Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पेन्शनमध्ये हजार रुपयांची वाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालभारतीच्या पन्नास यशस्वी वर्षांचे साक्षीदार असलेल्या पेन्शनर्सला एक हजार रुपये प्रति महिना वाढ आणि दरवर्षी एक डीए, तसेच एक महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अधिक देण्यात येईल. बालभारतीची वैभवशाली परंपरा यशस्वीरित्या पुढे नेत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार भेट म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा बालभारतीचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभप्रसंगी व बालभारतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी शनिवारी गुरू गोविंद सिंग कॉलेजमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

तावडे म्हणाले, बालभारतीचे गेल्या चार पाच पिढ्यांमधीले योगदान मोठे आहे. त्यामुळे बालभारतीच्या उपक्रमांची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या बालभारतीची रचना पाहण्यासाठी सहलीच्या माध्यमातून त्यांना न्यायला हवे, असेदेखील त्यांनी सुचवले. बालभारतीच्या किशोर मासिकाच्या डिजिटायझेशन उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कॉफी टेबल बुक, निफाडमधील वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ‘बालमनोन्मेष’ या हस्तलिखिताचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, वर्षा तावडे, बालभारतीचे संचालक सुनील मगर, गायक स्वप्नील बांदोडकर, गुरू गोविंदसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूदेवसिंग बिरदी, हरजितसिंग, बलविरसिंग, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जयवंत जाधव आदी उपस्थित होते. विवेक गोसावी यांनी आभार मानले.

डिजिटल कनेक्टिव्हिटीवर भर

१९८० साली ज्ञानरचनावाद जगाने स्वीकारला भारताने मात्र तो २००६ साली स्वीकारला. ज्ञानरचनावादाप्रमाणेच राज्यातील अभ्यासक्रम बदलणे आवश्यक असल्याने शिक्षणपद्धतीत काही बदल होत आहेत. या बदलाने विद्यार्थ्यांना गाइडशिवाय परिक्षेला सामोरे जाणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इ-लर्निंगला प्राधान्य देण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या वर्षभरात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर ‘ते’ मंदिर हटवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई सुरू आहे. शनिवारी आजोंध्या बाबा मंदिर हटवताना पोल‌िस व पालिका प्रशासनात वाद झाल्याने महादेव मंदिर हटवण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत थांबली होती.

शहरातील ९ पैकी ६ धार्मिक स्थळे हटव‌िण्यात आली. मात्र भायगाव येथील आजोंध्या बाबा मंदिर, मोसमपूल परिसरातील शनी मंदिर, महादेव मंदिर हटव‌िण्यास विरोध झाल्याने या तीन मंदिरावरील कारवाई थांबली होती. अखेर शनिवारी पालिका व पोल‌िस प्रशासनाने बंदोबस्तात आजोंध्या बाबा मंदिर हटवले. तर शनी मंदिरातील मूर्ती स्थलांतरित करण्यात आली.

मागील आठवड्यात आजोंध्या बाबा मंदिर हटव‌ितांना परिसरातील महिलांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते. भाजप नेते अद्वय हिरे यांनी मंदिरासाठी त्यांच्या संस्थेची पर्यायी जागा दिल्याने वाद निवळा होता. मात्र मंदिर हटव‌िण्याचे काम प्रलंबित होते. तर शनीमंदिर व महादेव मंदिराबाबत मंदिर विश्वस्त व पालिका प्रशासन यांच्यात वाद असल्याने या मंदिरास देखील हटवण्यात आले नव्हते.

शनिवारी सकाळी प्रांताधिकारी अजय मोरे, नायब तहसीलदार जगदीश निकम, पालिका उपायुक्त अंबादास गरकल, डॉ. प्रदीप पठारे, सहआयुक्त राजू खैरनार, विलास गोसावी, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांच्यासह पोल‌िस उपाधिक्षक शशिकांत शिंदे, अजित हगवणे आजोंध्या बाबा मंदिराजवळ दाखल झाले. मंदिरातील मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिरावर अखेर बुलडोजर चालवण्यात आला.

दुपारनंतर मोसमपुलावरील शनीमंदिर व महादेव मंदिर हटवण्याची कारवाई सुरू केली. गेल्या आठवड्यात शनी मंदिर परिसरातील चौथरा हटवण्यात आला होता. मात्र मंदिर कायम होते. हे मंदिर हटवण्याबाबत देखील प्रशासन ठाम असल्याने शनिवारी सकाळपासूनच मंदिर विश्वस्तांनी शनी देवतेची शिळा व हनुमान मूर्ती पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत स्वप्नपूर्ती नगर येथील गणपती मंदिर येथे हलव‌िली.

आधी तक्रार करा, मग कारवाई करू...

गेल्या आठवड्यात आजोंध्या बाबा मंदिर हटवितांना स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे शनिवारी पोलिस बंदोबस्तात पालिका प्रशासनाकडून आजोंध्या बाबा मंदिर हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र स्थानिकांकडून उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. याबाबत पठारे यांनी पोल‌िस उपाधिक्षक अजित हगवणे यांना तक्रार केली. पोलिसांनी फिर्याद द्या मग कारवाई करू, असे सांगितल्याने संतप्त झालेल्या पालिका अधिकाऱ्यांनी मंदिर हटवून थेट प्रभाग एक कार्यालय गाठले. त्यामुळे मोसम पुलावरील शनीमंदिर हटवताना काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत महादेव मंदिर हटवण्याची कारवाई थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य सेवेचा रुतला गाडा

$
0
0

संजय लोणारी, येवला

तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उपकेंद्र कुलूपबंद अवस्थेत धूळ खात पडले आहेत. येवला तालुक्यातही मंजूर असलेली तब्बल ४४ पदे रिक्त असल्यामुळे ‘असूनही इमारती, रुतला आरोग्य सेवेचा गाडा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात पूर्वीच्या तुलनेत अनेक ठिकाणी नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे उभी राहिली आहेत. तालुक्यात अंदरसूल, मुखेड, पाटोदा व सावरगाव या जुन्या केंद्रांसह मागील वर्षी सुरू झालेले भारम अशी एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २३ उपकेंद्र सध्या कार्यान्वित आहेत. राजापूर येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह देवठाण व एरंडगाव या दोन आरोग्य उपकेंद्रांचे सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तालुक्यातील भुलेगाव व निमगाव मढ या ठिकाणच्या उपकेंद्रांच्या इमारतींचे काम पूर्ण होवूनही केवळ पदे भरली न गेल्याने या दोन ठिकाणी आरोग्य सेवेचा श्रीगणेशा होवू शकलेला नाही. निमगाव मढचे बांधकाम पूर्ण होवून दहा महिने झाली आहेत. भुलेगावची इमारत पूर्णत्वास जावून आता तब्बल तीन वर्षे उलटली असली तरी पदांची भरती केलेली नाही.

