Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ट्रॅजेडी एकांकिका अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा आणि सुविचार हॉस्पिटल यांच्यातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेत कलाभ्रमंती संस्था प्रस्तुत ‘ट्रॅजेडी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. ‘लेटस बिगिन’ या एकांकिकेने द्वितीय तर ‘आभासी जग’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट दिग्दर्शनाबरोबरच नेपथ्य प्रकारात धोबी पछाड प्रथम, लेटस बिगिन द्वितीय, मला मोठ व्हायचंय या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट प्रकाशयोजना विनोद राठोड प्रथम, कार्तिकेय पाटील द्वितीय तर चेतन ढिकले तृतीय क्रमांक उत्कृष्ट वेशभूषेचा आभासी जग तर उत्कृष्ट रंगभूषा ताटी उघडा या एकांकिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी आणि बालअभिनेत्री सई मोराणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात दिवसभर ही स्पर्धा चालली. यामध्ये १० नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
सामाजिक आशयाच्या कथानकांचा समावेश असलेली ही नाटके विद्यार्थ्यांनी अतिशय खुबीने सादर केली. मला मोठं व्हायचंय (मेनली ऍमॅच्युअर्स), गोट्या (दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग), धोबीपछाड (नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, सिन्नर संकुल), वाट चुकलेली माणसं (डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय), ड्रायव्हर (ओम साई सच्चिदानंद संस्था), लेटस् बिगीन (कृपा शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्था), आभासी जग (प्रबोधिनी ट्रस्ट), ग्रीन व्हेल (नूतन मराठी शाळा, इगतपुरी), ट्रॅजेडी (कलाभ्रमंती संस्था), घरटं (सृजन प्रतिष्ठान) या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मानसी देशमुख, रवींद्र ढवळे आणि श्यामसुंदर दळवी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू घाटांसाठी नोंदणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील वाळू घाटांसाठी गौण खनिज विभागाने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ८ जानेवारी रोजी ई-लिलाव केले जाणार असून त्यासाठी शनिवारपासूनच (दि. ३०) नोंदणी सुरू झाली आहे. गतवर्षी लिलावात न गेलेल्या पाच घाटांचाही या लिलाव प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे.

गौण खनिज विभागाच्या वतीने दरवर्षी वाळू ठेक्यांच्या लिलाव प्रक्रियेचे आयोजन केले जाते. त्या माध्यमातून सरकारला मोठा महसूल मिळतो. गेल्या तीन वर्षापासून घाटांसाठी ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविली जाते. परंतु, ठेकेदार या प्रक्रियेकडे पाठ फिरवित आहेत. याच महिन्यात ही प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, यामध्ये २४ पैकी चार घाट गेले. उर्वरित घाटांसाठी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गतवर्षी न गेलेल्या पाच घाटांचाही यावेळी लिलाव प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. त्याद्वारे अपेक्षित महसूल मिळण्याची प्रशासनाला आशा आहे.

जिल्ह्यातील तीस घाटांमधून ४१ हजार ५७४ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव प्रशासनाला अपेक्षित आहे. त्या माध्यमातून सरासरी तीन कोटी ९६ लाख ५७ हजार ८० रुपयांचा महसूल मिळावा अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. दरम्यान, शन‌िवारपासून (दि. ३०) ते ३ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत नोंदणी करता येणार आहे. ३ ते ५ जानेवारीदरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी ७ यावेळेत निविदा डाउनलोड करणे व भरता येतील. दाखल निविदा या शनिवारी (दि. ६) रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उघडण्यात येतील. तर सोमवारी (दि. ८) सकाळी ११ ते १ याकाळात घाटांचे इ-लिलाव केले जातील. दरम्यान, गतवर्षी न गेलेले निफाड तालुक्यातील दारणासांगवी १ ते ४ आणि निफाडमधील करंजगाव या पाच घाटांचा समावेश आहे.

या घाटांचे होणार लिलाव
नाशिक तालुक्यातील माडसांगवी, निफाड तालुक्यातील दारणासांगवी १ ते ४ तसेच लालपाडी, चेहडी खु., शिंपीटाकळी, करंजगाव, शिंगवे १, १ ब आणि २, दिंडोरी तालुक्यातील अवनखेड १ व २; देवळा तालुक्यातील लोहरणे १ व ३ आणि वासोळ १ व २, कळवण तालुक्यातील जयूपर, मोकभणगी, पळसदर तसेच बागलाण तालुक्यातील आसखेडा, भडाणे, तांदूळवाडी, लखमापूर, धांद्री १ ते ३, जायखेडा, ब्राह्मणगाव या घाटांचा लिलावात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकाणू समितीची आज होणार बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी हिताच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असून १ मार्च २०१८ पासून पुन्हा संपावर जाण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. याबाबतची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी (दि. १) सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्र्यंबक नाका येथील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या या बैठकीला समितीमधील सर्व प्रमुख संघटनांचे नेते व पदाधिकारी उपस्थ‌ित राहणार आहेत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. जूनमध्ये पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाला नाशिकमधून मोठे बळ मिळाले होते. नाशिकच या संपाचा केंद्रबिंदू ठरला होता. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. त्यानंतर कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. हमी भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व अन्य काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. सरकारने हे प्रश्न सोडविण्याचे धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. या मागण्यांचा पाठपुराव्याबाबत दिशा ठरविण्यासाठी ही बैठक होणार आहे. राज्याच्या विविध भागातून शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ वर्षातील पोलिस आयुक्तांचे गेट टुगेदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेला आता २७ वर्ष पूर्ण होणार असून, मंगळवारपासून (दि. २) सुरू होणाऱ्या पोलिस रेझींग सप्ताहाच्या आयोजनात याची झलक पाहण्यास मिळणार आहे. नाशिकमध्ये यापूर्वी काम केलेल्या सर्व पोलिस आयुक्तांना एकाच मंचावर बसवण्याचाही प्रयत्न होणार आहे.

शहर पोलिस आयुक्तालयाची स्थापना सप्टेंबर १९९० मध्ये झाली. तत्कालीन पोलिस आयुक्त के. के. कश्यप यांनी १९९२ मध्ये पदभार सोडला होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी २ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पोलिस रेझींग सप्ताहाचे नियोजन हाती घेतले आहे. या सप्ताहात सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांचे काम जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनला आणून पोलिसांबद्दलची त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वी हा कार्यक्रम एकाच दिवसात आटोपला जाई. आता तो एक आठवडाभर राबवला जातो. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, की पोलिस आयुक्तालयाची २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या रेझींग सप्ताहामध्ये वेगवेगळ्या तसेच अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मागील २५ वर्षात नाशिक शहारात काम केलेल्या सर्व पोलिस आयुक्तांना एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातील काही निवृत्त झाले असून, काही सध्या कार्यरत आहेत. पोलिस म्हणून काम करताना अधिकाऱ्यांचा शहराशी जवळून संबंध येतो. शहरातील चांगले नाते जोडले जाते. काही कटू आठवणीही असतात. यानिमित्ताने या सर्व बाबींना उजाळा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. सध्या सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून, एकाच दिवशी किती अधिकारी एकत्र येऊ शकतील, हे अद्याप स्पष्ट नाही. आमचा प्रयत्न जास्तीत जास्त आजी-माजी पोलिस आयुक्तांनी एकत्र यावे यासाठी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे होते पोलिस आयुक्त
के. के कश्यप, पी. चक्रवर्ती, पी. के. जोशी, पी. पी. शर्मा, पी. टी. लोहार, एल. एल. वर्मा, पी. डी. पवार, पी. टी. लोहार, हिमांशू रॉय, एस. एम. सय्यद, हिमांशू रॉय, व्ही. डी. मिश्रा, विनोद लोखंडे, कुलवंतकुमार सरंगल, एस. जगन्नाथन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेचा फाजील अभिमान नसावा

