Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मनुष्यजीवनावर वास्तुशास्त्राचा प्रभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वास्तुशास्त्र या विज्ञानाचा हजारो वर्षांपूर्वी विस्तृतपणे भारतीय संस्कृतीत अभ्यास केला गेला आहे. वास्तुशास्त्र हे वैदिक शास्त्र असून, वास्तुशास्त्राची निर्मिती मानवी कल्याण व जीवन समर्थ करण्यासाठी झाली आहे, असे प्रतिपादन वास्तुविशारद जयंत बोधे यांनी केले.

आयादि वस्तू व ज्योतिष मार्गदर्शनतर्फे झालेल्या दोन दिवसीय सेमिनारमध्ये बोधे बोलत होते. महाशक्ती ही कालीच्या स्वरूपात, तर शिव हे रुद्र स्वरूपात आल्यामुळे, तसेच प्रारब्धातील संचित कर्मानुसार तयार झालेल्या पत्रिकेमुळे वास्तुदोष तयार होतात. जग हे दोन तत्त्वांमध्ये विभागले गेले आहे आणि ती तत्त्वे म्हणजे शिव आणि शक्ती ही होत, असेही ते म्हणाले. ज्योतिष व वास्तूविषयी आयोजित या सेमिनारमध्ये वास्तुविशारद बोधे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अनेक उपायदेखील सांगितले. याबरोबरच अंकशास्त्र ही एक गूढ विद्या आहे, असेही ते म्हणाले. वास्तुविशारद शुभांगिणी पांगारकर यांनी भूगर्भातील अशुद्ध ऊर्जा याविषयी मार्गदर्शन केले. ऑफिस व प्लॉट यांची वास्तू निवड याविषयी सागर गोसावी यांनी मार्गदर्शन केले. वास्तुविशारद श्यामला वाघ यांनी वास्तुशास्त्रात रंग व चित्र या उपायांनाही महत्त्व आहे, असे सांगताना स्वतः तयार केलेले चित्रकर्म उपस्थितांसमोर ठेवले. श्यामला वाघ यांनी सूत्रसंचालन केले. भावना बोधे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारनगरला मोबाईल दुकानात चोरी

$
0
0

मोबाइल दुकानात चोरी

सातपूर : सातपूर भागातील कामगारनगर येथे मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी १२ लाख रुपयाचे महागडे मोबाइल लंपास केले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगारनगर येथील मोबाइल एक्सपर्टिजचे दुकान असून, शुक्रवारी (दि. १२) रात्री शटरचा पत्रा वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

दुकानातील आयफोन, समसंग या कंपनीचे महागडे ८९ मोबाइल व एक लॅपटॉप असा १२ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. चोरीची घटना

सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भावेश दुगड यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजयकुमार मगर, सहायक आयुक्त सचिन गोरे, पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागातील गुन्ह्यांची संख्याअहमदनगर १८०८नाशिक

$
0
0

विभागातील गुन्ह्यांची संख्या

अहमदनगर १८०८

नाशिक १७२५

जळगाव ११००

धुळे ६५८

नंदुरबार ३८०

एकूण ५६७१

(खून, खुनाचा प्रयत्न, दंगे, दुखापत, सरकारी नोकरांवर हल्ला या गुन्ह्यांची एकत्रित आकडेवारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनाचा प्रयत्न; तिघांना कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी तिघा संशयितांना एक वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. ही घटना २७ एप्रिल २०१४ रोजी अमरधामरोड येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती.

अमर कृष्णकांत जंजाळ (२७), विवेक कृष्णकांत जंजाळ (२३) आणि योगेश भाऊसाहेब अमोलिक (२५) अशी शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील अमरधामरोडवर आरोपींचे आणि फिर्यादीचे भांडण झाले होते. जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी शिवीगाळ केल्यानंतर फिर्यादीने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग आल्याने आरोपींनी आपल्याकडील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पाठीवर माने वार केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. के. गायकवाड यांनी केला. सर्व पुरावे संकलित केल्यानंतर या खटल्याची सुनावणी न्यायाधिश शिंदे यांच्या कोर्टात पार पडली. सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी परिस्थितीजन्य पुरावे कोर्टासमोर मांडले. पैरवी सेलचे हवालदार आय. एस. पिरजादे तसेच एस. बी. गोडसे यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. समोर आलेले पुरावे, साक्षीदार या आधारे कोर्टाने तिघा आरोपींना दोषी ठरवत १ वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडीही आता रडारवर

