Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धावण्यातून होणार समाजकार्यही!

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

आरोग्यासाठी तर सगळेच धावतात. पण समाजकार्यासाठी धावता आले तर? हो हे शक्य झाले आहे इम्पॅक्ट या मोबाइल अॅपद्वारे. या अॅपची सध्या चलती असून, आपल्या चालण्यातून तयार झालेल्या पैशांचा वापर सामाजिक कामासाठी केला जातो आहे. त्यामुळे यंगस्टर्ससह स्मार्टफोनधारकांमध्ये या अॅपचा बोलबाला आहे.

फिटनेसच्या दृष्टीने आज सर्वजण जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला दैनंदिन व्यायामाचे महत्व पटू लागले आहे. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण आज व्यायाम करतो आहे. काहीजण ज‌मि व अन्य सुविधांच्या आधारे आपले शरीर सुदृढ ठेवत आहेत. असे असताना आता ‘इम्पॅक्ट’ नावाचे अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून केलेल्या व्यायामामुळे त्यातून मिळणारे पैसे दान करून त्याचा उपयोग गरीब मुलांच्या उपजीविकेसाठी केला जात आहे.

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फिटनेस आणि सामाजिक बांधिलकी जपण्याविषयी सांगड घालण्यात आली आहे. अँड्रॉइड मोबाइलवर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. पायी चालताना, धावताना किंवा सायकल चालवताना हे अॅप्लिकेशन सुरू केल्यास प्रत्येक किलोमीटरमागे युजर्सच्या नावावर संबंधित रुपये जमा होतात. हा जमा झालेला संपूर्ण निधी सामाजिक संस्थांना देण्यात येतो. अशा प्रकारच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्किल डेव्हलपमेंट आणि अन्य समाजोपयोगी कामांसाठी वापरला जातो.

या अॅप्लिकेशनमध्ये सेन्सरची सुविधा असल्याने आपण किती किलोमीटर चालतो अथवा पळतो, ते लगेच समजते. सेन्सरच्या मदतीने किलोमीटर आणि त्याचे रुपयांमध्ये झालेले रुपांतर आपल्याला लगेच दिसते. हे अॅप्लिकेशन पारदर्शी असल्याने किती प्रमाणात आपण दान करत आहोत, ते तत्काळ समजते. रनिंग, वॉकिंग किंवा सायकलिंग करतानाच हे अॅप्लिकेशन वापरता येईल. यात कोणताही खर्च येत नाही. शरीराची किती कॅलरी बर्न झाली व आपण चाललेले अंतर याची पूर्ण माहिती मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाची मागणी घातल्याने प्राध्यापकाविरुध्द तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एका नामवंत कॉलेजमधील प्राध्यापकाने आपल्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्या‌र्थिनीला लग्नाची मागणी घातली. ही बाब विद्यार्थिनीच्या पालकांना समजल्याने त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका नामवंत कॉलेजमधील प्राध्यापकाने एका विद्यार्थ‌िनीशी बोलाचाली वाढवून त‌िला लग्नाची मागणी घातली. वेळोवेळी आपल्या मोबाइलमध्ये फोटो काढून सोशल मीड‌ियाद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून प्राध्यापकाचे असे वागणे सुरूच होते. ही बाब विद्यार्थिनीच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाला जाब विचारला. यामुळे कॉलेज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या पालकांनी यासंदर्भात सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे म्हणाले की, तक्रार अर्ज दाखल झाला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगर रस्त्यावर चारचाकी पलटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

इंदिरानगर ते सिटी सेंटर मॉलपर्यंतच्या रस्त्याने गाड्या कायमच भरधाव वेगाने जात असतात. बुधवारी (दि. २९) अशाच पद्धतीने भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीचे टायर फुटल्याने ही गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यावरून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

मनोहर नगर ते सिटी सेंटर मॉलपर्यंतच्या रस्त्यात कोठेही गतिरोधक टाकलेले नसल्याने प्रत्येक वाहन हे वेगाने जात असते. बुधवारी, दुपारी चार वाजेच्या सुमारास (एमएच १५ सीएम ८७८१) ही गाडी भरधाव वेगाने सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जात होती. याचवेळी या गाडीचे टायर फुटले असावे म्हणून ही गाडी लगतच्या दुभाजकावर जावून आदळली. या गाडीत वाहन चालकासह एक महिला असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यावर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर घटनास्थळी मुंबईनाका पोलिस ठाण्याचे कर्मचारी आले होते. त्यांनी पंचनामा करून ही गाडी याठिकाणाहून हटविली. तसेच गाडीतील एअर बॅग उघडल्याने या दोघांचा जीव वाचल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.

रॅश ड्रायव्हिंग पडली महागात फोटो-प्रशांत देसले

नाशिक : पोलिस व्हॅन दिसताच कारसह पळ काढणाऱ्या तरुणांना वाहतूक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. बुधवारी (दि. २९) शहरातील बॉइज टाऊन स्कूलकडून त्र्यंबकरोडकडे वेगात कार चालविणाऱ्या दोघांनी पोलिस गाडी दिसताच कारचा वेग वाढवून पळ काढला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तरुणांचा पाठलाग केला. या तरुणांनी त्र्यंबकरोडवरील पत्रकार कॉलनीत गाडी सोडून तेथून पळ काढला. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी पत्रकार कॉलनीतून कार (एमएच ०१ व्ही ७०८७) ताब्यात घेतली. त्यानंतर काही वेळात संशयित तरुणांपैकी एकाला संभाजी चौकातून ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघा तरुणांवर सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहन चालव‌िल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत कारवाई करण्यात आली. पत्रकार कॉलनीतील रहिवाशांनी संशयिताचे हुबेहुब वर्णन केल्यामुळे पोलिसांना मदत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी भगूरने कसली कंबर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर शहरातील दैनंदिन कचऱ्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना शहरामध्ये या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. दैनंदिन शेकडो टन कचरा निर्माण होत होता. मात्र, भगूर नगरपालिकेने लोकशिक्षण व जनजागृतीपर उपक्रम हाती घेत स्वच्छ भारत अभियानात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सेंद्रिय खत निर्मिती सुरू केली आहे. खतनिर्मितीस प्रारंभ झाला असून, नगराध्यक्षा अनिता करंजकर व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत उत्पादित खतापैकी काही खत शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.

