Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

माहेश्वरी समाजबांधवांचा तहसीलवर मूक मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील धुळे यासह राज्यातील अनेक ठिकाणी माहेश्वरी समाजातील कुटुंबांना दरोडा, खंडणी, हत्या व प्राणघातक हल्ला अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. या घटनांमुळे मुळचा शांतताप्रिय व व्यापारी असलेल्या माहेश्वरी (मारवाडी) समाजामध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे. याकडे लक्ष वेधत समाजाला न्याय देण्यासाठी घटनेचे गुन्हे हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी येवला तालुक्यातील माहेश्वरी समाज संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील समाज बांधवांनी येवला तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून तहसीलदारांना एक निवेदन सादर केले. मागील काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील व्यापारी कैलास जाजू व परिवाराच्या घरावर दरोडा टाकून त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे असलेल्या माहेश्वरी बजाज कुटुंबाकडून खंडणीची मागणी केली गेली आहे तर जालन्यातील अंबड येथील गगराणी परिवारातील तरुणाची हत्या केली गेली. हिंगोली येथील तोष्णीवाल कुटुंबावरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला, याकडे या निवेदनाद्वारे माहेश्वरी समाजबांधवांनी लक्ष वेधले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे घटना घडू नये यासाठी उपाययोजना कराव्या, असे आवाहनदेखील या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या वेळी येवला तालुका माहेश्वरी समाज संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, दिनेश मुंदडा, नितीन काबरा, नंदकिशोर आट्टल, मनीष काबरा, पुरुषोत्तम काबरा, पुरुषोत्तम राठी, निशांत सोनी, अजय सोमाणी आदींसह शहर व तालुक्यातील माहेश्वरी समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीच्या दाखल्याचे डिजिटायजेशन

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जातीचा दाखला काढण्यासाठी ऑनलाइन प्रक्र‌िया सुरू झाली असून, यातील त्रुटींचा फटका अर्जदारांना बसू लागला आहे. अर्ज का फेटाळून लावला याची कारणे अर्जदारांना सांगणे आवश्यक असतानाही, ती सांगितली जात नसल्याने अप‌िल करण्याचा अर्जदारांचा हक्कही हिरावला गेला आहे.

एखाद्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे असो किंवा नोकरी मिळविणे या प्रत्येक ठिकाणी जातीचा दाखल्याबाबत विचारणा केली जाते. हा दाखला संबंधित व्यक्ती सादर करू शकली नाही तर त्यांना सरकारी सवलतींपासून वंच‌ित राहावे लागते. त्यामुळेच जातीचा दाखला काढण्यास नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. पूर्वी सेतू किंवा महा ऑनलाइनकडे अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे दिल्यानंतर विहीत मुदतीत दाखला मिळत असे. परंतु, गेल्या दीड महिन्यापासून हा दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो आहे. अर्ज सादर करतानाच सोबत वडिलांचा किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचा जातीचा दाखला, ओळखपत्र (मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड), पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र २) आदी कागपत्रेही सादर करणे आवश्यक असते. ऑनलाइन पद्धतीनेच ही कागदपत्रे सादर केल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू होते. अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता झाली असेल तर संबंधितांना साधारणत: महिनाभराच्या मुदतीमध्ये जातीचा दाखला प्राप्त होतो. परंतु, त्यानंतरही तो प्राप्त झाला नाही तर विचारणा कोणाकडे करायची असा प्रश्न आता नागरिकांना सतावू लागला आहे. महाईसेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली जाते. परंतु, कार्यवाही पूर्ण झाली की तुम्हाला मेसेज किंवा मेलद्वारे कळविले जाईल असे त्यांना सांगण्यात येते.

अर्ज रद्द केल्याचे मेसेज

त्रुटींमूळ अर्ज रद्द ठरविल्याचे मेसेज नागरिकांना प्राप्त होत असून, त्याबाबत कोणतीही कारणमीमांसा केली जात नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. कोणत्या कारणास्तव अर्ज बाद ठरविण्यात आला, याची माहितीच मिळत नसल्याने अपील कोणाकडे आणि किती दिवसांत करावे, हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो. याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही विचारणा होऊ लागली असून, त्यांच्याकडेही समाधानकारक उत्तर नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच पडत आहे. नागरिकांच्या या समस्येबाबत मंत्रालयात कळविले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पीक फॉर इंडिया’साठी आज होणार स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोवतालच्या विविध विषयांवर वक्तृत्वाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी कॉलेज विद्यार्थ्यांना देणाऱ्या ‘स्पीक फॉर इंडिया’ या उपक्रमाच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या पर्वास आज, सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. राणेनगर येथील अशोका बिझनेस स्कूल येथे हा उपक्रम होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या उपक्रमास सुरुवात होईल.

वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची आस बाळगणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ‘स्पीक फॉर इंडिया’ हे व्यासपीठ आहे. ‘फेडरल बँक’, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांनी राज्यातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वास राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

या स्पर्धेत विविध स्तरांवर सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धकांना मराठी, हिंदी वा इंग्रजी अशी कुठलीही भाषा निवडण्याची मुभा आहे. अंतिम विजेत्याला एक लाख रुपये रोख बक्षीस व उच्च शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. अंतिम विजेत्या विद्यार्थ्याच्या कॉलेजला ५० हजार रुपये रोख बक्षीस मिळेल. उपविजेत्या स्पर्धकास एक लाख रुपये रोख बक्षीस व त्याच्या कॉलेजला ५० हजार रुपये रोख मिळतील. अंतिम फेरीतील प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक बक्षीस मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूचकांसाठी उमेदवारांची धावपळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

मतदार राजाच्या अगोदर सुचक राजाची मनधरणी होत असते. त्यामुळे त्रिंबक नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकाच्या उमेदवारास नोंदणीकृत राजकीय पक्षाची उमेदवारी असेल तर सूचक म्हणून केवळ एक मतदार सूचक तर अपक्ष उमेदवाराला ५ सूचक गरजेचे आहेत. त्यात उमेदवाराची कोणतीही थकबाकी नको. आता मतदार सूचकही थकबाकीदार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे मतदार सूचक मिळवण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे.

जसजशी त्र्यंब‌केश्वर नगरपालिका निवडणूक जवळ येत आहे, तशी उमेदवारांची धावपळ सुरू झालेली आहे. आता उमेदवारी अर्जाच्या सूचकसाठी इच्छुक धावपळ करीत आहेत. उमेदवारी करणाऱ्यांना किमान ५ मतदारांची अनुमती असणे संयुक्तिक आहे. उमेदवार हे थकीत सर्व कर भरून अर्ज भरण्याच्या तयारीत असताना सुचकांचीदेखील थकबाकी नको, अशी चर्चा रंगल्याने सूचक मिळविताना धावपळ होत आहे. एक उमेदवार फॉर्म उडेल म्हणून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करण्याची तयारी करीत आहेत. एकाच उमेदवाराचे चार अर्ज दाखल करत असतांना साहजीकच २० सूचक आवश्यक ठरत आहेत. त्यात एकच व्यक्ती दोन अर्जांवर सूचक नको असेदेखील जाणकार सांगत असल्याने सुचकांची मनधरणी होत आहे. सूचक हा थकबाकीदार नसावा असा काही नियम नाही तथापि नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी याबाबत बोलत नाहीत.

करवसुली जोरात

एकीकडे सूचक थकबाकीदार नसल्याची चर्चा रंगल्याने त्र्यंबकेश्वरला करवसुली जोमाने होत आहे. गेल्या दोनच दिवसात किमान २५ लाखांची वसुली झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. काही उमेदवार स्व:तची घरपट्टी भरत असताना सूचक मतदाराचीदेखील भरण्यासाठी पुढे सरसावत आहेत. यामागे सूचक मिळवितानाच मतदानदेखील पक्के झाले, अशी भावना असल्याचे लक्षात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवाळली गोदामाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे गोदाघाटावर भाविकांकडून देवदिवाळी साजरी होत असताना पाण्याअभावी गोदेचे अस्वच्छ पात्र उघडे पडल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. गोदाघाट आणि येथील विविध कुंडांची स्वच्छता अपरिहार्य बाब असली, तरी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रविवारी गोदाघाट परिसरात मोठ्या संख्येने आलेल्या देशभरातील पर्यटकांसमोर नाशिकची शोभा झाली.

दक्षिणेकडील गंगा अशी ओळख असलेली गोदावरी नाशिकचे वैभव आहे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेल्या या नगरीत पर्यटक आणि भाविकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करू शकतील आणि त्यांना पुन्हा-पुन्हा या नगरीत यावेसे वाटेल, असे पर्यटन स्थळांचे दर्शन घडायला हवे. परंतु, दुर्दैवाने गोदाघाटावर याउलट परिस्थ‌िती पहावयास मिळते. प्रदूषणमुक्तीसाठी गोदावरी वाहती राहणे आवश्यक असले तरी गेल्या काही दिवसांपासून गोदेला पाणीच सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे गोदाघाट परिसरातील गौरी पटांगण, खंडेराव मंदिर तसेच मोदकेश्वर मंद‌िर परिसर, गाडगे महाराज पुलालगतच्या गोदापात्रातील अस्वच्छता ठळकपणे दिसू लागली आहे. रविवारी देव दिवाळीनिमित्त गोदाघाटावर कार्यक्रम होते. तसेच सुटीमुळे पर्यटकांची गर्दीही अधिक होती. त्यामुळे खरेतर शनिवारीच गोदापात्राची स्वच्छता होणे गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्याने भाविकांना आणि पर्यटकांना अस्वच्छतेने वेढलेल्या गोदापात्राचे दर्शन घडले. तसेच गोदाघाट परिसरातील दुर्गंधीचा सामना सर्वांनाच करावा लागला.

