Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कर्जमाफीनंतरही थांबेना आत्महत्यांचा फेरा

$
0
0

मटा मालिका


घुसमट बळीराजाची ः भाग ३

--


कर्जमाफीनंतरही थांबेना आत्महत्यांचा फेरा


pravin.bidve@timesgroup.com

Tweet : bidvepravinMT

--

नाशिक ः कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्यांचे प्रमुख कारण मानले जात असले, तरी कर्जमाफीच्या घोषणेनंतरच नाशिक जिल्ह्यात अधिक आत्महत्या झाल्या आहेत. जून ते ११ डिसेंबर या सहा महिन्यांत जिल्ह्यात ५८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. विशेष म्हणजे त्यापैकी सुमारे निम्मी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. २१ प्रकरणेच पात्र ठरली असून, उर्वरित प्रकरणे प्रलंबित आहेत.

जून २०१७ हा मह‌िना राज्याच्या इतिहासात नोंदविला गेला. संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सत्तेवर असलेल्या युती सरकारने या काळातच कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीच्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यास मात्र सरकारने बराच वेळ घेतला. विशेष म्हणजे कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. किंबहुना चालू वर्षातील शेतकरी आत्महत्येच्या १०१ घटनांपैकी ५८ घटना कर्जमाफीच्या घोषणेनंतर झालेल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून एक लाखाची मदत केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडून त्यासाठीचे निकष पडताळून पाहिले जातात. कर्जमाफीच्या घोषणेनंतरची अशी ५४ प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. या आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा, बॅंकांचा तगादा, नापिकी व तत्सम कारणे न आढळल्याने ती अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. २१ शेतकऱ्यांची कुटुंब मदतीस पात्र ठरली आहेत. उर्वरित प्रकरणांवर अद्याप निर्णय होणे बाकी आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या घोषणेपूर्वी म्हणजेच जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी २९ प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून, १४ प्रकरणे निकषांमध्ये न बसल्याने अपात्र ठरविण्यात आली.

--

या आठवड्यात आढावा बैठक

जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी आत्महत्यांचा या आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी १७ नोव्हेंबरला याबाबतची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी घेतली होती. त्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मालेगाव, नाशिक, दिंडारी या तालुक्यांमध्ये अशा घटना घडल्या असून, पाच ते सहा प्रकरणांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. पात्र शेतकरी कुटुंबांना मदत मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार आहे.

---

जानेवारी ते डिसेंबरदरम्यानच्या शेतकरी आत्महत्यांची स्थिती

--

महिना शेतकरी संख्या

जानेवारी ३

फेब्रुवारी ५

मार्च ८

एप्र‌िल ११

मे १६

जून १०

जुलै १४

ऑगस्ट १३

सप्टेंबर ७

ऑक्टोबर ८

नोव्हेंबर ४

डिसेंबर २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरावेचक स्वच्छतेच्या प्रचारक

$
0
0

महापालिका देणार १५० महिलांना ओळखपत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर स्वच्छतेसाठी विविध पावले उचलण्यासह या कामात शहरातील सामाजिक संस्थांचाही सहभाग वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी महापालिकेने आवाहन केले असले तरी त्याला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर नाशकातही कचरा वर्गीकरणासाठी कचरा वेचक महिलांचे साहाय्य घेतले जाणार असून, या महिला घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत. महापालिकेने पहिल्या टप्प्यात १५० महिलांना ओळखपत्रांचे वाटपही सुरू केले आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. पालिकेच्या घंटागाडी ठेक्यातही त्याबाबत अटी घालत ओला व सुका कचरा ठेवण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपकद्वारे प्रभागनिहाय जनप्रबोधन केले जात आहे. शहरातही तब्बल २०० ठिकाणी कचरापेट्या उभारून ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ते पेट्यांमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, पालिकेच्या या आवाहनाला वर्षभराचा कालावधी उलटला तरी नागरिकांकडून कचरा वर्गीकरणाला प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

ओला व सुका कचऱ्यासंदर्भात महापालिकेने आता पुण्याच्या धर्तीवर कचरा वेचकांमार्फत नागरिकांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेवा संस्थेचे सहकार्य महापालिकेला मिळत असून, या संस्थेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५० कचरा वेचकांना महापालिकेच्या वतीने ओळखपत्र दिली जाणार आहेत. या कचरा वेचक महिला घरोघरी जाऊन कचरा गोळा करतील व त्याचे वर्गीकरण करून घंटागाड्यांमध्ये जमा करतील. त्याबदल्यात महापालिकेकडून या महिलांना कुठलाही आर्थिक मोबदला देणार नसले तरी, त्यांना नागरिकांकडून युजर्स चार्जेस घेण्याची अनुमती दिली जाणार आहे.

पोलिसांकडून होणार व्हेरिफिकेशन

सेवा संस्थेमार्फत शहरात सामाजिक दातृत्‍वातून काम केले जात असून, सुमारे साडेसातशे महिलांचे संघटन काम करीत आहे. या महिला शहरातील कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करीत आहेत. त्यांच्याकडे अधिकृत परवाना नसल्याने नागरिकांकडून त्यांना कचरा दिला जात नव्हता. आता महापालिकेनेच ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना घरोघरी जाऊन कचरा वेचण्याचे काम करता येणार आहे. कचरावेचक महिलांकडून काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ओळखपत्र देण्यापूर्वी त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमसनिमित्त रविवारी केक वर्कशॉपची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ख्रिसमसनिमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रूट केक कसा तयार करावयाचा यासंदर्भात वर्कशॉप घेतले जाणार आहे.