भगूर शहरातील घनकचऱ्याच्या समस्यांच्या अभ्यासानंतर सरसकट कचरा नव्हे तर ओला आणि सुका कचरा एकत्र असणे, ही खरी समस्या असल्याचे लक्षात आले. कचऱ्याचे विलगीकरण केल्यास त्यापासून सेंद्रिय खत निर्माण करून नगरपालिकेस उत्पन्न मिळविण्याचे साधन उपलब्ध झाले आहे. वॉर्डांमध्ये जागेवर ओला कचरा, सुका कचरा, प्लास्ट‌िक, काच व धातू अशा चार प्रकारांमध्ये विलगीकरण करण्याचे ध्येय आरोग्य विभागामार्फत ठेवले. घरातूनच कचऱ्याचे विलगीकरण होण्यासाठी महिलांना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. इथवरच न थांबता कचराकुंडीमुक्त भगूर हा उपक्रम राबवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरिकांना कचरा देण्यासाठी दिवसातून दोनवेळा जीपीएस यंत्रणा असलेल्या दोन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबवण्यासाठी येथील प्रतिष्ठित नागरिक दादासाहेब देशमुख, संदीप गोरे, श्रीकांत कापसे यांची ‘स्वच्छता दूत’ म्हणून, तर धार्मिक नेता म्हणून येथील ह. भ. प. गणेश महाराज करंजकर यांना प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेने शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या संस्था, शाळा व बचत गटांचा आधार घेत त्यांच्यावर जनजागृतीची जबाबदारीदेखील सोपवली आहे. यांच्यामधून स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचे महत्त्व बिंबविण्यासाठी निबंध, चित्रकला, रांगोळी व नाट्य स्पर्धा घेण्यात येतात. त्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पारितोष‌िके दिली जातात.

स्वच्छता कक्ष

शहर स्वच्छतेसाठी दिवसातून दोनदा रस्ते सफाईसाठी २० स्वच्छता कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्हज, मास्क, गमबूट यासारखे सुरक्षा साहित्य पुरवत नेमणूक करण्यात आली आहे. आगामी काळात नगर परिषदेच्या कार्यालयात स्वच्छता कक्ष स्‍थापन करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांच्या स्वच्छताविषयक समस्यांचे निरसन केले जाईल. याशिवाय शहरात फ्लेक्स बोर्ड, मुख्य चौकामध्ये चित्रमय रंगीत बोलक्या भिंती, नगरसेवकांच्या बैठका आदी माध्यमांतून स्वच्छताविषयक जागृती केली जाणार आहे. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालये दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदुरीकर यांनी दिली.

नागरिकांना आवाहन

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नोंदणी करून सहभागी होत नागरिकांसाठी स्वच्छता अॅप हे नगरविकास विभागाच्या निर्देशानुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतील आरोग्य विभागाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगूर नगरपालितील नागरिकांनी स्वच्छता अॅपमार्फत समस्या पाठविण्याचे आवाहनदेखील नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागाशिवाय ‘स्मार्ट’शहर अशक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला निसर्गाच मोठ वरदान असून शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. त्यामुळे शहर स्मार्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न तसेच सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभागही महत्त्वाचा असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री तथा वैद्यकीय व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. नाशिक हे परिपूर्ण असल्याने राज्यातील पहिले स्मार्ट शहर म्हणून नाशिकला उदयास आणू, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला. भविष्यात ‘स्मार्ट शहर’ अशी ओळख प्रस्थापित करण्यात नाशिक यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिक म्युनिस‌िपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ताज गेटवे येथे आयोजित स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महाजन बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नॉर्वेच्या काऊन्सुलेट जनरल अॅन ओलेस्टड, विभागीय आयुक्त महेश झगडे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, स्मार्ट सिटी एलेट्सचे जोसेफ मॅक्व‌िल, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थव‌िल, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, रमेश पवार, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.

यावेळी महाजन यांनी स्मार्ट सिटीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. देशात एकूण ९८ शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली असून, त्यात नाशिकचा समावेश झाल्याने विकासाला चालना मिळणार आहे. नाशिकला निसर्गाचे वरदान लाभले असून, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक या साऱ्या दृष्टीने नाशिक परिपूर्ण शहर आहे. त्यामुळे या शहरात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. केवळ चांगले कपडे घातले म्हणजे माणूस स्मार्ट होत नाही, तर त्याचे बौद्धिक, शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच शहराचेही असून, स्मार्ट शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन, सृदृढ आरोग्य, शुद्ध पाणी, उत्तम वाहतूक व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था गरजेची असते, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

महाजन यांनी सध्याच्या शहराच्या स्थितीवरही टीका करत, आरोग्याच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या नाशिक महापालिकेला आरसाही दाखवला. शहरात आरोग्यविषयक अनेक तक्रारी आहेत. राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये असल्याने आरोग्यविषयक चांगल्या प्रकल्पांवर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांग‌ितले. स्मार्ट नाशिकअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. १६ कोटी रुपये खर्चून कौशल्य विकासाची केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे उद्योगांना पूरक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार आहे. शहर बदलासाठी प्रत्येकाने आपली मानसिकताही बदलली पाहिजे. प्रकल्प राबविताना अडचणी येतील; परंतु, लोकसहभागाशिवाय शहर स्मार्ट होणे अशक्य असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी जोसेफ, आयटीडीपीचे हर्षद अभ्यंकर, यूएसटी ग्लोबचे कार्तिक हरिहरन यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या विविध पैलूंबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

गोदाप्रकल्पावर भर

गोदावरी ही नाशिकची जीवनदाय‌िनी आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत गोदा प्रकल्प राबविला जात असून, त्याकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष असल्याचे गिरीश महाजन यांनी सांग‌ितले. या प्रकल्पासाठीची सर्व तरतूद करण्यात आली असून, त्यातून गोदावरीचे प्रदूषणही रोखले जाणार आहे. गोदा प्रकल्पाद्वारे शहराच्या पर्यटनाला तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले. नागरिकांनादेखील मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विरंगुळ्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