निकालाकडे लक्ष

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार नदीमधील बीओडी लेव्हल ५ पेक्षा कमी असायला हवी. परंतु, गोदावरीची बीओडी लेवल २० हून अधिक आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित नदी असून, प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. परंतु, या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. गोदावरी व तिच्या उपनद्या कायम अविरल, निर्मल, प्रदूषणमुक्त, अतिक्रमणमुक्त व्हाव्यात म्हणून हायकोर्टात याचिका दाखल आहे. या याचिकेवर सुनावणीची प्रक्रीया सुरू असून शुक्रवारी ( दि. १७ नोव्हेंबर) युक्त‌िवाद झाला. कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असले तरी निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले असून गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी ठोस उपाययोजना होतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाभिक समाजाकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ येथील नाभिक समाजबांधव व शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. या मोर्चानंतर तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन सोपविण्यात आले. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण व कार्यकर्त्यांनीही मोर्चात सहभागी होत नाभिक समाजाच्या भावनांचे समर्थन केले. नाभिक समाज बांधवांकडून एक दिवसाचा बंदही पाळण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील पाटस येथे भिमा सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभाप्रसगी बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्हावी समाजाविषयी भावना दुखावणारे वक्तव्य केले, असा आरोप करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून शहरातील नाभिक समाजबांधव व शिवसेनेकडून सिग्नल पॉइंट ते तहसील कचेरीपर्यंत मोर्चा काढून तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, नंदकिशोर बाविस्कर, संतोष राजपूत, दिलीप घोरपडे, रवींद्र चौधरी, हिरामण सैंदाणे, शिवाजी बहाळकर, किरण नेरपगार, पवन सैंदाणे, शुभम राठोड आदी शिवसैनिक उपस्थित होते. त्यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

धुळ्यात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल रविवारी (दि. १९) नाभिक समाजाने त्यांचा निषेध केला. तसेच त्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन शहरातील देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकात करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी दिनेश महाले, उमेश महाले, चेतन चित्ते, संदीप भदाणे, राजेंद्र जाधव, किशोर वाघ, मनोज सैंदाणे, धनराज पगारे, राहूल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून मुलीस मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकट्या मुली असल्याची संधी साधत एकाने घरात शिरकाव करून दोघींपैकी एकीला मारहाण केल्याची घटना अंबड परिसरातील उत्तमनगर येथील शुभम पार्कच्या एका इमारतीत घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सुरेश जगन्नाथ गुरव उर्फ सोनवणे या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी आणि पीडीत मुलगी शेजारीच राहतात.

या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या दोन घरात होत्या. यावेळी संशयित आरोपीने घरात घुसून दरवाजाची कडी आतून लावून घेतली. तसेच दोघींपैकी एका मुलीच्या अंगावर धावून जात हाताच्या चापटीने मारहाण केली. यावेळी या मुलीने मोठ्याने आरडाओरड सुरू केला. या दरम्यान दुसऱ्या बहिणीने दरवाजाची कडी उघडली. शेजारील लोक जमा झाल्याने संशयित आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली. अंबड पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निमसे करीत आहे.

मोबाइल चोरी
मोबाइल चोरी झाल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोबाईल चोरीबाबत दीपक प्रभातसिंग ललोत्रा (२५, रा. ओमशांती, गीता क्लासेस, जयभवानीरोड) याने फिर्याद दिली आहे. मोबाइल चोरीची घटना १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास आनंदनगर, मुक्तीधामच्या पाठीमागे घडली. दीपकला वडिलांचा फोन आल्यानंतर दोघांचे बोलणे झाले. यानंतर त्याने मोबाइल पॅन्टच्या खिशात ठेवला. मात्र, थोड्यावेळाने त्यास मोबाइल सापडला नाही. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पी. बी. गोसावी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचआयव्हीपीडितांना सर्वतोपरी सहकार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचआयव्हीपीडितांसाठी अनेक सरकारी योजना आहेत. परंतु, या योजनांचा लाभ मिळविताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या योजनांचा त्यांना सहजगत्या लाभ मिळावा, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही मालेगावचे प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिली.

महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड आणि यश फाउंडेशन यांच्यातर्फे मालेगाव आणि गंगापूर रोड येथील महिंद्रा जीप हाउस येथे एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालकांसमवेत नुकताच बाल‌दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी मालेगावातील कार्यक्रमात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे प्रांताधिकारी अजय मोरे, मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिभुवन, महिंद्रा आणि महिंद्राचे कमलाकर घोंगडे आणि चेतन दत्तानी, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोरंजक खेळांची मजा
मेळाव्यात विविध खेळांच्या माध्यमातून बाळ-गोपाळांनी मनसोक्त आनंद लुटला. २०० बाळ-गोपाळांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, मिठाई, कपडे व सकस आहाराचे वाटप करण्यात आले. संस्थेने सदर उपक्रम राबविताना विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील ४२० बालक व पालकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील येवला शहराजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ युवकाने शुक्रवारी (दि. १७) साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

दिनेश निंबाजीराव शितोळे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो मूळचा तळेगाव (ता. चाळीसगाव) येथे राहणारा आहे. तो सध्या तालुक्यातील उंदिरवाडी येथील नातेवाइकांकडे वास्तव्यास असून येवला येथील एका सराफी दुकानात नोकरीस होता. दिनेश शुक्रवारी रोजच्या वेळेत कामावर आला. त्याने दुपारी ३ वाजता दुकानातील सहकाऱ्याकडे आपल्याजवळील मोबाइल फोन, एटीएम कार्ड देत वडिलांची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून नाराज अवस्थेत निघून गेला. औरंगाबाद महामार्गावरील उड्डाणापुलाजवळ असलेल्या रेल्वेमार्गावरील बेंगळुरू-दिल्ली एक्सप्रेस समोर उभा राहून सायंकाळी त्याने आत्महत्या केली. या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाने येवला शहर पोलिसांना कळविले. त्यानुसार येवला शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. दिनेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहे. दरम्यान, शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारी दिनेशचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावर उंदिरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅन इन्सिग्निफिकंट मॅन’चे आज स्क्रिनिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील ‘अॅन इन्सिग्निफिकंट मॅन’ ही डॉक्युमेंट्री फिल्मचे स्पेशल स्क्रिनिंग आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजता कॉलेज रोडवरील सिनेमॅक्स येथे ठेवण्यात आले आहे.

चित्रपट बघण्यासाठी शहरातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पक्षाने आमंत्रणही दिले आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि ‘आप’चे नेते धनजंय शिंदे यांच्या सोबत पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा हा चित्रपट बघणार आहेत. राजकीय पक्षाचे आमंत्रण देतांना मात्र भाजप व काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना टाळण्यात आले आहे.

चित्रपटात केजरीवाल यांच्या समाजकारणापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास उलगडवून दाखविण्यात आला आहे. या डॉक्युमेंट्री फिल्मवर बंदी आणावी, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ती नामंजूर झाल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या डॉक्युमेंट्री फिल्‍मची निर्मिती विनय शुक्‍ला व खुशबू राका यांनी केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘आप’वरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि केजरीवाल यांच्यावर झालेली शाईफेक आदी गोष्टी दाखविण्यात आल्या असून योगेंद्र यादव यांच्यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपट बघण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘आप’चे मध्य विभागाचे अध्यक्ष जितेंद्र भावे, जगबिरसिंग, अभिजीत गोसावी, विकास पाटील, विनायक येवले, प्रभाकर वायचळे यांनी केले आहे.

दुपारी मेळावा
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि आप नेते धनजंय शिंदे यांच्यासोबत नाशिकरोड येथील नेहरुनगर जवळील सेंट झेवियर्स हायस्कूलजवळ भावे प्लास्टो येथे विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा दुपारी अडीच वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुधीर सावंत हे मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर सायंकाळी सावंत यांचे सार्वजनिक वाचनालय येथे व्याख्यान होणार आहे.

‘अॅन इन्सिग्निफिकंट मॅन’ ही डॉक्युमेंट्री फिल्म नाशिकमध्ये ‘आप’तर्फे शहरातील सामाजिक व राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दाखवण्यात येणार आहे. भाजप व काँग्रेस आघाडीचे नेते वगळून सर्वांना आमंत्रण दिले आहे.
- जितेंद्र भावे, अध्यक्ष, आप, मध्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी हद्दीलगत बांधकामास संधी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लष्करी हद्दीजवळील बांधकाम करण्यास नाशिकला कोणतेही निर्बंध लागू नसल्याची बाब राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने पाठवलेल्या पत्राने समोर आली असली तरी त्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब यांनी पाठवलेल्या पत्रानंतर ‘नगरविकास’ने एक पत्र महापालिका आयुक्तांना पाठवले. त्यात दोन परिपत्रक सोडून सर्व परिपत्रक रद्द केल्याचे म्हटले आहे. लागू असलेल्या पत्रकात एक केंद्र सरकार व दुसरे राज्य सरकारचे ७ नोव्हेंबर २०१६ चे परिपत्रकाच्या सुचनेनुसार बांधकाम परवानगी देण्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या पत्रकात केंद्राच्या परिपत्रकाचा संदर्भ घेऊन निर्बंध ठेवण्यात आलेल्या गावांचा उल्लेख केला असून त्यात नाशिकचे नावच नाही.

