडारी उपस्थित होते.

कांद्याबाबत निर्णय

पुढील आठवड्यात

कांद्याची रक्कम रोख स्वरूपात किंवा NEFTेद्वारे करणेसंदर्भात व्यापारी वर्ग बँकांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेणार असल्याची माहिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलिया आली अन् चिमुकल्यांत रमली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देणारा आणि आपल्याला इतरांशी जोडणारा ध्वनीच नसेल तर... ही कल्पना श्रवणशक्ती मजबूत असलेल्या अनेकांना सतावल्याखेरीज राहत नाही. समाजात अशा व्यक्तींची संख्या लक्षणीय असून, ते दररोज जगण्याची लढाई लढतात. अशीच लढाई लढणारी शेकडो कर्णबधिर मुले शुक्रवारी सिनेअभिनेत्री आलिया भट हिच्या भेटीने हरखून गेली होती.

निमित्त होते सेवा ऑटोमोटिव्ह आणि श्रवणयंत्र निर्मिती करणाऱ्या स्टार की कंपनीच्या माध्यमातून आयोजित उपक्रमाचे. आलियाने या चिमुकल्यांसमवेत काही काळ घालवला. या उपक्रमांतर्गत पंधराशे कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचे, तसेच भविष्यात असा रोल मिळाल्यास तो नक्की साकारणार असल्याचे आलियाने यावेळी सांगितले. समाजात कर्णबधिरांची संख्या लक्षणीय असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही आलियाने व्यक्त केले. शर्मिला राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नाशिक, नागपूर येथे पार पडलेल्या चार शिबिरांमध्ये आतापर्यंत साडेआठ हजार कर्णबधिरांना अगदी मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सेवा ऑटोमोटिव्हचे चेअरमन संजीव बाफना, आदित्य बाफना यांनी दिली. यंदा पंधराशे कर्णबधिरांची तपासणी करून यंत्रे वाटप करण्याचा मानस असल्याचे बाफना यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी सुरू झालेल्या शिबिरासाठी स्टारकी कंपनीचे चेअरमन बिल ऑस्टिन, संस्थापक टानी ऑस्टिन यांच्यासह अमेरिकेतील ४० डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे.

--

गरजू मुलांची होते निवड

पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ व ४ तारखेला कर्णबधिर मुलांची तपासणी करून त्यांना श्रवणयंत्रे बसवून देण्यात येणार आहेत. या श्रवणयंत्रांचे बाजारमूल्य १५ हजारांपासून दीड लाखांपर्यंत आहे. गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी दोन महिने अाधीच उत्तर महाराष्ट्रातील सर्व मूकबधिर शाळांमधून गरजू मुलांची तपासणी करून निवड करण्यात येते. त्यानुसार खास श्रवणयंत्रे तयार करून घेतली जातात.

--

या उपक्रमांतर्गत लाभार्थींची संख्या १५ हजारांच्या पुढे जावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तपासणीनंतर ही मुले जेव्हा प्रथमच आवाज ऐकतात, त्यामुळे त्यांना आनंद होतो. मुलांच्या चेहेऱ्यावरील आनंदाचे भाव पाहूनच खूप समाधान मिळते.

-शर्मिला राज ठाकरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन योजनेची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धकाधकीच्या जीवनमानात अनेक व्यक्तींना आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धासाठी तजवीज करता येत नाही. ही बाब ओळखून केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना (एनपीएस) सुरू करण्यासाठी वयोमर्यादा वाढवून ६० वरून ६५वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयमुळे आता वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत पेन्शन योजनेंतर्गत खाते उघडता येणार आहे. त्यामुळे वय वर्षे ६० ते ६५ दरम्यानची कुणीही व्यक्ती ‘एनपीएस’मध्ये खाते उघडून सत्तराव्या वर्षापर्यंत त्याचा लाभ घेऊ शकणार आहे. ‘एनपीएस’मध्ये सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा वाढल्याने आता अतिज्येष्ठ नागरिकांनाही खाते उघडता येणार आहे.

‘एनपीएस’मध्ये रक्कम गुंतविल्यानंतर तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बाहेर पडण्याची मुभा संबंधितांना देण्यात आली आहे. मात्र, तसे करताना गुंतवणूकदाराला एकूण फंडातील रकमेच्या ८० टक्के अॅन्युटी खरेदी करावी लागणार आहे. उर्वरित २० टक्के रक्कम त्याला एकत्रित दिली जाईल. ‘एनपीएस’मधील गुंतवणुकीच्या कालावधीत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास सर्व रक्कम वारसदाराला मिळण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा जरी पेन्शन स्कीममध्ये पैसे टाकले, तरीही त्याचा वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत परतावा मिळणार आहे.