काँक्रिट‌ीकरणाबाबत अभ्यास

गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदीपात्रातील काँक्र‌िट‌ीकरण काढण्याची मागणी केली जात आहे. काँक्रिटीकरण काढल्यास गोदावरीतील नैसर्गिक स्रोत मोकळे होतील असा दावा केला जात आहे. परंतु, हे स्रोत मोकळे झाले तरी, चिखलामुळे गोदावरीचे प्रदूषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी पात्रातील कॉँक्रिटीकरण काढावे की नाही, याबाबत अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट रोडवर भर-महापौर

महापौर भानसी यांनी नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी ‘स्मार्ट रोड’ तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. अशोकस्तंभ ते मॉडर्न सर्कलदरम्यान पहिल्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची मांडलेली संकल्पना तडीस नेण्यासाठी सर्वांचा पुढाकार असणे आवश्यक असल्याचे सांगत, कुंभनगरीत विकासाच्या योजना राबविण्याबरोबरच गावठाणाचाही विकास होणार असल्याचे स्पष्ट केले.

तरच शहर स्मार्ट- झगडे

महेश झगडे म्हणाले, गेल्या दोनशे वर्षांत शहाराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरीकरण वेगाने होत असताना शहर विस्ताराचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तेवढाच महत्त्वाचा आहे. नियोजनाद्वारे रोजगार आणि संपत्तीची निर्मिती, उत्तम मानव विकास निर्देशांक आणि शाश्वत पर्यावरण संवर्धन या बाबी स्मार्ट शहरासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. शहरातील मुलभूत समस्या दूर करूनच

शहर स्मार्ट करता येणे शक्य असल्याचे सांगून शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, रोजगार, वाहतूक, आवास अशा विविध पैलूंचा विचार या संदर्भात होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लवकरच ई प्रमाणपत्र - कृष्णा

कृष्णा म्हणाले, नागरिकांना शहराचे आकर्षण वाटावे अशा सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी नदीघाट विकास, सीसीटीव्ही आणि इतरही प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून, लवकरच ई-प्रमाणपत्र सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शाळेकडून व्हॅनचालकावर दबाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जेलरोडच्या होली फ्लॉवर इंग्लिश मीड‌ियम स्कूलच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या पालकाच्या मुलींना शाळेत आणू नये, यासाठी या शाळेने संबंधित व्हॅन चालकावर दबाब आणला. त्यामुळे व्हॅनचालकाने या मुलींना व्हॅनमध्ये बसण्यास मनाई करुन त्यांना न घेताच गेल्याचा आरोप वैभव एकनाथ ताकटे या पालकाने केला आहे. व्हॅनचालकाने मुलींना शाळेत न नेल्यामुळे या मुलींना पालकांनीच शाळेत पोहच केले. मात्र, या पालकाला शाळेत मुख्याध्यापकांना भेटण्यास येण्याचाच निरोप व्हॅनचालकामार्फत दिला होता, असा खुलासा या शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला असून, या पालकाने केलेले आरोप धादांत खोटे असल्याचा दावाही केला आहे.

या पालकाच्या म्हणण्यानुसार या शाळेने रोखीने शालेय फी भरण्याची सक्ती करत चेकद्वारे शालेय फी स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु, वैभव एकनाथ ताकटे (रा. जगताप मळा) या पालकाने चेकद्वारेच शालेय फी भरण्याचा आग्रह केल्याने या शाळेने त्यांच्या दोन मुलींना दुसऱ्या वर्गात बसविल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची वैभव ताकटे या पालकाने उपनगर पोलिसांत तक्रारही नोंदवली आहे. परंतु, या शाळेने या पालकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

व्हॅनचालकानेकडून मनाई

वैभव ताकटे यांच्या मुलींना दररोज सकाळी घेण्यासाठी येणाऱ्या व्हॅनचालकाने बुधवारी सकाळी आपल्या व्हॅनमधून शाळेत नेण्यास मनाई केली व या मुलींना रस्त्यावर सोडून निघून गेल्याचा आरोप या पालकाने केला. शाळेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आणल्याच्या रागातूनच या शाळेने व्हॅनचालकावर दबादव टाकून आपल्या मुलींना या व्हॅनचालकाने शाळेत नेण्यास मनाई केल्याचा आरोप या पालकाने केला. काल सकाळी या मुलींना पालकांनी शाळेत पोहच केले.

शाळेला नोटीस

होली फ्लॉवर इंग्लिश स्कुल या शाळेने फी वसुलीच्या कारणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात कोंडल्याचा कथित प्रकार उजेडात येताच मनपाच्या शिक्षणाधिका-यांनी बुधवारी दुस-याच दिवशी या शाळेच्या मुख्याध्यापिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या नोट‌िशीचा या शाळेकडून खुलासा झाल्यावरच खरा प्रकार स्पष्ट होणार आहे.

माझ्या मुलींना व्हॅनचालकाने शाळेत नेण्यास नकार देत रस्त्यावर सोडून निघून गेला. शाळेनेच आपल्याला तसे सांगितल्याचे संबंधित व्हॅनचालकाने सांगितले. त्यामुळे मुलींना शाळेत आम्हीच पोहच केले. या प्रकरातून या शाळेची मनमानी उघड झाली आहे. आजपासून या शाळेच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर कुटूंबियांसोबत धरणे आंदोलन करणार आहे.

- वैभव ताकटे, पालक, होली फ्लॉवर स्कूल

होली फ्लॉवर स्कूलच्या मुख्याध्यापिकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. शालेय फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिल्याचे निदर्शनास आल्यास या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित वर्गशिक्षकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, मनपा


संबंधित पालकाशी शाळेने संपर्क केला असता होऊ शकला नाही. त्यामुळे व्हॅनचालकामार्फत त्यांना शाळेशी संपर्क साधण्याचा निरोप दिला. विद्यार्थ्यांना शाळेत आणू नये यासाठी व्हॅनचालकावर शाळेने दबाव आणल्याचा या पालकाचा आरोप खोटा आहे.