येत्या रविवारी (दि. १७ डिसेंबर) हे वर्कशॉप होणार आहे. ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकमध्ये ड्रायफ्रूटपासून ते मसाले कसे वापरले जातात, तसेच हा केक नेमका कसा बनवितात हे शिकविले जाईल. याच वर्कशॉपमध्ये मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी कशा बनवायच्या हे विवेक सोहनी या डेमो वर्कशॉपच्या माध्यमातून दाखविणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. अधिक माहितीसाठी (०२५३)-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. www.mtcultureclub.com या वेबसाइटमार्फत ऑनलाइन सभासदत्व मिळविता येईल, असे ‍आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निदर्शनांद्वारे असंतोषाला वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सोमवारी तीन कामगार संघटनांतर्फे विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी निदर्शने करण्यात आली. त्याद्वारे निदर्शकांनी असंतोषाला वाट मोकळी करून दिल्याचे दिसून आले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर, समाजकल्याण कर्मचारी संघटना (गट क) महाराष्ट्र राज्याच्या नाशिक विभाग व जिल्हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नाशिक- पुणे रस्त्यावरील सामाजिक न्याय भवन संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर, तर राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

--

‘झेडपी’समोर घोषणाबाजी

नाशिक ः सरकारचे कर्मचारी कपात धोरण व ग्रामविकास विभागाकडील दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व सरकारच्या वतीने दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. अलीकडच्या काळातच महाराष्ट्र सरकारने ३० टक्के कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. त्याची कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. ग्रामविकास विभागाकडील परिचर, वाहनचालक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी विस्तार अधिकारी, लेखा कर्मचारी व इतर संदर्भीय कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणे असे सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे. परंतु सध्या ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा बोजा कर्मचाऱ्यांवर पडतो आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती खालावली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा प्रक्षोभ आहे. त्यातच सरकारने कर्मचाऱ्यांच्या गळचपीचे धोरण स्वीकारले आहे. सरकारच्या या धोरणासाठी व समवेतच्या पत्रातील मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संलग्न संघटना व सहकारी सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर हे आंदोलन छेडण्यात येत आहे. यावेळी दुपारी भोजनाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या गेटवर निदर्शने करण्य़ात येऊन सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून सरकारच्या कृतीचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

-----

‘समाजकल्याण’चे कर्मचारी रस्त्यावर

नाशिक ः समाजकल्याण कर्मचारी संघटना (गट क) महाराष्ट्र राज्याच्या नाशिक विभाग व जिल्हा कार्यालयातील कर्मचारी शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले होते. नाशिक-पुणे रस्त्यावरील सामाजिक न्याय भवन संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी निदर्शने केली.

कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनांनंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. यावेळी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, सहाय्यक संचालक दीपक बिरारी, लेखाधिकारी विनोद खैरनार, राजेश जोशी, समाजकल्याण कर्मचारी संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष अश्विनी मोरे, उपाध्यक्ष आर. डी. देवरे, उपाध्यक्ष श्रीधर त्रिभुवन, सचिव सदानंद नागरे, कोषाध्यक्षा मनीषा गांगुर्डे, नाशिक जिल्हाध्यक्ष जयश्री राठोड, दिलीप जाधव, डी. व्ही. शिंदे, महेंद्र होर्शिळ, वैशाली ताके , नीता नागरे, अनुप्रीता डेंगळे, रवी वाणी, संतोष सरकटे, अनिल तिदमे, राहुल गोंदके, किरण पाटील, गणेश पवार, बाबा शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेसह विविध खात्यांत ४० ते ४५ टक्के पदे रिक्त असताना, आणखी ३० टक्के पदांची कपात करण्याच्या शासनाच्या धोरणाचा निषेध यावेळी करण्यात आला. संघटनांच्या प्रमुख मागण्यांपैकी सातवा वेतन आयोग त्वरित लागू करणे, जुनी पेन्शन योजना, ५ दिवसांचा आठवडा, २ वर्षे बालसंगोपन रजा, विनाअट निवृत्तीचे वय ६० वर्षे, सर्व रिक्त पदे त्वरित भरणे, कंत्राटीकरण रद्द करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची विनाअट अनुकंपा भरती करणे आदींबाबत ३ महिन्यांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ७ जुलैच्या बैठकीत देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संयुक्त आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला.

----

राजपत्रित अधिकारी महासंघ आक्रमक

नाशिक ः सरकारने सातवा वेतन आयोग सुधारणांसह राज्यात त्वरित लागू करावा, रिक्त पदे तातडीने भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. प्रलंबित मागण्यांबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असून, चर्चेसाठी तात्काळ बोलवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ११ डिसेंबर हा विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तो मागणी दिन म्हणून पाळला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेवणाच्या सुटीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वोरावर एकत्रित जमून निदर्शने केली. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघ समन्वय समितीचे अध्यक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सरचिटणीस बाळासाहेब घोरपडे, प्रमोद वानखेडकर, डॉ. प्रदीप जायभावे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुनंदा जरांडे, दिलीप थेटे, महेश आव्हाड, उत्तम गांगुर्डे आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र आहिरे, ज्ञानेश्वर कासार आदी उपस्थित होते.

१६ जानेवारी आणि ७ जुलै अशी दोन वेळा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांशी मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी के.पी. बक्षी समितीची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही त्यावेळी संघटनेला देण्यात आली होती. ही समिती स्थापन होऊन १० महिने झाले. परंतु अद्याप समितीने सरकारला अहवाल सादर केलेला नाही. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा मिळावी, अनुकंपा तत्वावर भरती करावी, वेतनातील समानाता निश्चित करून वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ द्यावी, विविध विभागांमधील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीसंदर्भात परिणामकारक कायदा करावा, कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, आणि योग्य सुधारणांसह विनाविलंब सातवा वेतन आयोग लागू करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