$
0
0

म. टा. प्रतिक्रिया, नाशिक

भाषेचा अभिमान प्रत्येकाने बाळगायलाच हवा. परंतु, फाजील अभिमान नसावा, असे प्रतिपादन अॅड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी नाशिकमध्ये केले. खान्देशरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी मंचावर आमदार सीमा हिरे, पर्यटन विभागाचे अधिकारी आशुतोष राठोड, सुरेशबाबा पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, रमेश गायधनी, महेश हिरे, रश्मी हिरे बेंडाळे आदी मान्यवर उपस्थ‌ित होते. यावेळी अॅड. निकम यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ११ जणांना खान्देशरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना अॅड. निकम यांनी सांगितले, की भाषा, राज्य यांवर देशात स्थ‌ित्यंतरे सुरू झाली आहेत. भाषेवरून वाद होतात. राज्याच्या विघटनासाठी भाषेचा वापर होऊ लागला आहे. भाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान जरूर असावा. परंतु, फाजील अभिमान नसावा. खान्देश भाषेमध्ये गोडवा आहे. ही केवळ कसमादे किंवा जळगाव, धुळे, नंदुरबारची भाषा नाही; तर पूर्ण नाशिक विभागाची ती भाषा आहे, असे मी मानतो. आपण सर्व एक आहोत हे सांगण्याचे आणि दर्शविण्याचे काम भाषा करते, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

सीमा हिरे यांनी आयोजित केलेला खान्देश महोत्सव हा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुकोद्गार काढताना ‘मी शक्यतो राजकारण्यांचे अभिनंदन करीत नाही’, असेही अॅड. निकम यांन‌ी स्पष्ट केले. मी सरकारचा प्रवक्ता नाही तसेच त्यांचा नोकरही नाही. त्यामुळे सरकारचे गुणगानही आपण गात नसल्याचे ते म्हणाले. हल्लीची पिढी सोशल मीडिया आणि चित्रवाहिन्यांमुळे भरकटते आहे. मनस्थ‌िती बदला परिस्थ‌िती आपोआप बदलेले असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. हल्ली गुन्हेगार आणि फिर्यादी कोणत्या जातीचा आहे हे पाहिले जाते. मात्र, गुन्हेगार आणि तक्रारदाराला जात, धर्म, पंथ नसतो, असेही अॅड. निकम यांनी स्पष्ट केले.

पाकला वेसन घालावे
कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला आपली बाजू प्रभावीपणे मांडावी लागणार आहे. पाकिस्तानच्या आडमुठेपणाला वेसन घालण्यासाठी ठोस पाऊले उचलावी लागतील, असेही अॅड. उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले. अॅड. निकम यांनी भाषणाची सुरुवात खान्देशी भाषेने केली. मुंबई दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेल्या अजमल कसाब याच्याशी संबंधित किस्सेही त्यांनी यावेळी सांगितले. रवींद्र मालुंजकर आणि सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

यांचा झाला सन्मान
आर्किटेक्ट संजय पाटील, अभिनेते कांचन पगारे, राजेश कोठावदे, लेखिका स्वाती पाचपांडे, पत्रकार सुरेश पवार, नंदलाल जगताप, कृषी तज्ज्ञ रावसाहेब पाटील, प्रमोद कोतवाल, रवींद्र पाटील, गायिका गीता माळी, विजया पाटील यांचा खान्देशरत्न पुरस्कार देऊन अॅड. निकम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीनिमित्त साधली संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पेतून ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवात रविवारी अखेरच्या दिवशी सातपूर आणि सिडकोमधील नागरिकांनी तुफान गर्दी केली. सांस्कृतिक कार्यक्रमांसह खान्देशी चविष्ट व चटपटीत खाद्यपदार्थ्यांचा त्यांनी मनमुरास आस्वाद घेतला.

सुटीचा दिवस असल्याने कामगार वसाहत असलेल्या सातपूर, अशोकनगर, सिडको, कामटवाडा, खुटवडनगर या भागासाठी रहिवाशांनी कुटुंबीयांसह खान्देश महोत्सवाला सकाळी ११ वाजेनंतरच हजेरी लावली. शहरातील अनेक खाद्य विक्रेत्यांनी या महोत्सवात आपला सहभाग घेत विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. आमदार हिरे व त्यांच्या कुटुंबीयांनी आलेल्या नागरिकांचे स्वागत केले. महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले.

खवय्यांसाठी मेजवानी
खान्देशी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी केली. यात खापरावरील मांड (पुरणपोळ्या), कळण्याची भाकर, मिरचीचा ठेचा, भरलेली वांग्याची भाजी, वांग्याचे भरीत, भरली कारली, काळ्या मसाल्याची आमटी, मटण, चिकन, बाजरी, ज्वारी, दादरच्या भाकरी, शेंगुळे, थाळी पिठ व विविध प्रकारचे खान्देशी पापडांचा आस्वाद खवैय्यांनी घेतला.

शालेय नृत्याची धम्माल
महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. हिन्दी, मराठी गाण्यांवर ग्रुपने नृत्य सादर करत शालेय विद्यार्थ्यांनी अनेकांची मने जिंगली. पालकांनीही आपल्या पाल्याचे नृत्य पाहण्यासाठी आर्वजून उपस्थिती लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक साक्षरतेची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शालेय शिक्षणासह सर्वांना आर्थिक साक्षरतेचे ज्ञान दिले गेले पाहिजे. आर्थिक साक्षरता असेल तरच मनुष्य श्रीमंत होऊ शकतो, असे प्रतिपादन ई अॅण्ड जी कंपनीचे चेअरमन अविनाश शिसोदे यांनी केले.

आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या खान्देश महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी उद्योजक मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. यावेळी मंचावर सिडको मंडलचे यशवंत नेरकर, रामदास पाटील, डॉ. विनय मोगल, सिनेअभिनेते दीपक करंजीकर, विद्या करंजीकर उपस्थित होते.

उद्योजकता घडविणे ही माझी आवड असल्याचेही सांगून शिसोदे यांनी उपस्थितांशी प्रश्नोत्तराद्वारेही संवाद साधला तसेच अनेक शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी सांगितले, की केवळ कष्ट करून नव्हे तर आर्थिक साक्षरता मिळवून श्रीमंत होणे केव्हाही चांगले. व्यवसाय करण्यासाठी वय आणि शिक्षणाची अट नाही. पालकांनी मुलांना आर्थिक साक्षर करणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरता येत नाही तोपर्यंत आपण व्यवसाय करू शकत नाही. समाजात गरीब अधिक गरीब, मध्यवर्गीय हे आहे तसेच तर श्रीमंत पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंत होत आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी समाजात आर्थिक साक्षरता येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. लोकांची गरज काय याचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करावा. यशस्वी उद्योजक होण्यासाठी चांगला गुरू असणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आमदार हिरे यांनी सांगितले, की महिला, विद्यार्थ्यांप्रमाणेच युवकांसाठीही कार्यक्रम असावेत, म्हणून या संवादाचे आयोजन केले. पदवी मिळविल्यानंतर पुढे काय करायचे असा तरुणांपुढे प्रश्न असतो. त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे मुले व्यवसाय करण्यास पुढे येत नाही. अशा वेळी अनुभवातून यशस्वी उद्योजक झालेल्या उद्योजकांच्या मार्गदर्शनाची गरज आज नवीन पिढीला मार्गदर्शक ठरावी या दृष्टीने ही उद्योजक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली.

