Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आशावाद-मेहनतीने तणाव करा हद्दपार

$
0
0

मटा डिबेट

--

(संकलन : बागेश्री पारनेरकर, यश कुलकर्णी)

--

आशावाद-मेहनतीने तणाव करा हद्दपार

--

सातत्याने येणारा स्पर्धेचा तणाव, करिअरमध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष किंवा नात्यांमध्ये होणारी घुसमट असे काहीसे भावविश्व सद्यःस्थितीत तरुणाईचे बनले आहे. मात्र, कार्यमग्नता, सकारात्मक विचारांची जोपासना आणि आशावादाला दिलेली प्रामाणिक मेहनतीची जोड तरुणांना नक्कीच तणावापासून चार हात दूर ठेवू शकते, असा आशावाद ‘मेंटल वेलनेस’ या शीर्षकांतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’मधून व्यक्त झाला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पार पडलेल्या या उपक्रमास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मेंटल वेलनेस या संकल्पनेनुसार ‘मना सज्जना’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वृत्तमालिकेच्या माध्यमातून विषयाची मांडणी झाल्यानंतर आता ‘मटा डिबेट’च्या माध्यमातून थेट तरुणांशी संवाद साधला जात आहे.

--

तज्ज्ञ, विद्यार्थ्यांनी साधला संवाद

या उपक्रमांतर्गत ‘युवकांना तणावाचा सामना करावा लागत आहे का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस प्राचार्य डॉ. धनेश कलाल, विद्यार्थिनी मंचच्या प्रमुख डॉ. आश्लेषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कॉलेजची माजी विद्यार्थिनी धनश्री जोशी हिने विविध अनुभव सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही ताणाची विविध कारणे, उपाय, आलेले अनुभव सांगत चर्चेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

--

प्रेरक बाबींना द्या प्राधान्य

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य धनेश कलाल म्हणाले, की तरुणांनी सोशल नेटवर्किंगसारख्या नवमाध्यमांचा उपयोग अत्यंत जबाबदारीने करायला हवा. याशिवाय स्वत:तील कलागुण, छंदांना जास्त वाव देण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही निश्चितच तणावापासून दूर राहाल. डॉ. आश्लेषा कुलकर्णी यांनी तरुणांना वाचनाची आवड जोपासण्याचा सल्ला दिला. तणावापासून चार हात दूर राहण्यासाठी श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाकडे प्रेरक ग्रंथ म्हणून बघा आणि त्याचा अभ्यास करा, असे आवाहन केले. कॉलेजची माजी विद्यार्थिनी धनश्री जोशी हिने युवकांना विविध कारणांनी येणारे ताण, त्यातून बाहेर पडण्याचे उपाय यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मिस ग्लोबल इंटरनॅशनल एशिया विजेती भैरवी बुरड हिनेही मतप्रदर्शन केले. ती म्हणाली, की कोणत्याही क्षेत्रात ताण-तणावाचे प्रसंग येतातच. हाच अनुभव मिस ग्लोबल इंटरनॅशनल एशिया हे टायटल जिंकलेल्या स्पर्धेच्या काळात आला. आपण तणावाला कसे सामोरे गेलो हे तिने सांगितले.

--

तणावातून बाहेर पडण्याचे काही उपाय

---

-योगा, प्राणायाम, व्यायाम यांना महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे ताण-तणावाचे प्रसंग आले, तरी त्रास जाणवत नाही.

-आपल्या जवळच्या व्यक्तीशी, मित्र-मैत्रिणींशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत.

-चांगल्या कामात, कॉलेजच्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे.

-स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने केली, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ.

---

तुम्हीही घ्या पुढाकार...

--

विद्यार्थिमित्रांनो, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, कॅम्पस अन् कट्ट्यावर अनेक जण कुठल्या ना कुठल्या तणावाचा सामना करीत असतात. अनेकदा त्यांची घुसमट कुठे मांडली जात नाही. मग तिचे रुपांतर कळत-नकळत नैराश्यात होत जाते. हे सर्व टाळण्यासाठी तुमच्यासारख्या सर्वच आशावादी तरुणांना सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र टाइम्स’ एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. या व्यासपीठावरून तुम्हाला तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठीचा दुवा बनता येणार आहे. या चांगल्या कार्यासाठी तयार असाल, तर आमच्याशी संपर्क साधा अन् ‘मेंटल वेलनेस’ या उपक्रमाचा एक भाग बना. संपर्कासाठी इ मेल आयडी : mataanashik@gmail.com

--

विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्दे...

--

संवाद वाढविण्याची गरज

नात्यांतील दुरावा हेदेखील ताणाचे एक कारण आहे. आपल्या जोडीदाराशी किंवा मित्रमंडळींशी मनमोकळेपणाने न बोलल्यामुळे नात्यांतील दुरावा वाढतो. अनेक गोष्टी आणखी बिघडतात, साहजिकच यामुळे ताण हा वाढतो. त्यासाठी शक्य तितका संवाद वाढवावा.

-पूजा पिंगळे

--

ताणाचे व्हावे व्यवस्थापन

ताण हा काही वेळा उगीच घेतला जातो. अतिविचार करणे हे त्याचे कारण असू शकते. बऱ्याचदा अशा ताणाचे रुपांतर नैराश्यात होते. अशा वेळेस योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन व ताणाचे योग्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच ताण कमी होऊ शकतो.

-नेहा कुलकर्णी

--

स्वतःला आेळखणे महत्त्वाचे

एखाद्या गोष्टीचा जास्त व अनावश्यक विचार केल्यावर ताण येतो. नैराश्य हे ताणाचे जोड उत्पादन आहे. मात्र, काही प्रसंगी ताण हा फायद्याचादेखील असतो. मात्र, ताण-तणावातून बाहेर पडण्यासाठी युवकांनी स्वतःला ओळखण्यास प्राधान्य देणे गरजेचे.

-अश्विनी कुलकर्णी

--

आत्मविश्वासाने मात शक्य

हे काम माझ्याकडून होईल की नाही, हे नाही झाले तर... अशा विचारांमुळे ताण निर्माण होतो. अशा प्रकारच्या विचारांमुळे मनावर येणारे दडपण म्हणजेच ताण. अशा वेळी मनातील सर्वच न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासने ताणावर मात करता येते.

-अंकिता मयेकर

--

आवडीच्या गोष्टींना द्यावे प्राधान्य

युवकांना अनेक कारणांमुळे ताण येतो, जसे की परीक्षेचा ताण, नोकरीसंदर्भातील ताण. कधीतरी ताण गरजेचा असतो. पण, तो जास्त नसावा, त्याची पातळी मध्यम असावी. अशा वेळी आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात, जसे की मला ताण आल्यास मी गाणी ऐकते.

-राधिका भार्गवे

--

तणावास असतात दोन बाजू

नाण्याप्रमाणेच प्रत्येक गोष्टीच्याही दोन बाजू असतात. ताण हा फायदेशीरही असतो आणि काही वेळा घातकही. या ताणामुळेच काही लोकांनी अपयशातून मोठे यश मिळविले, तर काही जीव गमवून बसल्याचीही उदाहरणे आहेत. वास्तव व अपेक्षेतील अंतराचा हा खेळ आहे.