$
0
0

पालिकेच्या नोटीसमुळे स्थानिकांमध्ये रोष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उत्पन्न वाढीसाठी चांगलेच झपाटले असून, त्यांनी महापालिकेच्या जागेवर असलेल्या अंगणवाड्यांनाही नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. कन्नमवार पुलाशेजारी असलेल्या एका अंगणवाडीलाच नाशिक पूर्व विभागाने नोटीस बजावत जागा खाली करण्याचे फर्मान काढले आहे. सात दिवसांच्या आत खुलासा केला नाही, तर अंगणवाडी खाली करण्यासाठी खर्चवसुली करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्वमालकीच्या मिळकतींच्या करात वाढ करण्याबरोबरच नूतनीकरण न झालेल्या मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मनपाच्या जवळपास ९०३ मिळकती असून, त्या ताब्यात घेताना अंगणवाडीसाठी देण्यात आलेल्या मिळकतींना देखील नोटिसा पाठविण्यात येत आहेत. कन्नमवार पुलाजवळील संत गाडगे महाराज वसाहतीच्या सर्वे नं. ३९८ मध्ये अनेक वर्षांपासून अंगणवाडी चालवली जाते. या अंगणवाडीत सध्या ३० ते ३५ विद्यार्थी शिकत आहेत. सध्या महापालिकेने स्वमालकीच्या करार न झालेल्या इमारती ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून, त्यात या अंगणवाडीला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा न झाल्यास अंगणवाडी खाली करून घेताना त्याचा खर्चदेखील वसूल करण्याचे नोटिसीत म्हटले आहे. अंगणवाडी महापालिकेचीच असताना कारवाई झाली तरी पालिका कोणाकडून सदरचा खर्च वसूल करेल, असा प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे. या नोटीस सत्रातून अंगणवाड्याही सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातही आता वॉक विथ कमिशनर

$
0
0

नवी मुंबईच्या धर्तीवर राबविणार उपक्रम; शनिवारपासून प्रारंभ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीच्या निर्णयावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह नगरसेवक आणि विविध संघटनांनी आयुक्तांविरोधात संघर्षाची भूमिका घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता थेट जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंढेंनी येत्या शनिवार (२१ एप्रिल) पासून 'वॉक विथ कमिशनर' उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात आयुक्तांकडे थेट तक्रारी करून त्या सोडविण्याचे जागेवरच निर्देश दिले जाणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, या उपक्रमातून नगरसेवकांच्या प्रभागात जाऊन त्यांनाच राजकीयदृष्ट्या आव्हान दिले जाणार असल्याने आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम चांगलाच हिट झाला होता. नाशिकमध्ये आल्यानतर मुंढेंनेही हा उपक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. आयुक्तांच्या करवाढीच्या निर्णयाने शहरभर वातावरण ढवळून निघाले आहे. आयुक्त मुंढे यांनी केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात येत्या २३ एप्रिलला विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. यात नगरसेवकांकडून आयुक्तांच्या भूमिकेला कडाडून विरोध होणार आहे. त्यामुळे महासभेआधीच आयुक्तांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी, २१ तारखेला सकाळी साडेसहा वाजता अनंत कान्हेरे मैदानावर या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. लोकप्रतिनिधी व आयुक्त यांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे नगरसेवकांचा रोष वाढत असताना थेट जनतेच्या दरबारात जावून त्यांच्या तक्रारी उपक्रमाच्या माध्यमातून सोडविण्याची भूमिका घेतल्याने नगरसेवक विरुध्द आयुक्त संघर्ष वाढणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे.

टोकन घ्यावे लागणार

या उपक्रमाची घोषणा करताना आयुक्तांनी प्रशासनासाठी आचारसहिंता आखून दिली असून, या उपक्रमाचा प्रचार, प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात जिथे जिथे हा उपक्रम होईल, त्या भागात होर्डिंगद्वारे माहिती देण्याचे बंधन घातले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळी सहा वाजेपासून नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहेत. उपक्रम स्थळावर पाच बाय दहा फूट आकाराचा लाकडी स्टेज, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफरची व्यवस्था करणे, विभागनिहाय तक्रारींचे चार्ट तयार करणे आदी कामांचे वाटप करण्यात आले आहे. शनिवारपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून उपक्रमाला सकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ गावांना मिळणार तीन लाखांपर्यंत बक्षीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वॉटर कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन म्हणून दीड ते तीन लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. संबंधित गावांना डिझेलसाठी ही बक्षिसाची रक्कम वापरता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी सोमवारी दिली.