महिला उत्कृष्ट व्यवस्थापक
महिला उत्कृष्ट व्यवस्थापक असतात. त्यामुळे महिलांनी उद्योजक बनले पाहिजे. ज्येष्ठांनी उद्योजकांचे धडे घेवून पुढीला मार्गदर्शन केले तर ते चांगले गाईड होऊ शकतात. विद्यार्थी कार्यशाळेत उद्योजक बनर्याचे मार्गदर्शन घेत असेल तर पुढे काय शिकायचे, काय करायचे याचे ज्ञान त्याला आत्ताच मिळू शकते, युवकांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास व्यवसायवाढीसाठी चांगली मदत होऊ शकते, असेही शिरोदे यांनी सांगितले. उद्योजक होण्यासाठी मुळात मराठी माणसाने शिकण्याची कला आत्मसात करायला हवी. चांगला उद्योजक होण्यासाठी अगोदर आर्थिक साक्षर तसेच नियोजन महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार चळवळीवर प्रशासकीय राजवट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील तीन मोठ्या सहकारी संस्थेवर प्रशासक नियुक्ती झाल्याने सहकार चळवळीचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या संस्थेवर प्रशासकीय राजवट असणार आहे.

जिल्हा बँक व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शनिवारी (दि. ३०) बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी नाशिक मर्चन्ट बँकेवर साडेतीन वर्षांपूर्वी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात २१२ शाखा आहे तर मर्चंट बँकेच्या ४७ शाखा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन बँकेच्या २५९ शाखेचे काम आता प्रशासकाच्या निर्णयानुसार चालणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी उलाढाल असणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाजही पुढे प्रशासकाच्या निर्णयावर सुरू राहणार आहे. या तीन संस्थांसह जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थेची स्थिती सुद्धा खूप चांगली नाही. त्यामुळे या संस्थेवरही ही टांगती तलवार असणार आहे.

राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात रुजल्यानंतर त्यात होणाऱ्या गैरव्यवहारामुळे अनेक संस्था अडचणीत आल्या. यातील काही टिकल्या तर काही अवसायकात निघाल्या. प्रशासकांनी चांगले काम केले अशा संस्थांचा फायदा झाला. पण सक्षम प्रशासक न लाभलेल्या संस्थांच्या अडचणीत अधिक वाढ झाली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, मर्चन्ट बँक, जनलक्ष्मी बँक, नाशिकरोड-देवळाली बँक या मोठ्या संस्था आहेत. यातील नाशिक मर्चन्ट बँकेवर ६ जानेवारी २०१४ रोजी प्रशासकाची निवड झाली. त्यानंतर साडेतीन वर्षांत रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ का बरखास्त केले याचे उत्तर मिळाले नसल्याने माजी संचालकांनी दोन महिन्यांपूर्वी प्रशासकाविरूद्ध संताप व्यक्त केला. संचालक मंडळाच्या काळात ३० कोटी एनपीए (अनुत्पादक कर्जे) होता, आता तो १४२ कोटींवर आल्याचाही त्यांनी आरोप केला होता. पण, या बँकेची प्रशासक नियुक्तीनंतर आर्थिक स्थिती चांगली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती खूपच बिकट आहे. कोट्यवधी रुपयांचे थकलेले कर्ज यामुळे बँक अगोदर अडचणीत आहे. त्यात गैरव्यवहाराचे प्रकरणाने बँकेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे प्रशासकांना सुद्धा ही बँक नफ्यात आणणे अवघड आहे.

बँकेबरोबर उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मोठी उलाढाल असणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई झाली आहे. आतापर्यंत येथे एका गटाचे वर्चस्व होते. पण, गैरव्यवहाराचे आरोपामुळे ही संस्था वादग्रस्त ठरली. त्यानंतर पाच महिन्यापूर्वी येथेही सत्ता बदल झाला. पण या संस्थेवरही आता प्रशासक नियुक्त झाला आहे. जिल्ह्यातील या तीन मोठ्या संस्थांसह अनेक सहकारी संस्थेची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे या संस्थेवरही पुढे प्रशासकाची नियुक्ती झाली तर ही चळवळच मोडीत निघणार आहे. या तीन संस्थेबरोबरच जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, सहकारी बँका यांची स्थिती नाजूक आहे. सरकाराचे बदलेलले धोरण, वाढता गैरव्यवहार हे यामागे कारण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चुरा लिया है’ची रसिकांवर मोहिनी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घर आजा घीर आये बदरा सावरिया, ये शाम मस्तानी, ये क्या हुआ, कैसे हुआ अशा एकाहून एक सरस गीतांनी आर. डी. बर्मन यांच्या स्वरांची मोहिनी अजूनही किती आहे, याचा अनुभव विश्वास लॉन्स येथे जमलेल्या हजारो रसिकांना आला.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रुप, विश्वास हॅपिनेस सेंटरतर्फे व विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या समधुर गीतांची मैफल ‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना विश्वास ठाकूर यांची होती.

जगण्यातील आर्तता, उत्कटता, हर्ष आणि आनंदाचा अनोखा मिलाफ आर. डी. यांच्या संगीतात होता. याची प्रचीती प्रत्येक गाण्यात येत होती. ख्यातनाम लेखक अंबरीश मिश्र यांचे अभ्यासपूर्ण निवेदन आणि आठवणी आर. डी. बर्मन यांच्या संगीताचे मर्म उलगडून दाखविण्यासाठी पूरकच ठरले. हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांनी केलेले प्रयोग गीतांचा आशय पोहोचविण्यासाठी किती प्रभावी होते याचा अनुभव प्रत्येक रसिक घेत होते.

इस मोड से जाते हैं, चुनरी संभाल गोरी, ओ मांझी रे, जाने क्या बात है, तेरे बिना जिया लागे ना, आज उनसे पहली मुलाकात होगी, ओ मेरे दिल कै चैन, क्या जानू सनम, तेरे बिना जिंदगी सें, आनेवाला पल, रिमझिम गिरे सावन, हमें तुमसे प्यार कितना, होगा तुमसे प्यारा कौन, हम दोनो दो प्रेमी अशा एकाहून एक सरस गीतांनी मैफलीत चांगलीच रंगत आणली. गायिका रागिणी कामतीकर, मिलिंद धटिंगण व विवेक केळकर यांनी गीतांचे अप्रतिम सादरीकरण केले.

विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, फ्रवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

मैफलीला साथसंगत प्रमोद पवार (हार्मोनिअम), कन्हैय्या खैरनार (की-बोर्ड), कृष्ण प्रसाद अय्यर (लिड गिटार), नीलेश सोनवणे (बास गिटार), मनोज गुरव (बासरी), अभिजीत शर्मा (ड्रम), शुभम जाधव (ऑक्टोपॅड), फारूक पिरजादा (टुंबा ढोलक), स्वरांजय धुमाळ (काँगो तबला), महेंद्र फुलफगर (परक्युशन) यांनी केली व ध्वनीव्यवस्था तुषार बागूल यांची होती. राजश्री मनोज शिंपी व दीपांजली नितीन महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विश्वास ठाकूर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवाडा पोलिस स्टेशन होणार ‘स्मार्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट पोलिस स्टेशनअंतर्गत सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या इमारतीचा विस्तार व इतर पायाभूत सुविधांसाठी निधीची जमवाजमव सुरू आहे. डीपीडीसीसह आमदार निधींची तरतूद केली जात असून, लवकरच काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

पोलिस स्टेशनमध्ये चालणारी कार्यपद्धती सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. एखाद्या कार्यक्रमाची परवानगी असो की गुन्ह्याचा तपास, यातून पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक ही चिंतेची बाब मानली जाते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिस दलाला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन, तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच अनुषंगाने गृह विभागाने ‘स्मार्ट पोलिस स्टेशन’ ही संकल्पना पुढे आणली आहे. सर्व कर्मचाऱ्यांकडे कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन असावेत, तसेच त्यांना इंटरनेट वापरण्याचे कौशल्य अवगत असावे, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. कागदपत्रांची जागा सॉफ्ट कॉपीने घेतली की कामकाजही गत‌िमान होईल. तक्रारदाराला किंवा अर्जदाराला पोलिस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत, हा त्यामागील उद्देश आहे. आजही कार्यक्रमाची, साउंड सिस्टिमची किंवा शस्त्र परवान्याचे अर्ज नागरिकांना प्रत्यक्ष सादर करावे लागतात. वास्तव‌िक हे काम ऑनलाइन शक्य आहे.

ऑनलाइन तक्रारी सुरू

स्मार्ट पोलिस स्टेशन या संकल्पनेत पोलिस स्टेशनमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचे काम सुरू झाले असले, तरी इतरही अनेक समस्या इंटरनेटच्या स्मार्ट वापराने कमी करता येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलिस स्टेशन स्मार्ट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारवाडा पोलिस स्टेशनला मुबलक जागा उपलब्ध असून, येणाऱ्या निधी अंतर्गत वेगवेगळ्या सुविधा येथे पुरवण्यात येऊ शकतात. एक-एक करीत सर्वच पोलिस स्टेशनमध्ये ही यंत्रणा विकस‌ित करण्यात येणार आहे.


सध्या वेगवेगळ्या माध्यमातून निधीची जमवाजमव सुरू आहे. जेवढा निधी उपलब्ध होईल त्या अनुषंगाने कामे हाती घेऊन पोलिस स्टेशनच्या कामकाजात बदल केले जातील. सरकारवाडापाठोपाठ इतर पोलिस स्टेशनचा विचार करण्यात येईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातूनच स्वच्छतेचा संदेश

$
0
0

मिलिंद कुलकर्णी करणार मालेगावात जागृती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहराला सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे घनकचरा व्यवस्थापन होय. परंतु, कचरा निर्मितीच्या ठिकाणीच यावर उपाय शोधले तर शहरातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. याच विचारातून शहरातील मिलिंद नारायण कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी घरच्याघरी जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प राबविला आहे.

गेली दहा वर्षे अत्यंत साध्या, सोप्या पद्धतीने त्यांनी हा प्रयोग राबवत असून, यामुळे कुलकर्णी यांच्या घराच्या आजूबाजूला परसबागेतील झाडांना सेंद्रिय खत मिळाले आहे. यामुळे पक्ष्यांचा वावरदेखील वाढला असून, घरातील जैविक कचऱ्याची नैसर्गिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याने पर्यावरणाची हानी टाळणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. मालेगाव महापालिकेकडून सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांनी कचरा वर्गीकरण करण्याचे आवाहन केले जात असून, कुलकर्णी यांच्यासारखा पुढाकार नागरिकांनी घ्यावा यासाठी त्यांना स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे ब्रँड अ‍ॅम्बेसिडरदेखील केले आहे. त्यांच्या या प्रयोगातून शहरवासीयांना घरातील कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवणे सहज शक्य होणार आहे.

शहरातील कॅम्प भागात राहणारे मिलिंद कुलकर्णी हे सध्या बँकेत लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील वजीरखेडे येथे त्यांची शेती असून शेती कामामुळे निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाविषयी ते नेहमीच प्रयोग करीत असतात. आपल्या घराच्या आजूबाजूलाही त्यांनी छोटीशी परसबाग उभी केली आहे. गावाकडच्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग केल्यानंतर घरातील परसबागेत तो करावा असा विचार त्यांच्या मनात १० वर्षापूर्वी आला.

शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ची तयारी सुरू असून, त्याअंतर्गत पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी नागरिकांनी कचरा वर्गीकरण करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने कुलकर्णी यांचे प्रत्यक्ष कचरा विघटनाचे प्रयोग नागरिकांना माहिती व्हावे यासाठी त्यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनविले आहे. त्यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू सार्थक दीपक शेलार व किंजल शेलार यांनादेखील यात समाविष्ट केले आहे.

असा आहे घरगुती प्रकल्प

कुलकर्णी यांच्या घराच्या कोपऱ्यात केलेल्या खड्ड्यात माती, शेण, पालापाचोळा टाकून त्यात वर्मी कल्चरचा उपयोग केला. यानंतर घरातील जैविक कचरा यात टाकून त्यावरून पुन्हा पालापाचोळा टाकला जातो. यामुळे गांडूळ तसेच अन्य सूक्ष्म जीवांची निर्मिती होवून कचऱ्याची विल्हेवाट लागते. त्यानंतर तयार झालेल्या हे कंपोस्ट खत आपल्या झाडांसाठी, शेतीसाठी वापरतात. यामुळे जैविक कचरा अन्यत्र फेकला जात असून, त्यातून दुर्गंधी पसरणे, प्रदूषण होणे यास आळा बसण्यास मदत झाली आहे.

व्याख्यानानंतर कल्पनेला चालना

पुणे येथील निसर्गतज्ज्ञ डॉ. उदय भवाळकर यांचे व्याख्यान दरम्यानच्या काळात त्यांनी ऐकले आणि त्यांच्या कल्पनेस चालना मिळाली. त्यांच्या या प्रयोगात त्यांच्या पत्नी श्रद्धा कुलकर्णी, आई शालिनीताई, मुलगा सुकृत यांनीदेखील उत्साहाने सहभाग घेतला. घरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यास त्यांनी सुरुवात केली. घराच्या बाजूलाच एक अडीच फुटाचा खड्डा करून त्यात वर्मीकल्चर म्हणजे कृत्रिम संगोपन किंवा गांडूळच्या किड्यांचे लागवड करण्याच्या वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे घरबसल्या कंपोस्ट खत निर्मिती सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो मैल पायपीटने साक्षरतेचा जयघोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आपल्या भारत देशाला साक्षर करीत विविध राज्यांतील गावागावात जाऊन साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी बंगळुरूचे दोन तरुणांची पायपीट सुरू आहे. ते दोघेही चक्क पायी भारत भ्रमंती करीत तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत साक्षरतेचे धडे देऊन महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी शनिवारी (दि. ३०) मनमाडमध्ये पोहचून त्यांच्या अनोख्या पदयात्रेद्वारे नागरिकांमध्ये साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

आपल्या घरापासून हजारो मैल दूर पायी भटकंती करून साक्षरतेचे प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न साक्षरता अभियानातील मैलाचा दगड ठरणारच आहे. या साक्षरता वेड्या शिलेदारांचे मनमाड रोटरी क्लबतर्फे पदाधिकारी आनंद लोढा, संजय गुगळे, सुभाष गुजराथी, गुरुजीतसिंग कांत, डॉ. धीरज बरडीया, दिनेश बेदमुथा आदींनी स्वागत करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

सुरुवातीला तामिळनाडू व कर्नाटक राज्यात प्रचार करीत नंतर त्यांनी आपला पायी मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. शिर्डीनंतर मनमाडमध्ये शनिवारी (दि. ३०) त्यांनी हजेरी लावली. मनमाडमध्ये येऊन मनमाडच्या नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मुलांशी साक्षरतेविषयी संवाद साधला. तसेच या साक्षरता प्रेमींनी आपला हा साक्षरतेचा मूलमंत्र सर्वदूर पेरण्याची इच्छा पूर्ण केली.