-शुभम गोसावी

--

वाढती असुरक्षितता त्रासदायक

अभ्यास, परीक्षेचे टेन्शन, नोकरी, नात्यातील घडामोडी यामुळे तर ताण येतोच. पण, तरुणींना समाजात वावरताना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आजची तरुणी जास्त तणावग्रस्त झाली आहे. हे टाळण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे.

-वैष्णवी शिरसाठ

--

पुरेशा संवादाचा अभाव

तरुणांना अनेक वेगवेगळ्या कारणांनी ताण येतो. शिक्षणानंतर आता चांगला जॉब मिळेल की नाही, या गोष्टीने ताण येण्याचे प्रमाणही तरुणांमध्ये दिसते. हल्ली चांगले मार्क्स मिळूनही चांगली नोकरी मिळत नाही. त्यामुळे, तसेच संवादाच्या अभावाने अनेक जण तणावग्रस्त होतात.

-इंद्रजित मिश्रा

--

योगा, व्यायाम उपयुक्त

मी स्वतः एक खेळाडू आहे. पण, अनेकदा अभ्यास आणि खेळाच्या मॅचेसचा समतोल राखताना ताण-तणावाचे प्रसंग येतात. त्यामुळे मी खेळ सोडायचा विचारही केला होता. पण, प्रशिक्षक, घरच्यांनी मला धीर दिला. योगा, व्यायाम, मेडिटेशन याचाही मला खूप फायदा झाला.

-निकिता दरेकर

--

योग्य वेळी हवे मार्गदर्शन

कॉलेजच्या एका कार्यक्रमात मला आभार प्रदर्शन करायचे होते. त्यापूर्वी मी कधीच लोकांसमोर बोललो नव्हतो. त्यावेळी मला खूप टेन्शन आले होते. पण, शिक्षकांच्या सपोर्टमुळे मी बोलू शकलो. मला वाटते, की तणावाच्या काळात योग्य मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते.

-अनिरुद्ध दीक्षित

--

स्वीकारण्याचा गुण गरजेचा

सोप्या भाषेत ताण म्हणजे अतिविचार. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, तर ती गोष्ट मनात राहिल्यामुळे आपल्याला त्रास होतो. परिणामी ताण येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असे नाही.

-गायत्री देसाई

--

सकारात्मकतेने मात शक्य

कॉलेज लाइफमध्ये परीक्षा, सबमिशन, निकाल या गोष्टींमुळे अनेकदा टेन्शन येते. एखादा विषय राहिला किंवा इयर ड्रॉप असेल, तर नैराश्य येते. परीक्षेत येणार अपयश बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ताणाचे मुख्य कारण असते. त्यावर सकारात्मकतेने मात करणे शक्य आहे.

-उत्कर्षा सावजी

--

स्वत:तील क्षमता ओळखावी

प्रत्येकाने स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे. कारण, बऱ्याचदा स्वतःच्या क्षमतेपेक्षा आपण जास्त अपेक्षा ठेवतो. ती गोष्ट मनासारखी घडली नाही, तर आपल्याला त्याचा त्रास होतो. आपण काहीच करू शकत नाही, असे विचार मनात येतात. हे प्रकर्षाने टाळायला हवे.

-प्राजक्ता जोशी

--

मनावरील ताबा महत्त्वाचा

ताण-तणाव बऱ्याच कारणांनी येतात. पण, त्यातून बाहेर पडण्याचे उपाय आपण शोधले पाहिजेत. मानसिक संतुलन बिघडण्याचे एक कारण म्हणजे आपल्या मनावर आपला ताबा नसणे. त्यासाठी योग, प्राणायाम करावेत. त्यामुळे आपले मन शांत राहते, त्याचा त्रास जाणवत नाही.

-शुभम जोशी

--

आवडीवर एकाग्रता गरजेची

प्रत्येकाच्या आयुष्यात ताण-तणाव असतातच. खरे तर ताणाशिवाय आयुष्याला मजा नाही. पण, सध्या या ताणाचे विपरित परिणाम तरुणाईवर होताना दिसत आहेत. यावर प्रभावी उपाय म्हणजे या ताणाकडे दुर्लक्ष करून आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीत मन एकाग्र करणे हा होय.

-प्रकाश बोंबले

--

बाहेर पडण्याचे उपाय शाेधावेत

ताण-तणावाची कारणे शोधण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचे उपाय शोधले पाहिजेत. अनेकदा आपण मनात काही गोष्टी ठेवतो, त्या बोलत नाही. त्याचा ताण मनावर येतो. त्यामुळे आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत आपल्या मनातल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत.

-प्रणव दाणी

--

मेडिटेशन ठरते उपयुक्त

मी नाटकात काम करते. त्यामुळे बऱ्याचदा प्रयोगाच्या आधी खूप दडपण येते. आपण व्यवस्थित काम करू ना, काही विसरणार तर नाही ना, असे अनेक प्रश्न मनात येतात. मेडिटेशन हा यावरचा उत्तम उपाय ठरला आहे. आपण आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जायला हवे.

-सृष्टी वाघमारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारच्या धडकेत साईभक्त ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

घोटी मार्गावर हरसुले फाट्याजवळ भरधाव वेगात येणाऱ्या इर्टिका कारने साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईपालखी सोहळ्यातील चार पादचारी साईभक्तांना धडक दिल्याने एक साईभक्त जागीच ठार झाला, तर इतर तीन जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. १०) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. रोशन गणेश लगड (वय २०, रा. सर्वतीर्थ टाकेद, ता. इगतपुरी) असे मृत्युमुखी पडलेल्या साईभक्ताचे नाव आहे.

रविवारी पहाटे सर्वतीर्थ टाकेद येथून निघालेली साईपालखी सिन्नर-घोटी मार्गाने सिन्नरच्या दिशेने येत असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास हरसुले फाट्याजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या इर्टिका कारने (एमएच ०४, जीयू ३११३) पायी चालणाऱ्या चार साईभक्तांना चिरडले. या अपघातात रोशन गणेश लगड हा जागीच ठार झाला, तर राहुल राजाराम लगड (वय २०), योगेश बाळू भुसे (वय २३), पांडुरंग संपत काळे (वय २२), टाकेद खुर्द हे तिघे जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तत्काळ धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक लोखंडे धाव घेत घटनेचा पंचनामा केला. अपघातानंतर साईभक्तांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. आमदार राजाभाऊ वाजे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन साईभक्तांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सिन्नर पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून, कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी साईभक्त मृत्युमुखी

गेल्या दोन-तीन दिवसांत साईभक्त ठार होण्याची ही दुसरी घटना आहे. महागार्मांच्या रुंदीकरणानंतर वाहनांचा वाढलेला वेग साईभक्तांच्या जीवावर उठला आहे.