केंद्रनिहाय रिक्त पदे

भारम केंद्र (दहा पदे) :

दोन आरोग्य सहाय्यक, बाहयरुग्ण आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, चार शिपाई, सहाय‌िका, लिपिक.

अंदरसूल केंद्र (नऊ पदे) : आरोग्य सहायिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, चार आरोग्यसेविका, शिपाई, वाहनचालक

सावरगाव केंद्र (सहा पदे) : आरोग्य सहाय‌िका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका (प्रत्येकी २), परिचर

पाटोदा केंद्र (नऊ पदे) : तीन आरोग्यसेवक, चार आरोग्यसेविका, कनिष्ठ सहाय्यक, वाहनचालक

मुखेड केंद्र (दहा पदे) : वैद्यकीय अधिकारी, सहायिका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, तीन आरोग्यसेविका, सहाय्यक, वाहनचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार-पार योजनेवरून मालेगावात होर्डिंगबाजी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेली कित्तेक वर्ष तालुक्याच्या राजकीय चर्चेत राहिलेला नार-पार प्रकल्पाच्या शिळ्या कढीला पुन्हा एकदा उत आला आहे. याविषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शहरातील चौकाचौकात अद्वय हिरे मित्र मंडळ व शिवसेना मालेगाव यांच्या वतीने होर्डिंग लावण्यात आले आहेत. तालुक्यात नार-पारचे पाणी आलेले नसले तरी होर्डिंगद्वारे श्रेयवादाचे युद्ध मात्र सुरू झाले आहे.

तालुक्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष राहिले असल्याने याप्रश्नावर अनेक निवडणुकांमधून नार-पार, मांजारपाडा यांसारख्या प्रकल्पाबाबत आश्वासने दिली गेलीत. राजकीय आरोप-प्रत्यारोप झालेत. प्रत्यक्षात मांजरपाडा १ प्रकल्पाचे पाणी देखील मालेगावला मिळाले नाही, तर मांजरपाडा २ व नार-पारचा प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. या प्रकल्पाबाबत नुकतीच नाशिक येथे बैठक झाली आणि त्यानंतर हा प्रश्न चर्चेत आला. यावरून सेना-भाजपात श्रेयावाद रंगला आहे. शहरात ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंगमुळे मात्र शहर व तालुक्यातील मतदारांना पुन्हा एकदा नार पार प्रकल्पाची आठवण झाली असून ‘नार-पार म्हणजे काय र भाऊ?’ 'असा मिश्कील सवाल देखील पाहणाऱ्यांना पडत आहे.

शाब्दिक टोले

अद्वय हिरे मित्र मंडळाने ‘समाजश्री प्रशांतदादा हिरे यांच्या मेहनतीला फळ आले’ असेे होर्डिंग लावले असून, नार-पार दमणगंगा नदीजोड प्रकल्पास मजुरी प्रदान केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. तर तिकडे शिवसेनेच्या वतीने देखील ‘नार-पारच्या जलपूजनाला चला ... !’ असे शीर्षक असलेले होर्डिंग लावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिटनेस फेस्टिवलची नाशिककरांना पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळा ऋतू आला, की अनेक जण सकाळी जॉगिंगला जाण्याचा संकल्प करतात. पण, थंडीमुळे हा संकल्प काही प्रत्यक्षात उतरत नाही आणि फिटनेस फक्त विचारांपुरताच मर्यदित राहतो. पण, यंदा फिटनेस विचारांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सर्वांना ही संधी उपलब्ध करून देत आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि नवीन डान्स अॅकॅडमीतर्फे खास कल्चर क्लब सदस्यांसाठी विंटर फिटनेस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. २७ नोव्हेंबर) ते ६ डिसेंबर असे दहा दिवस हा फिटनेस फेस्टिवल रंगणार आहे.

कॉलेजरोडवरील फिटनेस लाऊंज या ठिकाणी हा विंटर फिटनेस फेस्टिवल होणार आहे. सकाळी ८ ते ९, ११ ते १२, सायंकाळी ५ ते ६ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत तुम्हाला त्यात सहभागी येईल. पूर्ण दहा दिवस या फिटनेससंदर्भातल्या बॅचेस असतील, त्यामुळे त्याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर ज्यांना कल्चर क्लबचे सदस्यत्व रिन्यू करावयाचे असेल त्यांनी ते त्वरित करावे.

या विंटर फिटनेस फेस्टिवलमध्ये झुम्बा, बोकवा, स्टेप एरोबिक्स, बूट कॅम्प या डान्स प्रकारांचे कॉम्बिनेशन शिकविले जाणार आहेत. डाएटसंदर्भातील टिप्स आणि योगासंदर्भातही प्रशिक्षण दिले जाईल. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क नसून, इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७ आणि ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदयात्री घड्याळजींचा नाशिककरांतर्फे सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री रामेश्वर ते केदारनाथ अशा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी पायी प्रवासाला निघालेल्या पुण्यातील दिवाकर घड्याळजी यांचा नाशिककरांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. गुरू गंगेश्वर वेद मंदिर येथे झालेल्या सत्काराला नाशिकच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

बारा ज्योर्तिलिंगपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन घड्याळजी यांचे शहरात आगमन झाले. ते मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहेत. श्री रामेश्वराचे दसऱ्याला दर्शन घेऊन त्यांनी या ज्योतिर्लिंग पायी प्रवासाला प्रारंभ केला. ५६ दिवसात दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी ६ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आहे. दिवाकरजी राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्यातून उपअभियंता पदावरून निवृत्त झालेले आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० दिवसांत नर्मदा परिक्रमा, ४० दिवसात गंगोत्री-जमुनोत्री व बद्रीनाथ आणि केदारनाथ ही चारधाम यात्रा आणि १५ दिवसात अष्टविनायक यात्रा पायी पूर्ण केलेली आहे.