अत्यावश्यक सेवेची ४० टक्के पदे रिक्त असताना आणखी ३० टक्के पदे कपात करण्याचा घाट सरकारकडून घातला जात असून, त्यामुळे अनुकंपाच्या जागांवरच कुऱ्हाड पडणार असल्याचेही या आंदोलनादरम्यान सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याउलट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विनाअट अनुकंपा भरतीत सामावून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्याबाबत सरकारची भूमिका नकारात्मक असून, समान काम समान दाम निर्णय कोर्टाने दिला आहे. परंतु, कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सात महिन्यांची थकबाकी आणि जुलै २०१७ पासूनचा महागाई भत्तादेखील अद्याप मिळालेला नाही. या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशी संघटनेची मागणी असून, त्यासाठी चर्चेसाठी विनाविलंब वेळ द्यावा, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्तमानाचे भान असणारा खरा संपादक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुणाकडून काय लिहून घेऊ नये हे कळले म्हणजे योग्य संपादन जमते. वर्तमानाचे भान ठेवून प्रश्न विचारायला हवे तर समोरच्याकडून संपादकाला हवे ते मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व ऋतुरंग दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते यांनी केले.

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू अशी ओळख असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचा ग्रंथालय सप्ताह सुरू आहे. त्यातील चौथे पुष्प अरुण शेवते व सुदेश हिंगलाजपूरकर यांच्या मुलाखतीने गुंफण्यात आले. ‘आपले दिवाळी अंक’ या विषयावर त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

शेवते म्हणाले, की आपली ओळख नसली तरी संवाद साधता यायला हवा. कवितेने माझ्यातले चैतन्य जागे ठेवले आहे. मनामध्ये समाज व स्वत:विषयी जाणीव उत्कटपणे पाहिजे.

या वेळी हिंगलाजपूरकर म्हणाले, की सर्जनशील व्यवस्थापन करताना खूप शिकायला मिळाले. आता तर मी स्वत:च गुगल झालो आहे. स्वत: जाणून घ्या तरच विकास साधला जातो हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे असेही हिंगलाजपूरकर म्हणाले.

निवेदिका अस्मिता पांडे, धनश्री धारपे तसेच सावानाचे पदाधिकारी उपस्थित होते. कवी संजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. वसंत खैरनार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

आज, मंगळवार १२ डिसेंबर रोजी अमरावती येथील सेवाभावी कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांचे ‘आयुष्यमान व्हा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अन्नपूर्णाबाई डोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानावेळी उत्कृष्ट वाचक व बालवाचक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणी लुटली इमानदारीची जहागिरी?

$
0
0

नाशिक ः ही आहेत गिरणारे परगण्यातील कुत्री. मानवी वस्तीकडे असा कटाक्ष टाकत आहे, जणू हक्काची जागा हिरावलीय. इमानदारीचे गोडवे गाणारी हीच ती मानवी वस्ती, जिने आता जगणे मुश्कील केलेय, अशी भावना तर या श्वानकुलात बळावली नसेल ना? माणसांनाच माणसं ओळखू येईना, कोण चोर नि कोण साव. तिथे या श्वानांची तरी काय चूक. मात्र, एकमेकांवर भुंकणारी ही श्वानांची फौज इमानदारीची जहागिरी लुटल्यागत जणू एकवटलीय. माणसांच्या मनात नाही, पण या श्वानांच्या नजरेत तरी ही मानवी वस्ती सामावली असेल ना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत नळजोडण्यांची २१ पासून शोधमोहीम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीचोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने दंडात्मक शुल्काद्वारे अनधिकृत नळजोडण्या नियमित करण्यासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी अभय योजनेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने आता अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असून, २१ तारखेपासून अनधिकृत नळजोडणी शोधण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्याने राबविण्यात येणाऱ्या या शोधमोहिमेत मुदतीनंतर बेकायदा जोडणी आढळल्यास घरगुती नळजोडणीधारकांना ५ ते २५ हजार रुपये व बिगरघरगुती नळजोडणीसाठी १० ते ५० हजार रुपये शुल्क व दंड आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे रक्कम वसुलीसाठी अनधिकृत जोडणीधारकाच्या घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे.

शहरातील पाणीचोरीचे प्रमाण रोखण्यासाठी तेलंगणामधील अब्दुल करीमनगरच्या धर्तीवर महापौर रंजना भानसी यांनी नाशिकमध्ये अनधिकृत नळजोडणीधारकांसाठी अभय योजना सुरू केली होती. प्रशासनाने ७ सप्टेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. या योजनेंतर्गत अनधिकृत नळजोडणीधारकांनी ७ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेकडे अर्ज करून विहित दंडात्मक शुल्काद्वारे नळजोडणी अधिकृत घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. या योजनेतून सुमारे १५ ते २० हजार अनधिकृत नळजोडण्या सापडतील असा महापालिकेचा अंदाज होता. परंतु, विहित कालावधीत अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी अवघे ४९४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे या योजनेला दोनदा मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, आतापर्यंत १७०३ अर्जच महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

येत्या २० डिसेंबरला अभय योजनेची मुदत संपत आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही या योजनेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने आता आक्रमक होत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेला आणखी मुदतवाढ न देता थेट २१ तारखेपासून शहरातील अनधिकृत नळजोडणी शोधण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली जाणार असून, थेट नळ कनेक्शन बंद करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले.