--

अनेकदा काही लोकांना काही कारणास्तव पेन्शन खाते उघडता येत नाही. त्यांच्यासाठी सरकारने चांगली सुविधा दिला आहे. यामुळे अनेकांना उशिरा का होईना खाते उघडता येणार आहे.

-अनंत घोलप, अध्यक्ष, फेस्कॉम

--

सरकारने सुरू केलेली योजना चांगली आहे. परंतु, त्याला कागदपत्रांची जास्त कटकट नको. नाही तर ६५ व्या वर्षी कागदपत्रांच्या कटकटीमुळे पेन्शनही नकोशी होईल.

-जनार्दन मराठे, ज्येष्ठ नागरिक

--

सरकारने फक्त घोषणा केली आहे. या योजनेत सहभागी व्हायचे असेल, तर काय करायला हवे याचा पूर्ण तपशील जनतेसमोर आणावा, तरच ही योजन जास्त लोकाभिमुख होईल.

-पांडुरंग करंजकर, ज्येष्ठ नागरिक

--

अनेक लोक यासाठी उत्सुक आहेत. परंतु, परतावा मिळण्यासाठी पोस्टासारख्या रांगा लावायला नको. नाही तर आपलेच पैसे आपल्याला मिळत नाहीत.

-एकनाथ जाधव, ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासभर व्हॉट्सअॅपची वटवट बंद

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

आजच्या तरुणाईच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे व्हॉट्सअॅप अचानक एक तास बंद झाल्यामुळे काही जण चिंतेत, तर काही निवांत झाल्याचे पाहायला मिळाले. अचानकपणे दुपारी व्हॉट्सअॅप बंद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काही तरुणांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर दिवसभर मात्र या बंदची खुमासदार सोशल चर्चा सुरू होती.

अचानक व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे त्याचे पडसाद इतर सोशल साइटवर उमटले आहेत. व्हॉट्सअॅप सतत सुरू असल्यामुळे दरवेळी मेसेज चेक करणे त्रासदायक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तासभर व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे अनेकांनी या काळात अन्य सोशल साइट्सचा आधार घेतल्याचे दिसून आले, तसेच व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे काही जणांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे काही महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी बहुतांश जणांनी अन्य सोशल मीडिया अथवा अन्य अॅप्लिकेशनचा वापर केल्याचे दिसून आले आहे. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे एक तास शांततेत गेल्याचे मत अनेक जणांनी फेसबुक व अन्य सोशल साइटवर व्यक्त केले आहे.

आज दुपारपासून व्हॉट्सअॅपवरील कुठल्याच ग्रुपवर मेसेज जात नव्हते, तसेच पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीला मिळत नव्हता. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे हे होत असल्याचे आधी कोणालाच समजले नाही. इंटरनेट सेवा बंद असावी किंवा आपल्या मोबाइलमध्ये काही बिघाड झाला असावा, असे गृहीत धरून अनेकांनी आपले फोन बंद ठेवले. मात्र, इतर सर्व सुरळीत असूनही मेसेज येत नसल्याचे समजल्यानंतर ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून पडताळणी सुरू झाली. काही वेळानंतर #whatsapp down असा हॅशटॅग ट्विटरवर सुरू झाल्यावर खरोखरच व्हॉट्सअॅप बंद असल्याचे निश्चित झाल्यावर अनेकांनी इतर सोशल साइटना पसंती दिल्याचे दिसून आले. यामुळे यूजर्सची मोठ्या प्रमाणात घालमेल झाल्याचे दिसून आले. अखेरीस तासाभरानंतर मेसेज येऊ लागले.

इतर अॅपचा वापर

दुपारी एक तास व्हॉट्सअॅप बंद असल्यामुळे एक तास शांततेत गेला. व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, की प्रत्येकाला तो लगेच पाहण्याची सवय असते. मात्र, आज दुपारी व्हॉट्सअॅप बंद असल्यामुळे दिवसभरातील एक तास शांततेत गेल्याचे समाधान मिळाले. मात्र, कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर अॅप्लिकेशनचा वापर केला.
- प्रणव मंडलिक, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>