यापूर्वी अवघ्या ११ दिवसांमध्ये बाराही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणारे नाशिकचे नंदकुमार देसाई, डॉ. विश्वास सावकार, दीपक शिर्के, राजेंद्र फड आणि विलास वाळके या साहसवीरांच्या हस्ते घड्याळजी यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक सायकलिस्टच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीणकुमार खाबिया, देविदास आहेर, प्रतिभा आहेर उपस्थित होते.

घड्याळजी यांनी सुरू केलेली यात्रा मार्च महिन्यात संपणार आहे. घड्याळजी यांचा जन्म नाशिकला झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यानंतर अहमदनगर व पुणे येथे पाटबंधारे खात्यात नोकरी केली. गेल्या ४० वर्षांपासून ते सातत्याने पंढरपूरचा पायी यात्रा करीत आहेत. रोज ५० किलोमीटर ते पायी चालतात. महिन्याला १ हजार किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. आतापर्यंत त्यांनी ३३ टक्के प्रवास पूर्ण केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर झाले होर्डिंगमय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिका निवडणुकीनंतर शहरात पुन्हा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यक्रमांमुळे डिज‌िटल बॅनरची दाटी झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा वीट आला आहे. डिज‌िटल बॅनरबरोबरच शहरातील विविध प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा पक्षाचे झेंडे लावण्यात आल्याने शहर विद्रूप होत आहे. रविवारी विविध राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. काही ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्याही निर्माण झाली.

रविवारी भाजपने उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक घेतली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेले दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. या कार्यक्रमासाठी चार जिल्ह्यांतून विविध पदाधिकारी नाशिकला आल्यामुळे त्यांच्या स्वागताचे फलक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावले. काँग्रेसने संविधान दिनाचे निमित्त साधून मोठा कार्यक्रम घेतला. त्यात राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची उपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्या स्वागताचे व कार्यक्रमाचे पोस्टर्स शहरात सगळीकडे लावण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांबरोबरच मनसे विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचेही शहरात आगमन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचीही गर्दी होती.

परवानगीबाबत साशंकता

राजकीय पक्षांनी लावलेल्या या डिज‌िटल बॅनरसाठी परवानगी घेतली की नाही, याबाबत साशंकता असते. याबाबतची माहिती, त्याची आकडेवारी किंवा कोणी परवानगी घेतली याची माहिती समोर येत नाही. महानगरपालिकेचे याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष असल्यामुळे त्यावरही नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, तर भाजपचे नेते व मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. कोणतीही निवडणूक नसताना हे डिज‌िटल बॅनर शहराला विद्रूप करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणाईच्या मनात स्फूर्ती चेतविणाऱ्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटींत दुर्गम भागातून आलेल्या तरुणाईने संचलनाद्वारे शहीदांना दिलेली मानवंदना अन् देशासाठी कौशल्यविकासाद्वारे योगदान देण्याची प्रतिज्ञा करीत २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले.

पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत कारडा कन्स्ट्रक्शन संचालित कारडा स्किलिंग सर्व्ह‌िसेसच्या वतीने शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. द्वारका परिसरातील माणेकशानगरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कारडा स्क‌िलिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल अमर, उपाध्यक्षा अंजू अमर, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, प्रकल्पप्रमुख विजय भोसले, दीपाली मालपुरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थ‌ित होते.
मुंबई हल्ल्यातील शहिदांना दुर्गम भागातील युवकांनी संचलनाद्वारे आदरांजली अर्पण केली. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सिक्युरिटी गार्ड, बीपीओ आणि हॉस्प‌िटॅलिटी असिस्टंस या प्रशिक्षण वर्गांचे सुमारे पावणेदोनशे प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थ‌ित होते. धनश्री पाटील, किरण पाटील, गणेश शेळके, सागर गायकवाड या प्रशिक्षणार्थींनी देशभक्तीपर गीते, कविता वाचन व वक्तृत्वाद्वारे आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.

--

युवकांना योगदानाचे आवाहन

हा हल्ला केवळ मुंबईवर नव्हता, तो देशावर आणि मातीवर झालेला हल्ला होता. देशावर झालेले हल्ले परतावून लावत आपण आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. देशाच्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सैन्य दल आणि पोलिस सज्ज आहेत. परंतु, सजग नागरिक म्हणून आपणही काही कर्तव्ये जाणिवपूर्व पार पाडायला हवीत. येथील प्रशिक्षणार्थींनी स्वत:मधील कौशल्यांचा विकास करून त्याचा उपयोग विधायक कामांसाठी केला तरी तीदेखील देशसेवाच आहे. चांगला माणूस बनून युवकांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पशुधन विकास अधिकाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारच्या नियमानुसार जनावरांना टॅग लावून युआयडी क्रमांक देण्यात येत आहे. हे काम करीत असताना म्हशीने लाथ मारल्याने सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २४) अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावात घडली. दशरथसिंग वनसिंग पाडवी (वय ५७) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संतप्त पशुधन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना जनावरांच्या कानाला युआयडी क्रमांक असलेले बिल्ला लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी वाण्याविहीर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग पाडवी हे धीरज क्षत्रिय यांच्या शेतात गेले होते. या वेळी म्हशीला टॅग लावण्याचे काम सुरू असतानाच म्हशीने त्यांना लाथ मारली. त्यामुळे तोल जाऊन ते जवळच असलेल्या विहिरीत पडले. विहिरीच्या कठड्याचा मार बसल्याने ते जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना विहिरीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शुक्रवारी (दि. २४) रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी (दि. २५) मध्यरात्री मृत्यू झाला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांधर्व’च्या विद्यार्थ्यांची मधुर गुरुवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या गायन व संगीत साधना करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली कला पेश करून गुरुवंदना सादर केली. गांधर्व महाविद्यालय, नाशिकचे संचालक गुरू कमलाकर जोशी (भाऊ) यांच्याप्रति आदर व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्वरमधुर गुरुवंदना अर्पण केली.

गांधर्व महाविद्यालयातर्फे गुरू कमलाकर जोशी यांच्या शिष्यवर्गाची गायन-वादनाची मैफल पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संस्थापित श्री रामनाम आधाराश्रम, पंचवटी येथे झाली. या मैफलीस प्रमुख पाहुणे डॉ. जयंत वाघ, विशेष अतिथी गोविंदराव पलुस्कर व मोमिना चॅटर्जी (संगीतप्रवीण) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.