---

पाणीचोरीचा गुन्हा दाखल होणार

अर्धा इंची नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी पाचशे ते हजारापर्यंतचीच रक्कम मुदतीत भरावी लागणार आहे. परंतु, मुदतीनंतर बेकायदा जोडणी आढळल्यास घरगुती नळजोडणीधारकांना ५ ते २५ हजार रुपये व बिगरघरगुती नळजोडणीसाठी १० ते ५० हजार रुपये शुल्क व दंड आकारला जाईल. रक्कम वसुलीसाठी अनधिकृत जोडणीधारकाच्या घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे. घरपट्टी नसल्यास पाणीपट्टी विभागाकडून दंडात्मक रक्कम वसुली करण्याबरोबरच नळजोडणीधारक व प्लंबरविरोधात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवर बेशिस्तांची भंबेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी कॉलेजरोडवर वाहन तपासणी करीत ४२३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतानाच कागदपत्रे नसलेली ७२ वाहने जप्त करण्यात आली. विशेषतः हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी लक्ष्य केले. आठ दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी दोन वेळेस कॉलेजरोडवर कारवाई केल्याने वाहनचालकांची भंबेरी उडाली.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विविध कॉलेजेसला भेटी दिल्या. हेल्मेट वापरासह वाहतूक नियमांचे पालन का करावे, याविषयी माहिती देण्यात आली. मात्र, जनजागृतीचा तितकासा परिणाम युवकांमध्ये दिसून आला नाही. रिक्षाचालकांच्या बेशिस्तीसह चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नही कॉलेजरोडवर सतावत आहे. जनजागृती मोहिमेचा फरक तेवढ्यापुरता दिसतो. त्यामुळे सतत मोठ्या स्वरूपात कारवाई करावी, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर दि. ४ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेच्या चार युनिटसनी मिळून कॉलेजरोडवर कारवाई केली होती. बरोबर एका आठवड्याच्या अंतराने पुन्हा ही कारवाई करण्यात आली. सोमवारी शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच कागदपत्रे नसलेल्या आणि दंड भरण्यास तयारी दर्शवीत नसलेल्या चालकांची ७२ वाहने जप्त केली. ही वाहने वाहतूक शाखेत जमा करण्यात आली असून, वाहनचालकांनी कागदपत्रे सादर करून दंडाची रक्कम भरून वाहने घेऊन जाणे अपेक्षित असल्याचे पोलिसांनी स्षष्ट केले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, कागदपत्रे सोबत ठेवावीत, हेल्मेटचा वापर करावा, नियमांचे योग्य पालन झाल्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

--

या ठिकाणांवर कारवाई

बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह म्हसरूळ, सरकारवाडा, भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कॉलेजरोडवर सोमवारी नाकाबंदी केली. जेहान सर्कल, भोसला स्कूल, बीवायके कॉलेजजवळील हॉल मार्क चौक, राजीव गांधी भवन, कॅनडा कॉर्नर येथे ३५ पोलिस अधिकारी व १५० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. हेल्मेट नसणे, ट्रिपलसीट, लायसन्स नसणे, फ्रंटसीट वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे ४२३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

--

शहरात कारवाईचा आकडा हजाराच्या घरात

शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी दिवसभर नाशिकरोडसह शहरात पॉइंटनिहाय कारवाई केली. पोलिसांनी काही तासांत एक हजारपेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक विभागाच्या नाशिकरोड युनिटनेदेखील अचानक कारवाई सुरू केल्याने वाहनचालकांची भंबेरी उडाली. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की बेशिस्त वाहनचालकांवर सातत्याने कारवाई सुरू असते. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृतीदेखील केली जाते. सोमवारी हॉकिंग डेच्या पार्श्वभूमीवर एबीबी सर्कल येथे एलईडी स्क्रीन असलेली व्हॅन उभी करून नागरिकांना त्याबाबतची माहितीदेखील देण्यात आली.

--

मटा भूमिका

बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोहीम सुरू केली हे चांगलेच झाले. पण, शहरात हेल्मेटसक्तीचा आग्रह हा विषय आता फार ताणता कामा नये, अशी भावना व्यक्त होत आहे. पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांनी ही सक्ती झुगारून लावली असल्याने याबाबत सगळ्यांसाठी समान न्याय लावला गेला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना तर या सक्तीचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळेच शहर वगळून महामार्गांवर आग्रह धरला, तर कदाचित वाहनधारकांचेही सहकार्य मिळेल अन् पोलिसांनाही प्रत्यक्ष गुन्हेगारांच्या बंदोबस्ताच्या मुख्य कामाला प्राधान्य देता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोतनीस बंधूंच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठेवींवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले सुहास आणि आनंद पोतनीस या दोघांच्या पोलिस कोठडीत कोर्टाने एका दिवसाची वाढ केली. या दोघांसह सुनंद कन्स्ट्रक्शन आणि इस्टेट कंपनीकडून कंपनीचे मालक वंदन अरविंद पोतनीस यांच्यावरदेखील गुन्हा दाखल असून, ते फरारी आहेत.

पोतनीस बंधूंना सरकारवाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत आज, सोमवारी संपल्याने त्यांना मुख्य दंडाधिकारी आर. व्ही. भक्त यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. स्वाती दांडेकर यांनी, तर बचाव पक्षातर्फे अॅड. उमेश वालझाडे यांनी बाजू मांडली. पोतनीस बंधूंकडे आता कोणतीही चौकशी करणे बाकी नसून, वंदन पोतनीस यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा मुद्दा बचाव पक्षातर्फे अॅड. वालझाडे यांनी उपस्थित केला. त्यावर सरकारी पक्षातर्फे अॅड. दांडेकर यांनी हरकत नोंदवली. वंदन पोतनीस फरारी असून, त्यांना अटक होणे आवश्यक असल्याचे दांडेकर यांनी सांगितले. सुनंद कंपनीचे आयसीआयसीआयसह विश्वास बँकेत खाते असून, ते सील करून त्याची तपासणी होणे महत्त्वाचे असल्याचे अॅड. दांडेकर यांनी कोर्टात सांगितले. हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल असेल अथवा तसा हायकोर्टाने आदेश दिला असल्यास तो आता बचाव पक्षाच्या वतीने सादर करावा, असा मुद्दाही दांडेकर यांनी उपस्थित केला.

सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश भक्त यांनी सुहास आणि आनंद पोतनीस यांच्या कोठडीत एका दिवसाची वाढ केली. या प्रकरणात वंदन पोतनीस यांना अटक होणार काय, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सुभाष राजाराम आंबेगावकर (वय ७२, रा. फ्लॅट नंबर ६, सुनंद सहनिवास डी विंग काठे गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. अनेक वर्षांपासून आंबेगावकर, तसेच तिन्ही संशयितांची ओळख होती. त्यातूनच या तिघांनी आपल्या मालकीच्या असलेल्या सुनंद कन्स्ट्रक्शन कंपनीत ठेव ठेवल्यास बाजारापेक्षा जास्त दराने म्हणजेच १५ टक्के दराने द.सा.द.शे. व्याज देऊ, असे आमिष दाखवले. यामुळे आंबेगावकर यांनी २००६ ते २०१५ या कालावधीत वेळोवेळी कंपनीत ४४ लाख रुपये गुंतवले. पोतनीस यांनी २०१४ पर्यंत नियमित व्याजदेखील दिले. मात्र, त्यानंतर संशयितांकडून पैसे येणे बंद झाले. पैशांचा तगादा लावल्यानंतर पोतनीस यांनी पैसे देण्याबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. दरम्यान, सुनंद कन्स्ट्रक्शन आणि इस्टेट कंपनीच्या फसवणूक प्रकरणास चालना मिळाल्याने आज ‘गांवकरी’च्या ठेवीदारांनी कोर्टात गर्दी केल्याचे ​चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार औद्योगिक विकासाचे शहर

$
0
0

डीएमआयसीच्या दुसऱ्या फेजमध्ये नाशिक

नवी दिल्ली : देशाच्या विकास आणि अर्थकारणाला गती देऊ शकणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या योजनेच्या दुसऱ्या फेजमध्ये नाशिकला औद्योगिक शहर विकसित केले जाणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकास महामंडळाचे (डीएमआयसीडीसी) मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर आलकेश कुमार शर्मा यांनी ‘मटा’ला विशेष मुलाखतीत दिली.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली होती. देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला वेग येतानाच रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करण्यासाठी ही योजना आखली गेली. या योजनेत एकूण आठ राज्यांमध्ये औद्योगिक शहरे विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. पहिल्या फेजचे काम सध्या सुरू आहे. जपान सरकारसह अन्य परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून ही योजना साकारली जात आहे. या अंतर्गत औरंगाबाद येथे ऑरा ही औद्योगिक वसाहत साकारण्यात आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही अशाप्रकारे औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-इगतपुरीत औद्योगिक विकास प्रस्तावित होता. पण विविध कारणांमुळे त्याचा समावेश होऊ शकला नाही. मात्र, आता दुसऱ्या फेजमध्ये नाशिक राहणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

‘मेक इन इंडिया’चा फायदा

संपुआ सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेला सध्याच्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया या योजनेचा लाभ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यास शर्मा यांनी दुजोरा दिला. मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक डीएमआयसीमध्ये आणण्यात यश येत असल्याचे ते म्हणाले.

दुसरी फेज केव्हा?

डीएमआयसीची पहिली फेज सध्या सुरू आहे. मात्र, या फेजला विलंब झाला आहे. ही फेज संपून दुसरी फेज केव्हा सुरू होईल याबाबत आताच सांगणे योग्य नाही, असे शर्मा यांनी म्हटले आहे. त्यामुळे दुसऱ्या फेजचे काम केव्हा सुरू होईल याबाबत स्पष्टता आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार संशोधन मांडा; फेलोशिप मिळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धांचा मुख्य हेतू संशोधनास प्रोत्साहन देण्याचा आहे. या स्पर्धांमध्ये अलीकडे अतिशय चांगले संशोधन मांडले जाऊ लागले आहे. या संशोधनाचा दर्जा जितका चांगला असेल, तितकी फेलोशिप मिळविण्याची तुम्हाला संधी आहे. या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. जयंत जायभाये यांनी केले.

पुणे विद्यापीठ आणि लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे एकदिवसीय आविष्कार प्रकल्प कार्यशाळा झाली. त्यावेळी जायभाये बोलत होते. उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज अध्यक्षस्थानी होत्या. कार्यशाळेसाठी विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. गंभीर, डॉ. एस. एल. लाव्हरे, डॉ. ए. व्ही बोराडे, डॉ. रूपाली खैरे, डॉ. एस. जी. औटी, डॉ. प्रमोद हिरे, डॉ. एस. के. महाजन, डॉ. एम. ए. भारद्वाज, डॉ. कैलास चंद्रात्रे, डॉ. महेश डी. औटी, महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. विनित रकिबे व शैक्षणिक व संशोधन समन्वयक डॉ. संतोष चोबे उपस्थित होते. उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विनित रकिबे यांनी सूत्रसंचालन केले. शैक्षणिक व संशोधन समन्वयक डॉ. संतोष चोबे यांनी आभार मानले. डॉ. एस. बी. शिसोदे, डॉ. टी. बी. पवार, प्रा. एस. पी. व्याळीज, प्रा. ए. बी. पाटील, प्रा. व्ही. व्ही. कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय प्रतिनिधींचा बुधवारी संप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

राज्यातिल हजारो वैद्यकीय प्रतिनिधींनी (एमआर) त्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी, १३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार वैद्यकीय प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, आपल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज नाशिक यूनिटने केली आहे. बुधवारी, सकाळी ११ वाजता एमएसएमआर ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

सेल्स प्रमोशन एम्प्लॉइज कायद्यानुसार औषध विक्री प्रतिनिधींना (एमआर) कामगार कायद्यानुसार बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आणि भारतीय कंपन्यांनी फॉर्म (ए)नुसार अधिकृत नेमणूकपत्र देण्यात यावे. ज्या कंपन्या फॉर्म (ए)चे उल्लंघन करते, अशा कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी. कामाची वेळ निश्चित करावी. किमान २० हजार वेतन निश्चित करावे. बोनस, पीएफ, ईएसआएस सुविधा देण्यात यावी. प्रस्तावित कामगारविरोधी कायदे सुधारणा त्वरित रद्द करावी. जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यासाठी कायदे बनवावेत, अशा विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधी बुधवारी संप पुकारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख लोकसंख्येमागे ३३ टक्के व्यसनी!