- सुदीप देव, संस्थापक, होली फ्लॉवर स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर अवतरले यमराज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘टू-व्हिलर चालवताना हेल्मेटचा वापर करा’, ‘फोर व्हिलर चालवताना सीटबेल्ट वापरा’, अशा सूचना खरे तर पोलिसांकडून दिल्या जातात. मात्र, बुधवारी या सूचना चक्क यमराजांनी रस्त्यावर येत वाहनचालकांना दिल्या. एडल्वाइज टोकियो लाइफ इन्शुरन्सच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावर वाहने चालवताना अनेक लोक सुरक्षा साधनांचा वापर करीत नाहीत. पोलिसांनी मोहीम उघडल्यानंतर तेवढ्यापुरती सुरक्षा साधने वापरतात. शहरात हेल्मेट न वापरता गाडी चालवून झालेल्या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला आहे. त्याचप्रमाणे हेल्मेट वापरल्याने अनेकांना जीवदानदेखील मिळाले आहे. हेल्मेट वापरले नाही तर माझ्या दारात यावे लागेल, असा संदेश देत बुधवारी यमराजांनी नागरिकांशी संवाद साधला. जेहान सर्कल, गंगापूर नाका, शरणपूर पोलिस चौकी याठिकाणी अवतरलेले यमराज पाहून वाहनधारकही चकीत झाले होते. यमराजांच्या माध्यमातून जनजागृतीचा हा प्रयोग चर्चेचा राहिल्याचे दिसून आले. यासंदर्भात वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. शहर वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या सकारात्मक पुढाकारांचे स्वागत केले आहे. विविध संस्थासंघटनांनी असा पुढाकार घ्यावा, त्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. रस्ते वाहतूक आणि अपघात ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. दिवसागणिक रस्त्यावर वाहने वाढत असल्याने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जागरुकता आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

आज येथे अवतरणार यमराज

यमराजांच्या माध्यमातून गुरूवारीही शहरातील काही ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. गुरुवारी (३० नोव्हेबर) सकाळी आणि दुपारच्या सुमारास सीबीएस, मालेगाव स्टॅँड आणि द्वारका या तीन ठिकाणी यमराज वाहनधारकांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब सदस्य व्हा, गेट टुगेदरची मजा लुटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी सरत्या वर्षाचा डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. म्युझिक, डान्स, स्नॅक्स अशी धम्माल कल्चर क्लब सदस्यांना करण्यास मिळणार आहे. येत्या रविवारी, ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. ज्या व्यक्ती अद्याप कल्चर क्लब सदस्य नाही अशा व्यक्तींनाही कल्चर क्लब सदस्यत्व घेऊन कार्यक्रमाची मजा लुटता येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या माध्यमातून मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. विविध पाककृतींबाबत मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे शो अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश असतो. यातील गेट टुगेदर सर्वच सदस्यांसाठी आकर्षणाचा भाग असतो. दरवर्षी वर्षाच्या अखेरीस या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.

या कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल प्रोग्रॅमने होणार आहे. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटातील गाणे तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि वेगवेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. त्यासाठी आधीच नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. फक्त कल्चर क्लब सदस्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे आजच कल्चर क्लब चे सभासद व्हा. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. तसेच कल्चर क्लब ऑनलाईन सभासदत्व www.mtcultureclub.com या वेबसाइटवरही मिळवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन जलकुंभाजवळ पाण्याचा अपव्यय

$
0
0

निशांत गार्डनजवळील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव परिसरातील निशांत गार्डनशेजारील नवीन जलकुंभाजवळ आठ दिवसांपासून पाणीगळती होत असून, पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी महापालिका प्रशासनाने पाणीगळती रोखण्यासाठी कोणतीही तजवीज केलेली नाही. त्यामुळे ही पाणीगळती थांबवण्यासाठी मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

आडगाव नवीन जलकुंभ येथील निशांत गार्डनजवळ आठ दिवसांपासून पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे पाणी वाया जात असून, पाण्याचा अपव्यय सुरू आहे. याशिवाय जमा झालेल्या पाण्यामुळे मोटरसायकल चालकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागतो. तरी ही पाणीगळती रोखण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असून, गळती रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत टाकले विषारी औषधे!

$
0
0

धोंडबारला मोठा अनर्थ टळला; विहिरीतील मासे मृत

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

धोंडबार (ता. सिन्नर) गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत अज्ञात माथेफिरुने विषारी औषधे टाकल्याने विहिरीतील सर्व मासे मृत झाले असून, सदरचा प्रकार वेळीच ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असता.

धोंडबार ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी या सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असून, या पाण्यावरच गावासह परिसरातील वाडी-वस्त्यांवरील ग्रामस्थांची तहान भागवली जाते. अज्ञात व्यक्तीने या विहिरीत पिकांवर फवारणी करावयाच्या कीटकनाशकांची पावडर व बाटल्या टाकल्याने मासे मृत झाले. बुधवारी (दि. २९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्‍थांनी तत्काळ ग्रामसेवक हेमंत पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामसेवक पवार यांनी सरपंच साबळे यांच्यासह सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. विहिरीच्या काठावर कीटकनाशकांच्या रिकाव्या पावडरच्या पिशव्या व बाटल्या आढळून आल्या. पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून दूषित पाण्याचे नमुने घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केल्या.

पाणीपुरवठा तत्काळ बंद

दरम्यान, सदर ‌विहिरीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला असून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. या प्रकरणी ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी पगार यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषित पाणी गोदापात्रात

$
0
0

रामवाडी नाल्याचे पाणी थेट रामकुंडात; प्रशासनाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा विषय हा हायकोर्टापर्यंत गेला असून प्रदुषण होऊ नये यासाठी महापालिकेला हायकोर्टाने आदेश देऊनही अजूनही गोदापात्रात प्रदूषित पाणी सर्रासपणे सोडले जाण्याचे प्रकार घडत आहेत. रामवाडीकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी थेट गोदावरी पात्रात सोडले जात आहे. हे पाणी पुढे होळकर पुलाखालून पवित्र मानल्या जाणाऱ्या रामकुंडात येते, याकडे का दुर्लक्ष केले जात आहे? असा प्रश्न नागरिक आता करू लागले आहेत.