यात प्रथम मोमिना चटर्जी यांनी राग पूरिया कल्याण सादर केला. त्यांना हार्मोनियमवर कमलाकर जोशी व तबल्यावर अनुराग जोशी यांनी साथसंगत केली.

शुभम तायडे, मानसी पाटील, तन्मय जाधव, अमृता डहाके, सुरेंद्र जालिहालकर यांनी शास्त्रीय गायन, नाट्यगीत, अभंग सादर केले. बाल गटात सार्थक, प्रणम्य, अर्णव, रुद्र, यज्ञेश यांनी त्रितालमध्ये कायदा, पलटा, तिहाई, चक्रदार इत्यादी वादन केले. समूह गायनात राग मालकंस स्वरमालिका व आलाप इत्यादी प्रकार कार्तिक, गार्गी, श्रद्धा, स्वरांगी, मनाली यांनी सादर केले.

मोठ्या गटाच्या तबलावादनात विद्यार्थ्यांनी झपताल वाजवून सर्वांची मन जिंकली. यात उमा, रोहन, गौरव, विपुल, तसेच सुयश मुळे, यश चांडक यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले. गुरू कमलाकर जोशी यांनी सतारीवर चंद्रकंस राग वाजवून कार्यक्रमाची सांगता केली. सुनेत्रा मांडवगणे यांनी निवेदन केले. नकुल दायमा, अनुराग जोशी, सचिन भालेराव, शुभम तायडे यांनी तबला व हार्मोनियमवर साथसंगत करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

--

बहारदार सादरीकरणाने वाहवा

चिन्मयी जोशी हिचे व्हायोलिन वादन व क्षितिजा शेवतकर यांची राग शिवरंजनीमध्ये जुगलबंदी सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. चिन्मयी जोशी हिने गगन सदन ही प्रार्थना व्हायोलिनवर सादर केली. केतकी गोरे राग पूरिया कल्याण व क्षितिजा शेवतकर यांनी राग बहार सतारीवर स्वतंत्र वादन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सुनीता देशपांडे व ज्योती डोखळे यांनी सतारीवर राग शिवरंजनीमध्ये एक धून सादर केली. अमला खाडिलकर हिने एकल तबलावादनात ताल रुद्रमध्ये कायदा, पलटा, चक्रधार, फरर्माशी चक्रधार, परण, कमाली परण इत्यादी सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. प्रणव पुजारी यांनी सतारीवर राग बागेश्री एकतालमध्ये सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्राद्ध टाळून दिव्यांगाला सायकल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दशक्रिया, श्राद्ध आदी विधी करण्यात येतात. या विधींना बराच खर्च येत असतो. तो टाळून काहीतरी समाजोपयोगी कार्य करण्याकडे काहींचा कल दिसून येतो. त्यापैकीच एक ठरलेल्या शहरातील बर्वे कुटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबातील संजय बर्वे यांच्या निधनानंतर या विधींना फाटा देत खर्च करण्याचे टाळून जळगाव जिल्ह्यातील एका दिव्यांगाला सायकल दिली आणि समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.

नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी योगेश बर्वे आणि प्रकाश बर्वे यांचे बंधू संजय बर्वे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर करण्यात येणारे धार्मिक विधी टाळून त्या खर्चाच्या रकमेतून त्यांनी उदांनी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील दाभाजी भाऊ पाटील या दिव्यांगाला तीनचाकी सायकल घेऊन दिली. अशा प्रकारच्या मदतीतून त्यांना आपल्या भावाला श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोडके यांच्या हस्ते ही सायकल पाटील यांना देण्यात आली. गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाचे अध्यक्ष निशिकांत पगारे, प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, शहराध्यक्ष श्याम गोसावी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेहरूनगरमधील रस्ताकामास लाभला मुहूर्त

$
0
0

म. टा. इम्पॅक्ट


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नेहरूनगरमधील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे काम प्रेस प्रशासनाने सुरू केले आहे. नागरिकांकडून अनेक दिवसांपासून रस्तादुरुस्तीची मागणी केली जात होती. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कर्मचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांचे हाल होत असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच प्रेस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत काम सुरू केल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, बंद पथदीप सुरू करण्याची मागणी केली आहे.

नेहरूनगरमधील बंद पथदीप सुरू करावेत, रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी बीइंग कॉमन संस्थेचे अध्यक्ष विक्रम कदम आणि रहिवाशांनी केली होती. ‘मटा’नेही याप्रश्नी पाठपुरावा केला होता. या रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे आदींच्या हस्ते झाले. आता त्याचे काम सुरू झाले आहे. खराब झालेला रस्ता फोडून त्यात मुरूम टाकण्यात आला आहे. त्यावर पाणी मारून रोलर फिरविला जात आहे.

नेहरूनगर ही प्रेस कामगारांची वसाहत आहे. येथे असंख्य इमारती असून, त्यामध्ये प्रतिभूती आणि चलार्थपत्र मुद्रणालयाचे कामगार राहतात. वीस वर्षांपूर्वी प्रेसमध्ये एकूण वीस हजारांवर कामगार होते. त्यांच्यासाठी नेहरूनगर वसाहत उभारण्यात आली होती. प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर प्रेस कामगारांची संख्या आता पाच ते सहा हजारांवर आली आहे. साहजिकच असंख्य इमारती असलेली नेहरूनगर वसाहत बरीच रिकामी झाली आहे. अनेक इमारतींतील निम्मी घरे रिकामी आहेत. प्रेसची सुरक्षा बघणाऱ्या सीआयएसएफ संस्थेचे जवान आता कुटुंबीयांसह येथे राहतात.

नेहरूनगरच्या प्रवेशद्वारातच खड्डा आहे. वाहतूक बेटाच्या वळणावर तर अनेक खड्डे आहेत. उपनगर पोलिस ठाण्याकडे जाताना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पोलिस ठाण्यासमोर एक घातकी खड्डा आहे. काही ठिकाणी नावाला डांबराएेवजी सिमेंट टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. खराब दर्जाचे काम असल्याने खड्डे पुन्हा उखडले. सीआयएसएफच्या जवानांनी वर्षापूर्वी श्रमदान करून रस्त्याची डागडुजी केली होती.