$
0
0

नाशिक : मौखिक आरोग्य तपासणीअंतर्गत पहिल्या ९ दिवसांत जिल्हाभरातील एक लाख २७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३३ टक्के व्यक्तींना तंबाखूसह मद्याचे व्यसन असल्याचे समोर आले असून, कॅन्सर आजाराची लक्षणे असू शकतील, अशा ७५१ नागरिकांसाठी पुढील तपासणी हाती घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुखस्वास्थ्य तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील ३० वर्षांवरील सुमारे सव्वा कोटी लोकांच्या मौखिक आरोग्यासाठी तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मुखस्वास्थ्य जीवनाचे गमक आहे. भारतात मुख कर्करोग हा प्राधान्याने आढळून येतो. पूर्वावस्थेत मुख कर्करोग ओळखला गेला तर त्यापासून वाचता येते. तंबाखूसह गुटखा, मशेरी सेवन ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच ३० वर्षांवरील व्यक्तींची मुखस्वास्थ्य तपासणी महत्त्वाची ठरते. या मोहिमेंतर्गत पहिल्या नऊ दिवसांत जिल्हाभरात एक लाख २७ हजार १९ नागरिकांची मौखिक तपासणी करण्यात आली. सरकारी हॉस्पिटल्ससह आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. यात मद्याचे व्यसन असलेल्या १४ हजार २११ आणि तंबाखूचे व्यसन असलेल्या २८ हजार २८८ व्यक्ती आढळून आल्या आहेत. तपासणी झालेल्या एकूण व्यक्तींच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे ११ आणि २२ टक्के ठरते. दरम्यान, तोंडात चट्टा असणे, जखम लवकर न भरणे, जखमा असलेल्या ७५१ नागरिकांना आरोग्य विभागाने पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवले आहे. मुख कॅन्सर होण्याची सुरुवात अशाच पद्धतीची असते. ७५१ पैकी काही व्यक्ती अशा आढळून आल्या तर त्यांना वेळीच उपचार मिळू शकतो. राज्य पातळीवरील हा महत्त्वाचा उपक्रम असून, यात खासगी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

मौखिक आरोग्य व्यवस्थित असणे ही महत्त्वाची बाब असून, सरकारच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम सुरू आहे. तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनांमुळे कॅन्सरसारख्या आजारास खतपाणी मिळते. या मोहिमेंतर्गत उपचारासह जनजागृतीवरदेखील भर दिला जातो आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाणी टाकून मिळवा पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील सध्याचे वॉटर वेंडिंग मशिन्स बदलण्यात येत असून, त्यांच्या जागी वॉटर पॉइंटच्या रुपाने अत्याधुनिक आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मदतीविना या मशिनमध्ये केवळ नाणे टाकून प्रवाशांना शुद्ध पाणी मिळू शकणार आहे. चोवीस तास ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये आरओ मशिन्स बसविण्यात येत आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे. फन्टुस कंपनीने ही मशिन्स बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन्स बसविण्यात आली आहेत. सर्वांत मोठ्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण, तेथे जास्त प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिन्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना याचा लाभ होणार आहे.

---

...असे आहेत दर

तीनशे मिलिलिटर आरओ पाणी स्वतःची बाटली असेल, तर एक रुपयात मिळणार आहे. बाटलीसह तेवढेच पाणी दोन रुपयांना मिळेल. पाचशे मिलिलिटर पाणी तीन व पाच रुपयांना मिळेल. एक लिटर पाणी स्वतःची बाटली असेल, तर पाच व बाटलीसह विकत घेतल्यास आठ रुपयांना मिळेल. दोन लिटर पाणी आठ व बारा रुपयांना मिळेल. पाच लिटर पाणी वीस व पंचवीस रुपयांना मिळेल. खासगी विक्रेते एक लिटर पाण्याच्या बाटलीचे वीस रुपये घेतात. शिवाय हे पाणी शुद्ध असेलच याची खात्री नाही. शिवाय बाटलीवर छापील किंमत पंधरा रुपये असतानाही वीस रुपये घेऊन लूट केली जात आहे. त्या तुलनेत संबंधित मशिनवर एक लिटर पाणी पाच रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांकडून त्याचे स्वागत होत आहे.

--

...असे मिळेल पाणी

या मशिनद्वारे स्वतः प्रवासी पैसे टाकून पाणी घेऊ शकतात. एक आणि पाच रुपयांचे नाणे टाकल्यास पाणी मिळते. पाणी शुद्ध कसे होते ते दाखविणाऱ्या आकृत्या मशिनवर आहेत. पाण्यावरच आरोग्य अवलंबून आहे हे अजून उमगले नसल्याने बहुसंख्य प्रवासी मशिनचे पाणी घेण्याचे टाळतात. त्यामुळे येथे पाणी सेवा देणारा कर्मचारी अडकून पडतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने आताची सर्व आधुनिक मशिन हटवून अत्याधुनिक मशिन बसविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅटफॉर्म एकवरील मशिन हटवून ते दोनवर हलविण्यात आले आहे. आता त्या जागी अत्याधुनिक मशिन येणार आहे. संबंधित विक्रेत्याकडे मागणी केल्यासही हे पाणी उपलब्ध होईल.