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यात १०० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५१ गावे सिन्नर तालुक्यातील असून, चांदवड तालुक्यातील ४९ गावांचाही या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली असून, ती २४ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने जलसंधारणाचीच कामे होणार आहेत. पाणी अडविण्यासाठी तसेच ते भूगर्भात जिरविण्यासाठीची कामे गावाने स्वयंस्फूर्तीने एकत्रितरित्या करणे अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी निवडलेल्या गावांमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी स्वत: करणार आहेत. या गावांना ते भेट देणार असून, उल्लेखनीय कामे करणाऱ्या गावांना प्रोत्साहन म्हणून दीड ते तीन लाख रुपये इंधनाच्या खर्चासाठी देण्यात येतील, अशी घोषणा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांची धग

$
0
0

टीम मटा

शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला कामगार आणि शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा घोषणांद्वारे निषेध केला. त्याचप्रमाणे महापालिकेने नवीन मिळकतींसह मोकळे भूखंड आणि शेतीवर लावलेल्या भरमसाठ करवाढीविरोधात 'आप'ने महापालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केले, तर 'मनविसे'ने महापालिका प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून निषेध नोंदवला. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता झालेल्या या आंदोलनांची धग शहरवासीयांना दिसून आली.

--

'लाल बावटा' रस्त्यावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. उन्हातान्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला कामगार आणि शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा घोषणाबाजीद्वारे निषेध केला.

सरकारकडे अनेक मागण्या प्रलंबित असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विभागीय मोर्चाची साद दिली होती. मोर्चासाठी नाशिकसह, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर येथून शेकडो महिला आणि पुरुष गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाले. दुपारी एकच्या सुमारास हा मोर्चा गोल्फ क्लब येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. रणरणत्या उन्हात लाल, तसेच जांभळ्या साड्या परिधान केलेल्या महिला, डोक्यावर लाल टोपी, हातामध्ये लाल बावटा व विविध मागण्यांचे फलक घेऊन शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेले शेतकरी व कामगार शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. गोल्फ क्लब मैदान-त्र्यंबक नाका-खडकाळी सिग्नल-शालिमार-नेहरू गार्डन-रेड क्रॉस सिग्नल-एमजीरोड-सीबीएस चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. तेथे प्रवेशद्वारावर सभा घेण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच बैठक मारली. शेतकरी, कामगार, तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

त्यानंतर 'आयटक'चे राज्य सचिव राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने आशा, आशा गटप्रवर्तक, ग्रामरोजगारसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी यांनीही त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनात तुकाराम भस्मे, भास्करराव शिंदे, दत्तात्रय गांगुर्डे, अॅड. राजपाल शिंदे, दत्तू तुपे, व्ही. डी. धनवटे, बाबासाहेब कदम, सुनीता कुलकर्णी, सुवर्णा मेतकर, चित्रा जगताप, माया घोलप आदी सहभागी झाले होते.

...या आहेत प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, वृद्धांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, 'मनरेगा'अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश रोजगार हमी योजनेंतर्गत करावा, आशा, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, ग्रामरोजगार सेवक, घंटागाडी सफाई कामगार, अंशकालीन स्त्री परिचर कामगार आदींना १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे, समृद्धीबाधितांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, 'नारपार'च्या पाणीवाटपात नांदगाव आणि चांदवड तालुक्यांचा समावेश करून समन्यायी पद्धतीने पाणीवाटप करावे, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, आशा व गटप्रर्वतक महिलांना कामाच्या ठिकाणी स्वतंत्र खोली द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, संजय गांधी वृद्धापकाळ पेन्शन रक्कम वाढवावी आणि सरकारी सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे आदी मागण्यांप्रश्नी हे आंदोलन करण्यात आले.

---

'मनसे'चे क्रिकेट खेलो!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळे भूखंड आणि शेतीवर लावलेल्या भरमसाठ कराचे पडसाद शहरात तीव्र स्वरुपात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाविरोधात शहरभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या करवाढीविरोधात शेतकरी संघटित होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पक्षाने थेट रस्त्यावर उतरत करवाढीविरोधात निषेध आंदोलन केले आहे. 'मनसे'च्या विद्यार्थी सेनेच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून करवाढीचा निषेध करण्यात आला.