सटाण्यात अपघातात एक ठार

सटाणा : लखमापूर (ता. बागलाण) येथे शनिवार संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सटाण्याकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या १८ चाकी कन्टेनर (आर जे.०९ जे.बी. ५२९६)ने लखमापूर बसस्टॉपजवळ प्रकाश काशिनाथ दळवी (वय ६२) यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश दळवी हे कामानिमित बसस्टॉपवर आले असता भरधाव कन्टेनरने त्यांच्या मोटरसायकलला कट मारल्यानंतर मोटरसायकल कडेला पडली व दळवी कन्टेनरमध्ये सापडल्यामुळे जागेवरच गतप्राण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडथळ्यांची शर्यत थांबेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहराच्या वाढत्या लोकवस्तीत रस्त्यांची समस्याही बिकट बनली आहे. महापालिकेने आरक्षित केलेले अनेक डीपीरोड आजही झाले नसल्याने अरुंद रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सातपूरमधील असलेल्या अशोकनगररोडवरही अशीच स्थिती असून, वाहनचालकांना रोजच करावी लागणारी अडथळ्यांची शर्यत संपणार केव्हा, असा सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.

सातपूर परिसरातील रस्त्यांच्या समस्यांप्रश्नी येथील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी महापालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे. परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणीही सातत्याने केली जात आहे. परंतु, केवळ निधीअभावी काम रखडल्याने अशोकनगररोडवर वाहनचालकांवर रोजच वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अशोकनगररोडच्या विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्ता रुंदीकरणाचे काम कधी मार्गी लागणार, असा सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.

--

डीपीरोडची कामे रखडली

देशात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचेही नाव घेतले जाते. केंद्र सरकारनेदेखील शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केला आहे. परंतु, असे असतानादेखील महापालिकेची स्थापना झाल्यावर सरकारने आरक्षित केलेल्या डीपीरोडची कामे आजही अपूर्ण असल्याने शहरातील सर्वच भागात खडतर प्रवास करण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे. विशेष म्हणजे याकरिता शेतकऱ्यांनीदेखील आरक्षित असलेल्या जमिनी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, महापालिकेची यंत्रणा याकडे लक्षच देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. डीपीरोडची कामे प्रलंबित असल्याने जुन्या रस्त्यांवर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे रोजच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

--

पालकमंत्र्यांनाही साकडे

सातपूर भागातील अशोकनगररोडवर रोजच वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहने चालवावी लागत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन नुकतेच शिवाजीनगरला विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले असताना येथील नगरसेवक तथा सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अशोकनगर रस्त्याची समस्या मांडली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी अशोकनगररोडच्या रुंदीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, प्रत्यक्षात कामास केव्हा प्रारंभ होतो, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

--

बसचालकांचीही उडतेय तारांबळ

अशोकनगररोडवरून रोजच शेकडो वाहने धावत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. त्यातून रोजच किरकोळ अपघात होत वादावादीचे प्रकार घडत अाहेत. काही कंपन्यांचे गेट अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर असल्याने अवजड वाहनांचाही त्रास कामगार, वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अनेकदा झालेल्या अपघातांत कामगारांना प्राण गमावण्याचीदेखील वेळ आली आहे. याप्रश्नी महापालिका व वाहतूक पोलिस उपाययोजना करणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर, तसेच रस्त्याच्या कडेलाच उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अन्य वाहनचालकांसह बसचालकांनादेखील चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने अशोकनगर रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण करावे, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

---

लोकवस्ती वाढत असलेल्या सातपूर भागातील अशोकनगररोडवर रोजच सायंकाळी वाहतूक कोंडी होते. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी कामगारांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्याकडे महापालिकेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

-अजय नायर, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात नाशिक अव्वल

$
0
0

लोकअदालतीत तब्बल ५३ टक्के खटले निकाली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा कोर्टाने एक लाख २७ हजार ४ इतक्या प्रकरणांमध्ये समझोता घडवून आणला. राज्यभरात एकूण दोन लाख ४१ हजार ३८८ दावापूर्व आणि प्रलंबित खटले निकाली काढण्यात आले. इतर राज्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात ५३ टक्के खटले निकाली निघाले असून, हा एक विक्रमच ठरला आहे. पुणे दुसऱ्या तर सातारा जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला.

दररोज दाखल होणाऱ्या हजारो खटल्यांमुळे न्यायव्यवस्थेवरील ताण वाढत आहे. प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीस गती नसताना नव्याने दाखल होणाऱ्या दावापूर्व खटल्यांची सुनावणी केव्हा होणार याची भ्रांत पक्षकाराला असते. न्याय उशिरा मिळणे हादेखील एक अन्यायच ठरतो. न्यायव्यवस्थेवरील हा ताण कमी करण्यासाठी लोकअदालतीचा पर्याय समोर आणण्यात आला. राज्यभरात नाशिकसह पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर अशा ३५ जिल्हा न्यायालयांमध्ये ९ डिसेंबर रोजी लोकअदालत पार पडली. दावापूर्व आणि प्रलंबित असे एकूण १० लाख ४३ हजार १६ प्रकरणे ठेवण्यात आली. नाशिकमधून सर्वाधिक म्हणजे तीन लाख ६७ हजार ८५० प्रकरणे समझोत्यासाठी पुढे आली. राज्यातील एकूण प्रकरणांपैकी दोन लाख ४१ हजार ३८८ प्रकरणावर तडजोड झाली. यात नाशिकमधील एक लाख २७ हजार ४ प्रकरणांचा समावेश होता. बँका, इन्शूरन्स, चेक बाऊन्स, कर थकबाकी, वीज महामंडळाची थकीत बिले अशा प्रकरणांमध्ये १२६ कोटी रुपयांची विक्रमी वसुलीदेखील नाशिक जिल्ह्यात झाली. याबाबत बोलताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले, की लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त खटले यावे, दोन्ही पक्षांमध्ये बोलणी व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केला. मागील दोन ते अडीच महिने ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करून लोकअदालतीचे फायदे समजावून सांगण्यात आले. अगदी तालुकास्तरावर आयोजित होणाऱ्या पथनाट्यांमध्ये न्यायाधिशांनी भाग घेतला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांच्यासह न्यायव्यवस्थेशी संलग्न सर्वच घटकांनी व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम हाती घेतल्याचा चांगला परिणाम झाला. जिल्ह्याभरात पक्षकारांनी तसेच वकिलांनी आम्हाला साथ दिली, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल

लोकअदालतीचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना झाला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या करांचा भरणा नागरिकांनी झटपट केला. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच १०० टक्के वसुली झाली. मार्च महिना उजडण्यास अद्याप अवकाश असताना ग्रामपंचायतींची विक्रमी वसुली झाली. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी तर आंनदोत्सव साजरा करीत फटाके फोडले.