--

छोट्या स्टेशनची काळजी

नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे ए वन दर्जाचे आहे. नाशिकरोड हद्दीतील ई क्लास दर्जाच्या छोट्या रेल्वे स्टेशनची तृष्णाही भागविण्याची सोय झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना आधुनिक प्युरिफायर्सद्वारे शुद्ध केलेले पाणी पिण्यास मिळूही लागले आहे. तहानेने घसा कोरडा पडलेल्या व तहानेने व्याकुळ झालेल्या रेल्वे प्रवाशांनी या सुविधेबद्दल रेल्वेला धन्यवाद दिले आहेत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील सात स्थानकांना शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे मशिन बसविण्यात आले आहेत. बँकेने एक वर्षाची देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रवाशांची उन्हाळ्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्युरिफायरला पाचशे लिटरची टाकी जोडण्यात आली आहे.

--

जलकुंभही उपलब्ध

नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. त्यासाठी मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टँड आहेत. ज्यांना मशिन्सचे पाणी नको असेल त्यांना जलकुभांचे पाणी मोफत मिळते. मुंबईला जाताना नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड स्थानकात पाणी भरले जाते. अन्य गाड्यांमध्ये भुसावळ येथे पाणी भरले जाते. मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये इगतपुरी स्थानकात पिण्याचे पाणी भरले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेस्ट कॅम्प रोडची अखेर डागडुजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

खड्ड्यांमुळे ओबडधोबड झालेल्या रेस्ट कॅम्प रोडच्या डागडुजीचे काम अखेर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने हाती घेतले आहे. दयनीय अवस्थेमुळे हा रस्ता अनेक अपघातांचे कारण ठरत होता. हा रस्ता दुरुस्त केला जात असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

देवळालीतून भगूरकडे जाणारा रेस्ट कॅम्प रोड हा कॅन्टोन्मेंट प्रशासन व लष्कराचा एमईएस विभाग अशा दोन्ही प्रशासनांच्या अखत्यारीत येतो. गेल्या वर्षी या रस्त्याच्या डांबरीकरणावर ६० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. या रस्त्यावर लष्करी वाहनांसह अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असते. मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण होत होते. सव्वा लाख बॅटरीजवळ रोड क्रॉसिंगसाठी हा रस्ता खोदण्यात आल्याने काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू होती. त्यातच १२ ऑक्टोबर रोजी येथे खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे एक महिला मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सव्वा लाख बॅटरी ते आर्मी स्टॅटिक वर्कशॉपदरम्यानचा हा रस्ता एमईएसकडून खडी व डांबर टाकून दुरुस्त करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यात खड्डे बुजून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हव्यासाचे क्रूर चित्रण करणारे ‘रक्तबीज’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोठे बनण्याचा माणसाचा हव्यास त्याला माणूसपणाकडून पशूकडे घेऊन जातो. आपल्यात व पशूत काही अंतर असते हेच तो माणूस विसरून जातो. मग त्याच्यामुळे कित्येक निरपराध जीव टांगणीला लागतात. कित्येकांच्या आत्महत्या होतात, याची त्याला जाणीवच नसते. या हव्यासाचे क्रूर चित्रण करणारे नाटक म्हणजे ‘रक्तबीज’ होय.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असून नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘रक्तबीज’ हे नाटक सोमवारी सादर झाले. नाटकाचे लेखन प्राची गोडबोले यांनी, तर दिग्दर्शन विक्रम गवांदे यांनी केले होते.

नाटकात दोन वेगवेगळ्या कथानकांचा समावेश होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील महत्त्वाकांक्षी पुरुषाला पैसा मिळविण्याचा हव्यास निर्माण होतो. स्वत:च्या पत्नीचा वापर करून तो बॉसकडून बढती मिळविण्याचे कारस्थान रचतो. मात्र, त्यातून त्याची पत्नी आत्महत्या करते. दुसऱ्या कथेत प्रख्यात वैज्ञानिकाला संशोधन पूर्ण झाल्यावर परदेशात जाऊन काम करण्याची महत्त्वाकांक्षा असते. मात्र, काही प्रसंग घडून या कथेतही एक बळी जातो. कोणतीही आत्महत्या ही हत्याच असते, जी मानवाच्या हव्यासातून घडते, असा संदेश या नाटकातून देण्यात आला.

कामगार कल्याण केंद्र, बुधवार पेठ, नाशिक या संस्थेतर्फे झालेल्या या नाटकाची निर्मिती संतोष सोनवणे, संदीप पवार यांची होती. दिग्दर्शन, नेपथ्य व मुख्य भूमिका विक्रम गवांदे यांनी केली. केतकी कुलकर्णी, श्रीराम गोरे, आशिष गायकवाड यांनी अन्य भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना ईश्वर जगताप, रंगभूषा माणिक कानडे, संगीत गौरव कुलकर्णी यांचे होते, तर केशभूषा व वेशभूषेची जबाबदारी सुमा देसाई यांनी सांभाळली.

आजचे नाटक : एडिपस रेक्स

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा संमेलन उधळणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या अध्यक्षाची निवड होऊन चोवीस तास होत नाहीत, तोच महाराष्ट्रातील काही तरुण कवी, लेखकांसह कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत बडोदा साहित्य संमेलन होऊच नये यासाठी थेट मराठी वाड्मय परिषद व बडोदा संमेलन आयोजकांना पत्र पाठव‌लिे आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

नांदगाव महाविद्यालयात कार्यरत असलेले या कृती समितीचे प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित करून साहित्य संमेलन अध्यक्ष पदाच्या व साहित्य मंडळ पदाधिकारी निवडणुकीची घटना बदलून लोकशाहीकरण करण्यात यावे, यासह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, दलित आदिवासी भटके विमुक्त व इतर अल्पसंख्यांक साहित्य प्रवाहांना साहित्य संमेलनात प्रतिनिधित्व मिळावे यासह विविध मागण्या कृती समितीने केला आहे. या कृती समितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील लेखक, कवी, कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कृती समिती मराठी भाषेच्या प्रेमापोटी ही भूमिका घेत असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संमेलन घेण्यात येऊ नये. अन्यथा मोर्चे, आंदोलने करण्यात यावी, असे आग्रही प्रतिपादन या संमेलन विरोधी कृती समिती संयोजकांनी केले आहे. या कृती समितीला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावण्याचा इशारा बडोदा साहित्य संमेलन आयोजकांना दिला असल्याचे कृती समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कृती समितीच्या स्थापनेने मराठी साहित्य वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांची कमतरता!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

म्हाळदे व सायने शिवारात महापालिकेतर्फे उभारण्या आलेल्या घरकुलांमध्ये अद्यापही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यांची पूर्तता झाल्याशिवाय लाभार्थ्यांचे स्थलांतरण करू नये, अशी मागणी येथील काँग्रेसचे आमदार असिफ शेख यांनी केली आहे.