--

या रस्त्यांची कामे सुरू

नाशिकरोड व जेलरोडला जाण्यासाठी नेहरूनगरमधील रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर उपनगर पोलिस ठाणे, केंद्रीय विद्यालय, सीआएसएफचे कार्यालय आहे. शालेय विद्यार्थी, पोलिस, सीआयएसएफचे जवान, नोकरदार या मार्गाचा वापर करतात. याच वसाहतीतून इच्छामणी गणेश मंदिर, शिखरेवाडीकडे रस्ता जातो. तेथील रस्ते तर पार उखडलेले आहेत. खड्डे चुकविताना दोन वाहने समोरासमोर येऊन अपघात होत आहेत. पोलिस ठाणे व केंद्रीय विद्यालयासमोरील रस्ताही खराब झालेला आहे. वाहतूक बेटावर सर्व बाजूंनी रस्ता उखडलेला आहे. सायकल स्टँडजवळ यापेक्षा वाईट अवस्था आहे. या सर्व ठिकाणी आता रस्तादुरुस्ती सुरू झाली आहे.

-------------

अन् पोलिस लाइन उजळली


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील पोलिस लाइनमधील पथदीपांची दुरुस्ती करून गरजेनुसार नवे पथददिवे बसविल्याने बऱ्याच कालावधीनंतर पोलिस लाइन उजळली आहे. येथील बहुतांश पथदीप बंद असल्याने पोलिस लाइन गेल्या महिनाभरापासून अंधारात होती. नागरिकांनी तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. समता परिषदेनेही मागणी केली होती. ‘मटा’मध्ये याबाबतेच वृत्त प्रसिद्ध होताच ही कार्यवाही झाली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकरोड पोलिस लाइनमध्ये पोलिसांची वसाहत, विभागीय माहिती अधिकारी कार्यालय, डिस्टिलरी क्वार्टर्स कर्मचारी वर्ग तीनची निवासस्थाने व लष्कर भरती प्रशिक्षण केंद्र आहे. पोलिस लाइनमध्ये दीडशे कुटुंबे राहतात. गेल्या महिनाभरापासून दिवसांपासून येथील पथदीप बंद होते. येथे गवतही वाढलेले आहे. शासकीय कर्मचारी भाडे भरतात, तरीही रस्ते, लाअट, पाणी यांसारख्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्यावर ते महापालिकेकडे बोट दाखवतात. ही वसाहत आमच्या हद्दीत नाही, असे महापालिका सांगते. आता किमान पथदीप सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत असून, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-------------

एमआयडीसीत खड्डेदुरुस्ती


म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजविण्यात येत आहेत. सुरुवातीला महापालिकेने मुरुमाची मलमपट्टी करीत खड्डे बुजविले होते. परंतु, आठच दिवसांत रस्ते पुन्हा खड्डेमय झाले होते. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने सातपूर व अंबड एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यास प्रारंभ केला आहे. निमा व आयमा संघटनेने अनेक वर्षांपासून एमआयडीसीतील सर्वच रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. याकडे महापालिका कधी लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेने एमआयडीसीला मूलभूत सेवा देताना सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनए’ नोटिसांविरोधात जनलढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकास आराखड्यात अंतर्भूत गावांमधील अद्याप एनए न झालेल्या जमिनींची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली असून, अशा शेतकऱ्यांना नोट‌िसा पाठविण्याचे आदेशही तलाठ्यांना देण्यात आले आहेत. जमिनी एनए कराव्यात की नाही हा शेतकऱ्यांचा ऐच्छ‌िक प्रश्न असून, महसूल गोळा करण्यासाठीच सरकारचा हा खटाटोप सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या या धोरणाविरोधात २३ गावांमधील शेतकऱ्यांनी जन आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

अन्य शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही सिमेंटचे जंगल वाढतेच आहे. मात्र तरीही महापालिका क्षेत्र आणि लगतच्या गावांमधील शेतकऱ्यांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवला आहे. परंतु, या जमिनीदेखील सहजतेने अकृषक (बिगरशेती) करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचा दावा आता शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे. शेतजमीन बिगरशेती करण्यासाठीची प्रक्रिया पूर्वी अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती. परंतु, गेल्या वर्षभरात सरकारने या प्रक्रियेमध्ये बरीचशी सुधारणा केली आहे. त्यामुळे नियमानुसार रक्कम भरून अशा जमिनी बिगरशेती करवून घेता येऊ लागल्या आहेत. विकास आराखडा मंजूर झाल्यानंतरही बहुतांश झोनमध्ये किमान ६० टक्के स्थानिक अजूनही शेती करीत आहेत. त्यांना त्यांची वडिलोपार्जित शेती जोपासायची आहे. परंतु, मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना नोट‌िसा देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४२ ब, वसुलीच्या अनुषंगाने हा विषय महत्त्वाचा असून त्याची तत्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे आदेश सरकारच्या निर्देशांनुसार तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आले आहेत.

विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या रहिवासी, निवासी आणि वाणिज्यक यांसारख्या अकृषक स्वरुपाच्या वापर विभागात ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींचे गट नंबर दर्शविणाऱ्या याद्या तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या जमिनी अद्याप बिगरशेती झालेल्या नाहीत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी आणि अशा जमिनींचे स्थळ निरीक्षण करूनच संबंधित शेतकऱ्यांना नोट‌िसा काढाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. अशा जमिनींवर अनधिकृत बांधकाम केलेल्या, विविध न्यायालयांमध्ये वाद सुरू असलेल्या जमिनी तूर्तास वगळाव्यात, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

..ही बाब ऐच्छ‌िकच

जिल्हाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत ही वस्तुस्थ‌िती आहे. परंतु, सरसकट सर्वच जमिनी एनए करण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचा शेतकऱ्यांचा दावा चुकीचा असल्याची माहिती जिल्हा प‍्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. जमीन एनए करावी की करू नये, हा पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांचा ऐच्छ‌िक विषय असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

विकास आराखड्यातील २३ गावांमधील शेतकरी सरकार आणि प्रशासनाच्या या नोट‌िसांना विरोध करण्यासाठी संघट‌ित होत आहेत. अकृषक कर आणि रुपांत‌रित कर गोळा करण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू आहे. हळूहळू सर्वच जमिनी एनए करण्यासाठीची ही छुप्या मार्गाने सुरू असलेली प्रक्रिया असून, याविरोधात लढा उभारण्यात येणार आहे.