या पत्रावर बांधकाम व्यावसायिकांमध्ये अद्याप संभ्रम असला तरी हे परिपत्रकाने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे हा निर्णय वर्षभरापूर्वी झालेला असताना त्याबाबत महापालिका व लष्कराचे अधिकारी अनभिज्ञ कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत महापालिका आणि लष्करी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत होते. पण नगर विकास खात्याने पाठवलेल्या पत्रात या परिपत्रकाची आठवण पुन्हा करून देण्यात आलेली आहे. निर्बंध नसताना ‘ना हरकत दाखला’ (एनओसी) घेण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांकडे महापालिका का पाठवित होती? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिका आयुक्त आणि संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच चर्चा करून हा प्रश्न सोडवणे आवश्यक असताना वर्षभर त्याची दखल का घेण्यात आली नाही, असा प्रश्न आता मिळकतदारांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून लष्करी हद्दी परिसरातील नागरिकांना संरक्षण खात्याकडून बांधकाम करू दिले जात नाही. त्यामुळे या भागात असंतोष आहे. महापालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांकडून ‘एनओसी’ आणण्यास सांगितले जाते. या प्रकरणात शिवसेनेचे नेत अॅड. शिवाजी शहाणे यांनी कोर्टात याचिका दाखल केली, त्यावरही निर्णय बाकी आहे. विशेष म्हणजे सरकारचे हा निर्णयाचे परिपत्रक सरंक्षण विभागाच्या दिल्ली, मुंबई व इतर प्रमुख कार्यालयात पाठवले गेले आहे. तरी पण हा संभ्रम का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांचा आठमुठेपणा

लष्करी हद्दीजवळील बांधकामाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांकडे महापालिका व लष्कर अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात या गोष्टी व पत्रकही दाखवण्यात आले. पण, लष्कर अधिकारी आठमुठेपणा करून बांधकामाला हरकत घेत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात.

लष्करी हद्दीतला हा प्रश्न सुटावा यासाठी मुख्यमंत्री, नगरविकास खात्याचे अधिकारी यांच्या भेटी घेतल्या. या प्रश्नी बैठका झाल्या. त्यानंतर ‘नगर विकास’ने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले. यात दोन परिपत्रक सोडून सर्व परिपत्रक व सूचना रद्द केल्याचे म्हटले आहे.
- बाळासाहेब सानप, आमदार, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कृषी शिक्षण घेणाऱ्या व या क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव कृषिथॉनमध्ये केला जाणार आहे. विविध कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या कृषी विस्तार व संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील विद्यार्थ्यास ‘गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कृषीथॉन प्रदर्शनामध्ये मुख्य सभागृहात रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हा समारंभ होईल. यावेळी राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर, प्राचार्य सुनील वानखेडे, प्रा. किरण यादव यांसह कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यांचा होणार गौरव
प्रवीण घुले (येवला), अनुराधा वाव्हळे, प्रशांत जगताप, संदीप कोकाटे, शुभम गव्हाणे, सौरभ पगार, सुजित वाबळे, गणेश शेलार, सुनील गायकवाड (नाशिक), रविजा पिंगळे (राहुरी), अक्षय फरतडे (जळगाव), ओंकार पंढरीनाथ साठे (लोणी) दत्तात्रय संकपाळ (धुळे), मनोहर मोहिते (नंदुरबार), सौरभ सोनवणे (अमळनेर) रुपाली चांदगुडे (अहमदनगर), आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्तची कामे मार्चपर्यंत पूर्ण कराच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
बागलाणमधील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अस्तित्वातील कामांचा व गाळ काढण्यासंदर्भातील कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, मार्च २०१८ अखेर कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण झाली पाहिजे. यातून संबंधित गावांमधील पाणीपातळी वाढून शेतीसिंचनाचा लाभ ग्रामस्थ व परिसरातील रहिवाशांना मिळावा, या सूचना तालुकास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीच्या अध्यक्षा व बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिल्या.

येथील पंचायत समिती सभागृहात बागलाण विधानसभा मतदार संघातील जलयुक्त शिवार अभियान संदर्भात तालुका स्तरीय समिती अध्यक्षा व आमदार दीपीका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, प्रातांधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार सुनील सैंदाणे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी डी. के. कापडणीस, वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील उपस्थित होते.

बागलाण मतदार संघातील आखतवाडे, आनंदपूर, आव्हाटी, बाभुळणे, बिजोरसे, ब्राह्मणपाडे, ढोलबारे, ब्राह्मणगाव, गोराणे, जुने निरपूर, श्रीपुरवडे, खिरमाणी, कोटबेल, महड, तरसाळी, वाठोडा, नामपूर, साल्हेर, मोहळांगी या गावांचा समावेश २०१७-१८ या वर्षातील जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला. या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या संबंधित गावांच्या जलयुक्त शिवार अभियानात सुमारे ९४५ हेक्टर क्षेत्रातील कामांसाठी सुमारे ९९०.५१ लक्ष रुपयांच्या कामांची तरतूद करण्यात आली आहे. सदरचे कामे मार्च अखेरीस पूर्ण झाल्यास येत्या पावसाळ्यात तालुक्यातील बहुतांश क्षेत्र हे ओलिताखाली येऊन परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ शकेल. यामुळे सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल.