महापालिका आयुक्तांनी नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्य दरात चारपट वाढ करण्यासह शेतीलाही कर लागू केला आहे. हरित पट्ट्यातील शेती वगळली असली, तरी पिवळ्या पट्ट्यातील शेती आणि जुन्या इमारती व बंगल्याशेजारील सामासिक अंतराच्या जागेत करवाढ लागू केल्याचे आता तीव्र पडता उमटत आहेत. या करवाढीला तीव्र विरोध सुरू झाला असून, शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. पाठोपाठ राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महापालिकेच्या वतीने अवाजवी करवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. शहरातील महाविद्यालये, मराठी शाळेच्या मैदानांवर कर लावल्यास शाळा व महाविद्यालयांकडून तो कर फीच्या स्वरुपात पालकांकडून वसूल केला जाईल. त्यामुळे शिक्षण महागेल अशी भीती व्यक्त करीत, क्रीडांगणे वाचविण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून दरवाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहाराध्यक्ष श्याम गोहाड, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शशिकांत चौधरी, सौरभ सोनवणे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

'आप'ने वाजवले ढोल

महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयास आम आदमी पक्षाच्या वतीने पहिल्या दिवसापासून विरोध करण्यात येत आहे. या करवाढीचा निषेध करण्यासाठी 'आप'च्या वतीने सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. जीएसटीमुळे महापालिकेच्या उत्पादनात घट झाली आहे. जीएसटी अनुदानातील दीडशे कोटी रुपयांची तूट येत असल्याने त्या वसुलीसाठी ही घरपट्टी लादण्यात आली आहे. दीडशे कोटींसाठी पाठपुरावा करण्याऐवजी नाशिककरांकडून ते वसूल केले जाणार आहेत. भाडेकरू असलेल्या मिळकतींवर तिप्पट घर आकारणी केल्यास घरमालक व भाडेकरूंची आर्थिक कोंडी होईल. शाळा, मोकळ्या भूखंडांवरील घरपट्टीत वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार असल्याने आयुक्त स्मशानभूमीलादेखील घरपट्टी लावणार का, असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे. पक्षाचे जितेंद्र भावे, जगबीर सिंग, प्रभाकर वायचळे, स्वप्निल घिया, अनिल कौशिक, विनायक येवले, एकनाथ सावळे, गिरीश उगले-पाटील आदींनी संपूर्ण करवाढ मागे घेण्याची मागणी या आंदोलनावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरू आपले आदर्श असतात

$
0
0

गुरू आपले आदर्श असतात

विजय कौशल महाराज यांचे विचार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गुरू दलाल नसतात, गुरू दयाळू असतात, गुरू आदर्श असतात. गुरू करावे लागत नाही, ते शोधावे लागत नाहीत. त्यांचे दर्शन केले जाते, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथेच्या पाचव्या पुष्पात ते बोलत होते.

गुरूंच्याजवळ बसल्याने मन शांत होते, मनातील प्रश्नांचे समाधान होते, मन प्रसन्न होते, दुर्गुण सोडण्याची इच्छा होते, असे विचार धनदाई लॉन्स येथे सोमवारी (दि. १६) रोजी झालेल्या श्रीरामकथेत विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले. भगवन्त भजन करावेसे वाटते, रडावेसे वाटते, त्यांच्या जवळून उठावेसे वाटत नाही. याशिवाय मोठा गुरू महिमा नाही. प्रभूने मनुष्यास सर्व काही दिले आहे, असेही ते म्हणाले.

प्रेम झाल्यावर मन व्याकूळ होते

शरीर, फळे, फुले, धान्य, सत्संग, दर्शन, तीर्थक्षेत्र असे खूप काही दिले आहे. भगवान प्रतीक्षा केल्याने मिळतो. मात्र, मनुष्य हा परीक्षा करीत बसतो. जसे शबरी प्रभू श्रीरामाची प्रतीक्षा करीत बसली होती. प्रतीक्षा करीत ती म्हातारी झाली होती. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचीच प्रतीक्षा केली जाते, असेही विजय कौशल महाराज यांनी स्पष्ट केले. संबंध होतो तेव्हाच प्रेम होते. ज्याच्याशी प्रेम होते तेव्हा मन बसता, उठता, येता, जाता, बेचैन, व्याकुळ राहते, असेही ते शेवट ते म्हणाले. या कथेतील विविध प्रसंगांना अनुसरून भजन गायनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले होते. भजनांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कसमादेचे प्रश्नसोडविण्यासाठी कटिबद्ध’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

गेल्या अनेक वर्षांपासून 'कसमादे'च्या जनतेने आहेर कुटुंबियांवर प्रेम केले आहे. त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही राजकीय जीवनात सक्रिय आहोत. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी व 'कसमादे'च्या ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