- अॅड. भास्कर निमसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या तत्कालीन नगराध्यक्षांचा हस्तक्षेप नाही

$
0
0

कदम यांनी मागविलेल्या माहिती अधिकारात बाब उघड

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेचा प्रारुप विकास आराखडा राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी परस्पर पत्र दिल्याचा आरोप खोटा असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी माहिती अधिकारात माहिती मिळविली होती. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

जिल्हाधिकारी नाशिक यांना त्र्यंबक नगरपालिका मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी १२ मे २०१७ रोजी पत्र दिले होते. त्यामध्ये डीपी आराखडा तयार करताना नगराध्यक्षांचा हस्तक्षेप झाल्याचे नमूद करताना शासन राजपत्रात प्रसिद्धीचे पत्र देण्याबाबत उल्लेख केला होता. याबाबत ठराव क्रमांक ४४८ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर त्र्यंबकेश्वरचा डीपी वादग्रस्त ठरला होता. परिणामी, विजया लढ्ढा यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सत्तांतर झाले होते.

मात्र या सर्व प्रकरणात संतोष कदम यांनी माहिती अधिकाराचा वापर करीत संपूर्ण मे महिन्याच्या कारागृह मुद्रणालयाचा आवकजावकच्या झेरॉक्स प्रती अपील करून प्राप्त केल्या आहेत. त्यातही लढ्ढा यांनी असे कोणतेच पत्र दिले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ऐन त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व समजल्याने या प्रकारास कोणते वळण मिळणार याची उत्सुकता नागरिकांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी तलाव दुरुस्तीला प्रारंभ

$
0
0

गडावरील पाणीटंचाई होणार दूर

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडास पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची गळती थांबवण्याच्या सर्व मेंटेनन्स कामाला रविवारी (दि. २६) पासून सुरुवात करण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पासून या तलावाच्या मुख्य कामास प्रारंभ होणार असून, याबाबत भाविक व गड ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. या पाझर तलावाने गडावरील पाणीटंचाई पुढील वर्षांपासून दूर होण्यास मदत होऊ शकते.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडास भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाझर तलावाला गळती असल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जात आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झालेली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दीबरोबर गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरजेपेक्षा पाण्याचा साठा कमी राहात असल्यामुळे उन्हाळा सुरू होताच गडावरील रहिवाशी व न्यासास दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परिणामी, या पाणीटंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यावसासिकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी भवानी तलावाची गळती थांबविणे, तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. त्यास त्यांना यश लाभून सरकारने २ कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत प्रशासकीय मान्यता दिली होती. सध्या भवानी तलाव तुडुंब भरलेला असून, किमान जानेवारी २०१८ पर्यंत सप्तशृंगी गडास पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सदर प्रस्तावित कामाची पाहाणी व मेंटेनन्स कामाच्या प्रारंभासाठी लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. पी. धुम, अभियंता ए. व्ही. महाजन, ठेकेदार एम. डी. लोखंडे यांनी हजेरी लावली. या वेळी शांताराम सदगीर, ग्रामविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५० युवकांचा ‘मनविसे’त प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवन‌र्मिाण विद्यार्थी सेनेमध्ये रविवारी तब्बल २५० युवकांनी प्रवेश केला. मनविसेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मुख्य उपस्थ‌तिीत ठक्कर बाजार बसस्थानकाजवळील पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आंदोलनांच्या माध्यतातून मनविसेने विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्न हाताळले आहेत. मनविसेच्या शहर आण‌ि जिल्हा कार्यकारिणीकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी शिरोडकर यांनी घेतला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील घोटाळा, वीज भार नियमनामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान, ज्येष्ठांसोबत साजरा करण्यात आलेला फ्रेन्डशिप डे, प्रश्नपत्रिका फुटल्याने लावण्यात आलेली चौकशी, मराठी पाट्या लावण्याबाबत इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर आणलेला दबाव आदींची माहिती मनविसेचे शहराध्यक्ष शाम गोहाड यांन‌ी यावेळी दिली. नाशिकमध्ये ५० टक्के इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठीत पाट्या लावल्या आहेत. अन्य शाळांनी त्या लावल्या नाहीत तर आम्ही लावू असे संदीप भवर यांच्याकडून शिरोडकर यांना सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या युवासेनेतील काही कार्यकर्त्यांसह तब्बल २५० युवकांनी मनविसेमध्ये प्रवेश केला.

यावेळी शिरोडकर म्हणाले, की मनविसेमध्ये कोणी ज्येष्ठ आणि कोणीही कनिष्ठ, कोणी जुने आणि कोणी नवीन पदाधिकारी असा भेदभाव नाही. सर्वांनी एक दिलाने काम करावे. त्यानंतर पुढील तीन आठवड्यांत त्यांना जबाबदाऱ्या ठरवून पदे दिली जातील. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मनोज रामराजे, अॅड. सागर देवरे, दीपक चव्हाण, संदीप भवर, कौशल पाटील, खंडेराव मेढे आदी उपस्थ‌ति होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

दानवेंनी बैठकीत घेतला विविध कामांचा आढावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. संघटनात्मक निवडणुका होऊन दोन वर्षे झाली तरी कार्यकारणी तयार न केल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना खूप काम असेल, तर त्यांना मुक्त करा असे सांगत नाराजी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्राच्या या बैठकीत मंत्र्यांची गैरहजेरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. संघटनेवर बोला सरकारबद्दल बोलू नका, अशा सूचना देण्यात आल्यामुळे यावेळी पदाधिकाऱ्यांची मात्र कोंडी झाली.

रविवारी गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आयोजित भाजपची आढावा बैठक तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली. प्रारंभी नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधून आढावा घेतला. त्यानंतर धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत संघटना बांधणीवर भर देण्याबरोबरच बूथ यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काय करता येईल यावर दानवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाची माहिती घेतली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीचे नाव विचारताच अनेक नेत्यांची फजिती झाली. यावेळी वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पदाधिकारी काम करतो आहे की नाही यापासून त्यांनी प्रत्येक विभागाची राजकीय स्थितीही जाणून घेतली.

या बैठकीत भाजपचे सरचिटणीस आमदार सुरजितसिंग ठाकूर, उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री किशोर काळकर, नाशिकचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर महापौर रंजना भानसी, मालेगावचे सुनील गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. जळगावच्या बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसेंसह आमदार उपस्थित होते.