गेल्या वर्षी तालुक्यातील सुमारे २४ गांवाचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करून कामे मार्गी लागली. परिणामी नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात कमी अधिक झालेल्य पावसाने निश्चितपणे चित्र पालटण्यास मदत झाल्याचे आमदार चव्हाण यांनी बैठकीत स्पष्ट केले. याच धर्तीवर मार्च अखेर उपरोक्त कामे पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बैठकीस कृषी, लघुसिंचन, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे, भूजल, ग्रामपंचाय, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केजीएस’चा बॉयलर पेटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील पिंपळगांव निपाणी येथील के. जी. एस. साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याच्या कार्यस्थळावर रविवारी पार पडला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस असूनही तालुक्यातील निसाका व रासाका हे दोन्ही कारखाने बंद असल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, ‘केजीएस’ सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कैलास डेर्ले, रमेश शिंदे, ज्ञानेश्वर खाडे यांनी सपत्नीक सकाळी ११ वाजता बॉयलर अग्निपूजन केले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड म्हणाले, की अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा कारखाना यंदा अधिकाधिक उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे. शेतकऱ्यांनी ‘केजीएस’ला उसाचा पुरवठा करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष बोडके, कारखान्याचे संचालक गणेश कराड, मंजुषा बोडके, देवाशिष मंडल, रतन पाटील वडघुले, सदाशिव सांगळे, भिकाभाऊ सानप, देविदास खाडे, वसंत नाईक, यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या कार्यस्थळावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली होती. यात ऊस उत्पादक शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन हा कारखाना लवकर चालू करावा, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने तातडीने कारखाना सुरू करण्याबाबत कार्यवाही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारात वाढली फळांची रेलचेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाजारात फळांची आवक वाढू लागल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सफरचंदपासून पपईपर्यंत सर्वच फळ बाजारात उपलब्‍ध असून, दरही थोडे कमी झाले आहेत. यामुळे फळांनाही चांगली मागणी आहे.

नोव्हेंबरपासून साधारणतः फळांची आवक वाढण्यास सुरुवात होते. अर्ली द्राक्षही बाजारात आले आहेत. पपई, बोर, सीताफळ, चिक्कू या फळांची बाजारात रेलचेल वाढली आहे. सफरचंदचे दरही थोडे कमी झाले असून, ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सीताफळांची बाजारात आवक मोठ्या प्रमाणात असून, दर ४० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. बोरही बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यात गोडवा कमी असल्याने मागणी कमी असल्याने दरही कमी आहेत. बोर २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहेत.

अर्ली द्राक्ष बाजारात दाखल झाले असले तरी निर्यातीवर जास्त भर दिला जात आहे. स्‍थानिक बाजारपेठेत द्राक्ष उपलब्‍ध असले तरी दर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहेत. किलोला द्राक्षाला दोनशे रुपये दर मिळत आहे. डिसेंबर म‌हिन्यात द्राक्षांची आवक वाढून स्‍थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होतील. केळी, किवी या बारमाही फळांचे दर कायम आहेत. बाजारात टरबूचेही आगमन झाले आहे. परंतु, आवक खूपच कमी आहे. पेरूचीही आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पेरु ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. येत्या काही दिवसात आवक वाढून दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

फळांचे किलोचे दर
सफरचंद - ८० ते १२०
चिक्कू - ६०
पपई - ३०
केळी - ३०
पेरू - ६० ते ८०
बोर - २० ते २५
किवी - ४० रुपये नग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरव्यागार पालेभाज्यांचा बहर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

थंडीचा मोसम सुरू झाला आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे. बाजार समितीचे आवार रोजच सायंकाळच्या लिलावासाठी तुडूंब भरू लागले आहे. हिरव्यागार कोवळ्या पालेभाज्यांनी मार्केटला बहर आला आहे.

गेल्या तीन महिन्यात विक्रमी दर मिळविणाऱ्या पालेभाज्यांचे दर सध्या खाली येऊ लागले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे कमी झालेली लागवड आणि त्यानंतर पावसाळ्यात खरिप हंगामात जोरदार पावसांच्या सरींमुळे पालेभाज्यांचे उत्पादन घटले होते. मागणी वाढत असल्याने पालेभाज्यांचा विशेषतः गावठी कोथिंबीरच्या दरांनी उच्चांक गाठला होता.