पुणे दुसऱ्या तर सातारा तिसऱ्या स्थानी

जिल्हा - प्रकरणे - निकाली खटले

नाशिक - ३ लाख ६७ हजार ८५० - १ लाख २७ हजार ४,
पुणे - १ लाख ८ हजार ७३ - ३० हजार १५३
सातारा - १ लाख २ हजार ८७९ - २० हजार ७७३
नागपूर - २५ हजार ६६३ - ११ हजार २४०
यवतमाळ - १९ हजार ९७९ - ७ हजार ८७९
धुळे - २१ हजार ५२ - ४ हजार ८०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब मेंबर होणे आता सोपे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचा डिसेंबर महिना ‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब सभासदांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे डिसेंबर महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१७ डिसेंबर रोजी सिझलिंग ब्राउनी, तसेच ख्रिसमस स्पेशल केक कसा बनवायचा, या संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच २५ डिसेंबर रोजी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या ‘कवितेचं गाणं होताना’ या कार्यक्रमाने होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कल्चर क्लबचे मेंबर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी बीसीसीएल नावाने २९९ रुपयांचा चेक आपल्या जवळच्या सेंटरवर जमा करायचा आहे. तेथे एक फॉर्म दिला जाईल. तो भरून द्यायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे कार्ड देण्यात येईल. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com. अधिक माहितीसाठी संपर्क - (०२५३)-६६३७९८७, ७०४०७६२२५४

नोंदणी केंद्रे

- दंडे ज्वेलर्स प्रा. लि., उड्डाणपुलाजवळ, दत्तमंदिर, नाशिक रोड

- मिश्रा पेपर स्टॉल, सरदार चौक, पंचवटी

- मानस एंटरप्राययजेस, साईबाबा मंदिरासमोर, राजीव नगर

- युवर चॉईस, हिरे शाळेजवळ, पवन नगर, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांना संरक्षण!

$
0
0

दोन दिवसांत ग्राहक संरक्षण समितीची होणार घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांच्या हिताशी बांधिलकी असलेली जिल्हा ग्राहक संरक्षण समिती गठित करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुदत संपल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून निष्क्रिय झालेल्या या समितीची दोन दिवसांत घोषणा होणार असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना वाली लाभणार आहेत.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण समिती काम करते. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून, पुरवठा अधिकारी उपाध्यक्ष असतात. महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम, २००४ नुसार जिल्ह्यात ग्राहक संरक्षण समिती गेली अनेक वर्षे काम करीत आहे. तीन वर्षे कारभार पाहणाऱ्या या समितीचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर लगेचच नवीन समिती स्थापन होणे आवश्यक असताना दोन महिने जिल्हा प्रशासनाला त्यासाठी मुहूर्तच गवसला नाही. परिणामी आजतागायत नवीन समिती स्थापन होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेली दोन महिने जिल्ह्यातील ग्राहकांना कुणीही वाली नव्हते. परंतु, ही समिती स्थापन करण्याच्या हालचाली आता गतिमान करण्यात आल्या आहेत.

पाच सदस्यांची निवड

पूर्वीच्याच समितीमध्ये सक्रिय असणाऱ्या पाच सदस्यांची निवड निश्च‌ति झाली असून, उर्वरित २३ सदस्यांची निवड मंगळवारपर्यंत केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आण‌ि समितीचे उपाध्यक्ष सोपान कासार यांनी दिली.

समितीत असणार ४० सदस्य

या समितीमध्ये एकूण ४० सदस्य असणार आहेत. त्यापैकी १२ सदस्य शासकीय तर २८ सदस्य अशासकीय असतील. अशासकीय सदस्यांची नेमणूक करता यावी, यासाठी दोन दिवसांपूर्वी ४० जणांना जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीला बोलाविण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय व्यवसाय, व्यापार-उद्योग, पेट्रोल, गॅस, शेतकऱ्यांचे प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील ३० जणांनी या मुलाखतींना हजेरी लावली. त्यामधून एकूण २८ अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकार्यच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरातील अनुदानित समाजकार्य कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी तीन महिन्यांत देण्यात यावी, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे समाजकार्य कॉलेजेसमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स या संघटनेने दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान हा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण हा निर्णय सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित समाजकार्य कॉलेजेसला लागू होणार नाही, असा आदेश आठ मार्च २०११ रोजी राज्य सरकारने काढला होता. त्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स या संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप बारहाते यांनी हायकोर्टात दाखल केली होती.

राज्य सरकारने २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करीत असताना १ जानेवारी २००६ ते ३१ मार्च २०१० या काळातील थकबाकी समाजकार्य कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण विभागातील अनुदानित कॉलेजमधील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात आली. केवळ समाजकार्य कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना वगळून राज्य सरकारने भेदभाव केला असल्याचा दावा याचिकेत केला. सदर बाब उच्च न्यायालयाने मान्य केली. तसेच एक जानेवारी २००६ ते ३१ मार्च २०१० पर्यंतची थकबाकी तीन महिन्यांत द्यावी, असा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐनवेळी सूचना देणे विद्यापीठाला पडले महागात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ज्या विद्यार्थ्यांची वर्षभरातील वर्गातील उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना परीक्षेस न बसू देण्याबाबतची सूचना ऐनवेळी देणे पुणे विद्यापीठाला महाग पडले आहे. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाबाबत ही घटना घडली होती. या प्रकाराचा खुलासा आता शिक्षण संचालकांनी मागविला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या दहा विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याच्या कारणावरून त्यांना पेपरला बसू न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली होती. यावर डॉ. माने यांनी विद्यापीठाने नियमाचे उल्लंघन केल्याचे सांगत विद्यापीठ प्रशासनाला या प्रकाराबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
हा प्रकार पुण्यात घडला असला तरीही याची चर्चा नाशिकमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. पुरेशा उपस्थिती अभावी परीक्षेला बसता येणार नसल्याची सूचना संबंधित विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेच्या केवळ एका तासापूर्वी करण्यात आली. असा निर्णय किमान तीन दिवस विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कळविणे अपेक्षित आहे. या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या सत्रातील एक पेपर दिल्यानंतर दुसऱ्या पेपरपूर्वी प्रशासनाने हा निर्णय त्यांना सांगितला. विभागाकडून आपल्याला मुद्दाम मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यापूर्वी केला होता. त्यानुसार मराठी विभागातील या विद्यार्थ्यांनी डॉ. माने यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांना सांगितला. डॉ. माने यांनी नियमावर बोट ठेवत कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांना पत्र पाठवून या प्रकरणी अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षण मंडळाला मिळाला हक्काचा ‘निवारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाला लवकरच हक्काची इमारत मिळणार आहे. आडगाव येथे ७ एकर जागेवर इमारत अशी हक्काची इमारत साकारण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षक संघटनांच्या झालेल्या बैठकीत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.