'कसमादे'च्या भूमिपुत्रांची जिल्ह्याच्या व राज्याच्या ठिकाणी विविध पदांवर निवड झाल्याबद्दल रामेश्वर (ता. देवळा) येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, नाशिक मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके-आहेर, महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोशिएशनचे अध्यक्ष विलास बिरारी, नाशिक जिल्हा मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, देवळा बाजार समितीचे सभापती बापू देवरे यांचा रामेश्वर वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलण्यात आला असून आगामी काळात अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरही उतरणार जनआंदोलनात

$
0
0

महापौरही उतरणार जनआंदोलनात

प्रशासनाच्या एककल्ली करवाढीविरोधात लढाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रशासनाने लागू केलेल्या भरमसाट करवाढीविरोधात शेतकरी, तसेच शहरवासीयांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. आता महापौर रंजना भानसी यांनीही याच मुद्द्यावरून जनआंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या आंदोलनाच्या शीर्षस्थानी राहणार असल्याचे त्यांनी 'मटा'च्या व्यासपीठावर स्पष्ट केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाच्या महापौराला जनतेच्या न्यायासाठी आयुक्तांविरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असून, महापौरपदाची धुरा भानसी सांभाळत आहेत. मात्र, आयुक्तपदावर आलेल्या तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीने आता महापौरही वैतागल्या आहेत. मुंढेंनी नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्यात चार पट वाढ करण्यासह जुन्या मालमत्तांच्या सामासिक अंतरावर कर लावण्यासह त्यात शेतीलाही ओढले आहे. त्यावरून सध्या शहरभर रान पेटले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर आता गावठाणमध्येही मोठे आंदोलन उभे राहत आहे. भाजपचा या करवाढीला सुरुवातीपासून विरोध असतानाही आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना न जुमानता करवाढीची अधिसूचना काढल्याने भाजपमध्ये रोष आहे. त्यातच भाजपचे आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आयुक्तांनाही दोन पाऊले माघारी यावे लागले.

महापौर, तसेच सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता प्रशासनाने एककल्ली कारभार चालवला आहे. मालमत्ता करातही प्रशासनाने ३६ टक्के वाढ सुचवली होती. ती मी १८ टक्क्यांनी कमी केली. आताही महासभेची परवानगी न घेता शेतकरी, हॉस्पिटल, शिक्षण संस्था, खुल्या जागांना करवाढीच्या जाळ्यात ओढण्यात आले आहे, जे योग्य नाही. या करवाढीला माझा, माझ्या पक्षाचा आणि संपूर्ण सदस्यांचा विरोध असल्याचे महापौरांनी 'मटा'च्या व्यासपीठावर सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर कर लागू होणार नाही, यासाठी वाटेल ते करावे लागले तरीही ते करण्याची माझी तयारी आहे. प्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागले तरी चालेल असे सांगत, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन दिवसांत बैठक होणार आहे. या ठिकाणी विषय सुटला नाही, तर थेट आमदारांना घेऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांची भेट घेऊ. मात्र, प्रस्तावित करवाढ लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटिसांचा भडिमार, नागरिक बेजार

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यात सध्या नोटिसांचे पेव फुटले असून, विविध घटकांमध्ये खळबळ उडाली आहे. यात जीएसटी चुकवणारे व्यापारी, बेनामी प्रॉपर्टीधारक, तसेच अंगणवाड्या, रुग्णालयांचाही समावेश आहे. जीएसटी न भरल्याने आठ हजार व्यापाऱ्यांना जीएसटी कार्यालयाने ऑनलाइन नोटिसा बजावल्या आहेत. जीएसटीपाठोपाठ महापालिकेनेही व्यापाऱ्यांना दणका दिला असून, एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय नूतनीकरण न करणाऱ्या ३४७ रुग्णालयांबरोबरच, महापालिकेच्या मालकीवर असलेल्या अंगणवाड्यांनाही नोटिसा बजावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

रुग्णालये रडारवर

महापालिकेने ३१ मार्चच्या आत नूतनीकरण न करून घेणाऱ्या शहरातील ३४७ रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयाचे नूतनीकरण केले नसल्याने रुग्णालयात पेशंट दाखल करून घेऊ नये, अशा आशयाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका विरुद्ध डॉक्टर्स असा सामना रंगणार आहे. आतापर्यंत शहरातील ६५४ पैकी २३८ रुग्णालयांनी नूतनीकरण केले आहे.