थंडी सुरू झाल्यानंतर भाजीपाला पिकांना पोषक हवामान मिळत असल्याने त्यांचा वाढ चांगली होते. भाजीपाल्यावर रोग-कीडींचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात होतो. त्यामुळे या काळात बुरशीनाशके व किडनाशके यांच्या फवारण्या फारच कमी प्रमाणात केल्या जातात. पालेभाज्यांना हिवाळ्यात चांगला बहर येतो. मेथीसारखी पालेभाजी हिवाळ्यात पोषक मानली जाते. या काळात मेथी चांगली बहरते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातील वातावरण मानवत नसल्याने मेथीची आवक कमी होत असते. ती हिवाळ्यात वाढते; सध्या कोथिंबीरीपेक्षाही मेथीची आवक जास्त होत आहे. कोथिंबीरीचे दर यंदा वर्षी उन्हाळा तसेच पावसाळ्यात वाढतच राहिले होते. ते आता कमी झाले आहे. हिवाळ्यात पडणाऱ्या दवामुळे शेपू पिवळी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी सकाळी दव झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कांदापातीचा दर्जा उत्तम असल्याचे ग्राहकांचे मत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव होतात. सध्या सुमारे दोन ते अडीच लाख पालेभाज्यांच्या जुड्या विक्रीस येत आहेत. आवक वाढलेली असल्याने पालेभाज्यांसाठी मार्केटचे आवार कमी पडू लागली आहे. पालेभाज्या लिलावासाठी उघड्या ठेवण्यासाठी मोकळी जागा व्हावी, यासाठी वाहनांची पार्किंग बाजारापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही हिवाळ्यात पालेभाज्यांची आवक टिकून राहणार असल्याचे दिसते. नाशिकच्या पालेभाज्यांचा दर्जा चांगला असल्याने मुंबई आणि गुजरात दोन्ही ठिकाणच्या मार्केटमध्ये त्यांना चांगली मागणी असते. आवक वाढलेली असली तरी दर चांगले मिळत आहेत.
- चंद्रकांत निकम, अडतदार

पालेभाज्या ...................दर (प्रति किलोत)
कोथिंबीर (गावठी)...........१५ ते २५
कोथिंबीर (छानी).............१० ते १५
मेथी...............................५ ते १५
शेपू................................१० ते १८
कांदापात.........................१० ते २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेटसाठी ४० टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्यांदाच झालेल्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी नाशिकसह नगर आणि पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर एकत्रितपणे सुमारे ४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती विविध उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मिळाली.

विद्यापीठ प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत आकडेवारी मिळू शकली नाही. या मतदानात तीनही जिल्ह्यांमध्ये नाशिकमधून सर्वाधिक प्रतिसाद मतदारांकडून मिळाला आहे. तर पुण्यातही मतदानाचा टक्का यंदाच्या निवडणूकीत वाढला आहे.

सिनेटवरील १० जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांनी क्षमता पणाला लावली. तीनही जिल्ह्यातून सुमारे ४९ हजार मतदारांनी नोंदणी केली होती. पैकी सुमारे २१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहर आणि जिल्ह्यातही २१ केंद्रांवर मतदान झाले. मतदानास रविवारी सकाळी ७ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. मतदानासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. आता उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.

नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणुकीत नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे १० हजारांवर मतदार नाशिक जिल्ह्यातून होते. पैकी सुमारे साडेचार ते पाच हजार मतदान एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाल्याचा अंदाज आहे. या पाठोपाठ पुण्यातील मतदानाची आकडेवारी गत सिनेट निवडणुकांच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वेळी सिनेटसाठी पुणे जिल्ह्यात अवघे १५ टक्के मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत नोंदविले जाण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्याचा प्रतिसाद आहे.

जिल्ह्यातून ५ हजारावर मतदान

जिल्ह्यात सुमारे १० हजार मतदार आहेत. पैकी या मतदानासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एका केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. शहरासाठी ६ केंद्र देण्यात आली होती. यामध्ये भोसला कॉलेज (गंगापूररोड), के. के. वाघ कॉलेज (पंचवटी), व्ही. एन. नाईक कॉलेज (कॅनडा कॉर्नर), बिटको कॉलेज (नाशिक), एचपीटी कॉलेज (कॉलेजरोड) आणि शांताराम बापू वावरे कॉलेज (सिडको) या केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली.