अनेक वर्षांपासून दहावी, बारावी परीक्षा मंडळ भाडे तत्वावरील इमारतीत कार्यरत होते. मंडळाच्या हक्काच्या इमारतीसाठीही अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मंडळाचे कार्यालय द्वारका चौकाजवळील वाणी हाउसमध्ये भाडे तत्वावर होते. या इमारतीला दरमहा चार लाख साठ हजार रुपये भाडे द्यावे लागत होते. हे भाडे विभागीय मंडळाला न परवडणारे आहे. म्हणून विभागीय मंडळाचे तत्कालीन सचिव एस. एस. म्हस्के याच्या पुढाकाराने आडगाव येथे ७ एकर जागा घेतली आहे. या जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याने हे बांधकाम प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार बाळासाहेब सानप यांनी यावेळी डिसेंबर अखेरपर्यंत ही सर्व अनधिकृत बांधकामे हटवून जानेवारी महिन्यात या भव्य इमारतीचे बांधकाम सुरू करणार असल्याची घोषणा केली. या बांधकामासाठी विभागीय मंडळाकडे २३ कोटी रुपये निधी उपलब्ध आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींच्या सहभागातून ५० कोटी रुपयांची इमारत उभारणार असल्याची माहिती अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिली. या बैठकीसाठी सचिव आर. आर. मारवाडी, सहसचिव मच्छिंद्र कदम, सहाय्यक सचिव वाय. पी. निकम, लेखाधिकारी श्वेता भोसले, कैलास सांगळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर, दत्ता वाघ उपस्थित होते.

अशा असणार सुविधा
नव्या इमारतीत भव्य पार्किंग, मिटिंग हॉल, पेपर सेटिंग हॉल, मुख्याध्यापकांसाठी वेटिंग हॉल, मूल्यांकन कस्टडी हॉल यासह अद्यावत सोयी-सुविधा व गार्डन अशा सुविधा असणार आहे. या इमारतीत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचे कार्यालय सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शिक्षक परिषद आंदोलनाच्या तयारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे निवेदन अनेक वेळा दिले असतानाही केंद्रनिहाय अधिकारी पदाची (बीएलओ) कामे देण्यात आल्याने शिक्षकवर्गात मोठी नाराजी आहे.

शिक्षकांना या कामास वेठीस धरले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबी विचारात घेत ‘बीएलओं’ची कामे शिक्षकांकडून काढून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. अन्यथा, या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येईल, असा इशारा परिषदेकडून देण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

शिक्षकेतर कामांनी शिक्षकांमध्ये मोठा अंसतोष आहे. प्रथम सत्र परीक्षेचा निकाल, मूल्यमापन परीक्षा, पेपर तपासणी, ऑनलाइन गुणदान व अध्यापनाचे कामकाज या शालेय कामांची जबाबदारी पेलण्याबरोबर ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरण्यासारखी कामे शिक्षकांकडे असताना आता पुन्हा ‘बीएलओं’ची कामेही थोपवण्यात आल्याने शिक्षकांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काही शाळांमधील सर्व शिक्षकांना बीएलओची कामे देण्यात आल्याने शैक्षणिक काम ठप्प होणार आहेत. त्यामुळे ही कामे रद्द करावीत, अन्यथा कामांवर बहिष्कार टाकून आंदोलन करण्यात येईल, अशे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शंकर सांगळे, कार्यवाहक दत्ता वाघे पाटील यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी कोणाचा फडकणार झेंडा?

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी नगरपालिका निवडणुकीत विजयासाठी भाजपसह शिवसेनेचे जिल्ह्यातील दिग्गज नेते तळ ठोकून आहेत. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या या इगतपुरी नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठी जनतेकडून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घातली जाते याचीही उत्सुकता आहे.

नगराध्यक्षपदी विजयाचा दावा करणाऱ्या उमेदवारांमध्ये फिरोज पठाण, संजय इंदुलकर, महेश शिरोळे, बद्रीनाथ शर्मा, आदींसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, भाजपच्या समर्थनार्थ जिल्हाध्यक्ष दादा जाधवराव, नगरसेवक दिनकर पाटील, माजी आमदार शिवराम झोले, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे आदी नेते तळ ठोकून होते. तर शिवसेनेच्या समर्थनार्थ जिल्हाध्यक्ष विजय करंजकर तसेच नाशिक महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांचेही निवडणुकीकडे लक्ष होते. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे हे शहरात दिवसभर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्यासह सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिस कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये ८५ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबक

त्र्यंबक नगर पालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी एकूण ८४.७४ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

नगराध्यक्षांसाठी सात आणि १६ नगरसेवकपदाच्या ५६ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. एका नगरसेवकाची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदी आपणच निवडून येणार असल्याचा दावा भाजपसह शिवसेना आणि काँग्रेस यांनी केला आहेत. प्रत्येक प्रभागात दोन बुथ असे १६ बुथबाहेर सकाळी साडेसात वाजेपासून मतदान केंद्रांच्या बाहेर रांगा लागल्या. मतदान केंद्राच्या बाहेर जमाव जमा होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत
नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप, ‘एनडीसीसी’चे माजी चेअरमन परवेज कोकणी, माजी आमदार वसंत गिते आदी बडी नेते मंडळी त्र्यंबकमध्ये निवडणुकीनिमित्त ठाण मांडून बसली होती. शहरात भाजपचे पारंपरिक मतदार नाहीत. अशा प्रभागात त्यांनी विशेष लक्ष पुरविल्याचे नजरेस आले आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनीही शहरात राबता ठेवत काँग्रेसचे मतदान कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

आधी मतदान, मग लग्न!
माहेश्वरी समाजाचे उमेदवार उमेश सोनी हे प्रभाग सातमधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पुतणीचे रविवारी नाशिक येथे लग्न होते. बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू निकिता हिने नाशिक येथून त्र्यंबकला हजेरी लावली. सकाळी विवाह मुहूर्त होता. धार्मिक विधी सुरू असतानाच सारसची मंडळी कलंत्री परिवार यांच्याकडून परवानगी घेत निकिता त्र्यंबकला पोचली. तिने मतदान केले. त्यानंतर सर्व विवाह सोहळ्यास रवाना झाले.

मतदारांना रांगोळीद्वारे आवाहन
प्रभाग आठमधील मतदान केंद्राच्या आवारात विजय दाभाडे या कलाकाराने मतदानाचे आवाहन करणारी सुंदर रांगोळी काढली. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्याचा संदेश या रांगोळीतून देण्यात आला होता. मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी येथे आलेल्या पहिल्या काही मतदारांना तुळशीचे रोप मतदान झाल्यानंतर भेट दिले आणि पर्यावरण संर्वधनाचा संदेश दिला.

याद्यांमधील घोळ?
निवडणुकीत मतदान याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता. उमेदवारांनी मतदाराचा क्रमांक असलेली नावाची संगणकीय चिठ्ठी दिलेली होती. या चिठ्ठीतील क्रमांक आणि प्रत्यक्ष यादीतील क्रमांक यांचा मेळ बसत नव्हता. परिणामी मतदानास उशीर झाला. तशात मेनरोडवरील याज्ञवल्क्य सभागृहात पूर्व आणि पश्चिम असे दोन बुथ होते. तेथे नेमके कोणत्या बुथवर नाव आहे ते समजत नसल्याने मतदारांना हेलपाटे मारावे लागत होते. मतदारांच्या संगणकीय चिठ्ठ्या खासगी पद्धतीने काढण्यात आल्या. निवडणूक विभागाने अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या. त्यांचा ताळमेळ नसल्याची चर्चा होती. दरम्यान, रविवारी लग्नसराईमुळे नागरिकांनी सकाळीच मतदान करून पुणे, मुंबई आदी दूरच्या ठिकाणी असलेले विवाहमुहूर्त गाठण्यासाठी धावपळ केली. काही मतदारांनी तर मतदार याद्यांमध्ये नाव शोधण्याचा नाद सोडून माघारी फिरणे पसंत केले.