हजारो मैलांचा प्रवास

रविवारी (दि. ३१) मनमाडमध्ये साक्षरतेची ज्योत पेटवून हे ध्येयवेडे तरुण मालेगावमार्गे राजस्थानकडे रवाना झाले. देशातील नागरिक साक्षर करण्याचे हे वेड गावागावात जागृती व प्रबोधन करणारे ठरत आहेत. बंगळुरू येथील साऊथ रोटरी क्लबचे सदस्य असलेल्या रोशन बीएन व अरुण के. या दोघा तरुणांना भारत देश साक्षर करण्याच्या ध्यासाने जणू झपाटून टाकले आहे. त्यामुळे त्यांनी भारतभर पायी फिरून साक्षरतेची गंगा गावागावात नेण्याचा चंग बांधला आहे. ३० ऑक्टोबरपासून हे दोघे तरुण पायी फिरून हजारो मैल पायपीट करीत आहेत.

दररोज ३० किमी प्रवास

भारत देश साक्षर राष्ट्र बनावे, साक्षरतेत भारताचे नाव व्हावे यासाठी तरुणांचा हा पायी अट्टाहास आहे. दररोज ते जवळपास २५ ते ३० किमी प्रवास करतात. सकाळी ६ वाजता हे पायी अभियान सुरू होते तर रात्री साडे दहा वाजता त्या दिवसाचे अभियान ते थांबवतात. महाराष्ट्रानंतर ते राजस्थानला रवाना झाले आहेत. 'इच वन टिच वन' असा ध्यास घेणारे हे दोघे तरुण रोटरीचे भूषण आहेत, अशी प्रतिक्रिया रोटरी मनमाडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मोटार सायकल वा इतर वाहनाने भारतभ्रमण करणारे सर्वदूर आढळतात मात्र साक्षरतेसाठी थेट पायी भारतभ्रमण करणाऱ्या या दोघा तरुणांचा सामाजिक उपक्रम लक्षवेधी ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरची विकासकामे कागदावरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध पुरस्कार मिळविणाऱ्या भगूर नगरपालिकेतील काही नागरिकांना अद्याप उघड्यावरच लोटा परेड करावी लागते त्याचप्रमाणे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भगूर नगरपालिकेची विकासकामे केवळ कागदावरच आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भगूर नगरपालिकेत स्वच्छता सर्वेक्षण सुरू असून, त्यासाठी दिल्ली येथून काही अधिकारी पाहणी करून गेले. मात्र, त्यांना हा सर्व्हे करताना शहरातील मोजक्याच भागात नेऊन पाहणी दौरा संपविण्यात आला. भगूरमधील समस्या त्यांना दाखविण्यात आल्या नाहीत. दरम्यान, शहरात स्वच्छतेच्या व मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला असून, जनता त्रस्त आहे. पत्रकार परिषदेत भगूरच्या चारही बाजूने घाणीचे साम्राज्य असलेले पुरावे छायाचित्राच्या माध्यमातून त्यांनी सादर केले. शहरात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, उघडे नाले, नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयात पालिकेचा अधिकृत डॉक्टर नाही. सावरकर उद्यानाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. आधी गांडूळ खत प्रकल्प ज्या ठिकाणी होता, त्याच ठिकाणी कुठल्याही ओल्या-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण न करता तेथे सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला आहे. तेथे प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच नजरेस पडतो. केंद्र व राज्य सरकारकडून येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी हा गावाच्या विकासासाठी आलेला असतो. मात्र, त्याचा वापर कशाप्रकारे होतो, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही.

अॅपही निरुपयोगी

नागरिकांना जे अॅप मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे, ते वापरताच येत नाही. त्याच्या आधारे आरोग्याच्या समस्या सोडविल्या जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत बलकवडे यांनी ही नागरिकांची दिशाभूल असल्याचे सांगितले. एकाच रस्त्याची वारंवार कामे केली जाऊन निधीचा गैरवापर केला जात आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एकूणच भगूर नगरपालिका हद्दीत सामान्य नागरिकांना होणार त्रास सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का, असे एक ना अनेक आरोप त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेदरम्यान विशाल बलकवडे, मोहम्मद मुन्ना अन्सारी, पूनम बर्वे, रुपाली व्यवहारे आदी उपस्थित होते.


आरोप करणाऱ्या व्यक्ती या राजकीय दृष्ट्या अपरिपक्व आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सखोल माहिती घेऊन आरोप करावेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. विरोधकांचे आरोप करणे हे काम आहे. कोणत्याही आरोपांवर उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत

- विजय करंजकर, जिल्हाप्रमुख शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी हवेत बहुभाषिक फलक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

‘नदीपात्रातील पाण्याचे प्रदूषण करू नये’ अशी सूचना करणारे फलक गोदापात्राच्या परिसरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. महापालिकेने लावलेले हे फलक मराठी भाषेत असल्यामुळे ते परराज्यातील भाविकांना आणि पर्यटकांना समजत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून गोदापात्रात प्रदूषण झाल्याचे प्रकार घडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या वेळी हा फलक आम्हाला वाचता येत नाही. हे फलक हिंदी आणि इंग्रजी या भाषेतही असावेत, असा आग्रह त्यांच्याकडून होत आहे.

गोदापात्रात विशेषतः रामकुंडात स्नान केल्यानंतर भाविक तेथील पाण्यातच कपडे धुण्याचा प्रयत्न करतात. महापालिकेने येथे नेमलेल्या सुरक्षारक्षकांकडून त्यांना कपडे धुण्यास विरोध केला जातो. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यावेळी दंड भरण्यास हे भाविक नकार देतात. आम्हाला हा नियमच माहीत नसल्याचे सांगतात. तेव्हा येथील आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक त्यांना येथे महापालिकेने लावण्यात आलेला फलक दाखवतात. तो फलक बघून परराज्यातील भाविक आणखी संताप व्यक्त करीत हा फलक आम्हाला वाचता येत नाही. आम्हाला वाचता येईल, अशा हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात यावेत अशी त्यांच्याकडून मागणी केली जात आहे.