रामवाडी, हनुमान वाडी, मोरे मळा परिसरातून वाहत येणाऱ्या नाल्याचे पाणी रामवाडीजवळील रस्त्यावरील पुलाखालून गोदापात्रात येते. येथे तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रकच्या लोखंडी पुलाखालून वाहत असलेले हे घाण, दुर्गंधीयुक्त पाणी गोदापात्र मिसळते. हा भाग रामकुंडाच्या उत्तरेला आहे. येथून वाहत जाणारे पाणी हे होळकर पुलाच्या खालून पुढे रामकुंडाकडेच जाते. त्यामुळे आता हे पाणी सोडले कसे जाते, असा प्रश्नही निर्माण होत आहे.

आरोग्याचा प्रश्न गंभीर

या पवित्र रामकुंडावर विविध ठिकाणाहून रोज हजारोंच्या संख्ये भाविक येत असतात. पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून येथे स्नान करतात. तीर्थ म्हणून मोठ्या श्रद्धेने येथील पाणी प्राशन करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. असे असताना रामकुंडात येणाऱ्या प्रवाहात जर असे प्रदूषित पाणी येत असेल तर या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे याचा विचार क्रमप्राप्तच असून, ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.

भाविकांच्या श्रद्धेला ठेच

नाशिक स्मार्ट सिटी करताना गोदावरीच्या सुशोभीकरणावर भर देण्याचे मोठ-मोठे प्लॅनिंग करण्याची स्वप्ने दाखविली जात आहेत. मात्र, अजूनही गोदापात्रात तेही पवित्र तीर्थस्थानाच्या पाण्याच्या प्रवाहात जर अशा प्रकारचे प्रदूषित पाणी मिसळत असेल तर भाविकांच्या श्रद्धेला किती मोठी ठेच पोहचत आहे, याचा विचार महापालिका प्रशासन करीत नाही, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

कोट००

गोदावरीच्या पाण्याचे प्रदुषण होऊ नये, यासाठी फक्त कागदावरच प्रयत्न केल्याचे दिसते. प्रत्यक्षात कृती होत नाही. सर्वसामान्य नागरिकांकडून चूक झाल्यास त्याच्याकडून दंड आकारणारी महापालिका प्रशासन पवित्र तिर्थस्थानावर प्रदूषित पाणी जात असताना डोळेझाकपणा का करीत आहे ? हे कळत नाही.

सुनील महंकाळे, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनवर होमगार्डची मदत?

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी होमगार्डसची मदत घेण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. मुंबईत त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुंबईतील एलफिन्सटनरोड येथे २९ सप्टेंबरला सकाळी गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक नागरिकांचे बळी गेले होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील रेल्वेस्टेशनला भेट दिऊन पादचारी पुलाची पाहणी केल्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांना रेल्वेस्टेशन व परिसरात होमगार्ड नियुक्त करण्याची सूचना केली होती. त्या दृष्टीने भुसावळ परिमंडळातील नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला येथे होमगार्डची मदत घेण्याचा प्रस्ताव आहे. मध्य रेल्वेला तो पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिकला प्रशिक्षण

मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कार्पोरेशन अधिकाऱ्यांचे (एमएसएससी) दोन दिवसांचे प्रशिक्षण नाशिकरोडच्या सामनगाव आरपीएफच्या केंद्रात नुकतेच झाले. एमएसएससी ही होमगार्डच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने तयार केलेली यंत्रणा आहे. चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊन नये म्हणून या संस्थेचे अधिकारी रेल्वे स्टेशनवर, खासकरून पादचारी पुलांवर देखरेख ठेवणार आहेत. २५९ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

याचे दिले प्रशिक्षण

मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा बलातर्फे हे दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण केंद्राचे संचालक रामभाऊ पवार, निरीक्षक राजपूत, निरीक्षक नायक, पीटर गार्विन, निरीक्षक पाल व अन्य अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिले. मुंबईतील रेल्वेस्थानकांमध्ये खासगी व सरकारी कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रचंड गर्दी असते. गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे, रेल्वेगाड्यांना तांत्रिक कारणांमुळे उश‌िर झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी कशी वागणूक ठेवावी, कसा सुसंवाद करावा, याची माहितीही या प्रशिक्षण वर्गात अधिकाऱ्यांना देण्यात आली.

प्रशासन झाले जागे

एलफिन्स्टन रोडच्या दुर्घटनेनंतर भारतीय रेल्वेने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला सक्त निर्देश देऊन मुंबईतील पादचारी पुलांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम रेल्वेने एमएसएससीच्या सातशे अधिकाऱ्यांना रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. रेल्वे आणि एमएसएससी यांनी रेल्वेस्थानकांचा संयुक्त सर्वे करुन प्रवाशांची हालचाल कशी असावी, त्यांचा रेल्वेस्थानकात येण्या-जाण्याचा मार्ग कोणता असावा, याबाबत चर्चा करण्यात आली.

होमगार्डना फायदा

राज्य सरकारने होमगार्डवरील खर्च कमी केला आहे. त्यांचे सराव सत्रही कमी केले आहेत. इस्त्री दुकान, रिक्षा, गवंडीकाम यांसारखी कामे करणाऱ्या होमगार्डमध्ये चार पैशांच्या आशेने भरती होत होती. सरकारच्या बचतीच्या धोरणामुळे त्यांच्यावर संक्रात आली आहे. नवरात्र, गणेशोत्सव आदींवरच होमगार्डची भिस्त आहे. नाशिकरोड कारागृहात होमगार्डची मदत घेतली जात होती. आता रेल्वे स्टेशनवर त्यांची मदत घेतली जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिकरोड स्थानकात रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस गस्त घालत असतात. मात्र, त्यांनाही मनुष्यबळाची टंचाई जाणवत असते. त्यामुळे भुरट्या चोऱ्या, गुंडगिरीच्या घटना येथे होतात. होमगार्डची मदत मिळाल्यास ते अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतील.

नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला येथे रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान दक्ष असतातच. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या स्थानकांवर होमगार्ड नियुक्त करण्याच प्रस्ताव आहे. लवकरच कृती अपेक्षित आहे.