महापालिकेतर्फे म्हाळदे व सायने शिवारात घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना स्थलांतरित करण्याची तयारी देखील पालिकेकडून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यांत १८५ लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार आहेत. मात्र या दोन्ही प्रकल्पात अद्यापही पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने या सोयी सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय लाभार्थींचे स्थलांतरण करू नये, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

आमदार शेख यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना निवेदन दिले आहे. या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील १९९५ पूर्वीच्या विविध १७ झोपडपट्टीधारकांना ११ हजार घरकुल मिळणार आहेत. यातील सात हजार घरांची निर्मिती जवळपास पूर्ण झाली असून, ४ हजार ३०० घरे पूर्णतः वाटप योग्य झाली आहेत. आत्तापर्यंत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी ९०९ लाभार्थींनी शुल्क भरले असून, चार टप्प्यात घरांचे वाटप केले जाणार आहे. पैकी पहिल्या टप्प्यात १८५ लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहेत. यासाठी गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त संगीता धायगुडे तसेच आमदार शेख यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी देखील केली होती. पस्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाना शाळा, पाणी, वीज, रुग्णालय, भाजी मार्केट, धार्मिक सुविधा मिळणे गरजेचे आहे. या प्राथमिक सोयीसुविधा त्यांना प्राप्त झाल्या नाहीत, तर शासनाच्या हेतूला हरताळ फासला जावू शकतो. सर्व सोयी सुविधांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी. अन्यथा यास विरोध केला जाईल, असा इशारा शेख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांच्या विकासासाठी पोल‌सिांचीही साथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव


एखाद्या गावात शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे हे देखील आदर्श गावाची वैशिष्ट्य आहे. कायदा सु-व्यवस्था व महिला साक्ष‌म‌ीकरण विषयांनादेखील प्रधान्य असावे. पोल‌सि प्रशासनाचे कर्तव्य कायदा सुव्यवस्था राखणे आहे. परंतु गावांच्या विकासासाठीदेखील पोल‌सि प्रशासन सोबत असेल, असा विश्वास जिल्हा पोल‌सि प्रमुख संजय दराडे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील आदर्शगाव ढवळेश्वर येथे गेल्या तीन वर्षांपासून येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत हिवाळी शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा देखील हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, ढवळेश्वरला जिल्हा पोल‌सि प्रमुख संजय दराडे यांनी भेट दिली. या कार्यक्रमातच निर्मल गंगा गोदा बहुद्देशीय संस्थेच्यावतीने दराडे यांनी विद्यार्थ्यांना सायबक क्राईमबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ‘निर्मल गंगा गोदा’च्या अध्यक्षा शीतल गायकवाड, जि. प. सदस्य समाधान हिरे, सरपंच चित्रा हिरे, वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास राऊत, काशिनाथ पवार, दीपक हिरे, कृष्णा निकम, ज्ञानदेव निकम आदींसह उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, प्राध्यापक उपस्थित होते.

जि. प. सदस्य समाधान हिरे, शीतल गायकवाड, ढवळेश्वर ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांतून आदर्श गाव संकल्पनेचे शिल्पकार पोपटराव पवार (हिवरे-बाजार) यांनी ढवळेश्वर गावाची निवड केली. गाभा क्षेत्रातील व बिगर गाभा क्षेत्रातील तसेच गावाच्या विकासासाठीचे सर्व कामे प्रगती पथावर असून, त्यासाठी निधीची उपलब्धतेसाठी शासन स्तरावर होत आहे. म्हणून अशा आदर्श गावाला भेट देण्यासाठी दराडे आले होते. त्यांनी यावेळी संपूर्ण गावाची पाहणी केली. ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलतांना जि. प. सदस्य समाधान हिरे यांनी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे व आदर्श गाव निर्मितीसाठी सहकार्य करण्याची भूमिका विषद केली. यावेळी निर्मल गंगा गोदाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला अभूतपुर्व यश मिळाल्यानंतर या विजयाचे शिल्पकार असलेल्या आमदार बाळासाहेब सानप व जिल्हा बँकेचे माजी जिल्हाध्यक्ष परवेझ कोकणी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणी आणि सानप यांचे विजयाबद्दल अभिनंदन करीत आगामी विधान परिषदेची तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नाशिक विधानपरिषदेसाठी भाजपकडून परवेझ कोकणी यांची दावेवादी वाढली आहे. त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्षांसह १७ पैकी १४ जागा भाजपने जिंकल्या. या निवडणुकीची जबाबदारी आमदार सानप आणि परवेझ कोकणी यांच्यावर टाकण्यात आली होती. त्यामुळे या विजयानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत कोकणी आणि सानप यांनी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यानी त्र्यंबकमध्ये भाजपच्या विजयाबद्दल सानप आणि कोकणी यांचे विशेष अभिनंदन केले. भाजपच्या निवडीत कोकणी यांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राहिलेल्या कोकणी यांनी भाजपच्या विजयासाठी आपले सर्व बळ वापरले. कोकणी यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या विजयानंतर त्यांची दावेदारी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images