अंगणवाड्यांनाही वैताग

उत्पन्नवाढीसाठी झपाटलेल्या महापालिकेच्या कचाट्यातून अंगणवाड्याही सुटल्या नाहीत. महापालिकेच्या जागेवर असलेल्या अंगणवाड्यांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. कन्नमवार पुलाशेजारी असलेल्या एका अंगणवाडीलाच नाशिक पूर्व विभागाने नोटीस बजावत जागा रिकामी करण्याचे फर्मान काढले आहे.

व्यापाऱ्यांना दणका

जीएसटी वसूल करूनही तो न भरणाऱ्या जिल्ह्यातील आठ हजार व्यापाऱ्यांना जीएसटी कार्यालयाने ऑनलाइन नोटिसा बजावल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या व्यापाऱ्यांनी रिटर्नही फाइल केलेली नाही. या व्यापाऱ्यांना १५ दिवसांत या नोटिशीला उत्तर देऊन रिटर्न व जीएसटी भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकदाही रिटर्न व जीएसटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जिल्ह्यात १४८६ असल्याची माहिती पुढे आली आहे.

एलबीटीचा पिच्छा सुटेना

महापालिकेने थकीत एलबीटीवरून दोन हजारांवर व्यापारी व उद्योजकांना नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेने पाठवलेल्या या नोटिशीमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांना एलबीटी तत्काळ भरण्याचे निर्देश दिले आहेत. अशा नोटिसा टप्याटप्याने ३५ हजार उद्योजक व्यापारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

सविस्तर वृत्त... २, नाशिक प्लस

नोटिसा

३४७ रुग्णालये

८,००० जीएसटी चुकवणारे व्यापारी

३५,००० एलबीटी चुकवणारे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँडल मार्चद्वारे बलात्काऱ्यांचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम्मू-काश्मीर येथील कठुआ येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले. द्वारका परिसरातील शहीद भगतसिंह चौकातून सुरू झालेल्या भव्य कँडल मार्चमध्ये घराघरातील व्यक्तींनी सहभाग नोंदवत एकजुटीचे दर्शन घडविले. या घटनांमधील दोषींना फासावर लटकवा आणि त्यांना न्याय मिळवून द्या, अशा मागण्या यावेळी मरण्यात आल्या.

'हँग दी रेपीस्ट', 'जस्टीस फॉर आसिफा', अशा घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला या मोर्चाला प्रतिसाद वाढतच गेला. द्वारका परिसरातून निघालेला हा मोर्चा, बागवानपुरा-आझाद चौक-चव्हाटा-बडी दर्गा-शहीद अब्दुल हमीद चौक-चौक मंडई-दूध बाजारमार्गे जुन्या नाशिकमधून मेनरोड येथे पोहचला. मेनरोड येथे संत गाडगे महाराज पुतळा परिसरात मेणबत्त्या प्रज्ज्वलित करून या घटनांचा निषेध करण्यात आला. यावेळी या घटनांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चामध्ये अबालवृद्ध सहभागी झाले. महिला व तरुणांचाही मोठ्या प्रमाणावर यात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज वसुलीचा टक्का वाढला

$
0
0

मालेगाव विभागात जिल्हा बँकेची ३१ कोटी वसुली

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव विभागाची ३१ मार्च अखेर विक्रमी वसुली झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांनी वसुली वाढली आहे. वसुलीचा आकडा २७ टक्क्यांपर्यंत गेला आहे. विभागातील शेतकऱ्यांकडे विविध प्रकारच्या कर्जापोटी ३१ मार्चअखेर एकूण ३१ कोटी ७७ लाख रुपये वसुली झाल्याची माहिती विभागीय अधिकारी गो. पी. निकम यांनी दिली.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा विभागातील शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या मालेगाव विभागाची वसुली वाढली आहे. तसेच बँकेच्या वसुली पथकाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे देखील वसुलीचा आकडा ३१ कोटीपर्यंत गेला आहे. मालेगाव विभागात एकूण ४६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या असून झोडगे, करंजगव्हाण , सायने फाटा, संगमेश्वर, सटाणा नाका, मालेगाव कॅम्प, वसंतवाडी, टिळक रोड व बाजार समिती अशा एकूण ९ शाखांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षातील दुष्काळी परिस्थिती त्यात नोटाबंदी, महागाई, शेतमालास भाव नसणे यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जफेडीबाबत फार प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे गेल्यावर्षी वसुली जेमतेम ७ टक्क्यांपर्यंत गेली होती. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात वसुलीस पात्र मुद्दल एकूण ७९ कोटी २९ लाख इतके होते. त्यापैकी २१ कोटी ५९ लाख वसूल झाले. तर व्याज एकूण १० कोटी ४१ लाख इतके होते. त्यापैकी एकूण १० कोटी १८ लाख रु वसूल करण्यात मालेगाव विभागाच्या वसुली पथकास यश आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी स्वतः मालेगावी बैठक घेवून वसुलीबाबत स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर विभागीय अधिकारी गो. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाने यंदा विक्रमी वसुली केली आहे. मालेगाव विभागात मार्चअखेर वसुली वाढली आहे. या वसुली मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकल, गो. पी. निकम सर्व क्षेत्रीय अधिकारी आदींसह विभागातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले. अद्याप ही थकबाकीदार असेल्यांनी थकीत रकमेचा भरणा करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जमाफी योजनेतून २० कोटी वसूल