कडोकोट पोलिस बंदोबस्त
जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे आणि अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मागर्दशनाने उपविभागीय अधिकारी शाम वळवी यांनी बंदोबस्ताचे नियोजन अत्यंत सुव्यवस्थित केले. वळवी यांच्यासह पोलिस निरीक्षकांनी सातत्याने प्रत्येक मतदान केंद्रास भेट देत माहिती घेतली. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली.

प्रभाग सातमध्ये गोंधळ
प्रभाग सातमध्ये पाचआळीतील श्रीहरी सरडे या मतदाराचे नाव होते. परंतु, यादीतील फोटो दुसराच मतदाराचा आहे. मतदानास गेला असता त्याच्या नावावर अगोदरच मतदान झाल्याचे श्रीहरी याला सांगण्यात आले. त्याने सर्व ओळखपत्र देऊन आणि तेथील उपस्थितांची साक्ष काढली. श्रीहारी सरडे आपणच असून आपले मतदान झाले नसल्याचे पटवून दिले तेव्हा त्यास नियमाप्रमाणे स्वतंत्र अर्ज करून छापील कागदावर मतदान घेतले. त्याचा स्वतंत्र लिफाफा सिलबंद करण्यात आला.

आज मतमोजणी
सोमवारी (दि. ११) सकाळी १० वाजता नगर परिषद कार्यालयात मतमाजणी होणार आहे. आठ प्रभागांसाठी आठ फेऱ्या होतील. एका वेळेस दोन टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात दोन बुथ होते. बुथनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या होणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीत ४८ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ अ मधील पोटनिवडणुकीसाठी दिवसभरात एकूण ४८.७८ टक्के मतदान झाले. लग्नसमारंभाचा मोठा फटका या पोटनिवडणुकीला बसला. मतदानाचा टक्का घसरल्याने कोण बाजीगर ठरणार हे सोमवारी (दि. ११) होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक ५ अ हा अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला राखीव प्रवर्गासाठी राखीव आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून या प्रभागातून भाजपच्या लता सोनवणे या विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांना तीन अपत्य असल्याची तक्रार पराभूत उमेदवार निर्मला सोनवणे यांनी केली. या तक्रारीची शहानिशा होऊन मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लता सोनवणे यांना अपात्र घोषित केले. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली.

प्रभाग क्रमांक ५ अ मधील पोटनिवडणुकीसाठी अनुसूचित जाती जमातीच्या महिला राखीव गटातून भाजपने निर्मला सोनवणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने आशा सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. येथील शेतकरी सहकारी संघात सकाळपासूनच मतदानाला संथ गतीने प्रारंभ झाला. आदिवासी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले तर बिगर आदिवासी मतदार लग्नसमारंभात व्यस्त असल्याने मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

दरम्यान, नगरपालिका कार्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून अवघ्या काही मिनिटांत निकाल घोषित होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या संघांची अंतिम फेरीत धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तेलंगणामधील हैदराबाद येथे सुरू असलेल्या २८ व्या फेडेरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत महिला गटात महाराष्ट्राची लढत कर्नाटकशी तर पुरूष गटात अंतिम सामना कोल्हापूर बरोबर रंगेल.

महिला गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने विदर्भचे आव्हान (१२-१,०-४) १२-५ असे सहज परतावून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली. नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राने जिंकून प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या कविता घाणेकर हिने ९ मिनीटांपैकी ४.५० मिनिटे सुंदर संरक्षण केले. त्यानंतर ऐश्वर्या सावंतने छान हुलकावण्या देत उर्वरित ४.१० मिनिटे नाबाद संरक्षण केले. आक्रमणात महाराष्ट्राने विदर्भाचे १२ खेळाडू बाद करून मध्यंतराला ११ गुणांची विजयी आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या शीतल भोरने बेधडक आक्रमण करीत प्रतिस्पर्धी संघाचे तब्बल सात गडी टिपले. महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकने यजमान तेलंगणाचा पराभव केला.

पुरूषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने केरळ संघावर (१०-५,३-६) १३-११ अशी २ गुण व ६ मिनिटे राखून मात केली. महाराष्ट्राच्या विजयात सुरेश सावंत (२.४० मिनिटे व २ गडी), महेश शिंदे (२.१० मिनिटे व २.१० मिनिटे) व गजानन शेंगाळ (२.२० मिनिटे व २ गडी) यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्र पुरूष संघाचा अंतिम सामना कोल्हापूर बरोबर होईल. कोल्हापूरने अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तेलंगणाचा (९-७,९-९) १८-१६ असा २ गुणांनी पराभव केला. कोल्हापूरचे विनायक पोकार्डे (२ मिनिटे व १ मिनिटे) व विक्रम पाटील (४ गडी) हे दोघे खेळाडू चमकले. पहिल्या डावातील २ गुणांची आघाडी कोल्हापूरकरांना तारक ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी महामार्गावर अपघात एक ठार; आठ जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भरधाव वेगातील दोन कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारातील साईशोभा पेट्रोल पंपाजवळ घडली.

सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत स्विफ्ट कार (एमएच ४, ईडी ५८६०) शिर्डीकडून सिन्नरकडे येत होती. तर दुसरी इर्टीका कार (एमएच ४८, केए ७२३२) सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने जात होती. या दोन्ही कारचा सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारातील साईशोभा पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर अपघात झाला. अपघातानंतर जखमींना लगेचच सिन्नर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच पवन गोयल (वय २५ रा. नालासोपारा, मुंबई) या तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य चैतन्य सत्यनारायण रतनफुलम (वय ५१), रेणुकादेवी रतनफुलम (वय २६), विशाल गुप्ता (वय १८), कस्मीना अलमोहम्मद (वय २९) सर्व रा. नालासोपारा तसेच नीलेश वाळुंजकर, विलास कुमार, भरत सिंग त‌घिेही रा. वसई, मुंबई व अन्य एक असे आठ जण गंभीर जखमी आहेत. यातील त‌घिांवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पाच जणांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. माहिती मिळताच वावी पोल‌सि ठाण्याचे हवालदार केदारे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील १२८ शाळांना ‘आयएसओ’

$
0
0

नाशिक : ग्रामीण भागातील शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा, सुविधांचा प्रश्न याविषयी उलटसुलट चर्चा रंगत असतात. मात्र या चर्चांना छेद देत जिल्ह्यातील १२८ शाळांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या १२८ शाळांना आयएसओचे मानांकन प्राप्त झाले असून, इतर शाळांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. चांदवड तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४७ शाळांचा यात समावेश आहे.