नाशिकचे काम ५४ टक्के

नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाला ५४ टक्के गुण दिले. भविष्याच्या दृष्टीने हे काम चांगले नसल्याचे सांगून त्यांनी अधिक काम करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत प्रारंभी मालेगाव विभाग, नंतर ग्रामीण व नंतर नाशिक शहराच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.

दार बंद करून चर्चा

आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकर्त्यांनी बसू नये, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी केवळ जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सरचिटणीस, विविध आघाडीचे प्रमुख फक्त उपस्थित होते. या चर्चेवेळी सभागृहाचे दार बंद करण्यात आले.

कडेकोट बंदोबस्त

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केल्यामुळे या आढावा बैठकीत पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आलेल्या वाहनांची तपासणी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वबळाचा निर्णय योग्यवेळी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढविण्याची औरंगाबाद येथील आढावा बैठकीत घोषणा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये मात्र सावध पवित्रा घेतला. नाशिकमध्ये त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका कशा लढवायच्या या योग्यवेळी ठरवू, असे सांगतानाच शिवसेनेवर टीका करण्याचेही टाळले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षाशी वैर नको म्हणून त्यांनी ही भूमिका घेतल्‍याची चर्चा मात्र रंगली.

भाजपच्या उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणेंबाबत विचारल्यावर ते म्हणाले, की विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्री व मला देण्यात आले आहेत. त्याबाबत बैठक झाल्यानंतर उमेदवाराचे नाव निश्चित केली करून दिल्लीत केंद्रीय समितीकडे पाठवले जाईल. त्यांची संमती मिळाल्यानंतर उमेदवाराचे नाव जाहीर करू. राणेंवर अन्याय होणार नाही. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होणार असला तरी तारीख निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले.

आढावा बैठकीबाबत बोलताना दानवे म्हणाले, की राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आम्ही संघटनात्मक बांधणीमुळे जिंकल्या. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याची तयारी आम्ही करीत आहोत. त्यासाठी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले जात असून, त्यासाठी बूथ गठित करणे महत्त्वाचे काम आहे. आतापर्यंत राज्यात ९१ हजार बूथपैकी ७० टक्के काम झाले असून, उर्वरित कामे येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात आम्ही बूथ विस्तारक नेमले असून, मुंबई येथे वॉर रूम सुरू केले आहेत. त्यामुळे येथे सर्व माहिती एकत्रित केली जाते.

कांदा निर्णयावर मौन

सरकारने कांद्यावर साडेआठशे डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य लावले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत दानवे यांनी कांद्याला सध्या चांगले भाव मिळत असल्याचे सांगत बोलणे टाळले. शेतकऱ्यांचे राज्य सरकारने कर्ज माफ केले असून, बँकेने यादी देण्यास विलंब केल्यामुळे ते मिळत नसले तरी घोषणा झाल्यापासून त्यांना व्याज आकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिल्टरेशन प्लँटची वाताहत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

देश-विदेशांतून नाशिकला येणारे भाविक रामकुंडात स्नानाला प्राधान्य देतात. मात्र, त्यांना रामकुंडातील प्रदूषित पाण्यात स्नान करावे लागते. येथील पाणी कायम शुद्ध राहावे यासाठी रामकुंडात २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर फिल्टरेशन प्लँट बसविण्यात आला होता. त्याची आता पुरती दैना उडाली आहे. त्यामुळे आता पुन्हा रामकुंडाच्या पाण्याच्या शुद्धिकरणाची चर्चा होऊ लागली आहे.

गोदावरीला गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत नाही, त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते. सध्या पाणी नसल्यामुळे रामकुंडातील शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गोदाकाठ परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यात रामकुंडाच्या पाण्याचाही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर येथे उभारण्यात आलेला प्लँट पुरेशा क्षमतेने कार्यान्वीतच न झाल्याने एकदा फेल गेलेला प्लँट पुन्हा उभारू नये. त्याऐवजी रामकुंडातील पाणी कायम प्रवाहित कसे राहील याचा विचार करताना रामकुंडातील नैसर्गिक झरे मोकळे करणे हा त्यावर चांगला उपाय होऊ शकतो, अशी भावना गोदाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

गोदावरी आढावा बैठकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रामकुंडातील प्रदूषित पाण्यात भाविकांना स्नान करावे लागते. ते टाळण्यासाठी पावसाळ्यानंतर फिल्टरेशन प्लँट कार्यरत करण्याची, तसेच नदी बारमाही प्रवाही करण्यासाठी नदीतील नैसर्गिक झरे मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही.

--

साहित्याची दैना

रामकुंडातील पाणी स्वच्छ करण्यासाठी बसविण्यात आलेल्या फिल्टरेशन प्लँट अयशस्वी ठरला आहे. हा प्लँट बसविण्यात आला, त्याच्या दोन मोठ्या टाक्या जुन्या भाजीबाजाराच्या कोपऱ्यावरील सुलभ शौचालयाच्या पश्चिमेला ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी रचलेला पायाच्या खुणा, तसेच तेथून रामकुंडात नेण्यात आलेले लोखंडी पाइप गंज येऊन पडलेले दिसत आहेत. येथील फिल्टरेशन प्लँटच्या टाक्या काढून त्या फुलेनगर येथील जलकुंभाच्या भागात ठेवून दिलेल्या आहेत. हा प्लँट पुरेशा क्षमतेने कार्यान्वित झालाच नाही. त्यामुळे या प्लँटवर केलेला खर्च वाया गेलेला आहे.

--

रामकुंडातील पाणी अधिक शुद्ध कसे करता येईल, त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याविषयी एका कंपनीकडून सल्ला घेण्यात येत आहे. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नदीतील नैसर्गिक झरे पुनर्जीवित करण्याचा सल्ला दिला आहे. काँक्रिटीकरणात बुजलेले झरे मोकळे केले, तरी रामकुंडात शुद्ध पाण्याचा प्रवाह सुरू राहू शकतो.