मालेगाव विभागातील वाहन कर्जांची संख्या ३३ असून मार्च अखेर ३ टॅक्टर जप्त करण्यात आले. त्यातून ३२ लाख ४० हजार वसूल झाले आहेत. एक रकमी कर्जफेड योजनेत ४५३ सभासदांकडून ३ कोटी वसूल झाले. मालेगाव विभागातील झालेल्या एकूण वसुलीपैकी कर्जमाफी योजनेअंतर्गत २० कोटी २ लाख ४२ हजार एवढी मोठी वसुली झाली आहे.

शासनातर्फे एकरकमी कर्जफेड योजनेस मुदत देण्यात आली असून सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शासनाच्या कर्जमाफी योजने अंतगर्त ७१५ खातेदारांना प्रोत्साहनपर १२ कोटी ४ लाख इतकी रक्कम जमा केली आहे. सभासदांनी थकबाकी वसुलीत प्रशासनास सहकार्य करावे

- गो. पी. निकम, विभागीय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिहा, तुमच्या महिला मंडळाविषयी!

$
0
0

\Bलिहा, तुमच्या महिला मंडळाविषयी!

\B

प्रिय सखी,

आपलंही महिला मंडळ आहे? दर आठवड्याला किंवा महिन्याला सगळे जण भेटतात? विविध प्रकारचे उपक्रम आपण राबवीत असालच! त्याचा प्रत्यक्षात किती जणांना फायदा झाला? आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांसह आपल्या मंडळाची माहिती आपण पाठवू शकता. त्यासाठी अश्विनी कावळे (ashwini.kawale@timesgroup.com) यांच्याशी संपर्क साधावा. अथवा आपल्या मंडळाविषयीची माहिती महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावरही पाठवू शकता. तेव्हा कुठलाही वेळ न दवडता तातडीने आपल्या मंडळाची माहिती पाठवा.

---

(वरील आवाहन सुधारित आहे. जुने घेऊ नये.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


(फोटो) उन्हातान्हात लाल बावटा रस्त्यावर

सिंथेटीक ट्रॅक फॉलोअप फोटो

योगेश परतण्याची अपेक्षा ठरली फोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी, हत्या झाली मालेगाव तालुक्यामध्ये अन खूनाचा उलगडा केला नाशिक शहर पोलिसांनी. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा हा असा हत्येचा उलगडा करण्यात यश मिळाले ते तब्बल तीन वर्षांनी! एका ना एक दिवस योगेश परत येईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना अपेक्षा होती. योगेशची बहिण नाशिक शहर पोलिस दलातच कार्यरत असून, घटनेची माहिती मिळताच त्यांनाही धक्का बसला.

जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ गावापासून २० किलोमीटर दूर असलेल्या एका गावात योगेश पाटील राहत होता. चालक म्हणून वेगवेगळ्या वाहनांवर काम करणाऱ्या योगेशची ओळख मंगरूळ गावातील संशयित आरोपी रुपेश उर्फ भुऱ्या सुरेश पाटील याच्याशी झाली. तीन वर्षांपूर्वी रूपेश आपल्या दोन मित्रांना घेऊन योगेशच्या घरी आला. शिर्डी येथे जायचे म्हणून तो योगेशला घेऊन गेला. प्रवासात दारू पाजून तिघांनी योगेशची झोडगे येथे डोक्यावर पाठीमागून लाकडी दांड्याने वार करून हत्या केली. यानंतर ओळख मिटविण्यासाठी तोंडावर प्रहार करून त्याचा मृतदेह झोडगे परिसरातील त्र्यंबक शिंदे यांच्या विहिरीत फेकून दिला. काही दिवसांनी मृतदेह फुगून बाहेर आला. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली.