नाहक भुर्दंड

गोदाघाट परिसरात कपडे धुणे, भांडी घासणे, वाहने धुणे आदी प्रकार आलेल्या भाविकांना या विषयी माहिती नसल्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ही कारवाई करताना दंड भरण्यास त्यांच्याकडून विरोध केला जातो. दंडात्मक कारवाई करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे भाविक जुमानत नसल्याचे दिसते. त्यामुळे अशा कारवाईसाठी या कर्मचाऱ्यांना पोलिसांची मदत घेण्याची वेळ येते. धार्मिक स्थळावर असे प्रकार घडत असल्याची नाराजी परराज्यातील भाविकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. मराठीप्रमाणेच हिंदी आणि इंग्रजीतूनही असे फलक लावण्यात आल्यास हे वाद विकोपास जाणार नाहीत, असे भाविकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या समर्थनार्थ उद्या जिल्हाभर निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर अन्याय होत असून, त्यांची तुरुंगातून त्वरित सुटका करण्यात यावी यासाठी भुजबळ यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. २) संपूर्ण जिल्हाभर निदर्शने करण्यात येणार आहेत.

याबाबत देवळा तालुक्याच्या वतीनेही सदरच्या निदर्शन आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांनी केले आहे. याबाबत कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. ३०) देवळा येथील दुर्गा माता मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांना गेल्या बावीस महिन्यांपासून बेकायदेशीररित्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. त्याबाबत देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पाच कंदील येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस मनोहर खैरनार यांनी केले. या वेळी जगदीश पवार, जितेंद्र आहेर, उदयकुमार आहेर, अतुल आहेर, सुनील आहेर, राजेश आहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कवितेच्या गाण्यांवर रसिकांचा ठेका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कविता स्वरबद्ध करून त्याचे गायन सादर करीत असताना कवितेचे गाणे होतानाचा प्रवास डॉ. सलील कुलकर्णी यांनी उलगडला. ही मैफल एकतर्फी न होता रसिकही कळत-नकळत मिसळून गेले आणि त्यांनी तालासुराचा ठेका धरला. यामुळे मैफलीला वेगळाच रंग चढला. विं. दा. करंदीकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, सुरेश भट आदी कवींच्या कविता स्वरबद्ध करून त्यांचे सादरीकरण करताना त्या कवितांमागील तत्त्वज्ञानही सलील यांनी विशद केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी ‘कवितेचे गाणे होताना’ या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या मैफलीची सुरुवात संतरचनेने झाली. आई ही केवळ नाते नाही, तर ती संकल्पना असल्याचे सांगत कवीवर्य विं. दा. करंदीकर यांच्या ‘पुन्हा वाटते’, तसेच ‘इवले बाळ होऊन कुशीत यावे’ या कवितेचे सादरीकरण करताना माणूस जसजसा मोठा होत जातो, तसतसे त्याला असुरक्षित वाटू लागते असे सांगत आईच्या कुशीचे महत्त्व सांगितले.

शुंभकर सलील कुलकर्णी याने गायलेल्या ‘एकटी एकटी घाबरली ना, वाटलं होत आई’ या गीताचे सादरीकरण करीत असताना रसिकांनीही सुरात सूर मिसळत ताल धरला. लहान मुलांची गाणी लहान होऊन गाता आले पाहिजे. कितीही मोठे झालो तरी विषय ताजा वाटत राहतो. ‘विं. दा.’ यांच्या ‘एका माकडाने काढलं दुकान’ तसेच पाडगावकरांच्या ‘एका माणसाची दाढी किती मोठी’ या कवितेने कशी धमाल उडविली होती, त्याचे अनुभव कथन केले.

आजी-आजोबांच्या नात्यांविषयी सांगताना नातवंडांचे फक्त लाड करणे त्यांना माहित असते. त्यांच्याकडून त्यांना काही अपेक्षा नसते. आजी-आजोबांच्या संवादाच्या कवितेचे गाणे होते. हळवी झालेल्या आजीला आजोबा समजावतात, ‘पिलास फुटून पंख घरटी झाली कुठे कुठे’ या कवितेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. बा. भ. बोरकरांची ‘तव नयनांचे दल हलले गं’ हे प्रेमगीत भावले.

उत्स्फूर्त चालींतून गायन

रसिका जोशी-भिडे हिने ‘सजन दारी उभा काय आता करू’ हे गीत सुरेल आवाजात सादर केले. कार्यक्रम सुरू असताना उत्स्फूर्त सुचलेल्या कवितांना चाल देत त्यांचे गायन करताना संवादिनीवर त्याचे सूर देता देता मधूनच एखाद्या लोकप्रिय गीताची धून वाजविण्याचा केलेला प्रयत्न रसिकांना भावला आणि त्याच सुरातून ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ या गाण्याचे गायन रसिकांनी केले. कुसुमाग्रज हे कसे तत्ववेत्ते होते हे त्यांच्या कवितांचे सादरीकरण करीत त्याचे अर्थातून स्पष्ट केले. आदित्य आठल्ये (तबला), रितेश ओहोळ (गिटार), राजेंद्र दूरकर (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू-वर सूचक मंडळांकडून लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाह जमणे सध्याच्या काळात मोठी समस्या बनली असून, या संधीचे सोने करून घेण्यासाठी वधू-वर सूचक मंडळांनी कंबर कसली आहे. गरजवंत पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारून लूट करण्याचा धंदा अनेक मेळाव्यांमधून होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात अनेक विवाह मंडळे वधू-वर मेळावे भरवत असून, लोकांकडून हजारो रुपये उकळत असल्याची बाब समोर आली आहे. यात काही मेळावे हे ज्ञाती बांधवांकडून भरवले जात असल्याने त्या मेळाव्यांना फी कमी आकारली जाते. मात्र, काही मेळावे हे खासगी वधू-वर सूचक मंडळांकडून भरवले जात असून, त्यात विविध आमिषे दाखवून पैसे लाटण्याचे प्रकार सुरू आहेत. खासगी मंडळांकडून साडेतीन हजार रुपये पासून ते १० हजार रुपयांपर्यंत पॅकेजेस ठेवण्यात आली आहेत. त्यात वधू-वराचा फोटो वेबसाइटवर टाकला जाईल व वधू-वरांना अपेक्षित असलेली शंभर स्थळे दाखविण्यात येतील, मेळावा झाल्यानंतर मेळाव्याला उपस्थित असलेल्या वधू-वरांचे मासलिक देण्यात येईल असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही होतांना दिसत नाही. वधू-वरांचे पालक अपेक्षेपोटी पैसे भरतात मात्र त्यांच्या पदरी निराशा येत आहे. जोपर्यंत लग्न जमत नाही तोपर्यंत पाल्याचे नातेवाईक वधू-वर मंडळांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवतात. पालक आल्यानंतर संचालक कुठल्यातरी वधू-वरांची यादी हातात देतात. त्यातील निम्म्या वधू-वरांची लग्ने झालेली असतात, अशा रितीने पालकांची फसवणूक सुरू आहे.

मी बाहेरगावाहून वधू-वर मेळाव्याला आलो आहे. मेळाव्याची फी अडीच हजार रुपये आहे. मेळाव्याला हजार लोक येतील, असे सांगितलेे. प्रत्यक्षात येथे फारच कमी लोक आले आहेत. आजपर्यंत हजारो रुपये मेळाव्यांमध्ये खर्ची घातले आहेत.

- एका मुलीचे पालक

विवाह संस्थेमध्ये नोंदणी करताना, ती संस्था नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. काही विवाह संस्था कमिटमेंट करतात परंतु, त्याची अंमलबजावणी करीत नाही. याकरिता आयएसओसारख्या मानांकन मिळालेल्या ऑनलाइन पोर्टलची निवड करावी.