- जुबेर पठाण, वरिष्ठ निरीक्षक, आरपीएफ, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण संस्थेचा कॅनॉलवर कब्जा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूर धरणातून जाणाऱ्या उजव्या कालव्यावर एका मोठ्या खासगी शिक्षणसंस्थेने कब्जा केल्याचे उघड झाले आहे. या संस्थेने चक्क कॅनॉलच बुजवून टाकला असून, त्या जागेचा वापर सुरू केला आहे. धरणाच्या पायथ्याशीच असलेल्या या संस्थेचा हा प्रताप अद्याप जलसिंचन विभागाच्या निदर्शनास आला नाही, हे विशेष!

शहरातील मुख्य भागातून गेलेल्या कॅनॉलरोडवर आधीच अतिक्रमणांचा विळखा आहे. त्यात भर म्हणून अनेक बांधकाम

व्यावसायिकांनीदेखील कॅनॉलरोडवरच इमारतींच्या पार्किंगची व्यवस्था केली असल्याचे जलसिंचन विभागाने दिलेल्या नोट‌िशींद्वारे समोर आले होते. परंतु, आता एका नामांकित खासगी शिक्षण संस्थेनेच गंगापूर धरणातून जाणाऱ्या उजव्या

कॅनॉलवर कब्जा केल्याचे चित्र आहे. संबंधित शिक्षण संस्थेने कॅनॉलचे सपाटीकरण करुन जागा वापरण्यासाठी घेतल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराकडे महापालिका व जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने यावर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शहरात नागरी लोकवस्ती स्थापन होण्याअगोदर मध्यवर्ती भागातून शेतजमिनींसाठी पाण्याची व्यवस्था या कॅनॉलद्वारे करण्यात आली होती. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर शेतजमिनींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ लागला. महापालिकेची स्थापना झाल्यावर कॅनॉलच्या बाजूलाच नागरी वस्ती उभी राहिल्याने पर्यायाने

कॅनॉल बंद करण्यात आला होता. यात महापालिकेला शहरात पिण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी जागेची गरज होती. जलसिंचन विभागाच्या पडून असलेल्या कॅनॉलमधूनच महापालिकेने परवानगी घेत पिण्याची पाइपलाइन टाकली होती. परंतु, दिवसेंदिवस महापालिका व जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आजमितीस कॅनॉल रोडवर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे काही बांधकाम व्यावसायिकांनीदेखील कॅनॉलच्या लगत अतिक्रमण केले होते. अतिक्रमण केलेल्या बांधकाम व्यावसायिकांना जलसिंचन विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, तरीही कॅनॉलरोडलगतचे अतिक्रमण कायम आहे.

धरणाच्या पायथ्याशीच असलेल्या एका नामांकित खासगी शिक्षण संस्थेने गोवर्धन शिवारात असलेल्या कॅनॉलवर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित शिक्षणसंस्थेच्या समोरील कॅनॉल गायब झालेला असूनही यावर महापालिका व

जलसिंचन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ठिकठिकाणी अतिक्रमणे वाढतच चालली आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणालगत अतिक्रमण

महापालिका व जलसिंचन विभागाच्या असलेल्या कॅनॉलवर धरणापासूनच झोपड्यांचे अतिक्रमण सुरू झाले. ग्रामीण भागातून शहरात जाणाऱ्या कॅनाालवर झोपड्यांचे रोजच अतिक्रमण होत असताना याकडे देखील महापालिका व जलसिंचन विभागाचे दुर्लक्ष असल्याने कॅनॉलची दयनीय अवस्था झाली आहे.

शेतकऱ्यांना जागा परत द्या

कॅनॉलसाठी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. कालांतराने कॅनॉलच बंद झाल्याने अखेर महापालिकेची पिण्याच्या पाण्याची थेट पाइपलाइन टाकण्यात आली होती. कॅनॉल बंद झाल्याने जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ही मागणी शासनदरबारी प्रलंब‌ित पडून असल्याचे जलसिंचन विभागाच्या

अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने तब्बल २३ किलोमीटर कॅनॉल ताब्यात घेतले असून, जलसिंचन विभाग व महापालिकेचे मालकी हक्क असल्याचेही जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीवरून ‘हल्लाबोल’

$
0
0

मटा मटा
राज्य सरकारने फसव्या जाहिराती करून जनेतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी कर्जमाफी फसवी असून, शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशा शब्दात सरकारवर आसूड ओढत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली निफाडमध्ये तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्यासह पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. निफाड मार्केट कमिटीच्या आवारातून बैलगाडीत बसून नेतेमंडळी निफाड तहसील आवारात दाखल झाले.

यावेळी दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम रंधवे, सुरेश खोडे, संपतराव व्यवहारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेच्या तालुकाध्यक्षा अश्विनी मोगल आदींनी आपल्या भाषणातून राज्य व केंद्र शासनाच्या कारभारवर जोरदार टिका केली.

बनकर म्हणाले, राज्य शासन तीन वर्षांत अपयशी ठरले आहे. सरकारने अनेक योजनांची पोकळ आश्वासने दिली. शेतकरी-शेतमजूर, कामगार, छोटे व्यावसायिक शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच घटकांत शासनाबद्दल नाराजी आहे. नोटबंदीने देश व राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकरी कर्जमाफी केवळ फार्स ठरत आहे. नवीन पिकांसाठी बँका कर्ज देत नाही. निफाड तालुक्यातील रस्ते खड्ड्यांत अडकले आहेत. तालुक्यात बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव वाढत आहे. तरीही वाड्या वस्त्यावर भारनियमन सुरू आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांवर बनकर यांनी प्रकाश टाकला. निफाडच्या नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना आंदोलनकर्त्यांनी प्रमुख समस्यांचे निवेदन दिले.