मृतदेह खराब अवस्थेत असल्याने एखाद्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असावी, अशी पोलिसांची शंका होती. तसेच मालेगावसह इतर ठिकाणीही या वयाच्या युवकाची मिसिंग दाखल नसल्याने पोलिसांनी काही महिने तपास करून ही केस बंद केली. तिकडे मंगरूळ येथे योगेशच्या पालकांनी त्याची शोधाशोध केली. चालक म्हणून काम करणारा योगेश कधीतरी परत येईल, अशी पालकाची अपेक्षा होती. जळगाव जिल्ह्यातील संबंधित पोलिस स्टेशनमध्येही या प्रकरणी साधी मिसिंग दाखल केली नव्हती. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने मालेगाव तालुका पोलिसांचा थंडावला होता. मात्र, हाती आलेल्या अस्पष्ट माहितीच्या आधारे एपीआय गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाने योगेशच्या हत्येला वाचा फोडलीच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांनंतर खुनाचा उलगडा

$
0
0

वाहनचोरी प्रकरणातील संशयिताकडून गुन्ह्याची कबुली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने केला. वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रुपेश उर्फ भुऱ्या सुरेश पाटील (मंगरूळ, ता. पारोळा, जि. जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे यांना संशयित रुपेशची माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक नीलेश माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे, पीएसआय विजय लोंढे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, पोलिस शिपाई महेंद्र साळुंखे, बाळा नांद्रे, अन्सार सय्यद, यादव डंबाळे, चालक संतोष ठाकूर आदींनी पारोळा गाठून रुपेशला अटक केली. त्याने वाहनचोरीची कबुली देऊन तीन वाहने पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र, संशयितांच्या हालचाली संशयास्पद होत्या. तसेच रुपेशचा एका हत्येच्या गुन्ह्यात सहभाग होता, अशी माहिती एपीआय देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये सर्व पर्याय संपल्यानंतर रुपेशने हत्येची कबुली दिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी आपल्या दोन साथिदारांसह योगेश रमेशसिंग परदेशी (वय २२, मंगरूळ, ता. पारोळा, जि. जळगाव) यांची मालेगाव तालुक्यातील झाडेगे परिसरात हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, युनिटच्या पथकाने पुढील तपास केला असता या प्रकरणी मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

अन्य दोघा संशयितांचा शोध

क्राइम ब्रँचच्या माहितीनंतर मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याची कबुली संशयिताने दिली असली तरी उर्वरित दोन संशयितांना अटक झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही तथ्य समोर येऊ शकतील, असे एपीआय देवडे यांनी सांगितले. मालेगाव तालुका पोलिस उर्वरित दोघा संशयितांचा तपास करीत आहे.

वाहनचोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करताना हत्येचा गुन्हा समोर आला. संशयितांचे राहण्याचे ठिकाण, हत्येचे ठिकाण फार वेगळे अन दूरचे होते. क्लिष्ट स्वरूपाचे हे प्रकरण तीन वर्षांनी सोडवण्यात यश मिळाले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास मालेगाव तालुका पोलिस स्टेशनमार्फत होईल.

- गंगाधर देवडे, सहायक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ठप्प

$
0
0

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ठप्प झाली. या आंदोलनात ८०० हून अधिक आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यात आरोग्यसेविका, आरोग्य सहायक, अकौटंट, डाटा एन्ट्री, आशा समन्वयकांसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या महासंघाने आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले असून, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना महासंघाने म्हटले आहे, की राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध पदावर अधिकारी व कर्मचारी गेल्या १० ते १२ वर्षांपासून कमी पगारावर काम करीत आहेत. आता या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुनर्नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करून पुढील पुनर्नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुनर्नियुक्ती देण्यासाठी कामावर आधारीत मूल्यांकन पध्दत अवलंबली आहे. या बदलामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. यातून भ्रष्टाचारालाही वाव मिळणार आहे. या कामावर आधारीत मूल्यांकनामध्ये अत्यंत जाचक अटी असून, जे काम फक्त कंत्राटी कर्मचारी यांचे नसून, संबंधित संस्थेचे आहे. यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात पुनर्नियुक्तीमध्ये झालेला बदल तसेच, संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांबरोबरच समान काम समान वेतन समायोजन या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन आम्ही करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात आनंद घुगे, शीतल जगताप, मंगेश डावरे, नीलेश आहेर, उध्दव हांडोरे, सुहास पाळदे, सचिन सोनवणे, संतोष नवले यांच्यासह सर्वच पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images