- संजय लोळगे, संचालक अनुरुप विवाह संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएमआयसीच्या पहिल्या टप्प्याला २०१९चा मुहूर्त

$
0
0

नाशिक ः अब्जावधींच्या गुंतवणुकीची खाण ठरणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडॉरचा (डीएमआयसी) पहिला टप्पा २०१९च्या मध्यावधीत पूर्ण होणार आहे. सहा राज्यांमध्ये या कॉरिडॉरअंतर्गत औद्योगिक शहरे विकसीत होत असून याठिकाणी लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून कॉरिडॉरला चालना दिली जात असून, परकीय गुंतवणुकीचे वेध कॉरिडॉरला लागले आहेत.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने घोषित केलेल्या कॉरिडॉरचे काम महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या सहा राज्यांमध्ये सुरू आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर विकास प्राधिकरणाच्या (डीएमआयसीडीसी) माध्यमातून त्या-त्या राज्यांमधील औद्योगिक महामंडळांसोबत कॉरिडॉरच्या कामाला गती दिली जात आहे. २०१८मध्येच पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, विविध कारणांमुळे आता हे काम २०१९च्या मध्यात पूर्ण होणार आहे. गुजरातच्या ढोलेरा येथील २२.५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर, ग्रेटर नोएडा येथे ७४७ एकरवर तर मध्यप्रदेशातील उज्जैन जवळील विक्रम उद्योगपुरी येथे ११०० एकरावर औद्योगिक शहर विकसीत केले जात आहे. औरंगाबाद येथे शेंद्रा-बिडकीन येथील ४० चौरस किलोमीटर क्षेत्रावरील पायाभूत सोयी-सुविधा पूर्णत्वाच्या मार्गावर असून, ढोलेरा आणि औरंगाबाद हे २०१९ मध्ये सज्ज असतील असे, डीएमआयसीडीसीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आल्केश कुमार शर्मा यांनी ‘मटा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

शेंद्रा औद्योगिक वसाहत ८.३९ चौकिमीवर विकसित होत असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसीने) त्याची जागा हस्तांतरीत केली आहे. तर, बिडकीन औद्योगिक वसाहतीतील ३२ चौरस किमीपैकी १०.१६ चौरस किमी जमीन एमआयडीसीने उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी एकूण चार टप्प्यात काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कंत्राटदारामार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यांवरील पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या प्रगतीपथावर आहे. ऑरिक सिटीमध्ये अत्याधुनिक बिल्डींग आणि हॉल साकारला जात आहे, असे शर्मा म्हणाले.

जागतिक ब्रँडिंग

कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असतानाच आम्ही त्याचे जागतिक पातळीवर ब्रँडिंग करीत आहोत. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून सहाही राज्यातील औद्योगिक शहरांमध्ये गुंतवणूक आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच देशातील विविध औद्योगिक प्रदर्शनांसह पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौरे आणि परदेशातील औद्योगिक कार्यक्रमांमध्ये आम्ही मार्केटिंग करीत आहोत. कॉरिडॉरमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्षात गुंतवणूक येऊन उद्योग साकारले जातील. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये आम्हाला १०० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. ‘मेक इन इंडिया’मुळे ते शक्य होईल, असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात कॉरिडॉरसाठी निधीची तरतूद होईल, असा आशावादही शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

कॉरिडॉरचा पहिला टप्पा २०१९च्या मध्यावधीत पूर्ण करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याची अंमलबजावणीही सुरू आहे.

- आल्केश कुमार शर्मा, सीईओ व एमडी, डीएमआयसीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांसाठी नाकाबंदी

$
0
0

शहरात पोलिस बंदोबस्त तैनात; वाहनचालकांची तपासणी

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी दक्षता घेत शहर पोलिसांनी तैनात केलेल्या शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात तरुणाईने जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करण्यात आली होती.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, सर्व सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त असला तरी कॉलेजरोड, गंगापूररोड आणि शहरातील मध्यवस्तीत तरुणांनी जल्लोष करीत गतवर्षाला निरोप दिला. प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीमध्ये फिक्स पॉइंट देऊन नाकाबंदी करण्यात आली होती. दुसरीकडे चार वाहतूक पोलिसांच्या युनिट्सनेही ठिकठिकाणी तपासणी मोहीम हाती घेऊन मद्यपी वाहनचालकांवर लक्ष केंद्रीत केले. यासाठी १३ ब्रेथ अॅनालायझरचा वापर करण्यात आला. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोज‌ति करण्यात आलेल्या मोठ्या कार्यक्रमांजवळ पोलिसांची गस्तही सुरू होती. याशिवाय निर्भया पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या तसेच मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर आणि हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कोठेही अनावश्यक गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाते आहे. पोलिस स्टेशननिहाय नाकाबंदी तैनात करण्यात आली असून, मद्यपी वाहनचालकांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात तीन दिवसांपूर्वी काही तासांत तिघांची हत्या झाली होती. शनिवारी रात्री एका व्यापाऱ्यालादेखील लुटण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोर चढवल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्याने कारवाईचा आकडा समोर येऊ शकला नाही.

बच्चे कंपनीची पार्टी’

लहान मुलांची पार्टी टेरेसवर रंगली होती. काहीही झाले तरी आम्ही पार्टी करणारच, असा हट्टच मुलांनी धरल्याने पालकांनीही त्यांना संमती दिली. त्यामुळे अनेक भागात बच्चे कोल्ड ड्रिंक पार्टी अपार्टमेन्टच्या टेरेसवर रंगली होती.

चिकण, मटणचे वाढले दर

मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी मटण व चिकणचे दर वाढवले होते. काही विक्रेत्यांनी नववर्षाची संधी साधत किलोमागे सरासरी वीस ते पन्नास रुपये दर वाढविले होते.

कॉलेजरोडवर बंदोबस्त

नाशिक शहरात कॉलेजरोडवर संध्याकाळपासून नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. संध्याकाळी परिसरात रंगीबेरंगी फुगे विकण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. पाणीपुरी, दाबेलीवर ताव मारत अनेक युवक-युवतींनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यात काही रायडर्स परिसरात सुसाट गाड्या फिरवत लोकांचे लक्ष वेधून घेण्याच प्रयत्न करीत होते. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले.

घरातच रंगल्या पार्ट्या

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी कडक कारवाई करण्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केल्यामुळे धास्तावलेल्या अनेक तळीरामांनी घरीच पार्टी करण्याचा बेत आखला. अनेकांनी बिअर बार सोडून वाइन शॉप गाठले. त्यामुळे शहरातील सर्वच वाइन शॉपवर गर्दी होती. आपल्या कुटुंबासह अनेक लोक नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी नातेवाईकांच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारात एकत्रित जमले. सेलिब्रेशन करण्यासाठी गच्चीवर ताल धरीत युवक-युवतींनी नृत्याचा धमाल आनंद घेत नववषाचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरत्या वर्षाने दिलेल्या कडू-गोड आठवणींचे संचित हृदयाच्या कुपीत अलगद जपून ठेवत २०१७ या वर्षाला अलविदा करण्यात आले. रविवारची सुटी आणि ‘थर्टी फर्स्ट’ असा दुहेरी योग जुळून आल्याने प्रत्येक क्षण भरभरून जगण्याचा जणू प्रत्येकाने चंगच बांधला होता. एकमेकांवर शुभेच्छांची उधळण करीत अन् स्नेहीजणांच्या सानिध्यात नाशिककरांन‌ी नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत केले.