त्र्यंबकमध्येही जोरदार घोषणा

त्र्यंबकेश्वर ः त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयावर सरकार विरोधात राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चा काढला. भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याच्या घोषणा मोर्चात देण्यात आल्या. तालुकाअध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजप युतीने सत्ता मिळवली. मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातींचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळाणे यांनी सरकारवर टिका केली. जव्हार फाट्यापासून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, विद्यार्थी अध्यक्ष राहुल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार मोहन कनोजे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाप्रसंगी वसंत भोसले, लालूमन आचारी, समाधान पालवे, दीपक कसबे, एकनाथ फसले, बाळू बोडके, हेमंत काळे, संदीप चव्हाण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्य नाट्य’मध्ये मून विदाउट स्काय प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / पंचवटी
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अश्वमेध थिएटर्स संस्थेच्या मून विदाउट स्काय या नाटकाला प्रथम क्रमांकाचे तर अमृतूल्य जीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ‘उत्तरदायित्व’ यास द्वितीय तर ओम साई श्री सच्चिदानंद सामाजिक संस्थेच्या प्रयास नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
मून विदाउट स्काय आणि उत्तरदायित्व या दोन्ही नाटकांचा अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शन - १) सचिन शिंदे (मून विदाउट स्काय), २) रोहित पगारे (उत्तरदायित्व), प्रकाशयोजना : १) प्रफुल्ल दीक्षित (मून विदाउट स्काय), २) रवींद्र रहाणे (उत्तरदायित्व), नेपथ्य : १) लक्ष्मण कोकणे (मून विदाउट स्काय), २) नीलेश राजगुरू (उत्तरदायित्व), रंगभूषा : १) माणिक कानडे (आणि धम्म), २) दर्शना क्षेमकल्याणी (श्यामची आई) यांना जाहीर झाले.
उत्कृष्ट अभिनय पुरुष रौप्यपदक प्रणव प्रभाकर (मून विदाउट स्काय) आणि उत्कृष्ट अभिनय स्त्री केतकी कुलकर्णी (रक्तबिज) यांना तर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्रे पूनम देशमुख (चाहूल), श्रद्धा पाटील (मून विदाउट स्काय), लक्ष्मी गाडेकर-पिंपळे (एक्झिट), पल्लवी पटवर्धन (प्रयास), विशाल पंडव (गाढवाचं लग्न), महेश डोकफोडे (इडिपस रेक्स), तुषार मोरे (हे रंग जीवनाचे), हेमंत गव्हाणे (सती न गेलेली महासती) यांना जाहीर झाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नाशिक केंद्रावर प्राथमिक फेरीची ही स्पर्धा (दि. ६) ते (दि. २५) नोव्हेंबर या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झाली. या स्पर्धेत २१ नाटकांचे सादरीकरण झाले. रमेश थोरात, वसंत सामदेकर, अनुया बाब यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. समन्वयकाची जबाबदारी राजेश जाधव यांनी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी सात आणि आठ प्रभागातील १७ जागांसाठी ५७ असे एकूण ६४ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. याशिवाय चार मातब्बर अपक्ष उमेदवारांनी या स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यामुळे लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील प्रभागांमध्ये १७ जागांसाठी भाजपने १७, काँग्रेसने १२, शिवसेनेने १०, राष्ट्रवादीने चार जागेवर उमेदवर दिले आहेत. अपक्षांची संख्या १४ आहे. प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये भाजपच्या त्रिवेणी तुंगार बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित प्रभागांमध्ये दुरंगी, तीरंगी, चौरंगी तर प्रभाग २ अ, २ ब, ३ अ मध्ये बहुंरंगी लढत होणार आहे.

त्र्यंबक नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. राजकीय पक्षांचे प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी आमदारांसह ज्येष्ठ नेते हजेरी लावत आहेत. सर्व उमेदवारांना घेऊन शहरातून फेरी काढण्यात येत असल्याने भाविकांसह, पर्यटकांनी सतत बहरलेले त्र्यंबकेश्वरचे वातातवरण आता निवडणुकीच्या प्रचारफेऱ्यांमुळे तापले आहे.

आघाडीत बिघाडी

राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी माघार घेऊन आपण काँग्रेससोबत असल्याचे सांग‌ितले. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी प्रभाग ३ ब मधून माघार घेतली. त्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध सुटले. तसेच प्रभागात काँगेसने १२ तर राष्ट्रवादीने अवघे ४ उमेदवार दिले आहेत. बुधवारी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला तेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनुपस्थित राह‌िल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी की बिघाडी याबाबत संभ्रम आहे. याबाबत अधिकृत कोणी बोलले नाही, मात्र राष्ट्रवादी अपक्षांना बळ देण्याची शक्यता असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. एकूणच काँगेसला ही निवडणूक स्वबळावर लढावी लागणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या बिनविरोध नगरसेविका त्रिवेणी तुंगार यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, परवेज कोकणी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार्डन आजपासून चिमुकल्यांच्या सेवेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरात लहानग्यांना खेळण्यासाठी सुविधांनी परिपूर्ण गार्डनचे आज, गुरुवारी उद‌्घाटन होणार आहे. शहरात एकही गार्डन नसल्यामुळे मनमाड मध्ये लायन्स क्लब ऑफ सिटीने पुढाकार घेत लाखो रुपये खर्चून आयुडीपी येथे चिल्ड्रेन पार्क साकारले आहे. नगरपालिकेच्या सौजन्याने व लायन्सचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. प्रताप गुजराथी यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त अशा खेळणी असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क हे खास वैशिष्ट्य असणार आहे.

टीव्ही, मोबाइलच्या दुनियेत व्यस्त असलेली मुले या पार्कमुळे आता काही तास का होईना घराबाहेर उद्यानात दिसतील, असा विश्वास डॉ. गुजराथी यांनी व्यक्त केला आहे. लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीने अशा लोकोपयोगी उपक्रमाने राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. चिल्ड्रन पार्क हा या संस्थेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. डॉ. गुजराथी, विजय जैन व सदस्यांच्या प्रयत्नातून आयुडीपी भागात पालिकेच्या जागेवर या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १२ ते चौदा लाख रुपये खर्चून येथे विविध खेळण्यांसाठी साधणे बसविण्यात आली आहे. एकूण २२ प्रकारची खेळणी या पार्क मध्ये आहेत. येवला येथील आर्किटेक्ट वैशाली पाटील यांनी पार्क रचना व उभारणीसाठी विनामूल्य मार्गदर्शन व प्रत्यक्षात डिझाईन करून लायन्सच्या सामाजिक बांधिलकी ला आकर्षक दाद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूलबसमधून विद्यार्थी पडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसमध्ये कोंबल्याने एक विद्यार्थी चक्क इमर्जन्सी एक्झीट विंडोमधून बाहेर फेकला गेल्याची घटना जाखोरी येथे घडली. सिद्धांत देवीदास राजपूत असे जखमी झालेल्या विद्याथ्याचे नाव आहे. तो दुसरीच्या वर्गात शिकतो. यात कहर म्हणजे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्याऐवजी संबंधित स्कूलचालकाने जखमी विद्यार्थ्याला रस्त्यातच निर्दयीपणे सोडून दिले.