-देवांग जानी, गोदावरीप्रेमी

---


कपिला संगमावर शेवाळाचा थर

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरू शकेल अशा कपिला संगमाकडे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. सध्या या संगमाच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या घाटजवळ तुंबलेल्या पाण्यावर शेवाळाचा थर जमा झाला आहे. हे शेवाळ काढण्याची तसदी महापालिका प्रशासन घेणार का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

पंचवटी परिसरातील मंदिरांची संख्या लक्षात घेता हा परिसर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हायला हवा. मात्र, तसा प्रयत्न होताना दिसत नाही. नाशिकला आलेले भाविक मंदिरातील दर्शनानंतर काही काळ या परिसरात थांबू शकतील, येथील निसर्गरम्य वातावरणात निवांत बसतील, अशी व्यवस्था अजूनही पंचवटी परिसरात झालेली नाही. निसर्गरम्य वातावरणनिर्मिती तपोवन परिसरात होऊ शकेल, असे तेथील वातावरण असतानाही त्या दृष्टीने पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे सध्या पंचवटीतील विशेषतः तपोवनात येणाऱ्या भाविका-पर्यटकांवर येथील मंदिराव्यतिरिक्त फक्त कपिला संगमावरील ओबडधोबड खडकांचे दर्शन घेण्याची वेळ येत आहे.

सध्या गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी एकदमच कमी झालेली असल्याने कपिला संगमावरील सर्वच खडक उघडे पडले आहेत. या ठिकाणाहून वाहत असलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरत आहे. संगमाच्या परिसरात येणारे पाणी अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. संगमाजवळच पाण्याचा प्रवाह खडकावर जोरात आदळतो. त्याच्या अगोदर संथ आणि साचलेल्या पाण्याच्या भागाकडे पर्यटकांचे लक्ष गेल्यास त्यांना येथील पाण्यावर पसरलेल्या शेवाळाचे दृश्य नजरेस पडत आहे. हे शेवाळ वाढून तेथे पाणवेलींची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकदा पाणवेली वाढल्या म्हणजे त्यांची साफसफाईचे काम करण्याची वेळ येणार, त्यामुळे त्या अगोदरच येथील शेवाळ काढून घ्यायला हवे, अशी मागणी होत आहे.

---

रामायणातील महत्त्वाचे प्रसंग ज्या भागात घडले त्या तपोवन परिसराचा पाहिजे तसा विकास करण्यात आलेला दिसत नाही. येथील पाण्याच्या स्वच्छतेबाबतीतदेखील पुरेशी काळजी घेतली जात नाही.

-हितेशकुमार पटेल, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचे वाहन खरेदी केल्यास गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ५२८ वाहने चोरीला गेली असून, त्यातील १०८ वाहने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. बहुतांश वेळी चोरीची वाहने अगदी स्वस्तात विकली जातात. खरेदीदार वाहनाची कोणतीही शहानिशा न करता खरेदी व्यवहार पार पाडतात. खरेदीदारांचे दुर्लक्षच वाहनचोरीच्या मुळाशी असून, यामुळे थेट खरेदीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलिसांनी सुरू केले आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. ऑक्टोबर २०१६ पर्यंत चोरट्यांनी ४६२ वाहनांवर हात साफ केला होता. तर पोलिसांनी ९५ वाहने परत आणण्यात यश मिळवले होते. यंदा वाहनचोरीचा आकडा ५२८ च्या घरात पोहचला असून, २० टक्क्यांच्या सरासरीने पोलिसांनी १०८ वाहने परत मिळवली आहेत. याबाबत क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले की, वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा सतत तपास करीत राहणे यावर पोलिसांचा भर आहे. नुकतेच गंगापूर पोलिसांनी पाचोरा येथून आठ वाहने जप्त केली. अगदी दोन मिन‌िटांत लॉक तोडून दुचाकी डायरेक्ट करून चोरटा थेट पाचोरा येथे वाहनाची विक्री करीत होता. ३० हजारांत बुलेट मिळाली म्हणून एका खरेदीदाराने तीन बुलेट विकत घेतल्या. या खरेदीदाराने कोणतीही शहानिशा करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या खरेदीदारावर चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणातील आणखी काही खरेदीदारांवरदेखील कारवाई होणार असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. खरेदीदारच मिळाले नाही तर वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध बसू शकतो, असे नखाते यांनी स्पष्ट केले. एका जिल्ह्यातील वाहन दुसऱ्या जिल्ह्यात विकण्याची प्रवृत्ती चोरट्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार यासह शेजारील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांशी सतत संपर्क ठेऊन माहितीचे आदानप्रदान केले जात आहे.

ऑनलाइनचा फायदा

पोलिसांनी वाहन चोरी तक्रार नावाचे अॅप सुरू केले आहे. हे अॅप पोलिसांपुरते मर्यादीत असून, चोरी झालेल्या वाहनांची नोंदणी या अॅपवर केली जाते. यामुळे गेल्या काही दिवसांत जवळपास ५० वाहने शोधली गेली असल्याची माहिती एसीपी नखाते यांनी दिली. या अॅप्ल‌िकेशनमध्ये सापडलेल्या अथवा हरवलेल्या, चोरी गेलेल्या वाहनाची नोंदणी होते. त्यामुळे दुसऱ्या पोलिस स्टेशनमार्फत याच वाहनाबाबत सापडल्याची नोंद झाली की एक अलर्ट मिळतो. या प्रकारे शहर हद्दीतील २५, तर इतर जिल्ह्यांमधील २५ पेक्षा अधिक वाहनांचा शोध लागला आहे.

वाहनचोरी तक्रार करा ऑनलाइन

वाहनचोरीची तक्रार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाशिक शहर पोलिसांच्या http://nashikpolice.com/ या वेबसाइटवर वाहनचोरी तक्रारीसंबंधी आयकॉन असून, येथे क्लिक केल्यानंतर वाहनचालक आपली काही माहिती भरून रजिस्टर होऊ शकतो. अशा व्यक्तीला पुढे ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवता येऊ शकते. ऑनलाइन तक्रार नोंदवली गेल्याचा फायदा तपासादरम्यान होतो

दुचाकीचे लॉक तोडणे चोरट्यांसाठी काही सेकंदाचे काम आहे. यासाठी वाहनधारकाने अतिरिक्त लॉकिंग सिस्ट‌िम कार्यान्व‌ित ठेवावी. महागाडी दुचाकी असल्यास जीपीएसचा वापरही होऊ शकतो. खरेदीदारांनी लक्ष दिल्यास, तसेच वाहनधारकांनी थोडी काळजी घेतल्यास या गुन्ह्यांना आळा बसू शकतो.

- अशोक नखाते, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images