सरत्या वर्षाला आनंदाने अलविदा करण्याचा आणि नवीन वर्षाचे सुहास्यवदने स्वागत करण्याचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर! कटू-गोड आठवणींचा हिशेब मांडण्याचा आणि नव्या स्वप्नांना नवे आयाम देण्याचा दिवस. यंदा ३१ डिसेंबर आणि रविवार असा दुहेरी योग जुळून येणे म्हणजे अबालवृद्धांसाठी दुग्धशर्करा योगच. त्यामुळे उत्साह द्विगुणीत होणे ओघाने आलेच. नवीन वर्षाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्याच्या प्रथेने नाशिकमध्येही चांगलेच बाळसे धरले आहे. नाताळच्या सुट्या सुरू होताच अबालवृद्धांना ‘थर्टी फर्स्ट’चेही वेध लागतात. थर्टी फर्स्ट रविवारीच आल्याने तरुणाईच्या उत्साहाला भरते न येईल तरच नवल! कुटुंबीय, नातलग तसेच मित्र परिवारासमवेत हा दिवस सेलिब‍्रेट करण्याचे नक्की झाले. काहींनी सेलिब्रेशनसाठी नाशिकबाहेर जाण्यास पसंती दिली, तर काहींनी दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात रमत सायंकाळी शहरातच नववर्षाचे वेलकम केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. तरुणाईचा उत्साह अधिक ओसंडतो तो कॉलेजरोड आणि गंगापूर रोड परिसरात. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तरुणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहावयास मिळाले. बालाजी मंदिर, सोमेश्वर, पांडवलेणी, दादासाहेब फाळके स्मारक, नेहरू गार्डन, प्रमोद महाजन उद्यान, सिटी गार्डन अशी विविध ठिकाणे गर्दीने फुलून गेली. त्र्यंबकेश्वरसह, पंचवटी, वणी या धार्मिक स्थळांवरही अनेकांनी धाव घेतली. ठक्कर डोम येथे भरविण्यात आलेल्या खान्देश फेस्ट‌िव्हललाही नागरिकांनी मोठी गर्दी केली.

हॉटेल्स फुल्ल

एन्जॉयमेंट आणि खाद्यभ्रमंती यांचे अतूट नाते आहे. किंबहुना मनसोक्त खाणे यालाही एन्जॉयमेंट समजण्याचा ट्रेंड नाशिकमध्येही चांगलाच रुळला आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहरातील बहुतांश हॉटेल्स गर्दीने फुलून गेली. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी पहावयास मिळाली. अनेक हॉटेल्समध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीची तिकिटे, बु‌किंग मिळविण्यासाठ‌ी ऑनलाइन सेवांचीही मदत घेण्यात आली. अनलिमिटेड फूड आणि ड्रिंक्सची ऑफर देणाऱ्या पार्ट्यांना अधिक पसंती मिळाली. रुफटॉप लाऊंज, लाइव्ह बॅण्ड आणि डान्स फ्लोअरसह मास्करेड बॉल, फूड कॅसिनो अशा हटके संकल्पना यंदा शहरात सेलिब्रेशनसाठी राबविण्यात आल्या. सुफी नाइट, शाम ए गझल यांसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांनीदेखील हा दिवस अधिकच यादगार बनविला. फूड स्ट्रीटलाही काहींनी पसंती ‌दिली तर अनेकांनी घरीच कुटुंबीयांसमवेत या दिवसाचा आनंद लुटला. वाइन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये विन‌ियार्डसचे कल्चरही नागरिकांना भावू लागले आहे. त्यामुळे येथेही नववर्षाच्या स्वागताची धूम होती.

सोशल मीड‌ियावर शुभेच्छांची उधळण

व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीड‌ियाची शुभेच्छांच्या देवाण घेवाणीसाठी मोठी मदत होऊ लागली आहे. आप्तस्वकीय, स्नेहीजण, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना नववर्षाच्या स्नेहमय शुभेच्छा देत नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


‘स्ट्रीट फूड’ला पसंती

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये खाद्यप्रेमींची जत्रा भरलेली असतेच. परंतु, हल्ली स्ट्रीट फूडमध्येही मिळत असलेल्या नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पसंती दिली जात आहे. याचेच चित्र ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात दिसून आले. पावभाजीपासून चटपटीत सँडविचेस, मोमोज, चायनीज पदार्थांवर नाशिककरांनी ताव मारला.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन जगभरात उत्साहात केले जाते. नाशिकमध्येही हॉटेल्स सज्ज झालेले असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी म्युझिकल नाईट, विविध ऑफर्स अशी जोरदार तयारी हॉटेल्सकडून केली जाते. मात्र, याबरोबरच गर्दी, वेटिंगचा सामनाही करावा लागतो. हे टाळण्यासाठी तसेच कमी खर्चात परंतु, आनंदात सेलिब्रेशन करण्यासाठी स्ट्रीट फूडकडेही यावेळी कल दिसून आला. कॉलेजियन्स, मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स यांची पसंती येथे जास्त दिसून आली. स्ट्रीट फूडमध्ये स्वच्छतेबाबत अनेक शंका उद््भवत असल्याने माहित असलेल्या ठिकाणीच जाण्यास खवय्यांनी पसंती दिली. शहरात मोठमोठे हॉटेल्स उभे असतानाही स्ट्रीट फूडला मिळालेल्या पसंतीमुळे येथील आर्थिक उलाढाल या विक्रेत्यांसाठीही नवीन वर्षाचे स्वागत आनंददायी ठरले.

सेलिब्रेशनला वाइनची झिंग
वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी वाइनचा आस्वाद घेत नववर्षाचे सेलिब्रेशन केले. नाशिककरांबरोबर बाहेरगावहून आलेल्या पर्यटकांनाही येथील वाइनने भुरळ घातली आहे. गंगापूर रोडवरील वायनरींमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेत अनेकांनी रेड, व्हाइट वाईनचे पेग रिचवले. शहरातल्या विविध हॉटेल्समध्येही वाइनला चांगली मागणी होती. त्याचबरोबर वाइन शॉपमधूनही चांगलीच विक्री झाली.

दारू व बीअर न पिणाऱ्यांनी वाइनला पसंती दिल्यामुळे त्याच्या विक्रीतही वाढ झाल्याचे बोलले जात आहे. १९९९ नंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वायनरी सुरू झाल्या. त्यानंतर जगभर नाशिकच्या वाइनचे मोठे ब्रँडिंग झाले. या ब्रँडिंगमध्ये वाइन उत्सवही प्रचंड लोकप्रिय होऊ लागला. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या पार्टीत वाइनला पसंती मिळाली आहे. याअगोदर परदेशातच वाइनची चलती होती. येथे मोठ्या प्रमाणात उत्सवामध्ये वाइनची मागणी असते. पण, भारतात वाइन फारशी लोकप्रिय नव्हती. नाशिकने वाइन लोकप्रिय केल्यानंतर आता त्याची मागणीही वाढली आहे. रविवारी ठिकठिकाणी सुरू असलेल्या नवर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये वाइन दिसत होती.

वर्षात ४७ हजार लिटर विक्री
सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री सुरू करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात देशी, विदेशी व बीअर विक्रीत घट झाली होती. मात्र, वाइनविक्रीत वाढ झाली होती. गेल्या आर्थिक वर्षात ४७ हजार ३०६ लिटर वाइनची विक्री झाली आहे. आता नव्या वर्षाच्या आकड्यांमध्ये त्यात भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images