जाखोरी येथे मविप्रची प्राथमिक शाळा आहे. परिसरातील काही गावांमधील विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्यासाठी या शाळेकडे एक स्कूलबस आहे. यामधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते. स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होते. शाळेतील विद्यार्थी मंगळवारी (दि. २८) सायंकाळी नेहमीप्रमाणे स्कूलबसमधून जात असताना चढ असलेल्या रस्त्यावर एका ठिकाणी स्कूलबसच्या मागील इमर्जंन्सी एक्झिट विंडोवर ताण पडला. यात ती विंडो उघडली गेल्याने सिद्धांत राजतूत हा विद्यार्थी बसच्या बाहेर फेकला गेला. खाली पडल्याने तो जखमी झाला. त्याच्या पालकांनी शाळाप्रमुखांसह स्कूलबसच्या चालकावर कारवाईची मागणी केली आहे.

बसचालकाचा निर्दयीपणा

घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर स्कूलबस चालकाने संबधित विद्यार्थ्यावर प्रथमोपचार करण्याची गरज होती. स्कूलबसमध्ये प्रथमोपचार साहित्य उपलब्ध होते. मात्र, असे कोणतेही उपचार न करता बस चालकाने जखमी सिद्धांतला रस्त्यावरच सोडून दिल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे. जखमी विद्यार्थ्याबाबत संबंधित स्कूलबसचालकाने पालकांना माहिती देणे टाळले. त्याच्या अशा वागणुकीबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

कारवाईची मागणी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जाखोरी ग्रामस्थ बुधवारी सकाळी एकत्र जमले. त्यांनी जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराची जबाबदारी शाळेने स्वीकारावी आणि संबंधित बसचालकावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी सरपंच सुनीता कळमकर यांनी बसचालकावर कोणती कारवाई केली याची विचारणा मुख्याध्यापकांना केली. दरम्यान, शाळेने जखमी विद्यार्थ्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये बुधवारी उपचारार्थ दाखल केले.

बसमधून पडल्यानंतर माझ्या जखमी मुलाच्या उपचाराकडे बसचालकाने दुर्लक्ष केले. अशी घटना पुन्हा होऊ नये तसेच संबंधित बसचालकावर काय कारवाई केली, अशी लेखी माहिती आम्ही सरपंचांच्या मध्यस्थीने मागितली. त्यानंतर माझ्या मुलाला शाळेने आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल केले.
- देवीदास राजपूत, जखमी विद्यार्थ्याचे पालक

घटनेतील जखमी विद्यार्थ्याला ‘मविप्र’च्या आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल केले. रस्ता खराब असल्याने आणि क्लिप्सची झीज झालेली असल्याने इमर्जन्सी एक्झिट विंडो अचानक उघडल्याने ही घटना घडली. खबरदारीची उपाय म्हणून बसची तात्काळ शोरुममध्ये नेऊन तपासणी व दुरुस्ती करून घेतली आहे.
- रवींद्र गांगुर्डे, मुख्याध्यापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका जागेसाठी सटाण्यात पोटनिवडणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा,

सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग ५ अ मधील पोटनिवडणुकीसाठी भाजप, सटाणा शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षात सरळ सामना रंगत आहे. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

शहरातील प्रभाग ५ अ हा अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या महिला राखीव प्रवर्गासाठी राखीव आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीतून या प्रभागातून भाजपच्या लता सोनवणे या विजयी झाल्या होत्या. मात्र त्यांना तीन अपत्य असल्याची तक्रार पराभूत उमेदवार निर्मला सोनवणे यांनी केली होती. यावर मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोनवणे यांच्या विरूद्ध निकाल देत त्यांना अपात्र घोषित केले होते. यामुळे रिक्त पदासाठी १० डिसेंबर पोटनिवडणूक होत आहे. यामुळे प्रभाग क्र. ५ अ मधील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान नगरसेवकांविषयी तक्रार करणाऱ्या तत्कालीन पराभूत उमेदवार निर्मला सोनवणे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आशा भामरे यांनी उमेदवारी ‌देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात २६ हजार पक्षी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

वन्यजीव विभाग नाशिक व पक्षीमिञ मंडळ निफाड यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी ८.३० ते १२.३० या दरम्यान नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षीगणना करण्यात आली. सध्या अभयारण्यात पक्षांच्या अधिवास आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत देश विदेशातील विविध रंगी आणि आकाराचे पक्षी सध्या मुक्त आणि स्वछंद विहार करताना दिसत आहेत. काल झालेल्या पक्षी गणनेत २६ हजार पक्षांची नोंद झाली आहे.

वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्रपाल भगवान ढाकरे, निफाड येथील पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले, पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर, किरण बेलेकर, राहुल वडघुले, गंगाधर आघाव, अमोल दराडे, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे आदीनी या पक्षीगणनेत सहभाग घेतला.

सध्या स्थलांतरीत व स्थानिक पक्ष्यांचा हंगाम सुरू आहे. पक्षीनिरीक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. वन्यजीव कर्मचारी, स्थानिक गाईड माहितीसाठी मदत करतात. -डॉ. उत्तमराव डेर्ले, अध्यक्ष, पक्षीप्रेमी मंडळ

हे पक्षी आढळले

रिफ एग्रेट, कोलार्ड, पीड मायना, डार्टर, लार्ज कॅरमोरनट, ग्रेट कॅरमोरनट, नॉर्थर शॉवेलर, कॉब डक, गढवाल, गरगोनी, व्हिस्टील डक, व्हाइट, ब्लॅक, पर्पल, ग्लोसि इबिस, मार्श हॅरिअर, कॉमन केष्ट्रल, काईट, स्पोटेड ईगल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>