इंगजी शाळांकडे वाढत्या ओढीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपुढे मोठे आव्हान उभे आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना इतरही सुविधांची उपलब्धता असल्याने विद्यार्थिसंख्या साहजिकच या शाळांकडे वळण्यास प्राधान्य देत आहे. नुकतेच राज्य शिक्षण विभागाने पटसंख्येचा अभाव असलेल्या १३०० शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिकमधील ३१ शाळांचा यात समावेश आहे. एकीकडे अशा परिस्थितीत शाळा बंद करण्यात येत असल्याचे व दुसरीकडे आयएसओ मानांकनावरून त्यांचा उत्कृष्ट दर्जा पुढे येत आहे. डिजिटल क्लासरूम, सौरऊर्जा वापर, इन्व्हर्टर सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, प्रथमोपचार पेटी, शालेय रेकॉर्ड, जुने रेकॉर्ड मांडणी, ग्रामस्थांचा सहभाग, खिडक्यांना पडदे, स्वच्छता व टापटीपपणा, वर्गांमधील प्रकाशयोजना, वाचनालय यांसारख्या सुमारे ५० निकषांची पूर्तता करून या शाळा आयएसओ मानांकनाच्या पातळीत यशस्वी ठरल्या आहेत.

तालुकानिहाय ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा

देवळा ः १४, सिन्नर ः ०३, कळवण ः ०१, चांदवड ः ४७, निफाड ः ०५, नांदगाव ः ०२, दिंडोरी ः ०४, त्र्यंबकेश्वर ः ०२, इगतपुरी ः ०४, मालेगाव ः ०४, पेठ ः १०, सुरगाणा ः ०१, नाशिक ः २३, येवला ः ०२, सटाणा ः ०६.

पटसंख्यावाढीस फायदा

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब या जिल्हा परिषदेच्या शाळेत असुविधांमुळे विद्यार्थी इतर खासगी शाळांना प्राधान्य देत असल्याचे चित्र काही वर्षांपासून होते. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिक्षकांच्या मदतीने ही शाळा सध्या डिजिटल स्कूल म्हणून आता ओळखली जात आहे. या शाळेने आयएसओ मानांकनदेखील शाळेने पटकावले आहे. याचा लाभ शाळेच्या पटसंख्यावाढीसही होत असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील इतर शाळांनाही आयएसओ मानांकनाविषयी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र, बीट, तालुकास्तरावर शाळांना मार्गदर्शन केले जात आहे. ज्या शाळा आयएसओ आहेत, त्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांचे अनुभवकथन, डिजिटल शाळा याविषयी इतर शाळांना मार्गदर्शन केले जात आहे.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी (प्रभारी), जिल्हा परिषद (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्र मॅरेथॉनचे रोड मॅपिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेच्या रोड मॅपिंगचा (धावन मार्ग मापन) प्रारंभ जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक व संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या उपस्थितीत झाला. दि. ७ जानेवारी २०१८ रोजी ही स्पर्धा होणार आहे.

मविप्र संस्थेतर्फे दिवंगत आमदार डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने नऊ वर्षांपूर्वी मविप्र मॅरेथान स्पर्धा सुरू झाली. संस्थे शताब्दी महोत्सवी वर्षापासून ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर होत आहे. ७ जानेवारी रोजी मविप्र मॅरेथान चौक येथून ही स्पर्धा सुरू होईल. तेथून धोंडेगावपर्यंत आणि पुन्हा मॅरेथान चौक असा या स्पर्धेचा मार्ग राहणार आहे.

जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक म्हणाले, की २०१८ हे वर्ष केंद्रीय क्रीडामंत्री हर्षवर्धन राठोड यांनी क्रीडा वर्ष म्हणून घोषित केले आहे. मविप्र मॅरेथान स्पर्धेने नाशिकच्या २०१८ मधील क्रीडा उपक्रमांची दमदार सुरुवात होणार असून, सरकारच्या वतीने मविप्र मॅरेथान स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धा देशात नाशिक शहराची एक वेगळी ओळख निर्माण करीत असून, संस्था गेल्या नऊ वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या मॅरेथान स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रवींद्र नाईक यांनी केले आहे. संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजतर्फे डॉक्टरांची पाच पथके व आयसीयू युनिट संस्थेच्या लॉ कॉलेजात सज्ज ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड रोड रेसेसच्या तांत्रिक नियमानुसार स्पर्धेचे अंतर कॅलिब्रेटेड बायसिकल पद्धतीने निश्चित करावे लागते. त्यानुसार स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने अंतरमापन करण्यात आले.

--

विविध गटांत स्पर्धा

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षांआतील मुले व मुलींसाठी ६ किलोमीटर अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे. ३५ वर्षांपुढील महिलांची, ४५, ६० आणि ७५ वर्षांवरील पुरुष गटांच्या वेगवेगळ्या अंतरांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेतील १ हजार ५०० सेवक, एनसीसी, एनएसएस, आरएसपी, तसेच अन्य विद्यार्थी कार्यरत असून, स्पर्धा अधिकाधिक तांत्रिक, शास्त्रशुद्ध करण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.

--

अॅप अन् साइटद्वारे नोंदणी

दहाव्या राज्यस्तरीय मॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी अॅप तयार करण्यात आले असून, अॅपचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन nashikmvpmarathon साठी रजिस्ट्रेशन करता येईल, तसेच www.nashikmvpmarathon.org या वेबसाइटद्वारेदेखील मॅरेथॉनकरिता प्रवेश निश्चित करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांचा वैयक्तिक समस्यांवरच भर

$
0
0

सहाय्यक पोलिस आयुक्त नखाते यांचा पाहणी दौरा

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराच्या वाढत्या लोकवस्तीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. मात्र, असे असतानादेखील टवाळखोरांची वाढलेली संख्या पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. सातपूरच्या सभापती माधुरी बोलकर यांनी अशोकनगर भागात राधाकृष्णनगर व परिसरात पोलिस चौकी असावी, अशी मागणी केली होती. याकरिता पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी पाहणी दौरा केला. याप्रसंगी अनेक महिलांनी वैयक्तिक वादांच्याच समस्या पोलिसांसमोर मांडल्या. सामाजिक भेडसावणाऱ्या समस्यांकडे कानाडोळा करीत केवळ वैयक्तिक समस्या मांडू नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नखाते यांनी केले. या वेळी सभापती बोलकर यांनी स्वतःच्या जागेत पोलिस चौकी उभारण्यासाठी महापालिकेकडे मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र, अशोकनगर भागात टवाळखोरांचा वाढलेला जाच कमी करण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी अशीही मागणी सभापती बोलकर यांनी केली.

कामगार वस्ती असलेल्या अशोकनगर भागात केवळ एकमेव पोलिस चौकी आहे. वेगाने वाढलेल्या लोकवस्तीत नवीन पोलिस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी सभापती बोलकर यांनी केली होती. पोलिस चौकीची मागणी लक्षात घेता, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नखाते यांनी पाहणी दौरा केला. या वेळी महिलांनी विविध समस्या नखाते यांच्यासमोर मांडल्या. मात्र, यात महिलांनी वैयक्तिक वादाच्याच समस्या मांडल्याने नखाते यांनी नाराजी व्यक्त केली. कामानिमित्ताने सातपूर भागात वास्तव्यास असलेल्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले. दरम्यान, अशोकनगर भागात टवाळखोरांचा वाढता त्रास बघता, सभापती बोलकर यांनी स्वतःच्या जागेत पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी केली. याबाबत लवकरच महापालिकेकडून मंजुरी मिळणार असल्याने पोलिसबळ उपलब्ध करून देण्याचीही मागणी बोलकर यांनी केली.