व्यवस्थापन गटातून ९९ टक्के मतदान

व्यवस्थापन गटातून संस्थाचालकांचे एकूण २२९ मतदान होते. पैकी २२७ मतदान झाले आहे. ही आकडेवारी सुमारे ९९ टक्क्यांच्या घरात आहे. पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि या विद्यापीठाशी संलग्न कॉलेजेसची संख्या नाशिक जिल्ह्यातून लक्षणीय आहे. त्यानुसार या जिल्ह्याला अधिसभेत योग्य प्रतिनिधित्वाची गरज आहे. त्यादृष्टीने या निवडणुकीपासून नाशिककर आशा बाळगून आहेत. या निवडणुकीसाठी नाशिकमधून व्यवस्थापन गटातून अशोक सावंत हे रिंगणात आहेत. पदवीधर सदस्य पदासाठी एकता पॅनलच्या वतीने ‘मविप्र’चे डॉ. तानाजी वाघ, राखीव गटातून ‘मविप्र’च्या तीसगांव शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी, व्ही. एन. नाईक संस्थेचे विजय सोनवणे तर प्रगती पॅनलच्या वतीने हेमंत दिघोळे हे रिंगणात आहेत. जयकर ग्रुप प्रणित विद्यापीठ विकास मंडळातर्फे अॅड. बाकेराव बस्ते हे उमेदवार नाशिकचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नृत्यानुष्ठान’ने फेडले डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नृत्यानुष्ठानाचे तिसरे पुष्प तन्वी पालव आणि भक्ती देशपांडे या कथक नृत्यांगनांनी गुंफले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला.

शहरातील कीर्ती कला मंदिर या कथक नृत्य संस्थेच्या दरवर्षी होत असलेल्या पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाने यंदा २५ वे वर्ष साजरे केले. त्यानिमित्ताने संचालिका रेखा नाडगौडा यांनी नृत्यानुष्ठान म्हणून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी २५ गुरूंच्या २५ शिष्यांची नृत्यप्रस्तुती नाशिकच्या रसिकांसाठी झाली. यात तिसरे नृत्य प्रस्तुत झाले.

प्रथम प्रस्तुती गुरू लता वाकलकर यांच्या शिष्या तन्वी पालव यांची होती. त्यांनी दुर्गास्तुतीने नृत्याचा प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा रुद्र ताल, परंपरेनुसार थाट, आमद, परण, चक्रदार, परण, रेला सादर केले. अभिनयात पारंपरित ठुमरी तन्वी पालव यांनी पेश केली. ‘ए री सखी मोरे पिया घर आये’ या ठुमरीवर त्यांनी नृत्य सादर केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुरू विद्याहरी देशापांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी नृत्य सादर केले. गणेश परणने त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा ४ ताल की सवारी सादर केला. अभिनयात गिरिजादेवींची चैती ‘यँही थैय्या मोतिया हैरा गयी’ सादर केली. त्यानंतर तीन तालमध्ये होरी सादर केली.

कार्यक्रमासाठी तबल्यावर विवेक मिश्रा, गायन व संवादिनीवर रसिका जानोरकर, बासरीवर हिमांशू गिंडे तर पढंतवर विद्याहरी देशपांडे यांनी साथसंगत केली. प्रारंभी मुकुंद पानसे, जगदीश फडके, रेखा नाडगौडा, अदिती पानसे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. रेणुका येवलेकर यांनी निवेदन केले. यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नृत्यानुष्ठानाचे पहिले व दुसरे पुष्प रसिक प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादात झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणारे संशयित जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव शहरातील घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित केले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयित आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे मालेगाव पथकातील अधिकारी व कर्मचारी कुसुंबा रोड, सलीमनगर भागात गस्त घालताना पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना सराईत गुन्हेगारांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून जिशान नफिस अहमद (२२, सलीमनगर) यास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आसीफ अली सईद अहमद (रमजानपुरा) इमरान शहा अरमान शहा उर्फ इम्मु (सलीमनगर), वसीम (पूर्ण नाव नाही. रा. सलीमनगर) यांची नावे समोर आली. या सर्वांनी सोयगावरोड, मालेगाव कॅम्प परिसरात १५ दिवसांपूर्वी घरफोडी केल्याची कबुली दिली. यातील आसीफ अली सईद अहमद यास सलीमनगर भागात जेरबंद केले.

आसीफच्या ताब्यात तीन फोन, एक लॅपटॉप, एक पिस्तुलासारखे दिसणारे लायटर, एक एअरगन, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, लोखंडी टॉम असा एक लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर संशयित सराईत असून, एअरगनचा वापर करून त्यांनी मोबाइल हिसकावून नेल्याचे गुन्हे केले आहेत. दरम्यान, याच पथकाने सोयगाव परिसतान राहुल मोतीराम पाटील (२८, ओमकार कॉलनी, सोयगाव) व एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. संशयितांनी हे मोबाइल सोयगाव येथील मोबाइल शॉपी फोडून चोरी केले होते.

पोलिस अधीक्षकांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा चांगलाच धसका ग्रामीण पोलिस दलाने घेतल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावातील तरुणीची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देवळालीगावातील तरुणीने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी विजय शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. लवकरच तिचा विवाह होणार होता. परंतु, त्याआधीच तिने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे देवळालीगावात हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकलेले नाही. उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैष्णवीवर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images