अशोकनगरच्या वाढत्या लोकवस्तीत पोलिस चौकी असावी, यासाठी सभापती बोलकर यांनी मागणी केली होती. यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. मात्र, अनेक महिलांनी केवळ वैयक्तिक समस्या मांडल्याने त्यासाठी पोलिसांकडून प्रबोधनही करण्यात येते. टवाळखोरांवर आळा घालण्यासाठी महिलांनी पोलिसांना मदत करण्याची गरज आहे.

- अशोक नखाते, सहाय्यक आयुक्त, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी युवकचा शुक्रवारी जवाब दो मोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दत्तक घेतलेल्या नाशिककरांवर भाजप व महापालिकेकडून होत असलेले दुर्लक्ष, त्यांचा कामचुकारपणा, सर्वसामान्य जनतेचे धोक्यात आलेले आरोग्य व नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महापालिकेवर शुक्रवारी, १५ डिसेंबर रोजी जबाब दो मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सर्वसामान्य नाशिककरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी काढण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

नाशिकच्या जनतेची दिशाभूल करीत मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी प्रशासनाला जाब विचारण्याकरिता हजारोंच्या संख्येने ‘जबाब दो मोर्चा’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून, या समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. स्मार्ट सिटीकडे नाशिकची वाटचाल होत असताना नाशिककर अनेक समस्यांना तोंड देत आहे. शहरातील डेंग्यू व स्वाइन फ्लूसदृश आजाराचा प्रश्न, तोट्याचे कारण देत व मनपा सर्वेक्षणामुळे कमी झालेल्या बसफेऱ्या, नाशिकमधील रस्त्यांची अक्षरशः झालेली चाळण, महापालिकेच्या बिटको व झाकीर हुसेनसारख्या रुग्णालयांची दयनीय अवस्था, शहरात पार्किंगचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असताना एआरच्या माध्यमातून विकसकांनी घशात घातलेल्या जमिनी, घंटागाडीच्या वेळेवर ना येणे, रस्त्यावर मोकाट जनावरे पिसाळलेले श्वान, डुकरे यांचा त्रास, शहरातील उद्याने, क्रीडा संकुले, मोकळे खेळ मैदाने, जॉगिंग ट्रॅक जागेवर उगवलेले गाजर गवत, घाण व कचऱ्याचे साम्राज्य, गोदावरी- नंदिनी नद्यांमध्ये वाढत असलेले प्रदूषण, धूर फवारणी व औषध फवारणी वेळेवर न होणे, मुख्य रस्त्यावर अडथळा ठरून अपघात होणाऱ्या वृक्षांचे अद्याप न झालेले पुनर्रोपण, नाशिकनगरीतील धार्मिक तीर्थक्षेत्र स्थळे आणि पर्यटनस्थळांची अवकळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ भारतसाठी शहर होणार अस्वच्छ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी येत्या ४ जानेवारीला केंद्रीय पथक येत आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जनप्रबोधनाची मोहीम राबवली जाणार आहे. मात्र, या मोहिमेसाठी शहरात तब्बल ४५० ठिकाणी विविध आकाराचे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेसाठी महापालिकेकडून शहरात होर्डिंग्ज आणि बॅनरमार्फत अस्वच्छता केली जाणार असून, शहराच्या बकालतेत भरच पडणार आहे. प्रचार- प्रसारासाठी सोशल मीडीयाचा वापर करण्याऐवजी आरोग्य विभागाने ठेकेदारांच्या प्रेमापोटी शहराला पुन्हा होर्डिंग्जमय केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून, चांगली कामगिरी करणाऱ्या शहरांना आर्थिक मदत केली जात आहे. यासाठी देशभरात स्पर्धा घेतली जात असून, केंद्रीय पथकांमार्फत सर्वेक्षण घेतले जात आहे. यापूर्वी २०१६ मध्ये पहिल्यांदा राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ७३ शहरांचा समावेश होता. त्या वेळी नाशिकचा क्रमांक ३१ वा होता. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धेत एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ४७४ शहरांचा समावेश झाला. त्यात नाशिकची क्रमवारी १५३ व्या क्रमांकावर घसरली. मात्र, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेच्या स्पर्धेत पहिल्या दहा शहरांत नाशिक असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. चार जानेवारी २०१८ पासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून, आता थेट तीन हजार शहरांचा या स्पर्धेत समावेश असणार आहे.

या स्पर्धेअंतर्गत नागरिकांकडून फीडबॅक घेण्यात येऊन त्याला सहाशे गुण देण्यात येतात. त्यामुळे स्वच्छताविषयक उपाययोजनांना नागरिकांचा प्रतिसाद मिळावा, तसेच स्वच्छताविषयक जाणीव जागृती व्हावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ४५५ होर्डिंग्ज बॅनर्स उभारले जाणार आहेत. यामध्ये व्यावसायिक जागांवर ३५, मनपाच्या मालकीच्या जागेवर ५०, छोटे १०० बॅनर्स लावले जाणार आहेत. मनपा मालकीच्या जागेवर १९०, तर खासगी जागेवर ८० बॅनर्स लावले जाणार आहे. हे होर्डिंग्ज, बॅनर्स जनप्रबोधनासाठी कितपत उपयुक्त ठरतात हे स्पर्धेच्या निकालातून समोर येईलच, पण तूर्त तरी ते अनधिकृत होर्डिंग्जमुळे निर्माण झालेल्या शहराच्या बकालावस्थेत भर घालणारे ठरणार आहेत.

५३३ लाभार्थ्यांकडून पैसे परत

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर संकल्पनेच्या पूर्ततेसाठी वैयक्तिक शौचालय उभारणीकरिता लाभार्थींना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. शहरात ७,२६४ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी काही लाभार्थींनी पैसे घेऊन शौचालयाची उभारणीच केली नाही. त्यामुळे अशा लाभार्थींवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यामुळे जागेअभावी, तसेच तांत्रिक कारणाअभावी शौचालय उभारणी होत नसल्याचे कारण देत, ५३३ लाभार्थींनी पालिकेला पैसे परत केले आहेत. त्यामुळे कारवाईच्या भीतीने का होईना नागरिकांना पालिकेचे पैसे परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मटा भूमिका

होर्डिंग्ज, बॅनरविरोधात न्यायालये अतिशय गंभीर असताना नाशिक महापालिकेने जणू त्यांच्या नाकावर टिच्चूनच काम करायचे ठरविलेले दिसते. शहर विद्रुपीकरणाचा हा प्रकार अत्यंत किळसवाणा असल्याने कोर्टाने वारंवार राजकीयसह इतरही फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर तर पालिका कधी गंभीर नव्हतीच, पण आता स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून तब्बल ४५० होर्डिंग्ज लावून पालिका स्वत:च स्वच्छतेला हरताळ फासत आहे. हे योग्य नव्हे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images